|
श्रीमद् भागवत पुराण भगवत्कृतं सनकादीनां सान्त्वनम्, वैकुण्ठात् जयविजयोः पतनं च - जय-विजयांचे वैकुंठातून पतन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
ब्रह्मोवाच -
इति तद्गृणतां तेषां मुनीनां योगधर्मिणाम् । प्रतिनन्द्य जगादेदं विकुण्ठनिलयो विभुः ॥ १ ॥
ब्रह्मदेव म्हणाले - ( अनुष्टुप् ) योगनिष्ठ मुनी यांनी या परी गायिली स्तुती प्रशंसुनी तयां तेव्हा श्रीहरी बोलला असे ॥ १ ॥
योगधर्मिणाम् - योग व भागवतधर्म यास जाणणारे असे - तेषाम् मुनिनाम् इति गृणताम् - ते ऋषि याप्रमाणे स्तुति करीत असता - वैकुण्ठनिलयः - वैकुण्ठलोक आहे स्थान ज्याचे असा - विभुः - विष्णु - तत् - त्या भाषणाला - प्रतिनन्द्य - आदरून - इदम् - पुढील वाक्य - जगाद - बोलला ॥१॥
ब्रह्मदेव म्हणाले - देवगण हो, योगनिष्ठ सनकादी मुनींनी जेव्हा अशी स्तुती केली, तेव्हा वैकुंठनिवासी श्रीहरींनी त्यांची प्रशंसा करीत म्हटले. (१)
श्रीभगवानुवाच -
एतौ तौ पार्षदौ मह्यं जयो विजय एव च । कदर्थीकृत्य मां यद्वो बह्वक्रातामतिक्रमम् ॥ २ ॥
श्री भगवान म्हणाले- हे दोघे जय विजयो माझे पार्षद हो मुनी । मला न मानिता त्यांनी तुम्हासी अवमानिले ॥ २ ॥
तौ - ते - एतौ - हे - जयः - जय - च - आणि - विजयः - विजय - मम - माझे - पार्षदौ - सेवक - स्तः - आहेत - यत् - जे - माम् - मला - कदर्थीकृत्य - तुच्छ समजून - वः - तुमचा - बहु - पुष्कळ - अतिक्रमम् - अपमान - अक्राताम् - करते झाले ॥२॥
श्रीभगवान म्हणाले - जय-विजय माझे पार्षद आहेत. माझी कोणत्याही प्रकारे पर्वा न करता यांनी आपला मोठाच अपराध केला आहे. (२)
यस्त्वेतयोर्धृतो दण्डो भवद्भिर्मामनुव्रतैः ।
स एवानुमतोऽस्माभिः मुनयो देवहेलनात् ॥ ३ ॥
तुम्ही अनुगतो माझे भक्तही तई या परी । अवज्ञेस तुम्ही दंड दिला तो मान्यची मला ॥ ३ ॥
मुनयः - हे ऋषिहो - माम - मला - अनुव्रतैः - अनुसरणार्या अशा - भगवद्भिः - देवस्वरूपी तुम्ही - देवहेलनात् - देवांच्या अवहेलनेमुळे - यः - जो - दण्डः - दण्ड - धृतः - केला - सः एव - तोच - अस्माभिः - आम्ही - अनुमतः - मान्य केला ॥३॥
हे मुनींनो, आपण माझे एकनिष्ठ भक्त आहात; म्हणून एका परीने त्यांनी ही माझीच अवज्ञा केल्यामुळे आपण यांना जो दंड दिला, त्याला माझी अनुमती आहे. (३)
तद्वः प्रसादयाम्यद्य ब्रह्म दैवं परं हि मे ।
तद्धीत्यात्मकृतं मन्ये यत्स्वपुम्भिरसत्कृताः ॥ ४ ॥
द्विज तो मम आराध्य माझ्या अनुचरे असे । वागले म्हणुनी भिक्षा प्रसन्नार्थिच मागतो ॥ ४ ॥
तत् - यास्तव - वः - तुम्हाला - अद्य - आता - प्रसादयामि - मी संतुष्ट करतो - हि - कारण - ब्रह्म - ब्राह्मण - मे - माझे - परं दैवम् - श्रेष्ठ दैवत होय - यत् - जे - स्वपुंभिः - माझ्या सेवकाकडून - यूयम् - तुम्ही - असत्कृताः - अवमानिले गेला - तत् हि - ते खरोखर - इति - त्यामुळे - आत्मकृतम् - माझेच कृत्य - मन्ये - मी समजतो ॥४॥
ब्राह्मण माझे परम आराध्य-दैवत आहेत. माझ्या सेवकांकडून आपला जो अपमान झाला आहे, तो मी माझ्य़ाकडूनच झाला असे मानतो. म्हणून मी आपली क्षमा मागतो. (४)
यन्नामानि च गृह्णाति लोको भृत्ये कृतागसि ।
सोऽसाधुवादस्तत् कीर्तिं हन्ति त्वचमिवामयः ॥ ५ ॥
सेवकी अपराधाते स्वामीचा मानिते जग । खरूज जै त्वचे लागी तशी कीर्तीहि दूषिता ॥ ५ ॥
लोकः - लोक - भृत्ये कृतागसि - सेवक अपराधी असता - यन्नामानि - ज्या धन्याला नावे - गृह्णाति - ठेवितो - सः - तो - असाधुवादः - अपवाद - आमयः - रोग - त्वचम् इव - त्वचेला जसे तसे - तत्कीर्तिम् - त्या धन्याच्या कीर्तीला - हन्ति - नष्ट करतो ॥५॥
सेवकांनी अपराध केला तर जग त्यांच्या स्वामीलाच दोष देते. ते अपयश स्वामीच्या कीर्तीला अशा प्रकारे दूषित करते की जसा चर्मरोग त्वचेला. (५)
यस्यामृतामलयशःश्रवणावगाहः
सद्यः पुनाति जगदाश्वपचाद्विकुण्ठः । सोऽहं भवद्भ्य उपलब्धसुतीर्थकीर्तिः छिन्द्यां स्वबाहुमपि वः प्रतिकूलवृत्तिम् ॥ ६ ॥
(वसंततिलका) माझी सुयेश विमलोचि सुधा असी की प्राशूनि तीस जग हीन पवित्र होते । वैकुंठ नाम म्हणुनी अपकीर्ति नाही माझ्या करें जर घडे तरि कापितो हे ॥ ६ ॥
यस्य - ज्या माझ्या - अमृतामलयशःश्रवणावगाहः - अमृतरूप निर्मल कीर्तीचा श्रवणेन्द्रियात झालेला प्रवेश - सद्यः - तत्काल - आश्वापचात् - चाण्डालसुद्धा - जगत् - सर्व लोकाला - पुनाति - पवित्र करतो - सः - तो - विकुण्ठः - विष्णु - भवद्भ्यः - तुमच्यापासून - उपलब्धसुतीर्थकीर्तिः - प्राप्त झाली आहे उत्तम पवित्र कीर्ति ज्याला असा - वः प्रतिकूलवृत्तिम् - तुमच्याविषयी प्रतिकूल आहे स्वभाव ज्याचा असा - स्वबाहुम् अपि - स्वतःच्या बाहूला देखील - छिन्द्याम् - तोडीन ॥६॥
माझ्या निर्मल सुयश-सुधेच्या श्रवणामध्ये डुंबणारे चांडालापर्यंतचे सर्व जग ताबडतोब पवित्र होते. म्हणूनच मला विकुंठ असे म्हणतात. परंतु ही पवित्र कीर्ती मला आपल्यामुळेच प्राप्त झाली आहे. म्हणून जो कोणी आपल्याविरुद्ध आचरण करील, मग तो माझा हात असला तरी, त्याला मी तोडून टाकीन. (६)
यत्सेवया चरणपद्मपवित्ररेणुं
सद्यः क्षताखिलमलं प्रतिलब्धशीलम् । न श्रीर्विरक्तमपि मां विजहाति यस्याः प्रेक्षालवार्थ इतरे नियमान् वहन्ति ॥ ७ ॥
मी सेविता द्विजपदा पदरेणु माझे झाले पवित्र पळती मग पाप सारे । झाला स्वभाव मृदु मीच उदास होता लक्ष्मी न सोडि क्षणमात्र विरंचि तैसा ॥ ७ ॥
यरयाः - ज्या लक्ष्मीच्या - प्रेक्षालवार्थे - अवलोकनाच्या लेशाकरिता - इतरे - ब्रह्मादिक देव - नियमान् - व्रते किंवा तपश्चर्या - वहन्ति - करितात - सा - ती - श्रीः - लक्ष्मी - यत्सेवया - ज्या ब्राह्मणांच्या सेवेमुळे - चरणपद्मपवित्ररेणुम् - चरणकमलांवर आहे पवित्र धूळ ज्याच्या अशा - क्षताखिलमलम् - दूर केला आहे संपूर्ण लोकांचा मळ ज्याने अशा - प्रतिलब्धशीलम् - व प्राप्त झाला आहे उत्तम स्वभाव ज्याला अशा - विरक्तम् अपि - विरक्त अशाहि - माम् - मला - विजहाति - सोडीत नाही ॥७॥
आपल्यासारख्यांची सेवा केल्यानेच माझ्य़ा चरणरजांना एवढी पवित्रता प्राप्त झाली आहे की, ती सर्व पापांना तत्काळ नष्ट करते आणि मला असा सुंदर स्वभाव प्राप्त झाला आहे की, जिच्या कृपाकटाक्षासाठी इतर देव अनेक प्रकारची व्रते करतात, ती लक्ष्मी मी उदासीन असूनही मला सोडीत नाही. (७)
नाहं तथाद्मि यजमानहविर्वितानेः
च्योतद्घृतप्लुतमदन् हुतभुङ्मुखेन । यद्ब्राह्मणस्य मुखतश्चरतोऽनुघासं तुष्टस्य मय्यवहितैर्निजकर्मपाकैः ॥ ८ ॥
जे अर्पिती मजसि कर्मचि सर्व ऐसे संतुष्ट ते द्विज जधी करितात भोज । पक्वन्न खाउनि मनी जधि तृप्त होती मी तृप्ततो तई मुखे नच जै यजींही ॥ ८ ॥
मयि - माझ्या ठिकाणी - अवहितैः - अर्पण केलेल्या - निजकर्मपाकैः - आपल्या कर्माच्या फलांनी - तुष्टस्य - संतोष पावलेल्या अशा - श्च्योतद्घृतप्लुतम् - वहाणार्या तुपाने भरलेल्या पदार्थाच्या - अनुघासम् - प्रत्येक घासाला - चरतः - रसास्वादपूर्वक भक्षण करणार्या - ब्राह्मणस्य - ब्राह्मणाच्या - मुखतः - मुखातून - अहम् - मी - यत् - जसे - अद्मि - खातो - तथा - तसे - विताने - यज्ञात - यजमानहविः - यजमानाने दिलेला हविर्भाग - हुतभुङ्मुखेन - अग्नीच्या मुखाने - अदन् - खाणारा असा - न अद्मि - खात नाही ॥८॥
जे आपले संपूर्ण कर्मफल मला अर्पण करून सदैव संतुष्ट राहातात, ते निष्काम ब्राह्मण जेव्हा तुपाने युक्त निरनिराळ्या पक्वानांचे भोजन करताना घासा-घासाला तृप्त होतात, तेव्हा त्यांच्या मुखाने मी जसा तृप्त होतो, तसा यज्ञामध्ये अग्निरूप मुखामध्ये यजमानाने दिलेल्या आहुती ग्रहण करूनही होत नाही. (८)
येषां बिभर्म्यहमखण्डविकुण्ठयोग
मायाविभूतिरमलाङ्घ्रिरजः किरीटैः । विप्रांस्तु को न विषहेत यदर्हणाम्भः सद्यः पुनाति सहचन्द्रललामलोकान् ॥ ९ ॥
ऐश्वर्य नित्य मजपासि असेच माया गंगा पदातुनि निघे शिव घे शिरीं ती । ऐसा पवित्र असुनी द्विजपाद सेवी घेतो पवित्र धुळीस तरि मी द्विजकर्म श्रेष्ठ ॥ ९ ॥
अखण्डविकुण्ठ - अपरिमेय व प्रतिबंध नसलेली - योगमायाविभूतिः - योगमाया हीच ज्याचे ऐश्वर्य आहे असे - यदर्हणामभः - ज्या माझ्या पूजेचे उदक - सहचन्द्रललामलोकान् - चंद्र आहे भूषण ज्याचे अशा शंकरासहित सर्व लोकांना - सद्यः - तत्काल - पुनाति - पवित्र करते - सः - तो - अहम् - मी - येषाम् - ज्या ब्राह्मणांची - अमलाङ्घ्रिरजः - निर्मल अशी पायधूळ - किरीटै - मुकुटांनी - बिभर्मि - धारण करितो - तान् - त्या - विप्रान् - ब्राह्मणांना - कः - कोण - न विषहेत - सहन करणार नाही ॥९॥
योगमायेचे अखंड आणि असीम ऐश्वर्य माझ्या अधीन आहे. तसेच ज्याचे चरणोदक अशी गंगा, चंद्र मस्तकावर धारण करणार्या शंकरांसहित सर्व लोकांना पवित्र करते असा असूनही मी ज्यांच्या पवित्र चरणरजांना माझ्या मुकुटावर धारण करतो, त्या ब्राह्मणांनी शाप दिला तरी तो कोण सहन करणार नाही ? (९)
ये मे तनूर्द्विजवरान्दुहतीर्मदीया
भूतान्यलब्धशरणानि च भेदबुद्ध्या । द्रक्ष्यन्त्यघक्षतदृशो ह्यहिमन्यवस्तान् गृध्रा रुषा मम कुषन्त्यधिदण्डनेतुः ॥ १० ॥
ते विप्र नी दुभति गाय अनाथ प्राणी त्या तीन ही मम तनू नच पापि जाणी । ते दृष्टिहीन मग त्यास गिधा समान क्रोधीत ने यमदुतो जणु साप डंखी ॥ १० ॥
मे - माझी - तनूः - शरीरेच अशा - व्दिजवरान् - श्रेष्ठ ब्राह्मणांना - मदीयाः - माझ्या - दुहतीः - गाईना - च - आणि - अलब्धशरणानि - प्राप्त झाला नाही रक्षणकर्ता ज्यांना अशा - भूतानि - प्राण्यांना - ये - जे - भेददृष्ट्या - भेददृष्टीने - द्रक्ष्यन्ति - पहातील - तान् - त्यांना - मम - माझा - अधिदण्डनेतुः - दंडाधिकारी जो यम त्याचे - गृधाः - गृधरूपी दूत - अहिमन्यवः - सर्पाप्रमाणे आहे क्रोध ज्यांचा असे - रुषा - क्रोधाने - कुपन्ति - चोचीने तोडितात ॥१०॥
ब्राह्मण, दुभत्या गायी आणि अनाथ प्राणी हे माझे शरीरच आहेत. पापांमुळे विवेकदृष्टी नाहीशी झाल्यामुळे जे लोक यांना माझ्यापासून वेगळे समजतात, त्यांना मी नियुक्त केलेल्या यमराजाचे गिधाडासारखे दूत, जे सापाप्रमाणे रागीट आहेत, ते अत्यंत रागाने आपल्या चोचींनी टोचतात. (१०)
ये ब्राह्मणान्मयि धिया क्षिपतोऽर्चयन्तः
तुष्यद्धृदः स्मितसुधोक्षितपद्मवक्त्राः । वाण्यानुरागकलयात्मजवद् गृणन्तः सम्बोधयन्ति अहमिवाहमुपाहृतस्तैः ॥ ११ ॥
बोलो कधीहि कटु ते द्विज मीच जाणा बोलास त्या करिच आदर नित्य सेवा । पुत्रास जै रुसलिया वदतो पिता तो ऐसे द्विजास वदता वश मीहि होतो ॥ ११ ॥
ये - जे - क्षिपतः - कठोर भाषण करणारे अशा - ब्राह्मणान् - ब्राह्मणांना - मयि धिया - माझ्याविषयीच्या बुद्धीने - अर्चयन्तः - पूजन करणारे - तृप्यद्धृदः - आनन्दित आहे अन्तकरण ज्यांचे असे - स्मितसुधोक्षितपद्मवक्त्राः - हास्यरूपी अमृताने भिजलेले आहे मुखकमल ज्यांचे असे - अनुरागकलया - प्रेमाने शोभणार्या - वाण्या - वाणीने - आत्मजवत् - पुत्राप्रमाणे - गृणतः - स्तुति करणारे - अहम् इव - माझ्याप्रमाणे - संबोधयन्ति - गौरवतात - तैः - त्यांच्याकडून - अहम् - मी - उपाहृतः - वश केलेला आहे ॥११॥
ब्राह्मणांनी तिरस्कार केला तरीसुद्धा जे त्यांच्यामध्ये माझी भावना करून प्रसन्नचित्ताने आणि अमृतमय हास्याने युक्त अशा चेहर्याने त्यांचा आदर करतात, तसेच ज्याप्रमाणे रागावलेल्या पित्याची त्याचा पुत्र आणि आपली मी, मनधरणी करतो, त्याप्रमाणे जे प्रेमपूर्ण वचनांची प्रार्थना करून त्यांना शांत करतात, ते मला त्यांच्या अधीन करून घेतात. (११)
तन्मे स्वभर्तुरवसायमलक्षमाणौ
युष्मद्व्यतिक्रमगतिं प्रतिपद्य सद्यः । भूयो ममान्तिकमितां तदनुग्रहो मे यत्कल्पतामचिरतो भृतयोर्विवासः ॥ १२ ॥
त्या सेवके मम मता नच जाणुनीया केला तुम्हास अवमान कृपा करोनी । त्यांच्याच तो जिवन काल नि नीच योनी व्हावा कमी अन पुन्हा मज ते मिळोत ॥ १२ ॥
तत् - त्यास्तव - स्वभर्तुः - सेवकांचा स्वामी अशा - मे - माझा - अवसायम् - अभिप्राय - अलक्षमाणौ - न जाणणारे - इमौ - हे दघे व्दारपाल - युष्वह्यतिक्रमगतिम् - तुमच्या अपमानामुळे प्राप्त झालेल्या अधोगतीला - सद्यः - तत्काळ - प्रतिपद्य - प्राप्त होऊन - भूयः - पुनः - मम - माझ्या - अन्तिकम् - जवळ - इताम् - प्राप्त होवोत - भृतयोः - सेवकांचा - विवासः - वियोग - अचिरतः - लवकर - कल्पताम् - संपावा - इति यत् - ही जी गोष्ट - तत् - ती - मे - माझ्यावर - अनुग्रहः - अनुग्रह होय ॥१२॥
माझ्या या सेवकांनी माझे मनोगत न समजल्याने आपला अपमान केला आहे. माझी तुम्हांला एवढीच विनंती आहे की, आपण कृपा करून यांचा हा शिक्षेचा कालावधी लवकर संपवा आणि आपल्या अपराधाला अनुसरून तत्काळ अधम गतीचा भोग घेऊन ते लवकरच माझ्याकडे येवोत. (१२)
ब्रह्मोवाच -
अथ तस्योशतीं देवीं ऋषिकुल्यां सरस्वतीम् । नास्वाद्य मन्युदष्टानां तेषां आत्माप्यतृप्यत ॥ १३ ॥
ब्रह्मदेव म्हणाले-( अनुष्टुप् ) सनकादिक संतांना क्रोधसर्पहि दंशिता । भगवत् मधुरावाणी ऐकता मुग्ध जाहले ॥ १३ ॥
अथ - तेव्हा - तस्य - श्रीविष्णूच्या - उशतीम् - मनोहर - देवीम् - प्रकाशमान - ऋषिकुल्याम् - व ऋषिमंडळीला अनुकूल अशा - सरस्वतीम् - वाणीचा - आस्वाद्य - आस्वाद घेऊन - मन्युदष्टानाम् - क्रोधाने व्याप्त झालेल्या - अपि - सुद्धा - तेषाम् - त्या सनत्कुमारादि मुनीचे - आत्मा - मन - न अतृप्यत - तृप्त झाले नाही ॥१३॥
ब्रह्मदेव म्हणाले - जरी क्रोधरूपी सर्पाने सनकादी मुनींना चावा घेतला होता, तरी अंतःकरणाला प्रकाशित करणारी भगवंतांची मंत्रमय सुमधुर वाणी ऐकत असता त्यांचे चित्त तृप्त झाले नाही. (१३)
सतीं व्यादाय शृण्वन्तो लघ्वीं गुर्वर्थगह्वराम् ।
विगाह्यागाधगम्भीरां न विदुस्तच्चिकीर्षितम् ॥ १४ ॥
भगवान बोलले थोडे अर्थपूर्ण नी मोहक । ऐकिले चित्त देवोनी तरी संतां न ते कळे ॥ १४ ॥
व्यादाय - कान देऊन - श्रृण्वन्तः - ऐकणारे असे सनत्कुमारप्रभृति मुनि - सतीम् - श्रेष्ठ अशा - लघ्वीम् - अल्प अक्षरे असलेल्या - गुर्वर्थगह्वराम् - थोर अर्थामुळे समजण्यास कठीण अशा - अगधिगम्भीराम् - खोल आणि भारदस्त अशा - सरस्वतीम् - वाणीचा - विगाह्य - विचार करून - तच्चिकीर्षितम् - ईश्वराचे इष्ट कार्य - न विदुः - समजले नाहीत ॥१४॥
भगवंतांचे बोलणे मोठे मनोहर आणि थोडक्यात होते; परंतु ते इतके अर्थपूर्ण, सारयुक्त, गूढ आणि गंभीर होते की, एकाग्र चित्ताने लक्ष देऊन, ऐकून व विचार करूनसुद्धा त्यांना भगवंतांचे मनोगत समजू शकले नाही. (१४)
ते योगमाययारब्ध पारमेष्ठ्यमहोदयम् ।
प्रोचुः प्राञ्जलयो विप्राः प्रहृष्टाः क्षुभितत्वचः ॥ १५ ॥
उदार जाणिले त्याला रोमहर्षित जाहले । ऐश्वर्यवंत त्या देवा हात जोडोनि बोलले ॥ १५ ॥
प्रहृष्टाः - आनंदित झालेले असे - ते विप्राः - ते सनत्कुमार ऋषि - योगमायया - योगमायेच्या योगाने - आरब्धपारमेष्ठ्यमहोदयम् - प्रकट केला आहे उत्कृष्ट ऐश्वर्याचा मोठा उत्कर्ष ज्याने अशा - तम् - त्या विष्णूला - क्षुभितत्वचः - रोमाञ्चित झाली आहे त्वचा ज्यांची असे - प्राञ्जलयः - जोडले आहेत हात ज्यांनी असे - प्रोचुः - बोलले ॥१५॥
भगवंतांच्या अशा बोलण्याने ते फार आनंदित झाले आणि त्यांचे अंग रोमांचित झाले. नंतर योगमायेच्या प्रभावाने आपल्या परम ऐश्वर्याचा प्रभाव प्रगट करणार्या प्रभूंना हात जोडून ते म्हणू लागले. (१५)
ऋषय ऊचुः -
न वयं भगवन् विद्मः तव देव चिकीर्षितम् । कृतो मेऽनुग्रहश्चेति यदध्यक्षः प्रभाषसे ॥ १६ ॥
सनकादिक मुनि म्हणाले- स्वयंप्रकाश भगवन् ! सर्वेश्वर असोनिया । तुम्ही जे बोधिले आम्हा नकळे अर्थ काय तो ॥ १६ ॥
भगवन् - हे ऐश्वर्यसंपन्ना - देव - देवा - त्वम् - तू - अध्यक्षः - सर्वसाक्षी - सन् - असून - मया एव अपराधः - मीच अपराध - कृत - केला - च - आणि - मे - माझ्यावर - अनुग्रहः - अनुग्रह - कार्यः - करावा - इति यत् प्रभाषसे - असे जे बोलतोस - तत् - त्यामुळे - तव - तुझे - चिकीर्षितम् - इष्ट कार्य - वयम् - आम्ही - न विद्मः - जाणत नाही ॥१६॥
मुनी म्हणाले - हे स्वयंप्रकाशी भगवंता, आपण सर्वेश्वर असूनसुद्धा म्हणता की, "आपण माझ्यावर अनुग्रह केला," याचा नेमका हेतू आमच्या लक्षात येत नाही. (१६)
ब्रह्मण्यस्य परं दैवं ब्राह्मणाः किल ते प्रभो ।
विप्राणां देवदेवानां भगवान् आत्मदैवतम् ॥ १७ ॥
लोकार्थ वदता तुम्ही "ब्राह्मणो मम देवता" परी तुम्हीच सर्वांचे आत्मा नी देवही प्रभो ॥ १७ ॥
प्रभो - परमेश्वरा - ब्रह्मण्यस्य - ब्राह्मणांचा कैवारी अशा - ते - तुझे - ब्राह्मणः - ब्राह्मण हे - किल - निश्चयाने - परम् - श्रेष्ठ - दैवम् - दैवत - सन्ति - आहेत - तु - परंतु - भगवान् - परमेश्वर - देवदेवानाम् - देवांना पूज्य अशा - विप्राणाम् - ब्राह्मणांचे - आत्मदैवतम् - आत्मदैवत - अस्ति - आहे ॥१७॥
प्रभो, आपण ब्राह्मणांचे कल्य़ाण करणारे आहात म्हणून लोकशिक्षणासाठी आपण खुशाल असे म्हणा की, ब्राह्मण माझे आराध्यदैवत आहेत. खरे पाहता, ब्राह्मण आणि देवांचेही देव ब्रह्मादिक यांचे सुद्धा आपण आत्मा आणि आराध्यदैवत आहात. (१७)
त्वत्तः सनातनो धर्मो रक्ष्यते तनुभिस्तव ।
धर्मस्य परमो गुह्यो निर्विकारो भवान्मतः ॥ १८ ॥
तुझा सनातनो धर्म रक्षिसी तूचि जन्मुनी । निर्विकार तुझे रूप वदती शास्त्र गुह्य हे ॥ १८ ॥
त्वत्तः - तुझ्यापासून - सनातनः - सनातन - धर्मः - धर्म - भवति - उत्पन्न होतो - तव - तुझ्या - तनुभिः - अवतारांनी - रक्ष्यते - रक्षण केला जातो - भवान् - तू - धर्मस्य - धर्माचा - परमः - फलरूप - गुह्यः - रहस्यमय - निर्विकारः - विकाररहित असा - मतः - मान्य आहेस ॥१८॥
सनातन धर्म आपल्यापासूनच उत्पन्न झाला आहे. आपल्या अवतारांच्या द्वाराच वेळोवेळी त्याचे रक्षण होते. तसेच निर्विकारस्वरूप आपणच धर्माचे परम गुह्य रहस्य आहात, हेच शास्त्रांचे मत आहे. (१८)
तरन्ति ह्यञ्जसा मृत्युं निवृत्ता यदनुग्रहात् ।
योगिनः स भवान् किंस्विद् अनुगृह्येत यत्परैः ॥ १९ ॥
कृपेने योगिराजे ते तरती भव पोहुनी । न राही भेद त्यांच्यात दुजा कोण तुम्हापरी ॥ १९ ॥
हि - कारण - यदनुग्रहात् - ज्या परमेश्वराच्या अनुग्रहामुळे - निवृत्ताः - विरक्त असे - योगिनः - योगी - अञ्जसा - सहज - मृत्युम् - जन्ममरणरूप संसाराला - तरन्ति - तरतात - सः भवान् - तो तू - परैः - इतरांनी - अनुगृह्येत - अनुग्रह केला जातो - इति यत् - असे जे - त्वया उक्तम् - तू म्हटले - तत् - ते - किस्वित् - कसे काय जुळते ॥१९॥
निवृत्तिपरायण योगीलोक आपल्या कृपेने सहजपणे या मृत्युरूप संसारसागरातून तरून जातात. असे असता दुसरा कोणी आपल्यावर कशी कृपा करू शकेल ? (१९)
यं वै विभूतिरुपयात्यनुवेलमन्यैः
अर्थार्थिभिः स्वशिरसा धृतपादरेणुः । धन्यार्पिताङ्घ्रितुलसीनवदामधाम्नो लोकं मधुव्रतपतेरिव कामयाना ॥ २० ॥
(वसंततिलका) अर्थार्थि जे भजती भक्तशिरी जियेच्या पायीचि धूळ अशि ती तुज सेवि लक्ष्मी । तुम्हास पाळ तुळसीदळ अर्पिती जे भृंगापरिचि वसती तव पादपद्मी ॥ २० ॥
अर्थार्थिभिः - द्रव्याची इच्छा करणार्या - अन्यैः - दुसर्या देवांनी - स्वशिरसा - आपल्या मस्तकाने - धृतपादरेणुः - धारण केली आहे पायांची धूळ जिची अशी - विभूतिः - लक्ष्मी - धन्यार्पितांघ्रि - पुण्यवान् लोकांनी अर्पण केलेली - तुलसीनवदामधाम्नः - जी पायावरील तुलसीची नूतन माला ती ज्याचे स्थान आहे अशा - मधुव्रतपतेः - भ्रमरश्रेष्ठाच्या - लोकम् - स्थानाला - कामयाना इव - जणु काय इच्छिणारी अशी - यम् - ज्या तुझी - अनुवेलम् - वेळोवेळी - वै - निश्चयाने - उपयाति - सेवा करते ॥२०॥
भगवन, दुसरे अर्थार्थी लोक जिचे चरणरज नेहमी आपल्या मस्तकांवर धारण करतात, ती लक्ष्मी नेहमी आपल्या सेवेत रत असते. तेव्हा असे वाटते की, भाग्यवान भक्तजन आपल्या चरणांवर ज्या ताज्या तुळशीच्या माळा अर्पण करतात, त्यांच्यावर गुंजारव करणार्या भ्रमरराजाप्रमाणे लक्ष्मीही आपल्या पादपद्मांना आपले निवासस्थान बनवू इच्छिते. (२०)
यस्तां विविक्तचरितैः अनुवर्तमानां
नात्याद्रियत्परमभागवतप्रसङ्गः । स त्वं द्विजानुपथपुण्यरजः पुनीतः श्रीवत्सलक्ष्म किमगा भगभाजनस्त्वम् ॥ २१ ॥
लक्ष्मी पदास नित सेवि तरीहि ना ती भक्तापरी प्रिय अशी तुज प्रीय भक्त । तू आश्रयो भजक भक्त अशास नित्य ती धूळ काय द्विजपाद नि श्रीहि शोभा ? ॥ २१ ॥
परमभागवतप्रसङ्गः - महाभगवद्भक्तांच्या ठिकाणी निःसीम प्रेम ठेवणारा - यः - जो विष्णु - विविक्तचरितैः - शुद्ध आचरणांनी - अनुवर्तमानाम् - सेवा करणार्या - ताम् - त्या लक्ष्मीला - न आत्याद्रियत् - फारसा मानीत नाही - सः त्वम् - तो तू - असि - आहेस - व्दिजानुपथपुण्यरजः - ब्राह्मणांची प्रत्येक रस्त्यात लागलेली पवित्र धूळ - च - आणि - श्रीवत्सलक्ष्म - श्रीवत्सचिन्ह - त्वाम् - तुला - पुनीतः किम् - पवित्र करते काय - भगभाजनः - ऐश्वर्याचा आश्रय असा - त्वम् - तू - उभे - लक्ष्मीला व श्रीवत्सचिन्हाला - अगाः - प्राप्त झाला आहेस ॥२१॥
परंतु आपल्या पवित्र सेवेने निरंतर आपल्या सेवेत तत्पर राहणार्या लक्ष्मीचाही आपण विशेष आदर करीत नाही. कारण आपण आपल्या भक्तांविषयीच विशेष प्रेम ठेवता. आपण स्वतःच संपूर्ण गुणांचे श्रेष्ठ आश्रय आहात, तर मग इकडे तिकडे हिंडणार्या ब्राह्मणांच्या चरणांमुळे पवित्र झालेली त्यांच्या मार्गातील धूळ आणि श्रीवत्स चिह्न आपल्याला पवित्र करू शकतील काय ? का बरे आपण त्यांचा स्वीकार केलात ? (२१)
धर्मस्य ते भगवतस्त्रियुग त्रिभिः स्वैः
पद्भिश्चराचरमिदं द्विजदेवतार्थम् । नूनं भृतं तदभिघाति रजस्तमश्च सत्त्वेन नो वरदया तनुवा निरस्य ॥ २२ ॥
तू विद्यमान अससी तिन्हि या युगासी तू देव विप्र कारिता तप शौच प्रेमे । रक्षीसि सृष्टि सगळीच चराचरी ही तू शुद्ध सत्व हरिरे रज नी तमाला ॥ २२ ॥
त्रियुग - तीन युगात प्रगट होणार्या हे विष्णो - धर्मस्य - धर्मरूप अशा - भगवतः - ऐश्वर्यसंपन्न अशा तुझ्या - त्रिभिः - तीन - स्वैः - आपल्या - पद्भिः - चरणांनी - इदम् - हे - चराचरम् - स्थावरजंगम जग - नः - आम्हाला - वरदया - वर देणार्या - सत्त्वेन तनुवा - सत्वगुणात्मक मूर्तीने - तदभिघाति - धर्माच्या चरणांचा नाश करणार्या अशा - रजः - रजोगुणाला - च - आणि - तमः - तमोगुणाला - निरस्य - दूर करून - व्दिजदेवतार्थम् - ब्राह्मण व देव यांच्याकरिता - नूनम् - निश्चित - भृतम् - पाळिले गेले आहे ॥२२॥
भगवन, आपण साक्षात धर्मस्वरूप आहात. सत्यादी तीन युगांमध्ये आपण प्रत्यक्ष अवतार रूपाने उपस्थित राहाता. खरोखर आपण आपल्या शुद्धसत्त्वमय वरदायिनी मूर्तिद्वारा आमच्यातील धर्मविरोधी असे रजोगुण-तमोगुण दूर करून ब्राह्मण आणि देवतांच्यासाठी तप, शौच आणि दया या आपल्या तीन चरणांनी या चराचर जगताचे रक्षण केले आहे. (२२)
न त्वं द्विजोत्तमकुलं यदि हात्मगोपं
गोप्ता वृषः स्वर्हणेन ससूनृतेन । तर्ह्येव नङ्क्ष्यति शिवस्तव देव पन्था लोकोऽग्रहीष्यद् ऋषभस्य हि तत्प्रमाणम् ॥ २३ ॥
देवा कृपे तवचि ती द्विजकुळ रक्षा साक्षात धर्मरुप तू सुमधूर वाणी । गाती तुला नि पुजिती नच त्यास रक्षा होता बुडेल सगळा मग धर्म सारा ॥ २३ ॥
देव - हे देवा - वृषः - धर्मरूप - त्वम् - तू - यदि - जर - आत्मगोपम् - स्वतः रक्षण करण्यास योग्य अशा - व्दिजोत्तमकुलम् - उत्तम ब्राह्मणांच्या कुलाला - ससूनृतेन - गोड वचनासहित - स्वर्हणेन - उत्तम आदराने - न गोप्ता - राखणार नाहीस - तर्हिः - तर - शिवः - कल्याणकारक - तव एव - तुझाच - पन्थाः - वेदमार्ग - नक्ष्यति - नष्ट होईल - हि - कारण - लोकः - लोक - ऋषभस्य - श्रेष्ठ अशा तुझे - तत् - ते तुझे आचरण - प्रमाणम् - प्रमाण - अग्रहीष्यत् - मानील ॥२३॥
हे देवा, हे श्रेष्ठ ब्राह्मणकुल आपल्याकडूनच रक्षण होण्याजोगे आहे. साक्षात धर्मरूप असून सुद्धा आपण जर सुमधुर वाणी आणि पूजनाद्वारा या उत्तम कुलाचे रक्षण केले नाही तर, आपण निश्चित केलेला कल्याणमार्गच नष्ट होऊन जाईल. कारण सामान्य लोक श्रेष्ठ पुरुषांचे आचरणच प्रमाणभूत समजून ग्रहण करतात. (२३)
तत्तेऽनभीष्टमिव सत्त्वनिधेर्विधित्सोः
क्षेमं जनाय निजशक्तिभिरुद्धृतारेः । नैतावता त्र्यधिपतेर्बत विश्वभर्तुः तेजः क्षतं त्ववनतस्य स ते विनोदः ॥ २४ ॥
तू खाण सत्व गुण मंगलधामास ऐसा संहारितोस नरवीरकरेंचि दुष्टां । उच्छेद वेद नच तो अभिइष्ट ऐसा होसी विनम्र द्विजपाहुनि हीहि लीला ॥ २४ ॥
जनाय - लोकांचे - क्षेमं - कल्याण - विधित्सोः - करण्याची इच्छा करणार्या अशा - निजशक्तिभिः - स्वतःच्या शक्तीच्या योगाने - उद्धृतारेः - दूर केले आहेत शत्रु ज्याने अशा - सत्त्वनिधेः - सत्त्वगुणाचा सागर अशा - ते - तुला - तत् - तो धर्मनाश - वत - अगदी - अनभीष्टम् इव - इष्ट नाहीच - एतावता - या धर्मरक्षणाच्या प्रयोजनाने - अवनतस्य - नमस्कार करणार्या - त्र्यधिपतेः - त्रैलोक्याचा अधिपति अशा - विश्वभर्तुः - विश्वाचे रक्षण करणार्या अशा - तव - तुझे - तेजः - सामर्थ्य - न क्षतम् - नष्ट झाले नाही - सः - तो नमस्कार - ते - तुझा - विनोदः - विनोद होय ॥२४॥
आपण सत्त्वगुणाची खाण आहात आणि सर्व जीवांचे कल्याण करण्यासाठी उत्सुक आहात. म्हणूनच आपण आपल्या राजे आदिरूप शक्तींच्या द्वारा धर्माच्या शत्रूंचा संहार करता. कारण वेदमार्गाचा नाश जणू आपल्याला मान्य नाही. आपण त्रिलोकीनाथ आणि जगप्रतिपालक असूनही ब्राह्मणांशी नम्र राहता. यामुळे आपला प्रभाव काही कमी होत नाही. कारण ही तर आपली लीला आहे. (२४)
यं वानयोर्दममधीश भवान्विधत्ते
वृत्तिं नु वा तदनुमन्महि निर्व्यलीकम् । अस्मासु वा य उचितो ध्रियतां स दण्डो येऽनागसौ वयमयुङ्क्ष्महि किल्बिषेण ॥ २५ ॥
सर्वेश्वरा उचित पार्षदि दंड देणे किंवा करा तशि क्षमा तरि तेहि मान्य । शापूनि आम्हि वदलो तरि हाहि दोष आम्हास द्या उचित दंड तरीहि भोगू ॥ २५ ॥
अधीश - हे अधिपते - भवान् - तू - अनयोः - ह्या दोघां व्दारपालांना - यं दमम् - जो दण्ड - नु वा - किंवा - वृत्तिं वा - अथवा उपजीविका - विधत्ते - करशील - तत् - ते सर्व - निर्व्यलीकम् - निष्कपटपणे - अनुमन्महि - आम्ही मान्य करू - वा - किंवा - ये वयम् - जे आम्ही - अनागसौ - निरपराधी अशा व्दारपालांना - किल्बिषेण - शापरूप पापाने - अयुङ्क्ष्महि - युक्त केले - तेषु - त्या - अस्मासु - आमच्यावर - यः - जो - उचितः - योग्य - सः - तो - दण्डः - दंड - ध्रियताम् - करावा ॥२५॥
हे सर्वेश्वरा, आपण या द्वारपालांना दंड द्यावा किंवा बक्षीस द्यावे. आम्ही सरळ मनाने ते मान्य करू किंवा आम्ही आपल्या या निरपराध सेवकांना शाप दिला आहे, यासाठी आम्हांला योग्य दंड द्यावा, तोही आम्ही आनंदाने स्वीकारू. (२५)
श्रीभगवानुवाच -
एतौ सुरेतरगतिं प्रतिपद्य सद्यः संरम्भसम्भृतसमाध्यनुबद्धयोगौ । भूयः सकाशमुपयास्यत आशु यो वः शापो मयैव निमितस्तदवेत विप्राः ॥ २६ ॥
श्री भगवान् म्हणाले- दंडीयले तुम्हि तयां मम प्रेरणेने शीघ्रेचि ते निजपती जरि दैत्य योनी । संपन्न योग असुनी अतिक्रोध बाधे येतील शीघ्र परती मज भेटण्याला ॥ २६ ॥
विप्राः - हे ब्राह्मण हो - यः - जो - वः - तुमचा - शापः - शाप - मया एव - मीच - निमित्तः - निर्माण केलेला - अस्ति इति - आहे असे - अवैत - जाणा - एतौ - हे दोघे व्दारपाल - सद्यः - तत्काल - सुरेतरगतिम् - दैत्य योनीला - आशु - लवकर - प्रतिपद्य - प्राप्त होऊन - संरभ्यसंभृतसमाध्यनुबद्धयोगौ - क्रोधाने वाढलेल्या एकाग्रतेने ज्यांचा भक्तियोग दृढ झाला आहे असे - भूयः - पुनः - सकाशम् - माझ्याजवळ - आशु - लवकर - उपयास्यतः - प्राप्त होतील ॥२६॥
श्रीभगवान म्हणाले - मुनींनो, आपण यांना जो शाप दिला तो माझ्या प्रेरणेनेच, असे समजा. आता यांना लवकरच दैत्ययोनी प्राप्त होईल आणि त्या योनीत क्रोधावेशाने वाढलेल्या एकाग्रतेमुळे ते माझ्याशी युक्त होऊन पुन्हा लवकरच माझ्याकडे येतील. (२६)
ब्रह्मोवाच -
अथ ते मुनयो दृष्ट्वा नयनानन्दभाजनम् । वैकुण्ठं तदधिष्ठानं विकुण्ठं च स्वयंप्रभम् ॥ २७ ॥ भगवन्तं परिक्रम्य प्रणिपत्यानुमान्य च । प्रतिजग्मुः प्रमुदिताः शंसन्तो वैष्णवीं श्रियम् ॥ २८ ॥
ब्रह्मदेव म्हणाले - स्वयंप्रकाश वैकुंठ भगवान् नयनोहरी वंदिला सनकादिंनी केली त्याची परीक्रमा ॥ २७ ॥ पुनश्च वंदिले आणि त्याचे ऐश्वर्य गायिले । त्याची ती घेउनी आज्ञा आले ते परतोनिया ॥ २८ ॥
अथ - नंतर - ते - ते - मुनयः - सनत्कुमारप्रभृति ऋषि - नयनानन्दभाजनम् - नेत्रांच्या आनंदाचे स्थान अशा - विकुपाठम् - विष्णुला - च - आणि - स्वयंप्रभम् - स्वयंप्रकाश अशा - तदधिष्ठानम् - विष्णूचे निवासस्थान अशा - वैकुण्ठम् - वैकुण्ठलोकाला - दृष्टवा - पाहून ॥२७॥भगवन्तम् - विष्णूला - परिक्रम्य - प्रदक्षिणा करून - प्रणिपत्य - नमस्कार करून - च - आणि - अनुमान्य - अनुमति घेऊन - प्रमुदिताः -
श्रीब्रह्मदेव म्हणाले - त्यानंतर त्या मुनिवरांनी नयनाभिराम भगवान विष्णू आणि त्यांच्या स्वयंप्रकाशी वैकुंठधामाचे दर्शन घेऊन प्रभूंना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना नमस्कार करून, त्यांची आज्ञा घेऊन भगवंतांच्या ऐश्वर्याचे वर्णन करीत मोठया आनंदाने ते तिथून परत गेले. (२७-२८)
भगवाननुगावाह यातं मा भैष्टमस्तु शम् ।
ब्रह्मतेजः समर्थोऽपि हन्तुं नेच्छे मतं तु मे ॥ २९ ॥
द्वारपालां वदे देव जावे हो निर्भयी असा । कल्याण तुमचे होवो ब्रह्मवाक्यचि वंद्य ते ॥ २९ ॥
भगवान् - श्रीविष्णु - अनुगौ - सेवकांना - आह - म्हणाला - युवाम् - तुम्ही - यातम् - जा - मा मैष्टम् - भिऊ नका - युवयोः - तुमचे - शम् - कल्याण - अस्तु - असो - समर्थः अपि - शाप निरसन करण्याचे सामर्थ्य असूनहि - अहम् - मी - मे - मला - मतम् - मान्य अशा - ब्रह्मतेजः - ब्राह्मणाच्या तेजाला - तु - तर - हन्तुम् - नष्ट करू - न इच्छे - इच्छित नाही ॥२९॥
नंतर भगवान आपल्या सेवकांना म्हणाले, "जा, मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका. तुमचे कल्याण होईल. सर्व काही करण्याचे सामर्थ्य असूनही मी ब्रह्मतेज मिटवू इच्छित नाही. कारण मला असेच अभिप्रेत आहे. (२९)
एतत्पुरैव निर्दिष्टं रमया क्रुद्धया यदा ।
पुरापवारिता द्वारि विशन्ती मय्युपारते ॥ ३० ॥
एकदा योगनिद्रेत होतो मी तुम्हि लक्षुमी । रोधिली बोलली तेंव्हा तुम्हा तो शाप हाच की ॥ ३० ॥
पुरा - पूर्वी - यदा - ज्यावेळी - मयि उपारते - मी योगनिद्रा घेत असता - विशन्ती - प्रवेश करणारी - लक्ष्मीः - लक्ष्मी - युवाभ्याम् - तुम्हा दोघांना - व्दारि - दरवाजात - अपवारिता - प्रतिबन्ध केली गेली - तदा - त्यावेळी - क्रुद्धया - रागावलेल्या - रमया - लक्ष्मीने - एतत् - हे - पुरा एव - पूर्वीच - निर्दिष्टम् - सांगितले होते ॥३०॥
मी जेव्हा योगनिद्रेत रमलो होतो, तेव्हा तुम्ही प्रवेश करणार्या लक्ष्मीला दारातच अडविले होते. तिने क्रोधाने त्यावेळीच तुम्हांला हा शाप दिला होता. (३०)
मयि संरम्भयोगेन निस्तीर्य ब्रह्महेलनम् ।
प्रत्येष्यतं निकाशं मे कालेनाल्पीयसा पुनः ॥ ३१ ॥
दैत्ययोनितही तुम्ही एकाग्र मज व्हालची । क्रोधाने ध्यास लागल मग येथेचि याल की ॥ ३१ ॥
मयि - माझ्या ठिकाणी - संरम्भयोगेन - विरोधभक्ति करण्याने - ब्रह्महेलनम् - ब्राह्मणाच्या अपमानामुळे मिळालेला शाप - निस्तीर्य - दूर करून - अल्पीयसा - थोडक्याच - कालेन - कालाने - मे - माझ्या - निकाशम् - जवळ - पुनः - फिरून - प्रत्येष्यतम् - परत याल ॥३१॥
आता दैत्ययोनीमध्ये माझ्याबाबतीत सतत क्रोधमय वृत्तीत राहिल्याने तुम्ही या ब्राह्मणांच्या अपमानरूप पापातून मुक्त व्हाल आणि थोडयाच काळात माझ्याकडे परत याल." (३१)
द्वाःस्थावादिश्य भगवान् विमानश्रेणिभूषणम् ।
सर्वातिशयया लक्ष्म्या जुष्टं स्वं धिष्ण्यमाविशत् ॥ ३२ ॥
आज्ञा ही देउनी त्यांना विमानी बसला स्वता । गेला संपन्न स्थानासी जेथे श्री नांदते सदा ॥ ३२ ॥
भगवान् - विष्णु - व्दास्थौ - व्दारपालांना - इति - याप्रमाणे - आदिश्य - आज्ञा करून - विमानश्रेणिभूषणम् - विमानांच्या पंक्तीनी शोभणार्या - सर्वातिशयया - सर्व सृष्टीतील संपत्तीपेक्षा अतिशय अशा - लक्ष्म्या - संपत्तीने - जुष्टम् - सेविलेले अशा - स्वम् - स्वकीय - धिष्ण्यम् - स्थानात - आविशत् - प्रवेश करता झाला ॥३२॥
द्वारपालांना अशा प्रकारे सांगून भगवंतांनी अनेक प्रासादांनी शोभणार्या आपल्या सर्वाधिक वैभवाने संपन्न धामामध्ये प्रवेश केला. (३२)
तौ तु गीर्वाणऋषभौ दुस्तरात् हरिलोकतः ।
हतश्रियौ ब्रह्मशापाद् अभूतां विगतस्मयौ ॥ ३३ ॥
द्विजांच्या शांपयोगाने श्रीहीन दूत जाहले । गळाला गर्व साराची जय नी विजयास तो ॥ ३३ ॥
गीर्वाणऋषभौ - देवांमध्ये श्रेष्ठ असे - तौ - ते दोघे व्दारपाल - तु - तर - दुस्तरात् - तरून जाण्यास कठीण अशा - ब्रह्मशापात् - ब्राह्मणाच्या शापामुळे - हरिलोकातः - विष्णुलोकातून - हतश्रियौ - नष्ट झाले आहे ऐश्वर्य ज्यांचे असे - विगतस्मयौ - गेला आहे गर्व ज्यांचा असे - भ्रष्टौ - भ्रष्ट - अभूताम् - झाले ॥३३॥
ते देवश्रेष्ठ जय-विजय त्या भगवद्धामातच निस्तेज होऊन त्यांचा गर्व गळून गेला. (३३)
तदा विकुण्ठधिषणात् तयोर्निपतमानयोः ।
हाहाकारो महानासीद् विमानाग्र्येषु पुत्रकाः ॥ ३४ ॥
वैकुंठाधाम सोडोनी खालती पडु लागता । हाहाकार तये वेळी केला वैकुंठवासिने ॥ ३४ ॥
पुत्रकाः - हे पुत्रहो - तदा - त्यावेळी - विकुण्ठधिषणात् - विष्णूच्या स्थानापासून - नियतमानयोः तयोः - ते दोघे पडू लागले असता - विमानाम्यषु - विमानात असलेल्या श्रेष्ठ लोकात - महान् - मोठा - हाहाकारः - हाहाकार - आसीत् - झाला ॥३४॥
पुत्रांनो, जेव्हा ते वैकुंठलोकातून खाली येऊ लागले, तेव्हा तेथे श्रेष्ठ प्रासादांत बसलेल्या वैकुंठवासियांमध्ये मोठाच हाहाकार उडाला. (३४)
तावेव ह्यधुना प्राप्तौ पार्षदप्रवरौ हरेः ।
दितेर्जठरनिर्विष्टं काश्यपं तेज उल्बणम् ॥ ३५ ॥
दीतिच्या गर्भि जे स्थीत कश्यपी उग्र तेज ते । प्रवेश त्यातची केला भगवत् पार्षदे तदा ॥ ३५ ॥
तौ एव - तेच - हरेः - विष्णूचे - पार्षदप्रवरौ - मुख्य व्दारपाल - अधुना - ह्या वेळी - दितेः - दितीच्या - जठरनिर्विष्टम् - उदरात असलेल्या - उल्बणम् - उग्र अशा - काश्यपम् - कश्यप ऋषीच्या - तेजः - वीर्याप्रत - प्राप्तो हि - प्राप्त झाले ॥३५॥
यावेळी दितीच्या गर्भात जे कश्यपांचे उग्र तेज राहिले आहे, त्यात भगवंतांच्या त्या थोर पार्षदांनीच प्रवेश केला आहे. (३५)
तयोरसुरयोरद्य तेजसा यमयोर्हि वः ।
आक्षिप्तं तेज एतर्हि भगवान् तद्विधित्सति ॥ ३६ ॥
त्या दोन्ही आसुरांच्या त्या तेजाने पांढरे तुम्ही । पडले जाणिजे सर्व हरी ऐसेचि इच्छितो ॥ ३६ ॥
तयोः - त्या - यमयोः - जुळ्या - असुरयेः - दैत्यांच्या - तेजसा - तेजाने - अद्य - आज - वः - तुमचे - तेजः - तेज - आक्षिप्तम् - फिके पडले आहे - एतर्हि - आता - तत् - ते - भगवान् हि - विष्णूच स्वतः - विधित्सति - करू इच्छित आहे ॥३६॥
त्या जुळ्या असुरांच्या तेजामुळेच तुम्हा सर्वांचे तेज फिके पडले आहे. यावेळी भगवंतांनाच असे करावयाचे आहे. (३६)
विश्वस्य यः स्थितिलयोद्भवहेतुराद्यो
योगेश्वरैरपि दुरत्यययोगमायः । क्षेमं विधास्यति स नो भगवांस्त्र्यधीशः तत्रास्मदीयविमृशेन कियानिहार्थः ॥ ३७ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
(वसंततिलका) विश्वास जो स्थिति लयोद् भव हेतु ऐसा कष्टोनि योगि तरती जई योग माया । सत्वादिच्या तिन्हि गुणा हरि तो नियंता रक्षो अम्हा नच कि हो मुळि अन्य चर्चा ॥ ३७ ॥ ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ सोळावा अध्याय हा ॥ ३ ॥ १६ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
विश्वस्य - सृष्टीचे - स्थितिलयोद्भवहेतुः - रक्षण, नाश व उत्पत्ति यांस कारण - आद्यः - सनातन - यः - जो भगवान् - योगेश्वरैः अपि - मोठमोठ्या योग्यांनीदेखील - दुरत्यययोगमायः - उल्लंघन करण्यास अशक्य आहे योगमाया ज्याची असा - अस्ति - आहे - सः - तो - त्रधीशः - त्रैलोक्याचा अधिपति असा - भगवान् - श्रीहरि - इह - ह्यावेळी - नः - आमचे - क्षेमम् - कल्याण - विधास्यति - करील - तत्र - त्या कार्यात - अस्मदीयविमृशेन - आमच्या विचाराने - कियान् - कितीसा - अर्थः - उपयोग - भवेत् - होईल ॥३७॥
जो आदिपुरुष विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारणीभूत आहे, ज्याची योगमाया मोठ-मोठे योगीजन सुद्धा महत्प्रयासाने पार करतात, तो सत्त्वादी तिन्ही गुणांचा नियंत्रक श्रीहरीच आमचे कल्याण करील. या विषयात आम्ही अधिक विचार करून काय लाभ होणार आहे ? (३७)
स्कंध तिसरा - अध्याय सोळावा समाप्त |