श्रीमद् भागवत पुराण
तृतीयः स्कन्धः
पञ्चदशोऽध्यायः

वैकुंठधामवर्णनम् - तत्र गतानां सनकादीनां
जयविजयावुद्दिश्य शापदानं भगवतो दर्शनं च -

जय-विजय यांना सनकादिकांचा शाप -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


मैत्रेय उवाच -
प्राजापत्यं तु तत्तेजः परतेजोहनं दितिः ।
दधार वर्षाणि शतं शङ्कमाना सुरार्दनात् ॥ १ ॥
मैत्रेयजी सांगतात -
( अनुष्टुप् )
जो गर्भ दिव्य देवांच्या तेजाला हारिणार तो ।
सौ वर्ष त्याज पोटात दीतिने रोधिले भये ॥ १ ॥

तत् - ते - तु - तर - परतेजोहनम् - दुसर्‍याच्या परक्रमाचा नाश करणारे - प्राजापत्यम् - कश्यपप्रजापतीचे - तेजः - तेज - दितिः - दिति - सुरार्दनात् - देवांना पीडा होईल म्हणून - शङ्कमानाः - भिणारी - शतं वर्षाणि - शंभर वर्षे - दधार - धारण करती झाली. ॥१॥
मैत्रेय म्हणाले - विदुरा, आपल्या पुत्रांपासून देवांना कष्ट होतील, या शंकेने दितीने दुसर्‍यांच्या तेजाचा नाश करणारे, कश्यपांचे ते तेज (वीर्य) शंभर वर्षांपर्यंत आपल्या उदरात ठेवले. (१)


लोके तेनाहतालोके लोकपाला हतौजसः ।
न्यवेदयन्विश्वसृजे ध्वान्तव्यतिकरं दिशाम् ॥ २ ॥
इंद्रादी लोकापालाचे सूर्याचे तेज गर्भ तो ।
हरूच लागला तेंव्हा ब्रह्माते देव बोलले ॥
अंधारे व्यापिले विश्व कार्य ही न सुचे कुणा ॥ २ ॥

तेन - त्या गर्भाच्या योगाने - हतालोके - नष्ट झाला आहे प्रकाश ज्यातील अशा - लोके - जगात - हतौ जसः - नष्ट झाला आहे पराक्रम ज्याचा असे - लोकपालाः - इंद्रादि लोकपाल - दिशाम् ध्वान्तव्यतिकरम् - दिशा अंधकाराने भरून गेल्या आहेत असे - विश्वसृजे - ब्रह्मदेवाला - न्यवेदयन् - सांगते झाले. ॥२॥
त्या गर्भस्थ तेजामुळेसुद्धा जगातील सूर्यादिकांचा प्रकाश क्षीण होऊ लागला. तसेच इंद्रादी लोकपालही तेजोहीन झाले. तेव्हा ब्रह्मदेवाकडे जाऊन ते म्हणाले की, सर्व दिशा अंधारमय झाल्यामुळे सगळीकडे गोंधळ माजला आहे. (२)


देवा ऊचुः
तम एतद्विभो वेत्थ संविग्ना यद्वयं भृशम् ।
न ह्यव्यक्तं भगवतः कालेनास्पृष्टवर्त्मनः ॥ ३ ॥
भगवत्कालशक्ती ती हरे कां बुद्धि आपुली ।
बोला काय असे झाले तमाचे भय वाटते ॥ ३ ॥

विभो - प्रभो - यत् - ज्यामुळे - वयम् - आम्ही - भृशम् - अत्यंत - संविग्नाः - पीडित - स्मः - आहोत - एतत् - ह्या - तमः - अंधकाराला - वेत्थ - जाणतोस - हि - कारण - कालेन - कालाने - अस्पृष्टवर्त्मनः - स्पर्श केला नाही ज्ञानमार्ग ज्याचा अशा - भगवतः - भगवंताला - अव्यक्तम् - न जाणिलेले असे - किचिदपि - काहीही - न - नाही. ॥३॥
देव म्हणाले - भगवन, आपल्या ज्ञानशक्तीला काळ कुंठित करू शकत नाही. म्हणून कोणतीच गोष्ट आपल्यापासून लपून राहात नाही. या अंधकाराविषयीही आपण जाणत असालच. आम्ही तर यामुळे फारच भयभीत झालो आहोत. (३)


देवदेव जगद्धातः लोकनाथशिखामणे ।
परेषामपरेषां त्वं भूतानामसि भाववित् ॥ ४ ॥
देवाधिदेव तुम्ही तो समस्त रचिले जग ।
मुकूट लोकपालांचे जीवांचे मन जाणता ॥ ४ ॥

देवदेव - हे देवाधिदेवा - जगद्धातः - जगाच्या रक्षका - लोकनाथशिखामणे - हे लोकपालाच्या नायका - त्वम् - तू - परेषाम् - सूक्ष्म किंवा स्थावर - अपरेषाम् - स्थूल किंवा जंगम - भूतानाम् - प्राण्यांचा - भाववित् - अभिप्राय जाणणारा - असि - आहेस. ॥४॥
देवाधिदेवा, आपण जगाची रचना करणारे आणि सर्व लोकपालांचे मुकुटमणी आहात. आपण लहान-मोठया सर्व जीवांचे भाव जाणत आहात. (४)


नमो विज्ञानवीर्याय माययेदमुपेयुषे ।
गृहीतगुणभेदाय नमस्तेऽव्यक्तयोनये ॥ ५ ॥
विज्ञान बल संपन्न मायेने हे चतुर्मुख ।
धारिले रजगूणाते नमस्कार तुम्हा प्रभो ॥ ५ ॥

विज्ञानवीर्याय - विविध ज्ञान आहे बल ज्याचे अशा तुला - नमः - नमस्कार असो - मायया - मायेच्या योगाने - गृहीतगुणभेदाय - स्वीकारिला आहे गुणविशेष म्हणजे रजोगुण ज्याने अशा - इदम् - ह्या ब्रह्मदेव शरीराला - उपेयुषे - प्राप्त झालेल्या - व्यक्तयोनये - व्यक्तरूप प्रपञ्चाचे कारण अशा - ते - तुला - नमः - नमस्कार असो. ॥५॥
देवा, आपण विज्ञानाच्या बळाने संपन्न आहात. आपण मायेनेच हे रूप आणि रजोगुण यांचा स्वीकार केला आहे. आपल्या उत्पत्तीचे कारण कोणालाच माहीत नाही. आपणांस नमस्कार असो. (५)


ये त्वानन्येन भावेन भावयन्त्यात्मभावनम् ।
आत्मनि प्रोतभुवनं परं सदसदात्मकम् ॥ ६ ॥
तेषां सुपक्वयोगानां जितश्वासेन्द्रियात्मनाम् ।
लब्धयुष्मत् प्रसादानां न कुतश्चित्पराभवः ॥ ७ ॥
तुम्हात स्थित हे विश्व कार्यकारण ही तनू ।
परे तरीहि त्या हून प्रपंच दाविता असा ॥ ६ ॥
अनन्यभाव ध्यानाने विश्वोत्पत्तीस चिंतिता ।
योग्यांचा ऱ्हास ना होई कटाक्षे धन्य हो तुम्ही ।
रोधिता मन इंद्रीया योग पक्वचि होतसे ॥ ७ ॥

सदसदात्मकम् - कार्ये व कारणे हेच आहे स्वरूप ज्याचे अशा - आत्मनि - स्वतःच्या ठिकाणी - प्रोतभुवनम् - भरले आहे त्रिभुवन ज्याच्यामध्ये अशा - आत्मभावनम् - व सर्व जीवांना उत्पन्न करणारा अशा - परम् - श्रेष्ठ अशा - त्वाम् - तुझे - अनन्येन - एकनिष्ठ - भावेन - भक्तीने - ये - जे - भावयन्ति - ध्यान करतात. ॥६॥ जितश्वासेन्द्रियात्मनाम् - जिंकिलेली आहेत प्राण, इंद्रिये व मन ज्यांनी अशा - सुपक्वयोगानाम् - अत्यंत पूर्ण झाला आहे योगाभ्यास ज्यांचा अशा - लब्धयुष्मप्रसादानाम् - प्राप्त झाली आहे तुमची कृपा ज्यांना अशा - तेषाम् - त्या भक्तांचा - कुतश्चित् - कोठूनही - पराभवः - पराभव - न - नाही. ॥७॥
आपल्यामध्ये सर्व जग सामावले आहे. हे कार्यकारणरूप विश्व आपले शरीर आहे; परंतु आपण याच्याही पलीकडे आहात. सर्व जीवांचे उत्पत्तिस्थान अशा आपले जे अनन्य भावाने ध्यान करतात, ते आपल्या कृपाकटाक्षाने कृतकृत्य होतात. तसेच प्राण, इंद्रिये आणि मनाला त्यांनी जिंकलेले असल्याने ज्यांचा योगही परिपक्व झालेला असतो, अशा सिद्धांचा कोणापासूनही पराभव होत नाही. (६-७)


यस्य वाचा प्रजाः सर्वा गावस्तन्त्येव यन्त्रिताः ।
हरन्ति बलिमायत्ताः तस्मै मुख्याय ते नमः ॥ ८ ॥
दोराने बांधिले बैल वेदाच्या वाणिने तसी ।
बांधिलीही प्रजा तुम्ही वागते अर्पिते बल ॥ ८ ॥

तन्त्या - दावणीने - यन्त्रितः - बांधलेल्या - गावः इव - गाईप्रमाणे - यस्य - ज्या ब्रह्मदेवाच्या - वाचा - वाणीने - आयताः - स्वाधीन केलेले - सर्वाः - सर्व - प्रजाः - लोक - बलिम् - बलि - हरन्ति - अर्पण करितात - तस्मै - त्या - मुख्याय - नायक, अशा - ते - तुला - नमः - नमस्कार असो. ॥८॥
दोराने बांधलेल्या बैलाप्रमाणे आपल्या वेदवाणीने बद्ध असलेली सर्व प्रजा आपल्या अधीन राहून नियमपूर्वक कर्मानुष्ठान करून आपली पूजा करते, त्या सर्वांचे प्राणरूप अशा आपणांस नमस्कार असो. (८)


स त्वं विधत्स्व शं भूमन् तमसा लुप्तकर्मणाम् ।
अदभ्रदयया दृष्ट्या आपन्नानर्हसीक्षितुम् ॥ ९ ॥
भूमन् हो दिनरात्रीचा तमाने भाग तोडिला ।
लोकांचे लोपले कर्म दुःखाने व्यापले जग ।
कल्याण करणे तुम्ही अपार दृष्टि टाकिणे ॥ ९ ॥

भूमन् - हे सर्वव्यापका - सः त्वम् - तो तू - तमसा - अंधकारामुळे - लुप्तकर्मणाम् - लुप्त झाली आहेत कर्मे ज्यांची अशा - नः - आमचे - शम् - कल्याण - विधत्स्व - कर - आपन्नान् - विपत्तीत सापडलेल्या अशा - नः - आम्हाला - अदभ्रदयया - विपुल आहे दया जीमध्ये अशा - दृष्ट्या - दृष्टीने - ईक्षितुम् - पाहण्यास - अर्हसि - योग्य आहेस. ॥९॥
हे भूमन्, या अंधकारामुळे दिवस आणि रात्र कळेनासे झाले आहेत, म्हणून लोकांची सर्व कर्मे थांबली आहेत. त्यामुळे ते दुःखी झाले आहेत. त्यांचे कल्याण करा आणि शरण आलेल्या आमच्याकडे अपार दयादृष्टीने पहा. (९)


एष देव दितेर्गर्भ ओजः काश्यपमर्पितम् ।
दिशस्तिमिरयन् सर्वा वर्धतेऽग्निरिवैधसि ॥ १० ॥
देवा हा दीतिचा गर्भ क्रमाने वाढवी तम ।
अग्नीत काष्ठ जै जाता वाढे अग्नि तसाचि तो ॥ १० ॥

देव - हे ब्रह्मदेवा - एधसि - काष्ठामध्ये असलेल्या - अग्निः इव - अग्नीप्रमाणे - अर्पितम् - ठेवलेले - काश्यपम् - कश्यप ऋषीचे - ओजः - वीर्य - एषः - हा - दितेः - दितीचा - गर्भः - गर्भ - सर्वाः - सर्व - दिशः - दिशांना - तिमिरयन् - अंधकाराने व्याप्त करणारा असा - वर्धते - वाढत आहे. ॥१०॥
देवा, इंधनात पडल्यामुळे ज्याप्रमाणे आग वाढतच जाते, त्याचप्रमाणे कश्यपांच्या वीर्याने स्थापित झालेला हा दितीचा गर्भ सर्व दिशा अंधकारमय करीत वाढत चालला आहे. (१०)


मैत्रेय उवाच -
स प्रहस्य महाबाहो भगवान् शब्दगोचरः ।
प्रत्याचष्टात्मभूर्देवान् प्रीणन् रुचिरया गिरा ॥ ११ ॥
महाबाहो ! अशी ब्रह्म्ये प्रार्थना ऐकुनी तदा ।
हासुनी गोड वाणीने हर्षाने बोलु लागले ॥ ११ ॥

महाबाहो - मोठे आहेत बाहु ज्याचे अशा हे विदुरा - शब्दगोचरः - देवांच्या भाषणाचा विषय झालेला - सः - तो - भगवान् आत्मभूः - भगवान ब्रह्मदेव - प्रहस्य - हास्य करून - देवान् - देवांना - प्रीणन् - संतोषित करणारा असा - रुचिरया - मधुर अशा - गिरा - वाणीने - प्रत्याचष्ट - प्रत्युत्तर देता झाला. ॥११॥
मैत्रेय म्हणाले - महाबाहो, देवांची प्रार्थना ऐकून भगवान ब्रह्मदेव हसले आणि आपल्या मधुर वाणीने त्यांना आनंदित करीत म्हणाले. (११)


ब्रह्मोवाच -
मानसा मे सुता युष्मत् पूर्वजाः सनकादयः ।
चेरुर्विहायसा लोकान् लोकेषु विगतस्पृहाः ॥ १२ ॥
ब्रह्मदेव म्हणाले -
देवांनो पुत्र माझे ते सनकादिक संत चौ ।
त्यागुनी सृष्टिचामोह आकाशी फिरती तदा ॥ १२ ॥

युष्मत्पूर्वजाः - तुमच्या पूर्वी जन्मलेले - मे मानसाः सुताः - माझे मानस पुत्र - सनकादयः - सनकप्रभृति ऋषि - विगतस्पृहाः - गेली आहे इच्छा ज्यांची असे - लोकेषु - लोकांवर असलेल्या - लोकान् - लोकात - विहायसा - आकाशमार्गाने - चेरुः - संचार करते झाले. ॥१२॥
श्रीब्रह्मदेव म्हणाले - देवांनो, तुमचे पूर्वज असलेले माझे मानसपुत्र सनकादिक लोकांबद्दलच्या आसक्तीचा त्याग करून सर्व लोकांमध्ये आकाशमार्गाने भ्रमण करीत असत. (१२)


त एकदा भगवतो वैकुण्ठस्यामलात्मनः ।
ययुर्वैकुण्ठनिलयं सर्वलोकनमस्कृतम् ॥ १३ ॥
एकदा शुद्धसत्वीं त्या सर्व लोक शिरी अशा ।
वैकुंठधाम या लोका विष्णुच्या त्या पहोचले ॥ १३ ॥

एकदा - एके वेळी - ते - ते ऋषि - अमलात्मनः - निर्मळ आहे स्वरूप ज्याचे अशा - भगवतः - ऐश्वर्यसंपन्न - वैकुण्ठस्य - विष्णूच्या - सर्वलोकनमस्कृतम् - सर्व लोकांना पूज्य अशा - वैकुण्ठनिलयम् - वैकुण्ठलोकाला - ययुः - गेले. ॥१३॥
एकदा ते शुद्ध-सत्त्वमय भगवान विष्णूंच्या सर्व लोकांना वंदनीय असलेल्या वैकुंठ लोकात गेले. (१३)


वसन्ति यत्र पुरुषाः सर्वे वैकुण्ठमूर्तयः ।
येऽनिमित्तनिमित्तेन धर्मेणाराधयन् हरिम् ॥ १४ ॥
तेथले सर्व ते जीव विष्णुरूपचि नांदता ।
अनन्य सेविती भक्ती धर्मानेचि उपासिती ॥ १४ ॥

यत्रः - ज्या वैकुण्ठ लोकांत - ये - जे - अनिमित्तनिमित्तेन - हेतु नाही प्रेरक ज्याचा अशा - धर्मेण - धर्माने - हरिम् - श्रीविष्णूला - आराधयन् - आराधिते झाले - सर्वे - सर्व - वैकुण्ठमूर्तयः - विष्णूसारखी आहेत स्वरूपे ज्यांची असे - पुरुषाः - पुरुष - वसन्ति - रहातात. ॥१४॥
जे निष्काम धर्माने श्रीहरीची आराधना करतात, ते लोक विष्णुरूप हो‌ऊन तेथे राहातात. (१४)


यत्र चाद्यः पुमानास्ते भगवान् शब्दगोचरः ।
सत्त्वं विष्टभ्य विरजं स्वानां नो मृडयन् वृषः ॥ १५ ॥
वेदांत प्रतिपाद्यो तो श्री आदीपुरुषोत्तम ।
भक्तांना सुख देण्याला नित्य तेथेचि तिष्ठतो ॥ १५ ॥

च - आणि - यत्र - ज्या वैकुण्ठलोकात - आद्यःपुमान् - आदि पुरुष - वृषः - धर्मरूपी - शब्दगोचरः - वेदांनी केवल जाणला जाणारा - भगवान् - ऐश्वर्यसंपन्न विष्णु - निरजम् - रजोगुणरहित - सत्त्वम् - सत्त्वगुणाची मूर्ति - विष्टभ्य - धारण करून - स्वान् - भक्त अशा - नः - आम्हाला - मूडयन् - सुखविणारा - आस्ते - असतो. ॥१५॥
तेथे वेदांताने वर्णन केलेले भगवान आदिनारायण आम्हां भक्तांना सुख देण्यासाठी शुद्ध सत्त्वमय स्वरूप धारण करून राहातात. (१५)


यत्र नैःश्रेयसं नाम वनं कामदुघैर्द्रुमैः ।
सर्वर्तुश्रीभिर्विभ्राजत् कैवल्यमिव मूर्तिमत् ॥ १६ ॥
नैःश्रेयश अशा या नामे उद्यान तेथले असे ।
कैवल्य पुतळा भासे नित्यकल्पतरु फुले ॥ १६ ॥

यत्र - ज्या वैकुण्ठलोकात - मूर्तिमत् - मूर्तिमान् - कैवल्यम् इव - मोक्षाप्रमाणे - सर्वर्तुश्रीभिः - सर्व ऋतूतील पुष्पफल इत्यादी आहे संपत्ती ज्यांमध्ये अशा - कामदुघैः - सर्व इच्छा पूर्ण करणार्‍या - द्रुमैः - वृक्षांनी - विभ्राजत् - शोभणारे - नैःश्रेयसं नाम - नैःश्रेयस नावाचे - वनम् - उद्यान - अस्ति - आहे. ॥१६॥
त्या लोकात निःश्रेयस नावाचे एक वन आहे, जे मूर्तिमान कैवल्य आहे असे वाटते. सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करणार्‍या वृक्षांनी ते सुशोभित असून नेहमी सहाही ऋतूंच्या शोभेने संपन्न असते. (१६)


वैमानिकाः सललनाश्चरितानि यत्र ।
    गायन्ति लोकशमलक्षपणानि भर्तुः ।
अन्तर्जलेऽनुविकसन् मधुमाधवीनां ।
    गन्धेन खण्डितधियोऽप्यनिलं क्षिपन्तः ॥ १७ ॥
(वसंत तिलका)
तेथे विमानि बसुनी सखया सवे ते
    गंधर्व गान करिती नित त्या प्रभूचे ।
जी कीर्ति भस्म करिते जनपाप सर्व
    ध्याना न मोडु शकते वनमाधवी ती ॥ १७ ॥

यत्र - ज्या उद्यानात - अन्तर्जले - पाण्यामध्ये - अनुविकसन्मधुमाधवीनाम् - पसरणार्‍या मकरंदाने युक्त अशा वसंत ऋतूतील पुष्पलतांच्या - गंधेन - सुगंधाने - खण्डितधियः अपि - विघ्र केलेली आहे बुद्धि ज्यांची असे असूनही - अनिलम् - वायूला - क्षिपन्तः - तिरस्कार करणारे - सललनाः - स्त्रियांसहवर्तमान - वैमानिकाः - विमानात बसलेले विष्णुभक्त - लोकशमलक्षपणानि - लोकांच्या पापाला दूर करणारी अशी - भर्तुः - पालनकर्त्या परमेश्वराची - चरितानि - चरित्रे - गायन्ति - गातात ॥१७॥
तेथे विमानातून भ्रमण करणारे पार्षद आपल्या स्त्रियांसह आपल्या प्रभूंच्या, लोकांचे पाप नाहीसे करणार्‍या पवित्र लीलांचे गायन करीत असतात. त्यावेळी सरोवरात उमललेल्या वसंत ऋतूतील माधवी वेलींचा मकरंदपूर्ण सुगंध त्यांच्या चित्ताला आपल्याकडे आकर्षित करतो; परंतु ते त्याच्याकडे लक्ष न देता तो सुगंध आणणार्‍या वायूलाच दोष देतात. (१७)


पारावतान्यभृतसारसचक्रवाक ।
    दात्यूहहंसशुकतित्तिरिबर्हिणां यः ।
कोलाहलो विरमतेऽचिरमात्रमुच्चैः ।
    भृङ्गाधिपे हरिकथामिव गायमाने ॥ १८ ॥
गाती जिथे भ्रमरराज कथा हरीची
    कोकीळ हंस चकवे नि कबूतरे ही ।
ती मोर सारस नि पोपट स्तब्ध होती
    ते कीर्तनात जणु ध्यान निमग्न होती ॥ १८ ॥

यः - जो - पारावतान्यभृतसारस - पारवे, कोकिल, सारस, चक्रवाक, - चक्रवाकदात्यूहहंसशुकतित्तिरिबर्हिणाम् - चातक, हंस, शुक, तित्तिर व मयूर यांचा - कोलाहलः - कलकलाट - सः - तो - भृङ्गाधिपे - मोठा भ्रमर - हरिकथाम् इव - श्रीहरीच्या कथालाच जणू काय - उच्चैः - मोठ्याने - गायमाने - गाऊ लागला असता - अचिरमात्रम् - क्षणमात्र - विरमते - बंद पडतो ॥१८॥
ज्या वेळी भ्रमरराज उच्च स्वरात गुंजारव करीत जणू हरिकथेचे गायन करतात, त्यावेळी थोडया काळासाठी कबुतर, कोकिळा, सारस, चकवा, चातक, हंस, पोपट, होला पक्षी आणि मोर यांचा कलकलाट बंद होतो. (१८)


मन्दारकुन्दकुरबोत्पलचम्पकार्ण ।
    पुन्नागनागबकुलाम्बुजपारिजाताः ।
गन्धेऽर्चिते तुलसिकाभरणेन तस्या ।
    यस्मिंस्तपः सुमनसो बहु मानयन्ति ॥ १९ ॥
घेवोनि अंगि तुळसी भगवंत तोषे
    तो गंध त्या अतिप्रियो नच अन्य दूजा ।
हे पाहुनी तिथलची बकुळा नि चंपा
    मंदार कुंद असुनी तुळसीच थोर ॥ १९ ॥

यस्मिन् - ज्या उद्यानात - मंदारकुन्दकुरबोत्पलचंपकार्ण - मंदार, कुंद, तिलक, कमोद, चंपक, अर्ण, - पुन्नागनागबकुलाम्बुजपारिजाताः - पुंनाग, नागकेसर, बकुल, कमल व पारिजातक - सुमनसः - पुष्पवृक्ष - तुलसिकाभरणेन - तुलसीची माला आहे अलंकार ज्याचा अशा श्रीहरीने - तुलस्याः - तुलसीच्या - गन्धेऽर्चिते - गंधाची प्रशंसा केली असता - तस्याः - त्या तुलसीच्या - तपः - तपश्चर्येला - बहु मानयन्ति - बहुमान देतात ॥१९॥
श्रीहरी तुळशीपत्रांनी आपले शरीर भूषवितात आणि तुळशीच्या सुगंधाचाच अधिक आदर करतात, हे पाहून तेथील मंदार, कुंद, तिलक, रात्री उमलणारे कमळ, अर्ण, पुन्नाग, नागकेसर, बकुळ, दिवसा उमलणारे कमळ आणि पारिजात ही फुले सुगंधी असूनसुद्धा तुळशीच्या तपाचीही प्रशंसा करतात. (१९)


यत्सङ्कुलं हरिपदानतिमात्रदृष्टैः ।
    वैदूर्यमारकतहेममयैर्विमानैः ।
येषां बृहत्कटितटाः स्मितशोभिमुख्यः ।
    कृष्णात्मनां न रज आदधुरुत्स्मयाद्यैः ॥ २० ॥
तो लोक वैडुरमणी अन माणकांचा
    सोन्याचियेचि सजले तिथली विमाने ।
जे भक्त त्यात बसुनी हरिगान गाती
त्यांना न मोह तिथल्या अति सुंदऱ्याचा ॥ २० ॥

यत् - जे वैकुण्ठस्थान - हरिपदानतिमात्रदृष्टैः - विष्णूच्या चरणांना नमस्कार केल्यानेच दृष्टीस पडणार्‍या अशा - वैदुर्यमारकतहममयैः - वैदूर्यमणि, पाचू व सुवर्ण यांनी तयार केलेल्या अशा - विमानैः - विमानांनी - संकुलम् - व्याप्त - अस्ति - असते - कृष्णात्मनाम् - श्रीकृष्णाच्या ठिकाणी आहे अंतःकरणाला ज्याचे अशा - येषाम् - ज्या भक्तांना - बृहत्कटितटाः - विशाल आहे कटिभाग ज्यांचा अशा - स्मितशोभिमुख्यः - मंदहास्याच्या योगाने शोभणारी आहेत मुखे ज्यांची अशा स्त्रिया - उत्स्मयाद्यैः - परिहास, हावभाव इत्यादिकांनी - रजः - काम - न आदधुः - उत्पन्न करू शकत नाहीत ॥२०॥
तो लोक वैडूर्य, मरकतमणी आणि सुवर्णाच्या विमानांनी भरलेला आहे. केवळ श्रीहरींच्या चरणांना वंदन करूनच हे सर्व प्राप्त होते. त्या विमानात बसलेल्या भगवद्‌भक्तांच्या चित्तात, मोठे नितंब असणार्‍या स्त्रियासुद्धा मंद हास्य आणि हावभावांनी कामविकार उत्पन्न करू शकत नाहीत. (२०)


श्री रूपिणी क्वणयती चरणारविन्दं ।
    लीलाम्बुजेन हरिसद्मनि मुक्तदोषा ।
संलक्ष्यते स्फटिककुड्य उपेतहेम्नि ।
    सम्मार्जतीव यदनुग्रहणेऽन्ययत्‍नः ॥ २१ ॥
श्री रूपिणी त्यजुनि दोष स्व चंचला तो
    हाती धरोनि कमळा हलवीत राही ।
पायात ते नुपुरि वाजुनि चित्त वेधी
    भिंती स्फटीक प्रतिमा जणु वाकुल्या त्या ॥ २१ ॥

यदनुग्रहणे - जिच्या अनुग्रहाविषयी - अन्ययत्नः - ब्रह्मादिक देवांचा प्रयत्न - अस्ति - आहे - सा - ती - श्रीः - लक्ष्मी - चरणारविन्दम् - चरणकमलाचा - क्वणयती - शब्द करणारी - मुक्तदोषा - टाकले आहे चांचल्य जिने अशी किंवा लांब केला आहे बाहू जिने अशी - रूपिणी - मनोहर रूप धारण केलेली - स्फटिककुड्ये - स्फटिकाच्या आहेत भिंती ज्याच्या अशा - उपेतहेम्नि - व सुवर्णपट्टिकांनी युक्त अशा - हरिसद्मनि - श्रीकृष्णाच्या घरात - लीलाम्बुजेन - क्रीडाकमलाने - संमार्जती इव - केर काढणारीच जणू काय - संलक्ष्यते - दिसते ॥२१॥
जिची कृपा प्राप्त करण्यासाठी देवगण सुद्धा प्रयत्‍नशील असतात, ती परम सौंदर्यशालिनी लक्ष्मी आपला चंचलपणाचा दोष टाकून देऊन श्रीहरींच्या भवनामध्ये राहाते. ज्या वेळी ती आपल्या चरणकमलातील नूपुरांचा झंकार करीत आपल्या हातातील लीलाकमल फिरविते, त्या वेळी त्या सुवर्णमहालाच्या स्फटिकयुक्त भिंतीवर तिचे प्रतिबिंब पडल्यानंतर असे वाटते की, ती, त्या भिंती जणू कमळाने साफ करीत आहे. (२१)


वापीषु विद्रुमतटास्वमलामृताप्सु ।
    प्रेष्यान्विता निजवने तुलसीभिरीशम् ।
अभ्यर्चती स्वलकमुन्नसमीक्ष्य वक्त्रम् ।
    उच्छेषितं भगवतेत्यमताङ्ग यच्छ्रीः ॥ २२ ॥
दास्या सहीत पुजिते हरि मंजिरीने
    तेथील घाट सजती जड रत्‍न भारे ।
तेंव्हा तशीच प्रतिमा दिसता जळात
    घाटास भास गमतो हरिचुंबनाचा ॥ २२ ॥

अग्ङ - हे देवांनो - यत् - ज्या वैकुण्ठलोकांत - प्रेप्यान्विता - दासींना युक्त अशी - निजवने - आपल्या वनात - तुलसीभिः - तुलसींनी - ईशम् - विष्णूची - अभ्यर्चती - पूजा करणारी - श्रीः - लक्ष्मी - विद्रुमतटासु - पोवळ्यांचे आहेत तट ज्यांचे अशा - अमलामृतासु - व निर्मल व गोड आहे पाणी ज्याचे अशा - वापीषु - विहिरीमध्ये - स्वलकम् - सुंदर आहेत केस ज्यावर अशा - उन्नसम् - उत्कृष्ट आहे नासिका ज्याची अशा - वक्त्रम् - मुखाला - समीक्ष्य - पाहून - भगवता - श्रीहरीने - उच्छेषितम् - चुंबन घेतलेले - इति - असे - अमत - मानिती झाली ॥२२॥
जेव्हा ती दासींना आपल्याबरोबर घेऊन आपल्या क्रीडावनामध्ये तुलसीदलाने भगवंतांचे पूजन करते, तेव्हा तेथील स्वच्छ पाण्याने भरलेल्या व पोवळ्याचे घाट असलेल्या सरोवरात, आपले सुंदर केशपाश आणि उभार नासिकेने शोभणारे मुख पाहून याचे भगवंतांनी कौतुक केले होते, याची तिला आठवण होते. (२२)


यन्न व्रजन्त्यघभिदो रचनानुवादात् ।
    श्रृण्वन्ति येऽन्यविषयाः कुकथा मतिघ्नीः ।
यास्तु श्रुता हतभगैर्नृभिरात्तसारान् ।
    तांस्तान् क्षिपन्त्यशरणेषु तमःसु हन्त ॥ २३ ॥
ते लोक पापहरिणी नच कीर्ति गाता
    काम्यायनी कथन निंदित ऐकतात ।
रे हाय जीव करिती रसहीन कार्य
    पुण्यास क्षेत्र अन ते नरकात जाती ॥ २३ ॥

ये - जे पुरुष - अद्यभिदः - पापाला दूर करणार्‍या श्रीहरिच्या - रचनानुवादात् - सृष्टि इत्यादिकं लीलांच्या अनुवादाहून - अन्यविषयाः - इतर अर्थ, काम आदि आहेत विषय ज्यामध्ये - मतिन्घीः - बुद्धिभ्रंश करणार्‍या - कुकथाः - निंद्य कथा - शृण्वन्ति - ऐकतात - ते - ते - यत् - ज्या वैकुण्ठलोकाला - न व्रजन्ति - प्राप्त होत नाहीत - तु - परंतु - याः - ज्या कथा - हतभगैः - नष्ट झाले आहे भाग्य ज्यांचे अशा - नृभिः - पुरुषांनी - श्रुताः - ऐकिलेल्या - आत्तसाराः - घेतले आहे पुण्य ज्यांनी अशा - तान् तान् - त्या त्या श्रोत्यांना - अशरणेषु - निराश्रय अशा - तमःसु - नरकामध्ये - क्षिपन्ति - टाकतात - हन्त - हाय हाय ॥२३॥
जे लोक भगवंतांच्या पाप हरण करणार्‍या लीलाकथांना सोडून बुद्धी नष्ट करणार्‍या अर्थ आणि कामासंबंधी अन्य निंद्य कथा ऐकतात, ते त्या वैकुंठलोकात जाऊ शकत नाहीत. अरेरे ! जेव्हा हे अभागी लोक अशा असार गोष्टी ऐकतात, तेव्हा त्या कथा त्यांना कोणी त्राता नसलेल्या घोर नरकात टाकतात. (२३)


येऽभ्यर्थितामपि च नो नृगतिं प्रपन्ना ।
    ज्ञानं च तत्त्वविषयं सहधर्मं यत्र ।
नाराधनं भगवतो वितरन्त्यमुष्य ।
    सम्मोहिता विततया बत मायया ते ॥ २४ ॥
ओ हो ! पहा वदति देव मनुष्य जन्म
    आम्हा मिळो तयिच धर्म धेरियलेचि माये ॥ २४ ॥

यत्र - ज्या मनुष्य जातीमध्ये - सहधर्म - धर्मज्ञानासह - तत्त्वविषयम् - ब्रह्म आहे विषय ज्यामध्ये असे - ज्ञानम् - ज्ञान - भवति - होते - ताम् - त्या - नः अपि - आम्हांकडून देखील - अभ्यर्थिताम् - प्रार्थना केलेल्या - नृगतिम् - मनुष्य योनीला - प्रपन्ना - प्राप्त झालेले - ये - जे - भगवतः - विष्णूची - आराधनम् - आराधना - न वितरन्ति - करीत नाहीत - ते - ते - क्तितया - विस्तृत अशा - अमुष्य - ह्या विष्णूच्या - मायया - मायेने - मोहिताः बत - मोहित झालेले खरोखर होत ॥२४॥
अहो ! आम्ही देवसुद्धा या मनुष्ययोनीची इच्छा धरतो. कारण यातच तत्त्वज्ञान आणि धर्माची प्राप्ती होऊ शकते. अशी मनुष्ययोनी मिळूनही जे लोक भगवंतांची आराधना करीत नाहीत, ते वास्तविक त्यांच्या सर्वव्याप्त असलेल्या मायेनेच मोहित झालेले असतात. (२४)


यच्च व्रजन्त्यनिमिषामृषभानुवृत्त्या ।
    दूरे यमा ह्युपरि नः स्पृहणीयशीलाः ।
भर्तुर्मिथः सुयशसः कथनानुराग ।
    वैक्लव्यबाष्पकलया पुलकीकृताङ्गाः ॥ २५ ॥
त्या कीर्तनेचि यमराज पळे दुरी तो
    जे वादती हरिकथा अनुराग जन्म ।
रोमांच देहि उठुनी गळतात नेत्र
    तो पावतो हरिपदा मग आम्हि कोठे ॥ २५ ॥

भर्तुः - श्रीकृष्णाच्या - सुयशसः - उत्तम कीर्तीचे - मिथः - एकमेकांशी - कथनानुराग - कथांविषयीच्या प्रेमामुळे - वैक्लव्यबाष्पकलया - विव्हळ होऊन उत्पन्न झालेले जे आनंदाश्रु त्यांसह - पुलकीकृताङ्गाः - रोमाञ्चित झाले आहे शरीर ज्यांचे असे - दूरेयमाः - दूर आहे यम ज्यापासून असे - स्पृहणीयशीलाः - अनुकरणीय आहे शील ज्यांचे असे भक्त - अनिमिषाम् - देवांतील - ऋषभानुवृत्या - श्रेष्ठ जो विष्णु त्याच्या सेवेने - नः - आमच्या - उपरि - वर - यत् - ज्या वैकुण्ठाला - व्रजन्ति - जातात ॥२५॥
देवाधिदेव श्रीहरींचे निरंतर चिंतन केल्यामुळे ज्यांच्यापासून यमराज दूर राहातात, आपापसातील प्रभूंच्या सुयशाची कथा ऐकून प्रेमाने सद्‌गद होऊन ज्यांच्या डोळ्यांतून अखंड अश्रुधारा वाहतात आणि शरीरावर रोमांच उभे राहतात, तसेच ज्यांच्या स्वभावाची आम्ही इच्छा करतो, असे परम भागवतच आमच्या लोकांच्या वर असलेल्या त्या वैकुंठधामात जातात. (२५)


तद्विश्वगुर्वधिकृतं भुवनैकवन्द्यं ।
    दिव्यं विचित्रविबुधाग्र्यविमानशोचिः ।
आपुः परां मुदमपूर्वमुपेत्य योग ।
    मायाबलेन मुनयस्तदथो विकुण्ठम् ॥ २६ ॥
जेथेचि विश्वगुरु तो निवसे तिथेची
    त्या देवता बघितल्या बसल्या विमानी ।
योगी बलेचि सनकादिक तेथ गेले
    पाहोनि हर्ष भरला मनि त्याहि संता ॥ २६ ॥

अथो - नंतर - तत् - त्यावेळी - मुनयः - ऋषि - विश्वगुर्वधिकृतम् - विश्वाचा गुरु जो विष्णु त्याने अधिकृत केलेल्या अशा - भुवनैकवंद्यम् - व त्रिभुवनाला सर्वथैव पूज्य अशा - दिव्यम् - अलौकिक अशा - विचित्रविबुधाम्यविमानशोचिः - चित्रविचित्र देवश्रेष्ठांच्या विमानांच्या प्रकाशाने युक्त अशा - तत् अपूर्वंविकुण्ठम् - त्या अपूर्व अशा वैकुण्ठाला - योगमायाबलेन - अष्टाङ्गयोगसाधनाच्या सामर्थ्याने - उपेत्य - प्राप्त करून - पराम् - फार - मुदम् - आनंदाला - आपुः - प्राप्त झाले ॥२६॥
जेव्हा सनकादी मुनी विश्वगुरू श्रीहरींचे निवासस्थान, त्रैलोक्याला वंदनीय आणि श्रेष्ठ देवतांच्या अलौकिक विमानांनी विभूषित, अशा त्या परम दिव्य आणि अद्‌भुत वैकुंठधामाला आपल्या योगमायाबलाने पोहोचले, तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. (२६)


तस्मिन्नतीत्य मुनयः षडसज्जमानाः ।
    कक्षाः समानवयसावथ सप्तमायाम् ।
देवावचक्षत गृहीतगदौ परार्ध्य ।
    केयूरकुण्डलकिरीटविटङ्कवेषौ ॥ २७ ॥
साहि त्यजोनि मुनि चौक पुढेचि जाता
    देवा समान धरिती करि जे गदांना ।
दोन्ही समान कुणि ते जयि आयु एक
    केयूर कुंडल किरीट विटंक वेशे ॥ २७ ॥

असज्जमानाः - आसक्ती न करणारे - मुनयः - सनकादिक ऋषि - तस्मिन् - त्या वैकुण्ठामध्ये - षट् - सहा - कक्षाः - तटांचे दरवाजे - अतीत्य - ओलांडून - अथ - नंतर - सप्तमायाम् - सातव्या दरवाजामध्ये - समानवयसौ - समान आहे वय ज्यांचे असे - गृहीतगदौ - घेतल्या आहेत गदा ज्यांनी अशा - परार्ध्यकेयूरकुण्डकिरीट - बहुमोल बाहुभूषणे, कुंडले व किरीट - विटङ्कवेषौ - यामुळे सुंदर आहे वेष ज्यांचा अशा - देवौ - दोन देवांना - अचक्षत - पहाते झाले ॥२७॥
भगवद्‌दर्शनाच्या लालसेने अन्य दर्शनीय वस्तूंची उपेक्षा करीत वैकुंठ धामाचे सहा तटांचे दरवाजे ओलांडून जेव्हा ते सातव्या दरवाजाजवळ पोहोचले, तेव्हा तेथे त्यांना हातात गदा घेतलेले, एकाच वयाचे दोन देव दृष्टीस पडले. ते बाजूबंद, कुंडले, किरीट इत्यादी अनेक मौल्यवान दागिन्यांनी विभूषित झालेले होते. (२७)


मत्तद्विरेफवनमालिकया निवीतौ ।
    विन्यस्तयासितचतुष्टयबाहुमध्ये ।
वक्त्रं भ्रुवा कुटिलया स्फुटनिर्गमाभ्यां ।
    रक्तेक्षणेन च मनाग्रभसं दधानौ ॥ २८ ॥
त्यांच्या गळ्यात सुमाहार विशोभियेले
    ते उंचवोनि भुवया अन नासिकेला ।
नेत्रात वर्ण अरुणी दिसला तयांच्या
    ते क्षोभले जणु असे दिसले मुनींना ॥ २८ ॥

असितचतुष्टयबाहुमध्ये - श्यामवर्ण अशा चार बाहूंमध्ये - विन्यस्तया - घातलेल्या - मत्तद्विरेफवनमालिकया - मत्त भ्रमरांनी युक्त अशा वनमालेने - निवीतौ - वेष्टित - कुटिलया - वक्र अशा - भ्रुवा - भ्रुकुटीने - स्फुटनिर्गमाभ्याम् - फुललेल्या नाकपुड्यांनी - च - आणि - रक्तेक्षणेन - लाल डोळ्यांनी - मनाग्रभसम् - किंचित क्षुब्ध दिसणार्‍या अशा - वक्त्रम् - मुखाला - दधानौ - धारण करणारे ॥२८॥
त्यांच्या चार श्यामवर्ण भुजांभोवती भुंगे गुंजारव करीत असलेली वनमाला शोभून दिसत होती. चढवलेल्या भुवया, फुरफुरणारे नाक आणि लालसर डोळ्यांमुळे त्यांच्या चेहर्‍यावर काहीसा रागीट भाव दिसत होता. (२८)


द्वार्येतयोर्निविविशुर्मिषतोरपृष्ट्वा ।
    पूर्वा यथा पुरटवज्रकपाटिका याः ।
सर्वत्र तेऽविषमया मुनयः स्वदृष्ट्या ।
    ये सञ्चरन्त्यविहता विगताभिशङ्काः ॥ २९ ॥
त्यांनाहि पाहुनि मुनी पुसता न त्यांना
    सूवर्ण वज्रसम चौकटि लंघुनीया ।
साही मधून घुसले मग याहि दारी
    निःशंक दृष्टिसम ते फिरले तिथेही ॥ २९ ॥

ते मुनयः - ते सनत्कुमारप्रभृति ऋषि - याः - ज्या - पूर्वाः - पूर्वीच्या - पुरटवज्रकपाटिकायाः - सुवर्णाने अलंकृत केलेल्या आहेत हिर्‍याच्या फळ्या ज्यातील अशा - व्दारः - दरवाजात - यथा - जसे - विविशुः - शिरले - तथा - त्याप्रमाणे - सप्तमायाम् - सातव्या - व्दारि - दरवाजात - एतयोः मिषतोः - हे दोघे पुरुष पाहात असता - अपृष्ट्वा - न विचारता - निविविशुः - शिरले - ये - जे - अविहताः - प्रतिबन्ध न केलेले - अविषमया - सरळ अशा - स्वदृष्ट्या - आपल्या दृष्टीने - विगताभिशङ्काः - गेली आहे शंका ज्यांची असे - सर्वत्र - सर्व ठिकाणी - संचरन्ति - संचार करतात ॥२९॥
ते अशा रीतीने पाहात असूनसुद्धा, ते मुनी काहीही न विचारता ज्याप्रमाणे सुवर्ण आणि वज्रमय असे पहिले सहा दरवाजे ओलांडून ते आले होते, त्याचप्रमाणे याही दारातून आत गेले. समान दृष्टीने ते सगळीकडे पाहात होते, त्यामुळे निःशंक मनाने सगळीकडे ते जात होते. (२९)


तान्वीक्ष्य वातरशनांश्चतुरः कुमारान् ।
    वृद्धान्दशार्धवयसो विदितात्मतत्त्वान् ।
वेत्रेण चास्खलयतामतदर्हणांस्तौ ।
    तेजो विहस्य भगवत् प्रतिकूलशीलौ ॥ ३० ॥
तत्वज्ञ चार कुमरा वय पाच नित्य
    ब्रह्माचिया परिहि आयु असोनि बाळे ।
ते वस्त्रहीन फिरता भगवंत शीलां
    रोधियले अनुचिता हसलेहि दूत ॥ ३० ॥

भगवत्प्रतिकूलशीलौ - विष्णूच्या स्वभावाच्या विरुध्द आहे स्वभाव ज्यांचा असे - तौ - ते दोघे व्दारपाल - वातरशनान् - वायुवस्त्र हेच आहे कटिवस्त्र ज्यांचे अशा - वृद्धान् - वृद्ध असा - दशार्धवयसः - पाच वर्षांचे आहे दिसण्यात वय ज्यांचे अशा - विदितात्मतत्त्वान् - व जाणिलेले आहे आत्मतत्त्व ज्यांनी अशा - तान् - त्या - चतुरः - चार - कुमारान् - कुमारांना - वीक्ष्य - पाहून - तेजः - सामर्थ्याला - विहस्य - हसून - अतदर्हणान् तान् - प्रतिबंध करण्यास अयोग्य अशा त्यांना - वेत्रेण - वेताने - अस्खलयताम् - प्रतिबंध करते झाले ॥३०॥
ते चारही कुमार पूर्ण तत्त्वज्ञानी होते. तसेच ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये वयाने सर्वांत ज्येष्ठ असूनही पाच वर्षाच्या बालकांसारखे दिसत होते आणि त्यांची दिगंबर अवस्था होती. त्यांना अशा प्रकारे निःसंकोचपणे आत जाताना पाहून भगवंतांच्या ब्राह्मणांचा आदर करण्याच्या स्वभावापेक्षा विपरीत स्वभाव असणार्‍या त्या द्वारपालांनी त्यांच्या तेजाला तुच्छ मानून काठीने त्यांना अडविले. वास्तविक त्यांच्याशी असे दुर्वर्तन करणे योग्य नव्हते.(३०)


ताभ्यां मिषत्स्वनिमिषेषु निषिध्यमानाः ।
    स्वर्हत्तमा ह्यपि हरेः प्रतिहारपाभ्याम् ।
ऊचुः सुहृत्तमदिदृक्षितभङ्ग ईषत् ।
    कामानुजेन सहसा त उपप्लुताक्षाः ॥ ३१ ॥
हे श्रेष्ठ पात्र असुनी भगवत्पुजेला
    ते द्वारपाल अडवे विपरीत आले ।
त्या प्रीय श्रेष्ठ भगवत्पुजनात बाधा
    आल्यामुळे कुमरक्रोध वदोनि गेले ॥ ३१ ॥

स्वर्हत्तमाः अपि - अत्यन्त पूज्य असे असूनहि - अनिमिषेषु मिषत्सु - देव पहात असता - हरेः - विष्णूच्या - ताभ्याम् - त्या दोघा - प्रतिहारपाभ्याम् - व्दारपालांनी - निषिध्यमानाः - प्रतिबन्ध केलेले - सुहृत्तमदिदृक्षितभग्ङे - अत्यंत प्रिय अशा श्रीहरीच्या दर्शनाच्या इच्छेचा भंग झाला असता - ईषत् - किंचित् - कामानुजेन - कामाचा धाकटा बंधू जो क्रोध त्याने - सहसा - एकाएकी - उपप्लुताक्षाः - व्याप्त झाली आहे दृष्टी ज्यांची असे - ते - सनत्कुमार प्रभृति मुनि - ऊचुः - बोलले ॥३१॥
वैकुंठवासी देवांच्या समक्ष जेव्हा त्या द्वारपालांनी त्या अत्यंत पूज्य कुमारांना अडविले, तेव्हा आपल्या प्रियतम प्रभूंच्या दर्शनात विघ्न आल्यामुळे त्यांचे डोळे क्रोधाने काहीसे लाल झाले आणि ते म्हणाले. (३१)


मुनय ऊचुः ।
को वामिहैत्य भगवत् परिचर्ययोच्चैः ।
    तद्धर्मिणां निवसतां विषमः स्वभावः ।
तस्मिन् प्रशान्तपुरुषे गतविग्रहे वां ।
    को वात्मवत् कुहकयोः परिशङ्कनीयः ॥ ३२ ॥
सनकादिक मुनी म्हणाले -
सेवाचि ती करुनिया मग हा निवास
    त्या श्रीहरी परि तुम्हा मिळलेहि रूप ।
त्यांच्या परीच असणे समदर्शि शांत
    तुम्ही असाल कपटी धरिताय शंका ॥ ३२ ॥

उच्चैः - मोठ्या - भगवत्परिचर्यया - श्रीविष्णूच्या सेवेने - इह - ह्या वैकुण्ठलोकात - एत्य - येऊन - निवसताम् - राहाणार्‍या - तद्धर्मिणाम् - भागवतधर्माच्या पुरुषांमध्ये - वाम्- तुम्हा दोघांचा - कः - कोणता - अयम् - हा - विषमः - पक्षपाती - स्वभावः - स्वभाव - अस्ति - आहे - तस्मिन् - त्या - गतविग्रहे - गेला आहे विरोध ज्यापासून अशा - प्रशान्तपुरुषे - शांत पुरुषाच्या ठिकाणी - कुहकयोः - कपटी अशा - वाम् - तुम्हा दोघांना - आत्मवत् - तुमच्यासारखा कपटी - कः वा - कोणता बरे - परिशक्ङनीयः - शंका घेण्यास योग्य - अस्ति - आहे ॥३२॥
मुनी म्हणाले - अरे द्वारपालांनो, जे लोक भगवंतांची महान सेवा करून त्या प्रभावाने या लोकाची प्राप्ती करून घेऊन येथे निवास करतात, ते तर भगवंतांच्या सारखेच समदर्शी असतात. तुम्ही दोघे त्यांच्यापैकीच असून स्वभावात एवढी विषमता कशी ? भगवंत तर परम शांत स्वभावाचे आहेत, त्यांचा कोणाशीही विरोध नाही. तर मग ज्याच्याविषयी संशय घ्यावा, असा येथे कोण असणार ? तुम्ही स्वतः संशयी आहात, म्हणून आपल्याप्रमाणे दुसर्‍यावर संशय घेत आहात. (३२)


न ह्यन्तरं भगवतीह समस्तकुक्षौ ।
    आत्मानमात्मनि नभो नभसीव धीराः ।
पश्यन्ति यत्र युवयोः सुरलिङ्‌गिनोः किं ।
    व्युत्पादितं ह्युदरभेदि भयं यतोऽस्य ॥ ३३ ॥
ब्रह्मांड स्थीर हरिच्या उदरात सारे
    तुम्हास भेद नसणे हरिरूप तुम्ही ।
शंकार्थ भेद दिसतो तुमचा तयासी
    भेदामुळेच मनि शंकितऽसात तुम्ही ॥ ३३ ॥

हि - कारण - धीराः - विव्दान् लोक - समस्तकुक्षौ - संपूर्ण विश्व आहे उदरात ज्याच्या अशा - यत्र - ज्या - इह - ह्या - भगवति - विष्णूच्या ठिकाणी - अन्तरम् - भेद - न पश्यन्ति - पहात नाहीत - किंतु - परंतु - नभसि - महादाकाशात - नभ इव - घटकाश असते त्याप्रमाणे - आत्मनि - त्या परमेश्वराच्या ठिकाणी - आत्मानम् - स्वतःला - पश्यन्ति - पहातात - तत्र - परमेश्वराच्या ठिकाणी - सुरलिग्ङिनोः - देवांचे चिन्ह धारण केलेल्या अशा - युवयोः - तुम्हा दोघांना - अस्य - श्रीविष्णूला - उदरभेदि - उदराचा भेद करणारे - भयम् - भय - यतः - ज्या कारणाने - व्युत्पादितम् - उत्पन्न झाले - तत् - ते - किम् - काय ॥३३॥
भगवंतांच्या उदरात हे सारे ब्रह्मांड आहे म्हणून इथे राहाणारे ज्ञानीजन सर्वात्मा श्रीहरी व आपल्यात काही भेद मानीत नाहीत. उलट महाकाशात घटाकाश असावे त्याप्रमाणे भगवंतांत आपल्याला अनुस्यूत समजतात. तुम्ही देवरूपधारी आहात. मग तुम्हांला येथे असे काय दिसते की, ज्यामुळे तुम्ही भगवंतांच्या ठिकाणी अंतर्गत भेदामुळे उत्पन्न होणार्‍या भयाची कल्पना केलीत ? (३३)


तद्वाममुष्य परमस्य विकुण्ठभर्तुः ।
    कर्तुं प्रकृष्टमिह धीमहि मन्दधीभ्याम् ।
लोकानितो व्रजतमन्तरभावदृष्ट्या ।
    पापीयसस्त्रय इमे रिपवोऽस्य यत्र ॥ ३४ ॥
वैकुंठनाथ हरिपार्षद ही असोनी
    तुम्हास बुद्धि मुळि ना मग दंड पाशा ।
ही भेद बुद्धि करणी इथुनी निघावे
    योनीस पाप त्रिरिपू बहु जन्म घ्यावे ॥ ३४ ॥

तत् - त्यास्तव - अमुष्य - ह्या - विकुण्ठभर्तुः - वैकुण्ठनायक - परमस्य - परमेश्वराचे सेवक अशा - वाम्‌मन्दधीभ्याम् - सेवक अशा तुम्हा दोघा मंदबुद्धीचे - प्रकृष्टम् - कल्याण - कर्तुम् - करण्याकरिता - इह - ह्या अपराधाविषयी - धीमहि - विचार करतो - अन्तरभावदृष्ट्या - भेदभावाच्या दृष्टीने युक्त अशा - अस्य पापीयसः - पापी पुरुषाचे - यत्र - ज्या लोकात - इमे रिपवः - काम, क्रोध आणि लोभ हे तीन शत्रु - सन्ति - आहेत - तान् लोकान् - त्या लोकांना - इतः - ह्या वैकुण्ठ लोकापासून - व्रजतम् - जा ॥३४॥
आपण त्या भगवान वैकुंठनाथांचे पार्षद आहात, परंतु तुम्ही अत्यंत मंदबुद्धी आहात म्हणून तुमचे कल्याण करण्यासाठी आम्ही तुमच्या अपराधाला योग्य असा दंड देण्याचा विचार करीत आहोत. या भेदबुद्धीच्या दोषामुळे तुम्ही या वैकुंठ लोकातून निघून त्या पापमय योनीत जा. जेथे काम, क्रोध आणि लोभ हे प्राण्यांचे तीन शत्रू निवास करतात. (३४)


तेषामितीरितमुभाववधार्य घोरं ।
    तं ब्रह्मदण्डमनिवारणमस्त्रपूगैः ।
सद्यो हरेरनुचरावुरु बिभ्यतस्तत् ।
    पादग्रहावपततामतिकातरेण ॥ ३५ ॥
हे ऐकुनी वचन त्या सनकादिकांचे
    नाही मुळीच द्विजशाप कटेहि हाटे ।
जाणोनि ते पडियले धरती वरी ते
त्यांचाहि स्वामि हरि तो भितसे द्विजाला ॥ ३५ ॥

तेभ्यः मुनिभ्यः - त्या मुनींपासून - उरू - मोठे - बिभ्यतः - भय बाळगणार्‍या - हरेः - विष्णूचे - उभौ - दोघे - अनुचरौ - सेवक - इति - याप्रमाणे - तेषाम् - त्या मुनींचे - घोरम् - भयंकर - ईरितम् - भाषण - अवधार्य - ऐकून - तम् - त्या - ब्रह्मदण्डम् - ब्रह्मशापाला - अस्त्रपूगैः - शस्त्रांच्या समूहांनी - अनिवारणम् - निवारण करण्यास अशक्य असे - अवधार्य - जाणून - सद्यः - तत्काल - अतिकातरेण - अत्यन्त भयाने - तत्पादग्रहौ - त्या मुनींचे पाय धरणारे असे - अपतताम् - पडले ॥३५॥
सनकादिकांचे हे कठोर वचन ऐकून आणि ब्राह्मणांचा शाप कोणत्याही शस्त्रसमूहाने निवारण होत नाही, हे जाणून श्रीहरीच्या त्या दोन पार्षदांनी अत्यंत दीनभावाने त्यांचे चरण पकडले. त्यांचे स्वामी श्रीहरीसुद्धा ब्राह्मणांना अतिशय घाबरतात. हे त्यांना माहीत होते. (३५)


भूयादघोनि भगवद्‌भिरकारि दण्डो ।
    यो नौ हरेत सुरहेलनमप्यशेषम् ।
मा वोऽनुतापकलया भगवत्स्मृतिघ्नो ।
    मोहो भवेदिह तु नौ व्रजतोरधोऽधः ॥ ३६ ॥
आतूर होऊनि तये म्हटले खरे हे
    आम्हास मान्य अपुला यदि दंड सारा ।
होता तुम्हास अनुताप करा असेच
जन्मात ही अधम योनि स्मरो हरी तो ॥ ३६ ॥

भगवद्भिः - आपणांकडून - अघोनि - पाप्यांच्या ठिकाणी - यः - जो - दण्डः - दण्ड - अकारि - केला गेला - सः - तो - भूयात् - घडून येवो - यः - जो - नौ - आमच्या - अशेषम् - संपूर्ण - सुरहेलनम् अपि - ईश्वराच्या आज्ञेच्या उल्लंघनालाहि - हरेत - हरण करील - तु - परंतु - इह - ह्या अपराधामुळे - अधः अधः - खालच्या खालच्या योनीला - व्रजतोः - जाणार्‍या - नौ - आमचा - वः - तुमच्या - अनुतापकलया - कृपेने झालेल्या पश्चातापाच्या लेशाने - भगवत्स्मृतिघ्रः - भगवन्ताची स्मृति नष्ट करणारा असा - मोहः - मोह - मा भवेत् - होऊ नये ॥३६॥
नंतर ते म्हणाले, भगवन, आम्ही अपराधी आहोत. म्हणून आम्हांला जो दंड दिला आहे, तो आम्हांला मिळालाच पाहिजे. त्यामुळे भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याचे आम्हांला लागलेले पाप पूर्णपणे नाहीसे होईल. आपल्याला आमची थोडीसुद्धा दया येत असेल, तर अशी कृपा करा की जेणे करून त्या अधमाधम योनीत जाऊनही आम्हांला भगवंतांची स्मृती नाहीशी करणारा मोह होऊ नये. (३६)


एवं तदैव भगवान् अरविन्दनाभः ।
    स्वानां विबुध्य सदतिक्रममार्यहृद्यः ।
तस्मिन् यन्ययौ परमहंसमहामुनीनाम् ।
    अन्वेषणीयचरणौ चलयन् सहश्रीः ॥ ३७ ॥
त्या द्वारपाल कडुनी अपराध झाला
    लक्ष्मीसहीत कळता द्विजमान हानी ।
जाणोनि सर्व भगवान् स्वपदेचि आला
    जे पाय ना सहज प्राप्त मुनीस ध्याता ॥ ३७ ॥

तदा एव - त्यावेळीच - अरविन्दनाभः - नाभीपासून उत्पन्न झाले आहे कमल ज्याच्या असा - आर्यहृद्यः - साधूंचे मनोगत जाणणारा - भगवान् - विष्णु - स्वानाम् - आपल्या सेवकांचा - एवम् - याप्रमाणे - सदतिक्रमम् - साधूंच्या ठिकाणी घडलेला अपराध - विबुध्य - जाणून - परमहंसमहामुनीनाम् - परमहंसामध्ये श्रेष्ठ अशा सनत्कुमारादि मुनींच्या - अन्वेषणीयचरणौ - शोधण्यास योग्य अशा चरणांना - चलयन् - हालविणारा - सहश्रीः - लक्ष्मीसहित - तस्मिन् - त्या स्थानी - ययौ - गेला ॥३७॥
इकडे साधुजनांचे हृदयधन असणारे भगवान कमलनाभ यांना आपल्या द्वारपालांनी सनकादी साधूंचा अनादर केलेला समजला, तेव्हा परमहंस मुनिजन ज्यांचा शोध घेत असतात अशा पायांनी चालत श्रीलक्ष्मीसह ते तेथे आले. (३७)


तं त्वागतं प्रतिहृतौपयिकं स्वपुम्भिः ।
    तेऽचक्षताक्षविषयं स्वसमाधिभाग्यम् ।
हंसश्रियोर्व्यजनयोः शिववायुलोलः ।
    शुभ्रातपत्रशशिकेसरशीकराम्बुम् ॥ ३८ ॥
येताचि तो बघितला सनकादिकांनी
    वैकुंठनाथ विषयो निजध्यान ऐसा ।
छत्रादि चामर झुले गण सोबतीला
    मोती विशोभति तया दव जै सुधेचे ॥ ३८ ॥

ते तू - ते मुनि तर - स्वपुम्भिः - विष्णूच्या सेवकांनी - प्रतिहृतौपयिकम् - आणिलेली आहेत गमनाला उचित अशी छत्रपादुकादि साधने ज्याला अशा - हंसश्रियोः - हंसाप्रमाणे आहे शोभा ज्यांची अशा - व्यजनयोः - दोन चवर्‍यांच्या - शिववायुलोलच्छुभ्रातपत्र - अनुकूल अशा वायूने हलणार्‍या - शशिकेसरसीकराम्बुं - चंद्रासारख्या शुभ्र छत्राचे जे मोत्यांचे सर त्यातून गळत आहेत जलकण ज्याच्यावर अशा - त्त्वसमाधिभाग्यम् - आपल्या समाधीने प्राप्त करून घेण्याजोगे ऐश्वर्यच अशा - अक्षविषयम् - दृष्टीच्या प्रदेशात - आगतम् - आलेल्या अशा - तम् - त्या विष्णूला - अचक्षत - पहाते झाले ॥३८॥
सनकादिकांनी पाहिले की, आपल्या समाधीचे भाग्य असणारे श्रीवैकुंठनाथ स्वतः आलेले आहेत. त्यांच्या समवेत छत्र चामरे घेऊन पार्षदही आहेत. तसेच प्रभूंच्या दोन्ही बाजूंना राजहंसाच्या पंखाप्रमाणे दोन शुभ्र चवर्‍या ढाळल्या जात आहेत. चवर्‍यांच्या थंडगार वायूने त्या शुभ्र छत्रावर लावलेली मोत्यांची झालर अशी हालत आहे की, जणू चंद्राच्या किरणातून अमृताचे थेंब झिरपत आहेत. (३८)


कृत्स्नप्रसादसुमुखं स्पृहणीयधाम ।
    स्नेहावलोककलया हृदि संस्पृशन्तम् ।
श्यामे पृथावुरसि शोभितया श्रिया स्वः ।
    चूडामणिं सुभगयन्तमिवात्मधिष्ण्यम् ॥ ३९ ॥
पाहे कृपामृत जशी पडतेय वर्षा
    पाहोनि भक्त हृदया करितोचि स्पर्ष ।
सूवर्ण चिन्ह हरिच्या हृदयास लक्ष्मी
    चूडामणी सकल लोक तिथेचि शोभे ॥ ३९ ॥

कृत्स्त्रप्रसादसुमुखम् - सर्व व्दारपाल व सनत्कुमार मुनि यांच्या प्रसन्नतेविषयी उत्सुक अशा - स्पृहणीयधाम - इच्छा करण्यास योग्य अशा गुणांचे स्थान - स्नेहावलोककलया - प्रेमयुक्त कटाक्षाच्या योगाने - हृदि - अंतःकरणात - संस्पृशन्तम् - सुख उत्पन्न करणार्‍या अशा - श्यामे - श्यामवर्ण अशा - पृथौ - व विस्तृत अशा - उरसि - वक्षःस्थलावर - शोभितया - शोभा उत्पन्न करणार्‍या - श्रिया - लक्ष्मीच्या योगाने - स्वश्चूडामणिम् - स्वर्गाचे शिरोभूषण अशा - आत्मधिष्‌ण्यम् - आपले स्थान जे वैकुण्ठ त्याला - सुभगयन्तम् इव - शोभा उत्पन्न करणाराच जणू काय अशा विष्णूला - अचक्षत - पहाते झाले ॥३९॥
प्रभू सर्व सद्‌गुणांचे आश्रय आहेत. त्यांची मुखमुद्रा पाहून असे वाटत होते की, ते सर्वांवर कृपेचा वर्षाव करीत आहेत. आपल्या स्नेहमय दृष्टीने ते भक्तांच्या हृदयाला स्पर्श करीत होते आणि त्यांच्या विशाल श्यामवर्ण वक्षःस्थळावर जी लक्ष्मी विराजमान झाली होती, तिच्या शोभेने ते समस्त दिव्यलोकांचा चूडामणी असलेल्या वैकुंठधामाला सुशोभित करीत होते. (३९)


पीतांशुके पृथुनितम्बिनि विस्फुरन्त्या ।
    काञ्च्यालिभिर्विरुतया वनमालया च ।
वल्गुप्रकोष्ठवलयं विनतासुतांसे ।
    विन्यस्तहस्तमितरेण धुनानमब्जम् ॥ ४० ॥
पीतांबरोचि हरि तो कमरेस नेसे
    कंठास ती विरजते वनमाळ,भृंग ।
दंडात कंकण तसे कर एक ठेवी
खांदी गरूड नि दुजे धारिलेहि चक्र ॥ ४० ॥

पृथुनितम्बिनि - विस्तीर्ण कटिप्रदेश आहे आश्रय ज्याला अशा - पीतांशुके - पीताम्बरावर - विस्फुरन्त्या - झळकणार्‍या - काच्ञया - कमरपट्ट्याच्या योगाने - च - आणि - अलिभिः - भ्रमरांच्या - विरुतया - शब्दांनी युक्त अशा - वनमालया - वनमालेने - युक्तम् - युक्त अशा - वल्गुप्रकोष्ठवलयम् - सुंदर आहे मनगटावरील कडे ज्याच्या अशा - विनतासुतांसे - गरुडाच्या खांद्यावर - हस्तम् - हात - विन्यस्य - ठेवून - इतरेन - दुसर्‍या हाताने - अब्जम् - कमळ - धुनानम् - हलविणार्‍या अशा परमेश्वराला - अचक्षत - पहाते झाले ॥४०॥
त्यांच्या पीतांबरमंडित विशाल नितंबांवर झगमगणारी मेखला आणि गळ्यात भ्रमरांनी वेढलेली वनमाला विराजमान झाली होती. तसेच कलाकुसरयुक्त कडे घातलेला एक हात त्यांनी गरुडाच्या खांद्यावर ठेवला होता, तर दुसर्‍या हाताने ते कमलपुष्प फिरवीत होते. (४०)


विद्युत्क्षिपन् मकरकुण्डलमण्डनार्ह ।
    गण्डस्थलोन्नसमुखं मणिमत्किरीटम् ।
दोर्दण्डषण्डविवरे हरता परार्ध्य ।
    हारेण कन्धरगतेन च कौस्तुभेन ॥ ४१ ॥
वीजे परी मकर कुंडल तेज फाके
    ती नासिका उभर सुंदर मूख शोभा ।
शीरावरीहि झळके मणितेज टोपा
    कंठात हार चमके मणि कौस्तुभाची ॥ ४१ ॥

विद्युत्क्षिपन् - विद्युल्लतेचा तिरस्कार करणारी अशी जी - मकरकुण्डनार्ह - मकराकार कुण्डले त्यांच्या शोभेला योग्य अशा - गण्डस्थलोन्नसमुखम् - गण्डस्थलाने आणि उत्कृष्ट नासिकेने युक्त आहे मुख ज्याचे अशा - मणिमत्किरीटम् - रत्नांनी युक्त आहे किरीट ज्याचा अशा - दोर्दण्डषण्डविवरे - लांब बाहूंच्या मध्यभागात असलेल्या - हरता - मनोहर - परार्ध्यहारेण - मौल्यवान् हाराने
त्यांचे सुंदर गाल विजेच्या प्रभेला लाजविणार्‍या मकराकृती कुंडलांची शोभा वाढवीत होते. उत्तुंग नासिका असलेले, मोहक मुख होते. मस्तकावर रत्‍नजडित मुकुट होता. तसेच चारी हातांच्या मध्ये महामूल्यवान हार आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी विराजत होता. (४१)


अत्रोपसृष्टमिति चोत्स्मितमिन्दिरायाः ।
    स्वानां धिया विरचितं बहुसौष्ठवाढ्यम् ।
मह्यं भवस्य भवतां च भजन्तमङ्गं ।
    नेमुर्निरीक्ष्य न वितृप्तदृशो मुदा कैः ॥ ४२ ॥
सौंदर्यशालि दिसला भगवान् तदा तो
    लक्ष्मीस लज्जित करी जणु हा रूपाने ।
माझ्या शिवा नि तुमचा प्रगटेचि कार्या
    तो श्रीहरी नमियला कुमरांनि तेंव्हा ॥ ४२ ॥

स्वानाम् - भक्तांच्या - धिया - बुद्धीने - इन्दिरायाः - लक्ष्मीचा - बहुसोष्ठवाढ्यम् - मी अत्युत्तम सौंदर्याने युक्त आहे असा - उत्स्मितम् - गर्व - अत्र - भगवन्ताच्या सौंदर्याच्या ठिकाणी - उपस्पृष्टम् - अस्तंगत झाला आहे - इति - असा - विरचितम् - तर्क केला - मह्यम् - माझ्याकरिता - भवस्य - शंकराकरिता - भवताम् - सनत्कुमारादि मुनींकरिता - अङ्गम् - शरीराला - भजन्तम् - धारण करणार्‍या अशा - विष्णुम् - विष्णूला - निरीक्ष्य - पाहून - नवितृप्तदृशः - तृप्त झाले नाहीत नेत्र ज्याचे असे ते मुनि - मुदा - हर्षाने - कैः - मस्तकांनी - नेमुः - नमस्कार करिते झाले ॥४२॥
भगवंतांचे स्वरूप अत्यंत सौंदर्यशाली होते. त्यांना पाहून भक्तांच्या मनात येत असे की, यांच्या समोर लक्ष्मीचा सौंदर्याभिमानही गळून पडला आहे. ब्रह्मदेव म्हणाले, देवहो, अशाप्रकारे माझ्यासाठी, महादेवांसाठी आणि तुमच्यासाठी परम सुंदर रूप धारण करणार्‍या श्रीहरींना पाहून सनकादी मुनींनी त्यांना मस्तक लववून नमस्कार केला. ते त्यांचे अद्‌भुत रूप पाहाता पाहाता त्यांच्या नेत्रांची तृप्तीच होत नव्हती. (४२)


तस्यारविन्दनयनस्य पदारविन्द ।
    किञ्जल्कमिश्रतुलसीमकरन्दवायुः ।
अन्तर्गतः स्वविवरेण चकार तेषां ।
    सङ्क्षोभमक्षरजुषामपि चित्ततन्वोः ॥ ४३ ॥
ध्यानात मग्न असता मनि त्याच वेळी
    त्या पादपद्म मकरंद सुवास वेगे ।
गंधात त्या तुळसिच्या मिसळोनि श्वासी
    गेला मुनीं हृदयि ना निज भान राही ॥ ४३ ॥

तस्य अरविन्दनयनस्य - त्या कमलनेत्र भगवंताच्या - पादारविन्दकिञ्जल्कमिश्र - चरणावरील कमलांच्या केसरांनी मिश्र अशा - तुलसीमकरन्दवायुः - तुलसीच्या मकरंदाने युक्त असा वायु - स्वविवरेण - आपल्या नासिकेच्या छिद्राने - अन्तर्गतः - आत गेलेला असा - अक्षरजुषाम् तेषाम् - ब्रह्मानन्दाचे सेवन करणार्‍या अशाहि त्या सनत्कुमार मुनीमध्ये - चित्ततन्वोः - अंतःकरण व देह यांचा - क्षोभम् - क्षोभ - चकार - करता झाला ॥४३॥
सनकादी मुनीश्वर नेहमी ब्रह्मानंदात निमग्न राहात असत. परंतु ज्यावेळी भगवान कमलनयनांच्या चरणकमलांतील मकरंदात मिसळलेल्या तुलसी-मंजिरीच्या सुवासिक वायूने नाकातून त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला, त्यावेळी भक्तीच्या आवेगाने ते आपले शरीर सांभाळू शकले नाहीत आणि त्यांची मनेही विचलित झाली. (४३)


ते वा अमुष्य वदनासितपद्मकोशम् ।
    उद्वीक्ष्य सुन्दरतराधरकुन्दहासम् ।
लब्धाशिषः पुनरवेक्ष्य तदीयमङ्‌घ्रि ।
    द्वन्द्वं नखारुणमणिश्रयणं निदध्युः ॥ ४४ ॥
ते नीलपद्म गमले मुख श्रीहरीचे
    ते हास्य कुंदकलिका परि शांत होते ।
झाले मनात मुनि कृतकृत्य ऐसे
    ते पद्मराग नख पाद ध्याती ॥ ४४ ॥

ते - ते सनत्कुमार मुनि - वै - निश्चयाने - सुन्दरतरा - अतिशय सुंदर अशा रक्तवर्ण - अधरकुन्दहासम् - अधरोष्ठावर कुन्दपुष्पाप्रमाणे शोभणार्‍या हास्याने युक्त अशा - अमुष्य - ह्या विष्णूचे - वदनासितपद्मकोशम् - मुख हेच जी नीलवर्ण कमळाची कळा त्याला - उव्दीक्ष्य - पाहून - लब्धाशिषः - पूर्ण झाले आहेत मनोरथ ज्यांचे असे होत्सासे - पुनः - पुनः - नखारुणमणिश्रयणम् - नखरुपी किंचित् लाल रत्नांचा आश्रयरूप असे - तदीयम् - त्या विष्णूचे - अङ्घ्रिव्दन्व्दम् - दोन चरण - अवेक्ष्य - पाहून - निदिध्युः - ध्यान करते झाले ॥४४॥
भगवंतांचे मुख नीलकमलासारखे होते, अतिशय सुंदर ओठ आणि कुंदकळीसारखे मनोहर हास्य यांमुळे त्यांची शोभा आणखीच वाढली होती. ते पाहूनच ते कृतकृत्य झाले. पुन्हा पद्मरागासारख्या लाल लाल नखांनी सुशोभित असे त्यांचे चरणकमल पाहून ते त्यांचे ध्यान करू लागले. (४४)


पुंसां गतिं मृगयतामिह योगमार्गैः ।
    ध्यानास्पदं बहुमतं नयनाभिरामम् ।
पौंस्नं वपुर्दर्शयानमनन्यसिद्धैः ।
    औत्पत्तिकैः समगृणन्युतमष्टभोगैः ॥ ४५ ॥
ज्या सिद्धि ना मिळति त्या मुनि साधानात
    आठीहि सिद्धि सहजी हरिच्या ठिकाणी ।
जो योग मार्गि पुरुषा विषयोच ऐसा
    तो गायिला मुनिवरे सुखनेत्रवृद्धी ॥ ४५ ॥

इह - ह्या जगात - योगमार्गैः - योगमार्गांनी - गतिम् - मोक्षाला - मृगयताम् - शोधणार्‍या - पुंसाम् - पुरुषांचे - ध्यानास्पदम् - ध्यानांचा विषय असे - बहुमतम् - अत्यन्त मान्य - नयनाभिरमम् - नेत्रांना आनंद देणारे असे - पौंस्नम् - पुरुषाचे - वपुः - शरीर - दर्शयानम् - दाखविणार्‍या अशा - अनन्यसिद्धैः - इतरांना दुर्लभ अशा - औत्पत्तिकेः - स्वाभाविक - अष्टभोगैः - अणिमादि आठ सिद्धींनी - युतम् - युक्त अशा - विष्णुम् - विष्णूला - समगृणन् - स्तविते झाले ॥४५॥
यानंतर ते मुनी अन्य साधनांनी सिद्ध न होणार्‍या स्वाभाविक अष्टसिद्धींनी संपन्न अशा श्रीहरींची स्तुती करू लागले. जे भगवान योगमार्गाने मोक्षपदाला जाऊ इच्छिणार्‍या पुरुषांच्या ध्यानाचा विषय होणारे अत्यंत आदरणीय आणि नयनानंद वाढविणारे पुरुषरूप प्रगट करतात. (४५)


कुमारा ऊचुः -
योऽन्तर्हितो हृदि गतोऽपि दुरात्मनां त्वं ।
    सोऽद्यैव नो नयनमूलमनन्त राद्धः ।
यर्ह्येव कर्णविवरेण गुहां गतो नः ।
    पित्रानुवर्णितरहा भवदुद्‍भवेन ॥ ४६ ॥
सनकादिक म्हणाले-
तू राहसी जरिहि दुष्ट त्याहि देही
    तो ना बघे तुजसि त्या जणु झापड्याची ।
ब्रह्म्ये तुझे स्वरुप हे जधि वर्णियेले
    तेंव्हाचि भास नि बघो अजि तू समक्ष ॥ ४६ ॥

अनन्त - हे अनन्ता - यः - जो - त्वम् - तू - हृदि - हृदयामध्ये - गतः अपि - राहिलेला असूनही - दुरात्मनाम् - दुष्ट आहे अन्तःकरण ज्याचे अशा पुरुषांना - अन्तर्हितः - गुप्त - असि - आहेत - सः - तो - नः - आम्हाला - अन्तर्हितः न भवसि - गुप्त नसतोस - तु - परंतु - नयनमूलम् - डोळ्यांच्या मूळाला - अद्य एव - आजच - राध्दः - प्राप्त झाला आहेस - यर्हि - ज्या वेळी - भवदुभ्दवेन - तुझ्यापासून आहे उत्पत्ति ज्याची अशा - नः - आमच्या - पित्रा - पित्याने - त्वम् - तू - अनुवर्णितरहाः - वर्णन केले आहे रहस्य ज्याचे असा झालास - तर्हि एव - तेव्हाच - कर्णविवरेण - कर्णरन्ध्राने - गुहां गतः - आमच्या बुध्दीमध्ये तू प्रगट झालास ॥४६॥
सनकादी मुनी म्हणाले - हे अनंता, जरी आपण अंतर्यामीरूपाने अशुद्धचित्त असणार्‍या पुरुषांच्या हृदयामध्ये असता, तरीसुद्धा त्यांना कधीच दिसत नाहीत. प्रभो, ज्यावेळी आपल्यापासून उत्पन्न झालेल्या आमच्या पित्याने ब्रह्मदेवांनी आपले रहस्य वर्णन केले होते, त्याचवेळी कानाद्वारे आमच्या बुद्धीत आपण विराजमान झाला होता. परंतु प्रत्यक्ष दर्शनमात्र आम्हांला आजच झाले आहे. (४६)


तं त्वां विदाम भगवन्परमात्मतत्त्वं ।
    सत्त्वेन सम्प्रति रतिं रचयन्तमेषाम् ।
यत्तेऽनुतापविदितैर्दृढभक्तियोगैः ।
    उद्‍ग्रन्थयो हृदि विदुर्मुनयो विरागाः ॥ ४७ ॥
साक्षात तूचि असशी परमात्मरूप
घेवोनि रूप रिझवी निज भक्त त्यांना ।
हे रूप जे सगुण नी निरहं असेचि
    ध्याती तुझ्याच वरदे मुनि श्रेष्ठ नित्य ॥ ४७ ॥

भगवन् - हे भगवन्ता - विरागाः - विरक्त असे - मुनयः - मुनि - ते - तुझ्या - अनुतापविदितैः - कृपेने जाणिलेल्या - दृढभक्तियोगैः - दृढ अशा श्रवणादिक भक्तियोगांनी - उद्‌ग्रन्थयः - तुटली आहे अहंकाररूप गाठ ज्यांची असे - हृदि - अन्तःकरणात - यत् - जे - विदुः - जाणतात - तत् - ते - परम् - श्रेष्ठ - आत्मतत्त्वम् - आत्मस्वरूप - सत्त्वेन - सत्त्वमूर्तीने - एषाम् - ह्या भक्तांना - संप्रति - उत्तम प्रकारे प्रतिक्षणी - रतिम् - प्रीतीला - रचयन्तम् - उत्पन्न करणार्‍या अशा - तम् त्वाम् - त्या तुला - विदाम - जाणतो ॥४७॥
भगवन, आपल्याला आम्ही साक्षात परमात्मतत्त्व म्हणूनच जाणतो. यावेळी आपल्या विशुद्ध सत्त्वमय शरीराने आपल्या या भक्तांना आनंदित करणार्‍या, आसक्ती आणि अहंकाराने मुक्त असे मुनिजन आपल्या कृपादृष्टीने प्राप्त झालेल्या सुदृढ भक्तियोगाने आपल्या या रूपाला हृदयात पाहातात. (४७)


नात्यन्तिकं विगणयन्त्यपि ते प्रसादं ।
    किम्वन्यदर्पितभयं भ्रुव उन्नयैस्ते ।
येऽङ्ग त्वदङ्‌घ्रिशरणा भवतः कथायाः ।
    कीर्तन्यतीर्थयशसः कुशला रसज्ञाः ॥ ४८ ॥
आहे तुझे सुयश कीर्तनची करावे
    कीर्ती तुझी श्रवणि दे तयि मोक्ष तुच्छ ।
केली जरी भुवई वक्र भितेच विश्व
    इंद्रादि भोगि मग ते कुठल्या कुठेची ॥ ४८ ॥

अङ्ग - हे देवा - त्वदङ्घ्रिशरणाः - तुझे चरण आहेत आश्रय ज्यांचा असे - कुशलाः - कल्याणस्वरूप असे - ये - जे - कीर्तन्यतीर्थशसः - वर्णन करण्यास योग्य व पवित्र आहे कीर्ति ज्याची अशा - भवतः - तुझ्या - कथायाः - कथेचा - रसज्ञाः - रस जाणणारे - सन्ति ते - आहेत ते - आत्यन्तिकम् अपि - अत्यन्त मोठ्या मोक्षस्वरूप अशाहि - प्रसादम् - प्रसादाला - न विगणयन्ति - मोजीत नाहीत - तु - तर - ते - तुझ्या - भुवः - भ्रुकुटीच्या - उन्नयैः - चढविण्याने - अर्पितभयम् - ठेविले आहे भय ज्यामध्ये अशा - अन्यत् - दुसर्‍या इन्द्रादि पदाला - विगणयेयुः - आदरतील - किम् - काय ॥४८॥
हे प्रभो, आपले सुयश अत्यंत कीर्तनीय आणि सांसारिक दुःखांची निवृत्ती करणारे आहे. आपल्या चरणांशी शरण आलेले जे महाभाग आपल्या कथेचे रसिक आहेत, ते आपला आत्यंतिक प्रसाद जो मोक्ष, त्याचीही पर्वा करीत नाहीत; तर मग ज्यांना आपली थोडीसुद्धा वक्रदृष्टी भयभीत करते, त्या इंद्रपद इत्यादी अन्य भोगांची काय कथा ? (४८)


कामं भवः स्ववृजिनैर्निरयेषु नः स्तात् ।
    चेतोऽलिवद्यदि नु ते पदयो रमेत ।
वाचश्च नस्तुलसिवद्यदि तेऽङ्‌घ्रिशोभाः ।
    पूर्येत ते गुणगणैर्यदि कर्णरन्ध्रः ॥ ४९ ॥
भुंग्यासमान रमते मन आमुचे हे
    पायी तुझ्याच ठिवणे तुळसी प्रमाणे ।
ऐकोत आम्हि तुझिया मग कीर्तना ते
    होवो जरीहि नरकी मग ना च चिंता ॥ ४९ ॥

यदि - जर - नः - आमचे - चेतः - अन्तःकरण - ते - तुझ्या - पदयोः - चरणांच्या ठिकाणी - अलिवत् - भ्रमराप्रमाणे - रमेत नु - खरोखर रमेल - यदि - जर - नः - आमच्या - वाचः - वाणी - तुलसिवत् - तुलसीप्रमाणे - ते - तुझ्या - अङ्घ्रिशोभाः - चरणांमुळे आहे शोभा ज्यांना अशा - भवेयुः - होतील - च - आणि - यदि - जर - कर्णरन्ध्रः - कर्णच्छिद्र - ते - तुझ्या - गुणगणैः - गुणांच्या समुदायांनी - पूर्येत - भरून जाईल - तर्हि - तर - स्ववृजिनैः - आपल्या पापांच्या योगाने - निरयेषु - नरकांमध्ये - भवः - जन्म - कामम् - यथेच्छ - स्तात् - होवो ॥४९॥
भगवन, जर आमचे चित्त भ्रमराप्रमाणे आपल्या चरणकमलांशीच रममाण होईल, आमची वाणी तुळसीप्रमाणे आपल्या चरणकमलांच्या वर्णनामुळे सुशोभित होईल आणि आमचे कान आपल्या सुयशरूप अमृताने परिपूर्ण होतील, तर आमच्या पापांमुळे उत्पन्न आमचा जन्म नरकादी योनींत होऊ दे. त्याची आम्हांला चिंता नाही. (४९)


प्रादुश्चकर्थ यदिदं पुरुहूत रूपं ।
    तेनेश निर्वृतिमवापुरलं दृशो नः ।
तस्मा इदं भगवते नम इद्विधेम ।
    योऽनात्मनां दुरुदयो भगवान् प्रतीतः ॥ ५० ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे जयविजयोः सनकादिशापो नाम पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥
हे कीर्तिमान् भगवते दिसलास ऐसा
    धालो स्वये नयनि सौख्य मिळे न कोणा ।
साक्षात तूचि दिसला नयनास आम्हा
    आम्ही तुलाचि नमितो विनये करोनी ॥ ५० ॥
॥ इति श्रीमद्‌भागवत महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥
॥ पंधरावा अध्याय हा ॥ ३ ॥ १५ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥


पुरुहूत - मोठी आहे कीर्ति ज्याची अशा - ईश - हे ईश्वरा - यत् - जे - इदम् - हे - रूपम् - स्वरूप - प्रादुश्चकर्थ - तू प्रगट केलेस - तेन - त्या स्वरूपाने - नः - आमची - दृशः - दृष्टि - अलम् - अत्यन्त - निर्वृतिम् - सुखाला - अवापुः - प्राप्त झाली - अनात्मनाम् - इन्द्रिये स्वाधीन नसलेल्या पुरुषांना - दुरुदयः - अशक्य आहे दर्शन ज्याचे असा - यः - जो - भगवान् - विष्णु - इत् - अशा प्रकारचा - प्रतीतः - प्रत्यक्ष झालेला - असि - आहेस - तस्मै - त्या - भगवते - भगवान विष्णूला - इदम् - हा - नमः - नमस्कार - विधेम - आम्ही करतो ॥५०॥
हे विपुलकीर्ती प्रभो, आपण आमच्यासमोर हे जे मनोहर रूप प्रगट केले आहे, त्यामुळे आमच्या डोळ्य़ांना अत्यंत सुख प्राप्त झाले आहे. विषयासक्त अजितेंद्रिय पुरुषांना हे रूप दिसणे अत्यंत कठीण आहे. आपण साक्षात भगवान आमच्या डोळ्यांसमोर प्रकट झालेले आहात. आम्ही आपणांस प्रणाम करीत आहोत. (५०)


स्कंध तिसरा - अध्याय पंधरावा समाप्त

GO TOP