|
श्रीमद् भागवत पुराण दितिकश्यपसंवादः, दित्यां कश्यपद्वारा गर्भस्थापनं च - दितीची गर्भधारणा - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
br> हरेः कथां कारणसूकरात्मनः ।
पुनः स पप्रच्छ तमुद्यताञ्जलिः न चातितृप्तो विदुरो धृतव्रतः ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - ( इंद्रवज्रा ) प्रयोजनी सूकर रूप धारी मैत्र्यजिंच्या मुखिची कथा ही । विदूर ऐकोनि अतृप्त राही भक्तीव्रती हात जुळोनि बोले ॥ १ ॥
धृतव्रतः - स्वीकारिले आहेत नियम ज्याने असा - सः - तो विदुर - कारणसूकरात्मनः - पृथ्वीचा उद्धार करण्याकरिता वराहाचे रूप धारण केलेल्या - हरेः - ईश्वराची - कोषारविणा - मैत्रेय ऋषीने - उपवर्णिताम् - सांगितलेल्या - कथाम् - कथेला - निशम्य - श्रवण करून - न अतितृप्तः - फारशी तृप्ती न झालेला असा - उद्यताञ्जलिः - हात जोडून - पुनः - पुनः - पप्रच्छ - प्रश्न करिता झाला ॥१॥
श्रीशुकदेव म्हणाले - राजन, विशिष्ट हेतूने वराह बनलेल्या श्रीहरींची मैत्रेयांच्या तोंडून कथा ऐकूनही भक्तीचे व्रत धारण केलेल्या विदुराची पूर्ण तृप्ती झाली नाही. म्हणून त्याने हात जोडून पुन्हा विचारले. (१)
विदुर उवाच -
तेनैव तु मुनिश्रेष्ठ हरिणा यज्ञमूर्तिना । आदिदैत्यो हिरण्याक्षो हत इत्यनुशुश्रुम ॥ २ ॥
विदुरांनी विचारिले - ( अनुष्टुप् ) आदिदैत्य हिरण्याक्षा मारिले यज्ञमूर्तिने । आताच बोलले तुम्ही आम्ही ते ऐकले असे ॥ २ ॥
मुनिश्रेष्ठ - हे ऋषिवर्या - तेन एव - त्याच - तु - तर - यज्ञमूर्तिना - यज्ञस्वरूपी - हरिणा - परमेश्वराने - आदिदैत्यः - पहिला दैत्य - हिरण्याक्षः - हिरण्याक्ष - हतः - मारिला - इति - अशी गोष्ट - अनुशुश्रुम - आम्ही ऐकिले आहे ॥२॥
विदुर म्हणाला - मुनिवर, आम्ही आपल्याकडून ऐकले की, आदिदैत्य हिरण्याक्षाला भगवान यज्ञमूर्तींनीच मारले. (२)
तस्य चोद्धरतः क्षौणीं स्वदंष्ट्राग्रेण लीलया ।
दैत्यराजस्य च ब्रह्मन् कस्माद् हेतोरभून्मृधः ॥ ३ ॥
दाढेने काढिता पृथ्वी लीलेने भगवान् जधी । कोणत्या कारणे झाले दोघांचे घोर युद्ध ते ॥ ३ ॥
ब्रह्मन् - हे मैत्रेय ऋषे - क्षोणीम् - पृथ्वीला - स्वदंष्ट्राग्रेण - आपल्या दाढेच्या टोकाने - उद्धरतः - वर काढणार्या - तस्य - त्या वराहरूपी श्रीहरीचा - च - आणि - दैत्यराजस्य - दैत्यराज हिरण्याक्षाचा - मृधः - संग्राम - कस्मात् - कोणत्या - हेतोः - कारणामुळे - अभूत् - झाला ॥३॥
ब्रह्मन, ज्यावेळी भगवान सहजपणे पृथ्वीला आपल्या दाढेवर ठेवून वर काढीत होते, त्यावेळी त्यांचे आणि दैत्यराज हिरण्याक्षाचे युद्ध कशासाठी झाले ? (३)
मैत्रेय उवाच -
साधु वीर त्वया पृष्टं अवतारकथां हरेः । यत्त्वं पृच्छसि मर्त्यानां मृत्युपाशविशातनीम् ॥ ४ ॥
मैत्रयजी म्हणाले- साधुवीरा तुम्ही प्रश्न कथेसी अनुषंगिक । पुसला जो मनुष्याचे संसार बंध तोडतो ॥ ४ ॥
वीर - हे वीरा विदुरा - त्वया - तुझ्याकडून - साधु - चांगले - पृष्टम् - विचारिले गेले - यत् - कारण - त्वम् - तू - मर्त्यानाम् - मनुष्यांच्या - मृत्युपाशविशातनीम् - मृत्युरूप बन्धन तोडणारी अशी - हरेः - श्रीहरीची - अवतार कथाम् - अवताराची कथा - पृच्छसि - विचारतोस ॥४॥
मैत्रेय म्हणाले - विदुरा, तुझा प्रश्न मोठा सुंदर आहे. कारण तू श्रीहरीच्या अवतारकथांसंबंधीच विचारीत आहेस. या कथा मनुष्यांचे मृत्युपाश तोडणार्या आहेत. (४)
ययोत्तानपदः पुत्रो मुनिना गीतयार्भकः ।
मृत्योः कृत्वैव मूर्ध्न्यङ्घ्रिं आरुरोह हरेः पदम् ॥ ५ ॥
पुत्र उत्तानपादाचा नारदी बोध घेउनी । मृत्युला तुडवोनीया श्रेष्ठ त्या पदि बैसला ॥ ५ ॥
मुनिना - नारदाने - गीतया - गायिलेल्या - यया - ज्या कथेने - उत्तानपदः - उत्तानपाद राजाचा - अर्भकः - अल्पवयी - पुत्रः - पुत्र - मृत्योः एव - मृत्यूचाच - मूर्न्धि - मस्तकावर - अङ्घ्रिम् - पाय - कृत्वा - करून - हरेः - विष्णूच्या - पदम् - स्थानावर - आरुरोह - चढला ॥५॥
पहा ना ! उत्तानपादाचा पुत्र ध्रुव हा लहानपणीच श्रीनारदांनी सांगितलेल्या हरिकथेच्या प्रभावाने मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून भगवंतांच्या परमपदावर आरूढ झाला होता. (५)
अथात्रापीतिहासोऽयं श्रुतो मे वर्णितः पुरा ।
ब्रह्मणा देवदेवेन देवानां अनुपृच्छताम् ॥ ६ ॥
हिरण्याक्ष नि भगवान् यांच्या युद्धाचिया कथा । उत्तरा देवतांच्या त्या ब्रह्माजी बोलले तसे ॥ परंपरेनुसारेची ऐकिले मीहि ते असे ॥ ६ ॥
अथ - नंतर - अत्र अपि - या संग्रामाविषयीहि - पुरा - पूर्वी - देवानाम् अनुपृच्छताम् - देव प्रश्न करीत असता - देवदेवेन ब्रह्मणा - देवांचा मुख्य देव अशा ब्रह्मदेवाने - वर्णितः - वर्णन केलेला - अयम् - हा - इतिहासः - इतिहास - मे - माझ्या - श्रुतः - ऐकण्यात आला आहे ॥६॥
पूर्वी एकदा देवांनी प्रश्न विचारल्यावरून श्रीब्रह्मदेवांनी त्यांना हाच इतिहास सांगितलेला मी ऐकला आहे. (६)
दितिर्दाक्षायणी क्षत्तः मारीचं कश्यपं पतिम् ।
अपत्यकामा चकमे सन्ध्यायां हृच्छयार्दिता ॥ ७ ॥ इष्ट्वाग्निजिह्वं पयसा पुरुषं यजुषां पतिम् । निम्लोचत्यर्क आसीनं अग्न्यगारे समाहितम् ॥ ८ ॥
दक्षपुत्री दिती इच्छी कामातुरचि होऊनी । सायं प्रार्थी पतीकश्यप् मरीची राजनंदना ॥ ७ ॥ ते होते खीर घेवोनी अग्निशाळेत बैसले । होते यज्ञार्थ ध्यानस्थ सूर्यास्तासी पजेत त्या ॥ ८ ॥
क्षत्तः - हे विदुरा - दाक्षायणी - दक्ष प्रजापतीची कन्या - दितिः - दिति - अर्के - सूर्य - निम्लोचति - अस्ताला जात असता - अग्निजिह्वम् - अग्नि आहे जिह्वा ज्याची अशा - यजुषाम् - यज्ञांचा - पतिम् - रक्षक अशा - पुरुषम् - परमेश्वराला - पयसा - दुधाने - इष्ट्वा - हवन करून - अग्न्यगारे - अग्निशाळेमध्ये - समाहितम् - स्वस्थ मनाने - आसीनम् - बसलेल्या - पतिम् मारीचम् - पति मरीचिपुत्र अशा - कश्यपम् - कश्यप ऋषीला - अपत्यकामा - अपत्याची इच्छा जिला आहे अशी - हृच्छयार्दिता - मदनाने पीडित अशी - संध्यायाम् - संध्याकाळी - चकमे - भोगार्थ इच्छिती झाली ॥७-८॥
विदुरा, एकदा दक्षाची मुलगी दिती हिने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने कामातुर होऊन तिन्हीसांजेच्या वेळीच आपले पती मरीचीनंदन कश्यपांच्या सहवासाची कामना केली. (७) त्यावेळी कश्यप अग्नी हीच जिव्हा असलेल्या भगवान यज्ञपतींना पायसाच्या आहुती देऊन सूर्यास्ताचे वेळी अग्निशाळेत ध्यानस्थ बसले होते. (८)
दितिरुवाच -
एष मां त्वत्कृते विद्वन् काम आत्तशरासनः । दुनोति दीनां विक्रम्य रम्भामिव मतङ्गजः ॥ ९ ॥
दीति म्हणाली - मत्तहत्ती जसा केळी बागेचा ध्वंस मांडितो । धनुर्धारी तसा काम छळितो तुजवाचुनी ॥ ९ ॥
विद्वन् - हे ज्ञानी ऋषे - एषः - हा - कामः - मदन - आत्तशरासनः - घेतलेले आहे धनुष्य ज्याने असा - त्वत्कृते - तुझ्याकरिता - दीनाम् - निरपराधी अशा - माम् - मला - मतङ्गजः - हत्ती - रम्भाम् इव - केळीप्रमाणे - विक्रम्य - पराक्रम करून - दुनोति - दुःख देतो ॥९॥
दिती म्हणाली - अहो विद्वन, उन्मत्त झालेला हत्ती जसा केळीचे झाड चुरगळून टाकतो, त्याचप्रमाणे हा धनुर्धर कामदेव अबला असलेल्या मला जबरदस्तीने तुमच्यासाठी बेचैन करीत आहे. (९)
तद्भवान् दह्यमानायां सपत्नीनां समृद्धिभिः ।
प्रजावतीनां भद्रं ते मय्यायुङ्क्तामनुग्रहम् ॥ १० ॥
पाही मी सवती माझ्या समृद्ध पुत्र होऊनी । ईर्षेने जळते अंग करावी मजला कृपा ॥ १० ॥
तत् - म्हणून - भवान् - आपण - प्रजावतीनाम् - संतति ज्यास आहे अशा - सपत्नीनाम् - सवतीच्या - समृद्धिभिः - समृद्धिनी - दह्यमानायाम् मयि - दुःखित होणार्या माझ्यावर - अनुग्रहम् - कृपा - आयुङ्क्त्ताम् - करावी - ते - तुझे - भद्रम् - कल्याण - अस्तु - असो ॥१०॥
आपल्या पुत्रवती सवतींचे सुख पाहून मी इर्षेने जळत आहे. म्हणून आपण माझ्यावर कृपा करा. आपले कल्याण असो. (१०)
भर्तर्याप्तोरुमानानां लोकानाविशते यशः ।
पतिर्भवद्विधो यासां प्रजया ननु जायते ॥ ११ ॥
ज्या गर्भे पुत्ररूपाने पती जन्मेल रूपि त्या । ज्या मुळे पत्नि ती होय सन्मानित पतीचि ती ॥ ११ ॥
भर्तरी - पतीच्या ठिकाणी - आप्तोरुमानानाम् - प्राप्त केला आहे मोठा मान ज्यांनी अशा स्त्रियांची - यशः - कीर्ति - लोकान् - जगात - अविशते - पसरते - यासाम् - ज्यांच्या - प्रजया - संततीने - भवद्विधः - तुमच्यासारखा - पतिः - पति - ननु - खरोखर - जायते - उत्पन्न होतो ॥११॥
ज्यांच्या गर्भातून आपल्यासारखा पती पुत्ररूपाने जन्म घेतो, त्याच स्त्रिया आपल्या पतींपासून सन्मानित समजल्या जातात. त्यांचे सुयश जगात सगळीकडे पसरते. (११)
पुरा पिता नो भगवान् दक्षो दुहितृवत्सलः ।
कं वृणीत वरं वत्सा इत्यपृच्छत नः पृथक् ॥ १२ ॥
आम्हा भगिनिला दक्ष प्रेमाने बोल बोलला । कोणता वरिता छान पती जो आवडे तुम्हा ॥ १२ ॥
पुरा - पूर्वी - नः - आमचा - पिता - पिता - भगवान् - ऐश्वर्यसंपन्न - दुहितृवत्सलः - कन्यांवर प्रीती करणारा - दक्षः - दक्षप्रजापति - वत्साः - मुलींनो - कम् - कोणत्या - वरम् - पतीला - वृणीत - वरता - इति - असे - नः - आम्हाला - पृथक् - वेगवेगळे - अपृच्छत - विचारता झाला ॥१२॥
आमचे वडील प्रजापती दक्ष यांचे आपल्या मुलींवर अतिशय प्रेम होते. एकदा त्यांनी आम्हा सर्वांना स्वतंत्रपणे बोलावून विचारले की, "आपला पति कोण असावा, असे तुम्हांस वाटते ?" (१२)
स विदित्वात्मजानां नो भावं सन्तानभावनः ।
त्रयोदशाददात्तासां यास्ते शीलमनुव्रताः ॥ १३ ॥
आमची काळजी त्याला तेरा त्याच्या मुली अम्ही । ज्यांना आवडले तुम्ही ता आम्ही वरिंले तुम्हा ॥ १३ ॥
संतानभावनः - प्रजा उत्पन्न करणारा - सः - तो दक्ष - नः - आम्हा - आत्मजानाम् - कन्यांचा - भावम् - अभिप्राय - विदित्वा - जाणून - तासाम् - त्यांपैकी - याः - ज्या - ते - तुझ्या - शीलम् - स्वभावाला - अनुव्रताः - अनुसरणार्या - आसन् - होत्या - ताः - त्या - त्रयोदश - तेरा - तुभ्यम् - तुला - अददात् - देता झाला ॥१३॥
ते आपल्या मुलींची काळजी घेणारे होते. म्हणून आमच्या भावना जाणून त्यांनी आमच्यापैकी तेरा कन्यांचा, गुण आणि स्वभावाला अनुरूप अशा आपल्याशी विवाह लावून दिला. (१३)
अथ मे कुरु कल्याण कामं कञ्जविलोचन ।
आर्तोपसर्पणं भूमन् अमोघं हि महीयसि ॥ १४ ॥
करावे मम कल्याण कामकंजविलोचना । दीनांचे मागणे व्यर्थ न हो श्रेष्ठापुढे कधी ॥ १४ ॥
जञ्जविलोचन - हे कमलनेत्रा - कल्याण - हे सुखदायका - अथ - आता - मे - माझी - कामम् - इच्छापूर्ति - कुरु - करा - हि - कारण - भूमन् - हे संपन्ना - महीयसि - मोठ्याच्या ठिकाणी - आर्तोपसर्पणम् - दुःखितांची याचना - अमोघम् - निष्फल न होणारी असते ॥१४॥
म्हणून हे मंगलमूर्ती, हे कमलनयन, आपण माझी इच्छा पूर्ण करावी. कारण हे महत्तम, दीनजनांचे आपल्यासारख्या महापुरुषांकडे जाणे निष्फळ होत नाही. (१४)
इति तां वीर मारीचः कृपणां बहुभाषिणीम् ।
प्रत्याहानुनयन् वाचा प्रवृद्धानङ्गकश्मलाम् ॥ १५ ॥
दीति ती कामवेगाने बेचैन बहु बोलली । प्रार्थिले कश्यपा तेंव्हा गोड शस्ब्दात बोलले ॥ १५ ॥
वीर - हे शूरा विदुरा - मारीचः - कश्यप - प्रवृद्धानङ्गकश्मलाम् - वाढलेल्या कामाने पीडित जालेल्या अशा - ताम् - त्या दितीला - वाचा - भाषणाने - अनुनयन् - शान्त करीत - प्रत्याह - म्हणाला ॥१५॥
विदुरा, कामाच्या अतिवेगाने दिती अत्यंत बेचैन झाली होती. तिने या रीतीने पुष्कळ प्रकारांनी विनवून कश्यपांना प्रार्थना केली. तेव्हा तिला समजावीत मधुर वाणीने ते म्हणाले, (१५)
एष तेऽहं विधास्यामि प्रियं भीरु यदिच्छसि ।
तस्याः कामं न कः कुर्यात् सिद्धिस्त्रैवर्गिकी यतः ॥ १६ ॥
भिरु ! इच्छा तुझी पूर्ण धर्मार्थकाम सिद्ध जी । करितो,कोण तो ऐसा पत्नीसी काम ना करी ॥ १६ ॥
भीरु - भित्रे - एषः - हा - अहम् - मी - यत् - जे - इच्छसि - तू इच्छितेस - तत् - ते - ते - तुझे - प्रियम् - प्रिय - विधास्यामि - करीन - यतः - जिच्यापासून - त्रैवर्गिकी - धर्म, अर्थ व काम यांची - सिद्धिः - सिद्धि - भवति - होते - तस्याः - त्या स्त्रीची - कामम् - इच्छा - कः - कोण - न कुर्यात् - पुरी करणार नाही ॥१६॥
अधीर प्रिये, तुझ्या इच्छेनुसार मी आताच तुझ्या मनासारखे अवश्य करीन. जिच्यामुळे धर्म, अर्थ, आणि काम या तिन्हींची सिद्धी होते, अशा आपल्या पत्नीची कामना कोण पूर्ण करणार नाही ? (१६)
सर्वाश्रमानुपादाय स्वाश्रमेण कलत्रवान् ।
व्यसनार्णवमत्येति जलयानैर्यथार्णवम् ॥ १७ ॥
जहाजी बसता जातो सागरा पार कोणिही । गृहस्थ सहचारीच्या योगाने दुःख पार हो ॥ १७ ॥
कलत्रवान् - विवाहित पुरुष - यथा - ज्याप्रमाणे - जलयानैः - नौकांच्या योगाने - अर्णवम् - समुद्राला - तथा - त्याप्रमाणे - स्वाश्रमेण - आपल्या आश्रमाने - सर्वाश्रमान् - सर्व आश्रमांना - उपादाय - घेऊन - व्यसनावर्णवम् - दुःखरूपी समुद्राला - अत्येति - तरून जातो ॥१७॥
ज्याप्रमाणे माणूस जहाजाने महासागर पार करतो, त्याचप्रमाणे गृहस्थाश्रमी दुसर्या आश्रमांना आश्रय देत आपल्या आश्रमद्वारा स्वतःही दुःखसमुद्रातून पार होतो. (१७)
यामाहुरात्मनो ह्यर्धं श्रेयस्कामस्य मानिनि ।
यस्यां स्वधुरमध्यस्य पुमांश्चरति विज्वरः ॥ १८ ॥
मानिनी ! त्रय पौरूषी अर्धांगी मानिली असे । निश्चिंत पति तो राही विसंबुनि तिच्यावरी ॥ १८ ॥
मानिनि - हे मानी स्त्रिये - याम् - जिला - श्रेयस्कामस्य - कल्याणेच्छू पुरुषाच्या - आत्मनः - देहाचे - अर्धम् - अर्धा भाग - आहुः - म्हणतात - पुमान् - पुरुष - यस्याम् - जिच्या ठिकाणी - स्वधुरम् - आपल्या कामांचा भार - अध्यस्य - ठेवून - विज्वरः - चिंतारहित असा - चरति - फिरतो ॥१८॥
हे मानिनी ! त्रिविध पुरुषार्थांची इच्छा असणार्या पुरुषांची स्त्री ही अर्धे अंग समजली जाते. तिच्यावर आपल्या गृहस्थाश्रमाचा भार टाकून पुरुष निश्चिंत राहातो. (१८)
यामाश्रित्येन्द्रियारातीन् दुर्जयानितराश्रमैः ।
वयं जयेम हेलाभिः दस्यून् दुर्गपतिर्यथा ॥ १९ ॥
दुर्जयी इंद्रिये शत्रु किल्लेदार जसा लढे । धन्याचे धन तो राखि तशी ती जी विवाहिता ॥ १९ ॥
यथा - ज्याप्रमाणे - दुर्गपतिः - किल्ल्याचा अधिकारी - दस्यून् - शत्रूंना - तथा - त्याप्रमाणे - वयम् - आम्ही - याम् - जिचा - आश्रित्य - आश्रय करून - इतराश्रयैः - इतर आश्रमांनी - दुर्जयान् - जिंकण्यास अशक्य़ अशा - इन्द्रियारातीन् - इन्द्रियरूप शत्रूंना - हेलाभिः - लीलांनी - जयेम - जिंकू शकतो ॥१९॥
इंद्रियरूप शत्रूंना जिंकणे अन्य आश्रमवासीयांना अत्यंत कठीण आहे. परंतु ज्याप्रमाणे किल्लेदार लुटारूंना सहज आपल्या अधीन करून घेतो, त्याचप्रमाणे आम्ही जिच्या आश्रयाने इंद्रियरूप शत्रूंना सहज जिंकून घेतो. (१९)
न वयं प्रभवस्तां त्वां अनुकर्तुं गृहेश्वरि ।
अप्यायुषा वा कार्त्स्न्येन ये चान्ये गुणगृध्नवः ॥ २० ॥
गृहेश्वरी ! तुझ्या ऐशा पत्नीचा उपकार तो । गुणग्राही पती कोणी जन्मात फेडु ना शके ॥ २० ॥
गृहेश्वरि - हे गृहस्वामिनी - ये - जे - वयम् - आम्ही - गुणगृध्नवः - गुण ग्रहण करणारे - स्मः - आहोत - ते - ते - च - आणि - अन्ये - दुसरे - ताम् त्वाम् अनुकर्तुम् - त्या तुझे अनुकरण करण्यास - आयुषा अपि वा - सर्व आयुष्याने देखील - न प्रभवः - समर्थ नाही ॥२०॥
हे गृहस्वामिनी, तुझ्यासारख्या पत्नीच्या उपकारांची परतफेड आम्ही किंवा कोणताही गुणग्राही पुरुष या जन्मात किंबहुना जन्मांतरातही पूर्णपणे करू शकत नाही. (२०)
अथापि काममेतं ते प्रजात्यै करवाण्यलम् ।
यथा मां नातिरोचन्ति मुहूर्तं प्रतिपालय ॥ २१ ॥
तरीही जी तुझी इच्छा संतान प्राप्तिची पुरी । यथाशक्ति करीतो मी परी तू थांब थोडिशी ॥ मुहुर्त एकची थांब जेणे निंदा न होय ती ॥ २१ ॥
अथ अपि - असे असताही - प्रजात्यै - संततीकरिता - एतम् - ह्या - ते - तुझ्या - कामम् - कामाला - अलं करवाणि - मी पूर्ण करीन - यथा - जेणे करून - माम् - माझी - न अतिवोचन्ति - लोक निन्दा करणार नाहीत - तथा - तशी - मुहूर्तम् - दोन घटिका - प्रतिपालय - तू थांब ॥२१॥
तरीसुद्धा तुझी संतानप्राप्तीची इच्छा मी अवश्य पूर्ण करीन. पण तू एक मुहूर्तभर थांब, त्यामुळे लोक माझी निंदा करणार नाहीत. (२१)
एषा घोरतमा वेला घोराणां घोरदर्शना ।
चरन्ति यस्यां भूतानि भूतेशानुचराणि ह ॥ २२ ॥
अत्यंत घोर ही वेळ भयान राक्षसी पहा । भगवान् भूतनाथाचे गणही फिरती तसे॥ २२ ॥
एषा - ही - घोराणाम् - राक्षसादि भयंकर प्राण्यांची - वेला - वेळ - घोरदर्शना - भयंकर आहे दर्शन जिचे अशी - घोरतमा - अत्यन्त भयङ्कर - अस्ति - आहे - यस्याम् - जिच्या ठिकाणी - भूतेशानुचराणि - शंकराची अनुयायी अशी - भूतानि - भूते - चरन्ति ह - फिरतात ॥२२॥
ही अत्यंत भयंकर वेळ राक्षसादी भयंकर प्राण्यांची आहे आणि दिसण्यातही भयानक आहे. यावेळी भगवान भूतनाथांचे भूत, प्रेत, इत्यादी गण फिरत असतात. (२२)
एतस्यां साध्वि सन्ध्यायां भगवान् भूतभावनः ।
परीतो भूतपर्षद्भिः वृषेणाटति भूतराट् ॥ २३ ॥
साध्वी या अस्तवेळेला भगवान् भूतभावन । भूत प्रेता सवे जातो वृषभीं बैसुनी शिव ॥ २३ ॥
साध्वि - हे पतिव्रते - एतरयाम् संध्यायाम् - ह्या संध्याकाळच्या वेळी - भूतभावनः - प्राण्यांचे कल्याण करणारा - भगवान् - भगवान् - भूतराट् - भूतांची राजा शंकर - भूतपर्षद्भिः - भूतगणांनी - परीतः - युक्त असा - वृषेण - नंदीवर बसून - अटति - फिरतो ॥२३॥
हे साध्वी, या तिन्हीसांजेच्या वेळी भूतभावन भूतपती भगवान शंकर, भूत, प्रेत इत्यादी आपल्या गणांना बरोबर घेऊन नंदीवर बसून फिरत असतात. (२३)
श्मशानचक्रानिलधूलिधूम्र
विकीर्णविद्योतजटाकलापः । भस्मावगुण्ठामलरुक्मदेहो देवस्त्रिभिः पश्यति देवरस्ते ॥ २४ ॥
( इंद्रवज्रा ) स्मशान चक्रानिल धूम्र धूळे तो तो जटाजूट दिपूनि राही । सुवर्ण गौरांग विलेप भस्म तो मेहुणा पाहि त्रिनेत्रि आता ॥ २४ ॥
श्मशानचक्रानिलधूलिधूम्रविकिर्णविद्योतजटाकलापः - श्मशानातील वावटळीने उठविलेल्या धुळीने धूम्रवर्ण व विसकटलेला असा आहे देदीप्यमान जटाकलाप ज्याचा असा - देवः - शंकर - ते - तुझा - देवरः - दीर - त्रिभिः - तीन डोळ्यांनी - पश्यति - पहातो ॥२४॥
स्मशानभूमीतून उडालेल्या वावटळीच्या धुळीने धूसर झालेल्या ज्यांच्या जटा दैदीप्यमान दिसत आहेत आणि ज्यांनी सुवर्णकांतिमय गोर्या शरीराला भस्म लावले आहे, ते तुझे दीर महादेव आपल्या सूर्य, चंद्र आणि अग्निरूप अशा तिन्ही डोळ्यांनी सर्वांना पाहात आहेत. (२४)
न यस्य लोके स्वजनः परो वा
नात्यादृतो नोत कश्चिद्विगर्ह्यः । वयं व्रतैर्यत् चरणापविद्धां आशास्महेऽजां बत भुक्तभोगाम् ॥ २५ ॥
त्याला न कोणी परका नि प्रीय न निंदितो नी नच लोभ कोणा । माया तयाची करणे स्विकार भोगास लाथे त्यजिले तयाने ॥ २५ ॥
यस्य - ज्याचा - लोके - जगात - स्वजनः - स्वकीय - वः - किंवा - परः - परकीय - न - नाही - अत्यादृतः न - पूज्य कोणी नाही - उत - किंवा - विगर्ह्यः - निंद्य - कश्चित् - कोणी - न - नाही - बत - खरोखर - वयम् - आम्ही - व्रतैः - व्रतांनी - यच्चरणापविद्धाम् - ज्याच्या पायाने फेकलेल्या अशा - भुक्तभोगाम् - घेतला आहे भोग जिचा अशा - अजाम् - मायारूप वैभवाला - आशास्महे - इच्छितो ॥२५॥
या जगात त्यांना कोणी आपला किंवा परका नाही. कोणी विशेष आदरणीय आहे किंवा कोणी निंदनीय आहे, असेही नाही. आम्ही तर अनेक व्रतांचे पालन करून त्यांच्या मायेला जवळ करू इच्छितो की, जिचा उपभोग घेऊन तिला त्यांनी दूर लोटले आहे. (२५)
यस्यानवद्याचरितं मनीषिणो
गृणन्त्यविद्यापटलं बिभित्सवः । निरस्तसाम्यातिशयोऽपि यत्स्वयं पिशाचचर्यामचरद्गतिः सताम् ॥ २६ ॥
विद्वान मोहा करण्या फजीत पवित्र कीर्ती हरिचीच गाती । ना त्या परी कोणिहि संत जाती समृद्ध होवोनि स्मशानि राही ॥ २६ ॥
अविद्यापटलम् - मायेच्या आवरणाला - बिभित्सवः - दूर करण्याची इच्छा करणारे - मनीषिणः - ज्ञानी लोक - यस्य - ज्या शंकराच्या - अनवद्याचरितम् - निर्दोष आचरणाला - गृणन्ति - स्तवितात - यत् - कारण - सः - तो - स्वयम् - स्वतः - सताम् - साधूंना - गतिः - मोक्ष देणारा - निरस्तु साम्यातिशयः अपि - दूर केले आहे इतरांचे साम्य किंवा आधिक्य ज्याने असा असूनहि - पिशाचचर्याम् - पिशाचांच्या वृत्तीला - अचरत् - आचरता झाला ॥२६॥
विवेकी पुरुष अविद्येचे आवरण दूर करण्याच्या इच्छेने त्यांच्या निर्मल चरित्राचे गायन करतात. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठच काय, त्यांच्या बरोबरीचाही कोणी नाही आणि फक्त सत्पुरुषच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. एवढे सगळे असूनही ते स्वतः पिशाचासारखे आचरण करतात. (२६)
हसन्ति यस्याचरितं हि दुर्भगाः
स्वात्मन् रतस्याविदुषः समीहितम् । यैर्वस्त्रमाल्याभरणानुलेपनैः श्वभोजनं स्वात्मतयोपलालितम् ॥ २७ ॥
श्वानास भक्ष्यो तनु हीन ऐसी ते मुढ देहा म्हणातात आत्मा । वस्त्रे अलंकार नि चंदनाते घेती, तये ते हसती शिवाला ॥ २७ ॥
स्वात्मन्रतस्य - स्वस्वरूपी रममाण असलेल्या - तस्य - ज्या शंकराच्या - समीहितम् - अभीष्ट अशा - आचरितम् - आचरणाला - अविद्वांस - अज्ञानी - दुर्भगाः - दुर्दैवी लोक - हसन्ति हि - हसतात - यैः - ज्यांनी - वस्त्रमाल्याभरणानुलेपनैः - वस्त्रे, माला, अलङ्कार व उटी यांनी - श्वभोजनम् - कुत्र्यांचे भक्ष असे हे शरीर - स्वात्मतया - आपला आत्मा आहे असे समजून - उपलालितम् - गौरविले ॥२७॥
माणसाचे शरीर हे कुत्र्याचे खाद्य आहे, जो अविवेकी पुरुष त्याला आत्मा मानून वस्त्र, अलंकार, माळा, चंदन इत्यादींनी सजवितो, तो अभागीच आत्माराम भगवान शंकरांच्या आचरणाला त्याचा हेतू न कळल्यामुळे हसतो. (२७)
ब्रह्मादयो यत्कृतसेतुपाला
यत्कारणं विश्वमिदं च माया । आज्ञाकरी यस्य पिशाचचर्या अहो विभूम्नश्चरितं विडम्बनम् ॥ २८ ॥
ब्रह्मादिकी लोकहि सर्व त्याची नुल्लंधती रेष ’शिवाय’ धर्म । मायादि आज्ञांकित वागते ती लीला प्रभूची नकळे कुणाला ॥ २८ ॥
ब्रह्मादयः - ब्रह्मदेवप्रभृति देव - यत्कृतसेतुपालाः - ज्याने घालून दिले त्या धर्ममर्यादेचे पालन करणारे आहेत - इदम् - हे - विश्वम् - जग - यत्कारणम् - ज्यापासून उत्पन्न झालेले - अस्ति - आहे - च - आणि - माया - प्रकृति - यस्य - ज्याची - आज्ञाकरी - आज्ञा मान्य करणारी - अस्ति - आहे - तस्य - त्या शंकराची - पिशाचचर्या - पिशाच्याप्रमाणे वृत्ति - अस्ति - आहे - अहो - अहो - विभूम्नः - मोठ्यांचे - चरितम् - चरित्र - विडम्बनम् - अतर्क्य - अस्ति - आहे ॥२८॥
ब्रह्मदेवादी लोकपालसुद्धा त्यांनी घालून दिलेल्या धर्ममर्यादेचे पालन करतात, तेच या विश्वाचे अधिष्ठान आहेत आणि ही मायासुद्धा त्यांच्याच आज्ञेचे पालन करते. असे असूनही ते पिशाचासारखे आचरण करतात. अहो ! त्या जगद्व्यापक प्रभूची ही अद्भुत लीला काही समजत नाही. (२८)
मैत्रेय उवाच -
सैवं संविदिते भर्त्रा मन्मथोन् मथितेन्द्रिया । जग्राह वासो ब्रह्मर्षेः वृषलीव गतत्रपा ॥ २९ ॥
मैत्रेयजी सांगतात-( अनुष्टुप् ) कामातुरा दितीने ते पतीचे ऐकिले परी । वेश्येसमचि निर्लज्ज होऊनी आग्रहे पुन्हा ॥ ब्रह्मर्षी जो पती त्याचे धरिले वस्त्रही करें ॥ २९ ॥
भर्त्रा - पतीने - एवम् - याप्रमाणे - संविदिते - जाणविले असता - मन्मथोन्मथितेन्द्रिया - मदनाने व्याकुळ केलेली आहेत इंद्रिये जिची अशी - सा - ती दिति - वृषली इव - वेश्येप्रमाणे - गतत्रपा - गेली आहे लज्जा जिची अशी - ब्रह्मर्षेः - ब्रह्मर्षि कश्यपाच्या - वासः - वस्त्राला - जग्राह - धरिती झाली ॥२९॥
मैत्रेय म्हणाले - पतीने अशा प्रकारे समजावल्यानंतरही कामातुर झालेल्या दितीने वेश्येप्रमाणे निर्लज्ज होऊन ब्रह्मर्षी कश्यपांच्या वस्त्राला हात घातला. (२९)
स विदित्वाथ भार्यायाः तं निर्बन्धं विकर्मणि ।
नत्वा दिष्टाय रहसि तयाथोपविवेश हि ॥ ३० ॥
पत्निचा हट्ट पाहोनी दैवाला त्या नमोनिया । निंदीत कार्य हे जाणी एकान्ती एक जाहला ॥ ३० ॥
अथ - नंतर - सः - तो कश्यप ऋषी - भार्यायाः - पत्नीचा - तम् - त्या - विकर्मणि - निषिद्ध कर्मातील - निर्बन्धम् - आग्रहाला - विदित्वा - जाणून - दिष्टाय - दैवाला - नत्वा - नमस्कार करून - अथ - नंतर - तया - तिच्यासह - रहसि - एकांतात - उपविवेश ह - बसलो ॥३०॥
अशा निंद्य कर्मासाठी आपल्या पत्नीचा हट्ट पाहून कश्यपांनी दैवाला नमस्कार केला आणि एकांतात तिचाशी समागम केला. (३०)
अथोपस्पृश्य सलिलं प्राणानायम्य वाग्यतः ।
ध्यायन् जजाप विरजं ब्रह्म ज्योतिः सनातनम् ॥ ३१ ॥
पुन्हा स्नान करोनीया वाणी नी प्राण संयमे । ज्योतिर्मयचि ब्रह्माचे केले आरंभ ध्यान ते ॥ ३१ ॥
अथ - नंतर - सलिलम् उपस्पृश्य - उदकाला स्पर्श करून - प्राणान् आयम्य - प्राणायाम करून - वाग्यतः - मौन धारण केलेला असा - विरजम् - निर्मळ अशा - ज्योतिः - तेजोरूप सूर्याचे - ध्यायन् - ध्यान करीत - सनातनम् - नित्य अशा - ब्रह्म - परब्रह्मरूप गायत्रीला - जजाप - जपिता झाला ॥३१॥
नंतर त्यांनी स्नान करून प्राणायाम केला आणि मौन धारण करून विशुद्ध सनातन तेजाचे ध्यान करीत ते गायत्रीजप करू लागले. (३१)
दितिस्तु व्रीडिता तेन कर्मावद्येन भारत ।
उपसङ्गम्य विप्रर्षिं अधोमुख्यभ्यभाषत ॥ ३२ ॥
निंद्यकर्मे दितीलाही वाटली बहुलाज ही । जवळी पतिच्या येता नमुनी बोलली अशी ॥ ३२ ॥
भारत - हे विदुरा - तेन - त्या - कर्मावद्येन - निंद्य कर्माने - व्रीडिता - लज्जित झालेली - दितिः - दिति - विप्रर्षिम् - ब्रह्मर्षीच्या - उपसंगम्य - जवळ जाऊन - अधोमुखी - खाली आहे मुख जिचे अशी - अभाषत - बोलली ॥३२॥
विदुरा, दितीलासुद्धा त्या निंद्य कर्माविषयी लाज वाटू लागली, आणि ब्रह्मर्षींच्या जवळ जाऊन खाली मान घालून ती म्हणू लागली. (३२)
दितिरुवाच -
न मे गर्भमिमं ब्रह्मन् भूतानां ऋषभोऽवधीत् । रुद्रः पतिर्हि भूतानां यस्याकरवमंहसम् ॥ ३३ ॥
दीति म्हणाली :- ब्रह्मन् तो रुद्र भूतांच्या स्वमीची अपराधि मी । परंतु मम गर्भाला न तो नष्ट करी हर ॥ ३३ ॥
ब्रह्मन् - हे ऋषे - यस्य - ज्याचा - अंहसम् - अपराध - अकरवम् - केला - सः - तो - भूतानाम् - प्राण्यांमध्ये - ऋषभः - श्रेष्ठ असा - रुद्रः - शंकर - इमम् - ह्या - मे - माझ्या - गर्भम् - गर्भाला - मा वघीत् - नष्ट न करो - हि - कारण - सः - तो - भूतानाम् - प्राण्यांचा - पतिः - रक्षक - अस्ति - आहे ॥३३॥
दिती म्हणाली - ब्रह्मन, भगवान रुद्र भूतांचे स्वामी आहेत. मी त्यांचा अपराध केला आहे. परंतु ते भूतश्रेष्ठ माझा हा गर्भ नष्ट न करोत ! (३३)
नमो रुद्राय महते देवायोग्राय मीढुषे ।
शिवाय न्यस्तदण्डाय धृतदण्डाय मन्यवे ॥ ३४ ॥
नमिते रुद्ररूपाला भक्त वत्सल हेतुला । कल्याणकारि तो भक्ता दंडितो दुष्टशा जना ॥ ३४ ॥
रुद्राय - भयंकर - उग्राय - उग्र - मीढुषे - सकामकर्माचे फल देणार्या - न्यस्तदण्डाय - टाकला आहे दंड ज्याने असा - मन्यवे - क्रोधरूप अशा - महते देवाय - महादेवाला - नमः - नमस्कार असो ॥३४॥
भक्तवांछाकल्पतरू, उग्र आणि रुद्ररूप अशा महादेवाला मी नमस्कार करते. ते सत्पुरुषांचे कल्याण करणारे आणि त्यांना दंड न देणारे आहेत, परंतु दुष्टांना मात्र रागाने दंड देणारे आहेत. (३४)
स नः प्रसीदतां भामो भगवानुर्वनुग्रहः ।
व्याधस्याप्यनुकम्प्यानां स्त्रीणां देवः सतीपतिः ॥ ३५ ॥
अनुकंपा शिकारीही स्त्रियांशी करिती सदा । शिव तो मेहुणा माझा कृपाळु नी प्रसन्नही ॥ आम्हा स्त्रीयांवरी व्याधही दया करिती पहा । शिव तो मेहुणे माझे मजला ते प्रसन्नची ॥ ३५ ॥
सः - तो - भामः - भगिनीपति - भगवान् - भगवान - उर्वग्रहः - मोठी आहे कृपा ज्याची असा - सतीपतिः - सतीदेवीचा पती - देवः - महादेव - व्याधस्य अपि - पारध्याला देखील - अनुकम्पानाम् - अनुग्रह करण्यास योग्य अशा - नः - आम्हा - स्त्रीणाम् - स्त्रियांना - प्रसीदताम् - प्रसन्न होवो ॥३५॥
आम्हां स्त्रियांवर तर शिकारी लोकसुद्धा दया दाखवितात. मग ते सतीपती तर माझे मेहुणे आणि परम कृपाळू आहेत. ते माझ्यावर प्रसन्न होवोत ! (३५)
मैत्रेय उवाच -
स्वसर्गस्याशिषं लोक्यां आशासानां प्रवेपतीम् । निवृत्तसन्ध्यानियमो भार्यामाह प्रजापतिः ॥ ३६ ॥
मैत्रेयजी सांगतात - संपता ध्यानसंध्यादी कश्यपे पाहिले पुढे । अंगासी कांपरी दीती पुत्र कल्याण प्रार्थिता ॥ ३६ ॥
निवृत्तसंध्यानियमः - समाप्त झाले आहे सायंकाळचे विहित कर्मानुष्ठान ज्याचे असा - प्रजापतिः - प्रजापति कश्यप - प्रवेपतीम् - कंप पावणार्या अशा - स्वसर्गस्य - आपल्या संततीच्या - लोक्याम् - उभय लोकांना योग्य अशा - आशिषम् - कल्याणाची - आशासानाम् - इच्छा करणार्या अशा - भार्याम् - पत्नीला - आह - म्हणाला ॥३६॥
मैत्रेय म्हणाले - सायंकालीन संध्यावंदन आदी झाल्यावर प्रजापती कश्यपांनी पाहिले की, दिती थरथर कापत आहे आणि आपल्या संतानाच्या लौकिक पारलौकिक उन्नतीसाठी प्रार्थना करीत आहे. तेव्हा ते तिला म्हणाले. (३६)
कश्यप उवाच -
अप्रायत्यादात्मनस्ते दोषान्मौहूर्तिकादुत । मन्निदेशातिचारेण देवानां चातिहेलनात् ॥ ३७ ॥ भविष्यतस्तवाभद्रौ अभद्रे जाठराधमौ । लोकान्सपालांस्त्रींश्चण्डि मुहुराक्रन्दयिष्यतः ॥ ३८ ॥
कश्यपजी म्हणाले - तुझे ते मळले चित्त कामाच्या वासनेमुळे । अवेळ,मज ना मानी देवताही न मानिल्या ॥ ३७ ॥ अमंगला तुझ्या पोटी पुत्र अधम दोन ते । जन्मुनी त्रासुनी भूपा लोकांना पीडितील की ॥ ३८ ॥
अभद्रे - दुर्दैवी - चण्डि - हे कोपिष्टे - ते - तुझे - आत्मनः - अंतःकरणाच्या - अप्रायत्याय् - अशुद्धपणामुळे - मौहूर्तिकात् - दोन घटिकांच्या - दोषात् - दोषामुळे - उत मन्निदेशातिचारेण - आणि माझ्या आज्ञेचा भंग केल्यामुळे - च - आणि - देवानाम् - देवांच्या अनुचरांचा - अवहेलनात् - अपमान केल्यामुळे - तव - तुला - अभद्रौ जाठराधमौ - अकल्याणकारी व अधम असे पुत्र - भविष्यतः - होतील - तौ - ते - सपालान् - रक्षकांसहित - लोकान् - तिन्ही लोकांना - मुहुः - वारंवार - आक्रन्दयिष्यतः - रडावयास लावतील ॥३७-३८॥
कश्यप म्हणाले - कामवासनेने तुझे चित्त मलीन झाले होते. ती वेळही शुभ नव्हती. तू माझे म्हणणे ऐकले नाहीस. तसेच देवांची सुद्धा अवहेलना केलीस. (३७) हे अमंगल स्त्रिये, तुला दोन अमंगळ आणि अधम पुत्र उत्पन्न होतील. ते वारंवार संपूर्ण लोक आणि लोकपालांना आपल्या अत्याचारांनी रडवतील. (३८)
प्राणिनां हन्यमानानां दीनानां अकृतागसाम् ।
स्त्रीणां निगृह्यमाणानां कोपितेषु महात्मसु ॥ ३९ ॥ तदा विश्वेश्वरः क्रुद्धो भगवान् लोकभावनः । हनिष्यत्यवतीर्यासौ यथाद्रीन् शतपर्वधृक् ॥ ४० ॥
अपराधाविना प्राणि मरतील तया करे । स्त्रियांची छेड होईल महात्म्यां क्रोधही चढे ॥ ३९ ॥ कोपोनी पाहता देव भगवान् जन्म घेउनी । पर्वता तोडि जै इंद्र त्यांना मारील तो तसा ॥ ४० ॥
दीनानाम् - गरीब - अकृतागसाम् - केला नाही अपराध ज्यांनी असे - प्राणिनाम् - प्राणी - हन्यमानानाम् - मारले जात असता - स्त्रीणाम् - स्त्रिया - निगृह्यमाणानाम् - बलात्काराने धरल्या जात असता - महात्ससु - साधु - कोपितेषु - क्रुद्ध झाले असता - तदा - त्यावेळी - लोकभावनः - जगाचे कल्याण करणारा - विश्वेश्वरः - विश्वाचा स्वामी - असौ - हा - भगवान् - विष्णू - क्रुद्धः - रागावलेला असा - अवतीर्य - अवतार घेऊन - यथा - ज्याप्रमाणे - शतपर्वधृक् - वज्र धारण करणारा इंद्र - अद्रीन् - पर्वतांना - तथा इमौ - त्याप्रमाणे ह्या दोन पुत्रांना - हनिष्यति - मारील ॥३९-४०॥
जेव्हा त्यांच्या हातून पुष्कळसे निरपराध आणि दीन प्राणी मारले जाऊ लागतील, स्त्रियांवर अत्याचार होऊ लागतील आणि महात्म्यांना क्रुद्ध केले जाईल, त्यावेळी सर्व लोकांचे रक्षण करणारे भगवान श्रीजगदीश्वर क्रुद्ध होऊन अवतार घेतील आणि इंद्राने ज्याप्रमाणे पर्वतांना शासन केले त्याप्रमाणे ते त्यांचा वध करतील. (३९-४०)
दितिरुवाच -
वधं भगवता साक्षान् सुनाभोदारबाहुना । आशासे पुत्रयोर्मह्यं मा क्रुद्धाद्ब्राह्मणाद् विभो ॥ ४१ ॥
दीति म्हणाली - द्विजांच्या क्रोध शापाने न हो त्यांचा कधी वध । भगवान् चक्रपाणीच्या करें पुत्र मरो सुखे ॥ ४१ ॥
विभो - महाराज - सुनाभोदारबाहुना - सुदर्शनचक्रामुळे सुंदर आहेत बाहु ज्याचे अशा - भगवता - विष्णूकडून - मह्यम् - माझ्या - पुत्रयोः - दोन पुत्रांचा - वधम् - वध - आशासे - इच्छिते - क्रुद्धात् - रागावलेल्या - ब्राह्मणात् - ब्राह्मणापासून - मा - नव्हे ॥४१॥
दिती म्हणाली - प्रभो, माझीसुद्धा अशीच इच्छा आहे की, जर माझ्या पुत्रांचा वध होणार असेल, तर तो साक्षात भगवान चक्रपाणी यांच्या हातूनच होवो. क्रुद्ध ब्राह्मणांच्या शापामुळे होऊ नये. (४१)
न ब्रह्मदण्डदग्धस्य न भूतभयदस्य च ।
नारकाश्चानुगृह्णन्ति यां यां योनिमसौ गतः ॥ ४२ ॥
ब्राह्मणे शापिता दग्ध प्राण्यांना भय दावि जो । नारकी प्राणिही त्याला ना दाविती कधी ॥ ४२ ॥
नारकाः - नरकातील लोक - च - आणि - असौ - हा - याम् याम् - ज्या ज्या - योनिम - योनीला - गतः - जाईल - तत्रस्थाः - त्या ठिकाणचे लोक - ब्रह्मदण्डदग्ध - ब्राह्मणाच्या दण्डामुळे दग्ध झालेल्या प्राण्यावर - च - आणि - भूतभयदस्य - प्राणिमात्राला दुःख देणार्या प्राण्यावर - न अनुगृह्णन्ति - अनुग्रह करीत नाहीत ॥४२॥
जो जीव ब्राह्मणांच्या शापाने दग्ध झालेला किंवा प्राण्यांना भय उत्पन्न करणारा असतो, तो कोणत्याही योनीत गेला तरी त्याच्यावर पापी असणारे जीवसुद्धा दया दाखवीत नाहीत. (४२)
कश्यप उवाच -
कृतशोकानुतापेन सद्यः प्रत्यवमर्शनात् । भगवत्युरुमानाच्च भवे मय्यपि चादरात् ॥ ४३ ॥ पुत्रस्यैव च पुत्राणां भवितैकः सतां मतः । गास्यन्ति यद्यशः शुद्धं भगवद्यशसा समम् ॥ ४४ ॥
कश्यपजी म्हणाले - पश्चात्ताप तुला झाला शोक हा करिसी असा । सारासार विचाराने माझा नी शिव विष्णुचा ॥ ४३ ॥ आहे आदर तै तूंते एका पुत्रास त्यातल्या । भक्त होईल तो पुत्र गातील संत कीर्ति ज्या ॥ ४४ ॥
कृतशोकानुपातेन - केलेल्या अपराधाने झालेला शोक व पश्चाताप या दोहींमुळे - सद्यः - तत्काल - प्रत्यवमर्शनात् - युक्त व अयुक्त याचा विचार केला असता - भगवति - विष्णूच्या ठिकाणी - च - आणि - उरुमानात् - मोठा मान ठेविल्यामुळे - भवे - शंकराच्या ठिकाणी - च - आणि - मयि आदरात् - माझ्या ठिकाणी आदर ठेवल्यामुळे - ते - तुझ्या - पुत्रस्य एव - पुत्राच्याच - पुत्रानाम् - पुत्रांमध्ये - तु - तर - एकः - एक - सताम् - साधूंना - मतः - मान्य असा पुत्र - भविता - होईल - शुद्धम् - शुद्ध असे - यद्यशः - ज्याचे यश - भगवद्यशसासमम् - भगवंताच्या कीर्तीच्या बरोबरीने - गास्यन्ति - गातील ॥४३-४४॥
कश्यप म्हणाले - देवी, तू आपल्या कर्माबद्दल शोक आणि पश्चात्ताप प्रगट केला आहेस. तुला योग्य काय व अयोग्य काय यांचा बोधही तत्काळ झाला आणि भगवान विष्णू, शंकर आणि माझ्याबद्दल तुला फार आदर आहे. म्हणून तुझ्या एका पुत्राच्या चार पुत्रांपैकी एक असा होईल की, सत्पुरुषसुद्धा ज्याचा सन्मान करतील आणि ज्याचे पवित्र यश, भक्तजन, भगवंतांच्या गुणांसह गातील. (४३-४४)
योगैर्हेमेव दुर्वर्णं भावयिष्यन्ति साधवः ।
निर्वैरादिभिरात्मानं यच्छीलमनुवर्तितुम् ॥ ४५ ॥
वारंवार जसे सोने करिती शुद्धची तसे । साधू ते त्यानुसाराने करितील स्वयां तसे ॥ ४५ ॥
योगैः - प्रयोगांनी - दुर्वर्णम् - हिणकस - हेम इव - सुवर्ण जसे तसे - साधवः - साधु पुरुष - यच्छीलम् - ज्याच्या स्वभावाला - अनिवर्तितुम् - अनुसरण्याकरिता - निर्वैरादिभिः - निर्वैरत्व इत्यादि उपायांनी - आत्मानम् - स्वतःला - भावयिष्यन्ति - शुद्ध करतील ॥४५॥
ज्याप्रमाणे अशुद्ध सोने वारंवार तापवून शुद्ध केले जाते, त्याप्रमाणे साधुजन त्याच्या स्वभावाचे अनुकरण करण्यासाठी निर्वैरता इत्यादी उपायांनी आपले अंतःकरण शुद्ध करतील. (४५)
यत्प्रसादादिदं विश्वं प्रसीदति यदात्मकम् ।
स स्वदृग्भगवान् यस्य तोष्यतेऽनन्यया दृशा ॥ ४६ ॥
ज्याच्या कृपें जगत् सर्व आनंदे भरते असा । स्वयं प्रकाश भगवान् तया पावेल भक्तिने ॥ ४६ ॥
यदात्मकम् - जे परमेश्वरस्वरूप - इदम् - हे - विश्वम् - जग - यत्प्रसादात् - ज्या परमेश्वराच्या प्रसादामुळे - प्रसीदति - प्रसन्न होते - सः - तो - स्वदृक् - सर्वसाक्षी - भगवान् - परमेश्वर - यस्य - ज्यांच्या - अनन्यया दृशा - एकनिष्ठ बुद्धीने - तोष्यते - संतुष्ट होईल ॥४६॥
ज्यांच्या कृपेमुळे त्यांचेच स्वरूपभूत असणारे हे जग आनंदित होते, ते स्वयंप्रकाश भगवानसुद्धा त्याच्या अनन्य भक्तीने संतुष्ट होतील. (४६)
स वै महाभागवतो महात्मा
महानुभावो महतां महिष्ठः । प्रवृद्धभक्त्या ह्यनुभाविताशये निवेश्य वैकुण्ठमिमं विहास्यति ॥ ४७ ॥
( इंद्रवज्रा ) उदार जे भक्त प्रभावशाली त्यांनाहि तो बाळचि पूज्य होई । होईल विशुद्ध मोठाच भक्त दंभास त्यागी हरिसी स्मरोनी ॥ ४७ ॥
सः - तो - महाभागवतः - मोठा भगवद्भक्त - महात्मा - महात्मा - महानुभावः - थोर अन्तःकरणाचा - महताम् - मोठ्यांमध्ये - प्रवृद्धभक्त्या - वृद्धिंगत झालेल्या भक्तीने - अनुभाविताशये - शुद्ध झालेल्या अंतःकरणात - वैकुण्ठम् - विष्णूला - निवेश्य - स्थापून - इमम् - हा संसार - वै - खरोखर - विहास्यति - सोडून देईल ॥४७॥
तो मुलगा मोठा भगवद्भक्त, प्रभावशाली आणि महान पुरुषांनाही पूज्य होईल. तसेच वाढलेल्या भक्तिभावाने विशुद्ध आणि भावविभोर झालेल्या अंतःकरणात श्रीभगवंतांची स्थापना करून तो देहाभिमानाचा त्याग करील. (४७)
अलम्पटः शीलधरो गुणाकरो
हृष्टः परर्ध्या व्यथितो दुःखितेषु । अभूतशत्रुर्जगतः शोकहर्ता नैदाघिकं तापमिवोडुराजः ॥ ४८ ॥
आसक्त ना शील गुणी असा तो दुज्यांसुखी हर्ष दुःखात दुःखी । अजातशत्रू हरि चंद्र ताप तसा हरी तो भव ताप लोकी ॥ ४८ ॥
अलम्पटः - लम्पट नसलेला - शीलधरः - चांगल्या स्वभावाचा - गुणाकरः - गुणांचा सागर - परद्ध्र्या - दुसर्याच्या संपत्तीने - हृष्टः - हर्ष पावलेला - दुःखितेषु - दुःखी लोकांच्या ठिकाणी - व्यथितः - दुःखी झालेला - अभूतशत्रुः - उत्पन्न झाला नाही शत्रु ज्याला असा - सः - तो नातू - उडुराजः - नक्षत्रांचा राजा चन्द्र - नैदाधिकम् - ग्रीष्म ऋतूतील - तापम् एव - तापालाच तसा - जगतः - विश्वाचे - शोकहर्ता - दुःख हरण करणारा - भविष्यति - होईल ॥४८॥
तो विषयांत अनासक्त, शीलवान, गुणांचे भांडार, तसेच दुसर्यांच्या समृद्धीत सुख आणि दुःखात दुःख मानणारा होईल. त्याला कोणी शत्रू असणार नाही. चंद्र जसा ग्रीष्म ऋतूत होणारा उष्णतेचा दाह नाहीसा करतो, त्याप्रंमाणे तो जगाचे दुःख दूर करणारा होईल. (४८)
अन्तर्बहिश्चामलमब्जनेत्रं
स्वपूरुषेच्छानुगृहीतरूपम् । पौत्रस्तव श्रीललनाललामं द्रष्टा स्फुरत्कुण्डलमण्डिताननम् ॥ ४९ ॥
जो आत बाहेर विराजमान स्वभक्तेच्छे अवतार धारी । श्री कुंडले हालुनि तेज फाके ते बाळ ते रुप समक्ष पाही ॥ ४९ ॥
तव - तुझा - पौत्रः - नातू - अन्तः - आत - बहिः - बाहेर - अमलम् - निर्मळ - अब्जनेत्रम् - कमलाप्रमाणे आहेत नेत्र ज्याचे असा - स्वपूरुपेच्चानुगृहीतरूपम् - आपल्या भक्तांच्या इच्छेनुसार घेतली आहेत रूपे ज्याने अशा - श्रीललनाललामम् - लक्ष्मी हीच जी सुंदरी तिने भूषणभूत अशा - स्फुरत्कुण्डलमण्डिताननम् - देदीप्यमान कुण्डलांनी सुशोभित आहे मुख ज्याचे अशा भगवंताला - द्रष्टा - पाहील ॥४९॥
जो या विश्वाच्या आत आणि बाहेर व्यापून आहे, आपल्या भक्तांच्या इच्छेनुसार जो रूप प्रगट करतो, लक्ष्मीरूप लावण्यमूर्ती स्त्रीचीही शोभा वाढवितो, तसेच ज्याचे मुखकमल झगमगणार्या कुंडलांनी सुशोभित झाले आहे, त्या परमपवित्र कमलनयन श्रीहरीचे तुझ्या नातवाला प्रत्यक्ष दर्शन होईल. (४९)
मैत्रेय उवाच -
श्रुत्वा भागवतं पौत्रं अमोदत दितिर्भृशम् । पुत्रयोश्च वधं कृष्णाद् विदित्वाऽऽसीन् महामनाः ॥ ५० ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे दितिकश्यपसंवादे चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
मैत्रेयजी सांगतात :-( अनुष्टुप् ) श्रीहरिभक्त पौत्रांच्या लाभाने दीति हर्षली । हर्षली भगवत् हस्ते जाणनी पुत्रमृत्यु तो ॥ ५० ॥ ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ चौदावा अध्याय हा ॥ ३ ॥ १४ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
दितिः - दिति - भागवतम् - भगवद्भक्त अशा - पौत्रम् - नातवाला - श्रुत्वा - ऐकून - भृशम् - अत्यन्त - अमोदत - आनन्दित झाली - च - आणि - पुत्रयोः - पुत्रांचा - वधम् - वध - कृष्णात् - कृष्णापासून - विदित्वा - जाणून - महामनाः - मोठे झाले आहे चित्त जिचे अशी - आसीत् - झाली ॥५०॥
मैत्रेय म्हणाले - विदुरा, दितीने जेव्हा असे ऐकले की माझा नातू भगवंतांचा भक्त होईल, तेव्हा तिला मोठा आनंद झाला. तसेच आपले मुलगे प्रत्यक्ष श्रीहरीच्या हातून मारले जातील, हे ऐकून ती अधिकच प्रसन्न झाली. (५०)
स्कंध तिसरा - अध्याय चवदावा समाप्त |