श्रीमद् भागवत पुराण
तृतीयः स्कंधः
त्रयोदशोऽध्यायः

ब्रह्मणो नासारन्ध्रादाविर्भूतस्य भगवतो यज्ञवराहस्य
संक्षिप्तचरितम्, ऋषिभिः कृतं भगवतः स्तवनं च -

वराह अवताराची कथा -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
निशम्य वाचं वदतो मुनेः पुण्यतमां नृप ।
भूयः पप्रच्छ कौरव्यो वासुदेवकथादृतः ॥ १ ॥
श्री शुकदेवजी म्हणाले -
( अनुष्टुप् )
पुण्यदा ऐकता वार्ता हृदयी प्रेम दाटले ।
राजन् ! विदुरे पुढती प्रश्ना ते हे विचारिल ॥ १ ॥

नृप - हे राजा - वदतः - बोलणार्‍या - मुनेः - मैत्रेयऋषीचे - पुण्यतमाम् - अत्यन्त पुण्यकारक - वाचम् - वचन - निशम्य - श्रवण करून - वासुदेवकथादृतः - श्रीहरीच्या कथेविषयी आदर असलेला - कौरव्यः - व कुरुवंशोत्पन्न विदुर - भूयः - पुनः - पप्रच्छ - प्रश्न करता झाला ॥१॥
श्रीशुकदेव म्हणाले - हे राजन, मैत्रेयांच्या मुखातून ही परम पुण्यमय कथा ऐकून, भगवंतांच्या लीलाकथांमध्ये अत्यंत प्रेम निर्माण झाल्यामुळे विदुराने विचारले. (१)


विदुर उवाच -
स वै स्वायम्भुवः सम्राट्‌ प्रियः पुत्रः स्वयम्भुवः ।
प्रतिलभ्य प्रियां पत्‍नीं किं चकार ततो मुने ॥ २ ॥
विदुरजी म्हणाले-
स्वायंभूव महाराज ब्रह्माचा प्रिय पुत्र तो ।
शतरुपा वरीता राणी पुढे ते काय जाहल ॥ २ ॥

मुने - मैत्रेय ऋषे - स्वयम्भुवः - ब्रह्मदेवाचा - प्रियः - आवडता - पुत्रः - मुलगा - सः - तो - सम्राट् - सार्वभौम राजा - स्वायम्भुवः - स्वायंभुव नामक मनु - प्रियाम् - मनाजोगी - पत्‍नीम् - स्त्री - प्रतिलभ्य - मिळवून - ततः - नंतर - किम् - काय - चकार वै - करता झाला ॥२॥
विदुर म्हणाला - मुनिवर, स्वयंभू ब्रह्मदेवाचा, प्रिय पुत्र महाराज स्वायंभुव मनू यांनी आपली प्रिय पत्‍नी शतरूपा प्राप्त झाल्यानंतर काय केले ? (२)


चरितं तस्य राजर्षेः आदिराजस्य सत्तम ।
ब्रूहि मे श्रद्दधानाय विष्वक्सेनाश्रयो ह्यसौ ॥ ३ ॥
तुम्ही तो साधुची श्रेष्ठ आदि राजर्षि तो मनू ।
भगवद्‌भक्त तो श्रेष्ठ त्याची सांगा मला कथा ॥ ३ ॥

सत्तम - हे साधुश्रेष्ठा - आदिराजस्य - आदिराज अशा - राजर्षेः तस्य - त्या राजर्षि मनूचे - चरित्रम् - चरित्र - श्रद्दधानाय मे - श्रद्धा ठेवणार्‍या मला - ब्रूहि - सांग - हि - कारण - असौ - हा मनु - विष्वक्‍सेनाश्रयः - वासुदेवाचा भक्‍त - अस्ति - आहे ॥३॥
हे साधुशिरोमणी, आपण मला आदिराज राजर्षी स्वायंभुव मनूंचे पवित्र चरित्र सांगावे. ते श्रीविष्णूंचे भक्त होते. म्हणून त्यांचे चरित्र ऐकण्याविषयी मी श्रद्धाळू आहे. (३)


श्रुतस्य पुंसां सुचिरश्रमस्य
    नन्वञ्जसा सूरिभिरीडितोऽर्थः ।
तत्तद्‍गुणानुश्रवणं मुकुन्द
    पादारविन्दं हृदयेषु येषाम् ॥ ४ ॥
(इंद्रवजा)
ज्याच्या हृदीं श्रीचरणारविंद
    त्याच्या गुणाते श्रवणे करोनी ।
अनेक शास्त्रे पठने करोनी
    लाभे श्रमाचे फळ माणसाला ॥ ४ ॥

येषाम् - ज्यांच्या - हृदयेषु - अन्तःकरणात - मुकुन्दपादारविन्दम् - मुकुन्दाचे चरणकमल - अस्ति - आहे - यत् तद्‌गुणानुश्रवणम् - त्यांच्या गुणांचे जे श्रवण करणे - यत् - ते - पुंसाम् - पुरुषांच्या - सुचिरश्रमस्य - दीर्घकालीन श्रम आहेत ज्यामध्ये अशा - श्रुतस्य - शास्त्राध्ययनाचे - अञ्जसा - प्रामुख्याने - अर्थः - फल - सूरिभिः - विद्वानांनी - ईडितः - स्तविले आहे ॥४॥
विद्वानांचे असे श्रेष्ठ मत आहे की, ज्यांच्या हृदयामध्ये श्रीमुकुंदांचे चरणारविंद विराजमान आहेत, त्या भक्तजनांच्या गुणांचे श्रवण करणे हे माणसांनी पुष्कळ दिवस केलेल्या शास्त्राभ्यासाच्या श्रमाचे मुख्य फळ आहे. (४)


श्रीशुक उवाच -
इति ब्रुवाणं विदुरं विनीतं
    सहस्रशीर्ष्णश्चरणोपधानम् ।
प्रहृष्टरोमा भगवत्कथायां
    प्रणीयमानो मुनिरभ्यचष्ट ॥ ५ ॥
श्री शुकदेवजी सांगतात:-
सहस्त्रशीर्षा चरणा उपासी
    विदूर त्या श्री हरिचेच भक्त ।
त्यांचा असा ऐकुनि हाच प्रश्न
    मैत्रेय अंगास शहार आले ॥ ५ ॥

सहस्त्रशीर्ष्णः - हजारो आहेत मस्तके ज्याला अशा श्रीकृष्णाचा - चरणोपधानम् - पाय टेकण्याचा आधारच अशा - इति ब्रुवाणम् - याप्रमाणे बोलणार्‍या - विनीतम् - नम्र - विदुरम् - विदुराला - भगवत्कथायाम् - श्रीहरीच्या कथेविषयी - प्रणीयमानः - प्रेरणा केलेला - प्रहृष्टरोमा - उभे राहिले आहेत रोमांच ज्याचे असा - मुनिः - मैत्रेय ऋषि - अभ्यचष्ट - उत्तर देता झाला ॥५॥
श्रीशुकाचार्य म्हणाले - राजन, सहस्रशीर्षा भगवान श्रीहरींचे चरणाश्रित भक्त विदुराने जेव्हा विनयपूर्वक भगवंतांच्या कथा सांगण्याची विनंती केली, तेव्हा मुनिवर मैत्रेयांचे अंग रोमांचित झाले. ते म्हणाले. (५)


मैत्रेय उवाच -
यदा स्वभार्यया सार्धं जातः स्वायम्भुवो मनुः ।
प्राञ्जलिः प्रणतश्चेदं वेदगर्भमभाषत ॥ ६ ॥
मैत्रेयजी म्हणाले-( अनुष्टुप् )
शतरुपा सवे राजा स्वायंभुवहि जन्मता ।
विनम्र होऊनी त्याने पित्यासी कार्य पूसले ॥ ६ ॥

यदा - ज्यावेळी - स्वभार्यया साकम् - आपल्या स्त्रीसह - स्वायम्भुवः - ब्रह्मदेवाचा पुत्र - मनुः - मनु - जातः - उत्पन्न झाला - तदा सः - तेव्हा तो - प्रणतः - नम्र असा - प्राञ्जलिः - हात जोडून - वेदगर्भम् - ब्रह्मदेवाला - इदम् - हे - अभाषत च - बोलला ॥६॥
मैत्रेय म्हणाले - जेव्हा आपली पत्‍नी शतरूपेसह स्वायंभुव मनूंचा जन्म झाला, तेव्हा मोठया नम्रतेने हात जोडून ते श्रीब्रह्मदेवाला म्हणाले. (६)


त्वमेकः सर्वभूतानां जन्मकृत् वृत्तिदः पिता ।
तथापि नः प्रजानां ते शुश्रूषा केन वा भवेत् ॥ ७ ॥
भगवन् एकला तूची दाता जीव जिवासही ।
आम्ही ते कोणते कार्य सेवार्थ करणें पुढे ॥ ७ ॥

त्वम् - तू - सर्वभूतानाम् - सर्व प्राण्यांची - जन्मकृत् - उत्पत्ति करणारा - वृत्तिदः - व निर्वाहाची साधने देणारा - एकः पिता - एकच पिता - असि - आहेस - अथ अपि - असे असताहि - नः - आम्हा - प्रजानाम् - लोकांना - ते - तुझी - शुश्रूषा - सेवा - केन वा - कशाने - भवेत् - घडेल ॥७॥
भगवन, आपणच एकमेव सर्व जीवांचे जन्मदाते आणि त्यांची उपजीविका करणारे पिता आहात. तरीसुद्धा आपले संतान असलेल्या आमच्याकडून आपली सेवा कशी होऊ शकेल ? (७)


तद्विधेहि नमस्तुभ्यं कर्मस्वीड्यात्मशक्तिषु ।
यत्कृत्वेह यशो विष्वक् अमुत्र च भवेद्‍गतिः ॥ ८ ॥
पूज्यपाद नमस्कार आज्ञापा योग्य कार्य ते ।
जेणे कीर्ती तशी मुक्ती आम्हासी प्राप्त होय ती ॥ ८ ॥

ईड्य - हे स्तुतीस पात्र असलेल्या भगवन् - तुभ्यम् - तुला - नमः - नमस्कार असो - आत्मशक्‍तिषु - आमचे आहे सामर्थ्य ज्यामध्ये अशा - कर्मसु - कर्मातील - यत् - जे - कृत्वा - केले असता - इह - या लोकांत - विष्वक् - सर्वत्र - यशः - कीर्ति - च - आणि - अमुत्र - परलोकामध्ये - गतिः - उत्तम गति - भवेत् - प्राप्त होईल - तत् विधेहि - ते कर्तव्य सांगा ॥८॥
हे पूज्यपाद, आम्ही आपल्याला नमस्कार करीत आहोत. आमच्या हातून होऊ शकेल अशा योग्य कार्याची आपण आम्हांला आज्ञा करावी, ज्यामुळे या लोकात आमची सगळीकडे कीर्ती होईल आणि परलोकात (आम्हांला) सद्‌गती मिळेल. (८)


ब्रह्मोवाच
प्रीतस्तुभ्यमहं तात स्वस्ति स्ताद्वां क्षितीश्वर ।
यन्निर्व्यलीकेन हृदा शाधि मेत्यात्मनार्पितम् ॥ ९ ॥
ब्रह्मदेवजी म्हणाले -
कल्याणमस्तु हो दोघा मी प्रसन्न तुम्हावरी
सुमने पुसली आज्ञा केले आत्मार्पणे तसे ॥ ९ ॥

तात - बाळा - क्षितीश्वर - राजा - माम् - मला - शाधि - शिक्षण दे - इति - असे - यत् - जे - निर्व्यलीकेन हृदा - निष्कपट अन्तःकरणाने - आत्मना - स्वतः - अर्पितम् - सांगितलेस - तस्मात् - त्यामुळे - अहम् - मी - तुभ्यम् - तुझ्यावर - प्रीतः - संतुष्ट झालो आहे - वाम् - तुम्हा उभयतांचे - स्वस्ति - कल्याण - स्तात् - असो ॥९॥
श्रीब्रह्मदेव म्हणाले - पुत्रा, पृथ्वीपते, तुम्हां उभयतांचे कल्याण असो ! मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. कारण तुम्ही सरळ भावाने ‘मला आज्ञा करा,’ असे म्हणून आत्मसमर्पण केले. (९)


एतावत्यात्मजैर्वीर कार्या ह्यपचितिर्गुरौ ।
शक्त्याप्रमत्तैर्गृह्येत सादरं गतमत्सरैः ॥ १० ॥
ईर्षा न राखिता चित्ती पुत्राने पितृ पूजिणे ।
वीरारे ऐकणे आज्ञा आदरे आचरा पुढे ॥ १० ॥

वीर - हे वीरा - आत्मजैः - मुलांनी - गुरौ - गुरूच्या ठिकाणी - एतावती हि - एवढीच - अपचितिः - पूजा - कार्या - करावी - यत् - की - गतमत्सरैः अप्रमत्तैः - मत्सराचा त्याग करून व नम्र हो‌ऊन - सादरम् - आदरपूर्वक - शक्‍त्या - शक्‍त्यनुसार - तस्य आज्ञा - त्याची आज्ञा - गृह्येत - स्वीकारावी ॥१०॥
हे वीरा, पुत्रांनी आपल्या पित्याची अशा प्रकारेच पूजा केली पाहिजे. दुसर्‍याशी ईर्षा न करता जेवढे होईल तेवढे त्यांच्या आज्ञेचे आदरपूर्वक दक्षतेने पालन करणे, हेच योग्य आहे. (१०)


स त्वमस्यामपत्यानि सदृशान्यात्मनो गुणैः ।
उत्पाद्य शास धर्मेण गां यज्ञैः पुरुषं यज ॥ ११ ॥
स्वपत्‍निते स्वतेजाची प्रजा ते निर्मिणे बहु ।
सांभाळी धर्म पृथ्वीसी यज्ञाने हरि पूजण ॥ ११ ॥

सः - तो - त्वम् - तू - गुणैः - गुणांशी - आत्मनः - आपल्या - सदृशानि - सारखी - अपत्यानि - अपत्ये - अस्याम् - या शतरूपेच्या ठिकाणी - उत्पाद्य - उत्पन्न करून - गाम् - पृथ्वीला - धर्मेण - धर्माने - शास - पाळ - यज्ञैः - यज्ञानी - पुरुषम् - ईश्वराला - यज - पूज ॥११॥
तू या आपल्या भार्येपासून स्वतःसारखीच गुणवान संतती उत्पन्न करून धर्मपूर्वक पृथ्वीचे पालन कर आणि यज्ञ करून श्रीहरींची आराधना कर. (११)


परं शुश्रूषणं मह्यं स्यात्प्रजारक्षया नृप ।
भगवांस्ते प्रजाभर्तुः हृषीकेशोऽनुतुष्यति ॥ १२ ॥
येषां न तुष्टो भगवान् यज्ञलिङ्गो जनार्दनः ।
तेषां श्रमो ह्यपार्थाय यदात्मा नादृतः स्वयम् ॥ १३ ॥
प्रजेच्यापालने सेवा माझी तू ती करी अशी ।
तेणे श्रीहरि पावेल पाहील भगवान् स्वयें ॥ १२ ॥
यज्ञमूर्ती जनार्दनो न पावे श्रम व्यर्थ ते ।
आत्म्याची वंचना जाणोत्या कैसा पावतो हरी ॥ १३ ॥

नृप - राजा - प्रजारक्षया - प्रजेच्या रक्षणाने - मह्यम् - मजप्रत - परम् - उत्कृष्ट - शुश्रूषणम् - सेवा - स्यात् - होईल - भगवान् - भगवान् - हृषीकेशः - परमेश्वर - प्रजाभर्तुः - लोकांचे पालन करणार्‍या अशा - ते - तुजवर - अनुतुष्यति - नित्य संतुष्ट होईल ॥१२॥ यज्ञलिङ्गः - यज्ञ आहे स्वरूप ज्याचे असा - जनार्दनः - विष्णु - भगवान् - भगवान् - येषाम् - ज्यांच्यावर - तुष्टः न - संतुष्ट नाही - तेषाम् - त्यांचा - श्रमः - श्रम - अपार्थाय - निरर्थक - भवति - होतो - यत् - कारण - स्वयम् - स्वतः - आत्मा - आपण - अनादृतः - अनादर केलेला - भवेत् - होईल ॥१३॥
राजन, प्रजापालन हीच माझी मोठी सेवा होईल आणि तुला प्रजेचे पालन करताना पाहून भगवान श्रीहरी तुझ्यावर प्रसन्न होतील. यज्ञमूर्ती जनार्दन भगवान ज्यांच्यावर प्रसन्न होत नाहीत, त्यांचे सर्व श्रम व्यर्थ होत, कारण ते एक प्रकारे आपल्या आत्म्याचाच अनादर करतात. (१२-१३)


मनुरुवाच -
आदेशेऽहं भगवतो वर्तेयामीवसूदन ।
स्थानं त्विहानुजानीहि प्रजानां मम च प्रभो ॥ १४ ॥
स्वायंभूव मनु म्हणाले -
आज्ञा ही धारिली आम्ही प्रजापालनही करू ।
परी माझ्या प्रजेने त्या रहावे कोणत्या स्थळी ॥ १४ ॥

अमीवसूदन - पापाचा नाश करणार्‍या - प्रभो - हे देवा - अहम् - मी - भगवतः - आपल्या - आदेशे - आज्ञेत - वर्तेय - राहीन - तु - परंतु - प्रजानाम् - प्रजांना - च - आणि - मम - मला - इह - येथे - स्थानम् - स्थान - अनुजानीहि - नियमित करून दे ॥१४॥
मनू म्हणाले - पापांचा नाश करणारे तात ! मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करीन; परंतु आपण या जगात मी आणि माझी भावी प्रजा यांच्या राहण्याचे ठिकाण सांगा. (१४)


यदोकः सर्वसत्त्वानां मही मग्ना महाम्भसि ।
अस्या उद्धरणे यत्‍नो देव देव्या विधीयताम् ॥ १५ ॥
जीवांचे स्थान ती पृथ्वी बुडाली प्रलयी जळी ।
कृपया करणे कांही देवाधी देव ब्रह्मजी ॥ १५ ॥

यत् - कारण - सर्वसत्त्वानाम् - सर्व प्राण्यांचे - ओकः - स्थान अशी - मही - पृथ्वी - महाम्भसि - मोठ्या पाण्यात - मग्ना - बुडालेली आहे - देव - हे भगवन् - अस्याः देव्याः - ह्या पृथ्वी देवीच्या - उद्धरणे - उद्धराविषयी - यत्‍नः - यत्‍न - विधीयताम् - करावा ॥१५॥
हे देवा, सर्व जीवांचे निवासस्थान असलेली पृथ्वी यावेळी प्रलयातील पाण्यात बुडालेली आहे. या पृथ्वी देवीच्या उद्धाराचा आपण प्रयत्‍न करा. (१५)


मैत्रेय उवाच -
परमेष्ठी त्वपां मध्ये तथा सन्नामवेक्ष्य गाम् ।
कथमेनां समुन्नेष्य इति दध्यौ धिया चिरम् ॥ १६ ॥
मैत्रेयजी सांगतात -
अथांग जलप्रलयीं बुडाली पृथिवी अशी ।
काढणे वरती कैसी ब्रह्माजी मनिं चिंतितो ॥ १६ ॥

परमेष्ठी - ब्रह्मदेव - अपांमध्ये - पाण्यामध्ये - तथा सन्नाम् - तशा रीतीने बुडालेल्या - गाम् - पृथ्वीला - अवेक्ष्य - पाहून - एनाम् - ह्या - गां - पृथ्वीला - कथम् - कशी - उन्नेष्ये - वर काढीन - इति - असा - धिया - बुद्धीने - चिरम् - पुष्कळ वेळ - दध्यौ - विचार करीत राहीला ॥१६॥
मैत्रेय म्हणाले - पृथ्वी अशा प्रकारे अथांग पाण्यात बुडालेली पाहून ब्रह्मदेव बराच काळपर्यंत मनात विचार करीत राहिले की, हिला कशी (बाहेर) काढू ? (१६)


सृजतो मे क्षितिर्वार्भिः प्लाव्यमाना रसां गता ।
अथात्र किमनुष्ठेयं अस्माभिः सर्गयोजितैः ।
यस्याहं हृदयादासं स ईशो विदधातु मे ॥ १७ ॥
पृथ्वीच्या रचनेवेळी रसातळात ती बुडे ।
संकल्पा जन्म माझा तो निर्माणमम कार्य हे ॥
शक्तिमान् भगवान् माझा कार्य हे तोच करी ॥ १७ ॥

मे सृजतः - मी सृष्टि उत्पन्न करीत असता - वार्भिः - पाण्यांनी - प्लाव्यमाना - बुडविलेली - क्षितिः - पृथ्वी - रसाम् - रसातळाला - गता - गेली - अथ - आता - सर्गयोजितैः - सृष्टीकरिता योजना केलेल्या - अस्माभिः - आम्ही - अत्र - येथे - किम् अनुष्ठेयम् - काय करावे - यस्य - ज्याच्या - हृदयात् - अन्तःकरणापासून - अहम् - मी - आसम् - उत्पन्न झालो - सः ईशः - तो परमेश्वर - मे - मला - विदधातु - योजना सुचवो ॥१७॥
ज्यावेळी मी सृष्टिरचना करीत होतो, त्यावेळी पाण्यात बुडाल्यामुळे पृथ्वी रसातळाला गेली होती. सृष्टिकार्यासाठी आमची नियुक्ती झाली आहे, यासाठी आम्हांला आता काय केले पाहिजे ? ज्यांच्या संकल्पाने माझा जन्म झाला आहे, त्या सर्वशक्तिमान श्रीहरींनीच आता मला प्रेरणा द्यावी. (१७)


इत्यभिध्यायतो नासा विवरात्सहसानघ ।
वराहतोको निरगाद् अङ्गुष्ठपरिमाणकः ॥ १८ ॥
या परि करिता ब्रह्मा ध्यान ते तेधवा तया ।
नासिके मधुनी आला अंगुष्ठमात्र सूकर ॥ १८ ॥

अनघ - हे निष्पाप विदुरा - इति अभिध्यायतः - असा विचार करणार्‍या - ब्रह्मणः - ब्रह्मदेवाच्या - नासाविवरात् - नासिकेच्या छिद्रातून - सहसा - एकाएकी - अङ्गुष्ठपरिणामकः - अङ्गुष्ठ आहे प्रमाण ज्याचे असा - वराहतोकः - रानडुकराचे पिल्लू - निरगात - बाहेर पडले ॥१८॥
विदुरा, ब्रह्मदेव याप्रमाणे विचार करीतच होते, तेवढयात त्यांच्या नाकाच्या छिद्रातून अचानकपणे अंगठयाएवढा एक वराह-शिशू बाहेर पडला. (१८)


तस्याभिपश्यतः खस्थः क्षणेन किल भारत ।
गजमात्रः प्रववृधे तदद्‍भुतं अभून्महत् ॥ १९ ॥
आश्चर्य भारता मोठे आकाशी इवले पिलू ।
पाहता पाहता झाले हत्तीच्या परि थोर ते ॥ १९ ॥

भारत - हे भरतकुलोत्पन्ना विदुरा - तस्य अभिपश्यतः - तो ब्रह्मदेव पाहात असता - स्वस्थः - आकाशात असलेला - सः - तो बालवराह - क्षणेन - क्षणात - गजमात्रः - हत्तीएवढा - ववृधे - वाढला - किल - खरोखर - तत् - ते - महत् - मोठे - अद्भुतम् - आश्चर्यकारक - अभूत् - झाले ॥१९॥
हे भारता, मोठी आश्चर्याची गोष्ट अशी की, आकाशात असलेला तो वराह-शिशू ब्रह्मदेवांच्या देखतच मोठा हो‌ऊन क्षणात हत्तीएवढा झाला. (१९)


मरीचिप्रमुखैर्विप्रैः कुमारैर्मनुना सह ।
दृष्ट्वा तत्सौकरं रूपं तर्कयामास चित्रधा ॥ २० ॥
वराह पाहुनी मोठा ब्रह्माजीच्या परी तदा ।
स्वायंभूव तसे अन्या मनी आश्चर्य दाटल ॥ २० ॥

मरिचिप्रमुखैः - मरिचि आदिकरून - विप्रैः - ब्राह्मण - कुमारैः - सनत्कुमार - च मनुना सह - व मनु यांसह - तत् - ते - सौकरम् - डुकराचे - रूपम् - स्वरूप - दृष्ट्वा - पाहून - चित्रधा - अनेक प्रकारे - तर्कयामास - तर्क करता झाला ॥२०॥
त्या विशाल वराह-मूर्तीला पाहून मरीची आदी मुनिजन, सनकादिक आणि स्वायंभुव मनूसह ब्रह्मदेव वेगवेगळे तर्क करू लागले. (२०)


किमेतत्सौकरव्याजं सत्त्वं दिव्यमवस्थितम् ।
अहो बताश्चर्यमिदं नासाया मे विनिःसृतम् ॥ २१ ॥
अहो आश्चर्य हे कैसे एवढा प्राणि कोणता ।
आत्ताच नासिकेतूनबाहेर पडला असे ॥ २१ ॥

सौकरव्याजम् - डुकराच्या रूपाने - अवस्थितम् - प्राप्त झालेला - एतत् - हा - दिव्यम् - देवसंबंधी - सत्त्वम् - प्राणी - किं - कोण आहे बरे - अहो बत आश्चर्यम् - काय हो, आश्चर्य - इदं - हे - मे - माझ्या - नासायाः - नासिकेतून - विनिःसृतम् - बाहेर पडले ॥२१॥
अहो ! आज वराहाच्या रूपात हा कोणता दिव्य प्राणी प्रगट झाला आहे ? केवढे आश्चर्य हे ! हा तर आताच माझ्या नाकातून निघाला होता. (२१)


दृष्टोऽङ्गुष्ठशिरोमात्रः क्षणाद्‍गण्डशिलासमः ।
अपि स्विद्‍भगवानेष यज्ञो मे खेदयन्मनः ॥ २२ ॥
अंगुष्ठपेर मात्रा तो दिसला जन्मला तदा ।
क्षणात जाहला थोर पहाडा परि हा दिसे ॥
निश्चित भगवत् माया मोहिते यज्ञमूर्ति ती ॥ २२ ॥

अङ्गुष्ठशिरोमावः - अंगठ्याच्या अग्राइतका - दृष्टः - दिसलेला - क्षणात् - क्षणामध्ये - गण्डशिलासमः - प्रचंड शिलेसारखा - अभूत - झाला - अपि स्वित् - असे असेल काय की - एष - हा - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - यज्ञः - यज्ञरूपी परमेश्वर - मे - माझ्या - मनः - अंतःकरणाला - खेदयन् - मोहात पाडीत - आस्ते - आहे ॥२२॥
पहिल्यांदा तर हा अंगठयाच्या पेराएवढा दिसत होता. परंतु एका क्षणातच हा मोठया शिलेच्या आकाराचा झाला. हे यज्ञमूर्ती भगवानच निश्चितपणे आमच्या मनाला मोहित करीत असावेत. (२२)


इति मीमांसतस्तस्य ब्रह्मणः सह सूनुभिः ।
भगवान् यज्ञपुरुषो जगर्जागेन्द्रसन्निभः ॥ २३ ॥
पुत्र ब्रह्म्यासवे ऐसे विचार करिता मनीं ।
पर्वता एवढाझाला गर्जला यज्ञपूरुष ॥ २३ ॥

सूनुभिः सह - पुत्रांसह - तस्य ब्रह्मणः इति मीमांसतः - तो ब्रह्मदेव असा विचार करीत असता - यज्ञपुरुषः - यज्ञपुरुषरूपी - भगवान् - परमेश्वर - अगेन्द्रसंनिभः - मोठ्या पर्वतासारखा - भूत्वा - हो‌ऊन - जगर्ज - गर्जना करता झाला ॥२३॥
ब्रह्मदेव आणि त्याचे पुत्र अशा प्रकारे विचार करीत होते, तेवढयात भगवान यज्ञपुरुष पर्वताकार हो‌ऊन गर्जना करू लागले. (२३)


ब्रह्माणं हर्षयामास हरिस्तांश्च द्विजोत्तमान् ।
स्वगर्जितेन ककुभः प्रतिस्वनयता विभुः ॥ २४ ॥
शक्तिमान् श्रीहरी तेंव्हा गर्जता उठला ध्वनी ।
ब्रह्मा नी ब्राह्मणा तेंव्हा जाहला हर्ष थोर तो ॥ २४ ॥

विभुः - सर्वव्यापी असा - हरिः - परमेश्वर - दिशः - दिशा - प्रतिनस्वनयता - दुमदुमविणारा - स्वगर्जितेन - आपल्या गर्जनेने - ब्रह्माणम् - ब्रह्मदेवाला - च - आणि - तान् द्विजोत्तमान् - त्या ब्राह्मणश्रेष्ठांना - हर्षयामास - हर्ष उत्पन्न करता झाला ॥२४॥
सर्व शक्तिमान श्रीहरींनी आपल्या गर्जनांचा दिशांतून प्रतिध्वनी उमटवून ब्रह्मदेव आणि श्रेष्ठ ब्राह्मणांना हर्षभरित केले. (२४)


निशम्य ते घर्घरितं स्वखेद
    क्षयिष्णु मायामयसूकरस्य ।
जनस्तपःसत्यनिवासिनस्ते त्रिभिः
    पवित्रैर्मुनयोऽगृणन् स्म ॥ २५ ॥
( इंद्रवज्रा )
हरावया खेद तदा हरी तो
    गर्जे तदा तो जनलोक सारा ।
तपो नि सत्यातिलत्या मुनींना
    ते गायिले तीन सुरेख वेद ॥ २५ ॥

जनस्तपःसत्यनिवासिनः - जन, तप व सत्य या लोकात राहणारे - ते मुनयः - ते ऋषि - मायामयसूकरस्य - मायेने वराहाचे रूप धारण केलेल्या ईश्वराची - स्वखेदक्षयिष्णु - आपले दुःख दूर करणारी - घर्घरितम् - गर्जना - निशम्य - ऐकून - पवित्रैः त्रिभिः - पवित्र अशा तीन वेदांनी - अगृणन् स्म - स्तुति करिते झाले ॥२५॥
आपला खेद नाहीसा करणारी, मायामय वराह भगवानांची गर्जना ऐकून जनोलोक, तपोलोक, आणि सत्यलोकातील मुनिगण वेदांच्या पवित्र मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. (२५)


तेषां सतां वेदवितानमूर्तिः
    ब्रह्मावधार्यात्मगुणानुवादम् ।
विनद्य भूयो विबुधोदयाय
    गजेन्द्रलीलो जलमाविवेश ॥ २६ ॥
जी गायिली ती स्तुति वेदरूप
    मानोनि झाला मग तो प्रसन्न ।
पुन्हा तसाचि करिता ध्वनी तो
    हत्तीपरी त्याच जळात गेला ॥ २६ ॥

वेदवितानमूर्तिः - वेदानी स्तवन केलेले आहे स्वरूप ज्याचे असा वराहरूपी परमेश्वर - तेषाम् - त्या ब्रह्मदेवप्रभृति - सताम् - श्रेष्ठांनी - उच्चारितम् - उच्चारलेला - आत्मगुणानुवादम् - आपल्या गुणांचा अनुवाद करणारा असा - ब्रह्म - वेद - अवधार्य - जाणून - विबुधोदयाय - देवांच्या उत्कर्षाकरिता - भूयः - पुनः - विनद्य - गर्जना करून - गजेन्द्रलीलः - मोठ्या हत्तीप्रमाणे आहे लीला ज्याची असा - जलम् - पाण्यात - अविवेश - शिरला ॥२६॥
भगवंतांच्या स्वरूपाचे वेदांमध्ये विस्ताराने वर्णन केले गेले आहे. म्हणून त्या मुनीश्वरांनी जी स्तुति केली, ती वेदरूप मानून भगवंत फारच प्रसन्न झाले आणि एक वेळ पुन्हा गर्जना करून देवतांच्या हितासाठी हत्त्तीसारखी लीला करीत ते पाण्यात घुसले. (२६)


उत्क्षिप्तवालः खचरः कठोरः
    सटा विधुन्वन् खररोमशत्वक् ।
खुराहताभ्रः सितदंष्ट्र ईक्षा
    ज्योतिर्बभासे भगवान्महीध्रः ॥ २७ ॥
पुच्छा उभारोनि उडे नभात
    झाडोनि केसेंचि ढगास मारी ।
जाडे असे श्वेत तयास केस
    तेजस्वि डोळे बहुशोभले ते ॥ २७ ॥

उत्क्षिप्तवालः - उभारिले आहे पुच्छ ज्याने असा - खचरः - अंतराळात संचार करणारा - कठोरः - भयंकर स्वरूपाचा - सटाः - मानेवरील केस - विधुन्वन् - हलविणारा - खररोमशत्वक् - राठ आहेत केश व त्वचा ज्याची असा - खुराहताभ्रः - खुरांनी आघात केला आहे मेघावर ज्याने असा - सितदंष्ट्रः - शुभ्र आहेत दाढा ज्याच्या असा - ईक्षाज्योतिः - दृष्टीत तेज आहे ज्याचा असा - महीध्रः - पृथ्वीचा उद्धार करणारा - भगवान् - भगवान् - बभासे - शोभला ॥२७॥
त्या वराहरूपी भगवानांनी पहिल्यांदा शेपूट उंच करून मोठया वेगाने आकाशात उसळी मारली आणि आपल्या मानेवरील केस विस्फारून खुरांच्या आघातांनी ढगांना विखरून टाकले. त्यांचे शरीर अत्यंत कठोर होते. त्वचेवर राठ केस होते. सफेत दाढा होत्या आणि डोळ्यांत तेज होते. असे ते शोभायमान दिसत होते. (२७)


घ्राणेन पृथ्व्याः पदवीं विजिघ्रन्
    क्रोडापदेशः स्वयमध्वराङ्गः ।
करालदंष्ट्रोऽप्यकरालदृग्भ्याम्
    उद्वीक्ष्य विप्रान् गृणतोऽविशत्कम् ॥ २८ ॥
तो श्रीहरी सूकररूप मारी
    दाढा तयाच्या जणु वज्र तीक्ष्ण ।
थुट्टीस ढोसून धरेस शोधी
    मुनीस सौम्येचि पहात होते ॥ २८ ॥

स्वयम् - स्वतः - अध्यराङ्गः - यज्ञमूर्ति - अपि - असूनसुद्धा - क्रोडापदेशः - वराहाचे रूप घेणारा - घ्राणेन - नाकाने - पृथ्व्या - पृथ्वीचा - पदवीम् - मार्ग - विजिघ्रन् - हुंगणारा - करालदंष्ट्रः अपि - भयंकर आहेत दाढा ज्याच्या असा असूनसुद्धा - गृणतः - स्तुति करणार्‍या - विप्रान् - ब्राह्मणांना - अकरालदृरभ्याम् - सौम्य दृष्टीने - उद्वीक्ष्य - पाहून - कम् - पाण्यात - अविशत् - शिरला ॥२८॥
भगवान स्वतः यज्ञपुरुष आहेत. तथापि वराहरूप धारण केल्यामुळे आपल्या नाकांनी वास घेत ते पृथ्वीचा शोध घेत होते. त्यांच्या दाढा भयंकर होत्या. आपली स्तुती करणार्‍या मरीची आदी मुनींच्याकडे सौ‌म्य दृष्टीने पाहात त्यांनी पाण्यात प्रवेश केला. (२८)


स वज्रकूटाङ्गनिपातवेग
    विशीर्णकुक्षिः स्तनयन्नुदन्वान् ।
उत्सृष्टदीर्घोर्मिभुजैरिवार्तः
    चुक्रोश यज्ञेश्वर पाहि मेति ॥ २९ ॥
टाकीं जळासी जधि अंग तेंव्हा
    मुद्रपोटास दरीच झाली ।
जणू म्हणे तो मज तारि देवा
    आर्तस्वराने उठल्याहि लाटा ॥ २९ ॥

सः - तो - वज्रकूटाङ्गनिपातवेगविशीर्णकुक्षिः - वज्रासारखी तीक्ष्ण आहेत शिखरे ज्याला अशा पर्वतासारखे ज्याचे शरीर आहे अशा त्या वराहाच्या उडीच्या वेगामुळे फाटली आहे कूस ज्याची असा - उदन्वान् - समुद्र - स्तनयन् - गर्जना करणारा - उत्सृष्टदीर्घोर्मिभुजैः - पसरलेल्या व लांब अशा लाटारूप बाहुंनी युक्‍त असा - आर्त इव - घाबरल्यासारखा हो‌ऊन - यज्ञेश्वर - हे परमेश्वरा - मा - मला - पाहि - राख - इति - असा - चिक्रोश - आक्रोश करता झाला ॥२९॥
ज्यावेळी त्यांचे वज्रमय पर्वतासारखे कठोर शरीर पाण्यात पडले, तेव्हा त्या वेगाने जणू काही समुद्राचे पोटच फाटले आणि त्यातून ढगांच्या गडगडाटासारखा भीषण आवाज झाला. त्यावेळी असे वाटले की, जणू काही आपले प्रदीर्घ तरंगरूप हात उंच करून तो मोठया आर्तस्वराने "हे यज्ञेश्वरा ! माझे रक्षण करा" अशी प्रार्थना करीत आहे. (२९)


खुरैः क्षुरप्रैर्दरयंस्तदाप
    उत्पारपारं त्रिपरू रसायाम् ।
ददर्श गां तत्र सुषुप्सुरग्रे
    यां जीवधानीं स्वयमभ्यधत्त ॥ ३० ॥
तेव्हा पशू तो खुपसोनि खूर
    रसातळाला पृथिवीस शोधी ।
जिला हरीने तिज कल्पांती
    पोटीं स्वताच्या लिन केलि होती ॥ ३० ॥

त्रिपरुः - तीन आहेत पेरे ज्याला असा तो वराह - क्षुरप्रैः - लांब पात्याचे बाणच अशा - खुरैः - खुरांनी - अपः - उदकांना - उत्पारपारम् - अपार अशा त्यांचा पार लागेल अशा रीतीने - दरयन् - कापीत - तदा - त्या वेळी - गाम् - पृथ्वीला - रसायाम् - रसातलात - ददर्श - पहाता झाला - अग्रे - पूर्वी - तत्र - पाण्यात - सुषुप्सुः - शयन करण्याची इच्छा करणारा - जीवधानीम् - जीवांना आधारभूत अशा - याम् - ज्या पृथ्वीला - स्वयम् - स्वतः - सः - तो परमेश्वर - अभ्यधत्त - उदरात धारण करता झाला ॥३०॥
तेव्हा भगवान यज्ञमूर्ती आपल्या बाणासारख्या तीक्ष्ण खुरांनी पाणी कापीत त्या अगाध जलराशीच्या पलीकडच्या तीरावर पोहोचले. तेथे रसातळात त्यांनी सर्व जीवांचे आश्रयस्थान असलेली पृथ्वी पाहिली. त्या पृथ्वीला कल्पाच्या शेवटी निद्रा घेण्यासाठी उद्युक्त झालेल्या श्रीहरींनी स्वतः आपल्या पोटात सामावून घेतले होते. (३०)


स्वदंष्ट्रयोद्धृत्य महीं निमग्नां
    स उत्थितः संरुरुचे रसायाः ।
तत्रापि दैत्यं गदयापतन्तं
    सुनाभसन्दीपिततीव्रमन्युः ॥ ३१ ॥
जघान रुन्धानमसह्यविक्रमं
    स लीलयेभं मृगराडिवाम्भसि ।
तद्रक्तपङ्काङ्‌कितगण्डतुण्डो
    यथा गजेन्द्रो जगतीं विभिन्दन् ॥ ३२ ॥
पुन्हा जळासी बुडि मारुनिया
    दाढेस पृथ्वी धरुनीहि काढी ।
शोभा तदा ती घडली बहूही
    हिरण्यनेत्रां तयि ठार केले ॥ ३१ ॥
तो सिंह जैसा गजराज मारी
    भासे तसातो रुधिरे करोनी ।
जै लाल मातीते मारी स्व माथा
    आणीक आला भरवोनि अंग ॥ ३२ ॥

निमग्नाम् - बुडालेल्या - महीम् - पृथ्वीला - स्वदंष्ट्र्या - आपल्या दाढेने - उद्धृत्य - वर उचलून - रसायाः - रसातलापासून - उत्थितः - उठलेला - सः - तो वराह - संरुरुचे - चांगला शोभला - तत्र अपि - त्या पाण्यात सुद्धा - गदया - गदा घेऊन - आपतन्तम् - चालून येणार्‍या - रुन्धानम् - व अडविणार्‍या - असह्यविक्रमम् - असह्य आहे पराक्रम ज्याचा अशा - दैत्यम् - दैत्याला - सुनाभसंदीपिततीव्रमन्युः - चक्राने प्रदीप्त केला आहे तीव्र क्रोध ज्याचा असा - मृगराट् - सिंह - इभम् इव - हत्तीला जसा तसा - जघान - मारिता झाला - यथा - ज्याप्रमाणे - जगतीम् - पृथ्वीला - विभिन्दन् - विदारण करणारा - गजेन्द्रः - गजराज - तथा - त्याप्रमाणे - तद्रक्‍तंपङ्काङ्कितगण्डतुण्डः - त्या दैत्याच्या रक्‍ताच्या चिखलाने चिह्नित आहे गण्डस्थळ व मुख ज्याचे असा - अभवत् - झाला ॥३१-३२॥
नंतर पाण्यात बुडालेल्या पृथ्वीला आपल्या दाढेवर घेऊन ते रसातळाच्या वर आले. त्यावेळी ते मोठे शोभिवंत दिसत होते. पाण्यातून बाहेर येतेवेळी त्यांना अडविणार्‍या महापराक्रमी हिरण्याक्षाने पाण्याच्या आतच त्यांच्यावर गदा घेऊन आक्रमण केले. त्यावेळी त्यांचा क्रोध सुदर्शन चक्रासारखा तीव्र झाला आणि त्यांनी त्याला लीलया असे मारले की, जसा सिंह हत्तीला मारतो. त्यावेळी त्याच्या रक्ताने त्यांचे तोंड आणि कानशील माखल्यामुळे असे दिसत होते की, एखादा हत्ती लाल मातीत टक्कर देऊन आला आहे. (३१-३२)


तमालनीलं सितदन्तकोट्या
    क्ष्मामुत्क्षिपन्तं गजलीलयाङ्ग ।
प्रज्ञाय बद्धाञ्जलयोऽनुवाकैः
    विरिञ्चिमुख्या उपतस्थुरीशम् ॥ ३३ ॥
या श्वेतपद्मा गज धारि जैसा
    तैसा तदा तो दिसला धरेने ।
तमालनीला परिशोभला तो
मुनी तदा त्या स्तुति गात होते ॥ ३३ ॥

अङ्ग - हे विदुरा - गजलीलया - हत्तीप्रमाणे लीलेने - सितदन्तकोट्या - शुभ्र दंताच्या अग्राने - क्ष्माम् - पृथ्वीला - उत्क्षिपन्तम् - वर काढणार्‍या - तमालनीलम् - तमालपुष्पाप्रमाणे निळ्या वर्णाच्या - ईशम् - वराहरूप भगवंताला - प्रज्ञाय - ओळखून - बद्धाञ्जलयः - जोडले आहेत हात ज्यांनी असे - विरिञ्चिमुख्याः - ब्रह्मदेव आहे मुख्य ज्यामध्ये असे ते - अनुवाकैः - वेदातील सूक्‍तांनी - उपतस्थुः - स्तुति करते झाले ॥३३॥
विदुरा, ज्याप्रमाणे हत्ती आपल्या दातांवर कमल धारण करतो, त्याचप्रमाणे आपल्या सफेद दातांच्या टोकांवर पृथ्वी ठेवून आलेल्या तमालपत्राप्रमाणे नीलवर्ण वराहभगवानांना पाहून ब्रह्मदेव आदींनी त्यांना हे भगवंतच आहेत, असे ओळखून, हात जोडून ते वेदवाक्यांनी त्यांची स्तुती करू लागले. (३३)


ऋषय ऊचुः
जितं जितं तेऽजित यज्ञभावन
    त्रयीं तनुं स्वां परिधुन्वते नमः ।
यद् रोमगर्तेषु निलिल्युरध्वराः
    तस्मै नमः कारणसूकराय ते ॥ ३४ ॥
ऋषि म्हणाले:-
यज्ञोपतीचा जय हो सदाचा
    वेदत्रयीरुप तुम्हीच केला ।
पुन्हा नमस्ते तुज याग लीन
    पुन्हा नमो सूकररूप धारी ॥ ३४ ॥

अजित - अजिंक्य भगवन् - ते - तुझा - जितं जितम् - जयजयकार आहे - यज्ञभावन - यज्ञांच्या योगाने आराधना करण्यास योग्य अशा हे ईश्वरा - त्रयीम् - ती वेदस्वरूपी अशा - स्वाम् - आपल्या - तनुम् - शरीराला - परिधुन्वते - हलविणार्‍या तुला - नमः - नमस्कार - अस्तु - असो - यद्रोमगर्तेषु - ज्याच्या रोमांच्या छिद्रात - अध्वराः - यज्ञ - निलिल्युः - लीन झाले - तस्मै - त्या - कारणसूकराय - पृथ्वीला वर काढण्याकरिता वराहरूप धारण करणार्‍या - ते - तुला - नमः - नमस्कार - अस्तु - असो ॥३४॥
ऋषी म्हणाले - भगवन अजित, आपला जयजयकार असो. हे यज्ञपते, आपण आपले वेदत्रयीरूप शरीर थरथरवीत आहात. आपल्याला नमस्कार असो. (३४)


रूपं तवैतन्ननु दुष्कृतात्मनां
    दुर्दर्शनं देव यदध्वरात्मकम् ।
छन्दांसि यस्य त्वचि बर्हिरोम-
    स्वाज्यं दृशि त्वङ्‌घ्रिषु चातुर्होत्रम् ॥ ३५ ॥
पापी न जाणी तव रूप ऐसे
    तू यज्ञरूपी म्हणुनी असे ते ।
त्वचेत छंदो कुश रोमरोमी
    ते घृत नेत्री चरणात होम ॥ ३५ ॥

देव - देवा - ननु - खरोखर - यत् - जे - अध्वरात्मकम् - यज्ञरुपी - तव - तुझे - रूपम् - स्वरूप - अस्ति - आहे - एतत् - हे रूप - दुष्कृतात्मनाम् - पापी आहे अंतःकण ज्यांचे अशा पुरुषांना - दुर्दर्शनम् - कठीण आहे दर्शन ज्याचे असे - अस्ति - आहे - यस्य - ज्याच्या - त्वचि - त्वचेमध्ये - छन्दांसि - गायत्र्यादि छंद - रोमसु - केसामध्ये - बर्हि - दर्भ - दृशि - डोळ्यामध्ये - आज्यम् - घृत - अङ्‌घ्रिषु - पायात - चातुर्होत्रम् - चार होत्यांनी साध्य होणारे यज्ञकर्म - अस्ति - आहे ॥३५॥
आपल्या रोम-रोमात सर्व यज्ञ सामावले आहेत. पृथ्वीला वर आणण्यासाठी वराहरूप धारण करणार्‍या आपल्याला नमस्कार असो. हे देवा, आपल्या या शरीराचे दुराचारी लोकांना दर्शन होणे अत्यंत कठीण आहे. कारण हे यज्ञरूप आहे. याच्या त्वचेमध्ये गायत्री आदी छंद,रोमांत कुश, डोळ्यांमध्ये तूप, आणि चारी चरणांमध्ये होता, अध्वर्यू, उद्‌गाता, आणि ब्रह्मदेव या चारी ऋत्विजांचे कर्म आहे. (३५)


स्रक्तुण्ड आसीत्स्रुव ईश नासयोः
    इडोदरे चमसाः कर्णरन्ध्रे ।
प्राशित्रमास्ये ग्रसने ग्रहास्तु ते
    यच्चर्वणं ते भगवन्नग्निहोत्रम् ॥ ३६ ॥
ईशा तुझ्या भुट्टित सृक् नि नाकी
    स्रवा नि पोटात इडा नि तोंडी ।
प्राशित्र कानी चमसा नि कंठी
    घासात आहे ग्रह अग्नी होत्र ॥ ३६ ॥

ईश - हे ईश्वरा - स्रुक् - जुहू नावाचे पात्र - तुण्डे - मुखात - आसीत् - आहे - नासयोः - नाकपुड्यांमध्ये - स्रुवः - पळ्या - उदरे - पोटात - इडा - इडा नावाचे पात्र - कर्णरन्ध्रे - कानाच्या छिद्रात - चमसाः - चमचे - आस्ये - मुखात - प्राशित्रम् - पेला - ग्रहाः - सोमरसाचे द्रोण - ते - तुझ्या - ग्रसने - घशात - सन्ति - आहेत - तु - तसेच - भगवन् - हे भगवंत - ते - तुझे - यत् - जे - चर्वणम् - चर्वण - तत् - ते - अग्निहोत्रम् - अग्निहोत्र - अस्ति - आहे ॥३६॥
हे देवा, आपल्या मुखाच्या अग्रभागी स्त्रुक् आहे. नासिकाछिद्रात स्त्रुवा, पोटामध्ये इडा (यज्ञीय भक्षणपात्र), कानांमधे चमस, मुखामध्ये प्राशित्र (ब्रह्मभागपात्र) आणि कंठछिद्रात ग्रह (सोमपात्र) आहे. भगवन ! आपले जे चर्वण आहे, तेच अग्निहोत्र होय. (३६)


दीक्षानुजन्मोपसदः शिरोधरं
    त्वं प्रायणीयोदयनीयदंष्ट्रः ।
जिह्वा प्रवर्ग्यस्तव शीर्षकं क्रतोः
    सत्यावसथ्यं चितयोऽसवो हि ते ॥ ३७ ॥
दीक्षाचि इष्टी त्रय ईष्टिमान
    दीक्षान्त ईष्टी दृढदाढ दोन्ही ।
जिव्हा प्रवर्गी शिर सभ्य तैसे ।     आवस्थ्य प्राणी चितिरूप आहे ॥ ३७ ॥<>

दीक्षा - दीक्षानामक इष्टि - तव - तुझे - अनुजन्म - वारंवार घेतलेले अवतार - उपसदः - उपसद नावाच्या तीन इष्टि - शिरोधरम् - कंठ - त्वम् - तू - प्रायणीयोदयनीयदंष्ट्रः - प्रायणीय व उदयनीय ह्या दोन एष्टि आहेत दाढा ज्याच्या असा - असि - आहेस - तव - तुझी - जिह्‌वा - जीभ - प्रवर्ग्यः - महावीरनामक पात्र - क्रतोः - यज्ञाचा - सभ्यावसथ्यम् - सभ्य व आवसथ्य या दोन अग्नींचा समूह - तव - तुझे - शीर्षकम् - मस्तक - चितयः - चयने - ते - तुझे - असवः - प्राण - सन्ति - आहेत ॥३७॥
यज्ञस्वरूप अशा आपले वारंवार अवतार घेणे दीक्षणीय इष्टी आहे, मान उपसद (तीन इष्टी), दोन्ही दाढा प्रायणीय (दीक्षेनंतरची इष्टी) आणि उदयनीय (यज्ञसमाप्तीची इष्टी), जीभ प्रवर्ग्य (प्रत्येक उपसदाच्या पूर्वी केले जाणारे महावीर नावाचे कर्म), मस्तक सभ्य (होमरहित अग्नी) आणि आवसथ्य (औपासनाग्नी) आहे. तसेच प्राण चित्ती (इष्टिकाचयन) आहे. (३७)


सोमस्तु रेतः सवनान्यवस्थितिः
    संस्थाविभेदास्तव देव धातवः ।
सत्राणि सर्वाणि शरीरसन्धि-
    स्त्वं सर्वयज्ञक्रतुरिष्टिबन्धनः ॥ ३८ ॥
देवा तुझे वीर्यचि सोम आहे
    बैसूनि प्रातः सवनादि तीन ।
त्या देव धातू तव धातु सर्व
    सांधे तुझे सत्र नि याग रुप ॥ ३८ ॥

देव - हे देवा - सोमः - सोमरस - तव - तुझे - रेतः - वीर्य - सवनानि - सवने - अवस्थितिः - आसन - संस्थाविभेदाः - अग्निष्टोम इत्यादी भेद - धातवः - त्वचा, मांस इत्यादी सप्तधातु - सर्वाणि - सर्व - सत्राणि - सत्रे - शरीरसंधिः - शरीराचे सांधे - त्वम् - तू - सर्वयज्ञक्रतुः - सर्व यज्ञ व क्रतु आहेत स्वरूप ज्याचे असा - इष्टिबन्धनः - यज्ञातील अनुष्ठाने ही आहेत शरीरातील सांध्यांचे बंध ज्याच्या असा - असि - आहेस ॥३८॥
देवा, आपले वीर्य सोम आहे. आसन (बसणे) प्रातः सवनादी तीन सवन, सात धातू अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्थ, षोडशी, वाजपेय, अतिरात्र आणि आप्तोर्याम नावाच्या सात संस्था आहेत. तसेच शरीराचे सांधे सर्व सत्रे आहेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण यज्ञ (सोमरहित याग) आणि क्रतू (सोमसहित याग) रूप आहात. यज्ञानुष्ठानरूप इष्टी आपल्या अंगांना एकत्रित ठेवणार्‍या मांसपेशी आहेत. (३८)


नमो नमस्तेऽखिलमन्त्रदेवता
    द्रव्याय सर्वक्रतवे क्रियात्मने ।
वैराग्यभक्त्यात्मजयानुभावित
    ज्ञानाय विद्यागुरवे नमो नमः ॥ ३९ ॥
नमो नमस्तेऽ खिलमंत्र देवा
    नी द्रव्य यज्ञा अन कर्म रूपा ।
वैराग्य भक्ती अन रूप ध्यान
    विद्यागुरूला नमितो पुन्हाही ॥ ३९ ॥

अखिलमन्त्रदेवताद्रव्याय - सर्व मंत्र, देवता व द्रव्ये हे आहे स्वरूप ज्याचे असा - सर्वक्रतवे - सर्वयज्ञस्वरूपी - क्रियात्मने - व क्रियास्वरूप अशा - ते - तुला - नमः नमः - अनेकदा नमस्कार असो - वैराग्यभक्त्यात्मजयानुभावितज्ञानाय - वैराग्य, भक्‍ती व इंद्रियदमन याच्या योगाने साक्षात्कार झाला आहे ज्ञानाचा ज्याला अशा - विद्यागुरवे - ज्ञानगुरु अशा तुला - नमः नमः - अनेकदा नमस्कार असो ॥३९॥
सर्व मंत्र, देवता, द्रव्य, यज्ञ आणि कर्म आपलेच स्वरूप आहे. आपणांस नमस्कार असो. वैराग्य, भक्ती आणि मनाची एकाग्रता याद्वारे ज्या ज्ञानाचा अनुभव येतो, ते आपलेच स्वरूप आहे. तसेच आपण सर्वांचे विद्यागुरू आहात. आपल्याला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. (३९)


दंष्ट्राग्रकोट्या भगवंस्त्वया धृता
    विराजते भूधर भूः सभूधरा ।
यथा वनान्निःसरतो दता धृता
    मतङ्गजेन्द्रस्य सपत्रपद्मिनी ॥ ४० ॥
पृथ्वीधरा ! या धरिता धरेला
    जी पर्वतांनी अति शोभलेली ।
जैसे वनीचे नित्‍नपद्म रत्‍न
    श्वेतोगजाने धरिले स्वदंती ॥ ४० ॥

भगवन् भूधर - हे पृथ्वीला वर काढणार्‍या ईश्वरा - यथा - ज्याप्रमाणे - वनात् - पाण्यातून - निःसरतः - बाहेर निघणार्‍या - मतङ्गजेन्द्रस्य - गजराजाच्या - दता - दंताने - धृता - धरिलेली - सपत्रएप्रिनी - पानासह अशी कमलिनी - विराजते - शोभते - तथा - त्याप्रमाणे - त्वया - तू - दंष्ट्राग्रकोट्या - दाढेच्या अग्रभागाने धरिलेली - सभूधरा - पर्वतांसहित - भूः - पृथ्वी - विराजते - शोभते ॥४०॥
हे पृथ्वीला धारण करणार्‍या भगवंता, आपल्या दाढेच्या टोकावर ठेवलेली, पर्वतांनी वेढलेली ही पृथ्वी अशी शोभायमान दिसत आहे की, जसे पाण्यातून बाहेर आलेल्या हत्तीने दातांवर पत्रयुक्त कमळवेल ठेवली आहे. (४०)


त्रयीमयं रूपमिदं च सौकरं
    भूमण्डलेनाथ दता धृतेन ते ।
चकास्ति शृङ्गोढघनेन भूयसा
    कुलाचलेन्द्रस्य यथैव विभ्रमः ॥ ४१ ॥
दातास भूमंडल रूप तूझे
    वेदोमयी विग्रह शोभले ते ।
जै मेघमाला शिखरास येई
    त्यापर्वतांची कुल नित्य शोभा ॥ ४१ ॥

अथ - नंतर - यथा - ज्याप्रमाणे - शृंगोढघनेन - शिखरांनी धारण केलेल्या मेघामुळे - कुलाचलेन्द्रस्य - श्रेष्ठ अशा कुलपर्वतांची - विभ्रमः - लीला - चकास्ति - शोभते - तथा - त्याप्रमाणे - एव - च - इदम् - हे - य्रयीमयम् - तीन वेदरूपी - तव - तुझे - सौकरम् - वराहाचे - रूपम् - रूप - भूयसा - फार मोठ्या - दता - दंताने - धृता - धरिलेल्या - भूमण्डलेन - पृथ्वीमंडलाच्या योगाने - चकास्ति - शोभते ॥४१॥
आपल्या दातांवर ठेवलेल्या भूमंडलामुळे आपले वेदमय वराहरूप असे शोभत आहे की, जसे शिखरांवर मेघ दाटून आले असता प्रचंड वाटणारे कुलपर्वत शोभावेत. (४१)


संस्थापयैनां जगतां सतस्थुषां
    लोकाय पत्‍नीमसि मातरं पिता ।
विधेम चास्यै नमसा सह त्वया
    यस्यां स्वतेजोऽग्निमिवारणावधाः ॥ ४२ ॥
नाथा जिवांच्या सुख वैभवाला
    ही पत्‍नि पृथ्वी जळि ठेववावी ।
जगत्पित्या रूप सतेज तूचि
    माता धरेला तुजला नमस्ते ॥ ४२ ॥

पत्‍नीम् - पत्‍नी अशा - एनाम् मातरम् - या पृथ्वी मातेला - सतस्थुषाम् - स्थावरासहित - जगताम् - लोकांच्या - लोकाय - निवासस्थानाकरिता - संस्थापय - स्थापन कर - यतः त्वम् - कारण तू - पिता - पिता - असि - आहेस - त्वया सह - तुझ्यासह - अस्यै - ह्या पृथ्वीमातेला - नमसा विधेम - नमस्काराने सेवा करतो - यस्याम् - ज्या पृथ्वीमध्ये - अरणौ - अरणीमध्ये - अग्निम् इव - अग्नीप्रमाणे - स्वतेजः - आपले तेज - अधाः - ठेविलेस ॥४२॥
नाथ, चराचर जीवांना सुखाने राहण्यासाठी आपण आपली पत्‍नी या जगन्माता पृथ्वीला पाण्यावर स्थापित करा. आपण जगताचे पिता आहात आणि अरणीमध्ये अग्नी स्थापन करतात, त्याप्रमाणे आपण हिच्यात धारणशक्तिरूप आपले तेज स्थापित केले आहे. आम्ही आपणासह या पृथ्वीमातेला नमस्कार करीत आहोत. (४२)


कः श्रद्दधीतान्यतमस्तव प्रभो
    रसां गताया भुव उद्विबर्हणम् ।
न विस्मयोऽसौ त्वयि विश्वविस्मये
    यो माययेदं ससृजेऽतिविस्मयम् ॥ ४३ ॥
पृथ्वी तुम्ही काढिलि साहसाने
    आश्चर्य हे ना तुजला नवीन ।
मायारुपाने रचितोस सृष्टी
    हे केवढे साहस आश्रयासी ॥ ४३ ॥

प्रभो - हे समर्था - तव - तुझ्याकडून - रसाम् - रसातलाला - गतायाः - गेलेल्या - भुवः - पृथ्वीचा - उद्धिवर्हणम् - उद्धार - कः - कोण - अन्यतमः - तुझ्यावाचून दुसरा - श्रद्दधीत - निश्चयाने करू म्हणेल - विश्वविस्मये - सर्व आश्चर्य समाविष्ट झालेली आहेत ज्यात अशा - त्वयि - तुझ्या ठिकाणी - असौ - हे - विस्मयः - आश्चर्य - न - नाही - यः - जो - मायया - मायेच्या योगाने - अतिविस्मयम् - अत्यंत आश्चर्यकारक - इदम् - हे जग - ससृजे - निर्माण करता झाला ॥४३॥
प्रभो, रसातळात बुडालेल्या या पृथ्वीला वर काढण्याचे साहस आपल्याशिवाय आणखी कोण करू शकत होते ? ज्यांनी आपल्या मायेने या अतिशय आश्चर्यमय असलेल्या विश्वाची रचना केली आणि जे सर्व आश्चर्यांची खाण आहे, त्या आपल्याबाबतीत यात आश्चर्य ते काय ! (४३)


विधुन्वता वेदमयं निजं वपुः
    जनस्तपःसत्यनिवासिनो वयम् ।
सटाशिखोद्धूत शिवाम्बुबिन्दुभिः
    विमृज्यमाना भृशमीश पाविताः ॥ ४४ ॥
वेदोमयी विग्रह झुल्लतो तू
    आयाळ केसें शितथेंब येती ।
जना तपा सत्य निवास ज्यांचा
    ते शुद्ध झाले जलथेंब घेता ॥ ४४ ॥

ईश - परमेश्वरा - वेदमयम् - वेदस्वरूपनिजम् - आपले - वपुः - शरीर - विधुन्वता - डोलविणार्‍या - त्वया - तुझ्याकडून - सटाशिखोद्धूतशिवाम्बुबिन्दुभिः - केसांच्या अग्रांनी उडविलेल्या पवित्र पाण्याच्या बिंदूंनी - विमृज्यमानाः - धुतले जाणारे - जनस्तपः सत्यनिवासिनः - जन, तप व सत्य या लोकांत राहणारे - वयम् - आम्ही - भृशम् - अत्यंत - पाविताः - पवित्र झालो आहो ॥४४॥
हे देवा, आपण जेव्हा आपले वेदमय शरीर थरथरवता, त्यावेळी आपल्या मानेवरील केसांतील पवित्र जलबिंदू आमच्यावर पडतात. त्यामुळे जनोलोक, तपोलोक, आणि सत्यलोक यांत राहणारे आम्ही सर्वार्थाने पवित्र होतो. (४४)


स वै बत भ्रष्टमतिस्तवैष ते
    यः कर्मणां पारमपारकर्मणः ।
यद्योगमायागुणयोगमोहितं
    विश्वं समस्तं भगवन्विधेहि शम् ॥ ४५ ॥
त्याची मती भ्रष्ट कळोनि येते
    कर्मास त्यागू बघती तयांची ।
न पार होती कुणि कर्मत्यागे
    माया तुझी तूचि हितास नेसी ॥ ४५ ॥

अपारकर्मणः - अपार आहेत कर्मे ज्याची अशा - तव - तुझ्या - कर्मणाम् - कर्माच्या - पारम् - अंताला - गन्तुं - जावयास - यः - जो - एषते - इच्छितो - सः - तो - वै - खरोखर - भ्रष्टमतिः - नष्ट झाली आहे बुद्धि ज्याची असा - बत - खरोखर - अस्ति - होय - समस्तम् - सर्व - विश्वम् - जग - यद्योगमायागुणयोगमोहितम् - ज्याच्या योगमायेच्या गुणांनी मोहित झालेले - अस्ति - आहे - भगवान् - परमेश्वर - शम् - कल्याण - विधेहि - कर ॥४५॥
जे पुरुष आपल्या कर्मांचा ठावठिकाणा लावू पाहातात, ते खरोखरच बुद्धिभ्रष्ट समजावेत. कारण आपल्या कर्मांना काही अंत नाही. आपल्याच योगमायेच्या गुणांनी हे सर्व जग मोहित झाले आहे. भगवन, आपण याचे कल्याण करा. (४५)


मैत्रेय उवाच -
इत्युपस्थीयमानस्तैः मुनिभिर्ब्रह्मवादिभिः ।
    सलिले स्वखुराक्रान्त उपाधत्तावितावनिम् ॥ ४६ ॥
मैत्रयजी म्हणाले -
( अनुष्टुप् )
ब्रह्मवादी मुनी यांनी या परी स्तविता तया ।
रक्षार्थ जल स्तंभोनी पृथिवी स्थापिली तिथे ॥ ४६ ॥

तैः - त्या - ब्रह्मवादिभिः - वेद जाणणार्‍या - मुनिभिः - ऋषींनी - इति - याप्रमाणे - उपस्थीयमानः - स्तविला जाणारा - अविता - पृथ्वीचे पालनकर्ता - स्वखुराक्रान्ते - आपल्या खुरांनी खवळलेल्या - सलिले - पाण्यात - अवनिम् - पृथ्वीला - उपाधत्त - स्थापित करिता झाला ॥४६॥
मैत्रेय म्हणाले - विदुरा, त्या ब्रह्मवादी मुनींनी अशाप्रकारे स्तुती केल्यानंतर सर्वांचे रक्षण करणार्‍या वराह भगवानांनी आपल्या खुरांनी पाणी स्थिर करून त्यावर पृथ्वीची स्थापना केली. (४६)


स इत्थं भगवानुर्वीं विष्वक्सेनः प्रजापतिः ।
    रसाया लीलयोन्नीतां अप्सु न्यस्य ययौ हरिः ॥ ४७ ॥
या परी लीलया त्याने काढिली स्थापिली धरा ।
पुन्हा तो विष्वक्सेनो अंतर्धानहि पावला ॥ ४७ ॥

सः - तो - भगवान् - ऐश्वर्यसंपन्न - विष्वक्सेनः - परमेश्वर - प्रजापतिः - प्रजापालक - हरिः - श्रीहरि - लीलया - लीलेने - रसायाः - रसातलापासून - उन्नीताम् - वर काढलेल्या - उर्वीम् - पृथ्वीला - इत्थम् - याप्रमाणे - अप्सु - पाण्यामध्ये - न्यस्य - नीट स्थापन करून - ययौ - गेला ॥४७॥
अशा प्रकारे रसातळातून सहज आणलेल्या पृथ्वीला पाण्यावर ठेवून ते विष्वक्सेन प्रजापती भगवान श्रीहरी अंतर्धान पावले. (४७)


य एवमेतां हरिमेधसो हरेः
    कथां सुभद्रां कथनीयमायिनः ।
शृण्वीत भक्त्या श्रवयेत वोशतीं
    जनार्दनोऽस्याशु हृदि प्रसीदति ॥ ४८ ॥
( इंद्रवज्रा )
लीला मंगला मंजुळ वाणि ऐके
    सांगे तया श्री हरि वेगि पावे ॥ ४८ ॥

यः - जो - कथनीयमायिनः - वर्णन करण्यास योग्य आहेत मायारूप चरित्रे ज्याची - हरिमेधसः - सर्व दुःखांना दूर करणारे आहे ज्ञान ज्याचे अशा - हरेः - श्रीहरीच्या - सुभद्राम् - अत्यंत कल्याणकारक अशा - उशतीम् - सुंदर - कथाम् - कथेला - एवम् - याप्रमाणे - श्रृण्वीत - श्रवण करील - वा - किंवा - श्रवयेत - श्रवण करवील - अस्य - ह्याच्यावर - जनार्दनः - श्रीकृष्ण - हृदि - अंतःकरणात - आशु - त्वरित - प्रसीदति - प्रसन्न होईल ॥४८॥
विदुरा, भगवंतांचे लीलामय चरित्र अत्यंत कीर्तनीय आहे. आणि त्यात रममाण झालेली बुद्धी सर्व प्रकारचे पाप-ताप नाहीसे करते. जो त्यांची ही मंगलमय मनोहर कथा भक्तिभावाने ऐकतो किंवा ऐकवितो, त्याच्यावर भक्तवत्सल भगवान मनापासून फार लवकर प्रसन्न होतात. (४८)


तस्मिन्प्रसन्ने सकलाशिषां प्रभौ
    किं दुर्लभं ताभिरलं लवात्मभिः ।
अनन्यदृष्ट्या भजतां गुहाशयः
    स्वयं विधत्ते स्वगतिं परः पराम् ॥ ४९ ॥
तो कामनापूर्ण समर्थ आहे
    त्याला जगी काय अशक्य आहे ।
त्या तुच्छ हेतूस नकोच थारा
    अनन्य भावे पद मेळवावे ॥ ४९ ॥

सकलाशिषाम् प्रभौ - सर्व भोगांचा स्वामी असा - तस्मिन् - तो श्रीहरि - प्रसन्ने - प्रसन्न झाला असता - किं दुर्लभम् - काय दुर्लभ - अस्ति - आहे - लवात्मभिः - तुच्छ आहे रूप ज्याचे अशा - ताभिः - त्या भोगांनी - अलम् - पुरे - गुहाशयः - अंतःकरणात वास करणारा - परः - परमेश्वर - अनन्यदृष्ट्या - एकनिष्ठदृष्टीने - भजताम् - सेवा करणार्‍या भक्‍तांना - पराम् - उत्कृष्ट अशी - स्वगतिं - आपली प्राप्ती - स्वयम् - स्वतः - विधत्ते - करतो ॥४९॥
भगवंत सर्व कामना पूर्ण करण्यास समर्थ आहेत. ते प्रसन्न झाल्यावर या संसारात दुर्लभ अशी कोणती गोष्ट आहे ? म्हणून तुच्छ इच्छांची आवश्यकताच काय ? जे लोक त्यांचे अनन्यभावाने भजन करतात, त्यांना ते अंतर्यामी परमात्मा स्वतः आपले परमपदच प्रदान करतात. (४९)


को नाम लोके पुरुषार्थसारवित्
    पुराकथानां भगवत्कथासुधाम् ।
आपीय कर्णाञ्जलिभिर्भवापहा-
    महो विरज्येत विना नरेतरम् ॥ ५० ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे वराहप्रादुर्भावानुवर्णनं त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥
पशूस सोडा,नर कोण सांगा
    माया मना सोडविना कथा ही ।
ही ऐकता अमृतवाणि कानी
    हटेल त्याचे मन तेथुनीया ॥ ५० ॥
॥ इति श्रीमद्‌भागवत महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥
॥ तेरावा अध्याय हा ॥ ३ ॥ १३ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

अहो - अहो - लोके - जगात - नरेतरं विना - मनुष्येतर प्राण्याशिवाय - कः नाम - कोणता बरे - पुरुषार्थसारवित् - पुरुषार्थाचे रहस्य जाणणारा - भवापहाम् - संसाराचा नाश करणार्‍या - पुराकथानाम् - पूर्वीच्या कथेतील - भगवत्कथासुधाम् - श्रीहरीच्या अमृतासारख्या कथा - कर्णाञ्जलिभिः - कर्णरूपी ओंजळींनी - आपीय - पिऊन - विरज्येत - कंटाळा करील ॥५०॥
अहो ! या जगात पशुतुल्य माणूस सोडला तर आपल्या पुरुषार्थाचे सार जाणणारा असा कोण आहे की, जो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सोडविणार्‍या भगवंतांच्या प्राचीन कथांपैकी कोणत्याही अमृतमय कथेचे आपल्या कानांची ओंजळ करून एक वेळ जरी श्रवण करील, तरी त्याचे मन तेथून दूर जाईल ? (५०)


स्कंध तिसरा - अध्याय तेरावा समाप्त

GO TOP