श्रीमद् भागवत पुराण
तृतीयः स्कंधः
द्वादशोऽध्यायः

सनकादे रुद्रस्य मरीच्यादीनां सरस्वत्त्या वेदादीनां च उत्पत्तिवर्णनम्,
ब्रह्मणो देहात् स्वायंभुवोमनोः शतरूपायाश्च जन्म -

सृष्टीचा विस्तार -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


मैत्रेय उवाच -
इति ते वर्णितः क्षत्तः कालाख्यः परमात्मनः ।
महिमा वेदगर्भोऽथ यथास्राक्षीन्निबोध मे ॥ १ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
( अनुष्टुप् )
भगवत् कालरूपाचा महिमा कथिला तुम्हा ।
ब्रह्म्याने निर्मिली सृष्टी ऐकावी या परी अशी ॥ १ ॥

क्षत्तः - हे विदुरा - परमात्मनः - परमेश्वराचे - कालाख्यः - काल शक्‍तिरूप - महिमा - माहात्म्य - एवम् - याप्रमाणे - ते - तुला - वर्णितः - सांगितले - अथ - आता - वेदगर्भः - वेद आहेत उदरामध्ये ज्याच्या असा ब्रह्मदेव - यथा - ज्या रीतीने - अस्त्राक्षीत् - सृष्टि उत्पन्न करता झाला - तत् - ते - मे - माझ्यापासून - निबोध - समजून घे ॥१॥
मैत्रेय म्हणाले - विदुरा, अशा रीतीने मी तुला भगवंतांचा कालरूप महिमा ऐकविला. आता ब्रह्मदेवांनी ज्या प्रकारे विश्वाची रचना केली, ते ऐक. (१)


ससर्जाग्रेऽन्धतामिस्रं अथ तामिस्रमादिकृत् ।
महामोहं च मोहं च तमश्चाज्ञानवृत्तयः ॥ २ ॥
अज्ञान अस्मिता क्रोध अभिनिवेष द्वेष हे ।
पाच या वृत्ति अज्ञान प्रथमीं रचिल्या तये ॥ २ ॥

आदिकृत् - सृष्टीचा उपक्रम करणारा ब्रह्मदेव - अग्रे - प्रथम - महामोहम् - महामोह - च - आणि - मोहम् - मोह - तामिस्त्रम् - तामिस्त्र - च - आणि - अन्घतामिस्त्रम् - अन्धतामिस्त्र - अथ - आणि - तमः - तम - इति - अशा - अज्ञानवृत्तीः - अज्ञानाची स्वरूपे - ससर्ज - उत्पन्न करता झाला ॥२॥
प्रथम त्यांनी तम(अविद्या), मोह(अस्मिता), महामोह(राग), तामिस्त्र(द्वेष) आणि अंधतामिस्त्र(अभिनिवेश) या अज्ञानाच्या पाच वृत्ती निर्माण केल्या. (२)


दृष्ट्वा पापीयसीं सृष्टिं नात्मानं बह्वमन्यत ।
भगवद्ध्यानपूतेन मनसान्यां ततोऽसृजत् ॥ ३ ॥
पापी अत्यंत सृष्टी ही पाहुनी खेद पावला ।
भगवत् चिंतने शुद्ध ब्रह्म्याने मन जिंकिले ।
दुसरी निर्मिली तेणे सृष्टि ती वेगळी पुन्हा ॥ ३ ॥

पापीयसीम् - अतिशय पापी अशा - सृष्टिम् - सृष्टीला - दृष्ट्वा - पाहून - आत्मानम् - स्वतःला - बहु न अमन्यत - चांगले मानिता झाला नाही. - ततः - नंतर - भगवद्धयानपूतेन - परमेश्वराच्या ध्यानाने पवित्र झालेल्या - मनसा - अन्तःकरणाने - अन्याम् सृष्टिम् - दुसर्‍या सृष्टीला - असृजत् - उत्पन्न करता झाला. ॥३॥
परंतु ही अत्यंत पापमय सृष्टी पाहून ते संतुष्ट झाले नाहीत. तेव्हा भगवंतांचे ध्यान करून त्यांनी आपले मन पवित्र केले आणि दुसर्‍या सृष्टीची रचना केली. (३)


सनकं च सनन्दं च सनातनमथात्मभूः ।
सनत्कुमारं च मुनीन् निष्क्रियान् ऊर्ध्वरेतसः ॥ ४ ॥
सनको नि सनंदो नी सनातन नि बंधु तो ।
सनत्कुमार हे चौघे ऊर्ध्वरेतेचि निर्मिले ॥ ४ ॥

अथ - नंतर - आत्मभूः - ब्रह्मदेव - सनकम् - सनक - च - आणि - सनन्दम् - सनन्द - च - आणि - सनातनम् - सनातन - च - आणि - सनत्कुमारम् - सनत्कुमार - इति - अशा - ऊर्ध्वरेतसः - उर्ध्वगति आहे रेताची ज्यांच्या अशा - निष्क्रियान् - धर्म, अर्थ व काम याविषयी निरपेक्ष अशा - मुनीन् - ऋषींना - असृजत् - उत्पन्न करता झाला ॥४॥
यावेळी ब्रह्मदेवांनी सनक, सनंदन, सनातन, आणि सनत्कुमार या चार निवृत्तिपरायण ऊर्ध्वरेता मुनींची उत्पत्ती केली. (४)


तान् बभाषे स्वभूः पुत्रान् प्रजाः सृजत पुत्रकाः ।
तन्नैच्छन् मोक्षधर्माणो वासुदेवपरायणाः ॥ ५ ॥
पुत्रांनो सृष्टि ही निर्मा ब्रह्माजी बोलले तयां ।
त्यांनी ना इच्छिले तैसे निमाले भगवत् रूपी ॥ ५ ॥

स्वभूः - ब्रह्मदेव - तान् - त्या - पुत्रान् - पुत्रांना - बभाषे - म्हणाला - पुत्रकाः - मुलांनो, - प्रजाः - प्रजा - सृजत - उत्पन्न करा - किंतु - परंतु - मोक्षधर्माणः - मोक्षधर्म आचरण करणारे - वासुदेवपरायणाः - वासुदेव हेच सर्वस्व आहे ज्यांचे असे - ते - ते - तत् - ते सृष्टिकर्म - न ऐच्छन् - न इच्छिते झाले. ॥५॥
आपल्या या पुत्रांना ब्रह्मदेव म्हणाले, "पुत्रांनो ! तुम्ही प्रजा उत्पन्न करा. "परंतु ते जन्मतःच निवृत्तिपरायण आणि भगवच्चिंतनात तत्पर असल्याने ते करण्याची त्यांची इच्छा नव्हती. (५)


सोऽवध्यातः सुतैरेवं प्रत्याख्यातानुशासनैः ।
क्रोधं दुर्विषहं जातं नियन्तुमुपचक्रमे ॥ ६ ॥
मोडिली आपुली आज्ञा ब्रह्म्याने पाहिली मुले ।
नावरे आवरी क्रोध बुद्धिने रोधिला तरी ॥ ६ ॥

प्रत्याख्यातानुशासनैः - अङ्गिकारिली नाही आज्ञा ज्यांनी अशा - सुतैः - मुलांनी - एवम् - याप्रमाणे - अवध्यातः - अपमान केलेला - सः - तो ब्रह्मदेव - जातम् - उत्पन्न झालेल्या - दुर्विषहम् - सहन करण्यास कठीण अशा - क्रोधम् - क्रोधाला - नियन्तुम् - आवरून धरण्याकरिता - उपचक्रमे - प्रयत्‍न करता झाला ॥६॥
आपली आज्ञा न मानता आपले पुत्र आपला तिरस्कार करीत आहेत, असे पाहून ब्रह्मदेवांना अत्यंत क्रोध आला. आपला क्रोध आवरण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला. (६)


धिया निगृह्यमाणोऽपि भ्रुवोर्मध्यात्प्रजापतेः ।
सद्योऽजायत तन्मन्युः कुमारो नीललोहितः ॥ ७ ॥
वाढता क्रोध ब्रह्म्याचा मधुनी दोन बाहुच्या ।
मूलएक निळे-लाल प्रगटे रूप आगळे ॥ ७ ॥

धिया - बुद्धीने - निगृह्यमाणः अपि - आवरून धरलेलाहि - तन्मन्युः - तो क्रोध - प्रजापतेः - ब्रह्मदेवाच्या - भ्रुवोः - भुवयांच्या - मध्यात् - मध्यापासून - सद्यः - तत्काल - नीललोहितः - काळा व लाल वर्णाचा - कुमारः - बालक असा - अजायत - उत्पन्न झाला ॥७॥
त्यांनी विवेकाने क्रोध आवरण्याचा प्रयत्‍न करून सुद्धा तो क्रोध ताबडतोब ब्रह्मदेवाच्या भुवयांच्या मध्यातून एका निळ्या आणि लाल रंगाच्या बालकाच्या रूपात प्रगट झाला. (७)


स वै रुरोद देवानां पूर्वजो भगवान्भवः ।
नामानि कुरु मे धातः स्थानानि च जगद्‍गुरो ॥ ८ ॥
देवतांपूर्व ते बाळ मोठ्याने रडु लागले ।
पिताजी मजला सांगा नाव नी स्थान राहण्या ॥ ८ ॥

देवानाम् पूर्वजः - देवांच्या पूर्वी उत्पन्न झालेला - सः - तो - भगवान् - ऐश्वर्यसंपन्न - भवः - शंकर - धातः - हे तात - जगद्‍गुरो - त्रैलोक्यगुरो - मे - माझी - नामानि - नावे - च - आणि - स्थानानि - स्थाने - कुरु - नियोजित कर - इति - असे - रुरौद वै - रडू लागला ॥८॥
ते (बालक म्हणजेच) देवतांचे पूर्वज भगवान भव (रुद्र) रडत-रडत म्हणू लागले, "जगत्पिता विधाता, माझी नावे आणि राहण्याची ठिकाणे सांगा." (८)


इति तस्य वचः पाद्मो भगवान् परिपालयन् ।
अभ्यधाद् भद्रया वाचा मा रोदीस्तत्करोमि ते ॥ ९ ॥
पद्मयोनि असा ब्रह्मा वाणिने गोड बोलला ।
ना रडू बालका ऐसा इच्छा ही पूर्ण होतसे ॥ ९ ॥

इति - हे - तस्य - त्याचा - वचः - शब्द - परिपालयन् - पुरा करणारा - भगवान् - ऐश्वर्यसंपन्न - पाद्मः - ब्रह्मदेव - भद्रया - गोड - वाचा - वाणीने - मा रोदीः - रडू नको - ते - तुझे - तत् - ते कार्य - करोमि - करतो - इति - असे - अभ्यधात् - बोलला ॥९॥
तेव्हा कमलयोनी भगवान ब्रह्मदेव त्या बालकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मधुर वाणीने म्हणाले की, "रडू नकोस. मी आता तुझी इच्छा पूर्ण करतो." (९)


यदरोदीः सुरश्रेष्ठ सोद्वेग इव बालकः ।
ततस्त्वां अभिधास्यन्ति नाम्ना रुद्र इति प्रजाः ॥ १० ॥
हे देवा जन्मता तुम्ही रडला स्फुंद स्फुंदुनी ।
म्हणोनी रुद्र या नामे संबोधिल प्रजा तुम्हा ॥ १० ॥

सुरश्रेष्ठ - हे देवश्रेष्ठा - यत् - जे - सोद्वेगः - खिन्न अशा - बालकः इव - मुलाप्रमाणे - अरोदीः - रडलास - ततः - त्यामुळे - प्रजाः - लोक - त्वाम् - तुला - रुद्रः - रुद्र - इति नाम्ना - अशा नावाने - अभिधास्यन्ति - हाक मारतील ॥१०॥
हे देवश्रेष्ठ, तू दुःखी बालकाप्रमाणे स्फुंदून-स्फुंदून रडू लागलास, म्हणून प्रजा तुला ‘रुद्र’ नावाने संबोधतील. (१०)


हृदिन्द्रियाण्यसुर्व्योम वायुरग्निर्जलं मही ।
सूर्यश्चन्द्रस्तपश्चैव स्थानान्यग्रे कृतानि मे ॥ ११ ॥
हृदयेंद्रिये नि प्राण आकाश वायु अग्नि नी ।
पृथिवीजल नी सूर्य तप हे निर्मिले घर ॥ ११ ॥

हृत् - हृदय - इन्द्रियाणि - इन्द्रिये - असुः - प्राण - व्योम - आकाश - वायुः - वारा - अग्निः - अग्नि - जलम् - जल - मही - पृथ्वी - सूर्यः - सूर्य - चन्द्रः - चंद्र - च - आणि - तपः - तपश्चर्या - एतानि - ही - स्थानानि - स्थाने - अग्रे एव - पूर्वीच - मे - मी - कृतानि - केली आहेत ॥११॥
तुझ्या राहण्यासाठी मी अगोदरच हृदय, इंद्रिये, प्राण, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य, चंद्र, आणि तप ही स्थाने उत्पन्न केली आहेत. (११)


मन्युर्मनुर्महिनसो महान् शिव ऋतध्वजः ।
उग्ररेता भवः कालो वामदेवो धृतव्रतः ॥ १२ ॥
मन्यू मनू महिनसो महान् शिव ऋतध्वज ।
उग्ररेता भवो काल वामदेव धृतव्रत ॥
ऐसे हे तुजला नाम ऐकावे देवदेवता ॥ १२ ॥

मन्युः - मन्यु - मनुः - मनु - महिनसः - महिनस - महान् - महान - शिवः - शिव - ऋतुध्वजः - ऋतुध्वज - उग्ररेताः - उग्ररेता - भवः - भव - कालः - काल - वामदेवः - वामदेव - ध्रृतव्रतः - ध्रृतव्रत - इति तव नामानि सन्ति - ही तुझी नावे आहेत ॥१२॥
मन्यू, मन, महिनस, महान, शिव, ऋतध्वज, उग्ररेता, भव, काल, वामदेव, आणि धृतव्रत अशी तुझी नावे असतील. (१२)


धीर्वृत्तिरसलोमा च नियुत्सर्पिरिलाम्बिका ।
इरावती स्वधा दीक्षा रुद्राण्यो रुद्र ते स्त्रियः ॥ १३ ॥
धी वृती उशना ऊमा नियुत् सर्पी इला सुधा ।
अंबिका नी इरावती बारा पत्‍न्या तुला अशा ॥ १३ ॥

रुद्र - हे रुद्रा - धीः - धी - वृत्तिः - वृत्ति - उशना - उशना - उमा - उमा - नियुत्सर्पिः - नियुत्सर्पि - इला - इला - अम्बिका - अम्बिका - च - आणि - इरावतीसुधादीक्षारुद्राण्यः - इरावती, सुधा, दीक्षा आणि रुद्राणी - एताः - ह्या - ते - तुझ्या - स्त्रियः - स्त्रिया - सन्ति - आहेत ॥१३॥
तसेच धी, वृत्ती, उशना, उमा, नियुत, सर्पि, इला, अंबिका, इरावती, सुधा, आणि दीक्षा या अकरा रूद्राणी तुझ्या पत्‍न्या असतील. (१३)


गृहाणैतानि नामानि स्थानानि च सयोषणः ।
एभिः सृज प्रजा बह्वीः प्रजानामसि यत्पतिः ॥ १४ ॥
नाम स्थान नि पत्‍न्यांचा स्वीकार करणे तुम्ही ।
प्रजापती तुम्हा नाम प्रजा ती बहु निर्मिणे ॥ १४ ॥

सयोषणः - स्त्रियांसहित - त्वम् - तू - एतानि - ह्या - नामानि - नावांना - च - आणि - एभिः - ह्या स्थानांना, नावांनी व स्त्रियांनी - युक्‍तः - युक्‍त असा - बह्‌वीः - पुष्कळ - प्रजाः - प्रजा - सृज - उत्पन्न कर - यत् - कारण - त्वम् - तू - प्रजानाम् - लोकांचा - पतिः - पालक - असि - आहेस ॥१४॥
तू वरील नावांचा, स्थानांचा, आणि स्त्रियांचा स्वीकार कर आणि त्यांच्या द्वारा पुष्कळशी प्रजा उत्पन्न कर. कारण तू प्रजापती आहेस. (१४)


इत्यादिष्टः स्वगुरुणा भगवान् नीललोहितः ।
सत्त्वाकृतिस्वभावेन ससर्जात्मसमाः प्रजाः ॥ १५ ॥
ब्रह्म्याची मानुनी आज्ञा बलकारी स्वभावि ही ।
प्रजा तो आपल्या ऐसी नित्यची निर्मु लागला ॥ १५ ॥

गुरुणा - ब्रह्मदेवाने - इति - याप्रमाणे - आदिष्टः - आज्ञा केलेला - सः - तो - भगवान् - भगवान् - नीललोहितः - रुद्र - सत्त्वाकृतिस्वभावेन - बल, आकार व स्वभाव यांना अनुरूप - आत्मसमाः - आपल्यासारख्या - प्रजाः - प्रजा - ससर्ज - उत्पन्न करता झाला ॥१५॥
लोकपिता ब्रह्मदेवांची अशी आज्ञा घेऊन भगवान नीललोहित आपल्यासारखेच बल, आकार, आणि स्वभाव असणारी प्रजा निर्माण करू लागला. (१५)


रुद्राणां रुद्रसृष्टानां समन्ताद् ग्रसतां जगत् ।
निशाम्यासंख्यशो यूथान् प्रजापतिरशङ्कत ॥ १६ ॥
असंख्य जन्मले रुद्र जगाला भक्षु लागले ।
ब्रह्म्याने पाहिले सर्व शंकाहि निपजे मनीं ॥ १६ ॥

रुद्रसृष्टानाम् - रुद्रांनी उत्पन्न केलेल्या - जगत् - जगाच्या - समन्तात् - चोहूंकडे - वसताम् - राहणार्‍या अशा - रुद्राणाम् - रुद्रांचे - संख्यशः - असंख्य - यूथान् - कळप - निशाम्य - पाहून - प्रजापतिः - ब्रह्मदेव - अशङ्कत - शंकित झाला ॥१६॥
रुद्राने उत्पन्न केलेले त्या रुद्रांचे असंख्य समुदाय सर्व जगाचे भक्षण करीत आहेत, असे पाहून ब्रह्मदेवांना भीती वाटली. (१६)


अलं प्रजाभिः सृष्टाभिः ईदृशीभिः सुरोत्तम ।
मया सह दहन्तीभिः दिशश्चक्षुर्भिरुल्बणैः ॥ १७ ॥
तेंव्हा तो बोलला त्याला जाळिते सृष्टिला मला ।
प्रजा ही असुरी ऐसी न निर्मा ती कधी पुन्हा ॥ १७ ॥

सुरोत्तम - हे सुरश्रेष्ठा - उल्बणैः - तीक्ष्ण - चक्षुर्भिः - डोळ्यांनी - मया सह - माझ्यासह वर्तमान - दिशः - दिशांना - दहन्तीभिः - जाळणार्‍या - ईदृशीभिः - अशा प्रकारच्या - सृष्टाभिः - उत्पन्न केलेल्या - प्रजाभिः - प्रजा - अलम् - पुरे झाल्या ॥१७॥
ते रुद्राला म्हणाले - "सुरश्रेष्ठ, तुझी प्रजा आपल्या भयंकर दृष्टीने मला आणि सर्व दिशांना भस्म करू पाहात आहे. तेव्हा अशी प्रजा निर्माण करू नकोस." (१७)


तप आतिष्ठ भद्रं ते सर्वभूतसुखावहम् ।
तपसैव यथापूर्वं स्रष्टा विश्वमिदं भवान् ॥ १८ ॥
होवो भद्र तुम्हा सारे सुखकारी करा तप ।
तपाच्या त्या प्रभावाने निर्मावी सृष्टि ही पुन्हा ॥ १८ ॥

सर्वभूतसुखावहम् - सर्व प्राण्यांना सुख उत्पन्न करणारे असे - तपः - तप - आतिष्ठ - कर - ते - तुझे - भद्रम् - कल्याण - अस्तु - असो - भवान् - तू - तपसा एव - तपश्चर्येने - यथापूर्वम् - पूर्वीप्रमाणे - इदम् - हे - विश्वम् - जग - स्रष्टा - उत्पन्न करशील ॥१८॥
तुझे कल्याण असो, आता तू सर्व प्राण्यांना सुखी करण्यासाठी तप कर. नंतर त्या तपाच्या प्रभावानेच तू पुन्हा पहिल्याप्रमाणे या सृष्टीची रचना कर. (१८)


तपसैव परं ज्योतिः भगवन्तमधोक्षजम् ।
सर्वभूतगुहावासं अञ्जसा विन्दते पुमान् ॥ १९ ॥
तपाने इंद्रियातीत सर्वान्तर्यामि श्रीहरी ।
ज्योतिस्वरूप लाभेची सुलभो पुरुषा अशी ॥ १९ ॥

पुमान् - पुरुष - तपसा एव - तपश्चर्येने - परम् - श्रेष्ठ - ज्योतिः - तेजोरूप - सर्वभूतगुहावासम् - सर्व प्राण्यांच्या हृदयात वास करणार्‍या अशा - भगवन्तम् - ऐश्वर्यसंपन्न - अधोक्षजम् - परमेश्वराला - अञ्जसा - सहज - विन्दते - प्राप्त करून घेतो ॥१९॥
पुरुष तपानेच इंद्रियातीत, सर्वांतर्यामी आणि ज्योतिःस्वरूप श्रीहरीला सुलभतेने प्राप्त करून घेऊ शकतो. (१९)


मैत्रेय उवाच -
एवमात्मभुवाऽऽदिष्टः परिक्रम्य गिरां पतिम् ।
बाढमित्यमुमामन्त्र्य विवेश तपसे वनम् ॥ २० ॥
मैत्रेयजी सांगतात-
रुद्राने ऐकिली आज्ञा ’छान हे !’ बोलले नि तो ।
परीक्रमा करोनीया वनात पातला तपा ॥ २० ॥

आत्मभुवा - ब्रह्मदेवाने - एवम् आदिष्टः - याप्रमाणे आज्ञा केलेला रुद्र - गिराम् - वेदवाणीचा - पतिम् - अधिकारी अशा - अमुम् - ब्रह्मदेवाला - परिक्रम्य - प्रदक्षिणा करून - च - आणि - बाढम् इति आमन्त्रय - ठीक आहे अशा शब्दांनी निरोप घेऊन - तपसे - तपश्चर्येकरिता - वनम् - अरण्यात - विवेश - प्रवेश करता झाला ॥२०॥
मैत्रेय म्हणाले - जेव्हा ब्रह्मदेवांनी अशी आज्ञा केली, तेव्हा रुद्राने ‘फारच चांगले’ असे म्हणून आज्ञा शिरसावंद्य मानली आणि त्यांची अनुमती घेऊन, त्यांना प्रदक्षिणा घालून तो तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला. (२०)


अथाभिध्यायतः सर्गं दश पुत्राः प्रजज्ञिरे ।
भगवत् शक्तियुक्तस्य लोकसन्तानहेतवः ॥ २१ ॥
भगवत् शक्तिसंपन्न ब्रह्मे संकल्पिले पुन्हा ।
दहा पुत्र तदा झाले प्रजा ती वाढली बहू ॥ २१ ॥

अथ - नंतर - सर्गम् - सृष्टिस्वरूप - अभिध्यायतः - मनात घोळवीत असणार्‍या त्या - भगवच्छक्‍तियुक्‍तस्य - भगवंताच्या शक्‍तीने युक्‍त अशा ब्रह्मदेवाला - लोकसंतानहेतवः - लोकविस्तार जेणेकरून हो‌ईल असा - दश - दहा - पुत्राः - पुत्र - प्रजज्ञिरे - उत्पन्न झाले ॥२१॥
यानंतर जेव्हा भगवंतांच्या शक्तीने संपन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी उत्पत्तीसाठी संकल्प केला, तेव्हा त्यांना आणखी दहा पुत्र झाले. त्यामुळे प्रजेची पुष्कळ वाढ झाली. (२१)


मरीचिरत्र्यङ्‌गिरसौ पुलस्त्यः पुलहः क्रतुः ।
भृगुर्वसिष्ठो दक्षश्च दशमस्तत्र नारदः ॥ २२ ॥
मरिची अत्रि अंगीरा पुलस्त्य पुलह क्रतु ।
भृगु वसिष्ठ नी दक्ष दहावा नारदो असे ॥ २२ ॥

मरीचिः - मरीचि - अत्र्यङ्गिरसौ - अत्रि व अङ्गिरा - पुलस्त्यः - पुलस्त्य - पुलहः - पुलह - क्रतुः - क्रतु - भृगुः - भृगु - वसिष्ठः - वसिष्ठ - दक्षः - दक्ष - च - आणि - तत्र - त्या पुत्रात - दशमः - दहावा - नारदः - नारद - अस्ति - होय ॥२२॥
मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगू, वसिष्ठ, दक्ष, आणि दहावे नारद अशी त्यांची नावे होत. (२२)


उत्सङ्गान्नारदो जज्ञे दक्षोऽङ्गुष्ठात्स्वयम्भुवः ।
प्राणाद्वसिष्ठः सञ्जातो भृगुस्त्वचि करात्क्रतुः ॥ २३ ॥
पुलहो नाभितो जज्ञे पुलस्त्यः कर्णयोH Ruषिः ।
अङ्‌गिरा मुखतोऽक्ष्णोऽत्रिः मरीचिर्मनसोऽभवत् ॥ २४ ॥
नारदा जन्म कुक्षीत अंगुठी दक्ष जन्मला ।
वसिष्ठ जन्म प्राणात त्वचेत भृगु जन्मला ॥ २३ ॥
करी क्रतु नि नाभीत पुलही जन्म लाभला ।
पुलस्त्य कर्ण भागात मुखासी अंगिरा तसा ॥
नेत्रात जन्मला अत्री मरिची मनि जन्मला ॥ २४ ॥

स्वयुम्भुवः - ब्रह्मदेवाच्या - उत्सङ्गात् - मांडीतून - नारदः - नारद - अङ्गुष्ठात् - अंगुष्ठापासून - दक्षः - दक्ष - जज्ञे - उत्पन्न झाला - प्राणात् - प्राणापासून - वसिष्ठः - वसिष्ठ - संजातः - उत्पन्न झाला - त्वचि - त्वचेच्या ठिकाणी - भृगुः - भृगु - करात् - हातापासून - क्रतुः - क्रतु - जज्ञे - झाला ॥२३॥ पुलहः - पुलह - नाभितः - नाभीपासून - कर्णयोः - कर्णापासून - पुलस्त्यः ऋषि - पुलस्त्य ऋषि - जज्ञे - झाला - अंगिराः - अंगिरा - मुखतः - मुखातून - अक्ष्णः - डोळ्यातून - अत्रिः - अत्रि - मरीचिः - मरीचि - मनसः - मनापासून - अभवत् - झाला ॥२४॥
यांपैकी नारद ब्रह्मदेवाच्या मांडीपासून, दक्ष आंगठ्यापासून, वसिष्ठ प्राणांपासून, भृगू त्वचेपासून, क्रतू हातापासून, पुलह नाभीपासून, पुलस्त्य कानांपासून, अंगिरा मुखापासून, अत्री डोळ्यांपासून, आणि मरीची मनापासून उत्पन्न झाले. (२३-२४)


धर्मः स्तनाद् दक्षिणतो यत्र नारायणः स्वयम् ।
अधर्मः पृष्ठतो यस्मात् मृत्युर्लोकभयङ्करः ॥ २५ ॥
डाव्या स्तनात धर्माचा पत्‍नि नारायणी तया ।
अधर्म जन्मला पाठी भय मृत्यूस कारणी ॥ २५ ॥

यत्र - ज्या धर्माचे ठिकाणी - स्वयम् - स्वतः - नारायणः - नारायण - अस्ति सः - आहे तो - धर्मः - धर्म - दक्षिणतः - उजव्या - स्तनात् - स्तनातून - यस्मात् - ज्यापासून - लोकभयंकरः - लोकांना भीति उत्पन्न करणारा - मृत्युः - मृत्यु - भवति सः - उत्पन्न होतो तो - अधर्मः - अधर्म - पृष्ठतः - पाठीतून - जज्ञे - उत्पन्न झाला ॥२५॥
त्यांच्या उजव्या स्तनापासून धर्म उत्पन्न झाला. ज्यांच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाले, त्यांच्या पाठीपासून अधर्माचा जन्म झाला. त्या अधर्मापासून संसाराला भयभीत करणारा मृत्यू उत्पन्न झाला. (२५)


हृदि कामो भ्रुवः क्रोधो लोभश्चाधरदच्छदात् ।
आस्याद् वाक्सिन्धवो मेढ्रान् निर्‌ऋतिः पायोरघाश्रयः ॥ २६ ॥
हृदयी काम निष्पन्न बाहूसी क्रोध जन्मला ।
अधरी लोभ तो जन्मे वाणीने ती सरस्वती ॥
लिंगातुनि समुद्राला गुदासी पाप निऋत ॥ २६ ॥

हृदि - अंतःकरणाच्या ठिकाणी - कामः - काम - भ्रुवः - भ्रुकटीपासून - क्रोधः - क्रोध - अधरदच्छदात् - अधरोष्ठापासून - लोभः - लोभ - आस्यात् - मुखातून - वाक् - वाणी - मेढ्रात् - शिश्नापासून - सिन्धवः - नद्या - च - आणि - पायोः - गुदद्वारापासून - अघाश्रयः - पापांचा आश्रय असा - निऋतिः - निऋति - जज्ञे - उत्पन्न झाला ॥२६॥
तसेच ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम, भुवयांपासून क्रोध, खालच्या ओठांपासून लोभ, मुखापासून वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती, लिंगापासून समुद्र, गुदस्थानापासून पापांचे निवासस्थान निर्ऋती उत्पन्न झाले. (२६)


छायायाः कर्दमो जज्ञे देवहूत्याः पतिः प्रभुः ।
मनसो देहतश्चेदं जज्ञे विश्वकृतो जगत् ॥ २७ ॥
कर्दमां जन्म छायेत देवहूतीस जो पती ।
तन मने अशी सृष्टी ब्रह्म्याने निर्मिले जग ॥ २७ ॥

छायायाः - छायेपासून - देवहूत्याः - देवहूतीचा - पति - पती - प्रभुः - समर्थ असा - कर्दमः - कर्दम ऋषि - जज्ञे - जन्मला - च - आणि - विश्वकृतः - ब्रह्मदेवाच्या - मनसः - मनापासून - च - आणि - देहतः - देहापासून - इदम् - हे - जगत् - जग - जज्ञे - उत्पन्न झाले ॥२७॥
सावलीपासून देवहूतीचे पती भगवान कर्दम उत्पन्न झाले. अशा प्रकारे हे सर्व जग जगत्कर्त्या ब्रह्मदेवाच्या शरीर आणि मनापासून उत्पन्न झाले. (२७)


वाचं दुहितरं तन्वीं स्वयम्भूर्हरतीं मनः ।
अकामां चकमे क्षत्तः सकाम इति नः श्रुतम् ॥ २८ ॥
स्वकन्या ती सुकुमार देखणी पाहुनी मनीं ।
ब्रह्म्याला काम तो झाला परी ती हीन वासना ॥ २८ ॥

क्षत्तः - हे विदुरा - सकामः - कामाने युक्‍त असा - स्वयम्भूः - ब्रह्मदेव - तन्वीम् - सुंदर अशा - मनः - अंतःकरणाला - हरन्तीम् - मोह पाडणार्‍या अशा - अकामाम् - कामरहित अशा - वाचम् दुहितरम् - सरस्वतीनामक कन्येला - चकमे - अभिलाषिता झाला - इति - असे - नः श्रुतम् - आमच्या ऐकण्यात आहे ॥२८॥
विदुरा, ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती कोमल आणि सुंदर होती. आम्ही ऐकले आहे की, ती स्वतः वासनाहीन असूनही तिला पाहून ब्रह्मदेवांच्या मनात कामवासना निर्माण झाली. (२८)


तमधर्मे कृतमतिं विलोक्य पितरं सुताः ।
मरीचिमुख्या मुनयो विश्रम्भात् प्रत्यबोधयन् ॥ २९ ॥
बापाचे पाहुनी पाप मरिची बोलला तया ।
ऋषिहि बोलले आणि विश्वासे बोधिले तया ॥ २९ ॥

सुताः - पुत्र असे - मरीचिमुख्याः - मरीचि आहे मुख्य ज्यामध्ये असे - मुनयः - ऋषि - अधर्मे - अधर्मामध्ये - कृतमतिम् - केली आहे बुद्धि ज्याने अशा - तम् - त्या - पितरम् - पिता जो ब्रह्मदेव त्याला - विलोक्य - पाहून - विश्रम्भात् - विश्वासामुळे - प्रत्यबोधयन् - सविनय बोध करते झाले ॥२९॥
असा अधर्मी विचार ब्रह्मदेवांच्या मनात आलेला पाहून त्यांचे पुत्र मरीची आदी ऋषींनी त्यांना विश्वासात घेऊन समजावले. (२९)


नैतत्पूर्वैः कृतं त्वद्ये न करिष्यन्ति चापरे ।
यस्त्वं दुहितरं गच्छेः अनिगृह्याङ्गजं प्रभुः ॥ ३० ॥
समर्थ असुनी तुम्ही पुत्रीचा लोभ पाप ते ।
असे हे कोणते ब्रह्मा या पूर्वी वागला नसे ॥ ३० ॥

यत् त्वम् - जो तू - प्रभुः - समर्थ असा - अङ्गजम् - कामाला - अनिगृह्य - न आवरून - दुहितरं गच्छेः - कन्येशी गमन करण्यास प्रवृत्त झालास - एतत् - हे - पूर्वैः - पूर्वजांनी - न कृतम् - केले नाही - च - आणि - त्वत् अपरे - तुझ्यानंतर - ये - जे - सन्ति ते - आहेत ते - न करिष्यन्ति - करणार नाहीत ॥३०॥
तात, आपण समर्थ असूनही आपल्या मनात उत्पन्न झालेल्या कामवेगाला आवरू शकला नाहीत आणि कन्या-गमनासारखे भयंकर पाप करण्याचा संकल्प करीत आहात. असे तर यापूर्वी कोणीही केले नाही, आणि पुढेही कोणी करणार नाही. (३०)


तेजीयसामपि ह्येतन्न सुश्लोक्यं जगद्‍गुरो ।
यद्‌वृत्तमनुतिष्ठन् वैन्वै लोकः क्षेमाय कल्पते ॥ ३१ ॥
जगद्गुरो तुम्ही तेज तुम्हा काम न शोभतो ।
तुमच्या अनुसारात जगाला सुख लाभते ॥ ३१ ॥

जगदगुरो - हे त्रैलोक्यगुरो - तेजीयासाम् अपि - तेजस्वी लोकांना सुद्धा - एतत् - हे - सुश्‍लोक्यम् - स्तुतीला योग्य असे - न - नाही - हि - कारण - यद्‌वृत्तम् - ज्या तेजस्वी पुरुषांच्या वर्तनाला - अनुतिष्ठन् - अनुसरणारा - लोकः - लोक - क्षेमाय - कल्याणाला - कल्पते - प्राप्त होतो ॥३१॥
हे जगद्‌गुरो, आपल्यासारख्या तेजस्वी पुरुषांना असे कृत्य शोभत नाही. कारण आपल्यासारख्यांच्या आचरणाचेच अनुकरण केल्याने या जगातील लोकांचे कल्याण होते. (३१)


तस्मै नमो भगवते य इदं स्वेन रोचिषा ।
आत्मस्थं व्यञ्जयामास स धर्मं पातुमर्हति ॥ ३२ ॥
भगवंते स्वतेजाने तुम्हासी निर्मिले असे ।
नमस्कार तया नित्य रक्षील तोचि धर्म की ॥ ३२ ॥

यः - जो भगवान - आत्मस्थम् - आपल्या स्वरूपात असलेले - इदम् - हे जग - व्यञ्जयामास - व्यक्‍त करता झाला - तस्मै - त्या - भगवते - परमेश्वराला - नमः - नमस्कार - अस्तु - असो - सः - तो भगवान् - धर्मम् - धर्माचे - पातुम् - रक्षण करण्याकरिता - अर्हति - योग्य आहे ॥३२॥
ज्या भगवंतांनी आपल्या स्वरूपात स्थित असलेल्या या जगाला आपल्याच तेजाने प्रगट केले आहे, त्यांना नमस्कार असो. यावेळी त्यांनीच धर्माचे रक्षण करावे. (३२)


स इत्थं गृणतः पुत्रान् पुरो दृष्ट्वा प्रजापतीन् ।
प्रजापतिपतिस्तन्वं तत्याज व्रीडितस्तदा ।
तां दिशो जगृहुर्घोरां नीहारं यद्विदुस्तमः ॥ ३३ ॥
पुत्रांची प्रार्थना ब्रम्हा ऐकुनी लाजला बहू ।
तत्काळ सोडिला देह अंधःकार रुपी असा ॥ ३३ ॥

तदा - त्या वेळी - प्रजापतिंपतिः - प्रजापतींचा पिता ब्रह्मदेव - पुरः - आपल्यापुढे - इत्थम् - अशा प्रकारे - गृणतः - बोलणार्‍या - प्रजापतीन् - प्रजापतिरूप अशा - पुत्रान् - पुत्रांना - दृष्ट्वा - पाहून - ब्रीडितः - लज्जित झालेला असा - तन्वम् - शरीराला - तत्याज - त्यागिता झाला ॥३३॥
आपले पुत्र मरीची आदी प्रजापती आपल्यासमोरच असे म्हणत आहेत असे पाहून प्रजापतींचे अधिपती ब्रह्मदेव लज्जित झाले आणि त्यांनी त्याच क्षणी आपल्या शरीराचा त्याग केला. तेव्हा त्या घोर शरीराला दिशा घेऊन गेल्या. तेच धुके झाले. त्याला अंधार असेही म्हणतात. (३३)


कदाचिद् ध्यायतः स्रष्टुः वेदा आसंश्चतुर्मुखात् ।
कथं स्रक्ष्याम्यहं लोकाम् समवेतान् यथा पुरा ॥ ३४ ॥
मनात एकदा ब्रह्मा पूर्वसृष्टीस निर्मिण्या ।
विचारे बैसला तेंव्हा चारीही वेद जन्मले ॥ ३४ ॥

दिशः - दिशा - घोराम् - निंद्य अशा - ताम् - त्या शरीराला - जगृहुः - स्वीकारत्या झाल्या - यत् - ज्या शरीराला - तमः - तमोगुणरूप - नीहारम् - धुके - विदुः - समजतात - अहम् - मी - यथा - ज्याप्रमाणे - पुरा - पूर्वी - असृजम् तथा - सृष्टि उत्पन्न करता झालो त्याप्रमाणे - समवेतान् - सुव्यस्थित - लोकान् - लोकांना - कथम् - कसे - स्त्रक्ष्यामि - उत्पन्न करीन - इति - असा - कदाचित् - एके वेळी - ध्यायतः - विचार करणार्‍या - स्त्रष्टुः - ब्रह्मदेवाच्या - चतुर्मुखात - चार मुखांतून - वेदाः - वेद - आसन् - उत्पन्न झाले ॥३४॥
एकदा ब्रह्मदेव विचार करू लागले की, मी पूर्वीप्रमाणेच व्यवस्थितपणे सर्व लोकांची रचना कशी करू ? त्याच वेळी त्यांच्या चार मुखातून चार वेद प्रगट झाले. (३४)


चातुर्होत्रं कर्मतन्त्रं उपवेदनयैः सह ।
धर्मस्य पादाश्चत्वारः तथैवाश्रमवृत्तयः ॥ ३५ ॥
अध्वर्यु न्याय उद्गाता होता अन् उपवेद ही ।
ब्रह्मा चौ ऋत्विजी कर्म धर्म याग सविस्तर ।
वृत्ति आश्रम हे सर्व ब्रह्म्याच्या मुखि जन्मले ॥ ३५ ॥

उपवेदनयैः सह - उपवेद व न्याय यांसह - चातुर्होत्रम् - होता,अध्वर्यु व उद्‌गाता व ब्रह्मा यांची कर्मे - कर्मतन्त्रम् - यज्ञाचा विस्तार - धर्मस्य - धर्माचे - चत्वारः - चार - पादाः - चरण - तथा एव - तसेच - आश्रमवृत्तयः - आश्रम व त्यांचा वर्तनक्रम - आसन् - उत्पन्न झाले ॥३५॥
त्याखेरीज उपवेद, न्यायशास्त्र, होता, उद्‌गाता, अध्वर्यु, आणि ब्रह्मा या चार ऋत्विजांचे कर्म, यज्ञांचा विस्तार, धर्माचे चार चरण आणि चार आश्रम तसेच त्यांच्या वृत्ती, हे सर्व ब्रह्मदेवांच्या मुखापासूनच उत्पन्न झाले. (३५)


विदुर उवाच -
स वै विश्वसृजामीशो वेदादीन् मुखतोऽसृजत् ।
यद् यद् येनासृजद् देवस्तन्मे ब्रूहि तपोधन ॥ ३६ ॥
विदुरजींनी विचारिले-
स्वामी जो विश्वनिर्माता मुखाने वेद बोलला ।
कोणत्या मुखिने काय बोलला सांगिजे तपी ॥ ३६ ॥

तपोधन - तपच ज्याचे धन आहे अशा हे मैत्रैयमुने ! - विश्वसृजाम् - प्रजापतींचा - ईशः - स्वामी - सः - ब्रह्मदेव - वेदादीन् - वेद इत्यादिकांना - मुखतः - मुखापासून - असृजत् - उत्पन्न करता झाला - देवः - ब्रह्मदेव - यत् यत् - जे जे - येन - ज्या मुखाने - असृजत् - उत्पन्न करता झाला - तत् - ते - मे - मला - ब्रूहि - सांगा ॥३६॥
विदुराने विचारले - हे तपोधन, विश्वरचनेचे स्वामी श्रीब्रह्मदेवांनी आपल्या मुखांतून या वेद इत्यादींची रचना केली. तर आपल्या कोणत्या मुखातून कोणती वस्तू उत्पन्न केली, हे आपण सांगावे. (३६)


मैत्रेय उवाच -
ऋग्यजुःसामाथर्वाख्यान् वेदान् पूर्वादिभिर्मुखैः ।
शास्त्रमिज्यां स्तुतिस्तोमं प्रायश्चित्तं व्यधात्क्रमात् ॥ ३७ ॥
मैत्रेयजी म्हणाले-
ऋग्यजुसामाथर्व क्रमाने पूर्व दक्षिण ।
पश्चिमी उत्तरा तोंडे रचिले वेद ते असे ॥
शस्त्र इज्या स्तुति स्तोम पायश्चित्त तसेचि ते ॥ ३७ ॥

पूर्वादिभिः - पूर्व इत्यादिक - मुखैः - मुखांनी - क्रमात् - क्रमाने - ऋग्यजुःसामाथर्वाख्यान् - ऋक्, यजु, साम व अथर्व अशा आहेत नावे ज्यांची असे - वेदान् - वेद - शस्त्रम् - गायन केल्याशिवाय पठण करावयाचे मन्त्र - इज्याम् - हवन, पूजन इत्यादिक करणे - स्तुतिस्तोमम् - गायनपूर्वक म्हणावयाचे मंत्र - प्रायश्चित्तम् - कर्मात होणार्‍या दोषांची निवृत्ति व्हावी म्हणून करावयाची कृत्ये - व्यधात् - करता झाला ॥३७॥
मैत्रेय म्हणाले - विदुरा, ब्रह्मदेवांनी आपल्या पूर्व, दक्षिण, पश्चिम, आणि उत्तर या मुखांपासून अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदाची रचना केली. तसेच याच क्रमाने शस्त्र(होत्याचे कर्म), इज्या(अध्वर्यूचे कर्म), स्तुतिस्तोम(उद्‌गात्याचे कर्म) आणि प्रायश्चित(ब्रह्म्याचे कर्म) या चारांची रचना केली. (३७)


आयुर्वेदं धनुर्वेदं गान्धर्वं वेदमात्मनः ।
स्थापत्यं चासृजद् वेदं क्रमात् पूर्वादिभिर्मुखैः ॥ ३८ ॥
आयुर्वेद धनुर्वेद गांधर्ववेद नी तसा ।
स्थापत्यवेद हे चारी क्रमे रचियले तये ॥ ३८ ॥

आत्मनः - आपल्या - पूर्वादिभिः - पूर्व इत्यादिक - मुखैः - मुखांनी - क्रमात् - अनुक्रमाने - आयुर्वेदम् - वैद्यशास्त्र - धनुर्वेदम् - शस्त्रविद्या - गान्धर्वम् - गायनविद्या - च - आणि - स्थापत्यं वेदम् - कलाकौशल्य - असृजत् - उत्पन्न करता झाला ॥३८॥
याच रीतीने आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, आणि स्थापत्यवेद या चार उपवेदांनाही क्रमशः आपल्या त्याच पूर्वादी मुखांपासून उत्पन्न केले. (३८)


इतिहासपुराणानि पञ्चमं वेदमीश्वरः ।
सर्वेभ्य एव वक्त्रेभ्यः ससृजे सर्वदर्शनः ॥ ३९ ॥
सर्वदर्शि तये ब्रह्मे चारीही त्या मुखातुनी ।
इतिहास पुराणे तो पाचवा वेद बोलिला ॥ ३९ ॥

सर्वदर्शनः - सर्व पदार्थांचे आहे ज्ञान ज्याला असा - ईश्वरः - ब्रह्मदेव - पञ्चमम् - पाचवा - वेदम् - वेद - इतिहासपुराणानि - इतिहास व पुराणे - सर्वेभ्यः एव - सर्वच - वक्‍त्रेभ्यः - मुखातून - ससृजे - उत्पन्न करता झाला ॥३९॥
नंतर सर्वज्ञ भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या चारी मुखांपासून इतिहास-पुराणरूपी पाचवा वेद तयार केला. (३९)


षोडश्युक्थौ पूर्ववक्त्रात् पुरीष्यग्निष्टुतावथ ।
आप्तोर्यामातिरात्रौ च वाजपेयं सगोसवम् ॥ ४० ॥
षोडशी उक्थ चयनो अग्निष्टोम तसेच ते ।
आप्तोर्याम अतिरात्र वाजपेय नि गोसव ॥
द्वि द्वि याग तशा त्याच क्रमाने रचिल्या पुन्हा ॥ ४० ॥

षोडश्युक्थौ - षोडशी व उक्‍थ ही कर्मे - पूर्ववक्रात् - पूर्वेकडील मुखातून - अथ - आणि - इतरेभ्यः क्रमात् - इतर मुखातून क्रमाने - पुरीष्यग्निष्टुतौ - चयन व अग्निष्टोम - आप्तोर्यामातिरात्रौ - आप्तोर्याम व अतिरात्र - च - आणि - सगोसवम् - गोसवासहित - वाजपेयम् - वाजपेय ॥४०॥
याच क्रमाने त्यांच्या पूर्वादी मुखांपासून षोडशी आणि उक्थ, चयन, आणि अग्निष्टोम, आप्तोर्याम, आणि अतिरात्र तसेच वाजपेय आणि गोसव हे दोन-दोन यज्ञही उत्पन्न झाले. (४०)


विद्या दानं तपः सत्यं धर्मस्येति पदानि च ।
आश्रमांश्च यथासंख्यं असृजत्सह वृत्तिभिः ॥ ४१ ॥
विद्या दान तप सत्य धर्माचे चारपाय ते ।
यापरी वर्णिले त्याने चौमुखे चारही क्रमे ॥ ४१ ॥

विद्या - शुद्धता - दानम् - दया - तपः - तपश्चर्या - च - आणि - सत्यम् - सत्य - इति - हे - धर्मस्य - धर्माचे - पदानि - चरण - च - आणि - वृत्तिभिःसह - वागण्याच्या नियमांसहित - आश्रमान् - आश्रम - यथासंख्यम् - क्रमाने - असृजत् - उत्पन्न करता झाला ॥४१॥
विद्या, दान, तप आणि सत्य हे धर्माचे चार पाय आणि आचरणासह चार आश्रमसुद्धा याच क्रमाने प्रगट झाले. (४१)


सावित्रं प्राजापत्यं च ब्राह्मं चाथ बृहत्तथा ।
वार्ता सञ्चयशालीन शिलोञ्छ इति वै गृहे ॥ ४२ ॥
सावित्र नी प्रजापत्या चार ब्राह्मनी बृहत् ।
ब्रह्मचार्यास या वृत्ती वार्ता संचय शालिन ॥
शीलोंछ चारि या वृत्ती गृहस्थ धर्म तो तसा ॥ ४२ ॥

सावित्रम् - सावित्री - च - आणि - प्राजापत्यम् - प्राजापत्य - च - आणि - ब्राह्मम् - ब्राह्म - अथ - आणि - बृहत् - बृहत् - इति चतुर्धा ब्रह्मचर्यम् - याप्रमाणे चार प्रकारचे ब्रह्मचर्य - वार्तासंचयशालीनशिलोञ्‌छः - वार्ता, संचय, शालीन व शिलोञ्‌छ - इति - अशी - गृहे - घरात - स्थितानां वृत्तयः सन्ति - राहणार्‍यांच्या उपजीविकेची साधने आहेत ॥४२॥
सावित्र, प्राजापत्य, ब्राह्म, आणि बृहत् या चार वृत्ती ब्रह्मचार्‍याच्या आहेत. तसेच वार्ता, संचय, शालीन, आणि शिलोञ्छ या चार वृत्ती गृहस्थाश्रमाच्या आहेत. (४२)


वैखानसा वालखिल्यौ दुम्बराः फेनपा वने ।
न्यासे कुटीचकः पूर्वं बह्वोदो हंसनिष्क्रियौ ॥ ४३ ॥
वैखानस वालखित्य औदुंबर नि फेनप ।
वर्णिले भेद हे चार वानप्रस्थास युक्त ते ।
कुटिचक् बहूद्रको हंस आणिक निश्क्रिय ।
संन्यासी भेद हे चारी मुखांनी चार वर्णिले ॥ ४३ ॥

वैखानसाः - वैखानस - वालखिल्यौदुम्बुराः - वालखिल्य व औदुम्बर - फेनपाः - फेनप - इति - असे - वने - अरण्यात - स्थितानां चत्वारः भेदाः सन्ति - असे चार भेद आहेत ॥४३॥
याच प्रकारे वृत्तिभेदाने वैखानस, वालखिल्य, औदुंबर, आणि फेनप हे चार भेद वानप्रस्थाश्रमाचे आणि कुटीचक, बहूदक, हंस, आणि निष्क्रिय(परमहंस) हे चार भेद संन्याशांचे आहेत. (४३)


आन्वीक्षिकी त्रयी वार्ता दण्डनीतिस्तथैव च ।
एवं व्याहृतयश्चासन् प्रणवो ह्यस्य दह्रतः ॥ ४४ ॥
अन्विक्षकी त्रयी वार्ता दंडनीती तशा परी ।
व्याहृती चारही तैशा ओंकार हॄदयातुनी ॥ ४४ ॥

आन्वीक्षिकी - आत्मज्ञान - त्रयी - ऋग्, यजु आणि साम हे तीन वेद - वार्ता - शेतकी आदिकरून निर्वाहाची साधने - च - आणि - तथा एव - त्याप्रमाणेच - दण्डनीतिः - राजनीति - एवम् - याप्रमाणे - व्याहृतयः - भूः, भुवः, स्वः आणि भूर्भुवः स्वः हे मंत्रोच्चार - पूर्वादिभ्यः क्रमात् आसन् - पूर्वादि मुखातून क्रमाने उत्पन्न झाले - च - आणि - अस्य - ह्या ब्रह्मदेवाच्या - दहृतः - हृदयापासून - प्रणवः हि - ओम्‌कार - आसीत् - उत्पन्न झाला ॥४४॥
याच क्रमाने आन्वीक्षिकी, त्रयी, वार्ता, आणि दंडनीती या चार विद्या आणि चार व्याहृतीसुद्धा ब्रह्मदेवाच्या चार मुखांपासूनच उत्पन्न झाल्या. तसेच त्यांच्या हृदयाकाशातून ॐकार प्रगट झाला. (४४)


तस्योष्णिगासील्लोमभ्यो गायत्री च त्वचो विभोः ।
त्रिष्टुम्मांसात्स्नुतोऽनुष्टुब् जगत्यस्थ्नः प्रजापतेः ॥ ४५ ॥
मज्जायाः पङ्‌क्तिरुत्पन्ना बृहती प्राणतोऽभवत् ।
स्पर्शस्तस्याभवज्जीवः स्वरो देह उदाहृत ॥ ४६ ॥
छंद ते उष्णिक रोमे गायत्री तो त्वचेतुनी
मासाने त्रिष्टुप् छंद अनुष्टुप् स्नायुस्थान ते ॥ ४५ ॥
अस्थीने जगती आणि मज्जेने पंक्ति जाहला ।
प्राणाने बृहती छंद असे अंगासि जन्मले ॥
स्पर्शवर्ण तया प्राण देह तो स्वरवर्णची ॥ ४६ ॥

तस्य - त्या ब्रह्मदेवाच्या - लोमभ्यः - केसांपासून - उष्णिक् - उष्णिक् छन्द - आसीत् - उत्पन्न झाला - विभोः - व्यापक अशा ब्रह्मदेवाच्या - त्वचः - त्वचेपासून - गायत्री - गायत्री छन्द - मांसात् - मासापासून - त्रिष्टुप् - त्रिष्टुप् छन्द - स्नुतः - स्नायूपासून - अनुष्टुप् - अनुष्टुप् छंद - च - आणि - प्रजापतेः - ब्रह्मदेवाच्या - अस्थ्नः - अस्थीपासून - जगती - जगती छन्द - आसन् - झाले ॥४५॥ मज्जायाः - मज्जेपासून - पङ्‌क्‍ति - पङ्‌क्‍ति छंद - उत्पन्ना - उत्पन्न झाला - प्राणतः - प्राणापासून - बृहती - बृहती छंद - अभवत् - उत्पन्न झाला - स्पर्शः - क पासून म पर्यंत जे वर्ण ते - तस्य - त्या ब्रह्मदेवाचा - जीवः - जीव - अभवत् - झाले - स्वरः - अ, इ, उ,ऋ इत्यादी स्वर - देहः - देह - उदाहृतः - म्हटले आहे ॥४६॥
त्यांच्या रोमांपासून उष्णिक्, त्वचेपासून गायत्री, मांसापासून त्रिष्टुप्, स्नायूंपासून अनुष्टुप्, हाडांपासून जगती, मज्जांपासून पंक्ती आणि प्राणांपासून बृहती असे छंद निर्माण झाले. याचप्रमाणे त्यांचा जीव स्पर्शवर्ण(क वर्गादी पाच वर्ग) आणि देह स्वरवर्ण(अकारादी) म्हणविला गेला. (४५-४६)


ऊष्माणमिन्द्रियाण्याहुः अन्तःस्था बलमात्मनः ।
स्वराः सप्त विहारेण भवन्ति स्म प्रजापतेः ॥ ४७ ॥
इंद्रियी ऊष्मवर्णो नी अंतस्थ बलस्थान ते ।
त्यांच्या क्रिडे निषदोनी ऋषभ गंधार् षड्ज नी ।
मध्यमो धैवतो पंचम् हे सात स्वर जन्मले ॥ ४७ ॥

ऊष्माणम् - श, ष, स, ह या ऊष्म वर्णांना - आत्मनः - ब्रह्मदेवाची - इन्द्रियाणि - इन्द्रिये - आहुः - म्हणतात - अन्तस्थाः - य, व, र, ल हे अंतस्थ वर्ण - बलम् - बल - स्युः - होत - प्रजापतेः - ब्रह्मदेवाच्या - विहारेण - क्रीडेपासून - सप्त स्वराः - षड्‌जादि सात स्वर - भवन्ति स्म - उत्पन्न झाले ॥४७॥
त्यांच्या इंद्रियांना ऊष्मवर्ण (श,ष,स,ह) आणि शक्तीला अंतःस्थ (य,र,ल,व) म्हणतात. तसेच त्यांच्या क्रीडांपासून निषाद, ऋषभ, गांधार, षड्ज, मध्यम, धैवत, आणि पंचम हे सात स्वर उत्पन्न झाले. (४७)


शब्दब्रह्मात्मनस्तस्य व्यक्ताव्यक्तात्मनः परः ।
ब्रह्मावभाति विततो नानाशक्त्युपबृंहितः ॥ ४८ ॥
शब्दब्रह्मस्वरूपी तो ब्रह्मजीवैखीतुनी ।
व्यक्त होवोनि ओंकारी अव्यक्त होतसे सदा ।
परिपूर्ण बहुशक्तींनी इंद्रादी त्याहुनी पुढे ।
प्रगटे बहुशक्तींनी इंद्रादी भासरूप ते ॥ ४८ ॥

शब्दब्रह्मात्मनः - शब्द ब्रह्म आहे शरीर ज्याचे अशा - व्यक्‍ताव्यक्‍तात्मनः - व व्यक्‍त व अव्यक्‍त आहे स्वरूप ज्याचे अशा - तस्य - त्या ब्रह्मदेवाला - परः - परमेश्वर - ब्रह्म - ब्रह्मरूपाने अविकृत असा - विततः - सर्वव्यापी असा - च - आणि - नानाशक्‍त्युपबृंहितः - अनेक शक्‍तींनी युक्‍त असा - अवभाति - दिसतो ॥४८॥
ब्रह्मदेव शब्दब्रह्मस्वरूप आहेत. ते वाणीरूपाने व्यक्त आणि ॐकार रूपाने अव्यक्त आहेत. तसेच त्यांच्या पलीकडे जे सर्वत्र परिपूर्ण असे परब्रह्म आहे, तेच अनेक प्रकारच्या शक्तींनी विकसित हो‌ऊन इंद्र आदींच्या रूपाने भासत आहे. (४८)


ततोऽपरामुपादाय स सर्गाय मनो दधे ।
ऋषीणां भूरिवीर्याणां अपि सर्गमविस्तृतम् ॥ ४९ ॥
ज्ञात्वा तद्धृदये भूयः चिन्तयामास कौरव ।
अहो अद्‍भुतमेतन्मे व्यापृतस्यापि नित्यदा ॥ ५० ॥
न ह्येधन्ते प्रजा नूनं दैवमत्र विघातकम् ।
एवं युक्तकृतस्तस्य दैवं चावेक्षतस्तदा ॥ ५१ ॥
कस्य रूपमभूद् द्वेधा यत्कायमभिचक्षते ।
ताभ्यां रूपविभागाभ्यां मिथुनं समपद्यत ॥ ५२ ॥
यस्तु तत्र पुमान्सोऽभूत् मनुः स्वायम्भुवः स्वराट् ।
स्त्री याऽऽसीच्छतरूपाख्या महिष्यस्य महात्मनः ॥ ५३ ॥
अंधार कामरूपाची ब्रह्म्याने तनु त्यागुनी ।
दुसरा घेतला देह विश्व विस्तारि लागला ॥ ४९ ॥
मरिच्यादि ॠषी यांनी प्रयत्‍न करुनी सदा ।
न वाढे सृष्टि संतान विचारा लागले मनीं ॥ ५० ॥
अहो आश्चर्य हे मोठे श्रमानेही निरंतर ।
दैवाचे आडवे विघ्न न वाढे मानवी प्रजा ॥ ५१ ॥
यथोचित क्रियाकर्मी ब्रह्मा तो चिंतितो मनीं ।
देहाचे भाग दो झाले क ब्रह्म नाम त्याजला ।
विभक्ती काय तो देह तै स्त्री पुरुष जन्मले ॥ ५२ ॥
स्वायंभूव मनू सम्राट् महाराणी शतोरुपा ।
नाम हे त्याच दोघांचे ब्रह्माचे पुत्र पुत्रि ते ॥ ५३ ॥

ततः - मग - अपरां - दुसरे - तनूम् - शरीर - उपादाय - धारण करून - सः - तो ब्रह्मदेव - सर्गाय - सृष्टि करण्यासाठी - मनो दधे - मन लाविता झाला - भूरिवीर्याणां ऋषीणाम् - महासामर्थ्यवान् अशा ऋषींची - अविस्तृतम् सर्गम् - अगदी अल्प अशी उत्पत्ति - तत् - तेव्हा - ज्ञात्वा - जाणून - कौरव - हे विदुरा - सः - तो ब्रह्मदेव - हृदये - मनात - भूयःचिंतयामास - पुनः विचार करू लागला ॥४९॥ अहो - अहो - एतत् - हे - अद्‌भुतम् - आश्चर्य - अस्ति - आहे - नित्यदा - निरंतर - मे - मी - व्यापृतस्य अपि - सृष्टिकर्मात लागलो असताहि - प्रजाः - प्रजा - न एधन्ते हि - ज्या अर्थी वाढत नाहीत - नूनम् - खरोखर - अत्र - येथे - दैवम् - प्रारब्ध - विघातकम् - कार्याचा बिघाड करणारे - अस्ति - आहे ॥५०॥ एवम् - याप्रमाणे - तस्य - तो ब्रह्मदेव - युक्‍तकृतः - यथायोग्य काम करीत असता - च - आणि - दैवम् - प्रारब्धाचा - अवेक्षतः - विचार करीत असता - तदा - त्या वेळी - कस्य - ब्रह्मदेवाचे - रूपम् - शरीर - द्वेधा - दुभंगलेले - अभूत् - झाले - यम् - ज्याला - कायम् - काय असे - अभिचक्षते - म्हणतात ॥५१॥ ताभ्याम् - त्या - रूपविभागाभ्याम् - शरीराच्या दोन विभागांनी - मिथुनम् - स्त्री-पुरुषांचा जोडा - समपद्यत - उत्पन्न झाला - तत्र - त्या दोहोमध्ये - यः - जो - पुमान् - पुरुष - सः - तो - तु - तर - स्वायभ्भुवः - ब्रह्मदेवाचा पुत्र - मनुः - मनु - स्वराट् - जगाचा राजा - अभूत - झाला - या - जी - स्त्री - स्त्री - आसीत् - होती - सा - ती - महात्मनः अस्य - महात्म्या मनूची - शतरूपाख्या - शतरूपी नावाची - महिषी - पट्टराणी - अभवत् - झाली ॥५२-५३॥
विदुरा, धुके बनलेले आपले पहिले कामासक्त शरीर सोडल्यानंतर ब्रह्मदेवांनी दुसरे शरीर धारण करून विश्वविस्तार करण्याचा विचार केला.मरीची आदी महान् शक्तिशाली ऋषींकडूनसुद्धा विस्तार जास्त झाला नाही, हे पाहून ते मनोमन पुन्हा चिंता करू लागले की, "अहो ! मोठे आश्चर्य आहे ! माझ्या सतत प्रयत्‍न करण्यानेही प्रजेची वृद्धी होत नाही. यात दैव काहीतरी विघ्न आणीत आहे. असे वाटते." योग्य कर्म करणारे ब्रह्मदेव जेव्हा अशा प्रकारे दैवाविषयी विचार करीत होते, त्यावेळी अकस्मात त्यांच्या शरीराचे दोन भाग झाले. ‘क’ हे ब्रह्मदेवाचे नाव आहे. ते विभक्त झाल्याकारणाने शरीराला काय म्हणतात. त्या दोन विभागांतून एक स्त्री-पुरुषांची जोडी प्रगट झाली. त्यांपैकी जो पुरुष होता, तो सार्वभौ‌म सम्राट् स्वायंभुव मनू झाला आणि जी स्त्री होती, ती त्या महात्म्याची महाराणी शतरूपा झाली. (४९-५३)


तदा मिथुनधर्मेण प्रजा ह्येधाम्बभूविरे ।
स चापि शतरूपायां पञ्चापत्यान्यजीजनत् ॥ ५४ ॥
तेंव्हा पासोनि संभोगीधर्माने वाढली प्रजा ।
स्वायंभुवेची पाचांना जन्मासि घातल तदा ॥ ५४ ॥

तदा हि - त्यावेळी खरोखर - मिथुनधर्मेण - मैथुनाने - प्रजाः - प्रजा - एधाम्बभूविरे - वाढू लागल्या - च - आणि - सः अपि - तो मनुसुद्धा - शतरूपायाम् - शतरुपा स्त्रीच्या ठिकाणी - पञ्च - पाच - अपत्यानि - अपत्ये - अजीजनत् - उत्पन्न करता झाला ॥५४॥
तेव्हापासून मैथुनाने प्रजेची वाढ होऊ लागली. मनूने शतरूपेपासून पाच संताने उत्पन्न केली. (५४)


प्रियव्रतोत्तानपादौ तिस्रः कन्याश्च भारत ।
आकूतिर्देवहूतिश्च प्रसूतिरिति सत्तम ॥ ५५ ॥
प्रियव्रतोत्तानपाद जाहले पुत्र दोन हे ।
देहहूती नि आकूती प्रसूती तीन या मुली ॥ ५४ ॥

सत्तम भारत - हे साधुश्रेष्ठ भरतकुलोत्पन्ना विदुरा - प्रियव्रतोत्तानपादौ - प्रियव्रत व उत्तानपाद - च - आणि - आकूतिः - आकूति - देवहूतिः - देवहूति - च - आणि - प्रसूतिः - प्रसूति - इति - अशा - तिस्त्रः - तीन - कन्याः - कन्या ॥५५॥
विदुरा, त्यात प्रियव्रत आणि उत्तानपाद असे दोन पुत्र होते आणि आकूती, देवहूती व प्रसूती अशा तीन कन्या होत्या. (५५)


आकूतिं रुचये प्रादात् कर्दमाय तु मध्यमाम् ।
दक्षायादात्प्रसूतिं च यत आपूरितं जगत् ॥ ५६ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
आकुती रुचि या रायें देवहूतीस कर्दमें ।
प्रसुती वरिली दक्षे प्रजेने भरल जग ॥ ५६ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवत महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥
॥ बारावा अध्याय हा ॥ ३ ॥ १२ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

सः - तो स्वायंभुव मनु - आकूतिम - आकूति - रुचये - रुचि ऋषीला - तु - त्याचप्रमाणे - कर्दमाय - कर्दम ऋषीला - मध्यमाम् - मधली देवहूति - च - आणि - दक्षाय - दक्षप्रजापतीला - प्रसूतिम् - प्रसूती - प्रादात् - देता झाला - यतः - ज्यांच्यामुळे - जगत् - जग - आपूरितम् - व्यापले गेले ॥५६॥
मनूंनी आकूती रुचीला, देवहूती कर्दमाला आणि प्रसूती दक्षाला दिली. यांच्या संततीने सर्व जग भरून गेले. (५६)


स्कंध तिसरा - अध्याय बारावा समाप्त

GO TOP