|
श्रीमद् भागवत पुराण
मन्वंतरादि कालपरिमाणनिरूपणं मन्वन्तरादी कालविभागाचे वर्णन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
मैत्रेय उवाच -
चरमः सद्विशेषाणां अनेकोऽसंयुतः सदा । परमाणुः स विज्ञेयो नृणामैक्यभ्रमो यतः ॥ १ ॥
मैत्रेयजी म्हणाले - ( अनुष्टुप् ) पृथ्व्यादि कार्य सूक्ष्मांशू ते न भागती । परमाणू न संयोगी संयोगे भ्रम तो पडे ॥ १ ॥
सद्विशेषाणाम् - व्यक्त पदार्थांच्या अंशांचा - चरमः - शेवटचा भाग - अनेकः - एकमेकापासून पृथक असलेला - असंयुक्तः - समुदायरूपाला प्राप्त न झालेला - सदा - नेहमी - अस्ति - असतो - सः - तो - परमाणुः - परमाणु - विज्ञेयः - समजावा - संयुतेभ्यः - एकत्र झालेल्या अशा - यतः - ज्यांच्यामुळे - नृणाम् - मनुष्यांना - ऐक्यभ्रमः - एकत्रीकरणामुळे मूर्तरूपास आल्याचा भास - भवति - होतो ॥१॥
मैत्रेय म्हणाले - पृथ्वी आदी कार्यवर्गाचा जो सूक्ष्मतम अंश आहे, ज्याचे आणखी विभाग होऊ शकत नाहीत, तसेच जो कार्यरूपाला प्राप्त झालेला नाही आणि ज्याचा इतर परमाणूंच्या बरोबरही संयोग झालेला नाही, त्याला ‘परमाणू’ म्हणतात. असे अनेक परमाणू एकत्र आल्यानंतर मनुष्याला भ्रमाने त्याच्या समुदायाच्या रूपाला ‘अवयवी’ अशी प्रचीती येते. (१)
सत एव पदार्थस्य स्वरूपावस्थितस्य यत् ।
कैवल्यं परममहान् अविशेषो निरन्तरः ॥ २ ॥
परमाणू सूक्ष्मांशाचे कार्य ते पृथिवी महत् । न भान कालमात्राचे घटकाशी जसा भ्रम ॥ २ ॥
स्वरूपावस्थितस्य - मूळ रूपातच असलेल्या - सतः पदार्थस्य एव - कार्यस्वरूप पदार्थाचेच - यत् - जे - कैवल्यम् - केवलरूप - सः - तो - अविशेषः - विशिष्ट धर्म ज्यात नाही असा - निरन्तरः - भेदरहित असा - परममहान् - फार मोठा - विज्ञेयः - समजावा ॥२॥
हा परमाणू ज्याचा सूक्ष्मतम अंश आहे, त्या आपल्या सामान्य स्वरूपात स्थित असलेल्या पृथ्वी इत्यादी कार्यांच्या समुदायाला ‘परम महान’ असे नाव आहे. यावेळी त्यात प्रलयादी अवस्थांची स्फूर्ती होत नाही. नवीन-जुने अशा कालभेदाचे ज्ञान होत नाही आणि घटपटादी वस्तुभेदाचीसुद्धा कल्पना असत नाही. (२)
एवं कालोऽप्यनुमितः सौक्ष्म्ये स्थौल्ये च सत्तम ।
संस्थानभुक्त्या भगवान् अव्यक्तो व्यक्तभुग्विभुः ॥ ३ ॥
अवस्थी परमाणूंच्या व्याप्त होवोनि व्यक्त त्या । पदार्था भोगतो सृष्टी काळाला जीव जाणतो ॥ स्थूळ नी सूक्ष्म रूपाचा अंदाज लागतो तया ॥ ३ ॥
सत्तम - हे साधुश्रेष्ठ विदुरा - भगवान् - परमेश्वराची शक्तिरूप असा - विभुः - उत्पत्ति इत्यादिकांमध्ये दक्ष असा - अव्यक्तः - व अस्पष्ट असा - व्यक्तभुक् - व्यक्त सृष्टीला व्यापून राहणारा असा - कालः अपि - कालसुद्धा - एवम् - परमाणूप्रमाणे - संस्थानभुक्त्या - परमाणु, मध्यम आणि परम महान् अशा सर्व अवस्थांना व्यापून असल्यामुळे - सौक्ष्म्ये - सूक्ष्म स्वरूपाविषयी - च - आणि - स्थौल्ये - स्थूल स्वरूपाविषयी - अनुमतिः - तर्क केलेला आहे ॥३॥
हे साधुश्रेष्ठ विदुरा, अशा प्रकारे वस्तूच्या सूक्ष्मतम आणि महत्तम स्वरूपाचा विचार झाला. याच्याच साधर्म्याने परमाणू इत्यादी अवस्थांत व्याप्त होऊन व्यक्त पदार्थांना भोगणार्या सृष्टी इत्यादीमध्ये समर्थ, अव्यक्तस्वरूप अशा भगवान कालाची सुद्धा सूक्ष्मता आणि स्थूलता यांचे अनुमान केले जाऊ शकते. (३)
स कालः परमाणुर्वै यो भुङ्क्ते परमाणुताम् ।
सतोऽविशेषभुग्यस्तु स कालः परमो महान् ॥ ४ ॥
परमाणू स्थितीकाल प्रपंची अति तो लघु । सृष्टिच्या पासुनी भोगी अवस्था सर्व तो महान ॥ ४ ॥
यः - जो - परमाणुताम् - परमाणुस्वरुपाला - भुङ्क्ते - उपभोगितो - सः वै कालः - तो काल खरोखर - परमाणुः - परमानु - तु - परंतु - यः - जो - ततः - परमाणुस्वरूपाहून - अविशेषभुक् - सामान्य कार्यमात्राचा उपभोग घेणारा - आस्ते - असतो - सः कालः - तो काल - परमः - फार - महान् - मोठा होय ॥४॥
जो काल प्रपंचाच्या परमाणूसारख्या सूक्ष्म अवस्थेत व्यापून असतो, तो अत्यंत सूक्ष्म आहे आणि जो सृष्टीपासून प्रलयापर्यंत त्याच्या सर्व अवस्था भोगतो, तो परम महान आहे. (४)
अणुर्द्वौ परमाणू स्यात् त्रसरेणुस्त्रयः स्मृतः ।
जालार्करश्म्यवगतः खमेवानुपतन्नगात् ॥ ५ ॥
दोन त्या परमाणूंचा अणू नी अणुच्या त्रये । त्रसरेणु झरोक्यात पाहता चमके दिसे ॥ ५ ॥
द्वौ - दोन - परमाणू - परमाणु - अणुः - अणु - स्यात् - होय - त्रयः - तीन अणु - त्रसरेणुः - त्रसरेणु - स्मृतः - म्हणतात - यः - जो त्रसरेणु - जालार्करश्म्यवगतः - खिडकीतील सूर्याच्या किरणात दिसणारा असा - खम् एव - आकाशातच - अनुपतन् - उडत - अगात् - जातो ॥५॥
दोन परमाणूंचा एक अणू होतो आणि तीन अणू मिळून एक त्रसरेणू होतो. (म्हणजे) जो झरोक्यातून आलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात आकाशात उडताना दिसतो. (५)
त्रसरेणुत्रिकं भुङ्क्ते यः कालः स त्रुटिः स्मृतः ।
शतभागस्तु वेधः स्यात् तैस्त्रिभिस्तु लवः स्मृतः ॥ ६ ॥
त्यातुनी कीरा जाण्या तृत्यांश समयो त्रुटी । त्रुटीच्या शंभरी वेध वेधत्रयचि तो लव ॥ ६ ॥
यः - जो - त्रसरेणुत्रिक्रम् - तीन त्रसरेणूंना - भुङ्क्ते - व्यापितो - सः कालः - तो काल - त्रुटिः - त्रुटि - स्मृतः - म्हणतात - तु - परंतु - शतभागः - शंभर आहेत त्रुटिरूप अवयव ज्याचे असा - वेधः - वेध - स्यात् - होय - तु - परंतु - तैः त्रिभिः - त्या तीन वेधांनी - लवः - लव - स्मृतः - म्हणतात ॥६॥
असे तीन त्रसरेणू ओलांडून जाण्याला सूर्याला जेवढा वेळ लागतो, त्याला ‘त्रुटी’ म्हणतात. याच्या शंभरपट काळाला ‘वेध’ म्हणतात आणि तीन वेधांचा एक ‘लव’ होतो. (६)
निमेषस्त्रिलवो ज्ञेय आम्नातस्ते त्रयः क्षणः ।
क्षणान् पञ्च विदुः काष्ठां लघु ता दश पञ्च च ॥ ७ ॥
त्रिलवाचा निमिषो नी त्रिनिमेषेचि तो क्षण । क्षणी पाचात ती काष्ठा पंधरा गुणि तो लघु॥ ७ ॥
त्रिलवः - तीन आहेत लवा ज्यामध्ये असा - निमेषः - निमेष - ज्ञेयः - समजावा - ते त्रयः - ते तीन निमेष म्हणजे - क्षणः - क्षण - आम्नातः - म्हणतात - पञ्च - पाच - क्षणान् - क्षणांना - काष्ठां - काष्ठा - विदुः - समजतात - दश - दहा - च - आणि - पञ्च - पाच - ताः - काष्ठा म्हणजे - लघु - लघु - भवति - होतो ॥७॥
तीन लवांचा एक ‘निमिष’, तीन निमिषांचा एक ‘क्षण’, पाच क्षणांची एक ‘काष्ठा’ आणि पंधरा काष्ठांचा एक ‘लघू’ होतो. (७)
लघूनि वै समाम्नाता दश पञ्च च नाडिका ।
ते द्वे मुहूर्तः प्रहरः षड्यामः सप्त वा नृणाम् ॥ ८ ॥
पंधरा लघुच दंड द्विदंडाचा मुहुर्त तो । सप्त प्रहर तो दंड यामही त्यास बोलिजे ॥ याम हा चवथा भाग दिन वा रात्रिचा असे ॥ ८ ॥
दश - दहा - च - आणि - पञ्च - पाच - लघूनि - लघू म्हणजे - नाडिका - घटिका - आम्नाता वै - खरोखर म्हणतात - ते द्वे - त्या दोन घटिका म्हणजे - मुहूर्तः - मुहूर्त - भवति - होतो - षट् - सहा - वा - किंवा - सप्त - सात घटिका - नृणाम् - मनुष्यांच्या - प्रहरः - प्रहर - भवति - होतो - सः एव - तोच - यामः - याम होय ॥८॥
पंधरा लघूंना एक ‘नाडिका’ म्हणतात. दोन नाडिकांचा एक ‘मुहूर्त’ आणि सहा किंवा सात नाडिकांचा एक ‘प्रहर’ होतो.यालाच ‘याम’ म्हणतात. याम म्हणजे माणसाच्या दिवसाचा किंवा रात्रीचा चौथा भाग होय. (८)
द्वादशार्धपलोन्मानं चतुर्भिश्चतुरङ्गुलैः ।
स्वर्णमाषैः कृतच्छिद्रं यावत् प्रस्थजलप्लुतम् ॥ ९ ॥
सहा पळेभर तांबे त्याचे पात्र करोनिया । सुवर्ण माष छिद्राने जळाचा ओघ नाडिका ॥ ९ ॥
द्वादशार्धपलोन्मानम् - सहा पले वजनाचे पात्र - चतुर्भिः - चार - स्वर्णमाषैः - मासे सुवर्णाने - चतिरङ्गुलैः - तयार केलेल्या चार अंगुले लांब अशा तारेने - कृतच्छिद्रम् - केले आहे छिद्र ज्यामध्ये असे - यावत्प्रस्थजलप्लुतम् - प्रस्थवजन पाण्याने बुडणारे असे - भवति - असते - तत् नाडिका उच्यते - त्याला घटिका म्हणतात ॥९॥
सहा पल तांब्याचे एक असे भांडे बनवावे की, ज्यामध्ये एक शेर पाणी मावेल आणि चार मासे सोन्याची चार बोटे लांबीची सळी बनवून तिने त्या भांडयाच्या बुडाला एक छिद्र पाडून ते भांडे पाण्यात सोडावे. जितक्या वेळात एक शेर पाणी त्या भांडयात भरले जाईल, तेवढया वेळेला एक ‘नाडिका’ म्हणतात. (९)
यामाश्चत्वारश्चत्वारो मर्त्यानामहनी उभे ।
पक्षः पञ्चदशाहानि शुक्लः कृष्णश्च मानद ॥ १० ॥
चार प्रहर रात्रीचे दिवसाचे तसेच ते । पंधरादिन रात्रीचे पक्ष शुक्ल कृष्ण हे ॥ १० ॥
मानद - हे मान देणार्या विदुरा - चत्वारः - चार - च - आणि - चत्वारः - चार - यामाः - प्रहर - मर्त्यानाम् - मनुष्यांचे - उभे - दोन - अहनी - रात्र आणि दिवस - स्तः - होतात - पञ्चदश - पंधरा - अहानि - दिवसांचा - पक्षः - पक्ष - भवति - होतो - सः - तो - शुक्लः - शुक्ल - च - आणि - कृष्णः - कृष्ण ॥१०॥
विदुरा, मनुष्याचे चार-चार प्रहराचे ‘दिवस’ आणि ‘रात्र’ होतात आणि पंधरा दिवसांचा एक पंधरवडा होतो, जो शुक्ल आणि कृष्ण या नावांनी दोन प्रकारचा मानला गेला आहे. (१०)
तयोः समुच्चयो मासः पितॄणां तदहर्निशम् ।
द्वौ तावृतुः षडयनं दक्षिणं चोत्तरं दिवि ॥ ११ ॥ अयने चाहनी प्राहुः वत्सरो द्वादश स्मृतः । संवत्सरशतं नॄणां परमायुर्निरूपितम् ॥ १२ ॥
द्वीपक्षी मास तो एक पित्रांची दिनरात्र ती । द्वैमासी ऋतो तो एक अयनी मास ते सहा ॥ अयनी भेद ते दोन उत्तरायण दक्षिण ॥ ११ ॥ दोघांच्या दिनरात्रीने देवांचा दिन एक तो । वर्ष हे द्वादशो मासी मानवा आयु शंभरी ॥ १२ ॥
तयो - त्या दोन पक्षांचा - समुच्चयः - समूह म्हणजे - मासः - महिना - तत् - तो महिना - पितृणाम् - पितरांचे - अहर्निशम् - अहोरात्र - भवति - होते - तौ द्वौ - दोन महिने म्हणजे - ऋतुः - ऋतु - भवति - होतो - षट् - सहा महिने म्हणजे - अयनम् - अयन - भवति - होते - तत् - ते - दक्षिणम् - दक्षिण - च - आणि - उत्तरम् - उत्तर - च - आणि - अयने - दक्षिणायन व उत्तरायण यांना - दिवि - स्वर्गातील - अहनी - दिवस रात्र - प्राहुः - म्हणतात - द्वादश - बारा महिने म्हणजे - वत्सरः - संवत्सर - स्मृतः - म्हणतात - संवत्सरशतम् - शंभर वर्षे - नृणाम् - मनुष्यांचे - परम् - अधिकांत अधिक - आयुः - आयुष्य - निरूपितम् - सांगितले आहे ॥११-१२॥
या दोन पक्षांचा मिळून एक महिना होतो, जो पितरांचा एक दिवस-रात्र असते. दोन महिन्यांचा एक ऋतू आणि सहा महिन्यांचे एक ‘अयन’ होते. दक्षिणायन आणि उत्तरायण अशी दोन अयने आहेत. (११) ही दोन्ही अयने मिळून देवतांची एक दिवस-रात्र होते. मनुष्यलोकात बारा महिन्यांना एक वर्ष असे म्हणतात. अशी शंभर वर्षे हे मनुष्याचे अधिकतम आयुष्य सांगितले गेले आहे. (१२)
ग्रहर्क्षताराचक्रस्थः परमाण्वादिना जगत् ।
संवत्सरावसानेन पर्येत्यनिमिषो विभुः ॥ १३ ॥
चंद्रादि ग्रह नक्षत्रे तारांगणहि सर्व हे । कालस्वरूप सूर्याने बारा राशीत फीरती ॥ १३ ॥
ग्रहर्क्षताराचक्रस्थः - ग्रह, नक्षत्रे व तारका यांच्या चक्रावर राहणारा असा - अनिमिषः - नित्य जागृत असणारा - विभुः - सर्वसाक्षी भगवान् - परमाण्वादिना - परमाणु आहे अल्पतम मान ज्याचे - संवत्सरावसानेन - व संवत्सर आहे महत्तम मान ज्याचे अशा कालचक्राने - जगत् - पृथ्वीला - पर्येति - प्रदक्षिणा करतो ॥१३॥
चंद्र इत्यादी ग्रह, अश्विनी इत्यादी नक्षत्रे आणि सर्व तारामंडलांचा अधिष्ठाता कालस्वरूप भगवान सूर्य परमाणूपासून संवत्सरापर्यंत काळात बारा राशीरूप अशा संपूर्ण भुवनाला प्रदक्षिणा करीत असतो. (१३)
संवत्सरः परिवत्सर इडावत्सर एव च ।
अनुवत्सरो वत्सरश्च विदुरैवं प्रभाष्यते ॥ १४ ॥
सूर्य बृहस्पती चंद्र सवनी भेद मास जे । संवत् परि इडा वर्ष अनुवत्सर वत्सर ॥ या परी रूप वर्षाचे नावही त्या तसे मिळे ॥ १४ ॥
विदुर - हे विदुरा - सः एव - तोच - संवत्सरः - संवत्सर - परिवत्सरः - परिवत्सर - इडावत्सरः - इडावत्सर - अनुवत्सरः - अनुवत्सर - च - आणि - वत्सरः - वत्सर - एवम् - याप्रमाणे - प्रभाष्यते - म्हटला जातो ॥१४॥
विदुरा ! सूर्य, बृहस्पती, सवन, चंद्र आणि नक्षत्रासंबंधी महिन्यांच्या भेदाने या वर्षांनाच संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर आणि वत्सर असे म्हटले जाते. (१४)
यः सृज्यशक्तिमुरुधोच्छ्वसयन् स्वशक्त्या ।
पुंसोऽभ्रमाय दिवि धावति भूतभेदः । कालाख्यया गुणमयं क्रतुभिर्वितन्वन् । तस्मै बलिं हरत वत्सरपञ्चकाय ॥ १५ ॥
(वसंततिलका) तेजस्वरूप सविता बिज अंकुराला कालादि शक्त गतिने करि कर्म सारे । मोहादि वृत्ति पुरूषी हरि आयु सारी यज्ञादि मंगलमाया फळ तेज देतो ॥ १५ ॥
यः - जो - भूतभेदः - पंचमहाभूतांपैकी एक असा सूर्य - कालाख्यया - काल आहे नाव जिचे अशा - स्वशक्त्या - आपल्या शक्तीने - सृज्यशक्तिम् - उत्पन्न करावयाच्या वस्तूंतील शक्तीला - उरुधा - अनेकप्रकारे - उच्छ्वसयन् - उत्तेजित करणारा - क्रतुभिः - व यज्ञांनी - गुणमयम् - सत्त्वादि गुणांनी युक्त अशा कर्मफलाला - वितन्वन् - विस्तारित - पुंसाम् - पुरुषांचा - अभ्रमाय - मोह निवृत्त करण्याकरिता - दिवि - आकाशात - धावति - धावतो - तस्मै - त्या - वत्सरपंचकाय - पंचसंवत्सरमय स्वरूपाला - बलिम् - पूजा - हरत - अर्पण करा ॥१५॥
अशी पाच प्रकारची वर्षे करणार्या भगवान सूर्याची आपण पूजा करा. हे सूर्यदेव पंचमहाभूतांपैकी तेजाचे स्वरूप आहेत आणि आपल्या कालशक्तीने बीजापासून अंकुर उत्पन्न करणार्या शक्तीला अनेक प्रकारे कार्यान्वित करतात. पुरुषांची मोहनिवृत्ती करण्यासाठी हे त्यांच्या आयुष्याचा क्षय करीत आकाशात भ्रमण करतात. तसेच हेच सकाम पुरुषांना यज्ञ इत्यादी कर्मांपासून प्राप्त होणारी स्वर्ग इत्यादी मंगलमय फले देतात. (१५)
विदुर उवाच -
पितृदेवमनुष्याणां आयुः परमिदं स्मृतम् । परेषां गतिमाचक्ष्व ये स्युः कल्पाद्बहिर्विदः ॥ १६ ॥
विदुरजी म्हणाले - ( अनुष्टुप् ) मनुष्य पितरे देव यांची तो आयु बोलले । त्रिलोक बाह्य जे कोणी तयांची आयु सांगणे ॥ १६ ॥
पितृदेवमनुष्याणाम् - पितर, देव व मनुष्य यांचे - इदम् - हे शंभर वर्षांचे - परम् - मोठे - आयुः - आयुष्य - स्मृतम् - म्हटले आहे - ये - जे - विदः - ज्ञानी - कल्पात् - कल्पापासून - बहिः - बाहेर - स्युः - आहेत - तेषाम् - त्या - परेषाम - श्रेष्ठांचे - गतिम् - आयुष्याचे प्रमाण - आचक्ष्व - सांग ॥१६॥
विदुर म्हणाला - मुनिश्रेष्ठ, आपण देवता, पितर आणि मनुष्यांच्या कमाल आयुष्याचे वर्णन केले. आता जे सनकादी ज्ञानी मुनिजन त्रैलोक्याच्या बाहेर कल्पापेक्षाही अधिक काळापर्यंत राहाणारे आहेत, त्यांच्याही आयुष्याचे वर्णन करावे. (१६)
भगवान् वेद कालस्य गतिं भगवतो ननु ।
विश्वं विचक्षते धीरा योगराद्धेन चक्षुषा ॥ १७ ॥
तुम्ही तो भगवंताची जाणता काळशक्ति ती । ज्ञानी तो पहती योगे दृष्टिने विश्व दिव्य ते ॥ १७ ॥
भगवान् - आपण - भगवतः कालस्य - सर्वश्रेष्ठ कालाची - गतिम् - गति - नूनम् - खरोखर - वेद - जाणता - धीराः - ज्ञानी पुरुष - योगराद्धेन - योगाभ्यासाने प्राप्त झालेल्या - चक्षुषा - ज्ञानाने - विश्वम् - जगाला - विचक्षते - पहातात ॥१७॥
आपण भगवान असल्याने काळाची गती चांगल्या तर्हेने जाणता. कारण ज्ञानीलोक आपल्या योगसिद्ध दिव्य दृष्टीने सारे विश्व पाहातात. (१७)
मैत्रेय उवाच -
कृतं त्रेता द्वापरं च कलिश्चेति चतुर्युगम् । दिव्यैर्द्वादशभिर्वर्षैः सावधानं निरूपितम् ॥ १८ ॥
मैत्रेयजी म्हणाले - सत्य त्रेता नि द्वापार कली सह चतुर्युग । बाराहजारतो वर्षे आयु देवास ती असे ॥ १८ ॥
कृतम् - कृत - त्रेता - त्रेता - द्वापरम् - द्वापर - च - आणि - कलिः - कलि - इति - याप्रमाणे - चतुर्युगम् - चार युगांचा समुदाय - सावधानम् - संध्या व अंश यांसहित - दिव्यैः - देवाच्या - द्वादशभिः - बारा - सहस्त्रैः - हजार - वर्षैः - वर्षांनी - भवति - होते - इति - असे - निरूपितम् - सांगितले आहे ॥१८॥
मैत्रेय म्हणाले - विदुरा, असे सांगितले जाते की, सत्य, त्रेता, द्वापर आणि कली ही चार युगे संध्या आणि संध्यांशांच्यासह देवांच्या बारा हजार वर्षांपर्यंत राहातात. (१८)
चत्वारि त्रीणि द्वे चैकं कृतादिषु यथाक्रमम् ।
सङ्ख्यातानि सहस्राणि द्विगुणानि शतानि च ॥ १९ ॥
क्रमाने चार यूगाचे चौ तीन दोन एक ते । सहस्त्र दिव्य ते वर्ष संध्येचा काळ दुप्पट ॥ १९ ॥
कृतादिषु - कृत, त्रेता इत्यादि युगांमध्ये - यथाक्रमम् - क्रमाने - चत्वारि - चार - त्रीणि - तीन - द्वे - दोन - च - आणि - एकम् - एक - सहस्त्राणि - हजार - च - आणि - द्विगुणानि - दुप्पट - शतानि - शेकडे - संख्यातानि - गणिली आहेत ॥१९॥
या सत्यादी चार युगांची क्रमाने चार, तीन, दोन आणि एक हजार दिव्य वर्षे असतात आणि प्रत्येकाची जितकी सहस्त्र वर्षे असतात, त्याच्या दुप्पट शंभर वर्षे त्यांची संध्या आणि संध्यांशात असतात. (१९)
संध्यांशयोरन्तरेण यः कालः शतसङ्ख्ययोः ।
तमेवाहुर्युगं तज्ज्ञा यत्र धर्मो विधीयते ॥ २० ॥
युगादिकाळ ती संध्या अंती संध्यांश जाणि जे । दोघात कळ तो यूग युगधर्म सुनिश्चित ॥ २० ॥
तज्ज्ञाः - कालाचे प्रमाण जाणणारे लोक - शतसंख्ययोः - शेकडे आहेत संख्या ज्यांची अशा - संध्याशयोः - युगाच्या प्रारंभीचा काल व समाप्तीचा काल यांच्या - अन्तरेण - मध्ये - यः कालः - जो काल - आस्ते - असतो - तम् एव - त्याच कालाला - युगम् - युग - आहुः - म्हणतात - यत्र - ज्यामध्ये - धर्मः - धर्म - विधीयते - सांगितला आहे ॥२०॥
युगांच्या सुरुवातीला संध्या आणि शेवटी संध्यांश असतो. यांची वर्षगणना शेकडयांच्या संख्येने सांगितली गेली आहे. यांच्या मधल्या काळाला कालवेत्ते ‘युग’ म्हणतात. प्रत्येक युगामध्ये एकेका विशेष धर्माचे विधान आहे. (२०)
धर्मश्चतुष्पान्मनुजान् कृते समनुवर्तते ।
स एवान्येष्वधर्मेण व्येति पादेन वर्धता ॥ २१ ॥
धर्म तो सत्य यूगात चौपदी छान चालतो । पुढे तो हीन आचारे एकेक पाय हो क्षिण ॥ २१ ॥
कृतं - कृतयुगामध्ये - चतुष्पाद् - तप आदि चार आहेत चरण ज्याला असा - धर्मः - धर्म - मनुजान् - मनुष्यांमध्ये - समनुवर्तते - असतो - अन्येषु - इतर युगात - पादेन - एका चरणाने - वर्धता - वाढणार्या - अधर्मेण - अधर्माने - सः - तोच चतुष्पाद् धर्म - व्येति - नष्ट होतो ॥२१॥
सत्ययुगातील मनुष्यांमध्ये धर्म आपल्या चार चरणांनी राहातो. नंतर अन्य युगात अधर्म वाढत गेल्याने त्याचा एक-एक चरण कमी होत जातो. (२१)
त्रिलोक्या युगसाहस्रं बहिराब्रह्मणो दिनम् ।
तावत्येव निशा तात यन्निमीलति विश्वसृक् ॥ २२ ॥ निशावसान आरब्धो लोककल्पोऽनुवर्तते । यावद्दिनं भगवतो मनून् भुञ्जंश्चतुर्दश ॥ २३ ॥
त्रिलोका पुढती महर् ब्रह्मलोक सहीत त्यां । तेवढीच तया रात्र तेंव्हा ब्रह्माहि झोपतो ॥ २२ ॥ सरता रात्र ती त्याची कल्पारंभास तो क्रमे । चौदा त्या मनुचा जन्म एकेक कल्प वेळिला ॥ २३ ॥
तात - हे विदुरा - त्रिलोक्याः - त्रैलोक्याच्या - बहिः - बाहेरील - आब्रह्मणः - महर्लोकापासून ब्रह्मलोकासुद्धा सर्वांचा - युगसाहस्त्रम् - हजार युगे - दिनम् - दिवस - भवति - होतो - च - आणि - तावती एव - तेवढीच - निशा - रात्र - भवती - होते - यत् - ज्या रात्रीत - विश्वसृक् - ब्रह्मदेव - निमीलति - शयन करतो - निशावसाने - रात्र संपल्यावर - आरब्धः - आरंभ केलेली - लोककल्पः - सृष्टिरचना - यावत् - जोपर्यंत - भगवतः - ब्रह्मदेवाचा - दिनम् - दिवस - अस्ति तावत् - असतो तोपर्यंत - चतुर्दश - चवदा - मनून् - मनूचा - भुञ्जन् - उपभोग घेणारी अशी - अनुवर्तते - चालू असते ॥२२-२३॥
प्रिय विदुरा, त्रैलोक्याच्या बाहेर महर्लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत येथील एक हजार चतुर्युगाचा एक दिवस असतो आणि तेवढीच मोठी रात्र असते. त्या रात्री जगत्कर्ता ब्रह्मदेव शयन करतो. (२२) त्या रात्रीचा शेवट झाल्यावर या लोकाच्या कल्पाचा प्रारंभ होतो. त्याचा क्रम जोपर्यंत ब्रह्मदेवाचा दिवस असतो, तोपर्यंत चालू असतो. त्या एका कल्पात चौदा मनू होतात. (२३)
स्वं स्वं कालं मनुर्भुङ्क्ते साधिकां ह्येकसप्ततिम् ।
मन्वन्तरेषु मनवः तद् वंश्या ऋषयः सुराः । भवन्ति चैव युगपत् सुरेशाश्चानु ये च तान् ॥ २४ ॥
दोनशे चवर्याऐंशी युगे मनु अधिपिती । सप्तर्षि इंद्रदेवादी सवे मन्वंश राज ते ॥ २४ ॥
मनुः - मनु - स्वम् स्वम् - आपाआपल्या - कालम् - कालाचा - साधिकाम् - किंचित अधिक अशी - एकसप्ततिम् - एकाहत्तर युगे - भुङ्क्ते हि - उपभोग घेतो - मन्वन्तरेषु - मन्वन्तरात - मनवः - मनु - ऋषयः - ऋषि - सुराः - देव - च - आणि - सुरेशाः - इंद्र - च - आणि - तान् अनु - इंद्राचे अनुयायी - ये - जे गंधर्व इत्यादि - ते - ते - युगपत् - एकाच काळी - भवन्ति - होतात - च - आणि - तद्वंश्याः - मनुवंशातील राजे - क्रमेण - क्रमाने - एव - च - भवन्ति - होतात ॥२४॥
प्रत्येक मनू एकाहत्तर चतुर्युगांपेक्षा थोडा अधिक काळापर्यंत आपला अधिकार चालवतो. प्रत्येक मन्वन्तरामध्ये निरनिराळे मनुवंशी राजे, सप्तर्षी, देवगण, इंद्र आणि त्यांचे गंधर्वादी अनुयायी त्यांच्याबरोबरच उत्पन्न होतात. (२४)
एष दैनन्दिनः सर्गो ब्राह्मस्त्रैलोक्यवर्तनः ।
तिर्यङ्नृपितृदेवानां सम्भवो यत्र कर्मभिः ॥ २५ ॥
सारी सृष्टि अशी रोज ब्रह्मा त्रीलोक मांडतो । मनुष्य देवाता पित्रे पक्षादी कर्म भोगिती ॥ २५ ॥
एषः - हा - दैनंदिन - प्रत्येक दिवशी उत्पन्न होणारा असा - ब्राह्मः - ब्रह्मदेवाचा - त्रैलोक्यवर्तनः - त्रैलोक्याला उत्पन्न करणारा - सर्गः - सर्ग - अस्ति - आहे - यत्र - ज्या सर्गात - कर्मभिः - कर्मानी - तीर्यङ्नृपितृदेवानाम् - पशु, पक्षी, मनुष्य, पितर व् देव यांची - संभव - उत्पत्ति - भवति - होते ॥२५॥
ही ब्रह्मदेवाची दैनंदिन सृष्टी आहे; यामध्ये तिन्ही लोकांची रचना होते. त्यामध्ये आपापल्या कर्मानुसार पशु-पक्षी, मनुष्य, पितर आणि देवतांची उत्पत्ती होते. (२५)
मन्वन्तरेषु भगवान् बिभ्रत्सत्त्वं स्वमूर्तिभिः ।
मन्वादिभिरिदं विश्वं अवत्युदितपौरुषः ॥ २६ ॥
सत्वात आश्रया राहे चालू या मनवंतरी । भगवान् मूर्तिच्या द्वारे सांभाळी विश्व तो बळे ॥ २६ ॥
मन्वन्तरेषु - मन्वन्तरात - सत्त्वम् - सत्त्वगुणाला - विभ्रत् - धारण करणारा असा - स्वमूर्तिभिः - आपले अवतारस्वरूप अशा - मन्वादिभिः - मनु इत्यादिकांकडून - उदितपौरुषः - प्रगट केला आहे पराक्रम ज्याने असा - भगवान् - परमेश्वर - इदम् - ह्या - विश्वम् - जगाचे - अवति - रक्षण करतो ॥२६॥
भगवान या मन्वन्तरांमध्ये सत्त्वगुणाच्या आश्रयाने, आपल्या मनू इत्यादी रूपाने पुरुषाकार प्रगट करून या विश्वाचे पालन करतात. (२६)
तमोमात्रामुपादाय प्रतिसंरुद्धविक्रमः ।
कालेनानुगताशेष आस्ते तूष्णीं दिनात्यये ॥ २७ ॥
ब्रह्म्याचादिन सरता तमाला तो स्विकारतो । निर्माण पुरूषार्थाला थांबवी, शांत राहतो ॥ २७ ॥
दिनात्यये - ब्रह्मदेवाचा दिवस संपल्यावर - तमोमात्राम् - तमोगुणाचा अंश - उपादाय - घेऊन - प्रतिसंरुद्धविक्रमः - बंद केला आहे पराक्रम ज्याने असा - कालेन - कालाकडून - अनुगताशेषः - प्रविष्ट केले आहे सर्व जग ज्याने असा - तूष्णीम् - स्वस्थ - आस्ते - असतो ॥२७॥
कालक्रमानुसार जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस संपतो तेव्हा तो तमोगुणाचा आश्रय करून आपले सृष्टिरचनारूप कार्य स्थगित करून सर्व आपल्यात लीन करून स्वस्थ राहातो. (२७)
तमेवान्वपि धीयन्ते लोका भूरादयस्त्रयः ।
निशायां अनुवृत्तायां निर्मुक्तशशिभास्करम् ॥ २८ ॥
तेंव्हा तो लोप सृष्टीचा तया मध्येच होतसे । प्रलयी रात्र ती ऐसी चंद्र सूर्य जघी नसे ॥ २८ ॥
निशायाम् अनुवृत्तायाम् - रात्र सुरू झाली असता - निर्मुक्तशशिभास्करम् - चंद्र व सूर्य लुप्त झाले आहे अशा स्थितीत - भूरादयः - भूः इत्यादिक - त्रयः - तीन - लोकाः - लोक - तम् एव - त्या परमेश्वरातच - अन्वपिधीवन्ते - गुप्त होतात ॥२८॥
जेव्हा सूर्य आणि चंद्ररहित अशी प्रलयरात्र होते, तेव्हा भूः भुवः, आणि स्वः असे तिन्ही लोक त्या ब्रह्मदेवाच्या शरीरात लीन होतात. (२८)
त्रिलोक्यां दह्यमानायां शक्त्या सङ्कर्षणाग्निना ।
यान्त्यूष्मणा महर्लोकात् जनं भृग्वादयोऽर्दिताः ॥ २९ ॥
शेषाच्या मुखिच्या अग्ने जळती तिन्हि लोक ते । तपाने व्याकुळे विश्व महर्लोकातुनी जना । आश्रया पातती भृगु अणि जे ते मुनीश्वर ॥ २९ ॥
शक्त्या - शक्तिरूप अशा - संकर्षणाग्निना - शेषाच्या मुखातील अग्नीच्या योगाने - त्रिलोक्याम् दह्यमानायाम् - त्रैलोक्य जळू लागले असता - ऊष्मणा - उष्णतेने - अर्दिताः - पीडित झालेले - भृग्वादयः - भृगु इत्यादिक ऋषि - महर्लोकात् - महर्लोकापासून - जनम् - जनलोकाला - यान्ति - जातात ॥२९॥
त्यावेळी शेषाच्या मुखातून निघालेल्या अग्निरूप भगवंतांच्या शक्तीने तिन्ही लोक जळू लागतात. म्हणून त्या तापाने व्याकूळ होऊन भृगू आदी ऋषी महर्लोकातून जनोलोकात येतात. (२९)
तावत् त्रिभुवनं सद्यः कल्पान्तैधितसिन्धवः ।
प्लावयन्त्युत्कटाटोप चण्डवातेरितोर्मयः ॥ ३० ॥
प्रचंड प्रलयी वारे वाहुनी सात सागरा । उन्मत्त उठती लाटा त्रिलोका बुडवीतशा ॥ ३० ॥
तावत् - तोपर्यंत - उत्कटाटोपचण्डवातेरितोर्मयः - उत्कट आहे क्षोभ ज्यांचा अशा प्रचंड वायूनी उसळत आहेत लाटा ज्यांच्या असे - कल्पन्तैधितसिन्धवः - प्रलयकाली वाढलेले समुद्र - सद्यः - तत्काल - त्रिभुवनम् - त्रैलोक्याला - प्लावयन्ति - बुडवितात ॥३०॥
इतक्यात प्रलयकालाच्या प्रचंड तुफानामुळे सातही समुद्र उचंबळून येतात आणि आपल्या उसळत्या उत्तुंग लाटांनी त्रैलोक्य बुडवून टाकतात. (३०)
अन्तः स तस्मिन् सलिल आस्तेऽनन्तासनो हरिः ।
योगनिद्रानिमीलाक्षः स्तूयमानो जनालयैः ॥ ३१ ॥
तेंव्हा त्यांचि जलामध्ये भगवान् योगविद्रित । राहतो नि तदा त्याला स्तात्रे ते मुनि गात ती ॥ ३१ ॥
तस्मिन् - त्या - सलिले अन्तः - पाण्यामध्ये - अनन्तासनः - शेष आहे आसन ज्याचे असा - हरिः - दुःख हरण करणारा भगवान् - योगनिद्रानिमीलाक्षः - योगनिद्रेच्या योगाने मिटलेले आहेत डोळे ज्याने असा - जनालयैः स्तूयमानः - व जनलोक आहे स्थान ज्याचे अशा मुनींनी स्तविला जाणारा असा - आस्ते - असतो ॥३१॥
त्यावेळी त्या जलात शेषशायी भगवान योगनिद्रेने डोळे झाकून घेऊन शयन करतात. तेव्हा जनोलोकात निवास करणारे मुनिगण त्यांची स्तुती करतात. (३१)
एवंविधैरहोरात्रैः कालगत्योपलक्षितैः ।
अपक्षितमिवास्यापि परमायुर्वयःशतम् ॥ ३२ ॥
काळाच्या गतियोगाने सहस्त्रयुग चार ते । दिनांनी शंभरी वर्षे ब्रह्म्याची आयु संपते ॥ ३२ ॥
कालगत्या - कालगतीने - उपलक्षितैः - युक्त अशा - एवंविधैः - अशा प्रकारच्या - अहोरात्रैः - दिवसरात्रींनी - अस्य अपि - ह्या ब्रह्मदेवाचे सुद्धा - परम् - अधिक असे - वयःशतम् - शंभर वर्षे आहे काल ज्याचा असे - आयुः - आयुष्य - अपक्षितम् इव - संपल्यासारखे - भवति - होते ॥३२॥
अशा प्रकारे कालाच्या गतीने एकेक हजार चतुर्युगांच्या रूपाने होणार्या दिवस-रात्रींमुळे ब्रह्मदेवाच्याही शंभर वर्षांच्या आयुष्याची समाप्ती होते, असे दिसते. (३२)
यदर्धमायुषस्तस्य परार्धमभिधीयते ।
पूर्वः परार्धोऽपक्रान्तो ह्यपरोऽद्य प्रवर्तते ॥ ३३ ॥
त्याच्या अर्ध्या आयुष्याला परार्ध नाम ते असे । पारार्ध जाहला एक दुसरा सद्य हा असे ॥ ३३ ॥
तस्य - ब्रह्मदेवाच्या - आयुषः - आयुष्याचे - यत् - जे - अर्धम् - अर्ध - तत् - ते - परार्धम् - परार्ध - अभिधीयते - म्हटले आहे - पूर्वः - पूर्व - परार्धः - परार्ध - अपक्रान्तः - संपले - अपरः - दुसरे परार्ध - अद्य - हल्ली - प्रवर्तते - चालू आहे ॥३३॥
ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या अर्ध्या भागाला परार्ध असे म्हणतात. आतापर्यंत पहिला परार्ध होऊन गेला असून दुसरा परार्ध चालला आहे. (३३)
पूर्वस्यादौ परार्धस्य ब्राह्मो नाम महानभूत् ।
कल्पो यत्राभवद्ब्रह्मा शब्दब्रह्मेति यं विदुः ॥ ३४ ॥
परार्धारंभ काळात ब्राह्म कल्प महान जे । तेंव्हाचि जन्माला ब्रह्मा नामे जे शब्द ब्रह्म ते ॥ ३४ ॥
पूर्वस्य - पूर्व - परार्धस्य - परार्धाच्या - आदौ - प्रारंभी - ब्राह्मः नाम - ब्राह्म नावाचा - महान् कल्पः - मोठा कल्प - अभूत् - झाला - यत्र - ज्या ब्राह्म कल्पात - ब्रह्मा - ब्रह्मदेव - अभवद् - उत्पन्न झाला - यम् - ज्याला - शब्दब्रह्म इति - शब्दब्रह्म असे - विदुः - समजतात ॥३४॥
पहिल्या परार्धाच्या सुरुवातीला ब्राह्म नावाचा महाकल्प झाला होता. त्यातच ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली होती. पंडित लोक याला ‘शब्दब्रह्म’ म्हणतात. (३४)
तस्यैव चान्ते कल्पोऽभूद् यं पाद्ममभिचक्षते ।
यद्धरेर्नाभिसरस आसीत् लोकसरोरुहम् ॥ ३५ ॥
पुन्हा जे जाहले कल्प पद्मनाम तया असे । तेंव्हा सरोवरीं नाभी विराट पद्म जन्मले ॥ ३५ ॥
तस्य एव - त्या परार्धाच्याच - अन्ते - शेवटी - कल्पः - एक कल्प - अभूत् - झाला - यम् - ज्याला - पाद्मम् - पाद्म कल्प - अभिचक्षते - म्हणतात - यत् - ज्या कल्पात - हरेः - विष्णूच्या - नाभिसरसः - नाभिसरोवरापासून - लोकसरोरुहम् - त्रैलोक्यरूपी कमळ - आसीत् - उत्पन्न झाले ॥३५॥
त्याच परार्धाच्या शेवटी जो कल्प झाला होता, त्याला पाद्मकल्प म्हणतात. यामध्ये भगवंतांच्या नाभिसरोवरातून सर्वलोकमय कमळ प्रगट झाले होते. (३५)
अयं तु कथितः कल्पो द्वितीयस्यापि भारत ।
वाराह इति विख्यातो यत्रासीत् शूकरो हरिः ॥ ३६ ॥
द्वितीय कल्प आरंभी वराह अवतार तो । सध्या जो चालु हा कल्पवराह नाम त्याजला ॥ ३६ ॥
भारत - हे विदुरा - द्वितीयस्य अपि - दुसर्या परार्धाचाहि - अयम् - हा - तु - तर - कल्पः - कल्प - वाराहः इति - वाराह नावाने - विख्यातः - प्रख्यात असा - कथितः - सांगितला आहे - यत्र - ज्या वाराहकल्पात - हरिः - विष्णु - सूकरः - वराह - आसीत् - झाला ॥३६॥
विदुरा, आता जो कल्प चालू आहे, तो दुसर्या परार्धाच्या सुरुवातीचा आहे, असे सांगितले जाते. हा ‘वाराहकल्प’ नावाने प्रसिद्ध आहे. यात भगवंतांनी वराहरूप धारण केले होते. (३६)
कालोऽयं द्विपरार्धाख्यो निमेष उपचर्यते ।
अव्याकृतस्यानन्तस्य अनादेर्जगदात्मनः ॥ ३७ ॥
दोन या प्रहरामधे अव्यक्त नि अनादि जो । विश्वात्मा श्री हरी त्याचा निमेष मानला असे ॥ ३७ ॥
अयम् - हा - द्विपरार्धाख्यः - द्विपरार्ध आहे नाव ज्याचे असा - कालः - काल - अव्याकृतस्य - कार्याच्या उपाधीने शून्य अशा - अनादेः अनन्तस्य - व ज्याला आदि नाही व अन्तही नाही अशा - जगदात्मनः - जगाचे कारण अशा परमेश्वराचा - निमेषः - डोळ्याची पापणी मिटून उघडण्यास लागणारा काळ - उपचर्यते - म्हटला जातो ॥३७॥
हा दोन परार्धांचा कालावधी अव्यक्त, अनंत, अनादी, विश्वात्मा श्रीहरींचा एक ‘निमेष’ मानला जातो. (३७)
कालोऽयं परमाण्वादिः द्विपरार्धान्त ईश्वरः ।
नैवेशितुं प्रभुर्भूम्न ईश्वरो धाममानिनाम् ॥ ३८ ॥
परमाणू सवे काळ ज्या आधिनी असे । मनीं त्या मालकी नाही गर्व्यांना शासितोचि तो ॥ ३८ ॥
धाममानिनाम् एव - देह, घर इत्यादिकांवर आसक्ति ठेवणार्या प्राण्यांचेच - ईश्वरः - समर्थ असा - अयम् - हा - कालः - काल - भूम्नः - परिपूर्ण अशा परमेश्वराला - ईशितुम् - नियमित करावयास - न प्रभुः - समर्थ होत नाही ॥३८॥
परमाणूपासून द्विपरार्धापर्यंत पसरलेला हा काल सर्वसमर्थ असूनही सर्वात्मा श्रीहरींवर मात्र याची कोणत्याही प्रकारे सत्ता चालत नाही. हा देहादिकांमध्ये अभिमान ठेवणार्या जीवांवरच सत्ता चालवतो. (३८)
विकारैः सहितो युक्तैः विशेषादिभिरावृतः ।
आण्डकोशो बहिरयं पञ्चाशत्कोटिविस्तृतः ॥ ३९ ॥ दशोत्तराधिकैर्यत्र प्रविष्टः परमाणुवत् । लक्ष्यतेऽन्तर्गताश्चान्ये कोटिशो ह्यण्डराशयः ॥ ४० ॥ तदाहुरक्षरं ब्रह्म सर्वकारणकारणम् । विष्णोर्धाम परं साक्षात् पुरुषस्य महात्मनः ॥ ४१ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
पंचतन्मात्र नी आठ प्रकृती दश ईंद्रिये । मन नी पंचभूते ते सोळांचे कवचो असे ॥ ३९ ॥ योजने कोटि पन्नास विस्तार आत ज्या असा । ब्रह्मांड बाह्य अंगाला दहाच्यात्या पटीत ते ॥ कवचो सात ते त्याला याला तो अणु मानितो ॥ ४० ॥ ब्रह्मांड शेकडो राशी ब्रह्माक्षर ते पहा । समस्त कारणी तोची परमात्मा पुराण जो ॥ त्याचे ते धाम हे ऐसे भगवत् रूपची असे ॥ ४१ ॥ ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ अकरावा अध्याय हा ॥ ३ ॥ ११ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
विकारेः - सोळा विकारांनी - युक्तैः - युक्त अशा आठ प्रकृति त्यांनी - सहितः - सहित असा - बहिः - बाहेर - विशेषादिभिः - पृथिवी इत्यादि भूतांनी झाकलेला असा - पञ्चाशत्कोटिविस्तृतः - पन्नास कोटि योजनांनी विस्तृत असा - अयम् - हा - आण्डकोशः - ब्रह्मांडकोश - अस्ति - आहे ॥३९॥ दशकोत्तराधिकैः - उत्तरोत्तर दसपटीने वाढणार्या पृथिवी आदिकरून आवरणांनी - आवृतः सः - झाकलेला असा तो ब्रह्मांडकोश - यत्र - ज्या परमेश्वरामध्ये - प्रविष्टः - लीन झाला असता - परमाणुवत् - परमाणूप्रमाणे - लक्ष्यते हि - खरोखर दिसतो - च - आणि - अन्ये - दुसर्या - कोटिशः - कोट्यवधि - अण्डराशयः - ब्रह्मांडाच्या राशी - अन्तर्गताः - आत असलेल्या - लक्ष्यन्ते - दिसतात ॥४०॥ तत् - त्याला - साक्षात् - प्रत्यक्ष - महात्मनः पुरुषस्य विष्णोः - श्रेष्ठ पुरुषरूप विष्णूचे - परम् - श्रेष्ठ - धाम - स्वरूप असे - सर्वकारणकारणम् - व सर्व कारणांचे कारण - अक्षरम् - अविनाशि - ब्रह्म - ब्रह्म - आहुः - म्हणतात ॥४१॥
प्रकृती, महत्तत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या आठ प्रकृतींसह दहा इंद्रिये, मन आणि पंचमहाभूते असे सोळा विकार मिळून बनलेला हा ब्रह्मांडकोश आतून पन्नास कोटी योजने विस्तार असलेला आहे. तसेच बाहेर चारी बाजूंनी याला उत्तरोत्तर दहा-दहा पट अशी सात आवरणे आहेत. त्या सर्वांसहित हा ज्यात परमाणूप्रमाणे पडलेला दिसतो आणि ज्याच्यामध्ये अशा कोटयवधी ब्रह्मांडराशी आहेत, तोच या प्रधान इत्यादी सर्व कारणांचे कारण ‘अक्षरब्रह्म’ म्हटला जातो आणि हेच पुराणपुरुष परमात्मा श्रीविष्णू भगवानांचे श्रेष्ठ स्वरूप आहे. (३९-४१)
स्कंध तिसरा - अध्याय अकरावा समाप्त |