|
श्रीमद् भागवत पुराण दशविधसृष्टिवर्णनम् - दहा प्रकारच्या सृष्टींचे वर्णन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
विदुर उवाच -
(अनुष्टुप्) अन्तर्हिते भगवति ब्रह्मा लोकपितामहः । प्रजाः ससर्ज कतिधा दैहिकीर्मानसीर्विभुः ॥ १ ॥
विदुरजी म्हणाले - ( अनुष्टुप् ) भगवान् गुप्त तो होता लोकपितामह । तयाने देह चित्ताने निर्मिली सृष्टि कोणती ॥ १ ॥
भगवति अन्तर्हिते - भगवान् अन्तर्धान पावले असता - लोकपितामहः - त्रैलोक्याचा पितामह असा - ब्रह्मा - ब्रह्मदेव - दैहिकीः - शारीरिक - च - आणि - मानसीः - मानसिक - प्रजाः - सृष्टि - कतिधा - किती प्रकारची - ससर्ज - उत्पन्न करता झाला ॥१॥
विदुर म्हणाला - मुनिवर, भगवान नारायण अंतर्धान पावल्यानंतर सर्व लोकांचे पितामह ब्रह्मदेव यांनी आपला देह आणि मन यांपासून किती प्रकारची सृष्टी उत्पन्न केली ? (१)
ये च मे भगवन्पृष्टाः त्वय्यर्था बहुवित्तम ।
तान्वदस्वानुपूर्व्येण छिन्धि नः सर्वसंशयान् ॥ २ ॥
भगवन् ! याहूनी अन्य मी जे प्रश्न विचारिले । क्रमाने मज सांगावे मिटवा संशयो पुरा ॥ २ ॥
च - आणि - भगवान् - हे भगवन् - बहुवित्तम - ज्ञानिश्रेष्ठा - मे - माझ्याकडून - त्वयि - तुला - ये अर्थाः - ज्या गोष्टी - पृष्टाः - विचारल्या गेल्या - तान् - त्या गोष्टी - आनुपूर्व्येण - अनुक्रमाने - वदस्व - सांग - च - आणि - नः - आमच्या - सर्वसंशयान् - संपूर्ण संशयांना - छिन्धि - दूर कर ॥२॥
भगवन, याखेरीज मी आपल्याला आणखी काही गोष्टी विचारल्या, त्या सर्वांचे आपण क्रमाने वर्णन करावे आणि माझे सर्व संशय दूर करावेत. कारण आपण सर्वज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ आहात. (२)
सूत उवाच -
एवं सञ्चोदितस्तेन क्षत्त्रा कौषारवो मुनिः । प्रीतः प्रत्याह तान् प्रश्नान् हृदिस्थानथ भार्गव ॥ ३ ॥
सूतजी सांगतात - विदुरे पुसता प्रश्न मैत्रेया हर्ष जाहला । प्रसन्न होऊनी त्यांनी उत्तरे दिधली अशी ॥ ३ ॥
भार्गव - हे शौनका - अथ - नंतर - तेन क्षत्त्रा - त्या विदुराने - एवम् - याप्रमाणे - संचोदितः - प्रेरणा केलेला - कौषारवः मुनिः - मैत्रेय ऋषि - प्रीतः - संतुष्ट होऊन - हृदिस्थान - अन्तःकरणात असलेल्या - तान् प्रश्नान् - त्या प्रश्नांचे - प्रत्याह - उत्तर देता झाला ॥३॥
सूत म्हणाले - शौनका, विदुराने असे विचारल्यावर मुनिवर मैत्रेय अत्यंत प्रसन्न झाले आणि आपल्या मनात ठेवलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागले. (३)
मैत्रेय उवाच -
विरिञ्चोऽपि तथा चक्रे दिव्यं वर्षशतं तपः । आत्मनि आत्मानमावेश्य यथाह भगवान् अजः ॥ ४ ॥
मैत्रेयजी म्हणाले - भगवान् बोलले जैसे त्यापरी शत वर्ष ते । ब्रह्म्याने लाविले ध्यान आत्मा चित्त निरोधुनी ॥ ४ ॥
यत् - जसे - अजः भगवान् - जन्मरहित अशा भगवन्ताने - आह - सांगितले होते - तथा - त्याप्रमाणे - विरिञ्चः अपि - ब्रह्मदेव देखील - आत्मनि - परमात्म्याच्या ठिकाणी - आत्मानम् - मन - आवेश्य - लावून - दिव्यं वर्षशतम् - देवांची शंभर वर्षे - तपः - तपश्चर्या - चक्रे - करिता झाला ॥४॥
मैत्रेय म्हणाले - अजन्मा भगवान श्रीहरींनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी आपले चित्त आपला आत्मा श्रीनारायण यांचे ठायी तसेच एकाग्र करून दिव्य शंभर वर्षांपर्यंत तप केले. (४)
तद् विलोक्याब्जसंभूतो वायुना यदधिष्ठितः ।
पद्मं अम्भश्च तत्काल कृतवीर्येण कम्पितम् ॥ ५ ॥
ब्रह्म्याने पाहिले तेंव्हा वार्याच्या त्या गती मुळे । हालते जळ नी पद्म जेथे तो बसला असे ॥ ५ ॥
अब्जसंभूतः - कमलापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव - यद् अधिष्ठितः - ज्याच्या आश्रयाने होता - तत् पद्मम् - ते कमळ - च - आणि - तत् अम्भः - ते उदक - कालकृतवीर्येण - प्रलयकालाने उत्पन्न केले आहे सामर्थ्य ज्याचे अशा - वायुना - वार्याने - कम्पितं विलोक्य - हालविलेले पाहून ॥५॥
ब्रह्मदेवांनी असे पाहिले की, प्रलयकालातील वायूच्या तुफान वेगामुळे ज्याच्यावर ते बसले होते ते कमळ आणि पाणी थरारत आहे. (५)
तपसा हि एधमानेन विद्यया चात्मसंस्थया ।
विवृद्धविज्ञानबलो न्यपाद् वायुं सहाम्भसा ॥ ६ ॥
तपस्या घोर ती झाली ज्ञानाच्या शक्तिने हृदीं । वाढली शक्ति विज्ञान प्राशी वायु जला सव ॥ ६ ॥
एधमानेन हि तपसा - वाढलेल्या तपश्चर्येने - च - आणि - आत्मसंस्थया विद्यया - परमात्मविषयक जे ज्ञान त्याने - विवृद्धविज्ञानबलः - वाढली आहे ज्ञानशक्ति ज्याची असा ब्रह्मदेव - अम्भसा सह वायुम् - उदकासहित वायूला - न्यपान् - पिऊन टाकिता झाला ॥६॥
प्रबळ तपश्चर्या आणि हृदयात स्थिर झालेले आत्मज्ञान यामुळे ज्यांचे विज्ञानबल वाढले आहे, अशा त्यांनी पाणी आणि वायू दोन्हीही पिऊन टाकले. (६)
तद्विलोक्य वियद्व्यापि पुष्करं यदधिष्ठितम् ।
अनेन लोकान्प्राग्लीनान् कल्पितास्मीत्यचिन्तयत् ॥ ७ ॥
आकाश व्यापिले पद्मे पाहुनी मनिं चिंतिले । लीन जे पूर्वकल्पांती त्यासी मी रचितो ययीं ॥ ७ ॥
स्वेन - स्वतः - यत् अधिष्ठितं - ज्याचा आश्रय केलेला होता - तत् पुष्करम् - ते कमळ - विद्यापि - आकाशाला व्यापून राहाणारे असे - विलोक्य - पाहून - प्राक् - पूर्वी - लीनान् - लय पावलेल्या - लोकान् - लोकांना - अनेन - या कमळाच्या योगाने - कल्पितास्मि - उत्पन्न करीन - इति सः अचिन्तयत् - असा तो विचार करिता झाला ॥७॥
नंतर ज्याच्यावर ते स्वतः बसले होते त्या आकाशव्यापी कमळाला पाहून त्यांनी विचार केला की, पूर्वकल्पामध्ये लीन झालेले लोक मी यापासूनच निर्माण करीन. (७)
पद्मकोशं तदाविश्य भगवत्कर्मचोदितः ।
एकं व्यभाङ्क्षीदुरुधा त्रिधा भाव्यं द्विसप्तधा ॥ ८ ॥
पद्मकोषात जावोनी त्रिभाग निर्मिले तये । विस्तार ते असे होते चौदाही लोक मावती ॥ ८ ॥
भगवत्कर्मचोदितः - परमेश्वराने सृष्टिकर्माविषयी प्रेरणा केलेला - पद्मकोशम् - कमलाच्या कळ्यात - आवेश्य - शिरून - द्विसप्तधा - चवदाप्रकारे - वा - किंवा - उरुधा - पुष्कळ प्रकारे - भाव्यम् - करता येण्यासारखे अशा - तत् एकम् - ते एकच असे कमळ - त्रिधा - तीन प्रकाराने - व्यभाङ्क्षीत् - विभागिता झाला ॥८॥
भगवंतांनी सृष्टिकार्यासाठी नेमलेल्या ब्रह्मदेवांनी मग त्या कमलकोशात प्रवेश केला आणि त्या एकाचेच भूः भुवः आणि स्वः असे तीन भाग केले. वास्तविक ते कमल एवढे मोठे होते की, त्याचे चौदा किंवा त्याहीपेक्षा अधिक लोक केले जाऊ शकले असते. (८)
एतावान् जीवलोकस्य संस्थाभेदः समाहृतः ।
धर्मस्य ह्यनिमित्तस्य विपाकः परमेष्ठ्यसौ ॥ ९ ॥
भोगस्थान जिवांचे ते त्रिलोक शास्त्र वर्णिती । निष्कामकर्म जो वर्ते सत्यलोकादि त्या मिळे ॥ ९ ॥
जीवलोकस्य - प्राण्यांना भोग्य अशा लोकांचा - एतावान् - एवढा - संस्थाभेदः - रचनेचा प्रकार - समाहृतः - सांगितला - हि - कारण - असौ - हा - परमेष्ठी - ब्रह्मदेव - अनिमित्तस्य - निष्काम अशा - धर्मस्य - धर्माचा - विपाकः - परिणाम - अस्ति - आहे ॥९॥
जीवांची भोगस्थाने म्हणून याच तिन्ही लोकांचे शास्त्रांत वर्णन आले आहे. जे निष्काम कर्माचरण करणारे आहेत, त्यांना महर्लोक, तपोलोक जनोलोक आणि सत्यलोकरूप ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. (९)
विदुर उवाच -
यथात्थ बहुरूपस्य हरेरद्भुतकर्मणः । कालाख्यं लक्षणं ब्रह्मन् यथा वर्णय नः प्रभो ॥ १० ॥
विदुरजी म्हणाले- अद्भूत विश्वरूपाची कालशक्ति कशी असे । ब्राह्मणा ! सांगणे सर्व विस्तारे मजला प्रभो ! ॥ १० ॥
प्रभो ब्रह्मन् - हे ब्राह्मणश्रेष्ठा - बहुरूपस्य - ज्याची पुष्कळ स्वरूपे आहेत अशा - अद्भुतकर्मणः - व अद्भुत ज्याच्या लीला आहेत अशा - हरेः - श्रीहरीचे - यत् - जे - कालाख्यम् - कालनावाचे - लक्षणम् - स्वरूप - आत्थ - तू सांगितलेस - तत् - ते - यथा - जसे असेल तसे - वर्णय - सांग ॥१०॥
विदुर म्हणाला - ब्रह्मन, आपण अद्भुतकर्मा विश्वरूप अशा श्रीहरींच्या ज्या कालनामक शक्तीविषयी सांगितले होते, त्याविषयी विस्तारपूर्वक आम्हांला सांगा. (१०)
मैत्रेय उवाच -
गुणव्यतिकराकारो निर्विशेषोऽप्रतिष्ठितः । पुरुषः तदुपादानं आत्मानं लीलयासृजत् ॥ ११ ॥
मैत्रेयजी म्हणाले - विषयानंतर तो काल स्वयं तो विषया विना । अनादी अंत ना त्याला सृष्टीचा खेळ खेळतो ॥ ११ ॥
निर्विशेषः - स्वरूप ज्याला नाही असा - अप्रतिष्ठितः - व आदि आणि अन्त ज्याच्या ठिकाणी नाही असा - गुणव्यतिकराकारः - सत्त्वादि त्रिगुणांचा परिणाम हाच आहे आकार ज्याचा असा - कालस्वरूप - काळरूपी - पुरुषः - ईश्वर - तदुपादानम् - तो काल आहे उपादान कारण ज्याचे असे - आत्मनम् - स्वतःचे स्वरूप असे जग - लीलया - लीलेने - असृजत् - उत्पन्न करिता झाला ॥११॥
मैत्रेय म्हणाले - विषयांचे बदलणे हेच कालाचे स्वरूप आहे. तो काल स्वतः निर्विशेष, अनादी आणि अनंत आहे. त्यालाच निमित्त करून भगवान आपण आपल्यालाच लीलेने सृष्टीच्या रूपांत प्रगट करतात. (११)
विश्वं वै ब्रह्मतन्मात्रं संस्थितं विष्णुमायया ।
ईश्वरेण परिच्छिन्नं कालेनाव्यक्तमूर्तिना ॥ १२ ॥
विश्व हे लीन होवोनी मायेने स्थित ब्रह्मची । अव्यक्तमूर्ती काळाने पुन्हा तो वेगळा करी ॥ १२ ॥
ईश्वरेण - परमेश्वराने - विष्णुमायया संस्थितम् - विष्णूच्या मायेने संहार केलेले - ब्रह्मतन्मात्रम् - सूक्ष्म असे ब्रह्मस्वरूप - विश्वम् - जग - अव्यक्तमूर्तिना - अस्पष्ट आहे स्वरूप ज्याचे अशा - कालेन - कालाने - वै - खरोखर - परिछिन्नम् - निराळे प्रकाशित केले ॥१२॥
अगोदर हे सर्व विश्व भगवंतांच्या मायेने लीन होऊन ब्रह्मरूपामध्ये स्थित होते. त्यालाच भगवंतांनी अव्यक्तमूर्ती कालाच्या द्वारे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे प्रगट केले. (१२)
यथेदानीं तथाग्रे च पश्चादप्येतदीदृशम् ।
सर्गो नवविधस्तस्य प्राकृतो वैकृतस्तु यः ॥ १३ ॥
आहे होती तशी होय सृष्टी नऊ प्रकारची । प्राकृता वैकृता ऐसी दहावी एक आणखी ॥ १३ ॥
एतत् - हे कालाचे स्वरूप - यथा - जसे - इदानींम् - आता - अस्ति - आहे - तथा - तसे - अग्रे च - पूर्वीही - आसीत् - होते - पश्चात् अपि - पुढेही - ईदृशम् - अशा प्रकारचेच - भविष्यति - असेल - तस्य - त्या कालाच्या निमित्ताने - सर्गः - सृष्टि - नवविधः - नऊ प्रकारची - अस्ति - आहे - तु - परंतु - यः - जी - प्राकृतः - प्रकृतीपासून उत्पन्न झालेली - वैकृतः - आणि विकृतीपासून उत्पन्न झालेली - अस्ति - आहे - सः दशमः - मी दहावी होय ॥१३॥
हे जग आता जसे आहे, तसेच अगोदर होते आणि यापुढेही ते तसेच राहील. या जगाची उत्पत्ती नऊ प्रकारची होते. तसेच प्राकृत-वैकृत भेदाने एक दहावी सृष्टीही आहे. (१३)
कालद्रव्यगुणैरस्य त्रिविधः प्रतिसङ्क्रमः ।
आद्यस्तु महतः सर्गो गुणवैषम्यमात्मनः ॥ १४ ॥
द्रव्य काल गुणांद्वारा तिन्ही रीत्ये घडे लय । प्रेरिता सत्विं भेदांनी महत्तत्वचि जाहले ॥ १४ ॥
अस्य - ह्या सृष्टीचा - कालद्रव्यगुणैः - काल, भूते आणि सत्त्वादि गुण यांनी - त्रिविधः - तीन प्रकारचा - प्रतिसंक्रमः - लय - भवति - होतो - महतः सर्गः - महत्तत्त्वाची उत्पत्ति - आद्यः - पहिली सृष्टि होय - सा - ती - आत्मनः - परमेश्वरापासून - गुणवैषमम्यम् - सत्त्वादि गुणांच्या न्यूनाधिक्याने झालेली ॥१४॥
तसेच याचा प्रलय काल, द्रव्य आणि गुणांच्या द्वारा तीन प्रकारांनी होतो. पहिली सृष्टी महत्तत्त्वाची, भगवंतांच्या प्रेरणेने सत्त्वादी गुणांमध्ये विषमता होणे हेच हिचे स्वरूप आहे. (१४)
द्वितीयस्त्वहमो यत्र द्रव्यज्ञानक्रियोदयः ।
भूतसर्गस्तृतीयस्तु तन्मात्रो द्रव्यशक्तिमान् ॥ १५ ॥
दुसरी ती अहंकारी पृथ्व्यादी पंचभूत नी । कर्म ज्ञानेंद्रिया जन्म तिसरी भूतसर्ग ती । राहतो वर्ग तन्मात्र भूतांना जन्म देतसे ॥ १५ ॥
यत्र द्रव्यज्ञानक्रियोदयः - पंचभूते, ज्ञानेंद्रिये आणि कर्मेन्द्रिये यांची जी उत्पत्ति ती - तु - तर - अहमः - अहंकाराची - द्वितीयः - दुसरी सृष्टि होय - द्रव्यशक्तिमान् - स्थूल महाभूते उत्पन्न करण्याची ज्यात शक्ति आहे अशी - तन्मात्रः - सूक्ष्म भूते ही - तृतीयः भूतसर्गः - तिसरी भूतसृष्टि होय ॥१५॥
दुसरी सृष्टी अहंकाराची; जिच्यापासून पृथ्वी आदी पंचमहाभूते तसेच ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांची उत्पत्ती होते. तिसरी सृष्टी भूतसर्ग आहे, जिच्यामध्ये पंचमहाभूतांना उत्पन्न करणारा तन्मात्रवर्ग राहातो. (१५)
चतुर्थ ऐन्द्रियः सर्गो यस्तु ज्ञानक्रियात्मकः ।
वैकारिको देवसर्गः पञ्चमो यन्मयं मनः ॥ १६ ॥
चवथी इंद्रियाची ती संपन्न ज्ञान नी क्रिये । मन सत्व अहंकार पाचवी देवता तिथे ॥ १६ ॥
ज्ञानक्रियात्मकः - ज्ञानेन्द्रिये आणि कर्मेन्द्रिये जिचे स्वरूप आहे अशी - यः सर्गः - जी सृष्टि - तु - तर - चतुर्थः - चवथी - ऐन्द्रियः - इन्द्रियसृष्टि होय - वैकारिकः - सात्त्विक अहंकारापासून उत्पन्न झालेली - देवसर्गः - देवतांची सृष्टि - पंचमः - पाचवी सृष्टि होय - मनः यन्मयम् - मन जीत अन्तर्भूत होते ॥१६॥
चौथी सृष्टी इंद्रियांची आहे; ही ज्ञान आणि क्रियाशक्तीने युक्त आहे. पाचवी सृष्टी सात्त्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांची आहे. मन या सृष्टीच्याच अंतर्गत आहे. (१६)
षष्ठस्तु तमसः सर्गो यस्त्वबुद्धिकृतः प्रभोः ।
षडिमे प्राकृताः सर्गा वैकृतानपि मे श्रृणु ॥ १७ ॥
अविद्या ती सहावी नी पाचग्रंथी तिला पहा । विक्षेप जीव बुद्धीला वैकृत सातवी असे ॥ १७ ॥
प्रभो - समर्था विदुरा - यः - जी - अबुद्धिकृतः - अज्ञान उत्पन्न करणार्या - तमसः - अविद्येची - सर्गः - उत्पत्ति - तु - तर - षष्ठः - सहावी सृष्टि होय - इमे - ह्या - षट् - सहा - प्राकृताः सर्गाः - प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या सृष्टि होत - वैकृतान् अपि - विकृतीपासून उत्पन्न झालेल्या सृष्टींना सुद्धा - मे - माझ्यापासून - शृणु - ऐक ॥१७॥
सहावी सृष्टी अविद्येची आहे. यामध्ये तामिस्त्र, अंधतामिस्त्र, तम, मोह, आणि महामोह या पाच गाठी आहेत. ही सृष्टी जीवांच्या बुद्धीवर आवरण आणि विक्षेप करणारी आहे. या सहा सृष्टी प्राकृत आहेत. आता वैकृत सृष्टी आहेत, त्यांचेही वर्णन ऐक. (१७)
रजोभाजो भगवतो लीलेयं हरिमेधसः ।
सप्तमो मुख्यसर्गस्तु षड्विधस्तस्थुषां च यः ॥ १८ ॥
चिंतने भजि जो नित्य त्याची चिंता हरे हरी । लीला ही श्रीहरीची त्या ब्रह्मा तोचि रजा मुळे ॥ त्या गुणे रचिता सृष्टी सहाही या परी तसे । सातवी वैकृता सृष्टी प्रधान वृक्ष निर्मिती ॥ १८ ॥
हरिमेधसः - दुःख हरण करणारी आहे धारणा ज्याची अशा - रजोभाजः - रजोगुणास धारणा करणार्या - भगवतः - परमेश्वराची - इयम् - ही - लीला - लीला - अस्ति - आहे - च - आणि - तस्थुषाम् - स्थावरांची - षड्विधः - सहा प्रकारची - यः मुख्यसर्गः - जी प्रधान सृष्टि - तु - तर - सप्तमः - सातवी ॥१८॥
भगवंतांचे चिंतन करणार्यांचे दुःख दूर करणार्या व रजोगुणाचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणार्या भगवंतांची ही लीला आहे. सातवी प्रमुख वैकृत सृष्टी सहा प्रकारच्या वृक्षांची असते. (१८)
वनस्पत्योषधिलता त्वक्सारा वीरुधो द्रुमाः ।
उत्स्रोतसस्तमःप्राया अन्तःस्पर्शा विशेषिणः ॥ १९ ॥
वनस्पत्योषधीवेली त्वक्सारा विरुधो द्रुमा । ज ज्ञान नी परीस्पर्श स्वयं गुण विशेषता ॥ १९ ॥
वनस्पत्योषधिलताः - वनस्पति, औषधी आणि वेली - त्वक्साराः - त्वचा ज्यांची कठीण आहे असे वेळू इत्यादि - वीरुधः - आधाराशिवाय राहणार्या वेत इत्यादि वेली - द्रुमाः - वृक्ष - इमे - हे - उत्स्रोतसः - ज्यांच्या आहाराची गति ऊर्ध्व आहे असे - तमः प्रायाः - ज्यांची जनशक्ति स्पष्ट नाही असे - अन्तःस्पर्शाः - आतच ज्यांना स्पर्शाने ज्ञान होते असे - विशेषिणः - विशेष धर्म ज्यांना आहेत असे - सन्ति - असतात ॥१९॥
वनस्पती, औषधी, लता, त्वक्सार, वीरुध आणि द्रुम हे खालून वर वाढतात. यांच्यामध्ये साधारणतः ज्ञानशक्ती प्रगट झालेली नसते. यांना दीर्घकालीन आतल्या आतच केवळ स्पर्शाचा अनुभव येतो आणि या प्रत्येकात कोणता तरी एखादा विशेष गुण असतो. (१९)
तिरश्चामष्टमः सर्गः सोऽष्टाविंशद्विधो मतः ।
अविदो भूरितमसो घ्राणज्ञा हृद्यवेदिनः ॥ २० ॥
आठवी योनि ती पक्षी अठ्ठाविस प्रकारचे । त्यांना न ज्ञान काळाचे तमाचे सुख भोगिती ॥ २० ॥
तिरश्चाम् - पशु इत्यादि प्राण्यांची - सर्पः - उत्पत्ति - अष्टमः - आठवा सर्ग होय - सह् - तो - अष्टाविंशद्विधः - अठ्ठावीस प्रकारचा - मतः - मानिला आहे - ते - ते - अविदः - उद्या काय होणार याचे धोरण नसलेले - भूरितमसः - पुष्कळ अज्ञान ज्यांना आहे म्हणजे आहार इत्यादि ज्ञानाशिवाय ज्यांना ज्ञान नाही असे - घ्राणज्ञाः - घ्राणेंद्रियाने ओळखणारे - हृदि अवेदिनः - हृदयात न जाणणारे म्हणजे सुखदुःख ज्यांच्या मनात फार वेळ राहत नाही असे - सन्ति - असतात ॥२०॥
आठवी सृष्टी पशु-पक्ष्यांची आहे. ही अठ्ठावीस प्रकारची मानली गेली आहे. यांना कालाचे ज्ञान नसते. यांच्यामध्ये तमोगुण अधिक असतो. केवळ वासावरून यांना वस्तूंचे ज्ञान होते. यांच्यात विचारशक्ती नसते. (२०)
गौरजो महिषः कृष्णः सूकरो गवयो रुरुः ।
द्विशफाः पशवश्चेमे अविरुष्ट्रश्च सत्तम ॥ २१ ॥
तीर्यकी म्हशि नी गाई मृग कोल्हे वराह नी । पशू हे उंट इत्यादी द्विशकी जात एकची ॥ २१ ॥
सत्तम - हे साधुश्रेष्ठा - गौः - गाय - अजः - बकरा - महिषः - रेडा - कृष्णः - काळा हरिण - सूकरः - डुकर - गवयः - गवा - रुरुः - काळवीट - च - आणि - अविः - मेंढा - च - आणि - उष्ट्रः - उंट - इमे - हे - द्विशफाः - दोन खुरांचे - पशवः - पशु - सन्ति - आहेत ॥२१॥
हे विदुरा, या पशुयोनींमध्ये गाय, बकरा, रेडा, काळवीट, डुक्कर, नीलगाय, रुरू नावाचे हरीण, मेंढा, आणि उंट हे दोन खुरांचे पशू होत. (२१)
खरोऽश्वोऽश्वतरो गौरः शरभश्चमरी तथा ।
एते चैकशफाः क्षत्तः श्रृणु पञ्चनखान् पशून् ॥ २२ ॥
खेचरे गर्दभे घोडे खुरेक मृग गौर ते । पंचनखी अस् प्राणी-पक्ष्यांच्या योनि ऐकणे ॥ २२ ॥
क्षत्तः - हे विदुरा - तथाः - त्याप्रमाणे - खरः - गाढव - अश्वः - घोडा - अश्वतरः - खेचर - गौरः - एक प्रकारचा हरिण - शरभः - शरभ - च - आणि - वमरी - वनगाय - एते - हे - एकशफाः - एका खुराचे - पशवः सन्ति - पशु आहेत - पञ्चनखान् - पाच आहेत नखे ज्यांना अशा - पशून् - पशूंना - शृणु - ऐक ॥२२॥
गाढव, घोडा, खेचर, पांढरे हरीण, चित्ता, आणि वनगाय हे एक खूर असलेले आहेत. आता पाच नखे असलेल्या पशूंची नावे ऐक. (२२)
श्वा सृगालो वृको व्याघ्रो मार्जारः शशशल्लकौ ।
सिंहः कपिर्गजः कूर्मो गोधा च मकरादयः ॥ २३ ॥
लांडगे श्वान नी वाघ ससे सिंह नि वानरे । हत्ती नी कासवे आणि सुसरे ही जळातले ॥ २३ ॥
श्वा - कुत्रा - सृगालः - कोल्हा - वृकः - लांडगा - व्याघ्रः - वाघ - मार्जारः - मांजर - शशशल्लकौ - ससा व साळ - सिंहः - सिंह - कपिः - वानर - गजः - हत्ती - कूर्मः - कांसव - गोधा - घोरपड - च - आणि - मकरादयः - मगर इत्यादि ॥२३॥
कुत्रा, कोल्हा, लांडगा, वाघ, मांजर, ससा, साळ, सिंह, माकड, हत्ती, कासव, घोरपड मगर, इत्यादी होत. (२३)
कङ्कगृध्रबकश्येन भासभल्लूकबर्हिणः ।
हंससारसचक्राह्व काकोलूकादयः खगाः ॥ २४ ॥
बगळे हंस नी मोर कावळे चिमण्या तसे । घुबडे बदके कंक उडणारेचि पक्षि ते ॥ २४ ॥
कङ्कगृध्रवटश्येनभासभल्लूकबर्हिणः - कंकपक्षी, गिधाड, वटवाघूळ, ससाणा, भास, अस्वल, मोर - हंससारसचक्राह्वकाकोलूकादयः - हंस, सारस, चक्रवाक, कावळा, घुबड इत्यादि - खगाः - पक्षी - सन्ति - आहेत ॥२४॥
बगळा, गिधाड, होला, ससाणा, भास, भल्लूक, मोर, हंस, सारस, चक्रवाक, कावळा, घुबड इत्यादी उडणारे जीव पक्षी म्हणविले जातात. (२४)
अर्वाक्स्रोतस्तु नवमः क्षत्तरेकविधो नृणाम् ।
रजोऽधिकाः कर्मपरा दुःखे च सुखमानिनः ॥ २५ ॥
नववी मानवी योनी एकची रूप जाणिजे । मुखाने सेविती अन्न गिळिती उर्ध्व मार्गि ते रजप्रधान ती वृत्ती कर्माचे ते परायण । विषयी दुःख जे प्राप्त तयाला सुख मानिती ॥ २५ ॥
क्षत्तः - हे विदुरा - च - आणि - अर्वाक्स्त्रोतः - वरून खाली आहे आहारविहाराची गति ज्याची अशी - एकविधः - एकप्रकारची - नृणाम् - मनुष्यांची - सर्गः - सृष्टि - नवमः - नववी होय - ते - ते मनुष्य - रजोधिकाः - रजोगुण आहे अधिक ज्यांमध्ये असे - कर्मपराः - कर्म ज्यांना श्रेष्ठ आहे असे - च - आणि - दुःखे तु - दुःखाच्या ठिकाणी तर - सुखमानिनः - सुख मानणारे - सन्ति - आहेत ॥२५॥
विदुरा, नववी सृष्टी मनुष्यांची आहे. ती एकाच प्रकारची आहे. यांच्या आहाराचा प्रवाह वरून खाली असा असतो. मनुष्ये रजोगुणप्रधान, कर्मपरायण, आणि दुःखरूप विषयांतच सुख मानणारी असतात. (२५)
वैकृतास्त्रय एवैते देवसर्गश्च सत्तम ।
वैकारिकस्तु यः प्रोक्तः कौमारस्तूभयात्मकः ॥ २६ ॥
स्थावरो पशुपक्षादी मानवी योनि या तिन्ही । वैकृता प्राकृत योनि ऋषियोनी अनेक त्या ॥ २६ ॥
सत्तम - हे साधुश्रेष्ठा विदुरा - एते त्रयः - हे तीने सर्ग - वैकृताः एव - विकृतीपासून झालेलेच आहेत - च - आणि - देवसर्गः - देवसृष्टि - अपि - देखील - वैकृतः - विकृतीपासून उत्पन्न झालेली आहे - तु - परंतु - यः - जी - प्रोक्तः - सांगितली - सः - ती - वैकारिकः - सात्त्विक अहंकारापासून झालेली आहे - तु - परंतु - कौमारः - सनत्कुमारांची सृष्टि - उभयात्मकः - प्राकृत आणि वैकृत आहे ॥२६॥
स्थावर, पशु-पक्षी आणि मनुष्य या तीन प्रकारच्या सृष्टी, तसेच पुढे सांगितला जाणारा देवसर्ग, या वैकृत सृष्टी आहेत आणि जो महत्तत्त्वादिकरूप वैकारिक देवसर्ग आहे, त्याची गणना या अगोदर प्राकृत सृष्टीत केली गेली आहे. या व्यतिरिक्त सनत्कुमार इत्यादी ऋषींचा जो कौमार सर्ग आहे, तो प्राकृत आणि वैकृत असा दोन्ही प्रकारचा आहे. (२६)
देवसर्गश्चाष्टविधो विबुधाः पितरोऽसुराः ।
गन्धर्वाप्सरसः सिद्धा यक्षरक्षांसि चारणाः ॥ २७ ॥ भूतप्रेतपिशाचाश्च विद्याध्राः किन्नरादयः । दशैते विदुराख्याताः सर्गास्ते विश्वसृक्कृताः ॥ २८ ॥
असूर देवता पित्रे गंधर्व अप्सरा तसे । यक्ष राक्षस नी सिद्ध विद्याधर नि चारण ॥ २७ ॥ भूतप्रेत पिशाच्चादी किंपुरूष नि किन्नर । अश्वमुखादि योनी या ब्रह्म्याने रचिल्या पहा ॥ २८ ॥
च - आणि - देवसर्गः - देवांचा सृष्टि - अष्टविधः - आठ प्रकारची - अस्ति - आहे - विबुधाः - देव - पितरः - पितर - असुराः - दैत्य - गन्धर्वाप्सरसः - गंधर्व आणि अप्सरा - सिद्धाः - सिद्ध - यक्षरक्षांसिः - यक्ष आणि राक्षस - चारणाः - चारण ॥२७॥ भूतप्रेतपिशाचाः - भूत, प्रेत, पिशाच - विद्याध्राः - विद्याधर - किन्नरादयः - किन्नर इत्यादि - विदुर - हे विदुरा - एते - हे - दश - दहा - विश्वसृक्कृताः - ब्रह्मदेवाने केलेल्या - सर्गाः - सृष्टि - ते - तुला - आख्याताः - सांगितल्या ॥२८॥
देव, पितर, असुर, गंधर्व-अप्सरा, यक्ष-राक्षस, सिद्ध-चारण-विद्याधर, भूत-प्रेत-पिशाच्च, आणि किन्नर-किंपुरुष-अश्वमुख इत्यादी भेदांनी देवसृष्टी आठ प्रकारची आहे. विदुरा, याप्रमाणे जगत्कर्त्या ब्रह्मदेवांनी रचलेली ही दहा प्रकारची सृष्टी मी तुला सांगितली. (२७-२८)
अतः परं प्रवक्ष्यामि वंशान् मन्वन्तराणि च ।
एवं रजःप्लुतः स्रष्टा कल्पादिष्वात्मभूर्हरिः । सृजत्यमोघसङ्कल्प आत्मैवात्मानमात्मना ॥ २९ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे दशमोऽध्यायः ॥ १० ॥
मन्वंतरादि वंशाचे सांगतो वर्णन पुढे । सत्यसंकल्प भगवान् ब्रह्म्याचे रूप घेऊनी ॥ प्रत्येक कल्प वेळेला रजाने रचितो जग ॥ २९ ॥ ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ दहावा अध्याय हा ॥ ३ ॥ १० ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
अतःपरम् - यापुढे - वंशान् - वंशांना - च - आणि - मन्वन्तराणि - मन्वन्तरांना - प्रवक्ष्यामि - सांगतो - हरिः - परमेश्वर - रजःप्लुतः - रजोगुणाने युक्त होत्साता - कल्पादिषु - कल्पादिकांमध्ये - एवं स्त्रष्टा - याप्रमाणे सृष्टि उत्पन्न करणारा - अमोघसंकल्पः - निष्फळ नाही संकल्प ज्याचा असा - आत्मा एव - स्वतःच - आत्मना - आपल्या योगाने - आत्मानम् - आत्मस्वरूप अशा जगाला - सृजति - निर्माण करतो ॥२९॥
आता यापुढे मी वंश आणि मन्वन्तर इत्यादी सांगेन. अशा प्रकारे सृष्टीरचना करणारे सत्यसंकल्प भगवान हरी हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला रजोगुणाने व्याप्त होऊन स्वतःच जगताच्या रूपाने आपलीच रचना करतात.(२९)
स्कंध तिसरा - अध्याय दहावा समाप्त |