|
श्रीमद् भागवत पुराण ब्रह्मकृता भगवत्स्तुतिः, भगवतो ब्रह्मणे वरप्रदानं च - ब्रह्मदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
ब्रह्मोवाच -
(अनुष्टुप्) ज्ञातोऽसि मेऽद्य सुचिरान्ननु देहभाजां न ज्ञायते भगवतो गतिरित्यवद्यम् । नान्यत्त्वदस्ति भगवन्नपि तन्न शुद्धं मायागुणव्यतिकराद् यदुरुर्विभासि ॥ १ ॥
ब्रह्मदेव म्हणाले - (वसंततिलका) मी जाणिले प्रभू तुला ! बहु काळ गेला दुर्भागि जीव नच हे रुप जाणितात । नाही तुझ्याविण तसा अणु रेणु सुद्धा माया गुणे प्रगटसी जरि सत्य ना ते ॥ १ ॥
भगवन् - हे परमेश्वरा - सुचिरात् तपसः - पुष्कळ काळ केलेल्या तपामुळे - अद्य - आज - त्वम् - तू - मे ज्ञातः असि - माझ्याकडून जाणिला गेला आहेस - ननु - खरोखर - भगवतः - परमेश्वराचे - गतिः - स्वरूप - देहभाजां न ज्ञायते - प्राण्यांना समजत नाही - इति - हा - तेषाम् - त्यांचा - अवद्यम् - दोष - अस्ति - आहे - त्वत् अन्यत् - तुझ्याहून इतर काही - न अस्ति - नाही - यत् भाति - जे भासते - तत् अपि - ते देखील - शुद्धम् - खरे - न - नाही - यत् - कारण - मायागुणव्यतिकरात् - मायेच्या सत्त्व आदिगुणांचे मिश्रण होण्यामुळे - त्वम् - तू - उरुः - अनेक प्रकारचा - विभासि - भासतोस ॥१॥
ब्रह्मदेव म्हणाले - प्रभो, आज पुष्कळ काळानंतर मी आपल्याला जाणू शकलो. पहा ना ! केवढी दुर्भाग्याची गोष्ट आहे की, देहधारी जीव आपल्याला जाणू शकत नाहीत. भगवन, आपल्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नाही, जी जी वस्तू दिसते, तीसुद्धा खरे पाहाता सत्य नाही. कारण मायेच्या गुणांत विषमता उत्पन्न झाल्यामुळेच आपणच अनेक रूपांत प्रतीत होत आहात. (१)
रूपं यदेतदवबोधरसोदयेन ।
शश्वन्निवृत्ततमसः सदनुग्रहाय । आदौ गृहीतमवतारशतैकबीजं । यन्नाभिपद्मभवनाद् अहमाविरासम् ॥ २ ॥
चित् शक्ति तू तळपता तम नाश होतो ज्या नाभिस्थान कमळीं मम जन्म झाला । ते शेकडोस मुळ हो अवतार स्थान त्यांना कृपा करविण्या मम जन्म झाला ॥ २ ॥
अवबोधरसोदयेन - ज्ञानरसाच्या अविर्भावाने - शश्वत् - निरंतर - निवृत्ततमसः - गेले आहे अज्ञान ज्यापासून अशा - तव - तुझे - सदनुग्रहाय - भक्तांवर अनुग्रह करण्याकरिता - आदौ - सृष्टीच्या आरंभी - अवतारशतैकबीजम् - शंभर अवतारांचे मूल कारण असे - यत् - जे रूप - गृहीतम् - स्वीकारिले - च - आणि - यन्नभिपद्मभवनात् - ज्याच्या नाभिकमळरूप आश्रयापासून - अहम् - मी - आविरासम् - उत्पन्न झालो - तत् - ते - एतत् - हे - रूपम् - रूप - अस्ति - आहे ॥२॥
देवाधिदेवा ! आपण आपल्याच चित्शक्तीने प्रकाशित असल्याकारणाने आपल्यापासून अज्ञान नेहमीच दूर राहाते. ज्यांच्या नाभिकमलापासून मी प्रगट झालो, ते आपले रूप शेकडो अवतारांचे मूळ कारण आहे. सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठीच आपण हे पहिल्याप्रथम प्रगट केले आहे. (२)
नातः परं परम यद्भवतः स्वरूपम् ।
आनन्दमात्रमविकल्पमविद्धवर्चः । पश्यामि विश्वसृजमेकमविश्वमात्मन् । भूतेन्द्रियात्मकमदस्त उपाश्रितोऽस्मि ॥ ३ ॥
आनंद,भे विण तू स्वरूपीहि तेज मी विश्व हे रचियण्या तुज प्रार्थियेले । विश्वाअतिता शरण मी समजून आलो संपूर्ण भूत न इंद्रिय आश्रयो तू ॥ ३ ॥
b>अतः - या रूपाहून - परम् - दुसरे - यत् - जे - भवतः - तुझे - अविद्धवर्चः - स्पष्ट आहे प्रकाश ज्याचा असे - स्वरूपम् - स्वरूप - स्यात् - असेल - तत् - ते - न पश्यामि - मी पहात नाही - अतः - म्हणून - परम आत्मन् - हे परमेश्वरा - विश्वसृजम् - जगाला उत्पन्न करणार्या अशा - अविश्वम् - व सृष्टीहून निराळे अशा - भूतेन्द्रियात्मकम् - भूते आणि इंद्रिये आहेत स्वरूप ज्याचे अशा - ते - तुझ्या - अदः एकम् रूपम् - ह्या एका रूपाला - उपाश्रितः - शरण आलेला - अस्मि - मी आहे ॥३॥
परमात्मन, आपले जे आनंदरूप, भेदरहित व अखंड तेजोमय स्वरूप आहे, ते मी या रूपाहून वेगळे समजत नाही. आपण विश्वाची रचना करणारे असूनही, विश्वातीत व अद्वितीय आहात. भूतमात्र आणि इंद्रिये यांचे कारणही आपणच आहात. मी आपल्याला शरण आलो आहे. (३)
तद्वा इदं भुवनमङ्गल मङ्गलाय ।
ध्याने स्म नो दर्शितं त उपासकानाम् । तस्मै नमो भगवतेऽनुविधेम तुभ्यं । योऽनादृतो नरकभाग्भिरसत्प्रसङ्गैः ॥ ४ ॥
हे विश्वमंगलमया तुज पूजितो मी झाली हितास मम ध्यानि तुम्हासि भेट । पापात्मि ज विषयी जीव तुला न ध्याति मी तो तुला नमितसेचि पुनःपुन्हाही ॥ ४ ॥
भुवनमङ्गल - हे त्रैलोक्यमंगला - ते - तुझी - उपासकानाम् - उपासना करणार्या अशा - नः - आमच्या - मङ्गलाय - कल्याणाकरिता - तत् इदम् - ते हे स्वरूप - ध्याने - ध्यानामध्ये - वै - खरोखर - दर्शितम् - दाखविलेस - यः - जो - त्वम् - तू - असत्प्रसङ्गैः - निरिश्वरवादादि दुष्ट विषयांनी - नरकभाग्भिः - नरकाचे सेवन करणार्या पुरुषांनी - अनादृतः - अनादर केलेला असा - असि - आहेस - तस्मै - त्या - भगवते - परमेश्वर अशा - तुभ्यम् - तुला - नमः - नमस्कार - अनुविधेम - करतो ॥४॥
हे विश्वकल्याणमय देवा, मी आपला उपासक आहे. माझ्या हितासाठीच आपण मला ध्यानात आपले हे रूप दाखविले. जो जीव पापात्मा, विषयासक्त आहे, तोच याचा अनादर करतो. मी आपल्या या रूपाला वारंवार नमस्कार करतो. (४)
ये तु त्वदीयचरणाम्बुजकोशगन्धं ।
जिघ्रन्ति कर्णविवरैः श्रुतिवातनीतम् । भक्त्या गृहीतचरणः परया च तेषां । नापैषि नाथ हृदयाम्बुरुहात्स्वपुंसाम् ॥ ५ ॥
जे वेद वायुरुप वेगि पदारविंदी गंधास कर्णपटि सेविति नित्य संत । त्यांच्या न तू हृदय या कमळास दूर ते बांधिती स्वमनची तव पादपद्मा ॥ ५ ॥
नाथ - हे ईश्वरा - ये - जे - तु - तर - श्रुतिवातनीतम् - वेदरूपी वायूने वाहून नेलेल्या - त्वदीयचरणाम्बुजकोशगन्धम् - तुझ्या चरणरूपी कमलकलिकेचा सुगंध - कर्णविवरैः - कर्णरूपी द्वारांनी - जिघ्रन्ति - हुंगतात - तेषाम् - त्या - स्वपुंसाम् - आपल्या भक्तांच्या - परया - उत्कृष्ट - भक्त्या - भक्तीने - गृहीतचरणः - धरले आहेत पाय ज्याचे असा - त्वम् - तू - तेषाम् - त्यांच्या - हृदयाम्बुजरुहात् - अंतःकरणरूपी कमलापासून - न अषैषि च - दूर होत नाहीस ॥५॥
स्वामी, जे लोक वेदरूप वायूने आणलेल्या आपल्या चरणरूपी कमलकोशातील सुगंध आपल्या कानांनी ग्रहण करतात, त्या आपल्या भक्तजनांच्या हृदयकमलातून कधीच आपण बाहेर पडत नाही. कारण त्यांनी पराभक्तिरूप दोरीने आपल्या चरणकमलांना बांधले आहे. (५)
तावद्भयं द्रविणगेहसुहृन्निमित्तं ।
शोकः स्पृहा परिभवो विपुलश्च लोभः । तावन्ममेत्यसदवग्रह आर्तिमूलं । यावन्न तेऽङ्घ्रिमभयं प्रवृणीत लोकः ॥ ६ ॥
नाही पदां रण जो नच आश्रियेला तेंव्हा तया धन घरादि भये नि शोक । ती लालसा भयप्रदो अन दीन होण्या ती एक दुःप्रद कारण जीव भोगी ॥ ६ ॥
यावत् - जोपर्यंत - लोकः - लोक - ते - तुझ्या - अभयम् - निर्भय अशा - अङ्घ्रिम् - चरणाला - न प्रवृणीत - स्वीकारीत नाहीत - तावत् - तोपर्यंत - तस्य - त्यांचे - द्रविणगेहसुहृन्निमित्तम् - द्रव्य, घर व मित्र हे आहेत कारण ज्याचे अशी - भयम् - भीति - अस्ति - असते - शोकः - शोक - स्पृहा - इच्छा - परिभवः - अनादर - विपुलः - पुष्कळ - लोभः - लोभ - च - आणि - तावत् - तोपर्यंत - सन्ति - असतात - मम इति - माझे असा - असदवग्रहः - खोटा अभिमान - आर्तिमूलम् - दुःखाचे कारण - भवति - होतो ॥६॥
जोपर्यंत माणूस आपल्या अभय देणार्या चरणकमलांचा आश्रय घेत नाही, तोपर्यंत त्याला धन, घर आणि सुहृदांपासून होणारे भय, शोक, लालसा, अपमान आणि अत्यंत लोभ सतावीत राहातात. शिवाय तोपर्यंतच त्याच्यामध्ये जो दुःखाचे एकमात्र कारण आहे, तो ‘मी-माझे ’असा दुराग्रह राहातो. (६)
दैवेन ते हतधियो भवतः प्रसङ्गात् ।
सर्वाशुभोपशमनाद् विमुखेन्द्रिया ये । कुर्वन्ति कामसुखलेशलवाय दीना । लोभाभिभूतमनसोऽकुशलानि शश्वत् ॥ ७ ॥
कीर्ती तुझी हटवितेच अमंगलाला तेथे न गुंतिन नी विषयास भोगी । त्याच्या सुखार्थ करि जो नित हीन कर्म तेणे त्यजानि दिधले जणु प्राक्तनाते ॥ ७ ॥
दीनाः - दुःखित असे - लोभाभिभूतमनसः - व लोभाने ग्रासलेली आहेत अंतःकरणे ज्याची असे - ये - जे - सर्वाशुभोपशमनात् - सर्व दुःखांना दूर करणार्या अशा - भवतः - तुझ्या - प्रसंङ्गात् - कथा ऐकणे इत्यादी विषयांपासून - विमुखेन्द्रियाः - पराङ्मुख आहेत इन्द्रिये ज्यांची असे - कामसुखलेशलवाय - विषयसुखाच्या अतिशय अल्प अंशाकरिता - शश्वत् - निरंतर - अकुशलानि - दुःखजनक काम्य कर्मे - कुर्वन्ति - करतात - ते - ते - दैवेन - प्रारब्धाने - हतधियः - नष्ट झाली आहे बुद्धि ज्यांची असे - भवन्ति - होतात ॥७॥
सर्व प्रकारच्या अमंगल गोष्टी नष्ट करणारे आपले श्रवण-कीर्तनादी प्रसंग यांच्यापासून इंद्रियांना दूर ठेवून किंचित विषय-सुखासाठी दीन आणि लोभाने मनोमन लाचार होऊन नेहमी दुष्कर्मात गढून जातात, अशा बिचार्या लोकांची बुद्धी दैवाने हिरावून घेतलेली असते. (७)
क्षुत्तृट्त्रधातुभिरिमा मुहुरर्द्यमानाः ।
शीतोष्णवातवर्षैरितरेतराच्च । कामाग्निनाच्युत रुषा च सुदुर्भरेण । सम्पश्यतो मन उरुक्रम सीदते मे ॥ ८ ॥
तृष्णा नि भूक कफ वात नि पित्त थंडी ऊष्मादिका अन हि काम तसेचि क्रोधी । भोगी प्रज सतत हे मज पाहुनीया होते प्रभो अतिव दुःख मना न साहे ॥ ८ ॥
उरुक्रम - मोठा आहे पराक्रम ज्याचा अशा - अच्युत - हे परमेश्वरा - क्षुट्त्रिधातुभिः - क्षुधा - शीतोष्णवातवर्षैः - व थंडी, ऊन, वारा व पाऊस यांनी - च - आणि - इतरेतरात् - परस्परांपासून - सुदुर्भरेण - अत्यंत दुःसह अशा - कामाग्निना - कामरूपी अग्नीने - च - आणि - रुषा - क्रोधाने - मुहुः - वारंवार - अर्द्यमानाः - पीडिल्या जाणार्या अशा - इमाः - ह्या प्रजांना - संपश्यतः - पाहणार्या - मे - माझे - मनः - मन - सीदते - दुःखित होते ॥८॥
हे अच्युता, हे उरुक्रमा, या प्रजेला तहान-भूक, वात, पित्त, कफ, सर्दी, उष्णता, हवा आणि पाऊस अशा परस्पर भिन्न तसेच कामाग्नी आणि सहन न होण्यासारख्या क्रोधामुळे जे कष्ट सोसावे लागतात, ते पाहून माझे मन फारच खिन्न होते. (८)
यावत् पृथक्त्वमिदमात्मन इन्द्रियार्थ ।
मायाबलं भगवतो जन ईश पश्येत् । तावन्न संसृतिरसौ प्रतिसङ्क्रमेत । व्यर्थापि दुःखनिवहं वहती क्रियार्था ॥ ९ ॥
माया प्रभाव पडता जिव पाहतो ती स्वरूप अणि तुजला बघती निराळा । स्वामी तयास कुठली भवमुक्ति ? नाही ! मिथ्या तरहि जिव भोगि स्वकर्म दुःख ॥ ९ ॥
ईश - हे परमेश्वरा - यावत् - जोपर्यंत - जनः - लोक - भगवतः - परमेश्वराची - इन्द्रियार्थमायाबलम् - इंन्द्रियस्वरूप व विषयस्वरूप जी माया तिचे आहे बल ज्याला अशा - इदम् - ह्या देह व जग इत्यादिकांना - आत्मनः - परमेश्वराहून - पृथक्त्वम् - भिन्नपणाने - पश्येत् - पाहील - तावत् - तोपर्यंत - क्रियार्था - कर्माचे आहे फल ज्यामध्ये असा - दुःखनिवहम् - दुःखसमूहाला - वहती - प्राप्त करून देणारा - व्यर्था अपि - खोटा असा देखील - असा - हा - संसृतिः - संसार - न प्रतिसंक्रमेत - निवृत्त होणार नाही ॥९॥
स्वामी, जोपर्यंत मनुष्य इंद्रिय आणि विषयरूपी मायेच्या प्रभावाने स्वतःला तुमच्यापासून वेगळा समजतो, तोपर्यंत त्याची या संसारचक्रातून सुटका होत नाही. हा संसार जरी खोटा आहे, तथापि कर्म-फलभोग याद्वाराच भोगावे लागत असल्याने ते त्याला अनेक दुःखात लोटतात. (९)
अह्न्यापृतार्तकरणा निशि निःशयाना ।
नानामनोरथधिया क्षणभग्ननिद्राः । दैवाहतार्थरचना ऋषयोऽपि देव । युष्मत् प्रसङ्गविमुखा इह संसरन्ति ॥ १० ॥
साक्षात जे हृषि मुनी नच कीर्तनाचा आनंद ना मळविता फसती भवात । विक्षिप्त चित्त दिन रात्र ध्यास निद्राहि ना मग तया धन ही न लाभे ॥ १० ॥
देव - हे परमेश्वरा - इह - या लोकात - युष्मत्प्रसङ्गविमुखाः - तुझ्या कथा, उपासना इत्यादी विषयांपासून तोंड फिरविलेले असे - ऋषयः अपि - ऋषि देखील - अह्नि - दिवसा - आपृतार्तकरणाः - कर्मे करण्यात गुंतलेली म्हणूनच पीडित आहेत इंन्द्रिये ज्यांची असे - निशि - रात्री - निःशयानाः - झोपी जाणारे असे - नानामनोरथाधिया - अनेक प्रकारचे आहेत मनोरथ जीमध्ये अशा बुद्धीने - क्षणभग्ननिद्राः - क्षणोक्षणी नष्ट झाली आहे निद्रा ज्यांची असे - देवाहतार्थरचनाः - प्रारब्धामुळे चोहोकडून नष्ट झाला आहे द्रव्यसंपादनाचा उद्योग ज्यांचा असे - संसरन्ति - संसारात पडतात ॥१०॥
देवाधिदेवा, साक्षात मुनीसुद्धा जर आपल्या कथा-कीर्तनांना विन्मुख झाले, तर त्यांनाही संसारात अडकावे लागते.ते दिवसा अनेक प्रकारच्या कामकाजात राहिल्याने त्यांचे चित्त विचलित होते, रात्री ते झोपेत अचेतनासारखे पडून राहतात, त्यावेळी निरनिराळे मनोरथ केल्यामुळे क्षणाक्षणाला त्यांची झोप उडते आणि दैवयोगाने अर्थसिद्धीचे त्यांचे सर्व उद्योगही विफल होतात. (१०)
त्वं भक्तियोगपरिभावितहृत्सरोज ।
आस्से श्रुतेक्षितपथो ननु नाथ पुंसाम् । यद् यद् धिया ते उरुगाय विभावयन्ति । तत्तद् वपुः प्रणयसे सदनुग्रहाय ॥ ११ ॥
नाथा ! तुझा कळतसे गुण-गानि मार्ग जो भक्तियेग करितो हृदयात तू त्या । जो जै भजे धरूनि भाव करूनि गान तैशा रुपासरूनि मग बोध देसी ॥ ११ ॥
नाथ - हे ईश्वरा - श्रुतेक्षितपथः - श्रवणाच्या योगाने पाहिला आहे मार्ग ज्याचा असा - त्वम् - तू - पुंसाम् - पुरुषांच्या - भावयोगपरिभावितहृत्सरोजे - भक्तीयोगाने शुद्ध झालेल्या हृदयरूपी कमळात - ननु - खरोखर - आस्से - वास करतोस - उरुगाय - हे अनंतकीर्ते - ते - तुझ्या - यत् यत् - ज्या ज्या शरीराला - धिया - मनाने - विभावयन्ति - ध्यातात - तत् तत् - ते ते - वपुः - शरीर - सदनुग्रहाय - भक्तांवर अनुग्रह करण्याकरिता - प्रणयसे - प्रगट करतोस ॥११॥
नाथ, केवळ आपले गुणगान ऐकल्यानेच आपला मार्ग कळतो. आपण निश्चितच माणसाने केलेल्या भक्तियोगाने शुद्ध झालेल्या हृदयकमलात निवास करता.हे पुण्यश्लोक प्रभो, आपले भक्त ज्या ज्या भावनेने आपले चिंतन करतात, त्या साधुपुरुषांवर कृपा करण्यासाठी आपण तेच रूप धारण करता. (११)
नातिप्रसीदति तथोपचितोपचारैः ।
आराधितः सुरगणैर्हृदि बद्धकामैः । यत्सर्वभूतदययासदलभ्ययैको । नानाजनेष्ववहितः सुहृदन्तरात्मा ॥ १२ ॥
तूं एकटा निसतो परि सर्वभूती त्या देवता धरूनि हेतु तुला पुजिती । ना पावसी कधिहि तू हवि यज्ञकर्मीं जो सर्वभूत जतो मग त्यास पावे ॥ १२ ॥
नानाजनेषु - अनेक लोकांमध्ये - अवहितः - अंतर्यामिरूपाने असलेला - सुहृत् - व मित्र असा - अन्तरात्मा - व गुप्तरूपाने संचार करणारा असा - एकः - एक - भवान् - तू - यत् - जसा - असदलभ्यया - दुर्जनांनी प्राप्त करण्यास अशक्य अशा - सर्वभूतदयया - सर्व प्राण्यांवरील दयेने - अतिप्रसीदति - अत्यंत प्रसन्न होतोस - तथा - तसा - हृदि - हृदयात - बद्धकामैः - ठेविली आहे इच्छा ज्यांनी अशा - सुरगणैः - देवांच्या समूहांनी - उपचितोपचारैः - पुष्कळ उपहारांनी - आराधितः - आराधना केलेला असा - न प्रसीदति - प्रसन्न होत नाही ॥१२॥
भगवन, आपण एक आहात. तसेच सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात राहणारे त्यांचे परम हितकारी असे अंतरात्मा आहात. म्हणून जरी देवतांनी आपल्या हृदयांत निरनिराळ्या प्रकारच्या कामना ठेवून हरतर्हेच्या भरपूर सामग्रींनी आपले पूजन केले, तरीसुद्धा आपण तितके प्रसन्न होत नाही, जितके सर्व प्राण्यांवर दया केल्याने प्रसन्न होता. परंतु ही सर्वभूतदया अभक्त पुरुषांना दुर्लभ आहे. (१२)
पुंसामतो विविधकर्मभिरध्वराद्यैः ।
दानेन चोग्रतपसा परिचर्यया च । आराधनं भगवतस्तव सत्क्रियार्थो । धर्मोऽर्पितः कर्हिचिद् ध्रियते न यत्र ॥ १३ ॥
जो आर्पिलेतुजसि कर्म न नाश पावे हेतु तुझाच असता फल रूप याग । दानादि कतिव हेतु अपार श्रेष्ठ नाही मुळी कठिण कांहि तुझ्या कृपेने ॥ १३ ॥
अतः - यास्तव - पुंसाम् - पुरुषांचे - अध्वराद्यैः - यज्ञ इत्यादि - विविधकर्मभिः - नाना प्रकारच्या कर्मांनी - दानेन - दानाने - उग्रतपसा च - आणि तीव्र तपश्चर्येने - च - आणि - व्रतचर्यया - व्रतांच्या आचरणाने - भगवतः - षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा - तव - तुझा - आराधनम् एव - संतोषच - सत्क्रियार्थः - उत्तम कर्मफल - अस्ति - आहे - यत्र - ज्या तुझ्या ठिकाणी - अर्पितः - अर्पण केलेला - धर्मः - धर्म - कर्हिचित् - कधीही - न हृयते - नष्ट होत नाही ॥१३॥
जे कर्म आपल्याला अर्पण केले जाते, त्याचा कधीही नाश न होता ते अक्षय राहाते. म्हणून दान, खडतर तप, व्रते, यज्ञ इत्यादी कर्मे यांच्या द्वारा आपली आराधना करणे हेच मनुष्याचे सर्वांत मोठे कर्मफळ आहे. (१३)
शश्वत्स्वरूपमहसैव निपीतभेद ।
मोहाय बोधधिषणाय नमः परस्मै । विश्वोद्भवस्थितिलयेषु निमित्तलीला । रासाय ते नम इदं चकृमेश्वराय ॥ १४ ॥
प्राण्यास भद-भ्रम जो तुझिया प्रकाशे संपोनि जाय सगळा तयि अंधकार । उत्पत्ति नी स्थिति लयी तव खेळ आहे तेंव्हा तुला प्रभु नमो नि नमो सदाही ॥ १४ ॥
शश्वत् - निरंतर - स्वरूपमहसा एव - ज्ञानस्वरूपाच्या प्रकाशानेच - निपीतभेदमोहाय - दूर झाला आहे भेदरूपी भ्रम ज्यापासून अशा - बोधधिषणाय - व ज्ञान हीच आहे विद्याशक्ति ज्याची अशा - परस्मै - श्रेष्ठ अशा परमेश्वराला - नमः - नमस्कार - अस्तु - असो - विश्वोद्भवस्थितिलयेषु - सृष्टीची उत्पत्ति, पालन व संहार याविषयी - निमित्तलीलारासाय - कारण अशी जी माया तिच्या लीला हीच आहे क्रीडा ज्याची अशा - ईश्वराय - सर्वांचे नियमन करणार्या - ते - तुला - इदम् नमः - हा नमस्कार - चकृम - करतो ॥१४॥
आपण नेहमी आपल्या स्वरूपाच्या प्रकाशानेच प्राण्यांचा भेदभ्रमरूप अंधकार नाहीसा करता. आपण ज्ञानाचे अधिष्ठान साक्षात परमपुरुष आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार यांच्या निमित्ताने जी मायेची लीला होते, तो सर्व आपला खेळ आहे अशा परमेश्वरास मी वारंवार नमस्कार करतो. (१४)
यस्यावतार गुणकर्मविडम्बनानि ।
नामानि येऽसुविगमे विवशा गृणन्ति । तेऽनैकजन्मशमलं सहसैव हित्वा । संयान्त्यपावृतामृतं तमजं प्रपद्ये ॥ १५ ॥
जो प्राणत्यग समयी भजतो तुला नी होऊनिया विवश नाम वदेल वाचे । तो त्यागिते सकल कर्म नि ब्रह्म होतो । अजन्म तू शरण मी तुजला परेशा ॥ १५ ॥
असुविगमे - प्राणोत्क्रमणाच्या वेळी - विवशाः - पराधीन झालेले - ये - जे - यस्य - ज्या तुझी - अवतारगुणकर्मविडम्बनानि - अवतार, गुण व कर्मे यांचे आहे अनुकरण ज्यांमध्ये अशी - नामानि - भक्तवत्सल गोवर्धनधारी, दामोदर इत्यादि नावे - गृणन्ति - उच्चारितात - ते - ते पुरुष - नैकजन्मशमलम् - अनेक जन्मातील पाप - सहसा एव - एका वेळीच - हित्वा - टाकून - अपावृतम् - आवरण नसलेल्या अशा - ऋतम् - ब्रह्माला - संयान्ति - प्राप्त होतात - तम् - त्या - अजम् - जन्मरहित अशा ईश्वराला - प्रपद्ये - मी शरण आलो आहे ॥१५॥
जे लोक प्राणत्याग करताना आपले अवतार, गुण आणि कर्मांना सूचित करणारी नावे पराधीन स्थितीतही घेतात, ते अनेक जन्मांच्या पापांतून तत्काल मुक्त होऊन माया-आवरणरहित असलेल्या ब्रह्मपदाला प्राप्त करतात.त्या अजन्मा अशा आपल्याला मी शरण आलो आहे. (१५)
यो वा अहं च गिरिशश्च विभुः स्वयं च ।
स्थित्युद्भवप्रलयहेतव आत्ममूलम् । भित्त्वा त्रिपाद्ववृध एक उरुप्ररोहः । तस्मै नमो भगवते भुवनद्रुमाय ॥ १६ ॥
तू विश्वरूप तरुसीच विराजमान स्वीकार तू करुनिया गुण तीन आम्ही । शाखेस भेद भरूनी मग जन्मलो की शाखा तुझ्याच मनु या तुजला मनी मी ॥ १६ ॥
आत्ममूलम् - आपणच आहे अधिष्ठान जिचे अशा प्रकृतीला - भित्वा - भेदून - यः - जो त्रिभुवनरूपी वृक्ष - स्थित्युद्भवप्रलयहेतवः - पालन्, उत्पति व नाश यांचे कारण असा - च - आणि - विभुः - व्यापक असा - स्वयंम् - स्वतः विष्णू - च - आणि - अहम् - मी - च - आणि - गिरिशः - शंकर - इति - असे - त्रिपात् - तीन आहेत पाय ज्याला असा - एकः - एक - उरुप्ररोहः - व अनेक आहेत फांद्या ज्याला असा - ववृधे - वाढला - तस्मै - त्या - भगवान् - भगवान - त्रिभुवनद्रुमाय - त्रिभुवनरूपी वृक्षाला - नमः - नमस्कार - अस्तु - असो ॥१६॥
भगवन, या विश्ववृक्षाच्या रूपात आपणच विराजमान आहात. आपणच आपल्या मूळ प्रकृतीचा स्वीकार करून जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करण्यासाठी मी, आपण आणि महादेव अशा तीन प्रमुख रूपांत विभक्त झाला आहात आणि पुन्हा प्रजापती, मनू इत्यादी शाखा-उपशाखांच्या रूपांत विस्तार पावला आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. (१६)
लोको विकर्मनिरतः कुशले प्रमत्तः ।
कर्मण्ययं त्वदुदिते भवदर्चने स्वे । यस्तावदस्य बलवान् इह जीविताशां । सद्यश्छिनत्त्यनिमिषाय नमोऽस्तु तस्मै ॥ १७ ॥
देवा तुझा शणधर्म हितैषि ऐसा तू हा स्वये कथियला परि जीव भ्रांत । त्याचा प्रमाद करितो सुखनाश सारा ती नाशशक्ति तुझिची नमितो तुला मी ॥ १७ ॥
यावत् - जोपर्यंत - अयम् - हा - लोकः - लोक - त्वदुदिते - तू सांगितलेल्या - कुशले - कल्याणकारक - स्वे - स्वकीय अशा - भवदर्चने कर्मणि - तुझ्या अर्चनरूपी कर्मात - प्रमत्तः - प्रमाद करणारा - विकर्मनिरतः - विरुद्ध अशा यज्ञादि काम्य कर्मामध्ये तत्पर असा - अस्ति - असतो - तावत् - तोपर्यंत - यः - जो - बलवान् - बलाढ्य असा - इह - या लोकात - अस्य - या जगाची - जीविताशाम् - जगण्याची आशा - सद्यः - तत्काल - छिनत्ति - तोडतो - तस्मै - त्या - अनिमिषाय - नित्य जागृत अशा कालाला - नमः - नमस्कार - अस्तु - असो ॥१७॥
भगवन, आपली आराधना हाच आपण लोकांना स्वधर्म सांगितला आहे; परंतु ते याबाबतीत उदासीन असून नेहमी निषिद्ध कर्मातच गुरफटलेले असतात. अशा जीवांच्या जीवन-आशेला जो तत्काळ तोडून टाकतो, तो बलवान काल आपलेच स्वरूप आहे. अशा आपल्याला मी नमस्कार करतो. (१७)
यस्माद्बिभेम्यहमपि द्विपरार्धधिष्ण्यं ।
अध्यासितः सकललोकनमस्कृतं यत् । तेपे तपो बहुसवोऽवरुरुत्समानः । तस्मै नमो भगवतेऽधिमखाय तुभ्यम् ॥ १८ ॥
मी सत्यलोक अधिदेव जगात श्रेष्ठ तोमी भिऊनि तुयि ययि कालरूपा । केले तसेचि बहु ते तप,सा-----त तू यज्ञरूप अधि हा नमितो तुला मी ॥ १८ ॥
यत् - जे - सर्वलोकनमस्कृतम् - संपूर्ण लोकांनी नमस्कार केलेले असे - द्विपरार्धधिष्ण्यम् - दोन परार्ध कालपर्यंत टिकणारे स्थान - अस्ति - आहे - तत् - त्या स्थानावर - अध्यासितः अपि - बसलेला असून सुद्धा - अहम् - मी - यस्मात् - ज्या तुझ्यापासून - विभेमि - भितो - च - आणि - अवरुरुत्समानः - तुझ्या प्राप्तीची इच्छा करणारा असा - बहुसवः - व पुष्कळ केले आहेत यज्ञ ज्याने असा - तपः - तपश्चर्या - तेपे - करता झाला - तस्मै - त्या - अधिमखाय - यज्ञांचा आश्रय अशा - भगवते - व सर्वगुणसंपन्न अशा - तुभ्यम् - तुला - नमः - नमस्कार असो ॥१८॥
दोन परार्धांपर्यंत राहाणारा आणि सर्वांना वंदनीय अशा सत्यलोकाचा मी अधिष्ठाता असलो, तरी मी कालाला भितो. आपली प्राप्ती करून घेण्यासाठी मी पुष्कळ काळपर्यंत तपश्चर्या केली. अधियज्ञरूपाने त्या तपाचे साक्षीदार असणार्या आपल्याला मी नमस्कार करतो. (१८)
तिर्यङ्मनुष्यविबुधादिषु जीवयोनि ।
ष्वात्मेच्छयात्मकृतसेतुपरीप्सया यः । रेमे निरस्तविषयोऽप्यवरुद्धदेहः । तस्मै नमो भगवते पुरुषोत्तमाय ॥ १९ ॥
तू पूर्णकाम असी विषयास मुक्त तू आपुली परिसिमा अन धर्मकार्या । पक्षी नि ते पशु शा मग योनि अंशे भोगि सुखास लिलया नमो तुला मी ॥ १९ ॥
निरस्तरतिः अपि - टाकलेले आहे विषयसुख ज्याने असा असूनहि - यः - जो - आत्मकृतसेतुपरीप्सया - आपण केलेल्या धर्ममर्यादेचे पालन करणार्या इच्छेने - तिर्यंङ्मनुष्यविबुधादिषु - पश्वादि प्राणी, मनुष्य, देव इत्यादि - जीवयोनिषु - जीवयोनामध्ये - आत्मेच्छया - आपल्या इच्छेने - अवरुद्धदेहः - घेतले आहे शरीर ज्याने असा - रेमे - क्रीडा करतो - तस्मै - त्या - पुरुषोत्तमाय - पुरुषश्रेष्ठ अशा - भगवते - परमेश्वराला - नमः - नमस्कार असो ॥१९॥
कोणत्याही विषयसुखाची ज्यांना इच्छा नाही, तरीसुद्धा ज्यांनी स्वतःच निर्माण केलेल्या धर्ममर्यादांचे रक्षण करण्यासाठी पशु-पक्षी, मनुष्य, देव इत्यादी जीवयोनींमध्ये आपल्याच इच्छेने शरीर धारण करून अनेक लीला केल्या आहेत, अशा भगवान पुरुषोत्तमाला माझा नमस्कार असो. (१९)
योऽविद्ययानुपहतोऽपि दशार्धवृत्त्या ।
निद्रामुवाह जठरीकृतलोकयात्रः । अन्तर्जलेऽहिकशिपुस्पर्शानुकूलां । भीमोर्मिमालिनि जनस्य सुखं विवृण्वन् ॥ २० ॥
तू राग नी अभिनिवेष नि द्वेष दंभ नाहीस तू अधिही तयि त्या अविद्यीं । सारे तुझ्याच उदरी मिटवूनि शय्यी झोपून हा श्रमित तू पहुडे असा हा ॥ २० ॥
दशार्धवृत्त्या - तम आदि पाच आहेत वृत्ति जिच्या अशी - अविद्यया - अविद्येने - अनुपहतः अपि - व्याप्त नसून सुद्धा - जठरीकृत लोकयात्रः - उदरामध्ये लीन केली आहे लोकरचना ज्याने असा - यः - जो - सुखम् - सुखाचा - विवृण्वन् - विस्तार करणारा असा - भीमोर्मिमालिनि - भयंकर लाटांच्या माला आहेत ज्यामध्ये अशा - अन्तर्जले - पाण्यात - अहिकशिपुस्पर्शानुकूलाम् - शेषरूपी शय्येचा स्पर्श आहे अनुकूल जिला अशी - निद्राम् - योगनिद्रा - उवाह - घेता झाला ॥२०॥
प्रभो, आपण अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश यांपैकी कशानेही ग्रस्त नाही, तरीसुद्धा या वेळी सर्व विश्वाला आपल्या पोटात लीन करून घेऊन भयंकर लाटांनी प्रक्षुब्ध झालेल्या प्रलयकालीन जलामध्ये पूर्वकल्पातील कर्मपरंपरेने थकलेल्या जीवांना विश्रांती देण्यासाठी आपण शेषरूप कोमल शय्येवर शयन करीत आहात. (२०)
यन्नाभिपद्मभवनाद् अहमासमीड्य ।
लोकत्रयोपकरणो यदनुग्रहेण । तस्मै नमस्त उदरस्थभवाय योग । निद्रावसानविकसन् नलिनेक्षणाय ॥ २१ ॥
मी जन्मलो कमलनाभिं तुझ्याच पोटी जे साठले सकल विश्व तुझाच पोटी । ते विश्व तू रचियण्या मज दे कृपा ती सारोनि योगनिज ही,नमितो तुला मी ॥ २१ ॥
ईडय - स्तुति करण्यास योग्य अशा हे परमेश्वरा - यन्नाभिपद्मभवनात् - ज्यांच्या नाभीरूप कमलाच्या आश्रयापासून - अहम् - मी - आसम् - उत्पन्न झालो - च - आणि - यदनुग्रहेण - ज्याच्या कृपेने - लोकत्रयोपकरणः - तीन लोक उत्पन्न करण्याची साधने प्राप्त झाली ज्याला असा - आसम् - झालो - तस्मै - त्या - उदरस्थभवाय - उदरात आहे सर्व सृष्टि ज्याच्या अशा - योगनिद्रावसानविकसन्नलिनेक्षणाय - व योगनिद्रेच्या शेवटी उघडलेले आहेत कमलनेत्र ज्याने अशा - ते - तुला - नमः - नमस्कार ॥२१॥
हे स्तुत्य असणार्या भगवन, आपल्या नाभिकमलरूप घरात माझा जन्म झाला आहे. हे संपूर्ण विश्व आपल्या पोटात सामावले आहे. आपल्या कृपेने मी त्रैलोक्याची रचना करण्याच्या उपकाराला समर्थ झालो आहे. यावेळी आपली योगनिद्रा समाप्त झाली असल्याकारणाने आपले नेत्रकमल उघडू लागले आहेत. अशा आपणास माझा नमस्कार असो. (२१)
सोऽयं समस्तजगतां सुहृदेक आत्मा ।
सत्त्वेन यन्मृडयते भगवान् भगेन । तेनैव मे दृशमनुस्पृशताद्यथाहं । स्रक्ष्यामि पूर्ववदिदं प्रणतप्रियोऽसौ ॥ २२ ॥
तू तो समस्त जगता सुहृदेक आत्मा तू पावसी निजकृपे शरणागताला । तू षड् गुणे करिहि जग मोद युक्त तेणे भरे मम मती रचण्यास विश्व ॥ २२ ॥
सः अयम् - तो हा - समस्तजगताम् - सर्व त्रैलोक्याचा - सुहृत् - मित्र असा - एकः - एक - आत्मा - व सर्वात भरलेला असा - भगवान् - भगवान - यत् - ज्या - सत्त्वेन - ज्ञानाच्या योगाने - च - आणि - भगेन - ऐश्वर्याच्या योगाने - मृडयते - कृपा करतो - तेन एव - त्याच्याच योगाने - असौ प्रणतप्रियः - हा भक्तांचा कैवारी - मे - माझ्या - दृशम् - दृष्टीला - अनुस्पृशतात् - युक्त करो - यथा - जेणेकरून - अहम् - मी - पूर्ववत् - पूर्वीप्रमाणे - इदम् - हे विश्व - स्त्रक्ष्यामि - उत्पन्न करीन ॥२२॥
आपण संपूर्ण जगाचे एकमात्र सुहृद आणि आत्मा आहात, तसेच शरणागतांवर कृपा करणारे आहात. आपल्या ज्या ज्ञान आणि ऐश्वर्याने आपण या विश्वाला आनंदित करीत आहात, त्यानेच माझ्या बुद्धीलाही युक्त करावे.त्यामुळे मी पूर्वकल्पातल्याप्रमाणे यावेळीही सृष्टीची रचना करू शकेन. (२२)
एष प्रपन्नवरदो रमयात्मशक्त्या ।
यद्यत् करिष्यति गृहीतगुणावतारः । तस्मिन्स्वविक्रममिदं सृजतोऽपि चेतो । युञ्जीत कर्मशमलं च यथा विजह्याम् ॥ २३ ॥
भक्तास कल्पतरु तू कमले सहीत घेऊनि कर्म कासी अवतार लीला । दे प्रेरणा रचियण्या अन शक्ति दे तू जेणे न राहि मजला अभिमा त्याचा ॥ २३ ॥
आत्मशक्त्या - आप ली शक्तिरूप अशा - रमया - लक्ष्मीसहित - गृहीत गुणावतारः - घेतले आहेत सत्त्वादि गुणाच्या योगे अवतार ज्याने असा - प्रपन्नवरदः - शरण आलेल्यांना वर देणारा असा - एषः - हा परमेश्वर - यत् यत् - जे जे कर्म - करिष्यति - करील - तस्मिन् - त्या कर्माच्या ठिकाणी - स्वविक्रमम् - विष्णूचाच आहे प्रभाव ज्यामध्ये असे - इदम् - हे विश्व - सृजतः - उत्पन्न करणार्या अशा - मे - माझे - चेतः - अंतःकरण - सः - तो परमेश्वर - युञ्जीत - युक्त करो - यथा - जेणेकरून - कर्म - कर्माविषयीची आसक्ती - च - आणि - शमलम् - व त्यापासून उत्पन्न झालेले पाप - विजह्याम् - मी टाकून देईन ॥२३॥
आपण भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे आहात. आपली शक्ती असलेल्या लक्ष्मीसहित अनेक गुणावतार घेऊन आपण जी जी अद्भुत कर्मे कराल, त्यांपैकीच एक म्हणजे मी करीत असलेला सृष्टीरचनेचा हा उद्योग ! म्हणून यावेळी आपण माझ्या चित्तात प्रेरणा निर्माण करावी की ज्यामुळे सृष्टिरचनाविषयक अभिमानापासून मी दूर राहू शकेन. (२३)
नाभिह्रदादिह सतोऽम्भसि यस्य पुंसो ।
विज्ञानशक्तिरहमासमनन्तशक्तेः । रूपं विचित्रमिदमस्य विवृण्वतो मे । मा रीरिषीष्ट निगमस्य गिरां विसर्गः ॥ २४ ॥
मी तो तुझ्या कमलनाभित जन्मलो नी विज्ञान शक्ति मज पासि तुझीच आहे । या सृष्टिला रयिण्या जरि वेळ गेला तेंव्हाहि मी न विसरो मनि वेदमंत्रा ॥ २४ ॥
अंभसि - उदकामध्ये - यस्य अनंतशक्तेः पुंसः - ज्या अमित पराक्रमी अशा पुरुषाच्या - नाभिहृदात् - नाभिरूप सरोवरातून - इह - येथे - विज्ञानशक्तिः अहं - महत्तत्त्वरूप जे चित्त ते आहे शक्ती ज्याची असा मी - आसम् - उत्पन्न झालो - अस्य - त्या आदिपुरुषाचे - इदं विचित्रं रुपं - हे विचित्र रूप असे जग - विवृण्वतः मे - विस्तृत करणार्या माझ्या - निगमस्य - वेदरूप - गिरां विसर्गः - वाणीचे उच्चारण - मा अरीरिषीष्ट - लुप्त होऊ नये ॥२४॥
प्रभो, या जलात शयन करीत असताना अनंतशक्ती अशा परम पुरुषाच्या नाभिकमलातून माझी उत्पत्ती झाली आहे. आणि मीच आपली विज्ञानशक्ती आहे म्हणून या जगाच्या विविधतेने नटलेल्या रूपाचा विस्तार करतेवेळी माझ्या वेदरूप वाणीच्या उच्चारणाचा लोप न होवो. (२४)
सोऽसौ अदभ्रकरुणो भगवान् विवृद्ध ।
प्रेमस्मितेन नयनाम्बुरुहं विजृम्भन् । उत्थाय विश्वविजयाय च नो विषादं । माध्व्या गिरापनयतात्पुरुषः पुराणः ॥ २५ ॥
तू तो पुराण पुरुषो करुणामयो तू तू प्रेमदृष्टि हसनी उघडी स्व नेत्रा । तू सोडवेगि शयना झोप सोडी वाणीस बोल मधु शब्द विषाद टाळी ॥ २५ ॥
अदभ्रकरूणः - मोठी आहे दया ज्याची असा - भगवान् पुराणः पुरुषः - भगवान आदि पुरुष - विवृद्धप्रेमस्मितेन - वृद्धिंगत झालेल्या प्रेमाने युक्त अशा मंदहास्याने - नयनाम्बुरुहं - आपले नेत्रकमल - विजृम्भन् - विकसित करणारा - उत्थाय - उठून - च विश्वविजयाय - आणि विश्वाची उत्पत्ति व्हावी म्हणून - माध्व्या गिरा - गोड शब्दांनी - नः विषादं - आमची चिंता - अपनयतात् - दूर करो ॥२५॥
आपण अपार करुणा असलेले पुराणपुरुष आहात. आपली परम प्रेममय स्मितहास्ययुक्त नेत्रकमले उघडावीत आणि शेषशय्येवरून उठून विश्वाच्या उत्पत्तीसाठी आपल्या सुमधुर वाणीने माझा विषाद दूर करावा. (२५)
मैत्रेय उवाच -
(अनुष्टुप्) स्वसम्भवं निशाम्यैवं तपोविद्यासमाधिभिः । यावन्मनोवचः स्तुत्वा विरराम स खिन्नवत् ॥ २६ ॥
मैत्रेयजी म्हणाले- तप विद्या समाधीत ब्रह्म्याने जन्मस्थान जो । पाहला भगवान् , त्याला स्तवोनी स्तब्ध राहिला ॥ २६ ॥
सः - तो ब्रह्मदेव - तपोविद्यासमाधिभिः - तपश्चर्या, उपासना आणि समाधियोग यांच्या योगाने - स्वसंभवम् - आपली आहे उत्पत्ति ज्यापासून अशा विष्णूला - निशाम्य - पाहून - यावन्मनोवचः - मन व वाणी यांच्या शक्तीनुसार - एवम् - याप्रमाणे - स्तुत्वा - स्तुति करून - खिन्नवत् - दमलेल्यासारखा - विरराम - स्वस्थ राहिला ॥२६॥
मैत्रेय म्हणाले - विदुरा ! अशा प्रकारे तप, विद्या, आणि समाधीच्याद्वारा ब्रह्मदेवांनी आपले उत्पत्तिस्थान श्रीभगवंतांना पाहिले आणि आपले मन व वाणीच्या शक्तीनुसार स्तुती करून जणू थकून जाऊन त्यांनी मौन धारण केले. (२६)
अथाभिप्रेतमन्वीक्ष्य ब्रह्मणो मधुसूदनः ।
विषण्णचेतसं तेन कल्पव्यतिकराम्भसा ॥ २७ ॥ लोकसंस्थानविज्ञान आत्मनः परिखिद्यतः । तमाहागाधया वाचा कश्मलं शमयन्निव ॥ २८ ॥
पाहिले भगवंते त्यां घाबरा खिन्नची असा । रण्यि सृष्टि हीसारी तयाची बुद्धि ना चले ॥ २७ ॥ पाहता ती अवस्था नी जाणुनी हेतु तो तया । खेदनाशार्थ तै बोले गंभीर मधुसुदन् ॥ २८ ॥
अथ - नंतर - मधुसूदनः - मधु नामक दैत्याचा नाश करणारा असा विष्णु - आत्मनः - आपल्या - लोकसम्स्तानविज्ञाने - लोकरचनेच्या ज्ञानाविषयी - परिखिद्यतः - खिन्न होणार्या - ब्रह्मणः - ब्रह्मदेवाचे - अभिप्रेतम् - अभीष्ट - च - आणि - तेन - त्या - कल्पव्यतिकराम्भसा - कल्पातील क्षोम पावलेल्या पाण्यामुळे - विषण्णचेतसम् - खिन्न झाले आहे मन ज्याचे अशा - तम् - त्या ब्रह्मदेवाला - अन्वीक्ष्य - पाहून - अगाधया - गंभीर अशा - वाचा - वाणीने - कश्मलम् - पापाला - शमयन् इव - दूर करीतच - आह - बोलला ॥२७-२८॥
श्रीमधुसूदन भगवंतांनी पाहिले की, या प्रलयराशीला पाहून ब्रह्मदेव फारच घाबरलेला आहे. तसेच लोकरचनेच्या संदर्भात काही निश्चित विचार त्याच्या मनात नसल्याने तो फारच खिन्न झाला आहे. तेव्हा ब्रह्मदेवाची ती स्थिती पाहून गंभीर वाणीने त्याचा खेद जणू नाहीसा करीत ते म्हणाले. (२७-२८)
श्रीभगवानुवाच -
मा वेदगर्भ गास्तन्द्रीं सर्ग उद्यममावह । तन्मयाऽऽपादितं ह्यग्रे यन्मां प्रार्थयते भवान् ॥ २९ ॥
श्री भगवान् म्हणाले- वेदगर्भा नको खेद आळसा टाकुनी उठी । त्वरे तू लाग उद्योगा हेतू मी जाणिला तुझा ॥ २९ ॥
वेदगर्भ - वेद आहेत उदरामध्ये ज्याच्या अशा ब्रह्मदेवा - त्वम् - तू - तन्द्रीम् - आळसाप्रत - मा गाः - जाऊ नकोस - सर्गे - सृष्टिविषयी - उद्यमम् - उद्योग - आवह - कर - भवान् - तू - यत् - ज्याप्रीत्यर्थ - माम् - मला - प्रार्थयसे - प्रार्थितोस - तत् - ते - मया - मी - अग्रे - पूर्वी - आपादितम् - प्राप्त् करून ठेविले आहे ॥२९॥
श्री भगवान म्हणाले - वेदगर्भा ! तू आळस करू नकोस; सृष्टिरचनेचा प्रयत्न कर. तुला माझ्यापासून जे अपेक्षित आहे, ते मी अगोदरच केले आहे. (२९)
भूयस्त्वं तप आतिष्ठ विद्यां चैव मदाश्रयाम् ।
ताभ्यां अन्तर्हृदि ब्रह्मन् लोकान् द्रक्ष्यसि अपावृतान् ॥ ३० ॥
पुन्हाही ऐक ते माझे तप तू करणे असे । तेणे या त्रयलोकाचे होईल ज्ञान अंतरी ॥ ३० ॥
ब्रह्मन् - हे ब्रह्मदेवा ! - त्वम् - तू - भूयः - पुनः - तपः - तपश्चर्येचे - च - आणि - मदाश्रयाम् - मी आधार जिचा अशा - विद्याम् एव - समाधियोगाचे - आतिष्ठ - आचरण कर - ताभ्याम् - त्या दोहोंच्या योगाने - अन्तर्हृदि - अन्तःकरणात - अपावृतान् - प्रगट झालेल्या - लोकान् - लोकांना - द्रक्ष्यसि - तू पाहशील ॥३०॥
तू पुन्हा एकदा तप कर आणि भागवत ज्ञानाचे अनुष्ठान कर. त्यामुळे तू सर्व लोकांना स्पष्टपणे आपल्या अंतःकरणात पाहाशील. (३०)
तत आत्मनि लोके च भक्तियुक्तः समाहितः ।
द्रष्टासि मां ततं ब्रह्मन् मयि लोकान् त्वमात्मनः ॥ ३१ ॥
तेंव्हा तू सर्वलोकांना भक्तियुक्त समाहित । माझ्यात पाहसी आणि तुलाही जाणसील तू ॥ ३१ ॥
ब्रह्मन् - हे ब्रह्मदेवा - ततः - नंतर - भक्तियुक्तः - भक्तीने युक्त असा - समाहितः - व स्थिरचित्त असा - त्वम् - तू - आत्मानि - स्वतःमध्ये - च - आणि - लोके - लोकांत - ततम् - व्यापून असलेल्या अशा - माम् - मला - द्रष्टा - पाहशील - च - आणि - मयि - माझ्या ठिकाणी - लोकान् - लोकांना - च - आणि - आत्मनः - स्वतःला - द्रष्टा - पाहशील ॥३१॥
नंतर भक्तियुक्त आणि एकाग्र चित्त झाल्यावर तू संपूर्ण लोकांत आणि तुझ्यात मला व्याप्त पाहाशील. तसेच माझ्यामध्ये संपूर्ण लोक आणि तू आहेस, असे पाहाशील. (३१)
यदा तु सर्वभूतेषु दारुष्वग्निमिव स्थितम् ।
प्रतिचक्षीत मां लोको जह्यात्तर्ह्येव कश्मलम् ॥ ३२ ॥
कात अग्नि ज राही तैसे माझ्यात जीव ते । पाहता दृष्टिने ऐसा तेंव्हा अज्ञान नष्टते ॥ ३२ ॥
लोकः - लोक - यदा - जेव्हा - दारुषु - लाकडात - आग्नेम् इव - अग्नि असतो त्याप्रमाणे - सर्वभूतेषु - सर्व प्राण्यांमध्ये - स्थितम् - भरलेला असे - माम् - मला - प्रतिचक्षीत - जाणतील - तर्हि एव - त्या वेळीच - सः - तो लोक - कश्मलम् - मोह - जह्यात् - टाकून देईल ॥३२॥
ज्यावेळी जीव, काष्ठात व्याप्त असलेल्या अग्नीप्रमाणे सर्व भूतांमध्ये मला पाहतो, त्याचवेळी तो अज्ञानातून मुक्त होतो. (३२)
यदा रहितमात्मानं भूतेन्द्रियगुणाशयैः ।
स्वरूपेण मयोपेतं पश्यन् स्वाराज्यमृच्छति ॥ ३३ ॥
जेंव्हा कोणी वता मध्ये भूत इंद्रीय नी गुण । रही मज जो पाही त्यालाच मोक्ष लाभतो ॥ ३३ ॥
यदा - ज्यावेळी - भूतेन्द्रियगुणाशयैः - भूते, इन्द्रिये, सत्त्व आदि गुण व अन्तःकरण यांनी - रहितम् - रहित अशा - आत्मानम् - जीवाला - स्वरूपेण - स्वतःचा स्वरूपभूत अशा - मया - मी जो परमेश्वर त्याशी - उपेतम् - एक झालेला असा - पश्यन् - पाहणारा - भवति - होतो - तदा - तेव्हा - स्वाराज्यम् - मोक्षाला - ऋच्छति - प्राप्त होतो ॥३३॥
जेव्हा तो स्वतःला पंचमहाभूते, इंद्रिये, गुण आणि अंतःकरण यांनी रहित तसेच माझ्यापासून स्वरूपतः अभिन्न आहे, असे पाहातो, तेव्हा तो मोक्षपद प्राप्त करून घेतो. (३३)
नानाकर्मवितानेन प्रजा बह्वीः सिसृक्षतः ।
नात्मावसीदत्यस्मिन् ते वर्षीयान् मदनुग्रहः ॥ ३४ ॥
अनेक कर्म संकारे जीवांना हेतु निर्मिण्या । असुनी न तुला मोह ब्रह्माजी ही कृपा मम ॥ ३४ ॥
नानाकर्मवितानेन - अनेक प्रकारच्या कर्मांच्या विस्तारामुळे - बह्वीः - पुष्कळ - प्रजाः - प्रजा - सिसृक्षतः - उत्पन्न करण्याची इच्छा करणार्या अशा - ते - तुझे - आत्मा - मन - अस्मिन् - या सृष्टिकार्याविषयी - न अवसीदति - खिन्न होणारा नाही - यत् - कारण - त्वयि - तुझ्यावर - वर्षीयान् - अत्यन्त मोठा - मदनुग्रहः - माझा अनुग्रह - अस्ति - आहे ॥३४॥
ब्रह्मदेवा, अनेक प्रकारच्या कर्मसंस्कारांना अनुसरून विविध प्रकारच्या जीवसृष्टीची रचना करण्याची इच्छा असूनही तुझे चित्त मोहवश होत नाही, हे तुझ्यावरील माझ्या मोठ्या कृपेचे फळ आहे. (३४)
ऋषिमाद्यं न बध्नाति पापीयान् त्वां रजोगुणः ।
यन्मनो मयि निर्बद्धं प्रजाः संसृजतोऽपि ते ॥ ३५ ॥
आद्य तू मंत्रद्रष्टा नी कार्यात स्मरशी मजसी मज । त्या रजो गुणिचे पाप त्यामुळे तुज बांधिना ॥ ३५ ॥
यत् - कारण - प्रजाः - प्रजा - संसृजतः अपि - उत्पन्न करीत असताही - ते - तुझे - मनः - मन - मयि - माझ्या ठिकाणी - निर्बद्धम् - लागलेले - अस्ति - आहे - अतः - म्हणून - पापीयान् - मोह करणारा - रजोगुणः - रजोगुण - आद्यम् ऋषिम् त्वाम् - आदि ऋषि अशा तुला - न बध्नाति - बंधनात पाडणार नाही ॥३५॥
तू पहिला मंत्रद्रष्टा आहेस. प्रजा-उत्पत्तीच्या वेळीही तुझे मन माझ्यातच लागून राहिलेले असते. म्हणूनच पापमय रजोगुण तुला बद्ध करीत नाही. (३५)
ज्ञातोऽहं भवता त्वद्य दुर्विज्ञेयोऽपि देहिनाम् ।
यन्मां त्वं मन्यसेऽयुक्तं भूतेन्द्रियगुणात्मभिः ॥ ३६ ॥
गुणातीत मलाऐसे जाणिसी तूच एकला । सोपे ना ज्ञान हे ऐसे तुला ते लाभले खरे ॥ ३६ ॥
यत् - ज्या अर्थी - त्वम् - तू - माम् - मला - भूतेन्द्रियगुणात्मभिः - भूते, इंन्द्रिये, सत्त्व इत्यादी गुण आणि अहंकार यांनी - अयुक्तम् - रहित अशा - मन्यसे - मानतोस - तु - त्याअर्थी - देहिनाम् - प्राण्यांना - दुर्विज्ञेयः अपि - जाणण्यास अशक्य असाहि - अहम् - मी - अद्य - आज - भवता - तुझ्याकडून - ज्ञातः - ओळखिला गेलो ॥३६॥
तू मला पंचमहाभूते, इंद्रिये, गुण, आणि अंतःकरण यांनी रहित समजतोस. देहधारी जीवांना माझे ज्ञान होणे जरी अवघड आहे, तरी तू मात्र मला जाणले आहेस." (३६)
तुभ्यं मद्विचिकित्सायां आत्मा मे दर्शितोऽबहिः ।
नालेन सलिले मूलं पुष्करस्य विचिन्वतः ॥ ३७ ॥
आश्रय तुज सदेह येता तो नलिनीतुनी । जळात धुंलि तेंव्हा दाविले रूप मी तुला ॥ ३७ ॥
सलिले - पाण्यात - पुष्करस्य - कमलाचे - मूलम् - आधार - नालेन - देठाने - विचिन्वतः - शोध करणार्या अशा - तुभ्यम् - तुला - मद्विचिकित्सायाम् - माझ्याविषयी संशय उत्पन्न झाला असता - मे - माझ्याकडून - आत्मा - स्वतःचे रूप - अबहिः - तुझ्या हृदयातच - दर्शितः - दाखविले गेले ॥३७॥
आपला आश्रय कोणी आहे की नाही ?" या शंकेने तू कमळाच्या देठाद्वारे पाण्यामध्ये त्याचे मूळ शोधीत होतास. तेव्हा मी तुला माझे हे स्वरूप तुझ्या अंतःकरणात दाखविले. (३७)
यच्चकर्थाङ्ग मत्स्तोत्रं मत्कथा अभ्युदयांकितम् ।
यद्वा तपसि ते निष्ठा स एष मदनुग्रहः ॥ ३८ ॥
स्त्रोत्र तू गायिले माझे निष्ठेने वैभवी असे । प्रीय ! ते फळ माझ्याची कृपेचे जाणिज पहा ॥ ३८ ॥
अङ्ग - हे ब्रह्मदेवा - यत् - जी - यत्कथाऽभ्युदयाङ्कितम् - माझ्या कथारूपी उत्कर्षाने युक्त अशी - मत्स्तोत्रम् - माझी स्तुति - चकर्थ - तू केली - यत् वा - किंवा जी - ते - तुला - तपसि - तपश्चर्येमध्ये - निष्ठा - आस्था - उत्पन्ना - उत्पन्न झाली - सः एषः - तो हा - मदनुग्रहः - माझा अनुग्रह - अस्ति - आहे ॥३८॥
प्रिय ब्रह्मदेवा, माझ्या कथांच्या वैभवाने युक्त अशी तू माझी जी स्तुती केली आहेस आणि तपश्चर्येमध्ये तुझी जी निष्ठा आहे, तेसुद्धा माझ्या कृपेचेच फळ आहे. (३८)
प्रीतोऽहमस्तु भद्रं ते लोकानां विजयेच्छया ।
यद् अस्तौषीर्गुणमयं निर्गुणं मानुवर्णयन् ॥ ३९ ॥
सृष्टिच्या निर्मितीसाठी सगुणी गमलो परी । निगणी गायिले रूप ’तथास्थू’ मी प्रसन्नची ॥ ३९ ॥
गुणमयम् - सत्त्वादि गुणांनी भासणार्या अशा - अपि - देखील - मा - मला - निर्गुणम् - गुणरहित असे - अनुवर्णयन् - म्हणणारा - त्वम् - तू - लोकानाम् - लोकांच्या - विजयेच्छया - उत्कर्षाच्या इच्छेने - यत् - ज्या अर्थी - अस्तौषीः - माझी स्तुति करता झालास - तत् - त्या अर्थी - अहम् - मी - ते - तुझ्यावर - प्रीतः - संतुष्ट झालो आहे - ते - तुझे - भद्रम् - कल्याण - अस्तु - असो ॥३९॥
लोकरचनेच्या इच्छेने, सगुण प्रतीत होऊन सुद्धा तू जे निर्गुणरूपाने माझे वर्णन करून स्तुती केलीस, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझे कल्याण असो. (३९)
य एतेन पुमान्नित्यं स्तुत्वा स्तोत्रेण मां भजेत् ।
तस्याशु सम्प्रसीदेयं सर्वकामवरेश्वरः ॥ ४० ॥
समस्त कामनापूर्ती करण्या मी समर्थची । गायि जो स्तोत्री त्याला प्रसन्नशीघ्र होतसे ॥ ४० ॥
यः - जो - पुमान् - पुरुष - एतेन - ह्या - स्तोत्रेण - स्तोत्राने - नित्यम् - नेहमी - माम् - माझी - स्तुत्वा - स्तुति करून - भजेत् - सेवा करील - सर्वकामवरेश्वरः - सर्व इच्छित वर देण्याविषयी समर्थ असा - अहम् - मी - तस्य - त्याला - आशु - लवकर - संप्रसीदेयं - प्रसन्न होईन. ॥४०॥
सर्व इच्छा पूर्ण करण्यास समर्थ असणारा जो पुरुष दररोज या स्तोत्राने स्तुती करून माझे भजन करील, त्याच्यावर मी लगेच प्रसन्न होईन. (४०)
पूर्तेन तपसा यज्ञैः दानैर्योगसमाधिना ।
राद्धं निःश्रेयसं पुंसां मत्प्रीतिः तत्त्वविन्मतम् ॥ ४१ ॥
जाणिती तत्ववेत्ते ते दान योग समाधिला । कल्याणफळ जे आहे ही माझीच प्रसन्नता ॥ ४१ ॥
पूर्तेन - विहिरी, धर्मशाळा व लोकोपयोगी अन्य कृत्यांनी - तपसा - यपश्चर्येने - यज्ञैः - यज्ञांनी - दानैः - दानांनी - च - आणि - योगसमाधिना - योगाभ्यासाने - राद्धम् - सिद्ध होणारे - पुंसाम् - पुरुषांचे - निःश्रेयसम् - उत्तम फळ - मत्प्रीतिः - माझा संतोष - स्यात् - होय - इति - असे - तत्त्वविन्मतम् - तत्त्ववेत्त्यांचे मत - अस्ति - आहे ॥४१॥
तत्त्ववेत्त्यांचे असे मत आहे की, वास्तुनिर्माण, तप, यज्ञ, दान, योग आणि समाधी इत्यादी साधनांनी प्राप्त होणारे परमकल्याणकारी फळ जर कोणते असेल तर ते म्हणजे माझी प्रसन्नता ! (४१)
अहमात्मात्मनां धातः प्रेष्ठः सन् प्रेयसामपि ।
अतो मयि रतिं कुर्याद् देहादिर्यत्कृते प्रियः ॥ ४२ ॥
आत्म्याचा मी असे आत्मा प्रियाचा मी प्रियो असे । माझे ते प्रीय देहादी प्रेम माझ्यावरी करा ॥ ४२ ॥
धातः - हे ब्रह्मदेवा - यत्कृते - ज्यांच्याकरिता - देहादिः - देह, इन्द्रिये इत्यादिक - प्रियः - प्रिय - अस्ति - आहे - तेषाम् - त्या - आत्मनाम् - जीवांचा - आत्मा - आत्मा - अहम् - मी - प्रेयसाम् अपि - प्रिय वस्तूंपेक्षाही - प्रेष्ठः - प्रिय - अस्म् - आहे - अतः - म्हनून - मयि - माझ्यावर - रतिम् - प्रेम - कुर्यात् - करावे - यत्कृते - ज्याच्यासाठी - देहादिः - देह इत्यादि - प्रियः - प्रिय आहे ॥४२॥
हे विधात्या, मी आत्म्यांचा आत्मा आणि प्रिय वस्तूंमध्ये अत्यंत प्रिय आहे. म्हणून देहादिक ज्याच्यासाठी प्रिय आहेत, त्या माझ्यावरच प्रेम केले पाहिजे. (४२)
सर्ववेदमयेनेदं आत्मनाऽऽत्माऽऽत्मयोनिना ।
प्रजाः सृज यथापूर्वं याश्च मय्यनुशेरते ॥ ४३ ॥
वेळींया माझिया रूपी त्रिलोक लीन जाहले । पूर्वकल्पापरी त्याते वेदरूपे स्वयं रची ॥ ४३ ॥
आत्मा - स्वतः तू - इदम् - ह्या विश्वाला - च - आणि - याः - ज्या - मयि - माझ्यामध्ये - अनुशेरते - लय पावल्या आहेत - ताः - त्या - प्रजाः - प्रजांना - आत्मयोनिना - मी आहे कारण ज्याचे अशा - सर्ववेदमयेन - संपूर्ण वेद आहेत उदरात अशा - आत्मना - आपल्या योगाने - यथापूर्वम् - पूर्वीप्रमाणे - सृज - उत्पन्न कर ॥४३॥
ब्रह्मदेवा ! त्रैलोक्य तसेच जी प्रजा यावेळी माझ्यामध्ये लीन आहे, या सर्वांची तू पूर्वकल्पाप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेल्या आपल्या सर्ववेदमय स्वरूपापासून स्वतःच रचना कर. (४३)
मैत्रेय उवाच -
तस्मा एवं जगत्स्रष्ट्रे प्रधानपुरुषेश्वरः । व्यज्येदं स्वेन रूपेण कञ्जनाभस्तिरोदधे ॥ ४४ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
संहितेच्या या श्लोकास समश्लोकी श्लोक नाही ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ नववा अध्याय हा ॥ ३ ॥ ९ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
कञ्जनाभः - कमलाप्रमाणे आहे नाभि ज्याची असा - प्रधानपुरुषेश्वरः - प्रकृति व पुरुष यांचा नियन्ता असा परमेश्वर - जगत्स्त्रष्ट्रे - जगाला उत्पन्न करणार्या अशा - तस्मा - ब्रह्मदेवाला - इदम् - हे जग - एवम् - याप्रमाणे - व्यज्य - स्पष्ट दाखवून - स्वेन रूपेण - आपल्या स्वरूपाने - तिरोदधे - गुप्त झाला ॥४४॥
मैत्रेय म्हणाले - प्रकृती आणि पुरुषाचे स्वामी कमलनाभ भगवान सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाला याप्रमाणे जगाचे स्वरूप दाखवून आपल्या त्या नारायणरूपात अदृश्य झाले. (४४)
स्कंध तिसरा - अध्याय नववा समाप्त |