|
श्रीमद् भागवत पुराण विष्णोर्माभिकमलाद् ब्रह्मोत्पत्तिवर्णनम् - ब्रह्मदेवाची उत्पत्ती - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
मैत्रेय उवाच -
सत्सेवनीयो बत पूरुवंशो यल्लोकपालो भगवत्प्रधानः । बभूविथेहाजितकीर्तिमालां पदे पदे नूतनयस्यभीक्ष्णम् ॥ १ ॥
मैत्रेयजी म्हणाले - ( इंद्रवज्रा ) तो श्रेष्ठराजा यमधर्म तुम्ही तुम्हा मुळे पावन वंश झाला । ती नित्य माला हरि कीर्तनाची तुम्हामुळे नूतन दिव्य होते ॥ १ ॥
पूरु वंश - पूरु राजाचा वंश - बत - अहो - सत्सेवनीयः - साधूंनी सेवन करण्यास योग्य असा - अस्ति - आहे - यत् - कारण - इह - ह्या पूरुवंशात - भगवत्प्रधानः - भगवन्तालाच मानणारा असा - लोकपालः - दक्षिण दिशेचा पालक यमधर्म त्याचा अवतार - त्वम् - तू - बभूविथ - उत्पन्न झालासा ॥१॥
मैत्रेय म्हणाले- विदुरा ! तू भगवद्भक्त लोकपाल यमराज आहेस. तू पुरुवंशात जन्म घेतल्याने तो वंश साधुपुरुषांनाही सेवनीय झाला आहे. तू पदोपदी श्रीहरींची कीर्तिरूप माळ नित्य ताजी टवटवीत ठेवीत आहेस. ()
सोऽहं नृणां क्षुल्लसुखाय दुःखं
महद्गतानां विरमाय तस्य । प्रवर्तये भागवतं पुराणं यदाह साक्षात् भगवान् ऋषिभ्यः ॥ २ ॥
इंद्रिय भोगास सुखार्थ घेती ते जीव दुःखातचि घोर जाती । त्यांच्या सुखां त्या पुषोत्तमाने सांगीतले भागवतास ऐका ॥ २ ॥
सः अहम् - तो मी - क्षुल्लसुखाय - क्षुद्र सुखाकरिता - महत् - मोठ्या - दुःखम् - दुःखात - गतानाम् - पडलेल्या - नृणाम् - मनुष्यांच्या - तस्य - दुःखाच्या - विरमाय - नाशाकरिता - भागवतम् - भागवतनामक - पुराणम् - पुराणाला - प्रवर्तये - करतो - यत् - जे भागवत पुराण - साक्षात् भगवान् शेषः - प्रत्यक्ष शेष भगवान् - ऋषिभ्यः - ऋषींना - आह - सांगता झाला ॥२॥
क्षुद्र विषयसुखाच्या इच्छेने मोठे दुःख ओढवून घेणार्या लोकांच्या दुःखनिवृत्तीसाठी आता मी श्रीमद्भागवत पुराण सांगण्यास सुरुवात करतो. हे पुराण स्वतः श्री संकर्षण भगवानांनी सनकादी ऋषींना सांगितले होते. (२)
आसीनमुर्व्यां भगवन्तमाद्यं
सङ्कर्षणं देवमकुण्ठसत्त्वम् । विवित्सवस्तत्त्वमतः परस्य कुमारमुख्या मुनयोऽन्वपृच्छन् ॥ ३ ॥
पाताळ लोकात विराजमान् तो ज्ञानि होता आसनस्थ तेथे । सनत्कुमारादि ऋषिंनि त्याला तत्वार्थ प्रश्नास चिरियेले ॥ ३ ॥
कुमारमुख्याः - सनत्कुमार आहे मुख्य ज्या मध्ये असे - मुनयः - ऋषि - उर्व्याम् - पाताळतळी - आसीनम् - बसलेल्या - अकुण्ठसत्त्वम् - अकुण्ठित आहे ज्ञान ज्यांचे अशा - आद्यं देवम् - आदिदेव अशा - भगवन्तं संकर्षणम् - भगवान् संकर्षणाला - अतः - संकर्षणापेक्षा - परस्य - श्रेष्ठ अशा परमेश्वराचे - तत्त्वम् - यथार्थ स्वरूप - विवित्सवः - जाणण्याच्या इच्छेने - अन्वपृच्छन् - प्रश्न करते झाले ॥३॥
अखंड ज्ञानसंपन्न असे आदिदेव भगवान संकर्षण पाताल लोकात होते. सनत्कुमार आदी ऋषींनी त्यांना त्यांच्याहून श्रेष्ठ अशा श्रीवासुदेवांचे तत्त्व जाणण्यासाठी प्रश्न विचारला. (३)
स्वमेव धिष्ण्यं बहु मानयन्तं
यद् वासुदेवाभिधमामनन्ति । प्रत्यग्धृताक्षाम्बुजकोशमीषद् उन्मीलयन्तं विबुधोदयाय ॥ ४ ॥
त्या मानसी पूजनि शेष होता ज्यां वासुदेवो म्हणतात वेद । पद्मापरी जे मिटवोनि नेत्र ऐकोनि प्रश्ना उघडी क्वचित् तो ॥ ४ ॥
यम् - ज्याला - वासुदेवाभिधम् आमनन्ति - वासुदेव नावाने संबोधितात - तत् स्वम् एव धिष्ण्यम् - त्या स्वतःचाच आश्रयभूत अशा वासुदेवाला - बहु मानयन्तम् - फार मान देणार्या - प्रत्यग्धृताक्षाम्बुजकोशम् - अन्तर्मुख केलेल्या नेत्ररूपी कमळाच्या कळीला - विबुधोदयाय - सनत्कुमारादि ज्ञान्यांच्या उत्कर्षाकरिता - किञ्चित् उन्मीलयन्तम् - किंचित उघडणार्या ॥४॥
ज्यांना ‘वासुदेव ’या नावाने संबोधतात, त्या आपले आश्रय असणार्या परमात्म्याची त्यावेळी शेष मानसिक पूजा करीत होते. कमळाच्या कळीसारखे बंद असणारे आपले नेत्र सनत्कुमारादींच्या उत्कर्षासाठी त्यांनी अर्धोन्मीलित केले. (४)
स्वर्धुन्युदार्द्रैः स्वजटाकलापैः
उपस्पृशन्तश्चरणोपधानम् । पद्मं यदर्चन्त्यहिराजकन्याः सप्रेम नानाबलिभिर्वरार्थाः ॥ ५ ॥
गंगाजळाने भिजल्या जटा त्या टेकूनि त्याला नमिले ऋषिंनी । तैं नागकन्या वर प्राप्तिसाठी होती तदा पूजित भक्ति भावे ॥ ५ ॥
वरार्थाः - ज्यांना पतीची इच्छा आहे अशा - अहिराजकन्याः - सर्प राजांच्या कन्या - नानाबलिभिः - अनेक प्रकारच्या उपहारांनी - सप्रेम - प्रेमाने - यत् - ज्याला - अर्चन्ति - पूजितात - चरणोपधानम् - ज्याच्यावर शेष आपले पाय ठेवतो अशा - तत् पद्मम् - त्या कमलाला - स्वर्धुन्युदार्द्रैः - गंगेच्या पाण्याने भिजलेल्या - स्वजटाकलापैः - आपल्या जटाकलापांनी - उपस्पृशन्तु - स्पर्श करणारे ॥५॥
सनत्कुमार आदी ऋषींनी मंदाकिनी नदीच्या पाण्याने भिजलेल्या आपल्या जटांनी त्यांच्या चरणाचे आसन असलेल्या कमल पुष्पाला स्पर्श केला, ज्या कमलपुष्पांची नागराजकुमारी सुयोग्य वर मिळण्यासाठी प्रेमपूर्वक अनेक वस्तू अर्पण करून पूजा करतात. (५)
मुहुर्गृणन्तो वचसानुराग
स्खलत्पदेनास्य कृतानि तज्ज्ञाः । किरीटसाहस्रमणिप्रवेक प्रद्योतितोद्दामफणासहस्रम् ॥ ६ ॥
सनत्कुमारे गुणगान केले पुनःपुन्हा प्रेमभरोनि गीतें । फण्या हजारो झटकोनि शेष हजार सूर्यासम दिव्य झाला ॥ ६ ॥
तज्ज्ञाः - शेषाच्या प्रभावाला जाणणारे सनत्कुमारादि ऋषि - अस्य - शेषाच्या - कृतानि - चरित्रांना - अनुरागस्खलत्पदेन - प्रेमामुळे ज्यातील पदे अर्धवट उच्चारली जात आहेत अशा - वचसा - वाक्यांनी - मुहुः - वारंवार - गृणन्तः - वर्णन करणारे - ऋषयः - सनत्कुमारादि ऋषि - किरीटसाहस्त्रमणि - सहस्त्र मुकुटांवरील उत्तम मण्यांनी प्रकाशित आहेत - प्रवेकप्रद्योतितोद्दामफणासहस्त्रम् - वर उभारलेल्या हजार फणा ज्याच्या अशा - संकर्षणं अपृच्छन् - शेषाला प्रश्न करिते झाले ॥६॥
सनत्कुमारादी ऋषी त्यांच्या लीलांचे जाणकार आहेत. त्यांनी वारंवार सद्गदित वाणीने त्यांच्या लीला गाइल्या, त्यावेळी शेषभगवानांच्या उभारलेल्या हजारो फणांवरील किरीटांच्या हजारो श्रेष्ठ रत्नांची छटा चकचकीत किरणांनी झळकत होती. (६)
प्रोक्तं किलैतद्भगवत्तमेन
निवृत्तिधर्माभिरताय तेन । सनत्कुमाराय स चाह पृष्टः साङ्ख्यायनायाङ्ग धृतव्रताय ॥ ७ ॥
निवृत्त ऐशा सनकादिकांना संकर्षणे हे कथिले पुराण । वार्ता तशीची सनकादिकांनी सांख्यायना सांगोतली पुन्हा ही ॥ ७ ॥
भगवत्तमेन तेन - श्रेष्ठ अशा भगवान् शेषाने - एतत् - हे भागवत - निवृत्तिधर्माभिरताय सनत्कुमाराय - मोक्षधर्मात आसक्त असलेल्या सनत्कुमाराला - प्रोक्तम् - सांगितले - किल - अशी प्रसिद्धी आहे - अङ्ग - हे विदुरा - च - आणि - पृष्टः सः - सांख्यायनाने प्रश्न केलेला तो सनत्कुमार - धृतव्रताय - ज्याने व्रतांचा - सांख्यायनाय - सांख्यायन ऋषीला - (एतत् भागवतं) आह - हे भागवत सांगता झाला ॥७॥
हे विदुरा, निवृत्तिपरायण सनत्कुमारांना भगवान संकर्षणांनी हे भागवत ऐकविले होते, हे प्रसिद्धच आहे. नंतर सनत्कुमारांनी हे परम व्रती सांख्यायन मुनींना त्यांनी प्रश्न केल्यावरून सांगितले होते. (७)
साङ्ख्यायनः पारमहंस्यमुख्यो
विवक्षमाणो भगवद्विभूतीः । जगाद सोऽस्मद्गुरवेऽन्विताय पराशरायाथ बृहस्पतेश्च ॥ ८ ॥
सांख्यायने इच्छिले या कथेला ऐकावया त्या वि-ती- पाराशरो या गुरुने तयांना बृहस्पतींना हे कथूनि गेले ॥ ८ ॥
पारमहंस्यमुख्य - परमहंसाच्या धर्मात पूर्ण असा - सः सांख्यायनः - तो सांख्यायन - भगवद्विभूतीः विवक्षमाणः - परमेश्वराच्या लीलांचे वर्णन करण्याच्या इच्छेने - अन्विताय - अनुरूप असे वर्तन करणार्या - अस्मद्गुरवे पराशराय - आमचे गुरु जे पराशर त्यांना - च - आणि - बृहस्पतेः - बृहस्पतीला - जगाद - सांगता झाला ॥८॥
परमहंसांचे प्रमुख सांख्यायनांना जेव्हा भगवंतांच्या विभूती वर्णन करण्याची इच्छा झाली, तेव्हा त्यांनी आपले अनुयायी शिष्य, आमचे गुरू पराशरमुनी आणि बृहस्पतींना हे भागवत सांगितले. (८)
प्रोवाच मह्यं स दयालुरुक्तो
मुनिः पुलस्त्येन पुराणमाद्यम् । सोऽहं तवैतत्कथयामि वत्स श्रद्धालवे नित्यमनुव्रताय ॥ ९ ॥
पाराशारांनीच पुलस्त्य यांना पुलस्त्य यांनी कथिली मला ती । वत्सा तुझी पाहुनि भक्ति आता पुराण ते मी तुज सांगतो पा ॥ ९ ॥
पुलस्त्येन - पुलस्त्य ऋषीने - उक्तः - वर दिलेला - सः - तो - दयालुः - दयाळू - मुनिः - ऋषि पराशर - आद्यम् - पहिले असे - पुराणम् - भागवत पुराण - मह्यम् - मला - प्रोवाच - सांगता झाला - वत्स - हे विदुरा - सः अहम् - तो मी - श्रद्धालवे - श्रद्धाळू अशा - नित्यम् अनुव्रताय - व भागवतधर्माचे नित्य आचरण करणार्या - तुभ्यम् - तुला - एतत् - हे भागवत - कथयामि - सांगतो ॥९॥
यानंतर परम दयाळू पराशरांनी पुलस्त्य मुनींच्या सांगण्यावरून हे आदिपुराण मला सांगितले. वत्सा, श्रद्धाळू आणि सदैव अनुयायी अशा तुला हे पुराण मी सांगतो. (९)
उदाप्लुतं विश्वमिदं तदासीत्
यन्निद्रयामीलितदृङ् न्यमीलयत् । अहीन्द्रतल्पेऽधिशयान एकः कृतक्षणः स्वात्मरतौ निरीहः ॥ १० ॥
हे विश्व पाण्यात बुडुन होते तै शेषशय्येत हरीहि होता । झाकोनि डोळे करि योगनिद्रा आनंदमग्नी न इच्छी क्रियेला ॥ १० ॥
इदं विश्वम् - हे जग - तदा - त्या वेळी - उदाप्लुतम् - पाण्यात बुडालेले - आसीत् - होते - यत् - ज्या वेळी - स्वात्मरतौ - आत्मस्वरूपाच्या आनंदात - कृतक्षणः - मानिला आहे उत्साह ज्याने असा - निरीहः - निरिच्छ असा - एकः - एकटा - अहीन्द्रतल्पे - सर्पराजरूपी शय्येवर - अधिशयानः - निजणारा - निद्रया - योगनिद्रेने - अमीलितदृक् - मावळली नाही ज्ञानशक्ति ज्याची असा भगवान् - न्यमीलयत् - डोळे मिटता झाला ॥१०॥
सृष्टीच्या पूर्वी हे संपूर्ण विश्व पाण्यामध्ये बुडालेले होते. त्यावेळी एकमात्र श्रीनारायण शेषशय्येवर पहुडले होते. त्यांनी आपली ज्ञानशक्ती अबाधित ठेवूनच योगनिद्रेचा आश्रय घेऊन आपले डोळे मिटून घेतले होते. सृष्टिकर्मांपासून विश्रांती घेऊन ते आत्मानंदातच मग्न होते. त्यांच्यामध्ये कोणत्याही क्रियेचा लवलेश नव्हता. (१०)
सोऽन्तः शरीरेऽर्पितभूतसूक्ष्मः
कालात्मिकां शक्तिमुदीरयाणः । उवास तस्मिन् सलिले पदे स्वे यथानलो दारुणि रुद्धवीर्यः ॥ ११ ॥
काष्ठात अग्नी असुनी दिसेना तै प्राणिमात्रास स्वतात लीन । करूनि राही मग तो निवांत नी कालशक्तीसचि जागवी तो ॥ ११ ॥
यथा - ज्याप्रमाणे - अनलः - अग्नि - दारुणि - लाकडात - रुद्धवीर्य - गुप्त आहे शक्ति ज्याची असा - आस्ते - असतो - तथा - त्याप्रमाणे - अन्तःशरीरे - शरीरामध्ये - अर्पितभूतसूक्ष्मः - लीन केली आहेत सूक्ष्मभूते ज्याने असा - कालात्मिकाम् - व काल आहे स्वरूप जीचे अशा - शक्तिम् - शक्तीला - उदीरयाणः - जागृत करणारा असा - सः - तो परमेश्वर - तस्मिन् - त्या - स्वे - आपल्या - पदे - अधिष्ठानभूत अशा - सलिले - पाण्यात - उवास - रहाता झाला ॥११॥
ज्याप्रमाणे अग्नी आपली दाहक शक्ती लपवून लाकडामध्ये व्यापून असतो, त्याचप्रमाणे श्रीभगवंतांनी सर्व प्राण्यांच्या सूक्ष्म शरीरांना आपल्या शरीरात लीन करून आपल्याला आधारभूत असलेल्या जलात शयन केले. निर्मितिकाल आल्यावर पुन्हा जागविण्यासाठी फक्त कालशक्तीला जागे ठेवले. (११)
चतुर्युगानां च सहस्रमप्सु
स्वपन् स्वयोदीरितया स्वशक्त्या । कालाख्ययाऽऽसादितकर्मतन्त्रो लोकानपीतान्ददृशे स्वदेहे ॥ १२ ॥
चिच्छक्तिने एक हजार वर्षे चतुर्युगे तो निजतो जळात । वृत्ती नि कर्मे मग तो जिवांच्या स्वांग पाही लिन सर्वलोक ॥ १२ ॥
च - आणि - चतुर्युगानाम् सहस्त्रम् - एक हजार युग चौकड्यापर्यंत - अप्सु - पाण्यात - स्वपन् - झोप घेणारा असा - स्वया - आपल्या - उदीरितया - जागृत असलेल्या - कालख्यया - काल आहे स्वरूप जिचे अशा - स्वशक्त्या - आपल्या शक्तीने - आसादितकर्मतन्त्रः - मिळवित आहे कर्म सामग्री ज्याने असा - सः - तो परमेश्वर - अपीतान् - लय पावलेल्या - लोकान् - लोकांना - स्वदेहे - आपल्या शरीरात - ददृशे - पाहता झाला ॥१२॥
याप्रमाणे आपल्या स्वरूपभूत चिच्छक्तीसह एक हजार युगचौकडयापर्यंत जलात शयन केल्यानंतर जेव्हा त्यांनीच प्रेरित केलेल्या त्यांच्या कालशक्तीने त्यांना जीवांच्या कर्मांच्या प्रवृत्तीसाठी प्रेरणा दिली, तेव्हा त्यांनी आपल्या शरीरात लीन असलेले असंख्य लोक पाहिले. (१२)
तस्यार्थसूक्ष्माभिनिविष्टदृष्टेः
अन्तर्गतोऽर्थो रजसा तनीयान् । गुणेन कालानुगतेन विद्धः सूष्यंस्तदाभिद्यत नाभिदेशात् ॥ १३ ॥
दृष्टी पडे ती निजलिंग देही कालाश्रिता तो रजगूण जन्मे । सृष्टी निमित्ते रचण्यास सारे नाभीतुनी तो मग जन्म घेई ॥ १३ ॥
तदा - त्यावेळी - अर्थसूक्ष्माभिनिविष्टदृष्टेः - सूक्ष्म अशा शब्दस्पर्श इत्यादी भूतांकडे लाविली आहे दृष्टि ज्याने अशा - तस्य - त्या परमेश्वराच्या - अन्तर्गतः - आत असलेला - तनीयान् अर्थः - सूक्ष्म भूतांचा समूह - कालानुगतेन - सृष्टिकालाला अनुकूल अशा - रजसा गुणेन - रजोगुणाने - विद्धः - चाळविलेला असता - सूष्यन् - उत्पत्ति करणारा - नाभिदेशात् - नाभिप्रदेशातून - अभिद्यत - उत्पन्न झाला ॥१३॥
जेव्हा भगवंतांची दृष्टी आपल्यातच अंतर्भूत असलेल्या लिंगशरीर इत्यादी सूक्ष्मतत्त्वांवर गेली, तेव्हा ते कालाला अनुसरणार्या रजोगुणाने क्षोभ पावल्याने सृष्टिरचनेच्या निमित्ताने त्यांच्या नाभिप्रदेशातून बाहेर पडले. (१३)
स पद्मकोशः सहसोदतिष्ठत्
कालेन कर्मप्रतिबोधनेन । स्वरोचिषा तत्सलिलं विशालं विद्योतयन्नर्क इवात्मयोनिः ॥ १४ ॥
त्या कर्म शक्ती करण्यास दृश्य नी नाभिपद्मातुनि तो उठोनी । सूर्यापरी फाकविता प्रकाश केल्या तये दिव्य जलीच राशी ॥ १४ ॥
कर्मप्रतिबोधनेन - प्राण्यांच्या प्राक्तन कर्मांना जागृत करणार्या अशा - कालेन - कालाच्या योगाने - आत्मयोनिः - विष्णु आहे उत्पत्तिस्थान ज्यांचे अशा - सः पद्मकोशः - तो कमलाचा कळा - अर्कः इव - सूर्याप्रमाणे - स्वरोचिषा - आपल्या तेजाने - तत् - त्या - विशालम् - अफाट अशा - सलिलम् - पाण्याला - विद्योतयन् - प्रकाशित करीत - सहसा - एकएकी - उदतिष्ठत् - वर आला. ॥१४॥
कर्मशक्तीला जागृत करणार्या कालामुळे श्रीनारायणाच्या नाभीतून प्रगट झालेल्या सूक्ष्मतत्त्वरूप कमलकोशाने, सूर्यासमान आपल्या तेजाने त्या अथांग जलराशीला दैदीप्यमान केले. (१४)
तल्लोकपद्मं स उ एव विष्णुः
प्रावीविशत्सर्वगुणावभासम् । तस्मिन् स्वयं वेदमयो विधाता स्वयंभुवं यं स्म वदन्ति सोऽभूत् ॥ १५ ॥
सर्वागुणी लोकमयी असा तो विष्णू स्वये तेथ प्रवेशला नी । ब्रह्मा रुपे ज्ञानि जन्मास आला जो जाणितो वेद न वाचिताहि ॥ १५ ॥
उ - अहो - सः एव - तोच - विष्णुः - विष्णु - तत् - त्या - सर्वगुणावभासम् - प्राण्यांच्या सर्व भोग्य पदार्थांना प्रकाशित करणार्या अशा - लोकपद्मम् - लोकरूपी कमलात - प्रावीविशत् - अन्तर्यामिरूपाने शिरला - तस्मिन् - त्या कमलामध्ये - यं - ज्याला - स्वयम्भुवम् - स्वयंभू - वदन्ति - म्हणतात - सः - तो - स्वयम् - स्वतः - वेदमयः - वेदस्वरूप असा - विधाता - ब्रह्मदेव - अभूत् - उत्पन्न झाला. ॥१५॥
सर्व गुणांना प्रकाशित करणार्या त्या सर्व लोक असलेल्या कमलामध्ये तेच भगवान विष्णू स्वतः अंतर्यामीरूपाने प्रविष्ट झाले. तेव्हा त्यातून न शिकविताही सर्व वेदांना जाणणारे वेदमूर्ती श्रीब्रह्मदेव प्रगट झाले. म्हणून त्यांना लोक स्वयंभू म्हणतात. (१५)
तस्यां स चाम्भोरुहकर्णिकायां
अवस्थितो लोकमपश्यमानः । परिक्रमन् व्योम्नि विवृत्तनेत्रः चत्वारि लेभेऽनुदिशं मुखानि ॥ १६ ॥
त्या कर्णिकेमाजि बसोनि ब्रह्मा ना लोक पाहू शकला चहूंचा । विस्फारूनि पाहि चहू दिशांना तेंव्हा तया चार मुखेहि आले ॥ १६ ॥
तस्याम् - त्या - अम्भोरुहकर्णिकायाम् - कमलाच्या गाभ्यात - अवस्थितः - बसलेला असा - लोकम् - जनाला - अपश्यमानः - न पाहिल्यामुळे - परिक्रमन् - फिरत फिरत - व्योम्नि - आकाशात - अनुदिशम् - चार दिशांकडे - विवृत्तनेत्रः - फिरवले आहेत डोळे ज्याने असा - सः - ब्रह्मदेव - चत्वारि - चार - मुखानि - मुखे - लेभे - मिळविता झाला. ॥१६॥
त्या कमलकोशावर बसलेल्या ब्रह्मदेवांना जेव्हा कोणतेच लोक दिसले नाहीत, तेव्हा डोळे फिरवून, आकाशात चारी दिशांना मान वळवून ते पाहू लागले, तेव्हा त्यांना चारी दिशांना चार तोंडे उत्पन्न झाली. (१६)
तस्माद्युगान्तश्वसनावघूर्ण
जलोर्मिचक्रात् सलिलाद्विरूढम् । उपाश्रितः कञ्जमु लोकतत्त्वं नात्मानमद्धाविददादिदेवः ॥ १७ ॥
वार्यात लाटा उसळोनि येता ब्रह्म्ये जधी पाहियल्या स्व केत्रे । त्या ब्रह्मदेवे बघताच पद्म मी कोण काही न कळे तयाला ॥ १७ ॥
तस्मात् - त्या - युगान्नश्वसनावघूर्णजलोर्मिचक्रात - प्रलयकाळाच्या वायूने उसळलेले आहेत पाण्याच्या तरंगांचे समूह ज्यावर अशा - सलिलात् - पाण्यावर - विरूढम् - उद्भवलेल्या - कञ्चम् - कमळावर - उपाश्रितः - बसलेला - आदिदेवः - ब्रह्मदेव - लोकतत्त्वम् - लोकांच्या रचनेला - च - आणि - अद्धा - साक्षात - आत्मानम् - स्वतःला - उ - निश्चयाने - न अविदत् - जाणता झाला नाही. ॥१७॥
त्यावेळी प्रलयकालीन वार्याच्या प्रचंड वेगाच्या मार्याने पाण्यावर उसळणार्या तरंगांमुळे त्या जलराशीच्या वर आलेल्या कमलावर बसलेल्या आदिदेव ब्रह्मदेवांना स्वतःचे तसेच त्या लोकतत्त्वरूप कमळाचे काहीच रहस्य समजले नाही. (१७)
क एष योऽसौ अहमब्जपृष्ठ
एतत्कुतो वाब्जमनन्यदप्सु । अस्ति ह्यधस्तादिह किञ्चनैतद् अधिष्ठितं यत्र सता नु भाव्यम् ॥ १८ ॥
मी कोण याचा करि तो विचार या कर्णिके माजि असे कसा मी । या कर्णिकेचा मग भार कोणा कोणी हिला धारियले कसे ते ॥ १८ ॥
यः - जो - असौ - हा - अहम् - मी - अब्जपृष्ठे - कमळाच्या पृष्ठावर - अस्मि - आहे - एषः कः - हा कोण - वा - किंवा - अप्सु - पाण्यात - एतत् - हे - अनन्यत् - एकटेच - अब्जम् - कमळ - कुतः - कोठून - आगतम् - आले - यत्र - ज्यावर - एतत् - हे कमळ - अधिष्ठितम् - आधार घेऊन राहिले - अस्ति - आहे - तत् - ते - इह - येथे - अधस्तात् - खाली - किंचन - काही - हि - खरोखर - अस्ति - आहे - तेन सता - ती सद्वस्तूच - नु - निश्चयाने - भाव्यम् - असली पाहिजे ॥१८॥
ते विचार करू लागले की, ‘या कमलकर्णिकेवर बसलेला मी कोण आहे ? कोणत्याही आधाराशिवाय या पाण्यात हे कमळ कोठून उत्पन्न झाले ? याच्या खाली निश्चित काही तरी वस्तू असली पाहिजे, ज्याच्या आधारावर हे कमळ आहे. (१८)
स इत्थमुद्वीक्ष्य तदब्जनाल
नाडीभिरन्तर्जलमाविवेश । नार्वाग्गतस्तत् खरनालनाल नाभिं विचिन्वन् तदविन्दताजः ॥ १९ ॥
ऐसा करोनी मग तो विचार गेला नलिनी मधुनीच खाली । नाभी प्रदेशास जरीहि आला तरी न त्याला मुळि शोध झाला ॥ १९ ॥
सः अजः - तो ब्रह्मदेव - इत्थम् - याप्रमाणे - उद्वीक्ष्य - विचार करून - तदब्जनालनाडीभिः - त्या कमळाच्या देठाच्या छिद्रातून - अन्तर्जलम् - पाण्यात - आविवेश - शिरला - च - आणि - तत् - त्या - खरनालननाभिम् - कठीण आहे देठ ज्याचा अशा त्या कमलाच्या देठाच्या आश्रयाला - विचिन्वन् - शोधीत - अर्वाक् - खाली - गतः - गेलेला असा - तत् - देठाच्या आधाराला - न अविदन्त - न प्राप्त होता झाला ॥१९॥
असा विचार करून ते त्या कमळाच्या देठातील सूक्ष्म छिद्रातून पाण्यात घुसले, परंतु देठाच्या मार्गाने शोधीत शोधीत नाभिप्रदेशाजवळ जाऊनही त्यांना कोणतीही वस्तू दिसली नाही. (१९)
तमस्यपारे विदुरात्मसर्गं
विचिन्वतोऽभूत् सुमहांस्त्रिणेमिः । यो देहभाजां भयमीरयाणः परिक्षिणोत्यायुरजस्य हेतिः ॥ २० ॥
अंधार मार्गातचि धुंडिताना गेला किती काळ तया न बोध । ते कालचक्रो भगवंत लीला जेणे जिवाला भय आयु क्षीण ॥ २० ॥
विदुर - हे विदुरा - अपारे - अगाध अशा - तमसि - अज्ञानमोहात - पतित्वा - पडून - आत्मसर्गम् - आपल्या उत्पत्तीच्या कारणाला - विचिन्वतः - शोधणार्या ब्रह्मदेवाचा - सुमहान् - फार मोठा - त्रिणेभिः - वर्तमान, भूत व भविष्य अशा तीन आहेत धावा ज्याला असा काल - अभूत् - झाला - यः - जो काल - अजस्य - ईश्वराचे - हेतिः - शस्त्रस्वरूप असा - देहभाजाम् - व मनुष्यांना - भयम् - भीति - ईरयाणः - उत्पन्न करणारा असा - तेषाम् - मनुष्यांच्या - आयुः - आयुष्याला - परिक्षिणोति - क्षीण करतो ॥२०॥
विदुरा, त्या गडद अंधारात आपल्या उत्पत्तिस्थानाला शोधण्यात ब्रह्मदेवांचा पुष्कळ काळ व्यतीत झाला. हा काळ म्हणजेच भगवंतांचे (काल) चक्र आहे, जो प्राण्यांना भयभीत करून त्यांचे आयुष्य क्षीण करीत राहतो. (२०)
ततो निवृत्तोऽप्रतिलब्धकामः
स्वधिष्ण्यमासाद्य पुनः स देवः । शनैर्जितश्वासनिवृत्तचित्तो न्यषीददारूढसमाधियोगः ॥ २१ ॥
अखेर ना येश मिळे तयाला तेंव्हा पुन्हा तो परतोनि आला । पद्मात बैसोनि तसाच प्राण रोधोनि, संकल्प धारोनि ध्यान ॥ २१ ॥
अप्रतिलब्धक्रामः - पूर्ण झाला नाही मनोरथ ज्याचा असा - ततः - तेथून - निवृत्तः - परत फिरलेला असा - सः देवः - तो ब्रह्मदेव - पुनः - पुनः - स्वधिष्ण्यम् - आपल्या स्थानावर - आसाद्य - येऊन - शनैः - हळूहळू - जितश्वासनिवृत्तचित्तः - प्राणांचे नियमन केल्यामुळे स्वस्थ झाले आहे अन्तःकरण ज्याचे असा - आरूढसमाधियोगः - व अभ्यास केला आहे समाधियोगाचा ज्याने असा ॥२१॥
शेवटी आपली इच्छा पूर्ण न झाल्याने निराश होऊन ते तेथून माघारी फिरले आणि पुन्हा आपल्या आधारभूत कमलावर बसून हळू हळू प्राणवायूवर विजय मिळवून, चित्तातील सर्व संकल्प काढून टाकून, समाधीत स्थिर झाले. (२१)
कालेन सोऽजः पुरुषायुषाभि
प्रवृत्तयोगेन विरूढबोधः । स्वयं तदन्तर्हृदयेऽवभातं अपश्यतापश्यत यन्न पूर्वम् ॥ २२ ॥
केला तयाने शतवर्ष योग तेंव्हा तया ज्ञान मिळोनि गेले । झाले तया आत्म प्रकाश ज्ञान पाहू शके तो मग सृष्टि सर्व ॥ २२ ॥
पुरुषायुषा - पुरुषाचे आहे आयुष्य ज्यात अशा - कालेन - काळाने - अभिप्रवृत्तयोगेन - अभ्यासिलेल्या समाधियोगामुळे - विरूढबोधः - उत्पन्न झाले आहे ज्ञान ज्याला असा - सः अजः - तो ब्रह्मदेव - यत् - जे - पूर्वम् - पूर्वी - न अपश्यत - पाहता झाला नव्हता - तत् - ते स्वरूप - स्वयम् - स्वतःच्या - अन्तर्हृदये - अन्तःकरणात - अवभातम् - प्रगट झालेले - अपश्यत - पाहिले ॥२२॥
अशा प्रकारे दिव्य शंभर वर्षे चांगल्या तर्हेने योगाभ्यास करून ब्रह्मदेवांना ज्ञान झाले, तेव्हा अगोदर शोधूनही जे आपले अधिष्ठान त्यांना सापडले नव्हते, ते त्यांच्या स्वतःच्या अंतःकरणातच प्रकाशित होत असलेले त्यांनी पाहिले. (२२)
मृणालगौरायतशेषभोग
पर्यङ्क एकं पुरुषं शयानम् । फणातपत्रायुतमूर्धरत्न द्युभिर्हतध्वान्तयुगान्ततोये ॥ २३ ॥
मृणाल गौरां दसहस्त्र डोकी शैय्या अशी शेष अंगास एक । पाही जधी त्या पुरुषोत्तमाला मिटोनि अंधार प्रकाश झाला ॥ २३ ॥
फणातपत्रायुतमूर्धरत्नद्युभिः - फणारूपी छत्रांनी युक्त अशा मस्तकांच्या वरील रत्नांच्या प्रभांना - हतध्वान्तयुगान्ततोये - घालविला आहे अन्धःकार ज्यावरील अशा प्रलयकाळाच्या उदकात - मृणालगौरायतशेषभोगपर्यङ्के - कमळाच्या गाभ्याप्रमाणे शुभ्र व भव्य अशा शेषरूपी शय्येवर - शयानम् - निजणार्या - एकं पुरुषम् - एका पुरुषाला ॥२३॥
त्यांनी असे पाहिले की, त्या प्रलयकालीन जलामध्ये शेषाच्या कमलाच्या देठासारख्या गोर्या आणि विशाल शय्येवर पुरुषोत्तम भगवान एकटेच पहुडले आहेत. शेषनागाच्या हजारो फणा छत्रासारख्या पसरल्या आहेत. त्यांच्या मस्तकावरील किरीटावर जी रत्ने जडविली होती त्यांच्या प्रकाशाने प्रलयाच्या पाण्यातील अंधार नाहीसा झाला आहे. (२३)
प्रेक्षां क्षिपन्तं हरितोपलाद्रेः
सन्ध्याभ्रनीवेरु रुरुक्ममूर्ध्नः । रत्नोदधारौषधिसौमनस्य वनस्रजो वेणुभुजाङ्घ्रिपाङ्घ्रेः ॥ २४ ॥
तो आपुल्या श्याम तनूस शोभे त्या नीलकांता मनिं लाज वाटे । सायंप्रकाशात ढगास रंग पीतांबराने पडला फिका की ॥ २४ ॥
संध्याभ्रनीवेः - संध्याकाळचे मेघच आहेत नेसण्याचे वस्त्र ज्याचे अशा - उरुरुक्ममूर्घ्नः - व विपुल आहेत सुवर्णाची शिखरे ज्याला अशा - रत्नौदधारौषधिसौमनस्यवनस्त्रजः - रत्ने, उदकांचे प्रवाह, वनस्पति व पुष्पसमूह यांच्या आहेत वनमाळा ज्यावर अशा - वेणुभुजाङ्घ्रिपाङ्घ्रेः - वेळू हेच ज्याचे बाहू आहेत व वृक्ष हेच ज्याचे पाय आहेत अशा - हरितोपलाद्रेः - पाचूच्या पर्वताच्या - प्रेक्षाम् - शोभेला - क्षिपन्तम् - मागे सारणाराला ॥२४॥
ते आपल्या शरीराच्या तेजाने पाचूच्या रत्नपर्वताच्या शोभेवर मात करीत आहेत. त्यांच्या कमरेचा पीतांबर पर्वत प्रांतात पसरलेल्या संध्याकाळच्या पिवळसर चकचकीत मेघांचे सौंदर्यही धूसर करीत आहे. मस्तकावरील सुशोभित सुवर्णमुकुट सुवर्ण शिखरांनाही मान खाली घालावयास लावीत आहे. त्यांच्या गळ्यातील वनमाला पर्वतावरील रत्ने, धबधबे, वनस्पती आणि फुलांच्या शोभेला निस्तेज करून टाकीत आहे आणि त्यांचे बाहू बांबूंचा आणि चरण वृक्षांचा तिरस्कार करीत आहेत. (२४)
आयामतो विस्तरतः स्वमान
देहेन लोकत्रयसङ्ग्रहेण । विचित्रदिव्याभरणांशुकानां कृतश्रियापाश्रितवेषदेहम् ॥ २५ ॥
श्री विग्रहा चौक त्रिलोक भासे ऐसा तदा तो गमला विशाल । विचित्र वस्त्राभरणे पहा ते सुसज्ज जैसे कुणि पाहिले ना ॥ २५ ॥
लोकत्रयसंग्रहेण - तीन लोकांचा आहे समावेश ज्यामध्ये अशा - विचित्रदिव्याभरणांशुकानाम् कृताश्रिया - चित्रविचित्र व उंची असे अलंकार आणि वस्त्रे यांना दिली आहे सर्वत्र शोभा ज्याने अशा - आयामतः - लांबीने - च - आणि - विस्तरतः - रुंदीने - स्वमानदेहेन - सुंदर व निरुपम अशा शरीराने - अपाश्रितवेषदेहम् - धारण केले आहेत अलंकार ज्यावर असे आहे शरीर ज्याचे अशा ॥२५॥
त्यांच्या शरीराच्या लांब-रूंद विस्ताराने त्रैलोक्य व्यापल्यासारखे वाटते. ते आपल्या शोभेने, निरनिराळ्या दिव्य वस्त्रांना, आभूषणांना सुशोभित करणारे असूनही पीतांबर इत्यादी वस्त्रालंकारांनी सुशोभित आहेत. (२५)
पुंसां स्वकामाय विविक्तमार्गैः
अभ्यर्चतां कामदुघाङ्घ्रिपद्मम् । प्रदर्शयन्तं कृपया नखेन्दु मयूखभिन्नाङ्गुलिचारुपत्रम् ॥ २६ ॥
इच्छा मनीच्या करण्या पुर्या त्या पदास ठेवी निजभक्त राजा । बोटास शोभा जणु चंद्रिका त्या नखाग्र होऊनि प्रकाशल्या की ॥ २६ ॥
स्वकामाय - आपल्या इच्छित फलाकरिता - विवक्तमार्गैः - शुद्ध मार्गानी - अभ्यर्चताम् - पूजा करणार्या - पुंसाम् - पुरुषांना - नखेन्दुमयूखभिन्नाङ्गुलिचारुपत्रम् - नखरूपी चंद्राच्या किरणांनी युक्त अशी बोटे हीच आहेत सुंदर पाने ज्याची अशा - कामदुघाङ्घ्रिपद्मम् - इच्छा पूर्ण करणार्या अशा चरणकमलाला - कृपया - दयेने - प्रदर्शयन्तम् - दाखविणाराला ॥२६॥
आपापल्या इच्छापूर्तीसाठी निरनिराळ्या मार्गांनी पूजा करणार्या भक्तजनांना कृपापूर्वक आपल्या इच्छा पूर्ण करणार्या चरणकमलांचे दर्शन देत आहेत. त्यांची सुंदर बोटे नखचंद्रिकांमुळे वेगवेगळी अशी स्पष्ट चमकत आहेत. (२६)
मुखेन लोकार्तिहरस्मितेन
परिस्फुरत् कुण्डलमण्डितेन । शोणायितेनाधरबिम्बभासा प्रत्यर्हयन्तं सुनसेन सुभ्र्वा ॥ २७ ॥
आकर्षि लोकांस असेच हास्य नी हालती कुंडल कर्ण भागी । ती लालिमा केसरयुक्त ओठी भक्ता जणू तो अभयोचि बोले ॥ २७ ॥
लोकार्तिहरस्मितेन - लोकांच्या पीडेला हरण करणारे आहे मंद हास्य ज्यामध्ये अशा - परिस्फुरत्कुण्डलमण्डितेन - चकचकणार्या कुंडलांनी सुशोभित अशा - अधरबिम्बभासा - अधरोष्ठरूपी बिंबफलाच्या कांतीने - शोणायितेन - लाल दिसणार्या अशा - सुनसेन - सुंदर आहे नासिका ज्याची अशा - सुभ्रवा - सुंदर आहेत भ्रुकटी ज्यावर अशा - मुखेन - मुखाने - प्रत्यर्हयन्तम् - भक्तांचा सत्कार परत करणार्या अशा ॥२७॥
सुंदर नासिका, रेखीव भुवया, कानातील झगमगणार्या कुंडलांची शोभा, यांनी लालसर ओठांची कांती आणि भक्तांची पीडा दूर करणारे हास्ययुक्त मुखकमल याने ते आपल्या भक्तांचा सन्मान करीत आहेत. (२७)
कदम्बकिञ्जल्कपिशङ्गवाससा
स्वलङ्कृतं मेखलया नितम्बे । हारेण चानन्तधनेन वत्स श्रीवत्सवक्षःस्थलवल्लभेन ॥ २८ ॥
तो केसरी वस्त्रहि नेसला नी शोभून आल्या कटि मेखळा त्या । श्रीवत्सचिन्हांकित रेख शोभे वृक्षस्थळासी वनमाळ तैसी ॥ २८ ॥
वत्स - हे विदुरा - नितम्बे - कमरेला - कदम्बकिञ्जल्कपिशङ्गवाससा - कदंबाच्या फुलातील केशराप्रमाणे पिंगट वर्णाच्या वस्त्राने - च - आणि - मेखलया - कमरपट्ट्याने - च - आणि - श्रीवत्सवक्षस्थलवल्लभेन - श्रीवत्सनामक केसांच्या भोवर्याने युक्त असे जे वक्षस्थळ त्याला प्रिय अशा - अनंतधनेन - अगणित आहे किंमत ज्याची अशा - हारेण - हाराने - स्वलङ्कृतम् - सुशोभित अशा ॥२८॥
वत्सा, त्यांच्या कमरेवर कदंबफुलातील केसराप्रमाणे पीतांबर आणि सुवर्णमेखला शोभत आहेत. तसेच अमूल्य हार आणि सुंदर श्रीवत्सचिन्ह वक्षःस्थळावर शोभून दिसत आहे. (२८)
परार्ध्यकेयूरमणिप्रवेक
पर्यस्तदोर्दण्डसहस्रशाखम् । अव्यक्तमूलं भुवनाङ्घ्रिपेन्द्र महीन्द्रभोगैरधिवीतवल्शम् ॥ २९ ॥
अव्यक्त ऐसा हरि चंदनो तो बलिष्ट बाहू जणु वृक्ष शाखा । केयूर तैसे मणिरत्न धारी नी शेष मंडीतचि स्कंध त्याचा ॥ २९ ॥
परार्ध्यकेयुरमणि - बहुमोल बाहुभूषणांनी व उत्तम मण्यांनी - प्रवेकपर्यस्तदोर्दण्डसहस्त्रशाखम् - भरलेले असे बाहू ह्याच आहेत अनंत शाखा ज्याच्या अशा - अव्यक्तमूलम् - अदृष्ट आहेत मुळे ज्यांची म्हणजे ब्रह्म आहे मूळ कारण ज्याचे अशा - अहीन्द्रभोगैः - शेषाच्या फणांनी - अधिवीतवल्शम् - वेष्टिलेल्या आहेत शाखा ज्याच्या अशा - भुवनाङ्घ्रिपेन्द्रम् - जगत्स्वरूपी मोठ्या वृक्षाला ॥२९॥
ते अव्यक्त मूळ असलेल्या चंदनाच्या वृक्षाप्रमाणे आहेत. महामूल्य उत्तमोत्तम मण्यांनी सुशोभित अशा अंगदांनी युक्त त्यांचे विशाल भुजदंड हे जणू त्या वृक्षाच्या हजारो शाखाच आहेत आणि त्यांच्या खांद्यांना शेषनागाने लपेटले आहे. (२९)
चराचरौको भगवन् महीध्र
महीन्द्रबन्धुं सलिलोपगूढम् । किरीटसाहस्रहिरण्यश्रृङ्गं आविर्भवत्कौस्तुभरत्नगर्भम् ॥ ३० ॥
चराचरा आश्रय पर्वताचा पाण्यात वेढोनि तसा दिसे तो । सहस्त्र शृंगी किरिटो असे तो हिरण्यगर्भा परि कौस्तुभो तो ॥ ३० ॥
चराचरौकः - स्थावर आणि जंगम यांचा आश्रय अशा - अहीन्द्रबन्धुम् - शेषाची प्रीतिस्थान अशा - सलिलोपगूढम् - पाण्याने वेष्टिलेला अशा - किरीटसाहस्त्रहिरण्यशृङ्गम् - हजारो किरीट हेच आहेत सुवर्णाची शिखरे ज्याची अशा - आविर्भवत्कौस्तुभरत्नगर्भम् - स्पष्ट दिसत आहे कौस्तुभमणि ज्यात असा आहे अंतर्भाग ज्याचा - भगवन्महीन्ध्रम् - भगवत्स्वरूपी पर्वताला ॥३०॥
नागराज अनंताचे बंधू श्रीनारायण सभोवती पाणी असलेल्या पर्वतासारखे आहेत. ते संपूर्ण चराचराचे आश्रय आहेत. हजारो मुकुट ही त्या पर्वताची जणू सुवर्णमंडित शिखरेच आहेत. तसेच त्यांच्या वक्षःस्थळावर शोभणारा कौस्तुभमणी जणू पर्वतातून प्रगट झालेले रत्नच आहे. (३०)
निवीतमाम्नायमधुव्रतश्रिया
स्वकीर्तिमय्या वनमालया हरिम् । सूर्येन्दुवाय्वग्न्यगमं त्रिधामभिः परिक्रमत् प्राधनिकैर्दुरासदम् ॥ ३१ ॥
गंधीत होती वनमाळ कंठी गुंजारवो वेदभृंगो करीती । सूर्येन्दु वायूऽग्नि देवतांना सुदर्शनाही नव्हताच थारा ॥ ३१ ॥
आम्नायमधुव्रतश्रिया - वेदरूपी भ्रमरांची आहे शोभा जिला अशा - स्वकीर्तिमय्या - आपली कीर्तिस्वरूप अशा - वनमालया - वनमालेच्या योगाने - निवीतम् - व्याप्त अशा - सूर्येन्दुवाय्वग्न्यगमम् - सूर्य, चंद्र व वायु यांना जाणण्यास अशक्य अशा - त्रिधामभिः - तीन लोकांमध्ये आहे तेज ज्यांचे अशा - परिक्रमत्प्राधनिकैः - सभोवार फिरणार्या आयुधांमुळे - दुरासदम् - जिंकण्यास अशक्य अशा - हरिम् - ईश्वराला - ब्रह्मा अपश्यत् - ब्रह्मदेव पाहता झाला ॥३१॥
प्रभूंच्या गळ्यामध्ये जणू वेदरूप भ्रमर गुंजारव करीत असलेली कीर्तिमय वनमाला विराजत आहे. सूर्य, चंद्र, वायू, अग्नी आदी देवताही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्रिभुवनात स्वैरपणे संचार करणार्या सुदर्शन चक्रासारखी आयुधे प्रभूंच्या आजूबाजूलाच फिरतात, त्यामुळे त्यांच्या जवळ जाणे कठीण आहे. (३१)
तर्ह्येव तन्नाभिसरःसरोजं
आत्मानमम्भः श्वसनं वियच्च । ददर्श देवो जगतो विधाता नातः परं लोकविसर्गदृष्टिः ॥ ३२ ॥
जो सृष्टि इच्छी रचण्यास ब्रह्मा तो पाहि माभी कमळास आणि । आकाश वायू नि स्वदेह पाणी याहूनि त्याला न दिसेच कांही ॥ ३२ ॥
तर्हि एव - त्याच वेळी - लोकविसर्गदृष्टिः - लोकांच्या उत्पत्तीचे आहे ज्ञान ज्याला असा - जगतः - व जगाचा - विधाता - उत्पन्नकर्ता असा - देवः - ब्रह्मदेव - तन्नाभिसरःसरोजम् - परमेश्वराच्या नाभीरूपी सरोवरातील कमळाला - आत्मानम् - स्वतःला - अम्भः - पाण्याला - श्वसनम् - वायूला - च - आणि - वियत् - आकाशाला - ददर्श - पाहाता झाला - अतः - यापेक्षा - परम् - दुसरे - न - न पाहाता झाला ॥३२॥
तेव्हा विश्वाची रचना करण्याची इच्छा करणारे लोकविधाता ब्रह्मदेव यांनी भगवंतांच्या नाभिसरोवरातून प्रगट झालेल्या कमल, जल, आकाश, वायू आणि आपले शरीर ह्याच केवळ पाच वस्तू पाहिल्या. याशिवाय त्यांना दुसरे काहीही दिसले नाही. (३२)
स कर्मबीजं रजसोपरक्तः
प्रजाः सिसृक्षन्नियदेव दृष्ट्वा । अस्तौद् विसर्गाभिमुखस्तमीड्यं अव्यक्तवर्त्मन्यभिवेशितात्मा ॥ ३३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥
रजो गुणी व्याप्त मनात इच्छी प्रजा रचाया परि तेथ कांही । ना पंचभूता विष्णु तैं दिसे की तेंव्हा तये प्रार्थिले त्या प्रभूला ॥ ३३ ॥ ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ आठवा अध्याय हा ॥ ३ ॥ ८ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ सातवा अध्याय हा ॥ ३ ॥ ७ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
रजसा - रजोगुणाने - उपरक्तः - युक्त असा - सः - तो ब्रह्मदेव - प्रजाः - प्रजांना - सिसृक्षन् - उत्पन्न करण्याची इच्छा करणारा असा - अव्यक्तवर्त्मनि - अदृश्य आहे मार्ग ज्याचा अशा परमेश्वराच्या ठिकाणी - अभिवेशितात्मा - स्थिर केले आहे अंतःकरण ज्याने असा - विसर्गाभिमुखः - सृष्टि करण्याकडे लागले आहे चित्त ज्याचे असा - इयत् एव - कमल, स्वतः, उदक, वायु व आकाश इतकेच - कर्मबीजम् - सृष्टिकर्माचे मूळ साहित्य - दृष्ट्वा - पाहून - ईड्यम् - स्तुति करण्यास योग्य अशा - तम् - त्या परमेश्वराला - अस्तौत् - स्तविता झाला ॥३३॥
रजोगुणाने व्याप्त झालेले ब्रह्मदेव प्रजेची निर्मिती करू इच्छित होते. त्यांनी जेव्हा सृष्टीला कारणीभूत असणार्या या पाचच वस्तू पाहिल्या, तेव्हा लोकनिर्मितीला उत्सुक झाल्या कारणाने त्यांनी अचिंत्यगती श्रीहरींमध्ये आपले चित्त एकाग्र केले आणि त्या परमपूजनीय प्रभूची ते स्तुती करू लागले. (३३)
स्कंध तिसरा - अध्याय आठवा समाप्त |