![]() |
श्रीमद् भागवत पुराण
निर्गुणस्य भगवतो गुणक्रियादिसङ्गः कथिमिति प्रश्नस्य विदुराचे प्रश्न - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्) एवं ब्रुवाणं मैत्रेयं द्वैपायनसुतो बुधः । प्रीणयन्निव भारत्या विदुरः प्रत्यभाषत ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - ( अनुष्टुप् ) मैत्रय बोलता ऐसे बुद्धिमान् व्यासनंदने- । विदुरे पुसले प्रश्न प्रसन्न वाणिने असे ॥ १ ॥
द्वैपायनसुतः - व्यासाचा पुत्र - बुधः विदुरः - ज्ञानी असा विदुर - एवम् - या प्रकारे - ब्रुवाणम् मैत्रेयम् - बोलणार्या मैत्रेय ऋषीला - भारत्या - वाणीने - प्रीणयन् इव - जणू आनंद देत - प्रत्यभाषत - बोलला ॥१॥
श्रीशुकदेव म्हणाले - मैत्रेय मुनींचे हे भाषण ऐकून बुद्धिमान व्यासपुत्र विदुराने आपल्या वाणीने त्यांना प्रसन्न करीत विचारले. (१)
विदुर उवाच ।
ब्रह्मन् कथं भगवतः चिन्मात्रस्याविकारिणः । लीलया चापि युज्येरन् निर्गुणस्य गुणाः क्रियाः ॥ २ ॥
विदुरजी म्हणाले- ब्रह्मन् ! सांगा कसा देव निर्विकार असोनिया । लीलेने गुणक्र्माच्या संबंधी जाहला कसा ॥ २ ॥
ब्रह्मन् - हे मैत्रेया - अविकारिणः - विकार ज्याला नाही अशा - निर्गुणस्य - निर्गुण - चिन्मात्रस्य भगवतः - चैतन्यरूप षड्ग्णैश्वर्यसंपन्न परमेश्वराला - क्रियाः - क्रिया - च - आणि - गुणाः - सत्त्वादि गुण - लीलया अपि - लीलेने सुद्धा - कथं युज्येरन् - कसे संयुक्त करतील ॥२॥
विदुर म्हणाला- ब्रह्मन ! भगवंत शुद्ध बोधस्वरूप निर्विकार आणि निर्गुण आहेत. त्यांचा लीलेने का असेना पण गुण आणि क्रियांशी संबंध कसा येतो ? (२)
क्रीडायां उद्यमोऽर्भस्य कामश्चिक्रीडिषान्यतः ।
स्वतस्तृप्तस्य च कथं निवृत्तस्य सदान्यतः ॥ ३ ॥
बाळात खेळण्या इच्छा कामना सर्व नांदती । असंग तृप्त भगवान् क्रीडा संकल्प का करी ॥ ३ ॥
अर्भस्य - बालकाच्या - क्रीडायाम - खेळण्याकडे होणार्या - उद्यमः - प्रवृत्तीचे कारण - कामः - इच्छा - अस्ति - आहे - च - आणि - चिक्रीडिषा - खेळण्याची इच्छा - अन्यतः - दुसर्या वस्तूमुळे किंवा दुसर्या मुलांच्या प्रेरणेने - भवति - होते - तु - परंतु - स्वतः तृप्तस्य - स्वतःच्याच योगे तृप्त असलेल्या - सदा - सर्वकाल - अन्यतः निवृतस्य - दुसर्यापासून निवृत्त असलेल्या परमेश्वराला - चिक्रीडिषा - खेळ्ण्याची इच्छा - कथम् - कशी - संभवति - संभवते. ॥३॥
बालकामध्ये कामना आणि दुसर्यांच्या बरोबर खेळण्याची इच्छा असते; म्हणूनच ते खेळण्याचा प्रयत्न करते. परंतु भगवंत तर स्वतः नित्यतृप्त आणि नेहमी आसक्तिरहित आहेत. असे असता ते क्रीडा करण्यासाठी का होईना, संकल्प कशासाठी करतील ? (३)
अस्राक्षीत् भगवान् विश्वं गुणमय्याऽऽत्ममायया ।
तया संस्थापयत्येतद् भूयः प्रत्यपिधास्यति ॥ ४ ॥
ईशाने आपुल्या माये रचिले जग सर्व हे । तोचि जगवितो सारे नष्टील तोचि परी ॥ ४ ॥
भगवान् - भगवान् - गुणमय्या - सत्त्वादि गुण जीमध्ये आहेत अशा - आत्मयायया - आपल्या मायेने - एतत् विश्वम् अस्त्राक्षीत् - ह्या जगाला उत्पन्न करता झाला - तया - त्या मायेच्या योगाने - एतत् संस्थापयति - या विश्वाचे पालन करतो - च - आणि - भूयः - पुनः - प्रत्यपिधास्यति - लय करील. ॥४॥
भगवंतांनी आपल्या गुणमय मायेने जगाची रचना केली आहे, त्या मायेनेच ते त्याचे पालन करतात आणि नंतर मायेद्वारेच त्याचा संहार पण करतील. (४)
देशतः कालतो योऽसौ अवस्थातः स्वतोऽन्यतः ।
अविलुप्तावबोधात्मा स युज्येताजया कथम् ॥ ५ ॥
देश काल अवस्थांनी लोपेना कधि ही तसा । तरी माये सवे त्याचा संयोग घडतो कसा ॥ ५ ॥
यः - जो - असौ - हा जीव - देशतः - देशामुळे - कालतः - कालामुळे - अवस्थातः - अवस्थेमुळे - स्वतः - आपल्यामुळे - अन्यतः - दुसर्यामुळे - अविलुप्तावबोधात्मा - लुप्त झाले नाही ज्ञानस्वरूप ज्याचे असा - अस्ति - आहे - सः - तो जीव - अजया - मायेशी - कथं युज्येत - कसा युक्त होईल. ॥५॥
ज्यांच्या ज्ञानाचा, काल किंवा अवस्थेमुळे, आपोआप किंवा दुसर्या कोणत्याही निमित्ताने कधीच लोप होत नाही, त्यांचा मायेबरोबर कसा संयोग होऊ शकेल ? (५)
भगवानेक एवैष सर्वक्षेत्रेष्ववस्थितः ।
अमुष्य दुर्भगत्वं वा क्लेशो वा कर्मभिः कुतः ॥ ६ ॥
एकटा भगवान् सर्व क्षेत्राचा साक्षिभूत तो । मग दुर्भाग्य क्लेशादी तयाला प्राप्त ते कसे ॥ ६ ॥
एषः - हा - भगवान् - भगवान् - एकः एव - एकटाच - सर्वक्षेत्रेषु - सर्व शरीरात - अवस्थितः - राहिलेला - अस्ति - आहे - अमुष्य - ह्या जीवाला - दुर्भगत्वम् - दुःख - वा - अथवा - कर्मभिः क्लेशः - कर्मामुळे होणारा क्लेश - वा कुतः - कोठून - संभवेत् - संभवणार ॥६॥
एकमात्र हे भगवंतच सर्व (जीवांमध्ये) साक्षीरूपाने आहेत, तर मग त्यांना दुर्दैव कोठून असेल ? किंवा कर्मांमुळे क्लेश कसे होऊ शकतील ? (६)
एतस्मिन्मे मनो विद्वन् खिद्यतेऽज्ञानसङ्कटे ।
तन्नः पराणुद विभो कश्मलं मानसं महत् ॥ ७ ॥
अज्ञान संकटे माझे मन हे खिन्न जाहले । ब्रह्मणा मन्मनाच्या या मोहाला दूर सारिणे ॥ ७ ॥
विद्वन् - हे ज्ञानी मैत्रेया - मे मनः - माझे मन - एतस्मिन् अज्ञानसंकटे - ह्या अज्ञानरूपी कठीण मार्गात - खिद्यते - खिन्न होते - विभो - हे प्रभो मैत्रेया - तत् - त्यास्तव - नः - आमच्या - महत् मानसं कश्मलम् - मोठ्या मानसिक मोहाला - पराणुद - दूर कर ॥७॥
भगवन, या अज्ञानसंकटात पडल्याने माझे मन खिन्न होत आहे. आपण माझ्या मनातील हा महामोह कृपा करून दूर करा.(७)
श्रीशुक उवाच -
स इत्थं चोदितः क्षत्त्रा तत्त्वजिज्ञासुना मुनिः । प्रत्याह भगवच्चित्तः स्मयन्निव गतस्मयः ॥ ८ ॥
श्री शुकदेवजी सांगतात्- जिज्ञासू विदुरां ऐसी प्रेरणा जाहली पहा । निरहंकारि मैत्रेये श्रीकृष्णी मन लाविले ॥ मागुती हासले आणि पुढे ते बोलले असे ॥ ८ ॥
तत्त्वजिज्ञासुना क्षत्त्रा - तत्त्व जाणण्याची इच्छा करणार्या विदुराने - इत्थम् - पूर्वोक्तप्रकारे - चोदितः - प्रेरणा केलेला - सः मुनिः - तो मैत्रेय ऋषि - भगवश्चित्तः - भगवन्ताच्या ठिकाणी चित्त आहे ज्याचे व - गतस्मयः - ज्याचा गर्व गेला आहे असा - स्मयन् इव प्रत्याह - हसतच जणू काय प्रत्युत्तर देता झाला ॥८॥
श्रीशुकदेव म्हणतात - तत्त्वजिज्ञासू विदुराचेकडून प्रेरणा मिळालेल्या अहंकाररहित मैत्रेयांनी भगवंतांचे स्मरण करीत सुहास्यवदनाने म्हटले.(८)
मैत्रेय उवाच -
सेयं भगवतो माया यन्नयेन विरुध्यते । ईश्वरस्य विमुक्तस्य कार्पण्यमुत बन्धनम् ॥ ९ ॥
मैत्रेयजी म्हणाले- सर्वात्मा मुक्त तो नित्य न बद्ध सत्य ते असे । मायेने परि तो ईश दावितो खेळ आगळे ॥ ९ ॥
विमुक्तस्य - सर्वस्वी बंधनरहित - जीवस्य - जीवाला - बन्धनम् - बन्धन - उत - आणि - कार्पण्यम् - दुःख - भवति - होते - इति यत् - हे जे - नयेन विरुध्यते - तर्काशी विरुद्ध दिसते - सा - ती - इयम् - ही - भगवतः - षड्गुणैश्वर्यसंपन्न - ईश्वरस्य - ईश्वराची - माया - माया - अस्ति - आहे ॥९॥
मैत्रेय म्हणाले - जो आत्मा सर्वांचा स्वामी आणि सर्वथा मुक्तस्वरूप आहे, त्याला दीनता आणि बंधन प्राप्त झाले, ही गोष्ट युक्तिसंगत नाही. परंतु तीच तर भगवंतांची माया आहे. (९)
यदर्थेन विनामुष्य पुंस आत्मविपर्ययः ।
प्रतीयत उपद्रष्टुः स्वशिरश्छेदनादिकः ॥ १० ॥
स्वप्नात जाहला घाव भयानेजीव घाबरे । तसा तो बंधनी भासे मुक्त तो सत्य हे असे ॥ १० ॥
यत् - कारण - अमुष्य उपद्रष्टुः पुंसः - ह्या स्वप्न पाहणार्या पुरुषाला - स्वशिरश्छेदनात्मकः - आपले मस्तक तुटणे इत्यादि - आत्मविपर्ययः - शरीरामध्ये होणारा भेद - अर्थेन विना - वास्तविक स्थितीवाचून - प्रतीयते - भासतो ॥१०॥
ज्याप्रमाणे स्वप्न पाहाणार्या पुरुषाला आपले मस्तक छाटले आहे इत्यादी घटना न होताही अज्ञानामुळे खर्या वाटतात, त्याचप्रमाणे या जीवाला बंधन इत्यादी काहीही नसताना अज्ञानामुळे तसा भास होतो. (१०)
यथा जले चन्द्रमसः कम्पादिस्तत्कृतो गुणः ।
दृश्यतेऽसन्नपि द्रष्टुः आत्मनोऽनात्मनो गुणः ॥ ११ ॥
जळींच्या च्ंद्र बिंबाला कंपाने छेद भासती न जाणे परि तो चंद्र जळात काय जाहले । तसे त्या भगवत् रूपा जीवाचे सुख दुःख नी देहभिमान यांचाही ठाव तो नेणतो मुळी ॥ ११ ॥
यथा - ज्याप्रमाणे - जले - पाण्यात - तत्कृतः - पाण्याने केलेला - कम्पादिः - हालणे इत्यादि व्यापार - चन्द्रमसः - चन्द्राचा - गुणः असन् अपि - गुण नसून देखील - दृश्यते - दिसतो - तथा - त्याप्रमाणे - अनात्मनः - देह, इन्द्रिये इत्यादिकांचा - गुणः - गुण - द्रष्टुः आत्मनः - देहादिकांचा अभिमानी अशा साक्षीभूत जीवात्म्याचा - दृश्यते - दिसतो ॥११॥
ज्याप्रमाणे पाण्यावर उठणारे तरंग चंद्राच्या प्रतिबिंबावर न उमटताही तसे भासतात, आकाशातील चंद्रावर नाही, तसे देहाभिमानी जीवांनाच देहाच्या मिथ्या धर्मांची प्रचीती येते, परमात्म्याला नाही. (११)
स वै निवृत्तिधर्मेण वासुदेवानुकम्पया ।
भगवद्भक्तियोगेन तिरोधत्ते शनैरिह ॥ १२ ॥
निष्काम आचरे धर्म भगवान् त्यास पावतो । भक्तियोगे करोनीया हळू तो मुक्त होतसे ॥ १२ ॥
वै - खरोखर - सः - तो देहादिकांचा गुण - निवृत्तिधर्मेण - विषयत्यागरूप धर्माचरणाने - च - आणि - वासुदेवानुकम्पया - परमेश्वराच्या कृपेने - भगवद्भक्तियोगेन - भगवन्ताच्या ठिकाणी भक्ति जडल्यामुळे - इह - या लोकी - शनैः - हळूहळू - तिरोधत्ते - नाहीसा होतो ॥१२॥
या जगात निष्कामभावाने धर्माचे आचरण केल्यावर भगवत्कृपेने प्राप्त झालेल्या भगवंतांच्या भक्तियोगाच्या द्वारे ही प्रचीती हळूहळू नाहीशी होते. (१२)
यदेन्द्रियोपरामोऽथ द्रष्ट्रात्मनि परे हरौ ।
विलीयन्ते तदा क्लेशाः संसुप्तस्येव कृत्स्नशः ॥ १३ ॥
इंद्रिये विषयातून हरीसी जे स्थिरावती । विकारा सांडि निद्रीत इंद्रिये राहती तशी ॥ १३ ॥
अथ - नंतर - यदा - ज्यावेळी - द्रष्ट्रात्मनि परे हरौ - साक्षीरूपाने हृदयात राहून सर्वांचे दुःख हरण करणार्या परमेश्वराच्या ठिकाणी - इन्द्रियोपरामः - इन्दियांची निश्चलता - भवति - होते - तदा - त्यावेळी - संसुप्तस्य इव - निजलेल्या मनुष्याचे सर्व क्लेश जसे दूर होतात त्याप्रमाणे - क्लेशाः - क्लेश - कृत्स्त्रशः - सर्व प्रकारे - विलीयन्ते - नष्ट होतात. ॥१३॥
जेव्हा सर्व इंद्रिये विषयांपासून परावृत्त होऊन साक्षी असणार्या परमात्मा श्रीहरीमध्ये निश्चलभावाने स्थिर होतात, तेव्हा गाढ झोपलेल्या मनुष्य़ाप्रमाणे जीवाचे रागद्वेषादी सर्व क्लेश पूर्णपणे नाहीसे होतात. (१३)
अशेषसङ्क्लेशशमं विधत्ते
गुणानुवादश्रवणं मुरारेः । किं वा पुनस्तच्चरणारविन्द परागसेवारतिरात्मलब्धा ॥ १४ ॥
( इंद्रवज्रा ) नष्टोनि क्लेशा मन होय शुद्ध श्रीकृष्ण गाणी श्रवणी नि गाता । आम्हा हृदीं ते चरणारविंद होता असे तो मग काय सांगो ॥ १४ ॥
मुरारेः - मुरनामक दैत्याचा शत्रु अशा परमेश्वराच्या - गुणानुवादश्रवणम् - गुणांचे वर्णन आणि श्रवण - अशेषसंक्लेशशमम् - संपूर्ण दुःखाच्या शान्तीला - विधत्ते - करिते - आत्मलब्धा - मनात उत्पन्न झालेली - तच्चरणारविन्दपरागसेवारतिः - ईश्वराच्या चरणकमलावरील धुळीच्या सेवनाविषयीची प्रीति - विधत्ते - करिते - कुतः पुनः - हे काय पुनः सांगितले पाहिजे ॥१४॥
श्रीकृष्णांच्या गुणांचे वर्णन आणि श्रवण दुःखाच्या सर्व राशींना शांत करते; तर मग जर आमच्या हृदयात त्यांच्या चरणकमळपराग-सेवनाविषयी प्रेम जागृत झाले, तर काय विचारावे ? (१४)
विदुर उवाच -
(अनुष्टुप्) सञ्छिन्नः संशयो मह्यं तव सूक्तासिना विभो । उभयत्रापि भगवन् मनो मे सम्प्रधावति ॥ १५ ॥
विदुरजी म्हणाले-( अनुष्टुप् ) भगवन् ! युक्तिशस्त्राने संदेह कापिला मम । खोटा संदेह तो होता मायेची जळमटे जशी ॥ १५ ॥
विभो - समर्था मैत्रेया - तव सूक्तासिना - तुझ्या उत्तम भाषणरूपी खड्गाने - मह्यम् - माझा - संशयः संच्छिन्नः - संशय पार तुटला - भगवन् - हे भगवन् - उभयत्र अपि - ईश्वराचे स्वातंत्र्य व जीवाचे पारतंत्र्य या दोन्हीविषयी - मे मनः संप्रधावति - माझ्या मनाची नीट समजूत पटली ॥१५॥
विदुर म्हणाला - भगवन, आपल्या सयुक्तिक वचनांच्या तलवारीने माझे संदेह छिन्न-भिन्न झाले आहेत. आता माझे चित्त भगवंतांची स्वतंत्रता आणि जीवाची परतंत्रता या दोन्ही विषयांत प्रवेश करू लागली आहे. (१५)
साध्वेतद् व्याहृतं विद्वन् आत्ममायायनं हरेः ।
आभात्यपार्थं निर्मूलं विश्वमूलं न यद्बहिः ॥ १६ ॥
जीवांना जाणवे क्लेश मायेचा भासची असा । विद्वान ! सृष्टिचे मूळ नाही कांही तिच्या विना ॥ १६ ॥
विद्वन् - हे ज्ञानसंपन्न विदुरा - अपार्थं निर्मूलम् एतत् - ज्यात काही अर्थ नाही व ज्याला खरा आधारहि नाही असे हे बंधनात्मक दुःख - हरेः आत्ममायायनम् आभाति - भगवन्ताची जीवविषयक जी माया तिच्या आश्रयाने भासते - यत् बहिः विश्वमूलम् - जिच्या बाहेर सृष्टीचे कारण - अन्यत् - दुसरे - न - नाही - इति - याप्रमाणे - साधु व्याहृतम् - चांगले सांगितले ॥१६॥
अहो विद्वान, जीवाला जे क्लेश जाणवतात, त्याला आधार केवळ भगवंतांची माया, हे आपले म्हणणे बरोबर आहे. हे सर्व क्लेश मिथ्या तसेच आधाररहित आहेत. कारण या विश्वाचे मूळ कारण मायेशिवाय दुसरे कोणतेच नाही. (१६)
यश्च मूढतमो लोके यश्च बुद्धेः परं गतः ।
तावुभौ सुखमेधेते क्लिश्यत्यन्तरितो जनः ॥ १७ ॥
मूढ, संत असे दोघे सुखी ते जगतात या । संशयापन्न जे लोक वर्ग तो दुःख भोगितो ॥ १७ ॥
लोके यः मूढतमः - जगात जो अत्यन्त मूर्ख - च - आणि - बुद्धेः परं गतः - जो ज्ञानाच्या सीमेला पोचलेला आहे - तौ उभौ सुखम् एधेते - ते दोघे सुखाने राहतात - च - आणि - अन्तरितः जनः क्लिश्यति - या दोहोमधला मनुष्य दुःखाने पीडित होतो ॥१७॥
या संसारात दोनच प्रकारचे लोक सुखी आहेत. जे अत्यंत अज्ञानी आहेत किंवा बुद्धीच्या पलीकडे असणार्या भगवंतांची ज्यांनी प्राप्ती करून घेतली आहे. मधल्या श्रेणीतील संशयी लोक मात्र दुःखच भोगीत राहतात. (१७)
अर्थाभावं विनिश्चित्य प्रतीतस्यापि नात्मनः ।
तां चापि युष्मच्चरण सेवयाहं पराणुदे ॥ १८ ॥
अनात्मवस्तु हा भाभगवन् दाविला मज । कृपेने तुमच्या तोहि मोह झाडू शकेल मी ॥ १८ ॥
नात्मनः - आत्मस्वरूपी नव्हे अशा देहादि प्रपंचाचा - प्रतीतस्य अपि - अनुभवास येत असून सुद्धा - अर्ताभावं - वास्तविक खोटेपणा - युष्मच्चरणसेवया विनिश्चित्य - तुमच्या चरणांच्या सेवेने निश्चित करून - अहं - मी - तां - त्या प्रतीताला - अपि च - सुद्धा - पराणुदे - दूर करतो ॥१८॥
भगवन, आपल्या कृपेमुळे माझा आता निश्चय झाला आहे की, हे अनात्म पदार्थ खरे पहाता नाहीतच, ते केवळ आहेत असे वाटतात. आता मी आपल्या चरणसेवेच्या प्रभावाने तसे वाटणेही नाहीसे करीन. (१८)
यत्सेवया भगवतः कूटस्थस्य मधुद्विषः ।
रतिरासो भवेत्तीव्रः पादयोर्व्यसनार्दनः ॥ १९ ॥
मधुसूदन श्री भगवान् याच्या या नित्य दर्शने । वाढतो हर्ष तो नित्य मोहाच्या नाश होतसे ॥ १९ ॥
यत्सेवया - ज्या तुमच्यासारख्यांच्या सेवेमुळे - कूटस्थस्य - विकाररहित अशा - भगवतः मधुद्विषः - भगवान मधुसूदनाच्या - पादयोः - पायांच्या विषयी - व्यसनार्दनः - संकटाचा नाश करणारा असा - तीव्रः - अति उत्कट - रतिरासः - प्रेमाचा उत्साह - भवेत् - होतो ॥१९॥
आपल्या श्रीचरणांच्या सेवेने नित्यसिद्ध भगवान श्रीमधुसूदनांच्या चरणकमलांचे ठायी उत्कट प्रेम आणि आनंदाची वृद्धी होते, ज्यामुळे जन्म-मरण फेरा नाहीसा होतो. (१९)
दुरापा ह्यल्पतपसः सेवा वैकुण्ठवर्त्मसु ।
यत्रोपगीयते नित्यं देवदेवो जनार्दनः ॥ २० ॥
संत जे कीर्तने गाती तो मार्ग मोक्ष भोगण्या । पुण्यहीन मनुष्याला सेवेची संधि ना मिळे ॥ २० ॥
हि - खरोखर - अल्पतपसः - थोडे आहे तप ज्याचे अशा पुरुषाला - वैकुण्ठवर्त्मसु - वैकुंठाच्या मार्गातील - सेवा - सेवा - दुरापा - प्राप्त होण्यास कठीण - यत्र - ज्या वैकुंठमार्गात - नित्यं - सतत - देवदेवः जर्नादनः - देवांचा देव असा जनार्दन - उपगीयते - स्तविला जातो ॥२०॥
महात्मे लोक भगवत्प्राप्तीच्या मार्गावरील वाटाडेच होत, ते नेहमीच देवाधिदेव श्रीहरींच्या गुणांचे गान करीत असतात. कमी पुण्याई असणार्या माणसांना त्यांच्या सेवेची संधी मिळणे अत्यंत कठीण आहे. (२०)
सृष्ट्वाग्रे महदादीनि सविकाराणि अनुक्रमात् ।
तेभ्यो विराजं उद्धृत्य तमनु प्राविशद्विभुः ॥ २१ ॥
आरंभी भगवंताने क्रमाने तत्व आणखी । विकारा रचुनी त्याने विराट निर्मिले असे ॥ २१ ॥
अग्रे - प्रथम - सविकाराणि - इंद्रिये, देवता इत्यादी विकारांसहित - महदादीनि - महत्तत्त्व, अहंकार इत्यादिकांना - अनुक्रमात् - अनुक्रमाने - सृष्ट्वा - उत्पन्न करून - तेभ्यः - महत्तत्त्वादिकांपासून - विराजम् - विराट पुरुषाला - उद्धृत्य - उत्पन्न करून - तम् - त्या विराट पुरुषात - अनु प्राविशत् - प्रवेश करिता झाला ॥२१॥
भगवन, आपण सांगितलेत की सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांनी महदादी तत्त्वे आणि त्यांच्या विकारांची क्रमाने रचना केली आणि मग त्यांच्या अंशापासून विराटाला उत्पन्न करून ते स्वतः त्यामध्ये प्रविष्ट झाले. (२१)
यमाहुराद्यं पुरुषं सहस्राङ्घ्र्यूरुबाहुकम् ।
यत्र विश्व इमे लोकाः सविकाशं समासते ॥ २२ ॥
हजारो पाय रूपा त्या मांड्या नी बाहुही तशा । त्या आदी पुरुषीं स्थीर त्रिलोक, वेद सांगती ॥ २२ ॥
यम् आद्यं पुरुषम् - ज्या आदिपुरुषाला - सहस्त्राङ्घ्र्यूरुबाहुकम् - हजारो पाय, मांड्या आणि बाहू ज्यास आहेत असा - आहुः - म्हणतात - यत्र - ज्या विराट पुरुषाच्या ठिकाणी - इमे - हे - विश्वे लोकः - सर्व लोक - सविकासम् - विस्तारासहित - आसते - रहातात ॥२२॥
त्या विराट पुरुषाला हजारो पाय, मांडया आणि हात आहेत, त्यालाच वेद ‘आदिपुरुष’ म्हणतात, त्यातच हे सर्व लोक ऐसपैस राहिले आहेत. (२२)
यस्मिन् दशविधः प्राणः सेन्द्रियार्थेन्द्रियः त्रिवृत् ।
त्वयेरितो यतो वर्णाः तद्विभूतीर्वदस्व नः ॥ २३ ॥ यत्र पुत्रैश्च पौत्रैश्च नप्तृभिः सह गोत्रजैः । प्रजा विचित्राकृतय आसन्याभिरिदं ततम् ॥ २४ ॥
विषये इंद्रिये त्यात अहंती देवता स्थिर । तसे ते दश ही प्राण बल सह उपस्थित ॥ २३ ॥ आता ब्रह्म्यासह सर्व विभूती मज सांगणे । ज्यांच्या पुत्र नि पौत्रांच्या मध्येमे विश्व व्यापले ॥ २४ ॥
यस्मिन् - ज्याच्या ठिकाणी - दशविधः - दहा प्रकारचा - सेंद्रियार्थेन्द्रियः - इंद्रिये, त्यांचे विषय आणि त्यांच्या देवता यांसह - त्रिवृत् - तीन वृत्तींचा - प्राणः - प्राण - त्वया - तुझ्याकडून - ईरितः - सांगितला गेला - यतः - ज्या विराट पुरुषापासून - वर्णाः - ब्राह्मणादि वर्ण - भवन्ति - उत्पन्न होतात - तद्विभूतीः - त्या विराट पुरुषाची ब्रह्मदेव आदि करून स्वरूपे - नः - आम्हाला - वदस्व - सांग ॥२३॥ यत्र - ज्या विभूतींच्या ठिकाणी - पुत्रैः पौत्रैः नप्तृभिः च गोत्रजैः सह - पुत्र, नातू, पणतू आणि इतर वंशज यांसह - विचित्राकृतयः - निरनिराळी आहेत स्वरूपे ज्यांची अशी - प्रजाः - प्रजा - आसन् - उत्पन्न झाल्या - याभिः - ज्या संततींनी - इदं ततम् - हे जग व्यापिले ॥२४॥
आपण असे वर्णन केले की, त्या विराट पुरुषातच इंद्रिये, विषय, इंद्रियाभिमानी देवता त्यांच्यासह तीन प्रकारचे दहा प्राण आहेत आणि त्यापासूनच ब्राह्मणादी वर्णसुद्धा उत्पन्न झाले आहेत. आता आपण मला ब्रह्मदेव इत्यादी विभूतींचे वर्णन ऐकवा, ज्यांच्यापासून पुत्र, नातवंडे आणि कुटुंबियांसहित निरनिराळ्या प्रकारची प्रजा उत्पन्न होऊन हे सारे ब्रह्मांड भरून गेले. (२३-२४)
प्रजापतीनां स पतिः चकॢपे कान् प्रजापतीन् ।
सर्गांश्चैवानुसर्गांश्च मनून् मन्वन्तराधिपान् ॥ २५ ॥
ब्रह्मादिंचा पिता तोची कोणते ते प्रजापती । मनु मन्वंतरे सर्ग उपसर्गा रची कसे ॥ २५ ॥
सः प्रजापतीनां पतिः - प्रजापतींचा स्वामी असा तो ब्रह्मदेव - कान् - कोणत्या - प्रजापतीन् - प्रजापतींना - सर्गान् - सृष्टीला - अनुसर्गान् - सृष्टींच्या भागांना - च - आणि - मन्वन्तराधिपान् - मन्वंतरांचे राजे अशा - मनून् - मनूंना - चक्लृपे - निर्माण करिता झाला ॥२५॥
तो विराट पुरुष ब्रह्मदेव इत्यादी प्रजापतींचाही ईश्वर आहे. त्याने कोणकोणत्या प्रजापतींना उत्पन्न केले ? तसेच सर्ग, उपसर्ग आणि मन्वन्तरांचे अधिपती असलेल्या मनूंचीसुद्धा कोणत्या क्रमाने रचना केली ? (२५)
एतेषामपि वंशांश्च वंशानुचरितानि च ।
उपर्यधश्च ये लोका भूमेर्मित्रात्मजासते ॥ २६ ॥ तेषां संस्थां प्रमाणं च भूर्लोकस्य च वर्णय । तिर्यङ्मानुषदेवानां सरीसृप पतत्त्रिणाम् । वद नः सर्गसंव्यूहं गार्भस्वेदद्विजोद्भिदाम् ॥ २७॥
मनूचे वं ने राजे यांचे सारे चरित्रही । त्रिलोक स्थिति ती कैसी तीर्यकमनुष देवता ॥ २६ ॥ सर्पटे नि जरायूजी पक्षी स्वतेजं उद्भिज । चारी ते निर्मिले कैसे सांगावे मज सर्व ते ॥ २७ ॥
मित्रात्मज - हे मैत्रेया - एषेताम् - ह्या मनूंच्या व राजांच्या - वंशान् - वंशाना - अपि - सुद्धा - च - आणि - भूमेः - पृथ्वीच्या - उपरि - वर - च - आणि - अधः - खाली - ये लोकाः आसते - जे लोक आहेत - तेषाम् - त्यांच्या - च - आणि - भूर्लोकस्य - भूलोकाच्या - संस्थां - स्थितीला - च - आणि - प्रमाणम् - लांबी रुंदी इत्यादिकांनी - वर्णय - वर्णन कर ॥२६॥ तिर्यङ्मानुषदेवानाम् - पशु, मनुष्य आणि देव यांच्या - च - आणि - गार्भस्वेदद्विजोदिभदाम् - गर्भज, स्वेदज, द्विज आणि उद्भिज्ज यांच्या - सर्गसंव्यूहम् - उत्पत्तीचे विभाग - नः - आम्हाला - वद - सांग ॥२७॥
मैत्रेय महोदय ! त्या मनूंचे वंश, वंशधर राजांची चरित्रे, पृथ्वीच्या वरच्या आणि खालच्या भागातील निरनिराळे लोक तसेच भूलोकाचा विस्तार आणि स्थिती यांचेही वर्णन करावे. मनुष्य़ेतर प्राणी, मनुष्य, देवता, सरपटणारे प्राणी व पक्षी, जरायुज, स्वेदज, अंडज, उद्भिज्ज या चार प्रकारचे प्राणी कशा प्रकारे उत्पन्न झाले तेही सांगावे. (२६-२७)
गुणावतारैर्विश्वस्य सर्गस्थित्यप्ययाश्रयम् ।
सृजतः श्रीनिवासस्य व्याचक्ष्वोदारविक्रमम् ॥ २८ ॥
उत्पत्ति स्थिति हारा ब्रह्मा विष्णु महेश्वर । लीला जै वर्तला सार्या सांगाव्या सर्व त्या मला ॥ २८ ॥
गुणावतारैः - त्रिगुणांच्या योगाने घेतलेल्या ब्रह्मादि अवतारांनी - विश्वस्य - जगाच्या - सर्गास्थित्यप्ययाश्रयम् - उत्पत्ति, पालन, संहार यांच्या आश्रयाला - सृजतः - निर्माण करणार्या - श्रीनिवासस्य - लक्ष्मीचे निवासस्थान अशा परमेश्वराच्या - उदारविक्रमम् - उत्कृष्ट पराक्रमाला - व्याचक्ष्व - सांग ॥२८॥
श्रीहरींनी सृष्टी निर्माण करतेवेळी जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करण्यासाठी आपले गुणावतार जे ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव यांच्या रूपाने ज्या कल्याणकारी लीला केल्या त्यांचेही वर्णन करावे. (२८)
वर्णाश्रमविभागांश्च रूपशीलस्वभावतः ।
ऋषीणां जन्मकर्माणि वेदस्य च विकर्षणम् ॥ २९ ॥ यज्ञस्य च वितानानि योगस्य च पथः प्रभो । नैष्कर्म्यस्य च साङ्ख्यस्य तंत्रं वा भगवत्स्मृतम् ॥ ३० ॥ पाषण्डपथवैषम्यं प्रतिलोमनिवेशनम् । जीवस्य गतयो याश्च यावतीर्गुणकर्मजाः ॥ ३१ ॥
स्वभाव वेश आचारे चारी वर्ण विभागिले । ऋषिंचे जन्म कमी वेदांचे चार भाग ते ॥ २९ ॥ यज्ञविस्तार नी मार्ग योग ज्ञान नि साधना । नारदी पंचरात्रो ती सांख्यनी तंत्रशास्त्र ते ॥ ३० ॥ पाखंडमत जे भिन्न तसाचि वर्णसंकर । त्यांची जी गति ती सर्व कृपया मज सांगणे ॥ ३१ ॥
रूपशीलस्वभावतः - बाह्य चिन्हे, आचार व स्वभाव यांवरून - वर्णाश्रमविभागान् - ब्राह्मणादि वर्णविभाग व ब्रह्मचर्यादि आश्रमविभाग यांना - च - आणि - ऋषीणाम् - ऋषींची - जन्मकर्मादि - अवतार व कर्मे इत्यादि - च - आणि - वेदस्य - वेदाचे - विकर्षणम् - विभाग ॥२९॥ प्रभो - समर्था मैत्रेया - च - आणि - यज्ञस्य - यज्ञाचे - वितानानि - निरनिराळे प्रकार - च - आणि - यागस्य - योगशास्त्राच्या - सांख्यस्य - सांख्यशास्त्राच्या - च - आणि - नैष्कर्म्यस्य - कर्मत्यागयुक्त अशा - पथः - मार्गांना - च - आणि - भगवतसमृतम् - भगवंतांनी सांगितलेल्या - तन्त्रम् - तंत्रमार्गाला - वद - सांगा ॥३०॥ पाखण्डपथवैषम्यम् - पाखण्डमार्गाकडे होणारी विषम प्रवृत्ती - प्रतिलोमनिवेशनम् - उत्पत्तिक्रमाच्या विरुद्ध क्रमाने सर्वांचा लय किंवा खालच्या वर्णाच्या पुरुषांपासून वरच्या वर्णातील स्त्रियांना होणार्या संततीचा प्रकार - च - आणि - जीवस्य - जीवाच्या - याः यावतीः गुणकर्मजाः गतयः - ज्या व जितक्या गुण आणि कर्मे यांपासून उत्पन्न होणार्या गति - सन्ति - आहेत ॥३१॥
वेष, आचरण आणि स्वभावानुसार वर्ण-आश्रमांचे विभाग, ऋषींची जन्म-कर्मे इत्यादी, वेदांचे विभाग, यज्ञांचे विस्तार, योगमार्ग, ज्ञानमार्ग व त्याचे साधन सांख्य मार्ग, तसेच भगवंतांनी सांगितलेली नारदपांचरात्र इत्यादी तंत्रशास्त्रे, निरनिराळ्या नास्तिकवादी मार्गांच्या प्रचाराने होणारी विषमता, नीचवर्णाचा पुरुष आणि उच्चवर्णाची स्त्री यांच्यापासून होणार्या संतानांचे प्रकार, शिवाय वेगवेगळे गुण आणि कर्मांच्यामुळे जीवाला ज्या ज्या आणि जितक्या गती प्राप्त होतात, ते सर्व मला सांगावे. (२९-३१)
धर्मार्थकाममोक्षाणां निमित्तान्यविरोधतः ।
वार्ताया दण्डनीतेश्च श्रुतस्य च विधिं पृथक् ॥ ३२ ॥ श्राद्धस्य च विधिं ब्रह्मन् पितॄणां सर्गमेव च । ग्रहनक्षत्रताराणां कालावयवसंस्थितिम् ॥ ३३ ॥
धर्मार्थकाम मोक्षाची अविरोधचि साधने । नीति वाणिज्य नी दंड श्रवणा विधि कोणता ॥ ३२ ॥ श्राध्दाचा विधी तो कैसा काल तारांतणी स्थिती । सांगाव्या स्पष्ट त्या ऐशा वेगळ्या करुनी मज ॥ ३३ ॥
धर्मार्थकाममोक्षाणाम् - धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांच्या प्राप्तीचे - अविरोधतः निमित्तानि - परस्परांच्या विरोधाशिवाय उपाय - वार्तायाः - उपजीविकेच्या साधनांचा - च - आणि - दण्डनीतेः - राजनीतीचा - च - आणि - श्रुतस्य - शास्त्राचा - पृथक् विधिम् - वेगवेगळा प्रकार ॥३२॥ ब्रह्मन् - हे ब्रह्मवेत्त्या मैत्रेया - च - आणि - श्राद्धस्य - श्राद्धाचा - विधिम् - प्रकार - च - आणि - पितृणां एव सर्गम् - पितरांचाहि उत्पत्ति प्रकार - च - आणि - ग्रहनक्षत्रताराणाम् - ग्रह, नक्षत्रे आणि तारा यांची - कालावयवसंस्थितिम् - कालचक्राच्या ठिकाणी रचना - कथय - सांग ॥३३॥
ब्रह्मन ! धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाच्या प्राप्तीसाठी लागणारी एकमेकांना विरोध नसणारी साधने, व्यापार, राजनीती, शास्त्रश्रवण करण्याचा विधी, श्राद्धाचा विधी, पितृगणांची सृष्टी त्याचबरोबर कालचक्रामध्ये ग्रह, नक्षत्रे आणि तारागणांची स्थिती यांचेही वेगवेगळे वर्णन करावे. (३२-३३)
दानस्य तपसो वापि यच्चेष्टापूर्तयोः फलम् ।
प्रवासस्थस्य यो धर्मो यश्च पुंस उतापदि ॥ ३४ ॥
दान तपादि कर्माचे काय ते इष्ट जे फल । प्रवासापत्तिच्या वेळी मानवीधर्म कोणता ॥ ३४ ॥
दानस्य - दानाचे - तपसः - तपश्चर्येचे - वा - अथवा - इष्टापूर्तयोः अपि - यज्ञादिक कर्मे आणि धर्मशाळा, कूप इत्यादी लोकोपयोगी कृत्ये यांचेही - यत् फलम् - जे फल असेल ते - च - आणि - प्रवासस्थस्य - प्रवासात असलेल्या - उत आपदि च - आणि संकटात सापडलेल्या - पुंसः - पुरुषाचा - यः धर्मः - जो धर्म असेल तो ॥३४॥
दान, तप, यज्ञयाग आणि विहीर, धर्मशाळा इत्यादी बांधणे या कर्मांचे फळ काय आहे ? प्रवास आणि संकटाच्या वेळी मनुष्याचा धर्म कोणता ? (३४)
येन वा भगवान् तुस्तुष्येद् धर्मयोनिर्जनार्दनः ।
सम्प्रसीदति वा येषां एतत् आख्याहि मेऽनघ ॥ ३५ ॥
श्रीजनार्दन भगवान् धर्माचा मूळ कारण । कशाने पावतो तेही सांगावे ते सविस्तर ॥ ३५ ॥
वा - किंवा - येन - ज्या योगाने - धर्मयोनिः भगवान् जनार्दनः तुष्येत् - धर्माचा उत्पादक असा भगवान् परमात्मा संतुष्ट होईल ते - वा - किंवा - अनघ - हे निष्पाप मुने - येषाम् प्रसीदति - ज्यांना प्रसन्न होतो - एतत् च - हेहि - आख्याहि - सांगा ॥३५॥
हे महानुभाव मैत्रेय मुनी धर्माचे मूळ कारण असणारे श्रीजनार्दन भगवान कोणते आचरण केल्याने संतुष्ट होतात आणि कोणाचा अनुग्रह करतात, त्याचे वर्णन करावे. (३५)
अनुव्रतानां शिष्याणां पुत्राणां च द्विजोत्तम ।
अनापृष्टमपि ब्रूयुः गुरवो दीनवत्सलाः ॥ ३६ ॥
अनुव्रती त्या शिष्यांना पुत्रांनाही द्विजोत्तमा । सद्गुरु सांगती गोष्टी जरी ना पुसले तरी ॥ ३६ ॥
द्विजोत्तम - हे ब्राह्मणश्रेष्ठ मैत्रेया - अनुव्रतानां शिष्याणाम् - आपल्या आज्ञाधारक शिष्यांना - च - आणि - पुत्राणाम् - पुत्रांना - दीनवत्सलाः गुरवः - दीनावर दया करणारे गुरु - अनापुष्टम् अपि - न विचारलेले देखील - ब्रूयुः - सांगतात ॥३६॥
हे ब्राह्मणश्रेष्ठा, दीनवत्सल असणारे गुरुजन, आपले अनुयायी शिष्य आणि पुत्र यांना त्यांनी विचारले नसताही त्यांच्या हिताची गोष्ट सांगतात. (३६)
तत्त्वानां भगवन् तेषां कतिधा प्रतिसङ्क्रमः ।
तत्रेमं क उपासीरन् क उ स्विदनुशेरते ॥ ३७ ॥
लय प्रकार सांगावे योग निद्रेतोपता । कोणाला भगवान् सेवी कोण तो लोप पावतो ॥ ३७ ॥
उ भगवन् - हे मैत्रेय मुने - तेषाम् - त्या - तत्त्वानाम् - तत्त्वांचा - प्रतिसंक्रमः - लय - कतिधा - किती प्रकारांनी - भवति - होतो - तत्र - प्रलय काळी - इमम् - ह्या ईश्वराला - के - कोण - उपासीरन् - भजतील - स्वित् - किंवा - इमं शयानम् - ईश्वर योगनिद्रा घेत असता त्याच्या ठायी - के अनुशेरते - कोण लीन होतात ॥३७॥
भगवन, त्या महदादी तत्त्वांचा प्रलय किती प्रकारचा आहे ? तसेच जेव्हा भगवान योगनिद्रेत शयन करतात, तेव्हा त्या तत्त्वांतील कोणती तत्त्वे त्यांची सेवा करतात आणि कोणती त्यांच्यामध्ये लीन होतात ? (३७)
पुरुषस्य च संस्थानं स्वरूपं वा परस्य च ।
ज्ञानं च नैगमं यत्तद् गुरुशिष्यप्रयोजनम् ॥ ३८ ॥
तत्व नी भगवत् रूप वेदांचे ज्ञान काय ते । गुरू नी शिष्य या दोघां संबंध कायस असो ॥ ३८ ॥
च - आणि - पुरुषस्य - जीवाच्या - संस्थानम् - शरीराची रचना - वा - अथवा - स्वरूपम् - स्वरूप - च - तसेच - परस्य - परमेश्वराचे - स्वरूपम् - स्वरूप - ब्रूहि - सांगा - च - आणि - यत् - जे - गुरुशिष्यप्रयोजनम् - गुरुशिष्यांचा संबंध ज्यास आवश्यक आहे असे - नैगमम् - उपनिषत्संबंधी - ज्ञानम् - ज्ञान - तत् - ते ॥३८॥
जीवाचे तत्त्व, परमेश्वराचे स्वरूप, उपनिषदांनी प्रतिपादन केलेले ज्ञान तसेच गुरू आणि शिष्य यांच्या परंपरेचे प्रयोजन काय आहे ? (३८)
निमित्तानि च तस्येह प्रोक्तान्यनघसूरिभिः ।
स्वतो ज्ञानं कुतः पुंसां भक्तिर्वैराग्यमेव वा ॥ ३९ ॥
पुण्यवंत अशा संते ज्ञानार्थ काय बोधिले । भक्तिज्ञान नि वैराग्य अनायासे न लाभते ॥ ३९ ॥
अनघ - हे निष्पाप मैत्रेया - च - आणि - इह - या लोकात - सूरिभिः - विद्वानांनी - प्रोक्तानि - सांगितलेली - तस्य - त्या ज्ञानाची - निमित्तानि - साधने - ब्रूहि - सांगा - हि - कारण - पुंसाम् - पुरुषांना - ज्ञानम् - ज्ञान - भक्तिः - भक्ती - वा - किंवा - वैराग्यम् एव - वैराग्य हेहि - स्वतः - आपोआप - कुतः - कोठून होणार ॥३९॥
हे पवित्रात्मन, त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी विद्वानांनी कोणकोणते उपाय सांगितले आहेत ? कारण मनुष्यांना ज्ञान, भक्ती किंवा वैराग्याची प्राप्ती आपोआप कशी होईल ? (३९)
एतान्मे पृच्छतः प्रश्नान् हरेः कर्मविवित्सया ।
ब्रूहि मेऽज्ञस्य मित्रत्वात् अजया नष्टचक्षुषः ॥ ४० ॥
मोहाने अंध मी झालो प्रश्न मी जे विचारिले । हरीच्या जाणण्या लीला पुसले र्व सांगणे ॥ ४० ॥
हरेः - श्रीकृष्णाची - कर्मविवित्सया - चरित्रे जाणण्याच्या इच्छेने - एतान् प्रश्नान् - ह्या प्रश्नांना - पृच्छतः - विचारणार्या - मे - मला - अजया - मायेने - नष्टचक्षुषः - ज्याचे ज्ञान नष्ट झाले आहे अशा - अज्ञस्य - अज्ञानी अशा - मे - मला - मित्रत्वात् - मित्रसंबंधामुळे - ब्रूहि - सांगा ॥४०॥
मायेमुळे माझी विचारदृष्टी नष्ट झालेली आहे. मी अजाण आहे. आपण माझे परम सुहृद आहात. म्हणून श्रीहरीच्या लीलांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने मी जे काही प्रश्न विचारले आहेत, त्यांचे मला उत्तर द्यावे. (४०)
सर्वे वेदाश्च यज्ञाश्च तपो दानानि चानघ ।
जीवाभयप्रदानस्य न कुर्वीरन् कलामपि ॥ ४१ ॥
भगवत् गुण गाण्याने संसारभय नासते । वेदाने आणि यज्ञाने दानाने नच साध्य जे ॥ ४१ ॥
अनघ - हे निष्पाप मैत्रेया - सर्वे वेदाः - संपूर्ण वेद - च - आणि - यज्ञाः - यज्ञ - च - आणि - तपः - तप - च - आणि - दानानि - दाने - जीवाभयप्रदानस्य - जीवाला जे अभय देणे त्याच्या - कलाम् अपि - अंशाला देखील - न कुर्वीरन् - करणार नाहीत ॥४१॥
हे पुण्यवान मैत्रेय मुनी ! सर्व वेदांचे अध्यन, यज्ञ, तपश्चर्या आणि दान इत्यादींमुळे होणारे पुण्य, जीवाची जन्म-मृत्यूपासून सुटका करून त्याला निर्भय करणारे जे पुण्य आहे, त्याच्या काही अंशाचीही बरोबरी करू शकत नाही. (४१)
श्रीशुक उवाच -
स इत्थं आपृष्टपुराणकल्पः कुरुप्रधानेन मुनिप्रधानः । प्रवृद्धहर्षो भगवत्कथायां सञ्चोदितस्तं प्रहसन्निवाह ॥ ४२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
शुकदेवजी सांगतात - ( इंद्रवज्रा ) जेंव्हा कुरूश्रेष्ठ विदूरजीने पुराण ऐसे पुसतास प्रश्न । चर्चेस मैत्रेय फुलूनि आले हासोनिया ते पुढती म्हणाले ॥ ४२ ॥
कुरुप्रधानेन - कुरुवंशात श्रेष्ठ अशा विदुराने - इत्थम् - याप्रमाणे - आपृष्टपुराणकल्पः - पुराणप्रसिद्ध विषय विचारला आहे ज्याला असा - भगवत्कथायाम् - श्रीकृष्णाच्या कथेविषयी प्रेरणा केलेला - प्रवृद्धहर्षः - ज्याचा हर्ष वाढला आहे असा - मुनिप्रधानः सः - ऋषिश्रेष्ठ असा तो मैत्रेय - संचोदितः - प्रेरणा केलेला असता - प्रहसन इव - ह्सतच जणू काय - तम् - त्या विदुराला - आह - म्हणाला ॥४२॥
श्रीशुक म्हणतात - राजन, जेव्हा कुरुश्रेष्ठ विदुराने मैत्रेय मुनींना या प्रकारे पुराणाविषयी प्रश्न विचारले, त्यामुळे भगवच्चर्चा करण्याला प्रेरणा मिळाल्यामुळे ते फारच प्रसन्न झाले आणि सुहास्य वदनाने त्यांना सांगू लागले. (४२)
स्कंध तिसरा - अध्याय सातवा समाप्त |