|
श्रीमद् भागवत पुराण
ईशशक्तिप्रवेशेन स्थूलभूतानां जगत् निर्माणशक्तित्व विराट शरीराची उत्पत्ती - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
ऋषिरुवाच -
(अनुष्टुप्) इति तासां स्वशक्तीनां सतीनामसमेत्य सः । प्रसुप्तलोकतन्त्राणां निशाम्य गतिमीश्वरः ॥ १ ॥ कालसञ्ज्ञां तदा देवीं बिभ्रत् शक्तिमुरुक्रमः । त्रयोविंशति तत्त्वानां गणं युगपदाविशत् ॥ २ ॥
मैत्रेय ऋषि सांगतात - ( अनुष्टुप् ) अशा सर्व स्वशक्ती त्या न एकत्र म्हणूनची । विश्वाच्या रचनाकार्यी झाल्या त्या असमर्थ की ॥ १ ॥ तेंव्हा तो काळ शक्तीने त्या एकादश इंद्रिया । सह तो तेविसांच्या त्या समुदायी प्रविष्टला ॥ २ ॥
सः ईश्वरः - तो परमेश्वर - इति असमेत्य सतीनाम् - याप्रकारे एकमेकीत मिळून नसलेल्या अशा - प्रसुप्तलोकतन्त्राणाम् - लीन आहे लोकरचना रूप कार्य ज्यांचे अशा - स्वशक्तीनाम् - आपल्या देवतारूप शक्तींची - गतिम् - स्थिती - निशाम्य - पाहून ॥१॥ तदा - त्या वेळी - उरुक्रमः - मोठा आहे पराक्रम ज्याचा असा परमेश्वर - कालसंज्ञाम् - काल आहे नाव जिला अशा - शक्तिं देवीम् बिभ्रत् - शक्तिदेवीला धारण करून - त्रयोविंशतितत्त्वानाम् - तेवीस तत्त्वांच्या - गणम् - समूहात - युगपत् - एकाएकी - आविशत् - प्रवेश करिता झाला ॥२॥
मैत्रेय ऋषी म्हणाले - आपापसात मिळून न राहिल्याने माझ्या महत्तत्त्व इत्यादी शक्ती विश्वरचना करण्याच्या कार्यात असमर्थ आहेत, असे पाहून सर्वशक्तिमान भगवान कालशक्तीचा स्वीकार करून एकाच वेळी महत्तत्त्व, अहंकार, पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, मन, पाच कर्मेंद्रिये व पाच ज्ञानेंद्रिये अशा तेवीस तत्वांच्या समुदायात प्रविष्ट झाले. (१-२)
सोऽनुप्रविष्टो भगवान् चेष्टारूपेण तं गणम् ।
भिन्नं संयोजयामास सुप्तं कर्म प्रबोधयन् ॥ ३ ॥
प्रवेशताच जीवांच्या अदृष्टा प्रेरिले तये । वेगळा जाहला तैसा तत्व क्रीयेत घातले ॥ ३ ॥
अनुप्रविष्टः - तेवीस तत्त्वांत प्रवेश केलेला - सः भगवान् - तो भगवान् - सुप्तम् कर्म प्रबोधयन् - लीन असलेल्या क्रियेला जागृत करून - चेष्टारूपेण - क्रियारूपशक्तीने - भिन्नम् तम् गणम् - विभक्त असलेल्या त्या तेवीस तत्त्वांच्या समुदायाला - संयोजयामास - एकत्र करिता झाला ॥३॥
त्या समुदायात प्रविष्ट होऊन त्यांनी जीवांच्या निद्रिस्त असलेल्या संचित कर्माला जागृत केले आणि एकमेकांपासून वेगळ्या असणार्या त्या तत्त्वसमूह घटकांना आपल्या क्रियाशक्तीच्या द्वारे आपापसात मिसळून टाकले. (३)
प्रबुद्धकर्म दैवेन त्रयोविंशतिको गणः ।
प्रेरितोऽजनयत्स्वाभिः मात्राभिः अधिपूरुषम् ॥ ४ ॥
अदृष्टा लाविले कार्यी तेविसा प्रेरुनी पुन्हा । अंशद्वारा स्वये ईशे विराट रूप हे असे ॥ ४ ॥
दैवेन - परमेश्वराच्या क्रियाशक्तीने - प्रेरितः - प्रेरणा केलेला - प्रबुद्धकर्मा - जागृत झाली आहे क्रियाशक्ति ज्यांची असा - त्रयोविंशतिकः गणः - तेवीस तत्त्वांचा समूह - स्वाभिः मात्राभिः - आपआपल्या अंशांनी - अधिपूरुषम् - विराट् पुरुषाला - अजनयत् - उत्पन्न करता झाला ॥४॥
ज्याची क्रियाशक्ती जागृत केली आहे अशा त्या तेवीस तत्त्वांच्या समूहाने भगवंतांच्या प्रेरणेने आपल्या अंशांतून विराटाला उत्पन्न केले. (४)
परेण विशता स्वस्मिन् मात्रया विश्वसृग्गणः ।
चुक्षोभान्योन्यमासाद्य यस्मिन् लोकाश्चराचराः ॥ ५ ॥
तेंव्हा त्या सर्व तत्त्वांचा प्रभाव स्वच्छ जाहला । तत्त्वांच्या या परिणामे विराट रूप हे असे । चराचर जया योगे विद्यमान जग जाहले ॥ ५ ॥
विश्वसृड्गणः - विश्वाला उत्पन्न करणार्या तत्त्वांचा समूह - स्वस्मिन् - आपल्या ठिकाणी - मात्रया विशता - अंशाने प्रवेश करणार्या - परेण - परमेश्वराच्या योगाने - अन्योन्यम् - परस्परात - आसाद्य - मिसळून - चुक्षोभ - परिणाम पावला - यस्मिन् - ज्या परिणत रूपामध्ये - चराचराः - स्थावर आणि जंगम - लोकाः - लोक - सन्ति - आहेत ॥५॥
जेव्हा भगवंतांनी अंशरूपाने आपल्या त्या शरीरात प्रवेश केला, तेव्हा विश्वरचना करणारा तो महत्तत्त्वादिकांचा समुदाय एक-दुसर्यात मिसळून जाऊन विराटरूपाने परिणाम पावला. त्यामध्येच हे चराचर राहिले आहे. (५)
हिरण्मयः स पुरुषः सहस्रपरिवत्सरान् ।
आण्डकोश उवासाप्सु सर्वसत्त्वोपबृंहितः ॥ ६ ॥
जळाच्या कवचीं अंड हिरण्मय पुरूष तो । हजार राहिला वर्षे सर्व जीवां सवे तिथे ॥ ६ ॥
सर्वसत्त्वोपबृंहितः - सर्व अव्यक्तरूप जीवांनी युक्त - हिरण्मयः सः पुरुषः - हिरण्यगर्भ नावाचा तो विराट् पुरुष - आण्डकोशे - ब्रह्मांडात - अप्सु - उदकामध्ये - सहस्त्रपरिवत्सरान् - हजार वर्षे - उवास - राहिला ॥६॥
पाण्यामध्ये जे अंड्याच्या रूपात आश्रयस्थान होते, तेथे सर्व जीवांना आपल्यात घेऊन तो सुवर्णमय विराट पुरुष एक हजार दिव्य वर्षांपर्यंत राहिला. (६)
स वै विश्वसृजां गर्भो देवकर्मात्मशक्तिमान् ।
विबभाजात्मनात्मानं एकधा दशधा त्रिधा ॥ ७ ॥
ज्ञान क्रीया शक्तीने संपन्न गर्भ तो असे । निवडी शक्तिना तोची एक तीन दहात ही ॥ ७ ॥
वै - खरोखर - विश्वसृजाम् गर्भः - सृष्टीला उत्पन्न करणार्या तत्त्वांचे अपत्य असा - देवकर्मात्मशक्तिमान् - व ज्ञानशक्ति, क्रियाशक्ति आणि भोक्तृशक्ति ह्या शक्ति ज्याच्यात आहेत असा - सः - तो विराट पुरुष - आत्मना - स्वतः - आत्मानम् - आपल्याला - एकधा - एकप्रकाराने - दशधा - दहाप्रकाराने - त्रिधा - तीन प्रकाराने - विबभाज - विभक्त करता झाला ॥७॥
तो विश्वरचना करणार्या तत्त्वांचे कार्य असणारा विराट ज्ञान, क्रिया आणि आत्मशक्तीने संपन्न होऊन या शक्तींपासून त्याने स्वतःचे क्रमशः एक(हृदयरूप) दहा(प्राणरूप) आणि त्रिविध (आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिकरूप असे) विभाग केले. (७)
एष ह्यशेषसत्त्वानां आत्मांशः परमात्मनः ।
आद्योऽवतारो यत्रासौ भूतग्रामो विभाव्यते ॥ ८ ॥
आद्य जीव विराटाचा समस्ता जीवही असे । समस्त जीव तेजाने त्याच्यानेच प्रकाशती ॥ ८ ॥
अशेषसत्त्वानाम् आत्मा - संपूर्ण प्राण्यांच्या अंतर्यामी असा - एषः - हा विराट पुरुष - अंशः - अंशभूत असा - परमात्मनः - परमेश्वराचा - आद्यः अवतारः - पहिला अवतार - यत्र - ज्या विराट् पुरुषांमध्ये - असौ - हा - भूतग्रामः - पंचमहाभूतांचा समूह - विभाव्यते - सुरक्षित असतो ॥८॥
हा विराट पुरुषच प्रथम जीव असल्याकारणाने सर्व जीवांचा आत्मा, जीवरूप असल्याने परमात्म्याचा अंश आणि प्रथमच उत्पन्न झाला असल्याने भगवंतांचा आद्य अवतार आहे. हा संपूर्ण भूतसमुदाय(चराचर सृष्टी) याच्यातच प्रकाशित होतो. (८)
साध्यात्मः साधिदैवश्च साधिभूत इति त्रिधा ।
विराट्प्राणो दशविध एकधा हृदयेन च ॥ ९ ॥
अध्यात्म अधिभूतो नी अधिदैवीहि या तिन्ही । तसे दहा परी प्राणा हृदया एक रूपची ॥ ९ ॥
विराट् - विराट् पुरुष - साध्यात्मः - अध्यात्मासहित - साधिदैवः - देवतांसहित - च - आणि - साधिभूतः - भौतिक अशा विषयांसह - इति - याप्रकारे - त्रिधा - तीन प्रकारचा - अस्ति - आहे - च - आणि - प्राणः - प्राण - दशविधः - दहा प्रकारचा - अस्ति - आहे - च - आणि - हृदयेन - हृदयाने - एकधा - एक प्रकारचा - अस्ति - आहे ॥९॥
हा विराट अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैवरूपाने तीन प्रकारचा, प्राणरूपाने दहा प्रकारचा आणि हृदयरूपाने एक प्रकारचा आहे. [ दहा इंद्रियांसह मन अध्यात्म, इंद्रियांचे विषय अधिभूत, इंद्रियांच्या देवता अधिदैव आणि प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय हे दहा प्राण होत.] (९)
स्मरन्विश्वसृजामीशो विज्ञापितं अधोक्षजः ।
विराजं अतपत्स्वेन तेजसैषां विवृत्तये ॥ १० ॥
भगवान् प्रार्थिती त्यांना तयांच्या वृत्ति जागवी । तेजाने चेतना रूपी तयाना जागवीयले ॥ १० ॥
विश्वसृजाम् ईशः - सृष्टीच्या उत्पादक तत्त्वांचा नियंता - अधोक्षजः - परमेश्वर - विज्ञापितम् - देवतांच्या प्रार्थनेला - स्मरन् - स्मरून - एषाम् विवृत्तये - ह्या तत्त्वांच्या अनेक प्रकारच्या निर्वाहाकरिता - स्वेन तेजसा - आपल्या ज्ञानशक्तीच्या योगाने - विराजम् - हिरण्यगर्भाचे स्वरूप - अतपत् - मनात आणिता झाला ॥१०॥
विश्वाची रचना करणार्या महत्तत्त्वादिकांचे अधिपती असणार्या श्रीभगवंतांनी त्यांच्या प्रार्थनेचे स्मरण करून त्यांच्या वृत्ती जागविण्यासाठी आपल्या चेतनरूप तेजाने त्या विराट पुरुषाला प्रकाशित केले, त्याला जागविले. (१०)
अथ तस्याभितप्तस्य कति चायतनानि ह ।
निरभिद्यन्त देवानां तानि मे गदतः श्रृणु ॥ ११ ॥
जागृत जाहला तेंव्हा मिळाले स्थान दैवता । कसे ते सांगतो ऐका चित्त एकाग्र ठेउनी ॥ ११ ॥
अथ - नंतर - तस्य अभितप्तस्य - त्याने विचाररूप तप केले असता - देवानाम् - देवांची - कति - किती - आयतनानि - स्थाने - निरभिद्यन्त - उत्पन्न झाली - तानि - ती स्थाने - गदतः मे - सांगणार्या माझ्यापासून - शृणु - श्रवण कर ॥११॥
तो जागृत होताच देवतांच्यासाठी किती ठिकाणे उत्पन्न झाली, हे मी सांगतो ऐका. (११)
तस्याग्निरास्यं निर्भिन्नं लोकपालोऽविशत्पदम् ।
वाचा स्वांशेन वक्तव्यं ययासौ प्रतिपद्यते ॥ १२ ॥
विराटा पहिले तोंड इंद्रीय फुटले असे । अग्नि या लोकपालाने जीव तो बोलु लागला ॥ १२ ॥
तस्य - त्या विराट पुरुषाच्या - निर्भिन्नम् - उत्पन्न झालेल्या - आस्यम् पदम् - मुखरूपी स्थानात - लोकपालः - लोकांचे संरक्षण करणारी - अग्निः - अग्निदेवता - स्वांशेन वाचा - आपली अंशरूप जी वाणी तीसह - अविशत् - प्रवेश करता झाला - यया - ज्या वाणीने - असौ - हा विराट् पुरुष - वक्तव्यम् - भाषणरूप क्रियेला - प्रतिपद्यते - प्राप्त होतो ॥१२॥
विराट पुरुषाचे प्रथम मुख प्रगट झाले, त्यामध्ये लोकपाल अग्नी वाक् इंद्रियासह प्रगट झाला. त्यामुळेच हा जीव बोलतो. (१२)
निर्भिन्नं तालु वरुणो लोकपालोऽविशद्धरेः ।
जिह्वयांशेन च रसं ययासौ प्रतिपद्यते ॥ १३ ॥
तयास टाळु ती आली लोकपाल वरूण तो । रसेंद्रियी स्थिर झाला जीव आस्वाद घेतसे ॥ १३ ॥
च - आणि - हरेः - विराट् पुरुषाला - निर्भिन्नम् - उत्पन्न झालेल्या - तालु - तालु इन्द्रियात - लोकपालः वरुणः - लोकपाल वरुण - अंशेन जिह्वया - आपली अंशभूत जी जिव्हा तीसह - अविशत् - प्रवेश करता झाला. - यया - ज्या जिव्हेने - असौ - हा पुरुष - रसम् - रसविषयाला - प्रतिपद्यते - ग्रहण करतो ॥१३॥
नंतर विराट पुरुषाची टाळू उत्पन्न झाली. तीत लोकपाल वरुण आपला अंश रसनेंद्रियासह राहिला. यामुळे जीव रस ग्रहण करतो. (१३)
निर्भिन्ने अश्विनौ नासे विष्णोः आविशतां पदम् ।
घ्राणेनांशेन गन्धस्य प्रतिपत्तिर्यतो भवेत् ॥ १४ ॥
विराटा नासिका झाली पुन्हा इंद्रिय हे नवे । आश्विनीकुमराअंशे जीव तो गंध घेतसे ॥ १४ ॥
विष्णोः - विष्णुरूप हिरण्यगर्भाला - निर्भिन्ने - उत्पन्न झालेल्या - नासे पदम् - नासिकारूप स्थानात - आश्विनौ - अश्विनीकुमार - अंशेन घ्राणेन - घ्राणेन्द्रियरूप आपल्या अंशासह - अविशतम् - शिरले - यतः - ज्या घ्राणेन्द्रियाने - गन्धस्य प्रतिपत्तिः भवेत् - गन्धाचे ज्ञान होते ॥१४॥
यानंतर त्या विराट पुरुषाला दोन नाकपुडया उत्पन्न झाल्या. त्यात दोन्ही अश्विनीकुमार आपला अंश घ्राणेंद्रियासहित प्रविष्ट झाले. यामुळे जीव वास ग्रहण करतो. (१४)
निर्भिन्ने अक्षिणी त्वष्टा लोकपालोऽविशद्विभोः ।
चक्षुषांशेन रूपाणां प्रतिपत्तिर्यतो भवेत् ॥ १५ ॥
प्रगटे नेत्र त्या रूपा सूर्य देव तिथे तसा । नेत्राने जाणिले रूप जीव पाही तशा परी ॥ १५ ॥
विभोः - सर्वव्यापक अशा हिरण्यगर्भाला - निर्भिन्ने अक्षिणी - उत्पन्न झालेल्या डोळ्यात - लोकपालः त्वष्टा - लोकरक्षक अशी सूर्य देवता - अंशेन चक्षुषा - नेत्रेन्द्रि रूप आपल्या अंशाने - अविशत् - प्रवेश करिती झाली - यतः - ज्या नेत्रेन्द्रियाने - रूपाणाम् - रूपांचे - प्रतिपत्तिः भवेत् - ज्ञान होते ॥१५॥
अशाच प्रकारे जेव्हा विराटपुरुषाच्या शरीरात डोळे प्रगट झाले, तेव्हा लोकपाल सूर्याने आपला अंश नेत्रेंद्रियासह त्यात प्रवेश केला. त्या नेत्रेंद्रियामुळे पुरुषाला विविध रूपांचे ज्ञान होते. (१५)
निर्भिन्नान्यस्य चर्माणि लोकपालोऽनिलोऽविशत् ।
प्राणेनांशेन संस्पर्शं येनासौ प्रतिपद्यते ॥ १६ ॥
विराट विग्रहा आली त्वचा ती जाणिवे सह । तिथे वायू स्थिरोनीया स्पर्शाचे सुख देतसे ॥ १६ ॥
अस्य - ह्या विराट् पुरुषाला - निर्भिन्नानि - उत्पन्न झालेल्या - चर्माणि - त्वचेत - लोकपालः अनिलः - लोकरक्षक वायु देवता - अंशेन प्राणेन - आपल्या अंशभूत प्राणांसह - अविशत् - प्रवेश करती झाली - येन असौ संस्पर्शम् प्रतिपद्यते - ज्या त्वगिन्द्रियाने या जीवाला स्पर्शाचे ग्रहण होते. ॥१६॥
यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा उत्पन्न झाली. त्या त्वचेत वायू आपला अंश त्वग्इंद्रियासहित राहिला. याच त्वग्इंद्रियामुळे जीवाला स्पर्शाचा अनुभव येतो. (१६)
कर्णौ अस्य विनिर्भिन्नौ धिष्ण्यं स्वं विविशुर्दिशः ।
श्रोत्रेणांशेन शब्दस्य सिद्धिं येन प्रपद्यते ॥ १७ ॥
कानाचे छिद्र आले त्या तेथे वायूहि पातला । श्रवणेंद्रिय जीवाला शब्दांचे ज्ञान देतसे ॥ १७ ॥
अस्य - ह्या विराट् पुरुषाला - निर्भिनौ - उत्पन्न झालेल्या - कर्णौ - दोन कानात - स्वं धिष्ण्यम् - आपल्या स्थानात - दिशः - दिशानामक देवता - अंशेन श्रोत्रेण - आपल्या श्रवणेन्द्रिरूप अंशासह - विविशुः - प्रवेश करित्या झाल्या - येन - ज्या कानांनी जीव - शब्दस्य - शब्दाच्या - सिद्धिं प्रतिपद्यते - ज्ञानाला प्राप्त होतो ॥१७॥
जेव्हा याला कानाची छिद्रे उत्पन्न झाली, तेव्हा त्यात दिशांनी आपला अंश असलेले श्रवणेंद्रिय यासह प्रवेश केला. यामुळेच जीवाला शब्दाचे ज्ञान होते. (१७)
त्वचमस्य विनिर्भिन्नां विविशुर्धिष्ण्यमोषधीः ।
अंशेन रोमभिः कण्डूं यैरसौ प्रतिपद्यते ॥ १८ ॥
कातडी जाहली त्याला रोम तेथेचि जाहले । रोमांच्या सह औषधी आल्या त्या सहजी पुन्हा ॥ १८ ॥
अस्य - ह्या विराट् पुरुषाला - विनिर्भिन्नाम् - उत्पन्न झालेल्या - त्वचम् धिष्ण्यम् - त्वचारूप स्थानात - ओषधीः - औषधी - अंशेन रोमभिः - रोमरूप अंशासह - विविशुः - प्रवेश करित्या झाल्या - यैः असौ कण्डूम् प्रतिपद्यते - ज्या रोमांनी जीवाला कंडूचा अनुभव मिळतो ॥१८॥
मग विराट पुरुषाच्या शरीरात त्वचा उत्पन्न झाली. त्यामध्ये निरनिराळ्या औषधी आपला अंश असलेल्या रोमांसह राहिल्या. या रोमांतूनच जीव खाजवण्याचा अनुभव घेतो. (१८)
मेढ्रं तस्य विनिर्भिन्नं स्वधिष्ण्यं क उपाविशत् ।
रेतसांशेन येनासौ आनन्दं प्रतिपद्यते ॥ १९ ॥
त्याला लिंग पुन्हा आले श्रेष्ठवीर्यासहीत ते । प्रजापती तिथे राही जीवां आनंद देतसे ॥ १९ ॥
तस्य - त्या विराट् पुरुषाला - विनिर्भिन्नम् - उत्पन्न झालेल्या - मेढ्रम् स्वधिष्ण्यम् - शिश्नरूपी आपल्या स्थानात - कः - प्रजापति - अंशेन रेतसा - रेतोरूप अंशासह - उपाविशत् - प्रविष्ट झाला - येन - ज्या रेतामुळे - असौ आनन्दम् प्रतिपद्यते - हा जीव आनंदाला प्राप्त होतो ॥१९॥
आता त्याला लिंग उत्पन्न झाले. आपल्या या आश्रयात प्रजापतीने आपला अंश वीर्य यासह प्रवेश केला. त्यामुळे जीव आनंदाचा अनुभव घेतो. (१९)
गुदं पुंसो विनिर्भिन्नं मित्रो लोकेश आविशत् ।
पायुनांशेन येनासौ विसर्गं प्रतिपद्यते ॥ २० ॥
विराटा गुद उत्पन्न झाले नी मित देवता । आली नी जीव तो त्यागी आपुला मळ सर्वची ॥ २० ॥
पुंसः - विराट पुरुषाला - विनिर्भिन्नम् - उत्पन्न झालेल्या - गुदम् - गुदद्वारात - लोकेशः मित्रः - लोकरक्षक अशी मित्रदेवता - अंशेन पायुना - गुदेंद्रियरूप आपल्या अंशासह - आविशत् - प्रविष्ट झाली - येन - ज्या गुदेंद्रियाने - असौ विसर्गं प्रतिपद्यते - जीव मलत्याग करतो ॥२०॥
यानंतर विराट पुरुषाचे गुदद्वार निर्माण झाले. त्यात लोकपाल मित्राने आपला अंश पायूइंद्रिय यासह प्रवेश केला. याद्वारे जीव मलत्याग करतो. (२०)
हस्तावस्य विनिर्भिन्नौ इन्द्रः स्वर्पतिराविशत् ।
वार्तयांशेन पुरुषो यया वृत्तिं प्रपद्यते ॥ २१ ॥
पुढे हात त्या आले इंद्र तो पातला तिथे । शक्तिने जीव त्या घेती जगण्या पाहिजे असे ॥ २१ ॥
अस्य - ह्या विराट् पुरुषाला - विनिर्भिन्नौ - उत्पन्न झालेल्या - हस्तौ - हातात - स्वर्पतिः इन्द्रः - स्वर्गाचा राजा इन्द्र - अंशेन वार्तयाः - आपल्या अंश अशा क्रयविक्रयरूप शक्तीसह - आविशत् - प्रवेश करता झाला - यया - ज्या क्रयविक्रयरूप शक्तीच्या योगाने - पुरुषः - जीव - वृत्तिम् - उपजीविकेच्या साधनाला - प्रतिपद्यते - प्राप्त करून घेतो ॥२१॥
नंतर त्याचे हात प्रगट झाले. इंद्राने आपल्या देणे-घेणे या शक्तींसहित हातांत प्रवेश केला. त्यायोगे जीव आपली उपजीविका प्राप्त करतो. (२१)
पादौ अवस्य विनिर्भिन्नौ लोकेशो विष्णुराविशत् ।
गत्या स्वांशेन पुरुषो यया प्राप्यं प्रपद्यते ॥ २२ ॥
पुन्हा पाय तया आले तयांनी गति घेतली । विष्णु लोकेश्वरो तेथे गंतव्या प्रेरितो असे ॥ २२ ॥
अस्य - ह्या विराट् पुरुषाला - विनिर्भिन्नौ - उत्पन्न झालेल्या - पादौ - दोन पायांत - लोकेशः - लोकपाल - विष्णुः - विष्णु - स्वांशेन गत्या - गतिरूप आपल्या शक्तीसह - आविशत् - प्रवेश करता झाला - यया - ज्या क्रयविक्रयरूप शक्तीच्या योगाने - पुरुषः प्राप्यं प्रपद्यते - पुरुष पाहिजे असलेले स्थान प्राप्त करून घेतो ॥२२॥
जेव्हा त्याचे पाय उत्पन्न झाले, तेव्हा लोकेश्वर विष्णूंनी त्यात आपली शक्ती गतीसह प्रवेश केला. या शक्तीमुळे जीव आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतो. (२२)
बुद्धिं चास्य विनिर्भिन्नां वागीशो धिष्ण्यमाविशत् ।
बोधेनांशेन बोद्धव्य प्रतिपत्तिर्यतो भवेत् ॥ २३ ॥ हृदयं चास्य निर्भिन्नं चन्द्रमा धिष्ण्यमाविशत् । मनसांशेन येनासौ विक्रियां प्रतिपद्यते ॥ २४ ॥
बुद्धि त्या पुरुषा येता ब्रह्मा वाक्यति पातला । जाणण्या सर्वज्ञानाला राहिला स्थिर तो तिथे ॥ २३ ॥ हृदयो जाहले त्याला मन नी चंद्र हा तिथे । संकल्प नि विकल्पाच्या विकारा जाणिले तये ॥ २४ ॥
च - आणि - अस्य - ह्या विराट् पुरुषाला - निर्भिन्नम् - उत्पन्न झालेल्या - हृदयम् - हृदयरूप - धिष्ण्यम् - स्थानात - चन्द्रमाः - चंद्र - अंशेन मनसा - मनोरूपी शक्तीसह - आविशत् - प्रविष्ट झाला - तेन असौ विक्रियां प्रतिपद्यते - ज्या मनोरूप शक्तीने जीव संकल्पविकल्प इत्यादि विकारांना प्राप्त होतो - च - आणि - अस्य - ह्या विराट् पुरुषाला - निर्भिन्नम् - उत्पन्न झालेल्या - आत्मानम् पदम् - अहंकाररूप स्थानात - अभिमानः - रुद्रदेवता - अंशेन कर्मणा - अहंक्रियारूप शक्तीसह - आविशत् - प्रविष्ट झाली - येन असौ विक्रियाम् प्रतिपद्यते - ज्या अहंक्रियारूप शक्तीने पुरुषाला कर्तव्याचे ज्ञान होते ॥२३-२४॥
आता याची बुद्धी उत्पन्न झाली. तीत वाणीचा स्वामी ब्रह्मदेवाने आपलाच अंश असलेली बुद्धीशक्ती हिच्यासह प्रवेश केला. या बुद्धीशक्तीमुळे जीव जाणण्याजोगे विषय जाणतो. (२३) नंतर हृदय प्रगट झाले.चंद्राने आपला अंश मनासह त्यात प्रवेश केला. या मनामुळे संकल्प-विकल्प हे विकार निर्माण होतात. (२४)
आत्मानं चास्य निर्भिन्नं अभिमानोऽविशत्पदम् ।
कर्मणांशेन येनासौ कर्तव्यं प्रतिपद्यते ॥ २५ ॥ सत्त्वं चास्य विनिर्भिन्नं महान् धिष्ण्यमुपाविशत् । चित्तेनांशेन येनासौ विज्ञानं प्रतिपद्यते ॥ २६ ॥
अहंकार विराटाला झाला नी रुद्र देवता । पातंता जाणिले जीवे आपुले कर्म काय ते ॥ २५ ॥ चित्तात ते महत्तत्व येवोनिया स्थिरावले । या चित्त शक्तिने जीव चेतना मेळवीतसे ॥ २६ ॥
अस्य - ह्या विराट् पुरुषाला - विनिर्भिन्नम् - उत्पन्न झालेल्या - सत्त्वम् धिष्ण्यम् - बुद्धि आणि चित्तरूपी स्थानात - महान् - ब्रह्मदेव - अंशेन चित्तेन - आपल्या चेतनारूप शक्तीसहवर्तमान - उपाविशत् - येऊन राहिला - येन असौ विज्ञानं प्रतिपद्यते - ज्या चेतनारूप शक्तीमुळे जीवाला विज्ञान प्राप्त होते. ॥२५-२६॥
त्यानंतर विराट पुरुषात अहंकार उत्पन्न झाला. अभिमानाने आपला अंश असलेल्या क्रियाशक्तीसहित त्यात प्रवेश केला. यामुळे जीव कर्तव्य करतो. (२५) आता याच्यात चित्त प्रगट झाले. महत्तत्त्व(ब्रह्मा) हे चेतनेसह तेथे राहिले. याच चित्तशक्तीने जीव विज्ञान प्राप्त करून घेतो. (२६)
शीर्ष्णोऽस्य द्यौर्धरा पद्भ्यां खं नाभेरुदपद्यत ।
गुणानां वृत्तयो येषु प्रतीयन्ते सुरादयः ॥ २७ ॥
स्वर्गलोक तया माथीं पायी पृथ्वी नि नाभिसी । आकाश पातले, त्याच्या त्रिगुणी तीन योनि त्या ॥ २७ ॥
अस्य - ह्या विराट् पुरुषाच्या - शीर्ष्णः - मस्तकापासून - द्यौः - स्वर्ग लोक - पदभ्याम् - पायापासून - धराः - पृथ्वी - नाभेः - नाभीपासून - खम् - आकाश - उदपद्यत - उत्पन्न झाले - येषु - स्वर्ग, पृथ्वी आणि आकाश यांमध्ये - गुणानाम् वृत्तयः सुरादयः - सत्व रज आणि तम यांपासून उत्पन्न झालेले देव मनुष्य व भूते - प्रतीयन्ते - प्रतीत होतात. ॥२७॥
या विराट पुरुषाच्या डोक्यापासून स्वर्गलोक, पायांपासून पृथ्वी आणि नाभीपासून आकाश (अंतरिक्ष) उत्पन्न झाले. याठिकाणी क्रमाने तिन्ही गुणांचे परिणामरूप देवादिक आढळतात. (२७)
आत्यन्तिकेन सत्त्वेन दिवं देवाः प्रपेदिरे ।
धरां रजःस्वभावेन पणयो ये च ताननु ॥ २८ ॥ तार्तीयेन स्वभावेन भगवन् नाभिमाश्रिताः । उभयोरन्तरं व्योम ये रुद्रपार्षदां गणाः ॥ २९ ॥
सत्वप्रधान ते देव स्वर्गामाजी स्थिरावले । रजप्रधान ते जीव पृथ्वीसीच स्थिरावले ॥ २८ ॥ रूद्रपार्षद ते जीव प्रधान तम जाहले । भगवत् नाभि स्थानाला राहती अंतरीक्षि ते ॥ २९ ॥
देवाः - देव - आत्यन्तिकेन सत्त्वेन - उच्च सत्त्वगुणामुळे - दिवम् - स्वर्गाला - प्रपेदिरे - प्राप्त झाले - पणयः - यज्ञादिकांच्या योगाने व्यवहार करणारे मनुष्य - च - आणि - तान् अनु - त्या मनुष्याच्या मागोमाग असणारे इतर प्राणी ते - रजःस्वभावेन - रजोगुणाच्या स्वभावाने - धराम् - पृथ्वीला - प्रपेदिरे - प्राप्त झाले. ॥२८॥ ये रुद्रपार्षदां गणाः - जे रुद्राचे परिवारगण - ते - ते - तार्तीयेन स्वभावेन - तिसर्या तामस स्वभावाने - भगवन्नाभिम् - भगवंताच्या नाभिरूप - उभयोः अन्तरं - स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये असणार्या - व्योम आश्रिताः - अंतराळाचा आश्रय करते झाले ॥२९॥
यामध्ये सत्त्वगुणांच्या आधिक्यामुळे देव स्वर्गलोकात, रजोगुणाच्या प्राधान्यामुळे मनुष्य व त्यांना उपयोगी पडणारे गायी इत्यादी जीव पृथ्वीवर आणि तमोगुणी स्वभावाचे असणारे रुद्राचे पार्षद(भूत, प्रेत) इत्यादी दोन्हींच्यामध्ये भगवंतांचे नाभिस्थान असलेल्या अंतरिक्ष लोकात राहातात. (२८-२९)
मुखतोऽवर्तत ब्रह्म पुरुषस्य कुरूद्वह ।
यस्तून्मुखत्वाद् वर्णानां मुख्योऽभूद् ब्राह्मणो गुरुः ॥ ३० ॥
तयाच्या त्या मुखा मध्ये द्विजांचा जन्म जाहला । म्हणोनी सर्व वर्णात श्रेष्ठ नी गुरु ते द्विज ॥ ३० ॥
कुरुद्वह - हे कुरुकुलश्रेष्ठ विदुरा - पुरुषस्य - पुरुषाच्या - मुखतः - मुखापासून - ब्रह्म - वेद - अवर्तत - उत्पन्न झाला - च - आणि - ब्राह्मणः - ब्राह्मण - अवर्तत - उत्पन्न झाला - यस्तु - जो ब्राह्मण - उन्मुखत्वात् - मुखापासून उत्पन्न झाल्यामुळे - वर्णानां मुख्यः गुरुः अभूत् - वर्णांमध्ये श्रेष्ठ असा गुरु झाला ॥३०॥
विदुरा, भगवंतांच्या मुखापासून वेद आणि ब्राह्मण प्रगट झाले. मुखापासून प्रगट झाल्यामुळे ब्राह्मण सर्व वर्णांत श्रेष्ठ आणि सर्वांचे गुरु आहेत. (३०)
बाहुभ्योऽवर्तत क्षत्रं क्षत्रियस्तदनुव्रतः ।
यो जातस्त्रायते वर्णान् पौरुषः कण्टकक्षतात् ॥ ३१ ॥
क्षत्रीय ते भुजांमध्ये जन्मले रक्षिण्या जग । विराट अंश ते रूप भयाते नासिती सदा ॥ ३१ ॥
बाहुभ्यः - परमेश्वराच्या बाहूंपासून - क्षत्त्रम् - पालनरूप वृत्ति - च - आणि - तदनुव्रतः - पालनरूप वृत्तीला अनुसरणारा - क्षत्रियः - क्षत्रिय - अवर्तत - उत्पन्न झाला - पौरुषः जातः - परमेश्वरापासून उत्पन्न झालेला जो क्षत्रिय - वर्णान् कण्टकक्षतात् त्रायते - ब्राह्मणादिवर्णाचे चोर इत्यादिकांच्या उपद्रवापासून रक्षण करतो ॥३१॥
त्यांच्या बाहूंपासून क्षत्रियवृत्ती आणि त्या वृत्तीचा अंगीकार करणारा क्षत्रिय वर्ण उत्पन्न झाला. हा वर्ण विराट भगवंतांचा अंश असल्यामुळे सर्व वर्णांचे चोर इत्यादींच्या उपद्रवापासून संरक्षण करतो. (३१)
विशोऽवर्तन्त तस्योर्वोः लोकवृत्तिकरीर्विभोः ।
वैश्यस्तदुद्भवो वार्तां नृणां यः समवर्तयत् ॥ ३२ ॥
निर्वाह वृत्ति मांड्यांत जाहली भगवन्मनी । तेथुनी वैश्यवर्णाचा प्रादुर्भावहि जाहला ॥ ३२ ॥
तस्य विभोः - त्या सर्वव्यापक परमेश्वराच्या - ऊर्वोः - मांड्यांपासून - लोकवृत्तिकरीः विशः - लोकांच्या उपजीविकेचे शेतकी इत्यादी धंदे - अवर्तन्त - उत्पन्न झाले - तदुद्भवः - त्या मांड्यांपासून आहे उत्पत्ति ज्याची असा - वैश्यः - वैश्य - अस्ति - आहे - यः - जो - नृणां वार्तां समवतर्यत् - मनुष्यांची उपजीविका संपादन करतो ॥३२॥
त्या भगवंतांच्या दोन मांडयापासून सर्व लोकांचा निर्वाह करणारे शेती इत्यादी व्यवसाय आणि तिच्यापासून वैश्यवर्णाचा प्रादुर्भाव झाला. आपल्या वृत्तीनुसार हा वर्ण जीवांची उपजीविका चालवितो. (३२)
पद्भ्यां भगवतो जज्ञे शुश्रूषा धर्मसिद्धये ।
तस्यां जातः पुरा शूद्रो यद्वृत्त्या तुष्यते हरिः ॥ ३३ ॥
सर्व धर्मास सिद्धीते सेवावृत्तीहि जाहली । तेंव्हा पायात शूद्रांचा जन्म तो जाहला असे ॥ ३३ ॥
धर्मसिद्धये - धर्ममार्गांची सिद्धि होण्याकरिता - भगवतः - विराट् पुरुषाच्या - पदभ्याम - पायापासून - शुश्रूषा - सेवाधर्म - पुरा - पूर्वी - जज्ञे - उत्पन्न झाला - तस्याम् - त्या सेवेनिमित्त - शूद्रः - शूद्रवर्ण - जातः - उत्पन्न झाला - यद्वृत्त्या हरिः तुष्यते - ज्या सेवाधर्माच्या योगाने परमेश्वर संतुष्ट होतो. ॥३३॥
यानंतर सर्व धर्म व्यवस्थित चालण्यासाठी भगवंतांच्या चरणापासून सेवावृत्ती प्रगट झाली आणि तीपासून प्रथम ती वृत्ती धारण करणारा शूद्रवर्ण प्रगट झाला. या सेवावृत्तीनेच श्रीहरी प्रसन्न होतात. [ ब्राह्मणधर्म मोक्षासाठी, क्षत्रियधर्म कामासाठी, वैश्यधर्म अर्थासाठी पण हे सर्व धर्म चालविण्यासाठी शूद्राचीच आवश्यकता असते. धर्म चालविणारा शूद्र म्हणून भगवंताला प्रिय असतो.] (३३)
एते वर्णाः स्वधर्मेण यजन्ति स्वगुरुं हरिम् ।
श्रद्धया आत्मविशुद्ध्यर्थं यज्जाताः सह वृत्तिभिः ॥ ३४ ॥
वृत्तींच्या सह ते चारी जाहले वर्ण तेधवा । श्रीगुरूच्या पाया धर्माने नित्य सेविती ॥ ३४ ॥
एते वर्णाः - हे ब्राह्मणादि वर्ण - वृत्तिभिः सह - उपजीविकेच्या साधनांसहित - यत् जाताः - ज्या विराट पुरुषापासून उत्पन्न झाले - तम् - त्या - स्वगुरुं हरिम् - आपला गुरु जो परमेश्वर त्याला - आत्मविशुद्ध्यर्थम् - स्वतःच्या शुद्धतेकरिता - श्रद्धया - श्रद्धेने - यजन्ति - पूजितात ॥३४॥
हे चारी वर्ण आपापल्या वृत्तींसहित ज्यांच्यापासून उत्पन्न झाले, त्या आपले गुरु श्रीहरींचे आपापल्या धर्माने चित्तशुद्धीसाठी, श्रद्धापूर्वक पूजन करतात. (३४)
एतत् क्षत्तर्भगवतो दैवकर्मात्मरूपिणः ।
कः श्रद्दध्यादुपाकर्तुं योगमायाबलोदयम् ॥ ३५ ॥ तथापि कीर्तयाम्यङ्ग यथामति यथाश्रुतम् । कीर्तिं हरेः स्वां सत्कर्तुं गिरमन्याभिधासतीम् ॥ ३६ ॥
प्रगटे योगमायेने काल कर्म स्वभावि तो । स्वरूप पूर्ण ते त्याचे वर्णू कोण असा ॥ ३५ ॥ परंतु व्यर्थ बोलाने झाली वाणी अशुद्धची । पवित्र करण्या तीते बुद्धिच्या क्षमते परी ॥ गुरुमुखातुनी जैसे ऐकले ते असे असे । श्रीहरी सुयशा गातो सांगतो कीर्तने अशी ॥ ३६ ॥
क्षत्तः - हे विदुरा - दैवकर्मात्मरूपिणः - काल, कर्म आणि स्वभाव ह्या तीन ज्याच्या शक्ति आहेत अशा - भगवतः - परमेश्वराच्या - योगमायाबलोदयम् - योगमायेच्या सामर्थ्याने वृद्धिंगत झालेले - एतत् - हे विराट् रूप - उपाकर्तुम् - पूर्णपणे वर्णन करण्यास - कः श्रद्दध्यात् - कोणाला श्रद्धा वाटेल ॥३५॥ अथापि - असे असतादेखील - अङ्ग - हे विदुरा - अन्याभिधाऽसतीम् - ईश्वराव्यतिरिक्त विषयांच्या चर्चेने मलिन झालेल्या - स्वां गिरम् - आपल्या वाणीला - सत्कर्तुम् - शुद्ध करण्याकरिता - हरेः - श्रीहरीची - कीर्तिम् - कीर्ति - यथाश्रुतम् - जशी ऐकली आहे तशी - यथामति कीर्तयामि - यथामति वर्णन करितो. ॥३६॥
विदुरा, हा विराट पुरुष काल, कर्म आणि स्वभावशक्तीने युक्त असलेल्या भगवंतांच्या योगमायेच्या प्रभावाला प्रगट करणारा आहे. याच्या स्वरूपाचे संपूर्ण वर्णन करण्याचे साहस कोण करू शकेल ? तरीही हे विदुरा, अन्य व्यावहारिक बोलल्याने अपवित्र झालेली माझी वाणी, पवित्र करण्यासाठी मी गुरुमुखातून जसे ऐकले आहे त्याप्रमाणे आणि माझ्या बुद्धीप्रमाणे श्रीहरीचे सुयश वर्णन करतो. (३५-३६)
एकान्तलाभं वचसो नु पुंसां
सुश्लोकमौलेर्गुणवादमाहुः । श्रुतेश्च विद्वद्भिरुपाकृतायां कथासुधायां उपसम्प्रयोगम् ॥ ३७ ॥
( इंद्रवज्रा ) त्या पावनो श्रीहरिच्या गुणाते गावे मनुष्यें निजवाणि नित्य । विद्वद् मुखीच्या भगवत् कथेची पिता सुधा कर्णि तरीहि मोक्ष ॥ ३७ ॥
ब्रह्मिष्ठाः - ब्रह्मनिष्ठ पुरुष - सुश्लोकमौलेः - पुण्यश्लोकांमध्ये श्रेष्ठ अशा परमेश्वराच्या - गुणवादम् - गुणानुवादाला - पुंसां वचसः - मनुष्यांच्या वाणीचा - च - आणि - विद्वद्भिः - विद्वान लोकांनी - उपाकृतायां कथासुधायाम् - कथन केलेल्या अमृतासारख्या कथांच्या विषयांत - अनुसंप्रयोगम् - संनिध रहाण्याच्या तत्परतेला - श्रुतेः - कर्णेन्द्रियाच्या - नु - निश्चयाने - एकान्तलाभम् आहुः - आत्यंतिक लाभ असे म्हणतात ॥३७॥
महापुरुषांचे असेच मत आहे की, पुण्यश्लोकशिरोमणी श्रीहरींच्या गुणांचे वर्णन करणे हा मनुष्याला त्याच्या वाणीचा आणि विद्वानांच्या मुखातून भगवत्कथामृताचे पान करणे हाच त्याच्या कानांचा सर्वांत मोठा लाभ आहे. (३७)
आत्मनोऽवसितो वत्स महिमा कविनाऽऽदिना ।
संवत्सरसहस्रान्ते धिया योगविपक्वया ॥ ३८ ॥
( अनुष्टुप् ) वत्सा रे काय वाणू ब्रह्मा जो कवि आद्य तो । हजार वर्ष पर्यंत स्मरुनी न कथू शके ॥ ३८ ॥
वत्स - बाळ विदुरा - आदिना कविना - आदिकवि ब्रह्मदेवाने - संवत्सरसहस्त्रान्ते - हजार वर्षांच्या शेवटी - योगविपक्वया धिया - योगाभ्यासाने परिपक्व झालेल्या बुद्धीने - आत्मनः महिमा - ईश्वराचा महिमा - अवसितः - निश्चित केला - किम् - काय ॥३८॥
विदुरा, आम्हीच काय, पण आदिकवी ब्रह्मदेवांनी तरी एक हजार दिव्य वर्षांपर्यंत आपल्या योगसाधनेने परिपक्व झालेल्या बुद्धीने भगवंतांचा अपार महिमा जाणला का ? (३८)
अतो भगवतो माया मायिनामपि मोहिनी ।
यत्स्वयं चात्मवर्त्मात्मा न वेद किमुतापरे ॥ ३९ ॥
अशी ती भगवत् माया थोरांना मोहवीतसे । अनंत चक्र मायेचे तोही ते जाणु ना शके ॥ ३९ ॥
यत् - कारण - स्वयम् - स्वतः - आत्मा - ईश्वर - आत्मवर्म - आपल्या मायेची गति - न वेद - जाणत नाही - अपरे किमुत - दुसरे कोठून जाणणार - अतः - यास्तव - भगवतः - परमेश्वराची - माया - माया - मायिनाम् अपि मोहिनी - मायावी लोकांना देखील भुरळ पाडणारी - अस्ति - आहे ॥३९॥
म्हणजेच भगवंतांची माया मायावी लोकांनाही मोहित करणारी आहे. भगवंतांनाही त्यांच्या मायेचा थांगपत्ता लागला नाही; तर अन्य कोणाचा तिथे काय पाड लागणार ? (३९)
यतोऽप्राप्य न्यवर्तन्त वाचश्च मनसा सह ।
अहं चान्य इमे देवाः तस्मै भगवते नमः ॥ ४० ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
जिथे ना पोचते वाणी फिरते मागुती तसे । अशक्य रुद्र इंद्रासी ज्याचे वर्णन त्या नमो ॥ ४० ॥ ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ सहावा अध्याय हा ॥ ३ ॥ ६ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
मनसा सह वाचः - मनासहित वाणी - अहम् - अहंकाराची देवता रुद्र - इमे - हे इन्द्रियांचे अधिपति - च - आणि - इतरे देवा - इतर देव - यतः - जेथून - अप्राप्य न्यवर्तन्त - प्राप्त न होऊन परत फिरले - तस्मै भगवते नमः - त्या भगवंताला नमस्कार असो ॥४०॥
वाणी आणि मन जेथपर्यंत जाऊन माघारी फिरतात, तसेच अहंकाराचा अभिमानी रुद्र व इतर इंद्रियाधिष्ठात्या देवतांनासुद्धा ज्यांचा पार लागणे शक्य नाही, त्या श्रीभगवानांना नमस्कार असो. (४०)
स्कंध तिसरा - अध्याय सहावा समाप्त |