![]() |
श्रीमद् भागवत पुराण
विदुर प्रश्नं अनुसृत्य मैत्रेयद्वारा सृष्टिक्रमवर्णनम्, तत्र महदादि विदुराचा प्रश्न आणि मैत्रेयांचे सृष्टिक्रमवर्णन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच ।
द्वारि द्युनद्या ऋषभः कुरूणां मैत्रेयमासीनमगाधबोधम् । क्षत्तोपसृत्याच्युतभावसिद्धः पप्रच्छ सौशील्यगुणाभितृप्तः ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - ( इंद्रवज्रा ) विशुद्ध चित्ते हरिद्वार येथे मैत्रेय यांना गुज बोलण्याला । साधुस्वभावे विदुरे अनेक ऋषीस केले चतुराय प्रश्न ॥ १ ॥
कुरूणाम् - कौरवांमध्ये - ऋषभः - श्रेष्ठ - अच्युतभावशुद्धः - व श्रीकृष्णाच्या भक्तीने शुद्ध - सौशील्यगुणाभितृप्तः - आणि मैत्रेयाच्या सुशीलत्वादि गुणांनी संतुष्ट झालेला असा - क्षत्ता - विदुर - द्युनद्याः द्वारि - गंगेचे द्वार जे हरिद्वार तेथे - आसीनम् - बसलेल्या - अगाधबोधम् - ज्याचे ज्ञान अगाध आहे अशा - मैत्रेयम् - मैत्रेयाला - उपसृत्य - जवळ जाऊन - पप्रच्छ - प्रश्न करिता झाला. ॥१॥
श्रीशुकदेव म्हणाले - हरिद्वाराला राहाणार्या परमज्ञानी मैत्रेयांकडे भगवद्भक्तीने अंतःकरण शुद्ध झालेला विदुर गेला आणि त्यांच्या सौजन्याने मन प्रेमाने भरून येऊन त्याने त्यांना विचारले. (१)
विदुर उवाच -
सुखाय कर्माणि करोति लोको न तैः सुखं वान्यदुपारमं वा । विन्देत भूयस्तत एव दुःखं यदत्र युक्तं भगवान् वदेन्नः ॥ २ ॥
विदुरजी म्हणाले- मिळवयाला सुख सर्व लोक कर्माचरोनी न मिळे तयांना । परी तयांचे दुख वाढतेची त्यांनी तदा काय करोत कर्म ॥ २ ॥
लोकः - लोक - सुखाय - सुखाकरिता - कर्माणि - क्रिया - करोति - करतात - तु - परन्तु - तैः - त्या कर्मांनी - सुखम् - सुख - न - नाही - वा - किंवा - अन्यदुपारमम् - दुसरे जे दुःख त्याची निवृत्ति - न भवति - होत नाही - प्रत्युत - उलट - ततः - त्यापासून - भूयः - पुनः - दुःखम् एव - दुःखच - विन्देत - प्राप्त करून घेईल - अतः - म्हणून - अत्र - ह्या संसारात - यत् - जे - युक्तम् - करावयास योग्य असेल - तत् - ते - भगवान् - भगवान् - नः - आम्हाला - वदेत् - सांगोत. ॥२॥
विदुर म्हणाला - भगवन, सर्व संसारी लोक सुखप्राप्तीसाठी कर्म करतात; परंतु त्यांना सुख मिळत नाही आणि त्यांचे दुःखही दूर होत नाही. उलट कर्मामुळे त्यांच्या दुःखात वाढच होते. म्हणून याविषयी योग्य काय व अयोग्य काय, ते आपण कृपा करून मला सांगावे. (२)
जनस्य कृष्णाद् विमुखस्य दैवाद्
अधर्मशीलस्य सुदुःखितस्य । अनुग्रहायेह चरन्ति नूनं भूतानि भव्यानि जनार्दनस्य ॥ ३ ॥
नाही जया भक्ति हरीपदासी ते घोर दुःखात कितीक लोक । त्यांच्या कृपेसाठि तुम्हाऽवतार हितार्थ त्यांच्या करिता विहार ॥ ३ ॥
नूनम् - खरोखर - दैवात् - प्रारब्धाने - कृष्णात् - कृष्णापासून - विमुखस्य - पाठ फिरविलेल्या - अधर्मशीलस्य - धर्मरहित ज्याचा स्वभाव आहे अशा - सुदुःखितस्य - अत्यन्त पीडित अशा - जनस्य - लोकांचे - अनुग्रहाय - कल्याण करण्याकरिता - जनार्दनस्य - विष्णूच्या - भव्यानि - शुभकारक अशा - भूतानि - विभूति - इह - ह्या भूमीवर - चरन्ति - संचार करितात ॥३॥
आपल्या दुर्भाग्यामुळे जे लोक भगवान श्रीकृष्णांपासून दूर असतात, अधर्माचे आचरण करतात आणि अत्यंत दुःखी आहेत, अशांच्यावर कृपा करण्यासाठीच आपल्यासारखे भाग्यवान भगवद्भक्त पृथ्वीवर संचार करतात. (३)
तत्साधुवर्यादिश वर्त्म शं नः
संराधितो भगवान् येन पुंसाम् । हृदि स्थितो यच्छति भक्तिपूते ज्ञानं सतत्त्वाधिगमं पुराणम् ॥ ४ ॥
हे श्रेष्ठ साधो मज शांतिमंत्र द्यावा जये साधन मी करेन । जेणे विराजे हृदयात कृष्ण रूपानुभवासहि ज्ञान देई ॥ ४ ॥
साधुवर्य - हे संतशिरोमणे - तत् - म्हणून - नः - आम्हाला - शं वर्त्म - कल्याणकारक मार्ग - आदिश - सांग - येन - ज्या मार्गाने - संराधितः - आराधना केलेला असा - पुंसाम् - पुरुषांच्या - भक्तीपूते - भक्तीने पवित्र झालेल्या - हृदि - अन्तःकरणात - स्थितः भगवान् - असलेला परमेश्वर - पुराणम् - पुरातन - सतत्त्वाधिमम् - आत्मसाक्षात्काराने युक्त अशा - ज्ञानम् - ज्ञानाला - यच्छति - देतो ॥४॥
साधुशिरोमणि ! आपण मला शांती देणार्या अशा साधनाचा उपदेश करा की, ज्यानुसार आराधना केल्याने भगवान भक्तांच्या भक्तीने पवित्र हृदयात विराजमान होतात आणि आपल्या स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव करून देणार्या सनातन ज्ञानाचा उपदेश करतात. (४)
करोति कर्माणि कृतावतारो
यान्यात्मतंत्रो भगवान् त्र्यधीशः । यथा ससर्जाग्र इदं निरीहः संस्थाप्य वृत्तिं जगतो विधत्ते ॥ ५ ॥ यथा पुनः स्वे ख इदं निवेश्य शेते गुहायां स निवृत्तवृत्तिः । योगेश्वराधीश्वर एक एतद् अनुप्रविष्टो बहुधा यथाऽऽसीत् ॥ ६ ॥
लीला करीतो अवतार घेता जगत्रयाचा असुनीहि स्वामी । असे अकर्ता परि सृष्टि निर्मी पोसून त्यांना लिनही करी तो ॥ ५ ॥ पुन्हा निजे तो मग शून्य स्थानी आणीक माया करुनी प्रभू तो । अनेक रूपात पुन्हाहि जन्मे सांगा रहस्यास कृपा करोनी ॥ ६ ॥
त्र्यधीशः - त्रिगुणात्मक मायेचा नियन्ता असा - आत्मतन्त्रः - व स्वतन्त्र असा - भगवान् - परमेश्वर - कृतावतारः - ज्याने अवतार घेतला आहे असा होत्साता - यानि - जी - कर्माणि - कर्मे - करोति - करतो - निरीहः - इच्छारहित असा - भूत्वा - होऊन - यथा - ज्या प्रकाराने - इदम् - ह्या सृष्टीला - ससर्ज - उत्पन्न करितो - च - आणि - संस्थाप्य - पालन करून - ञथा - ज्या प्रकारे - जगतः - सृष्टीची - वृत्तिम् - उपजीविका - विधत्ते - करितो ॥५॥
सः - तो परमेश्वर - पुनः - पुनः - स्वे ख - आपल्या हृदयाकाशात - इदम् - ह्या सृष्टीला - निवेश्य - लीन करून - निवृत्तवृत्तिः - ज्याने आपल्या क्रिया समाप्त केल्या आहेत असा - गुहायाम् - आत्ममायेच्या ठिकाणी - यथा - ज्या रीतीने - शेते - शयन करितो - एकः - एक - योगेश्वराधीश्वरः - आणि योग्यांचा श्रेष्ठ अधिपती असा - एतदनुप्रविष्टः - ह्या सृष्टीत प्रवेश केलेला असा - यथा - ज्या प्रकाराने - बहुधा - ब्रह्मदेवादि रूपे धारण करून अनेक प्रकारचा - आसीत् - झाला ॥६॥
त्रैलोक्याचे नियंते आणि पूर्णपणे स्वतंत्र असे भगवान श्रीहरी अवतार घेऊन ज्या ज्या लीला करतात, ज्या पद्धतीने अकर्ता असूनही त्यांनी कल्पाच्या आरंभी या सृष्टीची रचना केली, ती स्थिर केली आणि जगातील जीवांच्या उपजीविकेची तरतूद केली आणि पुन्हा या सृष्टीला आपल्या हृदयाकाशात लीन करून घेऊन, वृत्तिशून्य होऊन योगमायेच्या आश्रयाने जे निद्रिस्त होतात, ते योगेश्वरेश्वर प्रभू एकच असूनही या ब्रह्मांडात अंतर्यामीरूपाने प्रवेश करून अनेक रूपांत कसे प्रगट होतात ? (५-६)
क्रीडन् विधत्ते द्विजगोसुराणां
क्षेमाय कर्माण्यवतारभेदैः । मनो न तृप्यत्यपि शृण्वतां नः सुश्लोकमौलेश्चरितामृतानि ॥ ७ ॥
गो-ब्राह्मणाच्याच्स् हितास इच्छी घेतो रुपाते मज एहि सांगा । श्रीकृष्ण याच्या हरि कीर्तनाच्या कधी न पाने मन तृप्त होई ॥ ७ ॥
अवतारभेदैः - भिन्न भिन्न अवतार घेऊन - क्रीडन् - क्रीडा करीत - द्विजगोसुराणाम् - ब्राह्मण, गाई आणि देव यांच्या - क्षेमाय - कल्याणाकरिता - कर्माणि - कर्मे - विधत्ते - करतो - सुश्लोकमौलेः - पुण्यकीर्तीचा शिरोमणी अशा भगवन्ताची - चरितामृतानि - अमृततुल्य चरित्रे - शृण्वताम् अपि - श्रवण करीत असता देखील - नः - आमचे - मनः - मन - न तृप्यति - संतुष्ट होत नाही. ॥७॥
तसेच ब्राह्मण, गायी आणि देवता यांचे कल्याण करण्यासाठी जे त्या त्या अवताराप्रमाणे लीलेने कर्मे करतात, ते पण आम्हांस सांगावे. सर्व यशस्वी पुरुषांचे मुकुटमणी असलेल्या श्रीहरींच्या लीलामृताचे कितीही पान केले तरी आमचे मन तृप्त होत नाही. (७)
यैस्तत्त्वभेदैः अधिलोकनाथो
लोकानलोकान् सह लोकपालान् । अचीकॢपद्यत्र हि सर्वसत्त्व निकायभेदोऽधिकृतः प्रतीतः ॥ ८ ॥
स्वामी त्रिलोका रचितो कसा तो निर्मि कसे भोग जिवा शिवाचे । कोण्या परीने अधिकार ऐसा त्या प्राणि मात्रास विभिन्न भेद ॥ ८ ॥
हि - कारण - अधिलोकनाथः - लोकपालांचा अधिपती - यत्र - ज्याच्या ठिकाणी - सर्वसत्त्वनिकायभेदः - सर्व प्राण्यांच्या समुदायांचा भेद - अधिकृतः - रचलेला - प्रतीतः - दिसतो - तान् - त्या - सहलोकपालान् - लोकांचे रक्षणकर्ते राजे किंवा इन्द्रादिक देव यांसहित - लोकान् - लोकांना - च - आणि - अलोकान् - लोकालोक पर्वताच्या बाहेरील भागांना - यैः - ज्या - तत्त्वभेदैः - तत्त्वांच्या भेदांनी - अचीक्लॄपत् - रचिता झाला ॥८॥
सर्व लोकपतींचे स्वामी असणार्या श्रीहरींनी कोणत्या तत्त्वांनी हे लोक, लोकपाल आणि लोकालोक पर्वताच्या बाहेरच्या भागांची, ज्यामध्ये या सर्व प्रकारच्या प्राण्यांमध्ये अधिकारानुसार वेगवेगळा भेद जाणवतो, त्यांची रचना केली आहे ? (८)
येन प्रजानामुत आत्मकर्म
रूपाभिधानां च भिदां व्यधत्त । नारायणो विश्वसृगात्मयोनिः एतच्च नो वर्णय विप्रवर्य ॥ ९ ॥ परावरेषां भगवन् व्रतानि श्रुतानि मे व्यासमुखादभीक्ष्णम् । अतृप्नुम क्षुल्लसुखावहानां तेषामृते कृष्णकथामृतौघात् ॥ १० ॥
नारायणे ही अपुल्या प्रजेची स्वभाव कर्मे नि रुपादि नामा । केली कशी ती रचना नवीन कृपा करोनी मज हेहि सांगा ॥ ९ ॥ रोहावरोहातचि व्यास शब्दीं धर्मास ऐको किति एक वेळा । परी हरीच्या कथाना मृताचा प्रवाह सोडोनि कुठेन शांती ॥ १० ॥
विप्रवर्य - हे ब्राह्मणश्रेष्ठा - विश्वसृट् - जगाला उत्पन्न करणारा - आत्मयोनिः - स्वतःच आहे उत्पत्तिस्थान ज्याचे असा स्वयंभू - नारायणः - परमेश्वर - प्रजानाम् - जीवांच्या - उतच - आणि - आत्मकर्मरूपाभिधानाम् - आपल्या कर्मांच्या रूपांच्या आणि नावांच्या - भिदाम् - भेदांना - व्यधत्त - करता झाला - एतत् च - हेहि - नः - आम्हाला - वर्णय - सांगा ॥९॥
भगवन् - हे मैत्रेया - परावरेषाम् - श्रेष्ठ व कनिष्ठ वर्णाच्या लोकांचे - व्रतानि - धर्म - मे - मी - व्यासमुखात् - व्यासांच्या मुखातून - अभीक्ष्णम् - वारंवार - श्रुतानि - ऐकिले आहेत - किंतु - पण - कृष्णकथामृतौघात्ऋते - कृष्णकथारूपी अमृताच्या प्रवाहाच्या अभावी - क्षुल्लसुखावहानाम् - क्षुल्लक सुख देणार्या - तेषाम् - त्या धर्माच्या - श्रवणेन - श्रवणाने - अतृप्नुम - आम्ही कंटाळून गेलो ॥१०॥
ब्राह्मणश्रेष्ठ ! त्या विश्वकर्त्या स्वयंभू श्रीनारायणांनी आपल्या प्रजेचा स्वभाव, कर्म, रूप आणि नामभेद यांची कोणत्या प्रकारे रचना केली ? भगवन, उच्च-नीच वर्णांचे धर्म मी श्रीव्यासांच्या मुखातून अनेक वेळा ऐकले आहेत. परंतु श्रीकृष्णकथामृताच्या प्रवाहाशिवाय इतर तुच्छ सुख देणारे धर्म ऐकण्याची इच्छा आता मला उरली नाही. (९-१०)
कस्तृप्नुयात्तीर्थपदोऽभिधानात्
सत्रेषु वः सूरिभिरीड्यमानात् । यः कर्णनाडीं पुरुषस्य यातो भवप्रदां गेहरतिं छिनत्ति ॥ ११ ॥
त्या तीर्थपादो हरिच्या गुणाला गाऊनि झाला न कुणीहि तृप्त । तुम्हीच साधो अन नारदाने गावे तयाचे गुणगान नित्य । आणीक गाताहि मनुष्य मात्रा कर्णातुनी आत प्रविशिवावे । संसार चक्रात मनुष्य बद्ध असून सारे तुटतील बंध ॥ ११ ॥
यः - जो भगवान - पुरुषस्य - मनुष्य़ाच्या - कर्णनाडीम् - कर्णरन्ध्रात - यातः - शिरला असता - भवप्रदाम् - संसारात पाडणार्या - गेहरतिम् - गृहविषयक प्रीतीला - छिनत्ति - तोडतो - तस्य - त्या - तीर्थपदः - पवित्र आहेत पदे ज्यांची अशा श्रीकृष्णाच्या - वः सत्रेषु - तुमच्या सभांमध्ये - सूरिभिः - नारदादिक विद्वानांनी - ईड्यमानात् - स्तवन केलेल्या - अभिधानात् - नामाने - कः तृप्नुयात् - कोण तृप्त होईल ॥११॥
त्या तीर्थरूप श्रीहरींचे गुण ऐकून कुणाची तृप्ती होईल ? नारदांसारखे महात्मे आपल्यासारख्या साधूंच्या समाजात त्यांचे गुण गातात आणि ते गुणगान जेव्हा मनुष्याच्या कर्णरंध्रात प्रवेश करते, तेव्हा त्यांची संसारचक्रात गुरफटून टाकणारी गृहस्थ-धर्माची आसक्ती नाहीशी होते. (११)
मुनिर्विवक्षुर्भगवद्गुणानां
सखापि ते भारतमाह कृष्णः । यस्मिन् नृणां ग्राम्यसुखानुवादैः मतिर्गृहीता नु हरेः कथायाम् ॥ १२ ॥
व्यासे तयाच्या गुणगान इच्छे रचीयले भारत ते महान । त्याच्या सुखाला स्मरता मनात त्याची कथा चित्त हरून घेते ॥ १२ ॥
ते - तुझा - सखा - मित्र - भगवान् - भगवान् - कृष्णः मुनिः अपि - व्यास मुनि सुद्धा - भगवद्गुणानाम् - भगवंताच्या गुणांना - विवक्षुः - वर्णन करण्याची इच्छा करणारा - भारतम् - महाभारत - आह - रचता झाला - यस्मिन् - ज्या महाभारतात - ग्राम्यसुखानुवादैः - क्षुद्रसुखांच्या वर्णनांनी - नृणां - मनुष्यांची - मतिः - बुद्धि - हरेः - श्रीकृष्णाच्या - कथायां - कथेत - नु - निश्चयाने - गृहीता - लावली आहे. ॥१२॥
भगवन, आपले परम मित्र मुनिवर व्यासांनीसुद्धा भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याच्या इच्छेनेच महाभारताची रचना केली. त्यात त्यांनी विषयसुखांचा उल्लेख करीत मनुष्यांची बुद्धी भगवंतांच्या कथेकडे आकर्षित केली आहे. (१२)
सा श्रद्दधानस्य विवर्धमाना
विरक्तिमन्यत्र करोति पुंसः । हरेः पदानुस्मृतिनिर्वृतस्य समस्तदुःखाप्ययमाशु धत्ते ॥ १३ ॥
श्रद्धाळुच्या जैहॄदयात जाता कथा रुची तीच विरक्ति देते । पायी सदैवोचि निमग्न होता दुःखे क्षणा माजि पळोनि जाती ॥ १३ ॥
विवर्धमाना - वाढणारी - सा - ती कृष्णकथाविषयक बुद्धि - श्रद्दधानस्य पुंसः - श्रद्धाळू पुरुषाच्या ठिकाणी - अन्यत्र - इतर विषय सुखांविषयी - विरक्तिम् - वैराग्य - करोति - उत्पन्न करिते - च - आणि - हरेः - श्रीकृष्णाच्या - पदानुस्मृतिनिर्वृतस्य - चरणकमलाच्या ध्यानाने सुखी झालेल्या पुरुषाच्या - आशु - लवकर - समस्तदुःखात्ययम् - संपूर्ण दुःखाचा नाश - धत्ते - करिते ॥१३॥
ही भगवत्कथेची गोडी श्रद्धाळू पुरुषाच्या हृदयात जेव्हा वाढू लागते, तेव्हा ती त्याला अन्य विषयांपासून विरक्त करते. तो भगवच्चरणांच्या अखंड चिंतनाने आनंदित होत जातो आणि त्या पुरुषाच्या सर्व दुःखांचा तत्काळ नाश होतो. (१३)
तान् शोच्यशोच्यान् अविदोऽनुशोचे
हरेः कथायां विमुखानघेन । क्षिणोति देवोऽनिमिषस्तु येषां आयुर्वृथावादगतिस्मृतीनाम् ॥ १४ ॥
होतो मला खेद तया नराचा जो पूर्वपापें मुकतो कथेला । रे रे घटे आयु तया नराची वाणी तनू कष्टित नित्य राही ॥ १४ ॥
अघेन - पापामुळे - हरेः कथायाम् - श्रीकृष्णाच्या कथेविषयी - विमुखान् - पराङ्मुख अशा व - शोच्यशोच्यान् - अत्यंत कीव करण्यास पात्र अशा - तान् अविदः - त्या अज्ञान्यांचे - अनुशोचे - मला वाईट वाटते - वृथावादगतिस्मृतीनाम् - निष्फल आहेत बोलणे, चालणे व मनोव्यापार ज्यांचे अशा - येषाम् - ज्यांचे - आयुः - आयुष्य - अनिमिषः देवः - सतत कार्यतत्पर असा भगवान् काल - क्षिणोति - नष्ट करितो ॥१४॥
जे आपल्या पूर्वजन्मीच्या पापांमुळे भगवत्कथेविषयी विन्मुख असतात, अशा शोचनीय पुरुषांनाही शोचनीय अशा अज्ञानी लोकांबद्दल मला नेहमी खेद होतो. आणि निरर्थक संभाषण, कामे आणि चिंतनात काळ घालवितात, त्यांचे अमूल्य जीवन काळपुरुष हिरावून घेतो. (१४)
तदस्य कौषारव शर्मदातुः
हरेः कथामेव कथासु सारम् । उद्धृत्य पुष्पेभ्य इवार्तबन्धो शिवाय नः कीर्तय तीर्थकीर्तेः ॥ १५ ॥
मैत्रेयजी दीनबंधू तुम्ही तो भुंगा जसा गंध फुलात सेवी । निसून सांगा हरिच्या कथा त्या कल्याणकारी नि पवित्र ऐशा ॥ १५ ॥
आर्तबन्धो कौषारव - हे दुःखितांचे रक्षण करणार्या मैत्रेया ! - तत् - यास्तव - शर्मदातुः - सुख देणार्या - तीर्थकीर्तेः - पवित्र आहे यश ज्यांचे अशा - हरेः - श्रीकृष्णाच्या - कथासु - कथेतील - सारम् - सार अशा - कथाम् एव - कथेलाच - पुष्पेभ्यः - पुष्पांतून - मधु इव - मधाप्रमाणे - उद्धृत्य - काढून - अस्य शिवाय - ह्या जगाच्या कल्याणाकरिता - नः - आम्हाला - कीर्तय - सांग ॥१५॥
मैत्रेय मुनी, आपण दीनांच्यावर कृपा करणारे आहात. भुंगा जसा फुलांतील मध काढून घेतो, त्याचप्रमाणे या लौकिक कथांमधून सारभूत असलेल्या परम कल्याणकारी पवित्रकीर्ती श्रीहरींच्या निवडक कथा आमच्या कल्याणासाठी आम्हांला सांगा. (१५)
स विश्वजन्मस्थितिसंयमार्थे
कृतावतारः प्रगृहीतशक्तिः । चकार कर्माण्यतिपूरुषाणि यानीश्वरः कीर्तय तानि मह्यम् ॥ १६ ॥
उत्पत्ति संहार स्थिती जगाची सर्वेष्वराने करण्या धरीले । श्रीरामकृष्णादि रुपास माये लिला तयाच्या मज सांगणे त्या ॥ १६ ॥
विश्वजन्मस्थितिसंयमार्थे - जगाची उत्पत्ति,पालन आणि नाश याकरिता - प्रगृहीतशक्तिः - ज्याने त्रिगुणात्मक शक्तीचा आश्रय केला आहे - कृतावतारः - आणि ज्याने अवतार घेतला आहे असा - सः ईश्वरः - तो परमेश्वर - अतिपूरुषाणि - अमानुष अशी - यानि कर्माणि - जी कृत्ये - चकार - करता झाला - तानि - ती - मह्यम् - मला - कीर्तय - सांग ॥१६॥
त्या सर्वेश्वर भगवंतांनी संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करण्यासाठी आपल्या मायाशक्तीचा स्वीकार करून राम-कृष्णादी अवतारांच्याद्वारा ज्या अनेक अलौकिक लीला केल्या, त्या सर्व मला सांगाव्यात. (१६)
श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्) स एवं भगवान् पृष्टः क्षत्त्रा कौषारविर्मुनिः । पुंसां निःश्रेयसार्थेन तमाह बहु मानयन् ॥ १७ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - ( अनुष्टुप् ) विदुरे जनकल्याणा प्रश्न ऐसे विचारिले । तेंव्हा त्या श्रेष्ठ मैत्रेये करुनी स्तुति बोलले ॥ १७ ॥
पुंसाम् - पुरुषांच्या - निःश्रेयसार्थेन - कल्याणाच्या इच्छेने - क्षत्त्रा - विदुराने - एवम् - या प्रकारे - पृष्टः - विचारलेला - भगवान् - भगवान् - सः मुनिः कौषारविः - तो ऋषि मैत्रेय - तम् - त्या विदुराला - बहु - पुष्कळ - मानयन् - मान देऊन - आह - म्हणाला ॥१७॥
श्रीशुकदेव म्हणतात - जीवांचे कल्याण होण्याच्या हेतूने विदुराने जेव्हा अशी प्रार्थना केली, तेव्हा मुनिश्रेष्ठ भगवान मैत्रेयांनी त्याची प्रशंसा करीत म्हटले. (१७)
मैत्रेय उवाच -
साधु पृष्टं त्वया साधो लोकान् साधु अनुगृह्णता । कीर्तिं वितन्वता लोके आत्मनोऽधोक्षजात्मनः ॥ १८ ॥
मैत्रेय म्हणाले- साधुस्वभाव विदुरा मानवा हितकारक । तुमचा प्रश्न हा आहे तुम्ही तो कृष्णरूपची ॥ तशी या उत्तराने ती कीर्ती होईल या जगीं ॥ १८ ॥
साधो - हे सज्जना विदुरा - लोकान् - लोकांवर - साधु - उत्तम प्रकारे - अनुगृह्नणता - अनुग्रह करणार्या - अधोक्षजात्मनः - श्रीकृष्णाच्या ठिकाणी आहे मन ज्याचे अशा - आत्मनः - आपल्या - कीर्तिम् - यशाला - लोके - लोकात - वितन्वता - पसरविणार्या - त्वया - तू - साधु पृष्टम् - चांगला प्रश्न केलास ॥१८॥
मैत्रेय म्हणाले - साधुस्वभाव विदुरा ! सर्व जीवांवर अनुग्रह करण्यासाठी आपण ही फार चांगली गोष्ट मला विचारली. तुझे चित्त नेहमी भगवच्चरणीच लागलेले असते. यामुळेच तुझी कीर्ती सर्वत्र पसरली आहे. (१८)
नैतच्चित्रं त्वयि क्षत्तः बादरायणवीर्यजे ।
गृहीतोऽनन्यभावेन यत्त्वया हरिरीश्वरः ॥ १९ ॥
तुम्ही तो भगवान् व्यास यांचे औरस पुत्रची । आश्चर्य तुमचे नाही तुम्ही श्रीहरिआश्रित ॥ १९ ॥
क्षत्तः - हे विदुरा - यत् - जो - त्वया - तू - हरिः - दुःखाचा परिहार करणारा - ईश्वरः - परमेश्वर - अनन्यभावेन - अनन्यभक्तीने - गृहीतः - धारण केलास - एतत् - हे - बादरायणवीर्यजे - व्यासापासून उत्पन्न झालेल्या - त्वयि - तुझ्या ठिकाणी - चित्रम् न - आश्चर्यकारक नाही ॥१९॥
तू श्रीव्यासांचा औरस पुत्र असल्याने अनन्यभावाने सर्वेश्वर श्रीहरीचा आश्रय केलास, यात काही आश्चर्य नाही. (१९)
माण्डव्यशापाद् भगवान् प्रजासंयमनो यमः ।
भ्रातुः क्षेत्रे भुजिष्यायां जातः सत्यवतीसुतात् ॥ २० ॥
प्रजेला दंडदेणारे तुम्ही तो भगवान् यम । मांडव्य ऋषिच्या शापे दासीपुत्रचि जाहले ॥ २० ॥
प्रजासंयमनः - लोकांचे नियमन करणारा - भगवान् यमः - भगवान यम - माण्डव्यशापात् - मांडव्य ऋषीच्या शापामुळे - सत्यवतीसुतात् - सत्यवतीचा पुत्र जो व्यास त्यापासून - भ्रातुः - भाऊ जो विचित्रवीर्य त्याच्या - भुजिष्यायाम्क्षेत्रे - भोग्य स्त्रीच्या ठिकाणी - जातः - जन्मलास ॥२०॥
तू प्रजेला शासन करणारा भगवान यमच आहेस. मांडव्य ऋषींच्या शापामुळे श्रीव्यासांचा भाऊ विचित्रवीर्य याच्या दासीच्या गर्भातून श्रीव्यासांपासून तुझा जन्म झाला आहे. (२०)
भवान् भगवतो नित्यं सम्मतः सानुगस्य ह ।
यस्य ज्ञानोपदेशाय माऽऽदिशद्भगवान् व्रजन् ॥ २१ ॥
तुम्ही तो कृष्ण नी भक्त या दोघाही अतिप्रिय । निघता निजधामाला जाता जाता मला तये । ज्ञानोपदेश देण्याची इच्छाही बोलले असे ॥ २१ ॥
च - आणि - भगवान् व्रजन् - भगवान निजधामाला जात असता त्याने - यस्य - ज्या तुला - ज्ञानोपदेशाय - तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्याकरिता - मा - मला - आदिशत् - आज्ञा केली - सः - तो - भवान् - तू - सानुगस्य भगवतः - सेवकांसहित जो भगवान् त्याला - नित्यम् - निरंतर - संमतः - संमत आहेस ॥२१॥
श्रीभगवंत आणि त्यांचे भक्त यांना तू नेहमीच प्रिय आहेस. म्हणूनच निजधामाला जातेवेळी भगवंतांनी तुला ज्ञानोपदेश करण्याची मला आज्ञा केली आहे. (२१)
अथ ते भगवल्लीला योगमायोरुबृंहिताः ।
विश्वस्थिति उद्भवान्तार्था वर्णयामि अनुपूर्वशः ॥ २२ ॥
त्यामुळे जग उत्पत्ती स्थिती मायेतुनी,तशा । कृष्णाच्या सगळ्या लीला क्रमाने सांगतो तुम्हा ॥ २२ ॥
अथ - आता - ते - तुला - विश्वस्थित्युद्भवान्तार्थाः - जगाचे रक्षण,उत्पत्ति आणि नाश ही आहेत प्रयोजने ज्यांची अशा - योगमायोपबृंहिताः - व योगमायेने विस्तृत केलेल्या अशा - भगवल्लीलाः - भगवंताच्या लीला - अनुपूर्वशः - अनुक्रमाने - वर्णयामि - वर्णन करतो ॥२२॥
म्हणून मी आता जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यासाठी भगवंतांनी योगमायेच्या साह्याने केलेल्या वेगवेगळ्या लीलांचे क्रमशः वर्णन करतो. (२२)
भगवान् एक आसेदं अग्र आत्माऽऽत्मनां विभुः ।
आत्मेच्छानुगतावात्मा नानामत्युपलक्षणः ॥ २३ ॥
तो एकटा पूर्वी त्या न द्रष्टा न दृश्य जो । सृष्टिनिमार्णच्या वेळी इच्छेने जाहला बहू ॥ २३ ॥
आत्मनाम् आत्मा - जीवांचा स्वरूपभूत असा - विभुः - व स्वामी - अनानामत्युपलक्षणः - अनेकपणा जीत नाही अशा बुद्धीने समजून येणारा - भगवान् आत्मा - भगवान् परमात्मा - इदम् - हे विश्व - अग्रे - सृष्टीच्या पूर्वी - आत्मेच्छानुगतौ - आत्म मायेचा लय झाला असता - एकः आस - एकटाच होता ॥२३॥
सृष्टिरचनेच्या पूर्वी हे विश्व म्हणजे आत्म्यांचे आत्मा आणि त्याचे स्वामी एकमेव परमात्माच होते. माया आवरण्याची त्यांना इच्छा झाली असता सृष्टीमध्ये अनेक वृत्तींच्या भेदामुळे जी अनेकता दृष्टीस पडते, तीही नाहीशी होऊन ते एकटेच उरतात. (२३)
स वा एष तदा द्रष्टा नापश्यद् दृश्यमेकराट् ।
मेनेऽसन्तमिवात्मानं सुप्तशक्तिः असुप्तदृक् ॥ २४ ॥
स्वताच जाहला द्रष्टा परी तो पाहु ना शके । लुप्त होत्या तया शक्ती परी जागृत ज्ञान ते ॥ २४ ॥
सः वा एषः द्रष्टा - तो हा पाहणारा - एकराट् - एकटाच प्रकाशणारा असा - तदा - त्यावेळी - दृश्यम् - पाहता येण्यासारख्या वस्तूस - न अपश्यत् - न पाहता झाला - च - आणि - सुप्तशक्तिः - लीन झाल्या आहेत मायादि शक्ती ज्याच्या असा - असुप्तदृक् - व लीन झाली नाही चिच्छक्ति ज्याची असा - आत्मानम् - आपल्याला - असंतम् इव - नसल्याप्रमाणे - मेने - मानता झाला ॥२४॥
ते द्रष्टा होऊन पाहू लागले, परंतु त्यांना काहीच दिसले नाही. कारण त्यावेळी ते स्वतःच्याच अद्वितीय रूपाने प्रकाशित होत होते. अशा अवस्थेत ते स्वतःला नसल्याप्रमाणे समजू लागले. खरे पाहता ते असत् नव्हते; तर त्यांच्या शक्ती निद्रिस्त होत्या. पण त्यांच्या ज्ञानाचा लोप झाला नव्हता. (२४)
सा वा एतस्य संद्रष्टुः शक्तिः सद् असदात्मिका ।
माया नाम महाभाग ययेदं निर्ममे विभुः ॥ २५ ॥
द्रष्टा दृश्य तया ती अनुसंधि ना । त्याचि माये तये ईशे विश्वाला निर्मिले असे ॥ २५ ॥
महाभाग - हे महाभाग्यवान् विदुरा - सा वा - तीच - एतस्य संद्रष्टः - ह्या साक्षिरूप ईश्वराची - सदसदात्मिका - कार्यकारणात्मक - माया नाम शक्तिः - मायानावाची शक्ती - यया - जिच्या योगाने - इदम् - हे जग - विभुः- परमात्मा - निर्ममे - निर्माण करता झाला ॥२५॥
द्रष्टा आणि दृश्य यांना एकत्र आणणारी शक्ती म्हणजे कार्यकारणरूप माया होय. महाभाग विदुरा, या मायेच्या द्वाराच भगवंतांनी हे विश्व निर्माण केले आहे. (२५)
कालवृत्त्या तु मायायां गुणमय्यामधोक्षजः ।
पुरुषेणात्मभूतेन वीर्यमाधत्त वीर्यवान् ॥ २६ ॥
क्षोभाच्या त्रिगुणी माये चिदाभासास रोपिले ॥ २६ ॥
वीर्यवान् अघोक्षजः तु - चिच्छक्ति ज्याच्यात आहे असा परमेश्वर तर - कालवृत्त्या - कालाच्या शक्तीने - गुणमय्याम् मायायाम् - तीन गुणांचा क्षोभ जीत झाला आहे अशा मायेमध्ये - आत्मभूतेन पुरुषेण - आपल्या अंशाने उत्पन्न झालेल्या पुरुषाकडून - वीर्यम् आधत्त - वीर्य स्थापन करता झाला ॥२६॥
काळाच्या शक्तीने जेव्हा या त्रिगुणात्मक मायेचा क्षोभ झाला, तेव्हा त्या इंद्रियातीत चिन्मय परमात्म्याने आपला अंश असलेल्या पुरुषरूपाने तीत चिदाभासरूप बीजाची स्थापना केली. (२६)
ततोऽभवन् महत्तत्त्वं अव्यक्तात् कालचोदितात् ।
विज्ञानात्माऽऽत्मदेहस्थं विश्वं व्यञ्जन् तमोनुदः ॥ २७ ॥
काळा़च्या प्रेरणेने तै महत्तत्व स्वरूपले । मिथ्या विज्ञान ते रूप प्रपंच्या व्यक्त ते करी ॥ २७ ॥
ततः - नंतर - कालचोदितात् अव्यक्तात - कालाने प्रेरणा केलेल्या मायेपासून - महत्तत्त्वम् अभवत् - महत्तत्त्व उत्पन्न झाले - विज्ञानात्मा - विज्ञान आहे स्वरूप ज्याचे असे - तमोनुदः - व अज्ञानाचा नाश करणारे असे - सः - ते महत्तत्त्व - आत्मदेहस्थम् - आपल्या शरीरात - विश्वम् - जगाला - व्यञ्जन् - प्रगट करीत - आस्ते - असते ॥२७॥
तेव्हा काळाच्या प्रेरणेने त्या अव्यक्त मायेपासून महत्तत्त्व प्रगट झाले. ते खोटया अज्ञानाचा नाश करणारे असल्याने विज्ञानस्वरूप आणि आपल्यातच सूक्ष्मरूपाने असलेल्या विश्वाचे प्रगटीकरण करणारे होते. (२७)
सोऽप्यंशगुणकालात्मा भगवद् दृष्टिगोचरः ।
आत्मानं व्यकरोद् आत्मा विश्वस्यास्य सिसृक्षया ॥ २८ ॥
गुण कालाधिनी तत्वें भगवत् दृष्टि पाहता । विश्वाच्या रचने साठी स्वरुपा पालटीयले ॥ २८ ॥
अंशगुणकालात्मा - चिदाभासरूप वीर्य, तीन गुण व काल यांनी युक्त असे - सः अपि आत्मा - ते महत्तत्त्व देखील - भगवद्दृष्टिगोचरः - भगवंताचा पाहण्याचा विषय होऊन - अस्य विश्वस्य - ह्या जगाची - सिसृक्षया - उत्पत्ती करण्याच्या इच्छेने - आत्मानम् व्यकरोत् - आपले रुपांतर करते झाले ॥२८॥
नंतर चिदाभास, गुण आणि कालाच्या अधीन असणार्या महत्तत्त्वावर भगवंतांची दृष्टी पडल्यावर त्यांनी विश्वाच्या रचनेसाठी स्वतःस रुपांतरित केले. (२८)
महत्तत्त्वाद् विकुर्वाणाद् अहंतत्त्वं व्यजायत ।
कार्यकारणकर्त्रात्मा भूतेन्द्रियमनोमयः ॥ २९ ॥
बिघडता महत्तत्त्व अहंकारहि जन्मला । कार्य कारण कर्ता तो मन भूतेंद्रियी असा ॥ २९ ॥
विकुर्वाणात् महत्तत्त्वात् - विकार पावलेल्या महत्तत्त्वापासून - कार्यकरणकर्त्रात्मा - कार्य, कारण आणि कर्ता ही ज्याचे स्वरूप आहेत असा - भूतेंद्रियमनोमयः - आणि पंचमहाभूते, दहा इन्द्रिये, मन आणि देवता यांचे मूळ कारण असे - अहंतत्त्वम् - अहंकारनामक तत्त्व - व्यजायत - उत्पन्न झाले ॥२९॥
महत्तत्त्व विकृत झाल्यावर त्यातून अहंकाराची उत्पत्ती झाली. हा अहंकार कार्य, कारण आणि कर्ता यांच्या रूपात असल्याने तोच भूतमात्र, इंद्रिये आणि मनाला कारणीभूत आहे. (२९)
वैकारिकस्तैजसश्च तामसश्चेत्यहं त्रिधा ।
अहंतत्त्वाद् विकुर्वाणात् मनो वैकारिकात् अभूत् । वैकारिकाश्च ये देवा अर्थाभिव्यञ्जनं यतः ॥ ३० ॥
बिघडता महत्तत्व अहंकारहि भेदिले । त्यातुनी मनानिष्पत्ती विषया तेच जाणते ॥ ३० ॥
वैकारिकः तैजसः च तामसः च इति - सात्त्विक, राजस आणि तामस असा - अहं - अहंकार - त्रिधा - तीन प्रकारचा - अभूत् - झाला - विकुर्वाणात् - विकार पावणार्या - अहंतत्त्वात् - सात्त्विक अहंकारापासून - मनः अभूत् - मन उत्पन्न झाले - च् - आणि - वैकारिकाः - सात्त्विक अशा - ये देवाः - ज्या देवता - ते अभूवन् - त्या झाल्या - यतः - ज्या देवतांपासून - अर्थाभिव्यञ्जनम् - शब्दस्पर्शादि विषयांचा अनुभव मिळतो ॥३०॥
तो अहंकार सात्त्विक, राजस आणि तामस असा तीन प्रकारचा आहे. म्हणून अहंतत्त्वामध्ये विकार उत्पन्न झाल्यावर सात्त्विक अहंकारापासून मन आणि ज्यामुळे विषयांचे ज्ञान होते, त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्या देवता उत्पन्न झाल्या. (३०)
तैजसानि इन्द्रियाण्येव ज्ञानकर्ममयानि च ।
तामसो भूतसूक्ष्मादिः यतः खं लिङ्गमात्मनः ॥ ३१ ॥
इंद्रिये सत्वते जात तमसातूनि शब्द ते । दृष्टांत बोध बोधाया त्यात आकाश जन्मले ॥ ३१ ॥
ज्ञानकर्ममयानि इन्द्रयाणि - पञ्च ज्ञानेन्द्रिये आणि पञ्च कर्मेन्द्रिये - तैजसानि एव - राजस अहंकारापासून उत्पन्न झालेलीच - सन्ति - होत - च - आणि - तामसाः - तामस अहंकार - भूतसूक्ष्मादिः - सूक्ष्मभूत जो शब्द त्याचे कारण आहे - यतः - ज्या शब्दापासून - आत्मनः - आत्म्याचे - लिङ्गम् - दर्शक चिन्ह असे - खम् - आकाश - भवति - होते ॥३१॥
राजस अहंकारापासून ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये निर्माण झाली. तामस अहंकारापासून सूक्ष्म भूतांचे कारण शब्दतन्मात्र निर्माण झाले आणि त्यापासून दृष्टांतरूपाने आत्म्याचा बोध करून देणारे आकाश निर्माण झाले. (३१)
कालमायांशयोगेन भगवद् वीक्षितं नभः ।
नभसोऽनुसृतं स्पर्शं विकुर्वन् निर्ममेऽनिलम् ॥ ३२ ॥
आकाश पाहता तेणे त्यात माया नि कालही । त्यातुनी स्पर्श तन्मात्रा वायू तो निर्मिला पुन्हा ॥ ३२ ॥
नभः - आकाश - कालमायांशयोगेन - काल, माया आणि चैतन्यांश यांच्या योगाने - भगवद्विक्षितम् - परमेश्वराच्या दृष्टीस पडले - नभसः अनुसृतम् - आकाशापासून उत्पन्न झालेल्या - स्पर्शम् - स्पर्शाला - विकुर्वत् - विकृत करून - अनिलम् निर्ममे - वायूला उत्पन्न करते झाले ॥३२॥
भगवंतांची दृष्टी जेव्हा आकाशावर पडली, तेव्हा आकाशापासून काल, माया आणि चिदाभासाच्या योगाने स्पर्शतन्मात्र निर्माण झाले आणि त्याच्या विकृत होण्याने वायूची उत्पत्ती झाली. (३२)
अनिलोऽपि विकुर्वाणो नभसोरुबलान्वितः ।
ससर्ज रूपतन्मात्रं ज्योतिर्लोकस्य लोचनम् ॥ ३३ ॥
बलवान् वायुने तेंव्हा आकाशासह माजुनी । रूपतन्मात्र संसारा प्रकाशा तेज निर्मिले ॥ ३३ ॥
उरुबलान्वितः - मोठ्या बलाने युक्त असा - नभसा - आकाशाने - सहितः - सहित असा - विकुर्वाणः - विकार पावणारा - वायुः अपि - वायू देखील - रूपतन्मात्रम् - तेजाच सूक्ष्मभूत रूप - च - आणि - लोकस्य लोचनम् - लोकांच्या दृष्टीला प्रकाश देणारे असे - ज्योतिः - तेज - ससर्ज - उत्पन्न करता झाला ॥३३॥
अत्यंत बलवान अशा वायूने आकाशासह विकृत होऊन ‘रूप-तन्मात्रा’ची रचना केली आणि त्यापासून विश्वाचे प्रकाशक असे तेज उत्पन्न झाले. (३३)
अनिलेन अन्वितं ज्योतिः विकुर्वत् परवीक्षितम् ।
आधत्ताम्भो रसमयं कालमायांशयोगतः ॥ ३४ ॥
वायुयुक्त अशा तेजे कालमाया चिदांशने । रस तन्मात्र कार्यार्थ जलासी निर्मिले तये ॥ ३४ ॥
अनिलेन अन्वितम् - वायूने युक्त असे - परवीक्षितम् - व ईश्वराने पाहिलेले - ज्योतिः - तेज - कालमायांशयोगतः - काल, माया व चैतन्यांश यांच्या योगाने - विकुर्वत् - विकार पावत असता - रसमयम् अम्भः - रसस्वरूप अशा उदकाला - आधत्त - उत्पन्न करते झाले ॥३४॥
पुन्हा परमात्म्याची दृष्टी पडल्यावर वायुयुक्त तेजाने काल, माया आणि चिदंशाच्या योगाने विकृत होऊन रस-तन्मात्र आणि या तत्त्वाचे कार्य जल निर्माण केले. (३४)
ज्योतिषाम्भोऽनुसंसृष्टं विकुर्वद् ब्रह्मवीक्षितम् ।
महीं गन्धगुणां आधात् कालमायांशयोगतः ॥ ३५ ॥
या सर्वा मिळु ब्रह्मे कटाक्षे पाहिले तदा । गंध गुणमयी पृथ्वी उत्पन्न जाहली असे ॥ ३५ ॥
ज्योतिषा अनुसंसृष्टम् - तेजाने युक्त असे - ब्रह्मवीक्षितम् - ईश्वराने पाहिलेले ते - अम्भः - पाणी - कालमायांशयोगतः - काल, माया व चैतन्यांश यांच्या योगाने - विकुर्वत् - विकार पावून - गन्धगुणाम् महीम् - गन्ध आहे गुण जिचा अशा पृथ्वीला - आघात् - उत्पन्न करते झाले ॥३५॥
नंतर परमात्म्याची तेजाने युक्त असलेल्या जलावर जेव्हा दृष्टी गेली, तेव्हा त्याने काल, माया आणि चिदंशाच्या योगाने गंधगुण असलेल्या पृथ्वीला उत्पन्न केले. (३५)
भूतानां नभआदीनां यद् यद् यद् भव्यावरावरम् ।
तेषां परानुसंसर्गाद् यथा सङ्ख्यं गुणान् विदुः ॥ ३६ ॥
आकाश आदि भूतांच्या मिश्रणाने पुढे पुढे । जे जे उत्पन्न झाले ते पूर्वानुगत मानिजे ॥ ३६ ॥
भव्य - हे श्रेष्ठ विदुरा - नभाअदिनाम् भूतानाम् - आकाश आदिकरून भूतांमध्ये - यत् यत् - जे जे - अवरावरम् - उत्तरोत्तर - अभूत् - उत्पन्न झाले - तेषाम् - त्यामध्ये - परानुसंसर्गात् - पूर्वी उत्पन्न झालेल्या भूतांचा उत्तरोत्तर संबंध असल्यामुळे - यथासंख्यम् - क्रमाने - गुणान् - गुणांना - विदुः - जाणतात ॥३६॥
विदुरा, या आकाशादी भूतांमध्ये जी भूते नंतर उत्पन्न झाली, त्यांच्यामध्ये क्रमाने आधीच्या भूतांचे गुण आहेत, असे समजले पाहिजे. (३६)
एते देवाः कला विष्णोः कालमायांशलिङ्गिनः ।
नानात्वात् स्वक्रियानीशाः प्रोचुः प्राञ्जलयो विभुम् ॥ ३७ ॥
आपुल्या क्रम कार्यात देवता श्रमल्या जधी । भगवान् प्रार्थिला त्यांनी दोन्ही हातास जोडुनी ॥ ३७ ॥
कालमायांशलिङ्गिनः - काल, माया आणि चैतन्यांश ज्याचे दर्शक चिन्ह म्हणजे रूपांतर, चांचल्य व चेतना ही ज्यास आहेत अशा - विष्णोः कलाः - विष्णूच्या कलारूप अशा - एते देवाः - ह्या महत्तत्त्वादिकांच्या अभिमानी देवता - नानात्वात् - भिन्न भिन्न असल्यामुळे - स्वक्रियानीशाः - स्वतःच्या सृष्टिरूप कार्याविषयी असमर्थ अशा - प्राञ्जलयः - हात जोडून - विभुम् - परमेश्वराला - प्रोचुः - म्हणाल्या ॥३७॥
हे महतत्त्वादिकांचे अभिमानी आणि विकार, विक्षेप आणि चेतना यांनी युक्त असणारे देव हे सर्व श्रीभगवंतांचेच अंश होते. परंतु वेगवेगळे राहिल्याने विश्वरचनेच्या कार्यात यशस्वी झाले नाहीत. तेव्हा ते हात जोडून भगवंतांस म्हणू लागले. (३७)
देवा ऊचुः -
नमाम ते देव पदारविन्दं प्रपन्नतापोपशमातपत्रम् । यन्मूलकेता यतयोऽञ्जसोरु संसारदुःखं बहिरुत्क्षिपन्ति ॥ ३८ ॥
देवता म्हणाल्या - ( इंद्रवज्रा ) देवा तुझ्या याच पदारविंदा नमून आम्ही शरणार्थ आलो । फेकूनि संसार दुःखास देती -- त्यांना तव एकची की ॥ ३८ ॥
देव - हे परमेश्वरा - प्रपन्नतापोपशमातपत्रम् - शरण आलेल्या लोकांच्या तापाला शमविणारे छत्रच अशा - ते - तुझ्या - पदारविन्दम् - पदकमलाला - नमाम - आम्ही नमन करितो. - यन्मूलकेताः - ज्या चरणकमलाचे तल आहे आश्रयस्थान ज्याचे असे - यतयः - योगी लोक - उरुसंसारदुःखम् - मोठ्या संसाररूपी दुःखाला - अञ्जसा - त्वरित - बहिः - बाहेर - उत्क्षिपन्ति - फेकतात ॥३८॥
देव म्हणाले - देवाधिदेव, आम्ही आपल्या चरणकमलांना वंदन करीत आहोत, जी आपल्याला शरण आलेल्या जीवांचे ताप दूर करण्यासाठी छत्राप्रमाणे आहेत. तसेच यांचा आश्रय घेतल्यानेच संन्यासी लोक या संसारातील अनंत दुःखांना सहजासहजी दूर फेकून देतात. (३८)
धातर्यदस्मिन् भव ईश जीवाः
तापत्रयेणाभिहता न शर्म । आत्मन्लभन्ते भगवंस्तवाङ्घ्रि च्छायां सविद्यामत आश्रयेम ॥ ३९ ॥
तापत्रयाने न मिळेच शांती जगत् पती रे जगदीश्वरा रे । म्हणूनि देवा तुज प्रार्थना ही आधार आम्हा तव ज्ञान छाया ॥ ३९ ॥
धातः - हे सृष्टिकर्त्या - भगवन् ईश - षड्गुणैश्वर्यसंपन्न परमेश्वरा - यत् - ज्या अर्थी - अस्मिन् भवे - ह्या संसारात - तापत्रयेण - दुःखत्रयाने - उपहताः - संतप्त झालेले - जीवाः - प्राणी - सुखं न लभन्ते - सुखाला प्राप्त होत नाहीत - अतः - यास्तव - आत्मन् - हे व्यापक परमेश्वरा - तव - तुझ्या - सविद्याम् - ज्ञानयुक्त अशा - अंघ्रिच्छायाम् - चरणच्छायेचा - आश्रयेम - आम्ही आश्रय करतो. ॥३९॥
हे जगत्कर्त्या जगदीश्वरा, या संसारात तापत्रयाने व्याकूळ झाल्याने जीवांना थोडीसुद्धा शांती मिळत नाही. म्हणून भगवंता, आम्ही आपल्या चरणांच्या ज्ञानमय छायेचा आश्रय घेत आहोत. (३९)
मार्गन्ति यत्ते मुखपद्मनीडै-
श्छन्दःसुपर्णैः ऋषयो विविक्ते । यस्याघमर्षोदसरिद्वरायाः पदं पदं तीर्थपदः प्रपन्नाः ॥ ४० ॥
एकांति जे जे ॠषि ते रहाती त्यांच्या मुखी वेदपक्षी रहाती । ते ध्याती ज्याला नि पवित्र गंगा निघे पदासी हरि तो नमी मी ॥ ४० ॥
यस्य - ज्या - तीर्थेपदः - पवित्र आहे चरणकमल ज्याचे अशा - ते - तुझ्या - अघमर्षोदसरिद्वरायाः पदम् - पापांचा नाश करणारे आहे उदक जिचे अशा नदीश्रेष्ठ भागीरथीचे उत्पत्ति स्थान अशा - यत् पदम् - ज्या चरणकमलाला - ऋषयः - ऋषि - मुखपद्मनीडैः - मुखकमल आहे घरटे ज्याचे अशा - छन्दःसुपर्णैः - वेदरूप पक्ष्यांनी - विविक्ते - एकांत स्थानी - मार्गन्ति - शोधितात - तत् - त्या पादकमलाला - वयम् - आम्ही - प्रपन्नाः - शरण आलेले आहोत ॥४०॥
मुनिजन एकांत स्थळी राहून आपल्या मुखकमलाचा आश्रय घेणार्या वेदमंत्ररूप पक्ष्यांच्या द्वारा ज्यांच्या अनुसंधानात रहातात आणि जे संपूर्ण पापांचा नाश करणार्या नद्यांतील श्रेष्ठ अशा श्रीगंगानदीचे उगमस्थान आहेत, त्या आपल्या परम पवित्र चरणकमलांचा आम्ही आश्रय घेत आहोत. (४०)
यत् श्रद्धया श्रुतवत्या च भक्त्या
सम्मृज्यमाने हृदयेऽवधाय । ज्ञानेन वैराग्यबलेन धीरा व्रजेम तत्तेऽङ्घ्रिसरोजपीठम् ॥ ४१ ॥
आम्ही असो त्या पदपद्मि नित्य श्रद्धेचि गाती हरिरूप संत । विशुद्ध अंतःकरणात ध्याता वैराग्य पुष्टे मग वीर होती ॥ ४१ ॥
श्रद्धया - श्रद्धेने - च - आणि - श्रुतवत्या भक्त्या - श्रवणयुक्त अशा भक्तीने - संमृज्यमाने हृदये - शुद्ध केले जाणार्या अन्तःकरणात - यत् - ज्या चरणकमलरूपी स्थानाला - अवधाय - स्थापित करून - वैराग्यबलेन ज्ञानेन - वैराग्य आहे बल ज्याचे अशा ज्ञानाने - धीराः भवन्ति - ज्ञानसंपन्न होतात - तत् - त्या - ते - तुझ्या - अङ्घ्रिसरोजपीठम् - चरणकमलरूपी स्थानाला - व्रजेम - आम्ही शरण आलो आहोत. ॥४१॥
तुमचे भक्तजन तुमच्या ज्या चरणकमलांना, श्रद्धा आणि श्रवण-कीर्तन रूप भक्ती करून, शुद्ध केलेल्या अंतःकरणात धारण करतात आणि वैराग्याने पुष्ट झालेल्या ज्ञानाने परम ज्ञानी होतात, त्या चरणकमल ठेवण्याच्या आसनाचा आम्ही आश्रय घेत आहोत. (४१)
विश्वस्य जन्मस्थितिसंयमार्थे
कृतावतारस्य पदाम्बुजं ते । व्रजेम सर्वे शरणं यदीश स्मृतं प्रयच्छत्यभयं स्वपुंसाम् ॥ ४२ ॥
ईशा तुम्ही निर्मिती नी स्थितीते संहारण्याही अवतार घेता । म्हणूनि आम्ही चरणास लीन भक्ता तुम्ही तो अभयोचि देता ॥ ४२ ॥
ईश - हे ईश्वरा - विश्वस्य जन्म स्थितिसंयमार्थे - जगाची उत्पत्ति, पालन आणि संहार ही करण्याकरिता - कृतावतारस्य ते - घेतला आहे अवतार ज्याने अशा तुझ्या - पदाम्बुजम् - चरणकमलाला - सर्वे - सर्व - वयम् - आम्ही - शरणं व्रजेम - शरण आलो आहोत - यत् स्मृतम् - जे चरणकमल स्मरण केले असता - स्वपुंसाम् - आपले स्मरण करणार्या पुरुषांना - अभयम् प्रयच्छति - निर्भय असे मोक्षस्थान देते. ॥४२॥
ईश्वरा, आपण संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार यासाठीच अवतार घेता. ज्या आपल्या चरणकमलांचे स्मरण करणार्या भक्तजनांना आपण अभय देता, त्या चरणकमलांना आम्ही सर्वजण शरण आलो आहोत. (४२)
यत्सानुबन्धेऽसति देहगेहे
ममाहं इति ऊढ दुराग्रहाणाम् । पुंसां सुदूरं वसतोऽपि पुर्यां भजेम तत्ते भगवन् पदाब्जम् ॥ ४३ ॥
जे देह गेहा मन अर्पिती नी अहं असोनीहि तयात होसी । परी तया पासुनि दूर तूची आम्ही तुझ्या या भजतो पदाला ॥ ४३ ॥
भगवन् - हे भगवन्ता - पुर्याम् - सर्व प्राण्यांच्या शरीरात - वसतः - रहाणार्या - अपि - देखील - ते - तुझे - यत् पदाब्जम् - जे पादकमल - असति - नाशवन्त अशा - सानुबन्धे - परिवारासहित अशा - देहगेहे - देहरूपी घरावर - अहम् मम - मी व माझा - इति - असा - ऊढदुराग्रहाणाम् - धारण केला आहे दुराग्रह ज्यांनी अशा - पुंसाम् - पुरुषांना - सुदूरम् - फार दूर - अस्ति - आहे - तत् - त्या पदकमलाला - भजेम - आम्ही भजतो ॥४३॥
हे भगवन, ज्या पुरुषांमध्ये देह, घर आणि त्याच्याशी संबंध ठेवणार्या इतर तुच्छ पदार्थांच्या बाबतीत अहंकार आणि ममतेचा दृढ दुराग्रह आहे, त्यांच्या शरीरात आपण अंतर्यामीरूपाने राहात असूनही त्यांच्यापासून पुष्कळ लांब आहेत, त्या आपल्या चरणांचे आम्ही भजन करतो. (४३)
तान् वै ह्यसद्वृत्तिभिरक्षिभिर्ये
पराहृतान्तर्मनसः परेश । अथो न पश्यन्ति उरुगाय नूनं ये ते पदन्यासविलासलक्ष्याः ॥ ४४ ॥
यशोधना जे विषयात लुप्त त्यांच्या मनाला नच कांहि थारा । खरे विलासी जरि संत थोर त्यांच्या पदाला नच सेवि लुप्त ॥ ४४ ॥
उरुगाय परेश - हे विशालकीर्ते परमेश्वरा - असद्वृत्तिभिः - बर्हिमुख झालेल्या - अक्षिभिः - इंद्रियांनी - ये पराहतान्तर्मनसः - ज्यांचे मन दूर ओढून नेले आहे ते - अथो - त्या कारणास्तव - ये - जे कोणी - ते पदन्यासविलासलक्ष्म्याः - तुझ्या चरणक्षेपरूपी क्रीडेच्या वैभवाचे - आश्रिताः सन्ति - आश्रित आहेत - तान् - त्या - वै नूनं - खरोखरच - न पश्यन्ति - पाहात नाहीत ॥४४॥
हे परमयशस्वी परमेश्वरा, इंद्रिये विषयांकडे ओढली गेल्याने ज्यांचे मन नेहमी बाहेर भटकत राहाते, ते पामर, तुमच्या विलासयुक्त पदन्यासाची शोभा जाणणार्या भक्तांचे दर्शन घेऊ शकत नाहीत (आणि म्हणूनच ते तुमच्या चरणकमलांपासून दूर राहातात.) (४४)
पानेन ते देव कथासुधायाः
प्रवृद्धभक्त्या विशदाशया ये । वैराग्यसारं प्रतिलभ्य बोधं यथाञ्जसान् वीयुरकुण्ठधिष्ण्यम् ॥ ४५ ॥
देवा तुझी भक्ति करून ज्यांचे विशुद्ध ते चित्त भरून आले । ते लोक वैराग्यचि सार ऐसे वैकुंठधामास निवास त्यांना ॥ ४५ ॥
देव - हे परमेश्वरा - ये - जे - ते - तुझ्या - कथासुधायाः - कथारूपी अमृताच्या - पानेन - पानाने - प्रवृद्धभक्त्या - वृद्धिंगत झालेल्या भक्तीने - विशदाशयाः - ज्याचे निर्मळ अन्तःकरण झाले आहे असे - भवन्ति - होतात - ते - ते - वैराग्यसारम् - वैराग्याचे सार अशा - बोधम् - ज्ञानाला - प्रतिलभ्य - मिळवून - यथा - ज्याप्रमाणे - अञ्जसा - त्वरेने - अकुण्ठधिष्ण्यम् - वैकुण्ठलोकाला - अन्वीयुः - जातात ॥४५॥
हे देवा, आपल्या कथामृताचे पान केल्याने उचंबळून आलेल्या भक्तीमुळे ज्यांचे अंतःकरण निर्मळ झाले आहे, तेच वैराग्य हेच ज्याचे सार आहे, असे आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन अनायासेच आपल्या वैकुंठधामाला जातात. (४५)
तथापरे चात्मसमाधियोग
बलेन जित्वा प्रकृतिं बलिष्ठाम् । त्वामेव धीराः पुरुषं विशन्ति तेषां श्रमः स्यान्न तु सेवया ते ॥ ४६ ॥
कोणी समाधी धरुनी,बलिष्ट जिंकोनि माया मग लीन होती । परी तयांना पडतात कष्ट भक्तीत नाही अणुमात्र कष्ट ॥ ४६ ॥
तथा - त्याप्रमाणे - अपरे धीराः - दुसरे ज्ञानी लोक - आत्मसमाधियोगबलेन - आत्म्याच्या ठिकाणी केलेल्या चित्तस्थैर्याच्या सामर्थ्याने - बलिष्ठां प्रकृतिम् - प्रबल अशा मायेला - जित्वा - जिंकून - पुरुषं त्वाम् एव - तू जो आदिपुरुष त्याच्याच ठिकाणी - विशन्ति - प्रवेश करतात - तेषां श्रमः स्यात् - त्यांना परिश्रम होतो - ते सेवया तु - तुझ्या सेवेने तर - न - श्रम होत नाही. ॥४६॥
दुसरे काही धीर पुरुष चित्ताचा निरोध करून समाधीच्या बळावर तुमच्या बलाढय मायेला जिंकून तुमच्यातच लीन होऊन जातात; पण त्यांना फार कष्ट पडतात. आपल्या भक्तिमार्गात मात्र काहीच कष्ट नाहीत. (४६)
तत्ते वयं लोकसिसृक्षयाद्य
त्वयानुसृष्टास्त्रिभिरात्मभिः स्म । सर्वे वियुक्ताः स्वविहारतन्त्रं न शक्नुमस्तत् प्रतिहर्तवे ते ॥ ४७ ॥
हे आदि देवा तुचि इच्छिले नी आम्ही जागाची रचनाहि केली । विभिन्न भावे करूनी तुला ना शरण्य होण्या कधिही समर्थ ॥ आम्ही स्वक्रीडे तुज तोषिण्याला रचूनि ब्रह्मांड असू निराळे । केले असे हे जरि ह्या स्वभावे अर्पावयाला नच की समर्थ ॥ ४७ ॥
तत् - त्यास्तव - आद्य - हे आदिपुरुषा - त्वया - तू - लोकसिसृक्षया - जगाच्या उत्पत्तीच्या इच्छेने - त्रिभिः आत्मभिः - सत्त्वादि तीन गुणांनी - अनुसृष्टाः - क्रमाने उत्पन्न केलेले - विभक्ताः - म्हणूनच विभक्त असे - ते सर्वे वयम् - ते सर्व आम्ही देव - तत् स्वविहारतन्त्रम् - त्या आपल्या क्रीडेला साधन अशा ब्रह्माण्डाचे - ते - तुला - प्रतिहर्तवे - समर्पण करण्याकरिता - न शक्नुमः - समर्थ होत नाही. ॥४७॥
हे आदिदेवा, सृष्टिरचनेच्या इच्छेने आपण आम्हांस त्रिगुणयुक्त केलेले असल्याने आम्ही भिन्न स्वभावाचे आहोत आणि म्हणूनच आम्ही आपापसात एक होऊ शकत नाही. म्हणून आपल्या क्रीडेचे साधन असणारे ब्रह्मांड रचून ते आपणास समर्पित करण्यास आम्ही असमर्थ आहोत. (४७)
यावद्बलिं तेऽज हराम काले
यथा वयं चान्नमदाम यत्र । यथोभयेषां त इमे हि लोका बलिं हरन्तोऽन्नमदन्त्यनूहाः ॥ ४८ ॥
ब्रह्मांड भोगार्थ तुलाचि अर्पू जेथे स्थिरोनी मग अन्न सेवू । बाधा हरोनी मग भोग जीव देवोत आम्हा नि तसे तुलाही ॥ ४८ ॥
अज - हे जन्मरहिता परमेश्वरा - वयम् - आम्ही - काले - योग्य वेळी - बलिम् - भोग - यावत् - संपूर्णपणे - ते - तुला - हराम - अर्पण करू - यथा - ज्याप्रकारे - वयम् - आम्ही - अन्नम् अदाम - अन्न भक्षण करू - च - आणि - यत्र - जेथे - स्थित्वा - राहून - ते इमे लोकाः - ते हे लोक - उभयेषां बलिं हरन्तः - तू आणि आम्ही अशा दोघांना भोग देऊन - अनूहाः- निर्विघ्न होत्साते - अन्नम् अदन्ति - अन्न भक्षण करतील - तां वृत्तिम् उपकल्पय - अशी योजना कर ॥४८॥
हे जन्म नसलेल्या ईश्वरा, ज्यामुळे आम्ही ब्रह्मांडाची रचना करून आपल्याला सर्व प्रकारचे भोग वेळेवर समर्पण करू शकू आणि जेथे स्थिर होऊन आम्हीसुद्धा प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अन्न ग्रहण करू शकू, तसेच हे सर्व जीव सर्व प्रकारच्या विघ्नांपासून दूर राहून तुमच्यासह आम्हांला भोग अर्पण करून आपापले अन्न भक्षण करू शकतील असा उपाय करा. (४८)
त्वं नः सुराणामसि सान्वयानां
कूटस्थ आद्यः पुरुषः पुराणः । त्वं देव शक्त्यां गुणकर्मयोनौ रेतस्त्वजायां कविमादधेऽजः ॥ ४९ ॥
तू निर्विकारी नि पुराण ऐसा तूं कार्यवर्गासहि आदि होसी । तू तेज शक्ती निज अर्पिशी त्यां nbsp; मायेस जी कर्म करोनि राही ॥ ४९ ॥
त्वम् - तू - सान्वयानाम् सुराणाम् - कार्यासहित अशा आम्हा देवांचा - आद्यः कूटस्थः पुराणः पुरुषः असि - आदिकारण असा निर्विकार पुरातन पुरुष आहेस - देव - हे देवा - त्वम् - तू - अजः - जन्मरहित होत्साता - अजायाम् - अनादि अशा - गुणकर्मयोनौ - सत्त्वादि गुणांना आणि जन्मादि कर्मांना कारणीभूत अशा - शक्त्याम् - मायेत - तु - तर - कविम् - सर्वज्ञ अशा महत्तत्त्वरूपी - रेतः - वीर्य - आदधे - स्थापन केले ॥४९॥
कार्यरूप सृष्टी आणि आम्ही देवता यांचे आपण निर्विकार पुराणपुरुषच आदिकारण आहात. कारण हे देवा, प्रथम अजन्मा अशा आपणच सत्त्वादी गुण आणि जन्मादी कर्मांच्या कारणरूप अशा मायाशक्तीत आपले चिदाभासरूप वीर्य स्थापन केले होते. (४९)
ततो वयं मत्प्रमुखा यदर्थे
बभूविमात्मन् करवाम किं ते । त्वं नः स्वचक्षुः परिदेहि शक्त्या देव क्रियार्थे यद् अनुग्रहाणाम् ॥ ५० ॥
आम्ही महत्तत्व असोत देव कार्यार्थ ज्या जन्म मिळे अम्हाला । तुम्ही तयाचा उपदेश द्यावा nbsp; आम्हा क्रियाशक्तिनि ज्ञान द्यावे ॥ ५० ॥
आत्मन् - हे सर्व व्यापका - ततः - यास्तव - सत्प्रमुखाः - सत्त्वगुण ज्यामध्ये प्रधान आहे असे - वयम् - आम्ही - यदर्थे - ज्यांच्याकरिता - बभूविम - उत्पन्न झालो - तत् - ते - ते - तुझे - किम् - कोणते कार्य - करवाम - करू - देव - हे देवा - क्रियार्थे - सृष्टिरूप कार्याकरिता - त्वम् - तू - यदनुग्रहाणाम् नः - ज्या तुझ्यापासून आहे अनुग्रह ज्यांना अशा आम्हाला - स्वचक्षुः - आपले ज्ञान - शक्त्या - क्रियाशक्तीसह - परिदेही - अर्पण कर ॥५०॥
हे परमात्म्या, महत्तत्त्व इत्यादी रूपांनी युक्त असे आम्ही देवगण, ज्या कार्यासाठी उत्पन्न झालो आहोत, त्या संबंधी आम्ही काय करावे ? देवा ! आपणच आमच्यावर अनुग्रह करणारे आहात. म्हणून ब्रह्मांडाच्या रचनेसाठी आपण आम्हांला क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती प्रदान करावी. (५०)
स्कंध तिसरा - अध्याय पाचवा समाप्त |