श्रीमद् भागवत पुराण
तृतीयः स्कन्धः
चतुर्थोऽध्यायः

यदुवंशसंहार कथनम्, स्वपदारोहणात् प्राग् उद्धवाय उपदिष्टस्य
ज्ञानस्योपलब्धये विदुरस्य मैत्रेयसन्निधौ गमनम् -

उद्धवाचा निरोप घेऊन विदुराचे मैत्रेय ऋषींकडे प्रयाण -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


उद्धव उवाच ।
(अनुष्टुप्) अथ ते तदनुज्ञाता भुक्त्वा पीत्वा च वारुणीम् ।
तया विभ्रंशितज्ञाना दुरुक्तैर्मर्म पस्पृशुः ॥ १ ॥
उद्धवजी म्हणाले -
( अनुष्टुप् )
द्विजांची घेउनी आज्ञा यादवे अन्न सेविता ।
पिले ते वारूणी सर्व तयाने ज्ञान नष्टले ॥
अर्वाच्य शब्द काढोनी आपसी हीन बोलले ॥ १ ॥

अथ - नंतर - तदनुज्ञाताः - त्यांनी आज्ञा दिलेले - ते - ते यादव - भुक्त्वा - भोजन करून - च - आणि - वारूणीं - वारुणीनामक मद्याला - पीत्वा - पिऊन - तया - त्या मद्याने - विभ्रंशितज्ञानाः - ज्ञानभ्रष्ट असे - दुरुक्‍तैः - दुर्भाषणांनी - मर्म - मर्माला - पस्पृशुः - टोचिते झाले ॥१॥
उद्धव म्हणाला - नंतर ब्राह्मणांची परवानगी घेऊन यादवांनी भोजन केले आणि मग वारुणी नावाचे मद्य ते प्याले. त्यामुळे त्यांचा विवेक नष्ट झाला आणि लागट बोलून ते एकमेकांच्या मर्मावर आघात करू लागले. (१)


तेषां मैरेयदोषेण विषमीकृतचेतसाम् ।
निम्लोचति रवावासीत् वेणूनामिव मर्दनम् ॥ २ ॥
घासुनी पेटती वेळू तसे ते मारु लागले ।
दारुने नष्टली बुद्धी सूर्यास्त जाहला तदा ॥ २ ॥

मैरेयदोषेण - मद्यदोषाने - विषमीकृतचेतसां - क्षुब्ध झाली आहेत अन्तःकरणे ज्यांची अशा - तेषां - त्या यादवांमध्ये - वेणूनां - वेळूंच्या - मर्दनम् इव - घर्षणाप्रमाणे - रवौ - सूर्य - निम्लोचति - अस्ताला गेला असता - मर्दनं - मारामारी - आसीत् - झाली ॥२॥
मदिरेच्या नशेने त्यांची बुद्धी बिघडली आणि ज्याप्रमाणे वेळू एकमेकांवर घासल्याने त्यांना आग लागते, त्याप्रमाणे सूर्यास्तापर्यंत ते मारामारी करू लागले. (२)


भगवान् स्वात्ममायाया गतिं तां अवलोक्य सः ।
सरस्वतीं उपस्पृश्य वृक्षमूलमुपाविशत् ॥ ३ ॥
आपुली गति मायेची पाहोनी भगवान् तदा ।
आचम्य करुनी तीर्थी वृक्षाच्या तळि बैसले ॥ ३ ॥

सः - तो - भगवान् - श्रीकृष्ण - स्वात्ममायायाः - आपल्या मायेच्या - तां - त्या - गतिं - गतीला - अवलोक्य - पाहून - सरस्वतीं - सरस्वतीच्या उदकाने - उपस्पृश्य - आचमन करून - वृक्षमूलं - झाडांच्या बुंध्याशी - उपाविशत् - बसता झाला. ॥३॥
आपल्या मायेचा तो परिणाम पाहून भगवंत सरस्वती नदीच्या पाण्याने आचमन करून एका झाडाखाली बसले. (३)


अहं चोक्तो भगवता प्रपन्नार्तिहरेण ह ।
बदरीं त्वं प्रयाहीति स्वकुलं सञ्जिहीर्षुणा ॥ ४ ॥
कुळाचा नाश जाणोनी तत्पूर्वी भगवान् मला ।
बद्रिकाश्रमि जाण्याला आज्ञा करुनि बोलले ॥ ४ ॥

स्वकुलं - आपल्या कुळाला - संजिहीर्षुणा - हरण करण्याची इच्छा करणार्‍या - च - आणि - प्रपन्नार्तिहरेण - शरणागतांच्या पीडा दूर करणार्‍या - भगवता - श्रीकृष्णाने - अहं - मी - त्वं - तू - बदरीं - बदरिकाश्रमाला - प्रयाहि - जा - इति - असे - ह - खरोखर - उक्‍तः - बोलला गेलो ॥४॥
शरणागतांचे दुःख दूर करणार्‍या भगवंतांनी आपल्या कुलाचा संहार करावा, असे ठरविले होते. म्हणून त्यांनी मला बदरिकाश्रमास जावयास सांगितले. (४)


अथापि तदभिप्रेतं जानन् अहं अरिन्दम ।
पृष्ठतोऽन्वगमं भर्तुः पादविश्लेषणाक्षमः ॥ ५ ॥
जरी मी जाणिले सर्व तरी सोडी न मी पदा ।
येवोनी माग-मागेच प्रभासक्षेत्री पातलो ॥ ५ ॥

अरिन्दम - हे शत्रुनाशका विदुरा - अथ - नंतर - अहं - मी - तदभिप्रेतं - त्याच्या अभिप्रायाला - जानन् अपि - जाणून सुद्धा - पादविश्‍लेषणाक्षमः - पायाच्या वियोगाला सहन न करणारा असा होत्साता - भर्तुः - श्रीकृष्णाच्या - पृष्ठतः - मागोमाग - अन्वगमम् - चालू लागलो ॥५॥
विदुरा, त्यांच्या या म्हणण्याचा आशय जरी मला समजला होता, तरीसुद्धा स्वामीचरणांचा वियोग सहन न होऊ शकल्याने मी त्यांच्या पाठोपाठ प्रभासक्षेत्राला गेलो. (५)


अद्राक्षमेकमासीनं विचिन्वन् दयितं पतिम् ।
श्रीनिकेतं सरस्वत्यां कृतकेतमकेतनम् ॥ ६ ॥
तेंव्हा मी पाहिले त्याते जगाचा आश्रयो यया ।
नाही आश्रय कोणाचा, प्रभू प्रियतमो असा ॥
सरस्वती तटीं बैसे एकटा श्यामसुंदर ॥ ६ ॥

दयितं - प्रिय - पतिं - स्वामीला - विचिन्वन् - शोधणारा मी - सरस्वत्यां - सरस्वतीच्या काठी - कृतकेतं - स्थानस्थित झालेल्या - अकेतनम् - वस्तुतः ज्याला गृह म्हणजे एक निश्चित स्थान नाही अशा - श्रीनिकेतं - लक्ष्मीचे निवासस्थान अशा - एकं - एकट्या - आसीनं - बसलेल्या - कृष्णं - श्रीकृष्णाला - अद्राक्षम् - पाहता झालो ॥६॥
तेथे मी पाहिले की, जे सर्वांचे आश्रयस्थान आहेत, परंतु ज्यांना कोणाचाही आश्रय नाही, ते माझे प्रियतम परमसुंदर प्रभू सरस्वती नदीच्या तीरावर एकटेच बसले आहेत. (६)


श्यामावदातं विरजं प्रशान्तारुणलोचनम् ।
दोर्भिश्चतुर्भिः विदितं पीतकौशाम्बरेण च ॥ ७ ॥
दिव्य विशुद्ध सत्वाचा अत्यंत श्यामसुंदर ।
शांत दॄष्टी रतनारी चौभुजा रेशमांबर ॥
पाहता दूर मी त्याला जाणिले कृष्ण स्वामि हा ॥ ७ ॥

श्यामावदातं - श्यामसुंदर - विरजं - शुद्ध सत्त्वगुणी - प्रशान्तारुणलोचनम् - शान्त व आरक्‍त वर्णाचे डोळे आहेत ज्याचे अशा - चतुर्भिः - चार - दोर्भिः - हातांनी - च - आणि - पीतकौशाम्बरेण - पिवळ्या रेशमी वस्त्राने - विदितं - ओळखता येणार्‍या - श्रीकृष्णम् अद्राक्षम् - श्रीकृष्णाला पाहता झालो ॥७॥
दिव्य, अत्यंत विशुद्ध सत्त्वमय असे सुंदर श्यामवर्ण शरीर, शांत भाव असलेले तेजस्वी डोळे, चार हात आणि रेशमी पीतांबर हे पाहूनच मी त्यांना ओळखले. (७)


वाम ऊरौ अवधिश्रित्य दक्षिणाङ्‌घ्रिसरोरुहम् ।
अपाश्रितार्भकाश्वत्थं अकृशं त्यक्तपिप्पलम् ॥ ८ ॥
लहान पिंपळा खाली डाव्या मांडीवरी दुजा ।
चरणा ठेउनी बैसे उपवासी प्रफुल्लित ॥ ८ ॥

वामे - डाव्या - ऊरौ - मांडीवर - दक्षिणाङ्‌घ्रिसरोरुहं - उजव्या चरणकमलाला - अधिश्रित्य - ठेवून - अपाश्रितार्भकाश्वत्थं - लहान पिंपळाच्या झाडाला टेकून बसलेल्या - त्यक्‍तपिप्पलं - टाकली आहे विषयभोगेच्छा ज्याने अशा - अकृशं - आणि पुष्ट अशा - श्रीकृष्णम् अद्राक्षम् - श्रीकृष्णाला पाहता झालो ॥८॥
ते एका छोटयाशा पिंपळाला टेकून डाव्या मांडीवर उजवे चरणकमल ठेवून बसले होते. खाण्या-पिण्याचा त्याग करूनदेखील ते अतिशय आनंदी दिसत होते. (८)


तस्मिन् महाभागवतो द्वैपायनसुहृत्सखा ।
लोकान् अनुचरन् सिद्ध आससाद यदृच्छया ॥ ९ ॥
परम् भागवतो सिद्ध स्वच्छंदे फिरता पहा ।
व्यासांचे प्रिय मैत्रेय त्या क्षणी तेथ पातले ॥ ९ ॥

तस्मिन् - त्या वेळी - महाभागवतः - मोठा भगवद्भक्‍त - द्वैपायनसुहृत्सखा - व्यासांचा अत्यंत मित्र - सिद्धः - योगसिद्ध - मैत्रेयः - मैत्रेय मुनि - लोकान् - लोकांमध्ये - अनुचरन् - भ्रमण करणारा होत्साता - यदृच्छया - सहजगत्या - आससाद - तेथे प्राप्त झाला ॥९॥
त्याच वेळी व्यासांचे प्रिय मित्र, परम भागवत, सिद्ध-पुरुष, मैत्रेय ऋषी आनंदाने विहार करीत योगायोगाने तेथे येऊन पोहोचले. (९)


तस्यानुरक्तस्य मुनेर्मुकुन्दः
     प्रमोदभावानतकन्धरस्य ।
आश्रृण्वतो मां अनुरागहास
     समीक्षया विश्रमयन् उवाच ॥ १० ॥
( इंद्रवज्रा )
मैत्रेय भक्ती अन प्रेमभावे
    कृष्णापुढे मान झुकून राहि ।
तेंव्हा तिथे श्री हरि प्रेम भावे
    हासोनि बोले मज मोद युक्त ॥ १० ॥

अनुरक्‍तस्य - प्रेम करणारा - प्रमोदभावानतकन्धरस्य - व आनंदातिरेकाने नम्र केली आहे मान ज्याने असा - तस्य मुनेः आशृण्वतः - तो ऋषि ऐकत असता - मुकुन्दः - श्रीकृष्ण - अनुरागहाससमीक्षया - प्रेमपूर्वक मंद हास्याने अवलोकन करून - विश्रमयन् - माझे सर्व श्रम नष्ट करणारा होत्साता - मां - मला - उवाच - बोलला ॥१०॥
मैत्रेय मुनी भगवंतांचे प्रेमी भक्त आहेत. आनंद आणि भक्तिभावामुळे ते सदैव विनम्र असतात. त्यांच्या देखतच प्रेम आणि सुहास्य वदनाने माझ्याकडे पाहून मला आनंदित करीत श्रीहरी म्हणाले. (१०)


श्रीभगवानुवाच -
वेदाहमन्तर्मनसीप्सितं ते
     ददामि यत्तद् दुरवापमन्यैः ।
सत्रे पुरा विश्वसृजां वसूनां
     मत्सिद्धिकामेन वसो त्वयेष्टः ॥ ११ ॥
श्री भगवान म्हणाले-
मी जाणितो आस मनातली ती
    देतो तुम्हा साधन दुर्लभो ते ।
तू पूर्व जन्मी वसु तो असोनी
    यज्ञी स्तवीले मज दर्शनाते ॥ ११ ॥

अन्तः - हृदयात राहणारा - अहं - मी - ते - तुझ्या - मनसि - मनातील - ईप्सितं - इच्छेला - वेद - जाणतो - यत् - जे - अन्यैः - दुसर्‍यांनी - दुरवापं - मिळविण्यास कठीण - तत् - ते - ते - तुला - ददामि - देतो - च - आणि - वसो - वसूचा अवतार अशा हे उद्धवा - पुरा - पूर्वी - विश्वसृजां - जगदुत्पत्ति करणार्‍या - वसूनां - वसूंच्या - सत्रे - यज्ञात - मत्सिद्धिकामेन - माझ्या सिद्धीची इच्छा करणार्‍या - त्वया - तुझ्याकडून - अहं - मी - इष्टः - पूजिला गेलो ॥११॥
श्रीभगवान म्हणाले - मी तुझे मनोगत जाणतो. म्हणूनच दुसर्‍या कोणालाही अत्यंत दुर्लभ असलेले असे साधन मी तुला सांगतो. उद्धवा, मागील जन्मी तू वसू होतास. विश्वाची रचना करणार्‍या प्रजापती आणि वसू यांनी केलेल्या यज्ञात माझ्या प्राप्तीच्या इच्छेनेच तू माझी आराधना केली होतीस. (११)


स एष साधो चरमो भवानां
     आसादितस्ते मदनुग्रहो यत् ।
यन्मां नृलोकान् रह उत्सृजन्तं
     दिष्ट्या ददृश्वान् विशदानुवृत्त्या ॥ १२ ॥
साधू स्वभावा तुज हाचि जन्म
    अखेरचा, मी तुज बोध केला ।
या मृत्यु लोकास त्यजोनि जाणे
    नी चिंतितो मी निजधामि जाणे ।
एकांत ऐशा समयास तू तो
    भाग्यचि आला मम दर्शनाला ।
अनन्य भक्ती तुज कारणे हा
    आला असे योग अचिंत्य ऐसा ॥ १२ ॥

साधो - हे सत्पुरुषा उद्धवा - सः - तो - एषः - हा - ते - तुझ्या - भवानां - जन्मांपैकी - चरमः - शेवटला - भावः - जन्म - यत् - कारण - ते - तुझ्याकडून - मदनुग्रहः - माझी कृपा - आसादितः - संपादित केली गेली आहे. - यत् - ज्या हेतूस्तव - नृलोकान् - मनुष्य लोकाला - उत्सृजन्तं - सोडणार्‍या - मां - मला - विशदानुवृत्त्या - एकनिष्ठ निर्मळ भक्‍तीने - रहः - एकांतात - दिष्ट्या - सुदैवाने - ददृश्वान् - पहाता झालास ॥१२॥
हे उद्धवा, या जगात तुझा हा जन्म शेवटचाच आहे. कारण या जन्मात तू माझा अनुग्रह प्राप्त करून घेतला आहेस. हा मर्त्यलोक सोडून मी आता माझ्या धामाकडे जाऊ इच्छितो. तुझ्या अनन्य भक्तीमुळेच यावेळी अशा एकांतात तुला माझे दर्शन झाले, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. (१२)


पुरा मया प्रोक्तमजाय नाभ्ये
     पद्मे निषण्णाय ममादिसर्गे ।
ज्ञानं परं मन्महिमावभासं
     यत्सूरयो भागवतं वदन्ति ॥ १३ ॥
त्या पद्मकल्पा सुरुवात होता
    नाभीस पद्मात निवांत ब्रह्मा ।
होता,तया ज्ञान सुबोध केले
    त्याची तुम्हा भागवतास देतो ॥ १३ ॥

पुरा - पूर्वी - आदिसर्गे - सृष्ट्युत्पत्तीच्या आरंभी - मया - माझ्याकडून - मम - माझ्या - नाभ्ये - नाभीपासून उत्पन्न झालेल्या - पद्मे - कमळावर - निषण्णाय - बसलेल्या - अजाय - ब्रह्मदेवाला - मन्महिमावभासं - माझ्या माहात्म्याला दर्शविणारे - परं - श्रेष्ठ - ज्ञानं - ज्ञान - प्रोक्‍तं - सांगितले गेले - सूरयः - विद्वान् - यत् - ज्याला - भागवतं - भागवत असे - वदन्ति - म्हणतात. ॥१३॥
पूर्वी पाद्मकल्पाच्या प्रारंभी मी आपल्या नाभि-कमलावर बसलेल्या ब्रह्मदेवाला माझा महिमा प्रगट करणार्‍या ज्या श्रेष्ठ ज्ञानाचा उपदेश केला होता आणि ज्याला विवेकी लोक भागवत म्हणतात, तेच ज्ञान मी तुला देतो. (१३)


इत्यादृतोक्तः परमस्य पुंसः
     प्रतिक्षणानुग्रहभाजनोऽहम् ।
स्नेहोत्थरोमा स्खलिताक्षरस्तं
     मुञ्चञ्छुचः प्राञ्जलिराबभाषे ॥ १४ ॥
माझ्यावरी त्या पुरुषोत्तमाने
    वृष्टी कृपेची नित वर्षियेली ।
रोमांच माझ्या उठले शरीरी
    नेत्रात अश्रुहि गळोनि आले ।
हातास जोडोनि नमी तया मी
    विनम्र भावे वदलो तयाला ॥ १४ ॥

परमस्य - श्रेष्ठ - पुंसः - परमेश्वराच्या - प्रतीक्षणानुग्रहभाजनः - अवलोकनपूर्वक कृपादृष्टीला योग्य - इति - अशा रीतीने - आदृतोक्‍तः - आदराने बोललेला - अहं - मी - स्नेहोत्थरोमा - प्रेमामुळे रोमांच उठलेला - स्खलिताक्षरः - अडखळत शब्दोच्चार करणारा - शुचः - अश्रु - मुञ्चन् - सोडणारा - प्राञ्जलिः - हात जोडून - तं - त्या श्रीकृष्णाला - आबभाषे - बोललो ॥१४॥
विदुरा, माझ्यावर प्रत्येक क्षणी त्या परमपुरुषाच्या कृपेचा वर्षाव होत होता. जेव्हा ते असे आदरपूर्वक म्हणाले, तेव्हा स्नेहभावाने माझे अंग रोमांचित झाले, वाणी सद्‌गदित झाली आणि डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. मी हात जोडून त्यांना म्हणालो, (१४)


को न्वीश ते पादसरोजभाजां
     सुदुर्लभोऽर्थेषु चतुर्ष्वपीह ।
तथापि नाहं प्रवृणोमि भूमन्
     भवत्पदाम्भोज निषेवणोत्सुकः ॥ १५ ॥
स्वामी ! पदासी पुरुषार्थ चारी
    हो प्राप्त ते तो मजला नको की ।
माझ्या मनाला तव पाद सेवा
    अशीच लाभो बहु लालसा ही ॥ १५ ॥

ईश - हे श्रीकृष्णा - ते - तुझ्या - पादसरोजभाजां - चरणकमलांना सेवणार्‍या पुरुषास - इह - ह्या जगात - चतुर्षु - चार - अपि - हि - अर्थेषु - पुरुषार्थांपैकी - कः - कोणता - नु - बरे - सुदुर्लभः - मिळण्यास अत्यंत कठीण असा आहे - तथापि - तरी सुद्धा - अहं - मी - न प्रवृणोमि - त्याची याचना करीत नाही - भूमन् - ब्रह्मस्वरूपी हे श्रीकृष्णा - भवत्पदाम्भोजनिषेवणोत्सुकः - आपल्या चरणकमळाला सेवण्यास उत्कंठित असा - अस्मि - आहे ॥१५॥
स्वामी आपल्या चरणकमलांची सेवा करणार्‍या पुरुषांना या जगात अर्थ, धर्म, काम, मोक्ष या चारांपैकी काहीच दुर्लभ नाही. तथापि हे प्रभो, मला त्यांपैकी कशाचीच इच्छा नाही. मी तर केवळ आपल्या चरणकमलांच्या सेवेसाठीच आसुसलेला आहे. (१५)


कर्माण्यनीहस्य भवोऽभवस्य
     ते दुर्गाश्रयोऽथारिभयात्पलायनम् ।
कालात्मनो यत्प्रमदायुताश्रयः
     स्वात्मन् रतेः खिद्यति धीर्विदामिह ॥ १६ ॥
निःस्पृह तू तो करितोस कर्म
    तो जन्म नाही परि जन्म घेसी ।
तू काळरूपी असुनी भितोस
    शत्रूभितीने लपतोस हो ना? ।
स्वात्मा असोनी करितोस लीला
    सोळा सहस्त्रा ललनास भोगी ।
चरित्र सारेचि विचित्र ऐसे
    पाहोनि ज्ञानी भ्रमती मनात ॥ १६ ॥

अनीहस्य - निरिच्छ अशा - ते - तुझी - कर्माणि - कर्मे - अभवस्य - जन्मरहित अशा तुझा - भवः - जन्म - कालात्मनः - कालस्वरूपी तुझा - अरिभयात् - शत्रूच्या भीतीने - दुर्गाश्रयः - किल्ल्याचा आश्रय - अथ - आणि - पलायनं - पळून जाणे - स्वात्मन्नतेः - स्वतःच्या ठिकाणी रममाण होणार्‍या तुझा - यत् - जो काही - प्रमदायुताश्रयः - सहस्त्रावधि तरुण स्त्रियांशी झालेला संबंध - इह - येथे - विदां - ज्ञान्यांची - धीः - बुद्धि - खिद्यति - खेद पावते ॥१६॥
हे प्रभो, आपण निःस्पृह असूनही कर्म करता. अजन्मा असून जन्म घेता. स्वतः कालरूप असूनही शत्रूच्या भीतीने पळून जाऊन द्वारकेच्या किल्ल्यात लपून बसता आणि स्वात्माराम असूनही सोळा हजार स्त्रियांसमवेत रममाण होता. असे हे विचित्र चरित्र पाहून विद्वानांची बुद्धीसुद्धा संभ्रमात पडते. (१६)


मन्त्रेषु मां वा उपहूय यत्त्वं
     अकुण्ठिताखण्डसदात्मबोधः ।
पृच्छेः प्रभो मुग्ध इवाप्रमत्तः
     तन्नो मनो मोहयतीव देव ॥ १७ ॥
देवा तुझे ज्ञान अखंड ऐसे
    माझी परी संमति घेत होती ।
प्रभो तुझी ही सगळीच लीला
    माझ्या मनाला नित मोहवीते ॥ १७ ॥

वा - किंवा - प्रभो - समर्था - देव - - श्रीकृष्णा ! - अकुण्ठिताखण्डसदात्मबोधः - न अडखळणारा व नेहमी चालणारा आहे श्रेष्ठ आत्मज्ञाविषयक ओघ ज्याचा असा - त्वं - तू - मंत्रेषु - मसलत घेण्याच्या बाबतीत - मां - मला - उपहूय - बोलावून - मुग्धः इव - अज्ञान्याप्रमाणे - अप्रमत्तः - फारच सावधगिरीने विचारणारा - यत् - जे - पृच्छेः - विचारीत होतास - तत् - ते - नः - आमच्या - मनः - मनाला - मोहयति इव - जणू मोह उत्पन्न करिते. ॥१७॥
देवा, आपल्याला आपल्या स्वरूपाचे ज्ञान सर्वथैव अबाधित आणि अखंड आहे. असे असूनही सल्ला घेण्यासाठी मला बोलावून भोळ्या-भाबडया मनुष्याप्रमाणे आपण लक्षपूर्वक मला प्रश्न विचारता. प्रभो ! आपली ती लीला माझ्या मनाला संभ्रमित करते. (१७)


ज्ञानं परं स्वात्मरहःप्रकाशं
     प्रोवाच कस्मै भगवान् समग्रम् ।
अपि क्षमं नो ग्रहणाय भर्तः
     वदाञ्जसा यद् वृजिनं तरेम ॥ १८ ॥
ते गूढ रूपो तव जाणण्याला
    ब्रह्म्यास तू जे दिधलेस दान ।
मी पात्र जैसा मज तेच देई
    ज्याने भवाचे भय ते निवारे ॥ १८ ॥

भर्तः - हे स्वामी श्रीकृष्णा ! - भगवान् - भगवंत असे आपण - कस्मै - ब्रह्मदेवाला - स्वात्मरहःप्रकाशं - स्वतःच्या आत्मज्ञानरूपी रहस्याला दाखविणार्‍या - परं - श्रेष्ठ - समग्रं - संपूर्ण - ज्ञानं - ज्ञानाला - प्रोवाच - सांगते झाले - तत् - ते - नः - आम्हाला - अपि - सुद्धा - ग्रहणाय - घेता येण्यास - क्षमं - शक्य असेल - तर्हि - तर - वद - सांगा - यत् - ज्यामुळे - अञ्जसा - तत्काळ - वृजिनं - पापाला - तरेम - उल्लंघून जाऊ ॥१८॥
अहो स्वामी, आपल्या स्वरूपाचे गूढ रहस्य प्रगट करणारे जे श्रेष्ठ आणि समग्र ज्ञान आपण ब्रह्मदेवाला सांगितले, ते समजण्यास मी योग्य असेन, तर मला सांगावे. त्यायोगे मी या संसारदुःखातून सहज पार होईन. (१८)


(अनुष्टुप्) इत्यावेदितहार्दाय मह्यं स भगवान् परः ।
आदिदेश अरविन्दाक्ष आत्मनः परमां स्थितिम् ॥ १९ ॥
( अनुष्टुप् )
जेंव्हा मी त्यास हा माझा हॄदींचा भाव बोलिला ।
तेंव्हा त्या कमळाक्षाने रूपाची स्थिती बोधिली ॥ १९ ॥

इति - याप्रमाणे - आवेदितहार्दाय - प्रगट केला आहे स्वाभिप्राय ज्याने अशा - मह्यं - मला - सः - तो - अरविन्दाक्षः - कमळाप्रमाणे नेत्र असणारा - परः - परमपुरुष - भगवान् - श्रीकृष्ण - आत्मनः - आत्म्याच्या - परमां - श्रेष्ठ अशा - स्थितिं - स्वरूपाला - आदिदेश - उपदेशिता झाला. ॥१९॥
माझ्या हृदयातील भाव याप्रमाणे मी जेव्हा निवेदन केला, तेव्हा परमपुरुष कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी मला आपल्या परम स्थितीचा उपदेश केला. (१९)


स एवं आराधितपादतीर्थाद्
     अधीततत्त्वात्मविबोधमार्गः ।
प्रणम्य पादौ परिवृत्य देवं
     इहागतोऽहं विरहातुरात्मा ॥ २० ॥
(अनुष्टुप्) सोऽहं तद्दर्शनाह्लाद वियोगार्तियुतः प्रभो ।
गमिष्ये दयितं तस्य बदर्याश्रममण्डलम् ॥ २१ ॥
( इंद्रवज्रा )
त्यां एकाआकाराध्यचि पादतीर्थे
    दिले मला तत्व स्वरूप ज्ञान ।
वंदूनि त्याच्या चरणा इथे मी
    आलो परी हा विरही नि दुःखी ॥ २० ॥

सः - तो - अहं - मी - एवं - याप्रमाणे - आराधितपादतीर्थात् - ज्याचे पवित्र पाय आम्ही आराधिले आहेत अशा श्रीकृष्णापासून - अधीततत्त्वात्मविबोधमार्गः - शिकलेला आहे तात्त्विक असा आत्मज्ञानाचा मार्ग ज्याने असा - अहं - मी - परिवृत्य - प्रदक्षिणा करून - विरहातुरात्मा - वियोगाने ज्याचे अन्तकरण व्याकुळ झाले आहे असा - इह - येथे - आगतः - आलो आहे. ॥२०॥
अशा प्रकारे पूज्यपाद गुरु श्रीकृष्णांकडून आत्मतत्त्व समजावून घेण्याचे साधन ऐकून आणि प्रभूच्या चरणांना वंदन करून तसेच त्यांना प्रदक्षिणा घालून मी येथे आलो आहे. यावेळी त्यांच्या विरहाने माझे चित्त अत्यंत व्याकूळ झाले आहे. (२०)


यत्र नारायणो देवो नरश्च भगवान् ऋषिः ।
मृदु तीव्रं तपो दीर्घं तेपाते लोकभावनौ ॥ २२ ॥
( अनुष्टुप् )
प्रभो ! मी दर्शने त्याच्या आनंदे भरलो खरा ।
परंतु विरहे त्याच्या दुःखासी मन ना सहे ॥ २१ ॥
नर-नारायणे जेथे मांडिले दीर्घ ते तप ।
त्यांचाही बोध घेण्याला निघालो बद्रिकेश्वरी ॥ २२ ॥

तद्यर्शनाह्लादवियोगार्तियुतः - श्रीकृष्णदर्शनाने आनंद मानणारा व वियोगामुळे व्याकुळ झालेला असा - सः - तो - अहं - मी - प्रभोः - समर्थ अशा - तस्य - त्या श्रीकृष्णाच्या - दयितं - आवडत्या - बदर्याश्रममण्डलं - बदरिकाश्रमाच्या स्थानाला - गमिष्ये - जाईन ॥२१॥
यत्र - जेथे - देवः - देव - नारायणः - नारायण - च - आणि - भगवान् - ऐश्वर्ययुक्‍त - ऋषिः - सर्वज्ञ - नरः - नर - लोकभावनौ - लोकसंरक्षक - मृदु - निरुपद्रवी - तीव्रं - खडतर - तपः - तप - दीर्घं - पुष्कळ काळपर्यंत - तेपाते - तप करते झाले. ॥२२॥
विदुरा, त्यांचे दर्शन झाल्याने सुरुवातीला मला आनंद झाला होता, परंतु आता त्यांच्या विरहाने माझ्या हृदयाला कष्ट होत आहेत. मी आता त्यांना प्रिय असलेल्या बदरिकाश्रमक्षेत्राला जातो. तिथे भगवान श्रीनारायणदेव आणि नर हे दोन ऋषी लोकांवर कृपा करण्यासाठी दीर्घकालीन, सौ‌म्य, परंतु कठीण तपश्चर्या करीत आहेत. (२१-२२)


श्रीशुक उवाच -
इति उद्धवाद् उपाकर्ण्य सुहृदां दुःसहं वधम् ।
ज्ञानेनाशमयत् क्षत्ता शोकं उत्पतितं बुधः ॥ २३ ॥
श्री शुकदेवजी म्हणाले-
उद्धवो मुखिचा ऐसा संहार ऐकताचि त्या ।
विदुरे ज्ञान योगाने शोकाला मिटवीयले ॥ २३ ॥

बुधः - विद्वान् - क्षत्ता - विदुर - इति - याप्रमाणे - उद्धवात् - उद्धवापासून - दुःसहं - असह्य - सुहृदां - ज्ञातींच्या - वधं - नाशाला - उपाकर्ण्य - ऐकून - उत्पतितं - उत्पन्न झालेल्या - शोकं - शोकाला - ज्ञानेन - ज्ञानाने - अशमयत् - शमविता झाला ॥२३॥
श्रीशुक म्हणाले - उद्धवाच्या तोंडून आपल्या प्रिय बंधूंच्या विनाशाचा असा असह्य वृत्तांत ऐकल्यानंतर परम ज्ञानी विदुराला जो शोक उत्पन्न झाला, तो त्याने ज्ञानाने शांत केला. (२३)


स तं महाभागवतं व्रजन्तं कौरवर्षभः ।
विश्रम्भाद् अभ्यधत्तेदं मुख्यं कृष्णपरिग्रहे ॥ २४ ॥
भगवत् प्रीय जो श्रेष्ठ अद्धवो निघताच त्यां ।
विदुरे पुसला प्रश्न श्रद्धेने तो असा पहा ॥ २४ ॥

कौरवर्षभः - कौरवश्रेष्ठ - सः - तो - महाभागवतं - मोठा भगवद्भक्‍त - कृष्णपरिग्रहे - व श्रीकृष्णाच्या परिवारांपैकी - मुख्यं - श्रेष्ठ अशा - व्रजन्तं - जाणार्‍या - तं - त्या उद्धवाला - विश्रम्भात् - विश्वास असल्यामुळे - इंद - हे - अभ्यधत्त - बोलला ॥२४॥
भगवान श्रीकृष्णांच्या परिवारातील प्रमुख महाभागवत उद्धव जेव्हा बदरिकाश्रमाकडे जाण्यास निघाला, तेव्हा कुरुश्रेष्ठ विदुराने मोठया श्रद्धेने त्याला विचारले. (२४)


विदुर उवाच -
ज्ञानं परं स्वात्मरहःप्रकाशं
     यदाह योगेश्वर ईश्वरस्ते ।
वक्तुं भवान्नोऽर्हति यद्धि विष्णोः
     भृत्याः स्वभृत्यार्थकृतश्चरन्ति ॥ २५ ॥
विदुरजी म्हणाले -
( इंद्रवज्रा )
योगेश्वराने तुजला रुपाचे
    ज्या गुढ ज्ञानास प्रबोधियेले ।
ते ज्ञान सारे मजलाहि सांगा
    ते संत बोधा फिरतात नित्य ॥ २५ ॥

योगेश्वरः - योगश्रेष्ठ - ईश्वरः - श्रीकृष्ण - यत् - ज्या - स्वात्मरहःप्रकाश - स्वतःच्या आत्मविषयक रहस्याला प्रकाशित करणार्‍या - पर - श्रेष्ठ - ज्ञानं - ज्ञानाला - ते - तुला - आह - बोलला - तत् - त्याला - भवान् - आपण - नः - आम्हाला - वक्‍तुं - सांगण्यास - अर्हति - योग्य आहात - यत् - कारण - विष्णोः - विष्णूचे - भृत्याः - भक्‍त - स्वभृत्यार्थकृतः - आपल्या भक्‍तांवर अनुग्रह करणारे असे - हि - खरोखर - चरन्ति - हिंडतात ॥२५॥
विदुर म्हणाला - उद्धवा, योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या स्वरूपाचे गूढ रहस्य प्रगट करणारे जे परमज्ञान आपल्याला दिले होते, ते आपण आम्हांलाही ऐकवावे. कारण आपल्या सेवकांचे कार्य करण्यासाठीच भगवंतांचे सेवक विहार करीत असतात. (२५)


उद्धव उवाच ।
(अनुष्टुप्)
ननु ते तत्त्वसंराध्य ऋषिः कौषारवोऽन्ति मे ।
साक्षाद् भगवतादिष्टो मर्त्यलोकं जिहासता ॥ २६ ॥
उद्धवजी म्हणाले -
( अनुष्टुप् )
जाणण्या तत्वज्ञाना त्या मैत्रेया पुसणे बरे ।
तुम्हासी ज्ञान ते देण्या त्यांना देवेचि बोधिले ॥ २६ ॥

ननु - खरोखर - ते - तुझ्याकडून - कौषारवः - मैत्रेय - ऋषिः - ऋषि - तत्त्वसंराध्यः - तात्त्विक रीतीने आराधना करण्यास योग्य आहे - मर्त्यलोकं - मृत्युलोकाला - जिहासता - सोडून जाणार्‍या - भगवता - श्रीकृष्णाने - साक्षात् - प्रत्यक्ष - मे - माझ्या - अंति - देखत - आदिष्टः - आज्ञा दिलेला आहे ॥२६॥
उद्धव म्हणाला - हे तत्त्वज्ञान ऐकण्यासाठी तू मुनिवर मैत्रेयांची सेवा केली पाहिजेस. हा मर्त्यलोक सोडताना स्वतः भगवंतांनीच तुला उपदेश करण्याची त्यांना आज्ञा केली होती. (२६)


श्रीशुक उवाच -
इति सह विदुरेण विश्वमूर्तेः
     गुणकथया सुधया प्लावितोरुतापः ।
क्षणमिव पुलिने यमस्वसुस्तां
     समुषित औपगविर्निशां ततोऽगात् ॥ २७ ॥
शुकदेवजी म्हणाले -
(पुष्पिताग्रा)
ययि परि विदुरेचि विश्वमूर्ति
    हरिगुण गाउनी ताप शांतवी तो ।
क्षणभरि गमलीच रात्र सारी
    उठुनि सकाळि निघोनि पुढेहि गेले ॥ २७ ॥

इति - याप्रमाणे - विदुरेण - विदुराशी - सह - सहवर्तमान - विश्वमूर्तेः - जगत्स्वरूपी श्रीकृष्णाच्या - गुणकथया - गुणानुवादरूपी - सुधया - अमृताने - प्लावितोरुतापः - नाहीसा झाला आहे मोठा ताप ज्याचा असा - यमस्वसुः - यमुनेच्या - पुलिने - वाळवंटात - तां - त्या - निशां - रात्रीला - क्षणम् इव - क्षणाप्रमाणे - सुमुषितः - घालवून - औपगविः - उद्धव - ततः - तेथून - अगात् - निघून गेला. ॥२७॥
श्रीशुकदेव म्हणाले- विदुराबरोबरच्या संभाषणात भगवान श्रीकृष्णांच्या गुणांच्या त्या कथामृतामुळे उद्धवाचे भगवंतांशी वियोगाचे दुःख कमी झाले. यमुनेच्या तीरावरील त्याची ती रात्र त्याला एका क्षणासारखी वाटली. प्रातःकाल होताच तो तिथून निघून गेला. (२७)


राजोवाच -
निधनमुपगतेषु वृष्णिभोजेषु
     अधिरथयूथपयूथपेषु मुख्यः ।
स तु कथमवशिष्ट उद्धवो
     यद्धरिरपि तत्यज आकृतिं त्र्यधीशः ॥ २८ ॥
राजा परीक्षिती म्हणाला-
मरणि कुळ पडोनिया वृष्णि भोज
    युथपतिवीर मरोनिसवेचि गेले ।
हरि स्वयंहि त्यजोनि रूप गेला
    मग मुखिया असुनि उद्धवो जगे कै ॥ २८ ॥

अधिरथयूथपयूथपेषु - अधिरथी अशा वीर पुरुषांच्या समूहांच्या समूहांचे मोठमोठे अधिपती - वृष्णिभोजेषु - वृष्णि व भोज असे पुरुष - निधनं - नाशाला - उपगतेषु - प्राप्त झाले असता - सः - तो - तु - तर - उद्धवः - उद्धव - कथं - कसा - अवशिष्टः - शिल्लक राहिला - यत् - कारण - मुख्यः - मुख्य - त्र्यधीशः - त्रैलोक्याधिपति - हरिः - श्रीकृष्ण - अपि - सुद्धा - आकृतिं - शरीराला - तत्यजे - टाकता आला ॥२८॥
राजा परीक्षिताने विचारले - भगवान ! आणि भोजवंशातील सर्व महारथी आणि सेनापतींचेही सेनापती नष्ट झाले होते. एवढेच काय त्रिलोकीनाथ श्रीहरींनीही आपले ते रूप केले होते. असे असता सर्वांचे प्रमुख उद्धव कसे वाचले ? (२८)


श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्) ब्रह्मशापापदेशेन कालेनामोघवाञ्छितः ।
संहृत्य स्वकुलं स्फीतं त्यक्ष्यन् देहमचिन्तयत् ॥ २९ ॥
शुकदेवजी सांगतात -
( अनुष्टुप् )
ज्यांची इच्छा न हो खोटी त्याच श्रीहरीने तदा
द्विजाचा शाप मानोनी केला वंशही खंडन ।
स्वधामा निघण्या पूर्वी विचार मांडिला मनीं ॥ २९ ॥

अमोघवाञ्‌छितः - ज्याची इच्छा विफल होणारी नाही असा श्रीकृष्ण - ब्रह्मशापापदेशेन - ब्रह्मशापाच्या निमित्ताने - कालेन - काळाने - स्फीतं - वाढलेल्या - स्वकुलं - आपल्या कुळाला - संहृत्य - नष्ट करून - देहं - शरीराला - त्यक्ष्यन् - टाकणारा - अचिन्तयत् - विचार करू लागला ॥२९॥
श्रीशुकदेव म्हणाले - ज्यांनी केलेली इच्छा कधी व्यर्थ होत नाही, त्या श्रीहरींनी ब्राह्मणांच्या शापरूपी ‘काळा’चा बहाणा करून आपल्या कुळाचा संहार केला आणि आपला अवतार समाप्त करताना असा विचार केला (२९)


अस्मात् लोकादुपरते मयि ज्ञानं मदाश्रयम् ।
अर्हत्युद्धव एवाद्धा सम्प्रत्यात्मवतां वरः ॥ ३० ॥
हा लोक सोडुनी जाता घेण्या ज्ञान पुढे मम ।
एक उद्धव तो युक्त खराच अधिकारि तो ॥ ३० ॥

संप्रति - हल्ली - मयि - मी - अस्मात् - ह्या - लोकात् - लोकांतून - उपरते - निघून गेलो असता - मदाश्रयं - माझ्या आश्रयाने राहिलेल्या - अद्धा - साक्षात् - ज्ञानं - ज्ञानाला - आत्मवतां - आत्मज्ञान्यांमध्ये - वरः - श्रेष्ठ - उद्धवः एव - उद्धवच - अर्हति - योग्य आहे ॥३०॥
आता या लोकातून मी निघून गेल्यानंतर अत्यंत संयमशील असा उद्धवच मी सांगितलेले ज्ञान ग्रहण करण्यास योग्य अधिकारी आहे. (३०)


नोद्धवोऽण्वपि मन्न्यूनो यद्‍गुणैर्नार्दितः प्रभुः ।
अतो मद्वयुनं लोकं ग्राहयन् इह तिष्ठतु ॥ ३१ ॥
अणुमात्र नसे न्यून तो माझ्याहुनीही तसा ।
माझे ज्ञान जगा देण्या राहील एकटाचि तो ॥ ३१ ॥

प्रभुः - श्रेष्ठ - उद्धवः - उद्धव - अणुः - अणुमात्र - अपि - सुद्धा - मन्न्यूनः - माझ्याहून कमी - न - नाही - यत् - कारण - गुणैः - गुणजन्य विषयांनी - न अर्दितः - पीडिला गेला नाही - अतः - म्हणून - लोकं - लोकाला - मद्वयुनं - माझ्या संबंधीच्या ज्ञानाला - ग्राहयन् - उपदेशिणारा होत्साता - इह - येथे - तिष्ठतु - राहो ॥३१॥
आत्मज्ञानी उद्धव माझ्यापेक्षा अणुमात्रसुद्धा कनिष्ठ नाही. तो विषयांमुळे कधी विचलित झाला नाही. म्हणून माझ्या ज्ञानाचे लोकांना शिक्षण देण्यासाठी त्याने येथेच राहावे" (३१)


एवं त्रिलोकगुरुणा सन्दिष्टः शब्दयोनिना ।
बदर्याश्रममासाद्य हरिमीजे समाधिना ॥ ३२ ॥
वेदांचा मूळ तो कृष्ण त्याने त्या उद्धवाप्रती ।
बोधिता बद्रिकेदारी तो ध्यानातचि डुंबला ॥ ३२ ॥

एवं - याप्रमाणे - शब्दयोनिना - वेद प्रगट करण्यास कारणीभूत अशा - त्रिलोकगुरुणा - त्रैलोक्याधिपति श्रीकृष्णाने - संदिष्टः - आज्ञापिलेला - उद्धवः - उद्धव - बदर्याश्रमं - बदरिकाश्रमाला - आसाद्य - जाऊन - समाधिना - समाधियोगाने - हरिं - श्रीकृष्णाला - ईजे - पूजिता झाला ॥३२॥
वेदांचे मूळ कारण असणार्‍या जगद्‌गुरु श्रीकृष्णांची अशी आज्ञा झाल्यावर उद्धव बद्रिकाश्रमात जाऊन समाधियोगाने श्रीहरीची आराधना करू लागला. (३२)


विदुरोऽप्युद्धवात् श्रुत्वा कृष्णस्य परमात्मनः ।
क्रीडयोपात्तदेहस्य कर्माणि श्लाघितानि च ॥ ३३ ॥
देहन्यासं च तस्यैवं धीराणां धैर्यवर्धनम् ।
अन्येषां दुष्करतरं पशूनां विक्लवात्मनाम् ॥ ३४ ॥
आत्मानं च कुरुश्रेष्ठ कृष्णेन मनसेक्षितम् ।
ध्यायन् गते भागवते रुरोद प्रेमविह्वलः ॥ ३५ ॥
श्रीकृष्णे लीलया रूप घेतले पृथिवीवरी ।
लीलेने सोडिले सर्व अन्यां दुस्तर जे असे ॥ ३३ ॥
अंतर्धान तयाचे ते धीरांचे धैर्य वाढवी ।
उद्धवे कीर्ति ती त्याची अंतर्धानहि बोलले ॥ ३४ ॥
त्याने त्या निघण्यापूर्वी मला ही स्मरले मनीं ।
ऐकता विदुरे सारे तो शोकाकुल जाहला ॥ ३५ ॥

च - आणि - विदुरः - विदुर - अपि - सुद्धा - उद्धवात् - उद्धवापासून - क्रीडया - खेळण्याच्या निमित्ताने - उपात्तदेहस्य - देह धारण केलेल्या - परमात्मनः - श्रेष्ठ आत्मरूपी - कृष्णस्य - श्रीकृष्णाच्या - श्‍लाघितानि - स्तुत्य - कर्माणि - कृत्यांना - श्रुत्वा - ऐकून ॥३३॥
च - आणि - एवं - याप्रमाणे - धीराणां - धीट पुरुषांच्या - धैर्यवर्धनं - धीटपणाला वाढविणार्‍या - च - आणि - अन्येषां - दुसर्‍या - विक्‍लवात्मनां - चंचलचित्त असणार्‍या - पशूनां - पशुतुल्य प्राण्यांस - दुष्करतरं - करण्यास दुर्घट अशा - तस्य - त्या श्रीकृष्णाच्या - देहन्यासं - शरीरत्यागाला - श्रुत्वा - ऐकून ॥३४॥
च - आणि - कुरुश्रेष्ठ - हे परीक्षित राजा ! - कृष्णेन - कृष्णाने - मनसा - मनाने - ईक्षितम् - अवलोकिलेल्या म्हणजे चिंतिलेल्या - आत्मानं - स्वतःबद्दल - ध्यायन् - चिंतन करीत - भागवते गते - भगवद्‍भक्‍त उद्धव तेथून निघून गेला असता - प्रेमविह्‌वलः - प्रेमाने विव्हळ झालेला असा - रुरोद - रडू लागला ॥३५॥
कुरुश्रेष्ठ परीक्षिता, परमात्मा श्रीकृष्णांनी लीलेनेच आपला श्रीविग्रह प्रगट केला होता आणि लीलेनेच तो अदृश्य केला. त्यांचे हे अंतर्धान पावणेसुद्धा धैर्यवान पुरुषांचा उत्साह वाढविणारे आणि दुसर्‍या पशुतुल्य अशा अधीर पुरुषांना अत्यंत असह्य होते. परम भागवत उद्धवाच्या तोंडून भगवंतांची प्रशंसनीय कर्मे आणि अशा प्रकारे त्यांचे अंतर्धान होणे ऐकून तसेच भगवंतांनी परमधामाला जाताना आपली आठवण काढली, हे विदुराने ऐकल्यानंतर तो प्रेमविव्हल हो‌ऊन अश्रू ढाळू लागला. (३३-३५)


कालिन्द्याः कतिभिः सिद्ध अहोभिर्भरतर्षभ ।
प्रापद्यत स्वःसरितं यत्र मित्रासुतो मुनिः ॥ ३६ ॥
सिद्ध विदुरजी पश्चात् गंगेच्या तिरि पातले ।
मैत्रेय राहिले होते तेथे जाऊन भेटले ॥ ३६ ॥

सिद्धः - सिद्ध झालेला - भरतर्षभः - भरतश्रेष्ठ विदुर - कतिभिः - कित्येक - अहोभिः - दिवसांनी - कालिंद्याः - यमुनेच्या तीरावरून - यत्र - जेथे - मित्रासुत - मैत्रेय - मुनिः - मुनि - तत्र - तेथे - स्वःसरितं - गंगेला - प्रापद्यत - प्राप्त झाला ॥३६॥
यानंतर भरतश्रेष्ठ सिद्ध विदुर यमुनातटावरून काही दिवसांनी गंगेच्या किनार्‍यावर पोहोचला. श्रीमैत्रेय ऋषी तिथेच राहात होते. (३६)


स्कंध तिसरा - अध्याय चवथा समाप्त

GO TOP