![]()  | 
|  
 
श्रीमद् भागवत पुराण  
मथुरायां च द्वारकायां च सम्पन्नानां  भगवंतांच्या अन्य लीला-चरित्रांचे वर्णन - संहिता  -  अन्वय  -  अर्थ  समश्लोकी - मराठी 
उद्धव उवाच ।  
ततः स आगत्य पुरं स्वपित्रोः चिकीर्षया शं बलदेवसंयुतः । निपात्य तुङ्गाद् रिपुयूथनाथं हतं व्यकर्षद् व्यसुमोजसोर्व्याम् ॥ १ ॥ 
उद्धवजी म्हणाले -  ( इंद्रवज्रा ) माता-पित्यासी सुख द्यावयाला आले मथूरीं बलदेव कृष्ण । सिंहासनीचा उचलोनि कंस मारोनिया आपटिला धरेसी ॥ १ ॥ 
ततः -  नंतर - स्वपित्रोः -  आपल्या मातापितरांचे - शं -  कल्याण - चिकीर्षया -  करण्याच्या इच्छेने - बलदेवसंयुतः -  बलरामासह - सः -  तो श्रीकृष्ण - पुरं -  मथुरा नगरीला - आगत्य -  येऊन - रिपुयूथनाथं -  शत्रुसमूहाचा स्वामी अशा कंसाला - तुङ्गात् -  सिंहासनावरून - ओजसा -  पराक्रमाने - हतं निपात्य -  ठार होईल अशा रीतीने - व्यसुं -  गतप्राण झालेल्या त्याला - उर्व्यां -  पृथ्वीवर - व्यकर्षत् -  ओढून आणता झाला. ॥१॥ 
 
उद्धव म्हणतो - त्यानंतर आपल्या माता-पित्यांना सुखी करण्यासाठी श्रीकृष्ण बलदेवासह मथुरेत आले आणि त्यांनी समस्त शत्रूंचे स्वामी असलेल्या कंसाला उंच सिंहासनावरून खाली ओढून त्याचे प्राण घेतले आणि ते प्रेत जोराने जमिनीवरून फरफटत नेले. (१) 
 
सान्दीपनेः सकृत् प्रोक्तं ब्रह्माधीत्य सविस्तरम् ।  
तस्मै प्रादाद् वरं पुत्रं मृतं पञ्चजनोदरात् ॥ २ ॥ 
( अनुष्टुप् ) मुखे सांदिपनीच्या ते ऐकता वेद जाणिले । केला जिवंत तो पुत्र दक्षिणा द्यावयास त्या ॥ २ ॥ 
 सकृत् -  एकदाच - प्रोक्तं -  सांगितलेले - ब्रह्म -  वेद - सविस्तरं -  विस्तारपूर्वक - सांदीपनेः -  सांदिपनीपासून - अधीत्य -  शिकून - तस्मै -  त्याला - वरं -  दक्षिणा म्हणून - मृतं -  मेलेल्या - पुत्रं -  मुलाला - पञ्चजनोदरात् -  पञ्चजननामक समुद्रात राहणार्या दैत्यापासून - प्रादात् -  आणून अर्पण करिता झाला. ॥२॥  
 
सांदीपनी मुनींनी एकदाच शिकविलेल्या सांगोपांग वेदांचे अध्ययन करून गुरुदक्षिणेच्या स्वरूपात त्यांचा मृत पुत्र पंचजन नावाच्या राक्षसाच्या पोटातून परत आणून दिला. (२) 
 
समाहुता भीष्मककन्यया ये  
श्रियः सवर्णेन बुभूषयैषाम् । गान्धर्ववृत्त्या मिषतां स्वभागं जह्रे पदं मूर्ध्नि दधत्सुपर्णः ॥ ३ ॥ 
( इंद्रवज्रा ) रुक्मीणिच्या बोलविण्या प्रमाणे तेणे वराया हरुनीच नेले । गरूड नेई कलशो सुधेचा तैसी तियेला हरिनी वरीली ॥ ३ ॥ 
 भीष्मकन्यया -  भीष्मक राजाची कन्या जी रुक्मिणी तिने - श्रियः -  लक्ष्मीच्या - सवर्णेन -  समान असणार्या आपल्या सौंदर्याने - ये -  जे - राजानः -  राजे - समाहूतः -  बोलाविले होते - एषां मिषतां -  त्यांच्यासमक्ष - मूर्ध्नि -  मस्तकावर - पदं -  पायाला - दधत् -  ठेवणारा - गान्धर्ववृत्त्या -  गान्धर्व नामक विवाहविधीने - बुभूषया -  ऐश्वर्य उपभोगण्याच्या इच्छेने  - सुपर्णः -  गरूड - स्वभागं -  आपल्या भागाला - इव -  अशाप्रमाणे - जह्रे -  हरण करिता झाला. ॥३॥ 
 
भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी हिच्या सौंदर्याने आकर्षित होऊन किंवा रुक्मीने बोलावले म्हणून जे शिशुपालादी तेथे आले होते, त्या सर्वांच्या डोक्यावर पाय ठेवून गांधर्वविधीने विवाह करण्यासाठी म्हणून रुक्मिणीचे, गरुडाने अमृतकलश हरण करावा त्याप्रमाणे हरण केले. (३) 
 
ककुद्मिनोऽविद्धनसो दमित्वा  
स्वयंवरे नाग्नजितीमुवाह । तद्भग्नमानानपि गृध्यतोऽज्ञान् जघ्नेऽक्षतः शस्त्रभृतः स्वशस्त्रैः ॥ ४ ॥ 
स्वयंवरी सात नथीविना जे बैलास त्या वेसणि घातियेले । मारून शत्रूस तिथोनि कांही सत्या तदा ती वरिली सुखानें ॥ ४ ॥ 
 अविद्धनसः -  नाक टोचून वेसण न घातलेल्या - ककुद्मतः -  व ज्यांच्या पाठीवर मोठमोठी कोवळी आली आहेत अशा दांडग्या बैलांना - दमित्वा -  दमवून - स्वयंवरे -  स्वयंवरामध्ये - नाग्नजितीं -  नग्नजित् राज्याच्या कन्येला - उवाह -  वरिता झाला - अक्षतः -  स्वतः सुरक्षित राहिलेला - तद्भग्नमानान् अपि -  त्यामुळे अपमान पावलेली असूनसुद्धा  - गृध्यतः -  राज्यकन्येच्या प्राप्तीविषयी आशाळभूत झालेल्या - शस्त्रभृतः -  शस्त्रधारी  - अज्ञान् -  मूर्ख राजांना - स्वशस्त्रैः -  आपल्या शस्त्रांनी - जघ्ने -  मारिता झाला ॥४॥  
 
स्वयंवरात, वेसण नसलेल्या सात बैलांना वेसण घालून, नाग्नजिती(सत्यभामा)  हिच्याशी विवाह केला. याप्रकारे मानभंग झालेल्या मूर्ख राजांनी शस्त्र हातात घेऊन राजकुमारीला पळविण्याचे ठरविले, तेव्हा श्रीकृष्णांनी स्वतः जखमी न होता आपल्या शस्त्राने त्यांना मारले. (४) 
 
प्रियं प्रभुर्ग्राम्य इव प्रियाया  
विधित्सुरार्च्छद् द्युतरुं यदर्थे । वज्र्याद्रवत्तं सगणो रुषान्धः क्रीडामृगो नूनमयं वधूनाम् ॥ ५ ॥ 
ती सत्यभामा करण्या प्रसन्न स्वर्गा तुनी कल्पवृक्षासी आणी । इंद्रे तदा आक्रमणोहि केले । कांकी स्त्रियांचाचशिकार तो की ॥ ५ ॥ 
 प्रभुः -  श्रीकृष्ण - ग्राम्यः इव -  सामान्य गावंढळाप्रमाणे - प्रियायाः -  पत्नीचे - प्रियं -  प्रिय - विधित्सुः -  करण्यास इच्छिणारा - द्युतरुं -  स्वर्गातील वृक्षाला - आर्च्छ्त् -  इच्छिता झाला - यदर्थे -  ज्याकरिता - वज्री -  इंद्र - रुषा -  रागाने - अंधः -  धुंद झालेला - सगणः -  देवगणांसह - तं -  त्या श्रीकृष्णाच्या अंगावर - आद्रवत् -  धावत आला - नूनं -  खरोखर - वधूंना -  बायकांचा - अयं -  हा इंद्र - क्रीडामृगः -  खेळातला हरिणच की काय असा होता ॥५॥ 
 
भगवंतांनी संसारी पुरुषासारख्या लीला करीत, आपली प्रिय पत्नी सत्यभामा हिला प्रसन्न करण्यासाठी स्वर्गातून कल्पवृक्ष(पारिजात) उपटून आणला. त्यावेळी क्रोधाने आंधळा झालेला इंद्र आपल्या सैनिकांसहित भगवंतांवर चाल करून आला. कारण तो तर आपल्या पत्नीच्या हातचे खेळणे होता. (५) 
 
सुतं मृधे खं वपुषा ग्रसन्तं  
दृष्ट्वा सुनाभोन्मथितं धरित्र्या । आमंत्रितस्तत् तनयाय शेषं दत्त्वा तदन्तःपुरमाविवेश ॥ ६ ॥ 
भौमासुरा कृष्ण वधी तदा ती पृथ्वी तया प्रार्थित झाली तैसी । जे राज्य ते त्या भगदत्त याला देवोनि केले सुखि त्या प्रजेला ॥ ६ ॥ 
 वपुषा -  शरीराने - खं -  आकाशाला - ग्रसन्तं -  गिळणार्या - मृधे -  युद्धात  - सुनाभोन्मथितं -  चक्राने मारलेल्या - सुतं -  पुत्राला - आमन्त्रितः -  प्रार्थना केलेला - प्रभुः -  श्रीकृष्ण  - शेषं -  शिल्लक राहिलेल्या भागाला - तत्तनयाय -  त्याच्या मुलाला - दत्त्वा -  देऊन - तत् -  त्यानंतर - अन्तःपुरं -  अन्तःपुरात - आविवेश -  गेला ॥६॥ 
 
आपल्या विशाल शरीराने आकाशाला सुद्धा गिळणार्या आपल्या पुत्राला-भौमासुराला भगवंताच्या हातून मृत्यू आलेला पाहून पृथ्वीने त्यांची प्रार्थना केली. त्यावेळी भौमासुराचा मुलगा भगदत्त याला उरलेले राज्य देऊन भगवंतांनी त्याच्या अंतःपुरात प्रवेश केला. (६) 
 
तत्राहृतास्ता नरदेवकन्याः  
कुजेन दृष्ट्वा हरिमार्तबन्धुम् । उत्थाय सद्यो जगृहुः प्रहर्ष व्रीडानुरागप्रहितावलोकैः ॥ ७ ॥ 
ज्या राजकन्या हरिल्या असूरे हा दीनबंधू बघता हरी त्या । प्रेमे नि लाजे चुर जाहल्या नी दृष्टीकटाक्षे वरिले हरीला ॥ ७ ॥ 
 तत्र -  तेथे - कुजेन -  पृथ्वीच्या पुत्राने - आहृताः -  आणिलेल्या - ताः -  त्या - नरदेवकन्याः -  राजकन्या - आर्तबन्धुं -  पीडलेल्यांना सहाय्य करणार्या - हरिं -  श्रीकृष्णाला - दृष्ट्वा -  पाहून - सद्यः उत्थाय -  उठून - प्रहर्षव्रीडानुरागप्रहितावलोकैः -  आनंद, लज्जा व प्रेमपूर्वक अवलोकन ह्यांनी - तं -  त्या श्रीकृष्णाला - जगृहुः -  वरित्या झाल्या ॥७॥ 
 
त्या अंतःपुरात भौमासुराने पळवून आणलेल्या पुष्कळशा राजकन्या होत्या. दीनबंधू श्रीकृष्णांना पाहाताच त्या उठून उभ्या राहिल्या आणि अतिशय हर्ष, लज्जा आणि प्रेमपूर्वक कटाक्ष टाकून त्यांनी तत्काळ भगवंतांना पतिरूपाने वरले. (७) 
 
(अनुष्टुप्) आसां मुहूर्त एकस्मिन् नानागारेषु योषिताम् ।  
सविधं जगृहे पाणीन् अनुरूपः स्वमायया ॥ ८ ॥ 
( अनुष्टुप् ) भगवान योगमायेने पत्न्यानूसार तेवढी । धारिता जाहला रूपे मुहूर्ती लग्न लाविले ॥ ८ ॥ 
 स्वमायया -  आपल्या मायेने - अनुरूपः -  अनुकूल रूप धारण करणारा - नाना गारेषु -  अनेक मंदिरांमध्ये - एकस्मिन् -  एकाच - मुहूर्ते -  मुहूर्तावर - सविधं -  यथाविधि - आसां -  ह्या - योषितां -  स्त्रियांच्या - पाणीन् -  हातांना - जगृहे -  घेता झाला म्हणजे त्यांच्याशी विवाह लाविता झाला. ॥८॥ 
 
तेव्हा भगवंतांनी आपल्या योगमायेने त्या स्त्रियांना अनुरूप अशी तितकी रूपे धारण केली आणि त्या सर्वांचे वेगवेगळ्या महालांत एकाच मुहूर्तावर विधिपूर्वक पाणिग्रहण केले. (८) 
 
तास्वपत्यान्यजनयद् आत्मतुल्यानि सर्वतः ।  
एकैकस्यां दश दश प्रकृतेर्विबुभूषया ॥ ९ ॥ 
दावुनी आपुली लीला प्रत्येकीच्या कुशीत ते । दश् दशो जन्मिले पुत्र आपुल्या सम देखणे ॥ ९ ॥ 
 तासु -  त्या स्त्रियाचे ठिकाणी - सर्वतः -  सर्व बाजूने - आत्मतुल्यानि -  स्वतःसारख्या - अपत्यानी -  मुलांना - एकैकस्यां -  प्रत्येकीच्या ठिकाणी - दश दश -  दहा दहा - इति -  अशा संख्येने - प्रकृतेः -  मायेचा - विबुभूषया -  अधिक प्रसार व्हावा या इच्छेने - अजनयत् -  उत्पादिता झाला ॥९॥ 
 
स्वतःच अनेक रूपांनी नटण्यासाठी त्यांनी त्या प्रत्येकीच्या ठिकाणी आपल्या सारख्याच दहा दहा पुत्रांना जन्म दिला. (९) 
 
कालमागधशाल्वादीन् अनीकै रुन्धतः पुरम् ।  
अजीघनत् स्वयं दिव्यं स्वपुंसां तेज आदिशत् ॥ १० ॥ 
काल मागध शाल्वांनी द्वारकापुरि घेरिता । स्वजना शक्तिदेवोनी शत्रुला ठार मारिले ॥ १० ॥ 
 अनीकैः -  सैन्यांनी - पुरं -  नगराला - रुन्धतः -  वेढा घालून नाकेबंदी करणार्या - कालमागध शाल्वादीन् -  कालयवन,जरासंध व शाल्व इत्यादिकांना - स्वयं -  स्वतः  - अजीघनत् -  मारिता झाला - स्वपुंसां -  आपली भक्ति करणार्या पुरुषांना - दिव्यं -  दैदीप्यमान - तेजः -  तेजाला - आदिशत् -  देता झाला ॥१०॥ 
 
जेव्हा कालयवन, जरासंध आणि शाल्व आदी राजांनी आपल्या सेनांच्या द्वारे मथुरा आणि द्वारकापुरीला घेरले, तेव्हा भगवंतांनी आपल्याच लोकांना आपली अलौकिक शक्ती देऊन त्या सेनेला आपणच मारविले होते. (१०) 
 
शम्बरं द्विविदं बाणं मुरं बल्वलमेव च ।  
अन्यांश्च दन्तवक्रादीन् अवधीत्कांश्च घातयत् ॥ ११ ॥ 
शंबरा द्विविदा मूरा बल्वला दंतवक्रला । बाणासुरास मारी तो स्वयं वा दुसर्या करें ॥ ११ ॥ 
 शम्बरं -  शम्बरासुराला - द्विविदं -  द्विविद नामक वानराला - बाणं -  बाणासुराला - मुरं -  मुर दैत्याला - च -  आणि - बल्वलम् एव -  बल्वलाला सुद्धा - च -  आणि - अन्यान् -  दुसर्या - कान् -  कित्येकांना - घातयत् -  मारविता झाला - च -  आणि - दंतवक्रादीन् -  दंतवक्र वगैरेना - अवधीत् -  मारिता झाला ॥११॥ 
 
शंबर, द्विविद, बाणासुर, मुर, बल्वल, दंतवक्त्र इत्यादी अनेक योद्ध्यांपैकी काहींना त्यांनी स्वतः, तर काहींना दुसर्यांच्या करवी मारविले. (११) 
 
अथ ते भ्रातृपुत्राणां पक्षयोः पतितान् नृपान् ।  
चचाल भूः कुरुक्षेत्रं येषां आपततां बलैः ॥ १२ ॥ 
पांडवी पक्ष घेवोनी भारभूत असे नर । उभयी पक्षिचे त्याने मारोनी भार हारिला ॥ १२ ॥ 
 अथ -  नंतर - कुरुक्षेत्रं -  कुरुक्षेत्राला - आपततां -  आलेल्या - येषां - ज्यांच्या - बलैः -  सैन्यांनी - भूः - पृथ्वी - चचाल -  कापू लागली - तान् -  त्या - ते -  तुझे - भ्रातृपुत्राणां -  भाऊ जे धृतराष्ट्र व पंडु यांच्या मुलांच्या - पक्षयोः -  दोन पक्षांमध्ये - पतितान् -  पडलेल्या - नृपान् -  राजांना - अघातयत् -  मारविता झाला ॥१२॥ 
 
यानंतर त्यांनी आपले भाऊ धृतराष्ट्र आणि पांडूच्या पुत्रांचा कैवार घेऊन आलेल्या राजांचाही संहार केला. त्या राजांची सेना जेव्हा कुरुक्षेत्रात पोहोचली, तेव्हा पृथ्वी डगमगू लागली होती. (१२) 
 
स कर्णदुःशासनसौबलानां  
कुमंत्रपाकेन हतश्रियायुषम् । सुयोधनं सानुचरं शयानं भग्नोरुमूर्व्यां न ननन्द पश्यन् ॥ १३ ॥ 
( इंद्रवज्रा ) त्या कर्ण दुःशासन नी शकूनी मंत्री ययांची आयु नष्ट होता । भीमी गदेने जरि टांग जाता मेला कुणी तो नच त्यास दुःख ॥ १३ ॥ 
 सः -  तो श्रीकृष्ण - कर्णदिःशासनसौबलांना -  कर्ण, दुःशासन व शकुनि यांच्या - कुमन्त्रपाकेन -  वाईट मसलतीच्या परिणामाने - हतश्रियायुषं -  नष्ट झाली आहे संपत्ति व आयुष्य ज्याचे अशा - सानुचरं -  सेवकांसह - सुयोधनं -  दुर्योधनाला - भग्नोरुं -  मांडी मोडलेला अशा तर्हेने - उर्व्यां -  जमिनीवर - शयानं -  शयन करणारा असा - पश्यन् -  पाहणारा असा होत्साता - न ननन्द -  संतुष्ट झाला नाही ॥१३॥ 
 
कर्ण, दुःशासन आणि शकुनी यांच्या दुष्ट सल्ल्याने ज्यांचे आयुष्य आणि संपत्ती दोन्हीही नष्ट झाले होते, तसेच भीमसेनाच्या गदेने ज्याची मांडी तुटली होती, त्या दुर्योधनाला आपल्या सहकार्यांसह जमिनीवर पडलेला पाहूनही त्यांना प्रसन्नता वाटली नाही. (१३) 
 
कियान् भुवोऽयं क्षपितोरुभारो  
यद्द्रोणभीष्मार्जुन भीममूलैः । अष्टादशाक्षौहिणिको मदंशैः आस्ते बलं दुर्विषहं यदूनाम् ॥ १४ ॥ 
संहार झाला जरि खूप मोठा भीष्मार्जुनो आणि भीमा कडोनी । प्रद्युम्न आदी कडुनीही दुष्ट मेले तरी बाकि करी विचार ॥ १४ ॥ 
 द्रोणभीष्मार्जुनभीममूलैः -  द्रोण, भीष्म, अर्जुन व भीम ह्या मूलभूत पुरुषांकडून  - अयं -  हा - अष्टादशाक्षौहिणिकः -  अठरा अक्षौहिणी सैन्यांनी होणारा - उरुभारः -  मोठा भार - क्षपितः -  नाहीसा केला - कियान् -  हा कितीसा आहे - यत् -  कारण - मदंशैः -  माझ्या अंशामुळे - दुर्विषहं -  असह्य - यदूनां -  यादवांचे - बलं -  सैन्य - आस्ते -  अजून जिवंत आहे ॥१४॥ 
 
ते असा विचार करू लागले की, जरी द्रोण, भीष्म, अर्जुन आणि भीमसेन यांच्या द्वारा या विपुल अशा अठरा अक्षौहिणी सैन्याचा संहार झाला तरी पृथ्वीचा कितीसा भार हलका होईल ? अजूनहि माझे अंशरूप असलेल्या यादवांचे दुःख तर तसेच आहे ! (१४) 
 
मिथो यदैषां भविता विवादो  
मध्वामदाताम्रविलोचनानाम् । नैषां वधोपाय इयानतोऽन्यो मय्युद्यतेऽन्तर्दधते स्वयं स्म ॥ १५ ॥ 
प्राशोनि दारू मग लाल नेत्रे आप्तात तेही लढतील नाशा । यांच्या विना ना दुसरा उपाय संकल्प होताचि निघेन धामा ॥ १५ ॥ 
 माध्व्यामदाताम्रविलोचनानां -  मद्यप्राशनाने मदोन्मत्त होऊन लाल झाले आहेत डोळे ज्यांचे अशा - एषां -  ह्या यदुसैन्यामध्ये - यदा -  जेव्हा - मिथः -  एकमेकात - विवादः -  कलह - भविता -  होईल - इयान् -  हा - एषां -  ह्यांच्या - वधोपायः -  नाशाचा उपाय - अतः -  ह्याहून - अन्यः -  दुसरा - न -  नाही - मयि -  मी - उद्यते -  नाश करण्यास उद्युक्त झालो असता - स्वयं -  स्वतः - अन्तर्दधते स्म -  नाश पावतील ॥१५॥ 
 
जेव्हा हे यादव मद्यपान करून मस्तवाल होतील आणि लाल झालेल्या डोळ्यांनी आपापसात लढू लागतील, त्यामुळेच यांचा नाश  होईल. याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही. खरे पाहाता, माझ्या संकल्पानेच हे स्वतः नष्ट होतील. (१५) 
 
(अनुष्टुप्) एवं सञ्चिन्त्य भगवान् स्वराज्ये स्थाप्य धर्मजम् ।  
नन्दयामास सुहृदः साधूनां वर्त्म दर्शयन् ॥ १६ ॥ 
( अनुष्टुप् ) असे चिंतोनि कृष्णने धर्माते अभिषेकिले । सर्व संबधिता मोदे सन्माग हर्षतो दिला ॥ १६ ॥ 
 भगवान् -  श्रीकृष्ण - एवं -  याप्रमाणे - सञ्चिन्त्य -  विचार करून - धर्मजं -  धर्मराजाला - स्वराज्ये -  स्वतःच्या राज्यावर - स्थाप्य -  स्थापित करून - साधूनां -  साधूंच्या - वर्त्म -  मार्गाला - दर्शयन् -  दाखविणारा होत्साता - सुहृदः -  मित्रांना अर्थात् भक्तांना - नन्दयामास -  आनन्दित करिता झाला ॥१६॥ 
 
असा विचार करून भगवंतांनी युधिष्ठिराला त्याच्या वडिलार्जित राज्यावर बसविले आणि आपल्या संबंधितांना सत्पुरुषांनी घालून दिलेला मार्ग दाखवून आनंदित केले. (१६) 
 
उत्तरायां धृतः पूरोः वंशः साध्वभिमन्युना ।  
स वै द्रौण्यस्त्रसंछिन्नः पुनर्भगवता धृतः ॥ १७ ॥ 
पुंबीजे अभिमन्यूच्या उत्तरागर्भ राहिला । ब्रह्मास्त्रे मरता तोही कृष्णाने वाचवीयला ॥ १७ ॥ 
 अभिमन्युना -  अभिमन्यूने - उत्तरायां -  उत्तरेच्या ठिकाणी - साधु -  चांगल्या रीतीने - धृतः -  स्थापिलेल्या - पूरोः -  पूरूचा  - वंशः -  वंश - द्रौण्यस्त्रसंछिन्नः -  अश्वत्थाम्याच्या अस्त्राने नष्ट झाला असताही - भगवता -  श्रीकृष्णाने - वै -  खरोखर - पुनः -  फिरून - सः -  तो - धृतः -  रक्षिला ॥१७॥ 
 
अभिमन्यूने उत्तरेच्या गर्भात जे पुरुवंशाचे बीज स्थापित केले होते, ते सुद्धा अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जवळजवळ नष्ट झाले होते; परंतु भगवंतांनी ते वाचविले. (१७) 
 
अयाजयद् धर्मसुतं अश्वमेधैस्त्रिभिर्विभुः ।  
सोऽपि क्ष्मामनुजै रक्षन् रेमे कृष्णमनुव्रतः ॥ १८ ॥ 
अश्वमेध असे तीन केले धर्मा कडोनिया । कृष्णभक्ते सवे बंधू आनंदे रक्षिली धरा ॥ १८ ॥ 
 विभुः -  श्रीकृष्ण - धर्मसुतं -  धर्मराजाला - त्रिभिः -  तीन - अश्वमेधैः -  अश्वमेधांनी - अयाजयत् -  यज्ञ करण्यास लाविता झाला - सः अपि -  तो सुद्धा - अनुजैः -  भावांकडून - क्ष्मां -  पृथ्वीला - रक्षन् -  राखणारा - कृष्णं - श्रीकृष्णाला - अनुव्रतः -  अनुसरणारा होत्साता - रेमे -  रममाण झाला ॥१८॥ 
 
त्यांनी धर्मराज युधिष्ठिराकडून तीन अश्वमेध यज्ञ करविले आणि युधिष्ठिरसुद्धा श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे वागत लहान भावांच्या साहाय्याने पृथ्वीचे रक्षण करीत आनंदाने राहू लागला. (१८) 
 
भगवान् अपि विश्वात्मा लोकवेदपथानुगः ।  
कामान् सिषेवे द्वार्वत्यां असक्तः साङ्ख्यमास्थितः ॥ १९ ॥ 
भगवान् जरि विश्वात्मा लोकाना वेद दाविता । द्वारकीं भोगतो भोग निष्काम सांख्य स्थापुनी ॥ १९ ॥ 
 विश्वात्मा अपि -  विश्वव्यापक असूनहि  - भगवान् -  श्रीकृष्ण - लोकवेदपथानुगः -  लौकिक व वैदिक ह्या उभय मार्गांना अनुसरणारा होत्साता - सांख्यं -  सांख्यतत्वाला - आस्थितः -  धरून चालणारा - असक्तः -  अलिप्तपणाने - द्वार्वत्यां -  द्वारकेत - कामान् -  विषयांना - सिषेवे -  सेविता झाला ॥१९॥ 
 
विश्वात्मा श्रीभगवंतांनी सुद्धा द्वारकापुरीत राहून लोक आणि वेदांच्या मर्यादांचे पालन करीत सर्व प्रकारचे भोग भोगले; परंतु सांख्ययोगानुसार भोगात ते कधी आसक्त झाले नाहीत. (१९) 
 
स्निग्धस्मितावलोकेन वाचा पीयूषकल्पया ।  
चरित्रेणानवद्येन श्रीनिकेतेन चात्मना ॥ २० ॥ इमं लोकममुं चैव रमयन् सुतरां यदून् । रेमे क्षणदया दत्त क्षणस्त्रीक्षणसौहृदः ॥ २१ ॥ 
मधूर हासणे आणि स्नेहाळ पाहणे तसे । अमृतमय ती वाणी सौंदर्ये व्यापले जग ॥ २० ॥ यादवा दिधले सौख्य प्रियांना रजनी सुख । यथोचित विहाराने सर्वांना सुखची दिले ॥ २१ ॥ 
 स्निग्धस्मितावलोकेन -  प्रेमयुक्त हास्यपूर्वक अवलोकनाने - पीयूषकल्पया -  अमृतासारख्या मधुर - वाचा -  वाणीने - अनवद्येन -  स्तुत्य अशा - चरित्रेण -  कृत्यांनी - च -  आणि - श्रीनिकेतेन -  लक्ष्मीचे निवासस्थान अशा - आत्मना -  स्वतःकडून ॥२०॥  क्षणदया -  रात्रीमुळे - दत्तक्षणस्त्रीक्षणसौहृदः -  दिला आहे ज्याने क्षणमात्रपर्यंत स्त्रियांच्या ठिकाणी प्रेम करण्याकरिता कालावधि दिला आहे असा तो श्रीकृष्ण - इमं -  ह्या - लोकं -  लोकाला - अमुं -  दुसर्याला म्हणजे परलोकाला - च एव -  आणिहि - यदून् -  यादवांना - सुतरां -  अत्यंत - रमयन् -  रमविणारा - रेमे -  रममाण होता झाला ॥२१॥ 
 
मधुर हास्य, स्नेहपूर्ण दृष्टी, अमृतासारखी वाणी, निर्मल चारित्र्य, आणि सुंदर असे दिव्य शरीर यांनी लोक-परलोक तसेच यादवांना आनंदित केले. रात्रीच्या वेळी पत्नींसह क्षणभर प्रेममय होऊन त्यांनाही सुख दिले. (२०-२१) 
 
तस्यैवं रममाणस्य संवत्सरगणान् बहून् ।  
गृहमेधेषु योगेषु विरागः समजायत ॥ २२ ॥ 
अनेक वर्षही त्याने गृहस्थाश्रम भोगिला । भोगिता भोग सामग्री वैराग्य धारिले तये ॥ २२ ॥ 
 एवं -  ह्याप्रमाणे - बृहन् -  पुष्कळ - संवत्सरगणान् -  वर्षसमूहांना - रममाणस्य -  रममाण होणार्या  - तस्य -  त्यास - गृहमेधेषु -  गार्हस्थ्यधर्माविषयी - योगेषु -  व सांसारिक विषयांविषयी - विरागः -  वैराग्य - समजायत -  उत्पन्न झाले ॥२२॥  
 
अशा प्रकारे अनेक वर्षे सुखोपभोगात गेल्यानंतर त्यांना गृहस्थाश्रमासंबंधी उपभोगसामग्रीबद्दल वैराग्य निर्माण झाले. (२२) 
 
दैवाधीनेषु कामेषु दैवाधीनः स्वयं पुमान् ।  
को विश्रम्भेत योगेन योगेश्वरमनुव्रतः ॥ २३ ॥ 
भोगसामग्रि या सार्या ईश्वराधीन जीव हा वैराग्य बोलता ऐसे भक्तांनी काया मानणे ॥ २३ ॥ 
 योगेन -  योगाने - योगेश्वरं -  योगश्रेष्ठ श्रीकृष्णाला - अनुव्रतः -  अनुसरणारा - कः -  कोणता - पुमान् -  पुरुष - स्वयं -  स्वतः - दैवाधिनः -  दैवाच्यास्वाधीन होणारा असून - दैवाधीनेषु -  दैवाच्या स्वाधीन असणार्या - कामेषु -  विषयांवर - विस्त्रम्भेत -  विश्वास ठेवील ॥२३॥ 
 
विषयोपभोग आणि जीवसुद्धा दैवाधीन आहेत. जर योगेश्वर श्रीकृष्णांनासुद्धा त्याबाबत वैराग्य निर्माण झाले, तर भक्तियोगाने त्यांना अनुसरणारा भक्त विषयांवर विश्वास कसा ठेवील ? (२३) 
 
पुर्यां कदाचित् क्रीडद्भिः यदुभोजकुमारकैः ।  
कोपिता मुनयः शेपुः भगवन् मतकोविदाः ॥ २४ ॥ 
यदु नी भोजवंशीच्या मुलांनी खेळता ऋषि । छेडिता "कुळिचा नाश" होईल ऋषि बोलले ॥ २४ 
 कदाचित् -  एके काळी - पुर्यां -  नगरीत - क्रीडद्भिः -  खेळणार्या - यदुभोजकुमारकैः -  यदुवंशातील व भोजवंशातील बालकांना - कोपिताः -  क्रोधयुक्त केलेले - भगवन्मतकोविदाः -  श्रीकृष्णाचा अभिप्राय जाणणारे - मुनयः -  ऋषि - शेपुः -  शाप देते झाले ॥२४॥ 
 
एकदा द्वारकेत खेळत असता यदुवंशी आणि भोजवंशी मुलांनी काही मुनीश्वरांना चिडविले. भगवंतांना यदुकुलाचा नाशच अभिप्रेत आहे असे समजून त्या ऋषींनी त्या मुलांना शाप दिला. (२४) 
 
ततः कतिपयैर्मासैः वृष्णिभोज अन्धकादयः ।  
ययुः प्रभासं संहृष्टा रथैर्देवविमोहिताः ॥ २५ ॥ 
कांही मास पुढे तेंव्हा वृष्णि भोज नि यादव । हर्षाने रथि बैसोनी प्रभास क्षेत्री पातले ॥ २५ ॥ 
 ततः -  नंतर - कतिपयैः -  कित्येक - मासैः -  महिन्यांनी - संहृष्टा -  आनंदाच्या भरात आलेले - वृष्णिभोजान्धकादयः -  वृष्णि, भोज व अंधक वगैरे वंशांतील यादव - देवविमोहिताः -  श्रीकृष्णाच्या मायेने मोहित झालेले होत्साते - रथैः -  रथात बसून - प्रभासं -  प्रभास क्षेत्राला - ययुः -  जाते झाले ॥२५॥ 
 
काही महिने उलटल्यानंतर देवमायेने मोहित झालेले वृष्णी, भोज आणि अंधक वंशातील यादव मोठया आनंदाने रथात बसून प्रभासक्षेत्री गेले. (२५) 
 
तत्र स्नात्वा पितॄन् देवान् ऋषींश्चैव तदम्भसा ।  
तर्पयित्वाथ विप्रेभ्यो गावो बहुगुणा ददुः ॥ २६ ॥ 
तीर्थी स्नान करोनीया पितृ देव ऋषीस ही । तर्पिले दिधल्या गाई ब्राह्मणा दक्षिणा दिली ॥ २६ ॥ 
 तत्र -  तेथे - स्नात्वा -  स्नान करून - तदम्भसा -  त्याच्या उदकाने - पितृन् -  पितरांना - देवान् -  देवांना - च -  आणि - ऋषीन् -  ऋषींना - एव -  सुद्धा - तर्पयित्वा -  तृप्त करून - अथ -  नंतर - बहुगुणाः -  पुष्कळ गुणांनी युक्त अशा - गावः -  गाई - विप्रेभ्यः -  ब्राह्मणांना - ददुः -  देते झाले ॥२६॥ 
 
त्यांनी तेथे स्नान करून त्या तीर्थातील पाण्याने पितर, देवता आणि ऋषींचे तर्पण केले आणि ब्राह्मणांना उत्तमोत्तम गायी दान दिल्या. (२६) 
 
हिरण्यं रजतं शय्यां वासांस्यजिनकम्बलान् ।  
यानं रथानिभान् कन्या धरां वृत्तिकरीमपि ॥ २७ ॥ अन्नं चोरुरसं तेभ्यो दत्त्वा भगवदर्पणम् । गोविप्रार्थासवः शूराः प्रणेमुर्भुवि मूर्धभिः ॥ २८ ॥ 
सोने आणीक शय्यादी मृगचर्म नि वस्त्रही । कांबळे पालख्या हत्ती रथ कन्या भुमी तशी ॥ २७ ॥ जीवितार्थ असे दान अन्नादी ब्राह्मणा दिले । ज्यांचे प्राण द्विज गाई त्यांनी पृथ्वीस वंदिले ॥ २८ ॥ 
 हिरण्यं -  सुवर्ण - रजतं -  रुपे - शय्यां -  बिछाना - वासांसि -  वस्त्रे - अजिनकम्बलान् -  मृगचर्म व घोंगड्या किंवा शालजोड्या - यानं -  पालख्या - रथान् -  रथ - इभान् -  हत्ती - कन्याः -  कन्या - वृत्तिकरीं -  उपजीविका करण्याजोगी - धरां - पृथ्वी - अपि -  सुद्धा - ददुः -  ह्या सर्वांना देते झाले ॥२७॥  गोविप्रार्थासवः -  गाईकरिता व ब्राह्मणांकरिता ज्यांचे जगणे आहे असे - शूराः -  पराक्रमी - उरुरसं -  पुष्कळ रसांनी भरलेल्या - अन्नं -  अन्नाला - भगवदर्पणं -  श्रीकृष्णाला अर्पण करण्याच्या बुद्धीने - तेभ्यः -  त्या ब्राह्मणांना - दत्त्वा -  देऊन - च -  आणि - मूर्धभिः -  मस्तकांनी - भुवि -  जमिनीवर पडून - प्रणेमुः -  नमस्कार करिते झाले ॥२८॥ 
 
त्यांनी सोने, चांदी, बिछाने, वस्त्रे, मृगचर्म, कांबळी, वाहने, रथ, हत्ती, कन्या, उपजीविका होऊ शकेल अशी शेतजमीन आणि अनेक प्रकारचे रुचकर अन्न भगवंतांना अर्पण करून ब्राह्मणांना दिले. त्यानंतर गायी आणि ब्राह्मणांसाठी जीवित वेचणार्या त्या वीरांनी जमिनीवर डोके टेकवून त्यांना नमस्कार केला. (२७-२८) 
 
स्कंध तिसरा - अध्याय तिसरा समाप्त  |