श्रीमद् भागवत पुराण
तृतीयः स्कन्धः
द्वितीयोऽध्यायः

प्रभुविरह विषण्णेन उद्धवेन संक्षेपतः श्रीकृष्णबाललीलावर्णनम् -

भगवंतांच्या बाललीलांचे उद्धवाने केलेले वर्णन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच ।
इति भागवतः पृष्टः क्षत्त्रा वार्तां प्रियाश्रयाम् ।
प्रतिवक्तुं न चोत्सेह औत्कण्ठ्यात् स्मारितेश्वरः ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
अनुष्टुप् )
उद्धवे ऐकता प्रश्न स्वामीच्या आठवे तदा ।
आले भरूनिया ऊर नच बोलला ॥ १ ॥

इति - याप्रमाणे - क्षत्त्रा - विदुराने - प्रियाश्रयां - आपला आवडता जो श्रीकृष्ण त्यासंबंधी - वार्तां - कथेबद्दल - पृष्टः - विचारलेला - च - आणि त्यामुळे - स्मारितेश्वरः - श्रीकृष्णाची आठवण झालेला - भागवतः - भगवद्‍भक्त उद्धव - औत्कणठ्यात् - उत्कंठेने - प्रतिवक्‍तुं - उत्तर देण्यास - न उत्सेहे - उत्साहित झाला नाही. ॥१॥
श्री शुकदेव म्हणाले - जेव्हा विदुराने परम भक्त उद्धवाला अशा प्रकारे त्याच्या प्रियतम श्रीकृष्णासंबंधी विचारले, तेव्हा त्याला आपल्या स्वामींची आठवण झाली आणि त्यामुळे त्याचे हृदय उचंबळून आल्याने तो काहीच उत्तर देऊ शकला नाही. (१)


यः पञ्चहायनो मात्रा प्रातराशाय याचितः ।
तन्नैच्छत् रचयन् यस्य सपर्यां बाललीलया ॥ २ ॥
जो शिशू असता पाच वर्षाचा खेळ खेळता ।
कृष्णाची बाहुली खेळे तन्मये पूजिही तया ॥ २ ॥

यः - जो - उद्धवः - उद्धव - पञ्‍चहायनः - पाच वर्षांचा असताना - मात्रा - आईने - प्रातराशाय - सकाळच्या जेवणाकरिता - याचितः - बोलविला असता - बाललीलया - बाळपणाच्या खेळण्याने - यस्य - ज्या श्रीकृष्णाच्या - सपर्यां - पूजेला - रचयन् - करणारा होत्साता - तत् - ते जेवण - न ऐच्छत् - न इच्छिता झाला. ॥२॥
जेव्हा उद्धव पाच वर्षांचा होता, तेव्हा बालपणी खेळतानाही श्रीकृष्णाची मूर्ती करुन तिच्या पूजेत इतका तन्मय होत असे की, न्याहारीसाठी आईने बोलावले तरी तो येत नसे. (२)


स कथं सेवया तस्य कालेन जरसं गतः ।
पृष्टो वार्तां प्रतिब्रूयाद् भर्तुः पादौ अनुस्मरन् ॥ ३ ॥
आता तो वृद्धही झाला कृष्णाचे पद सेविता ।
प्रभूच्या स्मरणे दुःखी कैसा तो बोलुची शके ॥ ३ ॥

तस्य - त्या श्रीकृष्णाची - सेवया - सेवा करिता करिता - कालेन - काळाने - जरसं - वृद्धत्वाला - गतः - गेलेला - वार्तां - श्रीकृष्णकथांविषयी - पृष्टः - विचारलेला - भर्तुः - श्रीकृष्णाच्या - पादौ - पायांना - अनुस्मरन् - आठवणारा - सः - तो उद्धव - कथं - कसा - प्रतिब्रूयात् - प्रत्युत्तर देणार. ॥३॥
तोच आता पुष्कळ वर्षे त्यांच्याच सेवेत राहून म्हातारा झाला होता. म्हणून विदुराने विचारल्यावर आपल्या प्रिय प्रभूंच्या चरणकमलांच्या स्मरणाने तो व्याकूळ झाला. अशा स्थितीत तो कसे उत्तर देऊ शकणार ? (३)


स मुहूर्तं अभूत्तूष्णीं कृष्णाङ्‌घ्रिसुधया भृशम् ।
तीव्रेण भक्तियोगेन निमग्नः साधु निर्वृतः ॥ ४ ॥
श्रीकृष्णपादपद्माच्या सुगंधा मनि आठवी ।
भक्तिच्या डुंबता मोदीं मग्न तो बोलु नाशके ॥ ४ ॥

कृष्णाङ्‍‌घ्रिसुधया - श्रीकृष्णचरणरूपी अमृताने - साधुनिर्वतः - चांगल्या तर्‍हेने आनंदसुखात मग्‍न झालेला - तीव्रेण - उत्कट - भक्‍तियोगेन - भक्‍तियोगाने - भृशं - अत्यंत - निमग्नः - आनंदात बुडून गेलेला - सः - तो - मुहूर्तं - दोन घटका - तूष्णीं - स्तब्ध - अभूत् - झाला ॥४॥
तो दोन घटका काहीच बोलू शकला नाही. नंतर श्रीकृष्णांच्या चरणारविंद-मकरंद-सुधापानाने तीव्र भक्तियोगात बुडून जाऊन तो आनंदमग्न झाला. (४)


पुलकोद् भिन्नसर्वाङ्गो मुञ्चन्मीलद्‌दृशा शुचः ।
पूर्णार्थो लक्षितस्तेन स्नेहप्रसरसम्प्लुतः ॥ ५ ॥
रोमांच उठले अंगी अश्रुंचा पूर लोटला ।
पाहुनी विदुरे त्याते कृतकृत्यचि मानिले ॥ ५ ॥

पुलकोद्‌‍भिन्नसर्वाङ्गः - ज्याच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले आहेत असा - मीलद्‌‍दॄशा - किंचित मिटलेल्या डोळ्याने - शुचः - दुःखाश्रूंना - मुञ्चन् - टाकणारा - स्नेहप्रसरसंप्लुतः - प्रेमाच्या मोठ्या वेगाने व्यापून गेलेला - तेन - त्यायोगे - पूर्णार्थः - कृतकृत्य झाल्याप्रमाणे - लक्षितः - दिसत होता. ॥५॥
त्याच्या शरीरावर रोमांच दाटून आले आणि अर्धोन्मीलित नेत्रांतून अश्रुधारा वाहू लागल्या. अशा प्रकारे उद्धवाला प्रेमप्रवाहात बुडून गेलेला पाहून विदुराने त्याचे जीवन कृतकृत्य मानले. (५)


शनकैः भगवल्लोकान् नृलोकं पुनरागतः ।
विमृज्य नेत्रे विदुरं प्रीत्याहोद्धव उत्स्मयन् ॥ ६ ॥
प्रेमधामतुनी शांत संसारी मग पातता ।
प्रेमाश्रु पुसुनी लीला कृष्णाच्या सांगु लागले ॥ ६ ॥

शनकैः - हळूहळू - भगवल्लोकात् - भगवंताच्या लोकातून - पुनः - फिरून - नृलोकं - मनुष्यलोकाला - आगतः - आलेला - उद्धवः - उद्धव - नेत्रे - डोळे - विमृज्य - पुसून - उत्स्मयन् - आश्चर्य करणारा होत्साता - विदुरं - विदुराला - प्रत्याह - उत्तर देऊ लागला. ॥६॥
हळूहळू जेव्हा उद्धव भगवंतांच्या प्रेमधामातून पुन्हा या लोकात आला, तेव्हा त्याने आपले डोळे पुसले आणि भगवंतांच्या लीलांच्या स्मरणाने आश्चर्यचकित हो‌ऊन तो विदुराला म्हणाला. (६)


उद्धव उवाच ।
कृष्णद्युमणि निम्लोचे गीर्णेष्वजगरेण ह ।
किं नु नः कुशलं ब्रूयां गतश्रीषु गृहेष्वहम् ॥ ७ ॥
उद्धवजी म्हणाले-
श्रीकृष्ण सूर्यलोपाने काळसर्प गिळी घरे ।
श्रीहीन सगळे झाले कुळ ते काय बोलणे ॥ ७ ॥

कृष्णद्युमणिनिम्लोचे - कृष्णरूपी सूर्याचा अस्त झाला असता - अजगरेण - काळरूपी अजगराने - गीर्णेषु - गिळलेली - नः - आमची - गृहेषु - घरे - गतश्रीषु - शोभारहित झाली असता - ह - खरोखर - अहं - मी - कुशलं - खुशाली - किं नु ब्रूयाम् - काय बरे सांगणार? ॥७॥
उद्धव म्हणाला - श्रीकृष्णरूप सूर्य अस्ताला गेल्याने आमच्या घरांना कालरूप अजगराने गिळून टाकले आहे. आमची घरे ओसाड झाली आहेत. आता मी त्यांचे काय कुशल सांगू ? (७)


दुर्भगो बत लोकोऽयं यदवो नितरामपि ।
ये संवसन्तो न विदुः हरिं मीना इवोडुपम् ॥ ८ ॥
अभागी पृथिवीलोक अतिदुर्दैवि यादव ।
नोळखी कुणि कृष्णाते चंद्राते मीन ते जसे ॥ ८ ॥

अयं - हा - लोकः - भूलोक - बत - अरेरे - दुर्भगः - दुर्दैवी होय. - यदवः - यादव - अपि - सुद्धा - नितरां - फारच - दुर्भगाः - दुर्दैवी - ये - जे - श्रीकृष्णेन - कृष्णाशी - संवसतः - एकत्र सहवास करूनही - मीनाः - मासे - उडुपम् इव - चंद्राप्रमाणे - हरि - श्रीकृष्णाला - न विदुः - जाणु शकले नाहीत. ॥८॥
अहो ! हा मनुष्य-लोक केवढा अभागी आणि त्यातून यादव तर अतिशय भाग्यहीन आहेत. जे नेहमी श्रीकृष्णांच्या बरोबर राहूनही त्यांना ओळखू शकले नाहीत; जसे अमृतमय चंद्राला समुद्रात राहात असतांनाही मासे ओळखू शकले नाहीत. (८)


इङ्‌गितज्ञाः पुरुप्रौढा एकारामाश्च सात्वताः ।
सात्वतां ऋषभं सर्वे भूतावासममंसत ॥ ९ ॥
चतुर पोक्त नी तैसे कृष्णासी नित्य क्रीडती ।
परी त्या यादवे कोणी कृष्णां ओळखिले नसे ॥ ९ ॥

इंगितज्ञाः - मनातील अभिप्रायांना व हालचालींना जाणण्यात हुशार - पुरुप्रौढाः - फारच प्रौढ - च - आणि - एकारामाः - एकत्र क्रीडादि करणारे - सर्वे - सगळे - सात्वताः - यादव - भूतावासः - प्राणिमात्रांत वास्तव्य करणार्‍या श्रीकृष्णाला - सात्वतां - यादवांमध्ये - ऋषभं - एक श्रेष्ठ अशा तर्‍हेनेच - अमंसत - मानीत असत ॥९॥
यादवलोक तर मनातील भाव ओळखणारे, मोठे समजूतदार आणि भगवंतांच्या बरोबर एकाच ठिकाणी राहून त्यांच्याबरोबर व्यवहार करणारे होते. तरीसुद्धा ते सर्वजण, समस्त विश्वाचे आश्रय, सर्वांतर्यामी श्रीकृष्णांना एक श्रेष्ठ यादवच समजले. (९)


देवस्य मायया स्पृष्टा ये चान्यद् असदाश्रिताः ।
भ्राम्यते धीर्न तद्वाक्यैः आत्मन्युप्तात्मनो हरौ ॥ १० ॥
मायेने मोहिले सारे निंदिले शिशुपालने ।
भक्तांनी ऐकता कानी तयांना भ्रम ना पडे ॥ १० ॥

देवस्य - परमेश्वराच्या - मायया - मायेने - स्पृष्टाः - मोहित झालेले - च - आणि - ये - जे - अन्यदसदाश्रिताः - दुसर्‍या वैरादि वाईट गोष्टींना चिकटून राहिलेले - तद्वाक्यैः - त्यांच्या भाषणांनी - आत्मनिं - आत्मस्वरूपी - हरौ - श्रीकृष्णाच्या ठीकाणी - उप्तात्मनः - ठेविला आहे अन्तःकरण ज्याने अशा - मे - माझी - धीः - बुद्धि - न भ्राम्यते - भ्रम पावत नाही ॥१०॥
परंतु भगवंतांच्या मायेने मोहित झालेले हे यादव आणि भगवंतांशी विनाकारण वैर करणारे शिशुपाल इत्यादी यांच्या अवहेलना आणि निंदायुक्त भाषणाने भगवंत हेच ज्यांचे प्राण आहेत, त्या महात्म्यांची बुद्धी कधी विचलित होत नाही. (१०)


प्रदर्श्या तप्ततपसां अवितृप्तदृशां नृणाम् ।
आदायान्तरधाद्यस्तु स्वबिम्बं लोकलोचनम् ॥ ११ ॥
न तपी असता भक्त त्यांच्यात रमला हरी ।
अतृप्त ठेवुनी त्यांना गेलाही निजधामी तो ॥ ११ ॥

यः - जो - तु - तर - अतप्ततपसां - तपादि कृत्य ज्यांनी केले नाही अशा - अवितृप्तदृशां - ज्यांच्या दृष्टि तृप्त झाल्या नाहीत अशा - नृणां - मनुष्यांच्या पुढे - स्वबिम्बं - आपले स्वरूप - प्रदर्श्य - दाखवून - लोकलोचनं - लोकांचे नेत्रच झालेले असे - आदाय - घेऊन - अन्तरधात् - गुप्त झाला. ॥११॥
ज्यांनी कधी तप केले नाही, त्या लोकांनासुद्धा इतके दिवस दर्शन देऊन आता त्यांची दर्शन-इच्छा तृप्त न करताच ते भगवान श्रीकृष्ण आपल्या श्रीविग्रहाला लपवून अंतर्धान पावले आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्यांचे डोळेच जणू काढून घेतले आहेत. (११)


यन्मर्त्यलीलौपयिकं स्वयोग
     मायाबलं दर्शयता गृहीतम् ।
विस्मापनं स्वस्य च सौभगर्द्धेः
     परं पदं भूषणभूषणाङ्गम् ॥ १२ ॥
( इंद्रवज्रा )
माया प्रभावा जगातात दिव्य
    दावावया तो प्रगटोनि आला ।
लीला नि रूपे जग मोहियेले
    तो देखणा वाढवि रत्‍नशोभा ॥ १२ ॥

स्वयोगमायाबलं - आपल्या योगमायेच्या सामर्थ्याला - दर्शयता - दाखविणार्‍या - परमेश्वरेण - परमेश्वराने - गृहीतं - घेतलेले - यत् - जे - मर्त्यलीलौपयिकं - मानवी लीलांना उपयोगी असे स्वरूप - स्वस्य - स्वतःलाहि - विस्मापनं - थक्क करून सोडणारे - सौभगर्द्धेः - सौंदर्य व ऐश्वर्य ह्यांची - परं - अद्वितीय - पदं - सीमाच की काय असे - भूषणभूषणाङ्‌‍गं - दागिन्यांना शोभा आणणार्‍या सुंदर अवयवांनी युक्‍त असे - अभूत् - झाले. ॥१२॥
भगवंतांनी आपल्या योगमायेचा प्रभाव दाखविण्यासाठी मानवी-लीलांसाठी योग्य असे जे दिव्य रुप घेतले होते, ते इतके सुंदर होते की, ते पाहून संपूर्ण जग तर मोहित झालेच होते; परंतु ते स्वतःही आश्चर्यचकित होत होते. त्या रूपामध्ये सौभाग्य आणि सुंदरतेची पराकाष्ठा झाली होती. त्यांच्या अंगावरील आभूषणे त्यांच्या सौंदर्यामुळे विभूषित झाली होती. (१२)


यद्धर्मसूनोर्बत राजसूये
     निरीक्ष्य दृक्स्वस्त्ययनं त्रिलोकः ।
कार्त्स्न्येन चाद्येह गतं विधातुः
     अर्वाक्सृतौ कौशलमित्यमन्यत ॥ १३ ॥
यज्ञात पाहून युधिष्ठिराच्या
    आश्चर्य शब्दे जनकीर्ती गाती ।
चातुर्यमूर्ती मनुसृष्टिच्या हा
श्रीकृष्णरूपी गमतो त्रिलोकी ॥ १३ ॥

त्रिलोकः - संपूर्ण त्रैलोक्य - धर्मसूनोः - धर्मराजाच्या - राजसूये - राजसूय यज्ञात - दृक्स्वस्त्यनं - दृष्टीला आनंद देणार्‍या - यत् - ज्या स्वरूपाला - निरीक्ष्य - पाहून - च - आणि - विधातुः - ब्रह्मदेवाचे - अर्वाक्सृतौ - आधुनिक सृष्टिनिर्माणविषयक - कौशलं - नैपुण्य - अद्य - आज - इह - ह्या स्वरूपनिर्माणक्रियेत - कात्स्‌‍र्न्येन - संपूर्ण रीतीने - गतं - खर्ची पडले - इति - असे - बत - खरोखर - अमन्यत - मानिते झाले. ॥१३॥
धर्मराज युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी जेव्हा भगवंतांच्या त्या नयनमनोहर रूपावर लोकांची दृष्टी गेली, तेव्हा त्रैलोक्यातील लोकांना असेच वाटले की, सध्याच्या मानव सृष्टीच्या रचनेमध्ये विधात्याची जेवढी चतुराई आहे ती सर्व या रूपात पूर्णतया उतरली आहे. (१३)


यस्यानुरागप्लुतहासरास
     लीलावलोकप्रतिलब्धमानाः ।
व्रजस्त्रियो दृग्भिरनुप्रवृत्त
     धियोऽवतस्थुः किल कृत्यशेषाः ॥ १४ ॥
विनोद हास्ये अन प्रेमदृष्टी
    ती पाहता गौळणि लुब्ध झाल्या ।
सोडोनि सारे घरकाम-धंदा
    मूर्तीपरी त्या स्थिर वाटल्या की ॥ १४ ॥

यस्य - ज्याचे - अनुरागप्लुतहास - प्रेमाने परिपूर्ण असे हास्य, - रासलीलावलोकप्रतिलब्धमानाः - रासक्रीडा, कटाक्ष ह्यामुळे मिळाला आहे बहुमान ज्यांना अशा - दृग्भिः - अवलोकनांनीच - अनुप्रवृत्तधियः - तद्रूप झाले आहे मन ज्यांचे अशा - व्रजस्त्रियः - गोकुळातील स्त्रिया - कृत्यशेषाः - करावयाची कामे ज्याची शिल्लक राहिली आहेत अशा - किल - खरोखर - अवतस्थुः - स्तब्ध रहात. ॥१४॥
त्यांचा प्रेमळ हास्यविनोद आणि लीलेने पाहण्याने संमानित व्रजबालांच्या नजरा त्यांच्यावरच खिळून राहात असत आणि त्यांचे चित्त असे तल्लीन हो‍ऊन जात असे की, त्या घरातील काम-धंदा अर्धवट सोडून पुतळ्याप्रमाणे उभ्या राहात असत. (१४)


स्वशान्तरूपेष्वितरैः स्वरूपैः
     अभ्यर्द्यमानेष्वनुकम्पितात्मा ।
परावरेशो महदंशयुक्तो
     ह्यजोऽपि जातो भगवान् यथाग्निः ॥ १५ ॥
चराचराचा जधि स्वामि पाही
    स्वरूप संतास स्वरूप घोर ।
त्या राक्षसे त्रासियल्या क्षणासी
    बळीसवे कृष्णरुपात जन्मे ॥ १५ ॥

स्वशान्तरूपेषुः - आपली शान्त स्वरूपे - इतरैः - अशान्त म्हणजे क्रूर अशा - स्वरूपैः - स्वरूपांनी - अभ्यर्द्यमानेषु - पीडित झाली असता - अनुकम्पितात्मा - दया उत्पन्न झाली आहे मनात ज्याच्या असा - परावरेशः - निर्गुण ब्रह्म व सगुण ब्रह्म यांचा स्वामी - महदंशयुक्‍तः - महत्तत्त्व आहे अंशभूत जिचा त्या प्रकृतीने युक्‍त हो‍ऊन - अजः अपि - जन्मरहित असूनहि - भगवान् - परमेश्वर - यथा अग्निः - जसा अग्नि तसा - जातः - उत्पन्न झाला. ॥१५॥
चराचर जगत आणि प्रकृतीचे स्वामी असलेल्या भगवंतांनी जेव्हा असे पाहिले की, शांत स्वभावाच्या महात्म्यांना आपल्याच घोररूपात असलेल्या असुरांकडून पीडा होत आहे, तेव्हा ते करुणेने द्रवले आणि अजन्मा असूनही बलरामासह, लाकडातील अग्नीप्रमाणे प्रगट झाले. (१५)


मां खेदयत्येतदजस्य जन्म
     विडम्बनं यद्वसुदेवगेहे ।
व्रजे च वासोऽरिभयादिव स्वयं
     पुराद् व्यवात्सीद् यत् अनन्तवीर्यः ॥ १६ ॥
ना जन्म त्यां तो वसुदेव गेही
    जन्मूनि लीला करणे तयाने ।
वृंदावनी तोचि लपोनि राही
    भीती जणू त्या हरि शक्तिमंता ॥ १६ ॥

अजस्य - जन्मरहित भगवंताचे - यत् - जे - वसुदेवगेहे - वसुदेवाच्या घरी - जन्मविडंबनं - जन्म घेण्याच्या कृतीचे अनुकरण - च - आणि - अरिभयात् इव - शत्रूच्या भीतीनेच की काय - व्रजे - गोकुळात - वासः - रहाणे - स्वयं - स्वतः - अनन्तवीर्यः - महापराक्रमी असता - पुरात् - नगरातून - यत् व्यवात्सीत् - जो पळून दुसरीकडे गेला - एतत् - हे - मां - मला - खेदयति - पीडा देत आहे ॥१६॥
अजन्मा असूनही वसुदेवाच्या घरी जन्म घेण्याची लीला करणे, सर्वांना अभय देणारे असूनही जणू काही कंसाच्या भीतीने व्रजवनात जाऊन लपून राहाणे आणि अतुल पराक्रमी असूनही कालयवनाच्या समोरून मथुरानगरी सोडून पळून जाणे या भगवंतांच्या लीला आठवून मला काही सुचेनासे होत आहे. (१६)


दुनोति चेतः स्मरतो ममैतद्
     यदाह पादावभिवन्द्य पित्रोः ।
ताताम्ब कंसाद् उरुशंकितानां
     प्रसीदतं नोऽकृतनिष्कृतीनाम् ॥ १७ ॥
वंदूनि माता-पितयां पदाला
    बोले मला कंसभये न सेवा ।
घडे करावी मजला क्षमा ती
    हे ध्यानी येता मनि चैन नाही ॥ १७ ॥

पित्रोः - आईबापांच्या - पादौ - पायांना - अभिवंद्य - नमस्कार करून - तात - अहो बाबा - अंब - हे आई - कंसात् - कंसापासून - उरु - फारच - शङ्कितानां - भ्यालेल्या अशा - अकृतनिष्कृतीनां - केली नाही उपकाराची फेड ज्यांनी अशा - नः - आमच्यावर - प्रसीदतं - प्रसन्न व्हा - इति - असे - यत् - जे - आह - बोलला - एतत् - ह्याला - स्मरतः - स्मरण करणार्‍या - मम - माझे - चेतः - मन - दुनोति - दुःखी होते ॥१७॥
देवकी-वसुदेवांना नमस्कार करून श्रीकृष्ण म्हणाले होते - ‘तात ! माते ! कंसाचे मोठे भय असल्या कारणाने मी आपली काही सेवा करू शकलो नाही. या माझ्या अपराधाकडे आपण लक्ष न देता माझ्यावर प्रसन्न असावे.’ श्रीकृष्णांचे हे शब्द जेव्हा आठवतात, तेव्हा आजही माझे चित्त व्याकूळ होते. (१७)


को वा अमुष्याङ्‌घ्रिसरोजरेणुं
     विस्मर्तुमीशीत पुमान् विजिघ्रन् ।
यो विस्फुरद्‍भ्रूविटपेन भूमेः
     भारं कृतान्तेन तिरश्चकार ॥ १८ ॥
जो कालरूपेचि कटाक्ष टाकी
    भूमीवरीचा हरि भार सारा ।
त्या पादपद्मास कुणा न मोह
    कोणास त्याचा सहवे दुरावा ॥ १८ ॥

यः - जो - विस्फुरद्‍भ्रूविटपेन - चमकणार्‍या अशा आपल्या वेलीसारख्या भ्रुकुटीने - कृतान्तेन - काळाकडून - भूमेः - पृथ्वीच्या - भारं - भाराला - तिरश्चकार - नाहीसा करता झाला - अमुष्य - ह्याच्या - अङ्‌‍घ्रिसरोजरेणुं - चरणकमलाच्या धुळीला - विजिघ्रन - हुंगणारा - कः वा - कोणता बरे - पुमान् - पुरुष - विस्मर्तुं - विसरण्याला - ईशीत - समर्थ होईल ॥१८॥
कालरूप असलेल्या ज्यांनी आपल्या केवळ भुवया वाकडया करून पृथ्वीवरील सर्व भार नष्ट केला, त्या श्रीकृष्णांच्या चरणकमलपरागाचा सुगंध घेतलेला कोण त्यांना विसरू शकेल ? (१८)


दृष्टा भवद्‌भिः ननु राजसूये
     चैद्यस्य कृष्णं द्विषतोऽपि सिद्धिः ।
यां योगिनः संस्पृहयन्ति सम्यग्
     योगेन कस्तद्विरहं सहेत ॥ १९ ॥
यज्ञात तेंव्हा शिशुपाल भोगी
    शिक्षा, तयाचा करि द्वेष नित्य ।
योगी जयाचे पद नित्य ध्याती
    कोणास त्याचा सहवे दुरावा ॥ १९ ॥

भवद्‌‍भिः - आपल्याकडून - राजसूये - राजसूय यज्ञात - कृष्णं - श्रीकृष्णाला - द्विषतः - शत्रू मानणार्‍या - अपि - सुद्धा - चैद्यस्य - शिशुपालाची - सिद्धिः - मुक्‍ती किंवा सद्‌गति - दृष्टा - पाहिली गेली - ननु - खरोखर - यां - जिला - योगिनः - योगी - सम्यग्योगेन - चांगल्या योगमार्गाने - संस्पृहयंति - विशषतः इच्छितात - तद्विरहं - त्याच्या वियोगाला - कः - कोण - सहेत - सहन करील ॥१९॥
आपण सर्वांनी राजसूय यज्ञाच्या वेळी प्रत्यक्षच पाहिले की, श्रीकृष्णांचा द्वेष करणार्‍या शिशुपालाला अशी गती प्राप्त झाली की, जी योगी कठोर योगसाधना करून प्राप्त करू इच्छितात. त्या श्रीकृष्णांचा विरह कोणाला बरे सहन होईल ? (१९)


तथैव चान्ये नरलोकवीरा
     य आहवे कृष्णमुखारविन्दम् ।
नेत्रैः पिबन्तो नयनाभिरामं
     पार्थास्त्रपूतः पदमापुरस्य ॥ २० ॥
ज्यांनी महाभारत युद्ध क्षेत्री
    अर्जुनबाणास पडोनि घास ।
सोडीयला प्राणचि कृष्ण ध्याता
    त्यां लाभला मोक्ष सदा निवासा ॥ २० ॥

तथैव - त्याचप्रमाणे - च - आणि - आहवे - युद्धात - ये - जे - अन्ये - दुसरे - नरलोकवीराः - मनुष्यलोकातील शूर पुरुष - नयनाभिरामं - डोळ्यांना आनंद देणार्‍या - कृष्णमुखारविन्दं - श्रीकृष्णाच्या मुखकमलाला - नेत्रैः - डोळ्यांनी - पिबन्तः - पिणारे म्हणजे पाहणारे - पार्थास्त्रपूताः - अर्जुनाच्या अस्त्रांनी पवित्र झालेले - ते - ते शत्रुपक्षीय कौरवसैन्यातील लोक - अस्य - ह्या श्रीकृष्णाच्या - पदं - मोक्षस्थानाला - आपुः - प्राप्त झाले. ॥२०॥
शिशुपालाप्रमाणेच महाभारत-युद्धामध्ये ज्या शत्रुपक्षाच्या योद्ध्यांनी आपल्या डोळ्यांनी नयनाभिराम श्रीकृष्णांच्या मुखकमलाचे अवलोकन करीत अर्जुनाच्या बाणांनी घायाळ हो‌ऊन प्राणत्याग केला, ते सर्वजण पवित्र हो‌ऊन भगवंतांच्या परमधामाला प्राप्त झाले. (२०)


स्वयं त्वसाम्यातिशयस्त्र्यधीशः
     स्वाराज्यलक्ष्म्याप्तसमस्तकामः ।
बलिं हरद्‌भिश्चिरलोकपालैः
     किरीटकोट्येडितपादपीठः ॥ २१ ॥
त्रैलोकिचा कृष्ण स्वयेंचि राणा
    जो सिद्ध ऐश्वर्य नि पूर्णकाम ।
इंद्रादि देवो नमिती तयाला
    मुकूट टेकोनि हरि पदाला ॥ २१ ॥

स्व्यं - स्वतः - तु - तर - त्र्यधीशः - त्रैलोक्याधिपति - असाम्यातिशयः - निरुपम आहे उत्कर्ष ज्याचा असा - स्वाराज्यलक्ष्म्या - स्वतःच्या राज्यलक्ष्मीने - आप्तसमस्तकामः - ज्याची सर्व इच्छा तृप्त झाली आहे असा - बलिं - नजराण्यांना - हरद्‌भिः - आणणार्‍या - चिरलोकपालैः - चिरस्थायी इंद्रादि लोकपालांनी - किरीटकोट्या - मुकुटाच्या अग्रभागाने - ईडितपादपीठः - पूजिलेले आहे पादासन ज्याचे असा आहे ॥२१॥
स्वतः भगवान श्रीकृष्ण तिन्ही लोकांचे अधिपती आहेत. त्यांच्या बरोबरीचा सुद्धा कोणी नाही, तर त्यांच्यापेक्षा मोठा कोण असू शकेल ? ते आपल्या स्वतःसिद्ध ऐश्वर्याने नेहमीच पूर्णकाम आहेत. तरीही इंद्रादी पूर्वीपासूनचे लोकपाल अनेक प्रकारच्या भेटवस्तू देऊन आपापल्या मुकुटांच्या पुढील टोकांनी त्यांच्या पाय ठेवण्याच्या आसनाला प्रणाम करतात. (२१)


तत्तस्य कैङ्कर्यमलं भृतान्नो
     विग्लापयत्यङ्ग यदुग्रसेनम् ।
तिष्ठन्निषण्णं परमेष्ठिधिष्ण्ये
     न्यबोधयद्देव निधारयेति ॥ २२ ॥
त्या उग्रसेना पुढती उभाची
    राहोनि बोले जणु भृत्य नम्र ।
"ऐका तुम्ही देवजि प्रार्थना ही"
    स्मरून हे वाक्य व्यतीथ होतो ॥ २२ ॥

अङ्ग - हे विदुरा ! - यत् - जे - तिष्ठन् - स्वतः उभा राहून - परमेष्ठिधिष्‌ण्ये - श्रेष्ठ सिंहासनावर - निषण्णं - बसलेल्या - उग्रसेनं - उग्रसेनाला - देव - महाराज - निधारय - लक्षात असू द्या - इति - असे - न्यबोधयत् - विनवीत असे - तत् - ते - तस्य - त्या श्रीकृष्णाचे - कैङ्‍कर्यं - सेवकत्व - भृतान् - भक्‍त अशा - नः - आम्हाला - अलं - फारच - विग्लापयति - दुःख देत आहे ॥२२॥
विदुरा, तेच भगवान श्रीकृष्ण राजसिंहासनावर बसलेल्या उग्रसेन महाराजांच्या समोर नम्रपणे उभे राहून म्हणत असत की, "महाराज, आमची प्रार्थना ऐका." हा त्यांचा सेवा-विनम्रभाव आठवून आमच्यासारख्या सेवकांचे चित्त अत्यंत व्यथित होत आहे. (२२)


अहो बकी यं स्तनकालकूटं
     जिघांसयापाययदप्यसाध्वी ।
लेभे गतिं धात्र्युचितां ततोऽन्यं
     कं वा दयालुं शरणं व्रजेम ॥ २३ ॥
त्या पापिणी पूतन राक्षसीने
    स्तना विषो लाउनि पाजिले की ।
तरी दिली सद्गतिची तिला ती
    ऐसा दुजा कोण कृपाळु देव ॥ २३ ॥

अहो - किती हो आश्चर्य !!! - वकी - पूतना - यं - ज्या कृष्णाला - जिघांसया - मारण्याच्या इच्छेने - स्तनकालकूटं - स्तनात साठविलेल्या कालकूटनामक विषाला - अपाययत् - पाजिती झाली - असाध्वी - दुष्ट - अपि - असून सुद्धा - धात्र्युचितां - मातेलाच योग्य अशी - गतिं - मोक्षगतीला - लेभे - मिळविती झाली - वा - तर मग - ततः - त्याहून - अन्यं - दुसर्‍या - दयालुं - दयाळू अशा - कं - कोणाला - शरणं - शरण - व्रजेम - जावे ॥२३॥
पापिणी पूतनेने आपल्या स्तनांना हलाहल विष लावून श्रीकृष्णांना मारण्याच्या हेतूने त्यांना दूध पाजले होते. तिलाही भगवंतांनी दाईस मिळण्याजोगी गती दिली. अशा त्या श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त दुसरा कोण दयाळू आहे, ज्याला आम्ही शरण जावे ? (२३)


मन्येऽसुरान् भागवतांस्त्र्यधीशे
     संरम्भमार्गाभिनिविष्टचित्तान् ।
ये संयुगेऽचक्षत ताऱ्यपुत्र
     मंसे सुनाभायुधमापतन्तम् ॥ २४ ॥
त्या राक्षसांना समजेचि भक्त
    जे वैरभावात सदाचि ध्याती ।
त्यां चक्रपाणी गरुडा सवेची
    दे दर्शनो की मरणांतकाली ॥ २४ ॥

त्र्यधीशे - त्रैलोक्यपति परमेश्वरावर - संरम्भमार्गाभिनिविष्टचित्तान् - द्वेषबुद्धीने ज्यांनी आपले अंतःकरण ठेविले आहे अशा - असुरान् - दैत्यांना - भागवतान् - भगवद्‌भक्‍त वैष्णव असे - मन्ये - मानितो - ये - जे - संयुगे - युद्धात - अंसेसुनाभायुधं - खांद्यावर आहे सुंदर चक्र धरलेला परमेश्वर ज्याच्या अशा - आपतंतं - उड्या टाकीत धावत येणार्‍या - तार्क्ष्यपुत्रं - गरुडाला - अचक्षत - पहाते झाले ॥२४॥
मी असुरांना सुद्धा भगवंतांचे भक्त समजतो. कारण वैरभाव मनात असल्याने क्रोधामुळे त्यांचे चित्त नेहमी श्रीकृष्णांकडे लागलेले असे. रणभूमीमध्ये सुदर्शन चक्रधारी भगवंतांना खांद्यावर घेऊन आपल्याकडे झेपावणार्‍या गरुडाचे त्यांना दर्शन होत असे. (२४)


वसुदेवस्य देवक्यां जातो भोजेन्द्रबन्धने ।
चिकीर्षुर्भगवानस्याः शमजेनाभियाचितः ॥ २५ ॥
( अनुष्टुप् )
ब्रह्म्याच्या प्रार्थनेने तो पृथ्विचा भार काढिण्या ।
कंसकारागृहामध्ये देवकीपोटि जन्मला ॥ २५ ॥

अजेन - ब्रह्मदेवाने - अभियाचितः - प्रार्थना केलेला - अस्याः - व ह्या पृथ्वीचे - शं - कल्याण - चिर्कीषुः - करण्याची इच्छा करणारा - भगवान् - परमेश्वर - भोजेन्द्रबन्धने - कंसाच्या बंदिखान्यात - वसुदेवस्य - वसुदेवाच्या - देवक्यां - देवकीच्या ठिकाणी - जातः - उत्पन्न झाला ॥२५॥
ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यावरून पृथ्वीवरील भार नाहीसा करून तिला सुखी करण्यासाठी भगवंतांनी कंसाच्या कारागृहात वसुदेव-देवकीच्या पोटी अवतार घेतला. (२५)


ततो नन्दव्रजमितः पित्रा कंसाद् विबिभ्यता ।
एकादश समास्तत्र गूढार्चिः सबलोऽवसत् ॥ २६ ॥
वसुदेव पित्याने त्या कंस धाकेचि नंदजी- ।
घरासी ठेविले तेथे प्रभावे लुप्त राहिला ॥ २६ ॥

कंसात् - कंसापासून - विबिभ्यता - विशेष भ्यालेल्या - पित्रा - पित्यासह - ततः - तेथून - नंदव्रजं - नंदाच्या गोकुळाला - इतः - गेलेला - तत्र - तेथे - गूढार्चिः - आपले तेज प्रगट न करणारा श्रीकृष्ण - सबलः - बलरामासह - एकादशसमाः - अकरा वर्षे - अवसत् - राहिला ॥२६॥
कंसाच्या भीतीने जेव्हा पिता वसुदेवांनी त्यांना नंदबाबाच्या गोकुळामध्ये नेऊन पोचविले, तेव्हा तेथे ते बलरामांसह अकरा वर्षे आपले तेज गुप्त ठेवून राहिले. (२६)


परीतो वत्सपैर्वत्सान् चारयन् व्यहरद्विभुः ।
यमुनोपवने कूजद् द्विजसङ्कुलिताङ्‌घ्रिपे ॥ २७ ॥
यमुना तटिंच्या वृक्षीं पक्षांचे थव रंजती ।
तेथे गोपांसवे कृष्णे गाईही चारिल्या पहा ॥ २७ ॥

वत्सपैः - गोपाळांनी - परीतः - वेष्टिलेला - वत्सान् - वासरांना - चारयन् - चारणारा - विभुः - श्रीकृष्ण - कूजद्विजसंकुलिताङ्‌घ्रिपे - शब्द करणार्‍या पक्ष्यांनी जेथील वृक्ष गजबजून गेले आहेत अशा - यमुनोपवने - यमुनेच्या काठी असणार्‍या बागबगीचांत - व्याहरत् - खेळला ॥२७॥
यमुनेच्या उपवनातील हिरव्यागार वृक्षांवर कलकलाट करणार्‍या पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी रहातात. तेथे श्रीकृष्णांनी वासरांना चारून गोपबालांच्या समवेत विहार केला होता. (२७)


कौमारीं दर्शयन् चेष्टां प्रेक्षणीयां व्रजौकसाम् ।
रुदन्निव हसन्मुग्ध बालसिंहावलोकनः ॥ २८ ॥
गोपानुरूप त्या लीला केल्या कृष्णे तिथे तशा ।
रडणे हासणे आणि सिंह कोल्ह्यापरी बघे ॥ २८ ॥

मुग्धबालसिंहावलोकनः - मोहक अशा सिंहाच्या छाव्याप्रमाणे ज्याचे पाहणे आहे असा - कौमारीं - बाल्यावस्थेतल्या - प्रेक्षणीयां - पाहण्याजोग्या - चेष्टां - लीलांना - व्रजौकसां - गोकुळातील रहिवाश्यांना - दर्शयन् - दाखविणारा - रुदन् इव - रडण्याचे सोंग घेणारा - हसन् - मधून मधून हसणारा - बभूव - झाला ॥२८॥
व्रजवासीयांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी ते अनेक बाललीला करीत. कधी रडवेले होत, कधी हसत, तर कधी सिंहाच्या छाव्याप्रमाणे मंत्रमुग्ध दृष्टीने पाहात असत. (२८)


स एव गोधनं लक्ष्म्या निकेतं सितगोवृषम् ।
चारयन् ननुगान् गोपान् रणद् वेणुररीरमत् ॥ २९ ॥
पांढर्‍या रंगि बेरंगी गाई बैलास चारता ।
रमाया गोपबाळांना बासुरी वाजवी हरी ॥ २९ ॥

सः एव - तोच श्रीकृष्ण - रणद्वेणुः - मुरली वाजविणारा - लक्ष्म्याः - लक्ष्मीचे - निकेतं - स्थान अशा - सितगोवृषं - पांढर्‍या रंगाच्या गाई व बैल ज्यात आहेत अशा - गोधनं - पशुरूपी धनाला - चारयन् - चारणारा - अनुगान् - मागोमाग चालणार्‍या - गोपान् - गोपांना - अरीरमत् - रमविता झाला ॥२९॥
पांढरे शुभ्र बैल आणि निरनिराळ्या रंगांच्या गाईंना चारता चारता ते आपले साथीदार गोपबालकांची बासरी वाजवून करमणूक करीत असत. (२९)


प्रयुक्तान् भोजराजेन मायिनः कामरूपिणः ।
लीलया व्यनुदत्तान् तान् बालः क्रीडनकानिव ॥ ३० ॥
जेंव्हा कंसे तया तेथे मारण्या शत्रु धाडिले ।
खेळता खेळता त्याने खेळणी परि मारिले ॥ ३० ॥

बालः - बालक - क्रीडनकान् इव - खेळातील बाहुल्यांप्रमाणे - भोजराजेन - कंसाने - प्रयुक्‍तान् - पाठविलेल्या - तान् तान् - त्या त्या - कामरूपिणः - इच्छेनुसार अनेक रूपे घेणार्‍या - मायिनः - कपटी दैत्यांना - लीलया - सहज रीतीने - व्यनुदत् - मारिता झाला ॥३०॥
याच कालात त्यांना मारण्यासाठी जेव्हा कंसाने पुष्कळसे मायावी आणि इच्छेनुसार रूप धारण करणारे राक्षस पाठविले, तेव्हा त्यांना भगवंतांनी लहान मुलांनी खेळणी मोडावी, त्याप्रमाणे सहज मारले. (३०)


विपन्नान् विषपानेन निगृह्य भुजगाधिपम् ।
उत्थाप्यापाययद् गावः तत्तोयं प्रकृतिस्थितम् ॥ ३१ ॥
कालियाविषयोगाने मेले जे जळ पीउनी ।
गोप गाई ययां जीवदान ते दिधले तदा ॥
कालिया धाडुनी दूर शुद्ध डोहहि निर्मिला ॥ ३१ ॥

भुजगाधिपं - सर्पराज अशा कालियाला - निगृह्य - बंदोबस्ताने हाकलून लावून - विषपानेन - विष प्याल्यामुळे - विपन्नान् - मृत झालेल्या - गोपान् - गोपांना - च - आणि - गावः - गाईंना - उत्थाप्य - जिवंत करून - तत् - ते - प्रकृतिस्थितं - पूर्वीप्रमाणे निर्विष झालेले - तोयं - उदक - अपाययत् - पाजिता झाला ॥३१॥
यमुनेचे विषमिश्रित पाणी प्याल्यामुळे मेलेले गोपबालक आणि गाई यांना जिवंत केले. कालियाला निश्चेष्ट केले आणि कालिया डोहाचे पाणी विषरहित करून ते पिण्यायोग्य केले. (३१)


अयाजयद् गोसवेन गोपराजं द्विजोत्तमैः ।
वित्तस्य चोरुभारस्य चिकीर्षन् सद्व्ययं विभुः ॥ ३२ ॥
सद्व्ययी धन संकल्पे द्विज नी नंदजी सवे ।
गोवर्धनास गोयज्ञें इंद्रा लाजविले असे ॥ ३२ ॥

च - आणि - उरुभारस्य - पुष्कळ गडगंज भरलेल्या - वित्तस्य - द्रव्याच्या - सह्ययं - चांगल्या खर्चाला - चिकीर्षन् - करण्याची इच्छा करणारा - विभुः - श्रीकृष्ण - द्विजोत्तमैः - ब्राह्मणांकडून - गोपराजं - गोपांचा राजा जो नंद त्याला - गोसवेन - गोसव यज्ञाने - अयाजयत् - यजन कार्यात प्रवृत्त करता झाला ॥३२॥
अपार धनाचा सुयोग्य उपयोग करण्याच्या हेतूने भगवान श्रीकृष्णांनी श्रेष्ठ ब्राह्मणांच्या द्वारा नंदबाबाकरवी, गोवर्धनपर्वताच्या पूजेच्या रुपाने गोयज्ञ करविला. (३२)


वर्षतीन्द्रे व्रजः कोपाद् भग्नमानेऽतिविह्वलः ।
गोत्रलीलातपत्रेण त्रातो भद्रानुगृह्णता ॥ ३३ ॥
भद्र ! त्या मानभंगाने क्रोधुनी वर्षिले ढग ।
कृष्णे छ्त्रीपरी तेंव्हा गोवर्धनहि पेलिला ॥
पशू नी व्रजवासींना रक्षिले संकटातुनी ॥ ३३ ॥

भद्र - हे कल्याणस्वरूपा विदुरा - भग्नमाने - अपमानिलेला - इंद्रे - इंद्र - कोपात् - रागामुळे - वर्षति - पाऊस पाडीत असता - अतिविह्‌वलः - फारच घाबरून गेलेला - व्रजः - गोकुळातील गोपसमूह - गोत्रलीलातपत्रेण - सहज लीलेने छत्राप्रमाणे उचलून धरलेल्या पर्वताच्या योगे - अनुगृह्‌णता - अनुग्रह करणार्‍या - वासुदेवेन - श्रीकृष्णाने - त्रातः - रक्षिला ॥३३॥
हे महाभाग ! इंद्रयज्ञ न केल्याने आपला मानभंग झाल्याचे पाहून इंद्राने रागावून गोकुळाचा नाश करण्यासाठी मुसळधार पाऊस पाडावयास सुरुवात केली. तेव्हा भगवंतांना करुणा येऊन त्यांनी लीलेने छत्रीप्रमाणे गोवर्धन पर्वत उचलला आणि व्रजाचे रक्षण केले. (३३)


शरच्छशिकरैर्मृष्टं मानयन् रजनीमुखम् ।
गायन् कलपदं रेमे स्त्रीणां मण्डलमण्डनः ॥ ३४ ॥
शरच्चंद्र प्रकाशाचा मान वृंदावनात त्या ।
राखाण्या रासक्रीडेत गोपिंना साथही दिली ॥ ३४ ॥

शरच्छशिकरैः - शरद ऋतूतील चंद्रकिरणांनी - मृष्टं - निर्मळ झालेल्या - रजनीमुखं - प्रदोषकाळाला - मानयन् - मान देणारा - स्त्रीणां - स्त्रियांच्या - मंडलमण्डनः - समूहाला भूषणभूत असा - कलपदं - मधुर शब्दांनी - गायन् - गाणारा श्रीकृष्ण - रेमे - खेळला ॥३४॥
शरद ऋतूतील चांदणे जेव्हा सर्व वृंदावनावर पसरत असे, तेव्हा श्रीकृष्ण त्या चांदण्याचा आदर करून मधुर गाणे गात आणि फेर धरलेल्या गोपींची शोभा वाढवीत. त्यांच्याबरोबर रासक्रीडा करीत. (३४)


स्कंध तिसरा - अध्याय दुसरा समाप्त

GO TOP