श्रीमद् भागवत पुराण
तृतीय स्कन्धः
प्रथमोऽध्यायः

धृतराष्ट्रं परित्यज्य गतस्य विदुरस्य उद्धवेन सह समागमः -

उद्धव आणि विदुर यांची भेट -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच ।
एवमेतत्पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान् किल ।
क्षत्त्रा वनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृह ऋद्धिमत् ॥ १ ॥
श्री शुकदेवजी म्हणाले -
(अनुष्टुप)
समृद्ध घर सोडोनी वनी विदुर पातता ।
मैत्रेया पुसले प्रश्न तुझे ते एक सर्वची ॥ १ ॥

पुरा - पूर्वी - ऋद्धिमत् - समृद्ध अशा - स्वगृहं - आपल्या घराला - त्यक्त्वा - सोडून - वनं - अरण्याला - प्रविष्टेन - गेलेल्या - क्षत्त्रा - विदुराकडून - भगवान् - भगवान् - मैत्रेयः - मैत्रेय - एवं - याप्रमाणे - एतत् - हे - किल - खरोखर - पृष्टः - विचारला गेला. ॥१॥

श्रीशुक म्हणाले - जी गोष्ट तू विचारलीस तीच, सुखसमृद्धियुक्त असे घर सोडून वनात गेलेल्या विदुराने पूर्वी भगवान मैत्रेयांना विचारली होती. (१)


यद्वा अयं मंत्रकृद्वो भगवान् अखिलेश्वरः ।
पौरवेन्द्रगृहं हित्वा प्रविवेशात्मसात्कृतम् ॥ २ ॥
पांडवीदूत तो कृष्ण सोडुन मान नी सभा ।
पातला विदुरागेही निमंत्रण नसोनिया ॥ २ ॥

वा - किंवा - अयं - हा - वः - तुमचा - मंत्रकृत् - मसलतगार - अखिलेश्वरः - सर्वेश्वर - भगवान् - श्रीकृष्ण - पौरवेन्द्रगृहं - दुर्योधनाच्या घराला - हित्वा - सोडून - आत्मसात्कृतं - आपलेसे मानलेल्या - यत् - ज्या - विदुरगृहं - विदुराच्या घरी - प्रविवेश - शिरला ॥२॥

जेव्हा पांडवांचे सल्लागार सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरला गेले होते, तेव्हा ते दुर्योधनाच्या महालात जाण्याऐवजी आपलेच घर समजून विदुराच्या घरी गेले होते. (२)


राजोवाच ।
कुत्र क्षत्तुर्भगवता मैत्रेयेणास सङ्गमः ।
कदा वा सहसंवाद एतद् वर्णय नः प्रभो ॥ ३ ॥
राजा परीक्षिताने विचारिले -
प्रभो ! प्रथम ते तुम्ही सांगा भेट कशी कुठे ।
मैत्रेय विदुरो यांची जाहली कोणत्या क्षणी ॥ ३ ॥

प्रभो - हे समर्थ शुक्राचार्य ! - भगवता - भगवान् - मैत्रेयेण - मैत्रेयाशी - सह - सहवर्तमान - क्षत्तुः - विदुराचा - संगमः - समागम - कुत्र - कोठे - वा - किंवा - संवादः - भाषण - कदा - केव्हा - आस - झाले - एतत् - हे - नः - आम्हाला - वर्णय - वर्णन करा. ॥३॥

राजा परीक्षिताने विचारले - प्रभो, भगवान मैत्रेयांची विदुराशी भेट कोठे झाली आणि केव्हा त्यांचा संवाद झाला, ते आपण आम्हांला सांगावे. (३)


न ह्यल्पार्थोदयस्तस्य विदुरस्य अमलात्मनः ।
तस्मिन् वरीयसि प्रश्नः साधुवादोपबृंहितः ॥ ४ ॥
पवित्रात्मा विदूराने संत मैत्रेय याजला ।
पुसले श्रेष्ठची प्रश्न मैत्रेया तोष जाहला ॥ ४ ॥

अमलात्मनः - निर्मळ अन्तःकरणाच्या - तस्य - त्या - विदुरस्य - विदुराचा - तस्मिन् - त्या - वरीयसी - श्रेष्ठ अशा - मैत्रेये - मैत्रेयाचे ठिकाणी केलेला - प्रश्नः - प्रश्न - अल्पार्थोदयः - क्षुद्र अर्थ प्रगट करणारा - नहि - नाही - तर्हि - तर - साधुवादोपबृंहितः - चांगल्या भाषणाने वृद्धिंगत झालेला असाच - बभूव - झाला ॥४॥

पवित्र हृदयाच्या विदुराने महात्मा मैत्रेयांना अगदीच काही साधा प्रश्न विचारला नसेल. कारण मैत्रेयांसारख्या साधुशिरोमणींनीही त्याचा आदर केला होता. (३)


सूत उवाच ।
स एवं ऋषिवर्योऽयं पृष्टो राज्ञा परीक्षिता ।
प्रत्याह तं सुबहुवित् प्रीतात्मा श्रूयतामिति ॥ ५ ॥
सूतजी सांगतात -
सर्वज्ञ शुकदेवाने राजाचे प्रश्न हेचि तै ।
ऐकता बोलले मोदे ऐका सावध हौऊनी ॥ ५ ॥

परीक्षिता - परीक्षित् - रा‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ज्ञा - राजाने - एवं - याप्रमाणे - पृष्टः - विचारलेला - सः - तो - अयं - हा - सुबहुवित् - अत्यंत बहुश्रुत - ऋषिवर्यः - ऋषिश्रेष्ठ - शुकः - शुकाचार्य - प्रीतात्मा - प्रसन्न आहे मन ज्याचे असा - तं - त्या - राजानम् - राजाला - श्रूयतां - ऐकावे - इति - असे - प्रत्याह - प्रत्युत्तर देता झाला. ॥५॥

सूत म्हणाले - राजा परीक्षिताने असे विचारल्यावर सर्वज्ञ शुकदेवांनी अतिशय प्रसन्न हो‌उन म्हटले, ते ऐका. (५)


श्रीशुक उवाच ।
यदा तु राजा स्वसुतानसाधून्
    पुष्णन् न धर्मेण विनष्टदृष्टिः ।
भ्रातुर्यविष्ठस्य सुतान् विबन्धून्
    प्रवेश्य लाक्षाभवने ददाह ॥ ६ ॥
श्री शुकदेवजी म्हणाले -
(इंद्रवज्रा)
राजा असे त्या दिवसांचि गोष्ट
    तो अंधराजा धृतराष्ट्र जेंव्हा ।
स्वपुत्र तोषार्थ अनाचरे नी
    लाक्षागृही पांडुपुत्रासि धाडी ॥ ६ ॥

यदा - जेव्हा - तु - तर - विनष्टदॄष्टिः - नाहीशी झाली आहे दॄष्टि असा - राजा - राजा - धृतराष्ट्रः - धृतराष्ट्र - असाधून् - दुष्ट अशा - स्वसुतान् - आपल्या मुलांना - अधर्मेण - अधर्माने - पुष्णन् - पोसणारा - यविष्टस्य - कनिष्ठ अशा - भ्रातुः - भावाच्या - विबन्धून् - निराधार अशा - सुतान् - पुत्रांना - लाक्षाभवने - लाक्षागृहात - प्रवेश्य - घालून - ददाह - जाळीता झाला. ॥६॥

श्रीशुकाचार्य म्हणाले - ज्यावेळी अंध राजा धृतराष्ट्राने अन्यायपूर्वक आपल्या दुष्ट पुत्रांचे पालन-पोषण करतानाच आपला धाकटा भाऊ पांडू याच्या अनाथ मुलांना लाखेच्या घरात पाठवून त्या घराला आग लावून दिली. (६)


यदा सभायां कुरुदेवदेव्याः
    केशाभिमर्शं सुतकर्म गर्ह्यम् ।
न वारयामास नृपः स्नुषायाः
    स्वास्रैर्हरन्त्याः कुचकुङ्कुमानि ॥ ७ ॥
त्या द्रौपदीचे हरिताच वस्त्र
    आक्रंदुनी ती रडता साश्रु ।
वक्षस्थलाची उटि धौत झाली
    परी तयाने नच शब्द केला ॥ ७ ॥

नृपः - राजा - धृतराष्ट्रः - धृतराष्ट्र - यदा - जेव्हा - सभायां - सभेत - स्वास्त्रैः - आपल्या अश्रूंनी - कुचकु‍ङ्कुमानि - स्तनावरील केशरादि उट्याना ‌‌‌‌‌‌‌‌‌‌- हरन्त्याः - धुवून टाकणार्‍या - कुरुदेवदेव्याः - व कुरुकुळाला प्रकाशित करणार्‍या पांडवांची पत्नी द्रौपदीनामक अशा - स्नुषायाः - सुनेच्या - केशाभिमर्शं - केसांस स्पर्श करण्यासंबंधी - गर्ह्यं - निंद्य - सुतकर्म - पुत्राच्या कृत्याला - न वारयामासं - न निवारण करिता झाला. ॥७॥

तसेच ज्या वेळी आपली सून आणि महाराज युधिष्ठिरांची पट्टराणी द्रौपदी हिचे केस भर सभेत दुःशासनाने ओढले, त्यावेळी द्रौपदीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहात होत्या आणि त्या धारांमुळे तिच्या वक्षःस्थळाला लावलेले केशर वाहून जाऊ लागले, तरीसुद्धा धृतराष्ट्राने आपल्या मुलाला त्या कुकर्मापासून अडविले नाही. (७)


द्यूते त्वधर्मेण जितस्य साधोः
    सत्यावलंबस्य वनं गतस्य ।
न याचतोऽदात् समयेन दायं
    तमोजुषाणो यदजातशत्रोः ॥ ८ ॥
साधू अशा त्याच युधिष्ठिराला
    द्युतात ओढोनि वनात धाडी ।
दुर्योधनाने नच पाळियेले
    स्व वाक्य न राज्य दिले तयाला ॥ ८ ॥

यत् - ज्या कारणास्तव - तमः - अज्ञानाला - जुषाणः - सेवणारा - धृतराष्ट्रः - धृतराष्ट्र - द्यूते - द्युतात - तु - तर - अधर्मेण - अधर्माने - जितस्य - जिंकलेल्या - साधोः - सज्जन अशा - सत्यावलम्बस्य - खर्‍यावरच अवलंबून राहणार्‍या - वनागतस्य - अरण्यात गेलेल्या - समयेन - वनवासाची मुदत ठरल्याप्रमाणे संपवून - याचतः - मागणी करणार्‍या - अज्ञातशत्रोः - धर्मराजाच्या - दायं - वडिलोपार्जित हिश्शाला - न अदात् - न देता झाला. ॥८॥

अन्यायाने द्यूतामध्ये जिंकलेल्या सत्यपरायण आणि सरळ अशा युधिष्ठिराचे राज्य वनातून परतल्यावर अटीप्रमाणे त्याने परत मागितले, परंतु त्याचे वडिलोपार्जित राज्य मोहवश झालेल्या धृतराष्ट्राने त्या अजातशत्रूला परत दिले नाही. (८)


यदा च पार्थप्रहितः सभायां
    जगद्‍गुरुर्यानि जगाद कृष्णः ।
न तानि पुंसां अमृतायनानि
    राजोरु मेने क्षतपुण्यलेशः ॥ ९ ॥
जगद्गुरू कृष्ण सभेस जाता
    शिष्टासनी बैसुनि बोध बोले ।
अमृत ते ज्ञानवंतास वाटे
    पुण्यक्षयी भूप न मानि त्याला ॥ ९ ॥

यदा - जेव्हा - पार्थप्रहितः - कुंतीपुत्र अशा धर्मराजाने पाठविलेल्या - जगद्‍गुरुः - त्रैलोक्याचा उपदेशक - कृष्णः - श्रीकृष्ण - सभयां - सभेत - पुंसां - पुरुषांस - अमृतायनानि - अमृताप्रमाणे तरतरी उत्पन्न करणारी - यानि - जी - वचांसि - भाषणे - जगाद - स्पष्टरीतीने बोलता झाला. - तानि - ती - क्षतपुण्यलेशः - ज्याच्या जवळ थोडेही पुण्य शिल्लक राहीले नाही असा - राजा - ध्रुतराष्ट्र राजा - ऊरू - विशेष महत्त्वाची अशी - न मेने - न मानिता झाला. ॥९॥

महाराज युधिष्ठिराने पाठविल्यामुळे जगद्‌गुरु भगवान श्रीकृष्णांनी कौरवांच्या सभेत सज्जनांना अमृतासमान वाटणारे भाषण केले. त्या म्हणण्याचा धृतराष्ट्राने मुळीच आदर केला नाही. कारण त्याचे सर्व पुण्यच नाहीसे झाले होते ना ! (९)


यदोपहूतो भवनं प्रविष्टो
    मंत्राय पृष्टः किल पूर्वजेन ।
अथाह तन्मंत्रदृशां वरीयान्
    यन्मंत्रिणो वैदुरिकं वदन्ति ॥ १० ॥
पुन्हा विदूरास सभेत नेता
    पृच्छा करी त्यां धृतराष्ट्र तेंव्हा ।
नीती विदूरे तयि बोधिली ती
    विदूर नीती जगती प्रसिद्ध ॥ १० ॥

यदा - जेव्हा - मंत्रदृशां - मसलत देणार्‍या - वरीयान् - श्रेष्ठ - विदुरः - विदुर - पूर्वजेन - जेष्ठ भावाने - मंत्राय - मसलतीकरिता - उपहूतः - बोलावला असता - भवनं - घरात - प्रविष्टः - गेलेला असा - किल - खरोखर - पृष्टः - विचारला गेला. - अथ - नंतर - मन्त्त्रिणः - मसलतदार लोक - यत् - ज्याला - वैदुरिकं - विदुरनीतिशास्त्र असे - वदन्ति - म्हणतात - तत् - त्याला - आह - सांगता झाला. ॥१०॥

नंतर सल्लामसलतीसाठी जेव्हा विदुराला बोलावले गेले, तेव्हा सर्व मंत्र्यांत श्रेष्ठ अशा विदुराने राजभवनात जाऊन थोरले बंधू धृतराष्ट्राने विचारल्यावरून त्याला जो सल्ला दिला, त्या सल्ल्याला नीतिशास्त्र जाणणारे लोक विदुरनीती म्हणतात. (१०)


अजातशत्रोः प्रतियच्छ दायं
    तितिक्षतो दुर्विषहं तवागः ।
सहानुजो यत्र वृकोदराहिः
    श्वसन् रुषा यत्त्वमलं बिभेषि ॥ ११ ॥
विदूरजी म्हाणाले-
अजातशत्रूस युद्धिष्ठिराते
    देणे असे भाग पहा तयाचा ।
त्या भीमरूपातचि शांत माग
    घेईल राज्या तुज मारुनीया ॥ ११ ॥

तव - तुझ्या - दुर्विषहं - असह्य - आगः - अपराधाला - तितिक्षतः - सहन करणार्‍या - अजातशत्रोः - धर्मराजाच्या - दायं - वडिलोपार्जित हिश्शाला - प्रतियच्छ - परत देऊन टाक - यत्र - ज्याविषयी - सहानुजः - भावासह - वृकोदराहिः - भीमरूपी सर्प - रूषा - क्रोधाने - श्वसन् - फूत्कार टाकणारा असा - वर्तते - राहिला आहे. - यत् - ज्याला - त्वं - तू - अलं - पुष्कळ - बिभेति - भितोस. ॥११॥

विदुर म्हणाला - महाराज, आपण अजातशत्रू युधिष्ठिराला त्याचा राज्याचा हिस्सा देऊन टाका. सहन करता न येण्यासारखे आपण केलेले अपराधहि ते सहन करीत आहेत. ज्या भीमरूपी नागालाही आपण खूप घाबरता, तो बदला घेण्यासाठी आपल्या छोटया भावांसह मोठया क्रोधाने फूत्कार टाकीत आहे. (११)


पार्थांस्तु देवो भगवान् मुकुन्दो
    गृहीतवान् स क्षितिदेवदेवः ।
आस्ते स्वपुर्यां यदुदेवदेवो
    विनिर्जिताशेष नृदेवदेवः ॥ १२ ॥
त्या पांडु पुत्रासचि कृष्ण मानी
    यदू विरांचा भगवंत राजा ।
राजे तयाला नमितात सर्व
    साऱ्या द्विजांचा हरिपक्ष आहे ॥ १२ ॥

सक्षितिदेवदेवः - ब्राह्मण व देव ह्यांसहवर्तमान - भगवान् - षड्‍गुणैश्वर्यसंपन्न - देवः - तेजस्वी असा - मुकुन्दः - श्रीकृष्ण - तु - तर - पार्थान् - पाण्डवांना - गृहीतवान् - घेता झाला. - यः - जो - यदुदेवदेवः - मोठमोठ्या यादवांमध्ये वर्चस्वाने राहणारा - विनिर्जिताशेषनृदेवदेवः - ज्याने संपूर्ण राज्य जिंकले आहेत असा - कृष्णः - श्रीकृष्ण - स्वपुर्यां - आपल्या द्वारका नगरीत - आस्ते - रहातो. ॥१२॥

पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आपलेसे करून घेतले आहे. ते यदुवीरांचे आराध्य दैवत यावेळी आपली राजधानी द्वारकापुरी येथे आहेत. पृथ्वीवरील मोठमोठया राजांना त्यांनी जिंकून घेतले आहे आणि ब्राह्मण तसेच देवही त्यांच्याच बाजूने आहेत. (१२)


स एष दोषः पुरुषद्विडास्ते
    गृहान् प्रविष्टो यमपत्यमत्या ।
पुष्णासि कृष्णाद्विमुखो गतश्रीः
    त्यजाश्वशैवं कुलकौशलाय ॥ १३ ॥
दुर्योधनाला सुत मानुनीया
    घरात दोषा धुसवून घेसी ।
कृष्णास द्वेषी तव पुत्र नित्य
    क्षेमे कुळाच्या सुत त्याग व्हावा ॥ १३ ॥

कृष्णात् - श्रीकृष्णापासून - विमुखः - पराङ्‍मुख - गतश्रीः - ऐश्वर्यरहित - त्वं - तू - अपत्यमत्या - पुत्रबुद्धीने - यं - ज्याला - पुष्णासि - पोषितोस - सः - तो - एषः - हा - पुरूषद्विट् - श्रीकृष्णाचा द्वेष करणारा - दुर्योधनः - दुर्योधन - गृहान् - घरात - प्रविष्टः - शिरलेला - दोषः - मूर्तिमंत दोष असाच - आस्ते - राहत आहे. - कुलकौशलाय - वंशाच्या कल्याणाकरिता - आशु - लवकर - अशैवं - अमंगळ अशा - अमुं - या दुर्योधनाला - त्यज - टाकून दे. ॥१३॥

ज्याचे आपण पुत्र मानून पालन-पोषण करीत आहात, त्या दुर्योधनाच्या रूपाने तर मूर्तिमान दोषच आपल्या घरात घुसला आहे. हा श्रीकृष्णांचाच द्वेष करणारा आहे. म्हणूनच आपण श्रीकृष्णांना विन्मुख हो‌ऊन ऐश्वर्यहीन होऊ लागला आहात. आपल्या कुळाचे कल्याण व्हावे, असे आपल्याला वाटत असेल तर आपण ताबडतोब या दुष्टाचा त्याग करा. (१३)


इति ऊचिवान् तत्र सुयोधनेन
    प्रवृद्धकोपस्फुरिताधरेण ।
असत्कृतः सत्स्पृहणीयशीलः
    क्षत्ता सकर्णानुजसौबलेन ॥ १४ ॥
क एनमत्रोपजुहाव जिह्मं
    दास्याः सुतं यद्‍बलिनैव पुष्टः ।
तस्मिन् प्रतीपः परकृत्य आस्ते
    निर्वास्यतामाशु पुराच्छ्वसानः ॥ १५ ॥
हे ऐकता तोच सुयोधनो तै
    क्रोधे थरारे अधरोष्ठ चावी ।
तुच्छे वदे,दासि पुत्रास कोणी
    बोलाविले या कुटिलां कशाला ॥ १४ ॥
खाऊन ज्यांचे तुकडे जगे हा
    त्यांना प्रतीकूळ बनोनि हा तो ।
त्या शत्रुसी हात मिळोनि राही
    मारा न त्याला हकला इथोनी ॥ १५ ॥

तत्र - तेथे - इति - याप्रमाणे - ऊचिवान् - बोलला. - सत्स्पृहणीयशीलः - साधूंना अनुकरणीय ज्याचा स्वभाव आहे असा - क्षत्ता - विदुर - प्रवृद्धकोपस्फुरिताधरेण - फारच रागावल्यामुळे ज्याचे अधरोष्ठ फुरफुरत आहेत अशा - सकर्णानुजसौबलेन - कर्ण, दुःशासन व शकुनि यांसह - सुयोधनेन - दुर्योधनने - असत्कृतः - अपमानिला गेला. ॥१४॥ - जिद्मं - कपटी अशा - दास्याः - व दासीचा - सुतं - पुत्र अशा - एनं - ह्या - विदुरं - विदुराला - अत्र - येथे - कः - कोण - उपजुहाव - बोलाविता झाला - यद्‍बलिना- ज्याच्या अन्नाने - एव - च - पुष्टः - पोसलेला - तस्मिन् - त्याच्यावरच - प्रतीपः - शत्रुत्व करणारा - परकृत्ये - शत्रुकार्याविषयी - आस्ते - उद्युक्त होत आहे. - श्वसानः - जिवंत असा - आशु - लवकर - पुरात् - नगरातून - निर्वास्यतां - घालवून दिला जावा. ॥१५॥

साधुजन ज्याचे अनुकरण करण्याची इच्छा करीत, त्याचे हे म्हणणे ऐकून कर्ण, दुःशासन आणि शकुनीसहित दुर्योधनाचे ओठ क्रोधाने थरथर कापू लागले आणि त्याचा तिरस्कार करीत तो म्हणाला, "अरे या कपटी दासीपुत्राला येथे कोणी बोलावले ? ज्यांचे अन्न खाऊन हा जिवंत आहे, त्यांनाच प्रतिकूल हो‌ऊन शत्रुपक्षाची बाजू घेत आहे ! याला ठार न करता नगरातून ताबडतोब बाहेर हाकलून द्या." (१४-१५)


स इत्थमत्युल्बणकर्णबाणैः
    भ्रातुः पुरो मर्मसु ताडितोऽपि ।
स्वयं धनुर्द्वारि निधाय मायां
    गतव्यथोऽयादुरु मानयानः ॥ १६ ॥
बंधू पुढे हे असले कठोर
    ऐकून ही शब्द निघे विदूर ।
तेथेचि त्यांनी धनु ठेविले नी
    ही ईश्वरेच्छा भलि मानियेली ॥ १६ ॥

सः - तो - विदुरः - विदुर - भ्रातुः - भावाच्या - पुरः - समक्ष - अत्युल्बणकर्णबाणै - अत्यंत प्रखर वाग्बाणांनी कानावर प्रहार करणार्‍या - वचोभिः - भाषणांनी - इत्थं - याप्रमाणे - मर्मसु - मर्मस्थलावर - ताडितः - ताडन केलेला - अपि - सुद्धा - स्वयं - स्वतः - भगवतः - परमेश्वराच्या - मायां - मायेला - उरु - अधिक - मानयानः - मान देणारा असा होत्साता - गतव्यथः - पीडारहित - धनुः - धनुष्याला - द्वारि - दरवाज्यावर - निधाय - ठेवून - अयात् - निघाला. ॥१६॥

बाणाप्रमाणे तीक्ष्ण असे हे कठोर शब्द आपल्या भावादेखत ऐकून, ते शब्द मर्मभेदी असूनही विदुराने वाईट वाटून घेतले नाही आणि भगवंतांच्या मायेची महती समजून आपले धनुष्य राजद्वारावर ठेवून तो निघून गेला. (१६)


स निर्गतः कौरवपुण्यलब्धो
    गजाह्वयात् तीर्थपदः पदानि ।
अन्वाक्रमत्पुण्यचिकीर्षयोर्व्यां
nbsp;   स्वधिष्ठितो यानि सहस्रमूर्तिः ॥ १७ ॥
पुण्ये असा थोर विदूर काका
    त्या कौरवांना असता भलांही ।
श्रीविष्णु ब्रह्मा नि तसाचि रूद्र
    मूर्तित ज्या तेथ तीर्था निघाले ॥ १७ ॥

कौरवपुण्यलब्धः - कौरवांच्या पुण्याईने मिळालेला - गजाह्वयात् - हस्तिनापुरातून - निर्गतः - निघालेला - सः - तो - विदुरः - विदुर - पुण्यचिकीर्षया - पुण्य करण्याच्या इच्छेने - उर्व्यां - पृथ्वीवर - तीर्थपदः - पवित्र आहेत पदे ज्याची अशा श्रीहरीच्या - पदानि - स्थानाप्रत - अन्वाक्रमत् - क्रमाने गेला - य़ानि - ज्या - तीर्थानि - तीर्थाच्या ठीकाणी - सहस्त्रमूर्तिः - सहस्त्रावधि आहेत रूपे ज्याची असा परमेश्वर - स्वधिष्ठितः - चांगल्या तर्‍हेने राहिला आहे. ॥१७॥

कौरवांना पुण्याईने मिळालेला तो महापुरुष हस्तिनापुरातून निघून पुण्य प्राप्त करण्याच्या इच्छेने पृथ्वीवरील भगवच्चरणांनी पावन झालेल्या तीर्थक्षेत्री संचार करु लागला. जेथे श्रीहरी अनेक मूर्तिरूपात विराजमान आहेत. (१७)


पुरेषु पुण्योपवनाद्रिकुञ्जे
    ष्वपङ्कतोयेषु सरित्सरःसु ।
अनन्तलिङ्गैः समलङ्कृतेषु
    चचार तीर्थायतनेष्वनन्यः ॥ १८ ॥
पवित्र क्षेत्रास वनास आणि
    त्या पर्वतासी नि सरोवरासी ।
जे शोभले तीर्थ विष्णुपदांनी
    त्या त्या ठिकाणी निघले रमाया ॥ १८ ॥

अनन्यः - एकटा - सः विदुरः - तो विदुर - पुरेषु - नगरांत - पुण्योपवनाद्रिकुञ्जेषु - पुण्यकारक ठिकाणे,बागबगीचे,पर्वत व लतागृहे ह्या ठिकाणी - अपङ्कतोयेषु - निर्मळ पाणी असणार्‍या - सरित्सरस्सु - नद्या व सरोवरे ह्या ठिकाणी - अनन्तलिङ्‌गैः - वैष्णवचिन्हांनी - समलङ्‍कृतेषु - भूषित अशा - तीर्थायतनेषु - तीर्थे व क्षेत्रे य ठिकाणी - चचार - हिंडू लागला. ॥१८॥

जी जी भगवंतांच्या मूर्तींनी सुशोभित अशी तीर्थस्थाने, नगरे, पवित्र वने, पर्वत, लताकुंज, निर्मल पाण्यांनी भरलेल्या नद्या, सरोवरे इत्यादी होते, त्या सर्व ठिकाणी तो एकटाच विहार करीत होता. ज्याच्यामुळे आप्त आपल्याला ओळखू शकणार नाहीत, अशा अवधूत वेषामध्ये तो स्वच्छंदपणे पृथ्वीवर विहार करीत होता. (१८)


गां पर्यटन् मेध्यविविक्तवृत्तिः
    सदाप्लुतोऽधः शयनोऽवधूतः ।
अलक्षितः स्वैरवधूतवेषो
    व्रतानि चेरे हरितोषणानि ॥ १९ ॥
स्वच्छंदवेशी अवधूत रूप
     न ओळखी कोणि तया स्वकिय ।
पवित्र भोजान्न पवित्र स्नान
    भूमीसि निद्रा नि व्रतस्थ वृत्ती ॥ ।१९ ॥

गां - पृथ्वीवर - पर्यटन - फिरणारा - मेध्यविविक्‍तवृत्तिः - पवित्र व निर्भेळ पदार्थांवरच उपजीविका चालविणारा - सदाप्लुतः - नेहमी तीर्थस्नान करणारा - अधःशयनः - जमिनीवर निजणारा - अवधूतः - अभ्यंग स्नान न करणारा - अवधूतवेषः - साधूप्रमाणे वेष घेतलेला - स्वैः - स्वतःच्या नातलगांनी - अलक्षितः - न ओळखिलेला - विदुरः - विदुर - हरितोषणानि - परमेश्वाराला संतुष्ट करणारी - व्रतानि - व्रते - चेरे - आचरिता झाला. ॥१९॥

तो शरीराला सुशोभित करीत नसे. पवित्र आणि साधे भोजन करी. शुद्धवृत्तीने जीवन-निर्वाह चालवी. प्रत्येक तीर्थात स्नान करी. जमिनीवर निद्रा करी आणि भगवंतांना प्रसन्न करणार्‍या व्रतांचे पालन करीत असे. (१९)


इत्थं व्रजन् भारतमेव वर्षं
    कालेन यावद्‍गतवान् प्रभासम् ।
तावच्छशास क्षितिमेक चक्रां
    एकातपत्रामजितेन पार्थः ॥ २० ॥
अशा रितें भारत हिंडताना
    प्रभासक्षेत्रास फिरोनि येता ।
अखंडपृथ्वी वरि राज्य होते
    युधिष्ठिराचे हरिच्या कृपेने ॥ २० ॥

इत्थं - याप्रमाणे - भारतं - भारतासंबंधी - वर्षम् एव - खंडालाच - व्रजन् - गमन करणारा - यावत् - ज्या विवक्षित - कालेन - काही वेळाने - प्रभासं - प्रभासाला - गतवान् - गेला - तावत् - त्याच सुमारास - पार्थः - धर्मराज - एकचक्रां - एकाची सत्ता आहे जीवर अशा - एकातपत्रां - एकछत्री - क्षितिं - पृथ्वीला - अजितेन - श्रीकृष्णासह - शशास - पाळिता झाला. ॥२०॥

अशा प्रकारे भारत वर्षात फिरत फिरत जेव्हा तो प्रभास क्षेत्रात पोहोचला, त्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या सहाय्याने, महाराज युधिष्ठिर पृथ्वीवर एकछत्री अखंड राज्य करु लागले होते. (२०)


तत्राथ शुश्राव सुहृद्‌विनष्टिं
    वनं यथा वेणुज वह्निसंश्रयम् ।
संस्पर्धया दग्धमथानुशोचन्
    सरस्वतीं प्रत्यगियाय तूष्णीम् ॥ २१ ॥
वेळू जसे घासुनि भस्म होती
    स्वकीय युद्धे तयि नष्ट झाले ।
तेथेचि ऐकून विदूर काका
    सरस्वतीच्या तटि दुःख आले ॥ २१ ॥

अथ - नंतर - तत्र - तेथे - यथा - जसे - वेणुजवह्निसंश्रयं - वेळूपासून घर्षणाने उत्पन्न झालेल्या अग्नीच्या संपर्काने - वनं - अरण्य - दग्धं - जळून जाते - तथा - तशा रीतीने - संस्पर्धया - एकमेकाला जिंकण्याच्या इच्छेने - संभूतां - झालेल्या - सुहृद्विनष्टिं - मित्रनाशाला - शुश्राय - ऐकता झाला - अथ - नंतर - अनुशोचन् - शोक करणारा - तूष्णीं - स्तब्ध हो‍ऊन - सरस्वतीं - सरस्वतीच्या - प्रत्यक् - उगमाजवळ - इयाय - गेला. ॥२१॥

तेथे त्याने आपल्या कौरव-बंधूंच्या विनाशाचे वृत्त ऐकले, जे आपापसांतील कलहामुळे एकमेकांशी लढून नष्ट झाले होते; जसे बांबूंचे जंगल एकमेकांवर घासून पेटलेल्या अग्नीने जळून खाक होते. हे ऐकून तो शोक करीत निमूटपणे सरस्वतीच्या तीरावर आला. (२१)


तस्यां त्रितस्योशनसो मनोश्च
    पृथोरथाग्नेरसितस्य वायोः ।
तीर्थं सुदासस्य गवां गुहस्य
    यत् श्राद्धदेवस्य स आसिषेवे ॥ २२ ॥
पृथू मनू अग्नि असीत वायू
    गो श्राद्ध देवो उशना सुदास ।
त्रिता गुहादीक ही नाव घेता
    तीर्थेचि एकादश सेवियेली ॥ २२ ॥

सः - तो - विदुरः - विदुर - तस्यां - तेथील - त्रितस्य - त्रिताच्या - उशनसः - शुक्राचार्याच्या - च - आणि - मनोः - मनूच्या - पृथोः - पृथूच्या - अथ - नंतर - अग्नेः - अग्नीच्या - असितस्य - असिताच्या - वायोः - वायूच्या - सुदासस्य - सुदासाच्या - गवां - गाईच्या - गुहस्य - कार्तिकेयाच्या - च - आणि - श्राद्धदेवस्य - श्राद्धदेवाच्या - यत् - ज्या प्रसिद्ध - तीर्थं - तीर्थाला - आसिवेषे - यथेच्छ सेविता झाला. ॥२२॥

तेथे त्याने त्रित, उशना, मनू, पृथू, अग्नी, असित, वायू, सुदास, गौ, गुह आणि श्राद्धदेवाच्या नावाने प्रसिद्ध अशा अकरा तीर्थांत स्नान करुन संबंधितांना तिलांजली दिली. (२२)


अन्यानि चेह द्विजदेवदेवैः
    कृतानि नानायतनानि विष्णोः ।
प्रत्यङ्ग मुख्याङ्‌कितमन्दिराणि
    यद्दर्शनात् कृष्णमनुस्मरन्ति ॥ २३ ॥
आणीक जे ब्राह्मण देवता नी
    श्री विष्णु मंदीर उभारियेले ।
ज्या मुख्यभागात सुदर्शनाने
    श्री कृष्ण येतो स्मरणात नित्य ।
तेथे तिथे ते पृथिवीवरी या
    फिरोनि आले निजशांतिसाठी ॥ २३ ॥

इह - येथे - सः - तो विदुर - च - आणि - अन्यानि - दुसरी - प्रत्यङ्गमुख्याङ्‌कितमन्दिराणि - प्रत्येक अवयवाच्या मुख्य चिन्हांनी शोभित आहेत मंदिरे ज्यात अशी - द्विजदेवदेवैः - ऋषी व देव यांनी - कृतानि - निर्मिलेली - विष्णोः - विष्णूची - नानायतनानि - अनेक देवालये - आसिषेवे - यथेच्छ सेविता झाला. - यद्दर्शनात् - ज्यांच्या दर्शनाने - कृष्णं - श्रीकृष्णाला - अनुस्मरन्ति - आठवतात. ॥२३॥

याशिवाय पृथ्वीवर ब्राह्मण आणि देवतांनी स्थापन केलेली भगवान विष्णूंची अनेक मंदिरे होती की, ज्या मंदिरांच्या शिखरांवर भगवंतांचे मुख्य आयुध चक्र याचे चिन्ह होते व ज्याच्या केवळ दर्शनानेच श्रीकृष्णांचे स्मरण होत होते, अशा मंदिरांचे दर्शन घेतले. (२३)


ततस्त्वतिव्रज्य सुराष्ट्रमृद्धं
    सौवीरमत्स्यान् कुरुजाङ्गलांश्च ।
कालेन तावद्यमुनामुपेत्य
    तत्रोद्धवं भागवतं ददर्श ॥ २४ ॥
सुराष्ट्र समृद्ध मिटे पुढे जे
    सौवीर मत्स्यीं कुरुजांगी आले ।
अनेक वर्षे फिरता यमूना
    तटी तये उद्धव पाहियेले ॥ २४ ॥

ततः - नंतर - तु - तर - ऋद्धं - समृद्ध - सुराष्ट्रं - सौराष्ट्र देशाला - सौवीरमत्स्यान् - व सौवीर आणि मस्त्य देशांना - च - आणि - कुरुजाङ्गलान् - कुरु व जाङ्गल ह्या देशांना - अतिव्रज्य - उल्लंघून - तावत् - तेवढ्या - कालेन - काळाने - यमुनां - यमुनेला - उपेत्य - प्राप्त हो‍ऊन - तत्र - तेथे - भागवतं - भगवद्‌भक्त अशा - उद्धवं - उद्धवाला - ददर्श - पाहता झाला. ॥२४॥

तेथून निघून तो धन-धान्याने पूर्ण अशा सौराष्ट्र, सौवीर, मत्स्य, कुरुजांगल आदी देशात जाऊन काही दिवसांनी यमुनातटावर पोहोचला. तेव्हा तेथे त्याने परम भागवत उद्धवाचे दर्शन घेतले. (२४)


स वासुदेवानुचरं प्रशान्तं
    बृहस्पतेः प्राक्तनयं प्रतीतम् ।
आलिङ्ग्य गाढं प्रणयेन भद्रं
    स्वानां अपृच्छद् भागवत्प्रजानाम् ॥ २५ ॥
जे शांत नी भक्त बृहस्पतीचे
    ते शिष्य होते कधिकाळि निष्ठ ।
आलिंगिले त्यास बघून प्रेमे
    ते क्षेम सारे पुसले तयांना ॥ २५ ॥

सः - तो - प्रशान्तं - शान्त - बृहस्पतेः - बृहस्पतीपासून - प्राप्तनयं - नीतिशास्त्र शिकलेल्या - प्रतीतं - प्रसिद्ध अशा - वासुदेवानुचरं - श्रीकृष्णाची सेवा करणार्‍या - उद्धवं - उद्धवाला - प्रणयेन - प्रेमाने - गाढं - दृढ - आलिंङ्ग्य - आलिंगन देऊन - भगवत्प्रजानां - भगवंताचा आश्रय करून राहणार्‍या - स्वानां - स्वकीयांच्या - भद्रं - खुशालीबद्दल - अपृच्छत् - विचारू लागला ॥२५॥

तो भगवान श्रीकृष्णांचा विख्यात सेवक आणि शांत स्वभावाचा होता. तो पूर्वीचा बृहस्पतीचा शिष्य होता. विदुराने त्याला पाहून प्रेमाने गाढ आलिंगन दिले आणि त्याला भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आश्रित असलेल्या स्वजनांचे कुशल विचारले. (२५)


कच्चित्पुराणौ पुरुषौ स्वनाभ्य
    पाद्मानुवृत्त्येह किलावतीर्णौ ।
आसात उर्व्याः कुशलं विधाय
    कृतक्षणौ कुशलं शूरगेहे ॥ २६ ॥
विदूरजी म्हणाले-
श्री ब्रह्मजी प्रार्थिति जै हरीला
    तै कृष्ण आला अवतारुनीया ।
तो भार पृथ्वीस कमी करोनी
    तो शांत राही वसुदेव गेही ॥ २६ ॥

स्वनाभ्यपाद्मानुवृत्त्या - आपल्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून - इह - येथे - अवतीर्णौ - अवतीर्ण झालेले - पुराणौ - पुरातन असे - पुरुषौ - दोन पुरुष - उर्व्याः - पृथ्वीच्या - कुशलं - कल्याणाला - विधाय - करून - कृतक्षणौ - भोगिला आहे आनंद ज्यांनी असे - शूरगेहे - शूरसेनाच्या घरी - किल - खरोखर - कुशलं - खुशाल - आसाते कच्चित् - आहेत काय ? ॥२६॥

विदुराने विचारले - पुराण पुरुष बलराम आणि श्रीकृष्ण यांनी, आपल्याच नाभिकमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकून, या जगात अवतार घेतला, ते पृथ्वीचा भार उतरविल्यावर सर्वांना आनंद देत आता श्रीवसुदेवांच्या घरी सुखाने रहात आहेत ना ? (२६)


कच्चित् कुरूणां परमः सुहृन्नो
    भामः स आस्ते सुखमङ्ग शौरिः ।
यो वै स्वसॄणां पितृवद् ददाति
    वरान् वदान्यो वरतर्पणेन ॥ २७ ॥
सुहृद वसूदेव पित्या समान
    जो कुंती आदीसहि मोद देतो ।
ज्यां अर्पितो आम्हिहि सर्व वस्तु
    आनंदि हो ना निवसोनि तेथे ? ॥ २७ ॥

अङ्ग - अहो - कुरूणां - कुरुकुलोत्पन्न अशा - नः - आमचा - परमः - मोठा - सुहृतः - मित्र - भामः - पूज्य - सः - तो - शौरिः - वसुदेव - सुखं - सुखी - आस्ते कच्चित् - आहे ना ? - यः - जो - वै - खरोखर - वदान्यः - दानधर्म करणारा उदार - स्वसृणां - बहिणींचा - वरतर्पणेन - इष्ट वराने तृप्ति करून - पितृवत् - बाप मुलींना देतो त्याप्रमाणे - वरान् - योग्य वस्तूंना - ददाति - देतो ॥२७॥

प्रिय उद्धवा, आम्हां कुरुवंशीयांचे परम सुहृद आणि जे पित्याप्रमाणे समान वागणुकीने उदारतापूर्वक पतींसह कुंती आदी आपल्या बहिणींना इच्छिलेल्या सर्व वस्तू देऊन आनंद देणारे पूज्य वसुदेव खुशाल आहेत ना ? (२७)


कच्चिद् वरूथाधिपतिर्यदूनां
    प्रद्युम्न आस्ते सुखमङ्ग वीरः ।
यं रुक्मिणी भगवतोऽभिलेभे
    आराध्य विप्रान् स्मरमादिसर्गे ॥ २८ ॥
तो यादवीवीर प्रद्युम्न कैसा
    जो कामदेवो अवतार आहे ।
विप्रास प्रार्थोनिहि रुक्मिणीने
    पोटीतयाला निज पुत्र केला ॥ २८ ॥

अङ्ग - अहो - यदूनां - यादवांमध्ये - वीरः - पराक्रमी - वरूथाधिपतिः - सेनापति - प्रद्युम्नः - प्रद्युम्न - सुखं - सुखी - आस्ते कच्चित् - आहे ना ? - रुक्मिणी - रुक्मिणी - विप्रान् - ब्राह्मणांना - आराध्य - पूजून - आदिसर्गे - पूर्वजन्मी - यं - ज्याला - स्मरं - मदन - इति ब्रुवन्ति तं - असे म्हणतात त्याला - भगवतः - श्रीकृष्णापासून - अभिलेभे - मिळवती झाली. ॥२८॥

हे उद्धवा, जो पूर्वजन्मी कामदेव होता आणि ज्याला देवी रुक्मिणीने ब्राह्मणांची आराधना करुन भगवंतांकडून प्राप्त करुन घेतले, तो यादवांचा सेनापती वीर प्रद्युम्न सुखात आहे ना ? (२८)


कच्चित्सुखं सात्वतवृष्णिभोज
    दाशार्हकाणामधिपः स आस्ते ।
यमभ्यषिञ्चत् शतपत्रनेत्रो
    नृपासनाशां परिहृत्य दूरात् ॥ २९ ॥
सुखात ना सात्वत वृष्णि भोज
    दाशार्हवंहशी अधिउग्रसेन ।
राज्यासनासी नसुनीही इच्छा
    कृष्णे तया आसनि बैसवीले ॥ २९ ॥

शतपत्रनेत्रः - कमलनेत्र श्रीकृष्ण - नृपासनाशां - सिंहासनाच्या इच्छेला - दूरात् - दुरूनच - परिहृत्य - सोडून देऊन - यं - ज्याला - अभ्यषिंचत् - अभिषेकिता झाला - सात्वतवृष्णिभोजदाशार्हकाणां - सात्त्वत,वृष्णि,भोज व दाशार्ह ह्यांचा - अधिपः - पालक - सः - तो - उग्रसेनः - उग्रसेन - सुखं - कुशल - आस्ते कच्चित् - आहे ना? ॥२९॥

सात्वत, वृष्णी, भोज आणि दाशार्ह वंशातील यादवांचे अधिपती महाराज उग्रसेन सुखात आहेत ना ? त्यांनी राज्य मिळण्याची आशा पूर्णपणे सोडून दिली होती; परंतु कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी त्यांना पुन्हा राजसिंहासनावर बसविले. (२९)


कच्चिद् हरेः सौम्य सुतः सदृक्ष
    आस्तेऽग्रणी रथिनां साधु साम्बः ।
असूत यं जाम्बवती व्रताढ्या
    देवं गुहं योऽम्बिकया धृतोऽग्रे ॥ ३० ॥
कृष्णापरी जो रथि सांब कैसा
    कार्तीकस्वामी निज पूर्वजन्मी ।
जांबुवतीच्या तप आचराने
    पोटी तिच्या तो मग सांब झाला ॥ ३० ॥

सौम्य - हे शान्त उद्धवा! - व्रताढ्या - व्रताचरणाने महत्त्वाला पोचलेली - जाम्बवती - जाम्बवती - यं - ज्या - देवं - तेजस्वी - गुहं - गुहाला - असूत - उत्पन्न करती झाली - यः - जो - अग्रे - पूर्वी - अंबिकया - पार्वतीने - धृतः - धारण केला होता - सः - तो - सदृक्षः - सारख्याच योग्यतेचा - हरेः - श्रीकृष्णाचा - सुतः - पुत्र - रथिनां - रथीलोकात - अग्रणोः - नायक - सांबः - सांब - साधु - चांगला - आस्ते कच्चित् - आहे काय ? ॥३०॥

हे उद्धवा, आपले पिता श्रीकृष्ण यांच्याप्रमाणेच सर्व योद्ध्यांमध्ये अग्रगण्य असणारा श्रीकृष्णपुत्र सांब खुशाल आहे ना ? हे पार्वतीपुत्र कार्तिकस्वामी होते. अनेक व्रते करुन जांबवतीने यांना जन्म दिला होता. (३०)


क्षेमं स कच्चिद् युयुधान आस्ते
    यः फाल्गुनात् लब्धधनूरहस्यः ।
लेभेऽञ्जसाधोक्षजसेवयैव
    गतिं तदीयां यतिभिर्दुरापाम् ॥ ३१ ॥
तो क्षेम ना सात्यकि अर्जुनाचा
    गुरू धनुर्धारि असे कधीचा ।
जो योगिया दुर्लभ लाभ सेवी
    श्रीकृष्ण सेवेत सदाचि राही ॥ ३१ ॥

फाल्गुनात् - अर्जुनापासून - लब्धधनूरहस्य - मिळविले आहे धनुर्विद्येचे रहस्य ज्याने असा - सः - तो - युयुधानाः - सात्यकि - क्षेमं - खुशाल - आस्ते कच्चित् - आहे काय ? - यः - जो - अधोक्षजसेवया - श्रीकृष्णाची सेवा करून - यतिभिः - साधूंनी - दुरापां - मिळविण्यास कठीण अशा - तदीयां - श्रीकृष्णविषयक - गतिं - गतीला - अञ्जसा एव - तत्काळच - लेभे - मिळविता झाला ॥३१॥

अर्जुनापासून रहस्यांसह धनुर्विद्येचे शिक्षण घेतलेला सात्यकी सुखरुप आहे ना ? योग्यांनाही दुर्लभ अशी भगवद्‌गती सात्यकीला श्रीकृष्णाच्या सेवेनेच सहज प्राप्त झाली. (३१)


कच्चिद् बुधः स्वस्त्यनमीव
    आस्ते श्वफल्कपुत्रो भगवत्प्रपन्नः ।
यः कृष्णपादाङ्‌कितमार्गपांसु
    ष्वचेष्टत प्रेमविभिन्नधैर्यः ॥ ३२ ॥
तो भक्त अक्रूर सुखात हो ना
    जो बुद्धिमान् निर्मल कृष्णभक्त ।
जेणे पदोधूळ श्रीकृष्ण यांची
    लोळूनिया घेतलि अंग अंगी ॥ ३२ ॥

बुधः - बुद्धिवान् - अनमीवः - निष्पाप - भगवत्प्रपन्नः - श्रीकृष्णाची भक्ति करणारा - श्वफल्कपुत्रः - श्वफल्काचा मुलगा अक्रूर - स्वस्ति - कुशल - आस्ते कच्चित् - आहे काय ? - यः - जो - प्रेमविभिन्नधैर्यः - प्रेमामुळे धैर्य नाहिसे झालेला - कृष्णपादाङ्‌कितमार्गपांसुषु - श्रीकृष्णाच्या पायावरील चक्रादि चिन्हे उमटलेल्या रस्त्यावरील धुळीचे ठिकाणी - अचेष्टत - गडबडा लोळला ॥३२॥

भगवंतांना शरण गेलेला निर्मल अंतःकरणाचा बुद्धिमान अक्रूर प्रसन्नचित्त आहे ना ? तोच अक्रूर श्रीकृष्णांची चरणचिन्हे उमटलेल्या मार्गावरील धुळीत प्रेमाने अधीर हो‌ऊन लोळू लागला होता. (३२)


कच्चिच्छिवं देवकभोजपुत्र्या
    विष्णुप्रजाया इव देवमातुः ।
या वै स्वगर्भेण दधार देवं
    त्रयी यथा यज्ञवितानमर्थम् ॥ ३३ ॥
ती देवकी ठीक असेल ना की
    जी विष्णुची ती अदितीच माता ।
जी वेद ते तीन मंत्रास ध्यायी
    तेंव्हा तिच्या गर्भिही कृष्ण आला ॥ ३३ ॥

देवमातुः - देवांच्या आईच्या - इव - प्रमाणे - विष्णुप्रजायाः - जिच्यापासून विष्णु श्रीकृष्णनावाने पुत्ररूपाने अवतीर्ण झाला अशा - देवकभोजपुत्र्याः - भोजकुलोत्पन्न् देवकन्या जी देवकी तिचे - शिवं - कुशल - कच्चित् - आहे काय ? - यथा - जसे - त्रयी - तीन वेद - यज्ञ्वितानां - यज्ञाचा विस्तार करणार्‍या - अर्थं - अर्थाला - तथा - तसे - या - जी - वै - खरोखर - देवं - परमेश्वराला - स्वगर्भेण - आपल्या गर्भाने - दधार - धरती झाली ॥३३॥

देवमाता अदितीप्रमाणेच साक्षात भगवान विष्णूंची माता भोजवंशी राजा देवकाची मुलगी देवकी आनंदात आहे ना ? जसे तिन्ही वेद यज्ञविस्ताररूप अर्थाला आपल्या मंत्रांमध्ये धारण करतात, त्याचप्रमाणे देवकीने भगवान श्रीकृष्णांना आपल्या गर्भामध्ये धारण केले होते. (३३)


अपिस्विदास्ते भगवान् सुखं वो
    यः सात्वतां कामदुघोऽनिरुद्धः ।
यमामनन्ति स्म हि शब्दयोनिं
    मनोमयं सत्त्वतुरीयतत्त्वम् ॥ ३४ ॥
जो स्वामी झाला मन इंद्रियांचा
    नी भक्तकाम्या करितो पुरे जो ।
तो सांग कैसा अनिरुद्ध भक्त
    सांगा कसे क्षेम तयास आहे ॥ ३४ ॥

यः - जो - सात्वतां - सात्वत कुलात उत्पन्न झालेल्या - वः - तुमचा - कामदुघः - इच्छा पूर्ण करणारा - सः - तो - भगवान् - सर्वगुणसंपन्न - अनिरुद्धः - अनिरुद्ध - सुखं - सुखी - आस्ते - आहे - अपिस्वित् - काय ? - यं - ज्याला - सत्त्वतुरीयतत्त्वं - अंतःकरणाचे चवथे तत्त्वच असा - मनोमयं - मनस्वरूप - शब्दयोनिं - शब्दाचे उत्पत्तिकारण असे - आमनन्ति - मानतात. ॥३४॥

आपल्या भक्तांच्या कामना पूर्ण करणारे भगवान अनिरुद्ध सुखरुप आहेत ना ? त्यांना वेदशास्त्रांचे मूळ कारण आणि चित्त, अहंकार, बुद्धी व मन या अंतःकरणचतुष्टयाच्या चौथ्या तत्वाचा-मनाचा अधिष्ठाता समजले जाते. (३४)


अपिस्विदन्ये च निजात्मदैवं
    अनन्यवृत्त्या समनुव्रता ये ।
हृदीकसत्यात्मज चारुदेष्ण
    गदादयः स्वस्ति चरन्ति सौम्य ॥ ३५ ॥
सौम्यस्वभावा हृदयेश्वराचे
    जे पुत्र हृदीक नि चारूदेष्ण ।
क्षेम तयांचे मज सांगणे ते
    जे सर्व त्यांचे कुशलो वदावे ॥ ३५ ॥

सौम्यः - हे शांत उद्धवा ! - च - आणि - अन्ये - दुसरे - ये - जे - निजात्मदैवं - आपला मुख्य देव अशा श्रीकृष्णाला - अनन्यवृत्त्या - अनन्यभावाने - समनुव्रताः - भजणारे - हृदीकसत्यात्मजचारुदेष्णगदादयः - हृदीक, सत्यभामेचा पुत्र चारुदेष्ण, गद वगैरे - स्वस्ति - सुखाने - चरन्ति - राहतात - अपिस्वित् - काय ? ॥३५॥

हे उद्धवा ! आपले हृदयेश्वर अशा भगवान श्रीकृष्णांचे अनन्य भावाने अनुकरण करणारे हृदीक, सत्यभामेचा पुत्र चारुदेष्ण, गद इत्यादी सर्वजण सुखरुप आहेत ना ? (३५)


अपि स्वदोर्भ्यां विजयाच्युताभ्यां
    धर्मेण धर्मः परिपाति सेतुम् ।
दुर्योधनोऽतप्यत यत्सभायां
    साम्राज्यलक्ष्म्या विजयानुवृत्त्या ॥ ३६ ॥
बाहू जयाच्या हरि पार्थ दोघे
    साह्ये ययाच्याचि युधिष्ठिरो तो ।
त्या न्याय धर्मास अनूसरे की
    सांगा तशी क्षेम तिथील वार्ता ॥ ३६ ॥

धर्मः - धर्मराज - स्वदोर्भ्यां - आपले बाहूच की काय अशा - विजयाच्युताभ्यां - अर्जुन व श्रीकृष्ण यांसह - धर्मेण - धर्माने - सेतुं - धर्ममर्यादेला - परिपाति अपि - रक्षितो काय ? - यत्सभायां - ज्या धर्मराजाच्या सभेत - दुर्योधनः - दुर्योधन - विजयानुवृत्त्या - अर्जुनाने राजे जिंकून मिळविलेल्या अर्थात् अर्जुनाच्या मागोमाग येणार्‍या - साम्राज्यलक्ष्म्या - सार्वभौम संपत्तीने - अतप्यत - संतप्त झाला होता. ॥२६॥

अर्जुन आणि श्रीकृष्ण हे आपलेच दोन्ही हात असल्याचे समजणारे त्यांच्या सहाय्याने महाराज युधिष्ठिर धर्ममर्यादेचे न्यायपूर्वक पालन करीत आहेत ना ? मयसभेमध्ये त्यांचे राजवैभव आणि विजय पाहून दुर्योधनाचा जळफळाट झाला होता. (३६)


किं वा कृताघेष्वघमत्यमर्षी
    भीमोऽहिवद्दीर्घतमं व्यमुञ्चत् ।
यस्याङ्‌घ्रिपातं रणभूर्न सेहे
    मार्गं गदायाश्चरतो विचित्रम् ॥ ३७ ॥
क्षमी न जो भीम सर्पा प्रमाणे
    क्षमील का तो मज शांत होता ।
युद्धी पवित्रा जधि घे पदाने
    भूकंप तेंव्हा धरणीसि भासे ॥ ३७ ॥

वा - अथवा - अत्यमर्षी - अतिरागीट - भीमः - भीम - कृताघेषु - पापाचरण करणार्‍या - दुर्योधनादिषु - दुर्योधनादि शत्रूंच्या ठिकाणी - अहिवत् - सर्पाप्रमाणे - दीर्घतमं -अत्यंत मोठ्या - अघं - सूड घेण्याच्या क्रियेला - व्यमुञ्चत् किं - करता झाला काय - गदायाः - गदेच्या - विचित्रं - अद्‍भुत - मार्गं - भ्रमणक्रियेला - चरतः - करणार्‍या - यस्य - ज्या - भीमस्य - भीमाच्या - अंघ्रिपातं - पादप्रहाराला - रणभूः - युद्धभूमी - न सहे - सहन करीत नव्हती. ॥३७॥

अपराधी लोकांच्या बाबतीत अत्यंत असहिष्णू असलेल्या भीमाने सापाप्रमाणे दीर्घ काल टिकणारा आपला क्रोध सोडला की नाही ? जेव्हा तो गदायुद्धात वेगवेगळे पवित्रे घेत असे, त्यावेळी त्याच्या पायांचे आघात धरती सहन करु शकत नसे. (३७)


कच्चिद् यशोधा रथयूथपानां
    गाण्डीव धन्वोपरतारिरास्ते ।
अलक्षितो यच्छरकूटगूढो
    मायाकिरातो गिरिशस्तुतोष ॥ ३८ ॥
जेणे किरातास शरानुसंधे
    व्यापोनिया तोषविले शिवाला ।
गांडीवधारी मग पार्थ आता
    युद्धोत्तरे शांत असेल ना तो ॥ ३८ ॥

रथयूथपानां - महारथ्यांमध्ये - यशोधाः - उत्तम तर्‍हेने कीर्ति मिळविलेला - गाण्डीवधन्वा - गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन - उपरतारिः - शत्रूंना मारून स्वस्थ असा - आस्ते कच्चित् - आहे काय ? - यच्छरकूटगूढः - ज्या अर्जुनाच्या बाणवृष्टीने आच्छादून गेलेला - अलक्षितः - ओळखता न येणारा - माया किरातः - कपटाने भिल्लवेष घेतलेला - गिरीशः - शंकर - तुतोष - संतुष्ट झाला ॥३८॥

ज्याच्या बाणांच्या जाळ्यात झाकले गेलेले आणि भिल्लाचा वेष घेतल्यामुळे कोणालाही ओळखू न येणारे भगवान शंकर प्रसन्न झाले होते, तो सेनापतींचे यश वाढविणारा गांडीवधनुष्य़धारी अर्जुन सुप्रसन्न आहे ना ? आता तर त्याचे सर्व शत्रू संपले असतील. (३८)


यमावुतस्वित्तनयौ पृथायाः
    पार्थैर्वृतौ पक्ष्मभिरक्षिणीव ।
रेमात उद्दाय मृधे स्वरिक्थं
    परात्सुपर्णाविव वज्रिवक्त्रात् ॥ ३९ ॥
माद्री यमाचे सहदेव बंधू
nbsp;   जे रक्षिती त्याच युधिष्ठिराते ।
जै पापण्या रक्षिती नेत्र गोल
    सांगा तयांचे कुशलो कसे ते ॥
सुधा जशी त्या गरुडे मुखाने
    नेली ययांनी तयि युद्ध केले ॥ ३९ ॥

पक्ष्मभिः - पापण्यांनी - वृते - वेष्टिल्यामुळे रक्षिले गेलेल्या - अक्षिणी इव - दोन डोळ्यांप्रमाणे - पार्थैः - धर्म, भीम व अर्जुन या तीन कुंतीपुत्रांनी - वृतौ - रक्षिलेले - यमौ - जुळे - पृथायाः - कुन्तीचे - तनयौ - पुत्र नकुळ व सहदेव - सुपर्णौ वज्रिवक्‍त्रात् इव - इंद्राच्या मुखातून अमृताला घेणारे दोन गरुडच की काय अशाप्रमाणे - मृधे - युद्धात - परात् - शत्रूपासून - स्वरिक्थं - आपल्या द्रव्यभागाला - उद्दाय - घेऊन - रेमाते उतस्वित् - आनंदाने खेळतात काय ? ॥३९॥

पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांचे रक्षण करतात त्याप्रमाणेच कुंतीचे युधिष्ठिर आदी पुत्र ज्यांचा नेहमी सांभाळ करतात आणि कुंतीनेच ज्यांचे लालनपालन केले, ते नकुल आणि सहदेव कुशल आहेत ना ? ज्याप्रमाणे दोन गरुडांनी इंद्राच्या मुखातून अमृत काढून आणले होते, त्याप्रमाणे या दोघांनी युद्धात शत्रूकडून आपले राज्य जिंकून घेतले होते. (३९)


अहो पृथापि ध्रियतेऽर्भकार्थे
    राजर्षिवर्येण विनापि तेन ।
यस्त्वेकवीरोऽधिरथो विजिग्ये
    धनुर्द्वितीयः ककुभश्चतस्रः ॥ ४० ॥
बिचारि कुंती विधवा असोनी
    पुत्रार्थ प्राणास धरोनि राही ।
त्या पांडुने एक धनुष्य घेता
    चारी दिशा जिंकियल्या शुरत्वे ॥ ४० ॥

अहो - कितीहो आश्चर्य - पृथा - कुंती - अपि - सुद्धा - तेन - त्या - राजर्षिवर्येण - श्रेष्ठ राजर्षि अशा पंडुराजाने - विनाअपि - विरहित अशीहि - अर्भकार्थे - पुत्रांकरिताच - ध्रियते - जिवंत राहिली आहे - यः - जो - तु - तर - अधिरथः - महापराक्रमी - एकवीरः - अद्वितीय शूर - धनुर्द्वितीयः - फक्‍त ज्याला साहाय्य करणारे दुसरे धनुष्यच आहे असा पांडुराजा - चतस्त्रः - चार - ककुभः - दिशांना - विजिग्ये - जिंकिता झाला. ॥४०॥

अहो ! श्रेष्ठ राजर्षी पांडूचा वियोग हो‌ऊनही कुंती केवळ या बालकांसाठीच जिवंत राहिली. ज्या महारथी अद्वितीय वीर पांडूने केवळ एक धनुष्य घेऊन एकटयानेच चारी दिशा जिंकल्या होत्या. (४०)


सौम्यानुशोचे तमधःपतन्तं
    भ्रात्रे परेताय विदुद्रुहे यः ।
निर्यापितो येन सुहृत्स्वपुर्या
    अहं स्वपुत्रान् समनुव्रतेन ॥ ४१ ॥
सौम्या मला दुःख अधःपतीचे
    जो द्रोहितो बंधु रुपात पुत्र ।
जेणे मुलांचे समजोनि सत्य
    हाकी मलाही नगरा मधोनी ॥ ४१ ॥

सौम्य - हे शान्तस्वभावाच्या उद्धवा ! - अधः - अधोगतीला - पतन्तं - जाणार्‍या - तं - त्या - धृतराष्ट्रं - धृतराष्ट्राबद्दल - अनुशोचे - वाईट वाटते - यः - जो - परेताय - मेलेल्या - भ्रात्रे - भाऊ पांडुराजाशी - विदुद्रुहे - वैर करिता झाला - स्वपुत्रान् - आपल्या मुलांना - समनुव्रतेन - अनुसरणार्‍या - येन - ज्या धृतराष्ट्राने - सुहृन् - स्नेही असा - अहं - मी - स्वपुर्याः - आपल्या नगरातून - निर्यापितः - घालवून दिला गेलो ॥४१॥

हे उद्धवा, ज्याने पांडवांच्या रुपाने आपल्या परलोकवासी भाऊ पांडूचा द्वेष केला आणि आपल्या मुलांच्या होकारात होकार मिळवून आपला हितचिंतक असलेल्या मला नगराबाहेर घालवून दिले, तो धृतराष्ट्र अधःपतनाकडे जात आहे, हे पाहून मला फार वाईट वाटते. (४१)


सोऽहं हरेर्मर्त्यविडम्बनेन
    दृशो नृणां चालयतो विधातुः ।
नान्योपलक्ष्यः पदवीं प्रसादात्
    चरामि पश्यन् गतविस्मयोऽत्र ॥ ४२ ॥
परी न त्याचे मज दुःख कांही
    जगद् विधाता बघतो परीक्षा ।
त्याच्या कृपेने जन लोक दूर
    राही परी मोद भरेचि चित्ता ॥ ४२ ॥

सः - तो - अहं - मी - मर्त्यविडम्बनेन - मनुष्याचे अनुकरण करण्याने - नृणां - मनुष्यांचा - दृशः - दृष्टींना - चालयतः - चाळविणार्‍या - विधातुः - जगद्‌रक्षक - हरेः - श्रीकृष्णाच्या - प्रसादात् - अनुग्रहाने - पदवीं - सन्मार्गाला - पश्यन् - पहाणारा होत्साता - गतविस्मयः - आश्चर्य न मानणारा - नान्योपलक्ष्यः - वेष बदलल्यामुळे दुसर्‍याला ओळखता न येणारा असा - अत्र - येथे - चरामि - फिरत आहे ॥४२॥

परंतु मला या गोष्टीचे बिलकुल आश्चर्य वाटत नाही. जगद्विधाता भगवान श्रीकृष्णच मनुष्यासारख्या लीला करुन लोकांची मनोवृत्ती भ्रमित करतात. मी तर त्यांच्याच कृपेने त्यांचा महिमा पाहात इतरांपासून दूर राहून आनंदाने विहार करीत आहे. (४२)


नूनं नृपाणां त्रिमदोत्पथानां
    महीं मुहुश्चालयतां चमूभिः ।
वधात्प्रपन्नार्तिजिहीर्षयेशोऽपि
    उपैक्षताघं भगवान् कुरूणाम् ॥ ४३ ॥
त्या कौरवांचा अपराध साहे
    तो कृष्ण त्यांचेहि सहाय्य घेई ।
ज्यांच्यामुळे ही धरणी थरारे
    त्या दुष्टराजांस वधावयाला ॥ ४३ ॥

भगवान् - सर्वगुणसंपन्न परमेश्वर - नूनं - खरोखर - त्रिमदोत्पथानां - तीन प्रकारच्या मदाने उन्मत्त झालेल्या - चमूभिः - सैन्यानी - मुहुः - वारंवार - महीं - पृथ्वीला - चालयतां - हलवून सोडणार्‍या - नृपाणां - राजांच्या - वधात् - नाशाने - प्रपन्नार्तिजिहीर्षया - शरणागतांची पीडा दूर करण्याच्या इच्छेने - ईशः - समर्थ - अपि - असूनसुद्धा - कुरुणां - कौरवांच्या - अघं - पापाचरणाला - उपैक्षत - उपेक्षापूर्वक सहन करिता झाला. ॥४३॥

जरी कौरवांनी अपराध केले असले तरी भगवंतांनी त्यांची अशासाठी उपेक्षा केली की त्यांच्या बरोबरीने जे दुष्ट राजे धन, विद्या आणि जातीच्या मदाने अंध हो‌ऊन कुमार्गाने जात होते आणि वारंवार आपल्या सैन्याच्या बळावर पृथ्वीचा थरकाप उडवीत होते, त्यांनाही मारून आपल्याला शरण आलेल्यांचे दुःख ते नाहीसे करु इच्छित होते. (४३)


अजस्य जन्मोत्पथनाशनाय
    कर्माण्यकर्तुर्ग्रहणाय पुंसाम् ।
नन्वन्यथा कोऽर्हति देहयोगं
    परो गुणानामुत कर्मतंत्रम् ॥ ४४ ॥
तो कृष्ण जन्मा मरणास दूर
    त्या दुष्ट नाशार्थ जनास बोधी ।
न मुक्ति इच्छी तनु माणसाची
    जनार्थ येणे धरिली पहा की ॥ ४४ ॥

अजस्य - जन्मरहित ईश्वराचे - जन्म - जन्माला येणे - उत्पथनाशनाय - दुर्मार्गाने वागणार्‍यांच्या नाशाकरिता - अकर्तुः - कर्मरहित अशा परमेश्वराची - कर्माणि - कर्मे - पुंसां - पुरुषांना - ग्रहणाय - सन्मार्गात आणण्याकरिता - अन्यथा - असे नसेल तर - गुणानां - त्रिगुणांहून - परः - निराळा - कः - कोणता - देहयोगं - देहसंबंधाला - उत - आणि - कर्मतंत्रं - कर्मजालाला - ननु - खरोखर - अर्हति - स्वीकारण्यास ईच्छितो. ॥४४॥

उद्धवा, भगवान श्रीकृष्ण जन्म आणि कर्मरहित आहेत तरीसुद्धा दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना आपल्याजवळ आणण्यासाठी त्यांची दिव्य अशी जन्म-कर्मे होतात. नाही तर दुसरा अन्य कोण आहे की, जो गुणांच्या पलीकडे गेलेला असूनही या कर्मबंधनात पडू इच्छील ? (४४)


तस्य प्रपन्नाखिललोकपानां
    अवस्थितानां अनुशासने स्वे ।
अर्थाय जातस्य यदुष्वजस्य
    वार्तां सखे कीर्तय तीर्थकीर्तेः ॥ ४५ ॥
मित्रा जरी जन्म नसे तयाला
    स्वभक्त इच्छा करण्यास पूर्ण ।
जन्मास आला जन उद्धराया
    त्या श्री हरीची कथने कथावी ॥ ४५ ॥

सखे - हे मित्रा उद्धवा - प्रपन्नाखिललोकपानां - शरण आलेल्या सर्व राजांच्या - च - आणि - स्वे - आपल्या - अनुशासने - आज्ञेत - अवस्थितानां - राहिलेल्या साधूंच्या - अर्थाय - कल्याणाकरिता - यदुषु - यादवांमध्ये - जातस्य - जन्म घेतलेल्या - तीर्थकीर्तेः - पवित्र कीर्तीच्या - तस्य - त्या श्रीकृष्णाच्या - वार्तां - कथांना - कीर्तय - वर्णन करून सांगा. ॥४५॥

म्हणून मित्रा, ज्यांनी अजन्मा असूनही आपल्याला शरण आलेले सर्व लोकपाल आणि आज्ञाधारक भक्त यांचे कल्याण करण्यासाठी यदुकुळात जन्म घेतला आहे, त्या पवित्रकीर्ती श्रीहरींच्या कथा मला ऐकव. (४५)


स्कंध तिसरा - अध्याय पहिला समाप्त

GO TOP