|
श्रीमद् भागवत पुराण पुराणलक्षणानि, विराट्पुरुषविग्रहे इन्द्रिय-तदधिष्ठातृदेवानां उत्पत्तिश्च च - भागवताची दहा लक्षणे - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्) अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः । मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः ॥ १ ॥
श्री शुकदेवजी म्हणाले - ( अनुष्टुप् ) श्रीमद्भागवतामध्ये सर्ग स्थान विसर्ग नी । पोषणो ऊति ईशानु कथा मन्वंतरो असे ॥ निरोध मुक्ति आश्रेय दहा लक्षण वर्णिले ॥ १ ॥
अत्र - येथे - सर्गः - तात्त्विक सृष्टि - विसर्गः - स्थावरजंगम सृष्टि - स्थानं - स्थिती - पोषणं - ईश्वरानुग्रहाने पुष्ट होणे - ऊतयः - कर्मवासना - मन्वन्तरेशानुकथाः - सद्धर्म व अवतारकथा - निरोधः - संहार - मुक्तिः - मोक्ष - च - आणि - आश्रयः - परमेश्वर ॥१॥
श्रीशुक म्हणाले - परीक्षिता ! या भागवत पुराणात सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, ऊती, मन्वन्तर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय अशा दहा विषयांचे वर्णन आले आहे. (१)
दशमस्य विशुद्ध्यर्थं नवानामिह लक्षणम् ।
वर्णयन्ति महात्मानः श्रुतेनार्थेन चाञ्जसा ॥ २ ॥
दहावे आश्रयो तत्व कळावे दृढनिश्चये । कारणी श्रुति तात्पर्ये संतांनी वर्णिले नऊ ॥ २ ॥
इह - येथे - महात्मनः - थोर मनाचे पुरुष - दशमस्य - दहाव्या लक्षणांच्या - विशुद्ध्यर्थं - शुद्ध ज्ञानासाठी - नवानां - नऊ लक्षणांच्या - लक्षणम् - स्वरूपाला - अञ्जसा - प्रत्यक्ष - श्रुतेन - वेदादिकांच्या श्रवणाने - च - आणि - अर्थेन - अर्थाने - वर्णयन्ति - वर्णन करून सांगतात. ॥२॥
यातील दहावे जे आश्रय तत्त्व आहे त्याचे योग्य ज्ञान होण्यासाठी कधी श्रुतीने, कधी तात्पर्याने तर कधी प्रत्यक्ष अनुभवाने अन्य नऊ विषयांचे महात्म्यांनी वर्णन केले आहे. (२)
भूतमात्रेन्द्रियधियां जन्म सर्ग उदाहृतः ।
ब्रह्मणो गुणवैषम्यात् विसर्गः पौरुषः स्मृतः ॥ ३ ॥
पंचविस् शक्ति ज्या त्याच्या त्यांना सर्गचि बोलिजे । विसर्ग सृष्टिचे नाम ब्रह्म्याने निर्मिले जिला ॥ ३ ॥
गुणवैषम्यात् - गुणांच्या न्यूनाधिक्याने - ब्रह्मणः - ब्रह्मापासून - भूतमात्रेन्द्रियधियां - महाभूते, विषय, इन्द्रिये आणि बुद्धि यांची - जन्म - उत्पत्ति - सर्गः - सर्ग - उदाहृतः - बोललेला आहे - पौरुषः - पुरुषापासून झालेली सृष्टि - विसर्गः - विसर्ग - स्मृतः - सांगितला आहे. ॥३॥
ईश्वराच्या संकल्पाने सत्त्व-रज-तम गुणांमध्ये विषमता उत्पन्न होऊन रूपांतर झाल्याने जी आकाशादी पंचमहाभूते, शब्दादि तन्मात्रा, इंद्रिये, अहंकार आणि महत्तत्त्वरूप विराटाची जी उत्पत्ती होते, त्याला ’सर्ग’ म्हणतात. ब्रह्मदेवाकडून ज्या चराचर सृष्टी निर्माण होतात, त्यांचे नाव ’विसर्ग’. (३)
स्थितिर्वैकुण्ठविजयः पोषणं तदनुग्रहः ।
मन्वन्तराणि सद्धर्म ऊतयः कर्मवासनाः ॥ ४ ॥
वृद्धीस रक्षि जी शक्ती तियेचे नाम स्थान हे । कृपा ती पोषणो आणि अनुष्ठान् मनवंतर ॥ जीव ज्या वासनी बद्ध तया ऊतीच नाम की ॥ ४ ॥
वैकुण्ठविजयः स्थितिः - परमेश्वराचा विजय म्हणजे स्थिति - तदनुग्रहः पोषणं - त्याचा अनुग्रह म्हणजे पोषण - सद्धर्मः मन्वतराणि - साधूंनी आचरिलेला धर्म म्हणजे मन्वन्तरे - कर्मवासनाः ऊतयः - फलेच्छेने कर्मे करणे म्हणजे ऊति. ॥४॥
प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणार्या सृष्टीला एका मर्यादेपर्यंत स्थिर राखण्यात भगवान विष्णूंची जी सिद्धता होते, तिचे नाव ’स्थान’. भगवंतांची भक्तांच्यावर जी कृपा होते, तिचे नाव ’पोषण’. मन्वंतरांचे अधिपती जी भगवद्भक्ति आणि प्रजापालनरूप शुद्ध धर्माचे अनुष्ठान करतात, ते ’मन्वन्तर’ म्हटले जाते. जीवांना कर्मांच्याद्वारे बंधनात टाकणार्या वासना त्या ’ऊती’. (४)
अवतारानुचरितं हरेश्चास्यानुवर्तिनाम् ।
पुंसां ईशकथाः प्रोक्ता नानाख्यान उपबृंहिताः ॥ ५ ॥
विभिन्न अवतारात लीला तो घडवीतसे । ईशकथा तया नाम आख्याने युक्त गायनी ॥ ५ ॥
हरेः - भगवंताच्या - च - आणि - अस्य - ह्याचे - अनुवर्तिनां पुंसां - अनुकरण करणार्या भक्तांच्या - अवतारानुचरितं - अवतारांचे व त्यांतील कथांचे वर्णन - नानाख्यानोपबृंहिताः - अनेक कथानकांनी भरलेल्या - ईशकथाः - ईशकथा असे - प्रोक्ताः - म्हटले आहे. ॥५॥
भगवंतांच्या विविध अवतारांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या विविध आख्यानांनी युक्त अशा ज्या कथा, त्या ’ईशानुकथा’ होत. (५)
निरोधोऽस्यानुशयनं आत्मनः सह शक्तिभिः ।
मुक्तिः हित्वान्यथा रूपं स्वरूपेण व्यवस्थितिः ॥ ॥ ६ ॥
घेई तो योगनिद्रा तै तयात लीन सर्वची । निरोध नाम त्या ऐसे परित्त्यागचि मुक्ति ती ॥ ६ ॥
शक्तिभिः सह - तत्त्वांसह - अस्य आत्मनः - ह्या आत्म्याचे - अनुशयनं - लीन होणे - निरोधः - ह्याला निरोध म्हणतात - अन्यथा - दुसर्या मायिक - रूपं - स्वरूपाला - हित्वा - टाकून - स्वरूपेण - शुद्धात्मरूपाने - व्यवस्थितिः - राहणे - मुक्तिः - त्याला मुक्ति म्हणतात. ॥६॥
योगनिद्रेचा स्वीकार करून भगवंत शयन करतात, तेव्हा जीवाचे आपल्या उपाधींसह भगवंतांत लीन होणे, त्याला ’निरोध’ म्हणतात. अज्ञानाने कल्पना केलेले कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादि अनात्मभावाचा त्याग करून आपल्या परमात्मरूप वास्तविक स्वरूपात स्थिर होणे म्हणजे ’मुक्ति’ होय. (६)
आभासश्च निरोधश्च यतश्चाध्यवसीयते ।
स आश्रयः परं ब्रह्म परमात्मेति शब्द्यते ॥ ७ ॥
उत्पत्ती प्रलया शक्ति तीस आश्रय बोलती । परब्रह्माचिये शक्ति परमात्मा म्हणा तया ॥ ७ ॥
आभासः - भ्रम - च - आणि - निरोधः - लय - यतः - ज्यापासून - अध्यवसीयते - निश्चितपणे ठरविला जातो - सः - तो - आश्रयः - आश्रय - परं ब्रह्म - परब्रह्म - परमात्मा - परमात्मा - इति - असा - शब्दयते - संबोधिला जातो. ॥७॥
परीक्षिता, या चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्त्वाने प्रकाशित होतात, ते परब्रह्मच ’आश्रय’ आहे. शास्त्रात त्यालाच ’परमात्मा’ म्हटले आहे. (७)
योऽध्यात्मिकोऽयं पुरुषः सोऽसौ एवाधिदैविकः ।
यः तत्र उभय विच्छेदः स स्मृतोह्याधिभौतिकः ॥ ८ ॥
द्रष्टा इंद्रीयगर्वाच्या जीवाची सूर्य देवता । नेत्रादी युक्त हा देह त्या दोघा वेगळा बघे ॥ ८ ॥
यः - जो - अयं - हा - अध्यात्मिकः - इंद्रियाभिमानी - पुरुषः - जीव - सः एव - तोच - असौ - हा - आधिदैविकः - इंद्रियदेवतारूपी - यः - जो - तत्र - त्यांत - उभयविच्छेदः - दोहोंचा वियोग तो - पुरुषः - जीव - आधिभौतिकः हि - खरोखर शारीरिक ॥८॥
नेत्र इत्यादि इंद्रियांचा जो अभिमानी द्रष्टा जीव आहे, तोच इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता सूर्य इत्यादि रूपांतसुद्धा आहे. आणि जो नेत्रगोल इत्यादींनी दिसणारा देह आहे, तोच या दोहोंना वेगवेगळे करतो. (८)
एकं एकतराभावे यदा न उपलभामहे ।
त्रितयं तत्र यो वेद स आत्मा स्वाश्रयाश्रयः ॥ ९ ॥
एकाच्याही अभावाने दोघांचे उपलब्धि ना । या तिघा जाणणारा जो तया आश्रय बोलती ॥ ९ ॥
या श्लोकाचा शब्दार्थ घालावयाचा राहिला आहे.
या तिघांपैकी एकाचा जरी अभाव झाला, तरी दुसर्या दोघांचे ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून तिघांपैकी जो जाणतो, तो परमात्माच सर्वांचे अधिष्ठान असलेले ’आश्रय’ तत्त्व आहे. त्याचा आश्रय तो स्वतःच आहे, दुसरा कोणी नाही. (९)
पुरुषोऽण्डं विनिर्भिद्य यदाऽसौ स विनिर्गतः ।
आत्मनोऽयनमन्विच्छन् अपः अस्राक्षीच्छुचिः शुचीः ॥ १० ॥
ब्रह्मांड फोडुनी येता पुरुषें स्थान शोधिले । थांबण्या निर्मिले पाणी शुद्ध संकल्प इच्छिता ॥ १० ॥
यदा - जेव्हा - असौ - हा - शुचिः - निर्मल - पुरुषः - पुरुष - अण्डं - ब्रह्मांडाला - विनिर्भिदय - फोडून - विनिर्गतः - बाहेर पडला - सः - तो - आत्मनः - आपल्या - अयनं - स्थानाला - अन्विच्छन् - इच्छिणारा - शुचीः - निर्मळ - अपः - उदकाला - अस्राक्षीत् - उत्पन्न करिता झाला. ॥१०॥
विराट पुरुष जेव्हा ब्रह्मांड फोडून बाहेर पडला, तेव्हा तो स्वतःला राहण्यासाठी ठिकाण शोधू लागला. त्या शुद्धसंकल्प पुरुषाने स्वतःला राहण्यासाठी पवित्र पाणी निर्माण केले. (१०)
तास्ववात्सीत् स्वसृष्टासु सहस्रं परिवत्सरान् ।
तेन नारायणो नाम यदापः पुरुषोद्भवाः ॥ ११ ॥
निर्मिले नर रूपाने म्हणोनी ’नार’ ते जल । हजार वर्ष पाण्यात झोपे नारायणो तिथे ॥ ११ ॥
स्वसृष्टासु - स्वतः उत्पन्न केलेल्या - तासु - त्या उदकांत - सहस्रपरिवत्सरान् - हजारो वर्षेपर्यंत - अवात्सीत् - वास करिता झाला. - यत् - ज्या अर्थी - आपः - उदक - पुरुषोद्भवाः - पुरुषापासून उत्पन्न झालेले - तेन - त्या अर्थी - नारायणः नाम - नारायण नावाचा झाला. ॥११॥
विराट पुरुष ’नरा’ पासून उत्पन्न झाल्याकारणाने पाण्याचे नाव ’नार’ असे पडले. त्या आपणच उत्पन्न केलेल्या ’नारा’ मध्ये तो पुरुष एक हजार वर्षांपर्यंत राहिला, म्हणून त्याचे नाव ’नारायण’ पडले. (११)
द्रव्यं कर्म च कालश्च स्वभावो जीव एव च ।
यदनुग्रहतः सन्ति न सन्ति यद् उपेक्षया ॥ १२ ॥
नारायणकृपेने ती द्रव शक्ती स्वभाव नी । कर्म जीव ययी सत्ता त्या विना या न राहती ॥ १२ ॥
द्रव्यं - द्रव्य - च - आणि - कर्म - कर्म - कालः - काळ - च - आणि - स्वभावः - स्वभाव - च - आणि - जीवः - जीव - एव - सुद्धा - यदनुग्रहतः - ज्याच्या अनुग्रहामुळे - सन्ति - आहेत - यदुपेक्षया - ज्याने त्यांत दुर्लक्ष केल्यामुळे - न सन्ति - असत नाही. ॥१२॥
त्या नारायणांच्या कृपेनेच द्रव्य, कर्म, काल, स्वभाव आणि जीव आदींची सत्ता आहे. त्यांनी उपेक्षा केली तर कोणाचेच अस्तित्व राहणार नाही. (१२)
एको नानात्वमन्विच्छन् योगतल्पात् समुत्थितः ।
वीर्यं हिरण्मयं देवो मायया व्यसृजत् त्रिधा ॥ १३ ॥ अधिदैवं अथ अध्यात्मं अधिभूतमिति प्रभुः । अथैकं पौरुषं वीर्यं त्रिधा भिद्यत तच्छृणु ॥ १४ ॥
नारायणे अनेकात होण्याचे इच्छिले मनीं । बीजस्वरूप तेजोधी वीर्याचे तीन भाग ते ॥ १३ ॥ अध्यात्म अधिदैवो नी अधिभूती विभागिले । वीर्याची भागणी तैसी ऐकावी ती परीक्षिता ॥ १४ ॥
योगतल्पात् - योगशय्येवरून - समुत्थितः - उठलेला - एकः - एकटा - देवः - परमेश्वर - नानात्वम् - पुष्कळपणाला - अन्विच्छन् - क्रमाक्रमाने इच्छिणारा - हिरण्मयं - तेजोरूप - वीर्यं - वीर्याला - मायया - मायेच्या योगे - त्रिधा - तीन प्रकाराने - व्यसृजत् - सोडिता झाला. ॥१३॥
अथ - नंतर - प्रभुः - समर्थ परमेश्वर - एकं - एका - पौरुषं - पुरुषासंबंधी - वीर्यं - वीर्याला - अधिदैवं - अधिदैवनामक - अथ - आणि - अध्यात्मं - अध्यात्मनामक - अधिभूतं - व अधिभूतनामक - इति - अशा प्रकारे - त्रिधा - तीन विभाग करून - अभिदयत - निरनिराळे करिता झाला. - तत् - ते - शृणु - ऐक. ॥१४॥
त्या अद्वितीय नारायणांनी योगनिद्रेतून जागे होऊन ’अनेक’ होण्याची इच्छा केली. तेव्हा त्यांनी आपल्या मायेने अखिल ब्रह्मांडाचे बीजस्वरूप अशा आपल्या सुवर्णमय वीर्याचे तीन भाग केले - अधिदैव, अध्यात्म आणि अधिभूत. परीक्षिता, विराट पुरुषाचे एकच वीर्य तीन भागात कसे विभागले गेले, ते ऐक. (१३-१४)
अन्तः शरीर आकाशात् पुरुषस्य विचेष्टतः ।
ओजः सहो बलं जज्ञे ततः प्राणो महान् असुः ॥ १५ ॥
हालता तनु ती त्याची आकाशातुनि इंद्रिय । शरीर नि मनोशक्ति मधून प्राण जन्मला ॥ १५ ॥
विचेष्टतः - हालचाल करणार्या - पुरुषस्य - पुरुषाच्या - अन्तःशरीरे - शरीरांच्या आंत - आकाशात् - आकाशापासून - ओजः - इन्द्रियशक्ति - सहः - मानसिक शक्ति - बलम् - शारीरिक शक्ति - जज्ञे - उत्पन्न झाली - ततः - त्या तीन शक्तींपासून - महान् - मोठा - असुः - सर्वोत्पादनसमर्थ - प्राणः - प्राण ॥१५॥
विराट पुरुषाच्या इकडे तिकडे हालण्याने त्याच्या शरीरातील आकाशापासून इंद्रियबल, मनोबल आणि शरीरबलाची उत्पत्ती झाली. त्यांपासून या सर्वांचा राजा जो ’प्राण’ तो उत्पन्न झाला, (१५)
अनुप्राणन्ति यं प्राणाः प्राणन्तं सर्वजन्तुषु ।
अपानंतं अपानन्ति नरदेवं इवानुगाः ॥ १६ ॥
राजसेवक जे त्याचे सर्वचि नित्य धावती । प्राणासवे तनू तैसी चालते सुस्त राहते ॥ १६ ॥
अनुगाः - सेवक - नरदेवम् इव - राजाप्रमाणे - सर्वजन्तुषु - सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी - प्राणन्तं - संचार करणार्या - यम् अनु - ज्याला अनुलक्षून - प्राणाः - इंद्रिये - प्राणन्ति - चलनवलन करितात. - अपानन्तं - सोडणार्याला अनुलक्षून - अपानन्ति - चलनवलनादि व्यापार बंद करितात. ॥१६॥
राजाच्या पाठोपाठ त्याचे सेवक जसे चालतात, तसेच सर्वांच्या शरीरातील प्राण प्रबळ असेल तरच सर्व इंद्रियेसुद्धा प्रबळ राहतात आणि प्राण जेव्हा सुस्त होतो, तेव्हा सर्व इंद्रियेसुद्धा सुस्त होतात. (१६)
प्राणेन आक्षिपता क्षुत् तृड् अन्तरा जायते विभोः ।
पिपासतो जक्षतश्च प्राङ् मुखं निरभिद्यत ॥ १७ ॥
प्राणाच्या या गतीने त्या पुरुषा भूक वाढली । त्यातुनी त्या शरीराला मुख्य इंद्रिय जाहले ॥ १७ ॥
क्षिपता - चलनवलनादि कार्य करणार्या - प्राणेन - प्राणाने - प्रभोः - समर्थ प्रभूच्या - अन्तः - आत - क्षुत्तृट् - भूक व तहान - आजायते - उत्पन्न होते - पिपासतः - पिण्याची इच्छा करणार्याला - च - आणि - जक्षतः - खाण्याची इच्छा करणार्याला - प्राक् - प्रथम - मुखं - तोंड - निरभिदयंत - उत्पन्न झाले.॥१७॥
जेव्हा प्राणाचे येणे जाणे वेगाने होऊ लागते, तेव्हा विराट पुरुषाला तहान-भुकेचा अनुभव येऊ लागला. खाण्यापिण्याची इच्छा होताच सर्वात प्रथम त्याच्या शरीरात मुख प्रगट झाले. (१७)
मुखतः तालु निर्भिन्नं जिह्वा तत्र उपजायते ।
ततो नानारसो जज्ञे जिह्वया योऽधिगम्यते ॥ १८ ॥
मुखीं टाळू जिव्हा ह्याही तयाने निर्मिल्या तदा । अनेक रस निर्मोनी तयाने नित्य सेविले ॥ १८ ॥
मुखतः - तोंडापासून - तालु - ताळू - निर्भिन्नं - उत्पन्न झाली - तत्र - तेथे - जिह्वा - जीभ - उपजायते - उत्पन्न होते - ततः - त्या जिभेपासून - नानारसः - अनेक प्रकारचा रस - जज्ञे - उत्पन्न झाला - यः - जो रस - जिह्वया - जिभेने - अधिगम्यते - जाणला जातो. ॥१८॥
मुखापासून टाळू आणि टाळूपासून रसनेंद्रिय प्रगट झाले. यानंतर ज्यांना जीभ ग्रहण करते ते अनेक प्रकारचे रस उत्पन्न झाले. (१८)
विवक्षोर्मुखतो भूम्नो वह्निर्वाग् व्याहृतं तयोः ।
जले वै तस्य सुचिरं निरोधः समजायत ॥ १९ ॥
बोलणे इच्छिता त्याने तेथे अग्नि अधिष्ठिला । वाचा नी बोलणे हे ही जन्मले तीन त्यात नी ॥ १९ ॥
विवक्षोः - बोलण्याची इच्छा करणार्याला - भूम्नः - पुरुषाच्या - मुखतः - तोंडापासून - वह्निः - अग्नि - वै - आणि - वाक् - वाणी - तयोः - त्या दोघांचे कार्य - व्याहृतं - भाषण होय - तस्य - त्याचा - जले - पाण्यात - सुचिरं - पुष्कळ काळपर्यंत - निरोधः - कोंडमारा - समजायत - झाला. ॥१९॥
जेव्हा त्याला बोलण्याची इच्छा झाली, तेव्हा त्याच्या मुखातून वाक् इंद्रिय, त्याची अधिष्ठान-देवता अग्नि आणि त्याचा विषय बोलणे, हे तीन प्रगट झाले. यानंतर पुष्कळ दिवसपर्यंत त्या जलातच तो पडून राहिला. (१९)
नासिके निरभिद्येतां दोधूयति नभस्वति ।
तत्र वायुः गन्धवहो घ्राणो नसि जिघृक्षतः ॥ २० ॥
श्वासवेगे तया नाक तेथे गंधेद्रियास जो । वायु तो प्रगटोनिया श्वास गंधहि जाहले ॥ २० ॥
नभस्वति - वायु - दोधूयति - जोरजोराने वाहत असता - नासिके - दोन नाकपुडया - निरभिदयेतां - बाहेर पडल्या - तत्र - तेथे - गन्धवहः - सुगंधाला वाहून नेणारा - वायुः - वायु - जिघृक्षतः - सुगंध घेऊ इच्छिणार्या पुरुषाच्या - नसि - नाकांत - घ्राणः - सुगंध घेण्यालायक घ्राणनामक इंद्रिय होय. ॥२०॥
श्वासाच्या वेगामुळे नासिकाछिद्रे प्रगट झाली. जेव्हा त्याला वास घेण्याची इच्छा झाली, तेव्हा त्याच्या नाकात घ्राणेंद्रिय येऊन बसले आणि त्याची देवता - वास पसरविणारा - वायू प्रगट झाला. (२०)
यदाऽऽत्मनि निरालोकं आत्मानं च दिदृक्षतः ।
निर्भिन्ने ह्यक्षिणी तस्य ज्योतिः चक्षुः गुणग्रहः ॥ २१ ॥
प्रकाश नव्हता त्याला बघण्या इच्छिता मनीं । डोळे दृष्टींद्रिये सूर्य तिघांचे रूप जाहले ॥ २१ ॥
यदा - जेव्हा - आत्मनि - त्या विराट् देहात - निरालोकं - अंधकार युक्त - आत्मानं - आत्म्याला - दिदृक्षतः - पाहू इच्छिणार्या - तस्य - त्यास - अक्षिणी - दोन डोळे - निर्भिन्ने - उत्पन्न झाले. - हि - खरोखर - ज्योतिः - तेज - च - आणि - चक्षुः - नेत्रेंद्रिय - गुणग्रहः - रूपविषयाचे ग्रहण ॥२१॥
प्रथम त्याच्या शरीरात प्रकाश नव्हता. नंतर त्याला जेव्हा स्वतःला आणि दुसर्या वस्तू पाहण्याची इच्छा झाली, तेव्हा डोळे, त्यांचा अधिष्ठाता सूर्य आणि नेत्रेंद्रिय प्रगट झाले. (२१)
बोध्यमानस्य ऋषिभिः आत्मनः तत् जिघृक्षतः ।
कर्णौ च निरभिद्येतां दिशः श्रोत्रं गुणग्रहः ॥ २२ ॥
वेदरूप ऋषी त्याचा गुणा वर्णूहि लागले । ऐकण्या इच्छिता त्याते दिशा तेथेच जन्मल्या ॥ श्रवणेंद्रिय नी कान तिघांचा जन्म जाहला ॥ २२ ॥
ऋषिभिः - ऋषींकडून - बोध्यमानस्य - स्तुती केलेल्या - आत्मनः - आत्म्याला - तत् - त्या स्तुतीला - जिघृक्षतः - श्रवणव्दारा घेण्याची इच्छा करणार्याला - कर्णौ - दोन कान - निरभिदयेतां - उत्पन्न झाले - ततः - त्यापासून - दिशः - दिशा - च - आणि - श्रोत्रं - श्रवणेंद्रिय - गुणग्रहः - शब्दविषयांचे ग्रहण करण्याची क्रिया॥२२॥
जेव्हा वेदरूपी ऋषी विराट पुरुषाची स्तुती करून त्याला जागे करू लागले, तेव्हा त्याला ऐकण्याची इच्छा झाली. त्याच वेळी कान, त्यांची अधिष्ठात्री देवता दिशा आणि श्रोत्रेंद्रिय प्रगट झाले. यांमुळेच शब्द ऐकू येतो. (२२)
वस्तुनो मृदुकाठिन्य लघुगुर्वोष्ण शीतताम् ।
जिघृक्षतः त्वङ् निर्भिन्ना तस्यां रोम महीरुहाः । तत्र चान्तर्बहिर्वातः त्वचा लब्धगुणो वृतः ॥ २३ ॥
वस्तुंचे जड काठिण्य शीतोष्ण कोवळेपण । जाणण्या इच्छिता त्याने त्वचा तेंव्हाच जाहली ॥ त्वचेसी रोम उप्पत्ती जाहली अंग झाकुनी । सर्वेंद्रिय असे त्याचे जाहले स्पर्श दर्शना ॥ २३ ॥
वस्तुनः - पदार्थाचे - मृदुकाठिन्य - मृदुत्व, कठीणपणा, - लघुगुर्वोष्णशीतताम् - लघु, गुरु, उष्ण आणि थंड ह्या सर्वांना - जिघृक्षतः - घेण्याची इच्छा करणार्या पुरुषास - त्वक् - त्वचा - निर्भिन्ना - उत्पन्न झाली - तस्यां - तिच्या ठिकाणी - रोममहीरुहाः - केस व वृक्ष - तत्र च - आणि त्यावर - त्वचा - कातडीने - लब्धगुणः - झालेला आहे स्पर्शगुणाचा लाभ ज्याला असा - वातः - वायु - अन्तः - आंत - च - आणि - बहिः - बाहेर - वृतः - वेढून राहिला आहे. ॥२३॥
जेव्हा त्याला वस्तूंची कोमलता, कठिणपणा, हलकेपणा, जडपणा, उष्णता आणि थंडपणा जाणण्याची इच्छा झाली, तेव्हा त्याच्या शरीरामध्ये त्वचा निर्माण झाली. पृथ्वीतून जशी झाडे उगवतात, त्याचप्रकारे त्या त्वचेतून रोम निर्माण झाले आणि त्याच्या आत-बाहेर राहणारा वायु प्रगट झाला. स्पर्श ग्रहण करणारे त्वचा-इंद्रिय निर्माण होऊन, त्याने शरीराला सगळीकडून लपेटून घेतले. त्यायोगे त्याला स्पर्शाचा अनुभव येऊ लागला. (२३)
हस्तौ रुरुहतुः तस्य नाना कर्म चिकीर्षया ।
तयोस्तु बलमिन्द्रश्च आदानं उभयाश्रयम् ॥ २४ ॥
क्रर्म इच्छा मनीं ध्याता हात त्यां फुटले तदा । कर्मसंपादनी इंद्र प्रगटे स्थळि त्या पहा ॥ २४ ॥
नानाकर्मचिकीर्षया - अनेक कर्मे करण्याच्या इच्छेने - तस्य - त्या पुरुषाला - हस्तौ - दोन हात - रुरुहतुः - उत्पन्न झाले - तयोः तु - मग त्या दोन हातांचे ठिकाणी - बलं - बळ - इंद्रः - इंद्र देवता - च - आणि - उभयाश्रयं - त्या दोन्ही कर्माला आश्रय आहे ज्याचा असे - आदानं - स्वीकाराचे कार्य॥२४॥
जेव्हा त्याला अनेक कर्मे करण्याची इच्छा झाली, तेव्हा त्याला हात फुटले. त्यांना ग्रहण करण्याची शक्ती आणि त्याची अधिदेवता इंद्र तसेच या दोन्हींच्या आश्रयाने होणारे ग्रहणरूप कर्म प्रगट झाले. (२४)
गतिं जिगीषतः पादौ रुरुहातेऽभिकामिकाम् ।
पद्भ्यां यज्ञः स्वयं हव्यं कर्मभिः क्रियते नृभिः ॥ २५ ॥
इच्छिल्या स्थळि जाण्याचे तयाने इच्छिता मनीं । फुटले पाय ते त्याला तेंव्हा तेणे स्वयंरुपी ॥ भगवान् विष्णुरूपाने यज्ञ नामेचि पातला । चालुनी यज्ञ सामग्री तयाने मेळवीयली ॥ २५ ॥
अभिकामिकां - इच्छेला अनुसरणार्या - गतिं - गतीला - जिगीषतः - मिळविण्याची इच्छा करणार्या पुरुषास - पादौ - दोन पाय - रुरुहाते - उगवले - पद्भ्यां - दोन्ही पायांसह - स्वयं - स्वतः - यज्ञः - यज्ञस्वरूपी नारायण - नृभिः - मनुष्यांकडून - कर्मभिः - गमनादि क्रियांच्या योगाने - हव्यं - यज्ञसामग्री - क्रियते - प्राप्त केली जाते. ॥२५॥
जेव्हा त्याला इष्ट स्थळी जाण्याची इच्छा झाली, तेव्हा त्याच्या शरीराला पाय आले. त्याच्याबरोबरच अधिष्ठाता यज्ञपुरुष प्रगट झाला आणि चालण्याचे कर्म प्रगट झाले. माणसे याच चरणांनी चालून यज्ञसामग्री एकत्रित करतात. (२५)
निरभिद्यत शिश्नो वै प्रजानन्द अमृतार्थिनः ।
उपस्थ आसीत् कामानां प्रियं तद् उभयाश्रयम् ॥ २६ ॥
संतान रति नी स्वर्ग कामना इच्छिता मनीं । विराट लिंग उत्पत्ती होऊनीया प्रजापती ॥ जन्मला काम सौख्याचा भाव तो प्रगटे तसा ॥ २६ ॥
प्रजानन्दामृतार्थिनः - प्रजोत्पादन कृत्यांत आनंदामृतरसाचा लाभ घेण्यास इच्छिणार्या पुरुषास - वै - खरोखर - शिश्नः - जननक्रियेचे स्थान - निरभिदयत - उत्पन्न झाले - उपस्थः - जननेंद्रिय - आसीत् - झाले - कामानां - कामांचे - प्रियं - आवडते - तत् - ते - उभयाश्रयं - दोघांच्या आश्रयाने प्राप्त होणारे आहे. ॥२६॥
संतान, स्त्रीसुख आणि स्वर्गभोगाची इच्छा झाल्यावर विराट पुरुषाच्या शरीरात लिंगाची उत्पत्ती झाली. त्यात उपस्थ-इंद्रिय आणि प्रजापति देवता तसेच या दोहोंच्या आश्रयाने राहणार्या कामसुखाचा आविर्भाव झाला. (२६)
उत्सिसृक्षोः धातुमलं निरभिद्यत वै गुदम् ।
ततः पायुस्ततो मित्र उत्सर्ग उभयाश्रयः ॥ २७ ॥
इच्छिले मळत्यागास तेंव्हा गुदहि जाहले । मित्र ती देवता तेथे राहता त्यजिला मळ ॥ २७ ॥
धातुमलं - खाल्लेल्या अन्नाचा निःसत्त्व भाग - उत्सिसृक्षोः - सोडण्याची इच्छा करणार्या पुरुषास - गुदं - गुदव्दार - वै - खरोखर - निरभिदयत - उत्पन्न झाले - ततः - त्या गुदापासून - पायुः - पायु नावाचे इंद्रिय - ततः - तेथून - मित्रः - मित्रनामक देवता - उभयाश्रयः - दोघांचा आश्रय करून राहणारी - उत्सर्गः - मल सोडण्याची क्रिया ॥२७॥
जेव्हा त्याला मलत्याग करण्याची इच्छा झाली, तेव्हा गुदद्वार प्रगट झाले. त्यानंतर त्यात पायु-इंद्रिय आणि मित्रदेवता उत्पन्न झाली. या दोहोंच्या द्वारा मलत्यागाची क्रिया होते. (२७)
आसिसृप्सोः पुरः पुर्या नाभिद्वारं अपानतः ।
तत्र अपानः ततो मृत्युः पृथक्त्वं उभयाश्रयम् ॥ २८ ॥
परकाया प्रवेशाला इच्छिता नाभि जाहली । अपान मृत्यु हे दोघे तेथेचि जन्मले पहा ॥ प्रणापान तुटी होता मृत्यु तो घडतो पहा ॥ २८ ॥
पुर्याः - एका शरीरांतून - पुरः - दुसर्या शरीरामध्ये - आसिसृप्सोः - जाण्याची इच्छा करणार्या पुरुषास - नाभिव्दारं - नाभिस्थान - तत्र - तेथे - अपानः - अपान झाले - ततः - त्या अपानापासून - मृत्यूः - मृत्यु उत्पन्न झाला - उभयाश्रयं - दोहोंच्या आश्रयाने होणारे - अपानतः - अपानाहून - पृथक्त्वं - संबंध तुटण्याचे कार्य ॥२८॥
अपानमार्गाद्वारे एका शरीरातून दुसर्या शरीरात जाण्याची इच्छा झाल्यावर नाभी प्रगट झाली. त्यातून अपान आणि मृत्यूदेवता प्रगट झाली. या दोन्हींच्या आश्रयानेच प्राण आणि अपान वेगळे होऊन मृत्यू येतो. (२८)
आदित्सोः अन्नपानानां आसन् कुक्ष्यन्न नाडयः ।
नद्यः समुद्राश्च तयोः तुष्टिः पुष्टिः तदाश्रये ॥ २९ ॥
जलान्न ग्रहणा इच्छी कुक्षा आंत्रनि नाडिया । होऊनी सागरो तैसे नद्या तेथेचि जाहल्या ॥ २९ ॥
अन्नपानानां - भक्ष्यपेयपदार्थांना - आदित्सोः - घेण्याची इच्छा करणार्या पुरुषास - कुक्ष्यन्त्रनाडयः - उदर, आंतडी व नाडया - आसन् - असत्या झाल्या - तदाश्रये - त्यांवर अवलंबून राहिलेला - तुष्टिः - संतोष - च - आणि - पुष्टिः - पोषण - तयोः - त्या दोघांमध्ये - नदयः - नदया - समुद्राः - समुद्र ॥२९॥
जेव्हा विराट पुरुषाला अन्न-पाणी घेण्याची इच्छा झाली, तेव्हा पोट, आतडी आणि नाड्या उत्पन्न झाल्या. त्याचबरोबर आतड्यांची देवता समुद्र, नाड्यांची देवता नद्या, तसेच समाधान आणि पोषण हे दोन्ही त्यांच्यावर असणारे विषय उत्पन्न झाले. (२९)
निदिध्यासोः आत्ममायां हृदयं निरभिद्यत ।
ततो मनः ततश्चंद्रः सङ्कल्पः काम एव च ॥ ३० ॥
मायेला इच्छिता त्याने हृदया जन्म जाहला । तेथिचा चंद्र तो स्वामी संकल्पभावना तिथे ॥ ३० ॥
आत्ममायां - स्वतःच्या मायेला - निदिध्यासोः - चिन्तण्याची इच्छा करणार्यास - हृदयं - हृदय - निरभिदयत - उत्पन्न झाले - ततः - त्या हृदयापासून - मनः - मन - ततः - त्या मनापासून - चंद्रः - चंद्र - संकल्पः - संकल्प - च एव - आणखीही - कामः - काम उत्पन्न झाला. ॥३०॥
जेव्हा त्याने आपल्या मायेविषयी विचार करण्याची इच्छा केली, तेव्हा हृदयाची उत्पत्ती झाली. त्यापासून मनरूप इंद्रिय, आणि मनाची देवता चंद्र, तसेच कामना आणि संकल्प प्रगट झाले. (३०)
त्वक् चर्म मांस रुधिर मेदो मज्जास्थि धातवः ।
भूम्यप्तेजोमयाः सप्त प्राणो व्योमाम्बु वायुभिः ॥ ३१ ॥
पृथिवी जल तेजाने सात धातूहि जन्मल्या । त्वचा मास तसे रक्त मेद मज्जा नि अस्थि त्या ॥ आकाश जल तेजाने प्राण्यांचा जन्म जाहला ॥ ३१ ॥
सप्त - सात - त्वक्चर्ममांसरुधिर - त्वचा, चर्म, मांस, रक्त, - मेदोमज्जास्थिधातवः - मेद, मज्जा व अस्थि ह्या धातु - भूम्यप्तेजोमयाः - पृथ्वी, उदक व तेज यांनी बनलेल्या आहेत. - व्योमाम्बुवायुभिः - आकाश, उदक व वायु ह्यायोगे - प्राणः - प्राण ॥३१॥
विराट पुरुषाच्या शरीरामध्ये पृथ्वी, जल आणि तेजापासून त्वचा, चर्म, मांस, रक्त, मेद, मज्जा आणि हाडे असे सात धातू प्रगट झाले. तसेच आकाश, जल आणि वायूपासून प्राणाची उत्पत्ती झाली. (३१)
गुणात्मकान् इंद्रियाणि भूतादि प्रभवा गुणाः ।
मनः सर्व विकारात्मा बुद्धिर्विज्ञानरूपिणी ॥ ३२ ॥
कान ते ऐकती सारे अहंकार तयातुनी । विकारा मन ते नेते बुद्धि वस्तुस जाणिते ॥ ३२ ॥
इन्द्रियाणि - इन्द्रिये - गुणात्मकानि - विषयस्वरूपी होत - गुणाः - विषय - भूतादिप्रभवाः - भूतांचे मूळ जो अहंकार त्यापासून उत्पन्न झालेले - मनः - मन - सर्वविकारात्मा - सर्व विकारांनी व्यापिलेले - बुद्धिः - बुद्धि - विज्ञानरूपिणी - विविधज्ञानाने युक्त ॥३२॥
श्रोत्रादि इंद्रिये शब्दादि विषयांना ग्रहण करणारी आहेत. ते विषय अहंकारातून उत्पन्न झाले आहेत. मन सर्व विकारांचे उत्पत्तीस्थान आहे आणि बुद्धी सर्व पदार्थांचा बोध करून देणारी आहे. (३२)
एतद् भगवतो रूपं स्थूलं ते व्याहृतं मया ।
मह्यादिभिश्च आवरणैः अष्टभिः बहिरावृतम् ॥ ३३ ॥
तयाच्या स्थूल रूपाला वर्णिले मी असे पहा । पंचभूते अहंकारे महत्तत्वेचि वेष्ठिला ॥ ३३ ॥
च - आणि - एतत् - हे - मह्यादिभिः - पृथ्वी वगैरे - अष्टभिः - आठ - आवरणैः - आच्छादनांनी - बहिः - बाहेरून - आवृतम् - वेष्टिलेले - भगवतः - भगवंताचे - स्थूलं - विराट् - रूपं - स्वरूप - मया - माझ्याकडून - ते - तुला - व्याहृतं - सांगितले गेले आहे. ॥३३॥
भगवंतांच्या या स्थूल रूपाचे वर्णन मी तुला सांगितले. हे रूप बाहेरून पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, अहंकार, महत्तत्त्व आणि प्रकृति या आठ आवरणांनी आच्छादिलेले आहे. (३३)
अतः परं सूक्ष्मतमं अव्यक्तं निर्विशेषणम् ।
अनादिमध्यनिधनं नित्यं वाङ् मनसः परम् ॥ ३४ ॥
या पुढे सूक्ष्मरूपात अव्यक्त नित्य तो असा । वाणी नी मनही जेथे कधी ना पोहचू शके ॥ ३४ ॥
अतः - ह्याहून - परं - दुसरे - सूक्ष्मतमं - अत्यंत सूक्ष्म - अव्यक्तं - अस्पष्ट - निर्विशेषणं - विशेषणरहित - अनादिमध्यनिधनं - आदिमध्यान्तररहित - नित्यं - नेहमीचे - वाङ्मनसः - वाणी व मन ह्याहून - परं - पलीकडे ॥३४॥
याच्याही पलिकडे भगवंतांचे अत्यंत सूक्ष्म रूप आहे. हे अव्यक्त, निर्विशेष, आदी, मध्य आणि अंत यांनी रहित, तसेच नित्य आहे. वाणी आणि मन तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. (३४)
अमुनी भगवद् रूपे मया ते ह्यनुवर्णिते ।
उभे अपि न गृह्णन्ति मायासृष्टे विपश्चितः ॥ ३५ ॥
भगवद्रूप जे स्थूल-सूक्ष्म हे तुज बोधिले । मायेने निर्मिले सारे ज्ञानी त्या नच मानिती ॥ ३५ ॥
अमुनी - ही - भगवद्रूपे - भगवंताची दोन स्वरूपे - मया - माझ्याकडून - ते - तुला - अनुवर्णिते - क्रमाने सांगितली आहेत. - विपश्चितः - विव्दान - मायासृष्टे - मायेने उत्पादिलेली - उभे - दोन्ही - अपि - सुद्धा - न गृहणन्ति - स्वीकारीत नाहीत.॥३५॥
मी तुला भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म अशा ज्या दोन रूपांचे वर्णन ऐकविले, ती दोन्हीही रूपे भगवंतांच्या मायेच्या द्वारे रचलेली आहेत. म्हणून विद्वान पुरुष या दोन्ही रूपांचा स्वीकार करीत नाहीत. (३५)
स वाच्य वाचकतया भगवान् ब्रह्मरूपधृक् ।
नामरूपक्रिया धत्ते सकर्माकर्मकः परः ॥ ३६ ॥
निष्क्रिय भगवान् ऐसा स्वशक्तीनेच सष्क्रिय । ब्रह्यानी रूप वैराट वाच्य वाचक जाहला ॥ ३६ ॥
परः - श्रेष्ठ - अकर्मकः - कर्म न करणारा - ब्रह्मरूपधृक् - ब्रह्मदेवाचे स्वरूप घेणारा - सकर्मा - कर्म करणारा - सः - तो - भगवान् - परमेश्वर - वाच्यवाचकतया - वाच्यवाचकभावाने - नामरूपक्रियाः - नाव, रूप व क्रिया - धत्ते - धरतो. ॥३६॥
वास्तविक भगवंत निष्क्रिय आहेत. आपल्या शक्तीनेच ते सक्रिय बनतात. नंतर ते ब्रह्माचे रूप धारण करून शब्द आणि त्याचा अर्थ या रूपांत प्रगट होतात. नंतर ते अनेक नामे, रूपे आणि क्रिया यांचा स्वीकार करतात. (३६)
प्रजापतीन् मनून् देवान् ऋषीन् पितृगणान् पृथक् ।
सिद्धचारणगन्धर्वान् विद्याध्रासुर गुह्यकान् ॥ ३७ ॥ किन्नराप्सरसो नागान् सर्पान् किम्पुरुषोरगान् । मातृरक्षःपिशाचांश्च प्रेतभूतविनायकान् ॥ ३८ ॥ कूष्माण्दोन्माद वेतालान् यातुधानान् ग्रहानपि । खगान् मृगान् पशून् वृक्षान् गिरीन् नृप सरीसृपान् ॥ ३९ ॥
प्रजापती मनू देव ऋषी पितर सिद्धही । यक्ष चारण गंधर्व विद्याधर नि किन्नर ॥ ३७ ॥ असूर अप्सरा नाग किंपुरूष नि सर्प ते । राक्षसे मातृका प्रेत भूत नी उरगे तसे ॥ विनायक नि कुष्मांड वेताळ यातुधान ही ॥ ३८ ॥ उन्माद ग्रह पक्षी नी पशू वृक्ष नि पर्वत । जगीचे नाम रूपादी तयाचे सर्व सर्वही ॥ त्या विना नच ते कांही जाणी राजा परीक्षिता ॥ ३९ ॥
नृप - हे राजा ! - प्रजापतीन् - प्रजापतींना - मनून् - मनूंना - देवान् - देवांना - ऋषीन् - ऋषींना - पितृगणान् - पितृगणांना - सिद्धचारणगन्धर्वान् - सिद्ध, चारण व गन्धर्व ह्यांना - विदयाध्रासुरगुह्यकान् - विदयाधर, असुर व यक्ष ह्यांना - पृथक् - निरनिराळ्या ॥३७॥
किन्नराप्सरसः - किन्नर व अप्सरा ह्यांना - नागान् - वासुकिप्रमुख नागांना किंवा हत्तींना - सर्पान् - सापांना - किंपुरुषोरगान् - किंपुरुष व इतर किरकोळ सर्प त्यांना - मातृः - मातृदेवतांना - रक्षःपिशाचान् - राक्षस व पिशाच यांना - च - आणि - प्रेतभूतविनायकान् - प्रेत, भूत व विनायक ह्यांना ॥३८॥ कूष्माण्डोन्मादवेतालान् - कूष्माण्ड, उन्माद, वेताळ ह्यांना - यातुधानान् - यातुधानांना - ग्रहाम् - ग्रहांना - खगान् - पक्ष्यांना - मृगान् - मृगांना - पशून् - पशूंना - वृक्षान् - वृक्षांना - गिरीन् - पर्वतांना - सरीसृपान् - सरपटणार्या बारीक जीवांना - अपि - सुद्धा ॥३९॥
परीक्षिता, प्रजापती, मनू, देवता, ऋषी, पितर, सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, असुर, यक्ष, किन्नर, अप्सरा, नाग, साप, किंपुरुष, उरग, मातृका, राक्षस, पिशाच, प्रेत, भूत, विनायक, कूष्मांड, उन्माद, वेताळ, यातुधान, ग्रह, पक्षी, मृग, पशू, वृक्ष, पर्वत, सरपटणारे प्राणी आणि संसारात जेवढी नाम-रूपे आहेत, ती सर्व भगवंतांचीच आहेत. (३७-३९)
द्विविधाश्चतुर्विधा येऽन्ये जल स्थल वनौकसः ।
कुशला-अकुशला मिश्राः कर्मणां गतयस्त्विमाः ॥ ४० ॥
चराचर जरायूज अंडज श्वेद उद्भिज । जलस्थलादिचे जीव कर्माचे फळ ते असे ॥ ४० ॥
ये - जे - अन्ये - दुसरे - व्दिविधाः - दोन प्रकारचे - चतुर्विधाः - चार प्रकारचे - जलस्थलनभौकसः - पाण्यात, जमिनीवर व आकाशात राहणारे - कर्मणां - कर्माच्या - गतयः - गति - तु - तर - कुशलाकुशलाः - उत्तम व अधम - मिश्राः - उत्तमाधमाने मिश्रित म्हणजे मध्यम - इमाः - ह्या - सुरनृनारकाः - देव, मनुष्य व नरक अशा - सत्त्वं - सत्त्वगुण - रजः - रजोगुण - तमः - तमोगुण - इति - ह्यांनी क्रमाने बनलेल्या - तिस्रः - तीन गति आहेत. ॥४०॥
जगात चर आणि अचर भेदाने दोन प्रकारचे तसेच जरायुज, अंडज, स्वेदज, आणि उद्भिज अशा भेदाचे चार प्रकारचे, असे जितके जलचर, स्थलचर आणि आकाशात उडणारे प्राणी आहेत, ते सर्वच्या सर्व शुभ-अशुभ आणि मिश्र कर्मांची फळे आहेत. (४०)
सत्त्वं रजस्तम इति तिस्रः सुर-नृ-नारकाः ।
तत्राप्येकैकशो राजन् भिद्यन्ते गतयस्त्रिधा । यद् एकैकतरोऽन्याभ्यां स्वभाव उपहन्यते ॥ ४१ ॥
सत्वप्रधान ते देव रजप्रधान मानव । तमाने नारकी योनी प्रधानत्वेचि त्रैगुणी ॥ ४१ ॥
राजन् - हे राजा - यदा - जेव्हा - एकैकतरः - ह्यापैकी कोणताही एकच - स्वभावः - गुणस्वभाव - अन्याभ्यां - दुसर्या दोहोशी - उपहन्यते - मिसळला जातो - तत्रापि - तेव्हा त्यात सुद्धा - गतयः - गति - एकैकशः - प्रत्येकाच्या - त्रिधा - तीन तीन प्रकारांनी - भिदयन्ते - निरनिराळ्या मानल्या जातात. ॥४१॥
सत्त्वगुणाच्या प्राधान्याने देवता, रजोगुणाच्या प्राधान्याने मनुष्य आणि तमोगुणाच्या प्राधान्याने नरकवासीय योनींची प्राप्ती होते. यागुणांमध्ये सुद्धा जेव्हा एक गुण दुसर्या दोन गुणांमुळे दबला जातो, तेव्हा प्रत्येक गतीचे आणखी तीन तीन भेद होतात. (४१)
स एवेदं जगद्धाता भगवान् धर्मरूपधृक् ।
पुष्णाति स्थापयन् विश्वं तिर्यङ्नरसुरादिभिः ॥ ४२ ॥
भगवान् विष्णु रूपाने धारिण्या पोषिण्या जगा । मनुष्य पशु पक्षादी प्रगटे रूप घेउनी ॥ ४२ ॥
धर्मरूपधृक् - धर्माचे स्वरूप धारण करणारा - जगद्धाता - जग उत्पन्न करणारा - सः एव - तोच - भगवान् - परमेश्वर - तिर्यङ्नरसुरात्मभिः - पशु, मनुष्य, देव वगैरे रूपांनी - इदं - ह्या - विश्वं - जगाला - स्थापयन् - राखणारा - पुष्णाति - पोषितो. ॥४२॥
ते भगवंत जगाचे पालन पोषण करण्यासाठी विष्णुरूप घेऊन देव, मनुष्य, पशु-पक्षी, इत्यादी रूपांत अवतार घेतात आणि विश्वाचे पालनपोषण करतात. (४२)
ततः कालाग्निरुद्रात्मा यत्सृष्टं इदमात्मनः ।
सं नियच्छति तत्काले घनानीकं इवानिलः ॥ ४३ ॥
प्रलया समयी तो ची कालाग्नी रूप रूद्र तो । प्रगटे लीनि त्या घेता जसा मेघास वायु तो ॥ ४३ ॥
ततः - नंतर - अनिलः - वायु - घनानीकम् इव - मेघपङ्क्तीप्रमाणे - कालाग्निरुद्रात्मा - काळ, अग्नि, व रुद्र अशी रूपे घेणारा - आत्मनः - आत्म्यापासून - यत् - जे - इदं - हे - सृष्टं - उत्पन्न केलेले - कालेन - योग्य वेळी - संनियच्छति - संहारितो. ॥४३॥
प्रलयाचा काल आल्यावर तेच भगवान आपणच निर्माण केलेल्या या विश्वाला जसा वायू मेघमालेला आपल्यात लीन करून घेतो, त्याप्रमाणे कालाग्निस्वरूप रुद्राचे रूप धारण करून आपल्यात लीन करून घेतात. (४३)
इत्थं भावेन कथितो भगवान् भगवत्तमः ।
न इत्थं भावेन हि परं द्रष्टुं अर्हन्ति सूरयः ॥ ४४ ॥
अचिंत्य भगवद्रूप महात्मे वर्णिती असे । तत्वज्ञ जे पराज्ञानी त्यां इच्छा श्रेष्ठ पाहुनी ॥ ४४ ॥
भगवत्तमः - षड्गुणैश्वर्यवस्तूंमध्ये अत्यंत श्रेष्ठ असा - भगवान् - परमेश्वर - इत्थंभावेन - याप्रमाणे - कथितः - सांगितला आहे - हि - कारण - सूरयः - ज्ञानी - इत्थंभावेन - अशा रीतीने - परं - परमेश्वराला - द्रष्टुं - पाहण्याला - न अर्हन्ति - समर्थ होत नाहीत. ॥४४॥
महात्म्यांनी भगवंतांचे अशा प्रकारे वर्णन केले आहे. परंतु याच्याही पलीकडील ते असल्याकारणाने, तत्त्वज्ञानी पुरुषांनी त्यांना अशा रूपातच केवळ पाहता कामा नये. (४४)
नास्य कर्मणि जन्मादौ परस्य अनुविधीयते ।
कर्तृत्वप्रतिषेधार्थं माययारोपितं हि तत् ॥ ४५ ॥
निर्मिती कर्म इत्यादी यांच्यात्या या निरूपणी । भगवंत नसे कोणी माया आरोप सर्व हे ॥ कर्तुत्वाच्या निषेधार्थ वर्णिले सार हे असे ॥ ४५ ॥
अस्य - ह्या - परस्य - परमेश्वराच्या - जन्मादौ - जन्म वगैरेंमध्ये - कर्मणि - व कर्मामध्ये - न अनुविधीयते - कर्तृत्व संबंध मानिला जात नाही - कर्तृत्वप्रतिषेधार्थं - परमेश्वराला कर्तृत्वसंबंध नाही हे सिद्ध करण्यासाठीच - हि - कारण - तत् - ते कर्तृत्व - मायया - मायेने - आरोपितं - आरोपित केले आहे. ॥४५॥
सृष्टीची रचना इत्यादि कर्मांचे निरूपण परमात्म्याशी कर्माचा किंवा कर्तेपणाचा संबंध जोडण्यासाठी केलेला नाही, तर कर्तृत्वाचा निषेध करण्यासाठीच केलेले आहे. कारण ते मायेमुळे कल्पिलेले आहे. (४५)
अयं तु ब्रह्मणः कल्पः सविकल्प उदाहृतः ।
विधिः साधारणो यत्र सर्गाः प्राकृतवैकृताः ॥ ४६ ॥
क्रम हा सृष्टिचा एक सारखा कल्प कल्पही । पृथ्विही सारखी एक प्राणी ती नव निर्मिते ॥ ४६ ॥
अयं - हा - तु - तर - ब्रह्मणः - ब्रह्मदेवाचा - कल्पः - कल्प - सविकल्पः - अवांतर दैनंदिन कल्पासह - उदाहृतः - सांगितला आहे. - यत्र - ज्यात - प्राकृतवैकृताः - प्रकृतिजन्य व विकृतिजन्य - सर्गाः - सर्ग असा - साधारणः - सर्वसामान्य - विधिः - सृष्टीप्रकार आहे. ॥४६॥
हे मी ब्रह्मदेवाचे महाकल्पासह इतर कल्पांचे वर्णन केले आहे. सर्व कल्पांमध्ये सृष्टिक्रम एकसारखाच आहे. फरक एवढाच आहे की, महाकल्पाच्या प्रारंभी प्रकृतीपासून क्रमशः महत्तत्त्व इत्यादीची उत्पत्ती होते आणि कल्पाच्या प्रारंभी प्राकृत सृष्टी जशीच्या तशीच राहते. फक्त चराचर प्राण्यांची विकारजन्य सृष्टी नवीन निर्माण होते. (४६)
परिमाणं च कालस्य कल्पलक्षण विग्रहम् ।
यथा पुरस्ताद् व्याख्यास्ये पाद्मं कल्पमथो श्रृणु ॥ ४७ ॥
काळाचा महिमा कल्प मनवंतर वर्णने । पुढे ते सांगतो आता पद्मकल्पास ऐकणे ॥ ४७ ॥
कालस्य - काळाचे - परिमाणं - प्रमाण - च - आणि - कल्पलक्षणविग्रहम् - कल्पांचे लक्षण व त्यांचे विभाग - यथा - जसे - पुरस्तात् - क्रमाने येईल तसे पुढे - व्याख्यास्ये - मी सांगेन - अथो - ह्यानंतर - पाद्मं - पाद्म नामक - कल्पं - कल्पाला - शृणु - ऐक. ॥४७॥
कालाचे मोजमाप, कल्प आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या मन्वंतरांचे वर्णन यापुढे करण्यात येईल. आता तू पाद्मकल्पाचे वर्णन लक्ष देऊन ऐक. (४७)
शौनक उवाच ।
यदाह नो भवान् सूत क्षत्ता भागवतोत्तमः । चचार तीर्थानि भुवः त्यक्त्वा बंधून् सु-दुस्त्यजान् ॥ ४८ ॥
शौनकजींनी विचारले- सूतजी वदले तुम्ही विदूरे गृह त्यागुनी । तीर्थाटनास अन्यत्र फिरले पृथिवीवरी ॥ ४८ ॥
सूत - हे सूता ! - भवान् - आपण - नः - आम्हाला - यत् - जे - आह - बोलला - भागवतोत्तमः - भगवद्भक्तात श्रेष्ठ असा - क्षत्ता - विदुर - दुस्त्यजान् - टाकण्यास कठीण अशा - बन्धून् - भाऊबंदांना - त्यक्त्वा - टाकून - भुवः - पृथ्वीवरील - तीर्थानि - तीर्थांना - चचार - फिरला. ॥४८॥
शौनकांनी विचारले - सूत महोदय, आपण आम्हांस सांगितले होते की, भगवंतांचे परम भक्त विदुरांनी जवळच्या कुटुंबियांना सोडून पृथ्वीवरील निरनिराळ्या तीर्थक्षेत्री भ्रमण केले. (४८)
क्षत्तुः कौशारवेः तस्य संवादोऽध्यात्मसंश्रितः ।
यद्वा स भगवान् तस्मै पृष्टः तत्त्वं उवाच ह ॥ ४९ ॥
मुनी मैत्रेय यात्रेत विदुरा काय बोलले । अध्यात्म बोध तो त्यांना तत्वांनी बोधिला कसा ॥ ४९ ॥
अध्यात्मसंश्रितः - आत्मज्ञानाने युक्त - तस्य - त्या - कौषारवेः - मैत्रेयाचा - संवादः - भाषण - कुत्र - कोठे - यव्दा - किंवा - सः - तो - भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न मैत्रेय - पृष्टः - विचारला गेला असता - तस्मै - त्या विदुराला - तत्त्वं - ज्ञानाला - उवाच - बोलला. ॥४९॥
त्या तीर्थयात्रेमध्ये त्यांचा मैत्रेय ऋषींबरोबर अध्यात्मासंबंधी संवाद कुठे झाला ? तसेच त्यांनी प्रश्न विचारल्यावर मैत्रेय ऋषींनी कोणत्या तत्त्वाचा उपदेश केला ? (४९)
ब्रूहि नः तद् इदं सौम्य विदुरस्य विचेष्टितम् ।
बन्धुत्याग निमित्तं च यथैव आगतवान् पुनः ॥ ५० ॥
सौम्यरूपी मुनी तुम्ही सांगा ती विदुरीकथा । त्याजिता भावकी सारे गेले आले कसे पुन्हा ॥ ५० ॥
सौम्य - हे शांत सूता ! - तत् - ते - इदं - हे - विदुरस्य - विदुराचे - विचेष्टितं - चरित्र - च - आणि - बन्धुत्यागनिमित्तं - बंधूंचा त्याग करण्याचे कारण - तथैव - त्याचप्रमाणे - पुनः - फिरून - आगतवान् - परत आला - नः - आंम्हाला - ब्रूहि - सांगा. ॥५०॥
सूतमहोदय, विदुरांचे चरित्र आपण आम्हांला ऐकवावे. त्यांनी आपल्या बांधवांना का सोडले आणि पुन्हा ते त्यांच्याकडे का परत गेले ? (५०)
सूत उवाच -
राज्ञा परीक्षिता पृष्टो यद् अवोचत् महामुनिः । तद्वोऽभिधास्ये श्रृणुत राज्ञः प्रश्नानुसारतः ॥ ५१ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां द्वितीयस्कन्धे दशमोऽध्यायः ॥ १० ॥
सूतजी सांगतात- ऋषींनो याच प्रश्नाने पुसले त्या परिक्षिते । शुकांच्या त्याचि शब्दात आपणा सांगतो पुढे ॥ ५१ ॥ ॥ इति श्रीमद्भगवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ दहावा अध्याय हा ॥ २ ॥ १० ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥ ॥ दुसरा स्कंध परिपूर्ण हा ॥
परीक्षिता - परीक्षित - राज्ञा - राजाने - पृष्टः - विचारलेला - महामुनिः - महर्षि शुकाचार्य - यत् - जे - अवोचत् - बोलला - तत् - ते - राज्ञः - राजाच्या - प्रश्नानुसारतः - प्रश्नांच्या क्रमाने - वः - तुम्हाला - अभिधास्ये - मी सांगेन - शृणुत - ऐका. ॥५१॥
सूत म्हणाले - ऋषींनो, राजा परीक्षिताने विचारल्यावर त्याच्या प्रश्नांना अनुसरून शुकाचार्यांनी त्याला जे काही सांगितले होते, तेच मी आपणास सांगतो, लक्षपूर्वक ऐका. (५१)
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां |