श्रीमद् भागवत पुराण
द्वितीयः स्कन्धः
नवमोऽध्यायः

शुकस्य प्रतिवचनम् - ब्रह्मणो वैकुण्ठधाम दर्शनम्
तत्राभ्यर्थमानेन भगवता ब्रह्मणे चतुःश्लोकभागवतोपदेशदानम् -

ब्रह्मदेवाचे भगवद्‌धामदर्शन आणि त्यांना भगवंतांच्या द्वारा चतुःश्लोकी भागवाचा उपदेश -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्)
आत्ममायामृते राजन् पन्परस्यानुभवात्मनः ।
न घटेतार्थसम्बन्धः स्वप्नद्रष्टुरिवाञ्जसा ॥ १ ॥
श्री शुकदेवजी म्हणाले -
(अनुष्टुप्)
राजा स्वप्नात जे भासे त्याचा संबंध तो नसे ।
देहातीत तसा आत्मा दूर त्या मायिकाहुनी ॥ १ ॥

राजन् - हे परिक्षित राजा ! - स्वप्नद्रष्टुःइव - स्वप्नात पाहणार्‍या पुरुषाप्रमाणे - आत्ममायाम् ऋते - स्वतःच्या मायेचा स्वीकार केल्याशिवाय - परस्य - श्रेष्ठ अशा - अनुभवात्मनः - अनुभव घेणार्‍या आत्म्याचा - अर्थसंबंधः - देहादि पदार्थांशी संबंध - अञ्जसा - वास्तविक रीतीने - न घटेत - घडत नाही. ॥१॥
श्रीशुक म्हणाले - परीक्षिता, जसे स्वप्नात पाहिलेल्या पदार्थाशी पाहणार्‍याचा संबंध नसतो, तसेच देहाहून वेगळ्या अशा ज्ञानस्वरूप आत्म्याचा स्वतःच्या मायेखेरीज दृश्य पदार्थांबरोबर काहीही संबंध नसतो. (१)


बहुरूप इवाभाति मायया बहुरूपया ।
रममाणो गुणेष्वस्या ममाहमिति मन्यते ॥ २ ॥
बहुरूपा अशी माया म्हणोनी बहुरूपि तो ।
रमता वदती लोक हा मी नी मम हे असे ॥ २ ॥

बहुरूपया - अनेक स्वरूपे धारण करणार्‍या - मायया - मायेच्या योगे - बहुरूपः इव - अनेक स्वरूपे धारण केलेला असा - आभाति - भासतो - अस्याः - ह्या मायेच्या - गुणेषु - तीन गुणांच्या ठिकाणी - रममाणः - रमणारा - अहं मम - मी माझे - इति - असे - मन्यते - मानतो. ॥२॥
विविध रूपे धारण केलेल्या मायेच्या कारणाने तो पुरुषही विविध रूपांचा भासतो. जेव्हा तो त्या गुणांत रममाण होतो, तेव्हा ’हा मी आहे, आणि हे माझे आहे’ असे मानू लागतो. (२)


यर्हि वाव महिम्नि स्वे परस्मिन् कालमाययोः ।
रमेत गतसम्मोहः त्यक्त्वोदास्ते तदोभयम् ॥ ३ ॥
जेंव्हा तो मोह सोडोनी रमतो स्वरुपातची ।
तेंव्हा मी आणि माझे हे सोडुनि निर्गुणी बने ॥ ३ ॥

यर्हि - जेव्हा - कालमाययोः - काल व माया या दोहोंच्या - परस्मिन् - पलीकडे असणार्‍या - स्वे - आत्मविषयक - महिम्नि - माहात्म्यात - रमेत - रममाण होतो. - तदा - तेव्हा - वाव - खरोखर - गतसंमोहः - मोहरहित - उभयं - अहंता व ममता ह्या दोहोला - त्यक्त्वा - टाकून - उदास्ते - उदासीनपणाने राहतो. ॥३॥
परंतु जेव्हा काल आणि माया या दोन्हींच्या पलीकडे जाऊन आपल्या अनंत स्वरूपात मोहरहित होऊन रममाण होतो, तेव्हा ’मी, माझे’ हा भाव सोडून तो पूर्ण उदासीन होतो. (३)


आत्मतत्त्वविशुद्ध्यर्थं यदाह भगवानृतम् ।
ब्रह्मणे दर्शयन् रूपं अव्यलीकव्रतादृतः ॥ ४ ॥
ब्रह्म्याचे तप पाहोनी तयाने रूप दाविले ।
आत्मबोध परासत्य परमार्थ हि बोधिला ॥ ४ ॥

अव्यलीकव्रतादृतः - निष्कपट व्रताचरणाने आदराला प्राप्त झालेला - भगवान् - परमेश्वर - ब्रह्मणे - ब्रह्मदेवाला - ऋतं - खर्‍या - रूपं - स्वरूपाला - दर्शयन् - दाखविणारा असा होत्साता - यत् आह - जे बोलला ते - आत्मतत्त्वविशुद्धयर्थं - जीवाला तत्त्वज्ञान प्राप्त व्हावे एवढयाकरिता ॥४॥
ब्रह्मदेवाच्या निष्कपट तपस्येने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला आपल्या रूपाचे दर्शन करविले आणि आत्मतत्त्वाचे ज्ञान होण्यासाठी ज्या परम सत्य वस्तूचा उपदेश केला, तोच मी आता तुला सांगतो. (४)


स आदिदेवो जगतां परो गुरुः
    स्वधिष्ण्यमास्थाय सिसृक्षयैक्षत ।
तां नाध्यगछ्रद्दृशमत्र सम्मतां
    प्रपञ्चनिर्माणविधिर्यया भवेत् ॥ ५ ॥
(इंद्रवज्रा)
त्या आदिदेवे बसुनी फुलात
    विचार केला जग निर्मिण्याचा ।
जी ज्ञानदृष्टी असणे रचाया
    ती त्यास तेंव्हा नव्हती मिळाली ॥ ५ ॥

आदिदेवः - मुख्य देव - जगतां - जगामध्ये - पर - श्रेष्ठ - गुरुः - उपदेशक - सः - तो ब्रह्मदेव - स्वधिषण्यो - स्वस्थानावर - आस्थाय - बसून - सिसृक्षया - उत्पत्ति करण्याच्या इच्छेने - ऐक्षत - पाहू लागला - यया - ज्यायोगे - प्रपञ्चनिर्माणविधीः - सृष्टी उत्पन्न करण्याची पद्धति - भवेत् - माहीत होईल - तां - त्या - अत्र - ह्या बाबतीत - संमतां - सर्वमान्य अशा - दृशं - ज्ञानाला - न अध्यगच्छत् - प्राप्त करू शकला नाही. ॥५॥
तिन्ही लोकांचे परम गुरू आदिदेव ब्रह्मदेव आपल्या जन्मस्थानी कमळावर बसून सृष्टिरचना करण्याच्या इच्छेने विचार करू लागले, परंतु ज्या ज्ञानदृष्टीने सृष्टिनिर्मिती खात्रीने होऊ शकेल, ती दृष्टी त्यांना प्राप्त झाली नाही. (५)


स चिन्तयन् द्व्यक्षरमेकदाम्भसि
    उपाशृणोत् द्विर्गदितं वचो विभुः ।
स्पर्शेषु यत्षोडशमेकविंशं
    निष्किञ्चनानां नृप यद्धनं विदुः ॥ ६ ॥
चिंतेत जेंव्हा बसला तदाची
    तऽपऽअसे दोनचि वेळ ऐके ।
परीक्षिता ते धन योगियांचे
    तपात सामर्थ्य समावलेले ॥ ६ ॥

चिंतयन् - विचार करणारा - विभुः - सर्वव्यापी - सः - तो ब्रह्मदेव - एकदा - एके वेळी - अंभसि - उदकात - व्दिर्गदितं - दोनदा उच्चारिलेले - यत् - जे - स्पर्शेषु - स्पर्श नावाच्या अक्षरांपैकी - षोडशं - सोळावे म्हणजे ‘त’ हे अक्षर - च - आणि - एकविंश - एकविसावे ‘प’ अक्षर - व्दयक्षरं - दोन अक्षरांनी युक्त - वचः - शब्द - उपाशृणोत् - ऐकता झाला - नृप - हे परीक्षित राजा - यत् - जो शब्द - निष्किंचनानां - दरिद्री लोकांचे - धनं - द्रव्य - विदुः - समजतात. ॥६॥
हे राजा, एक दिवस ते प्रभू असा विचार करीत बसले असता प्रपयकाळच्या समुद्रात त्यांनी व्यंजनातील सोळावे आणि एकविसावे अक्षर ’त’ आणि ’प’, ’तप’ (तप कर) या प्रकारे दोन वेळा ऐकले. महात्मे लोक या तपालाच अधनांचे धन मानतात. (६)


निशम्य तद्वक्तृदिदृक्षया दिशो
    विलोक्य तत्रान्यदपश्यमानः ।
स्वधिष्ण्यमास्थाय विमृश्य तद्धितं
    तपस्युपादिष्ट इवादधे मनः ॥ ७ ॥
हा बोल कोठोनि उठे कुणाचा
    बघे परी ना दिसले कुणीच ।
तेंव्हा तये ओळखिले तपाते
    आज्ञा असे मानुनि बैसला तो ॥ ७ ॥

तत् - त्या ‘तप’ ह्या शब्दाला - निशम्य - ऐकून - वक्तृदिदृक्षया - बोलणार्‍याला पाहण्याच्या इच्छेने - दिशः - दाही दिशांकडे - विलोक्य - पाहून - तत्र - तेथे - अन्यत् - दुसरे काहीही - अपश्यमानः - न पाहणारा - स्वधिष्ण्यं - स्वस्थानावर - आस्थाय - बसून - तत् - ते तपच - हितं - कल्याणकारक आहे - विमृश्य - असे विचारपूर्वक ठरवून - उपादिष्टः - गुरूने उपदेश केलेला - इव - जणू काय - तपसि - तपामध्ये - मनः - अंतःकरण - आदधे - ठेविता झाला. ॥७॥
हे ऐकून ब्रह्मदेवांनी हे शब्द उच्चारणार्‍याला पाहण्याच्या इच्छेने चारी दिशांकडे पाहिले, पण तेथे दुसरे कोणीच दिसले नाही. जे आपल्या कमळावर बसले आणि "मला तप करण्याची जणू आज्ञा झाली आहे" असा निश्चय करून आणि त्यातच आपले हित आहे असे समजून त्यांनी मनाने तपाला प्रारंभ केला. (७)


दिव्यं सहस्राब्दममोघदर्शनो
    जितानिलात्मा विजितोभयेन्द्रियः ।
अतप्यत स्माखिललोकतापनं
    तपस्तपीयांस्तपतां समाहितः ॥ ८ ॥
तपस्वि जे त्यात अधीक श्रेष्ठ
    ब्रह्मा असे, ज्ञान अमोघ त्याचे ।
एकाग्र चित्तेचि हजार वर्षे
    केले तपा तो मग दिव्य झाला ॥ ८ ॥

अमोघदर्शनः - व्यर्थ न जाणारे आहे दर्शन ज्याला असा - तपतां - तपस्व्यांमध्ये - तपीयान् - मोठा तपस्वी - जितानिलात्मा - जिंकिली आहेत वायु आणि मन ज्याने असा - विजितोभयेन्द्रियः - जिंकिली आहेत दोन्ही प्रकारची इंद्रिये ज्याने असा - समाहितः - सावधानपणाने - दिव्यं - देवांची - सहस्राब्दं - हजार वर्षे - अखिललोकतापनं - सर्व लोकांना प्रकाशित करणारे - तपः - तप - अतप्यत स्म - अनुष्ठिता झाला. ॥८॥
ब्रह्मदेव तपस्वी लोकांमध्ये सर्वांत मोठे तपस्वी आहेत. त्यांचे ज्ञान अमोघ आहे. त्यांनी त्यावेळी दिव्य एक हजार वर्षांपर्यंत एकाग्र चित्ताने आपले प्राण, मन , कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये यांना आपल्या अधीन ठेवून तपश्चर्या केली. त्यामुळे ते सर्व लोकांना प्रकाशित करण्यास समर्थ झाले. (८)


तस्मै स्वलोकं भगवान् सभाजितः
    सन्दर्शयामास परं न यत्परम् ।
व्यपेतसङ्क्लेशविमोहसाध्वसं
    स्वदृष्टवद्‌भिः विबुधैरभिष्टुतम् ॥ ९ ॥
बघून त्याचे तप थोर ऐसे
    स्वलोक दावी भगवंत श्रेष्ठ ।
जेथे न कोणा भय कांही
    जेथे तयाची नित दर्शने ती ॥ ९ ॥

सभाजितः - प्रसन्न केलेला - भगवान् - परमेश्वर - व्यपेतसंक्लेशविमोहसाध्वसं - नष्ट झाली आहेत क्लेश, मोह व भीती जेथून असा - स्वदृष्टवद्‌भिः - महापुण्यवान अशा - विबुधैः - देवांनी - अभिष्टुतं - स्तुति केलेला - स्वलोकं - आपला लोक - तस्मै - त्या ब्रह्मदेवाला - संदर्शयामास - दाखविता झाला - यत् - ज्याहून - परं - दुसरे - न - नाही. ॥९॥
त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांना जो सर्वांत श्रेष्ठ आहे आणि ज्याच्या पलीकडे दुसरा लोक नाही, असा आपला वैकुंठ लोक दाखविला. त्या लोकात कोणत्याही प्रकारचे क्लेश, मोह आणि भय नाही. आत्मवेत्ते ज्ञानी त्याचीच स्तुती करीत असतात. (९)


प्रवर्तते यत्र रजस्तमस्तयोः
    सत्त्वं च मिश्रं न च कालविक्रमः ।
न यत्र माया किमुतापरे हरेः
    अनुव्रता यत्र सुरासुरार्चिताः ॥ १० ॥
जेथे न सत्वात रजो तमादी
    माया नि काळास जिथे न थारा ।
जेथे सदा देव नित्य सारे
    पार्षद त्याचे पद ध्याति नित्य ॥ १० ॥

यत्र - जेथे - रजः - रजोगुण - च - आणि - तमः - तमोगुण - तयोः - त्या दोघांचे - मिश्रं - मिश्रण ज्यात आहे असा - सत्त्वं - सत्त्वगुण - न प्रवर्तते - राहात नाही - च - आणि - कालविक्रमः - काळाचा पराक्रम - न - जेथे चालत नाही - यत्र - जेथे - माया - माया - न - नाही - उत - मग तर - अपरे - दुसरे - किं - कसे असणार - यत्र - जेथे - सुरासुरार्चिताः - देवदैत्यांनी पूजिलेले असे - हरेः अनुव्रताः - भगवंताच्या व्रताचा स्वीकार करणारे भक्त राहातात. ॥१०॥
तेथे रजोगुण, तमोगुण आणि यांनी मिश्र असा सत्त्वगुणपण नाही. तेथे काळाचा प्रभाव चालत नाही की माया पाय ठेवू शकत नाही. तेथे इतरांची काय कथा ? तेथे देव-दानवांनी पूजिलेले भगवंतांचे पार्षद राहतात. (१०)


श्यामावदाताः शतपत्रलोचनाः
    पिशङ्गवस्त्राः सुरुचः सुपेशसः ।
सर्वे चतुर्बाहव उन्मिषन्मणि
    प्रवेकनिष्काभरणाः सुवर्चसः ।
प्रवालवैदूर्यमृणालवर्चसः
    परिस्फुरत्कुण्डल मौलिमालिनः ॥ ११ ॥
कांती नभा सारखि दिव्य त्याची
    डोळे जसे ते शतपत्र नेत्र ।
वस्त्रे जयाची पिवळी अशी की
    सौंदर्यराशी गमतो मनासी ।
तो कोवळा आणि चतुर्भुजो नी
    माळा तया कंठि विशोभियेल्या ॥ ११ ॥

श्यामावदाताः - नीलवर्णाचे व तेजस्वी - शतपत्रलोचनाः - कमलाप्रमाणे सुंदर नेत्र आहेत ज्यांचे असे - पिशङ्गवस्त्राः - पिंगट वस्त्रे आहेत ज्यांची असे - सुरुचः - कांतिमान - सुपेशसः - सुकुमार - सर्वे - सगळे - चतुर्बाहवः - चार आहेत हात ज्यांना असे - उन्मिषन्मणिप्रवेकनिष्काभरणाः - चकाकणार्‍या उत्तम मण्यांनी खचित असे सुवर्णाचे अलंकार धारण करणारे - सुवर्चसः - अत्यंत तेजस्वी - प्रवालवैदूर्यमृणालवर्चसः - पोवळी, वैदूर्य, कमलतंतु ह्यांच्याप्रमाणे तेज आहे ज्यांचे असे - परिस्फुरत्कुंडलमौलिमालिनः - चकाकणारी कुंडले, मुकुट आणि माळा धारण करणारे. ॥११॥
त्या पार्षदांचे उज्ज्वल श्यामवर्ण शरीर आहे. कमळाप्रमाणे नेत्र आहेत. ते पीतांबरधारी आहेत. त्यांचे तेज दिव्य असून ते कोमलतेची मूर्तीच आहेत. सर्वांना चार-चार हात आहेत. ते स्वतः अत्यंत तेजस्वी असून रत्‍नजडित सुवर्णाची प्रभायुक्त आभूषणेही ते धारण करतात. त्यांचे रूप प्रवाळ, वैडूर्य आणि कमळाच्या उज्ज्वल तंतूंसारखे आहे. त्यांच्या कानांत कुंडले, मस्तकांवर मुगुट आणि गळ्यांत माळा शोभून दिसत आहेत. (११)


भ्राजिष्णुभिर्यः परितो विराजते
    लसद्विमानावलिभिर्महात्मनाम् ।
विद्योतमानः प्रमदोत्तमाद्युभिः
    सविद्युदभ्रावलिभिर्यथा नभः ॥ १२ ॥
आकाश जैसे ढग वीज यांनी
    शोभे तसा तो भगवंत शोभे ।
स्थळी स्थळी कामिनि दिव्य कांती
    नी दिव्य आत्मे हि विमान यानी ॥ १२ ॥

यथा - जसे - सविदयुदभ्रावलिभिः - विजेने युक्त अशा मेघपंक्तींनी - नभः - आकाश - यः - जो - महात्मनां - महात्म्यांच्या - भ्राजिष्णुभिः - दैदिप्यमान अशा - लसव्दिमानावलिभिः - शोभणार्‍या विमानपंक्तींनी - परितः - सभोवार - प्रमदोत्तमादयुभिः - तरुण स्त्रियांच्या कांतीने - विदयोतमानः - प्रकाशमान असा - विराजते - शोभतो. ॥१२॥
जसे आकाश चमकणार्‍या विजेप्रमाणे असनार्‍या ढगांनी शोभून दिसते, तसाच तो लोक सुंदर स्त्रियांप्रमाणे कांती असणार्‍या दिव्य, तेजोमय, महात्म्यांच्या विमानांनी सर्वत्र सुशोभित झालेला असतो. (१२)


श्रीर्यत्र रूपिण्युरुगायपादयोः
    करोति मानं बहुधा विभूतिभिः ।
प्रेङ्खं श्रिता या कुसुमाकरानुगैः
    विगीयमाना प्रियकर्म गायती ॥ १३ ॥
ती लक्षुमी तेथ अनेक रूपे
    त्या नाथपाया नित सेविते की ।
झोक्यात बैसे अन गायि केंव्हा
    त्या गंधरूपास मिलिंद गाती ॥ १३ ॥

यत्र - जेथे - या - जी - प्रेङ्खंश्रिता - झोपाळ्यावर बसलेली - कुसुमाकरानुगैः - वसंत ऋतुला अनुसरणार्‍या भ्रमरांनी - विगीयमाना - गायिलेली - प्रियकर्म - पतीचे चरित्र - गायती - गाणारी - रुपिणि - मूर्तिमंत - श्रीः - लक्ष्मी - बहुधा - अनेकप्रकारे - विभूतिभिः - ऐश्वर्यांनी - उरुगायपादयोः - परमेश्वराच्या चरणकमलांचा - मानं - सत्कार - करोति - करिते. ॥१३॥
त्या वैकुंठलोकात लक्ष्मी सुंदर रूप धारण करून आपल्या अनेक विभूतींद्वारा भगवंतांच्या चरणकमलांची अनेक प्रकारे सेवा करीत असते. कधी कधी ती झोपाळ्यावर बसून आपल्या प्रियतम भगवंतांच्या लीलांचे गायन करू लागते, तेव्हा भ्रमर स्वतः लक्ष्मीचे गुणगान करू लागतात. (१३)


ददर्श तत्राखिलसात्वतां पतिं
    श्रियः पतिं यज्ञपतिं जगत्पतिम् ।
सुनंदनंदप्रबलार्हणादिभिः
    स्वपार्षदाग्रैः परिसेवितं विभुम् ॥ १४ ॥
त्या दिव्य लोकी निजभक्त रक्षी
    लक्ष्मीपती यज्ञपतीच विष्णु ।
सुनंद नंद प्रबलार्हणादी
    प्रभूपदा पार्षद सेवितात ॥ १४ ॥

तत्र - तेथे - अखिलसात्वतां पतिं - संपूर्ण भक्तांचा रक्षक अशा - श्रियःपतिं - लक्ष्मीचा पति अशा - यज्ञपतिं - यज्ञाची मुख्य देवता अशा - सुनन्दनन्दप्रबलार्हणादिभिः - सुनंद, नंद, प्रबल व अर्हण इत्यादी - स्वपार्षदमुख्यैः - आपल्या मुख्य सेवकांनी - परिसेवितं - सेविलेल्या - विभुं - परमेश्वराला - ददर्श - पाहता झाला.॥१४॥
ब्रह्मदेवांनी पाहिले की, त्या दिव्य लोकात सर्व भक्तांचे रक्षणकर्ते, लक्ष्मीचे पती, यज्ञपती तसेच विश्वपती भगवंत विराजमान आहेत आणि सुनंद, नंद, प्रबल, अर्हण इत्यादि मुख्य मुख्य पार्षदगण त्या प्रभूंची सेवा करीत आहेत. (१४)


भृत्यप्रसादाभिमुखं दृगासवं
    प्रसन्नहासारुणलोचनाननम् ।
किरीटिनं कुण्डलिनं चतुर्भुजं
    पीतांशुकं वक्षसि लक्षितं श्रिया ॥ १५ ॥
त्याच्या प्रसादाभिमुखात हास्य
    डोळ्यात लाली नि मधूर दृष्टी ।
किरीट नी कुंडल धारि ऐसा
    ती हेममाला हृदयी विलासे ॥ १५ ॥

भृत्यप्रसादाभिमुखं - भक्तांवर प्रसाद करण्याला उत्सुक - दृगासवं - ज्याची दृष्टी मदयाप्रमाणे मोह उत्पन्न करणारी आहे अशा - प्रसन्नहासारुणलोचनाननम् - शांत व सुंदर हास्य आणि आरक्त नेत्र यांनी युक्त आहे मुख ज्याचे असा - किरीटिनं - मुकुट धारण करणारा - कुंडलिनं - कानात कुंडले असलेला - चतुर्भुजं - चार हात असणारा - पीतांबर - पिवळे वस्त्र परिधान केलेला - वक्षसि - वक्षःस्थलाच्या ठिकाणी - श्रिया - श्रीवत्सलांछनाच्या शोभेने - लक्षितं - चिन्हित असा ॥१५॥
प्रभूंचे मुखकमल प्रसन्न हास्य व लालसर नेत्रांनी युक्त आहे. दृष्टी मोहक आणि मधुर आहे. भक्तांवर कृपा करण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्यांच्या मस्तकावर मुकुट आणि कानांत कुंडले आहेत. त्यांनी पीतांबर परिधान केला आहे. ते चतुर्भुज असून त्यांच्या वक्षःस्थळावर लक्ष्मी विराजमान आहे. (१५)


अध्यर्हणीयासनमास्थितं परं
    वृतं चतुःषोडशपञ्चशक्तिभिः ।
युक्तं भगैः स्वैरितरत्र चाध्रुवैः
    स्व एव धामन् रममाणमीश्वरम् ॥ १६ ॥
सर्वोच्च त्या आसनि तो विराजे
    सभोवती शक्तिहि पंचवीस ।
षट्शक्ति तेथे रमती सदाच्या
    आनंदरूपी प्रभु नित्य राही ॥ १६ ॥

परं - उंच अशा - अध्यर्हणीयासनं - सर्वोत्कृष्ट सिंहासनावर - आस्थितं - बसलेल्या - चतुःषोडशपञ्चशक्तिभिः - चार, सोळा व पाच अशा म्हणजे पंचवीस तत्त्वरूपी शक्तींनी - वृतं - वेष्टिलेला - च - आणि - इतरत्र - इतर ठिकाणी - अध्रुवैः - क्षणिक - स्वैः - आपल्या - भगैः - ऐश्वर्यांनी - युक्तं - युक्त - स्वे - स्वतःच्या - धामन् - तेजामध्ये - रममाणं - रमून जाणार्‍या - ईश्वरं - परमेश्वराला ॥१६॥
ते एका सर्वोत्तम आणि मौल्यवान आसनावर बसलेले आहेत. पुरुष, प्रकृती, महत्तत्त्व, अहंकार, मन, दहा इंद्रिये, शब्दादि पाच तन्मात्रा आणि पंचमहाभूते, या पंचवीस शक्ति मूर्त स्वरूपात त्यांच्या चारी बाजूंनी उभ्या आहेत. समग्र ऐश्वर्य, धर्म, कीर्ति, संपत्ती, ज्ञान आणि वैराग्य या इतरत्र नसणार्‍या सहा ऐश्वर्यांनी ते युक्त आहेत. ते सर्वेश्वर आपल्याच नित्य आनंदमय स्वरूपात निमग्न असतात. (१६)


तद्दर्शनाह्लादपरिप्लुतान्तरो
    हृष्यत्तनुः प्रेमभराश्रुलोचनः ।
ननाम पादाम्बुजमस्य विश्वसृग्
    यत् पारमहंस्येन पथाधिगम्यते ॥ १७ ॥
ब्रह्मा तया पाहुनि हर्षला तै
    प्रेमाश्रु नेत्री नि शहारलाही ।
पदांबुजाला नमिले तयाने
    जेणे मिळे मुक्ति सदा सदाची ॥ १७ ॥

यत् - जे स्थान - पारमहंस्येन - परमहंसानी स्वीकारलेल्या - पथा - मार्गाने - अधिगम्यते - मिळविता येते - तद्दर्शनाल्हादपरिप्लुतान्तरः - त्याच्या दर्शनाच्या आनंदाने तल्लीन झाले आहे चित्त ज्याचे असा - हृष्यत्तनुः - रोमांचित आहे शरीर ज्याचे असा - प्रेमभराश्रुलोचनः - प्रेमातिरेकाने अश्रुयुक्त झाले आहेत नेत्र ज्याचे असा - विश्वसृक् - ब्रह्मदेव - अस्य - ह्याच्या - पादाम्बुजं - चरणकमलाला - ननाम - नमस्कार करिता झाला. ॥१७॥
त्यांचे दर्शन होताच ब्रह्मदेवाचे हृदय आनंदाच्या उद्रेकाने भरून आले. शरीर पुलकित झाले, प्रेमभराने डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. परमहंसांच्या निवृत्तिमार्गाने जे प्राप्त होतात, त्या चरणांना ब्रह्मदेवांनी नमस्कार केला. (१७)


तं प्रीयमाणं समुपस्थितं कविं
    प्रजाविसर्गे निजशासनार्हणम् ।
बभाष ईषत्स्मितशोचिषा गिरा
    प्रियः प्रियं प्रीतमनाः करे स्पृशन् ॥ १८ ॥
ब्रह्मप्रिया प्रीय बघे तयास
    तो नम्र आनंदित योग्य ऐसा ।
निर्माण कार्यास सुयोग्य जाणी
    हासोनि बोले कर ते धरोनी ॥ १८ ॥

प्रियः - सर्वांना प्रिय असा - प्रीतमनाः - प्रसन्न आहे मन ज्याचे असा भगवान - प्रियं - आवडत्या - प्रीयमाणं - प्रीति संपादन करणार्‍या - समुपस्थितं - व जवळ आलेल्या - प्रजाविसर्गे - प्रजा उत्पन्न करण्याच्या कार्यात - निजशासनार्हणम् - आपल्या उपदेशाला सत्पात्र अशा - तं - त्या ब्रह्मदेवाला - करे स्पृशन् - हस्तस्पर्श करणारा - तदा - तेव्हा - ईषत्स्मितशोचिषा - मंदहास्याने शोभणार्‍या - गिरा - वाणीने - बभाषे - बोलला. ॥१८॥
आपल्या आज्ञेला पात्र असणार्‍या प्रिय ब्रह्मदेवाला सृष्टिनिर्मितीसाठी आलेला पाहून भगवंत अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी ब्रह्मदेवाचा हात आपल्या हातात घेतला आणि मंदहास्ययुक्त मधुर वाणीने ते म्हणाले. (१८)


श्रीभगवानुवाच -
(अनुष्टुप्)
त्वयाहं तोषितः सम्यग् वेदगर्भ सिसृक्षया ।
चिरं भृतेन तपसा दुस्तोषः कूटयोगिनाम् ॥ १९ ॥
श्री भगवान म्हणाले-
वेदांचा जाणता तूचि तपाने मज तोषिले ।
कपटी योगसिद्धी ते कधी ना भावती मला ॥ १९ ॥

वेदगर्भ - वेद आहेत उदरात ज्याच्या अशा हे ब्रह्मदेवा - कूटयोगिनां - सकाम भक्तावर - दुस्तोषः - संतुष्ट होण्यास कठीण असा - अहं - मी - त्वया - तुझ्याकडून - सिसृक्षया - सृष्टि उत्पन्न करण्याच्या इच्छेने - चिरं - पुष्कळ काळपर्यंत - भृतेन - अनुष्ठिलेल्या - तपसा - तपाने - सम्यक् - चांगल्या प्रकारे - तोषितः - संतुष्ट केला गेलो आहे. ॥१९॥
श्रीभगवान म्हणाले - ब्रह्मदेवा, तुझ्या हृदयात सर्व वेदांचे ज्ञान आहेच. तू सृष्टिरचनेच्या इच्छेने चिरकाल तपस्या करून मला चांगल्या प्रकारे संतुष्ट केले आहेस. मनात प्रापंचिक बुद्धी ठेवून योगसाधन करणारे मला कधीच प्रसन्न करू शकत नाहीत. (१९)


वरं वरय भद्रं ते वरेशं माभिवाञ्छितम् ।
ब्रह्मञ्छ्रेयः परिश्रामः पुंसां मद्दर्शनावधिः ॥ २० ॥
तुझे कल्याण हो सारे मागावा वर काय तो ।
समर्थ इच्छिले देण्या सर्वांत साधनात मी ॥ २० ॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मदेवा - वरेशं - वर देण्यास समर्थ अशा - मा - माझ्याजवळून - अभिवाञ्‌छितं - इष्ट अशा - वरं - वराला - वरय - मागून घे - ते - तुझे - भद्रं - कल्याण असो - पुंसः - मनुष्याचा - श्रेयःपरिश्रामः - कल्याणासाठी करावयाचा परिश्रम - मद्दर्शनावधिः - माझे दर्शन हीच आहे मर्यादा ज्याची असा ॥२०॥
तुझे कल्याण असो. तुझी इच्छा असेल, तो वर माझ्याकडे माग. वर देण्यास मी समर्थ आहे. जीवांच्या सर्व कल्याणकारी साधनांचे पर्यवसान माझे दर्शन हेच आहे. (२०)


मनीषितानुभावोऽयं मम लोकावलोकनम् ।
यदुपश्रुत्य रहसि चकर्थ परमं तपः ॥ २१ ॥
जळीं वाणीस ऐकोनी घोर तू तप साधिले ।
इच्छिले तूच मी तेणे अन हा लोकदाविला ॥ २१ ॥

लोकावलोकनं - माझ्या लोकाचे दर्शन - अयं - हा - मम - माझ्या - मनीषितानुभावः - इच्छेचा प्रभावच - रहसि - एकांतात - यत् - जे - उपश्रुत्य - ऐकून - परमं - श्रेष्ठ अशा - तपः - तपाला - चकर्थ - केलेस. ॥२१॥
तू एकान्तात माझी वाणी ऐकून एवढी घोर तपश्चर्या केलीस. म्हणूनच माझ्या इच्छेनेच तुला माझ्या लोकांचे दर्शन झाले.(२१)


प्रत्यादिष्टं मया तत्र त्वयि कर्मविमोहिते ।
तपो मे हृदयं साक्षाद् आत्माऽहं तपसोऽनघ ॥ २२ ॥
सृष्टि ही रचण्या तू तो होता दिड्.मूढ तेधवा ।
माझीच ’तप्’ ती आज्ञा निष्पाप तप तोहि मी ॥ २२ ॥

अनघ - हे निष्पाप ब्रह्मदेवा - त्वयि-कर्मविमोहिते - तुला स्वकर्माविषयी मोह पडला असता - तत्र - त्याबद्दल - मया - माझ्याकडून - प्रत्यादिष्टं - उपदेशिलेले - तपः - तप - साक्षात् - प्रत्यक्ष - मे - माझे - हृदयं - हृदयच - अहं - मी - तपसः - तपाचा - आत्मा - आत्मा ॥२२॥
सृष्टिरचनेविषयी किंकर्तव्यमूढ झालेल्या तुला तप करण्याची मी आज्ञा केली. कारण, हे निष्पाप ब्रह्मदेवा, तप हे माझे हृदय आहे आणि मी स्वतः तपाचा आत्मा आहे. (२२)


सृजामि तपसैवेदं ग्रसामि तपसा पुनः ।
बिभर्मि तपसा विश्वं वीर्यं मे दुश्चरं तपः ॥ २३ ॥
तपाने निर्मितो सृष्टि तपाने पोषितो तसा ।
करितो लीन त्यानेच तप शक्ति असे मम ॥ २३ ॥

तपसा एव - तपानेच - इदं - ह्या - विश्वं - जगाला - सृजामि - उत्पन्न करितो - पुनः - फिरून - तपसा - तपाने - ग्रसामि - संहार करितो - तपसा - तपाने - बिभर्मि - पोषितो - तपः - तप - मे - माझे - दुश्चरं - अविनाशी - वीर्यं - सामर्थ्य होय. ॥२३॥
मी तपानेच या सृष्टीची उत्पत्ती करतो. तपानेच तिचे धारण-पोषण करतो आणि पुन्हा तपानेच या सृष्टीला विलीन करतो. तप ही माझी एक श्रेष्ठ शक्ती आहे. (२३)


ब्रह्मोवाच -
भगवन् सर्वभूतानां अध्यक्षोऽवस्थितो गुहाम् ।
वेद ह्यप्रतिरुद्धेन प्रज्ञानेन चिकीर्षितम् ॥ २४ ॥
तथापि नाथमानस्य नाथ नाथय नाथितम् ।
परावरे यथा रूपे जानीयां ते त्वरूपिणः ॥ २५ ॥
ब्रह्मदेवजी म्हणाले-
भगवन् ! सर्वभूतांत साक्षीरूप तुम्ही असा ।
सदैव आपुल्या ज्ञाने मम कार्यासि जाणिले ॥ २४ ॥
नाथा ! कृपा करी दीनां याचका दान देई हे ।
सगुणी निर्गुणी रूपा जाणण्या ज्ञान देई ते ॥ २५ ॥

भगवन् - हे परमेश्वरा - सर्वभूतानां - सर्व प्राणिमात्रांमध्ये - अध्यक्षः - प्रमुखपणे राहणारा - गुहां - हृदयाकशाला - अवस्थितः - व्यापून राहिलेला तू - अप्रतिरुद्धेन - अकुंठित अशा - प्रज्ञानेन - विशिष्ट ज्ञानाने - चिकीर्षितं - इच्छिलेल्या कार्याला - हि - खरोखर - वेद - जाणत आहेस. - नाथ - हे संरक्षक परमेश्वरा - तथापि - तरी सुद्धा - नाथमानस्य - याचना करणार्‍या अशा माझ्या - नाथितं - इच्छित मनोरथाला - नाथय - पूर्ण कर - यथा - जेणेकरून - अरूपिणः - निराकार अशा - ते - तुझी - परावरे - पर व अपर अशी - रूपे - दोन रूपे - तु - तर - जानीयाम् - मी जाणू शकेन. ॥२४-२५॥
ब्रह्मदेव म्हणाले - भगवन्, आपण सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात साक्षीरूपाने विराजमान असता. आपण आपल्या अप्रतिहत ज्ञानाने माझी इच्छा जाणता. (२४)
हे नाथ, रूपरहित अशा आपल्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपांना मी जाणू शकेन, ही या याचकाची इच्छा आपण पूर्ण करा. (२५)


यथात्ममायायोगेन नानाशक्त्युपबृंहितम् ।
विलुम्पन् विसृजन् गृह्णन् बिभ्रदात्मानमात्मना ॥ २६ ॥
क्रीडस्यमोघसङ्कल्प ऊर्णनाभिर्यथोर्णुते ।
तथा तद्विषयां धेहि मनीषां मयि माधव ॥ २७ ॥
मायेचे स्वामी हो तुम्ही संकल्प व्यर्थ ना कधी ।
मुखाने कीट जै जाळे काढितो क्रिडतो तयी ॥ २६ ॥
मायाजाळा तसे तुम्ही निर्मिता क्रीडता पुन्हा ।
कसे शक्य तुम्हा सारे,मर्माचे ज्ञान द्या मला ॥ २७ ॥

माधव - हे लक्ष्मीपते - यथा - ज्याप्रमाणे - उर्णनाभिः - कोळी - ऊर्णुते - सुताच्या जाळ्याने स्वतःला आच्छादितो - यथा - ज्याप्रमाणे - आत्म मायायोगेन - स्वतःच्या प्रकृतीच्या साहाय्याने - नानाशक्त्युपबृंहितं - अनेक शक्तीने वाढलेल्या विश्वाला - विसृजन् - उत्पन्न करणारा - गृह्‌णन् - रक्षण करणारा - विलुम्पन् - संहार करणारा - आत्मना - आत्म्याच्या योगे - आत्मानं - आत्म्याला - बिभ्रत् - धारण करणारा - अमोघसंकल्पः - व्यर्थ न होणारा आहे संकल्प ज्याचा असा - क्रीडसि - खेळतोस - तथा - त्याप्रमाणेच - तव्दिषयां - त्या गोष्टी आहेत विषय जिचा अशी - मनीषां - बुद्धि - मयि - माझ्या ठिकाणी - धेही - ठेव. ॥२६-२७॥
आपण मायेचे स्वामी आहात. आपण केलेला संपल्प कधी व्यर्थ जात नाही. जसा कोळी आपल्या तोंडातून धागा काढून तो विणून त्यात क्रीडा करतो आणि पुन्हा तो आपल्यातच लीन करून घेतो, त्याप्रमाणे आपणही आपल्या मायेचा आश्रय घेऊन विविध शक्तिसंपन्न अशा जगताची उत्पत्ती, पालन आणि संहार करण्यासाठी आपण स्वतःच अनेक रूपे घेता आणि क्रीडा करता. हे आपण कसे करता, त्याचे मर्म मी जाणू शकेन, असे ज्ञान आपण मला द्या. (२६-२७)


भगवच्छिक्षितमहं करवाणि ह्यतन्द्रितः ।
नेहमानः प्रजासर्गं बध्येयं यदनुग्रहात् ॥ २८ ॥
मला सामर्थ्य द्या ऐसे जेणे आज्ञाचि पाळि मी ।
करूनी रचिता सारे त्याचा गर्व नको मला ॥ २८ ॥

अहं - मी - अतन्द्रितः - आळसाला टाकून देणारा असा - हि - खरोखर - भगवच्छिक्षितं - आपल्या शिकवणीचे - करवाणि - आचरण करीन - यदनुग्रहात् - ज्याच्या कृपेने - प्रजासर्गं - सृष्टीच्या उत्पत्तीला - ईहमानः - इच्छिणारा - न बध्येयम् - बद्ध होणार नाही.॥२८॥
आपण माझ्यावर अशी कृपा करा की, मी तत्परतेने आपल्या आज्ञेचे पालन करू शकेन आणि सृष्टीची रचना करतेवेळी माझ्या कर्तेपणाच्या अभिमानाने बांधला जाणार नाही. (२८)


यावत्सखा सख्युरिवेश ते कृतः
    प्रजाविसर्गे विभजामि भो जनम् ।
अविक्लबस्ते परिकर्मणि स्थितो
    मा मे समुन्नद्धमदोऽजमानिनः ॥ २९ ॥
(इंद्रवज्रा)
मित्रा परी तू धरिले कराते
    सेवार्थ आता झटतो तुझ्या मी ।
कर्मानुसारे विभगीन जीव
    तेंव्हा मला ना मुळि गर्व व्हावा ॥ २९ ॥

भो ईश - हे परमेश्वरा - सखा - मित्र - सख्युः - मित्राचा - इव - त्याप्रमाणे - ते - तुझा - कृतः - मी केला गेलो - प्रजाविसर्गे - प्रजोत्पादनरूपी - ते - तुझ्या - परिकर्मणि - सेवाकर्मांत - स्थितः - राहिलेला - अविक्लवः - न डगमगणारा - यावत् - जोपर्यंत - जनम् - लोकाला - विभजामि - निरनिराळ्या प्रकारे विभक्त करीन - अजमानिनः - स्वतःला जन्मरहित समजणार्‍या - मे - माझा - समुन्नद्धमदः - वाढलेला गर्व - मा भूत् - न होवो. ॥२९॥
प्रभो, आपण एखाद्या मित्रासारखा माझा मित्र म्हणून स्वीकार केला आहे. म्हणून मी जेव्हा सृष्टिरचना करण्याच्या रूपाने आपली सेवा करू लागेन आणि सावधानतेने पूर्वसृष्टीच्या गुणकर्मानुसार जीवांचे विभाजन करू लागेन, तेव्हा स्वतःला जन्मकर्मापासून स्वतंत्र मानण्याचा अभिमान मला होऊ नये. (२९)


श्रीभगवानुवाच -
(अनुष्टुप्)
ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितम् ।
सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया ॥ ३० ॥
यावानहं यथाभावो यद् रूपगुणकर्मकः ।
तथैव तत्त्वविज्ञानं अस्तु ते मदनुग्रहात् ॥ ३१ ॥
श्री भगवान म्हणाले -
परं गुह्य असे ज्ञान प्रेमाने सांगतो तुला ।
माझ्या स्वरूप ज्ञानाला सांगतो ठीक ऐकणे ॥ ३० ॥
विस्तार लक्षणे माझी लीला रूप गुणासही ।
कृपेने जाणणे माझ्या तू तैसे अनुसरणे ॥ ३१ ॥

मे - माझे - यत् - जे - परमगुह्यं - अत्यंत गुप्त - विज्ञानसमन्वितं - अनुभविक ज्ञानाने युक्त - सरहस्यं - भक्तियोगासह - ज्ञानं - ज्ञान - च - आणि - तदङंग - त्याचे अंग - मया - माझ्याकडून - गदितं - सांगितलेले - गृहाण - घे - अहं - मी - यावान् - जितका - यथाभावः - जशी सत्ता असणारा - यद्रूपगुणकर्मकः - जशा स्वरूपाचा गुणांचा व कर्मे करणारा - तथैव - तशा प्रकारचेच - तत्त्वविज्ञानं - यथार्थ ज्ञान - ते - तुला - मदनुग्रहात् - माझ्या कृपेने - अस्तु - असो. ॥३०-३१॥
श्रीभगवान म्हणाले - अनुभव, भक्ती आणि साधनांनी युक्त, असे अत्यंत गोपनीय ज्ञान मी तुला सांगतो, ते तू ग्रहण कर. (३०)
माझा जेवढा विस्तार आहे, माझे जे लक्षण आहे, माझी जितकी आणि जशी रूपे, गुण आणि लीला आहेत, त्यांच्या तत्त्वांचा तू माझ्या कृपेने योग्य रीत्या अनुभव घे. (३१)


अहमेवासमेकोऽग्रे नान्यत् यत्सदसत्परम् ।
पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम् ॥ ३२ ॥
सृष्टिचा आदि तो मीची स्थूल ना सूक्ष्म ही जधी ।
जे जे सृष्टीत ते मीची राहील तोहि मीच की ॥ ३२ ॥

अग्रे - प्रथम - एव - सुद्धा - अहम् एव - मीच - आसम् - होतो - यत् - जे - सदसत्परं - अव्यक्त व व्यक्त यांच्या पलीकडचे - अन्यत् - मव्दयतिरिक्त - न - नाही - पश्चात् - मागाहून - च - आणि - यत् - जे - एतत् - हे - अहं - मीच - यः - जो - अवशिष्येत - शेष राहील - सः - तो - अहं - मी - अस्मि - आहे.॥३२॥
सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो, माझ्या व्यतिरिक्त स्थूल, सूक्ष्म किंवा या दोन्हींचे कारण अज्ञान तेही नव्हते. या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे, तेही मीच होतो. तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील, तेही मीच असेन. (३२)


ऋतेऽर्थं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि ।
तद्विद्याद् आत्मनो मायां यथाभासो यथा तमः ॥ ३३ ॥
वास्तवी नसूनी वस्तु अनिर्वचनि ज्या अशा ।
माझ्याविना मुळी खोट्या हे माया मम रूपची ॥ ३३ ॥

यत् - जे - अर्थम् ऋते - वस्तुस्थितीशिवायच - आत्मनि - आत्म्यावर - यथा भासः - जसा भ्रम तसे - प्रतीयेत - अनुभवास येते - यथा च तमः - आणि जसा राहू तसे - न प्रतीयेत - अनुभवास येत नाही - तत् - ते - आत्मनः - आत्म्याची - मायां विदयात् - माया असे जाणावे. ॥३३॥
ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टिदोषाने दोन चंद्रांचा भास होतो, त्याप्रमाणे दुसरी कोणतीही वस्तू नसूनही परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो किंवा ज्याप्रमाणे नक्षत्रांन राहू असून तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रतीती येत नाही, ती माझी माया समज. (३३)


यथा महान्ति भूतानि भूतेषूच्चावचेष्वनु ।
प्रविष्टानि अप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् ॥ ३४ ॥
थोर सान तनू मध्ये पंचभूते निवासती ।
प्रत्यक्ष न तिथे जैसे तसा जीवात मी शिरे ॥ ३४ ॥

यथा - जशी - महान्ति भूतानि - महाभूते - उच्चावचेषु भूतेषु - लहान मोठया प्राण्यांमध्ये - अनुप्रविष्टानि - शिरलेली - अप्रविष्टानि - न शिरल्याप्रमाणेच होत - तथा - त्याप्रमाणे - अहं - मी - तेषु - त्यांमध्ये - न - नाही. ॥३४॥
प्राण्यांच्या पंचमहाभूतरचित लहानमोठ्या शरीरांत आकाशाची पंचमहाभूते, ती शरीरे त्यांचे कार्य असल्याने त्यांच्यात प्रवेश करतात असे वाटते, पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारणरूपाने ती असल्याकारणाने प्रवेश करीतही नाहीत. हे जसे, तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे, असे वाटते. पण आत्मदृष्टीने पाहता माझ्याव्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेलाही नाही. (३४)


एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनाऽऽत्मनः ।
अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा ॥ ३५ ॥
निषेधे अन्वये सिद्ध मी तो सर्वत्र व्यापलो ।
एवढे जाणणे इच्छि जो मम दर्शन ॥ ३५ ॥

यत् - जे - अन्वयव्यतिरेकाभ्यां - अनुयोगी व प्रतियोगीसंबंधाने - सर्वत्र - सर्व ठिकाणी - सर्वदा - नेहमी - स्यात् - होईल. - एतावत् एव - एवढेच - आत्मनः - आत्मसंबंधी - तत्त्वजिज्ञासुना - तत्त्वज्ञानाची इच्छा करणार्‍याने - जिज्ञास्यं - जाणण्याजोगे आहे. ॥३५॥
जे सर्व ठिकाणी सदोदित असते, तेच आत्मतत्त्व होय, हेच तत्त्वजिज्ञासू माणसाने अन्वयव्यतिरेकाने जाणावे. (३५)


एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना ।
भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् ॥ ३६ ॥
ब्रह्माजी ! ध्यानयोगाने निष्ठा सिद्धांति ठेवणे ।
निर्मिता कल्प कल्पेही तरी ना मोह हो तुम्हा ॥ ३६ ॥

परमेण - श्रेष्ठ अशा - समाधिना - समाधियोगाने - एतत् - ह्या - मतं - मताला - समातिष्ठ - लक्षात घेऊन वा - कल्पविकल्पेषु - महाप्रलय व दैनंदिनप्रलय ह्या दोन्ही प्रलयात - कर्हिचित् - कधीही - भवान् - आपण - न विमुह्यति - मोहयुक्त होत नाही. ॥३६॥
ब्रह्मदेवा, तू अविचल समाधीने या सिद्धांतावर पूर्ण निष्ठा ठेव. यामुळे कोणत्याही कल्पामध्ये तुला कधीही मोह होणार नाही. (३६)


श्रीशुक उवाच -
सम्प्रदिश्यैवमजनो जनानां परमेष्ठिनम् ।
पश्यतः तस्य तद् रूपं आत्मनो न्यरुणद्धरिः ॥ ३७ ॥
श्री शुकदेवजी सांगतात-
लोकांचा प्रपिता ब्रह्मा त्याला हे उपदेशिता ।
पाहता पाहता झाला गुप्त तो अरुपी असा ॥ ३७ ॥

अजनः - जन्मरहित - हरिः - परमेश्वर - जनानां - लोकांचा - परमेष्ठिनं - उत्पादक अशा ब्रह्मदेवाला - एवं - ह्याप्रमाणे - संप्रदिश्य - सांगून - तस्य पश्यतः - त्याच्या समक्ष - आत्मनः - स्वतःच्या - तत् - त्या - रूपं - स्वरूपाला - न्यरुणत् - अदृश्य करिता झाला. ॥३७॥
श्रीशुक म्हणाले - लोकपितामह ब्रह्मदेवाला अशा प्रकारे उपदेश करून ज्यांना जन्म नाही, अशा भगवंतांनी ब्रह्मदेवाच्या देखत आपले रूप अदृश्य केले. (३७)


अन्तर्हितेन्द्रियार्थाय हरये विहिताञ्जलिः ।
सर्वभूतमयो विश्वं ससर्जेदं स पूर्ववत् ॥ ३८ ॥
सर्वभूत अशा ब्रह्मे जाणिले लोपले रुप ।
नमिले हात जोडोनी निर्मिली सृष्टि ही पुन्हा ॥ ३८ ॥

अन्तर्हितेन्द्रियार्थाय - अदृश्य केले आहे इंद्रियगम्य स्वरूप ज्याने अशा - हरये - परमेश्वराला - विहिताञ्जलिः - जोडले आहेत हात ज्याने असा - सर्व भूतमयः - सर्व भूते ज्यात वास्तव्य करितात असा - सः - तो ब्रह्मदेव - इदं - ह्या - विश्वं - जगाला - पूर्ववत् - पूर्वीप्रमाणे - ससर्ज - उत्पन्न करिता झाला. ॥३८॥
सर्वभूतस्वरूप ब्रह्मदेवाने, भगवंतांनी आपले इंद्रियांना दिसणारे स्वरूप अदृश्य केल्याचे पाहिले, तेव्हा त्याने हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि पहिल्या कल्पांप्रमाणेच या विश्वाची रचना केली. (३८)


प्रजापतिर्धर्मपतिः एकदा नियमान् यमान् ।
भद्रं प्रजानामन्विच्छन् नातिष्ठत्स्वार्थकाम्यया ॥ ३९ ॥
धर्म प्रजापती ब्रह्मा जनकल्याण साधण्या ।
यम नी नियमो यांना धारिले विधिपूर्वक ॥ ३९ ॥

प्रजापतिः - सृष्टिकर्ता किंवा प्रजारक्षक - धर्मपतिः - आणि धर्मसंरक्षक ब्रह्मदेव - प्रजानां - लोकांच्या - भद्रं - कल्याणाला - अन्विच्छन् - इच्छिणारा - स्वार्थकाम्यया - स्वकार्य करण्याच्या इच्छेने - एकदा - एके वेळी - नियमान् - नियमांना - च - आणि - यमान् - यमांना - आतिष्ठत् - अनुष्ठिता झाला. ॥३९॥
धर्मपती, प्रजापती ब्रह्मदेवाने एकदा सर्व जनतेचे कल्याण व्हावे, हा आपला स्वार्थ पूर्ण करण्याच्या हेतूने विधिपूर्वक यम आणि नियमांचे आचरण करण्यास सुरुवात केली. (३९)


तं नारदः प्रियतमो रिक्थादानामनुव्रतः ।
शुश्रूषमाणः शीलेन प्रश्रयेण दमेन च ॥ ४० ॥
मायां विविदिषन् विष्णोः मायेशस्य महामुनिः ।
महाभागवतो राजन् पितरं पर्यतोषयत् ॥ ४१ ॥
तेंव्हा त्या समयी त्याचा लाडका पुत्र नारद ।
माया तत्वास जाणाया इच्छा घेवोनिया मनीं ॥ ४० ॥
संयमी विनयी सौम्य सेवेत रत राहिला ।
पाहुनी भक्ति ती त्याची ब्रह्मा संतुष्ट जाहला ॥ ४१ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - रिक्थादानां - पुत्रांमध्ये - प्रियतमः - फारच आवडता असा - अनुव्रतः - व्रतानुष्ठानात दक्ष - शुश्रूषमाणः - सेवा करण्यास इच्छिणारा किंवा भगवद्‌गुणानुवाद ऐकण्याची इच्छा करणारा - महामुनिः - मोठा मननशील - महाभागवतः - मोठा भगवद्‌भक्त - नारदः - नारदमुनि - मायेशस्य - प्रकृतीचा चालक अशा - विष्णोः - विष्णूच्या - मायां - मायेला - विविदिषन् - जाणण्याची इच्छा करणारा - तं - त्या - पितरं - पिता जो ब्रह्मदेव त्याला - प्रश्रयेण - नम्रपणाने - शीलेन - सुस्वभावाने - च - आणि - दमेन - इंद्रियनिग्रहाने - पर्यतोषयत् - संतुष्ट करिता झाला. ॥४०-४१॥
त्यावेळी व्रह्मदेवाच्या पुत्रांपैकी सर्वांत अधिक प्रिय, परम भक्त अशा देवर्षी नारदांनी मायापती भगवंतांच्या मायेचे तत्त्व जाणण्याच्या इच्छेने संयम, विनय आणि सौम्यता धारण करून ब्रह्मदेवाची सेवा केली आणि आपल्या सेवेने त्यांना संतुष्ट केले.


तुष्टं निशाम्य पितरं लोकानां प्रपितामहम् ।
देवर्षिः परिपप्रच्छ भवान् यन्मानुपृच्छति ॥ ४२ ॥
नारदे पाहिले ब्रह्मा प्रसन्न जाहले असे ।
तयाने प्रश्न हे केले राजा ! तू जे विचारिले ॥ ४२ ॥

देवर्षिः - नारदमुनि - लोकानां प्रपितामहं - सर्व लोकांच्या पणजोबाला - पितरं - आपल्या पित्याला - तुष्टं - संतुष्ट - निशाम्य - पाहून - भवान् - आपण - मा - मला - यत् - जे - अनुपृच्छति - विचारिता - परिपप्रच्छ - तेच विचारिता झाला. ॥४२॥
आपले लोकपितामह वडील आपल्यावर प्रसन्न आहेत, असे पाहून देवर्षी नारदांनी तू मला विचारलेलाच प्रश्न विचारला. (४०-४१)


तस्मा इदं भागवतं पुराणं दशलक्षणम् ।
प्रोक्तं भगवता प्राह प्रीतः पुत्राय भूतकृत् ॥ ४३ ॥
हे असे प्रश्न ऐकोनी बह्माला हर्ष जाहला ।
दश लक्षण ही वार्ता पुत्रासी बोधिली असे ॥ ४३ ॥

प्रीतः - प्रसन्न झालेला - भूतकृत् - सृष्टिकर्ता ब्रह्मदेव - तस्मै पुत्राय - त्या पुत्राला - इदं - हे - भगवता - भगवंताने - प्रोक्तं - सांगितलेले - दशलक्षणं - दहा लक्षणांनी युक्त असे - भागवतं - भागवतनामक - पुराणं - पुराण - प्राह - सांगता झाला. ॥४३॥
त्याचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव आणखीच प्रसन्न झाले. मग त्यांनी हे दहा लक्षणांनी युक्त असे भगवंतांनी सांगितलेले भागवतपुराण आपला पुत्र नारद याला सांगितले. (४२)


नारदः प्राह मुनये सरस्वत्यास्तटे नृप ।
ध्यायते ब्रह्म परमं व्यासाय अमिततेजसे ॥ ४४ ॥
परीक्षित् ! निधि तेजाचे माझे तात सरस्वती ।
तटासी बैसले ध्यानी भगवव् द चिंतना मनीं ।
पुढे ती नारदे व्यासा बोधिली भगवत् कथा ॥ ४४ ॥

नृप - हे परीक्षित राजा ! - नारदः - नारदमुनि - सरस्वत्याःतटे - सरस्वती नदीच्या काठी - परमं - श्रेष्ठ - ब्रह्म - ब्रह्माला - ध्यायते - चिंतणार्‍या - अमिततेजसे - अत्यंत तेजस्वी - व्यासाय मुनये - व्यास ऋषी - प्राह - सांगता झाला. ॥४४॥
परीक्षिता, ज्यावेळी परमतेजस्वी व्यास सरस्वतीच्या तीरावर बसून परमात्म्याच्या ध्यानात मग्न झाले होते, त्यावेळी देवर्षी नारदांनी हेच भागवत त्यांना सांगितले होते. (४३)


यदुताहं त्वया पृष्टो वैराजात्पुरुषादिदम् ।
यथासीत् तदुपाख्यास्ते प्रश्नान् अन्यांश्च कृत्स्नशः ॥ ४५ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यं
संहितायां द्वितीयस्कन्धे नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
तू मला प्रश्न जे केले सृष्टि ब्रह्मांड जाणण्या ।
श्रीमदभागवतातून उत्तरे ऐक ही पहा ॥ ४५ ॥
॥ इति श्रीमद्‌भगवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥
॥ नववा अध्याय हा ॥ २ ॥ ९ ॥हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

उत - आणि - वैराजात् - विराट्‌संज्ञक - पुरुषात् - पुरुषापासून - इदं - हे - यथा - जसे - आसीत् - उत्पन्न झाले - यत् - ज्याप्रकारे - त्वया - तुझ्याकडून - अहं - मी - पृष्टः - विचारला गेलो - तत् - त्याप्रकारे - च - आणखीही - अन्यान् - दुसर्‍या - प्रश्नान् - प्रश्नांना - कृत्स्रशः - संपूर्ण रीतीने - उपाख्यास्ये - सांगतो. ॥४५॥
विराट पुरुषापासून या जगाची उत्पत्ती कशी झाली हा आणि दुसरे बरेचसे जे प्रश्न तू मला विचारलेस, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुला देत आहे. (४४-४५)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां द्वितीयः स्कन्धे नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
स्कंध दुसरा - अध्याय नववा समाप्त

GO TOP