श्रीमद् भागवत पुराण
द्वितीयः स्कन्धः
अष्टमोऽध्यायः

परीक्षितः प्रश्नाः -

राजा परीक्षिताचे विविध प्रश्न -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


राजोवाच -
(अनुष्टुप्)
ब्रह्मणा चोदितो ब्रह्मन् गुणाख्यानेऽगुणस्य च ।
यस्मै यस्मै यथा प्राह नारदो देवदर्शनः ॥ १ ॥
एतत् वेदितुमिच्छामि तत्त्वं तत्त्वविदां वर ।
हरेरद्‍भुतवीर्यस्य कथा लोकसुमङ्गलाः ॥ २ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
( अनुष्टुप् )
ब्राह्मणा ! वेदवेत्त्यात तुम्ही तो श्रेष्ठची असा ।
निर्गुणी भगवंताचे नारदा गुण वर्णिण्या ॥
ब्रह्म्याने सांगता त्यांनी कोणा कोणास बोधिले ॥ १ ॥
अचिंत्य भगवत्शक्ती कथा त्या मंगला सदा ।
स्वभाव नारदी ऐसा भगवद्दर्शनी सदा ॥
कृपया मजला सांगा गोष्टी त्या सर्वची तुम्ही ॥ २ ॥

ब्रह्मन् - शुकाचार्य - अगुणस्य - निर्गुण परमेश्वराच्या - गुणाख्याने - गुणकथनाविषयी - ब्रह्मणा - ब्रह्मदेवाने - चोदितः - प्रेरणा केलेला - देवदर्शनः - देवाप्रमाणे ज्याचे दर्शन आहे असा - नारदः - नारद - यस्मै यस्मै - ज्याला ज्याला - यथा - जसे - प्राह - बोलला. - वेदविदां वर - हे वेदवेत्त्यांत श्रेष्ठ - एतत् - ह्या - तत्त्वं - तत्त्वाला - वेदितुं - जाणण्य़ास - इच्छामि - इच्छितो - अद्‌भुतवीर्यस्य - आश्चर्यकारक पराक्रम करणार्‍या - हरेः - परमेश्वराच्या - कथाः - कथा - लोकसुमङ्गलाः - लोकांचे मोठे कल्याण करणार्‍या आहेत. ॥१-२॥
राजा म्हणाला - भगवन, आपण वेदवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आहेत. जेव्हा ब्रह्मदेवांनी नारदांना निर्गुण भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची आज्ञा केली, तेव्हा देवतुल्य नारदांनी कोणाकोणाला कोणकोणत्या रूपाने उपदेश केला ? कारण अचिंत्य शक्तींचे आश्रय असणार्‍या भगवंतांच्या कथाच लोकांचे परम मंगल करणार्‍या आहेत. म्हणून त्या मी आपणाकडून जाणून घेऊ इच्छितो. (१-२)


कथयस्व महाभाग यथाऽहं अखिलात्मनि ।
कृष्णे निवेश्य निःसङ्गं मनस्त्यक्ष्ये कलेवरम् ॥ ३ ॥
महाभाग शुका तुम्ही मजला उपदेष द्या ।
आसक्ति सोडुनि सर्व स्मरता कृष्ण मी मरो ॥ ३ ॥

महाभाग - मोठे भाग्य आहे ज्याचे अशा मुने - अहं - मी - यथा - ज्या योगे - अखिलात्मनि कृष्णे - सर्वांच्या अंतर्यामी वास करणार्‍या श्रीकृष्णाच्या ठिकाणी - निःसङ्गं - आसक्तिरहित - मनः - अंतःकरणाला - निवेश्य - ठेवून - कलेवरं - शरीराला - त्यक्ष्ये - टाकीन - कथयस्व - असे सांगा. ॥३॥
अहो महाभाग, आपण मला असा उपदेश करा की, ज्यायोगे मी माझ्या आसक्तिरहित मनाला सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांमध्ये तन्मय करून माझे शरीर सोडू शकेन. (३)


शृण्वतः श्रद्धया नित्यं गृणतश्च स्वचेष्टितम् ।
कालेन नातिदीर्घेण भगवान्विशते हृदि ॥ ४ ॥
श्रद्धेने वर्णिता लीला ऐकता श्रवणेंद्रियी ।
हृदयी प्रगटे भगवान् विलंब क्षणही नको ॥ ४ ॥

भगवान् - परमेश्वर - स्वचेष्टितं - आपल्या लीलांना - श्रद्धया - श्रद्धेने - नित्यं - नेहमी - शृण्वतः - ऐकणार्‍या - च - आणि - गृणतः - वर्णन करणार्‍या भक्ताच्या - हृदि - हृदयात - नातिदीर्घेण - फार दूर नव्हे अशा - कालेन - कालाने - विशते - शिरतो. ॥४॥
जे लोक श्रद्धेने त्यांच्या लिलांचे नित्य श्रवण आणि कथन करतात, त्यांच्या हृदयात लवकरच भगवंत प्रगट होतात. (४)


प्रविष्टः कर्णरन्ध्रेण स्वानां भावसरोरुहम् ।
धुनोति शमलं कृष्णः सलिलस्य यथा शरत् ॥ ५ ॥
कानाच्या छिद्रामार्गाने कृष्ण तो हृदयी शिरे ।
शरदी स्वच्छ जै पाणी तैसा तो मळ सारितो ॥ ५ ॥

कृष्णः - श्रीकृष्ण - कर्णरन्ध्रेण - कानाच्या छिद्राने - स्वानां - आपल्या भक्तांच्या - भावसरोरुहं - हृदयकमळात - प्रविष्टः - शिरलेला - यथा - ज्याप्रमाणे - शरत् - शरदृतु - सलिलस्य - उदकाच्या - शमलं - गढूळपणाला - धुनोति - नष्ट करितो. ॥५॥
श्रीकृष्ण कानांच्या छिद्रांतून आपल्या भक्तांच्या भावमय हृदयकमलावर जाऊन बसतात आणि जसा शरद ऋतू पाण्याचा गढूळपणा नाहीसा करतो, त्याप्रमाणे भक्तांच्या मनातील दोष नाहीसे करतात. (५)


धौतात्मा पुरुषः कृष्ण पादमूलं न मुञ्चति ।
मुक्तसर्वपरिक्लेशः पान्थः स्वशरणं यथा ॥ ६ ॥
जो न सोडी क्षणासाठी श्रीकृष्णचरणांबुज ।
शुद्ध ज्याच्या मनीं भाव क्लेष ना घडतो तया ॥ ६ ॥

यथा - ज्याप्रमाणे - पान्थः - प्रवास करून परत घरी आलेला - स्वशरणं - आपल्या घराला - धौतात्मा - पवित्र अंतःकरणाचा - मुक्तसर्वपरिक्लेशः - ज्याचे सर्व क्लेश नष्ट झाले आहेत असा - पुरुषः - मनुष्य - कृष्णपादमूलं - श्रीकृष्णाच्या चरणकमलाला - न मुञ्चति - सोडीत नाही. ॥६॥
रागद्वेषादी क्लेशांपासून मुक्त होऊन ज्याचे हृदय शुद्ध होते, तो श्रीकृष्णांच्या चरणकमलांना एक क्षणभरही विसरत नाही. ज्याप्रमाणे प्रवासाचा शीण झालेला वाटसरू आपले घर सोडीत नाही. (६)


यदधातुमतो ब्रह्मन्देहारम्भोऽस्य धातुभिः ।
यदृच्छया हेतुना वा भवन्तो जानते यथा ॥ ७ ॥
भगवन् ! पंचभूतांचा संबंधी जीव ना कधी ।
तनू ही पंचभूतांची कैसी ते मर्म सांगणे ॥ ७ ॥

ब्रह्मन् - हे शुकाचार्या ! - अधातुमतः - पञ्चमहाभूतांशी संबंध नसणार्‍या - अस्य - ह्या जीवाचा - धातुभिः - महाभूतांच्या योगे - देहारंभः - शरीराची उत्पत्ति - यत् - हे जे विरुद्ध कार्य - यदृच्छया - सहजगत्या - वा - किंवा - हेतुना - कारणाने - भवन्तः - आपण - यथा - जसेच्या तसे - जानते - जाणत आहा. ॥७॥
भगवन, जीवाचा पंचमहाभूतांशी संबंध नसताना त्याचे शरीर पंचमहाभूतांपासूनच बनते. हे आपोआप होते की, अन्य काही कारणामुळे ? आपण या गोष्टीचे मर्म जाणत आहात. (७)


आसीद् यदुदरात्पद्मं लोकसंस्थानलक्षणम् ।
यावानयं वै पुरुष इयत्तावयवैः पृथक् ।
तावानसाविति प्रोक्तः संस्थावयववानिव ॥ ८ ॥
भगवत् नाभिपुष्यात उभे हे सर्व लोक की ।
मित इंद्रिय हा जीव तसा तो वर्णिला कसा ॥ ८ ॥

यदुदरात् - ज्याच्या उदरापासून - लोकसंस्थानलक्षणं - लोकव्यवस्था हेच ज्याचे लक्षण आहे असे - पद्मं - कमळ - आसीत् - उत्पन्न झाले - असौ - हा - इयत्तावयवैः - मर्यादित अवयवांनी - पृथक् - निरनिराळा आहे - अयं - हा - पुरुषः - पुरुष - यावान् - जितक्या परिमाणाचा - तावान् - तितक्याच परिमाणाचा - संस्थावयववान् इव - जगद्रचनेच्या अवयवांनी युक्त अशाप्रमाणे - वै - खरोखर - इति - असा - प्रोक्तः - शास्त्रांत सांगितला आहे. ॥८॥
आपण सांगितलेत की, भगवंतांच्या नाभीतून जे कमळ प्रगट झाले, त्यातून सृष्टीची रचना झाली. हा जीव आपल्या मर्यादित अवयवांनी जसा परिछिन्न आहे, तसेच आपण परमात्म्याचे सुद्धा मर्यादित अवयवांनी परिच्छिन्न असल्याप्रमाणे वर्णन केले, हे कसे ? (८)


अजः सृजति भूतानि भूतात्मा यदनुग्रहात् ।
ददृशे येन तद् रूपं नाभिपद्मसमुद्‍भवः ॥ ९ ॥
स चाऽपि यत्र पुरुषो विश्वस्थित्युद्‍भवाप्ययः ।
मुक्त्वाऽऽत्ममायां मायेशः शेते सर्वगुहाशयः ॥ १० ॥
सर्वभूतमयी ब्रह्मा कृपेने जग निर्मितो ।
जन्मता नाभि पुष्यात कृपेने जाणुही शके ॥ ९ ॥
उत्पत्तिस्थिती नी नाश मायेचा स्वामी तो कसा
त्यागुनी मोह हे सारे झोपतो कोणत्या रूपी ॥ १० ॥

नाभिपद्मसमुद्‌भवः - नाभिकमळापासून उत्पन्न झालेला - भूतात्मा - भूतांना उत्पन्न करणारा - अजः - ब्रह्मदेव - यदनुग्रहात् - ज्याच्या अनुग्रहाने - भूतानि - प्राण्यांना - सृजति - उत्पन्न करितो - येन - ज्यायोगे - तद्रूपं - त्याच्या स्वरूपाला - ददृशे - पाहता झाला - विश्वस्थित्युद्‌भवाप्ययः - जगाचे रक्षण, उत्पत्ति व नाश करणारा - च - आणि - सर्वगुहाशयः - सर्वांच्या हृदयात वास करणारा - मायेशः - प्रकृतीचा स्वामी - सः - तो - पुरुषः - परमेश्वर - अपि - सुद्धा - आत्ममायां - स्वतःच्या मायेला - मुक्त्वा - सोडून - यत्र - जेथे - शेते - शयन करितो. ॥९-१०॥
ज्यांच्या कृपेने सर्वभूतमय ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात, ज्यांच्या नाभिकमलापासून उत्पन्न होऊनही ज्यांच्या कृपेने ते त्यांच्या रूपाचे दर्शन करू शकले होते, ते भगवंत सृष्टीची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलयाला कारण आहेत. सर्वांतर्यामी आणि मायेचे स्वामी परमपुरुष परमात्मा आपल्या मायेचा त्याग करून कोठे व कोणत्या रूपात शयन करतात ? (९-१०)


पुरुषावयवैर्लोकाः सपालाः पूर्वकल्पिताः ।
लोकैरमुष्यावयवाः सपालैरिति शुश्रुम ॥ ११ ॥
विराटरूपे अंगाचे लोक नी लोकपाल ते ।
रचिले बोधिले आणि उलटे बोधिले पुन्हा ॥
कल्पना सगळी रूपे दोन्हीई घडते कसे ॥ ११ ॥

सपालाः - लोकपालांसह - लोकाः - लोक - पुरुषावयवैः - परमेश्वराच्या अवयवांनी - पूर्वकल्पिताः - पूर्वीच कल्पिले आहेत - अमुष्य - ह्याचे - अवयवाः - अवयव - सपालैः - लोकपालांसह अशा - लोकेः - लोकांनी - कल्पितः - कल्पिले आहेत. - इति - असे - शुश्रुम - आम्ही ऐकिले आहे. ॥११॥
पहिल्यांदा आपण सांगितले होते की, विराट पुरुषाच्या अंगांपासून लोक आणि लोकपालांची रचना झाली होती आणि नंतर हेही सांगितलेत की, लोक आणि लोकपालांच्या रूपात त्याच्या अंगांची कल्पना झाली. या दोन्ही गोष्टींचे तात्पर्य काय ? (११)


यावान् कल्पो विकल्पो वा यथा कालोऽनुमीयते ।
भूतभव्यभवच्छब्द आयुर्मानश्च यत् सतः ॥ १२ ॥
कल्पनी तो महाकल्प अनुमान कशापरी ।
स्थूलदेहाभिमानांची आयु बांधिलि कां असे ॥ १२ ॥

यावान् - जितक्या प्रमाणाचा - कल्पः - महाकल्प - वा अथवा - यथाकालः - जेवढया कालावधीचा - विकल्पः - दैनंदिन साधारण कल्प - च - आणि - भूतभव्यभवच्छब्दः - भूतकाळ, भविष्यकाळ व वर्तमानकाळ अशी शब्दयोजना - यत् - जसे - सतः - व्यक्तसृष्टीचे - आयुर्मानं - आयुष्यप्रमाण - अनुमीयते - ठरविले जाते. ॥१२॥
महाकल्प आणि त्याच्या अंतर्गत अवांतर कल्प किती आहेत ? भूत, भविष्य आणि वर्तमान कालाचे अनुमान कोणत्या प्रकारे केले जाते ? स्थूल देहाभिमानी जीवांचे आयुष्यसुद्धा ठरलेले आहे काय ? (१२)


कालस्यानुगतिर्या तु लक्ष्यतेऽण्वी बृहत्यपि ।
यावत्यः कर्मगतयो यादृशी द्विजसत्तम ॥ १३ ॥
यस्मिन् कर्मसमावायो यथा येनोपगृह्यते ।
गुणानां गुणिनाश्चैव परिणाममभीप्सताम् ॥ १४ ॥
भूपातालककुब्व्योम ग्रहनक्षत्रभूभृताम् ।
सरित्समुद्रद्वीपानां सम्भवश्चैतदोकसाम् ॥ १५ ॥
काळाची गती नी वर्ष जाणणे कोणत्या परी ।
कर्माने जीव जीवांची गति ती केवधी कशी ॥ १३ ॥
देवादियोनि या सर्व गुणांनी मिळती तदा ।
कोणते कारणे कर्म इच्छित योनि लाभण्या ॥ १४ ॥
दिशा आकाश पाताळ ग्रह तारे नि पृथ्वी त्या ।
नद्या समुद्र द्वीपात जीव ते ते जन्मती कसे ॥ १५ ॥

व्दिजसत्तम - हे ब्रह्मश्रेष्ठा - या - जी - तू - तर - कालस्य - कालाची - अनुगतिः - प्रवृत्ति - अण्वी - सूक्ष्म - वा - किंवा - बृहती - स्थूल - अपि - सुद्धा - लक्ष्यते - दिसते - कर्मगतयाः - कर्माच्या गती - यावत्यः - जितक्या प्रकारच्या - यादृशीः - जशा ते सांगा - चैव - तसेच आणखी - गुणानां - गुणांच्या - परिणामं - कार्यरूपी फळाला - अभीप्सताम् - इच्छिणार्‍या - गुणिनां - गुणवान जीवांमध्ये - यस्मिन् - जेथे - कर्मसमावायः - कर्माचा संग्रह - यथा - ज्याप्रमाणे - येन - ज्या रीतीने - उपगृह्यते - संग्रहित केला जातो. - भूपातालककुब्व्योमग्रहनक्षत्रभूभृतां - पृथ्वी, पाताळ, दिशा, आकाश, ग्रह, नक्षत्रे, पर्वत यांची - च - आणि - सरित्समुद्रव्दीपानां - नदया, समुद्र व व्दीपे यांची - एतदोकसां - या सर्व ठिकाणी राहणार्‍यांची - संभवः - उत्पत्ति ॥१३-१५॥
अहो ब्राह्मणश्रेष्ठ, कालाची सूक्ष्म गती, चुटकी इत्यादि, आणि स्थूलगती, वर्ष इत्यादि, कोणत्या प्रकारे जाणली जाते ? विविध कर्मांमुळे जीवांच्या किती आणि कशा गती होतात ? (१३)
देव, मनुष्य इत्यादि योनी, सत्त्व, रज, तम या तीन गुणांच्या कालस्वरूपच प्राप्त होतात. त्या इच्छिणार्‍या जीवांपैकी कोण-कोण, कोण-कोणत्या योनी प्राप्त करून घेण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कर्मे करतात ? (१४)
पृथ्वी, पाताळ, दिशा, आकाश, ग्रह, नक्षत्र, पर्वत, नदी समुद्र, द्वीप आणि त्यांत राहणार्‍या जीवांची उत्पत्ती कशी होते ? (१५)


प्रमाणमण्डकोशस्य बाह्याभ्यन्तरभेदतः ।
महतां चानुचरितं वर्णाश्रमविनिश्चयः ॥ १६ ॥
युगानि युगमानश्च धर्मो यश्च युगे युगे ।
अवतारानुचरितं यदाश्चर्यतमं हरेः ॥ १७ ॥
नृणां साधारणो धर्मः सविशेषश्च यादृशः ।
श्रेणीनां राजर्षीणाञ्च धर्मः कृच्छ्रेषु जीवताम् ॥ १८ ॥
ब्रह्मांड परिमाणाने आत बाहेर ते कसे ।
चरित्र थोर व्यक्तींची धर्म वर्णाश्रमोवदा ॥ १६ ॥
युगांचे भेद नी नीति तयांचे धर्म कोणते ।
भगवद् अवतारांच्या लीला आश्चर्य ही वदा ॥ १७ ॥
सामान्य नी विशेषत्वे मानवी धर्म कोणते ।
राजर्षि व्यवसायी नी विपत्ति धर्म कोणता ॥ १८ ॥

बाह्याभ्यन्तरभेदतः - बाहेरील व आतील अशा भेदांनी - अण्डकोशस्य - ब्रह्माण्डाच्या कोशाचा - प्रमाणं - विस्तार - च - आणि - महतां - पुरुषांचे - अनुचरितं - आचरण - वर्णाश्रमविनिश्चयः - वर्ण व आश्रम यांचा निश्चय - हरेः - परमेश्वराचे - यत् - जे - आश्चर्यतमं - फारच आश्चर्यकारक - अवतारानुचरितं - अवतारांतील चरित्र - च - आणि - युगानि - युगे - युगमानं - युगांचे प्रमाण - च - आणि - युगेयुगे - प्रत्येक युगातील - यः - जो - धर्मः - धर्म - नृणां - मनुष्यांचा - साधारणः - सर्वसामान्य - सविशेषः - विशिष्टगोष्टींसह - धर्मः - धर्म - यादृशः - जसा - च - आणि - श्रेणीनां - निरनिराळ्या उदयोगाने निर्वाह करणार्‍यांचा - च - आणि - राजर्षीणां - सच्छील राजांचा - कृच्छ्रेषु - संकटांमध्ये - जीवतां - उपजीविका करणार्‍यांचे - धर्माः - धर्म. ॥१६-१८॥
ब्रह्मांडाचे आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारची परिमाणे सांगा. त्याचबरोबर महापुरुषांची चरित्रे, वर्णाश्रमांचे भेद आणि त्यांच्या धर्मांचे निरूपण करा. (१६)
युगांचे भेद, त्यांची परिमाणे, त्यांचे वेगवेगळे धर्म, तसेच भगवंतांच्या विभिन्न अवतारांची परम आश्चर्यमय चरित्रेसुद्धा सांगा. (१७)
मनुष्यांचे साधारण आणि विशेष धर्म कोण-कोणते आहेत ? भिन्न भिन्न व्यवसाय करणार्‍या लोकांचे, राजर्षींचे आणि संकटात सापडलेल्या लोकांचेही धर्म सांगा. (१८)


तत्त्वानां परिसङ्ख्यानं लक्षणं हेतुलक्षणम् ।
पुरुषाराधनविधिः योगस्याध्यात्मिकस्य च ॥ १९ ॥
योगेश्वरैश्वर्यगतिः लिङ्गभङ्गस्तु योगिनाम् ।
वेदोपवेदधर्माणां इतिहासपुराणयोः ॥ २० ॥
सम्प्लवः सर्वभूतानां विक्रमः प्रतिसङ्क्रमः ।
इष्टापूर्तस्य काम्यानां त्रिवर्गस्य च यो विधिः ॥ २१ ॥
स्वरूप लक्षणा संख्या तत्वांच्या त्या वदा मज ।
पुरुषाराधना आणि आध्यात्म योग तो कसा ॥ १९ ॥
योगेश्वरास ऐश्वर्य गति ती कोणती मिळे ।
टाकिती शरिरा कैसे वेदांचे सार कोणते ॥ २० ॥
उत्पत्ति सर्व प्राण्यांची स्थिती लय कसा असे ।
विहिरी खोदणे कैशा काम्य कर्म नि यज्ञ त्या ॥
धर्मार्थकाम यांचा ही साधवा विधि तो कसा ॥ २१ ॥

तत्त्वानां - महत्तत्त्वादि तत्त्वांचे - परिसंख्यानं - मोजमाप - लक्षणं - त्यांचे लक्षण - हेतुलक्षणम् - उत्पत्तीच्या हेतूंची लक्षणे - पुरुषाराधनविधिः - परमेश्वराच्या उपासनेचा शास्त्राने सांगितलेला मार्ग - च - आणि - योगस्य - योगाचा प्रकार - आध्यात्मिकस्य - आत्मविषयक ज्ञानमार्गाचा विधी - योगेश्वरैश्वर्यगतिः - श्रेष्ठ श्रेष्ठ योग्यांची ईश्वरविषयक गति - योगिनां - योग्यांच्या - लिङगभङगः - लिङगदेहाचा नाश - तु - आणखीही - वेदोपवेदधर्माणां - वेद, उपवेद व धर्म ह्यांचे स्वरूप b>इतिहसापुराणयोः - इतिहास व पुराण यांचे स्वरूप - सर्वभूतानां - सर्व प्राण्यांची - संप्लवः - उत्पत्ति - विक्रमः - उत्कर्ष, स्थिती - च - आणि - प्रतिसंक्रमः - नाश - इष्टापूर्तस्य - अग्निहोत्रादि आणि धर्मशाळा स्थापनादि धर्मकृत्यांचा - काम्यानां - सकाम कर्मांचा - त्रिवर्गस्य - धर्म, अर्थ व काम ह्या तीन पुरुषार्थांचा - यः - जो - विधिः - विधी ॥१९-२१॥
तत्त्वांची संख्या किती आहे ? त्यांचे स्वरूप आणि लक्षण कोणते ? भगवम्तांची आराधना आणि अध्यात्मयोगाचा विधी कोणता आहे ? (१९)
योगेश्वरांना कोण-कोणते ऐश्वर्य प्राप्त होते आणि अंति त्यांना कोणती गति मिळते ? योग्यांचे लिंगशरीर कोणत्या प्रकारे भंग होते ? वेद, उपवेद, धर्मशास्त्र, इतिहास आणि पुराणांचे स्वरूप आणि तात्पर्य काय आहे ? (२०)
सर्व प्राण्यांची उत्पत्ती, स्थिति आणि प्रलय कसा होतो ? तळी, विहिती खोदणे इत्यादि स्मार्त, यज्ञ यागादि वैदिक तसेच काम्य कर्मांचा आणि धर्म, अर्थ, काम यांच्या साधनांचा विधी काय आहे ? (२१)


यश्चानुशायिनां सर्गः पाषण्डस्य च सम्भवः ।
आत्मनो बन्धमोक्षौ च व्यवस्थानं स्वरूपतः ॥ २२ ॥
यथात्मतन्त्रो भगवान् विक्रीडत्यात्ममायया ।
विसृज्य वा यथा मायां उदास्ते साक्षिवद्विभुः ॥ २३ ॥
प्रलयी लीन जे जीव पुढती जन्मती कसे ।
पाखंडी निघती कैसे आत्म्याचे बंध मोक्ष ते ॥ २२ ॥
मुक्त तो भगवान् नित्य मायेने क्रीडितो कसा ।
त्रयस्थापरि तो कैसा त्यागितो सर्व ते पुन्हा ॥ २३ ॥

च - आणि - यः - जी - अनुशायिनां - मागून लीन होणार्‍या प्राण्यांची - सर्गः - उत्पत्ति - च - आणि - पाखण्डस्य - नास्तिकांची - सम्भवः - उत्पत्ति - आत्मनः - आत्म्याचा - बन्धमोक्षौ - बंध व मोक्ष - च - आणि - स्वरूपतः - आत्मरूपाने - व्यवस्थानं - राहणे - विभुः - सर्वव्यापी - आत्मतंत्रः - स्वतंत्र - भगवान् - परमेश्वर - आत्ममायया - स्वतःच्या मायेच्या योगाने - यथा - जसा - विक्रीडति - खेळतो - वा - किंवा - मायां - मायेला - विसृज्य - सोडून देऊन - साक्षिवत् - तटस्थ या नात्याने - यथा जसा - उदास्ते - उदासीनपणाने राहतो. ॥२२-२३॥
प्रलयाच्या वेळी प्रकृतीत लीन झालेल्या जीवांची उत्पत्ती कशी होते ? पाखंडांची उत्पत्ती कशी होते ? आत्म्याच्या बंध - मोक्षाचे स्वरूप काय आहे ? आणि तो आपल्या स्वरूपात कोणत्या प्रकारे स्थिर होतो ? (२२)
भगवंत परम स्वतंत्र आहेत. ते आपल्या मायेने कोणत्या प्रकारे क्रीडा करतात आणि तिला सोडून साक्षीभावाने उदासीन कसे राहतात ? (२३)


सर्वमेतच्च भगवन् पृच्छतो मेऽनुपूर्वशः ।
तत्त्वतोऽर्हस्युदाहर्तुं प्रपन्नाय महामुने ॥ २४ ॥
अत्र प्रमाणं हि भवान् परमेष्ठी यथात्मभूः ।
अपरे चानुतिष्ठन्ति पूर्वेषां पूर्वजैः कृतम् ॥ २५ ॥
तुम्हा मी पुसतो ब्रह्मन् ! शरणागत मी तुम्हा ।
क्रमाने सांगणे तत्व कृपया हे महामुने ॥ २४ ॥
विषयी याचिया आहा ब्रह्म्याच्या सम तो तुम्ही ।
पूर्वपरंपरेनेच दजे लोक अनुष्ठिती ॥ २५ ॥

भगवन् - सर्वगुणसंपन्न - महामुने - हे महर्षे - प्रपन्नाय - शरण आलेल्या - पृच्छ्ते - प्रश्न करणार्‍या - मे - मला - अनुपूर्वशः - अनुक्रमाने - तत्त्वतः - यथार्थ रीतीने - सर्वं - संपूर्ण - एतत् - हे - च - आणखीही - उदाहर्तुं - सांगण्यास - अर्हसि - योग्य आहेस. - हि - कारण - यथा - जसा - आत्मभूः - स्वयंभू - परमेष्ठी - ब्रह्मदेव - अत्र - ह्या विषयांत - भवान् - आपण - प्रमाणं - प्रमाणरूप आहां - च - आणि - इह - येथे - परे - इतर लोक - पूर्वेषां - वाडवडिलांच्या - पूर्वजैः - वाडवडिलांनी - कृतं - केलेले - अनुतिष्ठन्ति - आचरण करितात. ॥२४-२५॥
भगवन, मी हे सर्व आपल्याला विचारीत आहे. मी आपल्याला शरण आलो आहे. मनामुने, आपण कृपा करून क्रमशः या प्रश्नांचे तात्त्विक निरूपण करावे. (२४)
या विषयात आपण स्वयंभू ब्रह्मदेवाच्या समान परम प्रमाणभूत आहात. दुसरे लोक पूर्वपरंपरेने ऐकली-सांगितलेलीच माहिती सांगतात. (२५)


न मेऽसवः परायन्ति ब्रह्मन् अनशनादमी ।
पिबतोऽच्युतपीयूषं अन्यत्र कुपिताद् द्विजात् ॥ २६ ॥
माझ्या भूक तहानेची चिंता ती नकरा तुम्ही ।
शापीत प्राण हे माझे मुक्त ना अन्य साधने ॥
कथामृत तुम्ही देता प्राशितो भक्तिनेच् मी ॥ २६ ॥

ब्रह्मन् - हे शुकाचार्या - अच्युतपीयूषं - भगवत्कथामृताला - पिबतः - पिणार्‍या - मे - माझे - अमी - हे - असवः - प्राण - अनशनात् - उपवासामुळे - कुपितात् - रागावलेल्या - व्दिजात् - ब्राह्मणाहून - अन्यत्र - दुसर्‍या ठिकाणी - न परायन्ति - पीडित होत नाहीत. ॥२६॥
ब्रह्मन, रागावलेल्या ब्रह्मणाच्या शापाव्यतिरिक्त उपोषणाने माझा प्राण जाऊ शकणार नाही. कारण मी आपल्य मुखकमलातून निघणार्‍या भगवंतांच्या अमृतमय लीलाकथांचे श्रवण करीत आहे. (२६)


श्रीसूत उवाच -
स उपामन्त्रितो राज्ञा कथायामिति सत्पतेः ।
ब्रह्मरातो भृशं प्रीतो विष्णुरातेन संसदि ॥ २७ ॥
प्राह भागवतं नाम पुराणं ब्रह्मसम्मितम् ।
ब्रह्मणे भगवत्प्रोक्तं ब्रह्मकल्प उपागते ॥ २८ ॥
सूतजी सांगतात-
संताच्या त्या सभे मध्ये कथेची प्रार्थना अशी ।
राजा तो करितो तेंव्हा शुकां आनंद जाहला ॥ २७ ॥
श्रीमद्‌भागवतो ऐसे पुराण महानीय हे ।
ब्रह्मकल्पा मधे देवे ब्रह्म्याला बोधिले जसे ॥ २८ ॥

विष्णुरातेन राज्ञा - परीक्षित राजाने - संसदि - सभेत - इति - याप्रमाणे - सत्पतेः - साधूंचा कैवारी जो परमेश्वर त्याच्या - कथायां - चरित्र सांगण्यासाठी - उपामन्त्रितः - आमंत्रण दिलेला - सः - तो - ब्रह्मरातः - शुकाचार्य - भृशं - फारच - प्रीतः - आनंदित झाला. - ब्रह्मकल्पे उपागते - ब्रह्म नावाचा कल्प प्राप्त झाला असता - ब्रह्मणे - ब्रह्मदेवाला - भगवत्प्रोक्तं - भगवंताने सांगितलेले - ब्रह्मसंमितं - वेदतुल्य - भागवतं नाम - भागवत नावाचे - पुराणं - पुराण b>प्राह - सांगता झाला. ॥२७-२८॥
सूत म्हणाले - जेव्हा राजा परीक्षिताने संतांच्या सभेमध्ये भगवंतांच्या लीलाकथा ऐकण्यासाठी अशा प्रकारे प्रार्थना केली, तेव्हा शुकदेव अतिशय प्रसन्न झाले. (२७)
त्यांनी त्याला तेच वेदतुल्य श्रीमद् भागवतमहापुराण सांगितले, जे ब्राह्म कल्पाच्या सुरुवातीला स्वतः भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते. (२८)


यद्यत् परीक्षिदृषभः पाण्डूनामनुपृच्छति ।
आनुपूर्व्येण तत्सर्वं आख्यातुमुपचक्रमे ॥ २९ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यं
संहितायां द्वितीयस्कन्धे अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥
परीक्षित् पांडुवंशाचा श्रेष्ठ तो प्रश्न जे करी ।
क्रमाने उत्तरे त्यांची श्री शुके बोधिली पुन्हा ॥ २९ ॥
॥ इति श्रीमद्‌भगवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥
॥ आठवा अध्याय हा ॥ २ ॥ ८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

पाण्डूनां - पाण्डूंमध्ये - ऋषभः - श्रेष्ठ अशा - परीक्षित् - परीक्षित राजाने - यत् यत् - जे जे - अनुपृच्छति - अनुक्रमाने विचारिले - तत् - ते - सर्वं - सगळे - आनुपूर्व्येण - क्रमाक्रमाने - आख्यातुं - सांगण्यास - उपचक्रमे - प्रारंभ करिता झाला. ॥२९॥
पांडुवंशशिरोमणी परीक्षिताने त्यांना जे जे प्रश्न विचारले होते, ते त्या सर्वांचे क्रमशः उत्तर देऊ लागले. (२९)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां द्वितीयः स्कन्धे अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥
स्कंध दुसरा - अध्याय आठवा समाप्त

GO TOP