श्रीमद् भागवत पुराण
द्वितीयः स्कन्धः
पञ्चमोऽध्यायः

ब्रह्माणं प्रति नारदप्रश्नः, ब्रह्मोक्तिः,
तत्त्वानां उत्पत्तिः, ब्रह्माण्डनिर्माणवर्णनं च -

सृष्टिवर्णन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


नारद उवाच -
देवदेव नमस्तेऽस्तु भूतभावन पूर्वज ।
तद्विजानीहि यद् ज्ञानं आत्मतत्त्वनिदर्शनम् ॥ १ ॥
नारदांनी विचारिले -
( अनुष्टुप् )
सर्वांचे जनिते तुम्ही नमस्कार तुम्हा प्रभो ।
द्यावे ते मजला ज्ञान आत्मतत्त्वचि जे असे ॥ १ ॥

देवदेव - हे देवांच्या देवा - भूतभावना - हे सृष्टि उत्पन्न करणार्‍या - पूर्वज - हे पूर्वोत्पन्न ब्रह्मदेवा - ते - तुला - नमः - नमस्कार - अस्तु - असो - यत् - जे - आत्मतत्त्वनिदर्शनम् - आत्मज्ञानाचा बोध करून देणारे - ज्ञानं - ज्ञान - तत् - ते - विजानीहि - सांगा. ॥१॥
नारदांनी विचारले - तात आपण अनादी, देवाधिदेव आणि सृष्टिकर्ते आहात. आपणास माझा नमस्कार असो. ज्याच्यामुळे आत्मतत्त्वाचा साक्षात्कार होतो, ते ज्ञान आपण मला सांगावे. (१)


यद् रूपं यद् अधिष्ठानं यतः सृष्टमिदं प्रभो ।
यत्संस्थं यत्परं यच्च तत् तत्त्वं वद तत्त्वतः ॥ २ ॥
सृष्टिचे गुण ते काय कोणी ही निर्मिली असे ।
नेमकी काय ती आहे सांगा कोणा अधीन ती ॥ २ ॥

प्रभो - हे समर्थ ब्रह्मदेवा ! - इदं - हे विश्व b>यतः - ज्यापासून - सृष्टं - उत्पन्न झाले - यद्रूपं - जशा स्वरूपाने प्रकाशित झाले - यदधिष्ठानं - ज्याच्या आश्रयाने राहते - यत्संस्थं - ज्यांत लीन होते - यत्परं - ज्याच्या सत्तेने चालणारे - च - आणि - यत् - जशा तर्‍हेचे आहे - तत् - ते - तत्त्वं - तात्त्विक ज्ञान - तत्त्वतः - यथार्थ रीतीने - वद - सांगा. ॥२॥
प्रभो, या संसाराचे लक्षण काय आहे ? याचा आधार काय ? याची निर्मिती कोणापासून झाली ? याचा प्रलय कशामध्ये होतो ? हा कोणाच्या आधीन आहे ? आणि वास्तविक ही कोणती वस्तू आहे ? आपण याचे सत्य स्वरूप मला सांगावे. (२)


सर्वं ह्येतद् भवान् वेद भूतभव्यभवत्प्रभुः ।
करामलकवद् विश्वं विज्ञानावसितं तव ॥ ३ ॥
घडले घडते तैसे भविष्यस्वामि ही तुम्ही ।
जाणता ज्ञानदृष्टीने आवळ्यापरि स्पष्ट ते ॥ ३ ॥

भूतभव्यभवत्प्रभुः - भूत, भविष्य व वर्तमान ह्या तीनही काळांवर सत्ता गाजविणारे - भवान् - आपण - हि - खरोखर - एतत् - हे - सर्वं - सगळे - वेद - जाणत आहा - विश्वं - जग - तव - तुझ्या - विज्ञानावसितं - विशिष्ट ज्ञानाने जाणले गेलेले आहे. ॥३॥
जे काही झाले, होत आहे आणि होणार आहे, याचे स्वामी आपणच असल्याने हे सर्व आपण जाणताच. हा सगळा संसार तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे आपल्या ज्ञान दृष्टिपथातच आहे. (३)


यद् विज्ञानो यद् आधारो यत् परस्त्वं यदात्मकः ।
एकः सृजसि भूतानि भूतैरेवात्ममायया ॥ ४ ॥
पिताजी ! मिळले कोणा पासुनी ज्ञान हे तुम्हा ।
आधार स्वामी तो कोण एकले जग निर्मिता ॥ ४ ॥

त्वं - तू - एकः एव - एकटाच - यव्दिज्ञानः - ज्यापासून विशिष्ट ज्ञान मिळविलेला - यदाधारः - ज्याच्या आश्रयांवर अवलंबून राहिलेला - यत्परः - ज्याच्या सत्तेच्या बळावर काम करणारा - यदात्मकः - ज्याच्या आत्मस्वरूपाने युक्त होत्साता - आत्ममायया - प्रकृतीच्या साहाय्याने - भूतैः - महाभूतांकडून - भूतानि - स्थावर-जंगम सृष्टीला - सृजसि - उत्पन्न करतोस. ॥४॥
आपल्याला हे ज्ञान कोठून मिळाले ? आपण कोणाच्या आधारावर उभे आहात ? आपले स्वामी कोण आहेत ? आपले स्वरूप काय आहे ? आपण एकटेच तर आपल्या मायेने पंचमहाभूतांच्या द्वारा प्राण्यांची उत्पत्ती करता. (४)


आत्मन् भावयसे तानि न पराभावयन् स्वयम् ।
आत्मशक्तिमवष्टभ्य ऊर्णनाभिरिवाक्लमः ॥ ५ ॥
जसे जाळे करी कीट त्यापरी सृष्टी निर्मिता ।
स्वतेजे निर्मिता सारे विकारहीन राहुनी ॥ ५ ॥

ऊर्णनाभिः - ज्याच्या बेंबीतून सुतासारखे धागे निघतात असा कोळी नावाचा किडा - इव - त्याप्रमाणे - आत्मशक्तिं - स्वसामर्थ्याला - अवष्टभ्य - आवरून धरून - स्वयं - स्वतः - अक्लमः - श्रमरहित - न पराभावयन् - कोणाकडूनही जिंकिला न जाणारा - तानि - त्या प्राणिमात्रांस - आत्मन् भावयसे - आत्मस्वरूपानेच रक्षितोस. ॥५॥
कोळी सहजतया जसा आपल्या तोंडातून धागा काढून त्याच्याशीच खेळतो, तसेच आपणही आपल्या शक्तीच्या आधाराने जीवांना आपल्यातच उत्पन्न करता आणि असे असूनही आपल्याला कोणतेही श्रम पडत नाहीत. (५)


नाहं वेद परं ह्यस्मिन् नापरं न समं विभो ।
नामरूपगुणैर्भाव्यं सदसत् किञ्चिदन्यतः ॥ ६ ॥
जागात नामरूपाला गुणांना पाहिले तरी ।
सत्यासत्य उच्चवीच र्नाही ते निर्मिले कुणी ॥ ६ ॥

विभो - हे सर्वव्यापक ब्रह्मदेवा ! - अहं हि - मी तरी - अस्मिन् - ह्या जगात - किञ्चित् - काही देखील - अन्यतः - तुझ्या स्वरूपाहून भिन्न असे - परं - श्रेष्ठ असे - न वेद - जाणत नाही - अपरं - कनिष्ठ असेहि - न - नाही - समं - समान योग्यतेचेहि - न - नाही - नामरूपगुणैः - नावांनी, रूपांनी व गुणांनी - भाव्यं - ओळखिले जाणारे - सत् - चांगले - असत् - वाईट. ॥६॥
जगामध्ये नाम, रूप आणि गुणांवरून जे काही जाणले जाते, त्यांपैकी कोणतीही वस्तू, ती सत्-असत्, उत्तम, मध्यम किंवा अधम कशीही असो, आपल्या शिवाय अन्य कोणापासूनही उत्पन्न झालेली नाही. (६)


स भवानचरद् घोरं यत्तपः सुसमाहितः ।
तेन खेदयसे नस्त्वं पराशङ्कां च यच्छसि ॥ ७ ॥
तुम्ही तो थोर देवात चित्ताने घोर ते तप ।
केले जे कवणाचे ते थोर कोण तुम्हाहुनी ॥ ७ ॥

सः - ते - भवान् - आपण - सुसमाहितः - एकाग्र अंतःकरणाने - यत् - ज्या - घोरं - भयंकर - तपः - तपश्चर्येला - अचरत् - आचरिले - तेन् - त्यामुळे - त्वं - तू - नः - आम्हाला - खेदयसे - मोहवितोस - परां शङ्कां - तुझ्याहून श्रेष्ठ दुसरा कोणी तरी श्रेष्ठ आहे अशा शंकेला - प्रयच्छसि - उत्पन्न करितोस. ॥७॥
अशा प्रकारे सर्वांचे ईश्वर असूनही आपण एकाग्र चित्ताने घोर तपश्चर्या केली, यावरून मला अशी शंका येते की, आपल्यापेक्षा उच्चकोटीचा कोणी आहे काय ? (७)


एतन्मे पृच्छतः सर्वं सर्वज्ञ सकलेश्वर ।
विजानीहि यथैवेदं अहं बुध्येऽनुशासितः ॥ ८ ॥
पुसतो तुम्हि तो आहा सर्वज्ञ सकलेश्वर ।
कृपया सांगणे सोपे जो बोध मजला कळे ॥ ८ ॥

सर्वज्ञ - हे सर्व काही जाणणार्‍या - सकलेश्वर - सर्वाधिपते ब्रह्मदेवा - एतत् - हे - पृच्छतः - विचारणार्‍या - मे - मला - तथा एव - तशा तर्‍हेनेच - विजानीहि - सांगा - अनुशासितः - जसे सांगितले असता - अहं - मी - इदं - हे - सर्वं - सगळे - बुध्ये - जाणीन. ॥८॥
आपण सर्वज्ञ आणि सर्वांचे ईश्वर आहात. मी जे काही विचारीत आहे, ते सर्व आपण मला अशा रीतीने समजावून सांगा की, जेणे करून मी सर्व काही चांगल्या प्रकारे समजू शकेन. (८)


ब्रह्मोवाच -
सम्यक् कारुणिकस्येदं वत्स ते विचिकित्सितम् ।
यदहं चोदितः सौम्य भगवद्वीर्यदर्शने ॥ ९ ॥
ब्रह्मदेव म्हणाले-
करुणामय हा पुत्रा प्रश्न तू पुसला असे ।
भगवत् गुण गाण्याला जेणे प्रेरीत जाहलो ॥ ९ ॥

वत्स - हे बाळा नारदा ! - कारुणिकस्य - दयाळू अशा - ते - तुझ्या - इदं - हा - विचिकित्सितं - संशय - सम्यक् - चांगला आहे - सौ‌म्य - हे शांतमूर्ते नारदा ! - यत् - कारण - अहं - मी - परधर्मप्रदर्शने - परमेश्वराचे गुण दाखविण्याच्या कार्याला - चोदितः - प्रवृत्त केलेला आहे. ॥९॥
ब्रह्मदेव म्हणाले - पुत्रा नारदा, सर्व जीवांबद्दल वाटणार्‍या करुणतेपोटी तू मला हा सुंदर प्रश्न विचारला आहेस. कारण यामुळे भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे. (९)


नानृतं तव तच्चापि यथा मां प्रब्रवीषि भोः ।
अविज्ञाय परं मत्त एतावत्त्वं यतो हि मे ॥ १० ॥
माझिया विषयी तू जे बोलला सत्य ते असे ।
परेचे तत्व जे रूप त्या विना हेच भासते ॥ १० ॥

भो - हे नारदा ! - यथा - ज्याप्रमाणे - मां - मला - प्रब्रवीषि - म्हणतोस - तव - तुझे - तत् च अपि - ते सुद्धा भाषण - अनृतं - खोटे - न - नाही - हि यतः - कारण - मे - माझे - एतावत्त्वं - एवढे सामर्थ्य - मत्तः - माझ्याहून - परं - श्रेष्ठ अशा परमेश्वराला - अविज्ञाय - न जाणल्यामुळे तुला वाटत आहे. ॥१०॥
तू माझ्याविषयी जे काही सांगितलेस ते खरेच आहे. कारण जोपर्यंत माझ्याही पलीकडील असे भगवत्तत्त्व जाणले जात नाही, तोपर्यंत हा माझाच प्रभाव वाटत राहील. (१०)


येन स्वरोचिषा विश्वं रोचितं रोचयाम्यहम् ।
यथार्कोऽग्निः यथा सोमो यथा ऋक्षग्रहतारकाः ॥ ११ ॥
जसे नक्षत्र सूर्यादी ग्रह चंद्र प्रकाशती ।
चिन्मयी त्याच तेजाने तेज मी दे तसे जगा ॥ ११ ॥

येन - ज्याने - स्वरोचिषा - स्वतःच्या प्रकाशाने - रोचितं - प्रकाशित केलेल्या - विश्वं - जगाला - यथा - जसा - अर्कः - सूर्य - अग्निः - अग्नि - यथा - जसा - सोमः - चंद्र - यथा - जशी - ऋक्षग्रहतारकाः - नक्षत्रे, ग्रह व चांदण्या - अहं - मी - रोचयामि - प्रकाशित करतो. ॥११॥
जसे सूर्य, अग्नी, चंद्र, ग्रह, नक्षत्रे आणि तारे ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेल्या जगाला प्रकाशित करतात, तसाच मीसुद्धा भगवंतांच्या चिन्मय प्रकाशाने प्रकाशित झालेल्या जगाला प्रकाशित करतो. (११)


तस्मै नमो भगवते वासुदेवाय धीमहि ।
यन्मायया दुर्जयया मां वदन्ति जगद्‍गुरुम् ॥ १२ ॥
भगवान् वासुदेवा त्या ध्यातो मी वंदितो सदा ।
मायेने दुर्जयी ज्याच्या सद्गुरु जगतास मी ॥ १२ ॥

दुर्जयया - जिंकण्यासाठी कठीण अशा - यन्मायया - ज्याच्या मायेने - मां - मला - जगद्‌गुरुं - जगाचा पिता म्हणजे सृष्टिकर्ता असे - ब्रुवन्ति - म्हणतात - तस्मै - त्या - भगवते - षड्‌गुणैश्वर्य संपन्न अशा - वासुदेवाय - परमेश्वराला - नमः - नमस्कार असो - धीमही - आम्ही त्याचे ध्यान करतो. ॥१२॥
ज्यांच्या अगम्य मायेने मोहित होऊन लोक मला जगद्‌गुरू म्हणतात, त्या भगवान वासुदेवांना मी वंदन करतो आणि त्यांचे ध्यान करतो. (१२)


विलज्जमानया यस्य स्थातुमीक्षापथेऽमुया ।
विमोहिता विकत्थन्ते ममाहमिति दुर्धियः ॥ १३ ॥
ती मायाही तया नेत्रे नदिसे दूर जातसे ।
अज्ञानी मोहुनी जाती मी-माझे बोलती सदा ॥ १३ ॥

यस्य - ज्याच्या - ईक्षापथे - दृष्टीसमोर - स्थातुं - उभे राहण्यास - विलज्जमानया - फारच लाजणार्‍या - अमुया - ह्या मायेने - विमोहिताः - अत्यंत मोहून गेलेले - दुर्धियः - आमच्यासारखे दुर्बुद्धि - मम अहं - माझे, मी - इति - याप्रमाणे - विकत्थन्ते - बडबडतात. ॥१३॥
ही माया तर लाजून त्यांच्यासमोर उभीसुद्धा राहात नाही. परंतु संसारातील अज्ञानी लोक तिने मोहित होऊन "हा मी, हे माझे" अशा प्रकारे बडबड करतात. (१३)


द्रव्यं कर्म च कालश्च स्वभावो जीव एव च ।
वासुदेवात्परो ब्रह्मन् न चान्योऽर्थोऽस्ति तत्त्वतः ॥ १४ ॥
द्रव्य कर्म नी काळ स्वभाव आणि जीव तो ।
वास्तवी भगवंताच्या भिन्न ना एकवस्तुची ॥ १४ ॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मज्ञ नारदा ! - द्रव्यं - महाभूते - च - आणि - कर्म - कर्म - च - आणि - कालः - काळ - च - आणि - जीवः - जीव - एव - सुद्धा - वासुदेवात् - परमेश्वराहून - परः - श्रेष्ठ - अन्यः - दुसरा - अर्थः - पदार्थ - तत्त्वतः - तात्त्विक दृष्टी पाहता - न अस्ति - नाही. ॥१४॥
हे नारदा द्रव्य, कर्म, काल, स्वभाव आणि जीव यांपैकी वास्तविक भगवंतांखेरीज अशी कोणतीच वस्तू नाही. (१४)


नारायणपरा वेदा देवा नारायणाङ्गजाः ।
नारायणपरा लोका नारायणपरा मखाः ॥ १५ ॥
हरि परायणो वेद देवता हरि अंगची ।
यज्ञ त्यांच्याची साठी ते लोकफल हरीच की ॥ १५ ॥

वेदा - वेद - नारायणपराः - परमेश्वरविषयकच आहेत - देवाः - देव - नारायणाङ्गजाः - परमेश्वराच्या अवयवापासून झालेले आहेत - लोकाः - त्रैलोक्य किंवा सर्व प्राणिमात्र - नारायणपराः - परमेश्वरालाच श्रेष्ठ मानणारे आहेत - मखाः - यज्ञ - नारायणपराः - परमेश्वरालाच उद्देशून चालू असतात. ॥१५॥
वेद नारायणांचेच वर्णन करणारे आहेत. देवता नारायणांशीच एकरूप आहेत आणि सर्व यज्ञसुद्धा नारायणांच्या प्रसन्नतेसाठीच आहेत. यज्ञापासून ज्या लोकांची प्राप्ती होते तेही नारायणांमध्येच कल्पिलेले आहेत. (१५)


नारायणपरो योगो नारायणपरं तपः ।
नारायणपरं ज्ञानं नारायणपरा गतिः ॥ १६ ॥
योग नारायणासाठी तप त्यांच्याची साठि ते ।
ज्ञान नारयणासाठी साध्य साधन तोचि की ॥ १६ ॥

योगः - योग - नारायणपरः - परमेश्वरप्राप्तीकरिताच केला जातो - तपः - तपश्चर्या - नारायणपरं - परमेश्वराविषयी तत्परतेने ध्यान करूनच करावयाची असते - ज्ञानं - ज्ञान - नारायणपरं - परमेश्वरासंबंधीचेच असते - गतिः - मुक्ति - नारायणपरा - परमेश्वराशी एक होऊन जाण्यासंबंधाचीच असते. ॥१६॥
सर्व योगसाधना नारायणांच्या प्राप्तीसाठीच केल्या जातात. सर्व प्रकारचे तप नारायणांकडेच घेऊन जाते, ज्ञानानेही नारायणांनाच जाणले जाते. सर्वांचे फलही भगवान नारायणच होत. (१६)


तस्यापि द्रष्टुः ईशस्य कूटस्थस्याखिलात्मनः ।
सृज्यं सृजामि सृष्टोऽहं ईक्षयैवाभिचोदितः ॥ १७ ॥
द्रष्टा असोनिया ईश कोडे की अखिलात्म तो ।
मला ही निर्मिले त्याने त्यां इच्छेसृष्टि निर्मि मी ॥ १७ ॥

सृष्टः - उत्पन्न केलेला - अहं - मी - अपि - सुद्धा - तस्य - त्या - द्रष्टुः - साक्षीरूपाने राहणार्‍या - कूटस्थस्य - शरीरांत अविकृत आत्मरूपानेच राहणार्‍या - अखिलात्मनः - सर्वांचा आत्मा अशा - ईशस्य - परमेश्वराच्या - ईक्षया एव - नेत्रकटाक्षानेच - अभिचोदितः - आज्ञा दिलेला होत्साता - सृज्यं - उत्पन्न करण्यास योग्य अशा सृष्टीला - सृजामि - उत्पन्न करितो. ॥१७॥
ते द्रष्टा असूनही ईश्वर आहेत. निर्विकार असूनही सर्वांचे स्वरूप तेच आहेत. त्यांनीच मला निर्माण केले आहे. आणि त्यांच्या दृष्टिनेच प्रेरित झालेला मी सृष्टि रचना करतो. (१७)


सत्त्वं रजस्तम इति निर्गुणस्य गुणास्त्रयः ।
स्थितिसर्गनिरोधेषु गृहीता मायया विभोः ॥ १८ ॥
गुण माया नसे त्याला मायेच्या तिन्हि त्या स्थिती ।
रज सत्य तमो तिन्ही मायेने निर्मिले तये ॥ १८ ॥

निर्गुणस्य - त्रिगुणांहून निराळ्या स्थितीत राहणार्‍या - विभोः - सर्वव्यापी परमेश्वराच्या - मायया - प्रकृतीच्या योगे - स्थितिसर्गनिरोधेषु - रक्षण, उत्पादन व संहरण ह्या तीन कार्यानिमित्त - सत्त्वं - सत्त्व - रजः - रज - तमः - तम - इति - असे - त्रयः - तीन - गुणाः - गुण - गृहीताः - स्वीकारले. ॥१८॥
मायेच्या गुणांनी रहित अशा भगवंतांनी उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यासाठी रज, तम आणि सत्त्व हे गुण मायेच्या द्वारे स्वीकारलेले आहेत. (१८)


कार्यकारणकर्तृत्वे द्रव्यज्ञानक्रियाश्रयाः ।
बध्नन्ति नित्यदा मुक्तं मायिनं पुरुषं गुणाः ॥ १९ ॥
द्रव्य ज्ञान क्रिया मार्गे घुसती तिन्हि हे गुण ।
कार्य कारण कर्ता मी येणेचि बांधिल जन ॥ १९ ॥

द्रव्यज्ञानक्रियाश्रयाः - महाभूते, देवता व इंद्रिये ह्यांच्या उत्पत्तीला कारणीभूत - गुणाः - तीन गुण - नित्यदा - नेहमी - मुक्तं - कशांतही न गुरफटल्या जाणार्‍या - मायिनं - परंतु मायोपाधीने युक्त अशा - पुरुषं - जीवात्म्याला - कार्यकारणकर्तृत्वे - कार्य, कारण व कर्ता या तीनही बाबतीत - बन्धन्ति - बांधून टाकतात. ॥१९॥
हे तीन गुण द्रव्य, ज्ञान आणि क्रिया यांचा आश्रय घेऊन मायातीत अशा नित्यमुक्त पुरुषाला त्याने मायेचा आश्रय केल्यानंतर कार्य, कारण आणि कर्तेपणा यांच्या अभिमानाने बद्ध करतात. (१९)


स एष भगवान् लिङ्गैः त्रिभिरेतैरधोक्षजः ।
स्वलक्षितगतिर्ब्रह्मन् सर्वेषां मम चेश्वरः ॥ २० ॥
भगवान् इंद्रियातीत घेतो पांघुरणे तिन्ही ।
गुणांची त्याचि योगाने नळखी कोणिही तया ।
जगाचा आणि माझाही स्वामी तो एकमात्रची ॥ २० ॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मज्ञ नारदा ! - सः - तो - एषः - हा - एभिः - ह्या - त्रिभिः - तीन - लिङ्गैः - चिन्हानी - स्वलक्षितगतिः - भक्तांनी जाणिली आहे गति ज्याची असा - भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न - अधोक्षजः - इंद्रियांना अगोचर असा परमेश्वर - सर्वेषां - सर्वांचा - च - आणि - मम - माझा - ईश्वरः - सत्तारूपाने चालक आहे. ॥२०॥
नारदा, इंद्रियातीत असणारे भगवान गुणांच्या या तीन आवरणांनी स्वतःला चांगल्या रीतीने लपेटून घेतात, म्हणून लोक त्यांना ओळखत नाहीत. माझे आणि सर्व विश्वाचे एकमात्र स्वामी तेच आहेत. (२०)


कालं कर्म स्वभावं च मायेशो मायया स्वया ।
आत्मन् यदृच्छया प्राप्तं विबुभूषुरुपाददे ॥ २१ ॥
स्वच्छेने भगवंताने मायेने आपुल्याच त्या ।
कालकर्म स्वभावाचा केला स्वीकार तो पुन्हा ॥ २१ ॥

मायेशः - प्रकृतीला ताब्यात ठेवणारा परमेश्वर - स्वया - स्वतःच्या - मायया - प्रकृतीने - विबुभूषुः - अनेक प्रकारे होण्याची इच्छा करणारा असा होत्साता - यदृच्छया - सहजगत्या - आत्मन् - आत्म्यामध्ये - प्राप्तं - प्राप्त झालेल्या - कालं - काळाला - कर्म - कर्माला - च - आणि - स्वभावं - स्वभावाला - उपाददे - स्वीकारिता झाला. ॥२१॥
मायापती भगवंतांना "आपण अनेक व्हावे" अशी इच्छा झाल्यानंतर आपल्याच मायेने त्यांनी आपल्या स्वरूपात काल, धर्म आणि स्वभाव यांचा स्वीकार केला. (२१)


कालाद् गुणव्यतिकरः परिणामः स्वभावतः ।
कर्मणो जन्म महतः पुरुषाधिष्ठितात् अभूत् ॥ २२ ॥
त्याने स्वशक्तिने तीन गुणांचा क्षोभ निर्मिला ।
पालटोनि स्वभावाने महत्तत्त्वास निर्मिले ॥ २२ ॥

पुरुषाधिष्ठितात् - ईश्वराने अंगीकृत केलेल्या - कालात् - काळामुळे - गुणव्यतिकरः - त्रिगुणांचे न्यूनाधिक्याने मिश्रण - स्वभावतः - स्वाभाविक रीतीने - परिणामः - विकास - कर्मणः - प्रकृतीच्या क्रियेपासून - महतः - महतत्त्वाचा - जन्म - जन्म - अभूत - झाला. ॥२२॥
भगवंतांच्या शक्तीमुळे कालाने या तीन गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न केला, स्वभावाने त्यांना रूपांतरित केले आणि कर्माने महत्तत्त्वाला जन्म दिला. (२२)


महतस्तु विकुर्वाणाद् रजःसत्त्वोपबृंहितात् ।
तमःप्रधानस्त्वभवद् द्रव्यज्ञानक्रियात्मकः ॥ २३ ॥
वाढता रज सत्त्वो तो महत्तत्त्व विकारले ।
क्रिया नी ज्ञान द्रव्याच्या मधुनी तम जन्मले ॥ २३ ॥

रजःसत्त्वोपबृंहितात् - रजोगुण व तमोगुण यांनी वाढलेल्या - विकुर्वाणात् - विकार पावलेल्या - महतः - महत्तत्त्वापासून - तु - तर - द्रव्यज्ञानक्रियात्मकः - महाभूते, देवता व इंद्रिये यांनी युक्त असा - तमःप्रधानः - तमोगुणाचे प्राधान्य असलेला - अभवत् - उत्पन्न झाला - अहंकारः - अहंकार - इति - या नावाने - प्रोक्तः - सांगितलेला - सः - तो - तु - तर - विकुर्वन् - विकारयुक्त होत्साता - त्रिधा - तीन प्रकारचा - समभूत् - झाला. ॥२३॥
रजोगुण आणि सत्त्वगुण यांनी वृद्धिंगत झालेल्या महत्तत्त्वापासून ज्ञान, क्रिया आणि द्रव्यरूप असा तमःप्रधान विकार उत्पन्न झाला. (२३)


सोऽहङ्कार इति प्रोक्तो विकुर्वन्समभूत् त्रिधा ।
वैकारिकस्तैजसश्च तामसश्चेति यद्‌भिदा ।
द्रव्यशक्तिः क्रियाशक्तिः ज्ञानशक्तिरिति प्रभो ॥ २४ ॥
अहंकार म्हणा त्याला त्यातुनी तीन जन्मले ।
विकारी तेजसी आणि तामसी तीन रुप ते ।
ज्ञानशक्ति क्रियाशक्ती द्रव्यशक्ती अशी पहा ॥ २४ ॥

प्रभो - हे समर्था नारदा ! - यद्‌भिदा - ज्या अहंकाराचे भेद - वैकारिकः - सात्त्विक - च - आणि - तैजसः - राजस - च - आणि - तामसः - तामस - इति - असे - ज्ञानशक्तिः - सात्त्विकाहंकाराची देवतोत्पादक शक्ति - क्रियाशक्तिः - राजसाहंकाराची इंद्रियोत्पादक शक्ति - द्रव्यशक्तिः - तामसाहंकाराची भूतोत्पादक शक्ति - इति - अशा ह्या तीन अहंकाराच्या शक्ति होत. ॥२४॥
त्याला अहंकार म्हटले गेले आणि तो रूपांतरित होऊन तीन प्रकारचा झाला. ते तीन भेद वैकारिक, तेजस आणि तामस. नारदा, हे क्रमशः ज्ञानशक्ति, क्रियाशक्ति आणि द्रव्यशक्तिप्रधान आहेत. (२४)


तामसादपि भूतादेः विकुर्वाणाद् अभूत् नभः ।
तस्य मात्रा गुणः शब्दो लिङ्गं यद् द्रष्टृदृश्ययोः ॥ २५ ॥
महाभूते तमातून अहंकारहि जन्मला ।
आकाश निर्मिले त्याने तन्मात्रे गुण शब्द ते ।
द्रष्टा नी दृश्य दोघांचा आपणा बोध होतसे ॥ २५ ॥

भूतादेः - पंचमहाभूतांचे आदिकरण अशा - विकुर्वाणात् - विकाराला पावणार्‍या - तामसात् - तामसाहंकारापासून - अपि - सुद्धा - नभः - आकाश - अभूत् - झाले - तस्य - त्याचे - मात्रा - सूक्ष्म रूप - च - आणि - गुणः - गुण - शब्दः - शब्द - यत् - जे - द्रष्‌टटदृश्ययोः - पहाणारा पुरुष व पाहण्याची वस्तु ह्यांचे - लिङ्गं - दयोतक होय. ॥२५॥
जेव्हा महाभूतांचे कारण असणारा तामस अहंकार रूपांतरित झाला, तेव्हा त्यापासून आकाशाची उत्पत्ती झाली. आकाशाचा गुण शब्द आहे. या शब्दाच्या द्वारेच द्रष्टा आणि दृश्याचा बोध होतो. (२५)


नभसोऽथ विकुर्वाणाद् अभूत् स्पर्शगुणोऽनिलः ।
परान्वयाच्छब्दवांश्च प्राण ओजः सहो बलम् ॥ २६ ॥
आकाशातूनि तो वायू स्पर्शगुण तया असे ।
कारणे स्वगुणे शब्द त्यातुनी सहजीच ते ॥
स्फूर्ती ती इंद्रियामाजी शारीरीं जीवशक्तिही ।
बल नी तेजही चारी रूपे त्याचीच जाण पां ॥ २६ ॥

अथ - नंतर - विकुर्वाणात् - विकार पावणार्‍या - नभसः - आकाशापासून - स्पर्शगुणः - स्पर्शगुणयुक्त - अनिलः - वायु - अभूत् - झाला - परान्वयात् - दुसर्‍याशी म्हणजे पूर्वोक्त आकाशाशी संबंध असल्यामुळे - शब्दवान् - शब्दगुणानेही युक्त - प्राणः - शरीराला धारण करणे - ओजः - इंद्रियांची पुष्टी - सहः - मनाची पुष्टी - च - आणि - बलं - शरीराची शक्ती ही कार्ये करतो. ॥२६॥
जेव्हा आकाशात विकार उत्पन्न झाला, तेव्हा त्यापासून वायूची उत्पत्ती झाली, त्याचा गुण स्पर्श आहे. इंद्रियांच्यामध्ये स्फूर्ती, शरीरात जीवनशक्ति, ओज आणि बल हे याचे रूप आहे. (२६)


वायोरपि विकुर्वाणात् कालकर्मस्वभावतः ।
उदपद्यत तेजो वै रूपवत् स्पर्शशब्दवत् ॥ २७ ॥
कालकर्म स्वभावाने वायू तोही विकारला ।
निघाले त्यातुनी तेज या गुणे रूप जाहले ॥
यातही शब्द नी स्पर्श वायुचे गुण भासती ॥ २७ ॥

कालकर्मस्वभावतः - काल, कर्म व स्वभाव ह्यायोगे - विकुर्वाणात् - विकृत होणार्‍या - वायोः - वायूपासून - अपि - सुद्धा - वै - खरोखर - रूपवत् - रूपगुणाने युक्त - स्पर्शशब्दवत् - आणि स्पर्श व शब्द ह्या दोन्ही गुणांनी युक्त असे - तेजः - तेज - उदपदयत - उत्पन्न झाले. ॥२७॥
काल, कर्म आणि स्वभावाने वायूमध्ये सुद्धा विकार उत्पन्न होऊन त्याच्यापासून तेजाची उत्पत्ती झाली. याचा प्रधान गुण रूप आहे. आकाश आणि वायू या कारणांचे शब्द आणि स्पर्श हेही गुण याच्यात आहेत. (२७)


तेजसस्तु विकुर्वाणाद् आसीत् अम्भो रसात्मकम् ।
रूपवत् स्पर्शवच्चाम्भो घोषवच्च परान्वयात् ॥ २८ ॥
तेजात जन्मले आप त्याचा तो रस हा गुण ।
तत्वाचा गुण तो शब्द स्पर्शनी रूप ही असे ॥ २८ ॥

विकुर्वाणात् - विकार पावणार्‍या - तेजसः - तेजापासून - तु - तर - रसात्मकं - रसगुणाने युक्त - अंभः - उदक - आसीत - झाले - च - आणि - अंभः - ते उदक - परान्वयात् - दुसर्‍या पूर्वोक्त आकाश, वायु व तेज ह्यांशी संबंध असल्यामुळे - रूपवत् - रूपगुणयुक्त - स्पर्शवत् - स्पर्शगुणाने युक्त - च - आणि - घोषवत् - शब्दगुणयुक्त. ॥२८॥
तेजाच्या विकाराने पाण्याची उत्पत्ती झाली. याचा गुण आहे रस. याला कारणतत्त्व असणार्‍यांचे शब्द, स्पर्श आणि रूप हेही गुण याच्यात आहेत. (२८)


विशेषस्तु विकुर्वाणाद् अम्भसो गन्धवानभूत् ।
परान्वयाद् रसस्पर्श शब्दरूपगुणान्वितः ॥ २९ ॥
जल विकारता पृथ्वी तिचा गंधचि तो गुण ।
शब्द स्पर्श रस गंध हे चार गुण कारणे ॥ २९ ॥

विकुर्वाणात् - विकार पावणार्‍या - अंभसः - उदकापासून - तु - तर - गंधवान् - गंध गुणाने युक्त - विशेषः - विशिष्ट पृथ्वीरूप पदार्थ - अभूत् - झाला - परान्वयात् - पूर्वोक्त आकाश, वायू, तेज व उदक ह्यांशी संबंध असल्यामुळे - रसस्पर्शशब्दरूपगुणान्वितः - रस, स्पर्श, शब्द व रूप ह्या चार गुणांनी युक्त आहे. ॥२९॥
पाण्याच्या विकाराने पृथ्वीची उत्पत्ती झाली. तिचा गुण आहे गंध. कारणाचे गुण कार्यात येतात, या न्यायाने शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे चारही गुण पृथ्वीत आले. (२९)


वैकारिकान्मनो जज्ञे देवा वैकारिका दश ।
दिग्वातार्कप्रचेतोऽश्वि वह्नीन्द्रोपेन्द्रमित्रकाः ॥ ३० ॥
अहंकार विकाराने मन नी दश इंद्रियी
दिशा वायु रवी अग्नी विष्णू वरुण मित्र नी ।
अश्विनीपुत्र नी इंद्र अधिष्ठाते प्रजापती ।
निर्मिले भगवंताने आपल्या हेतुने पहा ॥ ३० ॥

वैकारिकात् - सात्त्विक अहंकारापासून - मनः - मन - जज्ञे - उत्पन्न झाले - दिग्वातार्कप्रचेतोऽश्विन्हीन्द्रोपेन्द्रमित्रकाः - दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनीकुमार, अग्नि, इंद्र, विष्णु, मित्र व ब्रह्मदेव ह्या - दश - दहा - देवाः - देवता - वैकारिकाः - सात्त्विकाहंकारोत्पन्न आहेत. ॥३०॥
वैकारिक अहंकारातून इंद्रियांच्या अधिष्ठात्या अशा दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनीकुमार, अग्नी, इंद्र, विष्णू, मित्र आणि प्रजापती या दहा देवतांची उत्पत्ती झाली. (३०)


तैजसात्तु विकुर्वाणाद् इंद्रियाणि दशाभवन् ।
ज्ञानशक्तिः क्रियाशक्तिः बुद्धिः प्राणश्च तैजसौ ।
श्रोत्रं त्वग् घ्राण दृग् जिह्वा वाग् दोर्मेढ्राङ्‌घ्रिपायवः ॥ ३१ ॥
विकारे तेजऽहंकार कान डोळे जिव्हा त्वचा ।
इंद्रीय पाचवा प्राण वाचा हात गुदा पद ।
पाचवे जननेंद्रीय सोबती ज्ञानरूप नी ।
बुद्धि आणि क्रियाशक्ति प्राण तेजही जाहले ॥ ३१ ॥

विकुर्वाणात् तैजसात् तु - राजस अहंकारात विकार होऊन त्यापासून - दश इंद्रियाणि - दहा इंद्रिये - अभवन् - उत्पन्न झाली - ज्ञानशक्तिः - ज्ञानाला आश्रय करून राहणारी शक्ती अशी - बुद्धिः - बुद्धि - क्रियाशक्तिः - कार्याश्रयभूत शक्ती असा - प्राणः - प्राण - तु - तर - तैजसौ - राजसाहंकारोत्पन्न - श्रोत्रत्वग्घ्‌राणदृग्जिव्हावाग्दोर्मेढ्राङ्‌घ्रिपायवः - कान, त्वचा, नाक, नेत्र, जीभ, वाणी, हात, शिस्न, पाय, गुद ही दहा इंद्रिये. ॥३१॥
तैजस अहंकारापासून कान, त्वचा, डोळे, जीभ, पाय गुदद्वार आणि जननेंद्रिय ही पाच कर्मेंद्रिये उत्पन्न झाली. त्याचबरोबर ज्ञानशक्तिरूप बुद्धी आणि क्रियाशक्तिरूप प्राण हेही तैजस अहंकारापासून उत्पन्न झाले. (३१)


यदैतेऽसङ्गता भावा भूतेन्द्रियमनोगुणाः ।
यदाऽऽयतननिर्माणे न शेकुर्ब्रह्मवित्तम ॥ ३२ ॥
तदा संहत्य चान्योन्यं भगवच्छक्तिचोदिताः ।
सदसत्त्वमुपादाय चोभयं ससृजुर्ह्यदः ॥ ३३ ॥
एकत्र नव्हते सारे स्वेच्छेने भोग भोगण्या ।
शरीर साधने निर्मिणे त्यांना श्क्यही नसे ॥ ३२ ॥
भगवान प्रेरिता झाले एकत्र कार्यकारणी ।
व्यष्टि समष्टि रूपाने पिंड ब्रह्मांडजाहले ॥ ३३ ॥

ब्रह्मवित्तम - ब्रह्मज्ञानी पुरुषात श्रेष्ठ अशा हे नारदा - यदा - ज्या वेळी - भूतेन्दियमनोगुणाः - पंचमहाभूते, दहा इंद्रिये, मन व तीन गुण यांनी युक्त - एते - हे - भावाः - पदार्थ - असंगताः - एकमेकात मिश्रित न झालेले असे हे - यदा - जेव्हा - आयतननिर्माणे - शरीर उत्पन्न करण्याविषयी - न शेकुः - समर्थ झाले नाहीत - तदा - तेव्हा - भगवच्छक्तिचोदिताः - ईश्वरशक्तीने प्रेरणा केलेले असे ते - सदसत्त्वं - न्यूनाधिक भागांना - उपादाय - घेऊन - च - आणि - अन्योन्यं - एकमेकांत - संहत्य - मिश्रित होऊन - अदः - हे जग - उभयं - व्यष्टिसमष्टिरूपाचे म्हणजे अवयवरूपाचे आणि समुदायरूपाचे किंवा स्थावरजंगमात्मक असे - हि - खरोखर - ससृजुः - उत्पन्न करते झाले. ॥३२-३३॥
हे श्रेष्ठ ब्रह्मर्षी, ज्यावेळी ही पंचमहाभूते, इंद्रिये, मन आणि सत्त्व इत्यादी तीन गुण हे सर्व एकमेकांशी संगठित झाले नव्हते, तेव्हा स्वतःला राहण्यासाठी म्हणून भोगांचे साधनरूप असलेल्या शरीराची रचना करू शकले नाहीत. (३२)
जेव्हा भगवंतांनी आपल्या शक्तीने यांना प्रेरित केले, तेव्हा त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले. त्यांनी आपापसात कार्यकारणभावाचा स्वीकार करून व्यष्टिरूप पिंड एक जीव आणि समष्टिरूप ब्रह्मांड सर्व चराचर जीव या दोहोंची रचना केली. (३३)


वर्षपूगसहस्रान्ते तदण्डमुदके शयम् ।
कालकर्मस्वभावस्थो जीवोऽजीवमजीवयत् ॥ ३४ ॥
सहस्र वर्ष पाण्यात ब्रह्मांडरूप अंड ते ।
राहिले अस्ता त्यात तेणेचि जीव ओतिला ॥ ३४ ॥

कालकर्मस्वभावस्थः - काल, कर्म, व स्वभाव ह्या ठिकाणी राहणारा - जीवः - परमात्मा - तत् - त्या - उदाकेशयं - पाण्यात पडलेल्या - अजीवं - अचेतन - अंडं - शरीररूपी अंडाला - वर्षपूगसहस्रान्ते - हजारो वर्षे लोटून गेल्यानंतर - अजीवयत् - सचेतन करता झाला. ॥३४॥
ते ब्रह्मांडरूप अंडे एक हजार वर्षेपर्यंत निर्जीव अवस्थेत पाण्यामध्ये पडून राहिले. नंतर काल, कर्म आणि स्वभाव यांच्या साह्याने भगवंतांनी त्याला जीवित केले. (३४)


स एव पुरुषः तस्माद् अण्डं निर्भिद्य निर्गतः ।
सहस्रोर्वङ्‌घ्रिबाह्वक्षः सहस्राननशीर्षवान् ॥ ३५ ॥
फोडिले अंड ते त्यात विराट निघाले रुप ।
सरस्रशीर्ष इत्यादी तयास इंद्रिये पहा ॥ ३५ ॥

सहस्रोर्वङ्घ्रिबाव्हक्षः - हजारो मांडया, पाय, बाहू व नेत्र आहेत ज्याला असा - सहस्राननशीर्षवान् - व हजारो मुखे व मस्तके आहेत ज्याला असा - सः एव - तोच - पुरुषः - पुरुष - अंडं - त्या अंडाला म्हणजे चोवीस तत्त्वांच्या बनलेल्या अंडकोशाला - निर्भिदय - फोडून - तस्मात् - त्यातून - निर्गतः - बाहेर पडला. ॥३५॥
ते अंडे फोडून त्याच्यातून विराट पुरुष निघाला. त्याच्या मांड्या, पाय, हात, डोळे, तोंड आणि मस्तके हजारो होती. (३५)


यस्येहावयवैर्लोकान् काल्पयन्ति मनीषिणः ।
कट्यादिभिरधः सप्त सप्तोर्ध्वं जघनादिभिः ॥ ३६ ॥
ज्ञानी त्या सर्व अंगात त्रिलोक आदि कल्पिती ।
कमरे पासुनी खाली साती पाताळ कल्पिली ॥ ३६ ॥

इह - येथे - मनीषिणः - ज्ञानी लोक - यस्य - ज्या पुरुषाच्या - अवयवैः - शरीराच्या हस्तपादादि अवयवांनी - कटयादिभिः - पृष्ठभागाकडील कमरेच्या भागांनी - अधः - खालील - सप्त - सात - जघनादिभिः - कमरेच्या पोटाकडील भागांनी - ऊर्ध्वं - वरील - सप्त - सात - लोकान् - लोकांना - कल्पयन्ति - कल्पितात. ॥३६॥
विद्वान पुरुष उपासनेसाठी त्याच्या अंगामध्ये समस्त लोकांची कल्पना करतात. त्याच्या कमरेपासून खालील अंगात सप्त पाताळांची आणि वरील अंगात सप्त स्वर्गांची कल्पना केली जाते. (३६)


पुरुषस्य मुखं ब्रह्म क्षत्रमेतस्य बाहवः ।
ऊर्वोर्वैश्यो भगवतः पद्‍भ्यां शूद्रोऽभ्यजायत ॥ ३७ ॥
विप्र हे मुखची त्याचे बाहू क्षत्रीय ह्या अशा ।
वैश्य हेचि तया मांड्या पाय ते शूद्र हे पहा ॥ ३७ ॥

ब्रह्म - ब्राह्मण - पुरुषस्य - पूर्वोक्त पुरुषाचे - मुखं - तोंड होय - क्षत्रं - क्षत्रिय - एतस्य - ह्या पुरुषाचे - बाहवः - बाहु होत - वैश्यः - वैश्य - भगवतः - पुरुषाच्या - ऊर्वोः - मांडीपासून होत - शूद्रः - शूद्र - पद्‌भ्यां - पायापासून - अभ्यजायत - झाला. ॥३७॥
या विराट पुरुषाचे ब्राह्मण हे मुख आहे, क्षत्रिय हात आहेत. वैश्य याच्या मांड्यांपासून आणि शूद्र पायांपासून उत्पन्न झाले आहेत. (३७)


भूर्लोकः कल्पितः पद्‍भ्यां भुवर्लोकोऽस्य नाभितः ।
हृदा स्वर्लोक उरसा महर्लोको महात्मनः ॥ ३८ ॥
पाताळ तळपायासी हा भूलोक कटीत त्या ।
नाभीतचि भुवलोक विराट रूप हे असे ॥ ३८ ॥

भूर्लोकः - पृथ्वीमंडल - पद्‌भ्यां - पुरुषाच्या दोन पायांनी - कल्पितः - कल्पिले आहे - भुवर्लोकः - अंतरिक्ष - अस्य - ह्या पुरुषाच्या - नाभितः - बेंबीपासून - स्वर्लोकः - स्वर्गलोक - महात्मनः - पुरुषाच्या - हृदा - हृदयाने - महर्लोकः - व महर्लोक - उरसा - वक्षःस्थलाने कल्पिला आहे. ॥३८॥
याच्या पायांमध्ये भूलोकाची कल्पना केली गेली आहे. नाभीमध्ये भुवर्लोक, हृदयात स्वर्लोक, आणि परमात्म्याच्या वक्षःस्थळामध्ये महर्लोकाची कल्पना केली गेली आहे. (३८)


ग्रीवायां जनलोकोऽस्य तपोलोकः स्तनद्वयात् ।
मूर्धभिः सत्यलोकस्तु ब्रह्मलोकः सनातनः ॥ ३९ ॥
जनलोक गळ्यामधे तपोलोक स्तनात नी ।
मस्तकी राहतो ब्रह्मा सत्यलोक तिथे असे ॥ ३९ ॥

जनलोकः - जनलोक - ग्रीवायां - कंठाचे ठिकाणी - च - आणि - तपोलोकः - तपोलोक - स्तनव्दयात् - दोन स्तनांपासून किंवा दोन ओठांपासून - सत्यलोकः - सत्यलोक - तु - तर - मूर्धभिः - मस्तकांनी - ब्रह्मलोकः - वैकुंठलोक - सनातनः - नित्य व वरील चौदा लोकांहून निराळा व श्रेष्ठ आहे. ॥३९॥
त्याच्या गळ्यामध्ये जनलोक, दोन्ही स्तनांमध्ये तपोलोक आणि मस्तकामध्ये ब्रह्मदेवाचे नित्य निवासस्थान असलेला सत्यलोक आहे. (३९)


तत्कट्यां चातलं कॢप्तं ऊरूभ्यां वितलं विभोः ।
जानुभ्यां सुतलं शुद्धं जङ्घाभ्यां तु तलातलम् ॥ ४० ॥
अतलो कमरे मध्ये जांघाशी वितले तशी ।
सुतलो गुडघ्यापाशी मांड्याशी ते तळातळ ॥ ४० ॥

अतलं - अतल - तत्कटयां - पुरुषाच्या कंबरेचे ठिकाणी - वितलं - वितल - विभोः - सर्वव्यापक पुरुषाच्या - ऊरुभ्यां - दोन मांडयांनी - शुद्धं - पवित्र - सुतलं - सुतल - जानुभ्यां - गुडघ्यांनी - च - आणि - तलातलम् - तलातल - तु - तर - जङ्गभ्यां - पोटर्‍यांनी - क्लृप्तं - कल्पिले आहे. ॥४०॥
त्या विराट पुरुषाच्या कमरेमध्ये अतल, मांड्यांमध्ये वितल, गुडघ्यांमध्ये पवित्र असा सुतललोक आणि पोटर्‍यांमध्ये तलातलाची कल्पना केली गेली आहे. (४०)


महातलं तु गुल्फाभ्यां प्रपदाभ्यां रसातलम् ।
पातालं पादतलत इति लोकमयः पुमान् ॥ ४१ ॥
महातळचि ते घोटे टाचामध्ये रसातळ ।
पाताळ तळवे जाणा ऐसे हे रूप थोरले ॥ ४१ ॥

महातलं - महातल - तु - तर - गुल्फाभ्यां - घोटयांनी - रसातलं - रसातल - प्रपदाभ्यां - पायांच्या अग्रांनी - पातालं - पाताल - पादतलतः - तळपायापासून - इति - असा - पुमान् - पुरुष - लोकमयः - चौदा लोकांनी बनला आहे. ॥४१॥
घोट्यांमध्ये महातल, पायांच्या वरच्या भागात रसातल आणि तळव्यांमध्ये पाताळ समजावे. अशा प्रकारे विराट पुरुष सर्व लोकमय आहे. (४१)


भूर्लोकः कल्पितः पद्‍भ्यां भुवर्लोकोऽस्य नाभितः ।
स्वर्लोकः कल्पितो मूर्ध्ना इति वा लोककल्पना ॥ ४२ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वितीयस्कंधे पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥
पायासी पृथिवी आणि बेंबीमध्ये भुवर असे ।
डोके स्वर्लोक जाणावे विराट रूप हे असे ॥ ४२ ॥
॥ इति श्रीमद्‌भगवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥
॥ पाचवा अध्याय हा ॥ २ ॥ ५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

भूर्लोकः - भूलोक - अस्य - पुरुषाच्या - पद्‌भ्यां - पायांनी - भुवर्लोकः - अंतरिक्ष - नाभितः - बेंबीमुळे - कल्पितः - कल्पिला आहे - स्वर्लोकः - स्वर्ग - मूध्ना - मस्तकाने - कल्पितः - कल्पिला आहे - इति - अशा रीतीने - वा - विकल्पाने म्हणजे निराळ्या रीतीने - लोककल्पना - ह्या लोकांच्या बाबतीत कल्पना आहे. ॥४२॥
किंवा विराट पुरुषाच्या पायात पृथ्वी, नाभीमध्ये भुवर्लोक आणि मस्तकात स्वर्लोक अशा प्रकारे सुद्धा तिन्ही लोकांची कल्पना केली जाते. (४२)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां द्वितीयः स्कन्धे पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥
स्कंध दुसरा - अध्याय पाचवा समाप्त

GO TOP