श्रीमद् भागवत पुराण
द्वितीयः स्कन्धः
चतुर्थोऽध्यायः

सूतोक्तिः - राज्ञः सृष्टिविषयकः प्रश्नः,
शुकस्य मंगलाचरणपूर्वकं कथारंभश्च -

राजाचे सृष्टिविषयक प्रश्न आणि शुकदेवांची कथेची सुरुवात -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


सूत उवाच -
वैयासकेरिति वचः तत्त्वनिश्चयमात्मनः ।
उपधार्य मतिं कृष्णे औत्तरेयः सतीं व्यधात् ॥ १ ॥
सूतजी सांगतात -
( अनुष्टुप् )
निश्चयां भगवत् तत्व शुकांचे बोलणे असे ।
उत्तरानंद त्या राये कृष्णासी बुद्धि अर्पिली ॥ १ ॥

औतरेयः - उत्तरापुत्र परीक्षित - इति - याप्रमाणे - आत्मनः - आत्म्याच्या - तत्त्वनिश्चयं - तात्विक निश्चयाला दर्शविणार्‍या - वैयासकेः - व्यासपुत्र शुकाचार्याच्या - वचः - भाषणाला - उपधार्य - निश्चितपूर्वक आकलन करून - कृष्णे - श्रीकृष्णाच्या ठिकाणी - सतीं - चांगल्या - मतिं - बुद्धीला - व्यधात् - ठेविता झाला. ॥१॥
सूत म्हणाले - श्रीशुकदेवांचे बोलणे भगवत्तत्त्वाचा निश्चय करणारे होते. उत्तरेचा पुत्र राजा परीक्षिताने ते वचन ऐकून आपली शुद्ध बुद्धी भगवन श्रीकृष्णांच्या ठिकाणी अनन्यभावाने समर्पित केली. (१)


आत्मजायासुतागार पशुद्रविणबन्धुषु ।
राज्ये चाविकले नित्यं विरूढां ममतां जहौ ॥ २ ॥
स्वस्तात पत्‍नि पुत्रात महाली नी धनातही ।
भावकी नी पशू राज्यो बंदिस्त मन सोडिले ॥ २ ॥

आत्मजायासुतागारपशुद्रविणबन्धुषु - शरीर, स्त्री, पुत्र, घर, गजादि पशु, द्रव्य व भाऊबंद यांचे ठिकाणी - च - आणि - अविकले - निष्कंटक अशा - राज्ये - राज्याचे ठिकाणी - नित्यं - नेहमी - विरूढां - उत्पन्न होऊन वाढलेल्या - ममतां - ममत्वाला - जहौ - सोडता झाला. ॥२॥
शरीर, पत्‍नी, पुत्र, राजमहाल, पशू, धन, बांधव आणि निष्कंटक राज्य यांच्याविषयीची सवयीने दृढ झालेली ममता त्यांनी एका क्षणात सोडून दिली. (२)


पप्रच्छ चेममेवार्थं यन्मां पृच्छथ सत्तमाः ।
कृष्णानुभावश्रवणे श्रद्दधानो महामनाः ॥ ३ ॥
संस्थां विज्ञाय सन्न्यस्य कर्म त्रैवर्गिकं च यत् ।
वासुदेवे भगवति आत्मभावं दृढं गतः ॥ ४ ॥
श्रेष्ठ परीक्षिते राये मृत्युची वेळ जाणिली ।
धर्मार्थ काम कर्माचा त्याने संन्यास घेतला ॥ ३ ॥
आत्म्याचा दृढ तो भाव कृष्णरूपास लावला ।
महिमा ऐकण्या सिद्ध होऊनी प्रश्न तो करी ॥ ४ ॥

सत्तमाः - साधुश्रेष्ठ शौनकादि ऋषि हो ! - यत् - जे - मां - मला - पृच्छथ - विचारता - इमम् एव - ह्याच - अर्थं - अर्थाबद्दल - कृष्णानुभावश्रवणे - श्रीकृष्णाच्या लीला ऐकण्याविषयी - श्रद्दधानः - श्रद्धायुक्त - च - आणि - महामनाः - थोर अंतःकरणाच्या अशा परीक्षिताने - पप्रच्छ - विचारले. ॥३॥ - संस्थां - मृत्यूला - विज्ञाय - जाणून - च - आणि - यत् - जे - त्रैवर्गिक - धर्मार्थकामसंबंधी - कर्म - कर्माला - संन्यस्य - टाकून - भगवति - सर्वगुणसंपन्न अशा - वासुदेवे - श्रीकृष्णाचे ठिकाणी - दृढं - बळकट अशा - आत्मभावं - आत्मैक्याला - गतः - प्राप्त झाला. ॥४॥
शौनकादी ऋषींनो, महामना परीक्षिताने आपल्या मृत्यूची निश्चित वेळ जाणली होती. म्हणून त्याने धर्म, अर्थ आणि कामाशी संबंध असणारी सर्व कर्मे सोडून दिली. नंतर भगवान श्रीकृष्णांमध्ये आत्मभावाने मिसळून जाऊन मोठ्या श्रद्धेने भगवान श्रीकृष्णांचा महिमा ऐकण्यासाठी त्याने श्रीशुकदेवांना तोच प्रश्न विचारला, जो आपण मला विचारीत आहात. (३-४)


राजोवाच -
समीचीनं वचो ब्रह्मन् सर्वज्ञस्य तवानघ ।
तमो विशीर्यते मह्यं हरेः कथयतः कथाम् ॥ ५ ॥
राजा परीक्षिताने विचारिले-
वदता योग्य ते ब्रह्मन् ! सर्वज्ञ शुद्ध हो तुम्ही ।
कथा ही सांगता तेणे अज्ञान पट फाटतो ॥ ५ ॥

अनघ - हे निष्पाप - ब्रह्मन् - ब्रह्मज्ञ शुकाचार्या - सर्वज्ञस्य - सर्व जाणणार्‍या अशा - तव - तुझे - वचः - भगवत्कथारूपी भाषण - समीचीनं - सर्वोत्कृष्ट होय - हरेः - भगवंताच्या - कथाम् - कथा - मह्य - मला - कथयतः - तू सांगत असता - तमः - अज्ञानांधकार - विशीर्यते - नष्ट होतो. ॥५॥
परीक्षिताने विचारले - "भगवत्स्वरूप मुनिवर, आपण परमपवित्र आणि सर्वज्ञ आहात. आपण जे काही सांगितले ते सत्य आणि योग्य आहे. आपण जसजशी भगवंतांची कथा सांगत आहात, तसतसा माझा अज्ञानाचा पडदा नाहीसा होऊ लागला आहे. (५)


भूय एव विवित्सामि भगवान् आत्ममायया ।
यथेदं सृजते विश्वं दुर्विभाव्यमधीश्वरैः ॥ ६ ॥
मायेने भगवान् सृष्टी निर्मितो ती कशी वदा ।
लोकपाल नि ब्रह्मादी सहसा जाणती न ते ॥ ६ ॥

भूयः एव - पुन्हाही - विवित्सामि - जाण्याची इच्छा करतो - विभुः - व्यापक - भगवान् - परमेश्वर - आत्ममायया - स्वतःच्या प्रकृतीच्या सहाय्याने - यथा - ज्याप्रमाणे - अधीश्वरैः - ब्रह्मदेवादि समर्थांकडून - दुर्विभाव्यं - कल्पना न करण्याजोगा - इदं - ह्या - विश्वं - जगाला - सृजते - उत्पन्न करितो - यथा - ज्याप्रमाणे - गोपायति - रक्षितो - पुनः - फिरून - यथा - ज्याप्रमाणे - संयच्छते - संहार करतो. ॥६॥
मी आपणाकडून पुन्हा हेच जाणून घेऊ इच्छितो की, भगवंत आपल्या मायेने या सृष्टीची उत्पत्ती कशी करतात ? कारण या सृष्टीची रचना ब्रह्मदेवांसारख्यांनाही कळण्यासारखी नाही. (६)


यथा गोपायति विभुः यथा संयच्छते पुनः ।
यां यां शक्तिमुपाश्रित्य पुरुशक्तिः परः पुमान् ।
आत्मानं क्रीडयन्क्रीडन् करोति विकरोति च ॥ ७ ॥
भगवान् रक्षि त्या कैसा संहार साधितो कसा ।
कोणत्या शक्तियोगाने खेळतो खेळ हा असा ॥
मुले जे मातिचा खोपा करिती आणि मोडिती ।
तसे ब्रह्मांड मांडोनी मोडितो तो पुन्हा कसा ॥ ७ ॥

पुरुशक्तिः - अपरिमित शक्ती असलेला - परः - श्रेष्ठ - पुमान् - पुरुष, परमेश्वर - यां यां - ज्या ज्या - शक्तिं - शक्तीला - उपाश्रित्य - स्वीकारून - क्रीडन् - खेळ खेळणारा असा - करोति - कार्य करितो - च - आणि - आत्मानं - स्वतःला - क्रीडयन् - खेळविणारा - विकरोति - पुष्कळ प्रकारे स्वतः रूपे घेऊन अनेक कार्ये करितो. ॥७॥
भगवंत या विश्वाचे संरक्षण आणि पुन्हा संहार कसा करतात ? अनंतशक्ती परमात्मा कोणकोणत्या शक्तींचा आश्रय घेऊन स्वतःच खेळणी बनून त्यांच्याशी खेळतात ? तसेच हे ब्रह्मांड कसे बनवितात आणि पुन्हा कसे मिटवून टाकतात ? (७)


नूनं भगवतो ब्रह्मन् हरेरद्‍भुतकर्मणः ।
दुर्विभाव्यमिवाभाति कविभिश्चापि चेष्टितम् ॥ ८ ॥
अचिंत्य भगवत् लीला नाही संशय तो मुळी ।
रहस्य ज्ञानियांनाही कळण्या जड होतसे ॥ ८ ॥

ब्रह्मन् - अहो ब्रह्मज्ञ शुकाचार्य हो ! - च - आणि - नूनं - खरोखर - भगवतः - सर्वगुणसंपन्न अशा - अद्‌भुतकर्मणः - व ज्यांची पराक्रमाची कृत्ये आश्चर्योत्पादक आहेत अशा - हरेः - श्रीकृष्णाचे - चेष्टितं - क्रीडादि कार्य - कविभिः - विद्वानांकडून - अपि - सुद्धा - दुर्विभाव्यं - अतर्क्य - इव - अशाप्रमाणे - आभाति - भासते. ॥८॥
हे मुनिवर्य, भगवान श्रीहरींच्या लीला मोठ्या अद्‌भुत आणि अचिंत्य आहेत. विद्वांनाही त्यांच्या लीलांचे रहस्य समजणे अवघड जाते. (८)


यथा गुणांस्तु प्रकृतेः युगपत् क्रमशोऽपि वा ।
बिभर्ति भूरिशस्त्वेकः कुर्वन् कर्माणि जन्मभिः ॥ ९ ॥
विचिकित्सितमेतन्मे ब्रवीतु भगवान् यथा ।
शाब्दे ब्रह्मणि निष्णातः परस्मिंश्च भवान्खलु ॥ १० ॥
भगवान् एकला आहे करितो सर्व कर्म हे ।
गुणांच्या सह तो राही पुरुषी भिन्नरूप ते ॥
क्रमाने जन्मतो होती अवतार पुढे पुढे ॥ ९ ॥
वेद नी ब्रह्मतत्वाला जाणता मुनिजी तुम्ही ।
म्हणून घालवा माझा संदेह मनिचा असा ॥ १० ॥

एकः - एकटा - जन्मभिः - अनेक जन्म घेऊन - भूरिशः - पुष्कळप्रकारे - तु - तर - कर्माणि - कृत्ये - कुर्वन् - करणारा असा होत्साता - यथा - ज्याप्रमाणे - प्रकृतेः - मायेच्या - गुणान् - तीन गुणांना - तु - तर - युगपत् - एकदम - अपि वा - किंवा - क्रमशः - अनुक्रमाने - बिभर्ति - धारण करितो - भगवान् - सर्वगुणसंपन्न - भवान् - आपण - यथा - ज्याअर्थी - शाब्दे - वेदादि शब्दांनी वर्णिल्या जाणार्‍या - च - त्याचप्रमाणे - परस्मिन् - श्रेष्ठ अनुभविक अशा - ब्रह्मणि - ब्रह्मांत - खलु - खरोखर - निष्णातः - निपुण आहा त्याअर्थी - एतत् - ह्या - मे - माझ्या - विचिकित्सितं - संशयाला - ब्रवीतु - सांगा, म्हणजे संशयांचा निरास करा. ॥९-१०॥
एकटे भगवंत पुष्कळशी कर्मे करण्यासाठी पुरुषरूपाने प्रकृतीच्या विभिन्न गुणांना एकाच वेळी धारण करतात ? (९)
मुनिवर, आपण वेद आणि ब्रह्मतत्त्व दोन्हींचेही मर्म जाणत आहात; म्हणून आपण माझ्या या जिज्ञासेचे समाधान करावे ? (१०)


सूत उवाच ।
इत्युपामंत्रितो राज्ञा गुणानुकथने हरेः ।
हृषीकेशं अनुस्मृत्य प्रतिवक्तुं प्रचक्रमे ॥ ११ ॥
सूतजी सांगतात -
असे परोपरी राजा कृष्णाचे गुण सांगण्या ।
प्रार्थिता शुकदेवाने व्याख्यान दिधले पुन्हा ॥ ११ ॥

इति - याप्रमाणे - राज्ञा - परीक्षित राजाने - हरेः - श्रीकृष्णाच्या - गुणानुकथने - गुणवर्णनाविषयी - उपामन्त्रितः - प्रार्थना केलेला शुकाचार्य - हृषीकेशं - जितेंन्द्रिय अशा परमेश्वराला - अनुस्मृत्य - स्मरून - प्रतिवक्तुं - बोलण्याला - प्रचक्रमे - सुरूवात करिता झाला. ॥११॥
सूत म्हणाले - जेव्हा परीक्षिताने भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याविषयी अशा प्रकारे प्रार्थना केली, तेव्हा श्रीशुकदेवांनी भगवान श्रीकृष्णांचे वारंवार स्मरण करून प्रवचनाला प्रारंभ केला (११)


श्रीशुक उवाच ।
नमः परस्मै पुरुषाय भूयसे
    सदुद्‍भवस्थाननिरोधलीलया ।
गृहीतशक्तित्रितयाय देहिनां
    अंतर्भवायानुपलक्ष्यवर्त्मने ॥ १२ ॥
श्रीशुकदेवजी म्हणाले -
(इंद्रवज्रा)
कोटी नमस्ते पुरुषोत्तमाला
    जो सृष्टि निर्माण करून पोषी ।
नी लीलया तो प्रलयात मोडी
    सत्वादि सारे गुण घेउनीया ।
तिन्ही गुणांचे रुप थोर घेई
    चराचराच्या हृदयात राही ।
बुद्धीस ना अंत अशा रूपाचा
    अनंत त्याचा महिमा अनंत ॥ १२ ॥

भूयसे - सर्वोत्कृष्ट माहात्म्याने युक्त अशा - असदुद्‌भवस्थाननिरोधलीलया - जगाची उत्पत्ति, स्थिती व संहार ह्यांना निमित्तभूत अशा लीलेने - गृहीतशक्तित्रितयाय - तीन शक्ति धारण करणार्‍या अशा - देहिनां - आणि देहधारी प्राणिमात्रांच्या - अंतर्भवाय - आत राहणार्‍या अशा - अनुपलक्ष्यवर्त्मने - न जाणता येणारा आहे मार्ग ज्याचा अशा - परस्मै - श्रेष्ठ - पुरुषाय - परमेश्वराला - नमः - नमस्कार असो. ॥१२॥
श्रीशुकाचार्य म्हणाले - जे संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करण्याची लीला करण्यासाठी सत्त्व, रज आणि तमोगुणरूप तिन्ही शक्तींचा स्वीकार करून ब्रह्मा, विष्णू आणि शंकराचे रूप धारण करतात, जे सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये अंतर्यामीरूपाने विराजमान आहेत, ज्यांचे स्वरूप आणि ते जाणण्याचा मार्ग बुद्धीला न कळणारा आहे. अशा अनंत महिमा असणार्‍या परमपुरुषांना मी नमस्कार करतो. (१२)


भूयो नमः सद्‌वृजिनच्छिदेऽसतां
    असंभवायाखिलसत्त्वमूर्तये ।
पुंसां पुनः पारमहंस्य आश्रमे
    व्यवस्थितानामनुमृग्यदाशुषे ॥ १३ ॥
मुक्तीच देतो खळ मारूनीया
    संन्यासियांसी परि दान देतो ।
समस्त जीवांश रूपे तयाची
    त्यांनाहि तो ना कद्धि वक्र पाहि ।
दुःखा हरोनी सुख प्रेम देतो
    त्या कृष्णरूपास सदा नमी मी ॥ १३ ॥

सद्‌वृजिनच्छिदे - साधूंच्या पापांचा नाश करणार्‍या - असतां - दुष्टांच्या - असंभवाय - उत्पत्तीलाच होऊ न देणार्‍या - अखिलसत्त्वमूर्तये - जेथे मूर्तिमान संपूर्ण सत्त्वगुण पूर्ण रीतीने वास्तव्य करीत आहे अशा - पुनः - फिरून - पारमहंस्ये - परमहंसानी आचरिलेल्या - आश्रमे - आश्रमात - व्यवस्थितानां - राहिलेल्या - पुंसां - पुरुषांच्या - अनुमृग्यदाशुषे - आत्मज्ञान देणार्‍या परमेश्वराला - भूयः - पुनः - नमः - नमस्कार असो. ॥१३॥
सत्पुरुषांचे दुःख नाहीसे करणार्‍या, दुष्टांची उन्नती होऊ नये म्हणून निरनिराळ्या देवता बनून त्यांना मागेल तेवढेच फळ देणार्‍या आणि परमहंस संन्याशांना त्यांच्या इच्छेप्रमाणे आत्मवस्तूचे दान करणार्‍या परमात्म्याला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. (१३)


नमो नमस्तेऽस्त्वृषभाय सात्वतां
    विदूरकाष्ठाय मुहुः कुयोगिनाम् ।
निरस्तसाम्यातिशयेन राधसा
    स्वधामनि ब्रह्मणि रंस्यते नमः ॥ १४ ॥
दुष्टांसि शत्रू स्वजन प्रियो हा
    ऐश्वर्यवंतो न तुळा कुणाही ।
पै ब्रह्मरूपात सदा रहातो
    त्या ब्रह्मरूपास सदा नमी मी ॥ १४ ॥

सात्वतां - भक्तांचा - ऋषभाय - पालक अशा - कुयोगिनां - व अभक्तांपासून - विदूरकाष्ठाय - दूर अंतरावर राहणार्‍या - मुहुः - वारंवार - नमः नमः - पुनः पुनः नमस्कार - अस्तु - असो - निरस्तसाम्यातिशयेन - सारखेपणा व विशिष्टपणा ज्यातून पार नाहीसा झाला आहे अशा - राधसा - ऐश्वर्याने - स्वधामनि - स्वतःचे राहण्याचे स्थान अशा - ब्रह्मणि - ब्रह्मामध्ये - रंस्यते - रममाण होणार्‍या परमेश्वराला - नमः - नमस्कार असो. ॥१४॥
जे भक्तवत्सल आहेत, भक्ती नसलेल्यांना जे अज्ञात असतात, ज्यांच्यासारखे ऐश्वर्य कोणाचेच नाही तर त्यांच्यापेक्षा अधिक कसे असू शकेल ? अशा ऐश्वर्याने युक्त असूनही जे नेहमी ब्रह्मस्वरूप असणार्‍या आपल्याच धामामध्ये विहार करतात, त्या भगवानांना मी वारंवार नमस्कार करतो. (१४)


यत्कीर्तनं यत्स्मरणं यदीक्षणं
    यद् वंदनं यच्छ्रवणं यदर्हणम् ।
लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषं
    तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ॥ १५ ॥
गाता नि ध्याता श्रवणे नि ज्ञाने
    नी कीर्तने वंदन केलियाने ।
पापा न थारा ययि पुण्यकीर्ती
    त्या कृष्णरूपास सदा नमी मी ॥ १५ ॥

यत्कीर्तनं - ज्यांचे गुणकीर्तन - यत्स्मरणं - ज्याचे स्मरण - यदीक्षणं - ज्याकडे पाहणे - यद्वन्दनं - ज्याला नमन करणे - यच्छ्रवणं - ज्याच्या गुणांचे श्रवण - यदर्हणं - ज्याचे पूजन - लोकस्य - प्राणिमात्रांच्या - कल्मषं - पापाला - सदयः - ताबडतोब - विधुनोति - दूर करते - तस्मै - त्या - सुभद्रश्रवसे - अत्यंत कल्याणप्रद कीर्तीने युक्त अशा श्रीकृष्णाला - नमः नमः - वारंवार नमस्कार असो. ॥१५॥
ज्यांचे कीर्तन, स्मरण, दर्शन, वंदन, श्रवण आणि पूजन जीवांची पापे तात्काळ नाहीशी करते, त्या पुण्यकीर्ति भगवानांना वारंवार नमस्कार असो ! (१५)


विचक्षणा यच्चरणोपसादनात्
    सङ्गं व्युदस्योभयतोऽन्तरात्मनः ।
विन्दन्ति हि ब्रह्मगतिं गतक्लमाः
    तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ॥ १६ ॥
चतूर ज्याच्या चरणा स्मरोनी
    आसक्ति मारूनचि ब्रह्म होती ।
ती मंगला कीर्ति रूपात ध्यावी
    त्या ब्रह्मरूपास सदा नमी मी ॥ १६ ॥

विचक्षणाः - ज्ञानी पुरुष - यच्चरणोपसादनात् - ज्याच्या चरणकमलाच्या सेवनाने - अन्तरात्मनः - अंतःकरणाच्या - उभयतः - ऐहिक व पारलौकिक - संगं - आसक्तीला - व्युदस्य - टाकून देऊन - गतक्लमाः - श्रमरहित होत्साते - हि - खरोखर - ब्रह्मगतिं - मोक्षमार्गाला - विन्दन्ति - मिळवितात - तस्मै - त्या - सुभद्रश्रवसे - कल्याणप्रद कीर्तीच्या परमेश्वराला - नमः नमः - वारंवार नमस्कार असो. ॥१६॥
विवेकी पुरुष ज्यांच्या चरणकमलांना शरण जाऊन आपल्या हृदयातून या व परलोकाची आसक्ती काढून टाकतात आणि कोणत्याही परिश्रमाविना ब्रह्मपद प्राप्त करून घेतात, त्या मंगल कीर्ति असणार्‍या भगवान श्रीकृष्णांना अनेक वेळा नमस्कार असो. (१६)


तपस्विनो दानपरा यशस्विनो
    मनस्विनो मंत्रविदः सुमङ्गलाः ।
क्षेमं न विन्दन्ति विना यदर्पणं
    तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ॥ १७ ॥
मोठे तपस्वी यश दानवंत
    तैसे सदाचारि नि मंत्रवेत्ते ।
ज्या अर्पिल्यावीण न लाभ त्यांना
    त्या कृष्ण रूपास सदा नमी मी ॥ १७ ॥

तपस्विनः - तपश्चर्या करणारे - दानपराः - दान करणारे - यशस्विनः - कीर्ती मिळविणारे - मनस्विनः - थोर मनाचे पुरुष - मंत्रविदः - वेदमंत्रांना जाणणारे - सुमंगलाः - व सदाचारी पुरुष - यदर्पणं - ज्याच्या अर्पणाला - विना - वगळून - क्षेमं - कल्याणाला - न विन्दन्ति - मिळवीत नाहीत - तस्मै - त्या - सुभद्रश्रवसे - ज्याचे गुणश्रवण कल्याणप्रद आहे अशा परमेश्वराला - नमः नमः - पुनः पुनः नमस्कार असो. ॥१७॥
मोठेमोठे तपस्वी, दानशूर, यशस्वी, सदाचारी आणि मंत्रवेत्ते जोपर्यंत आपली मोक्षप्राप्तीची साधने स्वतःसह त्यांच्या चरणी समर्पित करीत नाहीत, तोपर्यंत त्यांचे कल्याण होत नाही. अशा कल्याणकारी कीर्ति असणार्‍या भगवान श्रीकृष्णांना वारंवार नमस्कार असो. (१७)


किरातहूणान्ध्रपुलिन्दपुल्कशा
    आभीरकङ्का यवनाः खसादयः ।
येऽन्ये च पापा यदपाश्रयाश्रयाः
    शुध्यन्ति तस्मै प्रभविष्णवे नमः ॥ १८ ॥
किरात आंध्रादि पुलिंद हूण
    आभीर कंकादि तसेच पापी ।
संतासि येताचि पवित्र होती
    त्या ब्रह्मरूपास सदा नमी मी ॥ १८ ॥

किरातहूणांध्रपुलिन्दपुल्कसाः - किरात, हूण, तेलंगी, पुलिंद व चांडाळ - आभीरकंकाः - आभीर व कंक - यवनाः - यवन - खसादयः - खस आदि करून लोक - च - आणि - अन्ये - दुसरे - ये - जे - पापाः - पापी पुरुष - यदुपाश्रयाश्रयाः - ज्याच्या आश्रितांचा आशय करणारे असे - शुद्‌ध्यन्ति - शुद्ध होतात - तस्मै - त्या - प्रभविष्णवे - पराक्रमशाली परमेश्वराला - नमः - नमस्कार असो. ॥१८॥
किरात, हूण, आंध्र, पुलिन्द, पुल्कस, आभीर, कङ्क, यवन, खस इत्यादी कनिष्ठ जाती तसेच पापी, ज्यांच्या शरणागत भक्तांना शरण जाऊनच पवित्र होतात, त्या सर्वशक्तिमान भगवंतांना पुन्हा नमस्कार असो. (१८)


स एष आत्मात्मवतामधीश्वरः
    त्रयीमयो धर्ममयस्तपोमयः ।
गतव्यलीकैरजशङ्करादिभिः
    वितर्क्यलिङ्गो भगवान्प्रसीदताम् ॥ १९ ॥
तो ज्ञानियांचा परमात्मरूप
    नी भक्त स्वामी तपिया तपो तो ।
तो याज्ञिका होयहि वदमूर्ती
    त्या कृष्ण रूपास सदा नमी मी ।
ब्रह्मादिदेवा हृदयात चिंत्य
    आश्चर्य होवोनि सदा रहातो ।
जो धार्मिकांसी नितधर्म मूर्ती
    कृपा करो तो मज कृष्णस्वामी ॥ १९ ॥

सः - तो - एषः - हा - आत्मवतां - ज्ञान्यांचा - आत्मा - आत्मरूपाने सर्वत्र राहणारा - अधीश्वरः - श्रेष्ठ ऐश्वर्याने शोभणारा किंवा सर्व ईश्वरांमध्ये वर्चस्वाने राहणारा - त्रयीमयः - तीन वेदरूपी b>धर्ममयः - धर्मस्वरूपी - तपोमयः - तपोमूर्ति - गतव्यलीकैः - निष्कपट अशा - अजशङ्करादिभिः - ब्रह्मदेव, शंकर इत्यादिकांनी - वितर्क्यलिङ्गः - आश्चर्याने पाहण्याजोगी आहे मूर्ती ज्याची असा - भगवान् - परमेश्वर b>प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥१९॥
तेच भगवान ज्ञानी पुरुषांचे आत्मा, भक्तांचे स्वामी, कर्मकांड करणार्‍यांसाठी वेदमूर्ती, धार्मिकांच्यासाठी धर्ममूर्ती आणि तपस्वी लोकांसाठी तपःस्वरूप आहेत. ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देवसुद्धा शुद्ध हृदयाने त्यांच्या स्वरूपाचे चिंतन करतात आणि आश्चर्यचकित होऊन राहतात, ते माझ्यावर कृपेचा वर्षाव करोत. (१९)


श्रियः पतिर्यज्ञपतिः प्रजापतिः
    धियां पतिर्लोकपतिर्धरापतिः ।
पतिर्गतिश्चान्धकवृष्णिसात्वतां
    प्रसीदतां मे भगवान् सतां पतिः ॥ २० ॥
तो श्रीपती यज्ञहुता नि दाता
    सर्वासि रक्षी पृथिवीस स्वामी ।
रक्षी यदूवंश नि आश्रितांना
    कृपा करो तो मज कृष्णस्वामी ॥ २० ॥

श्रियः - लक्ष्मीचा - पतिः - स्वामी - यज्ञपतिः - यज्ञांचा अधिपति - प्रजापतिः - लोकरक्षक - धियां - बुद्धीचा - पतिः - चालक - लोकपतिः - त्रैलोक्याचा पालक - धरापतिः - पृथ्वीपति - अन्धकवृष्णिसात्वतां - अन्धक, वृष्णि व सात्वत् ह्या वंशातील यादवांचा - पतिः - स्वामी - च - आणि - गतिः - रक्षक - सतां - साधूंचा - पतिः - कैवारी - भगवान् - सर्वगुणसंपन्न श्रीकृष्ण - मे - माझ्यावर - प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥२०॥
लक्ष्मीदेवीचे पती, सर्व यज्ञांचे भोक्ते आणि फल देणारे, प्रजेचे रक्षक, सर्वांच्या अंतर्यामी, सर्व लोकांचे पालनकर्ते, पृथ्वीदेवीचे स्वामी, अंधक, वृष्णी आणि यादवांचे प्रमुख तसेच आधार, भक्तवत्सल आणि संतांचे सर्वस्व असे श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्न होवोत. (२०)


यदङ्घ्र्यभिध्यानसमाधिधौतया
    धियानुपश्यन्ति हि तत्त्वमात्मनः ।
वदन्ति चैतत् कवयो यथारुचं
    स मे मुकुंदो भगवान् प्रसीदताम् ॥ २१ ॥
त्या ज्ञानवंतास दिसे जधी तो
    ते पाहुनिया मग वर्णितात ।
जो मुक्ति प्रेमा लुटवी सदाचा
    कृपा करो तो मज कृष्णस्वामी ॥ २१ ॥

कवयः - ज्ञानी पुरुष - यदङ्घ्र्‌यनुध्यानसमाधिधौतया - ज्याच्या पादचिंतनरूपी समाधीने शुद्ध झालेल्या b>धिया - बुद्धीने - आत्मनः - आत्म्याच्या - तत्त्वं - तत्त्वाला - हि - खरोखर - अनुपश्यन्ति - पाहतात - च - आणि - एतत् - ह्याला - यथारुचं - आवडीप्रमाणे - वदन्ति - वर्णितात. - सः - तो - भगवान् - सर्वगुणसंपन्न - मुकुन्दः - मुक्तिदाता श्रीकृष्ण - मे - माझ्यावर - प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥२१॥
विद्वान पुरुष ज्यांच्या चरणकमलांच्या चिंतनरूप समाधीने शुद्ध झालेल्या बुद्धीच्या द्वारा आत्मतत्त्वाचा साक्षात्कार करून घेतात आणि आपापल्या आवडीनुसार ज्यांच्या स्वरूपाचे वर्णन करीत राहतात, ते भगवान मुकुन्द माझ्यावर प्रसन्न होवोत. (२१)


प्रचोदिता येन पुरा सरस्वती
    वितन्वताऽजस्य सतीं स्मृतिं हृदि ।
स्वलक्षणा प्रादुरभूत् किलास्यतः
    स मे ऋषीणां ऋषभः प्रसीदताम् ॥ २२ ॥
जो पूर्वकल्पी स्मृति देइ ब्रह्म्या
    सरस्वती स्थापुनि अंगि त्याच्या ।
त्याच्या मुखे वेद वदेहि पूर्ण
    कृपा करो तो मज कृष्णस्वामी ॥ २२ ॥

पुरा - पूर्वी - अजस्य - ब्रह्मदेवाच्या - हृदि - हृदयांत - सतीं - चांगल्या - स्मृतिं - पूर्वीच्या आठवणीला - वितन्वता - देणार्‍या - येन - ज्या ईश्वराने - प्रचोदिता - प्रेरणा दिलेली - स्वलक्षणा - आत्मलक्षणाने युक्त अशी - सरस्वती - वाग्देवी - आस्पतः - तोंडातून - किल - खरोखर - प्रादुरभूत् - आपण होऊन प्रगट झाली - सः - तो - ऋषीणां - ऋषींचा - ऋषभः - पुरस्कर्ता - मे - माझ्यावर - प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥२२॥
ज्यांनी सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी ब्रह्मदेवाच्या हृदयात आधीच्या कल्पाची स्मृती जागृत करण्यासाठी सरस्वती देवीला प्रेरित केले, तेव्हा ती स्वतः अंगांसहित वेदरूपाने त्यांच्या मुखातून प्रगट झाली, ते ज्ञानाचे मूळ कारण असलेले भगवान माझ्यावर कृपा करोत. (२२)


भूतैर्महद्‌भिर्य इमाः पुरो विभुः
    निर्माय शेते यदमूषु पूरुषः ।
भुङ्क्ते गुणान् षोडश षोडशात्मकः
    सोऽलङ्कृषीष्ट भगवान् वचांसि मे ॥ २३ ॥
निर्माण जीवास करोनि स्वस्थ
    सोळा कळांनी मग भोग भोगी ।
वाणी अलंकारित तो करो ही
    कृपा तो मज कृष्णस्वामी ॥ २३ ॥

यः - जो - विभुः - सर्वव्यापी - पुरुषः - परमेश्वर - महद्भिः - मोठया - भूतैः - पृथ्वी वगैरे पाच भूतांकडून - इमाः - ह्या - पुरः - शरीरांना - निर्माय - उत्पन्न करवून - यत् - ज्या कारणास्तव - अमूषु - ह्या शरीरात - शेते - शयन करितो - षोडशात्मकः - आणि सोळा कलांनी पूर्ण होत्साता - षोडश - सोळा - गुणान् - गुणांना - भुङ्क्ते - सेवितो - सः - तो - भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण - मे - माझ्या - वचांसि - वाणीला - अलंकृषीष्ट - सुशोभित करो. ॥२३॥
भगवंतच पंचमहाभूतांपासून या शरीरांना निर्माण करून त्यामध्ये जीवरूपाने शयन करतात आणि या पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच प्राण व मन या सोळा कलांनी युक्त होऊन सोळा विषयांचा उपभोग घेतात, ते भगवान माझ्या वाणीला अलंकृत करोत. (२३)


नमस्तस्मै भगवते वासुदेवाय वेधसे ।
पपुर्ज्ञानमयं सौम्या यन्मुखाम्बुरुहासवम् ॥ २४ ॥
( अनुष्टुप् )
व्यासांचे मुख ते पद्म ज्ञानामृतचिं ते कण ।
मकरंद झरे नित्य त्यांना मी नमितो सदा ॥ २४ ॥

तस्मै - त्या - अमिततेजसे - अतितेजस्वी अशा - भगवते - सर्वगुणसंपन्न - व्यासाय - व्यासाला - नमः - नमस्कार असो - सौ‌म्याः - शांतचित्ताचे शुद्ध सात्त्विक भक्त - ज्ञानमयं - ज्ञानरूपी - यन्मुखाम्बुरुहासवम् - ज्याच्या मुखकमलातील रसाला - पपुः - पिते झाले. ॥२४॥
ज्यांच्या मुखकमलातून मकरंदाप्रमाणे पाझरलेल्या ज्ञानमय अमृताचे जे संत पुरुष सेवन करतात, त्या वासुदेवावतार सर्वज्ञ भगवान व्यासांच्या चरणी माझा नमस्कार असो. (२४)


एतद् एवात्मभू राजन् नारदाय विपृच्छते ।
वेदगर्भोऽभ्यधात् साक्षाद् यदाह हरिरात्मनः ॥ २५ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वितीयस्कंधे चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
ब्रह्म्याने नारदालागी बोलिली ही कथा अशी ।
ब्रह्म्यासी जी स्वये देवे तीच मी तुज सांगतो ॥ २५ ॥
॥ इति श्रीमद्‌भगवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥
॥ चौथा अध्याय हा ॥ २ ॥ ४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

राजन् - हे परीक्षित राजा ! - हरिः - परमेश्वर - आत्मनः - स्वस्वरूपाने उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाला - यत् - जे - साक्षात् - स्वतः प्रत्यक्ष - आह - बोलला - एतत् एव - हेच - वेदगर्भः - ज्याच्या उदरात संपूर्ण वेद साठलेले आहेत अशा - आत्मभूः - ब्रह्मदेव - विपृच्छते - अनेक प्रकारे विचारणार्‍या - नारदाय - नारदाला - अभ्यधात् - सांगता झाला. ॥२५॥
परीक्षिता ! वेदगर्भ, स्वयंभू ब्रह्मदेवाने नारदांनी प्रश्न विचारल्यावरून हेच सांगितले होते. त्याचा स्वतः भगवान नारायणांनी त्याला उपदेश केला होता. आणि तेच मी तुला सांगत आहे. (२५)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां द्वितीयः स्कन्धे चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
स्कंध दुसरा - अध्याय चवथा समाप्त

GO TOP