|
श्रीमद् भागवत पुराण
नानाविधकामनासिद्धये नानादेवानां उपासनं, इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवद्भक्तीच्या माहात्म्याचे निरूपण - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
एवमेतन्निगदितं पृष्टवान् यद् भवान् मम । नृणां यन्म्रियमाणानां मनुष्येषु मनीषिणाम् ॥ १ ॥
श्रीशुकदेवजी सांगतात - ( अनुष्टुप् ) तुम्हा मी स्पष्ट ते केले मला जे पुसिले तुम्ही । चतुरे करणे काय मृत्यूच्या समयी भले ॥ १ ॥
भवान् - आपण - यत् - जे - मनुष्येषु - मनुष्यांमध्ये - म्रियमाणानां - मृत्यु समीप आहे ज्यांच्या अशा - च - आणि - मनीषिणां - विद्वान् - नृणां - मनुष्यांबद्दल - मम - मला - पृष्टवान् - विचारले - एतत् - हे - एवं- याप्रमाणे - निगदितं - सांगितले ॥१॥
श्रीशुक म्हणाले - परीक्षिता, तू मला जे विचारले होतेस की, मृत्यूसमयी बुद्धीमान मनुष्याने काय केले पाहिजे, त्याचे उत्तर मी तुला दिले. (१)
ब्रह्मवर्चसकामस्तु यजेत ब्रह्मणस्पतिम् ।
इन्द्रं इन्द्रियकामस्तु प्रजाकामः प्रजापतीन् ॥ २ ॥
शक्तिसाठी पुजा इंद्र ब्रह्मतेजा बृहस्पती । संतती हवितो त्याने उपवासा प्रजापती ॥ २ ॥
ब्रह्मवर्चसकामः - ब्रह्मतेजाची इच्छा करणाराने - तु - तर - ब्रह्मणस्पतिं - वेदाधिपति ब्रह्मदेवाला - इन्द्रियकामः - इन्द्रियांना बळकटी यावी अशी इच्छा करणाराने - तु - तर - इन्द्रं - इंद्राला - प्रजाकामः - संततीची इच्छा करणाराने - प्रजापतीन् - दक्षादि प्रजापतींना - यजेत - पूजावे ॥२॥
ब्रह्मतेजाची इच्छा करणार्याने ब्रह्मदेवाची, इंद्रियांच्या विशेष शक्तीची इच्छा करणार्याने इंद्राची आणि संतानप्राप्तीची लालसा असेल, त्याने प्रजापतीची उपासना करावी. (२)
देवीं मायां तु श्रीकामः तेजस्कामो विभावसुम् ।
वसुकामो वसून् रुद्रान् वीर्यकामोऽथ वीर्यवान् ॥ ३ ॥ अन्नाद्यकामस्तु अदितिं स्वर्गकामोऽदितेः सुतान् । विश्वान् देवान् राज्यकामः साध्यान् संसाधको विशाम् ॥ ४ ॥ आयुष्कामोऽश्विनौ देवौ पुष्टिकाम इलां यजेत् । प्रतिष्ठाकामः पुरुषो रोदसी लोकमातरौ ॥ ५ ॥
लक्ष्मीच्यासाठि ती माया तेजासाठीच अग्नि तो । धनासाठी वसू आणि शौर्यार्थ रूद्र पूजिणे ॥ ३ ॥ अदिती बहु अन्नासी स्वर्गासाठी तिचे सुत । राज्यार्थे विश्वदेवांना प्रजावश्यार्थ देवता ॥ ४ ॥ अश्विनीकुमारांना त्या आयुष्यासाठी पूजिणे । लोकामाता प्रतिष्ठेसी पुष्ट्यर्थ पृथिवी नभे ॥ ५ ॥
श्रीकामः - ऐश्वर्याची इच्छा असणार्याने - तु - तर - मायां - प्रकृतिरूपिणी अशा - देवीं - दुर्गादेवीला - तेजस्कामः - तेजाची इच्छा करणार्याने - विभावसुं - अग्नीला - वसुकामः - धनाची इच्छा करणार्याने - वसून् - वसूंना - अथ - तसेच - वीर्यकामः - पराक्रमाची इच्छा करणार्या - वीर्यवान् - पराक्रमी पुरुषाने - रुद्रान् - अकरा रुद्रांना - अन्नाद्यकामः - अन्नादि भक्ष्य पदार्थांना इच्छिणार्याने - तु - तर - अदितिं - अदितीला - स्वर्गकामः - स्वर्गाला इच्छिणार्याने - अदितेः - अदितीच्या - सुतान् - पुत्रांना म्हणजे देवांना किंवा बारा सूर्यांना - राज्यकामः - राज्याची इच्छा करणार्याने - विश्वान् देवान् - विश्वदेवांना - विशां - मनुष्यांना - संसाधकः - वश करु इच्छिणार्याने - साध्यान् - साध्यनामक देवांना - आयुष्कामः - दीर्घायुष्य इच्छिणार्याने - अश्विनौ देवौ - अश्विनीकुमारांना - पुष्टिकामः - शरीर धष्टपुष्ट होण्याची इच्छा करणार्याने - इलां - पृथ्वीला - प्रतिष्ठाकामः - दृढ असे स्थान प्राप्त होण्याची इच्छा करणार्या - पुरुषः - पुरुषाने - लोकमातरौ - सर्व त्रैलोक्याला पोषक अशा - रोदसी - द्यावापृथ्वीनामक देवतांना - यजेत् - पूजावे ॥३-५॥
ज्याला लक्ष्मी पाहिजे असेल त्याने दुर्गा देवीची, तेजाची इच्छा असणार्याने अग्नीची, धन पाहिजे असेल त्याने वसूंची आणि ज्या प्रभावशाली पुरुषाला वीरता पाहिजे असेल, त्याने रुद्रांची उपासना केली पाहिजे. (३)
ज्याला पुष्कळ अन्नधान्याची इच्छा असेल त्याने अदितीची, स्वर्गकामना असणार्याने अदितिपुत्रांची, राज्याची अभिलाषा असेल त्याने विश्वेदेवांची आणि आपल्या प्रजेला अनुकूल ठेवण्याची इच्छा करणार्याने साध्य देवांची आराधना केली पाहिजे. (४) दीर्घायुष्याची इच्छा असणार्याने पृथ्वीची आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी अशी मनीषा असेल त्याने लोकमाता पृथ्वी आणि आकाशाची उपासना केली पाहिजे. (५)
रूपाभिकामो गन्धर्वान् स्त्रीकामोऽप्सर उर्वशीम् ।
आधिपत्यकामः सर्वेषां यजेत परमेष्ठिनम् ॥ ६ ॥
गंधर्वा रूप इच्छेने पत्निप्राप्त्यर्थ उर्वशी । सर्वांचा स्वामि होण्यासी ब्रह्म्यासीच उपासणे ॥ ६ ॥
रूपाभिकामः - सौंदर्यप्राप्तीची इच्छा करणार्याने - गन्धर्वान् - गंधर्वांना - स्त्रीकामः - स्त्रीची इच्छा करणार्याने - अप्सरउर्वशीम् - उर्वशी नावाच्या अप्सरेला - सर्वेषां - सर्वांच्यावर - आधिपत्यकामः - सत्ता चालविण्याची इच्छा करणार्याने - परमेष्ठिनं - ब्रह्मदेवाला - यजेत् - पूजावे ॥६॥
सौंदर्याच्या इच्छुकांनी गंधर्वांची, पत्नीच्या प्राप्तीसाठी उर्वशी अप्सरेची, आणि सर्वांचा स्वामी होण्यासाठी ब्रह्मदेवाची आराधना केली पाहिजे. (६)
यज्ञं यजेत् यशस्कामः कोशकामः प्रचेतसम् ।
विद्याकामस्तु गिरिशं दाम्पत्यार्थ उमां सतीम् ॥ ७ ॥
यशार्थ करणे यज्ञ कोषासाठी वरूण तो । विद्यार्थे शंकराध्यावे पत्निप्रेमार्थ पार्वती ॥ ७ ॥
यशस्कामः - कीर्तीला इच्छिणार्याने - यज्ञं - विष्णूला - कोशकामः - द्रव्यभांडाराला इच्छिणार्याने - प्रचेतसम् - वरुणाला - विद्याकामः - विद्येला इच्छिणार्याने - तु - तर - गिरिशं - शंकराला - दाम्पत्यार्थ - पतिपत्नीमधील प्रेमाची इच्छा करणार्याने - सतीं - साध्वी - उमां - पार्वतीला - यजेत् - पूजावे ॥७॥
ज्याला यशप्राप्तीची इच्छा असेल त्याने यज्ञपुरुषाची, अपार संपत्तीची इच्छा असेल त्याने वरुणाची, विद्याप्राप्तीची आकांक्षा असणार्याने भगवान शंकरांची आणि पति-पत्नीमध्ये परस्पर प्रेम कायम ठेवण्यासाठी पार्वतीची उपासना केली पाहिजे. (७)
धर्मार्थ उत्तमश्लोकं तन्तुं तन्वन् पितॄन् यजेत् ।
रक्षाकामः पुण्यजनान् ओजस्कामो मरुद्गणान् ॥ ८ ॥
धर्मप्राप्त्यर्थ भगवान् पितरे वंश रक्षिण्या । रक्षणा यक्ष ते जाणा बलासाठी मरुद्गण ॥ ८ ॥
धर्मार्थः - धर्माची प्रार्थना करणार्याने - उत्तमश्लोकं - उत्तम कीर्तीच्या विष्णूला - तंतुं - पुत्रादिक प्रजातंतूला - तन्वन् - वाढविण्याची इच्छा करणार्याने - पितृन् - बर्हिषदादि पितरांना - रक्षाकामः - बाधेपासून रक्षणाची इच्छा करणार्याने - पुण्यजनात् - यक्षांना - ओजस्कामः - बलाची इच्छा करणार्याने - मरुद्गणान् - मरुत् नामक देवांना - यजेत् - पूजावे ॥८॥
धर्माचरणात प्रगती होण्यासाठी भगवान विष्णूंची, वंशपरंपरेचे रक्षण होण्यासाठी पितरांची, पीडांपासून संरक्षण होण्यासाठी यक्षांचे आणि बलवान होण्यासाठी मरुद्गणांची आराधना केली पाहिजे. (८)
राज्यकामो मनून् देवान् निर्ऋतिं त्वभिचरन् यजेत् ।
कामकामो यजेत्सोमं अकामः पुरुषं परम् ॥ ९ ॥
मन्वंतरास राज्यार्थ अभिचारार्थ निऋति । भोगार्थ चंद्रमा ध्यावा निष्कामे पुरुषोत्तम ॥ ९ ॥
राज्यकामः - राज्याला इच्छिणार्याने - देवान् - देदीप्यमान अशा - मनून् - स्वायंभुवप्रमुख चवदा मनूंना - अभिचरन् - जारण मारणादि शत्रुनाशक क्रिया करण्याची इच्छा करणार्याने - तु - तर - निऋतिं - राक्षसाला - यजेत् - पूजावे - कामकामः - विषयभोग इच्छिणार्याने - सोमं - चंद्राला - अकामः - कोणतीच इच्छा न करणार्याने - परं - श्रेष्ठ - पुरुषं - परमेश्वराला - यजेत् - पूजावे. ॥९॥
राज्यासाठी मन्वन्तरांचे अधिपती देवांना, जादूटोणा करता येण्यासाठी निर्ऋतीला, निरनिराळ्या उपभोगांसाठी चंद्राला आणि निष्कामता प्राप्त करण्यासाठी परमपुरुष नारायणांना भजले पाहिजे. (९)
अकामः सर्वकामो वा मोक्षकाम उदारधीः ।
तीव्रेण भक्तियोगेन यजेत पुरुषं परम् ॥ १० ॥
निष्काम बुद्धिवंताला जर तो मोक्षची हवा । भक्तियोगातुनी त्याने भजावा पुरुषोत्तम ॥ १० ॥
अकामः - ज्याला इच्छाच नाही असा - सर्वकामः - सर्वच गोष्टींची इच्छा करणारा असा - वा - किंवा - उदारधीः - उदार बुद्धीचा - मोक्षकामः - जो मुमुक्षु त्याने - तीव्रेण - तीक्ष्ण - भक्तियोगेन - भक्तियोगाने - परं - श्रेष्ठ - पुरुषं - परमेश्वराला - यजेत् - पूजावे. ॥१०॥
आणि जो बुद्धिमान पुरुष आहे, तो कामनारहित असो, सर्वकामना युक्त असो किंवा मुमुक्षू असो, त्याने तीव्र भक्तियोगाने पुरुषोत्तम भगवंतांची आराधना केली पाहिजे. (१९)
एतावानेव यजतां इह निःश्रेयसोदयः ।
भगवत्यचलो भावो यद्भागवतसङ्गतः ॥ ११ ॥
सर्व भक्तास ते हीत संताच्या संगतीत की । ज्यातुनी भगवंताचे लाभते दृढ प्रेम ते ॥ ११ ॥
यत् - जो - भागवतसंगतः - भगवद्भक्तांचा समागम घडून - भगवति - परमेश्वराचे ठिकाणी - अचलः - अढळ - भावः - भक्ती - एतावान् - एवढा - एव - च - इह - येथे - यजतां - परमेश्वराच्या उपासकांचा - निःश्रेयसोदयः - आत्यंतिक कल्याणाचा लाभ होय. ॥११॥
जेवढे उपासक आहेत, त्यांनी भगवंतांच्या प्रेमी भक्तांची संगत धरून भगवंतांचे अविचल प्रेम प्राप्त करावे, यातच त्यांचे सर्वश्रेष्ठ हित आहे. (११)
ज्ञानं यदाप्रतिनिवृत्तगुणोर्मिचक्रम् ।
आत्मप्रसाद उत यत्र गुणेष्वसङ्गः । कैवल्यसम्मतपथस्त्वथ भक्तियोगः । को निर्वृतो हरिकथासु रतिं न कुर्यात् ॥ १२ ॥
(वसंततिलका) त्या संतसंगति मधे हरिकीर्तनाने ते ज्ञान दुर्लभ असे मिळते जगाला । संसारसागर भयीं मग लाटमाला होऊनि शांत तयि त्यास मिळेचि मोद होऊनि ते हृदय शुद्ध सरेचि मोह तो भक्ति योग मग मोक्षचि होय साचा ॥ लागे तया चटक त्यां भगवत् कथेची याहूनि काय दुसरे मग लाभ व्हावे ॥ १२ ॥
यत् - ज्या ठिकाणी - आप्रतिनिवृत्तगुणोर्मिचक्रं - सर्वप्रकारे नष्ट झाला आहे त्रिगुणोत्पन्न कामादि लाटांचा समूह ज्यामुळे असे - ज्ञानं - ज्ञान - उत - आणखी - यत्र - जेथे - गुणेषु - त्रिगुणांमध्ये - असङ्गः - आसक्तीरहित - आत्मप्रसादः - आत्म्याला शांती - अथ - नंतर - तु - तर - कैवल्यसंमतपथः - मोक्षाप्रमाणे मानलेला आहे मार्ग ज्याचा असा - भक्तियोगः - भक्तियोग - निर्वृतः - सुखी - कः - कोण - हरिकथासु - भगवंताच्या कथांमध्ये - रतिं - प्रीतीला - न कुर्यात् - करणार नाही. ॥१२॥
अशा पुरुषांच्या संगतीत ज्या भगवंतांच्या लीला-कथांचे कथन होते, त्यामुळे दुर्लभ अशा ज्ञानाची प्राप्ती होते. त्या ज्ञानामुळे संसारसागरात त्रिगुणमय एकसारख्या उठणार्या तरंगांच्या बसणार्या थपडा शांत होतात, हृदय शुद्ध होऊन आनंदाचा अनुभव येऊ लागतो, इंद्रियांची विषयांत आसक्ती राहात नाही आणि मोक्षाचा सर्वसंमत मार्ग जो भक्तियोग तो प्राप्त होतो. भगवंतांच्या अशा रसपूर्ण कथांची एकदा गोडी लागल्यावर त्यांच्यावर प्रेम न करणारा कोण असेल बरे ? (१२)
शौनक उवाच -
इत्यभिव्याहृतं राजा निशम्य भरतर्षभः । किमन्यत् पृष्टवान् भूयो वैयासकिं ऋषिं कविम् ॥ १३ ॥
शौनकांनी विचरले - ( अनुष्टुप् ) शुकांचे ऐकुनी ऐसे विचारी काय तो नृप । सर्वज्ञ असुनी श्रेष्ठ मधुरा वाणि ती असे ॥ १३ ॥
भरतर्षभः - भरतश्रेष्ठ - राजा - परीक्षित राजा - इति - याप्रमाणे - अभिव्याहृतं - भाषणाला - निशम्य - ऐकून - भूयः - पुनः - अन्यत् - दुसरे - कविं - शब्दब्रह्मात निष्णात अशा - ऋषिं - ब्रह्मस्वरूप दाखविणार्या - वैयासकिं - व्यासपुत्र शुकाचार्याला - किं - काय - पृष्टवान् - विचारिता झाला. ॥१३॥
शौनक म्हणाले - राजा परीक्षिताने हे ऐकून सर्वज्ञ व्यासपुत्र व कवी असणार्या शुकाचार्यांना आणखी काय विचारले ? (१३)
एतद् शुश्रूषतां विद्वन् सूत नोऽर्हसि भाषितुम् ।
कथा हरिकथोदर्काः सतां स्युः सदसि ध्रुवम् ॥ १४ ॥
तुम्ही ते जाणता सारे आम्ही तो श्रवणोत्सुक । संतांच्या सगळ्या गोष्टी मिळती श्रीहरी प्रती ॥ १४ ॥
विद्वन् - हे ज्ञानसंपन्न - सूत - सूता - एतत् - हे - शुश्रूषतां - ऐकण्याची इच्छा करणार्या अशा - नः - आम्हाला - भाषितुं - सांगण्यास - अर्हसि - योग्य आहेस - ध्रुवं - खरोखर - सतां - साधूंच्या - सदसि - सभेत - हरिकथोदर्काः - ज्यांचे पर्यवसान भगवंताच्या कथेतच होणारे आहे अशा - कथाः - गोष्टी - स्युः - चालू असतात. ॥१४॥
विद्वन सूत महोदय ! त्यांच्यामध्ये झालेला संवाद आम्ही मोठ्या प्रेमाने ऐकू इच्छितो. कृपा करून आपण तो अम्हांला ऐकवावा. कारण संतांच्या सभेत अशाच गोष्टी चालतात की, ज्यांचे पर्यवसान भगवंतांच्या रसमय कथामध्येच होते. (१४)
स वै भागवतो राजा पाण्डवेयो महारथः ।
बालक्रीडनकैः क्रीडन् कृष्णक्रीडां य आददे ॥ १५ ॥
भगवद्भक्त तो राजा पांडूचा वंशनंदन । शैशवी खेळता खेळ कृष्णलीलाचि खेळला ॥ १५ ॥
वै - खरोखर - सः - तो - भागवतः - भगवद्भक्ति करणारा - पाण्डवेयः - पांडवांच्या कुळात उत्पन्न झालेला - महारथः - महारथी - राजा - परीक्षित राजा - यः - जो - बालक्रीडनकैः - लहानपणाची खेळणी घेऊन - क्रीडन् - खेळत असता सुद्धा - कृष्णक्रीडां - श्रीकृष्णासंबंधीच्या खेळण्याला - आददे - ग्रहण करीत असे. ॥१५॥
पांडुवंशी महारथी राजा परीक्षित महान भगवद्भक्त होता. लहानपणी खेळतानासुद्धा श्रीकृष्णलीलेतच त्याला गोडी होती. (१५)
वैयासकिश्च भगवान् वासुदेवपरायणः ।
उरुगायगुणोदाराः सतां स्युर्हि समागमे ॥ १६ ॥
शुकही जन्मता तैसे कृष्णभक्तिपरायण । असेल जाहली विव्य चर्चा ती हरिकीर्तनी ॥ १६ ॥
च - आणि - भगवान् - सर्वगुणसंपन्न - वैयासकिः - व्यासपुत्र शुकाचार्य - वासुदेवपरायणः - परमेश्वरभजनात तल्लीन - हि - कारण - सतां - साधूंची - समागमे - संगति झाली असता - उरुगायगुणोदाराः - अनंत कीर्ती अशा परमेश्वराच्या गुणांनी मोठेपणाला प्राप्त झालेल्या गोष्टी - स्युः - होतात. ॥१६॥
भगवन्मय असलेले श्रीशुक जन्मापासूनच भगवत्परायण आहेत. अशा संतांच्या समागमात भगवंतांच्या मंगलमय गुणांच्या दिव्य कथा होत असल्या पाहिजेत. (१६)
आयुर्हरति वै पुंसां उद्यन्नस्तं च यन्नसौ ।
तस्यर्ते यत्क्षणो नीत उत्तमश्लोकवार्तया ॥ १७ ॥
श्रवणी भजनी काळ त्यांचा तो नित्य जातसे । अन्यांचे हरितो काळ आयुष्य हळुवार की ॥ १७ ॥
उद्यन् - उगवणारा - च - आणि - अस्तं - अस्ताला - यन् - जाणारा - असौ - हा सूर्य - यत्क्षणः - जो काळ - उत्तमश्लोकवार्तया - भगवद्रुणानुवादश्रवणाने - नीतः - नेलेला - तस्य - त्या काळाच्या - ऋते - शिवाय - वै - खरोखर - पुंसां - पुरुषांचे - आयुः - आयुष्य - हरति - हिरावून घेतो. ॥१७॥
भगवंतांच्या गुणांचे कीर्तन किंवा श्रवण यांमध्ये ज्यांचा वेळ जातो, त्या व्यतिरिक्त इतरांचे आयुष्य हा सूर्य उदयास्ताबरोबर हिरावून घेत असतो. (१७)
तरवः किं न जीवन्ति भस्त्राः किं न श्वसन्त्युत ।
न खादन्ति न मेहन्ति किं ग्रामपशवोऽपरे ॥ १८ ॥
वृक्ष ते वाढती जागी भाताही श्वास घेतसे । मैथुनी रमती खाती ऐसे कित्येक जीव ते ॥ १८ ॥
तरवः - वृक्ष - किं न जीवन्ति - जगत नाहीत काय ? - उत - किंवा - भस्त्राः - भाते - किं न श्वसन्ति - श्वासोच्छ्वास करीत नाहीत काय ? - अपरे - दुसरे - ग्रामपशवः - गावात राहणारे गाय, बैल वगैरे पशु - न खादन्ति - खात नाहीत - न मेहन्ति किं - मूत्रोत्सर्ग करीत नाहीत काय ? ॥१८॥
वृक्ष जिवंत राहात नाहीत का ? गावातील अन्य प्राणी मनुष्यांप्रमाणे खात-पीत किंवा मैथुन करीत नाहीत काय ? (१८)
श्वविड्वराहोष्ट्रखरैः संस्तुतः पुरुषः पशुः ।
न यत्कर्णपथोपेतो जातु नाम गदाग्रजः ॥ १९ ॥
सूकरे गाढवे श्वान पिती खाती नि झोपती । कीर्तनाविण तो जीव व्यर्थ तैसाचि जातसे ॥ १९ ॥
गदाग्रजः - श्रीकृष्ण - जातु नाम - कधीही - यत्कर्णपथोपेतः - ज्याच्या कर्णमार्गात श्रवणद्वारा प्रविष्ट झालेला - न - नाही असा - पशुः - पशुतुल्य - पुरुषः - मनुष्य - श्वविड्वराहोष्ट्रखरैः - कुत्रा, डुकर, उंट व गाढव ह्यांच्याशी - संस्तुतः - बरोबरीचा होय. ॥१९॥
ज्यांच्या कानांनी भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकली नाही, ती पशुतुल्य माणसे पशु, कुत्रे, डुक्कर, उंट आणि गाढवे यांच्यासारखीच होत. (१९)
बिले बतोरुक्रमविक्रमान् ये
न शृण्वतः कर्णपुटे नरस्य । जिह्वासती दार्दुरिकेव सूत न चोपगायत्युरुगायगाथाः ॥ २० ॥
(इंद्रवज्रा) जे ना कधी ऐकति कानि वार्ता ना कर्ण त्याचे बिळ तेचि जाणा । गायी न जी जीभ कधी कथेला बोले जशी बेडकि अर्थहीन ॥ २० ॥
सूत - हे सूता - उरुक्रमविक्रमान् - मोठा पराक्रम करणार्या परमेश्वराच्या पराक्रमांना - न शृण्वतः - श्रवण न करणार्या - नरस्य - मनुष्याची - ये - जी - कर्णपुटे - कानाची दोन पुडे - बत - खरोखर - बिले - बिळे होत - च - आणि - उरुगायगाथाः - अनंत कीर्ती अशा श्रीकृष्णाच्या चरित्रांना - न उपगायति - गात नाही - असती - दुष्ट - जिह्वा - जीभ - दार्दुरिका इव - बेडकाच्या जिभेप्रमाणे होय. ॥२०॥
जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकत नाही, त्याचे कान म्हणजे बिळेच होत. जी जीभ भगवंतांच्या लीलांचे गायन करीत नाही ती, बेडकाच्या जिभेप्रमाणे डराँव डराँव करणारीच होय. (२०)
भारः परं पट्टकिरीटजुष्टं
अप्युत्तमाङ्गं न नमेन् मुकुंदम् । शावौ करौ नो कुरुते सपर्यां हरेर्लसत्काञ्चनकङ्कणौ वा ॥ २१ ॥
जे शीर नाही झुकले पदासी ओझेचि डोके सजुनी शरीरा । जो हात पूजा न करी कधीही सूवर्ण ल्याले परि प्रेत ते की ॥ २१ ॥
पटटकिरीटजुष्टम् अपि - पागोटे, मुकुट ह्यांनी युक्त असेही - उत्तमाङगं - मस्तक - मुकुन्दं - श्रीकृष्णाला - न नमेत् - नमस्कार करणार नाही तर - परं - केवळ - भारः - ओझ्याप्रमाणे होय - वा - किंवा - लसत्कञ्चनकङकणौ - तेजस्वी सोन्याच्या कंकणांनी शोभणारे - करौ - दोन हात - हरेः - भगवंताच्या - सपर्यां - पूजेला - नो कुरुतः - करणार नाहीत तर - शावौ - प्रेताच्या हाताप्रमाणे होत. ॥२१॥
जे मस्तक भगवंतांच्या चरणांवर नमत नाही, ते रेशमी वस्त्रांनी वेष्टित व मुकुट घातलेले असले तरी केवळ ओझेच होय. जे हात भगवंतांची सेवा-पूजा करीत नाहीत, ते सुवर्णकंकणांनी युक्त असले तरी मुडद्याच्या हातांप्रमाणेच होत. (२१)
बर्हायिते ते नयने नराणां
लिङ्गानि विष्णोर्न निरीक्षतो ये । पादौ नृणां तौ द्रुमजन्मभाजौ क्षेत्राणि नानुव्रजतो हरेर्यौ ॥ २२ ॥
ते मोरपंखापरि शुष्क डोळे जे ना कधी पाहति तीर्थ मूर्ती । यात्रेस जे पायि कधी न जाती मुळ्याचि त्या झाड धरूनि ठेल्या ॥ २२ ॥
ये - जे - विष्णोः - श्रीकृष्णाच्या - लिङगानि - मूर्तींना - न निरीक्षतः - पहात नाहीत - ते - ते - नराणां - मनुष्यांचे - नयने - दोन डोळे - बर्हायिते - मोराच्या पिसार्यावरील डोळ्याप्रमाणे होत. - यौ - जे - हरेः - भगवंताच्या - क्षेत्राणि - द्वारका, पंढरपूर, जगन्नाथपुरी वगैरे पवित्र स्थानांना - न अनुव्रजतः - गमन करीत नाहीत - तौ - ते - नृणां - मनुष्यांचे - पादौ - दोन पाय - द्रुमजन्मभाजौ - झाडांच्या जन्माप्रमाणे जन्म घेणारे होत. ॥२२॥
जे डोळे भगवंतांची निवासस्थाने पाहात नाहीत, ते मोरपिसांवरील डोळ्यांसारखे निरर्थक होत. जे भगवंतांच्या स्थानांची यात्रा करीत नाहीत, ते माणसांचे पाय झाडांसारखेच होत. (२२)
जीवन् शवो भागवताङ्घ्रिरेणुं
न जातु मर्त्योऽभिलभेत यस्तु । श्रीविष्णुपद्या मनुजस्तुलस्याः श्वसन् शवो यस्तु न वेद गन्धम् ॥ २३ ॥
ते जीत प्रेतासम घोर जाणा जे ना कधी वंदिती पायधूळ । निर्माल्य ऐशा तुलसी दळाचा ज्या गंध ना तो जितप्रेत जाणा ॥ २३ ॥
यः - जो - मर्त्यः - मनुष्य - तु - तर - जातु - कधीसुद्धा - भागवताङ्घ्रिरेणुं - भगवंताच्या पायधुळीला - न अभिलभेत - स्वीकार करणार नाही - जीवन् - जिवंत असूनही - शवः - प्रेताप्रमाणे होय - यः - जो - मनुजः - मनुष्य - तु - तर - श्रीविष्णुपदयाः - श्रीकृष्णाच्या पायावर असणार्या - तुलस्याः - तुळशीपत्राच्या - गन्धं - वासाला - न वेद - जाणत नाही तो - श्वसन - श्वासोच्छ्वास करीत असूनही - शवः - प्रेत होय. ॥२३॥
ज्या मनुष्याने भगवत्प्रेमी संतांच्या चरणांची धूळ मस्तकावर धारण केली नाही, तो जिवंत असूनही मेल्यासारखाच होय. ज्या मनुष्याने भगवंतांच्या चरणांवर अर्पण केलेल्या तुलसीपत्राचा सुगंध घेतला नाही, तो श्वास घेत असूनही श्वासरहित शवासारखाच होय. (२३)
तदश्मसारं हृदयं बतेदं
यद्गृह्यमाणैर्हरिनामधेयैः । न विक्रियेताथ यदा विकारो नेत्रे जलं गात्ररुहेषु हर्षः ॥ २४ ॥
ओसंडते की हृदयात प्रेम ऐकून श्रीकृष्ण कथामृताला । आनंदअश्रू नयनात येता रोमंचता मोद भरोनि येतो ॥ २४ ॥
तत् - ते - इदं - हे - हृदयं - अंतःकरण - बत - खरोखर - अश्मसारं - दगडाप्रमाणे कठीण होय - यत् - कारण - गृह्यमाणैः - घेतलेल्या - हरिनामधेयैः - श्रीकृष्णाच्या नावांनी - न विक्रियेत - विकारयुक्त होत नाही - अथ - आणि - यदा - जेव्हा - विकारः - परिणाम होतो - नेत्रे - डोळ्यात - जलं - भक्तीने प्राप्त झालेले प्रेमाश्रू - गात्ररुहेषु - शरीरावरील केसांवर - हर्षः - उभे राहण्याची क्रिया म्हणजे रोमांच. ॥२४॥
सूत महोदय ! भगवंतांच्या मंगलमय नामाचे श्रवण - कीर्तन केल्यावरही ज्याचे हृदय विरघळून जात नाही, ते हृदय नसून लोखंडच होय. ज्यावेळी हृदय विरघळते, त्यावेळी डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांच उत्पन्न होतात. (२४)
अथाभिधेह्यङ्ग मनोऽनुकूलं
प्रभाषसे भागवतप्रधानः । यदाह वैयासकिरात्मविद्या विशारदो नृपतिं साधु पृष्टः ॥ २५ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वितीयस्कंधे तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
मधूर बोला वदता तुम्ही या भरून वाहे हृदयात सारे । पुसे शुकांना मग भूप काय सांगा जसे चिंतन तेथ झाले ॥ २५ ॥ ॥ इति श्रीमद्भगवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ तिसरा अध्याय हा ॥ २ ॥ ३ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
अङग - हे सूता - मनोनुकूलं - मनाजोगे - प्रभाषसे - बोलतोस - अथ - आता ह्यापुढे - भागवतप्रधानः - भगवद्भक्तांत श्रेष्ठ असा - आत्मविदयाविशारदः - व आत्मज्ञानांत पारंगत - वैयासकिः - व्यासपुत्र शुकाचार्य - साधु - चांगल्या रीतीने - पृष्टः - विचारला गेला असता - नृपतिं - परीक्षित राजाला - यत् - जे - आह - बोलला - अभिधेहि - ते सांग. ॥२५॥
सूत महोदय ! आपण आमच्या मनाला आवडेल, असे बोलता. म्हणून भगवंतांचे परम भक्त, आत्मविद्येत प्रवीण अशा श्रीशुकदेवांनी परीक्षिताने सुंदर प्रश्न विचारल्यावर जे काही सांगितले, ते आपण आम्हांला ऐकवा. (२५)
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां |