श्रीमद् भागवत पुराण
द्वितीयः स्कन्धः
द्वितीयोऽध्यायः

योगिनां योगधारणयोत्क्रमण प्रकारस्य वर्णनं
सद्योमुक्तिक्रममुक्त्योर्निरूपणं च -

भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा तसेच क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती वर्णन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
एवं पुरा धारणयाऽऽत्मयोनिः
    नष्टां स्मृतिं प्रत्यवरुध्य तुष्टात् ।
तथा ससर्जेदममोघदृष्टिः
    यथाप्ययात् प्राक् व्यवसायबुद्धिः ॥ १ ॥
शुकदेवजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
या धारणेनेचि अमोघ दृष्टी
    निश्चेय बुद्धि हि ब्रह्म्या मिळाली ।
म्हणोनि तो विश्व जशास तैसे
    झाला रचीता प्रलयोत्तरे ही ॥ १ ॥

एवं - याप्रमाणे धारणया - धारणेच्या योगाने तुष्टात् - संतुष्ट झालेल्या श्रीहरीपासून पुरा - प्रलयकाली नष्टां - नाहीशा झालेल्या स्मृतिं - बुद्धीला प्रत्यवरुद्‌ध्य - परत मिळवून व्यवसायबुद्धिः - निश्चयात्मक आहे बुद्धि ज्याची असा अमोघदृष्टिः - सत्य आहे ज्ञानदृष्टी असा आत्मयोनिः - ब्रह्मदेव इदं - हे जग अप्ययात् प्राक् - प्रलय होण्याच्या पूर्वी यथा - जसे होते तथा - तसे ससर्ज - उत्पन्न करिता झाला. ॥१॥
श्रीशुक म्हणाले - सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने याच धारणेद्वारे प्रसन्न झालेल्या भगवंतांपासून लुप्त झालेली सृष्टिविषयक स्मृती प्राप्त करून घेतली होती. यामुळे त्यांची दृष्टी यथार्थ आणि बुद्धी निश्चयात्मक झाली. त्यायोगे त्यांनी प्रलयापूर्वीप्रमाणेच या जगताची निर्मिती केली. (१)


शाब्दस्य हि ब्रह्मण एष पन्था
    यन्नामभिर्ध्यायति धीरपार्थैः ।
परिभ्रमन् तत्र न विन्दतेऽर्थान्
    मायामये वासनया शयानः ॥ २ ॥
ती वेदशैली नकळे कुणाला
    स्वर्गादि नावात फसोनि जाती ।
स्वप्नी सुखाच्या भटकेचि जीव
    माया सुखाते नच भेटु देते ॥ २ ॥

शाब्दस्य - शब्दमय अशा ब्रह्मणः - वेदाचा एषः - हा पंथाः - मार्ग हि - खरोखर धीः - बुद्धि अपार्थैः - अर्थशून्य अशा नामाभिः - स्वर्गादि नावांच्या योगाने यत् - ज्याला ध्यायति - चिंतिते मायामये - मायिक अशा तत्र - त्या मार्गामध्ये वासनया - इच्छा उत्पन्न झाल्यामुळे शयानः - झोपेत जणू स्वप्न पहात आहे असा परिभ्रमन् - भ्रमण करित असता अर्थान् - मनोरथांना न विन्दते - प्राप्त होत नाही. ॥२॥
वेदांची वर्णनशैलीही अशाच प्रकारची आहे की, लोकांची बुद्धी स्वर्ग आदि मिथ्या सुखाच्या फेर्‍यात अडकते, जीव तिथे सुखाच्या वासनेने स्वप्न पाहिल्यासारखा भटकत राहतो; पण त्या मायामय नगरीत कोठेच त्याला खर्‍या सुखाची प्राप्ती होत नाही. (२)


अतः कविर्नामसु यावदर्थः
    स्याद् अप्रमत्तो व्यवसायबुद्धिः ।
सिद्धेऽन्यथार्थे न यतेत तत्र
    परिश्रमं तत्र समीक्षमाणः ॥ ३ ॥
जे ज्ञानि त्यांनी करणे असे की
    त्या भोगणे वस्तु प्प्रयोजनीच ।
त्या लाभती दैवयोगे करोनी
    उपार्जनी तेहि नकोच कष्ट ॥ ३ ॥

अतः - यासाठी तत्र - त्याविषयी परिश्रमं - मोठे श्रम आहेत असे समीक्षमाणः - पूर्णपणे जाणणारा व्यवसायबुद्धिः - निश्चयात्मक आहे बुद्धि ज्याची असा अप्रमत्तः - सावधान कविः - विचारवान पुरुष नामसु - नामधारी भोग्य पदार्थांत यावदर्थः - कार्यापुरते मात्र स्यात् - रहावे अर्थे सिद्धे - कार्य सिद्ध झाले असता अन्यथा - विनाकारण तत्र - त्यासाठी न यतेत - यत्न करू नये. ॥३॥
म्हणून विद्वान पुरुषांनी विविध नावाच्या पदार्थांशी कामापुरताच व्यवहार केला पाहिजे. त्यांच्यामध्ये सार नाही असा बुद्धीचा निश्चय करून पूर्ण सावध राहावे. संसारातील पदार्थ विनासायास प्रारब्धानुसार मिळतात, हे लक्षात घेऊन त्यांच्या प्राप्तीसाठी व्यर्थ प्रयत्‍न करू नयेत. (३)


सत्यां क्षितौ किं कशिपोः प्रयासैः
    बाहौ स्वसिद्धे ह्युपबर्हणैः किम् ।
सत्यञ्जलौ किं पुरुधान्नपात्र्या
    दिग्वल्कलादौ सति किं दुकूलैः ॥ ४ ॥
लागे जमीनीवरि झोप छान
    पलंग का तो मग मेळवावा ।
बाहू असोनी मग यंत्र कां ते
    भांडे कशा ओंजळिं काम होते ।
न वस्त्र घेता जगतोचि जीव
    कशास तो आग्रह वस्त्र लेणे ॥ ४ ॥

हि - कारण क्षितौ सत्यां - पृथ्वी असता कशिपोः - शय्येची प्रयासैः किम् - खटपट कशाला बाहौ - आपले बाहु स्वसिद्धे - स्वतः सिद्ध असता उपबर्हणैः किम् - उशा कशाला अंजलौ - ओंजळ सति - असता पुरुधा - पुष्कळ प्रकारची अन्नपात्र्या किम् - अन्नाची भांडी कशाला दिग्वल्कलादौ - दिशा, वल्कले इत्यादी सति - असता दुकूलैः किम् - रेशमी वस्त्रे काय करावयाची. ॥४॥
जमिनीवर झोपता येते तर पलंगासाठी प्रयत्‍न कशाला ? हात आपोआप मिळाले आहेत तर उशा-तक्क्यांची काय आवश्यकता ? ओंजळीने काम भागते, तर पुष्कळशा भांड्यांची जरुरी काय ? वल्कले किंवा दिशारूप वस्त्र असताना इतर वस्त्रांची काय आवश्यकता ? (४)


चीराणि किं पथि न सन्ति दिशन्ति भिक्षां ।
    नैवाङ्‌घ्रिपाः परभृतः सरितोऽप्यशुष्यन् ।
रुद्धा गुहाः किमजितोऽवति नोपसन्नान् ।
    कस्माद् भजंति कवयो धनदुर्मदान्धान् ॥ ५ ॥
(वसंततिलका)
कां नेसण्यास नच चिंधुटि मार्गि लाभे
    लागेचि भूक तरि वृक्ष न दे फळे कां ।
पाणी हवे तर नद्या सुकल्याच नाही
    त्या राहण्या तरि तुम्हा नच बंद गुंफा ।
कां ना करी मग तुम्हा भगवंत रक्षा
    हे जाणतेहि करिती धन लोभ सारा ॥ ५ ॥

पथि - रस्त्यावर चीराणि - फाटकी वस्त्रे न संति किम् - नाहीत काय ? परभृतः - फळे देऊन दुसर्‍यांचे पोषण करणारे आङ्‌घ्रिपाः - वृक्ष भिक्षां - भिक्षा नैव दिशंति - देत नाहीतच काय ? सरितः - नदया अपि - सुद्धा अशुष्यन् - सुकल्या काय ? गुहाः - पर्वतातील आसर्‍याच्या जागा रुद्धाः किम् - अडून गेल्या काय ? अजितः - श्रीहरि उपसन्नान् - शरण गेलेल्यांना न अवति किम् - रक्षण करीत नाही काय ? कवयः - ज्ञाते पुरुष धनदुर्मदांधान् - धनाच्या योगाने झालेला जो गर्व त्याने अंध झालेल्यांना कस्मात् - कोणत्या कारणामुळे भजंति - भजतात. ॥५॥
अंग झाकण्यासाठी रस्त्यात चिरगुटे मिळत नाहीत का ? केवळ दुसर्‍यांसाठीच शरीर धारण करणारे वृक्ष भूक लागल्यावर फळाफुलांची भिक्षा देत नाहीत का ? पाण्याची आवश्यकता असणार्‍यांसाठी नद्या एकदम आटल्या आहेत की काय ? राहण्यासाठी गुहा बंद करण्यात आल्या आहेत काय ? आपल्याला शरण आलेल्यांचे भगवंत रक्षण करीत नाहीत काय ? अशा स्थितीत बुद्धिमान पुरुषसुद्धा धनाच्या नशेने धुंद झालेल्यांचे लांगूलचालन कां करतात ? (५)


एवं स्वचित्ते स्वत एव सिद्ध
    आत्मा प्रियोऽर्थो भगवान अनंतः ।
तं निर्वृतो नियतार्थो भजेत
    संसारहेतूपरमश्च यत्र ॥ ६ ॥
(इंद्रवज्रा)
येणे प्रकारे मग त्या विरक्ते
    आत्म्यास प्रीती भगवंति दयावी ।
त्या कीर्तने ना भय त्या भवाचे
    अज्ञान नाशासचि जीव पावे ॥ ६

एवं - याप्रमाणे स्वचित्ते - आपल्या अंतःकरणात स्वत एव सिद्धः - स्वतः सिद्ध असलेली प्रियः अर्थः - प्रिय अशी वस्तू अनंतः - नाशरहित भगवान् - परमेश्वर आत्मा - व्यापक आत्मा च - आणि यत्र - ज्या ठिकाणी संसारहेतूपरमः - संसाराला कारण झालेल्या अविदयेचा नाश तं - त्या भगवंताचे नियतार्थः - निश्चित आहे स्वरूप ज्याचे असा होऊन निर्वृतः - आनंदयुक्त होऊन भजेत - भजन करावे. ॥६॥
अशा प्रकारे विरक्त झाल्यानंतर आपल्या हृदयात नित्य विराजमान, स्वतःसिद्ध, आत्मस्वरूप, परम प्रियतम, परम सत्य जे अनंत भगवान आहेत, त्यांचे आनंदाने दृढ निश्चयपूर्वक भजन करावे. कारण त्यांचे भजन केल्यानेच जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात अडकविणार्‍या अज्ञानरूप कारणाचा नाश होतो. (६)


कस्तां त्वनादृत्य परानुचिन्तां
    ऋते पशून् असतीं नाम कुर्यात् ।
पश्यञ्जनं पतितं वैतरण्यां
    स्वकर्मजान् परितापान् जुषाणम् ॥ ७ ॥
पशूस ना हे परि माणसास
    संसार डोहात पडोनि दुःख ।
तरी न चिंती मनि कृष्णरूपा
    मनास मोकाट सोडोनि राही ॥ ७

वैतरण्यां - वैतरणीनामक नदीमध्ये पतितं - पडलेल्या जनं - प्राण्याला स्वकर्मजान् - आपल्याच कर्मानी उत्पन्न झालेल्या परितापान् - क्लेशांना जुषाणम् - भोगीत असलेला पश्यन् - पहात असलेला असा परानुचिंतां - श्रीहरीचे निरंतरचे चिंतन जीत आहे अशा तां - त्या धारणेला तु - तर अनादृत्य - झिडकारून पशुन् ऋते - पशूंवाचून कः नाम - कोण बरे असंतीं - विनाशी असे विषयांचे चिंतन युंज्यात् - करील. ॥७॥
या संसाररूप वैतरणी नदीत पडून आपली कर्मजन्य दुःखे भोगणार्‍या लोकांना पाहणारा पशूखेरीज दुसरा कोणता मनुष्य भगवंतांची मंगल धारणा सोडून, या नाशवंत विषयभोगात आपले चित्त भटकू देईल ? (७)


केचित् स्वदेहान्तर्हृदयावकाशे
    प्रादेशमात्रं पुरुषं वसन्तम् ।
चतुर्भुजं कञ्जरथाङ्गशङ्ख
    गदाधरं धारणया स्मरन्ति ॥ ८ ॥
कोणी स्वदेही हॄदयावकाशी
    प्रदेशमात्रे पुरुषास ध्याती ।
चतुर्भुजीं शंख गदा नि पद्म
    चक्रास घेवोनि पुढे उभा जो ॥ ८ ॥

केचित् - कित्येक स्वदेहांतर्हृदयावकाशे - आपल्या देहातील हृदयाकाशांत वसतं - राहणार्‍या कंजरथांगशंखगदाधरं - कमल, चक्र, शंख व गदा धारण करणार्‍या चतुर्भुजं - चार ज्याला भुजा आहेत अशा प्रादेशमात्रं - टीचभर प्रमाणाच्या पुरुषं - पुरुषाला धारणया - धारणायोगाने स्मरंति - स्मरतात. ॥८॥
काही साधक आपल्या शरीरातील हृदयाकाशात विराजमान असलेल्या, चार हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करणार्‍या, प्रादेशाएवढ्या भगवंतांच्या स्वरूपाची धारणा करतात. (८)


प्रसन्नवक्त्रं नलिनायतेक्षणं
    कदंबकिञ्जल्कपिशङ्गवाससम् ।
लसन्महारत्‍नहिरण्मयाङ्गदं
    स्फुरन् महारत्‍नकिरीटकुण्डलम् ॥ ९ ॥
उन्निद्रहृत्पङ्कजकर्णिकालये
    योगेश्वरास्थापितपादपल्लवम् ।
श्रीलक्षणं कौस्तुभरत्‍नकन्धरं
    अम्लानलक्ष्म्या वनमालयाचितम् ॥ १० ॥
विभूषितं मेखलयाऽङ्गुलीयकैः
    महाधनैर्नूपुरकङ्कणादिभिः ।
स्निग्धामलाकुञ्चितनीलकुन्तलैः
    विरोचमानाननहासपेशलम् ॥ ११ ॥
अदीनलीलाहसितेक्षणोल्लसद्
    भ्रूभङ्गसंसूचितभूर्यनुग्रहम् ।
ईक्षेत चिन्तामयमेनमीश्वरं
    यावन्मनो धारणयाऽवतिष्ठते ॥ १२ ॥
प्रसन्न चर्या कमलाक्ष मोठे
    नी केसराच्या परि पीतवस्त्र ।
शोभा भुजीं रत्‍नहि बाजुबंद
    किरीट रत्‍नांकित कुंडले ती ॥ ९ ॥
त्या योगियांच्या हृदयात शोभे
    जी कर्णिका तेथ पदास ठेवी ।
श्री वत्स चिन्हो हृदयासि शोभे
    जे पाहता रेख सुवर्ण भासे ।
गळ्यात कौस्तूभमणीहि शोभे
    वक्षास माला कमलो सुके ना ॥ १० ॥
ती मेखळाही कमरेस शोभे
    बोटात रत्‍नांकित अंगठया त्या ।
नुपूर पायी करकंकणे नी
    केसींबटा स्वच्छ सुहास्य चर्या ॥ ११
उन्मुक्त लीला बघताचि नेत्री
    वृष्टी करी तोचि अनुग्रहाची ।
ही धारणा स्थीर बसे मनाची
    त्या वेळपर्यंत प्रयत्‍न व्हावा ॥ १२ ॥

प्रसन्नवक्त्रं - हसतमुख नलिनायतेक्षणं - कमलासारखे विस्तृत ज्याचे नेत्र आहेत अशा कदंबकिंजल्कपिशंगवाससं - कदंबाच्या केसरासारखी पिंगटवर्णाची आहेत वस्त्रे ज्याची अशा लसन्महारत्नहिरण्मयांगदं - महारत्नांनी सुशोभित केलेली बाहुभूषणे धारण केली आहेत ज्याने अशा स्फुरन्महारत्नकिरीटकुंडलम् - चकाकणारी मोठी रत्नजडित कुंडले व मुकुट ही धारण केली आहेत ज्याने उन्निद्रहृत्पंकजकर्णिकालये - जागृत झालेल्या हृदयरूप कमलाच्या कोशामध्ये योगेश्वरास्थापितपादपल्लवम् - योगेश्वरांनी ज्याचे चरणरूप पल्लव स्थापिलेले आहेत अशा श्रीलक्ष्मणं - लक्ष्मी हेच ज्याचे चिन्ह आहे अशा कौस्तुभरत्नकंधरं - कौस्तुभमणि ज्याने कंठात घातलेला आहे अशा अम्लानलक्ष्म्या - जिची शोभा कधी म्लान होत नाही अशा वनमालया अञ्चितं - वनमालेने सुशोभित महाधनैः - मोठया मौल्यवान् अशा नूपुरकंकणादिभिः - चाळ, कांकणे इत्यादिकांनी मेखलया - कमरपटटयाने अंगुलीयकैः - अंगठयांनी विभूषितं - विशेष शोभणार्‍या स्निग्धामलाकुंचितनीलकुंतलैः - स्निग्ध, स्वच्छ, कुरळ्या व निळ्या अशा केशांनी विरोचमानाननहासपेशलं - शोभायमान झालेल्या मुखांतील हास्यामुळे सुंदर शोभणार्‍या अदीनलीलाहसितेक्षणोल्लसद्‌भ्रूभंग उदार हसणे, खेळणे व कटाक्ष फेकणे, संसूचितभूर्यनुग्रहं - याच्या योगेच ज्याचा मोठा अनुग्रह सूचित होत आहे अशा एनं - ह्या चिंतामयं - ध्यानाने प्रकट होणार्‍या ईश्वरं - ईश्वराला ईक्षेत - ध्यानपूर्वक अवलोकावे मनः - मन धारणया - धारणायोगाने अवतिष्ठते - स्थिर होते. ॥९-१२॥
त्यांच्या मुखावर प्रसन्नता झळकत आहे, नेत्र कमळासारखे विशाल आहेत, त्यांनी कदंबाच्या फुलातील केसराप्रमाणे पीतांबर धारण केला आहे, श्रेष्ठ रत्‍नजडित असे सोन्याचे बाजूबंद दंडांमध्ये शोभा देत आहेत, डोक्यावर अतिशय सुंदर मुकुट आहे आणि बहुमूल्य रत्‍नजडित अशी कुंडले कानात झगमगत आहेत. (९)
त्यांची चरणकमले योगेश्वरांच्या उमललेल्या हृदयकमलाच्या कोशावर विराजमान झालेली आहेत, त्यांच्या हृदयावर श्रीवत्स चिह्न आहे, गळ्यात कौस्तुभमणी शोभत आहे आणि वक्षःस्थळावर कधी न कोमेजणारी वनमाला रुळत आहे. (१०)
त्यांनी कमरेला मेखला, बोटामध्ये बहुमूल्य अंगठ्या, पायांमध्ये नूपुरे आणि हातांमध्ये कडी असे अलंकार धारण केलेले आहेत. त्यांच्या केसांच्या बटा अतिशय सुंदर, निर्मल, कुरळ्या आणि काळ्याभोर आहेत. त्यांचे मुख मंद हास्याने शोभून दिसत आहे. (११)
लीलेने केलेले मुक्त हास्य आणि कृपादृष्टियुक्त कटाक्षांनी ते भक्त जनांवर अपार कृपेचा वर्षाव करीत आहेत. जोपर्यंत अशा धारणेवर मन स्थिर होत नाही, तोपर्यंत वारंवार चिंतनाने भगवंतांकडे पाहण्याचा प्रयत्‍न करावा. (१२)


एकैकशोऽङ्गानि धियानुभावयेत्
    पादादि यावद् हसितं गदाभृतः ।
जितं जितं स्थानमपोह्य धारयेत्
    परं परं शुद्ध्यति धीर्यथा यथा ॥ १३ ॥
बुद्धीत ध्यावी चरणारविंदे
    पुन्हा बघावे मुख अंग सारे ।
स्थिरे जशी बुद्धि तसेचि चित्त
    सोडोनि एकेक बघोत अंग ॥ १३ ॥

गदाभृतः - गदाधारी ईश्वराच्या पादादि - पायांपासून हसितं यावत् - हास्ययुक्त मुखापर्यंत अंगानि - अवयवांचे धिया - मनाने एकैकशः अनुभावयेत् - क्रमाक्रमाने ध्यान करावे यथायथा - जशीजशी धीः - बुद्धि शुद्‌ध्यति - शुद्ध होत जाईल तसतसा जितंजितं - प्रत्येक जिंकलेल्या स्थानं - अवयवाला अपोह्य - सोडून परंपरं - पुढील पुढील अवयवांचे धारयेत् - धारणायोगाने स्थिरीकरण करावे. ॥१३॥
भगवंतांच्या चरणकमलांपासून सुरुवात करून त्यांच्या हास्ययुक्त मुखकमलापर्यंत एकेका अवयवाची बुद्धीने धारणा करावी. जसजशी बुद्धी स्थिर होत जाईल आणि एकेका अंगाचे ध्यान व्यवस्थित होऊ लागेल, तेव्हा ते सोडून दुसर्‍या अंगाचे ध्यान व्यवस्थित होऊ लागेल, तेव्हा ते सोडून दुसर्‍या अंगाचे ध्यान करावे. (१३)


यावन्न जायेत परावरेऽस्मिन्
    विश्वेश्वरे द्रष्टरि भक्तियोगः ।
तावत् स्थवीयः पुरुषस्य रूपं
    क्रियावसाने प्रयतः स्मरेत ॥ १४ ॥
विश्वेश ना दृश्य द्रष्टा असा तो
    जो निर्गुणी वा सगुणी रूपी तो ।
ते नित्य नैमित्तिक कर्म व्हावे
    पुन्हा स्मरावे स्थुलरूप त्याचे ॥ १४ ॥

परावरे - परा विदया व अपरा विदया यांनी युक्त अशा द्रष्टरि - साक्षिरूप अस्मिन् - ह्या विश्वेश्वरे - जगदात्म्याच्या ठिकाणी भक्तियोगः - भक्तियोग यावत् - जोपर्यंत न जायेत - उत्पन्न होत नाही तावत् - तोपर्यंत पुरुषस्य - त्या पुरुषाचे स्थवीयः - स्थूल रूपं - रूप क्रियावसाने - कर्म संपताच प्रयतः - पवित्रान्तःकरणाने स्मरेत - स्मरण करावे. ॥१४॥
जोपर्यंत सगुण-निर्गुण द्रष्टास्वरूप भगवंतांशी अनन्य भक्तियोग साधत नाही, तो पर्यंत साधकाने नित्यनैमित्तिक कर्मे झाल्यानंतर एकाग्रतेने भगवंतांच्या वर वर्णन केलेल्या स्थूल रूपाचे चिंतन केले पाहिजे. (१४)


स्थिरं सुखं चासनमास्थितो यतिः
    यदा जिहासुरिममङ्ग लोकम् ।
काले च देशे च मनो न सज्जयेत्
    प्राणान् नियच्छेन्मनसा जितासुः ॥ १५ ॥
योगी जगाला जधि सोडितो ना
    तो देश काळास मनीं घेई ।
सुखासनी बैसुनि प्राण जिंकी
    इंद्रीय रोधोनि धरीहि तेव्हा ॥ १५ ॥

अंग - हे राजा ! यदा च - आणि जेव्हा स्थिरं - अढळ सुखं - सुखावह आसनं - आसनाचा आश्रितः - आश्रय केलेला असा यतिः - इंद्रियाचे नियमन केलेला योगी इमं लोकं - या लोकाला जिहासुः - सोडून जाण्याची इच्छा करणारा होईल जितासुः - तेव्हा प्राणांचा जय करून काले देशे च - काळ आणि स्थान याविषयी मनः - मन न सज्जयेत् - आसक्त ठेवू नये प्राणं - प्राणाला मनसा - मनाने नियच्छेत् - नियंत्रित करावे. ॥१५॥
परीक्षिता, जेव्हा योगी पुरुष या लोकाचा त्याग करण्याची इच्छा करील, तेव्हा त्याने देश व कालाला मनात थारा देऊ नये. सुखपूर्वक स्थिर आसन साध्य करून, प्राणांना जिंकून मनाने इंद्रियांचा संयम करावा. (१५)


मनः स्वबुद्ध्याऽमलया नियम्य
    क्षेत्रज्ञ एतां निनयेत् तमात्मनि ।
आत्मानमात्मन्यवरुध्य धीरो
    लब्धोपशान्तिर्विरमेत कृत्यात् ॥ १६ ॥
त्या शुद्ध बुद्धीस चित्तात ठेवी
    क्षेत्रज्ञिं दोघा अन त्यास आत्मी ।
आत्म्यास मेळी परमात्मरूपी
    पुन्हा न तेणे करणेचि कांही ॥ १६ ॥

अमलया स्वबुद्‌ध्या - निर्मल अशा निश्चयात्मिका बुद्धीने मनः नियम्य - मनाचे नियमन करून एतां - ह्या बुद्धीला क्षेत्रज्ञे - जीवात्म्याकडे निनयेत् - वळवावे तम् आत्मनि - त्या जीवात्म्याला परमात्म्याकडे वळवावे धीरः - गंभीर असा जो योगी त्याने आत्मानम् आत्मनि अवरुद्‌ध्य - जीवात्म्याचा परमात्म्यात लय करून लब्धोपशांतिः - शांति प्राप्त करून घेऊन कृत्यात् विरमेत - कर्मापासून निवृत्त होईल. ॥१६॥
त्यानंतर आपल्या शुद्ध बुद्धीने मनाला संयमित करून त्या बुद्धीला क्षेत्रज्ञामध्ये आणि क्षेत्रज्ञाला अंतरात्म्यामध्ये लीन करावे. नंतर अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन करून, धैर्यवान पुरुषाने, त्या शांतिमय अवस्थेत स्थिर व्हावे. यानंतर त्याच्यासाठी कोणतेच कर्तव्य शिल्लज राहात नाही. (१६)


न यत्र कालोऽनिमिषां परः प्रभुः
    कुतो नु देवा जगतां य ईशिरे ।
न यत्र सत्त्वं न रजस्तमश्च
    न वै विकारो न महान् प्रधानम् ॥ १७ ॥
परं पदं वैष्णवमामनन्ति
    तद् यन्नेति नेतीत्यतदुत्सिसृक्षवः ।
विसृज्य दौरात्म्यमनन्यसौहृदा
    हृदोपगुह्यार्हपदं पदे पदे ॥ १८ ॥
ऐशा अवस्थी गुण त्यास कैसे
    नाही अहंकार महाहि तत्त्व ।
अस्तित्त्व नाही मग प्रकृतीचे
    देवानियंता नच काल त्याला ।
त्या देवतांची नच ती कथा की
    तशीच देवाधिन प्राणियांची ॥ १७ ॥
हे ना नि ते ना म्हणवीत योगी
    रूपाविना ते त्यजिती पदर्था ।
आलिंगिती तो भगवंत भावे
    हे कार्य शास्त्रात सुमान्य आहे ॥ १८ ॥

अनिमिषां - देवांहून परः - श्रेष्ठ असा कालः - काळ यत्र - जेथे न प्रभुः - समर्थ नाही जगतां - जगाचे ये ईशिरे - जे स्वामित्व करतात ते देवाः - देव कुतो नु - कोठून समर्थ असतील यत्र - जेथे सत्त्वं रजः तमः च - सत्त्व, रज आणि तम ही न - नाहीत वै - त्याचप्रमाणे विकारः - सृष्टी न - नाही न महान् प्रधानम् - व स्वतः महतत्व आणि प्रकृतिही नाही यत् - जे अतत् - ते नव्हे असे नेति नेति इति - हे नव्हे हे नव्हे असे म्हणून उत्सिसृक्षवः - टाकून देऊ इच्छिणारे दौरात्म्यं - मी, माझे अशा अभिमानाला विसृज्य - सोडून अर्हपदं - पूज्य अशा परमेश्वराचे चरण पदेपदे - क्षणोक्षणी हृदा - हृदयाने उपगुह्य - धारण करून अनन्यसौहृदः - दुसर्‍या कोठेही त्यांचा प्रेमभाव नाही असे योगी तत् - ते वैष्णवं पदं - विष्णूचे पद परम आमनन्ति - श्रेष्ठ मानितात. ॥१७-१८॥
या अवस्थेत सत्त्वगुणही नाही तर रजोगुण आणि तमोगुण कोठून असणार ? अहंकार, महत्तत्त्व आणि प्रकृतीचेही तेथे अस्तित्व नाही. अशा स्तितीत जेथ देवतंच्या नियामक अशा काळाचाही प्रभाव चालत नाही, तेथे देव आणि त्यांच्या अधीन असणारे प्राणी यांचे काय चालणार ? (१७)
"हे नाही, हे नाही.." असे म्हणून योगी लोक परमात्याहून अन्य पदार्थांचा त्याग करू इच्छितात आणि शरीर व त्याच्यासंबंधी पदार्थांमध्ये आत्मबुद्धीचा त्याग करून, हृदयाच्या द्वारा पदोपदी भगवंतांच्या ज्या परमपूज्य स्वरूपाला आलिंगन देतात, तेच भगवान विष्णूंचे परमपद आहे असे सांगतात. (१८)


इत्थं मुनिस्तूपरमेद् व्यवस्थितो
    विज्ञानदृग्वीर्य सुरन्धिताशयः ।
स्वपार्ष्णिनऽपीड्य गुदं ततोऽनिलं
    स्थानेषु षट्सून्नमयेज्जितक्लमः ॥ १९ ॥
दृष्टीसह ज्ञानबले मनाची
    जी वासना तीहि जिरोनि जाते ।
त्या ब्रह्मनिष्ठे असल्या प्रकारे
    सोडोनि द्यावी तनु आपुली ती ।
लावूनिया टाच गुदास दाब
    द्यावा न भिता स्थिर राहुनिया ।
षट्चक्र भेदूनि वरी धरावा
    त्या साधके आपुला प्राणवायू ॥ १९ ॥

इत्थं - याप्रमाणे व्यवस्थितः - ज्याचे चित्त ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झाले आहे विज्ञानदृक - ज्याची दृष्टी विज्ञानमय झाली आहे असा सुरंधिताशयः - पूर्ण नष्ट झाली आहे विषयवासना ज्याची असा मुनिः - योगी तु - तर उपरमेत् - विराम पावतो. स्वपार्ष्णिना - आपल्या पायाच्या टाचेने गुदं आपीडय - गुदद्वार दाबून जितक्लमः - श्रमापासून मुक्त झालेल्या योग्याने ततः - तेथून षट्‌सु स्थानेषु - सहा चक्रांवर अनिलं उन्नमयेत् - वायूला चढवीत न्यावे. ॥१९॥
ज्ञानदृष्टीच्या बळावर ज्याच्या चित्तातील वासना नष्ट झाल्या आहेत, त्या ब्रह्मनिष्ठ योग्याने प्रथम टाचेने शिवणीवर दाब देऊन स्थिर व्हावे, नंतर शांतपणे प्राणवायूला षटचक्रभेदन करून वर न्यावे आणि शरीर सोडावे. (१९)


नाभ्यां स्थितं हृद्यधिरोप्य तस्माद्
    उदुदानगत्योरसि तं नयेन्मुनिः ।
ततोऽनुसन्धाय धिया मनस्वी
    स्वतालुमूलं शनकैर्नयेत ॥ २० ॥
जो नाभिचक्रात वसोनि वायू
    अनाहते तो हृदयात घेणे ।
तेथूनि विशुद्ध चक्रात घ्यावा
    न्यावे उदाना हळु टाळुमध्ये ॥ २० ॥

नाभ्यां स्थितं - नाभीत असलेल्या वायूला हृदि अधिरोप्य - हृदय वर नेऊन तस्मात् - तेथून उदानगत्या - उदानवायूच्या गतीने तं - त्याला मुनिः - योग्याने उरसि नयेत् - वक्षःस्थळात न्यावे ततः - तेथून पुढे धिया अनुसंधाय - बुद्धीशी तादात्म्य पावून मनस्वी - योग्याने शनकैः - क्रमाने स्वतालुमूलं नयेत - आपल्या टाळूच्या मुळाशी न्यावे. ॥२०॥
जितेंद्रिय योग्याने नाभिस्थानातील मणिपुर चक्रात असलेल्या वायूला हृदयातील अनाहतचक्रात, तेथून उदानवायुद्वारा वक्षःस्थळावरील विशुद्ध चक्रात आणि त्यानंतर त्या वायूला हळू हळू टाळूच्या मुळापर्यंत न्यावे. (२०)


तस्माद् भ्रुवोरन्तरमुन्नयेत
    निरुद्धसप्तायतनोऽनपेक्षः ।
स्थित्वा मुहूर्तार्धमकुण्ठदृष्टिः
    निर्भिद्य मूर्धन् विसृजेत् परं गतः ॥ २१ ॥
डोळे तसे सात छिद्रास रोधी
    टाळूस जो स्थीर उदानवायू ।
दो भूवईच्या स्थिर ठेवि मध्ये
    अर्ध्या घटीने मग ब्रह्मपद्मी ।
स्थिरोनि जावे परमात्मरूपी
    ते चक्र भेदूनि तनू त्यजावी ॥ २१ ॥

निरुद्धसप्तास्वयनः - बंद केले आहे प्राणांचे सात मार्ग ज्याने असा तस्मात् - तेथून भ्रुवोः - भुवयांच्या अंतरं - मध्यभागाला उन्नयेत - न्यावे अनपेक्षः - निरिच्छ मुहूर्तार्धं - एक घटिकापर्यंत स्थित्वा - स्थिर करून अकुंठदृष्टिः - अकुंठित ज्ञानदृष्टी होऊन मूर्धन् - ब्रह्मरंध्राला निर्भिदय - फोडून परं - श्रेष्ठपदाला गतः - पोचलेला होत्साता विसृजेत् - शरीर-त्याग करावा. ॥२१॥
त्यानंतर दोन डोळे, दोन कान, नाकाची दोन छिद्रे आणि मुख ही सात छिद्रे बंद करून टाळूच्या मुळात स्थिर झालेल्या वायूला भूमध्यातील आज्ञाचक्रात घेऊन जावे. कोणत्याच लोकात जाण्याची इच्छा नसेल तर अर्धी घटकापर्यंत त्या वायूला तेथेच थांबवून ठेवून स्थिर करावे. यानंतर ब्रह्मरंध्राचा भेद करून शरीर सोडावे. (२१)


यदि प्रयास्यन् नृप पारमेष्ठ्यं
    वैहायसानामुत यद् विहारम् ।
अष्टाधिपत्यं गुणसन्निवाये
    सहैव गच्छेन्मनसेन्द्रियैश्च ॥ २२ ॥
त्या ब्रह्मलोका जरि भोगणे वा
    त्या आठ सिद्धी मिळवूनि घेणे ।
आकाशमार्गी मिळवून सिद्धी
    ब्रह्मांड सारे फिरूनी राहावे ।
त्याने मना सोबत इंद्रियांना
    घेऊनि देहा त्यजुनी निघावे ॥ २२ ॥

नृप - हे राजा ! यदि - जर पारमेष्ठयं - ब्रह्मपदाला उत - किंवा यत् - ज्या वैहायसानां - आकाशात राहणार्‍या सिद्धादि देवांच्या विहारं - क्रीडास्थानाला अष्टाधिपत्य - आठ सिद्धींच्या स्वामित्वाला गुणसन्निवाये - गुणांनीच उत्पन्न झालेल्या ब्रह्मांडात प्रयास्यन् - जाण्याची इच्छा करणारा मनसा - मनाशी च - आणि इंद्रियैः - इंद्रियांशी सहैव - सहवर्तमानच गच्छेत् - जावे. ॥२२॥
परीक्षिता, जर योग्याची इच्छा असेल की आपण ब्रह्मलोकात जावे, अष्ट महासिद्धी प्राप्त करून घेऊन आकाशात हिंडणार्‍या सिद्धांच्या बरोबर विहार करावा, किंवा त्रिगुणमय ब्रह्मांडाच्या कोणत्याही प्रदेशात विहार करावा, तर त्याने मन आणि इंद्रियांना बरोबर घेऊन शरीरातून बाहेर पडावे. (२२)


योगेश्वराणां गतिमाहुरन्तः
    बहिस्त्रिलोक्याः पवनान्तरात्मनाम् ।
न कर्मभिस्तां गतिमाप्नुवन्ति
    विद्यातपोयोगसमाधिभाजाम् ॥ २३ ॥
त्या योगियाची तनु वायु ऐसी
    उपासना योग तपो नि ज्ञान ।
सेवि तया तो अधिकार आहे
    त्रिलोकि स्वच्छंदचि राहण्याचा ॥ २३ ॥

पवनान्तरात्मनां - वायुरूपी लिंग शरीराला धारण करणार्‍या योगेश्वराणां - योगश्रेष्ठांच्या त्रिलोक्याः - त्रैलोक्याच्या अंतः - आत बहिः - बाहेर गतिं - गतीला आहुः - बोलतात. विदयातपोयोगसमाधिभाजां - विदया, तप, योग व समाधी करणार्‍यांच्या तां - त्या गतिं - गतीला कर्मभिः - कर्मांनी न आप्नुवन्ति - प्राप्त होत नाहीत. ॥२३॥
योग्यांचे शरीर वायूसारखे सूक्ष्म असते. उपासना, तपस्या, योग आणि ज्ञान यांची साधना करणार्‍या योग्यांना त्रैलोक्याच्या आत आणि बाहेर सर्वत्र जाता येते. कर्मांनी असे जाता येत नाही. (२३)


वैश्वानरं याति विहायसा गतः
    सुषुम्नया ब्रह्मपथेन शोचिषा ।
विधूतकल्कोऽथ हरेरुदस्तात्
    प्रयाति चक्रं नृप शैशुमारम् ॥ २४ ॥

[ योऽन्तः पचति भूतानां यस्तपत्यण्डमध्यगः ।
सोऽग्निर्वैश्वानरो मार्गो देवानां पितृणां मुनेः ॥
देवयानं पिङ्गलाभिः हन्येति शतायुषा ।
रात्रीरिडाभिः पितृणां विषुवत्तां सुषुम्नया ॥ ]
These two shlokas are found only in Madhwa school
edition and Shri Vijayadhwajatirtha commented on these.

ज्योतिर्मयी वाट सुषुम्णि द्वारा
    योगी जधी ब्रह्म लोकास बैसे ।
आकाशमार्गी प्रथमोचि जाय
    तो अग्निलोकास असे निवांत ।
ते सूक्ष्म दोषो जळती तिथे नी
    जोतिर्मयी हो शिशुमारचक्री ॥ २४ ॥

नृप - हे राजा अथ - नंतर विहायसा - आकाशरूपी ब्रह्मपथेन - ब्रह्ममार्गाने गतः - गेलेला शोचिषा - तेजस्वी सुषुम्नया - सुषुम्ना नावाच्या नाडीने वैश्वानरं - अग्निलोकाला याति - जातो विधूतकल्कः - निष्पाप असा उदस्तात् - ऊर्ध्वभागी हरेः - भगवंताच्या शैशुमारं - शिशुमार नावाच्या चक्रं - चक्राला प्रयाति - जातो. ॥२४॥
परीक्षिता, योगी ज्योतिर्मय मार्ग असलेल्या सुषुम्नेच्या द्वारा जेव्हा ब्रह्मलोकाकडे जावयास निघतो, तेव्हा प्रथम तो आकाशमार्गाने अग्निलोकात जातो, तेथे त्याच्या पापाचा उरला-सुरला मळ निघून जातो. तेथून तो त्याच्यावर असलेल्या भगवान श्रीहरींच्या शिंशुमार नावाच्या ज्योतिर्मय चक्रावर पोहोचतो. (२४)


तद्विश्वनाभिं त्वतिवर्त्य विष्णोः
    अणीयसा विरजेनात्मनैकः ।
नमस्कृतं ब्रह्मविदामुपैति
    कल्पायुषो यद् विबुधा रमन्ते ॥ २५ ॥
हे विष्णुचे जे शिशुमारचक्र
    ते विश्वब्रह्मांड मध्यात केंद्र ।
योगी स्वयें सूक्ष्म विशुद्ध देही
    जाती महर्लोकि जिथे निवांत ।
ते ब्रह्मवेत्तं नि कितेक देव
    कितेक कल्पेहि जिवंत तेथे ॥ २५ ॥

तत् - तदनंतर विष्णोः - विष्णूच्या विश्वनाभिं - जगाला आश्रयभूत अशा त्या चक्राला तु - तर अतिवर्त्य - उल्लंघून एकः - एकटा अर्णीयसा - फारच सूक्ष्म विरजेन - निर्मळ आत्मना - शरीराने नमस्कृतं - सर्वांनी वंदन केलेल्या ब्रह्मविदां - ब्रह्मवेत्त्यांच्या स्थानाला उपैति - प्राप्त होतो यत् - ज्यामुळे कल्पायुषः - कल्पपर्यंत आयुष्य असणारे विबुधाः - देव रमन्ते - रममाण होतात. ॥२५॥
भगवान विष्णूंचे हे शिंशुमार चक्र ब्रह्मांडाच्या भ्रमणाचे केंद्र आहे. त्याचे अतिक्रमण करून अत्यंत सूक्ष्म आणि निर्मल शरीराने तो योगी एकटाच महर्लोकात जातो. हा महर्लोक ब्रह्मवेत्त्यांनाही वंदनीय आहे आणि तेथे कल्पापर्यंत आयुष्य असणार्‍या देवता विहार करीत असतात. (२५)


अथो अनन्तस्य मुखानलेन
    दन्दह्यमानं स निरीक्ष्य विश्वम् ।
निर्याति सिद्धेश्वरयुष्टधिष्ण्यं
    यद् द्वैपरार्ध्यं तदु पारमेष्ठ्यम् ॥ २६ ॥
पाहूनि कल्पांति जळात लोक
    शेषो मुखीच्या अनलात सारे ।
त्यां ब्र्ह्मलोकात विहार होतो
    आयू जिथे दोन परार्ध आहे ॥ २६ ॥

b>अथो - नंतर सः - तो अनन्तस्य - शेषाच्या मुखानलेन - मुखातून उत्पन्न होणार्‍या अग्नीने दंदह्यमानं - वेगाने जळून जाणार्‍या विश्वं - जगाला निरीक्ष्य - पाहून यत् - जे सिद्धेश्वरजुष्टधिष्ण्यं - मोठमोठया सिद्धींनी सेवन केलेले स्थान द्वैपरार्ध्यं - दोन परार्धकालापर्यंत टिकणारे असे तत् - त्या पारमेष्ठयं - ब्रह्मपदाला उ - खरोखर निर्याति - कायमचा जाऊन राहतो. ॥२६॥
जेव्हा प्रलयकाळ जवळ येऊन ठेपतो, तेव्हा खाली असलेले लोक शेषाच्या मुखातून निघालेल्या आगीने भस्म होत असलेले पाहून तो योगी ब्रह्मलोकात निघून जातो. जे सिद्ध योगी ब्रह्मलोकातील विमानांवर निवास करीत असतात, त्या ब्रह्मलोकाचे आयुष्य ब्रह्मदेवाच्या आयुष्यासारखे दोन परार्धांचे असते. (२६)


न यत्र शोको न जरा न मृत्युः
    न आर्तिः न चोद्वेग ऋते कुतश्चित् ।
यच्चित्ततोऽदः कृपयानिदं विदां
    दुरन्तदुःखप्रभवानुदर्शनात् ॥ २७ ॥
जेथे जरा मृत्यु न शोक दुःख
    उद्वेद भीती तरि ती कशाची ।
दुःखो तिथे एक महाभयान
    की दुःखभोगी बघवे न त्यांना ॥ २७ ॥

अनिदंविदां - हे ज्ञान नसणार्‍यांच्या दुरन्तदुःखप्रभवानुदर्शनान् - अत्यंत दुःखदायक जन्मांच्या यातायाती पाहून कृपया - त्यांच्याबद्दल कृपा उत्पन्न झाल्यामुळे चित्ततोदः - अंतःकरणाला खेद होतो यत् - ज्या ऋते - शिवाय यत्र - जेथे कुतश्चित् - कोठूनही शोकः - शोक न - नाही जरा - वृद्धावस्था न - नाही मृत्युः - मृत्यु न - नाही आर्तिः - पीडा न - नाही च - आणि उद्वेगः - खिन्नता न - नाही. ॥२७॥
तेथे शोक नाही की दुःख नाही. म्हातारपण नाही की मृत्यू नाही. असे असल्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा भय कसे असू शकेल ? तेथे फक्त एकाच गोष्टीचे दुःख आहे. ते म्हणजे या परमपदाला ना जाणणार्‍या लोकांच्या जन्म-मृत्यूच्या अत्यंत घोर संकटांना पाहून तेथीला लोकांना दयेमुळे जे मोठेच दुःख होते ते. (२७)


ततो विशेषं प्रतिपद्य निर्भयः
    तेनात्मनापोऽनलमूर्तिरत्वरन् ।
ज्योतिर्मयो वायुमुपेत्य काले
    वाय्वात्मना खं बृहदात्मलिङ्गम् ॥ २८ ॥
योगी पुन्हा सूक्ष्म तनू पृथीवी
    मिळूनि भेदी कवचेहि सात ।
ज्योतिर्मयी तो कवचास धारी
    अनंत बोधी अवकाश होतो ॥ २८ ॥

ततः - त्या ठिकाणी विशेषं - पृथ्वी आदिकरून महाभूतांना प्रतिपदय - मिळून जाऊन निर्भयः - भयरहित असा तेन आत्मना - त्या आपल्या सूक्ष्म शरीराने अपः - पाण्याला मिळून जाऊन अनलमूर्तिः - अग्निस्वरूप झालेला अत्वरन् - घाई न करणारा असा ज्योतिर्मयः - तेजोरूपी काले - योग्य काळी वायुम् उपेत्य - वायूत मिळून जाऊन वाय्वात्मना - वायुरूपाने बृहदात्मलिङगं - परमात्म्याचे मोठे लक्षण जे आकाश त्याला जाऊन मिळतो. ॥२८॥
तो योगी सत्यलोकात गेल्यानंतर निर्भय होऊन आपल्या सूक्ष्म शरीराला पृथ्वीमध्ये विलीन करतो आणि पुन्हा उतावीळ न होता सात आवरणांचे भेदन करतो. पृथ्वीरूपाने पाण्यात, पाणीरूपाने अग्निमय आवरणात विलीन होऊन तो ज्योतिरूपाने वायुरूप आवरणात येतो. तेथून योग्य वेळ येताच ब्रह्माच्या अनंतत्वाचा बोध करून देणार्‍या आकाशरूप आवरणात मिसळून जातो. (२८)


घ्राणेन गन्धं रसनेन वै रसं
    रूपं च दृष्ट्या श्वसनं त्वचैव ।
श्रोत्रेण चोपेत्य नभोगुणत्वं
    प्राणेन चाकूतिमुपैति योगी ॥ २९ ॥
ही स्थूल सारी कवचे त्यजोनी
    सूक्ष्मो अधिष्ठनि मिळोनि जातो ।
सर्वेंद्रिये कर्मशक्ती मिळोनी
    त्या सूक्ष्म रूपात मिळोनि जाती ॥ २९ ॥

योगी - भक्तियोगाने ईश्वरप्राप्ति करून घेणारा पुरुष घ्राणेन - घ्राणेंद्रियाने गंधं - गंधाशी रसनेन रसं - रसनेंद्रियाने रसाशी दृष्टया तु रूपं - तसेच चक्षुरिंद्रियाने रूपाशी त्वचा एव श्वसनं - त्वगिंद्रियाने स्पर्शाशी श्रोत्रेण च - आणि कर्णेंद्रियाने नभोगुणत्वं उपेत्य - आकाशाचा गुण जो शब्द त्याशी मिळून जाऊन प्राणेन च - आणि कर्मेंद्रियांनी आकूतिं - इंद्रियांच्या क्रियेशी वै - खरोखर उपैति - मिळून जातो. ॥२९॥
अशा प्रकारे योगी स्थूल आवरणांना ओलांडीत असता त्याची इंद्रियेसुद्धा आपापल्या सूक्ष्म अधिष्ठानात विलीन होतात. घाणेंद्रिय गंधतन्मात्रेत, रसना रसतन्मात्रेत, डोळे रूपतन्मात्रेत, त्वचा स्पर्शतन्मात्रेत, कान शब्दतन्मात्रेत आणि कर्मेंद्रिये आपापल्या क्रियाशक्तीत मिसळून जाऊन आपल्या मूळ सूक्ष्मस्वरूपाला प्राप्त होतात. (२९)


स भूतसूक्ष्मेन्द्रियसन्निकर्षं
    मनोमयं देवमयं विकार्यम् ।
संसाद्य गत्या सह तेन याति
    विज्ञानतत्त्वं गुणसंनिरोधम् ॥ ३० ॥
या स्थूल सूक्ष्मवरणातुनी तो
    सत्वीं रजांची मिळवी अहंता ।
सर्वां गुणाचे लयस्थान रूप
    जी प्रकृती त्यात मिळून जाते ॥ ३० ॥

सः - तो योगी भूतसूक्ष्मेन्द्रियसन्निकर्षं - सूक्ष्म भूते आणि इंद्रिय यांच्या एकमेकांवर होणार्‍या लयाला मनोमयं - मनःस्वरूपी देवमयं - देवस्वरूपी विकार्यम् - विविध कार्य उत्पन्न करणार्‍या अहंकार तत्त्वाला संसादय - प्राप्त होऊन गत्या - आपल्या गतीने तेन सह - त्या अहंकारासह विज्ञानतत्वं - महत् नावाच्या तत्वाला गुणसंनिरोधम् - त्रिगुणांचा जेथे लय होतो त्या प्रकृतीला याति - जाऊन मिळतो. ॥३०॥
अशा प्रकारे योगी स्थूल व सूक्ष्म आवरणांना पार करून अहंकारामध्ये प्रवेश करतो. तेथे सूक्ष्म भूतांना तामस अहंकारात, इंद्रियांना राजस अहंकारात, मन आणि इंद्रिये यांच्या अधिष्ठाता देवतांना सात्विक अहंकारात विलीन करतो. यानंतर अहंकारासहित लयरूप गतिद्वारा महत्तत्त्वामध्ये प्रवेश करून शेवटी सर्व गुणांचे लयस्थान असलेल्या प्रकृतिरूप आवरणाला जाऊन मिळतो. (३०)


तेनात्मनात्मानमुपैति शान्तं
    आनंदमानंदमयोऽवसाने ।
एतां गतिं भागवतीं गतो यः
    स वै पुनर्नेह विषज्जतेऽङ्ग ॥ ३१ ॥
महा अशा त्या प्रलयादि वेळी
    तिथून त्याला निघणे असेना ।
आनंदरूपात मिळून जातो
    त्या आत्मरूपा मग मुक्ति लाभे ॥ ३१ ॥

तेन आत्मना - त्या प्रकृतिरूप स्वरूपाने अवसाने - सरते शेवटी आनंदमयः - आनंदस्वरूपी होऊन शान्तम् आनंदम् आत्मानं - अविकार्य, आनंदरूप अशा आत्मस्वरूपास उपैति - प्राप्त होतो अंग - अहो यः - जो एतां भागवतीं गतिं गतः - या भगवंताच्या स्वरूपाला पोचलेला सः - तो वै - खरोखर पुनः इह न विषज्जते - पुनः या संसारात कधीही येत नाही. ॥३१॥
परीक्षिता, महाप्रलयाच्या वेळी जेव्हा प्रकृतिरूप आवरणाचाही लय होतो, तेव्हा तो योगी स्वतः आनंदरूप असलेल्या शांत परमात्म्याला प्राप्त करून घेतो. ज्याला अशी भगवन्मय गती प्राप्त होते, त्याला पुन्हा या संसारात यावे लागत नाही. (३१)


एते सृती ते नृप वेदगीते
    त्वयाभिपृष्टे च सनातने च ।
ये वै पुरा ब्रह्मण आह तुष्ट
    आराधितो भगवान् वासुदेवः ॥ ३२ ॥
परीक्षिता तू पुसलास प्रश्न
    सद्योत नी ती क्रम मुक्ति ऐसी ।
जेंव्हा पुसे वासुदेवास ब्रह्मा
    तेंव्हा तया हा निजबोध झाला ॥ ३२ ॥

नृप - हे राजा ! त्वया अभिपृष्टे - तू विचारलेले ते एते - ते हे वेदगीते - वेदांत सांगितलेले च - आणि सनातने - पूर्वापार चालत आलेले सृती - दोन मार्ग होत ये - जे वै - खरोखर पुरा - पूर्वी आराधितः - आराधिलेला भगवान् वासुदेवः - भगवान वासुदेव पृष्टः - विचारला गेलेला ह - खरोखर ब्रह्मणे आह - ब्रह्मदेवाला सांगता झाला. ॥३२॥
परीक्षिता, तू जे विचारले होतेस, त्याचे उत्तर म्हणून मी वेदाने सांगितलेल्या दोन्ही सनातन मार्गांचे - सद्योमुक्ति आणि क्रममुक्ति तुला वर्णन करून सांगितले. प्रथम ब्रह्मदेवाने भगवान वासुदेवांची आराधना करून त्यांना जेव्हा विचारले होते, तेव्हा हेच दोन्ही मार्ग त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते. (३२)


न ह्यतोऽन्यः शिवः पन्था विशतः संसृताविह ।
वासुदेवे भगवति भक्तियोगो यतो भवेत् ॥ ३३ ॥
( अनुष्टुप् )
संसारी गुंतले लोक त्यांना त्या साधनेत हे ।
कृष्णाचे लाभता प्रेम कल्याण दुसरे नसे ॥ ३३ ॥

यतः - ज्यापासून भगवति वासुदेवे - भगवान् वासुदेवाच्या ठिकाणी भक्तियोगः भवेत् - भक्तियोग होईल अतः अन्यः - त्याहून दुसरा शिवः पन्थाः - चांगला मार्ग इह संसृतौ - या संसारात विशतः - शिरणाराला नाहि - नाहीच. ॥३३॥
या संसार चक्रात पडलेल्या मनुष्याला, ज्या साधनाने भगवान विष्णूंची अनन्य भक्ति प्राप्त होईल, त्या व्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताच कल्याणकारी मार्ग नाही. (३३)


भगवान्ब्रह्म कार्त्स्न्येन त्रिरन् वीक्ष्य मनीषया ।
तदध्यवस्यत् कूटस्थो रतिरात्मन् यतो भवेत् ॥ ३४ ॥
भगवतप्रेमलाभाला तुलना नच ती कुठे ।
ब्रह्म्याने चार वेदांचा सार तो हाचि काढिला ॥ ३४ ॥

कूटस्थः भगवान् - निर्विकार असा भगवान् कार्त्स्न्येन - पूर्णपणे ब्रह्म - ब्रह्माचा त्रिः अन्वीक्ष्य - तीन वेळा एकाग्र मनाने विचार करून यतः - ज्यामुळे आत्मन् - परमात्म्याच्या ठिकाणी रतिः भवेत् - प्रेम उत्पन्न होईल तत् - ते मनीषया - बुद्धीने अध्यवस्यत् - निश्चित करता झाला. ॥३४॥
भगवान ब्रह्मदेवांनी एकाग्र चित्ताने सर्व वेदांचे तीन वेळा अध्ययन केले आणि आपल्या बुद्धीने निश्चय केला की, ज्यामुळे सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांविषयी अनन्य प्रेम निर्माण होईल, तोच सर्वश्रेष्ठ धर्म होय. (३४)


भगवान् सर्वभूतेषु लक्षितः स्वात्मना हरिः ।
दृश्यैर्बुद्ध्यादिभिर्द्रष्टा लक्षणैः अनुमापकैः ॥ ३५ ॥
समस्त प्राणियांचेही भगवद्रूप लक्ष्य ते ।
दृष्टि बुध्या दि ते सारी त्यांची ती अनुमानक ॥ ३५ ॥

भगवान् द्रष्टा हरिः - साक्षीभूत असलेला असा भगवान परमेश्वर सर्वभूतेषु दृश्यैः - सर्व भूतांच्या ठिकाणी दिसून येणार्‍या अनुमापकैः - ज्यांच्यावरुन अनुमान करता येते अशा बुद्‌ध्‌यादिभिः लक्षणैः - बुद्धि आदिकरून लक्षणांवरून स्वात्मना - स्वतःच्याच योगाने लक्षितः - पाहिला जात असतो. ॥३५॥
समस्त चराचर प्राण्यांमध्ये त्यांच्या आत्म्याच्या रूपाने भगवान श्रीकृष्णच दृग्गोचर होतात. कारण बुद्धी इत्यादी दृश्यपदार्थांचे साक्षीभूत एकमात्र द्रष्टे भगवान आहेत, या अनुमानावरून हे सिद्ध होते. (३५)


तस्मात् सर्वात्मना राजन् हरिः सर्वत्र सर्वदा ।
श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यो भगवान् नृणाम् ॥ ३६ ॥
म्हणून सर्व ती राजा सर्व वेळी हि शक्ति ती ।
भगवतकीर्तनी ध्यानी लावावी आपुली बरी ॥ ३६ ॥

राजन् - हे राजा तस्मात् - यास्तव भगवान् हरिः - भगवान परमेश्वर सर्वदा - नित्य सर्वात्मना - सर्वतोपरी सर्वत्र - सर्व ठिकाणी नृणां - मनुष्यांना श्रोतव्यः कीर्तितव्यः स्मर्तव्यः च - श्रवण करण्यास, कीर्तन करण्यास आणि स्मरण करण्यास योग्य आहे. ॥३६॥
परीक्षिता, यासाठी मनुष्याने सर्व काळी आणि सर्व स्थितींमध्ये, आपल्या शक्तीनुसार, भगवान श्रीहरीचेच श्रवण, कीर्तन आणि स्मरण करावे. (३६)


पिबन्ति ये भगवत आत्मनः
    सतां कथामृतं श्रवणपुटेषु सम्भृतम् ।
पुनन्ति ते विषयविदूषिताशयं
    व्रजन्ति तच्चरणसरोरुहान्तिकम् ॥ ३७ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां द्वितीयस्कंधे द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
(गति)
कथामृतो मधुरस संत वाटिती
    भरुनि कान करिल पान जो या ।
प्रभाव वीष विषय हॄदयी नुरे
    विशुद्ध हो,भगवत स्नेह प्राप्त त्या ॥ ३७ ॥
॥ इति श्रीमद्‌भगवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥
॥ दुसरा अध्याय हा ॥ २ ॥ २ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

ये - जे श्रवणपुटेषु संभृतं - कानात साठविलेले सताम् आत्मनः - साधूंच्या अंतर्यामी जो राहतो त्या भगवतः - भगवंताचे कथामृतं - मधुर कथारूप अमृत पिबंति - सेवन करतात ते - ते विषयविदूषिताशयं - विषयसेवनाने अत्यंत दूषित झालेल्या अंतःकरणाला पुनंति - शुद्ध करतात च - आणि तच्चरणसरोरुहांतिकं व्रजंति - त्याच्या चरणकमलाजवळ प्राप्त होतात. ॥३७॥
हे राजन्, संतपुरुषांनी सांगितलेल्या आत्मस्वरूप भगवंतांच्या मधुर कथांचे अमृत जे आपल्या कानांच्या द्रोणात भरभरून त्यांचे श्रवण करतात, ते विषयांनी विषारी झालेले अंतःकरण शुद्ध करतात आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांपाशी जातात. (३७)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां द्वितीयः स्कन्धे द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
स्कंध दुसरा - अध्याय दुसरा समाप्त

GO TOP