|  | 
| 
श्रीमद् भागवत पुराण  
शुकप्रवचनम् - तत्रादौ ध्यानविधिः  ध्यानविधी आणि भगवंतांच्या विराट स्वरूपाचे वर्णन - संहिता  -  अन्वय  -  अर्थ  समश्लोकी - मराठी 
श्रीशुक उवाच - वरीयान् एष ते प्रश्नः कृतो लोकहितं नृप । आत्मवित् सम्मतः पुंसां श्रोतव्यादिषु यः परः ॥ १ ॥ 
श्रीशुकदेव सांगतात -  ( अनुष्टुप् ) हिताचा प्रश्न सर्वांच्या राजा हा पुसला तुम्ही । आत्मज्ञान्या असा प्रश्न आवडे ध्यान कीर्तना ॥ १ ॥ 
नृप -  हे राजा ! पुंसां -  मनुष्यांना श्रोतव्यादिषु -  ऐकण्यास योग्य अशा गोष्टीत यः -  जो परः -  श्रेष्ठ च -  आणि आत्मवित्संमतः -  आत्मज्ञानी पुरुषांना मान्य असा लोकहितं -  लोकहितार्थ कृतः -  केलेला एषः -  हा  ते -  तुझा प्रश्नः -  प्रश्न वरीयान् -  चांगला आहे. ॥१॥  
 
श्रीशुकदेव म्हणाले - राजा, लोकहितासाठी म्हणून विचारलेला हा प्रश्न फारच चांगला आहे. कारण मनुष्यासाठी ऐकणे इत्यादींबाबत श्रेष्ठ काय असे तू विचारलेस. आत्मज्ञानी पुरुष अशा प्रश्नाचा मोठाच आदर करतात. (१) 
 
श्रोतव्यादीनि राजेन्द्र नृणां सन्ति सहस्रशः । अपश्यतां आत्मतत्त्वं गृहेषु गृहमेधिनाम् ॥ २ ॥ 
राजा ! जे काम धंद्यात गुंतले ते न जाणती । स्वरूप आपुले इच्छी त्यासी तो लाख ही कथा ॥ २ ॥ 
राजेन्द्र -  हे राजश्रेष्ठा ! आत्मतत्वं -  आत्मज्ञान अपश्यतां -  न जाणणार्या गृहेषु गृहमेधिनां -  प्रपंचात आसक्त राहून गृहस्थधर्म आचरणार्या नृणां -  पुरुषांना श्रोतव्यादीनि -  श्रवणमननादि साधने सहस्त्रशः -  हजारो संति -  आहेत. ॥२॥  
 
राजेंद्रा ! जे गृहस्थ संसारातील कामधंद्यात गढून गेले आहेत, आपल्या स्वरूपाला जे जाणत नाहीत, त्यांच्यासाठी ऐकण्यासारख्या, सांगण्यासारख्या इत्यादी हजारो गोष्टी आहेत. (२) 
 
निद्रया ह्रियते नक्तं व्यवायेन च वा वयः । दिवा चार्थेहया राजन् कुटुंबभरणेन वा ॥ ३ ॥ 
आयुष्य सरते त्यांचे रात्री स्त्री दिनि ते धन । अरेरे ! मरती व्यर्थ पोसिता बायका मुले ॥ ३ ॥ 
राजन् -  हे राजा नक्तं -  रात्रीतील वयः -  आयुष्य निद्रया -  झोपेने वा -  अथवा व्यवायेन -  विषयसेवनाने च -  आणि दिवा -  दिवसातील अर्थेहया -  द्रव्य मिळविण्याकरिता केलेल्या उद्योगाने वा -  अथवा कुटुंबभरणेन -  कुटुंबाच्या पालनपोषणाने च -  दुसर्याही कारणांनी ह्रियते -  नष्ट होते. ॥३॥  
 
हे राजा ! त्यांचे सर्व आयुष्य रात्री झोपेत किंवा स्त्री-सहवासात आणि दिवसा संपत्तीची हाव किंवा कुटुंबाचे पालनपोषण यातच संपून जाते. (३) 
 
देहापत्यकलत्रादिषु आत्मसैन्येष्वसत्स्वपि । तेषां प्रमत्तो निधनं पश्यन्नपि न पश्यति ॥ ४ ॥ 
पुत्र स्त्री तनु ही खोटी जे वाटे आपुले असे । सरतो काळ हा त्यांना मोहाने नकळे कधी ॥ ४ ॥ 
देहापत्यकलत्रादिषु -  देह, पुत्र, स्त्री इत्यादि आत्मसैन्येषु -  आपला परिवार असत्सु अपि -  मिथ्या असतानाहि तेषां -  त्या देहादिकांचे निधनं -  मरण पश्यन् अपि -  पहात असूनही प्रमत्तः -  बेसावध राहणारा न पश्यति -  पहात नाही. ॥४॥  
 
संसारामध्ये ज्यांना तो आपले अत्यंत घनिष्ठ संबंधी समजतो, ते शरीर, पुत्र, पत्नी इत्यादी सारे मिथ्या आहेत. परंतु जीव त्यांच्या मोहात असा अडकून जातो की, रात्रंदिवस आपण मृत्यूच्या दाढेत आहोत, हे पाहूनही तो सावध होत नाही. (४) 
 
तस्माद्भारत सर्वात्मा भगवान् ईश्वरो हरिः । श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चेच्छताभयम् ॥ ५ ॥ 
तुम्ही तो अभयस्थानप्राप्तीचा ध्यास घेतला । श्रवणी कीर्तनी ध्यानी लीला श्रीकृष्ण इच्छिता ॥ ५ ॥ 
भारत -  हे भरतवंशीय राजा ! तस्मात् -  म्हणून अभयं -  मोक्ष इच्छता -  इच्छिणाराने हरिः -  भवबंधन तोडणारा ईश्वरः -  जगन्नियंता सर्वात्मा -  सर्वांतर्यामी असा जो भगवान् -  भगवान श्रोतव्यः -  श्रवण करण्यास योग्य  च -  आणि कीर्तितव्यः -  कीर्तन करण्यास योग्य च -  आणि स्मर्तव्यः -  स्मरण करण्यास योग्य आहे. ॥५॥  
 
म्हणून परीक्षिता, जो अभयप्रद प्राप्त करून घेऊ इच्छितो, त्याने सर्वांचा आत्मा असणार्या, सर्वशक्तिमान, भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचेच श्रवण, कीर्तन आणि स्मरण केले पाहिजे. (५) 
 
एतावान् सांख्ययोगाभ्यां स्वधर्मपरिनिष्ठया । जन्मलाभः परः पुंसां अंते नारायणस्मृतिः ॥ ६ ॥ 
ज्ञान भक्ति तसा धर्म यातुनी हेच साधिणे । मृत्युच्या समयी कृष्ण स्मृती चित्तासि लावणे ॥ ६ ॥ 
स्वधर्मपरिनिष्ठया -  स्वधर्माच्या ठिकाणी पूर्ण निष्ठा ठेवून सांख्ययोगाभ्यां -  आत्मा कोणता, अनात्मा कोणता याचा विचार व अष्टांग योगसाधन यांचाही विचार करून अंते -  मरणसमयी नारायणस्मृतिः -  नारायणाचे स्मरण करणे एतावान् -  एवढेच पुंसां -  पुरुषांचे परः -  मोठे जन्मलाभः -  जन्मास आल्याचे फल होय. ॥६॥  
 
मनुष्यजन्माचा हाच श्रेष्ठ लाभ आहे की, ज्ञानाने, भक्तीने किंवा आपल्या धर्मावरील निष्ठेने कोणत्याही प्रकारे का होईना जीवन असे बनवावे की, मृत्यूसमयी भगवंतांचे स्मरण अवश्य व्हावे. (६) 
 
प्रायेण मुनयो राजन् निवृत्ता विधिषेधतः । नैर्गुण्यस्था रमंते स्म गुणानुकथने हरेः ॥ ७ ॥ 
निर्गूणरूपि जो स्थीर विधीच्या पार तो असा ।  म्हणोनी ऋषि नी संत रमती कृष्ण कीर्तनी ॥ ७ ॥ 
राजन् -  हे राजा ! विधिनिषेधतः -  श्रृति-स्मृतींनी अवश्य करण्यास सांगितलेली कर्मे व त्यांनी निषिद्ध ठरवलेली कर्मे यापासून निवृत्ताः -  पराङ्मुख झालेले नैर्गुणस्थाः -  निर्गुण ब्रह्मात निमग्न झालेले मुनयः -  मुनिजन प्रायेण -  बहुतकरून हरेः -  श्रीहरीचे गुणानुकथने -  गुणानुवाद वर्णन करण्यात रमंते स्म -  रममाण होतात. ॥७॥  
 
हे राजा, निर्गुण स्वरूपात रमलेले म्हणून विधि-निषेधाच्या मर्याला ओलांडलेले मुनीसुद्धा प्रामुख्याने भगवंतांच्या गुणांच्या वर्णनातच रमून जातात. (७) 
 
इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसम्मितम् । अधीतवान् द्वापरादौ पितुर्द्वैपायनादहम् ॥ ८ ॥ 
निर्गूणरूपि जो स्थीर विधीच्या पार नी भगवद्रुप । शिकलो अंति द्वापारा पिताश्री व्यासजीकडे ॥ ८ ॥ 
अहं -  मी ब्रह्मसंमितं -  वेदांशी तुल्य असे इदं -  हे भागवत नाम -  भगवंतानी सांगितलेले ‘भागवत’ हे नाव असलेले पुराणं -  पुराण द्वापरादौ -  द्वापर आहे आदि ज्याच्या अशा कलियुगाच्या प्रारंभी पितुः द्वैपायनात् -  पिता जो द्वैपायन व्यास त्याच्याकडून अधीतवान् -  शिकलो. ॥८॥  
 
द्वापरयुगाच्या शेवटी या वेदतुल्य श्रीमद्भागवत नावाच्या महापुराणाचे मी माझे वडील श्री व्यास यांचेकडून अध्ययन केले होते. (८) 
 
परिनिष्ठितोऽपि नैर्गुण्य उत्तमश्लोकलीलया । गृहीतचेता राजर्षे आख्यानं यत् अधीतवान् ॥ ९ ॥ तदहं तेऽभिधास्यामि महापौरुषिको भवान् । यस्य श्रद्दधतामाशु स्यान् मुकुंदे मतिः सती ॥ १० ॥ 
निर्गुणी मम तो निष्ठा कृष्णलिलामृते पहा । हृदया वेधिले माझ्या तेणे मी शिकलो कथा ॥ ९ ॥ तुम्ही तो भगवद्भक्त म्हणोनी सांगतो कथा । श्रद्धा नी शुद्धवृत्तीचे लोक त्या पदि पावती ॥ १० ॥ 
राजर्षे -  हे राजश्रेष्ठा परीक्षिता ! नैर्गुण्ये -  निर्गुण परब्रह्मांत परिनिष्ठितः अपि -  निरंतर ध्यानस्थ असा असुनही उत्तमश्लोकलीलया -  भगवंताच्या लीलेने गृहीतचेताः -  आकृष्टचित्त झालेला यत् -  जे आख्यानं -  कथानक अधीतवान् -  शिकलो तत् -  ते  अहं -  मी ते -  तुला अभिधास्यामि -  सांगणार आहे. यस्य -  ज्याच्या ठिकाणी श्रद्दधतां -  श्रद्धा करणारांना मुकुंदे -  मुक्ति देणार्या परमेश्वराच्या विषयी सती -  उत्तम मतिः -  बुद्धि आशु -  शीघ्र स्यात् -  होत असते भवान् -  आपण महापौरुषिकः -  मोठे भगवद्भक्त अस्ति -  आहा. ॥९-१०॥  
 
हे राजर्षे, निर्गुण परमात्म्यामध्ये पूर्ण निष्ठा असूनही भगवान श्रीकृष्णांच्या लीलांनी माझे हृदय आकृष्ट केल्यामुळे मी या पुराणाचा अभ्यास केला. (९)  तू भगवंतांचा परम भक्त आहेस, म्हणून मी तुला हे सांगतो. जो याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याची शुद्ध चित्तवृत्ती ताबडतोब श्रीकृष्णांच्या चरणी स्थिर होते. (१०) 
एतन्निर्विद्यमानानां इच्छतां अकुतोभयम् । योगिनां नृप निर्णीतं हरेर्नामानुकीर्तनम् ॥ ११ ॥ 
लोकी वा स्वर्गिचे सौख्य विरक्ती मोक्षही तसे । योगिया साधका शास्त्र भगवत् कीर्तनी असे ॥ ११ ॥ 
नृप -  हे राजा ! इच्छतां -  सकाम पुरुषांना योगिनां -  निष्काम ज्ञानेच्छूंना निर्विद्यमानानां -  आणि वैराग्यवान मुमुक्षूंना हरेः -  श्रीहरीच्या नामानुकीर्तनं -  नामांचे वारंवार कीर्तन करणे एतत् -  हे अकुतोभयं -  ज्याला कोठूनही भयप्राप्ती नाही असे निर्णीतं -  ठरविलेले आहे. ॥११॥  
 
जे लोक लौकिक अगर पारलौकिक कोणत्याही वस्तूची इच्छा करतात किंवा याउलट संसारातील दुःखांचा अनुभव घेऊन त्यापासून विरक्त झाले आहेत आणि निर्भय अशा मोक्षाची इच्छा करतात, अशा साधकांसाठी आणि ज्ञानी पुरुषांसाठी सुद्धा भगवंतांच्या नामांचे संकीर्तन करणे, हाच मार्ग सर्व शास्त्रांनी निश्चयपूर्वक सांगितला आहे. (११) 
 
किं प्रमत्तस्य बहुभिः परोक्षैर्हायनैरिह । वरं मुहूर्तं विदितं घटते श्रेयसे यतः ॥ १२ ॥ 
जागा ना आपुल्या कार्या व्यर्थ त्याचे जिणे असे । ज्ञानाचा क्षणही श्रेष्ठ कल्याणा मार्ग दावितो ॥ १२ ॥ 
इह -  या नश्वर लोकी बहुभिः -  बहुत परोक्षैः -  न जाणलेल्या हायनेः -  वर्षांनी प्रमत्तस्य -  मूर्खाला किम् -  काय उपयोग होणार आहे मुहूर्तं -  दोन घटकांपर्यंत विदितं -  जाणून केलेले काम वरम् -  चांगले यतः -  कारण श्रेयसे -  कल्याणाला घटेत -  मिळवून देते. ॥१२॥  
 
आपले कल्याण साधण्यात तत्पर नसणार्यांच्या व्यर्थ जाणार्या दीर्घ आयुष्याचा काय फायदा ? सावध राहून ज्ञानासाठी उपयोगात आणलेल्या एक दोन घटिकाही श्रेष्ठ आहेत. कारण त्या आपल्या कल्याणाकरिता उपयोगात आणल्या जातात. (१२) 
 
खट्वाङ्गो नाम राजर्षिः ज्ञात्वेयत्तामिहायुषः । मुहूर्तात् सर्वं उत्सृज्य गतवान् अभयं हरिम् ॥ १३ ॥ 
खट्वांगे मृत्यु जाणोनी तासात सर्व त्यागिले । तेणे त्या लाभले विष्णुकृपेचे अभयी पद ॥ १३ ॥ 
खट्वाङ्गः नाम -  खट्वांग या नावाचा राजर्षिः -  श्रेष्ठ राजा इह -  या लोकी आयुषः -  आयुष्याच्या इयत्तां -  मर्यादेला ज्ञात्वा -  जाणून सर्वं -  सर्व मुहूर्तात् -  दोन घटकात उत्सृज्य -  सोडून अभयं -  ज्याच्या ठिकाणी भयच नाही अशा हरिं -  श्रीहरीप्रत गतवान् -  गेला. ॥१३॥  
 
राजर्षी खट्वाङ्गाने आपले आयुष्य संपत आले आहे असे जाणून दोन घटकांमध्येच सर्वस्वाचा त्याग करून भगवंतांचे अभयपद प्राप्त करून घेतले. (१३) 
 
तवाप्येतर्हि कौरव्य सप्ताहं जीवितावधिः । उपकल्पय तत्सर्वं तावद् यद् सांपरायिकम् ॥ १४ ॥ 
तुम्हा तो लाभले सात दिन हे भाग्य केवढे । यच्यात करणे सारेकल्याणाचेचि ज असे ॥ १४ ॥ 
कौरव्य -  हे कुरुवंशोद्भव राजा ! एतर्हि -  आता तव -  तुझी अपि -  सुद्धा सप्ताहं -  सात दिवसांची जीवितावधिः -  आयुष्याची मर्यादा तावत् -  म्हणून तोपर्यंत यत् -  जे सांपरायिकं -  परलोकसंबंधी कर्तव्यकर्म तत् -  ते सर्वं -  सर्व उपकल्पय -  संपादन कर. ॥१४॥  
 
परीक्षिता, तुझ्या जीविताचे अजून सात दिवस शिल्लक आहेत. या कालावधीमध्ये आपल्या पारलौकिक कल्याणासाठी तुला जे काही करता येईल, ते सर्व तू कर. (१४) 
 
अंतकाले तु पुरुष आगते गतसाध्वसः । छिन्द्याद् असङ्गशस्त्रेण स्पृहां देहेऽनु ये च तम् ॥ १५ ॥ 
मनुष्यें मृत्युच्या वेळी धरावा धीर तो मनीं । वैराग्यशस्त्र योजोनी ताडावा मोह वेगळा ॥ १५ ॥ 
अंतकाले -  मरणकाल आगते -  प्राप्त झाला असता पुरुषः -  मनुष्याने तु -  तर गतसाध्वसः -  गेली आहे भिती ज्याची असा होत्साता असंग-शस्त्रेण -  निर्वासनारूप शस्त्राने देहे -  स्वतःच्या देहावर असलेल्या स्पृहां -  इच्छेला छिन्द्यात् -  तोडून टाकावे च -  आणि तम् अनु -  त्या देहाच्या मागून आलेले ये -  जे स्त्री पुत्रादिक त्या विषयींचा देखील अभिलाष सोडून दयावा. ॥१५॥ 
 
मृत्यूचा समय आल्यावर मनुष्याने भयभीत होऊ नये. त्याने वैराग्याच्या शस्त्राने शरीर आणि त्याच्याशी संबंध असणार्या विषयीची ममता तोडून टाकावी. (१५) 
 
गृहात् प्रत्प्रव्रजितो धीरः पुण्यतीर्थजलाप्लुतः । शुचौ विविक्त आसीनो विधिवत् कल्पितासने ॥ १६ ॥ अभ्यसेन् मनसा शुद्धं त्रिवृद् ब्रह्माक्षरं परम् । मनो यच्छेज्जितश्वासो ब्रह्मबीजं अविस्मरन् ॥ १७ ॥ 
धैर्याने घर सोडोनी तीर्थांचे स्नान ते घडो । एकांती शुद्ध जागेत बैसणे विधिपूर्वक ॥ १६ ॥ पवित्र तीन मात्रांचा मनात मंत्र जापिणे मनासी प्राणवायूते रोधुनी नित्य जापिणे॥ १७ ॥ 
 धीरः -  धैर्यवान  गृहात् -  घरातून प्रव्रजितः -  वैराग्याने निघून गेलेला पुण्यतीर्थजलाप्लुतः -  पवित्र तीर्थाच्या उदकात स्नान केलेला शुचौ -  पवित्र अशा विविक्ते -  एकांत स्थली विधिवत्कल्पितासने -  विधिपूर्वक तयार केलेल्या आसनावर आसीनः -  बसलेला असा मनसा -  मनाने शुद्धं -  उपाधिरहित परं -  सर्वोत्तम त्रिवृत् -  अकार, उकार व मकार यांनी युक्त अशा ब्रह्माक्षरं -  ब्रह्मरूप असल्यामुळे अविनाशी जे ओमकार अक्षर त्याचा अभ्यसेत् -  जप करावा ब्रह्मबीजं -  ओमकाराचे अविस्मरन् -  स्मरण ठेवून जितश्वासः -  श्वासोच्छ्वासाचे नियमन करून मनः -  चित्त यच्छेत् -  वश करावे. ॥१६-१७॥ 
 
मोठ्या धैर्याने घराच्या बाहेर पडून पवित्र तीर्थातील जलात स्नान करावे आणि पवित्र तसेच एकांत स्थानी विधिपूर्वक आसन घालून बसावे. (१६)  त्यानंतर परम-पवित्र अशा, "अ-उ-म" या तीन मात्रांनी युक्त असलेल्या अक्षर परब्रह्माचा (ॐ काराचा) मनःपूर्वक जप करावा. प्राणवायूला वश करून घेऊन मनाचा निग्रह करावा व प्रणवाचे विस्मरण होऊ देऊ नये. (१७) 
नियच्छेद् विषयेभ्योऽक्षान् मनसा बुद्धिसारथिः । मनः कर्मभिराक्षिप्तं शुभार्थे धारयेत् धिया ॥ १८ ॥ 
बुद्धिच्या वैभवे चित्त चित्तातुनहि इंद्रिये । वासना सोडुनी सर्व हरीसी ध्यान लाविणे ॥ १८ ॥ 
 बुद्धिसारथिः -  बुद्धि हीच ज्याची सारथी आहे अशा मनसा -  मनाने विषयेभ्यः -  विषयांपासून अक्षान् -  इंद्रियांना नियच्छेत् -  परावृत्त करावे कर्मभिः -  वासनांनी आक्षिप्तं -  व्यग्र झालेल्या मनः -  मनाला धिया -  बुद्धीने शुभार्थे -  मंगल अशा भगवंताच्या रूपाच्या ठिकाणी धारयेत् -  स्थिर करावे. ॥१८॥ 
 
बुद्धीच्या साहाय्याने, मनाच्या द्वारा, इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून परावृत्त करावे आणि कर्मवासनांनी चंचल झालेल्या मनाला विचारांनी काबूत ठेवून ते भगवंतांच्या मंगलमय रूपाकडे लावावे. (१८) 
 
तत्रैकावयवं ध्यायेत् अव्युच्छिन्नेन चेतसा । मनो निर्विषयं युक्त्वा ततः किञ्चन न स्मरेत् । पदं तत्परमं विष्णोः मनो यत्र प्रसीदति ॥ १९ ॥ 
एकेक अंग ध्यावोनी जिरवा वासना पुर्या । रहावे विरुनी तेथे भक्ता आनंद लाभतो ॥ १९ ॥ 
 तत्र -  त्या भगवंताच्या रूपात अव्युच्छिन्नेन -  सर्वस्वी संलग्न झालेल्या चेतसा -  चित्ताने एकावयवं -  त्या रूपातील एकएका अवयवाचे ध्यायेत् -  ध्यान करावे मनः -  मन निर्विषयं -  विषयचिंतनरहित युक्त्वा -  ईश्वराच्या ठिकाणी युक्त करून ततः -  त्यानंतर किंचन -  दुसर्या कशाचेही न स्मरेत् -  स्मरण करू नये यत्र -  ज्या ठिकाणी मनः -  अंतःकरण प्रसीदति -  प्रसन्न होते तत् -  ते विष्णोः -  विष्णूचे परमं -  श्रेष्ठ  पदं -  स्थान होय. ॥१९॥ 
 
स्थिर चित्ताने भगवंतांच्या मूर्तीमधील कोणत्याही एका अवयवाचे ध्यान करावे. अशा प्रकारे एकेका अंगाचे ध्यान करता करता विषयवासनारहित झालेल्या मनाला पूर्णरूपाने भगवंतांमध्ये असे तल्लीन करावे की, ते पुन्हा दुसर्या कोणत्याही विषयांचे चिंतन करणार नाही. जे प्राप्त झाल्यानंतर मन भगवत्प्रेमाच्या आनंदाने भरून जाते, ते भगवान विष्णूंचे परमपद आहे. (१९) 
 
रजस्तमोभ्यां आक्षिप्तं विमूढं मन आत्मनः । यच्छेद्धारणया धीरो हंति या तत्कृतं मलम् ॥ २० ॥ 
ध्यानात तम अज्ञान रज विक्षेप हो जरी । घाबरा न तया ध्यानी सारे योगात नष्टती ॥ २० ॥ 
 धीरः -  धैर्यवान पुरुष रजस्तमोभ्यां -  रजोगुण व तमोगुण यांनी आक्षिप्तं -  आपल्याकडे ओढून घेतलेल्या विमूढं -  विचारशून्य अशा मनः -  अंतःकरणाला धारणया -  धारणेने यच्छेत् -  आवरून धरावे. या -  जी आत्मनः -  मनाच्या तत्कृतं -  त्यांनी केलेल्या मलं -  दोषाला हंति -  नष्ट करते. ॥२०॥ 
 
मन रजोगुणामुळे चंचल किंवा तमोगुणामुळे मूढ झाले तरी धैर्याने, योगधारणेच्या द्वारा त्याला वश करून घ्यावे. कारण अशी धारणाच वरील दोन गुणांचे दोष नाहीशी करते. (२०) 
 
यस्यां सन्धार्यमाणायां योगिनो भक्तिलक्षणः । आशु संपद्यते योग आश्रयं भद्रमीक्षतः ॥ २१ ॥ 
धारणा स्थिर त्या होता मंगलोमय आश्रय । पाहता लाभते त्याला भक्तिसुख निरंतर ॥ २१ ॥ 
यतः -  कारण संधार्यमाणाया -  धारणा केली असता भद्रं -  सुखानंदरूपी आश्रयं -  विषयाला ईक्षतः -  शोधून पहाणार्या योगिनः -  योग्याला भक्तिलक्षणः -  भक्ति उत्पन्न होणे हेच ज्याचे लक्षण आहे असा योगः -  योग आशु -  शीघ्र संपद्यते -  संपादन करिता येतो. ॥२१॥ 
 
धारणा स्थिर झाल्यावर ध्यानामध्ये जेव्हा योगी आपला परम मंगलमय आश्रय जो भगवान त्यांना पाहतो, तेव्हा त्याला लगेच भक्तियोगाची प्राप्ती होते (२१) 
 
राजोवाच -  यथा सन्धार्यते ब्रह्मन् धारणा यत्र सम्मता । यादृशी वा हरेदाशु पुरुषस्य मनोमलम् ॥ २२ ॥ 
राजा परीक्षिती म्हणाला- द्विजा हो धारणाकोण्या साधनें करणे कशी । कोणते ते तिथे रूप जै शुद्ध चित्त होतसे ॥ २२ ॥ 
 ब्रह्मन् -  हे ब्रह्मस्वरूपी शुकाचार्या !  धारणा -  धारणा यथा -  ज्याप्रकाराने संधार्यते -  धारण केली जाते वा -  अथवा यत्र -  ज्या ठिकाणी संमता -  मान्य झालेली आहे यादृशी -  जशी पुरुषस्य -  मनुष्यप्राण्याच्या मनोमलं -  मनाच्या दोषाला आशु -  शीघ्र हरेत् -  हरण करते. ॥२२॥ 
 
परीक्षिताने विचारले ब्रह्मन्, जी धारणा मनुष्याच्या मनातील मल तत्काळ काढून टाकते, ती धारणा कोणत्या वस्तूमध्ये, कोणत्या प्रकारे केली जाते आणि तिचे स्वरूप काय ? (२२) 
 
श्रीशुक उवाच - जितासनो जितश्वासो जितसङ्गो जितेंद्रियः । स्थूले भगवतो रूपे मनः सन्धारयेद् धिया ॥ २३ ॥ 
श्रीशुकदेवजी म्हणाले- जिंकणे आसना श्वासा आसक्ति आणि इंद्रिया । बुद्धिच्या मधुनी चित्ती हरीचे स्थलरूप ध्या ॥ २३ ॥ 
 जितसंगः -  सर्वसंगपरित्याग केलेला जितेन्द्रियः -  सर्व इंद्रिये जिंकलेला जितासनः -  दृढ ब्रह्मासन घालून बसलेला जितश्वासः -  श्वासोच्छ्वासाचा जय केलेला धिया -  निश्चयात्मक बुद्धीने  मनः -  मन भगवतः -  भगवंताच्या स्थूले -  स्थूल रूपे -  स्वरूपावर संधारयेत् -  दृढ धरावे. ॥२३॥ 
 
श्रीशुक म्हणाले, परीक्षिता, आसन, श्वास, आसक्ती आणि इंद्रियांवर विजय मिळवून नंतर बुद्धीने मनाला भगवंतांच्या स्थूल रूपामध्ये स्थिर करावे. (२३) 
 
विशेषस्तस्य देहोऽयं स्थविष्ठश्च स्थवीयसाम् । यत्रेदं दृश्यते विश्वं भूतं भव्यं भवच्च सत् ॥ २४ ॥ 
सर्वकार्यरुपी विश्व सगळे दिसते तदा । विराट भगवंताचे रूप ते सत्य जाणणे ॥ २४ ॥ 
 यत्र -  ज्या ठिकाणी भूतं -  होऊन गेलेले च -  आणि भव्यं -  होणारे च -  आणि भवत् -  वर्तमान काळचे सत् -  केवळ कार्यरूपी इदं -  हे विश्वं -  जगत्  दृशते -  दिसते अयं -  हाच तस्य -  त्या भगवंताचा स्थवीयसां -  अत्यंत मोठयामध्ये  स्थविष्ठः -  मोठा असा विशेषः देहः -  विराट देह होय. ॥२४॥ 
 
हे कार्यरूप संपूर्ण विश्व, जे काही कधी होते, आहे अगर असेल असे संपूर्ण विश्व ज्यामध्ये दिसते, तेच भगवंतांचे स्थूलातिस्थूल आणि विराट शरीर आहे. (२४) 
 
अण्डकोशे शरीरेऽस्मिन् सप्तावरणसंयुते । वैराजः पुरुषो योऽसौ भगवान् धारणाश्रयः ॥ २५ ॥ 
जलाग्नि वायु आकाश अहंकारादि पाच हे । प्रकृती नी महत्तत्व यांनी ब्रह्मांड व्यापिले ॥ विराटरूपि तो देव धारणेचाचि आश्रय ॥ २५ ॥ 
 सप्तावरणसंयुते -  सात आवरणांनी युक्त अशा अस्मिन् -  ह्या आंडकोशे -  ब्रह्मांडरूप  शरीरे -  देहात यः -  जो असौ -  हा वैराजः -  विराट्  पुरुषः -  पुरुष भगवान् -  षड्गुणैश्वर्यसंपन्न परमेश्वर धारणाश्रयः -  धारणायोगाला आधारभूत असा आहे. ॥२५॥ 
 
जल, अग्नी, वायू, आकाश, अहंकार, महत्तत्त्व आणि प्रकृती या सात आवरणांनी वेढलेल्या या ब्रह्मांडरूपी शरीरात जो विराट पुरुष आहे तोच धारणेचे आश्रय भगवान आहेत. (२५) 
 
पातालमेतस्य हि पादमूलं पठंति पार्ष्णिप्रपदे रसातलम् । महातलं विश्वसृजोऽथ गुल्फौ तलातलं वै पुरुषस्य जङ्घे ॥ २६ ॥ 
(इंद्रवज्रा) पाताळा त्याचे तळवे पहा ते टाचा तयाच्या रसताळ जाणा । घोटे महाताळ असेचि जाणा नी पिंढर्या त्या तळ-आतळाच्या ॥ २६ ॥ 
 हि -  खरोखर एतस्य -  या विराट् पुरुषाचे पादमूलं -  पायांचे तळवे पातालं -  पाताळ पार्ष्णिप्रपदे -  पायांचे पूर्वपश्चाद्भाग  रसातलं -  रसातल अथ -  त्यानंतर विश्वसृजः -  विराट् पुरुषाच्या गुल्फौ -  पायांचा घोटा महातलं -  महातल वै -  खरोखर पुरुषस्य -  विराट् पुरुषाच्या जंघे -  पोटर्या तलातलं -  तलातल पठंति -  म्हणतात. ॥२६॥ 
 
तत्त्वज्ञ पुरुष त्या विराट पुरुषाचे वर्णन असे करतात - विराट पुरुषाचे तळवे हे पाताळ, टाचा आणि पंजे हे रसातळ, घोटे हे महातळ आणि पोटर्या या तलातल आहेत. (२६) 
 
द्वे जानुनी सुतलं विश्वमूर्तेः ऊरुद्वयं वितलं चातलं च । महीतलं तज्जघनं महीपते नभस्तलं नाभिसरो गृणन्ति ॥ २७ ॥ 
ते सूतलो ते गुडघे तयांचे मांड्या तयाच्या अतलो वितालो । नी पोट भू लोक परीक्षिता रे ती नाभि आकाश तया रुपाची ॥ २७ ॥ 
 महीपते -  हे राजा ! विश्वमूर्तेः -  विराट पुरुषाचे द्वे -  दोन्ही जानुनी -  गुढगे सुतलं -  सुतल ऊरुद्वयं -  दोन्ही मांडया वितलं -  वितल च -  आणि अतलं -  अतल तज्जघनं -  कंबरेमागील भाग महीतलं -  भूतल च -  आणि नाभिसरः -  नाभिरूप सरोवर नभस्तलं -  आकाश गृणंति -  म्हणतात. ॥२७॥ 
 
विश्वमूर्ती भगवंतांचे दोन गुडघे हे सुतळ, दोन्ही मांड्या हे वितळ आणि अतळ आणि कंबर भूतळ आहे. हे परीक्षिता, त्यांच्या नाभिरूप सरोवरालाच आकाश म्हणतात. (२७) 
 
उरःस्थलं ज्योतिरनीकमस्य ग्रीवा महर्वदनं वै जनोऽस्य । तपो रराटीं विदुरादिपुंसः सत्यं तु शीर्षाणि सहस्रशीर्ष्णः ॥ २८ ॥ 
महर् गळ्यासी अन वक्षिं स्वर्ग मुखीं पहा तो जन लोक आहे । कपाळ त्याचे तपलोक शोभे ते सत्यलोकास सहस्त्र डोके॥ २८ ॥ 
 अस्य -  या आदिपुंसः -  आदिपुरुषाची उरःस्थलं -  छाती ज्योतिरनीकं -  तारांगण ग्रीवा -  कंठ महः -  महर्लोक वदनं -  मुख जनः -  जनलोक रराटीं -  ललाट तपः -  तपोलोक वै -  आणि अस्य सहस्रशीर्ष्णः -  या हजारो मस्तकांच्या विराट्पुरुषाची तु -  तर शीर्षाणि -  मस्तके सत्यं -  सत्यलोक विदुः -  जाणतात. ॥२८॥ 
 
आदिपुरुष परमात्म्याच्या छातीला स्वर्गलोक, गळ्याला महर्लोक, वदनाला जनोलोक आणि कपाळाला तपोलोक म्हणतात. त्या सहस्रशीर्ष असलेल्या भगवंतांचा मस्तकसमूह म्हणजेच सत्यलोक होय. (२८) 
 
इन्द्रादयो बाहव आसुरुस्राः कर्णौ दिशः श्रोत्रममुष्य शब्दः । नासत्यदस्रौ परमस्य नासे घ्राणोऽस्य गंधो मुखमग्निरिद्धः ॥ २९ ॥ 
त्या देवता इंद्र अशा भुजांना दिशा पहा कान तया रुपाच्या । ते अश्विनीपुत्रचि नाक छिद्र मुखीं पहा अग्नि विशाल ज्वाला ॥ २९ ॥ 
 अमुष्य -  ह्या परमस्य -  परमेश्वराचे बाहवः -  बाहू इंद्रादयः -  इंद्रादिक उस्राः -  दैदिप्यमान देव कर्णौ -  दोन्ही कान दिशः -  दाही दिशा श्रोत्रं -  कर्णेंद्रिय शब्दः -  कर्णेंद्रियाचा विषय जो शब्द तो नासे -  दोन्ही नाकपुडया नासत्यदस्रौ -  नासत्य व सत्र म्हणजे अश्विनीकुमार हे घ्राणः -  घ्राणेंद्रिय गंधः -  सुवास अस्य -  याचे मुखं -  मुख इद्धः -  प्रदीप्त अग्निः -  अग्नि आहुः -  म्हणतात. ॥२९॥ 
 
इंद्रादी देवता त्यांचे हात आहेत. दिशा, कान आणि शब्द श्रवणेंद्रिये आहेत. दोन्ही अश्विनीकुमार त्यांच्या नाकाची छिद्रे आहेत, गंध हे घ्राणेंद्रिय आहे आणि धगधगणारी आग त्यांचे मुख आहे. (२९) 
 
द्यौरक्षिणी चक्षुरभूत्पतङ्गः पक्ष्माणि विष्णोरहनी उभे च । तद्भ्रूविजृम्भः परमेष्ठिधिष्ण्यं आपोऽस्य तालू रस एव जिह्वा ॥ ३० ॥ 
डोळे तया सूर्यहि अंतरिक्षी दिवा नि रात्रीसचि पापण्या त्या । त्या ब्रह्मलोका भुवया पहा हो टाळूस पाणी रस ती जिव्हाची ॥ ३० ॥ 
 अस्य -  ह्या विष्णो -  सर्वव्यापी विराट्पुरुषाचे अक्षिणी -  नेत्रगोलक द्यौः -  अंतरिक्ष चक्षुः -  नेत्रेंद्रिय  पतंगः -  सूर्य पक्ष्माणि -  पापण्या उभे -  दोन अहनी -  दिवस व रात्र तद्भ्रूविजृंभः -  त्याच्या भ्रुकुटीचा विलास परमेष्ठिधिष्ण्यं -  ब्रह्मदेवाचे स्थान तालुः -  ताळू आपः -  जल च -  आणि जिव्हा -  जीभ रस एव -  रसच अभूत् -  होय. ॥३०॥ 
 
भगवान विष्णूंचे नेत्र अंतरिक्ष आहेत, त्यांची पाहण्याची शक्ती सूर्य आहे, दोन्ही पापण्या रात्र आणि दिवस आहेत, त्यांचा भ्रूविलास ब्रह्मलोक आहे. टाळू पाणी आहे आणि जीभ रस आहे. (३०) 
 
छन्दांस्यनन्तस्य शिरो गृणंति दंष्ट्रा यमः स्नेहकला द्विजानि । हासो जनोन्मादकरी च माया दुरन्तसर्गो यदपाङ्गमोक्षः ॥ ३१ ॥ 
वेदास पाही तयि ब्रह्मरंध्र दाढा तयाच्या यम स्नेह दात । ते हास्य माया जगमोहिनीचे ही सृष्टि दृष्टीस विक्षेप त्याची ॥ ३१ ॥ 
 छंदांसि -  वेद अनंतस्य -  त्या विराट्पुरुषाचे शिरः -  मस्तक यमः -  यम दंष्ट्रा -  दाढा स्नेहकलाः -  पुत्रांदिकावरील स्नेहलेश द्विजानि -  दात जनोन्मादकरी -  लोकांना उन्मत्त करणारी माया -  माया हासः -  हसणे च -  आणि दुरंतसर्गः -  अपार अशी उत्पत्ति यदपांगमोक्षः -  ज्याचा नेत्रकटाक्ष गृणंति -  म्हणतात. ॥३१॥ 
 
वेदांना भगवंतांचे ब्रह्मरंध्र म्हणतात आणि यमाला दाढा. सर्व प्रकारचे प्रेम दात आहेत आणि जगाला मोहून टाकणारी त्यांची माया हेच त्यांचे हास्य म्हटले जाते. ही अनंत सृष्टी हा त्यांच्या मायेचा कटाक्ष-विक्षेप आहे. (३१) 
 
व्रीडोत्तरौष्ठोऽधर एव लोभो धर्मः स्तनोऽधर्मपथोऽस्य पृष्ठम् । कस्तस्य मेढ्रं वृषणौ च मित्रौ कुक्षिः समुद्रा गिरयोऽस्थिसङ्घाः ॥ ३२ ॥ 
ओठास लज्जा अधरोष्ठि लोभ तो धर्म स्तन्यीं नि अधर्म पाठ । प्रजापती हा जननेंद्रियो तो मित्रावरूणो तशि अंडकोष । काखी समुद्रो नग अस्थि त्याच्या हे रूप थोराट तयास आहे ॥ ३२ ॥ 
 अस्य -  या विराट् पुरुषाचा उत्तरोष्ठः -  वरचा ओठ व्रीडा -  लज्जा  अधरः एव -  खालचा ओठ लोभः -  लोभ स्तनः -  स्तन धर्मः -  धर्म पृष्ठः -  पृष्ठभाग अधर्मपथः -  अधर्माचा मार्ग तस्य -  त्याचे मेढ्रं -  शिस्न कः -  प्रजापति च -  आणि वृषणौ -  अंडकोश मित्रौ -  मित्र व वरुण कुक्षिः -  कूस समुद्राः -  चारी समुद्र अस्थिसंघाः -  अस्थिसमूह गिरयः -  पर्वत ॥३२॥ 
 
वरचा ओठ लज्जा तर खालचा ओठ लोभ आहे. धर्म स्तन तर अधर्म पाठ आहे. जननेंद्रिय हा प्रजापती तर अंडकोश मित्रावरूण आहेत. समुद्र पोट आहे तर मोठमोठे पर्वत त्यांची हाडे आहेत. (३२) 
 
नद्योऽस्य नाड्योऽथ तनूरुहाणि महीरुहा विश्वतनोर्नृपेन्द्र । अनन्तवीर्यः श्वसितं मातरिश्वा गतिर्वयः कर्म गुणप्रवाहः ॥ ३३ ॥ 
त्या विश्वरूपास नद्याच नाड्या ते वृक्ष रोमो अन श्वास वारा । तो चालतो काल तसेचि कर्म गुणास फेरा असतो तयाचा ॥ ३३ ॥ 
 अथ -  आणि नृपेंद्र -  हे राजश्रेष्ठा  विश्वतनोः अस्य -  या विराट् पुरुषाच्या नाडयः -  नाडया नदयः -  नदया तनूरुहाणि -  शरीरावरचे केश महीरुहाः -  वृक्ष श्वसितं -  श्वासोच्छ्वास अनंतवीर्यः -  अपार आहे बल ज्याचे असा मातरिश्वा  वायु गतिः -  गमन वयः -  काल कर्म -  क्रीडा गुणप्रवाहः -  त्रिगुणात्मक प्राण्यांचा संसार. ॥३३॥ 
 
हे राजन् ! विश्वमूर्ति विराट पुरुषाच्या नाड्या म्हणजे नद्या होत. वृक्ष रोम आहेत. अतिशय प्रभावी वायू हा श्वास आहे. काल हे त्याचे चालणे तर गुणांचे चक्र फिरते ठेवणे ये त्याचे कर्म आहे. (३३) 
 
ईशस्य केशान्न् विदुरम्बुवाहान् वासस्तु सन्ध्यां कुरुवर्य भूम्नः । अव्यक्तमाहुः हृदयं मनश्च स चन्द्रमाः सर्वविकारकोशः ॥ ३४ ॥ 
ढगास त्याचा कचभार माना अनंत संध्याचि तयास वस्त्रे । अव्यक्त त्याचे हृदयी कथीती विकार कोठार मनोचि चंद्र ॥ ३४ ॥ 
 कुरुवर्य -  हे कुरुवंशश्रेष्ठा  अंबुवाहान् -  मेघांना भूम्नः -  मोठयाहून मोठा अशा ईशस्य -  सर्वनियंत्या परमेश्वराचे केशान् -  केश वासः -  वस्त्राला तु -  तर संध्यां -  संध्याकाळ विदुः -  म्हणतात अव्यक्तं -  प्रकृतीला हृदयं -  हृदय च -  आणि सः -  तो चंद्रमाः -  चंद्र सर्वविकारत्रकोशः -  सर्व विकारांचे भांडारच मनः -  मन आहुः -  म्हणतात. ॥३४॥ 
 
परीक्षिता ढगांना त्याचे केस मानले आहे. संध्या (समय) त्या अनंतांचे वस्त्र आहे. महात्मा लोकांनी अव्यक्त अशा मूल प्रकृतीला त्यांचे हृदय म्हटले आहे आणि सर्व विकारांचा खजिना असलेले मन चंद्र म्हटले गेले आहे. (३४) 
 
विज्ञानशक्तिं महिमामनन्ति सर्वात्मनोऽन्तःकरणं गिरित्रम् । अश्वाश्वतर्युष्ट्रगजा नखानि सर्वे मृगाः पशवः श्रोणिदेशे ॥ ३५ ॥ 
चित्तो महत्तत्व अहंहि रूद्र हत्ती नि घोडे नख त्या रुपाला । मृगो पशूंची कमरेस वस्ती हे रूप थोराट तयास आहे ॥ ३५ ॥ 
 महिम् -  महत्त्वाला सर्वात्मनः -  सर्वस्वरूपी विराट् पुरुषाची विज्ञानशक्तिं -  चित्त गिरित्रं -  श्रीरुद्राला अंतःकरणं -  अंतःकरण आमनंति -  म्हणतात अश्वाश्वतर्युष्ट्रगजाः -  घोडे, खेचरे, उंट, हत्ती नखानि -  नखे सर्वे -  सर्व मृगाः -  हरिण पशवः -  गाई वगैरे श्रोणिदेशे -  कमरेचे ठायी ॥३५॥ 
 
सर्वात्मा भगवंतांचे चित्त म्हणजेच महत्तत्त्व आणि रुद्र म्हणजे त्यांचा अहंकार म्हटले आहे. घोडे, खेचर, उंट आणि हत्ती त्यांची नखे आहेत. वनात राहणारे सर्व मृग आणि पशू त्यांच्या कटिप्रदेशात आहेत. (३५) 
 
वयांसि तद् व्याकरणं विचित्रं मनुर्मनीषा मनुनो निवासः । गंधर्वविद्याधरचारणाप्सरः स्वरस्मृतीः असुरानीकवीर्यः ॥ ३६ ॥ 
पक्षी तयाची कुशलीकला नी बुद्धीहि स्वायंभुव ह्या मनूची । ते गेह त्याचे मनुपुत्र साचे राही तिथे तो रमुनी सदाचा । गंधर्व विद्याधर अप्सरांच्या षड्जादि नादास स्मृती म्हणाव्या । त्या दैत्यरूपासंचि वीर्य पाही हे रूप थोराट तयास आहे ॥ ३६ ॥ 
 वयांसि -  पक्षी विचित्रं -  विचित्र असे तद्व्याकरणं -  त्याचे शिल्पकौशल्य मनुः -  स्वायंभुव मनु मनीषा -  बुद्धि मनुजः -  मनुष्य निवासः -  राहण्याचे स्थल गंधर्वविदयाधरचरणाप्सरः -  गंधर्व, विदयाधर, चारण व अप्सरा स्वरः -  षड्जादि स्वर असुरानीकवीर्यः -  असुरसमूहात श्रेष्ठ असलेला प्रल्हाद स्मृतीः -  स्मृति. ॥३६॥ 
 
निरनिराळ्या प्रकारचे पक्षी हे त्यांचे अद्भुत रचनाकौशल्य आहे. स्वायंभुव मनू त्यांची बुद्धी आणि मनूचे संतान मनुष्य त्यांचे निवासस्थान आहे. गंधर्व, विद्याधर, चारण आणि अप्सरा, हे षड्ज आदि संगीतातील स्वरांची आठवण आहे. दैत्यसेना त्यांचे वीर्य आहे. (३६) 
 
ब्रह्माननं क्षत्रभुजो महात्मा विडूरुरङ्घ्रिश्रितकृष्णवर्णः । नानाभिधाभीज्यगणोपपन्नो द्रव्यात्मकः कर्म वितानयोगः ॥ ३७ ॥ 
द्विजो मुखो क्षत्रिय बाहु त्याच्या ते वैश्य मांडया पद शूद्र त्याचे । आवाहुनी यज्ञ तयासि कर्म हे रूप थोराट तयास आहे ॥ ३७ ॥ 
 ब्रह्मा -  ब्राह्मण आननं -  मुख महात्मा -  विराट् पुरुष क्षत्रभुजः -  क्षत्रिय आहेत भुज ज्याचे असा विडूरुः -  वैश्य आहेत मांडया ज्याच्या असा अङ्घ्रिश्रतकृष्णवर्णः -  ज्याच्या पायांचा शूद्रांनी आश्रय केलेला आहे असा नानाभिधाभीज्यगणोपपन्नः -  अनेक नावाच्या देवगणांनी युक्त असा द्रव्यात्मकः -  हविर्द्रव्य हेच ज्याचे स्वरूप आहे असा वितानयोगः -  यज्ञप्रयोग कर्म -  कर्तव्य ॥३७॥ 
 
ब्राह्मण मुख, क्षत्रिय भुजा, वैश्य मांड्या आणि शूद्र विराट पुरुषाचे चरण आहेत. विविध देवतांच्या नावाने जे द्रव्यमय यज्ञ केले जातात, ते त्यांचे कर्म होय. (३७) 
 
इयान् असौ ईश्वरविग्रहस्य यः सन्निवेशः कथितो मया ते । सन्धार्यतेऽस्मिन् वपुषि स्थविष्ठे मनः स्वबुद्ध्या न यतोऽस्ति किञ्चित् ॥ ३८ ॥ 
त्याचे जसे थोर स्वरूप आहे ते तुम्हा सांगितले असे हे । मुमुक्षु चित्तासि इथे स्थिरावी याच्याविना ना गति थोर कोणा ॥ ३८ ॥ 
 इयान् -  एवढा  असौ -  हा यः -  जो ईश्वरविग्रहस्य -  परमेश्वराच्या विराट्स्वरूपाचा सन्निवेशः -  अवयवांच्या ठेवणीचा प्रकार मया -  मी ते -  तुला कथितः -  सांगितला यतः -  ज्याहून किंचित् -  काहीसुद्धा न अस्ति -  नाही अस्मिन् -  ह्या स्थविष्ठे -  अत्यंत मोठया अशा वपुषि  विराट् शरीरावर स्वबुद्ध्या -  आपल्या निश्चयात्मक बुद्धीने मनः -  मन संधार्यते -  धारण करितात. ॥३८॥ 
 
परीक्षिता, विराट भगवंतांच्या स्थूल शरीराचे हेच स्वरूप आहे. ते मी तुला सांगितले. मुमुक्षू पुरुष यातच बुद्धीच्या द्वारे मनाला स्थिर करतात. कारण यापेक्षा वेगळी कोणतीच वस्तू नाही. (३८) 
 
स सर्वधीवृत्त्यनुभूतसर्व आत्मा यथा स्वप्नजनेक्षितैकः । तं सत्यमानंदनिधिं भजेत नान्यत्र सज्जेद्यत आत्मपातः ॥ ३९ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वितीयस्कंधे प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥ 
स्वप्नी स्वये भोग मनेचि हो तै सर्वास चित्ती बसुनी बघे तो । सर्वात राहूनचि सर्व भोगी ते एक आहे परमात्म रूप । त्या सत्यरूपास आनंद धामा मोहास सोडोनि भजा तयाला ॥ आसक्ति सारी जिवनासि हेतू तो घात आत्म्यासचि जाण राजा ॥ ३९ ॥ ॥ इति श्रीमद्भगवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ पहिला अध्याय हा ॥ २ ॥ १ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥ 
 यथा -  जसा स्वप्नजनेक्षिता -  स्वप्नामध्ये अनेक लोक पहाणारा जीव सर्वधीवृत्यनुभूतसर्वः -  सर्वांच्या बुद्धीच्या वृत्तीच्या योगाने सर्व अनुभव घेतलेला आहे ज्याने असा सः -  तो एकः -  एकटा आत्मा -  सर्वांतर्यामी आत्मा आनंदनिधिं -  आनंदाचा कोश अशा सत्यं -  सत्यस्वरूपी तं -  त्याला भजेत -  भजन करावे अन्यत्र -  दुसर्या ठिकाणी न सज्जेत् -  आसक्त होऊ नये यतः -  ज्यापासून आत्मपातः -  आपले अधःपतन. ॥३९॥ 
 
स्वप्न पाहणारा जसे स्वप्नावस्थेत आपल्यालाच विविध पदार्थांच्या स्वरूपात पाहतो, त्याचप्रमाणे सर्वांच्या बुद्धि-वृत्तींच्या द्वारे सर्व गोष्टींचा अनुभव घेणारा सर्वांतर्यामी परमात्माही एकच आहे. त्या सत्यस्वरूप आनंदनिधी भगवंतांचेच भजन केले पाहिजे. अन्य कशातच आसक्ति असता कामा नये. कारण त्यामुळे जीवाचा अधःपात होतो. (३९) 
 इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां  |