|  | 
| 
श्रीमद् भागवत पुराण  
परीक्षितो गंगातटे प्रायोपवेशनम्, ऋषिसमागमः,  परीक्षिताचे अनशनव्रत आणि शुकदेवांचे आगमन - संहिता  -  अन्वय  -  अर्थ  समश्लोकी - मराठी 
सूत उवाच । महीपतिस्त्वथ तत्कर्म गर्ह्यं विचिन्तयन् नात्मकृतं सुदुर्मनाः । अहो मया नीचमनार्यवत्कृतं निरागसि ब्रह्मणि गूढतेजसि ॥ १ ॥ 
सूतजी सांगतात -  (इंद्रवज्रा) महीपती राजगृहास जाता करी मनीं खेद घडे तयाचा । ते झाकलेले द्विजतेज अंगी नीचा प्रमाणे चुकलो तयासी ॥ १ ॥ 
अथ -  नंतर - आत्मकृतं -  स्वतः केलेले - तत् -  ते - गर्ह्यं -  निंद्य - कर्म -  कृत्य - विचिन्तयन् -  मनात घोळीत असता - सुदुर्मनाः -  खिन्न अंतःकरणाचा - महीपतिः -  परीक्षित राजा - अहो -  अहो - मया -  माझ्याकडून - निरागसि -  निरपराधी - गूढतेजसि -  ज्याच्यामध्ये तेज गुप्तरूपाने असते अशा - ब्रह्मणि -  ब्राह्मणापाशी - अनार्यवत् -  हलकटाप्रमाणे - नीचं -  नीच आचरण - कृतम् -  केले गेले. ॥१॥ 
 
सूत म्हणाले - राजधानीला पोहोचल्यावर राजा परीक्षिताला आपल्या निंद्य कर्माबद्दल अतिशय पश्चात्ताप झाला. तो अत्यंत उदास होऊन विचार करू लागला, मी निरपराध तसेच आपले तेज झाकून ठेवलेल्या ब्राह्मणाबरोबर असभ्य पुरुषासारखा नीच व्यवहार केला, हे किती वाईट झाले. (१) 
 
ध्रुवं ततो मे कृतदेवहेलनाद्  दुरत्ययं व्यसनं नातिदीर्घात् । तदस्तु कामं ह्यघनिष्कृताय मे यथा न कुर्यां पुनरेवमद्धा ॥ २ ॥ 
अवश्य लाभे विपदा तयाने  विप्रास मी त्या अवमानिले की । व्हावे तसे ही हीच मनात इच्छा तेणे न होई असले पुनश्च ॥ २ ॥ 
ततः -  तर मग - मे -  माझ्याकडून - कृतदेवहेलनात् -  घडलेल्या ब्राह्मणाच्या अवहेलनेमुळे - ध्रुवं -  खरोखर - नातिदीर्घात् -  लवकरच - दुरत्ययं -  दुर्घट - व्यसनं -  संकट - तु -  पण - पुनः -  फिरून - तत् -  ते - यथा -  जेणेकरून - एवं -  असे - अद्धा -  खरोखर - न कुर्यां -  मी करणार नाही - मे अघनिष्कृताय -  माझे पाप नष्ट होण्याकरिता - कामं -  अत्यंत - अस्तु -  प्राप्त होवो. ॥२॥ 
 
त्या महात्म्याचा अपमान केल्यामुळे लवकरच एखादे भयंकर संकट माझ्यावर अवश्य येईल आणि ते खुशाल येवो. कारण त्यामुळे माझ्या पापाचे प्रायश्चित्त मला मिळेल आणि असे कृत्य माझ्याकडून पुन्हा खात्रीने घडणार नाही. (२) 
 
अद्यैव राज्यं बलमृद्धकोशं  प्रकोपितब्रह्मकुलानलो मे । दहत्वभद्रस्य पुनर्न मेऽभूत् पापीयसी धीर्द्विजदेवगोभ्यः ॥ ३ ॥ 
क्रोधे द्विजाच्या जळुनीच जाई सेना खजीना नच राहि कांही । पुन्हा न होईल कुबुद्धि ऐसी देव द्विजा गायि साठी अशी ही ॥ ३ ॥ 
अद्य एव -  आजच - प्रकोपितब्रह्मकुलानलः -  क्रुद्ध असा ब्राह्मणकुलरूपी अग्नि - अभद्रस्य मे -  अधर्मी अशा माझे - राज्यं -  राज्य - बलं -  सैन्य - ऋद्धकोशं -  भरलेले द्रव्यभांडार - दहतु -  जाळून टाको - पुनः -  पुनः - मे धीः -  माझी बुद्धि - द्विजदेवगोभ्यः -  ब्राह्मण, देव आणि गाई यासंबंधाने - पापीयसी -  पापयुक्त - न अभूत् -  न होवो.॥३॥ 
 
ब्राह्मणाच्या क्रोधाग्नीने आजच माझे राज्य, सेना आणि समृद्ध खजिना जळून खाक होऊ दे. त्यामुळे पुन्हा कधीही माझ्यासारख्या दुष्टाची ब्राह्मण, देवता आणि गाय यांच्याबाबतीत अशी पापबुद्धी निर्माण होणार नाही. (३) 
 
स चिन्तयन्नित्थमथाशृणोद् यथा  मुनेः सुतोक्तो निर्ऋतिस्तक्षकाख्यः । स साधु मेने न चिरेण तक्षका नलं प्रसक्तस्य विरक्तिकारणम् ॥ ४ ॥ 
करी अशी राज मनात चिंता  तेंव्हाच त्याला कळलीहि वार्ता । कुमार शापे डसवेल साप वैराग्य संधी समजे मनासी ॥ ४ ॥ 
अथ -  मग - इत्थं -  याप्रमाणे - चिन्तयन -  विचार करीत असता - सः -  तो - अशृणोत् -  ऐकता झाला - यथा -  की - मुनेः सुतोक्तः -  ऋषींच्या पत्राने सांगितलेला - तक्षकाख्यः -  तक्षक नावाचा - नचिरेण -  लवकरच - निऋतिः -  मृत्यू - सः -  तो परीक्षित - प्रसक्तस्य -  संसारसुखांवर आसक्त झालेल्याला - विरक्तिकारणम् -  वैराग्य उत्पन्न करणार्या - तक्षकानलं -  तक्षकरूपी अग्नीला - साधु -  चांगला - मेने -  मानिता झाला.॥४॥ 
 
परीक्षित असा विचार करीत होता, एवढ्यात त्याला असे समजले की, ऋषिकुमाराच्या शापाने तक्षक त्याला दंश करणार आहे. त्यामुळे संसारात आसक्त असण्यार्या आपल्याला लवकरच वैराग्य प्राप्त करून देणारा तक्षकरूप मृत्यू त्याला चांगला वाटला. (४) 
 
अथो विहायेमममुं च लोकं  विमर्शितौ हेयतया पुरस्तात् । कृष्णाङ्घ्रिसेवामधिमन्यमान उपाविशत् प्रायममर्त्यनद्याम् ॥ ५ ॥ 
सुखासि मानी पहिलाच त्याज्य खरेचि त्यागा मिळलीहि संधी । श्रीकृष्ण ध्यानी मिसळोनि जाण्या सोदूनि आहार बसे तिरासी ॥ ५ ॥ 
अथो -  नंतर - हेयतया -  त्याज्य म्हणून - पुरस्तात् -  पूर्वीच - विमर्शितः -  विचारपूर्वक ठरविलेला - इमम् -  ह्या - च -  आणि - अमुं -  पर - लोकं -  लोकाला - विहाय -  सोडून - कृष्णांघ्रिसेवा -  श्रीकृष्णाची चरणसेवा - अधिमन्यमानः -  उत्तम मानणारा - अमर्त्यनद्याम् -  देवनदी जी गंगा तिच्या तीरावर - प्रायम् -  मृत्यू येईपर्यंत - उपाविशत् -  उपाशी राहिला. ॥५॥ 
 
या जगातील आणि परलोकांतील भोगांना तो पहिल्यापासूनच तुच्छ आणि त्याज्य समजत होता. आता त्याचा प्रत्यक्ष त्याग करून आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ मानून आमरण उपोषण व्रत घेऊन तो गंगातीरावर बसला. (५) 
 
या वै लसच्छ्रीतुलसीविमिश्र  कृष्णाङ्घ्रिरेण्वभ्यधिकाम्बुनेत्री । पुनाति लोकानुभयत्र सेशान् कस्तां न सेवेत मरिष्यमाणः ॥ ६ ॥ 
श्रीकृष्णपादांबुजगंधगंगा मिळे तयी तो तुलसी सुगंध । ती लोकपालासह सर्व लोका पवित्र ती कोण न सेवि अंती ॥ ६ ॥ 
या -  जी - वै -  खरोखर - लसच्छ्रीतुलसीविमिश्र -  प्रकाशमान शोभेने युक्त अशा तुळसीपत्रांनी मिश्रित  - कृष्णाङ्घ्रिरेण्वभ्यधिकांबुनेत्री -  श्रीकृष्णचरणरजामुळे अतिपवित्र झालेल्या उदकाने वाहणारी गंगा नदी - उभयत्र -  मृत्यूलोकी व स्वर्गात - सेशान् -  शंकरासहित - लोकान् -  लोकांना - पुनाति -  पवित्र करते - तां -  तिला - मरिष्यमाणः -  मरणोन्मुख झालेला - कः -  कोण - न सेवेत -  सेवणार नाही.॥६॥ 
 
तुळशीच्या सुगंधाने मिश्रित असलेले गंगाजल भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे पराग घेऊन प्रवाहित झाले आहे. म्हणून गंगामाता लोकपालांसहित स्वर्ग आणि पृथ्वीवर असलेल्या सर्व लोकांना पवित्र करते. मग मरणासन्न असला कोण मनुष्य तिचे सेवन करणार नाही ? (६) 
 
इति व्यवच्छिद्य स पाण्डवेयः  प्रायोपवेशं प्रति विष्णुपद्याम् । दधौ मुकुन्दाङ्घ्रिमनन्यभावो मुनिव्रतो मुक्तसमस्तसङ्गः ॥ ७ ॥ 
सोडूनि आसक्ति तटी तियेच्या  मुनी परी तो तयि निश्चयाने । बसे व्रताने उपवासी आणि श्रीकृष्णपादांबुजि ध्यान लावी ॥ ७ ॥ 
इति -  याप्रमाणे - विष्णुपद्यां -  गंगा नदीत - प्रायोपवेशं प्रति -  मृत्यू येईपर्यंत उपाशी राहाण्याविषयी - व्यवच्छिद्य -  निश्चित विचार करून - सः पांडवेयः -  तो पांडववंशज परीक्षित राजा - अनन्यभावः -  एकनिष्ठेने मन लावून - मुनिव्रतः -  मौनव्रत धारण करून - मुक्तसमस्तसंगः -  सर्वसंगपरित्याग करून - मुकुंदाङ्घ्रिं -  श्रीकृष्णचरणाला - दध्यौ -  ध्याता झाला.॥७॥ 
 
अशाप्रकारे आमरण उपोषणाचा निश्चय करून, गंगातटाकी बसून, त्याने सर्व आसक्तींचा त्याग केला आणि ऋषी-मुनी करीत असलेल्या व्रताचा स्वीकार करून अनन्यभावाने श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे तो ध्यान करू लागला. (७) 
 
तत्रोपजग्मुर्भुवनं पुनाना  महानुभावा मुनयः सशिष्याः । प्रायेण तीर्थाभिगमापदेशैः स्वयं हि तीर्थानि पुनन्ति सन्तः ॥ ८ ॥ 
ज्यांच्या मुळे शुद्ध तिन्हीहि लोक ते पातले संत भेटीस त्याच्या । शिष्यांसवे मीस तीर्थाटनाचे परी स्वये तीर्थरुपोचि सर्व ॥ ८ ॥ 
तत्र -  तेथे - भुवनं पुनानाः -  त्रिभुवनाला पवित्र करणारे - महानुभावाः -  महाप्रभावशाली - सशिष्याः मुनयः -  आपल्या शिष्यांसह अनेक मुनि - उपजग्मुः -  आले - हि -  कारण - प्रायेण -  बहुधा - तीर्थाभिगमापदेशैः -  तीर्थसेवन करण्यासाठी येण्याचे मिष करून - संतः -  सिद्ध पुरुष - स्वयं -  स्वतःच - तीर्थानि -  तीर्थांना - पुनंति -  पवित्र करतात.॥८॥ 
 
त्रैलोक्याला पवित्र करणारे महानुभाव मुनी आपल्या शिष्यांसह तेथे येऊन पोहोचले. तीर्थयात्रेच्या निमित्ताने खरेतर संतजन त्या तीर्थक्षेत्रांनाच पवित्र करतात. (८) 
 
अत्रिर्वसिष्ठश्च्यवनः शरद्वान्  अरिष्टनेमिर्भृगुरङ्गिराश्च । पराशरो गाधिसुतोऽथ राम उतथ्य इन्द्रप्रमदेध्मवाहौ ॥ ९ ॥ मेधातिथिर्देवल आर्ष्टिषेणो भारद्वाजो गौतमः पिप्पलादः । मैत्रेय और्वः कवषः कुम्भयोनिः द्वैपायनो भगवान् नारदश्च ॥ १० ॥ अन्ये च देवर्षिब्रह्मर्षिवर्या राजर्षिवर्या अरुणादयश्च । नानार्षेयप्रवरान् समेतान् अभ्यर्च्य राजा शिरसा ववन्दे ॥ ११ ॥ 
वसिष्ठ अत्री च्यवना सवे ते  उतथ्य इंद्रप्रमदादि और्व । अरिष्टनेमी भृगु विश्वमित्र तो पर्शुरामो अन अर्ष्टिषेण ॥ ९ ॥ मेधातिथि देवल गौतमादी अगस्ति मैत्रेय तसेच व्यास । नी नारदो ते कवषा सहीत देवर्षि राजर्षि ब्रह्मर्षि आले ॥ १० ॥ भिन्नो असे ते प्रवरो ॠषिंचे एकत्र आले सगळे बघोनी । परीक्षिताने नमिले तयांना सत्कार केला सगळ्या ऋषिंचा ॥ ११ ॥ 
अत्रिः -  अत्रि - वसिष्ठः -  वसिष्ठ - च्यवनः -  च्यवन - शरद्वान् -  शरद्वान - अरिष्टनेमिः -  अरिष्टनेमि - भृगुः -  भृगु - च -  आणि - अङ्गिराः -  अंगिरा - पराशरः -  पराशर - गाधिसुतः -  गाधिपुत्र विश्वामित्र - अथ -  आणि तसाच - रामः -  परशुराम - उतथ्यः -  उतथ्य - इन्द्रप्रमदेध्मवाहो -  इन्द्रप्रमद व इध्मवाह - मेधातिथीः -  मेधातिथी - देवलः -  देवल - आर्ष्टिषेणः -  आर्ष्टिषेण - भारद्वाजः -  भारद्वाज - गौतमः -  गौतम - पिप्पलादः -  पिप्पलाद - मैत्रेयः -  मैत्रेय - और्वः -  और्व - कवषः -  कवष - कुम्भयोनिः -  अगस्त्य - द्वैपायनः -  व्यास - च -  आणि - भगवान -  सर्वगुणसंपन्न - नारदः -  नारद - च -  आणि - अन्ये -  दुसरे - देवर्षिब्रह्मर्षिवर्याः -  श्रेष्ठ श्रेष्ठ देवर्षि व ब्रह्मर्षि - च -  आणि - अरुणादयः -  अरुण वगैरे - राजर्षिवर्याः -  श्रेष्ठ श्रेष्ठ राजर्षि - राजा -  परीक्षित - समेतान् -  येथे एकत्र जमलेल्या - नानार्षेयप्रवरान् -  अनेक ऋषिवंशातील श्रेष्ठ पुरुषांना - अभ्यर्च -  सत्कृत करून - शिरसा ववंदे -  साष्टांग नमस्कार करता झाला. ॥९-११॥ 
 
त्यावेळी तेथे अत्री, वसिष्ठ, च्यवन, शरद्वान, अरिष्टनेमी, भृगु, अंगिरा, पराशर, विश्वामित्र, परशुराम, उतथ्य, इंद्रप्रमद, इध्मवाह, मेधातिथी, देवल, आर्ष्टिषेण, भारद्वाज, गौतम, पिप्पलाद, मैत्रेय, और्व, कवष, अगस्त्य, भगवान व्यास, नारद तसेच यांच्या व्यरितिक्त अनेक श्रेष्ठ देवर्षी, ब्रह्मर्षी आणि अरुणादी राजर्षींचे शुभागमन झाले. अशा प्रकारे विभिन्न गोत्रांच्या मुख्य मुख्य ऋषींना एकत्र आलेले पाहून राजाने सर्वांचा यथायोग्य सत्कार केला आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला. (९-११) 
 
सुखोपविष्टेष्वथ तेषु भूयः  कृतप्रणामः स्वचिकीर्षितं यत् । विज्ञापयामास विविक्तचेता उपस्थितोऽग्रेऽभिगृहीतपाणिः ॥ १२ ॥ 
जेव्हा तिथे आसनी बैसले ते वंदूनि त्यांना कर जोडुनीया । परीक्षिते शुद्ध मने तयांना विचारिले काय तुम्हास हेतु ॥ १२ ॥ 
अथ -  मग - तेषु सुखोपविष्टेषु -  ते ऋषिगण सुखाने बसल्यावर - भूयःकृतप्रपामः -  पुनः नमस्कार करून - विविक्तचेताः -  वैराग्याने ज्याचे मन अगदी शुद्ध झाले आहे असा - अभिगृहीतपाणिः -  हात जोडून - अग्रे उपस्थितः -  पुढे उभा राहिला. - यत् स्वचिकीर्षितम् -  जे करावयाचे मनात आणिले ते - विज्ञापयामास -  विनयपूर्वक सांगू लागला. ॥१२॥ 
 
जेव्हा सर्व लोक स्वस्थपणे आपापल्या आसनावर बसले, तेव्हा महाराज परीक्षिताने त्यांना पुन्हा एकदा प्रणाम केला आणि त्यांच्यासमोरे उभे राहून शुद्ध हृदयाने हात जोडून त्याला जे काही करावयाचे होते, ते तो सांगू लागला. (१२) 
 
राजोवाच  अहो वयं धन्यतमा नृपाणां महत्तमानुग्रहणीयशीलाः । राज्ञां कुलं ब्राह्मणपादशौचाद् दूराद् विसृष्टं बत गर्ह्यकर्म ॥ १३ ॥ 
राजा परीक्षिती म्हणाला - मी धन्य आहे सगळ्या नृपात शीलस्वभावे मज लाभ झाला । जे राजवंशातिल थोर पापी कैसी तयांना द्विजपादसेवा ॥ १३ ॥ 
अहो -  अहो - महत्तमानुग्रहणीयशीलाः -  श्रेष्ठ लोकांच्या कृपेला पात्र होणारे आहे शील ज्यांचे असे - वयं -  आम्ही - नृपाणां -  राजामध्ये - धन्यतमाः -  अत्यंत कृतकृत्य आहोत - बत -  कारण - गर्ह्यकर्म -  निंद्य आहे कर्म ज्याचे असे - राज्ञां कुलं -  राजांचे कुळ - ब्राह्मणपादशौचात् -  ब्राह्मणाच्या पाय धुण्याच्या पाण्यापेक्षा - दूरात् -  दूर अंतरावर - विसृष्टं -  टाकलेले आहे. ॥१३॥ 
 
परीक्षित म्हणाला - अहो ! समस्त राजांमध्ये आम्ही धन्यतम आहोत; कारण आमच्या शीलस्वभावामुळे आम्ही आपल्यासारख्या महान पुरुषांच्या कृपेला पात्र झालो आहोत. निंदित कर्म केल्यामुळे राजवंशातील बहुतेक लोक ब्राह्मणांची पाद्यपूजा करण्यापासूनही दूर जातात, ही किती खेदाची गोष्ट आहे ! (१३) 
 
तस्यैव मेऽघस्य परावरेशो  व्यासक्तचित्तस्य गृहेष्वभीक्ष्णम् । निर्वेदमूलो द्विजशापरूपो यत्र प्रसक्तो भयमाशु धत्ते ॥ १४ ॥ 
राजा असे मीहि तयात पापी आसक्त देही नि तसाचि गेही । त्या विप्र शापे मज लाभ झाला त्याच्या भयानेचि विरक्ति आली ॥ १४ ॥ 
गृहेषु -  घरादारांदिकांवर - अभीक्ष्णं -  एकसारखे - व्यासक्तचित्तस्य -  विशिष्ट रीतीने आसक्त चित्त ज्याचे अशा - तस्य एव -  त्याच - अघस्यमे -  पापरूपी मला - हि -  खरोखर - निर्वेदमूलः -  वैराग्य उत्पन्न करणारा - द्विजशापरूपः -  ब्राह्मणाच्या शापाचे रूप धारण करणारा - परावरेशः -  परमेश्वर भेटला - यत्र -  ज्या ठिकाणी - प्रसक्तः -  विशेष आसक्त असा - आशु -  लवकर - भयम् -  भीती - धत्ते -  धारण करतो.॥१४॥ 
 
मीही नेहमी घरदारात आसक्त राहिल्याकारणाने पापीच झालो आहे. म्हणूनच स्वतः भगवंतच ब्राह्मणाच्या शापाच्या रूपाने माझ्यावर कृपा करण्यासाठी आले आहेत. हा शाप वैराग्य उत्पन्न करणारा आहे; कारण अशा प्रकारच्या शापाने संसारात आसक्त झालेला पुरुष भयभीत झाल्यामुळे विरक्त होतो. (१४) 
 
तं मोपयातं प्रतियन्तु विप्रा  गङ्गा च देवी धृतचित्तमीशे । द्विजोपसृष्टः कुहकस्तक्षको वा दशत्वलं गायत विष्णुगाथाः ॥ १५ ॥ 
मी अर्पिले चित्तंचि कृष्णपायी तुम्ही नि गंगा शरणागताला । अनुग्रहा नाहि मुळिच पर्वा देहा जरी तक्षक दंशला तो । कृपा करोनी मज सांगणे त्या श्रीकृष्णलीला रसपूर्ण गाव्या ॥ १५ ॥ 
विप्राः -  ब्राह्मण - च -  आणि - गंगा देवी -  देवी गंगा - ईशे -  परमेश्वराच्या ठिकाणी - धृतचित्तं -  धारण केले आहे चित्त ज्याने अशा - तं मा -  त्या मला - उपयातं -  शरण आलेला असे - प्रतियंतु -  समजोत - द्विजोपसृष्टः -  ब्राह्मणाने प्रेरणा केलेला - कुहकः -  कपटी - तक्षकः -  तक्षक सर्प - अलं दशतु वा -  खुशाल दंश करो - विष्णुगाथाः गायथ -  तुम्ही परमेश्वराचे गुणानुवाद गा. ॥१५॥ 
 
ब्राह्मण हो ! मी माझे चित्त भगवच्चरणी समर्पित केले आहे. आपण आणि गंगामाता, शरण आलेल्या माझ्यावर अनुग्रह करा. ब्राह्मणकुमाराच्या शापाने प्रेरित दुसरा कोणीही कपटाने तक्षकाचे रूप घेऊन किंवा स्वतः तक्षक येऊन दंश करू दे, मला त्याची पर्वा नाही. आपण भगवंतांच्या रसमय लीलांचे गायन करा. (१५) 
 
पुनश्च भूयाद्भगवत्यनन्ते  रतिः प्रसङ्गश्च तदाश्रयेषु । महत्सु यां यामुपयामि सृष्टिं मैत्र्यस्तु सर्वत्र नमो द्विजेभ्यः ॥ १६ ॥ 
पुन्हा द्विजांनो करितो प्रणाम मिळो मला जन्म कुण्याहि योनी । तरी घडो प्रेमचि कृष्णपायी जिथे पडे गाठ जिवा-शिवाची ॥ १६ ॥ 
च -  आणि - यां यां सृष्टिं -  ज्या ज्या योनीत - उपयामि -  मी जन्म घेईन - सर्वत्र पुनः -  त्या त्या सर्व ठिकाणी पुनः - भगवति अनंते -  भगवान् परमेश्वराच्या ठिकाणी - रतिः भूयात् -  प्रेम जडो - च -  आणि - तदाश्रयेषु -  त्याचा आश्रय करणार्याशी - प्रसङ्गः -  विशेष समागम असो - महत्सु -  थोर पुरुषांशी - मैत्री आस्तु -  मैत्री असो - द्विजेभ्यः नमः -  ब्राह्मणांना माझा नमस्कार असो. ॥१६॥ 
 
आपणा ब्राह्मणांच्या चरणांना प्रणाम करून मी पुन्हा आपणांस हीच प्रार्थना करतो की, कर्मवश ज्या ज्या योनीत मला जन्म घ्यावा लागेल, त्या त्या योनीत भगवान श्रीकृष्णांच्या चरणांवर माझी प्रीती असावी आणि त्यांच्या चरणाश्रित महात्म्यांचा संग घडावा. तसेच सर्व प्राणिमात्रांशी मैत्री असावी, असा आपण मला आशीर्वाद द्या. (१६) 
 
इति स्म राजाध्यवसाययुक्तः  प्राचीनमूलेषु कुशेषु धीरः । उदङ्मुखो दक्षिणकूल आस्ते समुद्रपत्न्याः स्वसुतन्यस्तभारः ॥ १७ ॥ 
सूतजी सांगतात - राजाधिराजा बसला कुशाच्या पूर्वाग्र त्या आसनि निश्चयाने । त्या उत्तरेसी मुख ते करोनी स्थापोनि राज्यीं जनमेजयाला ॥ १७ ॥ 
स्वसुतन्यस्तभारः -  आपल्या पुत्रावर राज्यकारभार सोपविला आहे ज्याने असा - धीरः -  ज्ञानी - राजा -  परीक्षित - इति अध्यवसाययुक्तः -  असा निश्चित केलेला आहे ज्याने असा - समुद्रपत्न्याः -  गंगा नदीच्या  - दक्षिणकूले -  दक्षिण तीरावर - प्राचीनमूलेषु कुशेषु -  ज्यांची टोके पूर्वेस केली आहेत अशा दर्भावर - उदङ्मुखः -  उत्तरेस तोंड आहे ज्याचे असा - आस्ते स्म -  बसला. ॥१७॥ 
 
महाराज परीक्षित मोठा धैर्यवान होता, तो दृढ निश्चय करून गंगेच्या दक्षिण तीरावर पूर्वाभिमुख कुशाग्र असलेल्या आसनावर उत्तरेकडे तोंड करून बसला. त्याने राज्यकारभार आपला पुत्र जनमेजयावर सोपवला होता. (१७) 
 
एवं च तस्मिन् नरदेवदेवे  प्रायोपविष्टे दिवि देवसङ्घाः । प्रशस्य भूमौ व्यकिरन् प्रसूनैः मुदा मुहुर्दुन्दुभयश्च नेदुः ॥ १८ ॥ 
साऱ्या जगाचे अधिपत्य ज्याचे तो बैसला त्या दृढ आनशाना । देवे तदा पुष्पवृष्टिहि केली मोदे नभासी झडले नगारे ॥ १८ ॥ 
च -  आणि - एवं -  याप्रमाणे - तस्मिन् नरदेवदेवे प्रायोपविष्टे -  तो राजश्रेष्ठ मृत्यू येईपर्यंत उपाशी राहण्याचा संकल्प करून बसला असता - दिवि -  स्वर्गात - देवसङ्घाः -  देवसमुदाय - प्रशस्य -  त्याची स्तुती करून - मुदा -  आनंदाने - प्रसूनैः -  पुष्पांनी - भूमौ व्यकिरन् -  भूमीवर वर्षाव करते झाले - च -  आणि - मुहुः -  वारंवार - दुन्दुभयः -  नगारे - नेदुः -  वाजविते झाले.॥१८॥ 
 
पृथ्वीवरील एकछत्री अंमल असणारा सम्राट परीक्षित याप्रमाणे जेव्हा आमरण उपोषणाचा निश्चय करून बसला तेव्हा आकाशातून देवसमुदाय आनंदाने त्याची प्रशंसा करीत पृथ्वीवर फुलांचा वर्षाव करू लागले आणि वारंवार नगारे वाजवू लागले. (१८) 
 
महर्षयो वै समुपागता ये  प्रशस्य साध्वित्यनुमोदमानाः । ऊचुः प्रजानुग्रहशीलसारा यदुत्तमश्लोकगुणाभिरूपम् ॥ १९ ॥ 
जे तेथ त्या सर्व ऋषी मुनींनी साधू ! म्हणोनिच प्रशंसिला तो । मुनिस्वभावेचि अनुग्रहीती ती शक्ति त्यांची जनहीती खर्चे ॥ नृपामनीचा बघताचि भाव श्रीकृष्ण भक्ती गुण त्यानुसार । वर्णीयली ती ऋषि नीं मुनींनी गाऊन गाऊन रसास राग ॥ १९ ॥ 
ये -  जे - वै प्रजानुग्रहशीलसाराः -  लोकांवर कृपा करणे हेच ज्यांच्या स्वभावाचे तत्त्व आहे असे - महर्षयः -  मोठे ऋषी - समुपागताः -  आले होते - प्रशस्य -  स्तुति करून - साधु इति अनुमोदमानाः -  चांगले आहे म्हणून अनुमोदन देणारे - यद् -  जे - उत्तमश्लोकगुणाभिरूपं -  पुण्यश्लोक अशा श्रीकृष्णाच्या गुणांच्या योगे रम्य असे - ऊचुः -  म्हणाले.॥१९॥ 
 
तेथे असलेल्या महर्षींनी परीक्षिताच्या निश्चयाची प्रशंसा केली आणि ’उत्तम, उत्तम !’ म्हणून त्याला अनुमोदन दिले. ऋषींचा स्वभाव आणि शक्ती लोकांवर कृपा करण्यासाठी असते. त्यांनी परीक्षिताच्या उत्तम कीर्तिमान अशा गुणांना अनुरूप असे उद्गार काढले. (१९) 
 
न वा इदं राजर्षिवर्य चित्रं  भवत्सु कृष्णं समनुव्रतेषु । येऽध्यासनं राजकिरीटजुष्टं सद्यो जहुर्भगवत्पार्श्वकामाः ॥ २० ॥ 
राजर्षिवर्या ! मुळि ना अचंबा तू थोरवंशी भजतोस कृष्णा । त्याच्या समीपी बसण्यास नित्य सिंहासनाते परि त्यागिले तू ॥ २० ॥ 
राजर्षिवर्य -  राजर्षित श्रेष्ठ अशा परीक्षित राजा - कृष्णं समनुव्रतेषु भवत्सु -  श्रीकृष्णाचे व्रत निष्ठेने पाळणार्या तुमच्या ठिकाणी - इदं चित्रं न -  हे आश्चर्यकारक नाही - ये -  जे - वै -  खरोखर - भगवत्पार्श्वकामाः -  भगवंताच्या सन्निध स्थान मिळावे म्हणून इच्छिणारे - राजकिरीटजुष्टं -  राजमुकुटाने युक्त - अध्यासनं -  सिंहासन - सद्यः -  तत्काल - जहुः -  सोडिते झाले.॥२०॥ 
 
हे राजर्षिशिरोमणी ! श्रीकृष्णांचे अनुयायी असणार्या आपणा पांडववंशीयांना ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. कारण आपण सर्वांनी भगवंतांचे सान्निध्य प्राप्त करण्याच्या आकांक्षेने, ज्या सिंहासनाची सेवा करण्यासाठी राजे आपापले मुकुट तेथे टेकवीत, अशा राजसिंहासनाचा एका क्षणात त्याग केलात. (२०) 
 
सर्वे वयं तावदिहास्महेऽद्य  कलेवरं यावदसौ विहाय । लोकं परं विरजस्कं विशोकं यास्यत्ययं भागवतप्रधानः ॥ २१ ॥ 
राहू ययी वेळ इथेचि आम्ही ना दुःख ना मोह अशा मनाने । टाकुनि देहा अपुल्या नृपा तू जाशील येथूनि स्वधाम-स्वर्गी ॥ २१ ॥ 
यावत् -  जोपर्यंत - असौ अयं भागवतप्रधानः -  तो हा भगवद्भक्तांत श्रेष्ठ - कलेवरं -  शरीराला - विहाय -  सोडून - विरजस्कं -  अज्ञानरहित - विशोकं -  शोकरहित - परं लोकं -  श्रेष्ठ लोकाला - यास्यति -  जाईल - तावत् -  तोपर्यंत - अद्य -  आज - सर्वे -  सर्व - वयं -  आम्ही - इह -  येथे - आस्महे -  राहू.॥२१॥ 
 
जोपर्यंत हा भगवंतांचा परम भक्त परीक्षित आपले नश्वर शरीर सोडून मायेचा दोष आणि शोक यांनी रहित अशा भगवद्धामाला जात नाही, तोपर्यंत आम्ही सर्वजण येथेच राहू. (२१) 
 
आश्रुत्य तद् ऋषिगणवचः परीक्षित्  समं मधुच्युद् गुरु चाव्यलीकम् । आभाषतैनानभिनन्द्य युक्तान् शुश्रूषमाणश्चरितानि विष्णोः ॥ २२ ॥ 
गंभीर नी गोड तसेचि सत्य  ऐकोनि राये अभिनंदुनी त्यां । श्रीकृष्णलीला अतिचांग ऐशा सांगावया नम्र ऋषीस बोले ॥ २२ ॥ 
विष्णोः -  विष्णूची - चरितानि -  चरित्रे - शुश्रूषमाणः -  ऐकण्याची इच्छा करणारा - परीक्षित -  परीक्षित राजा - तत् -  ते - समं -  निःपक्षपाती - अव्यलीकं -  असत्य ज्यात नाही असे - मधुच्युत् -  अमृत ज्यातून पाझरत आहे असे - गुरु -  प्रौढ - ऋषिगणवचः -  त्या मुनिसमूहाचे भाषण - आश्रुत्य -  ऐकून - एतान् अभिनद्य -  आणि त्यांचे अभिनंदन करून - युक्तम् अभाषत -  उचित असे उत्तर देता झाला. ॥२२॥ 
 
ऋषींचे हे फारच मधुर, गंभीर, सत्य आणि समत्वभावाने युक्त असे वचन ऐकून राजा परीक्षिताने त्या योगी मुनींचे अभिनंदन केले आणि भगवंतांचे मनोहर चरित्र ऐकण्याच्या इच्छेने त्यांना प्रार्थना केली. (२२) 
 
समागताः सर्वत एव सर्वे  वेदा यथा मूर्तिधरास्त्रिपृष्ठे । नेहाथवामुत्र च कश्चनार्थ ऋते परानुग्रहमात्मशीलम् ॥ २३ ॥ 
राजा परीक्षिती म्हणाला- अहो तुम्ही संत चहूकडोनी त्या सत्यलोकामधुनी इथे की । आले मुळी स्वार्थ तुम्हास नाही अनुग्रहाया पृथिवीस येता ॥ २३ ॥ 
यथा -  जसे - त्रिपृष्ठे -  त्रिभुवनाच्या पाठीवर - मूर्तिधराः -  मूर्तिमान - वेदाः -  वेद - सर्वतः -  चारी दिशांहून - एव -  च - सर्वे -  सर्वजण तुम्ही - समागताः -  एकत्र आलेले आहा - अथवा -  नाही तर - परानुग्रहम् आत्मशीलम् ऋते -  दुसर्यांवर कृपा करणे हेच जे स्वतःचे शील त्याशिवाय - इह अमुत्रच -  या लोकी आणि परलोकी हि - कश्चन अर्थः न -  कोणताही हेतु नाही.॥२३॥ 
 
हे महात्म्यांनो, आपण सर्व ठिकाणांहून येथे आलात. सत्यलोकात राहणार्या मूर्तिमान वेदांच्या समान आपण आहात. आपल्या नैसर्गिक स्वभावानुसार अनुग्रह करणे याखेरीज या लोकात अगर परलोकात आपला अन्य कोणताच स्वार्थ नाही. (२३) 
 
ततश्च वः पृच्छ्यमिमं विपृच्छे  विश्रभ्य विप्रा इति कृत्यतायाम् । सर्वात्मना म्रियमाणैश्च कृत्यं शुद्धं च तत्रामृशताभियुक्ताः ॥ २४ ॥ 
विश्वासिले तुम्हि म्हणोनि प्रश्न परस्परे योजुनि ते वदावे । जो अल्प मरे तयाला जे कर्म त्याला निजबोध देई ॥ २४ ॥ 
च -  नंतर - विप्राः -  हे ऋषि हो  - ततः -  यास्तव - विश्रम्य -  विश्वास ठेवून - इतिकृत्यतायाम् -  मनुष्याचे इतिकर्तव्य काय याविषयी - इमं पृच्छ्रंय -  ही विचारण्यासारखी गोष्ट - वः विपृच्छे -  मी तुम्हाला विचारतो - च -  आणि - अभियुक्ताः -  योग्य असेल तेच सांगणारे - सर्वात्मना -  प्रत्येक अवस्थेत असलेल्या मनुष्याने - च -  तसेच - म्रियमाणैः -  मृत्यू जवळ आला आहे अशांनी - तत्र शुद्धं कृत्यं -  त्या ठिकाणी करावयाचे शुद्ध कर्तव्य - आमृशत -  विचारपूर्वक मला सांगा.॥२४॥ 
 
हे विप्रांनो, आपणांवर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःच्या कर्तव्यासंबंधी विचारण्यायोग्य प्रश्न मी आपणांस विचारतो. आपण सर्व विद्वानांनी आपापसात विचारविनिमय करून सांगावे की, "१) सर्वांच्यासाठी सर्व अवस्थांमध्ये आणि २) विशेष करून थोड्याच वेळात मरण पावणार्या पुरुषांनी करण्यायोग्य विधुद्ध कर्म कोणते ?" (२४) 
 
तत्राभवद् भगवान् व्यासपुत्रो  यदृच्छया गामटमानोऽनपेक्षः । अलक्ष्यलिङ्गो निजलाभतुष्टो वृतश्च बालैरवधूतवेषः ॥ २५ ॥ 
सूतजी सांगतात- तेव्हाच पृथ्वीवरि त्या शुकाने स्वेच्छे तिथे आगमनोही केले । मनी विरागी बहिरंग नाही दिगंबरा त्या बघती मुले की ॥ २५ ॥ 
तत्र -  तेथे - यदृच्छया -  सहजगतीने - गाम् अटमानः -  पृथ्वीवर फिरणारा - स्त्रिबालेः वृतः -  स्त्रिया व मुले यांनी वेष्टिलेला - अनपेक्षः -  निरपेक्ष - अलक्ष्यलिंगः -  ज्याचा वर्ण किंवा आश्रम कळण्यासारखी काही खूण नव्हती असा - निजलाभतुष्टः -  आत्मप्राप्तीमुळे पूर्ण समाधान पावलेला - अवधूतवेषः -  सर्व संगपरित्याग केलेल्या वैराग्यवान माणसाचा वेष घेतलेला - भगवान् व्यासपुत्रः -  व्यासपुत्र भगवान शुकाचार्य - अभवत् -  येऊन ठेपला.॥२५॥  
 
पृथ्वीवर स्वेच्छेने संचार करणारे कोणापासून कोणतीच अपेक्षा न ठेवणारे, व्यासपुत्र भगवान श्रीशुकदेव त्यावेळी तेथे प्रगट झाले. त्यांच्या अंगावर वर्ण किंवा आश्रमाचे कोणतेही बाह्य चिन्ह नव्हते. ते आत्मानुभूतीमुळे संतुष्ट होते. लहान मुले त्यांच्या भोवती होती. त्यांचा वेष अवधूताचा होता. (२५) 
 
तं द्व्यष्टवर्षं सुकुमारपाद  करोरुबाह्वंसकपोलगात्रम् । चार्वायताक्षोन्नसतुल्यकर्ण सुभ्र्वाननं कम्बुसुजातकण्ठम् ॥ २६ ॥ निगूढजत्रुं पृथुतुङ्गवक्षसं आवर्तनाभिं वलिवल्गूदरं च । दिगम्बरं वक्त्रविकीर्णकेशं प्रलम्बबाहुं स्वमरोत्तमाभम् ॥ २७ ॥ श्यामं सदापीच्यवयोऽङ्गलक्ष्म्या स्त्रीणां मनोज्ञं रुचिरस्मितेन । प्रत्युत्थितास्ते मुनयः स्वासनेभ्यः तल्लक्षणज्ञा अपि गूढवर्चसम् ॥ २८ ॥ 
सोळांवयाने सुकुमार अंगी ते हात मांड्या पद स्कंध दंड । कपाळ शोभे सुकुमार तैसे सतेज सारे अन उंच नाक । ती कान शोभा भुवया समान शंखापरी कंठ दिसे मुखासी ॥ २६ ॥ ती गूढ हास्ये निधडीहि छाती आवर्त नाभी त्रिगुड्याहि पोटी । आजान बाहू कचवक्र शोभा दिगंबरी देव तने सुशोभे ॥ २७ ॥ ती श्यामवर्णी तरुणाइ त्यांची पाहिनि स्त्रीया मनि हर्षल्या की । सुहास्य पाही लपवी स्वतेज जाणोनि त्याला नमिले ऋषिंनी ॥ २८ ॥ 
तं -  त्याला - ह्यष्टवर्षं -  सोळा वर्षांचे वय आहे अशा - सुकुमारपादकरोरु -  ज्याचे पाय, हात, मांडया,  - बाह्वंसकपोलगात्रम् -  दंड, स्कंध, गाल आणि सर्व शरीर अतिशय कोमल आहे अशा - चार्वायताक्षोन्नसतुल्यकर्ण -  सुंदर व विस्तृत नेत्र, उंच नाक, समप्रमाण कान,  - सुभवाननं -  आणि शोभिवंत भुवया असलेले मुख आहे ज्याचे अशा - कंबुसुजातकंठं -  शंखाप्रमाणे सुंदर लक्षणाचा म्हणजे त्रिवळी असलेला कंठ आहे ज्याचा अशा - निगूढजत्रुं -  झाकून गेली आहे मान ज्याची अशा - पृथुतुंगवक्षसं -  विस्तृत व ताठ आहे छाती ज्याची अशा - आवर्तनाभिं -  भोवर्याप्रमाणे आहे नाभी ज्याची अशा - वलिवल्गूदरं -  वळ्यामुळे सुंदर दिसते आहे उदर ज्याचे अशा - च -  आणि - दिगंबरं -  दिशा हेच वस्त्र आहे ज्याचे अशा - वक्रविशीर्णकेशं -  कुरळे आणि पसरलेले आहेत केश ज्याचे अशा - प्रालंबबाहुं -  ज्याचे बाहु लांब आहेत अशा - स्वमरोत्तमाभं -  देवश्रेष्ठ विष्णूप्रमाणे दिव्य कांती आहे ज्याची अशा - श्यामं -  श्यामवर्णाच्या - सदापीच्यवयोङ्गलक्ष्म्या -  नित्य यौवन आणि तेजस्वी शरीरकांती यामुळे - च -  आणि - रुचिरस्मितेन -  रमणीय अशा हास्यामुळे - स्त्रीणां मनोज्ञं -  स्त्रियांना मनोहर दिसणारा अशा - गूढवर्चसं -  ज्याचे सामर्थ्य अव्यक्त होते अशा - अपि -  सुद्धा - तं -  त्याला - तल्लक्षणज्ञाः ते मुनयः -  त्याच्या लक्षणावरून त्याची योग्यता ओळखणारे ते ऋषि - स्वासनेभ्यः -  आपल्या आसनांवरून उठून - प्रत्युत्थिताः -  सामोरे गेले. ॥२६-२८॥ 
 
त्यांचे वय वर्षे सोळा. पाय, हात, मांड्या, बाहू, खांदे, गाल आणि इतर सर्व अवयव अत्यंत सुकुमार होते. नेत्र विशाल आणि मनोहर होते. नाक काहीसे उभार, कान सुडौल, सुंदर भुवया या सर्वांमुळे चेहरा अत्यंत शोभायमान दिसत होता. गळा तर जणू सुंदर शंखच होता. (२६)  खांद्याची हाडे लपलेली, छाती रुंद आणि भरदार, भोवर्याप्रमाणे खोल नाभी आणि पोट तीन वळ्यांनी युक्त असे सुंदर. लांब हात, मुखावर कुरळे केस विखुरलेले. अशा प्रकारचे दिगंबर वेषात असलेले ते एखाद्या श्रेष्ठ देवाप्रमाणे तेजस्वी दिसत होते. (२७) सावळा वर्ण, चित्ताकर्षक तारुण्य, अंगकांती आणि मधुर स्मित यांमुळे ते स्त्रियांना मनोहर वाटणारे होते. त्यांनी जरी आपले तेज झाकून ठेवले होते, तरीसुद्धा त्यांची लक्षणे जाणणारे मुनी त्यांच्या सन्मानासाठी आपापल्या आसनावरून उठून उभे राहिले. (२८) 
स विष्णुरातोऽतिथय आगताय  तस्मै सपर्यां शिरसाऽऽजहार । ततो निवृत्ता ह्यबुधाः स्त्रियोऽर्भका महासने सोपविवेश पूजितः ॥ २९ ॥ 
आतिथ्यरूपे शुकदेव आले राये तयांना प्राणिपात केला । माहात्म्य त्याचे बघुनी मुले नी गेल्या स्त्रिया नी शुक बैसले ते ॥ २९ ॥ 
सः विष्णुरातः -  तो परीक्षित राजा - तस्मै आगताय अतिथये -  त्या आलेल्या अतिथीला - शिरसा -  मस्तक लववून - सपर्यां -  पूजा - जहार -  अर्पण करता झाला - ततः -  तेव्हा - अबुधाः स्त्रियः अर्भकाः -  अज्ञानी अशी त्याच्या भोवती जमलेली बायकामुले - हि -  तत्काळ - निवृत्ताः -  माघारी गेली - पूजितः सः -  सत्कार केलेला तो - महासने उपविवेश -  महासनावर बसला. ॥२९॥ 
 
आलेल्या त्या अतिथींची परीक्षिताने मस्तक लववून आत्मनिवेदनरूप पूजा केली. त्यांचे खरे स्वरूप न जाणणार्या स्त्रिया आणि मुले तेथून निघून गेली. सर्वांनी केलेल्या स्वागताने सन्मानित झालेले श्रीशुकदेव श्रेष्ठ आसनावर विराजमान झाले. (२९) 
 
स संवृतस्तत्र महान् महीयसां  ब्रह्मर्षिराजर्षिदेवर्षि सङ्घैः । व्यरोचतालं भगवान् यथेन्दुः ग्रहर्क्षतारानिकरैः परीतः ॥ ३० ॥ 
तारामध्ये तो जयि चंद्र शोभे  तै शोभले तेथ शुको ऋषीत । होतेचि ते आदर पात्र तेजे राजर्षि यांच्यात तपोनिधी ते ॥ ३० ॥ 
महीयसां महान् -  थोरांपैकी थोर असा - सः -  तो शुक - तत्र -  तेथे - ब्रह्मर्षिराजर्षिदेवर्षिसंघैः -  ब्रह्मर्षि, राजर्षि आणि देवर्षि यांच्या समुदायांनी - संवृतः -  वेष्टिलेला - ग्रहर्क्षतारानिकरैः -  ग्रह, नक्षत्रे आणि इतर तारापुंजांनी - परीतः -  वेष्टिलेला - भगवान् -  सर्वगुणसंपन्न - इंदुः -  चंद्र - यथा -  जसा - अलं व्यरोचत -  तसा फारच शोभू लागला. ॥३०॥ 
 
ग्रह, नक्षत्रे आणि तार्यांनी वेढलेल्या चंद्राप्रमाणे ब्रहर्षी, देवर्षी आणि राजर्षी यांच्या समूहात महात्म्यांनाही आदरणीय श्रीशुकदेव  अत्यंत शोभिवंत दिसत होते. (३०) 
 
प्रशान्तमासीनमकुण्ठमेधसं  मुनिं नृपो भागवतोऽभ्युपेत्य । प्रणम्य मूर्ध्नावहितः कृताञ्जलिः नत्वा गिरा सूनृतयान्वपृच्छत् ॥ ३१ ॥ 
ते तीव्रबुद्धी मनि शांत होते तो भक्त राणा चरणासी आला । करास जोडोनि उभाचि ठेला मधूर शब्दे नृप त्या पुसे हे ॥ ३१ 
भागवतः -  भगवद्भक्त असा - नृपः -  राजा परीक्षित - प्रशांतं -  शांत स्वभावाच्या - अकुंठमेधसम् -  अकुंठित बुद्धीच्या - मुनिम् -  मुनीला - आसीनं -  बसलेल्या - अभ्युपेत्य -  जवळ जाऊन - मूर्ध्रा प्रणम्य -  मस्तक लववून नमस्कार केल्यावर - कृतांजलिः -  हात जोडलेला - नत्वा -  नम्र होऊन - अवहितः -  स्वस्थ चित्त आहे ज्याचे असा - सूनृतया गिरा -  मधुर वाणीने - अन्वपृच्छत -  विचारिता झाला. ॥३१॥ 
 
जेव्हा अत्यंत बुद्धिमान श्रीशुकदेव शांतपणे बसले होते, तेव्हा भगवंतांचे भक्त परीक्षित त्यांच्याजवळ आले व त्यांनी चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला. पुन्हा उठून उभे राहून हात जोडून नमस्कार केला. पुन्हा उठून उभे राहून हात जोडून नमस्कार केला आणि मधुर वाणीने त्यांना विचारले. (३१) 
 
परीक्षिदुवाच । अहो अद्य वयं ब्रह्मन् सत्सेव्याः क्षत्रबन्धवः । कृपयातिथिरूपेण भवद्भिस्तीर्थकाः कृताः ॥ ३२ ॥ 
राजा परीक्षिती म्हणाला -  ( अनुष्टुप् ) ब्रह्मरूप तुम्ही देवा उजळे मम भाग्य हे । अपराधी असोनी मी अधिकारीच मानिले ॥ अतिथीरूपी येवोनी तीर्थाच्या परि ते अम्हा । कृपेने शुद्धची केले भाग्य हे केवढे मम ॥ ३२ ॥ 
अहो ब्रह्मन् -  हे मुनिवर्या ! - अद्य -  आज - वयं -  आम्ही - क्षत्रबंधवः -  नीच क्षत्रिय - सत्सेव्याः -  सज्जनांना मान्य - भवद्भिः -  तुमच्याकडून - कृपया -  दयेमुळे - अतिथिरूपेण -  अतिथीच्या मिषाने - तीर्थकाः कृताः -  पवित्र केले गेलो. ॥३२॥ 
 
ब्रह्मस्वरूप भगवन, आम्ही अपराधी क्षत्रिय असूनही आज सत्संगाचे अधिकारी ठरलो, म्हणून आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत. अतिथीरूपाने येऊन कृपेने आपण आम्हांला तीर्थाप्रमाणे पवित्र केलेत. (३२) 
 
येषां संस्मरणात् पुंसां सद्यः शुद्ध्यन्ति वै गृहाः । किं पुनर्दर्शनस्पर्श पादशौचासनादिभिः ॥ ३३ ॥ 
स्मरणे तुमच्या होते पवित्र घर आमुचे । मग या प्रक्षाळे दाने आसन घालिता ॥ दर्शने लाभ तो काय तयासी तुलना नसे ॥ ३३ ॥ 
येषां -  ज्यांच्या - संस्मरणात् वै -  स्मरणानेच - पुंसां गृहाः -  पुरुषांची घरे - सद्यःशुद्ध्यन्ति -  तत्काळ शुद्ध होतात - पुनः -  मग - दर्शनस्पर्शपादशौचासनादिभिः -  प्रत्यक्ष दर्शन, स्पर्श, पादप्रक्षालन, बसणे इत्यादिकांनी - किम् -  काय सांगावे.॥३३॥ 
 
आपल्या सारख्या महात्म्यांच्या केवळ स्मरणानेच गृहस्थ लोकांचे घर ताबडतोब पवित्र होते; तर मग दर्शन, स्पर्श, पाद्यपूजा आणि आसनावर बसणे, अशी संधी मिळाल्यावर त्या घराचे भाग्य काय वर्णावे ! (३३) 
 
सान्निध्यात्ते महायोगिन् पातकानि महान्त्यपि । सद्यो नश्यन्ति वै पुंसां विष्णोरिव सुरेतराः ॥ ३४ ॥ 
समोर विष्णुच्या दैत्य कधीही नच थांबती । तुमच्या जवळी येता पातके धावती तसे ॥ ३४ ॥ 
महायोगिन् -  हे योगिश्रेष्ठ शुका ! - ते सान्निध्यात् -  तू समीप असलास तर - पुंसां -  पुरुषांची - महांति पातकानि अपि -  मोठी पातकेदेखील - वै सद्यः नश्यंन्ति -  खरोखर तत्काळ नष्ट होतात - विष्णोः -  विष्णुच्या सान्निध्यामुळे - सुरेतराः इव -  जसे असुर नाश पावतात त्याप्रमाणे. ॥३४॥ 
 
हे योगिवर ! ज्याप्रमाणे भगवन विष्णूंच्यासमोर दैत्य थांबत नाहीत, त्याप्रमाणे आपल्या सान्निध्यात मोठमोठीसुद्धा पापे ताबडतोब नाहीशी होतात. (३४) 
 
अपि मे भगवान् प्रीतः कृष्णः पाण्डुसुतप्रियः । पैतृष्वसेयप्रीत्यर्थं तद्गोत्रस्यात्तबान्धवः ॥ ३५ ॥ 
पांडवांचा सखाकृष्ण प्रसन्न मज तो असे । आत्त्येभावाकुळी तोची घरच्यापरि वागला ॥ ३५ ॥ 
अपि मे -  खरोखरच माझ्यावर - पांडुसुतप्रियः -  पांडवांवर प्रेम करणारा - तगदोत्रस्य -  त्यांच्या कुळाचे - अत्तिबान्धवः -  बंधुत्व स्वीकारलेला - भगवान् कृष्णः -  परमात्मा श्रीकृष्ण - पैतृस्वस्त्रेयप्रीत्यर्थं -  आतेभावांच्या संतोषाकरिता - प्रीतः -  संतुष्ट झाला की काय ?॥३५॥ 
 
पांडवांचे सुहृद, भगवान श्रीकृष्ण निश्चितच माझ्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. म्हणूनच त्यांनी आपल्या आतेभावांच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्याच कुळात उत्पन्न झालेल्या माझ्यापाशी सुद्धा आपलेपणाचा व्यवहार केला. (३५) 
 
अन्यथा तेऽव्यक्तगतेः दर्शनं नः कथं नृणाम् । नितरां म्रियमाणानां संसिद्धस्य वनीयसः ॥ ३६ ॥ 
कृपा ना जर ती त्याची अव्यक्त गतिचे तुम्ही । एकांत वनिचे सिद्ध न येत अंति दर्शना ॥ ३६ ॥ 
अन्यथा -  नाहीतर - संसिद्धस्य -  सिद्धी प्राप्त झालेल्या - वनीयसः -  माग माग म्हणून म्हणणार्या - अव्यक्तगतेः -  ज्याची गति कोंणाला कळत नाही अशा - ते दर्शनं -  तुझे दर्शन - नितरां म्रियमाणानां -  लवकरच मरणार अशा - नः नृणाम् -  आमच्यासारख्या माणसांना - कथं स्यात् -  कसे होईल.॥३६॥ 
 
भगवान श्रीकृष्णांची कृपा झाली नसती तर आपल्यासारख्या एकांत वनवासात राहणार्या अव्यक्तगती परम सिद्ध पुरुषांनी स्वतः येऊन मृत्यूच्या वेळी, माझ्यासारख्या सामान्य माणसाला कसे दर्शन दिले असते ? (३६) 
 
अतः पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुम् । पुरुषस्येह यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा ॥ ३७ ॥ 
सिद्धिच्या स्वरूपा तैसे संबध साधनाचिये । पुसतो प्रश्न ते सारे अंती जे कारणे असे ॥ ३७ ॥ 
अतः -  म्हणून - योगिनां परमं गुरुं -  योग्यांचे श्रेष्ठ गुरु जे तुम्ही त्यांना - म्रियमाणस्य पुरुषस्य -  पुरुष मरणोन्मुख झाला असता त्याचे - इह -  या लोकी - सर्वथा -  निश्चयेकरून - यत् कार्यं -  जे कर्तव्य अशा - संसिद्धिं -  कार्यसिद्धीला - पृच्छामि -  विचारितो.॥३७॥ 
 
आपण योग्यांचेही परम गुरू आहात; म्हणून मी आपणांस आसन्नमरण माणसाने काय केले असता त्याला मोक्ष मिळेल, हे विचारीत आहे. (३७) 
 
यच्छ्रोतव्यमथो जप्यं यत्कर्तव्यं नृभिः प्रभो । स्मर्तव्यं भजनीयं वा ब्रूहि यद्वा विपर्ययम् ॥ ३८ ॥ 
मनुष्ये करणे काय सेवार्थ हेहि सांगणे । ऐकणे जप नी ध्यान कुणाची भजने करो ॥ ३८ ॥ 
प्रभो -  हे प्रभो - नृभिः -  मनुष्यांना - यत् श्रोतव्यं -  जे श्रवण करण्यास योग्य - अथः -  अथवा - जाप्यं -  जप करण्यास योग्य - यत् कर्तव्यं -  जे करण्यास योग्य - वा स्मर्तव्यं भजनीयं -  किंवा स्मरण करण्यास अथवा भजन करण्यास योग्य असेल - वा -  अथवा - यत् विपर्ययं -  जे उलट असेल - ब्रूहि -  ते सर्व सांगा. ॥३८॥ 
 
हे भगवन, त्याचबरोबर आपणे हेही सांगा की मनुष्यांनी काय ऐकावे ? कोणता जप करावा ? कोणते कर्म करावे ? तसेच कशाचा त्याग करावा ? (३८) 
 
नूनं भगवतो ब्रह्मन् गृहेषु गृहमेधिनाम् । न लक्ष्यते ह्यवस्थानं अपि गोदोहनं क्वचित् ॥ ३९ ॥ 
मुनिजी भगवद्रूपा तुमची भेट दुर्लभ । गायीची धार काढाया लागतो वेळ जेवढा ॥ तेवढा वेळही तुम्ही नचही थांबता कुठे ॥ ३९ ॥ 
ब्रह्मन् -  हे ब्राह्मणा  - नूनं -  खरोखर - हि -  ज्यामुळे - गृहमेधिनां गृहेषु -  गृहस्थांच्या घरी - भगवतः अवस्थानं -  सर्वगुणसंपन्न अशा आपले राहणे - गोदोहनम् अपि -  गाईचे दूध काढून होईपर्यंत सुद्धा - क्वचित् -  कोठे - न लक्षये -  मी पाहात नाही.॥३९॥ 
 
हे मुनिवर, आपण गाईची धार काढण्यास जेवढा वेळ लागतो, तितकासुद्धा वेळ गृहस्थांच्या घरी थांबत नाही, म्हणून मी आपणांस हे आताच विचारत आहे. (३९) 
 
सूत उवाच । एवमाभाषितः पृष्टः स राज्ञा श्लक्ष्णया गिरा । प्रत्यभाषत धर्मज्ञो भगवान् बादरायणिः ॥ ४० ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे शुकागमनं नाम एकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥ ॥ 
सूतजी सांगतात - हे संभाषण नी प्रश्न राजाने गोड वाणिने । पुसता शुकदेवो ते उत्तरे बोलु लागले ॥ ४० ॥ ॥ इति श्रीमद्भगवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ एकोणविसावा अध्याय हा ॥ १ ॥ १९ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥ 
एवं -  याप्रमाणे - राज्ञा -  परीक्षित राजाने - श्लक्ष्णया गिरा -  मधुर शब्दांनी - आभाषितः पृष्टः -  संबोधून विचारलेला - धर्मज्ञः -  धर्म जाणणारा - सः -  तो - भगवान् बादरायणिः -  भगवान् व्यासपुत्र शुकाचार्य - प्रत्यभाषत -  उत्तर देता झाला.॥४०॥
 
सूत म्हणाले - जेव्हा राजाने मोठ्या मधुर वाणीने अशाप्रकारे संभाषण केले आणि प्रश्न विचारले तेव्हा सर्व धर्मांचे मर्म जाणणारे व्यासपुत्र भगवान श्रीशुकदेव त्यांची उत्तरे देऊ लागले. (४०) 
 इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां  |