|
श्रीमद् भागवत पुराण परीक्षिते मुनिकुमारः शापः - राजा परीक्षिताला श्रृंगी ऋषींचा शाप - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
सूत उवाच ।
यो वै द्रौण्यस्त्रविप्लुष्टो न मातुरुदरे मृतः । अनुग्रहाद् भगवतः कृष्णस्याद्भुतकर्मणः ॥ १ ॥ ब्रह्मकोपोत्थिताद् यस्तु तक्षकात् प्राणविप्लवात् । न सम्मुमोहोरुभयाद् भगवत्यर्पिताशयः ॥ २ ॥ उत्सृज्य सर्वतः सङ्गं विज्ञाताजितसंस्थितिः । वैयासकेर्जहौ शिष्यो गङ्गायां स्वं कलेवरम् ॥ ३ ॥
सूतजी सांगतात - ( अनुष्टुप् ) ब्रह्मास्त्रे द्रोणपुत्राच्या मेला ना जळला तरी । गर्भात वाढले बाळ कॄष्णाचे कार्य अद्भुत ॥ १ ॥ द्विजशापा मुळे साप तक्षको डंखण्यास ये । प्राणनाशभयालाही भिला ना तसुएवढा ॥ कॄष्णाच्या चरणी चित्त अर्पिता फळ हे मिळे ॥ २ ॥ आसक्ति सोडुनी त्याने शुकांचा उपदेश तो घेउनी तिरी गंगेच्या कॄष्णरूपासी जणिले । त्यागिली तनु ती त्याने आनंदे भय ना मुळी ॥ ३ ॥
वै - खरोखर - द्रौण्यस्त्रविप्लुष्टः - अश्वत्थाम्याच्या अस्त्राने दग्ध झालेला - यः - जो - मातुः - आई जी उत्तरा तिच्या - उदरे - पोटात - अद्भुतकर्मणः - आश्चर्यजनक कृत्ये करणार्या - भगवतः - षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा - कृष्णस्य - श्रीकृष्णाच्या - अनुग्रहात् - कृपेने - न मृतः - मेला नाही - भगवति - श्रीकृष्णाचे ठिकाणी - अर्पिताशयः - ज्याने आपले अंतःकरण अर्पण केले आहे असा - यः - जो - तु - तर - ब्रह्मकोपोत्थितात् - ब्राह्मणाच्या क्रोधाने उद्युक्त झालेल्या - तक्षकात् - तक्षक नावाच्या नागापासून - प्राणविप्लवात् - प्राणांचा नाश करणार्या - उरुभयात् - मोठया भीतीमुळे - न संमुमोह - घाबरला नाही - वैयासकेः - व्यासपुत्र जे शुकाचार्य त्यांचा - शिष्यः - शिष्य परीक्षित - विज्ञाताजितसंस्थितिः - भगवंताची सर्व मोक्षदायक तत्त्वे ज्याने जाणिली आहेत असा - सर्वतः - सर्व सांसारिक विषयांपासून - सङगं - आसक्तीला - उत्सृज्य - सोडून - स्वं - स्वतःच्या - कलेवरं - शरीराला - गङ्गायां - गंगेत - जहौ - टाकता झाला.॥१-३॥
सूत म्हणाले - अद्भुत कर्मे करणार्या भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने, राजा परीक्षित मातेच्या गर्भात अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जळूनही मरण पावला नाही. (१)
ब्राह्मणाच्या शापाने त्यला दंश करण्यासाठी तक्षक आला, त्यावेळी प्राण जाण्याच्या मोठ्या भयानेही तो भयभीत झाला नाही. कारण त्याने आपले चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित केले होते. (२) त्याने सर्वाची आसक्ती सोडली, गंगातटावर जाऊन श्रीशुकदेवांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून भगवंतांचे स्वरूप जाणून आपल्या शरीराचा त्याग केला. (३)
नोत्तमश्लोकवार्तानां जुषतां तत्कथामृतम् ।
स्यात्सम्भ्रमोऽन्तकालेऽपि स्मरतां तत्पदाम्बुजम् ॥ ४ ॥
श्रीकथामॄतपानाने सेविले पादपद्य ते । तया ना मोह देहाचा मृत्युचे भय कायसे ॥ ४ ॥
तत्कथामृतं - भगवच्चरित्ररूपी कथामृताला - जुषतां - सेवन करणार्या - तत्पदाम्बुजं - व भगवंताच्या चरणकमलाला - स्मरतां - स्मरण करणार्या - उत्तमश्लोकवार्तानां - श्रेष्ठकीर्तीच्या भगवंताच्या कथा श्रवण करणार्या भक्तांना - अन्तकाले - मरणकाली - अपि - सुद्धा - सम्भ्रमः - भ्रम - न स्यात् - होत नाही.॥४॥
जे लोक भगवान श्रीकृष्णांच्या लीला कथन करीत राहतात, त्या कथामृताचे मेहमी पान करतात आणि त्यांच्या चरणकमलांचे स्मरण करतात, त्यांना अंतकालीही मोह होत नाही. (४)
तावत्कलिर्न प्रभवेत् प्रविष्टोऽपीह सर्वतः ।
यावदीशो महानुर्व्यां आभिमन्यव एकराट् ॥ ५ ॥
पृथ्वीच्या सर्वतो दूर राज्य हे पसरूनि ही । परिक्षित् राज्यकाळात कलीचे कांही ना चल ॥ ५ ॥
यावत् - जोपर्यंत - ईशः - ऐश्वर्ययुक्त - महान् - मोठा - आभिमन्यवः - अभिमन्यूचा पुत्र परीक्षित - इह - ह्या - उर्व्या - पृथ्वीवर - एकराट् - एकच सार्वभौम राजा - तावत् - तोपर्यंत - सर्वतः - जिकडेतिकडे - प्रविष्टः - शिरलेला - अपि - सुद्धा - कलिः - कलि - न प्रभवेत् - सत्ता चालवू शकणार नाही.॥५॥
जोपर्यंत पृथ्वीवर अभिमन्युपुत्र महाराज परीक्षित सम्राट होते, तोपर्यंत सर्वत्र राहूनही कलीचा काही प्रभाव पडला नाही. (५)
यस्मिन्नहनि यर्ह्येव भगवान् उत्ससर्ज गाम् ।
तदैवेहानुवृत्तोऽसौ अधर्मप्रभवः कलिः ॥ ६ ॥
वैकुंठी कृष्ण ज्या वेळी गेला तेंव्हाचि तो कली । अधर्ममूळ जो ऐसा पृथ्वीसी पातला पहा ॥ ६ ॥
यस्मिन् - ज्या - अहनि - दिवशी - यर्हि - ज्यावेळी - एव - च - भगवान् - सर्वगुणसंपन्न श्रीकृष्ण - गां - पृथ्वीला - उत्ससर्ज - सोडून गेला - तदा - त्यावेळी - एव - च - इह - ह्या पृथ्वीवर - अधर्मप्रभवः - अधर्मापासून उत्पन्न झालेला - असौ - हा - कलिः - कलि - अनुवृत्तः - संचार करू लागला. ॥६॥
ज्या दिवशी, ज्या क्षणी, भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीचा त्याग केला, त्याचवेळी अधर्माचे मूळ कारण असलेले कलियुग आले होते. (६)
नानुद्वेष्टि कलिं सम्राट् सारङ्ग इव सारभुक् ।
कुशलान्याशु सिद्ध्यन्ति नेतराणि कृतानि यत् ॥ ७ ॥
भुंगा जै सारग्राही तो तसा राजा परीक्षित । क करी कलिचा द्वेश कलीचा गुण पाहिला । संकल्पे पुण्यकार्याच्या लाभते फळ सत्वर । केल्याने घडते पाप संकल्पे ते कधी नसे ॥ ७ ॥
सारङ्गः - सार म्हणजे तत्त्व तेवढयाच वस्तूकडे जाणारा - इव - प्रमाणे - सारभुक् - केवळ सार म्हणजे महत्त्वाचे जे असेल तेवढेच घेणारा - सम्राट् - सार्वभौम परीक्षित - कलिं - कलीला - न अनुद्वेष्टि - शत्रू मानून द्वेष करीत नव्हता - यत् - कारण - कुशलानि - पुण्यकृत्ये - आशु - तत्काळ - सिद्ध्यन्ति - संकल्पानेच फलित होतात - इतराणि - तद्वयतिरिक्त म्हणजे पापकृत्ये - न - नाहीत - कृतानि - आचरण केल्यानंतर फलित होतात.॥७॥
भ्रमरासारखे सार ग्रहण करणार्या सम्राट परीक्षिताने कलीचा द्वेष केला नाही. कारण कलियुगाचा एक गुण आहे की कलियुगात केवळ संकल्पाने पुण्यकर्माचे फळ मिळते; परंतु पापकर्माचे फळ संकल्पाने नव्हे, तर प्रत्यक्ष शरीराने केल्यावरच मिळते. (७)
किं नु बालेषु शूरेण कलिना धीरभीरुणा ।
अप्रमत्तः प्रमत्तेषु यो वृको नृषु वर्तते ॥ ८ ॥
बागुलासम भित्र्यांना कली हा भेडवीतसे । वीरांना घाबरे तोची प्रमाद्या वश तो करी ॥ ८ ॥
बालेषु - अज्ञानी लोकांवर अंमल चालविणार्या - धीरभीरुणा - ज्ञानी लोकांना भिणार्या - शूरेण - शूर - कलिना - कलीकडून - किंनु - काय नफानुकसान होणार आहे - यः - जसा एखादा - वृकः - लांडगा - अप्रमत्तः - सावधपणाने वागणारा असा होत्साता - प्रमत्तेषु - बेसावध अशा - नृषु - लोकांवर - वर्तते - अंमल गाजवितो. ॥८॥
लांडग्याप्रमाणे मोहग्रस्त लोकांवर पराक्रम गाजवणार्या आणि निश्चयी पुरुषांना भिणार्या कलीला काय किंमत आहे ? धर्महीन मनुष्यांना मात्र आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी हा नेहमी तत्पर असतो. (८)
उपवर्णितमेतद् वः पुण्यं पारीक्षितं मया ।
वासुदेव कथोपेतं आख्यानं यदपृच्छत ॥ ९ ॥
ॠषिंनो ! परिक्षित् राजा तयाची पुण्यदा कथा । भगवंतकथायुक्त पुसता वदलो तुम्हा ॥ ९ ॥
यत् - जे - अपृच्छत् - विचारलेत - एतत् - हे - वासुदेवकथोपेतं - श्रीकृष्णाच्या चरित्रांनी युक्त असे - पुण्यं - पुण्यकारक - पारीक्षितं - परीक्षितसंबंधी - आख्यानं - कथानक - मया - मी - वः - तुम्हाला - उपवर्णितं - वर्णन करून सांगितले. ॥९॥
ऋषींनो, आपण विचारलेले भगवंतांच्या कथांनी युक्त असे राजा परीक्षिताचे पवित्र चरित्र मी आपणास सांगितले. (९)
या याः कथा भगवतः कथनीयोरुकर्मणः ।
गुणकर्माश्रयाः पुम्भिः संसेव्यास्ता बुभूषुभिः ॥ १० ॥
कीर्तनीय अशा सर्व लिला श्रीकॄष्ण वर्तला । म्हणोनी सेविणे सर्वे कल्याण हित इच्छुके ॥ १० ॥
कथनीयोरुकर्मणः - वर्णन करण्याजोगी ज्याची मोठमोठी कृत्ये आहेत अशा - भगवतः - श्रीकृष्णाच्या - याः याः - ज्या ज्या - कथाः - कथा - गुणकर्माश्रयाः - गुणांना व कर्माला आश्रय करून राहिलेल्या - ताः - त्या कथा - बुभूषुभिः - उत्कर्षाला इच्छिणार्या - पुम्भिः - पुरुषांनी - संसेव्याः - सेवन करण्याजोग्या आहेत. ॥१०॥
वर्णन करण्यासारखी मोठमोठी कृत्ये करणार्या भगवान श्रीकृष्णांचे गुण आणि लीला यांचा संबंध असणार्या जितक्या कथा आहेत, त्या सर्वांचे कल्याण इच्छिणार्या पुरुषांनी सेवन केले पाहिजे. (१०)
ऋषय ऊचुः
सूत जीव समाः सौम्य शाश्वतीर्विशदं यशः । यस्त्वं शंससि कृष्णस्य मर्त्यानां अमृतं हि नः ॥ ११ ॥
ॠषि म्हणाले - शांतवृत्तीसुता तुम्ही जगावे युग यूगही । आपुल्या कीर्तने आम्हा भवाचे भय संपले ॥ लिला सुधामयी ऐशा ऐकूत उज्ज्वला कशा ॥ ११ ॥
सौम्य - हे शान्त - सूत - सूता - शाश्वतीः - पुष्कळ - समाः - वर्षे - जीव - जग - यः - जो - त्वं - तू - हि - खरोखर - विशदं - निर्मळ - मर्त्यानां - व मृत्यूने ग्रस्त झालेल्या - नः - आम्हाला - अमृतं - मृत्यूला नष्ट करणारे - कृष्णस्य - श्रीकृष्णाचे - यशः - यश - शंससि - कथन करतोस. ॥११॥
ऋषी म्हणाले - सूत महोदय, आपणांस दीर्घायुष्य लाभो. कारण जन्ममृत्यूच्या प्रवाहात पडलेल्या आम्हा लोकांना, आपण भगवान श्रीकृष्णांच्या अमृतमय उज्ज्वल कीर्तीचे श्रवण घडविता. (११)
कर्मण्यस्मिन् अनाश्वासे धूमधूम्रात्मनां भवान् ।
आपाययति गोविन्द पादपद्मासवं मधु ॥ १२ ॥
यज्ञाच्या धूम्रवायूने कायाही धूम्र जाहिली । भरोसा नच कर्माचा तुम्ही तो चरणामृत ॥ पाजिल धुंद नी गोड श्रीकॄष्णचंद्र दाविला ॥ १२ ॥
भवान् - आपण - अस्मिन् - ह्या - अनाश्वासे - फलांबद्दल विश्वास न ठेविता येणार्या - कर्मणि - कर्मात - धूमधूम्रात्मनां - धुराने धुरकटलेल्या शरीराच्या अशा आम्हास - मधु - गोड - गोविन्दपादपद्मासवं - श्रीकृष्णचरण-कमलापासून उत्पन्न होणार्या रसाला - आपाययति - तृप्ति होईपर्यंत पाजीत आहा. ॥१२॥
अनेक यज्ञांच्या धुरामुळे आमचे शरीर धूसर झाले आहे. असे असूनही या कर्माचा काही भरवसा नाही. अशावेळी आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे मधु-मधुर अमृत आम्हांला पाजत आहात. (१२)
तुलयाम लवेनापि न स्वर्गं नापुनर्भवम् ।
भगवत् सङ्गिसंगस्य मर्त्यानां किमुताशिषः ॥ १३ ॥
थोडाही क्षण संतांचा लाभता स्वर्ग काय तो । तुलना नच ती त्याची ऐहीक भोग काय ते ॥ १३ ॥
भगवत्सङ्गिसङगस्य - भगवंताचे ठिकाणी आसक्ती ठेवणार्या भक्तांच्या समागमाच्या - लवेन अपि - थोडया अंशाशी - स्वर्गं - स्वर्गाला - न तुलयाम - सारखेपणाने मानीत नाही - अपुनर्भवं - मोक्षाला - न - नाही - उत - तर मग - मर्त्यानां - मृत्यूधर्मी मानवांच्या - आशिषः - भोग्य वस्तूंना - किं - कोण विचारतो.॥१३॥
भगवत्प्रेमी भक्तांच्या क्षणभर झालेल्या सत्संगाची स्वर्ग किंवा मोक्षाशीसुद्धा तुलना केली जाऊ शकत नाही. मग तुच्छ सांसारिक उपभोगांची काय कथा ? (१३)
को नाम तृप्येद् रसवित्कथायां
महत्तमैकान्त परायणस्य । नान्तं गुणानां अगुणस्य जग्मुः योगेश्वरा ये भवपाद्ममुख्याः ॥ १४ ॥
(इंद्रवज्रा) आता पुरे कोण म्हणे कथेला रसज्ञ ऐसा नच जन्मला तो । अचिंत्य कल्याणमयी अनंत ब्रह्मा शिवाला नमिळे कदापी ॥ १४ ॥
ये - जे - भवपाद्ममुख्याः - शंकर व ब्रह्मदेव हे आहेत मुख्य ज्यामध्ये असे - योगेश्वराः - मोठे योगी - महत्तमैकान्तपरायणस्य - श्रेष्ठ श्रेष्ठ योग्यांनाच एक आश्रय देणार्या - अगुणस्य - निर्गुण परमेश्वराच्या - गुणानां - गुणांच्या - अन्तं - शेवटाला, टोकाला - न जग्मुः - जाऊन पोचू शकले नाहीत - कः - कोणता - रसवित् - रसाची म्हणजे भगवद्गुणांची आवड असलेला पुरुष - कथायां - भगवंताच्या कथेत - तृप्येत् - तृप्त होईल बरे !॥१४॥
महापुरुषांचे एकमेव जीवनसर्वस्व असलेल्या श्रीकृष्णांच्या कथांनी कोणता रसिक तृप्त होईल ? सर्व प्राकृत गुणांच्या पलिकडे असलेल्या त्या भगवंतांच्या गुणसमुच्चयाचा ब्रह्मा, शंकर इत्यादि योगेश्वरांनाही अंत लागत नाही. (१४)
तन्नो भवान् वै भगवत्प्रधानो
महत्तमैकान्त परायणस्य । हरेरुदारं चरितं विशुद्धं शुश्रूषतां नो वितनोतु विद्वन् ॥ १५ ॥
विद्वान तुम्ही ध्रुवकॄष्णतारा स्मरोनि सारे जगता असे हे । तो संत आधार असाचि एक विस्तार लिला कथिणे अम्हासी ॥ १५ ॥
विद्वन् - हे विद्वान सूता ! - भगवत्प्रधानः - श्रीकृष्णच आहे मुख्य ज्यास असे - भवान् - आपण - वै - खरोखर - महत्तमैकान्तपरायणस्य - मोठमोठया भक्तांना जो एकच मुख्य आश्रय आहे अशा - हरेः - श्रीकृष्णाचे - उदारं - उत्कृष्ट - विशुद्धं - निर्मळ - तत् - ते - चरितं - चरित्र - शुश्रूषतां - ऐकण्यास इच्छिणार्या - नः - आम्हांस - वितनोतु - विस्तारपूर्वक वर्णन करून सांगावे. ॥१५॥
हे विद्वन, आपण भगवंतांनाच अढळ स्थान मानीत आहात. म्हणून आपण, सत्पुरुषांचा एकमात्र आश्रय असलेल्या भगवंतांच्या उदार आणि विशुद्ध चरित्राचे, आमच्यासारख्या श्रद्धाळू श्रोत्यांसाठी विस्तारपूर्वक वर्णन करावे. (१५)
स वै महाभागवतः परीक्षिद्
येनापवर्गाख्यमदभ्रबुद्धिः । ज्ञानेन वैयासकिशब्दितेन भेजे खगेन्द्रध्वजपादमूलम् ॥ १६ ॥ तन्नः परं पुण्यमसंवृतार्थं आख्यानमत्यद्भुत योगनिष्ठम् । आख्याह्यनन्ता चरितोपपन्नं पारीक्षितं भागवताभिरामम् ॥ १७ ॥
ज्या त्या महाभागवाता परिक्षित् सांगीतलेली शुकदेवजीने । ज्ञानेचि मोक्षस्वरुपी निमाला ती ज्ञानवार्ता कथिणे आम्हाला ॥ १६ ॥ ते गुढ झाकोनि नसेअल कांही ती प्रेमभक्ती असली तयात । त्या कृष्णलिला जर त्या तयात आनंद त्यांचा मिळु द्या अम्हाला ॥ १७ ॥
अदभ्रबुद्धिः - मोठा बुद्धिमान - महाभागवतः - व मोठा भगवद्भक्त - सः - तो - परीक्षित - परीक्षित राजा - वै - खरोखर - वैयासकिशब्दितेन - व्यासपुत्र शुकाचार्याने सांगितलेल्या - येन - ज्या - ज्ञानेन - ज्ञानाने - अपवर्गाख्यं - मोक्ष ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या - खगेन्द्रध्वजपादमूलं - गरुड आहे ध्वज म्हणजे वाहन ज्याचे अशा परमेश्वराच्या चरणाच्या मुळाला - भेजे - प्राप्त झाला. ॥१६॥
तत् - ते - परं - श्रेष्ठ - पुण्यं - पुण्यकारक - असंवृतार्थं - स्पष्ट करून सांगितला आहे अर्थ ज्याचा असे - अत्यद्भुतयोगनिष्ठं - अत्यंत आश्चर्यजनक योगातच प्राधान्याने राहिलेले - अनन्ताचरितोपपन्नं - भगवंताच्या लीलांनी युक्त असे - भागवताभिरामं - भगवद्भक्त जेथे रममाण होत असतात असे - पारीक्षितं - परीक्षित राजासंबंधी - आख्यानं - चरित्र - हि - उत्तम रीतीने - नः - आम्हांला - आख्याहि - सांगा. ॥१७॥
भगवंतांवर परम प्रेम असणार्या बुद्धिमान परीक्षिताने मोक्षस्वरूप भगवंतांच्या चरणकमलांची प्राप्ती करून घेतली, आपण ते ज्ञान आणि परीक्षिताचे परम पवित्र उपाख्यान यांचे वर्णन करा. ज्यामध्ये कोणतीच गोष्ट गुप्त राहिलेली नसेल आणि भगवत्प्रेमाच्या अद्भुत योगनिष्टेचे निरूपण केलेले असेल, शिवाय ज्यात भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचेच वर्णन केलेले असेल असे प्रसंग भगवंतांच्या प्रिय भक्तांना ऐकण्यात फारच आनंद वाटतो. (१६-१७)
सूत उवाच ।
अहो वयं जन्मभृतोऽद्य हास्म वृद्धानुवृत्त्यापि विलोमजाताः । दौष्कुल्यमाधिं विधुनोति शीघ्रं महत्तमानामभिधानयोगः ॥ १८ ॥
सूतजी सांगतात - ह्या दासजातीत असोनि धन्य सेवेचि झालो तुमच्या असा मी । संतासी बोलोनि कमीच होतो तो दोष जन्मी कुलहीन हो का ॥ १८ ॥
अहो - काय हो - अद्य - आज - विलोमजाताः - विलोम म्हणजे विरुद्ध संकर जातीत उत्पन्न झालेले - अपि - सुद्धा - वयं - आम्ही - वृद्धानुवृत्त्या - वृद्ध पुरुषांच्या सेवेने - जन्मभृतः - सफल जन्म आहे असे - आस्म ह - झालेले आहो - महत्तमानां - मोठमोठया साधूंचा - अभिधानयोगः - समागमप्रसंगी - दौष्कुल्यं - वाईट कुलांत उत्पन्न झाल्याबद्दलच्या - आधिं - मानसिक दुःखाला - शीघ्रं - तत्काळ - विधुनोति - नाहीसे करितो.॥१८॥
सूत म्हणाले - अहो ! विलोम जातीमध्ये उच्च वर्णातील माता व कनिष्ठ कुळातील पिता यांपासून जन्म होऊनही महात्म्या पुरुषांची सेवा केल्यामुळे आज आमचा जन्म सफल झाला. कारण केवळ महापुरुषांशी संवाद केल्यानेही कनिष्ठ कुळात जन्म घेतल्याची मनोव्यथा तत्काळ नाहीशी होते. (१८)
कुतः पुनर्गृणतो नाम तस्य
महत्तमैकान्त परायणस्य । योऽनन्तशक्तिः भगवाननन्तो महद्गुणत्वाद् यमनन्तमाहुः ॥ १९ ॥
जे भक्त गाती हरिचेच नाम ते भाग्य कांही गमते विषेश । श्रीकृष्ण शक्ती असली अनंत म्हणोनि त्यां नामहि ते अनंत ॥ १९ ॥
यः - जो - अनन्तशक्तिः - अपरिमित शक्ति असलेला - भगवान् - सर्वगुणसंपन्न - अनन्तः - व ज्याचा अंत नाही असा परमेश्वर - यं - ज्याला - महद्गुणत्वात् - मोठया गुणांनी युक्त असल्यामुळे - अनन्तं - अनन्त असे - आहुः - बोलतात - तस्य - अशा त्या - महत्तमैकान्तपरायणस्य - मोठमोठया योग्यांना एकच आश्रय देणार्या परमेश्वराच्या - नाम - नावाला - गृणतः - वर्णन करणार्याच्या दुःखाला नाहीसे करील असे - पुनः - फिरून - कुतः - काय सांगितले पाहिजे ? ॥१९॥
भगवंत हेच ज्यांचा एकमात्र आश्रय आहे, अशा सत्पुरुषांबद्दल तर काय बोलावे ? भगवंतांची शक्ती अनंत आहे, ते स्वतः अनंत आहेत आणि त्यांच्या अंगी वसणार्या अनंत गुणांमुळेच त्यांना ’अनंत’ असे म्हटले जाते. (१९)
एतावतालं ननु सूचितेन
गुणैरसाम्यानतिशायनस्य । हित्वेतरान् प्रार्थयतो विभूतिः यस्याङ्घ्रिरेणुं जुषतेऽनभीप्सोः ॥ २० ॥
नसे तुळा त्या गुण वैभवाला ब्रह्माहि प्रार्थी जरि लक्षुमीला । मिळे न त्याला परि तीच सेवी पदा जयाच्याहि मनी नसोनी ॥ २० ॥
गुणैः - गुणांनी - असाम्यानतिशायनस्य - ज्याच्याशी बरोबरी किंवा उल्लंघनहि करता येणार नाही अशा परमेश्वराबद्दल - ननु - खरोखर - एतावता - एवढेच - सूचितेन - सुचविणे - अलं - पुरेसा आहे. - विभूतिः - ऐश्वर्यलक्ष्मी - प्रार्थयतः - याचना करणार्या - इतरान् - दुसर्यांना - हित्वा - सोडून - अनभीप्सोः - इच्छा न करणार्या - यस्य - ज्या परमेश्वराच्या - अङ्घ्रिरेणुं - पायधुळीला - जुषते - सेविते.॥२०॥
भगवंतांच्या गुणांशी बरोबरीही जर कोणी करू शकत नाही; तर त्यांच्यापेक्षा अधिक गुणावान कोण असू शकेल ? त्यांच्या गुणांची विशेषता समजण्यासाठी एवढे सांगणेच पुरेसे आहे की, जिच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करणार्या ब्रह्मादी देवांना सोडून, भगवंतांनी इच्छा न करताही लक्ष्मी भगवंतांच्या चरणकमलरजाचे सेवन करीत आहे. (२०)
अथापि यत्पादनखावसृष्टं
जगद्विरिञ्चोपहृतार्हणाम्भः । सेशं पुनात्यन्यतमो मुकुन्दात् को नाम लोके भगवत्पदार्थः ॥ २१ ॥
ब्रह्मा पदासी नित ओति पाणी तेथोनि गंगा निघली वहात । ते तीर्थ घेता शिव अंब तैसे पवित्र सारे, भगवंत श्रेष्ठ ॥ २१ ॥
अथापि - आणखीही - यत्पानखावसृष्टं - ज्याच्या पायाच्या नखापासून उत्पन्न झालेले - विरिञ्चोपहृतार्हणाम्भः - ब्रह्मदेवाने आणलेले अर्घोदक - सेशं - शंकरासह - जगत् - जगाला - पुनाति - पवित्र करते. - लोके - लोकांमध्ये - भगवत्पदार्थः - भगवान ह्या शब्दाला योग्य अशी वस्तु - मुकुन्दात् - श्रीकृष्णाहून - अन्यतमः - दुसरी श्रेष्ठ - कः - कोणती - नाम - बरे ?॥२१॥
ब्रह्मदेवांनी भगवंतांचे चरण धुण्यासाठी जे पाणी समर्पित केले होते, तेच त्यांच्या पायाच्या नखातून निघून गंगेच्या रूपाने वाहू लागले. हे महादेवासहित सर्व जगाला पवित्र करीत आहे. अशा स्थितीत या त्रिभुवनात श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त भगवान शब्दाला कोण पात्र होऊ शकतो. (२१)
यत्रानुरक्ताः सहसैव धीरा
व्यपोह्य देहादिषु सङ्गमूढम् । व्रजन्ति तत्पारमहंस्यमन्त्यं यस्मिन्नहिंसोपशमः स्वधर्मः ॥ २२ ॥
कृपे जयाच्या तनु गेह सारे सोडोनि आसक्ति पुरुष राही । कष्टी न कोणा करिता तदा तो स्वधर्मि राही मग पा निवांत ॥ २२ ॥
यत्र - ज्या परमेश्वराचे ठिकाणी - अनुरक्ताः - प्रेम करणारे - धीराः - ज्ञानी पुरुष - देहादिषु - देहादिकांमध्ये - ऊढं - असलेल्या - सङगं - आसक्तीला - व्यपोह्य - पार दूर सोडून - सहसा एव - एकदमच - अन्त्यं - शेवटल्या - तत् - त्या - पारमहंस्यं - परमहंसाच्या म्हणजे नैष्ठिक विष्णुभक्ति करणार्यांच्या पदाला - व्रजन्ति - जातात - यस्मिन् - जेथे - स्वधर्मः - स्वतःचा धर्म - अहिंसोपशमः - हिंसा न करणे व शांती स्वीकारणे असाच आहे. ॥२२॥
ज्यांच्या प्रेमाची प्राप्ती करून धैर्यवान पुरुष निःसंकोचपणे शरीर, घर इत्यादि आसक्ति सोडून देतो आणि अंती ज्या अवस्थेत कोणालाही कष्ट न देणे आणि सर्व दृष्टीने शांतीचा अनुभव घेणे हाच धर्म असणार्या परमहंस आश्रमाचा (संन्यासाचा) स्वीकार करतो. (२२)
अहं हि पृष्टोऽर्यमणो भवद्भिः
आचक्ष आत्मावगमोऽत्र यावान् । नभः पतन्त्यात्मसमं पतत्त्रिणः तथा समं विष्णुगतिं विपश्चितः ॥ २३ ॥
सूर्यापरी तेज तुम्हा ऋषींनो तुम्ही मला जे पुसले हिताचे । माझ्या मतीने कथितो तुम्हासी शक्तीनुसारे उडतात पक्षी ॥ २३ ॥
अर्यमणः - अहो सूर्याप्रमाणे तेजस्वी ब्राह्मण हो - हि - खरोखर - भवद्भिः - आपणांकडून - अहं - मी - पृष्टः - विचारला गेलो आहे - अत्र - ह्या बाबतीत - यावान् - जितका - आत्मावगमः - मला तुमच्या प्रश्नांची उत्तरे माझ्या ज्ञानशक्तीप्रमाणे जितकी म्हणून देता येतील तितके - आचक्षे - सांगतो - पतत्रिणः - पक्षी - आत्मसमं - आपल्या शक्तीप्रमाणे - नभः - आकाशांत - पतन्ति - उडतात - तथा - तसेच - विपश्चितः - विद्वान - समं - शक्त्यनुरूप - विष्णुगतिं - परमेश्वराच्या गतीला ॥२३॥
सूर्यासमान तेजस्वी असणार्या महात्म्यांनो, आपण मला जे काही विचारले, ते मी आपणास माझ्या कुवतीनुसार सांगत आहे. जसे पक्षी आपापल्या शक्तिनुसार आकाशात उडतात, तसेच विद्वान लोकसुद्धा आपापल्या बुद्धीनुसार श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन करतात. (२३)
एकदा धनुरुद्यम्य विचरन्मृगयां वने ।
मृगाननुगतः श्रान्तः क्षुधितस्तृषितो भृशम् ॥ २४ ॥ जलाशयमचक्षाणः प्रविवेश तमाश्रमम् । ददर्श मुनिमासीनं शान्तं मीलितलोचनम् ॥ २५ ॥
( अनुष्टुप् ) शिकार करण्या राजा एकदा वनि पातला धवाता हरिणापाठी तॄष्णेने पीडिला तदा ॥ क्षुधे व्याकुळ होवोनी थकला देहि तो पुन्हा ॥ २४ ॥ न दिसे मुळि ते पाणी म्ह्णोनी ऋहिआश्रमी । रिघता पहिले तेथे मुनी ध्यानस्थ आसनी ॥ २५ ॥
एकदा - एके दिवशी - धनुः - धनुष्य - उद्यम्य - घेऊन - वने - अरण्यात - मृगयां - मृगयेला म्हणजे भक्ष्य पशूंना मारण्याच्या क्रियेला - विचरन् - करणारा असा परीक्षित - मृगान् - मृगांना म्हणजे सर्वसामान्य भक्ष्य पशूंना किंवा हरिणांना - अनुगतः - अनुसरून मागोमाग धावत जाणारा - श्रान्तः - थकलेला - क्षुधितः - भुकेलेला - भृशं - व फारच - तृषितः - तहानलेला असा होत्साता - जलाशयं - सरोवराला - अचक्षाणः - न पाहणारा - तं - त्या - आश्रमं - आश्रमाला - प्रविवेश - गेला - आसीनं - व बसलेल्या - शान्तं - शांत - मीलितलोचनं - डोळे मिटलेल्या - मुनिं - ऋषीला - ददर्श - पाहता झाला.॥२४-२५॥
एके दिवशी राजा परीक्षित धनुष्य घेऊन शिकारीसाठी वनात गेला होता. पशूंच्या मागे धावता धावता तो थकून गेला आणि त्याला अतिशय तहान आणि भूक लागली. (२४)
जवळपास कोठे जलाशय दिसला नाही तेव्हा तो जवळच्याच एका ऋषीच्या आश्रमात गेला. तेथे त्याने पाहिले की, एक ऋषी डोळे बंद करून एका आसनावर शांत चित्ताने बसले आहेत. (२५)
प्रतिरुद्धेन्द्रियप्राण मनोबुद्धिमुपारतम् ।
स्थानत्रयात्परं प्राप्तं ब्रह्मभूतमविक्रियम् ॥ २६ ॥ विप्रकीर्णजटाच्छन्नं रौरवेणाजिनेन च । विशुष्यत्तालुरुदकं तथाभूतमयाचत ॥ २७ ॥
इंद्रीय प्राण बुद्धीला मनाला रोधुनी तसे । सोडोनी स्थिती त्या तीन तुरिया ब्रह्मरूप तो ॥ २६ ॥ जटा पसरल्या त्याच्या अंगी कृष्ण मृगाजिन । तृष्णेने व्याकूळी राजा मागे जल स्थितीत त्या ॥ २७ ॥
विशुष्यत्तालुः - ज्याची ताळू सुकून गेली आहे असा तो राजा - प्रतिरुद्धेंद्रियप्राणमनोबुद्धिं - ज्याने आपली इंद्रिये, प्राण, मन व बुद्धि यांचे योगसामर्थ्याने नियमन केले आहे - उपारतं - शांतपणाला प्राप्त झालेल्या - स्थानत्रयात् - तीनही अवस्थांतून - परं - पलीकडील चौथ्या अवस्थेला - प्राप्तं - पोचलेल्या - ब्रह्मभूतं - ब्रह्मरूप झालेल्या - अविक्रियं - विकारशून्य - विप्रकीर्णजटाच्छन्नं - जिकडेतिकडे विस्कळीत झालेल्या जटांनी आच्छादिलेल्या - च - आणि - रौरवेण - रुरु नावाच्या मृगाच्या - अजिनेन - कातडे पांघरलेल्या - तथाभूतं - तशा तर्हेच्या ऋषीजवळ - उदकं - पाणी - अयाचत - मागू लागला.॥२६-२७॥
इंद्रिये, प्राण, मन आणि बुद्धी यांचा निरोध केल्याने ते बाह्य जगापासून निवृत्त झाले होते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडील अशा निर्विकार, ब्रह्मरूप, तुरीय अवस्थेत स्थिर झाले होते. (२६)
विस्कटलेल्या जटांनी आणि कृष्णमृगाजिनाने त्यांचे शरीर जवळ जवळ झाकले गेले होते. तहानेने घसा कोरडा पडला असल्याने राजा परीक्षिताने तशा अवस्थेतही त्यांच्याकडे पाणी मागितले. (२७)
अलब्धतृणभूम्यादिः असम्प्राप्तार्घ्यसूनृतः ।
अवज्ञातं इवात्मानं मन्यमानश्चुकोप ह ॥ २८ ॥
नव्हते कुणि ही तेथे चटईही न बैसण्या । मग तो जल ते कैचे कैचे मधुर भाषण । अवज्ञा मानिली राये क्रोध भडकला पहा ॥ २८ ॥
अलब्धतृणभूम्यादिः - गवताचे आसन किंवा पृथ्वीवरील कोणतेही आसन न मिळालेला - असंप्राप्तार्घ्यसूनृतः - अर्ध्यपाद्यादिकाने किंवा मधुर भाषणाने ज्याचा सत्कार झाला नाही असा - आत्मानं - स्वतःला - अवज्ञातं - अपमानिलेल्या - इव - प्रमाणे - मन्यमानं - मानणारा - ह - फारच - चुकोप - रागावला.॥२८॥
जेथे राजाला बसण्यासाठी दर्भासन मिळाले नाही, भूमीवर ’बसा’ असेही कोणी म्हणाले नाही; तेथे अर्घ्य आणि आदरयुक्त मधुर वाणी कोठून मिळणार ? तेव्हा आपला अपमान झाला असे वाटून राजाला राग आला. (२८)
अभूतपूर्वः सहसा क्षुत्तृड्भ्यामर्दितात्मनः ।
ब्राह्मणं प्रत्यभूद्ब्रह्मन् मत्सरो मन्युरेव च ॥ २९ ॥
अभूतपूर्व तो राजा भुकेने व्याकुळा असा । द्विजाचा क्रोध त्या आला मनी मत्सर पातला ॥ २९ ॥
ब्रह्मन् - शौनक हो ! - क्षुत्तृडभ्यां - भुकेने व तहानेने - अर्दितात्मनः - व्याकुळ झालेल्या राजाचा - ब्राह्मणं - ब्राह्मणाला - प्रति - उद्देशून - अभूतपूर्वः - पूर्वी कधीही अशा रीतीने उत्पन्न न झालेला - मत्सरः - मत्सर - च - आणि - मन्युः - क्रोध - एव - ही - सहसा - एकाएकी - अभूत् - उत्पन्न झाला.॥२९॥
शौनका, राजा भूक आणि तहानेने व्याकूळ झाला होता; म्हणून लगेच त्याच्या मनात त्या ब्राह्मणाविषयी ईर्ष्या आणि क्रोध उत्पन्न झाला. असा प्रसंग त्याच्या जीवनात पहिल्यांदाच आला होता. (२९)
स तु ब्रह्मऋषेरंसे गतासुमुरगं रुषा ।
विनिर्गच्छन् धनुष्कोट्या निधाय पुरमागत् ॥ ३० ॥
बैसता क्रोधे वेगाने धनूने मृतसर्प तो । उचलोनी गळा घाली ध्यानस्थ ऋषिच्या तदा ॥ ३० ॥
विनिर्गच्छन् - तेथून निघणारा - सः - तो - तु - तर - रुषा - रागावून - धनुष्कोटया - धनुष्याच्या टोकाने - ब्रह्मऋषेः - ब्रह्मर्षींच्या - अंसे - खांद्यावर - गतासुं - मेलेल्या - उरगं - सापाला - निधाय - ठेवून - पुरं - नगराला - आगमत् - आला.॥३०॥
तेथून परत जातेवेळी क्रोधविवश होऊन त्याने धनुष्याच्या टोकाने एक मेलेला साप उचलून ऋषींच्या गळ्यात अडकवून तो राजधानीकडे निघून गेला. (३०)
एष किं निभृताशेष करणो मीलितेक्षणः ।
मृषा समाधिराहोस्वित् किं नु स्यात् क्षत्रबन्धुभिः ॥ ३१ ॥
राजाला भासले विप्र ध्यानाचे ढोंग ह करी । मनात समजे ऐसा नगरी पातला पुन्हा ॥ ३१ ॥
मीलितेक्षणः - डोळे मिटलेला - एषः - हा मुनि - निभृताशेषकरणः - खरोखरच सर्व इंद्रिये ताब्यात ठेविलेला असा - किं - आहे काय ? - आहोस्वित् - किंवा - समाधिः - समाधियोग - मृषा - खोटाच आहे - नु - कारण - क्षत्रबन्धुभिः - ह्या क्षुद्र क्षत्रियांकडून - किं स्यात् - आमचे काय होणार आहे ?॥३१॥
परीक्षिताच्या मनात असे आले की यांनी डोळे मिटले आहेत, त्याअर्थी खरोखरच इंद्रिये आवरून घेतली आहेत काय ? का राजाशी आपल्याला काय कर्तव्य आहे, असे मानून खोटे-खोटेच समाधीचे सोंग घेतले आहे ? (३१)
तस्य पुत्रोऽतितेजस्वी विहरन् बालकोऽर्भकैः ।
राज्ञाघं प्रापितं तातं श्रुत्वा तत्रेदमब्रवीत् ॥ ३२ ॥
महर्षि शमिकांचा तो पुत्र तेजस्वि खेळुनी । येता पाही पित्याची अवस्था साप तो गळा ॥ ३२ ॥
अतितेजस्वी - फारच तपश्चर्येच्या तेजाने युक्त असा - बालकः - लहान - तस्य - त्या मुनीचा - पुत्रः - पुत्र - अर्भकैः - बरोबरीच्या मुलांशी - विहरन् - खेळत असता - राज्ञा - राजाने - अघं - आगळिकेला - प्रापितं - नेलेल्या - तातं - बापाबद्दल - श्रुत्वा - ऐकून - तत्र - त्याच ठिकाणी - इदं - हे - अब्रवीत् - बोलला.॥३२॥
त्या शमीक मुनींचा पुत्र मोठा तेजस्वी होता. तो इतर ऋषिकुमारांसह बाजूलाच खेळत होता. त्याने जेव्हा ऐकले की, राजाने आपल्या पित्याशी असभ्य वर्तन केले आहे, तेव्हा तो म्हणाला, (३२)
अहो अधर्मः पालानां पीव्नां बलिभुजामिव ।
स्वामिन्यघं यद् दासानां द्वारपानां शुनामिव ॥ ३३ ॥
म्हणाला नृप हे मोठे उष्टे खावोनि काक जै । माजतो माजले तैसे धटींगणचि जाहले ॥ द्विजांचे दास ते साचे कुत्र्याच्यापरि मालका । द्वार ना रक्षिता ऐसे तिरस्कारोनि भुंकती ॥ ३३ ॥
अहो - किती हो ! - बलिभुजा - कावळ्यांच्या - इव - प्रमाणे - शुन - कुत्र्यांच्या - इव - प्रमाणे - पीव्नां - माजलेल्या - पालानां - राजांचा - अधर्मः - अधर्म - यत् - जसे - द्वारपानां - द्वाररक्षक अशा - दासानां - नोकरांचे - स्वामिनि - धन्याविषयी - अघं - वाईट चिंतन. ॥३३॥
उष्टे अन्न खाणार्या कावळ्यांप्रमाणे पुष झालेल्या लोकपालांचा केवढा हा अन्याय ! दरवाजावर पहारा देणार्या कुत्र्याप्रमाणे ब्राह्मणांचे दास असूनही आपल्या धन्याचाच हे तिरस्कार करतात. (३३)
ब्राह्मणैः क्षत्रबन्धुर्हि गृहपालो निरूपितः ।
स कथं तद्गृहे द्वाःस्थः सभाण्डं भोक्तुमर्हति ॥ ३४ ॥
ब्राह्मणे क्षत्रिया द्वार रक्षिण्या योजिले असे । सोडोनी काम ते खाती घरात घुसुनी पुन्हा ॥ ३४ ॥
हि - खरोखर - क्षत्रबन्धुः - साधारण क्षत्रिय राजा - ब्राह्मणैः - ब्राह्मणांनी - द्वारपालः - द्वाररक्षक असा - निरूपितः - नेमिला आहे - सः - तो - द्वाःस्थः - दरवाजावर उभा राहून - तद्गृहे - त्यांच्या घरात - सभाण्डं - मूळच्या भांडवलासह त्याला - कथं - कसा - भोक्तुं - खाण्याला - अर्हति - योग्य होतो. ॥३४॥
ब्रह्मणांनी क्षत्रियांना आपले द्वारपाल बनविले आहे. त्यांनी दरवाजावर उभे राहून संरक्षण केले पाहिजे. घरात घुसून भांड्यातील अन्न खाण्याचा त्यांना अधिकार नाही. (३४)
कृष्णे गते भगवति शास्तर्युत्पथगामिनाम् ।
तद् भिन्नसेतूनद्याहं शास्मि पश्यत मे बलम् ॥ ३५ ॥
मर्यादा सोडिती राजे कृष्णा माघारि हे असे । दावितो तप सामर्थ्य दंडितो शाप देउनी ॥ ३५ ॥
तत् - म्हणून - उत्पथगामिनां - दुर्मार्गानी चालणार्य़ाचा - शास्तरि - शासनकर्ता - भगवति - सर्वगुणसंपन्न भगवान - कृष्णे - श्रीकृष्ण - गते - निजधामाला गेला असता - अद्य - आज - अहं - मी - भिन्नसेतून् - धर्म-मर्यादा उल्लंघणार्या - शास्मि - शिक्षा करितो - मे - माझ्या - बलं - सामर्थ्याला - पश्चत - पाहा.॥३५॥
अधर्माने वागणार्यांना शासन करणारे भगवान श्रीकृष्ण परमधामाला गेल्यामुळे मर्यादेचे उल्लंघन करणार्यांना आज मी शासन करतो. माझे तपोबल पहाच ! (३५)
इत्युक्त्वा रोषताम्राक्षो वयस्यान् ऋषिबालकः ।
कौशिक्याप उपस्पृश्य वाग्वज्रं विससर्ज ह ॥ ३६ ॥
मित्रांना बोलला बाळ क्रोधाने लाल जाहला । कौशिकीजल आचम्य वाणीचे वज्र योजिल ॥ ३६ ॥
रोषताम्राक्षः - क्रोधाने लाल डोळे केलेला असा मुनिपुत्र - वयस्यान् - बरोबरीच्या - ऋषिबालकान् - मुनिपुत्रांना - इति - याप्रमाणे - उक्त्वा - बोलून - कौशिक्याः - कौशिकी नावाच्या किंवा विश्वामित्री नदीच्या - अपः - उदकाला - उपस्पृश्य - आचमनादि विधीने स्पर्श करून - ह - खरोखर - वाग्वज्रं - वज्राप्रमाणे तीक्ष्ण व न बदलणार्या वाणीला - विससर्ज - सोडता झाला. ॥३६॥
आपल्या सवंगड्यांना अशा प्रकारे सांगून क्रोधाने लालभडक डोळे झालेल्या त्या ऋषिकुमाराने कौशिकी नदीच्या पाण्याने आचमन करून आपल्या वाणीरूपी वज्राचा प्रयोग केला. (३६)
इति लङ्घितमर्यादं तक्षकः सप्तमेऽहनि ।
दङ्क्ष्यति स्म कुलाङ्गारं चोदितो मे ततद्रुहम् ॥ ३७ ॥
परीक्षिता कुलांगारा ! करिसी अवमान हा । चावेल तुजला साप सातव्या दिनी तक्षक ॥ ३७ ॥
इति - याप्रमाणे - लङ्घितमर्यादं - धर्म-मर्यादा उल्लंघिणार्या - कुलाङ्गार - आपल्या कुलाला बट्टा लावणार्या - ततद्रुहं - पित्याशी वैर करणार्याला - मे - माझ्याकडून - चोदितः - प्रेरणा केलेला म्हणजे पाठविलेला - तक्षकः - तक्षक नावाचा साप - सप्तमे - सातव्या - अहनि - दिवशी - दंक्ष्यति स्म - डसेल. ॥३७॥
कुलाला कलंक झालेल्या या परीक्षिताने माझ्या पित्याचा अपमान करून आपल्या मर्यादेचे उल्लंघन केले आहे. सबब, माझ्या शापाने याला आजपासून सातव्या दिवशी तक्षक सर्प दंश करील. (३७)
ततोऽभ्येत्याश्रमं बालो गले सर्पकलेवरम् ।
पितरं वीक्ष्य दुःखार्तो मुक्तकण्ठो रुरोद ह ॥ ३८ ॥
पुन्हा आश्रमि तो आला पाहुनी साप तो असा । मेलला गळि तो तैसा रडला दुःख होऊनी ॥ ३८ ॥
बालः - मुनिपुत्र - ततः - तेथून - आश्रमं - आश्रमाला - अभ्येत्यः - येऊन - गलेसर्पकलेवरं - ज्याच्या गळ्यात सापाचा मृत देह लोंबत आहे अशा - पितरं - बापाला - वीक्ष्य - पाहून - दुःखार्तः - फारच दुःखाने पीडिलेला होऊन - मुक्तकण्ठः - व अगदी गळा मोकला करून - रुरोद ह - रडू लागला. ॥३८॥
यानंतर तो बालक आपल्या आश्रमात आला आणि आपल्या पित्याच्या गळ्यातील साप पाहून त्याला अतिशय दुःख झाले व तो धाय मोकलून रडू लागला. (३८)
स वा आङ्गिरसो ब्रह्मन् श्रुत्वा सुतविलापनम् ।
उन्मील्य शनकैर्नेत्रे दृष्ट्वा चांसे मृतोरगम् ॥ ३९ ॥ विसृज्य तं च पप्रच्छ वत्स कस्माद्धि रोदिषि । केन वा तेऽपकृतं इत्युक्तः स न्यवेदयत् ॥ ४० ॥
ओरडून रडे तेंव्हा शमिके ऐकिले असे । हळूच सोडिल ध्यान नेत्राने साप पाहिला ॥ ३९ ॥ सापास फेकिले आणि वदले रडतोस कां । पुसता सर्व तो पुत्र पित्याला वदला असे ॥ ४० ॥
ब्रह्मन् - शौनका - वा सः - आणि तो - आङ्गिरसः - अंगिरसकुळात उत्पन्न झालेला मुनि - सुतविलापनं - पुत्राच्या रडण्याला - श्रुत्वा - ऐकून - शनकैः - हळूहळु - नेत्रे - दोन डोळे - उन्मील्य - उघडून - स्वांसे - आपल्या खांद्यावर - मृतोरगं - मेलेल्या सापाला - दृष्ट्वा - पाहून - विसृज्य - टाकून - पुत्रं - मुलाला - पप्रच्छ - विचारू लागला - वत्स - हे पुत्रा ! - हि कस्मात् - कशाकरिता - रोदिषि - रडतोस - वा - किंवा - केन - कोणी - ते - तुझे - प्रतिकृतं - वाईट केले - इति - याप्रमाणे - उक्तः - बोललेला - सः - तो मुनिपुत्र - न्यवेदयत् - कथन करू लागला. ॥३९-४०॥
विप्रवर शौनका, शमीक मुनींनी आपल्या पुत्राचे रडणे ऐकून हळूहळू आपले डोळे उघडले आणि पाहिले तर आपल्या गळ्यात एक मेलेला साप आहे. (३९)
सापाल फेंकून देऊन त्यांनी आपल्या मुलाला विचारले, "पुत्रा ! तू का रडत आहेस ?कोणी तुझा अपमान केला काय ?" असे विचारल्यानंतर मुलाने सर्व कहीकत सांगितली. (४०)
निशम्य शप्तमतदर्हं नरेन्द्रं
स ब्राह्मणो नात्मजमभ्यनन्दत् । अहो बतांहो महदद्य ते कृतं अल्पीयसि द्रोह उरुर्दमो धृतः ॥ ४१ ॥
(इंद्रवज्रा) विप्रे न केले कवतूक बाळा तू पाप केले वदले मुलाला । थोड्या चुकेला भलतीच शिक्षा तुझी असे बाळबुद्धी अशी ही ॥ ४१ ॥
सः - तो - ब्राह्मणः - ब्राह्मण - अतदर्ह - त्या शापाला अयोग्य अशा - नरेन्द्रं - राजाला - शप्तं - शापिले असे - निशम्य - ऐकून - आत्मजं - मुलाला - न अभ्यनन्दत् - न प्रशंसिता झाला - बत - अरेरे ! - अज्ञ - हे मूर्ख पुत्रा ! - अहो - किती हो ! - महत् - मोठे - ते - तुझे - अंहः - पाप - कृतं - घडले - अल्पीयसि - लहानशा - द्रोहे - अपराधाबद्दल - उरुः - मोठा - दमः - दंड - धृतः - योजिलास. ॥४१॥
राजाल दिलेल्या शापाची कहाणी ऐकून ब्रह्मर्षी शमीकांनी मुलाचे कौतुक केले नाही. कारण त्यांच्या दृष्टीने परीक्षिताला शाप देण्य योग्य नव्हव्ते. ते म्हणाले, मूर्खा ! तू मोठे पाप केले आहेस. त्यांच्या लहानश्या चुकीसाठी तू त्यांना एवढे मोठे शासन केलेस, याचा मला खेद होत आहे. (४१)
न वै नृभिर्नरदेवं पराख्यं
सम्मातुमर्हस्यविपक्वबुद्धे । यत्तेजसा दुर्विषहेण गुप्ता विन्दन्ति भद्राण्यकुतोभयाः प्रजाः ॥ ४२ ॥
राजा असे तो भगवंतरूप सामन्य लोकापरि तो असेना । अतीव तेजात प्रजा सुखाने कल्याणकारी वसते न चिंता ॥ ४२ ॥
अविपक्वबुद्धे - ज्याची बुद्धी पूर्णत्वाला पोचली नाही अशा हे पुत्रा ! - वै - खरोखर - पराख्यं - पर म्हणजे श्रेष्ठ ह्या नावांनी ओळखिल्या जाणार्या - नरदेवं - राजाला - नृभिः - मनुष्यांशी - सम्मातुं - तुलना करण्यास - न अर्हसि - योग्य नाहीस - दुर्विषहेण - असह्य अशा - यत्तेजसा - ज्याच्या सामर्थ्याने - गुप्ताः - रक्षिलेल्या - प्रजाः - प्रजा - अकुतोभयाः - निर्भय होऊन - भद्राणि - सुखाला - विन्दन्ति - मिळवितात.॥४२॥
तुझी बुद्धी अजूनही अपरिपक्व आहे. भगवत्स्वरूप राजाला तू सामान्य माणूस समजणे योग्य नव्हे. कारण राजाच्या असह्य तेजामुळेच प्रजा सुरक्षित आणि निर्भय होऊन आपले कल्याण करून घेते. (४२)
अलक्ष्यमाणे नरदेवनाम्नि
रथाङ्गपाणावयमङ्ग लोकः । तदा हि चौरप्रचुरो विनङ्क्ष्यति अरक्ष्यमाणोऽविव रूथवत् क्षणात् ॥ ४३ ॥
न राजरुपी भगवंत जागा जगात चो मग घोर होती । जे लांडगे तोडिती भक्ष्य सारे तैसे जनासी लुटतील चोर ॥ ४३ ॥
अङ्ग - हे पुत्रा ! - नरदेवनाम्नि - राजा नाव धारण करणारा - रथाङ्गपाणौ - चक्रपाणी विष्णू - अलक्ष्यमाणे - दिसत नाहीसा झाला असता - तदा - त्यावेळी - चौरप्रचुरः - चोरांचा पुष्कळ सुळसुळाट असलेला - अरक्ष्यमाणः - रक्षिला न जाणारा - अयं - हा - लोकः - लोक - हि - खरोखर - अविवरूथवत् - मेंढयांच्या कळपाप्रमाणे - क्षणात् - एका क्षणामध्ये - विनंक्ष्यति - नाश पावले. ॥४३॥
ज्यावेळी राजाचे रूप धारण करणारे भगवंत पृथ्वीवर दिसणार नाहीत, त्यावेळी चोरांची संख्या वाढेल आणि असुरक्षित बोकडांच्या कळपाप्रमाणे एका क्षणात लोकांचा नाश होऊल. (४३)
तदद्य नः पापमुपैत्यनन्वयं
यन्नष्टनाथस्य वसोर्विलुम्पकात् । परस्परं घ्नन्ति शपन्ति वृञ्जते पशून् स्त्रियोऽर्थाम् पुरुदस्यवो जनाः ॥ ४४ ॥
राजा न होता घडतील चोर्या ते मारिती बोल शिव्याहि देती । पशू स्त्रियांना नि धनास नेती तेंव्हा पहा आपण नागवेची ॥ ४४ ॥
नष्टनाथस्य - नाहीसा झाला आहे स्वामी ज्याचा अशा - वसोः - द्रव्याचा - विलुम्पकात् - अपहार करणार्यापासून - यत् - जे - पापं - पाप - तत् - ते - अद्य - आज - अनन्वयं - आमचा काहीएक संबंध नसता - नः - आम्हाला - उपैति - प्राप्त होते - पुरुदस्यवः - ज्यात पुष्कळसे चोर आहेत असे - जनाः - लोक - परस्परं - एकमेकांत - घ्नन्ति - मारामारी करितात - शपन्ति - शिवीगाळी देतात - पशून् - पशूंना - स्त्रियः - बायकांना - अर्थान् - द्रव्यादि मौल्यवान पदार्थांना - वृञ्जते - लुबाडतात. ॥४४॥
राजाच नाहीसा झाल्यावर धनादिकांची दोरी करणारे चोर जे पाप करतील, त्याच्याशी आपल्या काही संबंध नसूनही ते आपल्यालाच लागू होईल. रारण राजा नसेल तर चोरडाकूंची संख्या वाढते. ते आपापसात मार-पीट, शिव्याशाप देणे इत्यादि करतात. इतकेच नव्हे तर पशू, स्त्रिया आणि धन-संपत्ती यांची लूट करतात. ( ४४)
तदाऽऽर्यधर्मः प्रविलीयते नृणां
वर्णाश्रमाचारयुतस्त्रयीमयः । ततोऽर्थकामाभिनिवेशितात्मनां शुनां कपीनामिव वर्णसङ्करः ॥ ४५ ॥
तेंव्हा विलोपे मग धर्म सारा वर्णाश्रमाला मग नाहि थारा । नी लोभ कामात जनास बुद्धी होवोनि श्वानापरि संकरोची ॥ ४५ ॥
तदा - त्यावेळी - वर्णाश्रमाचारयुतः - चार वर्ण व चार आश्रम यांच्या आचरणांनी युक्त - त्रयीमयः - तीनही वेदांनी उपदेशिलेला - आर्यधर्मः - श्रेष्ठ धर्म - विलीयते - नष्ट होतो - च - आणि - ततः - त्यामुळे - अर्थकामाभिनिवेशितात्मनां - द्रव्यादि पदार्थ व वैषयिक उपभोग्य काम त्यातच ज्यांचे मन गढून गेले आहे अशा - नृणां - मनुष्यात - शुनां - कुत्र्यांच्या - कपीनां - वानरांच्या - इव - प्रमाणे - वर्णसङ्करः - अनुलोमप्रतिलोम जातिमिश्रण होते. ॥४५॥
त्यावेळी लोकांचा वैदिक वर्णाश्रमाचारयुक्त आर्यधर्म लुप्त होतो. संपत्तीचा लोभ आणि कामवासनेच्या आहारी जाऊन लोक कुत्री आणि माकडांप्रमाणे वर्णसंकर करतात. (४५)
धर्मपालो नरपतिः स तु सम्राड् बृहच्छ्रवाः ।
साक्षान् महाभागवतो राजर्षिर्हयमेधयाट् । क्षुत्तृट्श्रमयुतो दीनो नैवास्मच्छापमर्हति ॥ ४६ ॥
( अनुष्टुप् ) यशस्वी धर्मपालो तो अश्वमेधी धनुर्धर । भगवद्भक्त तो तृष्णे व्याकुळ येथ पातला ॥ कदपीही तदा तो तो आयोग्य शाप द्यावया ॥ ४६ ॥
सः - तो - नरपतिः - राजा - तु - तर - धर्मपालः - धर्मरक्षक - सम्राट् - सार्वभौम - बृहच्छ्रवाः - मोठा कीर्तिवान - साक्षात् - प्रत्यक्ष - महाभागवतः - मोठा भगवद्भक्त - राजर्षिः - राजा असून ऋषिपणाला पोचलेला - हृयमेधयाट् - अश्वमेघ यज्ञ करणारा - क्षुत्तृट्श्रमयुतः - भुकेने व तहानेने व्याकुळ झालेला व थकलेला - दीनः - स्वभावाने गरीब - अस्मच्छापं - आमच्या शापाला - न एव अर्हति - योग्य नाहीच.॥४६॥
सम्राट परीक्षित तर मोठे यशस्वी आणि धर्मदुरंधर आहेत. त्यांनी पुष्कळसे अश्वमेध यज्ञ केलेले आहेत आणि ते भगवंतांचे प्रिय भक्त आहेत. तेच राजर्षी तहान-भुकेने व्याकूळ होऊन आपल्या आश्रमात आले होते. त्यांना आपण शाप देणे कधीही योग्य नाही. (४६)
अपापेषु स्वभृत्येषु बालेनापक्वबुद्धिना ।
पापं कृतं तद्भगवान् सर्वात्मा क्षन्तुमर्हति ॥ ४७ ॥
नृप तो आमुचा भृत्य मुला रे बालबुद्धी ही । कृपया भगवंतारे क्षमावे मम बालका ॥ ४७ ॥
सर्वात्मा - सर्वांच्या हृदयात आत्मस्वरूपाने राहणारा - भगवान् - परमेश्वर - अपक्वबुद्धिना - अपूर्णज्ञानी अशा - बालेन - बाळाने - अपापेषु - पुण्यवान् अशा - स्वभृत्येषु - आपल्या भक्ताचे ठिकाणी - कृतं - केलेल्या - तत् - त्या - पापं - शापदानरूप पापाला - क्षन्तुं - क्षमा करण्यास - अर्हति - योग्य आहे.॥४७॥
या अज्ञान बालकाने आपल्या निष्पाप सेवक असलेल्या राजाचा अपराध केला आहे. सर्वांतरात्मा भगवान याला क्षमा करोत. (४७)
तिरस्कृता विप्रलब्धाः शप्ताः क्षिप्ता हता अपि ।
नास्य तत्प्रतिकुर्वन्ति तद्भक्ताः प्रभवोऽपि हि ॥ ४८ ॥
भगवद्भक्त जे होती समर्थ सर्व ते परी । दुजांचे क्षाळिती पाप जरी तो मान भंगला ॥ ४८ ॥
तिरस्कृताः - तिरस्कार केलेले - विप्रलब्धाः - फसविलेले - शप्ताः - शाप दिलेले - क्षिप्ताः - निंदिलेले किंवा धिक्कार केलेले - अपि वा - किंवा - हताः - मारलेले - तद्भक्ताः - परमेश्वराचे भक्त वैष्णव - प्रभवः - समर्थ - अपिहि - असूनसुद्धा - अस्य - ह्याच्या - तत् - त्या अपकाराला - न प्रतिकुर्वन्ति - प्रतिकार करीत नाहीत. ॥४८॥
भगवंतांच्या भक्तांमध्येही बदला घेण्याची शक्ती असते. परंतु ते दुसर्यांनी केलेला अपमान, फसवणूक, शिव्या-शाप देणे, अधिक्षेप करणे किंवा मारहाण करणे यासारख्या गोष्टींचा कधी बदला घेत नाहीत. (४८)
इति पुत्रकृताघेन सोऽनुतप्तो महामुनिः ।
स्वयं विप्रकृतो राज्ञा नैवाघं तदचिन्तयत् ॥ ४९ ॥
मुलाच्या अपराधाचे शमिका खेद जाहला । राजाच्या अपराधाचे मुळी त्या ध्यानही नसे ॥ ४९ ॥
सः - तो - महामुनिः - महर्षि - इति - याप्रमाणे - पुत्रकृता - मुलाने केलेल्या - अघेन - पापाने - अनुतप्तः - पश्चात्तापयुक्त झाला - राज्ञा - राजाने - स्वयं - स्वतः - विप्रकृतः - अपमानरूपी पाप केले असताहि - तत् - त्या - अघं - पापाला - न एव अचिन्तयत् - मनात आणिता झाला नाहीच. ॥४९॥
महामुनी शमीकांना पुत्राने केलेल्या अपराधाचा मोठा पश्चात्ताप झाला. राजा परीक्षिताने त्यांचा जो अपमान केला होता, त्याच्याकडे त्यांनी लक्षच दिले नाही. (४९)
प्रायशः साधवो लोके परैर्द्वन्द्वेषु योजिताः ।
न व्यथन्ति न हृष्यन्ति यत आत्मागुणाश्रयः ॥ ५० ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे विप्रशापोपलम्भनं नाम्ना अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥
सुख दुःख जगी द्वंद्व ऋषि ते मुक्त राहती । सर्वाच्या पार ते होती आत्मरूपी समावती ॥ ५० ॥ ॥ इति श्रीमद्भगवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ अठरावा अध्याय हा ॥ १ ॥ १८ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
प्रायशः - बहुतकरून - लोके - जगामध्ये - साधवः - सत्पुरुष - द्वंद्वेषु - सुखदुःखादि द्वैतात - परैः - दुसर्यांनी - योजिताः - योजिलेले असता - न व्यथंति - दुःखी होत नाहीत - न हृष्यन्ति - आनंदित होत नाहीत - यतः - कारण - आत्मा - आत्मा - अगुणाश्रयः - त्रिगुणाला सोडून राहणारा आहे. ॥५०॥
महात्म्यांचा स्वभावच असा असतो की, जगातील दुसरे लोक जेव्हा त्यांना सुख-दुःखरूपी द्वंद्वात पाडतात, तेव्हा ते सहसा आनंदित किंवा व्यथीत होत नाहीत. कारण आत्म्याचे स्वरूप तर गुणांच्या पलीकडे आहे, हे त्यांना माहीत असते. (५०)
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां |