|
श्रीमद् भागवत पुराण परीक्षित् धर्मसंवादः, कलिनिग्रहणं च - महाराज परीक्षिताकडून कलियुगाचे दमन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
सूत उवाच ।
तत्र गोमिथुनं राजा हन्यमानमनाथवत् । दण्डहस्तं च वृषलं ददृशे नृपलाञ्छनम् ॥ १ ॥
सूतजी सांगतात - ( अनुष्टुप् ) राजा जै पातला तेथे राजवेषात शूद्र तै । ताडिता धेनु बैलासी जणू वाली कुणी नसे ॥ १ ॥
तत्र - तेथे - राजा - परीक्षित राजा - अनाथवत् - अनाथाप्रमाणे - हन्यमानं - मारिल्या जाणार्या - गोमिथुनं - गाईच्या जोडप्याला म्हणजे गोरूपधारी पृथ्वीला व वृषभरूपधारी धर्माला - च - आणि - दण्डहस्तं - हातात दंड धारण करणार्या - नृपलाञ्छनम् - राजचिन्हे धारण केलेल्या - वृषलं - शूद्राला - दृश्ये - पाहता झाला. ॥१॥
सूत म्हणाले - हे शौनका, तेथे गेल्यावर राजा परीक्षिताला असे दिसले की, एक राजाचा वेष धारण करणारा शूद्र हातात काठी घेऊन एका गाय आणि बैलाच्या जोडीला अशा रीतीने मारीत होता की, त्यांना कोणी वाली नाही. (१)
वृषं मृणालधवलं मेहन्तमिव बिभ्यतम् ।
वेपमानं पदैकेन सीदन्तं शूद्रताडितम् ॥ २ ॥ गां च धर्मदुघां दीनां भृशं शूद्रपदाहताम् । विवत्सामाश्रुवदनां क्षामां यवसमिच्छतीम् ॥ ३ ॥ पप्रच्छ रथमारूढः कार्तस्वरपरिच्छदम् । मेघगम्भीरया वाचा समारोपितकार्मुकः ॥ ४ ॥
पद्मसूत्रापरी श्वेत वॄषभो लंगडा तिन्ही । पायाने, कांपरे अंगी भयाने मल त्यागिता ॥ २ ॥ हविष्यादि पदार्थांना देणारी गाय ती अशी । लाथेच्या ठोकारांनीच अतीव दीन जाहली ॥ होती ती कॄश देहाने पाडसो नव्हते सवे । भुकेली असुनी नित्य अश्रु ते ढाळिते अहा ! ॥ ३ ॥ सोन्याच्या रथिं तो राजा परिक्षित् धनु कढिता । बोलला शब्द मोठयाने ढगांची गर्जना जशी ॥ ४ ॥
कार्तस्वरपरिच्छदं - सुवर्णालंकारांनी मढविलेल्या - रथं - रथात - आरूढः - बसलेला - समारोपितकार्मुकः - धनुष्य सज्ज केलेला - मृणालधवलं - कमलतंतूप्रमाणे पांढर्या - विभ्यतं - भ्यालेल्या - मेहन्तम् इव - म्हणूनच मुतणार्या - वेपमानं - थरथर कापणार्या - एकेन - एका - पदा - पायामुळे - सीदन्तं - दुःख करणार्या - शूद्रताडितम् - शूद्र ज्याला मारीत आहे अशा - वृषं - बैलाला - च - आणि - धर्मदुधां - धर्मरूपी दुधाला देणार्या - दीनां - दीन - भृशं - फारच - शूद्रपदाहतां - जिला शूद्र पायाने लाथा मारीत आहे अशा - विवत्सां - वासरू नसलेल्या - साश्रुवदनां - जिच्या मुखावर अश्रुधारा वाहत आहेत अशा - क्षामां - कृश झालेल्या - यवसं - गवताला - इच्छतीं - इच्छिणार्या - गां - गाईला - मेघगम्भीरया - मेघाप्रमाणे गंभीर अशा - वाचा - वाणीने - पप्रच्छ - विचारू लागला. ॥२-४॥
कमलातील तंतूप्रमाणे शुभ्र रंगाचा बैल एका पायावर उभा राहून थरथर कापत होता आणि त्या शूद्राच्या मारण्यामुळे दुःखी आणि भयभीत होऊन मूत्र त्याग करीत होता. (२)
धार्मिक कृत्यांसाठी दूध, तूप असे आहूतीचे पदार्थ देणारी गायसुद्धा शूद्राच्या वारंवार लत्ताप्रहारांनी अत्यंत दुःखी झाली होती. एक तर ती अशक्त होती, शिवाय तिचे वासरूही तिच्याजवळ नव्हते. तिला भूक लागली होती, त्यामुळे तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. (३) स्वर्णजडित रथात बसलेल्या राजा परीक्षिताने आपले धनुष्य सज्ज केले आणि घनगंभीर आवाजात त्याने शूद्राला विचारले. (४)
कस्त्वं मच्छरणे लोके बलाद्धंस्यबलान् बली ।
नरदेवोऽसि वेषेण नटवत्कर्मणाद्विजः ॥ ५ ॥
कोण तू बलवान होसी तरी प्राण्यास मारिसी । माझ्या राज्यात सोंगाने राहसी शूद्र भाससी ॥ ५ ॥
मच्छरणे - माझ्या आश्रयाखाली असणार्या - लोके - ह्या लोकांत - बलात् - बलात्काराने - अबलान् - निर्बल अशांना - हंसि - मारतोस - बली - बलाढय असा - त्वं - तू - कः - कोण - नटवत् - नाटक्याप्रमाणे - वेषेण - पोषाखाने - नरदेवः - राजा - कर्मणा - व कृतीने - अद्विजः - शूद्र - असि - आहेस. ॥५॥
अरे, स्वतः बलवान असूनही माझ्या राज्यातील दुर्बल प्राण्यांना बलपूर्वक मारहाण करणारा तू कोण आहेस ? एखाद्या नटाप्रमाणे राजाचा वेष तू धारण केला आहेस, पण तुझे कृत्य तर शूद्रासारखे दिसत आहे. (५)
यस्त्वं कृष्णे गते दूरं सहगाण्डीवधन्वना ।
शोच्योऽस्यशोच्यान् रहसि प्रहरन्वधमर्हसि ॥ ६ ॥
आजोबा कॄष्ण हे दोघे जाता स्वर्गात हे असे । विजनी असहायांना मारिसी अपराध हा । तुला ठार करावे हे योग्य धर्मकारण ॥ ६ ॥
गांडीवधन्वना - अर्जुनाशी - सह - सहवर्तमान - कृष्णे - श्रीकृष्ण - दूरं - लांब निजधामाला - गते - गेला असता - रहसि - एकांतात - अशोच्यान् - निरपराधी अशांना - प्रहरन् - ताडण करणारा - शोच्यः - असा अपराधी - त्वं - तू - कः - कोण - असि - आहेस - वधं - मरण्याला - अर्हसि - योग्य आहेस. ॥६॥
अर्जुनासह श्रीकृष्णांच्या परमधामाला जाण्याने, निर्जन स्थानात निरपराध्यांवर अशा प्रकारे प्रहार करणारा तू अपराधी आहेस. म्हणून वध करण्यास योग्य आहेस. (६)
त्वं वा मृणालधवलः पादैर्न्यूनः पदा चरन् ।
वृषरूपेण किं कश्चिद् देवो नः परिखेदयन् ॥ ७ ॥
परीक्षित् वृषभास म्हणतो- पद्मसूत्रापरी श्वेत फिरसी लंगडा असा । तुला मी पाहतो कष्टी, सांग तू कोण् देवता ॥ ७ ॥
वा - किंवा - मृणालधवलः - कमलतंतूप्रमाणे पांढरा - पादैः - पायांनी - न्यूनः - कमी - पदा - एका पायाने - चरन् - चालणारा - नः - आम्हांला - परिखेदयन - खिन्नता देणारा - त्वं - तू - वृषरूपेण - बैलाचे रूप घेऊन - कश्चित् - कोणी एक - देवः - देव - किं - काय ? ॥७॥
परीक्षिताने धर्माला (बैलाला) विचारले, बिसतंतुप्रमाणे तुझा श्वेतवर्ण आहे. आणि तीन पाय नसलेला तू एकाच पायावर फिरतोस, हे पाहून मला फार दुःख होत आहे. बैलाच्या रूपात तू कोणी देव आहेस काय ? (७)
न जातु कौरवेन्द्राणां दोर्दण्डपरिरम्भिते ।
भूतलेऽनुपतन्त्यस्मिन् विना ते प्राणिनां शुचः ॥ ८ ॥
कुरुवंश नॄपो यांनी अजुनी रक्षिली धरा । अश्रु हे ढाळिता ऐसा कुणी ना पाहिला ना दुजा ॥ ८ ॥
पौरवेन्द्राणां - पुरुकुलात उत्पन्न झालेल्या राजांच्या - दोर्दण्डपरिरम्भिते - बाहुदंडानी आलिंगलेल्या - अस्मिन् - ह्या - भूतले - पृथ्वीवर - ते - तुझ्या - विना - शिवाय - जातु - कधीही - प्राणिनां - प्राण्यांचे - शुचः - शोकजन्य अश्रू - न अनुपतन्ति - पडत नाहीत. ॥८॥
सध्या ही पृथ्वी कुरुवंशी राजांच्या शौर्यामुळे सुरक्षित आहे. तेथे तुझ्याशिवाय अन्य कोणाही प्राण्याला दुःखाने अश्रूपात करताना मी पाहिले नाही. (८)
मा सौरभेयानुशुचो व्येतु ते वृषलाद् भयम् ।
मा रोदीरम्ब भद्रं ते खलानां मयि शास्तरि ॥ ९ ॥
धेनुपुत्रा नको शोक शूद्राला तू भिऊ नको । दुष्टां मी दंडि गोमाते नको तू रडु ही अशी ॥ ९॥
सौरभेय - हे कामधेनूपासून उत्पन्न झालेल्या वृषभा ! - मा अनुशुचः - शोक करू नकोस - ते - तुझे - वृषलात् - शूद्रापासून उत्पन्न होणारे - भयं - भय - व्येतु - नाश पावो - अम्ब - हे गोमाते ! - मयि - मी - खलानां - दुष्टांचा - शास्तरि - शासनकर्ता असता - मा रोदीः - रडू नकोस - ते - तुझे - भद्रं - कल्याण असो. ॥९॥
हे धेनुपुत्रा, तू आता शोक करू नकोस. गोमाते, मी दुष्टांना शासन करणारा असताना तू अश्रू ढाळू नकोस. तुझे कल्याण असो. (९)
यस्य राष्ट्रे प्रजाः सर्वाः त्र्यस्यन्ते साध्व्यसाधुभिः ।
तस्य मत्तस्य नश्यन्ति कीर्तिरायुर्भगो गतिः ॥ १० ॥
देवी ज्या नृपराज्यात दुष्टांनी त्रासिली प्रजा । अशा त्या नष्टची होतो नसे शंका मुळी मनी ॥ १० ॥
साध्वि - हे सदाचारसंपन्न गोमाते ! - यस्य - ज्याच्या - राष्ट्रे - राज्यात - सर्वाः - संपूर्ण - प्रजाः - प्रजा - असाधुभिः - दुष्टांकडून - त्रस्यन्ते - पीडिल्या जातात - मत्तस्य - ऐश्वर्याने धुंद झालेल्या - तस्य - त्या राजाची - कीर्तिः - कीर्ति - आयुः - आयुष्य - भगः - ऐश्वर्य - गतिः - व मोक्षादि परलोक - नश्यन्ति - नाश पावतात. ॥१०॥
हे देवी, ज्या राजाच्या राज्यामध्ये दुष्टांच्या उपद्रवामुळे सर्व प्रजा त्रस्त झालेली असते, त्या उन्मत्त राजाची कीर्ति, आयुष्य, ऐश्वर्य, एवढेच काय परलोकही नष्ट होतो. (१०)
एष राज्ञां परो धर्मो ह्यार्तानां आर्तिनिग्रहः ।
अत एनं वधिष्यामि भूतद्रुहमसत्तमम् ॥ ११ ॥
दुःख्यांचे दुःख वारावे असे हा राजधर्म की । प्राण्यांना पीडितो हा ना मारितो ठार याजला ॥ ११ ॥
आर्तानां - पीडिलेल्यांची - आर्तिनिग्रहः - पीडा दूर करणे - एषः - हा - हि - खरोखर - राज्ञां - राजांचा - परः - श्रेष्ठ - धर्मः - धर्म - अतः - म्हणून - असत्तमम् - दुष्ट अशा - भूतद्रुहं - प्राण्यांना पीडा देणार्या - एनं - ह्या शूद्राला - वधिष्यामि - ठार मारीन. ॥११॥
दुःखितांचे दुःख दूर करणे हा राजाचा परम धर्म आहे. हा महादुष्ट आणि प्राण्यांना पीडा देणारा आहे. म्हणून मी आता याला मारून टाकतो. (११)
कोऽवृश्चत् तव पादांस्त्रीन् सौरभेय चतुष्पद ।
मा भूवंस्त्वादृशा राष्ट्रे राज्ञां कृष्णानुवर्तिनाम् ॥ १२ ॥
तुझ्या या चार पायात तोडिले कोणि हे तिन्ही । कृष्णभक्त असे राजा न घडे राज्यि त्या असे ॥ १२ ॥
चतुष्पद - वास्तविक चार पाय असणार्या हे पशो ! - सौरभेय - कामधेनुपुत्रा वृषभा - कः - कोण - तव - तुझ्या - त्रीन् - तीन - पादान् - पायांना - अवृश्चत् - तोडिता झाला - कृष्णानुवर्तिनां - श्रीकृष्णाला अनुसरणार्या - राज्ञां - राजांच्या - राष्ट्रे - राज्यात - त्वादृशाः - तुझ्यासारखे दुःखी - मा भूवन् - असू नयेत. ॥१२॥
हे सुरभिनंदना, तू तर चार पायांचा पशू आहेस. तुझे तीन पाय कोणी तोडले. जे राजे श्रीकृष्णांचे भक्त आहेत, त्यांच्या राज्यात कोणीही आपल्यासारखा दुःखी असता कामा नये. (१२)
आख्याहि वृष भद्रं वः साधूनां अकृतागसाम् ।
आत्मवैरूप्यकर्तारं पार्थानां कीर्तिदूषणम् ॥ १३ ॥
कल्याण वृषभा होवो ! साधू तू अपराधि ना । तोडिले अंग ते कोणी सांगावे, मज दोष हा ॥ १३ ॥
वृष - हे वृषभा ! - अकृतागसां - निरपराधी - साधूनां - व सदाचरणसंपन्न अशा - वः - तुमचे - भद्रं - कल्याण असो - आत्मवैरूप्यकर्तारं - तुझ्या शरीराला कुरूप करणार्याला - पार्थानां - व पांडवांच्या - कीर्तिदूषणम् - कीर्तीला कलंक लावणार्याला - आख्याही - सांग. ॥१३॥
हे वृषभा, तुझे कल्याण असो. मला सांग की, तुझ्यासारख्या निरपराध साधुवृत्तीच्या प्राण्याचे अवयव तोडून कोणत्या दुष्टाने पांडवांच्या कीर्तिला कलंक लावला ? (१३)
जनेऽनागस्यघं युञ्जन् सर्वतोऽस्य च मद्भयम् ।
साधूनां भद्रमेव स्याद् असाधुदमने कृते ॥ १४ ॥
अपराधा विना प्राण्या त्रासिता तो कुठे असो । माझाचि धाक हा त्याला दुष्टघ्नी साधचे हित ॥ १४ ॥
अनागसि - निरपराधी - जने - लोकांचे ठिकाणी - अघं - पापाचरण - युञ्जन् - करणारा - अस्य - अशास - सर्वतः - सर्वप्रकारे - मद्भयं - माझ्यापासून भीती आहे - च - आणि - असाधुदमने - दुष्टांचा नाश - कृते - केला असता - साधूनां - सज्जनांचे - भद्रम् एव - कल्याणच - स्यात् - होईल. ॥१४॥
जो कोणी निरपराध प्राण्यांना पीडा देतो, तो कोठेही असला तरी त्याला माझ्यापासून अवश्य भय राहील. दुष्टांचे दमन केल्याने साधूंचे कल्याणच होते.(१४)
अनागःस्विह भूतेषु य आगस्कृन् निरङ्कुशः ।
आहर्तास्मि भुजं साक्षाद् अमर्त्यस्यापि साङ्गदम् ॥ १५ ॥
उद्याम व्यक्ति जो त्रासी प्राण्यांना दुःख देउनी । असला जरि तो देव हात बांधोनि कापितो ॥ १५ ॥
यः - जो - निरङ्कुशः - निर्भय होत्साता - इह - येथे - अनागस्सु - निरपराधी - भूतेषु - प्राणिमात्रांचे ठिकाणी - आगस्कृत् - अपराध करणारा - साक्षात् - प्रत्यक्ष - अमर्त्यस्यापि - देवांच्या सुद्धा - साङगदं - बाहूभूषणासह - भुजं - दंडाला - आहर्तास्मि - हरण करीन. ॥१५॥
जी उन्मत्त व्यक्ति निरपराध प्राण्यांना दुःख देते, ती साक्षात देवता असली तरी, मी त्या व्यक्तीचे बाजूबंद घातलेले हात तोडून टाकीन. (१५)
राज्ञो हि परमो धर्मः स्वधर्मस्थानुपालनम् ।
शासतोऽन्यान् यथाशास्त्रं अनापद्युत्पथानिह ॥ १६ ॥
आपत्ति विण जो शास्त्रसीमा ओलांडु पाहतो । शास्त्राने दंड त्या द्यावा राजाचा धर्म हा असे ॥ १६ ॥
इह - येथे - अनापदि - संकट नसताना - उत्पथान् - सन्मार्गाला सोडून वागणार्या - अन्यान् - दुसर्यांना - यथाशास्त्रं - शास्त्रनियमाप्रमाणे - शासतः - शिक्षा करणार्या - राज्ञः - राजाचा - स्वधर्मस्थानुपालनं - स्वधर्माचरण करणार्यांचे रक्षण करणे - हि - खरोखर - परमः - श्रेष्ठ - धर्मः - धर्म होय. ॥१६॥
आपत्काल नसताना शास्त्रमर्यादा उल्लंघन करणार्यांना शास्त्रानुसार शासन करून धर्मानुसार वागणार्या लोकांचे पालन करणे, हाच राजाचा परम धर्म आहे. (१६)
धर्म उवाच ।
एतद् वः पाण्डवेयानां युक्तमार्ताभयं वचः । येषां गुणगणैः कृष्णो दौत्यादौ भगवान् कृतः ॥ १७ ॥
धर्म(वृषभ) म्हणाला- पार्थाचा नातु तू राजा न दे आश्वासनास या । सद्गुणे पूर्वजांच्या त्या सारथ्य कृष्ण तो करी ॥ १७ ॥
पाण्डवेयानां - पांडवकुलात उत्पन्न झालेल्या - वः - तुमचे - एतद् - हे - आर्ताभयं - पीडिलेल्यांना निर्भय करणारे - वचः - भाषण - युक्तं - योग्य - भगवान् - सर्वगुणसंपन्न - कृष्णः - श्रीकृष्ण - येषां - ज्यांच्या - गुणगणैः - गुणसमुदायांनी - दौत्यादौ - दूतादिकर्मात - कृतः - नियोजित केला. ॥१७॥
धर्म म्हणाला - राजन्, दुःखितांना अभय देणे हे आपल्यासारख्या पाण्डूच्या वंशजांना योग्यच आहे. कारण आपल्या पूर्वजांनी त्यांच्या या श्रेष्ठ गुणांमुळे भगवान श्रीकृष्णांना आपले सारथी, दूत इत्यादी बनविले होते. (१७)
न वयं क्लेशबीजानि यतः स्युः पुरुषर्षभ ।
पुरुषं तं विजानीमो वाक्यभेदविमोहिताः ॥ १८ ॥
अनेक बोलती शास्त्रे म्हणोनी पुरूषोत्तम । आम्हाला कळला नाही व्यर्थ तो क्लेश होतसे ॥ १८ ॥
पुरुषर्षभ - हे पुरुषश्रेष्ठा परीक्षित राजा - वाक्यभेदविमोहिताः - भिन्न भिन्न शास्त्रीय प्रमाणभूत वाक्यांनी मोहित झालेले - वयं - आम्ही - यतः - ज्यापासून - क्लेशबीजानि - पीडेची कारणे - स्युः - उत्पन्न होतात - तं - त्या - पुरुषं - पुरुषाला - न विजानीमः - जाणत नाही. ॥१८॥
हे नरेंद्रा, शास्त्रांच्या वेगवेगळ्या वचनांनी मोहित झाल्यामुळे परमपुरुषाला आम्ही ओळखत नाही. त्यामुळे संसारक्लेशांची कारणे उत्पन्न होतात. (१८)
केचिद् विकल्पवसना आहुरात्मानमात्मनः ।
दैवमन्ये परे कर्म स्वभावं अपरे प्रभुम् ॥ १९ ॥
जयांना द्वैत ना मान्य दुःखाचे कारणी स्वता । मानिती कुणि प्रारब्ध कोणी कर्म तया वदे ॥ कोणी स्वभाव ईशाला दुःखकारण मानिती ॥ १९ ॥
विकल्पवसनाः - विविध कल्पनारूपी वस्त्रांनी वेढलेले - केचित् - कित्येक - आत्मनः - आत्म्याच्या सुख-दुःखास कारण - आत्मानं - आत्माच - अन्ये - दुसरे - दैवं - दैव - परे - आणखी त्याहून निराळे - कर्म - कर्म - अपरे - कित्येक दुसरे - स्वभावं - स्वभाव - प्रभुं - परमेश्वर - आहुः - असे बोलतात. ॥१९॥
कोणत्याही प्रकारचे द्वैत ज्यांना मान्य नाही, ते स्वतःलाच स्वतःच्या दुःखाचे कारण समजतात. कोणी प्रारब्धाला कारणीभूत ठरवितात, तर कोणी कर्माला; काही लोक स्वभावाला तर अन्य ईश्वरालाच दुःखाचे कारण मानतात. (१९)
अप्रतर्क्यादनिर्देश्याद् इति केष्वपि निश्चयः ।
अत्रानुरूपं राजर्षे विमृश स्वमनीषया ॥ २० ॥
कुणी ते बोलती ऐसे दुःखाचे मूळ् गवे । तर्काला वाणिला तैसे नच ते आकळे कदा । यातुनी कोणते योग्य जाण तू बुद्धिने स्वयें ॥ २० ॥
अप्रतर्क्यात् - अनुमानाचा विषय नसल्यामुळे - अनिर्देश्यात् - व अंगुलीने प्रत्यक्ष दाखवता येणारे नसल्यामुळे - केषु अपि - कोणत्याही वस्तूमध्ये - इति - असा - निश्चयः - निश्चय - राजर्षे - हे परीक्षित राजा - अत्र - या बाबतीत - अनुरूपं - योग्य - मनीषया - बुद्धीने - विमृशस्व - विचार करून ठरव. ॥२०॥
राजर्षे, काही जणांचे तर निश्चयपूर्वक असे म्हणणे आहे की, दुःखाचे कारण तर्काने जाणले जाऊ शकत नाही आणि वाणीने सांगितले जाऊ शकत नाही. आता यांपैकी कोणते मत बरोबर आहे, याचा तूच आपल्या बुद्धीने विचार कर. (२०)
सूत उवाच ।
एवं धर्मे प्रवदति स सम्राड् द्विजसत्तम । समाहितेन मनसा विखेदः पर्यचष्ट तम् ॥ २१ ॥
सूतजी सांगतात - ऋषिजी शौनका ऐका बैलाचे बोल ऐकूनी । सम्राट मोद तो पावे शांत होवोनि बोलला ॥ २१ ॥
द्विजसत्तम - ब्राह्मणश्रेष्ठा शौनका - धर्मे - वृषभरूप घेतलेला धर्म - एवं - याप्रमाणे - प्रवदति - बोलत असता - सम्राट् - सार्वभौम - सः - तो परीक्षित राजा - विखेदः - खेदरहित होऊन - समाहितेन - शांत अशा - मनसा - अंतःकरणाने - तं - त्याला - पर्यचष्ट - बोलला. ॥२१॥
सूत म्हणाले - ऋषिश्रेष्ठ शौनका, धर्माचे हे प्रवचन ऐकून सम्राट परीक्षित अतिशय प्रसन्न झाला, त्याचा खेद नाहीसा झाला. शांत चित्ताने तो धर्माला म्हणाला - (२१)
राजोवाच -
धर्मं ब्रवीषि धर्मज्ञ धर्मोऽसि वृषरूपधृक् । यद् अधर्मकृतः स्थानं सूचकस्यापि तद्भवेत् ॥ २२ ॥
राजा परीक्षिती म्हणाला - धर्मोपदेश तू केला याच रूपात धर्म तू । न वदे त्रासिले कोणी चुगली तो धर्म ता नसे ॥ २२ ॥
धर्मज्ञ - हे धर्म जाणणार्या वृषभा - धर्मं - धर्मशास्त्राला - ब्रवीषि - सांगतोस - वृषरूपधृक् - वृषभरूपधारी - धर्मः - धर्म - असि - आहेस - यत् - जे - अधर्मकृतः - अधर्म करणार्याचे - स्थानं - ठिकाण - तत् - ते - सूचकस्य - सुचविणार्याचे - अपि - सुद्धा - भवेत् - होईल. ॥२२॥
परीक्षित म्हणाला - धर्माचे तत्त्व जाणणारे वृषभदेव, आपण धर्माचा उपदेश करीत आहात. आपण निश्चितच वृषभरूपात असणारे धर्म आहात. आपण आपल्याला दुःख देणार्याचे नाव यासाठी सांगितले नसावे की, अधर्म करणार्याला जसा नरक प्राप्त होतो, तसाच नरक चहाडी करणार्यालाही प्राप्त होतो. (२२)
अथवा देवमायाया नूनं गतिरगोचरा ।
चेतसो वचसश्चापि भूतानामिति निश्चयः ॥ २३ ॥
असे सिद्धांत तो सारा प्राण्यांच्या मन वाणिला । देवाच्या रूप मायेला वर्णाया येइना कधी ॥ २३ ॥
अथवा - किंवा - नूनं - खरोखर - देवमायायाः - परमेश्वराच्या मायेची - गतिः - गति - भूतानां - प्राणिमात्रांच्या - चेतसः - मनाला - च - आणि - वचसः - वाणीला - अपि - सुद्धा - अगोचरा - समजण्यास कठीण - इति - असे - निश्चयः - निश्चित समजावे. ॥२३॥
किंवा असाही एक सिद्धांत आहे की, प्राण्यांच्या मन आणि वाणीद्वारा परमेश्वराच्या मायेच्या स्वरूपाचे निरूपण केले जाऊ शकत नाही. (२३)
तपः शौचं दया सत्यं इति पादाः कृते कृताः ।
अधर्मांशैस्त्रयो भग्नाः स्मयसङ्गमदैस्तव ॥ २४ ॥
तप शौच दया सत्य कृतात धर्मपाद चौ । गर्वासक्ति मदे ऽ धर्मे त्रिपाद मोडले असे ॥ २४ ॥
तपः - तपश्चर्या - शौचं - शुद्धता - दया - कृपा - सत्यं - खरे - इति - याप्रमाणे - तव - तुझे - पादाः - पाय - प्रकीर्तिताः - सांगितले आहेत - अधर्माशैः - अधर्माचेच अंश अशा - स्मयसङगमदैः - गर्व, आसक्ती, व उन्माद यांनी - त्रयः - तीन - भग्नाः - मोडून गेले. ॥२४॥
धर्मदेव, सत्ययुगात आपले तप, पवित्रता, दया आणि सत्य असे चार पाय होते. आता अधर्माचे अंश असलेले गर्व, आसक्ती आणि मद यांमुळे तीन चरण नष्ट झाले आहेत. (२४)
इदानीं धर्म पादस्ते सत्यं निर्वर्तयेद्यतः ।
तं जिघृक्षत्यधर्मोऽयं अनृतेनैधितः कलिः ॥ २५ ॥
राहिला पाय तो चौथा सत्याचा तो निदर्शक । अधर्म पोसला खोटा छेदिल कलिच्या रुपे ॥ २५ ॥
धर्म - हे धर्मा ! - इदानीं - हल्ली - ते - तुझा - सत्यं - सत्यनामक - पादः - पाय - यतः - ज्यामुळे - निर्वर्तयेत् - सुरक्षित राहील - तं - त्याला - अधर्मः - धर्माचा नाश करणारा - अनृतेन - असत्याने - ऐधितः - वाढलेला - अयं - हा - कलिः - कलि - जिघृक्षति - धरण्यास इच्छितो. ॥२५॥
आता सत्य हा आपला चवथा चरणच फक्त शिल्लक आहे. त्याच्याच बळावर आपण जीवित आहात. असत्याने पुष्ट झालेले हे अधर्मी कलियुग त्यालाही गिळंकृत करू इच्छित आहे. (२५)
इयं च भूमिर्भगवता न्यासितोरुभरा सती ।
श्रीमद्भिः तत्पदन्यासैः सर्वतः कृतकौतुका ॥ २६ ॥ शोचत्यश्रुकला साध्वी दुर्भगेवोज्झिताधुना । अब्रह्मण्या नृपव्याजाः शूद्रा भोक्ष्यन्ति मामिति ॥ २७ ॥
गोमाय पृथिवी साक्षात् कृष्णाने भार हारिला । सजलो होति ती त्याच्या पदचिन्हे सणापरी ॥ २६ ॥ रडे साध्वी अभागो ही कृष्णाच्या विरहामुळे । राजाचे सोंग घेवोनी शूद्र ते भोगतील की ॥ २७ ॥
च - आणि - इयं - ही - भगवंता - श्रीकृष्णाने - न्यासितोरुभरा - नाहीसा केला आहे पुष्कळ भार जिचा अशी - श्रीमद्भिः - शोभायमान - तत्पदन्यासैः - भगवंताच्या चरणाच्या ठेवण्याने - सर्वतः - सर्व ठिकाणी - कृतकौतुका - सुशोभित केलेली - सती - सदाचारसंपन्न - साध्वी - पतिव्रतेप्रमाणे असणारी - भूः - पृथ्वी - दुर्भगा - विधवा स्त्री - इव - प्रमाणे - अधुना - हल्ली - उज्झिता - सोडलेली होत्साती - अब्रह्मण्याः - ब्राह्मणांचे रक्षण न करणारे - नृपव्याजाः - राजांची सोंगे घेतलेले - शूद्राः - शूद्र - माम् - मला - भोक्ष्यन्ति - भोगतील - इति - असे म्हणून - अश्रुकला - डोळ्यांतून अश्रुधारा सोडणारी - शोचति - शोक करते. ॥२६-२७॥
ही गोमाता साक्षात पृथ्वी आहे. भगवंतांनी हिच्यावरील प्रचंड भार नष्ट केला होता आणि त्यांच्या अपूर्व सौंदर्याने युक्त अशा चरणचिन्हांमुळे ही सर्वत्र प्रेक्षणीय झाली होती. आता हिचा भगवंतांपासून वियोग झाला आहे. ही साध्वी अभागिनीप्रमाणे नेत्रातून अश्रू ढाळीत चिंता करीत आहे की आता राजाचे सोंग घेतलेले ब्राह्मणद्रोही शूद्र माझा उपभोग घेतील. माझ्यावर राज्य करतील. (२६-२७)
इति धर्मं महीं चैव सान्त्वयित्वा महारथः ।
निशातमाददे खड्गं कलयेऽधर्महेतवे ॥ २८ ॥
सूतजी सांगतात - सांत्वना बोललो दोघा परिक्षित् तो महारथी । कलीला कापण्या तेणे काढिले खड्ग तेधवा ॥ २८ ॥
महारथः - महारथी परीक्षित - इति - याप्रमाणे - धर्मं - वृषभरूपी धर्माला - च - आणि - महीं - गोरूपधारी पृथ्वीला - एव - सुद्धा - सांत्वयित्वा - सांतवून - अधर्महेतवे - अधर्माला कारणीभूत अशा - कलये - कलीकरिता - निशातं - तीक्ष्ण - खडगं - तरवारीला - आददे - घेता झाला. ॥२८॥
नंतर महारथी परीक्षिताने धर्म आणि पृथ्वीचे सांत्वन केले. नंतर अधर्माचे कारण ठरलेल्या कलीला मारण्यासाठी त्याने तीक्ष्ण तलवार हातात घेतली. (२८)
तं जिघांसुमभिप्रेत्य विहाय नृपलाञ्छनम् ।
तत्पादमूलं शिरसा समगाद् भयविह्वलः ॥ २९ ॥
कलिने जाणिले आता आपणा मारितोचि हा । उतरी राजचिन्हा नी पदासी लोळला पुन्हा ॥ २९ ॥
जिघांसुं - मारण्यास इच्छिणार्या - तं - त्या परीक्षिताला - अभिप्रेत्य - जाणुन - नृपलाञ्छनम् - राजचिन्हाला - विहाय - टाकून - भयविह्वलः - भीतीने विव्हळ झालेला - शिरसा - मस्तकाने - तत्पादमूलं - त्याच्या पायाला - समागात् - शरण गेला. ॥२९॥
आता हा मला मारून टाकणार हे कलीने जाणले आणि लगेच त्याने आपली राजचिन्हे काढून ठेवून भयाने व्याकूळ होऊन परीक्षिताच्या चरणांवर मस्तक ठेवले. (२९)
पतितं पादयोर्वीरः कृपया दीनवत्सलः ।
शरण्यो नावधीच्छ्लोक्य आह चेदं हसन्निव ॥ ३० ॥
दीनवत्सल येशस्वी शरणागत रक्षक । अशा परीक्षिते त्याला क्षम्यार्थ बोलला असे ॥ ३० ॥
दीनवत्सलः - दीनांवर दया करणारा - शरण्यः - शरण आलेल्यांचे रक्षण करणारा - श्लोक्यः - ज्याची कीर्ति सर्वत्र पसरली आहे असा परीक्षित - पादयोः - दोन्ही पायांवर - पतितं - पडलेल्या अशा त्याला - वीक्ष्य - पाहून - कृपया - दयेने - न अवधीत - न मारिता झाला - च - आणि - हसन् - हसणारा - इव - सारखा - इदं - याप्रमाणे - आह - बोलला. ॥३०॥
परीक्षित मोठा यशस्वी, दीनवत्सल आणि शरणागताचे रक्षण करणारा होता. कलियुगाने आपल्या चरणांवर मस्तक ठेवले आहे, हे पाहून कृपाळूपणाने त्याने त्याला मारले नाही. परंतु हसत हसत म्हटले - (३०)
राजोवाच
न ते गुडाकेशयशोधराणां बद्धाञ्जलेर्वै भयमस्ति किञ्चित् । न वर्तितव्यं भवता कथञ्चन क्षेत्रे मदीये त्वमधर्मबन्धुः ॥ ३१ ॥
राजा परिक्षिती म्हणाला - (इंद्रवजा) करास जोडोनि क्षमेसि मागे तया न भीती पृथुकूळराज्यीं । परी अधर्मा करिसी सहाय्य न थांब तेंव्हा क्षण एक येथे ॥ ३१ ॥
गुडाकेशयशोधराणां - अर्जुनाच्या कीर्तीला धारण करणार्यांपुढे - बद्धाञ्जलेः - हात जोडून उभा राहिलेल्या - ते - तुला - वै - खरोखर - किंचित् - थोडेसुद्धा - भयं - भय - न अस्ति - नाही - भवता - आपण - कथंचन - कोणत्याही कारणाने - मदीये - माझ्या - क्षेत्रे - भूमीत म्हणजे राज्यात - न वर्तितव्यं - राहू नये - त्वं - तू - अधर्मबन्धुः - अधर्मप्रिय आहेस. ॥३१॥
परीक्षित म्हणाला - तू हात जोडून शरण आला आहेस. तेव्हा अर्जुनाच्या यशस्वी वंशातील कोणाही वीरापासून तुला भय बाळगण्याचे कारण नाही. परंतु तू अधर्माचा सहायक असल्याने माझ्या राज्यात अजिबात राहू नकोस. (३१)
त्वां वर्तमानं नरदेवदेहेषु
अनुप्रवृत्तोऽयमधर्मपूगः । लोभोऽनृतं चौर्यमनार्यमंहो ज्येष्ठा च माया कलहश्च दम्भः ॥ ३२ ॥
तू घेतले राजरुपा तयाने असत्य चोरी अन लोभ दुष्ट । दरिद्रता नी कपटो नि दंभ अधर्म राजे तयिं वागतात ॥ ३२ ॥
लोभः - लोभ - अनृतं - मिथ्या भाषण - चौर्यं - चोरी - अनार्यं - क्षुद्रपणा - अंहः - पाप - ज्येष्ठा - लक्ष्मीची वडील बहीण अवदसा - च - आणि - माया - कपट - च - आणि - कलहः - भांडण - दम्भः - दंभ - अयं - हा - अधर्मपूगः - अधर्माचा समूह - नरदेवदेहेषु - राजदेहांत - वर्तमानं - वागणार्या - त्वां - तुला - अनुप्रवृत्तः - अनुसरला आहे. ॥३२॥
राजांच्या शरीरातील तुझ्या वास्तव्यामुळेच लोभ, असत्य, चोरी, दुष्टता, स्वधर्म-त्याग, दारिद्र्य, कपट, कलह, दंभ आणि अन्य पापे वाढत आहेत. (३२)
न वर्तितव्यं तदधर्मबन्धो
धर्मेण सत्येन च वर्तितव्ये । ब्रह्मावर्ते यत्र यजन्ति यज्ञैः यज्ञेश्वरं यज्ञवितानविज्ञाः ॥ ३३ ॥
या ब्रह्मतीर्थी नच थांब आता इथे सदा याग नि धर्म चाले । यज्ञातुनि ते ॠषि थोर देवा आराधिती या परिक्षेत्रि पुण्यें ॥ ३३ ॥
तत् - त्यामुळे - अधर्मबन्धो - हे अधर्मप्रिय कले - धर्मेण - धर्माने - च - आणि - सत्येन - सत्याने - वर्तितव्ये - वागण्याजोग्या - ब्रह्मावर्ते - ब्रह्मावर्तक्षेत्रांत - न वर्तितव्यं - राहू नयेस - यत्र - जेथे - यज्ञवितानविज्ञाः - यज्ञाच्या विस्ताराला जाणणारे - यज्ञैः - यज्ञांनी - यज्ञेश्वरं - श्रीकृष्णाला - यजन्ति - पूजितात. ॥३३॥
हे अधमसहायका, म्हणून तू या ब्रह्मवर्तात एक क्षण देखील राहू नकोस, कारण हे धर्म आणि सत्याचे निवासस्थान आहे. या क्षेत्रात यज्ञविधी जाणणारे महात्मे यज्ञांच्या द्वारा यज्ञपुरुष भगवंतांची आराधना करीत असतात. (३३)
यस्मिन् हरिर्भगवानिज्यमान
इज्यात्ममूर्तिर्यजतां शं तनोति । कामानमोघान् स्थिरजङ्गमानां अन्तर्बहिर्वायुरिवैष आत्मा ॥ ३४ ॥
या भारती राहि यज्ञात ईश तो यज्ञकर्त्यास हितोचि देई । जीवात बाहेरहि तोचि राही नी तो करी कामना पूर्ण सर्व ॥ ३४ ॥
यस्मिन् - जेथे - इज्यमानः - पूजिला गेलेला - भगवान् - सर्वगुणसंपन्न - इज्यामूर्तिः - यज्ञ हीच ज्याची मूर्ति असा - स्थिरजंगमानां - स्थावर म्हणजे वृक्षादि आणि जंगम म्हणजे मनुष्यादि ह्या सर्वांच्या - अन्तः - आत - बहिः - बाहेर - वायुः - वायु - इव - सारखा - आत्मा - सर्वव्यापी - एषः - हा - हरिः - श्रीकृष्ण - यजतां - यज्ञ करणार्यांचे - शं - कल्याण - अमोघान् - व्यर्थ न जाणार्या - कामान् - इच्छा - तनोति - पूर्ण करतो. ॥३४॥
या देशात भगवान श्रीहरी यज्ञरूपात निवास करीत असतात, यज्ञांच्या द्वारा त्यांची पूजा केली जाते आणि यज्ञ करणार्याचे ते कल्याण कारतात. सर्वांच्या अंतर्यामी असणारे ते भगवान वायूप्रमाणे समस्त चराचर जीवांच्या आत आणि बाहेर निवास करून त्यांच्या कामना पूर्ण करीत असतात. (३४)
सूत उवाच ।
परीक्षितैवमादिष्टः स कलिर्जातवेपथुः । तमुद्यतासिमाहेदं दण्डपाणिमिवोद्यतम् ॥ ३५ ॥
सूतजी सांगतात - ( अनुष्टुप् ) राजाची ऐकुनी आज्ञा उठला कलि कंपित । राजा तो कढिता खड्ग माराता यम भासला ॥ ३५ ॥
एवं - याप्रमाणे - परीक्षिता - परीक्षित राजाने - आदिष्टः - आज्ञा दिलेला - जातवेपथुः - थरथर कापणारा - सः - तो - कलिः - कलि - उद्यतासिं - हातात तरवार धारण केलेल्या - दण्डपाणिं - यमधर्म - इव - प्रमाणे - उद्यतं - सिद्ध असलेल्या - तं - त्या परीक्षित राजाला - इदं - याप्रमाणे - आह - बोलला. ॥३५॥
सूत म्हणाले - परीक्षिताची ही आज्ञा ऐकून कली थरथर कापू लागला. हातात यमराजासमान तलवार घेऊन मारण्यासाठी सज्ज झालेल्या परीक्षिताला तो म्हणाला. (३५)
कलिरुवाच ।
यत्र क्व वाथ वत्स्यामि सार्वभौम तवाज्ञया । लक्षये तत्र तत्रापि त्वामात्तेषुशरासनम् ॥ ३६ ॥ तन्मे धर्मभृतां श्रेष्ठ स्थानं निर्देष्टुमर्हसि । यत्रैव नियतो वत्स्य आतिष्ठन् तेऽनुशासनम् ॥ ३७ ॥
कलि म्हणाला - तुझ्या धनुष्य बाणाने धास्ती मी घेतली पहा । मनात माझिया चिंता रहावे कोणत्या स्थळी ॥ ३६ ॥ श्रेष्ठ तू जाणिसी धर्म राहीन स्थिर मी तिथे । पाळिन तव मी आज्ञा राहीन न स्थिर मी तिथे ॥ ३७ ॥
सार्वभौम - हे परीक्षित राजा ! - तव - तुझ्या - आज्ञया - आज्ञेने - यत्र - ज्या - क्वचन - कोठेही - वत्स्यामि - राहीन - तत्रतत्रापि - त्या त्या ठिकाणीसुद्धा - आत्तेषुशरासनं - धनुष्यबाण घेतलेल्या - त्वां - तुला - लक्षये - पाहतो. ॥३६॥
धर्मभृतां - धार्मिकात - श्रेष्ठ - श्रेष्ठ अशा हे राजा ! - ते - तुझ्या - अनुशासनं - आज्ञेला - आतिष्ठन् - पाळणारा - नियतः - नियमांनी बद्ध झालेला - यत्र एव - जेथेच - वत्स्ये - राहीन - तत् - ते - स्थानं - स्थान - मे - मला - निर्देष्टुं - दाखविण्यास - अर्हसि - योग्य आहेस. ॥३७॥
कली म्हणाला - हे सार्वभौम राजा, आपल्या आज्ञेप्रमाणे जेथे कोठे मी राहण्याचा विचार करतो, तेथे आपण धनुष्याला बाण लावून उभे आहात, असे मी पाहतो. हे धार्मिकशिरोमणी, जेथे मी राहू शकेन, असे ठिकाण मला सांगावे. (३६-३७)
सूत उवाच ।
अभ्यर्थितस्तदा तस्मै स्थानानि कलये ददौ । द्यूतं पानं स्त्रियः सूना यत्राधर्मश्चतुर्विधः ॥ ३८ ॥ पुनश्च याचमानाय जातरूपमदात्प्रभुः । ततोऽनृतं मदं कामं रजो वैरं च पञ्चमम् ॥ ३९ ॥
सूतजी सांगतात - विनंती कलिची राजा मानिता जाहला पहा । द्युत मद्य नि स्त्रींग हिंसा जागा दिल्या तया । अधर्म नांदतो खेटा मद आसक्तिं निर्दयीं ॥ ३८ ॥ आणिक मागता जागा राजाने धन दाविले । रजोगुणी कली नादे पंच स्थाने अशी तया ॥ ३९ ॥
तदा - त्यावेळी - अभ्यर्थितः - कलीने प्रार्थना केलेला राजा - तस्मै - त्या - कलये - कलीला - यत्र - जेथे - द्यूतं - जुगार - पानं - दारू पिणे - स्त्रियः - बायका - सूनाः - हिंसा - चतुर्विधः - चार प्रकारचा - अधर्मः - अधर्म - स्थानानि - ती स्थाने - ददौ - देता झाला. ॥३८॥
प्रभुः - समर्थ परीक्षित राजा - च - आणखी - पुनः - फिरून - याचमानाय - मागणी करणार्या कलीला - जातरूपं - सोने - ततः - त्यामुळे - अनृतं - मिथ्या भाषण - मदं - उन्माद - काम - इच्छा - रजः - हिंसादि दोष - च - आणि - पञ्चमम् - पाचवे - वैरं - शत्रुत्व - अदात् - देता झाला. ॥३९॥
सूत म्हणाले - कलियुगाची विनंती मान्य करून राजा परीक्षिताने त्याला चार ठिकाणे राहण्यासाठी दिली - द्यूत, मद्यपान, व्यभिचार आणि हिंसा. या स्थानात क्रमशः असत्य, मद, आसक्ति आणि निर्दयता या चार रूपांत अधर्म निवास करतो. कलियुगाने आणखी ठिकाणे मागितली, तेव्हा सामर्थ्यवान परीक्षिताने त्याला राहण्यासाठी सुवर्ण (धन) हे आणखी एक ठिकाण दिले. अशा प्रकारे कलियुगाची असत्य, गर्व, कामवासना, वैर आणि रजोगुण ही राहण्याची पाच ठिकाणे झाली. (३८-३९)
अमूनि पञ्च स्थानानि ह्यधर्मप्रभवः कलिः ।
औत्तरेयेण दत्तानि न्यवसत् तन्निदेशकृत् ॥ ४० ॥
राजाने दाविल्या पाच स्थानी त्या कलि राहतो । पंचमूळ अधर्माचे राजाज्ञा पाळितो तिथे ॥ ४० ॥
अधर्मप्रभवः - अधर्मापासून उत्पन्न झालेला - तन्निदेशकृत् - व राजाच्या आज्ञेप्रमाणे वागणारा - कलिः - कलि - हि - खरोखर - औत्तरेयेण - उत्तरेच्या मुलाने म्हणजे परीक्षित राजाने - दत्तानि - दिलेल्या - अमूनि - ह्या - पञ्च - पाच - स्थानानि - स्थानांना - न्यवसत् - धरून राहिला. ॥४०॥
अधर्माचे मूळ कारण असलेला कली परीक्षिताने दिलेल्या या पाच ठिकाणी राजाज्ञेचे पालन करीत राहू लागला. (४०)
अथैतानि न सेवेत बुभूषुः पुरुषः क्वचित् ।
विशेषतो धर्मशीलो राजा लोकपतिर्गुरुः ॥ ४१ ॥
आत्मकल्याणि जे होती त्या पाचां सेविती । नेता सुराजा गुरुने रहावे दूर यातुनी ॥ ४१ ॥
अथ - यास्तव - बुभूषुः - उत्कर्षाची इच्छा करणारा - पुरुषः - पुरुष - विशेषतः - विशेषेकरून - धर्मशीलः - धार्मिक - राजा - राजा - लोकपतिः - लोकांचा रक्षक - गुरुः - गुरु - एतानि - ह्यांना - क्वचित् - कधीही - न सेवेत् - सेवू नये. ॥४१॥
म्हणून आत्मकल्याण इच्छिणार्या पुरुषांनी या पाच ठिकाणांचा कधीही आश्रय घेऊ नये. विशेषतः धार्मिक राजा, प्रजेचा लौकिकदृष्ट्या नेता आणि धर्मोपदेश करणारे गुरू यांनी तर सावध राहून या ठिकाणांचा त्याग केला पाहिजे. (४१)
वृषस्य नष्टांस्त्रीन् पादान् तपः शौचं दयामिति ।
प्रतिसन्दध आश्वास्य महीं च समवर्धयत् ॥ ४२ ॥
बैलाचें मोडके पाय राजाने जोडिले तिन्ही । दया शौच तपस्या ही त्री पाया जुटले पुन्हा ॥ संवर्धिले स्वये राज्य धर्मा अभय देउनी ॥ ४२ ॥
वृषस्य - वृषभस्वरूपी धर्माच्या - नष्टान् - नष्ट झालेल्या - तपः - तपश्चर्या - शौचं - शुद्धता - दयां - कृपा - इति - अशा - त्रीन् - तीन - पादान् - पायांना - प्रतिसन्दधे - जोडता झाला - च - आणि - महीं - पृथ्वीला - आश्वास्य - शांतवन करून - समवर्धयत् - वाढविता झाला.॥४२॥
यानंतर परीक्षिताने तप, शुद्धता आणि दया हे तीन चरण वृषभरूप धर्माला जोडून दिले आणि त्याला आश्वासन देऊन पृथ्वीचे रक्षण केले. (४२)
स एष एतर्ह्यध्यास्त आसनं पार्थिवोचितम् ।
पितामहेनोपन्यस्तं राज्ञारण्यं विविक्षता ॥ ४३ ॥
जसे युधिष्ठिरे त्यला दिधले राजआसन । तशासिंहासनी नित्य विराजमान रहिला ॥ ४३ ॥
एतर्हि - सांप्रत - सः - तो - एषः - हा - अरण्यं - अरण्याला - विविक्षता - प्रवेशण्यास इच्छिणार्या - पितामहेन - आजोबा - राज्ञा - धर्मराजाने - उपन्यस्तं - दिलेल्या - पार्थिवोचितं - राजाला योग्य अशा - आसनं - आसनावर - अध्यास्ते - बसतो. ॥४३॥
परीक्षिताचे पितामह राजा युधिष्ठिरांनी वनात जातेवेळी महाराज परीक्षिताला राजसिंहासनावर बसविले होते, तोच आता तेथे विराजमान आहे. (४३)
आस्तेऽधुना स राजर्षिः कौरवेन्द्रश्रियोल्लसन् ।
गजाह्वये महाभागः चक्रवर्ती बृहच्छ्रवाः ॥ ४४ ॥
कौरवी राजलक्ष्मीत सम्राट शोभला पहा । राजर्षी चक्रवर्ती तो यशाने हस्तिनापुरी ॥ ४४ ॥
कौरवेन्द्रश्रिया - कुरुकुलातील राजांच्या ऐश्वर्याने - उल्लसन् - शोभणारा - चक्रवर्ती - सार्वभौम - बृहच्छ्रवाः - पुष्कळ पुण्यकारक कीर्ति असलेला - महाभागः - मोठा भाग्यवान - सः - तो - राजर्षिः - राजर्षि परीक्षित - अधुना - हल्ली - गजाह्वये - हस्तिनापुरात - आस्ते - राहतो. ॥४४॥
तोच परम यशस्वी, सौभाग्यशाली, चक्रवर्ती सम्राट राजर्षी परीक्षित यावेळी हस्तिनापुरात कौरवकुलाच्या राजलक्ष्मीने शोभत आहे. (४४)
इत्थम्भूतानुभावोऽयं अभिमन्युसुतो नृपः ।
यस्य पालयतः क्षौणीं यूयं सत्राय दीक्षिताः ॥ ४५ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे कलिनिग्रहो नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥
अभिमन्युसुतो थोर त्याचेचि राज्य हे असे । म्हणोनि दीर्घकाळाच्या यज्ञी दीक्षित आपण ॥ ४५ ॥ इति श्रीमद्भगवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ सतरावा अध्याय हा ॥ १ ॥ १७ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
अयं - हा - अभिमन्युसुतः - अभिमन्यूचा पुत्र परीक्षित - नृपः - राजा - इत्थंभूतानुभावः - अशा तर्हेचा पराक्रम करणारा आहे - यस्य - जो - क्षोणीं - पृथ्वीला - पालयतः - रक्षित असता - यूयं - तुम्ही - सत्राय - यज्ञ करण्याकरिता - दीक्षिताः - दीक्षा घेतलेले आहे.॥४५॥
हा अभिमन्युपुत्र राजा परीक्षित असा प्रभावशाली आहे. त्याच्याच शासनकालात आपण सर्वजण या दीर्घकाल चालणार्या यज्ञाची दीक्षा घेतली आहे. (३८-४५)
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां |