|
श्रीमद् भागवत पुराण परीक्षितो राज्यलाभः, दिग्विजयः, भूमिधर्मसंवाद श्रवणं च - परीक्षिताचा दिग्विजय आणि धर्म व पृथ्वीचा संवाद - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
सूत उवाच ।
ततः परीक्षिद् द्विजवर्यशिक्षया महीं महाभागवतः शशास ह । यथा हि सूत्यामभिजातकोविदाः समादिशन् विप्र महद्गुणस्तथा ॥ १ ॥
सूतजी सांगतात- (इंद्रवज्रा) इच्छेसवे ब्राम्हण सांगती जे परीक्षिते राज्य तसेचि केले । जे बोलले ज्योतिषि भाष्य मागे होते तयिं ते गुण विद्यमान ॥ १ ॥
विप्र - शौनक हो ! - ततः - नंतर - महाभागवतः - मोठा भगवद्भक्त - महद्गुणः - व श्रेष्ठ गुणांनी पूर्ण - परीक्षित् - परीक्षित राजा - यथा - जसे - सूत्यां - प्रसूतिकाळी - अभिजातकोविदाः - जातक वर्तविण्यात निपुण ज्योतिषी - हि - खरोखर - समादिशन् - जातक वर्तविते झाले - तथा - तसे - द्विजवर्यशिक्षया - श्रेष्ठ ब्राह्मणांच्या शिक्षणाच्या योगाने - महीं - पृथ्वीला - शशासह - रक्षिता झाला. ॥१॥
सूत म्हणाले - शौनका ! पांडवांच्या महाप्रयाणानंतर भगवंताचा परम भक्त राजा परीक्षित श्रेष्ठ ब्राह्मणांच्या उपदेशानुसार पृथ्वीचे पालन करू लागला. त्याच्या जन्माच्या वेळी ज्योतिष्यांनी त्याच्याविषयी जे काही सांगितले होते, ते सर्व श्रेष्ठ गुण त्याच्यामध्ये होते. (१)
स उत्तरस्य तनयां उपयेम इरावतीम् ।
जनमेजयादीन् चतुरः तस्यामुत्पादयत् सुतान् ॥ २ ॥
(अनुष्टुप्) कन्या उत्तरराजाची लग्न ईरावतीसि त्या । होउनी जनमेजेया सह चौ पुत्र जाहले ॥ २ ॥
सः - तो - उत्तरस्य - उत्तराच्या - तनयां - कन्या अशा - इरावतीं - इरावतीला - उपयेमे - वरिता झाला. - तस्यां - तिच्या ठिकाणी - जनमेजयादीन् - जनमेजय वगैरे - चतुरः - चार - सुतान् - पुत्रांना - उत्पादयत् - उत्पन्न करिता झाला. ॥२॥
त्याने उत्तराची कन्या इरावतीशी विवाह केला. तिच्यापासून त्याला जनमेजय आदि चार पुत्र झाले. (२)
आजहाराश्वमेधान् त्रीन् जङ्गायां भूरिदक्षिणान् ।
शारद्वतं गुरुं कृत्वा देवा यत्राक्षिगोचराः ॥ ३ ॥
आचार्य ते कृपाचार्य कुलोपाध्याय जाहले । गंगेच्या त्या तटापासी तिन्हीही अश्वमेध ते ॥ केले नी दक्षिणा खूप देउनी तोषिले द्विजा । तदा प्रत्यक्ष देवांनी येउनी भाग घेतला ॥ ३ ॥
शारद्वतं - कृपाचार्यास - गुरुं - गुरु - कृत्वा - करून - गंगायां - गंगेच्या ठिकाणी - त्रीन् - तीन - भूरिदक्षिणान् - ज्यांत पुष्कळ दक्षिणा दिली होती अशा - अश्वमेधान् - अश्वमेधयज्ञांना - आजहार - करिता झाला - यत्र - ज्या यज्ञात - देवाः - इंद्रादि देव - अक्षगोचराः - प्रत्यक्ष येऊन भाग घेत. ॥३॥
त्याने कृपाचार्यांना आचार्य नेमून गंगातटाकी तीन अश्वमेध यज्ञ केले, त्यावेळी ब्राह्मणांना पुष्कळ दक्षिणा दिली. त्या यज्ञात देवतांनी प्रत्यक्ष प्रगट होऊन आपापला भाग ग्रहण केला. (३)
निजग्राहौजसा वीरः कलिं दिग्विजये क्वचित् ।
नृपलिङ्गधरं शूद्रं घ्नन्तं गोमिथुनं पदा ॥ ४ ॥
लढाई जिंकिता तेणे एकदा पाहिला कली । राजवेषात लाथेने बैलासी ताडितो असा । धरिले योजुनी त्याला ताडिले बलपूर्वक ॥ ४ ॥
वीरः - शूर परीक्षित - क्वचित् - कोणत्या तरी एका - दिग्विजये - दिग्विजयात - पदा - पायाने - गोमिथुनं - गाईच्या जोडप्याला म्हणजे गाय व बैल ह्यांना - घ्रन्तं - ताडण करणार्या - नृपलिङगधरं - राजचिन्हे धारण करणार्या - शूद्रं - शूद्र जातीच्या अशा - कलिं - कलीला - ओजसा - स्वसामर्थ्याने - निजग्राह - अटकविता झाला. ॥४॥
एकदा दिग्विजय करीत असताना त्याने शूद्र असून कली, राजाचा वेष घेऊन गाय आणि बैल यांना लाथांनी मारीत आहे, असे पाहिले. तेव्हा राजाने मोठ्या शौर्याने त्या कलियुगाला पकडून शासन केले. (४)
शौनक उवाच ।
कस्य हेतोर्निजग्राह कलिं दिग्विजये नृपः । नृदेवचिह्नधृक् शूद्र कोऽसौ गां यः पदाहनत् । तत्कथ्यतां महाभाग यदि कृष्णकथाश्रयम् ॥ ५ ॥ अथवास्य पदाम्भोज मकरन्दलिहां सताम् । किं अन्यैः असदालापैः आयुषो यदसद्व्ययः ॥ ६ ॥
शौनकांनी विचारिले- ठार ना करिता त्याला नृपे कां सोडिला तसा । राजवेषात शूद्राचा आचार करिता असा ॥ ५ ॥ जर ह्या कृष्णलीलेच्या संबंधी प्रश्न आसला । ऐकोत तर ते सांगा व्यर्थ गोष्टी न सांगणे ॥ ६ ॥
नृपः - राजा परीक्षित - दिग्विजये - दिग्विजयप्रसंगी - कस्य - कोणाच्या - हेतोः - कारणास्तव - कलिं - कलीला - निजग्राह - अटकावून ठेविता झाला - यः - जो - पदा - पायाने - गां - गाईला - अहनत् - ताडिता झाला - असौ - हा - नृदेवचिह्नधृक् - राजलक्षणे धारण करणारा - शूद्रः - शूद्रस्वरूपी - कः - कोण ॥५॥
महाभाग - भाग्यवान् सूता ! - यदि - जर - तत् - ते - कृष्णकथाश्रयं - श्रीकृष्णाच्या कथांनी युक्त - अथवा - किंवा - अस्य - ह्या श्रीकृष्णाच्या - पदाम्भोजमकरन्दलिहां - चरणकमलातील पुष्परसाला चाटणार्या - सतां - साधूंच्या - कथ्यतां - सांगा - यत् - ज्यामुळे - आयुषः - आयुष्याचा - असद्व्ययः - व्यर्थ नाश - अन्यैः - दुसर्या - असदालापैः - मिथ्याभाषणांनी - किं - काय उपयोग ? ॥६॥
शौनकाने विचारले - सूत महोदय, दिग्विजयाच्या वेळी परीक्षिताने कलियुगाला केवळ शासन करूनच का सोडले ? कारण राजाचा वेष धारण केला होता तरी तो एक शूद्र होता व गायीला लाथांनी मारत होता. भगवान श्रीकृष्ण अथवा त्यांच्या चरणकमलांच्या मधुररसाचे पान करणार्या भक्तांशी या घटनेचा संबंध असेल तर सांगा. ज्यात आयुष्य फुकट जाते, अशा व्यर्थ गोष्टी बोलून काय फायदा ? (५-६)
क्षुद्रायुषां नृणामङ्ग मर्त्यानामृतमिच्छताम् ।
इहोपहूतो भगवान् मृत्युः शामित्रकर्मणि ॥ ७ ॥
पाहिजे मोक्ष ज्यांना ते अल्पायु मृत्यु ग्रस्त जे । कल्याण साधण्या त्यांचे शांतिकर्म यमास त्या । आवाहिले असे आम्ही आग्रहे योजिले तया ॥ ७ ॥
अङग - सूत हो ! - ऋतं - सत्याला म्हणजे मोक्षमार्गाला - इच्छतां - इच्छिणारा - क्षुद्रायुषां - अल्पायुष्य असणार्या - मर्त्यानां - मरणधर्मी - नृणां - मनुष्यांचा - भगवान् - सर्वगुणसंपन्न - मृत्यूः - काळ - इह - ह्या - शामित्रकर्मणि - शामित्र नावाच्या यज्ञकर्मात - उपहूतः - बोलावला आहे. ॥७॥
सूत महोदय, जे मोक्षाची इच्छा करतात, परंतु अल्पायुषी असल्यामुळे मृत्यूचा घास होतात, अशांच्या कल्याणासाठी भगवान यमांना आवाहन करून त्यांना येथे शामित्रकर्मासाठी नियुक्त केले आहे. (७)
न कश्चिन् म्रियते तावद् यावदास्त इहान्तकः ।
एतदर्थं हि भगवान् आहूतः परमर्षिभिः । अहो नृलोके पीयेत हरिलीलामृतं वचः ॥ ८ ॥
जोवरी यम तो येथे कर्मात, मृत्यु ना कुणा । मृत्युच्या भयिं जे ग्रस्त त्यांना अमृत ही कथा ॥ ८ ॥
यावत् - जोपर्यंत - अन्तकः - मृत्यू, काळ - इह - ह्या यज्ञात - आस्ते - राहत आहे - तावत् - तोपर्यंत - कश्चित् - कोणीही - न म्रियते - मरणार नाही - अहो - काय हो सांगावे ! - नृलोके - भूलोकामध्ये - हरिलीलामृतं - भगवंताच्या लीलारूपी अमृताने युक्त असे - वचः - भाषण - पीयेत - प्यायले जावे - एतदर्थं - ह्याकरिताच - हि - खरोखर - परमर्षिभिः - मोठमोठया ऋषींनी - भगवान् - सर्वगुणसंपन्न मृत्यू - आहूतः - बोलविला आहे. ॥८॥
जोपर्यंत येथे यमराजा आहे, तोपर्यंत कोणाला मृत्यू येणार नाही. मनुष्य लोकातील मृत्यूने ग्रासलेले लोक देखील भगवंतांच्या अमृततुल्य लीलाकथांचे पान करतील, यांसाठीच महर्षींनी भगवान यमाला येथे बोलाविले आहे. (८)
मन्दस्य मन्दप्रज्ञस्य वयो मन्दायुषश्च वै ।
निद्रया ह्रियते नक्तं दिवा च व्यर्थकर्मभिः ॥ ९ ॥
अज्ञान अल्प आयू नी संसारी मंदभाग्य हि । विषयी व्यर्थ व्यर्थ कष्टोनि झोपणे ॥ ९ ॥
मन्दस्य - आळशी - मन्दप्रज्ञस्य - अल्पबुद्धि - च - आणि - मन्दायुष - अल्पायुषी पुरुषाचे - वयः - वय - वै - खरोखर - नक्तं - रात्री - निद्रया - झोपेने - च - आणि - दिवा - दिवसा - व्यर्थकर्मभिः - निरुपयोगी कार्ये करण्यात - ह्लियते - नाश पावते. ॥९॥
एक तर कमी आयुष्य आणि अल्प समजूत. अशा अवस्थेत संसारातील अभागी माणसांचे आयुष्य व्यर्थ जात आहे. रात्र निद्रेमध्ये आणि दिवस व्यर्थ कामे करण्यात ! (९)
सूत उवाच ।
यदा परीक्षित् कुरुजाङ्गलेऽश्रृणोत् कलिं प्रविष्टं निजचक्रवर्तिते । निशम्य वार्तामनतिप्रियां ततः शरासनं संयुगशौण्डिराददे ॥ १० ॥
सूतजी सांगतात - (इंद्रवज्रा) राही परीक्षित् कुरुजांगदेशी सेनेत झाला कलिचा प्रवेश । झाले तया दुःख मनात थोर हाती तदा तो धनुबाण घेई ॥ १० ॥
यदा - जेव्हा - कुरुजाङगले - कुरुजाङगल प्रदेशात - वसन् - राहणारा - संयुगशौण्डिः - युद्धकुशल - परीक्षित् - परीक्षित राजा - निजचक्रवर्तिते - आपल्या राजसत्तेखाली असलेल्या राज्यात - प्रविष्टं - शिरलेल्या - कलिं - कलीला - अनतिप्रियां - अप्रिय अशा - वार्तां - बातमीला - निशम्य - ऐकून - ततः - नंतर - शरासनं - धनुष्याला - आददे - घेता झाला. ॥१०॥
सूत म्हणाले - राजा परीक्षित जेव्हा कुरुजांगल देशात राहात होता, त्यावेळी त्याने ऐकले की, सैन्याने सुरक्षित अशा माझ्या राज्यात कलियुगाचा प्रवेश झाला आहे. ही अप्रिय वार्ता ऐकून युद्धवीर परीक्षिताने धनुष्य हातात घेतले. (१०)
स्वलङ्कृतं श्यामतुरङ्गयोजितं
रथं मृगेन्द्रध्वजमाश्रितः पुरात् । वृतो रथाश्वद्विपपत्तियुक्तया स्वसेनया दिग्विजयाय निर्गतः ॥ ११ ॥
सिंहध्वजा अश्वहि श्यामकर्णी रथास जुंपोनि निघे लढाया । घोडे रथाचे दळ हत्ति सारे सवे तयाच्या निघले लाढाया ॥ ११ ॥
स्वलङकृतं - सुशोभित केलेल्या - श्यामतुरङगयोजितं - श्यामवर्णाचे घोडे जुंपलेल्या - मृगेंद्रध्वजं - ज्याच्या ध्वजावर सिंह आहे अशा - रथं - रथाला - आश्रितः - आश्रय करून राहिलेला - रथाश्वद्विपपत्तियुक्तया - रथ, घोडे, हत्ति, व पायदळ यांनी युक्त अशा - स्वसेनया - आपल्या सैन्याने - वृतः - युक्त असा - दिग्विजयाय - सर्व दिशा जिंकण्याकरिता - पुरात् निर्गतः - नगरातून निघाला. ॥११॥
श्यामवर्णाचे घोडे जुंपलेल्या, सिंहध्वज असलेल्या, सुसज्जित अशा रथावर आरूढ होऊन दिग्विजयासाठी परीक्षित नगराबाहेर पडला. त्यावेळी रथ, हत्ती, घोडे आणि पायदळ अशी चतुरंग सेना त्याच्याबरोबर होती. (११)
भद्राश्वं केतुमालं च भारतं चोत्तरान् कुरून् ।
किम्पुरुषादीनि वर्षाणि विजित्य जगृहे बलिम् ॥ १२ ॥
(अनुष्टुप्) भद्राश्व केतुमालाचा नी किंपुरूष भारत । उत्तरो कुरु हा देश जिंकोनी भेटि आणिल्या ॥ १२ ॥
भद्राश्वं - भद्राश्वखंडाला - केतुमालं - केतुमालखंडाला - च - आणि - भारतं - भरतखंडाला - च - आणि - उत्तरान् - उत्तरेकडे असणार्या - कुरुन् - कुरूंना - किंपुरुषादीनि - किंपुरुष वगैरे - वर्षाणि - खंडांना - विजित्य - जिंकून - बलिं - करभार - जगृहे - घेता झाला. ॥१२॥
त्याने भद्राश्व, केतुमाल, भारत, उत्तरकुरु, किंपुरूष इत्यादि सर्व देश जिंकून तेथील राजांकडून भेटी स्विकारल्या. (१२)
तत्र तत्रोपशृण्वानः स्वपूर्वेषां महात्मनाम् ।
प्रगीयमाणं च यशः कृष्णमाहात्म्यसूचकम् ॥ १३ ॥ आत्मानं च परित्रातं अश्वत्थाम्नोऽस्त्रतेजसः । स्नेहं च वृष्णिपार्थानां तेषां भक्तिं च केशवे ॥ १४ ॥ तेभ्यः परमसन्तुष्टः प्रीत्युज्जृम्भितलोचनः । महाधनानि वासांसि ददौ हारान् महामनाः ॥ १५ ॥
सर्वत्र ऐकिले त्याने पूर्वजांचे सुयेश ते । प्रत्येक पाउला त्याने कृष्णाचे गुण ऐकिले ॥ १३ ॥ स्वताच्या गर्भदेहाला ब्रह्मास्त्र अग्निपासुनी । रक्षिले कृष्णदेवाने ऐकिल्या सर्वही कथा ॥ पांडवांचा यदुवंशां लोभही ऐकिला तये । केवढी भक्ति त्या कृष्णीं ऐकिली पांडवांचि ती ॥ १४ ॥ चरित्र ऐकुनी सारे परिक्षित् खूष हौनी । बहुमूल्य अलंकार वस्त्रादी भेटि देतसे ॥ १५ ॥
तत्रतत्र - त्या त्या ठिकाणी - प्रगीयमानं - गायिले जाणारे - महात्मनां - मोठया मनाच्या - स्वपूर्वेषां - आपल्या पूर्वजांचे म्हणजे पांडवांचे - कृष्णमाहात्म्यसूचकं - श्रीकृष्णाच्या माहात्म्याला सुचविणारे - यशः - यश - च - आणि - अश्वत्थाम्नः - अश्वत्थाम्याच्या - अस्रतेजसः - ब्रह्मास्राच्या तेजापासून - परित्रातं - रक्षिलेल्या - आत्मानं - स्वतःला - च - आणि - तेषां - त्या - वृष्णिपार्थानां - यादव व पांडव यांच्या - केशवे - कृष्णावरील - स्नेहं - प्रेमाला - च - आणि - भक्तिं - भक्तीला - उपशृण्वानः - ऐकणारा - परमसंतुष्टः - फार आनंदित झालेला - प्रीत्युज्जृम्भितलोचनः - प्रेमाने प्रफुल्लित झाले आहेत नेत्र ज्याचे असा - महामनाः - मोठया मनाचा परीक्षित - तेभ्यः - त्यांना - महाधनानि - अतिशय मौल्यवान अशी - वासांसि - वस्त्रे - हारान् - हार - ददौ - देता झाला. ॥१३-१५॥
सर्व देशांमध्ये त्याला आपल्या पूर्वज महात्म्यांची यशोगाथा ऐकावयास मिळाली. त्या यशोगानातून पदोपदी भगवान श्रीकृष्णांचा महिमा प्रगट होत होता. (१३)
श्रीकृष्णांनी अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राच्या ज्वालांपासून कोणत्या प्रकारे त्याचे रक्षण केले, यादव आणि पांडव यांचे एकमेकांवर किती प्रेम होते, तसेच पांडवांची श्रीकृष्णांवर किती भक्ति होती, हे सर्व त्याला ऐकावयास मिळाले. (१४) जे लोक त्याला हे चरित्र ऐकवीत होते, त्यांच्यावर महात्मा राजा परीक्षित अत्यंत प्रसन्न होईल. त्याचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून येत. मोठ्या उदार अंतःकरणाने तो त्यांना बहुमोल वस्त्रे आणि मोत्यांचे हार भेट म्हणून देत असे. (१५)
सारथ्यपारषदसेवनसख्यदौत्य ।
वीरासनानुगमनस्तवनप्रणामान् । स्निग्धेषु पाण्डुषु जगत्प्रणतिं च विष्णोः । भक्तिं करोति नृपतिश्चरणारविन्दे ॥ १६ ॥
(वसंततिलक) सारथ्य पारषद मित्र शस्त्रास्त्र धारी कीर्ती वदे सह चले चरणीहि थांबे । पांडूकुमारचरणी नत विश्व केले ऐकोनि भक्तित नृपोहि तसा निमाला ॥ १६ ॥
नृपतिः - राजा परीक्षित - स्निग्धेषु - प्रेमयुक्त अशा - पाण्डुषु - पांडवांचे ठिकाणी - सारथ्यपारषदसेवनसख्यदौत्य - सारथ्याचे वर्तन, सभेतील अग्रमानाचा स्वीकार, सेवा, मित्रत्व, दूतकर्म, - वीरासनानुगमनस्तवनप्रणामम् - युद्धकृत्य, त्यांच्या मागोमाग जाणे, स्तवन, नमस्कारादि करणे ह्या सर्व कृत्यांना - च - आणि - विष्णोः - विष्णूच्या - जगत्प्रणतिं - जगद्वंदनाला जाणून - चरणारविन्दे - चरणकमलाच्या ठिकाणी - भक्तिं - भक्ती - करोति - करू लागला. ॥१६॥
त्याला असेही ऐकावयास मिळत होते की, अत्यंत प्रेमामुळे भगवान श्रीकृष्णांनी पांडवांचे सारथ्य केले. ते त्यांचे सभासद झाले, त्यांनी त्याची सेवाही केली, मित्र होतेच, ते त्यांचे दूतही झाले. रात्री शस्त्र हातात घेऊन वीरासन घालून ते बसत व शिबिरावर पहारा देत, त्यांच्या मागे मागे जात, त्यांची स्तुती व त्यांना प्रणाम करीत. इतकेच काय, आपल्या प्रेमपात्र पांडवांच्या चरणांवर सर्व जग त्यांनी झुकविले. हे ऐकून भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांवर परीक्षिताची भक्ती अधिकच दृढ होईल. (१६)
तस्यैवं वर्तमानस्य पूर्वेषां वृत्तिमन्वहम् ।
नातिदूरे किलाश्चर्यं यदासीत् तन्निबोध मे ॥ १७ ॥
(अनुष्टुप्) सार्या त्या इतिहासाला ऐकिले त्या परीक्षिते । शिबिरापासूनी दूर एकदा घडले असे ॥ १७ ॥
एवं - याप्रमाणे - तस्य - तो - अन्वहं - दररोज - पूर्वेषां - पूर्वजांच्या - वृत्तं - वर्तनाला - वर्तमानस्य - आचरीत असता - नातिदूरे - फार लांब नव्हे अशा प्रदेशात - किल - खरोखर - यत् - जे - आश्चर्यं - आश्चर्य - आसीत् - झाले - सत् - ते - मे - माझ्याकडून - निबोध - जाण. ॥१७॥
अशा प्रकारे दिवसेंदिवस परीक्षित पांडवांच्या आचरणाचे अनुकरण करीत दिग्विजय करीत होता. त्याच दिवसांत त्याच्या शिबिरापासून थोड्याच अंतरावर एक आश्चर्यकारक घटना घडली ते मी आपल्याला ऐकवितो. (१७)
धर्मः पदैकेन चरन् विच्छायामुपलभ्य गाम् ।
पृच्छति स्माश्रुवदनां विवत्सामिव मातरम् ॥ १८ ॥
वृषभोरूपि तो धर्म एकपायी चले तदा । गाईचे रूप घेवोनि पृथिवी पातली तिथे । पुत्राचा शोक व्हावा तैं अश्रु ते ढाळिता तदा । दिसता कांतिहीनो ती धर्माने पुसले तिला ॥ १८ ॥
एकेन - एकाच - पदा - पायाने - चरन् - चालणारा - धर्मः - धर्म - विच्छायां - निस्तेज अशा - विवत्सां - व जिचे बालक नष्ट झाले आहे अशा - मातरं - आई - इव - प्रमाणे - अश्रुवदनां - डोळ्यांतून मुखावर दुःखाश्रू ढाळणार्या - गां - गाईला - उपलभ्य - भेटून - पृच्छति स्म - विचारू लागला. ॥१८॥
बैलाचे रूप धारण करून धर्म एका पायावर चालत होता. एके ठिकाणी त्याला गायीच्या रूपात पृथ्वी भेटली. पुत्राच्या मृत्यूच्या दुःखाने माता जशी दुःखी होते, त्याप्रमाणे गायीच्या नेत्रांतून अश्रू वाहात होते. तिचे शरीर निस्तेज दिसत होते. धर्माने पृथ्वीस विचारले, (१८)
धर्म उवाच ।
कच्चिद्भद्रेऽनामयमात्मनस्ते विच्छायासि म्लायतेषन्मुखेन । आलक्षये भवतीमन्तराधिं दूरे बन्धुं शोचसि कञ्चनाम्ब ॥ १९ ॥
धर्म म्हणाला - (इंद्रवजा) देवी अशी दुःखि कशामुळे तू । तू कांतिहीना दिसली मला गे । बंधू कुणी दूर् निघोनि गेला ? म्हणोनि ऐसी दिससी उदास ॥ १९ ॥
भद्रे - हे कल्याणकारिणी गाई - ते - तुझे - आत्मनः - स्वतःचे - अनामयं - आरोग्य - कच्चित् - आहे ना - ईषत् - किंचित - म्लायता - म्लान अशा - मुखेन - मुखाने - विच्छाया - निस्तेज अशी - असि - आहेस - अम्ब - हे गोमाते - भवतीं - तुला - अन्तराधिं - मानसिक पीडेने युक्त अशी - आलक्षये - पाहतो - कञ्चन - कोणत्या - दूरे - लांब असणार्या - बन्धुं - बंधूबद्दल - शोचसि - शोक करितेस ? ॥१९॥
धर्म म्हणाला - हे कल्याणि, तू सुखरूप आहेस ना ? तुझे मुख म्लान झाले आहे. तू निस्तेज झाली आहेस. तुझ्या मनात काहीतरी सलत आहे, असे वाटते. आई, तुझे कोणी स्नेही दूरदेशी गेले आहेत आणि त्यांची तू चिंता करीत आहेस काय ? (१९)
पादैर्न्यूनं शोचसि मैकपादं
आत्मानं वा वृषलैर्भोक्ष्यमाणम् । आहो सुरादीन् हृतयज्ञभागान् प्रजा उत स्विन्मघवत्यवर्षति ॥ २० ॥
का तू करीशी मम काळजी ती माझे तिन्ही पाय तुटोनि जाता । का शासिती शूद्र म्ह्णोनि दुःखी ना यज्ञ नाऽहूति दुर्भिक्ष आले ॥ २० ॥
पादैः - पायांनी - न्यूनं - कमी अशा - एकपादं - एकच पाय आहे ज्याला अशा - मा - माझ्याबद्दल - वा - किंवा - वृषलैः - शूद्रांनी - भोक्ष्यमाणां - उपभोगिल्या जाणार्या - आत्मानं - स्वतःबद्दल - अहोस्वित् - किंवा - हृतयज्ञभागान् - नष्ट झाले आहेत यज्ञीय हविर्भाग ज्यांचे अशा - सुरादीन् - देवादिकांबद्दल - उत - किंवा - मघवति अवर्षति - इंद्र पाऊस पाडीत नसल्यामुळे - प्रजाः - प्रजेबद्दल - शोचसि - शोक करितेस ? ॥२०॥
माझे तीन पाय तुटले आणि एकच राहिला, म्हणून तू माझीच चिंता करीत नाहीस ना ? शूद्र तुझ्यावर आता शासन करतील यासाठी तू शोक करीत आहेस का ? ज्यांना आता यज्ञामध्ये आहुती दिली जात नाही, त्या देवतांसाठी तुला खेद होत आहे का ? किंवा पाऊस न पडल्यामुळे त्रस्त झालेल्या प्रजेसाठी तर तू खेद करीत नाहीस ना ? (२०)
अरक्ष्यमाणाः स्त्रिय उर्वि बालान्
शोचस्यथो पुरुषादैरिवार्तान् । वाचं देवीं ब्रह्मकुले कुकर्मणि अब्रह्मण्ये राजकुले कुलाग्र्यान् ॥ २१ ॥
त्रासोनि गेल्या अबला सती त्या कुकर्मि विप्रास मिळोनि विदया । विप्रास द्वेषी जरि दुष्ट राजा ते ज्ञानि विप्रो स्तुति गाति त्यांची ॥ २१ ॥
उर्वि - हे गोरूपधारिणी पृथ्वी - अरक्ष्यमाणाः - रक्षण न केल्या जाणार्या - स्त्रियः - स्त्रियांना उद्देशून - अथः - नंतर - पुरुषादैः - मनुष्यांना खाणार्या राक्षसादिकांकडून - आर्तान् - पीडिलेल्या - इव - प्रमाणे - बालान् - बालकांना उद्देशून - कुकर्माणि - वाईट कर्मे करणार्या - ब्रह्मकुले - ब्राह्मणकुळातील - देवी - प्रकाशरूप - वाचं - वेदवाणीला उद्देशून - अब्रह्मण्ये - ब्राह्मणांचे कल्याण न करणार्या - राजकुले - क्षत्रियकुलात - कुलाग्र्यान् - कुलीनांना उद्देशून - शोचसि - शोक करितेस ? ॥२१॥
हे पृथ्वी, राक्षसांसारखे वर्तन असणार्या माणसांकडून अरक्षित स्त्रिया आणि पीडित बालके यांच्यासाठी तू शोक करीत आहेस काय ? निषिद्ध कर्म करणार्या ब्राह्मणांच्या हाती विद्या पडली आहे आणि ब्राह्मणद्रोही राजांची सेवा करण्यात ब्राह्मण गुंतले आहेत, याचे तुला दुःख होत आहे काय ? (२१)
किं क्षत्रबन्धून् कलिनोपसृष्टान्
राष्ट्राणि वा तैरवरोपितानि । इतस्ततो वाशनपानवासः स्नानव्यवायोन्मुखजीवलोकम् ॥ २२ ॥
राजे तसे नाममात्रीच झाले त्या नागवीले कलिनेचि सर्व । खाणे पिणे स्नान विचित्र वस्त्रे स्वेच्छे प्रमाणे जन वागती ते ॥ २२ ॥
कलिना - कलिकालाने - उपसृष्टान् - व्यापून गेलेल्या - क्षत्रबन्धून् - अधम क्षत्रियांबद्दल - वा - किंवा - तैः - त्यांनी - अवरोपितानी - विध्वस्त केलेल्या - राष्ट्राणि - राज्यांबद्दल - वा - किंवा - इतस्ततः - जिकडे तिकडे - अशनपानवासःस्नान - खाणे, पिणे, चांगली वस्त्रे वापरणे, सुगंधी उटया लावून नेहमी स्नान करणे, - व्यवायोन्मुखजीवलोकं - परस्त्रीगमन वगैरे चैनीची कार्ये करण्यात दंग झालेल्या प्राणिमात्राबद्दल - किं - काय ? ॥२२॥
आजकालचे नाममात्र राजे संपूर्णपणे कलियुगी प्रवृत्तीचे झाले आहेत, त्यांनी मोठमोठे देश उजाड केले आहेत. आजकालचे लोक तर खाणे-पिणे, स्नान आणि स्त्रीसहवास इत्यादींमध्ये शास्त्रीय नियमांचे पालन न करता स्वैराचारी झाले आहेत, त्यांच्यासाठी तू दुःखी आहेस काय ? (२२)
यद्वाम्ब ते भूरिभरावतार
कृतावतारस्य हरेर्धरित्रि । अन्तर्हितस्य स्मरती विसृष्टा कर्माणि निर्वाणविलम्बितानि ॥ २३ ॥
आई मला ते समजोनि आले तो कॄष्ण गेला निघुनि म्हणोनि । आता न कोणी तव भार घेण्या म्हणोनि तू दुःखि गमे मला गे ॥ २३ ॥
अम्ब - हे माते - धरित्री - पृथ्वी ! - यद्वा - किंवा - ते - तुझ्यावरील - भूरिभरावतारकृतावतारस्य - मोठया भाराला दूर करण्याकरिता अवतार घेतलेल्या - अन्तर्हितस्य - व निजधामाला गेलेल्या - हरेः - श्रीकृष्णाची - निर्वाणविडम्बितानि - मोक्षालाही तुच्छ करणारी - कर्माणि - कर्मे - स्मरती - स्मरणारी - विसृष्टा - सोडली गेली. ॥२३॥
हे माते पृथ्वी, भगवान श्रीकृष्णांनी तुझा भार नाहीसा करण्यासाठी अवतार घेऊन मोक्षाला कारणीभूत लीला केल्या आणि अन्तर्धान पावून तुझा त्याग केला, त्यांची तुला आठवण येते काय ? (२३)
इदं ममाचक्ष्व तवाधिमूलं
वसुन्धरे येन विकर्शितासि । कालेन वा ते बलिनां बलीयसा सुरार्चितं किं हृतमम्ब सौभगम् ॥ २४ ॥
तूं द्रव्य रत्नासहि जन्म देंसी का दुर्बला तू मज सांग कानी । जो काळ तो त्या बळिसीहि दंडी सौभाग्य तेणे हरिले तुझॆ कां ॥ २४ ॥
अम्ब - हे माते - वसुन्धरे ! - पृथ्वी - वा - किंवा - बलिनां - बलाढयात - बलीयसा - बलाढय अशा - कालेन - कालाने - सुरार्चितं - देवांनी पूजिलेले - ते - तुझे - सौभगं - सौंदर्य - हृतं - हरण केले - किं - काय - येन - ज्यामुळे - विकर्शिता - फारच कृश झालेली - असि - आहेस - इदं - हे - तव - तुझे - आधिमूलं - मानसिक दुःख होण्याचे कारण - मम - मला - समाचक्ष्व - सांग. ॥२४॥
हे वसुंधरे, तू ज्यामुळे इतकी दुर्बल झाली आहेस, त्या तुझ्या दुःखाचे कारण मला सांग. असे वाटते की, बलवांनाही नेस्तनाबूत करणार्या या काळाने, देवतांनाही वंदनीय असे तुझे सौभाग्य हिरावून घेतले काय ? (२४)
धरण्युवाच ।
भवान् हि वेद तत्सर्वं यन्मां धर्मानुपृच्छसि । चतुर्भिर्वर्तसे येन पादैर्लोकसुखावहैः ॥ २५ ॥ सत्यं शौचं दया क्षान्तिः त्यागः सन्तोष आर्जवम् । शमो दमस्तपः साम्यं तितिक्षोपरतिः श्रुतम् ॥ २६ ॥ ज्ञानं विरक्तिरैश्वर्यं शौर्यं तेजो बलं स्मृतिः । स्वातन्त्र्यं कौशलं कान्तिः धैर्यं मार्दवमेव च ॥ २७ ॥ प्रागल्भ्यं प्रश्रयः शीलं सह ओजो बलं भगः । गाम्भीर्यं स्थैर्यमास्तिक्यं कीर्तिर्मानोऽनहङ्कृतिः ॥ २८ ॥ एते चान्ये च भगवन् नित्या यत्र महागुणाः । प्रार्थ्या महत्त्वमिच्छद्भिः नर्न वियन्ति स्म कर्हिचित् ॥ २९ ॥ तेनाहं गुणपात्रेण श्रीनिवासेन साम्प्रतम् । शोचामि रहितं लोकं पाप्मना कलिनेक्षितम् ॥ ३० ॥
धरणी म्हणाली - ( अनुष्टुप् ) तुम्ही जे पुसले सारे ते तो माहीत की तुम्हा । चौपाये जगता देता सौख्य ते भगवत कॄपें ॥ २५ ॥ पविता दया त्याग संतोष स्वच्छ ते मन । शम दमो तपो क्षेम सत्य नी समता तशी ॥ २६ ॥ तितिक्षा शास्त्र वैराग्य तेज बल नि वीरता । स्वातंत्र्य ज्ञान नैराश्य कौशल्य स्मृति वैभव ॥ २७ ॥ कोमलाकांति धैर्यादी निर्भिक नम्र शीलता । सौग्य स्थिरता आणि गंभीर आस्तिकी बल ॥ २८ ॥ निरहंकारि नी कीर्ति उत्साह सगळे असे । एकोणचाळिसी ऐसे अप्राकृतचि हे गुण ॥ २९ ॥ महत्वाकांक्षि ते लोक वांछनीयचि वागती । तयंचा आश्रायो कृष्ण गेल्याने दुःख हे मला ॥ ३० ॥
धर्म - हे धर्मा - यत् - जे - मां - मला - अनुपृच्छसि - विचारतोस - तत् - ते - सर्वं - सगळे - हि - खरोखर - भवान् - आपण - वेद - जाणत आहा - येन - ज्यामुळे - लोकसुखावहैः - लोकांना सुख देणार्या - चतुर्भिः - चार - पादैः - पायांनी - वर्तसे - राहतोस. ॥२५॥
भगवन् - हे सर्वगुणसंपन्न धर्मा - सत्यं - सत्य - शौचं - शुद्धता - दया - कृपा - क्षांति - सहनशीलता - त्यागः - सर्वसंगपरित्याग - संतोषः - आनंद - आर्जवं - सरलता - शमः - शान्ति - दमः - इंद्रियनिग्रह - तपः - तपश्चर्या - साम्यं - समबुद्धि - तितिक्षा - क्रोध न करणे - उपरतिः - उदासीनपणा - श्रुतं - शास्त्रश्रवण - ज्ञानं - आत्मज्ञान - विरक्तिः - वैराग्य - ऐश्वर्यं - मुबलकता - शौर्यं - पराक्रम - तेजः - तेज - बलं - सामर्थ्य - स्मृतिः - आठवण - स्वातन्त्र्यं - स्वातंत्रता - कौशलं - नैपुण्य - कान्तिः - सौंदर्य - धैर्यं - धैर्य - च - आणि - मार्दवं - मृदुपणा - एव - सुद्धा - प्रागल्भ्यं - प्रौढपणा - प्रश्रयः - नम्रता - शीलं - स्वभाव - सहः - मानसिक शक्ति - ओजः - बुद्धीची शक्ति - बलं - शारीरिक शक्ति - भगः - विषयसेवनाची शक्ति - गांभीर्यं - गंभीरपणा - स्थैर्यं - स्थिरपणा - आस्तिक्यं - श्रद्धा - कीर्तिः - कीर्ति - मानः - पूज्यता - अनहंकृतिः - अहंकाररहित - एते - हे - च - आणि - अन्ये - दुसरे - महत्त्वं - मोठेपणाला - इच्छद्भिः - इच्छिणार्यांनी - प्रार्थ्याः - प्रार्थना करण्याजोगे - महागुणाः - मोठमोठे गुण - यत्र - ज्या श्रीकृष्णाचे ठिकाणी - नित्याः - नित्य राहात असत - कर्हिचित् - कधीही - न वियन्ति स्म - नाश पावले नाहीत - अहं - मी - सांप्रतं - हल्ली - तेन - त्या - गुणपात्रेण - सर्व गुणांना लायक अशा - श्रीनिवासेन - व जेथे लक्ष्मी वास करिते अशा श्रीकृष्णाने - रहितं - टाकलेल्या - पाप्मना - व पापी - कलिना - कलीने - ईक्षितं - अवलोकिलेल्या - लोकं - लोकाबद्दल - शोचामि - शोक करते. ॥२६-३०॥
पृथ्वी म्हणाली - हे धर्मा ! तू आता मला जे काही विचारीत आहेस, ते तुला सर्व ठाऊक आहे. सत्य, पवित्रता, दया, क्षमा, त्याग, संतोष, सरलता, शम, दम, तप, समता, तितिक्षा, उपरती, शास्त्रविचार, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, वीरता, तेज, बल, स्मृती, स्वतंत्रता, कौशल्य, कांती, धैर्य, कोमलता, निर्भीकता, विनय, शील, साहस, उत्साह, बल, सौभाग्य, गंभीरता, स्थिरता, आस्तिकता, कीर्ति, गौरव आणि निरहंकारिता या एकोणचाळीस सहज गुणांनी युक्त अशा चारी चरणांद्वारा तू सर्व संसाराला सुखी करीत होतास. वरील गुणांखेरीज महत्त्वाकांक्षी ज्यांची इच्छा करतात, असे अन्य पुष्कळ गुण भगवंतांची सेवा करण्यासाठी त्यांच्या ठायी नित्य वास करतात. त्या सर्व गुणांचे आश्रयस्थान असलेले, सौंदर्यधाम असे भगवान श्रीकृष्ण यांनी यावेळी ही सृष्टी रहित झाली असून पापमय कलियुगाच्या वाईट नजरेची शिकार बनली आहे. हे पाहून मला फार दुःख होत आहे. (२५-३०)
आत्मानं चानुशोचामि भवन्तं चामरोत्तमम् ।
देवान् पितॄन् ऋषीन् साधून् सर्वान् वर्णांस्तथाश्रमान् ॥ ३१ ॥
मी माझ्या नी तुझ्या साठी मनुष्यवर्ण-आश्रम । पितरे देवता साधूं करिता शोकग्रस्त की ॥ ३१ ॥
आत्मानं - स्वतःबद्दल - च - आणि - भवन्तं - तुमच्याबद्दल - च - आणि - अमरोत्तमं - देवश्रेष्ठ - देवान् - देवांबद्दल - पितृन् - पितरांबद्दल - ऋषीन् - ऋषींच्या बाबतीत - साधून् - सत्पुरुषांच्या बाबतीत - सर्वान् - संपूर्ण - वर्णान् - ब्राह्मणादि चार वर्णाविषयी - तथा - तसेच - आश्रमान् - ब्रह्मचर्यादि चार आश्रमांविषयी - अनुशोचामि - शोक करते. ॥३१॥
स्वतःसाठी, सर्व देवता श्रेष्ठ असणार्या तुझ्यासाठी तसेच देवता, पितर, ऋषी, साधू आणि सर्व वर्णाश्रमांच्या मनुष्यांसाठी मला दुःख होत आहे. (३१)
ब्रह्मादयो बहुतिथं यदपाङ्गमोक्ष ।
कामास्तपः समचरन् भगवत्प्रपन्नाः । सा श्रीः स्ववासमरविन्दवनं विहाय । यत्पादसौभगमलं भजतेऽनुरक्ता ॥ ३२ ॥ तस्याहमब्जकुलिशाङ्कुशकेतुकेतैः । श्रीमत्पदैर्भगवतः समलङ्कृताङ्गी । त्रीनत्यरोच उपलभ्य ततो विभूतिं । लोकान् स मां व्यसृजद् उत्स्मयतीं तदन्ते ॥ ३३ ॥
(वसंततिलका) ज्याचा कटाक्ष मिळण्यासहि देव सारे । ध्याती तपे करुनिया अन ती रमा ही । सोडी निवास कमळो पद सेवि नित्य सून्हि पाय मजला परि तेचि गेले ॥ ३२ ॥ सौभाग्य ते सरुनि वैभवही निमाले दुर्भागि मीचि भगवान् मजला त्यजी तो । ’सौभाग्य’ हा मजमनीं हरण्यास गर्व दंडीयले मज गमे दुसरे न काही ॥ ३३ ॥
यदपाङगमोक्षकामाः - ज्याच्या कृपाकटाक्षाला इच्छिणार्या - ब्रह्मादयः - ब्रह्मदेवादि - बहुतिथं - पुष्कळ दिवस - तपः - तपश्चर्येला - समचरन् - करिते झाले - भगवत्प्रपन्ना - सर्वगुणसंपन्न पुरुषांनी म्हणजे थोर पुरुषांनी जिचा आश्रय केला आहे अशी - सा - ती - श्रीः - लक्ष्मी - स्ववासं - स्वतःचे राहाण्याचे ठिकाण अशा - अरविन्दवनं - कमलसमूहाला - विहाय - सोडून - यत्पादसौभगं - ज्या श्रीकृष्णाच्या पायांच्या सौंदर्याला - अनुरक्ता - लुब्ध होऊन म्हणजे प्रेम करून - अलं - यथेच्छ - भजते - सेविते. ॥३२॥
तस्य - त्या - भगवतः - श्रीकृष्णाच्या - अब्जकुलिशाङगुशकेतुकेतैः - कमल, वज्र, अंकुश व ध्वज ही चिन्हे असलेल्या - श्रीमत्पदैः - शोभणार्या पायांनी - समलङ्कृताङगि - जिची अंगे भूषित झाली आहेत अशी - अहं - मी - ततः - त्यापासून - विभूतिं - ऐश्वर्याला - उपलभ्य - मिळवून - त्रीन् - तीन - लोकान् - लोकांना - अत्यरोचे - तुच्छ लेखून अधिक शोभत होते - तदन्ते - सरते शेवटी - सः - तो श्रीकृष्ण - उत्स्मयन्तीं - श्रेष्ठपणाबद्दल गर्व करणार्या - मां - मला - व्यसृजत् - सोडिता झाला. ॥३३॥
लक्ष्मीचा कृपाकटाक्ष प्राप्त करण्यासाठी ब्रह्मा आदि देवता भगवंतांना शरण जाऊन पुष्कळ दिवसपर्यंत तपश्चर्या करीत; परंतु तीच लक्ष्मी आपले निवासस्थान असलेल्या कमलवनाचा त्याग करून मोठ्या प्रेमाने भगवंतांच्या ज्या चरणकमलांच्या सौभाग्ययुक्त छत्रछायेचा आश्रय घेते, त्याच भगवंतांच्या कमल, वज्र, अंकुश, ध्वज आदि चिह्नांनी युक्त असलेल्या श्रीचरणांनी मी विभूषित झालेली असल्याने मला मोठेच वैभव प्राप्त झाले होते आणि तिन्ही लोकांहून माझे महत्त्व अधिक होते. अभागिनी असलेल्या मला भगवंतांनी सोडून दिले आहे. मला असे वाटते की, माझ्या सौभाग्याचा मला गर्व झाला होता; म्हणून त्यांनी मला दंड केला आहे. (३२-३३)
यो वै ममातिभरमासुरवंशराज्ञाम् ।
अक्षौहिणी शतमपानुददात्मतन्त्रः । त्वां दुःस्थमूनपदमात्मनि पौरुषेण । सम्पादयन् यदुषु रम्यमबिभ्रदङ्गम् ॥ ३४ ॥
झाले तुझे चरण तीन अपंग तेणे दुःखी मनीं बघुनि श्रीहरि येथ जन्मे । तो श्यामसुंदर असा यदुवंशि आला स्वयं म्हणोनि सगळ्या वधि राक्षसाला ॥ ३४ ॥
आत्मतंत्रः - स्वतंत्र असा - यः - जो श्रीकृष्ण - वै - खरोखर - मम - मला - अतिभरं - फारच भारभूत झालेल्या - आसुरवंशराज्ञां - दैत्यवंशातील राजांच्या - अक्षौहिणीशतं - शंभर अक्षौहिणी सैन्याला - अपानुदत् - मारून टाकता झाला. - ऊनपदं - कमी झाले आहेत पाय ज्याचे अशा - दुःस्थं - दुःखस्थितीत लोळणार्या - त्वां - तुला - पौरुषेण - स्वपराक्रमाने - आत्मनि - आत्म्यात - संपादयन् - संपादन करणारा असा होत्साता - यदुषु - यादव कुळात - रम्यं - सुंदर - अङगं - शरीराला - अबिभ्रत् - धरिता झाला. ॥३४॥
आपले तीन पाय नष्ट झाल्याने तू मनातून कुढत होतास. म्हणून आपल्या पुरुषार्थाने तुला आपल्यामध्येच परिपूर्ण आणि स्वस्थ करण्यासाठी ते अत्यंत रमणीय असे श्यामसुंदराचे रूप घेऊन यदुवंशात प्रगट आणि असुरवंशी राजांच्या शेकडो अक्षौहिणी सैन्याच्या रूपाने माझ्यावर असणारा भार त्यांनी नष्ट केला. कारण ते स्वतः अगदी स्वतंत्र होते. (३४)
का वा सहेत विरहं पुरुषोत्तमस्य ।
प्रेमावलोक रुचिरस्मित वल्गुजल्पैः । स्थैर्यं समानमहरन् मधुमानिनीनां । रोमोत्सवो मम यदङ्घ्रि विटङ्कितायाः ॥ ३५ ॥
स्नेहार्द्र दॄष्टि बघुनी स्मित हास्य बोले भाभादि मानिनि तशा हरिल्या स्वतेजे । त्या राहिल्या जवळि ते पद सेविण्याला तो कॄष्णदुःखविरहो वद कोण साही ॥ ३५ ॥
वा - किंवा - प्रेमावलोकरुचिरस्मितवल्गुजल्पैः - प्रेमाने पाहणे, सुंदर मंदहास्य, मधुर भाषणे यांच्या योगे - मधुमानिनां - मधुकुलातील स्त्रियांच्या - समानं - अभिमानासह - स्थैर्यं - स्थिरपणाला - अहरत् - हरण करिता झाला. - यदङ्घ्रिविटङ्कितायाः - ज्याच्या पादकमलाने शोभणार्या - मम - माझ्यावर - रोमोत्सवः - रोमांच उत्पन्न होत - पुरुषोत्तमस्य - अशा श्रीकृष्णाच्या - विरहं - वियोगाला - का - कोणती स्त्री - सहेत - सहन करील ॥३५॥
ज्यांनी आपल्या स्नेहार्द्र दृष्टीने, मधुर हास्याने आणि गोड शब्दांनी सत्याभामा इत्यादि मधु-मधुर मानीनींच्या मानाबरोबर त्यांचे धैर्यही नाहीसे केले होते आणि ज्यांच्या चरणकमलांच्या स्पर्शाने मी सदैव रोमांचित होत असे, त्या पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा विरह कोणाला सहन होईल बरे ? (३५)
तयोरेवं कथयतोः पृथिवीधर्मयोस्तदा ।
परीक्षिन्नाम राजर्षिः प्राप्तः प्राचीं सरस्वतीम् ॥ ३६ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे पृथिवीधर्मसंवादो नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
( अनुष्टुप् ) धर्म नी पृथिवी यांचा संवाद चालता असा । सरस्वती तटी तेंव्हा परिक्षित् पातला असे ॥ ३६॥ इति श्रीमद्भगवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥सोळावा अध्याय हा ॥ १ ॥ १६ ॥ हरि ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
तयोः - ते - पृथिवीधर्मयोः - पृथ्वी व धर्म - एवं - याप्रमाणे - कथयतोः - एकमेकाला सांगत असताना - तदा - त्या वेळी - परीक्षित् - परीक्षित - नाम - नाव असणारा - राजर्षिः - राजर्षि - प्राचीं - पूर्व दिशेकडे वाहत जाणार्या - सरस्वतीं - सरस्वती नदीला - प्राप्तः - प्राप्त झाला. ॥३६॥
धर्म आणि पृथ्वी यांचा याप्रकारे आपापसात संवाद चालू असतानाच राजर्षी परीक्षित पूर्ववाहिनी सरस्वती नदीच्या तटावर येऊन पोहोचला. (३६)
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां |