श्रीमद् भागवत पुराण
प्रथमः स्कन्धः
पञ्चदशोऽध्यायः

अर्जुनाद् यदुकुलसंहारं भगवतस्तिरोधानं च
श्रुत्वा पाण्डवानां हिमालयदिशिमहाप्रयाणम् -

कृष्णविरहाने व्यथित पांडवांचे परीक्षिताला राज्य देऊन स्वर्गारोहण -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


सूत उवाच ।
एवं कृष्णसखः कृष्णो भ्रात्रा राज्ञा विकल्पितः ।
नानाशङ्‌कास्पदं रूपं कृष्णविश्लेषकर्शितः ॥ १ ॥
शोकेन शुष्यद् वदन हृत्सरोजो हतप्रभः ।
विभुं तमेवानुध्यायन् नाशक्नोत् प्रतिभाषितुम् ॥ २ ॥
सूतजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
भगवंतसखा पार्थ कृष्णाच्या विरहे कृश ।
जाहला असुनी धर्मे नाना प्रश्न विचारले ॥ १ ॥
ह्रदयोपद्म ते त्याचे मुखही सुकले तसे ।
फिका तो चेहरा झाला ध्यानमग्न न बोलला ॥ २ ॥

कृष्णविश्लेषकर्शितः - श्रीकृष्णवियोगाने कृश झालेला - कृष्णसखः - कृष्ण आहे मित्र ज्याचा असा - नानाशङकास्पदं - अनेक शंका घेण्याजोग्या - रूपं - रूपाला पाहून - एवं - याप्रमाणे - भ्रात्रा - भाऊ - राज्ञा - धर्मराजाकडून - विकल्पितः - विविध तर्क केलेला - शोकेन - शोकाने - शुष्यद्वदनहृत्सरोजः - सुकून गेले आहे मुख व हृदयरूपी कमळ ज्याचे असा - हतप्रभः - निस्तेज - कृष्णः - अर्जुन - तम् एव - त्याच - विभुं - श्रीकृष्णाला - अनुध्यायन् - चिंतित - प्रतिभाषितुं - उत्तर देण्याला - न अशक्नोत् - समर्थ झाला नाही. ॥१-२॥
सूत म्हणाले, भगवान श्रीकृष्णांचा प्रिय मित्र अर्जुन आधीच श्रीकृष्णांच्या विरहाने कष्टी झाला होता. त्यात राजा युधिष्ठिरांनी त्याची विषादग्रस्त अवस्था पाहून त्याविषयी अनेक प्रकारच्या शंका उपस्थित करून प्रश्नांची सरबत्ती केली. (१) शोकामुळे आधीच अर्जुनाचे मुख आणि मन सुकून गेले होते. तो भगवान श्रीकृष्णांच्या ध्यानात इतका गढून गेला होता की, आपल्या भावाच्या प्रश्नांची काहीच उत्तरे देऊ शकला नाही. (२)


कृच्छ्रेण संस्तभ्य शुचः पाणिनाऽऽमृज्य नेत्रयोः ।
परोक्षेण समुन्नद्ध प्रणयौत्कण्ठ्य कातरः ॥ ३ ॥
सख्यं मैत्रीं सौहृदं च सारथ्यादिषु संस्मरन् ।
नृपमग्रजमित्याह बाष्पगद्‍गदया गिरा ॥ ४ ॥
दृष्टिच्या आड तो कृष्ण गेल्याचे आठवे मनी ।
सारथ्य फिरणे आदी प्रसंगी मित्र जाहला ॥ ३ ॥
अभिन्न राहूनी त्याने प्रेमाने जिंकले सदा ।
पुनःपुन्हा स्मरे सारे कष्टाने शोक रोधिता ।
हाताने पुसले अश्रु बंधुराजास बोलला ॥ ४ ॥

कृच्छ्रेण - कष्टाने - शुचं - शोकाला - संस्तभ्य - आवरून - पाणिना - हाताने - नेत्रयोः - नेत्रांना - आमृज्य - पुसून - परोक्षेण - दृष्टीआड झाल्यामुळे - समुन्नद्धप्रणयौत्कण्ठयकातरः - फार प्रेमाच्या उत्कंठेने व्याकुळ झालेला - सारथ्यादिषु - सारथ्य वगैरे कृत्यांत - सख्यं - सहवासाला - मैत्रीं - मित्रत्वाला - च - आणि - सौहृदं - साधुत्वाला - संस्मरन् - स्मरणारा - बाष्पगद्‌गदया - अश्रूंनी सद्‌गदित झालेल्या - गिरा - वाणीने - अग्रजं - ज्येष्ठ भाऊ अशा - नृपं - धर्मराजाला - इति - याप्रमाणे - आह - बोलला. ॥३-४॥
आपल्या दृष्टीपासून श्रीकृष्ण दूर झाल्याकारणाने अर्जुन वाढत चाललेल्या प्रेमाच्या उत्कंठेने व्याकूळ झाला होता. रथ हाकणे, फिरावयास जाणे इत्यादि वेळी भगवंतांच्या बरोबर जी मित्रता, अभिन्नहृदयता आणि प्रेमयुक्त व्यवहार केले होते, त्यांची त्याला वारंवार आठवण येत होती. मोठ्या कष्टाने त्याने आपला शोक आवरला; हाताने डोळे पुसले आणि सद्‌गदित कंठाने आपले थोरले बंधू युधिष्ठिरांस अर्जुन म्हणाला - (३-४)


अर्जुन उवाच ।
वञ्चितोऽहं महाराज हरिणा बन्धुरूपिणा ।
येन मेऽपहृतं तेजो देवविस्मापनं महत् ॥ ५ ॥
अर्जुन म्हणाला -
नृपा! त्या मृतबंधूने-कृष्णे ठकविले मला ।
देवांना जिंकिले मी तो कृष्णाने लुटिले मला ॥ ५ ॥

महाराज - हे धर्मराजा ! - बन्धुरूपिणा - बंधूप्रमाणे असणार्‍या - हरिणा - श्रीकृष्णाने - अहं - मी - वञ्चितः - फसला गेलो - येन - ज्याने - मे - माझ्या - देवविस्मापनं - देवांना विस्मित करणार्‍या - महत् - मोठया - तेजः - तेजाला - अपहृतं - हरण केले. ॥५॥
अर्जुन म्हणाला - महाराज, माझे मामेभाऊ किंवा अत्यंत घनिष्ठ मित्र असलेल्या श्रीकृष्णांना मी मुकलो आहे. देवांनाही आश्चर्यचकित करणारा माझा पराक्रम श्रीकृष्णांनी माझ्यापासून काढून घेतला आहे. (५)


यस्य क्षणवियोगेन लोको ह्यप्रियदर्शनः ।
उक्थेन रहितो ह्येष मृतकः प्रोच्यते यथा ॥ ६ ॥
जीवाविना तनू जैसी मेला तो म्हणती तया ।
कृष्णक्षणावियोगाने विश्व तै मृत भासते ॥ ६ ॥

यथा - ज्याप्रमाणे - हि - खरोखर - एषः - हा लोक - उक्थेन - प्राणाने - रहितः - वियुक्त झालेला - मृतकः - मेलेला असे - प्रोच्यते - बोलला जातो - यस्य - ज्या श्रीकृष्णाच्या - क्षणवियोगेन - एक क्षणभर झालेल्या वियोगाने - लोकः - जग - हि - खरोखर - अप्रियदर्शनः - प्रेताप्रमाणे वाईट दिसणारे झाले. ॥६॥
प्राण निघून गेल्यावर जसे हे शरीर मृत म्हणून ओळखले जाते, तसेच त्यांच्या एका क्षणाच्या वियोगानेही हे जग असुंदर वाटू लागते. (६)


यत् संश्रयाद् द्रुपदगेहमुपागतानां
     राज्ञां स्वयंवरमुखे स्मरदुर्मदानाम् ।
तेजो हृतं खलु मयाभिहतश्च मत्स्यः
     सज्जीकृतेन धनुषाधिगता च कृष्णा ॥ ७ ॥
(वसंततिलका)
त्या द्रूपदाघरि जधी मदनांग राजे
    स्वयंवरास जमता हरिले तसे मी ।
ही द्रौपदीहि जितिली मिनवेध घेता ।
    ते आश्रयेचि घडले भगवत्‌ कृपेने ॥ ७ ॥

यत्संश्रयात् - ज्याच्या आश्रयामुळे - मया - माझ्याकडून - स्वयंवर मुखे - स्वयंवराच्या मुख्य ठिकाणी - द्रुपदगेहं - द्रुपदराजाच्या गृहाला - उपागतानां - आलेल्या - स्मरदुर्मदानां - गर्वाने म्दोन्मत्त झालेल्या - राज्ञोः - राजांचे - तेजः - सामर्थ्य - हृतं - हरण केले गेले - च - आणि - खलु - खरोखर - सज्जीकृतेन - सज्ज केलेल्या - धनुषा - धनुष्याने - मत्स्यः - मत्स्य - अभिहृतः - विद्ध केला गेला - च - आणि - कृष्णा - द्रौपदी - अधिगता - मिळविली गेली. ॥७॥
त्यांच्याच आश्रयामुळे द्रौपदीस्वयंवराच्या वेळी द्रुपदाच्या घरी आलेल्या कामोन्मत्त राजांचे तेज मी हिरावून घेतले होते. धनुष्याला बाण लावून मत्स्यवेध केला आणि द्रौपदीला प्राप्त करून घेतले. (७)


यत्सन्निधावहमु खाण्डवमग्नयेऽदां
     इन्द्रं च सामरगणं तरसा विजित्य ।
लब्धा सभा मयकृताद्‍भुतशिल्पमाया
     दिग्भ्योऽहरन्नृपतयो बलिमध्वरे ते ॥ ८ ॥
राहोनि सन्निध तया हरिलेहि इंद्रा
    अग्नीस तृप्त करण्या वन दान केले ।
ती राक्षसी मयसभा घरि आणिली मी
    यज्ञीं नृपेहि सगळ्या मज गौरवीले ॥ ८ ॥

उ - आणि - यत्सन्निधौ - जो जवळ असताना - अहं - मी - सामरगणं - देवगणांसह - इंद्रं - इंद्राला - तरसा - आवेशाने - विजित्य - जिंकून - अग्नये - अग्नीला - खाण्डवं - खांडववन - अदाम् - दिले - च - आणि - मयकृता - मयासुराने केलेली - अद्‌भुतशिल्पमाया - आश्चर्यजनक कलाकौशल्याने युक्त असल्यामुळे मोह उत्पन करणारी - सभा - सभा - लब्धा - मिळविली - नृपतयः - राजे - अध्वरे - यज्ञात अर्थात राजसूय यज्ञात - ते - तुला - बलिं - नजराणे - दिग्भ्यः - दाही दिशांकडून - अहरन् - देते झाले. ॥८॥
त्यांच्या केवळ सान्निध्यामुळे मी सर्व देवतांसह इंद्राला आपल्या बलाने जिंकून अग्नीला तृप्त करण्यासाठी त्याला खांडव-वन दिले आणि मय नावाच्या दानवाने निर्माण केलेली कलाकुसरयुक्त अशी मायामय सभा प्राप्त केली. तसेच आपल्या यज्ञामध्ये सर्व दिशांतून राजे लोकांनी येऊन अनेक प्रकारच्या भेटी आपल्याला अर्पण केल्या. (८)


यत्तेजसा नृपशिरोऽङ्‌घ्रिमहन्मखार्थ
     आर्योऽनुजस्तव गजायुतसत्त्ववीर्यः ।
तेनाहृताः प्रमथनाथमखाय भूपा
     यन्मोचितास्तदनयन् बलिमध्वरे ते ॥ ९ ॥
हत्ती हजार सम तो भिम शक्ति योगे
    माथीं पदेचि चलला जणु राजियांच्या ।
नी मारिले मगधच्या असुराहि मत्त
    यज्ञोबली मधुनिया नृप वाचविले ॥ ९ ॥

यत्तेजसा - ज्यांच्या तेजाने - आर्यः - श्रेष्ठ - गजायुतसत्त्ववीर्यः - दहा हजार हत्तींप्रमाणे उत्साह व सामर्थ्य आहे ज्याचा असा - तव - तुझा - अनुजः - धाकटा भाऊ अर्थात भीम - मखार्थे - यज्ञाकरिता - नृपशिरोङ्‌घ्रि - राजांच्या मस्तकावर पाय देणार्‍याला - अहन् - मारिता झाला. - यत् - ज्यामुळे - तेन - त्याने - प्रमथनाथमखाय - महाभैरवाला बळी देण्याकरिता - आहृताः - आणलेले - भूपाः - राजे - मोचिताः - सोडविले - तत् - त्यामुळे - ते - तुझ्या - अध्वरे - यज्ञात - बलिं - नजराण्यांना - अनयन् - आणिते झाले. ॥९॥
दहा हजार हत्तींची शक्ती आणि पराक्रम असलेल्या भीमसेन या आपल्या धाकट्या व माझ्या थोरल्या भावाने त्यांच्याच सामर्थ्याने यज्ञासाठी राजांच्या मस्तकावर पाय ठेवणार्‍या गर्विष्ठ जरासंधाचा वध केला होता. ज्या राजांना जरासंधाने महाभैरव यज्ञामध्ये बळी देण्यासाठी म्हणून बंदीवान केले होते, त्या अनेक राजांना भीमाने मुक्त केल्यामुळे त्या सर्व राजांनी आपल्या यज्ञात अनेक प्रकारच्या भेटी आणून दिल्या होत्या. (९)


पत्‍न्यास्तवाधिमखकॢप्तमहाभिषेक
     श्लाघिष्ठचारुकबरं कितवैः सभायाम् ।
स्पृष्टं विकीर्य पदयोः पतिताश्रुमुख्या
     यस्तत्स्त्रियोऽकृत तेशविमुक्तकेशाः ॥ १० ॥
पत्‍नीकचास कर दुष्ट सभेत लावी ।
    ती पांगल्या कचसवे हरिपाद ध्यायी ॥
कृष्णे मनात गिळिला अवमान सारा ।
    नी दुष्ट सर्व वधिले हि अवकृपेने ॥
केला जसा पण तये परिपूर्ण केला ।
    झाल्या समस्त विधवा मग बायका त्या ॥
सोडोनि केस स्वकरे जगती जगीं या ।
    झाली पवित्र मग द्रुपदी सुकेशा ॥ १० ॥

अधिमख - राजसूय यज्ञांत झालेल्या - क्लृप्तमहाभिषेकश्लाधिष्ठचारुकबरं - अभिषेकामुळे ज्याला फारच महत्त्व प्राप्त झाले आहे अशा सुंदर केशपाशाला - विकीर्य - विस्कळीत करून - सभायां - सभेत - स्पृष्टं - स्पर्श केला - तत्‌स्त्रियः - त्यांच्या स्त्रिया - ह्‌तेशविमुक्तकेशाः - पति मृत झाल्यामुळे केश मोकळे सोडलेल्या अशा - यः - जो - अकृत - करता झाला. ॥१०॥
आपल्या पत्‍नीची राजसूय यज्ञात केलेल्या महाभिषेकाने पवित्र झालेली सुंदर वेणी दुष्टांनी भरसभेत सोडून ओढली, तेव्हा श्रीकृष्णांच्या चरणांवर नमस्कार करताना तिच्या डोळ्यातील अश्रू ओघळले. तिचे ते दुःख पाहून त्याच श्रीकृष्णांनी त्या दुष्टांच्या स्त्रियांना वैधव्यामुळे केस सोडावयास भाग पाडले. (१०)


यो नो जुगोप वन एत्य दुरन्तकृच्छ्राद्
     दुर्वाससोऽरिरचितादयुताग्रभुग् यः ।
शाकान्नशिष्टमुपयुज्य यतस्त्रिलोकीं
     तृप्ताममंस्त सलिले विनिमग्नसङ्‌घः ॥ ११ ॥
आम्ही वनात असता ऋषिभोजनाला ।
    दुर्वास सत्व हरिण्या अपवेळि आले ॥
खावोनि पान हरिने पत राखिली तै ।
    झाले सवेचि मनि तृप्त ऋषी समस्त ॥ ११ ॥

यः - जो - वनं - अरण्याला - एत्य - प्राप्त होऊन - शाकान्नशिष्टं - उरलेल्या भाजीच्या पानाला - उपभुज्य - खाऊन - दुर्वाससः - दुर्वास ऋषींच्या - अरिविहितात् - शत्रूने उपस्थित केलेल्या - दुरन्तकृच्छ्रात् - महासंकटापासून - नः - आम्हाला - जुगोप - रक्षिता झाला - यतः - ज्यायोगे - यः - जो दुर्वास - अयुताग्रभुक् - दहा हजारांबरोबर भोजन करणारा - सलिले - पाण्यात - विनिमग्नसंघः - स्नानार्थ उतरलेला ऋषिसमूह - त्रिलोकीं - त्रैलोक्याला - तृप्तां - संतुष्ट झाल्याप्रमाणे - अमंस्त - मानता झाला. ॥११॥
वनवासात असताना आपला वैरी दुर्योधनाने षड्यंत्र रचून, दहा हजार शिष्यांसह दुर्वास ऋषींना भोजनास पाठवून आपल्याला संकटात टाकले होते. त्यावेळी श्रीकृष्णांनी द्रौपदीच्या थाळीत शिल्लक असलेले भाजीचे एक पान स्वतः खाऊन आमचे रक्षण केले. कारण श्रीकृष्णांनी तसे केल्यानंतर नदीत स्नान करणार्‍या मुनींना असे वाटले की, आपणच काय, सगळे त्रैलोक्य जेवून तृत झाले आहे. (११)


यत्तेजसाथ भगवान् युधि शूलपाणिः
     विस्मापितः सगिरिजोऽस्त्रमदान्निजं मे ।
अन्येऽपि चाहममुनैव कलेवरेण
     प्राप्तो महेन्द्रभवने महदासनार्धम् ॥ १२ ॥
कृष्णकृपेचि हरिले शिवशंकरा मी
    अंबे सहीत मज हो‌उनिया प्रसन्न ।
पाशूपतास्त्र मजला दिधले तयाने
    स्वास्त्रेहि मोद भरुनी दिलि लोकपाले ॥
कृष्णकृपेचि तनुहि असताहि स्वर्गी
    गेलोनि इंद्र बसतो बसलो तिथेही ।
सन्मान आणिक मला मिळला असा जो
    मुद्दाम इंद्र वदला मजला रहाया ॥ १२ ॥

अथ - तसाच - यत्तेजसा - ज्याच्या तेजाने - भगवान् - सर्वगुणसंपन्न - सगिरिजः - पार्वतीसह - शूलपाणिः - शंकर - युधि - युद्धात - विस्मापितः - आश्चर्याने थक्क झालेला - निजं - स्वतःच्या - अस्त्रं - अस्त्राला - मे - मला - अदात् - देता झाला - च - आणि - अन्येऽपि - दुसरे सुद्धा - अहं - मी - अमुना एव - ह्याच - कलेवरेण - शरीराने - महेन्द्रभवने - इंद्रलोकात - महत् - मोठे - आसनार्धं - अर्धे आसन - प्राप्तः - मिळविले. ॥१२॥
त्यांच्या प्रतापानेच मी युद्धामध्ये पार्वतीसह भगवान शंकरांना आश्चर्यचकित केले, तेव्हा त्यांनी आपले पाशुपत नावाचे अस्त्र मला दिले. त्याचबरोबर दुसर्‍या लोकपालांनीही प्रसन्न होऊन आपापली अस्त्रे मला दिली. एवढेच काय, त्यांच्या कृपेने मी याच शरीराने स्वर्गात गेलो आणि इंद्राच्या सभेत त्याच्याबरोबर त्याच्या श्रेष्ठ अर्ध्या आसनावर बसण्याचा मान मिळवला. (१२)


तत्रैव मे विहरतो भुजदण्डयुग्मं
     गाण्डीवलक्षणमरातिवधाय देवाः ।
सेन्द्राः श्रिता यदनुभावितमाजमीढ
     तेनाहमद्य मुषितः पुरुषेण भूम्ना ॥ १३ ॥
माझ्या बघोनि भलत्या धनु गांडिवाते
    इंद्रो निवातकवचा वधण्यास बोले ।
केली विनंति मजला अन आश्रियेले
    ज्याची कृपा अशि, हरी ठकवून गेला ॥ १३ ॥

आजमीढ - हे अजमीढकुलोत्पन्न धर्मराजा ! - सेन्द्राः - इंद्रासह - देवाः - देव - तत्रैव - त्या स्वर्गातच - विहरतः - क्रीडा करणार्‍या - मे - माझ्या - गांडीवलक्षणं - गांडीव धनुष्य धारण करणार्‍या - यदनुभावितं - त्या श्रीकृष्णाच्या कृपेने सामर्थ्यवान बनलेल्या - भुजदण्डयुग्मं - दोन बाहुदण्डांना - अरातिवधाय - शत्रुनाशार्थ - श्रिताः - आश्रय करते झाले - तेन - त्या - भूम्ना - तेजस्वी - पुरुषेण - श्रीकृष्णाने - अद्य - आज - अहं - मी - मुषितः - फ्सविला गेलो. ॥१३॥
मी स्वर्गात काही दिवस राहिलो. तेव्हा इंद्रासह सर्व देवांनी निवातकवच इत्यादी दैत्यांना मारण्यासाथी माझ्या गांडीव धनुष्य धारण केलेल्या बाहुबलाचा आश्रय घेतला. महाराज, हे सर्व ज्यांच्या कृपेचे फळ होते, त्या पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी मला अनाथ केले. (१३)


यद्‍बान्धवः कुरुबलाब्धिमनन्तपारं
     एको रथेन ततरेऽहमतीर्यसत्त्वम् ।
प्रत्याहृतं बहु धनं च मया परेषां
     तेजास्पदं मणिमयं च हृतं शिरोभ्यः ॥ १४ ॥
द्रोणादि भीष्म असली बहुधार सेना
    अजिंक्य थोर मगरी तरण्या समुद्र ।
त्याच्या कृपे तरुनिया सहजेचि गेलो
nbsp;    तो सारथी बनुनिया मज आश्रियेले ॥
ती स्वल्प वाट करिता जितलोहि मीच
     गाई विराटघरच्या अन दागिने ती ।
रत्‍नांकितो मुकुट तो परतोनि आणी
     ज्याची कृपा अशि, हरी फसवोनि गेला ॥ १४ ॥

यद्‌बान्धवः - ज्याच्या आश्रयावर अवलंबून राहिलेला - एकः - एकटा - अहं - मी - अनन्तपारं - ज्याचा अंत व पार नाही अशा - अतीर्यसत्वं - ज्याच्या बलाचे उल्लंघन करता येणारे नाही अशा - कुरुबलाब्धिं - कौरवसैन्यरूपी समुद्राला - रथेन - रथाने - ततरे - तरून गेलो - च - आणि - मया - म्या - परेषां - शत्रूचे - बहुधनं - पुष्कळ द्रव्य - प्रत्याहृतं - हिरावून घेतले - च - आणि - तेजास्पदं - तेजाचे ठिकाणच की काय अशा - मणिमयं - मणिरूपी धनाला - शिरोभ्यः - मस्तकातून - हृतं - हरण केले. ॥१४॥
महाराज, भीष्म-द्रोण इत्यादि पराजित न होणार्‍या अशा महामत्स्यांनी पूर्ण अपार समुद्रासारखी कौरवांची सेना दुस्तर होती; परंतु ज्या बंधूच्या आश्रयाने मी ती सेना पार केली; त्यांच्याच साह्याने मी शत्रूंकडून राजा विराटाच्या सर्व गायी घेऊन आलो होतो. त्याचबरोबर त्यांच्या मस्तकावर चमकणारे रत्‍नमय मुकुट, अंगावरील अलंकारांसह काढून आणले होते. (१४)


यो भीष्मकर्णगुरुशल्यचमूष्वदभ्र
     राजन्यवर्यरथमण्डलमण्डितासु ।
अग्रेचरो मम विभो रथयूथपानां
     आयुर्मनांसि च दृशा सह ओज आर्च्छत् ॥ १५ ॥
ते कर्ण भीष्म गुरुतुल्य चमूत वीर
    ती कौरवी रथि तशी सजताच सेना ।
त्यांच्या पुढा मज सवे चलता तयाने
    ते क्षत्रियी निरपिले बल आयु तेज ॥ १५ ॥

विभो - हे धर्मराजा - यः - जो - मम - माझ्या - अग्रेचरः - अग्रभागी चालणारा - अदभ्रराजन्यवर्यरथमण्डलमण्डितासु - श्रेष्ठ क्षत्रियांच्या रथसमूहांमुळे शोभणार्‍या - भीष्मकर्णगुरुशल्यचमूषु - भीष्म, कर्ण, द्रोण, व शल्य ह्यांच्या सैन्यातील - रथयूथपानां - सेनापतींची - आयुः - आयुष्ये - मनांसि - मने - च - आणि - सहः - बल - ओजः - व अस्त्रकौशल्य - दृशा - केवळ अवलोकनाने - आर्च्छत् - हरण करिता झाला. ॥१५॥
हे बंधो ! कौरवांची सेना भीष्म, कर्ण, द्रोण, शल्य तसेच इतर मोठमोठे राजे आणि क्षत्रियवीरांच्या रथांनी शोभत होती. त्यांच्याकडे जाताना, माझ्या पुढे राहून ते आपल्या दृष्टीनेच त्या महारथी राजांचे आयुष्य, मन, उत्साह आणि बल हिरावून घेत होते. (१५)


यद्दोःषु मा प्रणिहितं गुरुभीष्मकर्ण
     नप्तृत्रिगर्तशलसैन्धवबाह्लिकाद्यैः ।
अस्त्राण्यमोघमहिमानि निरूपितानि
     नो पस्पृशुर्नृहरिदासमिवासुराणि ॥ १६ ॥
द्रोणादि कर्ण असले बहुवीर तेही
    त्यांनी अचूक मज अस्त्र धरोनि वेध ।
ना स्पर्शिले मज जणू कयधूकुमार
मी कृष्णभक्त मजला नच घोर कांही ॥ १६

गुरुभीष्मकर्णद्रौणि - द्रोण, भीष्म, कर्ण, अश्वत्थामा, - त्रिगर्तशलसैन्धवबाह्लिकाद्यैः - सुशर्मा, शल्य, जयद्रथ व बाल्हीक वगैरे वीरांनी - निरूपितानी - सोडिलेली - अमोघमहिमानी - व्यर्थ जाणारी नाहीत सामर्थ्ये ज्यांची अशी - आसुराणि - दैत्यांची - अस्त्राणि - अस्त्रे - नृहरिदासं - नरसिंहभक्त प्रल्हाद - इव - प्रमाणे - यद्दोष्षु - ज्याच्या बाहूंवर - प्रणिहितं - अवलंबून राहिलेल्या - मा - मला - नोपस्पृशुः - स्पर्श करू शकली नाहीत. ॥१६॥
द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण, भूरिश्रवा, सुशर्मा, शल्य, जयद्रथ आणि बाल्हिक इत्यादि वीरांनी कधी नेम न चुकणारी अस्त्रे माझ्यावर टाकली होती. परंतु, ज्याप्रमाणे हिरण्यकशिपू इत्यादी दैत्यांची शस्त्रास्त्रे भगवद्‌भक्त प्रल्हादाला स्पर्श करू शकली नाहीत, त्याप्रमाणेच यांची अस्त्रे मला स्पर्श करू शकली नाहीत. श्रीकृष्णांच्या बाहुबलाच्या छत्रछायेत राहण्याचाच हा प्रभाव होता. (१६)


सौत्ये वृतः कुमतिनात्मद ईश्वरो मे
     यत्पादपद्ममभवाय भजन्ति भव्याः ।
मां श्रान्तवाहमरयो रथिनो भुविष्ठं
     न प्राहरन् यदनुभावनिरस्तचित्ताः ॥ १७ ॥
मुक्त्यर्थ नित्य भजती पद थोर संत
    तो आप्त मी समजला रथ तोचि हाकी ।
घोडे थकून बसता जमिनीवरी मी
    होतो तरी तयि कृपे मज रक्षियेले ॥ १७ ॥

भव्याः - सत्पुरुष - अभवाय - मोक्षप्राप्तीकरिता - यत्पादपद्मं - ज्याच्या चरणकमलाला - भजन्ति - सेवितात - यदनुभावनिरस्तचित्ताः - ज्याच्या पराक्रमाने अंतःकरणहीन - रथिनः - रथांत बसलेले - अरयः - शत्रू - श्रान्तवाहं - ज्याचे घोडे दमले होते अशा - भुविष्ठं - पृथ्वीवर उतरलेल्या - मां - मला - न प्राहरन् - न ताडिते झाले - आत्मदः - आत्मपद मिळवून देणारा - ईश्वरः - श्रीकृष्ण - कुमतिना - दुर्बुद्धि अशा - मे - माझ्याकडून - सौत्ये - सारथ्य कर्मात - वृतः - योजिला. ॥१७॥
श्रेष्ठ पुरुष संसारातून मुक्त होण्यासाठी ज्यांच्या चरणकमलांची सेवा करतात, स्वतःला सुद्धा भक्ताला देऊन टाकणार्‍या त्या भगवंतांना मी मूर्खाने माझा सारथी बनविले. ज्यावेळी माझे घोडे थकत होते आणि मी रथातून उतरून खाली जमिनीवर उभा राहात होतो, त्यावेळी शत्रुपक्षातील महारथी माझ्यावर प्रहार करत नसत. कारण श्रीकृष्णांच्या प्रभावाने त्यांची बुद्धी निकामी होत होती. (१७)


नर्माण्युदाररुचिरस्मितशोभितानि
     हे पार्थ हेऽर्जुन सखे कुरुनन्दनेति ।
सञ्जल्पितानि नरदेव हृदिस्पृशानि
     स्मर्तुर्लुठन्ति हृदयं मम माधवस्य ॥ १८ ॥
हासोनि प्रेमवचने वदता तयाच्या
    अर्जून पार्थ सखया कुरुपुत्र ऐशा ।
हाका मनात मजला नित ध्यानि येती
    काळिज आत घुसळे नकळेचि कांही ॥ १८ ॥

नरदेव - हे नरश्रेष्ठ धर्मराजा ! - माधवस्य - श्रीकृष्णाच्या - उदाररुचिरस्मितशोभितानि - गंभीर, सुंदर व मंदहास्य ह्यांनी शोभणारी - नर्माणि - थट्टेची भाषणे - हे पार्थ - हे कुंतीपुत्रा ! - हे अर्जुन - हे अर्जुना ! - सखे - हे मित्रा ! - कुरुनन्दन - हे कुरुवंशाला आनंद देणार्‍या - इति - याप्रमाणे - हृदिस्पृशानि - मनाला चटका लावणारी - संजल्पितानि - भाषणे - स्मर्तुः - स्मरणार्‍या - मम - माझ्या - हृदयं - अंतःकरणाला - लुठन्ति - क्षुब्ध करितात. ॥१८॥
अहो महाराज, माधवांचे ते मनमोकळे आणि मधुर हास्य, विनोदप्रचुर आणि हृदयस्पर्शी भाषण, तसेच त्यांचे मला ’पार्था, अर्जुना, सख्या, कुरुनंदना’ इत्यादि संबोधनांनी बोलावणे, हे सर्व आठवून माझे हृदय व्याकूळ होत आहे. (१८)


शय्यासनाटनविकत्थन भोजनादिषु
     ऐक्याद्वयस्य ऋतवानिति विप्रलब्धः ।
सख्युः सखेव पितृवत्तनयस्य सर्वं
     सेहे महान्महितया कुमतेरघं मे ॥ १९ ॥
खाणे पिणे नि फिरणे हि सवेचि होते
     "कृष्णा तुझ्या परि न कोणिहि सत्यवादी" ।
चेष्टेत मी वदतसे हिणावोनि ऐसे
    केले तरीहि अपराध मला क्षमा ते ॥ १९ ॥

शय्यासनाटनविकत्थनभोजनादिषु - निजणे, बसणे, फिरणे, बडबड करणे, भोजन वगैरेमध्ये - ऐक्यात् - अभेदामुळे - वयस्य - हे मित्रा ! - ऋतवान् - सत्यवक्ता - इति - याप्रमाणे - विप्रलब्धः - वंचिलेला म्हणजे तिरस्कृत केलेला - सख्युः - मित्राच्या - सखा - मित्र - इव - प्रमाणे - तनयस्य - पुत्राच्या - पितृवत् - बापाप्रमाणे - महान् - मोठा - महितया - मोठेपणामुळे - कुमतेः - दुर्बुद्धीच्या - मे - माझ्या - सर्वं - संपूर्ण - अघं - पापाला - सेहे - सहन करिता झाला. ॥१९॥
झोपणे, बसणे, फिरायला जाणे, आपापसात गोष्टी करणे, भोजन इत्यादी समयी आम्ही बहुधा एकत्रच असायचो. मी चेष्टेत कधी त्यांना म्हणत असे - "मित्रा ! तू तर मोठा सत्यवचनी आहेस !" त्यावेळी तो महापुरुष, आपल्या उदार मनामुळे ज्याप्रमाणे मित्र मित्राचा आणि पिता पुत्राचा अपराध सहन करतो, त्याप्रमाणे माझ्यासारख्या मूर्खाचे अपराध सहन करीत असे. (१९)


सोऽहं नृपेन्द्र रहितः पुरुषोत्तमेन
     सख्या प्रियेण सुहृदा हृदयेन शून्यः ।
अध्वन्युरुक्रमपरिग्रहमङ्‌ग रक्षन्
     गोपैरसद्‌भिरबलेव विनिर्जितोऽस्मि ॥ २० ॥
ना केवलो मम सखा ह्रदयोचि होता
    मार्गात दुष्ट गवळें मज हारवीले ।
कृष्णस्त्रिया मजसवे असुनी तयांना
    ना रक्षु मीच शकलो अबले परी की ॥ २० ॥

अङ्ग नृपेन्द्र - हे राजश्रेष्ठा धर्मा ! - सख्या - मित्र अशा - प्रियेण - प्रिय अशा - सुहृदा - व साधु स्वभावाच्या अशा - पुरुषोत्तमेन - पुरुषश्रेष्ठ श्रीकृष्णाने - रहितः - रहित - हृदयेन - हृदयाने - शून्यः - शून्य - सः - तो - अहं - मी - अध्वनि - वाटेत - उरुक्रमपरिग्रहं - श्रीकृष्णाच्या स्त्रियांना - रक्षन् - राखणारा - असद्‌भिः - दुष्ट अशा - गोपैः - गोपांनी - अबला - स्त्री - इव - प्रमाणे - विनिर्जितः - जिंकलेला - अस्मि - आहे. ॥२०॥
महाराज, जो माझा सखा, प्रिय, मित्र, नव्हे तर, माझे हृदयच होता, त्या पुरुषोत्तम भगवंतांना मी कायमचा अंतरलो आहे. भगवंतांच्या पत्‍न्यांना द्वारकेहून मी माझ्याबरोबर रक्षण करीत घेऊन येत होतो, परंतु वाटेत दुष्ट गोपांनी मला एखाद्या दुर्बलासारखे पराभूत केले. (२०)


तद्वै धनुस्त इषवः स रथो हयास्ते
     सोऽहं रथी नृपतयो यत आनमन्ति ।
सर्वं क्षणेन तदभूदसदीशरिक्तं
     भस्मन् हुतं कुहकराद्धमिवोप्तमूष्याम् ॥ २१ ॥
तेची असे धनुष गांडिव बाण तेंची
    घोडे रथास रथ तोचि रथीहि मीची ।
राजे झुकूनि करिती मजला प्रणाम
    कोंड्यापरी मम जिणे नसताच कृष्ण ॥ २१ ॥

यतः - ज्यामुळे - नृपतयः - राजे - आनमन्ति - नमत होते - तत् - ते - वै - च - धनुः - धनुष्य - ते - ते - इषवः - बाण - सः - तो - रथः - रथ - ते - ते - हयाः - घोडे - सः - तो - अहं - मी - रथी - रथांत बसणारा वीर - भस्मन्हुतं - भस्मांत हवन केलेले - कुहकराद्धं - कपटाने मिळविलेले - ऊष्यां - क्षारभूमीत - उप्तं - पेरलेले - इव - त्याप्रमाणे - ईशरिक्तं - श्रीकृष्णविरहित - तत् - ते - सर्वं - सर्व - क्षणेन - एका क्षणात - असत् - व्यर्थ - अभूत् - झाले. ॥२१॥
माझे गांडीव धनुष्य तेच आहे, बाण तेच आहेत, रथ, घोडे तेच आहेत आणि तो रथी अर्जुनही मीच आहे, ज्याच्यासमोर मोठमोठे राजे नतमस्तक होत होते. जसे राखेत टाकलेली तुपाची आहुती, कपटाने केलेली सेवा आणि रेताड जमिनीत पेरलेले बीज व्यर्थ होते, तसे श्रीकृष्णांखेरीज हे सर्व शून्यवत झाले आहे. (२१)


राजंस्त्वयानुपृष्टानां सुहृदां नः सुहृत्पुरे ।
विप्रशापविमूढानां निघ्नतां मुष्टिभिर्मिथः ॥ २२ ॥
वारुणीं मदिरां पीत्वा मदोन्मथितचेतसाम् ।
अजानतां इवान्योन्यं चतुःपञ्चावशेषिताः ॥ २३ ॥
(अनुष्टुप्‌)
राजा तू पुसले क्षेम द्वारकापुर वासिचे ।
विप्रांच्या शापमाहाने त्यांनी वारुणि प्राशिली ॥ २२ ॥
भ्रमात भावकी सारे एकमेकास ताडिता ।
सर्वच्या सर्वही मेले वाचले चार-पाचची ॥ २३ ॥

राजन् - हे धर्मराजा ! - त्वया - तू - सुहृत्पुरे - द्वारकेतील - अभिपृष्टानां - विचारलेले - नः - आमचे - सुहृदा - आप्तेष्ट - विप्रशापविमूढानां - ब्राह्मणशापाने मोहित झालेले - वारुणीं - वारुणी नावाच्या - मदिरां - मद्याला - पीत्वा - पिऊन - मदोन्मथितचेतसां - मदाने धुंद झाली आहेत अंतःकरणे ज्यांची असे - अन्योन्यं - एकमेकाला - अजानताम् इव - न ओळखणारे असेच की काय - मुष्टिभिः - मुठींनी - मिथः - एकमेकात - निघ्नतां - ताडण करीत असता - चतुःपञ्च - चारपाच - अवशेषिताः - उरले. ॥२२-२३॥
महाराज, आपण द्वारकानिवासी आपल्या सुहृदांविषयी विचारले, ते ब्राह्मणांच्या शापाने मोहग्रस्त होऊन, वारुणी नावाची मदिरा पिऊन मदोन्मत्त झाले आणि अपरिचितासारखे आपापसात लढले. तसेच लव्हाळ्याने मारपीट करून सर्वच्या सर्व नष्ट झाले. त्यांच्यापैकी केवळ चार-पाच जणच जिवंत आहेत. (२२-२३)


प्रायेणैतद् भगवत ईश्वरस्य विचेष्टितम् ।
मिथो निघ्नन्ति भूतानि भावयन्ति च यन्मिथः ॥ २४ ॥
शक्तिमान्‌ भगवंताची लीला सयचि ही पहा ।
पोषिती एकमेकांना मारिती जीव हे असे ॥ २४ ॥

यत् - ज्यामुळे - भूतानि - प्राणी - मिथः - एकमेकात - निघ्नन्ति - मारामारी करितात - च - आणि - मिथः - एकमेकांचे - भावयन्ति - पालन करितात - एतत् - हे - प्रायेण - बहुतकरून - भगवतः - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - ईश्वरस्य - परमेश्वराचे - विचेष्टितं - चरित्र. ॥२४॥
वास्तविक ही त्या सर्वशक्तिमान भगवंतांचीच लीला आहे. ज्यामूळे या संसारातील प्राणी एक-दुसर्‍याचे पालन-पोषणही करतात आणि एक-दुसर्‍यांचा नाशही करतात. (२४)


जलौकसां जले यद्वन् महान्तोऽदन्त्यणीयसः ।
दुर्बलान्बलिनो राजन् महान्तो बलिनो मिथः ॥ २५ ॥
एवं बलिष्ठैर्यदुभिः महद्‌भिरितरान् विभुः ।
यदून् यदुभिरन्योन्यं भूभारान् संजहार ह ॥ २६ ॥
राजा! जलचरे जैसी सान थोर परस्परा ।
पोषिती मारूनी खाती तैसे कृष्णेह दाविले ॥ २५ ॥
सानांना मारिले थोरे थोरे थोरास मारिले ।
निपटोनी यदुवंश पृथ्वीचा भार हारिला ॥ २६ ॥

राजन् - हे धर्मराजा - यद्वत् - ज्याप्रमाणे - जले - पाण्यात - जलौकसां - जलचर प्राण्यांपैकी - महान्तः - मोठे - अणीयसः - लहानांना - बलिनः - बलाढय - दुर्बलान् - अशक्तांना - महान्तः - मोठे - बलिनः - बलाढय - मिथः - परस्परांना - अदन्ति - खातात - एवं - याप्रमाणे - विभुः - श्रीकृष्ण - बलिष्ठैः - बलाढय - महद्भिः - मोठया - यदुभिः - यादवांकडून - इतरान् - दुसर्‍यांना - यदुभिः - यादवांकडून - यदून् - यादवांना - अन्योन्य - परस्पर - ह - खरोखर - भूभारान् - पृथ्वीच्या भारांना - संजहार - हरण करिता झाला. ॥२५-२६॥
महाराज, ज्याप्रमाणे जलचर प्राण्यांतील मोठे प्राणी लहानांना, बलवान दुर्बलांना तसेच मोठे व बलवान एक दुसर्‍याच्या जीवावर उठतात, त्याचप्रमाणे अतिशय बलवान आणि मोठ्या यादवांकडून भगवंतांनी दुसर्‍या राजांचा संहार करविला. त्यानंतर यादवांचा यादवांकडूनच संहार करवून पूर्णपणे पृथ्वीचा भार उतरविला. (२५-२६)


देशकालार्थयुक्तानि हृत्तापोपशमानि च ।
हरन्ति स्मरतश्चित्तं गोविन्दाभिहितानि मे ॥ २७ ॥
कृष्णे जे बोधिले आम्हा स्थल काल प्रयोजन ।
ह्रदये शांतची झाली आठवे चि मालिका ॥ २७ ॥

देशकालार्थ युक्तानी - देशकालाला शोभणार्‍या अर्थांनी युक्त - च - आणि - हृत्तापोपशमानि - हृदयांच्या तापांना शांत करणारी - गोविन्दाभिहितानि - श्रीकृष्णाची भाषणे - स्मरतः - स्मरण करणार्‍या - मे - माझ्या - चित्तं - अंतःकरणाला - हरन्ति - हरण करितात. ॥२७॥
भगवान श्रीकृष्णांनी मला जो उपदेश केला होता, तो देश, काल आणि हेतूला अनुसरून तसेच मानसिक ताप शांत करणारा होता. त्या उपदेशाचे स्मरण होताच चित्त हरखून जाते. (२७)


सूत उवाच ।
एवं चिन्तयतो जिष्णोः कृष्णपादसरोरुहम् ।
सौहार्देनातिगाढेन शान्ताऽऽसीद् विमला मतिः ॥ २८ ॥
सूतजी सांगतात-
अशा प्रगाढ श्रध्देने कृष्णाचे पदपद्म ते ।
अर्जुने स्मरिली तेंव्हा निमाल्या चित्त वृतिही ॥ २८ ॥

एवं - याप्रमाणे - अतिगाढेन - अत्यंत दृढ अशा - सौहार्देन - प्रेमाने - कृष्णपादसरोरुहं - श्रीकृष्णाच्या चरणकमलाला - चिन्तयतः - चिंतणार्‍या - जिष्णोः - अर्जुनाची - मतिः - बुद्धि - शान्ता - शांत - विमला - निर्मळ - आसीत् - झाली. ॥२८॥
सूत म्हणाले - याप्रमाणे अत्यंत प्रेमभरल्या अंतःकरणाने भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे चिंतन करता करता अर्जुनाची चित्तवृत्ती अत्यंत निर्मल आंइ शांत झाली. (२८)


वासुदेवाङ्‌घ्र्यनुध्यान परिबृंहितरंहसा ।
भक्त्या निर्मथिताशेष कषायधिषणोऽर्जुनः ॥ २९ ॥
रात्रंदिन पदी ध्यान अतीव वाढले असे ।
ह्रदया मंथिता ऐसे विकार झडले तदा ॥ २९ ॥

अर्जुनः - अर्जुन - वासुदेवाङ्घ्र्‌यनुध्यानपरिब्रुंहितरंहसा - श्रीकृष्णाच्या चरणाच्या चिंतनाने वाढला आहे वेग ज्याचा अशा - भक्त्या - भक्तीने - निर्मथिताशेषकषायधिषणः - नष्ट झाला आहे बुद्धीवरील सर्व मळ ज्याच्या असा झाला. ॥२९॥
भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचे रात्रंदिवस चिंतन केल्याने भक्ति अधिकच वाढली. त्यामुळे त्याच्या बुद्धीतील सारे विकार नाहीसे झाले. (२९)


गीतं भगवता ज्ञानं य त् तत् सङ्‌ग्राममूर्धनि ।
कालकर्मतमोरुद्धं पुनरध्यगमत् प्रभुः ॥ ३० ॥
युध्दारंभास जो कृष्णे गीतोपदेश बोधिला ।
विस्मृती जाहली होती त्याची त्या कर्मबंधनी ॥ ३० ॥

प्रभुः - अर्जुन - यत् - जे - ज्ञानं - ज्ञान - भगवता - श्रीकृष्णाने - संग्राममूर्धनि - युद्धाच्या प्रारंभी - गीतं - गायिले - तत् - ते - कालकर्मतमोरुद्धं - काळ, कर्म व अज्ञान यांनी रोधिलेले - पुनः - पुन्हा - अध्यगमत् - स्मरता झाला. ॥३०॥
अर्जुनाला युद्धाच्या प्रारंभी भगवंतांनी दिलेल्या गीताज्ञानाचे काळामुळे आणि मध्ये अनेक कर्मे केल्याने प्रमाद घडून विस्मरण झाले होते, त्याचे पुन्हा स्मरण झाले. (३०)


विशोको ब्रह्मसम्पत्त्या सञ्छिन्नद्वैतसंशयः ।
लीनप्रकृतिनैर्गुण्याद् अलिङ्‌गत्वादसम्भवः ॥ ३१ ॥
तुटले पाश मायादी मिळता ब्रह्मज्ञान ते ।
द्वैताची झडली वृत्ती भंगला सूक्ष्मदेह तो ।
जन्म नी मरणी शोक संसारक्र भेदले ॥ ३१ ॥

ब्रह्मसंपत्त्या - ब्रह्मज्ञानरूपी ऐश्वर्याने - विशोकः - शोकरहित झालेला - सञ्चिछन्नद्वैतसंशयः - व द्वैतबुद्धी व सर्व संशय पार नाहीसे झालेला - लीनप्रकृतिनैर्गुण्यात् - प्रकृति लीन होऊन प्राप्त झालेल्या नैर्गुण्यामुळे - अलिङ्गत्वात् - व सूक्ष्म शरीराच्या नाशामुळे - असंभवः - पुनर्जन्मादिरहित झाला. ॥३१॥
ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने मायेचे आवरण नाहीसे होऊन त्याला गुणातीत अवस्था प्राप्त झाली. सूक्ष्म शरीर भंग पावले आणि तो शोकापासून आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून कायमचा मुक्त झाला. (३१)


निशम्य भगवन्मार्गं संस्थां यदुकुलस्य च ।
स्वःपथाय मतिं चक्रे निभृतात्मा युधिष्ठिरः ॥ ३२ ॥
वैकुंठी कृष्ण तो गेला खंडला यदुवंशही ।
ऐकुनी शांत चित्ताने धर्माने स्वर्ग योजिला ॥ ३२ ॥

निभूतात्मा - स्थिरचित्त झालेला - युधिष्ठिरः - धर्मराज - भगवन्मार्गं - भगवंताच्या मार्गाला - च - आणि - यदुकुलस्य - यादव कुळाच्या - स्वंस्था - नाशाला - निशम्य - ऐकून - स्वःपथाय - स्वर्गमार्गाकरिता - मतिं - बुद्धीला - चक्रे - करिता जाला. ॥३२॥
भगवान स्वधामाला गेल्याचे आणि यदुवंशाचा संहार झाल्याचे ऐकून स्थिरबुद्धी युधिष्ठिरांनी स्वर्गारोहण करण्याचा निश्चय केला. (३२)


पृथाप्यनुश्रुत्य धनञ्जयोदितं
     नाशं यदूनां भगवद्‍गतिं च ताम् ।
एकान्तभक्त्या भगवत्यधोक्षजे
     निवेशितात्मोपरराम संसृतेः ॥ ३३ ॥
(इंद्रवज्रा)
श्रीकृष्ण गेला निजधामि आणि
    झाला यदूवंशहि नष्ट सारा ।
पार्थामुखीचे श्रवणेचि कुंती
    भक्तीत झाली मनि ती उदास ॥ ३३ ॥

पृथा - कुंती - अपि - सुद्धा - धनञ्जयोदितं - अर्जुनाने सांगितलेल्या - यदूनां - यादवांच्या - नाशं - नाशाला - च - आणि - तां - त्या - भगवद्‌गतिं - श्रीकृष्णाच्या गतीला - अनुश्रुत्य - ऐकून - एकान्तभक्त्या - आत्यंतिक अशा भक्तीने - अधोक्षजे - इंद्रियांना अगोचर न होणार्‍या - भगवति - परमेश्वराचे ठिकाणी - निवेशितात्मा - अर्पण केले आहे अंतःकरण जिने अशी - संसृते - संसारातून - उपरराम - पराङ्‌मुख झाली. ॥३३॥
यदुवंशीयांचा नाश आणि भगवंतांच्या स्वधामगमनाचे वृत्त अर्जुनाकडून ऐकून कुंतीनेही अनन्य भक्तियुक्त होऊन आपले हृदय भगवान श्रीकृष्णांमध्ये स्थिर केले आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला. (३३)


ययाहरद् भुवो भारं तां तनुं विजहावजः ।
कण्टकं कण्टकेनेव द्वयं चापीशितुः समम् ॥ ३४ ॥
(अनुष्टुप्‌)
काट्याने निघता काटा दोहीही फेकणे तसे ।
भूभार हरुनी कृष्णे यादवीकुळी नष्टिले ॥ ३४ ॥

अजः - श्रीकृष्ण - कण्टकेन - काटयाने - कण्टकं - काटयाला - इव - प्रमाणे - यया - जिने - भुवः - पृथ्वीच्या - भारं - भाराला - अहरत् - हरिता झाला - तां - त्या - तनूं - तनूला म्हणजे शरीराला - विजहौ - टाकता झाला - च - आणि - ईशितुः - परमेश्वराला - द्वयमपि - दोन्हीही - समम् - सारखेच. ॥३४॥
लोकांच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्णांनी ज्या यादव शरीराने पृथ्वीवरील भार हलका केला होता, त्या शरीराचा अशा रीतीने त्याग केला की, जसा काट्याने काटा काढून दोन्ही काटे फेकून द्यावे. भगवंतांच्या दृष्तीने दोन्ही सारखेच होते. (३४)


यथा मत्स्यादिरूपाणि धत्ते जह्याद् यथा नटः ।
भूभारः क्षपितो येन जहौ तच्च कलेवरम् ॥ ३५ ॥
नट तो धारितो रूप मत्स्य कूर्मादि टाकितो ।
पृथ्वीचा भार सारोनी यदुदेहहि फेकिला ॥ ३५ ॥

यथा - ज्याप्रमाणे - नटः - नाटकी - च - आणि - यथा - ज्याप्रमाणे - मत्स्यादिरूपाणि - मत्स्यादि स्वरूपे - धत्ते - धरतो - जह्यात् - टाकतो - येन - ज्याने - भूभारः - पृथ्वीचा भार - क्षपितः - नाहीसा केला - तत् - त्या - कलेवरं - शरीराला - जहौ - सोडता झाला. ॥३५॥
एकाद्या नटाप्रमाणे ते जसे मत्स्य इद्यादी रूपे धारण करतात आणि नंतर ती अदृश्य करतात, त्याचप्रमाणे त्यांनी ज्या शरीराने पृथ्वीवरील भार नाहीसा केला होता, ते शरीर अदृश्य केले. (३५)


यदा मुकुन्दो भगवानिमां महीं
     जहौ स्वतन्वा श्रवणीयसत्कथः ।
तदाहरेवाप्रतिबुद्धचेतसां
     अधर्महेतुः कलिरन्ववर्तत ॥ ३६ ॥
(इंद्रवज्रा)
मधूरलीला श्रवणासि युक्त
    पृथ्वीस त्यागी त्यजुनीहि देह ।
तेव्हांचि आला कलि या जगात
    लोकां अधर्मींचिखलात नेण्या ॥ ३६ ॥

यदा - जेव्हा - श्रवणीयसत्कथः - ऐकण्याजोग्या आहेत चांगल्या कथा ज्याच्या असा - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न्न - मुकुंदः - श्रीकृष्ण - स्वतन्वा - स्वतःच्या शरीराने - इमां - ह्या - महीं - पृथ्वीला - जहौ - सोडून जाता झाला. - तदाहः - त्या दिवसापासून - एव - च - अप्रतिबुद्धचेतसा - अज्ञानी अन्तःकरणाच्या लोकांच्या - अधर्महेतुः - अधर्माला कारणीभूत - कलिः - कलियुग - अन्ववर्तत - सुरू झाले. ॥३६॥
ज्यांच्या मधुर लीला श्रवणीय आहेत, त्या भगवान श्रीकृष्णांनी ज्या दिवशी आपले शरीर अंतर्धान केले, त्याच दिवशी अविवेकी लोकांना अधर्मात गुंतविणारे कलियुग येऊन टपकले. (३६)


युधिष्ठिरस्तत्परिसर्पणं बुधः
     पुरे च राष्ट्रे च गृहे तथाऽऽत्मनि ।
विभाव्य लोभानृतजिह्महिंसनादि
     अधर्मचक्रं गमनाय पर्यधात् ॥ ३७ ॥
राजा युधिष्ठिर बघे तयाला
    देशात राज्यात घरात लोकी ।
खोटे नि लोभी छळ हिंसको ते
    स्वर्गासि जाणे तयि नक्कि केले ॥ ३७ ॥

बुधः - ज्ञानी - युधिष्ठिरः - धर्मराज - तथात्मनि - कलिरूप बनलेल्या - राष्ट्रे - राज्यात - च - आणि - पुरे - नगरात - च - आणि - गृहे - घरात - तत्परिसर्पणं - कलीमुळे पसरत असलेल्या - लोभानृतजिह्यहिंसनादि - लोभ, असत्य, कपट, हिंसा वगैरे - अधर्मचक्रं - अधर्मसमूहाला - विभाव्य - पाहून - गमनाय - स्वर्गाला जाण्याकरिता - पर्यधात् - निश्चय करिता झाला. ॥३७॥
कलियुगाचे आगमन युधिष्ठिरांपासून लपून राहिले नाही. त्यांनी पाहिले की, देश, नगर, घरे तसेच प्राण्यांमध्ये लोभ, असत्य, कपट, हिंसा इत्यादि प्रकारांनी अधर्माचा वाढता प्रभाव निर्माण झाला आहे. तेव्हा त्यांनी महाप्रस्थान करण्याचा निर्णय घेतला. (३७)


स्वराट् पौत्रं विनयिनं आत्मनः सुसमं गुणैः ।
तोयनीव्याः पतिं भूमेः अभ्यषिञ्चद् गजाह्वये ॥ ३८ ॥
(अनुष्टुप्‌)
परीक्षित्‌ विनयी नातू आपूल्या सम जो गुणीं ।
आसमुद्रधरासम्राटपदीं त्या अभिषेकिले ॥ ३८ ॥

स्वराट् - सार्वभौ‌म धर्मराजा - आत्मनः - स्वतःच्या - गुणैः - गुणांशी - सुसमं - तुल्य अशा - विनयिनं - विनयशील - पौत्रं - नातवाला म्हणजे परीक्षिताला - गजाह्‌वये - हस्तिनापुरात - तोयनीव्याः - पाणीच आहे नेसलेले वस्त्र जिचे अशा अर्थात समुद्रवलयांकित - भूमेः - पृथ्वीचा - पतिं - रक्षक राजा असा - अभ्यषिञ्चत् - अभिषेकिता झाला. ॥३८॥
जो गुणांमध्ये त्यांच्याचसारखा होता असा आपला विनयशील नातू परीक्षित याला त्यांनी हस्तिनापुरात समुद्रवलयांकित पृथ्वीच्या सम्राट-पदावर बसविले. (३८)


मथुरायां तथा वज्रं शूरसेनपतिं ततः ।
प्राजापत्यां निरूप्येष्टिं अग्नीनपिबदीश्वरः ॥ ३९ ॥
वज्र जो अनिरुध्दाचा त्याला त्या मथुरे मधे ।
अभिषेकुनि धर्माने आहवनिय अग्नि तो ।
स्वतात करुनी लीन झाला संन्यासि मुक्त तो ॥ ३९ ॥

ततः - नंतर - ईश्वरः - धर्मराजा - तथा - त्याप्रमाणे - शूरसेनपतिं - शूरसेनदेशाचा राजा अशा - वज्रं - वज्र नावाच्या अनिरुद्धपुत्राला - मथुरायां - मथुरेत - प्राजापत्यां - प्राजापत्य नावाच्या - इष्टिं - इष्टीला म्हणजे यज्ञीय हवन कृत्याला - निरूप्य - करून - अग्नीन् - अग्नींना - अपिबत - पिता झाला. ॥३९॥
त्यांनी मथुरेत अनिरुद्धपुत्र वज्र याचा शूरसेनापती म्हणून अभिषेक केला. त्यानंतर समर्थ युधिष्ठिरांनी प्राजापत्य यज्ञ करून आहवनीय इत्यादी अग्नींना आपल्यामध्ये लीन करून घेतले, म्हणजेच संन्यास घेतला. (३९)


विसृज्य तत्र तत्सर्वं दुकूलवलयादिकम् ।
निर्ममो निरहङ्‌कारः सञ्छिन्नाशेषबन्धनः ॥ ४० ॥
वाचं जुहाव मनसि तत्प्राण इतरे च तम् ।
मृत्यावपानं सोत्सर्गं तं पञ्चत्वे ह्यजोहवीत् ॥ ४१ ॥
वस्त्र आभूषणे त्याने त्यागिली ममता तशी ।
अहंता सोडुनी सारी बंधने तोडिली स्वये ॥ ४० ॥
वाणीस दृढभावाने मनात मिसळीयली ।
मन प्राणात मेळोनी अपानातहि प्राण ते ।
प्राणास मृत्यु तेजोनी मृत्युला शरिरातही ।
पंचभूतमयी लीन केले धर्मे असे पहा ॥ ४१ ॥

तत्र - तेथे - तत् - ते - दुकूलवलयादिकं - रेशमी वस्त्र, सुवर्ण कंकणे वगैरे - सर्वं - सगळे - विसृज्य - टाकून - निर्ममः - माझेपणा ज्याने सोडला आहे - निरहंकारः - व मीपणा सोडलेला - सञ्चिछन्नाशेषबन्धनः - सर्व सांसारिक पाश ज्याने तोडून टाकले आहेत - वाचं - वाणीला - मनसि - मनात - तत् - ते मन - प्राणे - प्राणात - च - आणि - तं - त्या प्राणाला - इतरे - दुसर्‍यात म्हणजे अपानात - जुहाव - हवन करिता झाला - सोत्सर्गं - बाहेर सोडण्याच्या अपानाच्या क्रियेसह - अपानं - अपानाला - मृत्यौ - मृत्यूत - तं - त्या मृत्यूला - पञ्चत्वे - पाञ्चभौतिक तत्त्वात - हि - खरोखर - अजोहवीत - हवन करिता झाला. ॥४०-४१॥
त्यांनी आपली सर्व वस्त्रे, आभूषणे इत्यादींचा तेथेच त्याग केला. तसेच ममता आणि अहंकाररहित होऊन सर्व बंधनातून ते मुक्त झाले. (४०)
नंतर त्यांनी वाणीला मनात, मनाला प्राणात, प्राणाला अपानात, आणि अपानाला त्याच्या क्रियेसह मृत्यूत आणि शेवटी मृत्यूला पंचमहाभूतमय शरीरात विलीन केले. (४१)


त्रित्वे हुत्वा च पञ्चत्वं तच्चैकत्वेऽजुहोन्मुनिः ।
सर्वमात्मन्यजुहवीद् ब्रह्मण्यात्मानमव्यये ॥ ४२ ॥
शरीरा त्रिगुणामध्ये मूलतत्वात त्रैगुण ।
आत्म्यात मूलतत्वांना ब्रह्मात मेळिला ॥
तेंव्हा त्या भासली सृष्टी ब्रह्मरूपचि सर्वही ॥ ४२ ॥

अथ - नंतर - मुनिः - मननशील किंवा मौन धारण करणारा ऋषि - पञ्चत्वं - पाञ्चभौतिक तत्त्वाला - हुत्वा - हवनयुक्त करून - त्रित्वे - त्रिगुणात्मक तत्त्वात - च - आणि - तत् - ते त्रिगुणात्मक तत्त्व - एकत्वे - एकात्म अविद्यारूपी प्रकृतीत - अजुहोत् - हवन करिता झाला - सर्वं - सगळे - आत्मनि - आत्म्यात - आत्मानं - आत्म्याला - अव्यये - अविनाशी - ब्रह्मणि - ब्रह्मात - अजुहवीत् - हवन करिता झाला. ॥४२॥
नंतर त्यांनी शरीराला त्रिगुणात, त्रिगुणाला मूळ प्रकृतीत, मूळ प्रकृतीला आत्म्यामध्ये आणि आत्म्याला अविनाशी ब्रह्मात विलीन केले. (४२)


चीरवासा निराहारो बद्धवाङ्‌ मुक्तमूर्धजः ।
दर्शयन् आत्मनो रूपं जडोन्मत्त पिशाचवत् ॥ ४३ ॥
घेउनी चीरवस्त्रे ती अन्न नी जळ त्यागिले ।
मौन नी मुक्त केसांने उन्मत्त भूत भासले ॥ ४३ ॥

चीरवासाः - चिंध्या पांघरलेला - निराहारः - खाणेपिणे सोडून दिलेला - बद्धवाक् - मौन धरलेला - मुक्तमूर्धजः - केस मोकळे सोडलेला - आत्मनः - स्वतःच्या - रूपं - स्वरूपाला - जडोन्मत्तपिशाचवत् - उन्मत्त किंवा पिशाच्यांप्रमाणे - दर्शयन् - दाखविणारा. ॥४३॥
त्यानंतर त्यांनी शरीरावर वल्कले धारण केली. अन्नपाण्याचा त्याग केला, मौन धारण केले, केस मोकळे सोडले आणि जड, उन्मत्त, पिशाचासारख्या रूपात ते राहू लागले. (४३)


अनवेक्षमाणो निरगाद् अशृण्वन् बधिरो यथा ।
उदीचीं प्रविवेशाशां गतपूर्वां महात्मभिः ।
हृदि ब्रह्म परं ध्यायन् आवर्तेत यतो गतः ॥ ४४ ॥
श्रेष्ठात्मे मार्गि ज्या गेले निघाले उत्तरेस त्या ।
न ऐके श्ब्द काणाचे बहिर्‍यापरि चालले ।
ध्यान ते नित्यची चालू परब्रह्मचि पाहिले ।
जेथुनी फिरणे नाही निमाली तेथ वृत्ति ती ॥ ४४ ॥

अनवेक्षमाणः - इकडेतिकडे न पाहणारा - यथा - जसा - बधिरः - बहिरा - अशृण्वन् - काहीही न श्रवण करणारा - निरगात् - निघाला - महात्मभिः - माहात्म्यांनी - गतपूर्वां - पूर्वी गमन केलेल्या - उदीचीं - उत्तर - आशां - दिशेला - प्रविवेश - गेला. - परं - श्रेष्ठ - ब्रह्म - ब्रह्माला - हृदि - हृदयात - ध्यायन् - चिंतन करीत - गत - गेलेला - यतः - जेथून - न आवर्तेत - परत फिरत नाही. ॥४४॥
एवढे झाल्यावर कोणाचीही वाट न पाहता, बहिर्‍याप्रमाणे कोणाचेही काहीही न ऐकता, ते बाहेर पडले. ज्याला प्राप्त केल्यानंतर पुन्हा जन्माला यावे लागत नाही, त्या परब्रह्माचे हृदयात ध्यान करीत ते उत्तर दिशेकडे निघाले. यापूर्वी मोठमोठे महात्म्ये तिकडेच गेले होते. (४४)


सर्वे तमनुनिर्जग्मुः भ्रातरः कृतनिश्चयाः ।
कलिना अधर्ममित्रेण दृष्ट्वा स्पृष्टाः प्रजा भुवि ॥ ४५ ॥
भीम अर्जुनही पाही कलीने लोक ग्रासिले ।
धर्माच्या मार्गिते चारी निघाले कृष्ण दर्शना ॥ ४५ ॥

कृतनिश्चयाः - ज्यांचा ठाम निश्चय झाला आहे असे - सर्वे - सर्व - भ्रातरः - भीमादि भाऊ - भुवि - पृथ्वीवर - अधर्ममित्रेण - अधर्मच ज्याचा मित्र आहे अशा - कलिना - कलीने - स्पृष्टः - स्पर्शिलेल्या म्हणजे पगडा बसविलेल्या - प्रजाः - प्रजा - दृष्ट्‌वा - पाहून - तम् अनु - त्याच्या मागोमाग - निर्जग्मुः - गेले. ॥४५॥
भीमसेन, अर्जुन इत्यादी युधिष्ठिरांच्या धाकट्या भावांनीही असे पाहिले की, पृथ्वीवरील सर्व लोकांना आता अधर्माचा सहाय्यक असलेल्या कलियुगाने प्रभावित केले आहे. म्हणून तेही दृढ निश्चय करून आपल्या थोरल्या बंधूंच्या पाठोपाठ निघून गेले. (४५)


ते साधुकृतसर्वार्था ज्ञात्वा आत्यन्तिकमात्मनः ।
मनसा धारयामासुः वैकुण्ठ चरणाम्बुजम् ॥ ४६ ॥
सन्मान लाभ ते सारे कृष्णाने दिधले तयां ।
दाता तो सर्व श्रेयांचा भगवान्‌ धरिला मनीं ॥ ४६ ॥

साधुकृतसर्वार्थाः - चांगल्या रीतीने आचरिले आहेत धर्मादि चार पुरुषार्थ ज्यांनी असे - ते - ते पांडव - आत्मनः - स्वतःच्या जवळ - वैकुण्ठचरणाम्बुजं - श्रीकृष्णाच्या चरणकमलाला - आत्यन्तिकं - अतिशय - ज्ञात्वा - जाणुन - मनसा - मनाने - धारयामासुः - ध्यान करिते झाले. ॥४६॥
त्यांनी जीवनातील सर्व लाभ चांगल्याप्रकारे प्राप्त करून घेतले होते. म्हणुन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांची प्राप्ती करून घेणे हाच आपला परमपुरुषार्थ आहे असे समजून त्यांनी ते चरण आपल्या हृदयांत धारण केले. (४६)


तद्ध्यानोद्रिक्तया भक्त्या विशुद्धधिषणाः परे ।
तस्मिन् नारायणपदे एकान्तमतयो गतिम् ॥ ४७ ॥
अवापुः दुरवापां ते असद्‌भिर्विषयात्मभिः ।
विधूतकल्मषा स्थानं विरजेनात्मनैव हि ॥ ४८ ॥
त्यांचे काळीज भक्तीने ओसंडोनीच राहिले ।
बुध्दि ती उच्चरूपात अनन्यरूप पावली ॥ ४७ ॥
निष्पाप लोक जै जाती गति ती मिळाली तयां ।
विषयासक्त जे होती त्यांना जी कधि ना मिळे ॥ ४८ ॥

तद्‌ध्यानोद्रिक्तया - त्याच्या ध्यानाने वाढलेल्या - भक्त्या - भक्तीने - विशुद्धधिषणाः - शुद्धबुद्धि झालेले - ते - ते - विधूतकल्मपास्थानं - पापरहितांचे वसतिस्थान असे जे पद - तस्मिन् - त्या - परे - श्रेष्ठ अशा - नारायणपदे - भगवंताच्या पदाचे ठिकाणी - एकान्तमतयः - ज्यांची बुद्धि एकरूपाने चिकटून राहिली आहे असे - विषयात्मभिः - विषयलंपट अशा - असद्भिः - दुराचरणी पुरुषांनी - दुरवापां - मिळविण्यास कठीण अशा - गतिं - गतीला - हि - खरोखर - विरजेन - शुद्ध सात्त्विक अशा - आत्मना एव - आत्म्यानेच - अवापुः - मिळविते झाले. ॥४७-४८॥
भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलांच्या ध्यानाने पांडवांच्या हृदयांत भक्तिभाव उचंबळून आला, त्यांची बुद्धी शुद्ध झाली आणि केवळ निष्पाप पुरुषच जिथे स्थिर होतात त्या भगवान श्रीकृष्णाच्या सर्वोत्कृष्ट स्वरूपात ते अनन्य भावाने स्थिर झाले. विषयासक्त पापी मनुष्यांना कधीही प्राप्त न होणारी गती, त्यांना आपल्या विशुद्ध अंतःकरणामुळेच प्राप्त झाली. (४७-४८)


विदुरोऽपि परित्यज्य प्रभासे देहमात्मनः ।
कृष्णावेशेन तच्चित्तः पितृभिः स्वक्षयं ययौ ॥ ४९ ॥
प्रभास पुण्यक्षेत्रासी विदुरे देह त्यागिला ।
पितरे स्वागता आले त्यांचे स्वागत घेतले ॥ ४९ ॥

आत्मवान् - ज्ञानी - विदुरः - विदुर - अपि - सुद्धा - प्रभासे - प्रभासक्षेत्रात - देहं - देहाला - परित्यज्य - टाकून - कृष्णावेशेन - श्रीकृष्णावरील दृढ भक्तीने - तच्चित्तः - तेथेच अन्तःकरण ठेवलेला असा - पितृभिः - पितरांसह - स्वक्षयं - स्वस्थानाला - ययौ - गेला. ॥४९॥
संयमी आणि श्रीकृष्णांच्या प्रेमावेशात मुग्ध, भगवन्मय झालेल्या विदुरानेही आपल्या शरीराचा प्रभासक्षेत्रात त्याग केला. त्यावेळी त्यांना न्यावयास आलेल्या पितरांसह तो आपल्या यमलोकाला गेला. (४९)


द्रौपदी च तदाज्ञाय पतीनां अनपेक्षताम् ।
वासुदेवे भगवति ह्येकान्तमतिराप तम् ॥ ५० ॥
पतींना द्रौपदी पाही उदास जाहले मनी ।
मनात स्मरुनी कृष्ण ती ही त्यांच्यात पातली ॥ ५० ॥

च - आणि - तदा - त्यावेळी - द्रौपदी - द्रौपदी - पतींनां - पतींच्या - अनपेक्षतां - निरपेक्षस्थितीला - आज्ञाय - जाणून - वासुदेवे - प्रकाशरूपाने सर्वत्र वास्तव्य करणार्‍या - भगवति - भगवंताचे ठिकाणी - एकान्तमतिः - एकरूप केली आहे बुद्धि जिने अशी - हि - खरोखर - तं - त्या भगवत्पदाला - आप - प्राप्त झाली. ॥५०॥
द्रौपदीने पाहिले की, आता पांडवांना काही अपेक्षा राहिली नाही. तेव्हा ती अनन्य प्रेमाने भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करीत त्यांच्याशी एकरूप झाली. (५०)


यः श्रद्धयैतद्‍भगवत्प्रियाणां
पाण्डोः सुतानामिति सम्प्रयाणम् ।
श्रृणोत्यलं स्वस्त्ययनं पवित्रं
लब्ध्वा हरौ भक्तिमुपैति सिद्धिम् ॥ ५१ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
प्रथमस्कन्धे पाण्डवस्वर्गारोहणं नाम पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥
(इंद्रवज्रा)
जे कृष्णभक्तीत विरोनि गेले
    पवित्र ही मंगल गोष्ट त्यांची ।
पांडूसुतांच्याचि महाप्रयाणी
    ऐकेल त्याला मिळतोच मोक्ष ॥ ५१ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्र्लोकी मराठी रूपांतर ॥
॥ पंधरावा अध्याय हा ॥ १ ॥ १५ ॥ हरि ॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

यः - जो - इति - याप्रमाणे - श्रद्धया - भक्तीने - एतत् - हे - भगवत्प्रियाणां - भगवंताला आवडत्या - पाण्डोः - पाण्डुराजाच्या - सुतानां - पुत्रांचे - स्वस्त्ययनं - कल्याणकारक - पवित्रं - पवित्र - संप्रयाणं - स्वर्गारोहण - अलं - पुष्कळ वेळा - शृणोति - ऐकतो - हरौ - परमेश्वराचे ठिकाणी - भक्तिं - भक्तीला - लब्ध्वा - मिळवून - सिद्धिं - मोक्षाला - उपैति - जातो. ॥५१॥
भगवंतांचे प्रिय भक्त पांडव यांच्या महाप्रयाणाची ही परमपवित्र आणि मंगलमय कथा जो पुरुष श्रद्धेने ऐकेल, तो निश्चितच भगवंतांची भक्ति आणि मोक्ष प्राप्त करून घेईल. (५१)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां प्रथमः स्कन्धे पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥
अध्याय पंधरावा समाप्त

GO TOP