|  | 
| 
श्रीमद् भागवत पुराण  विदुरोपदेशेन गान्धार्यासह धृतराष्ट्रस्य वनाय प्रस्थानम् - विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गांधारीचे वनात जाणे - संहिता  -  अन्वय  -  अर्थ  समश्लोकी - मराठी 
सूत उवाच । विदुरस्तीर्थयात्रायां मैत्रेयादात्मनो गतिम् । ज्ञात्वागाt हास्तिनपुरं तयावाप्तविवित्सितः ॥ १ ॥ 
सूतजी सांगतात -  (अनुष्टुप्) मैत्रेया पासुनी काका विदुर आत्मज्ञान ते । मिळता तृप्त होवोनी हस्तिनापुरि पातले ॥ १ ॥ 
विदुरः -  विदुर - तीर्थयात्रायां -  तीर्थयात्रेत - मैत्रेयात् -  मैत्रेयापासून - आत्मनः -  आत्म्याच्या - गतिं -  गतीला म्हणजे ज्ञानाला - ज्ञात्वा -  जाणून - तया -  त्या गतीने म्हणजे ज्ञानाने - अवाप्तविवित्सितः -  ज्ञानेच्छा पूर्ण झालेला असा - हस्तिनापुरं -  हस्तिनापुराला - अगात् -  प्राप्त झाला. ॥१॥ 
 
सूत म्हणाले - विदुर तीर्थयात्रेत महर्षी मैत्रेय यांचेकडून आत्मज्ञान प्राप्त करून हस्तिनापुराला परतला. जे जाणण्याची त्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली होती. (१) 
 
यावतः कृतवान् प्रश्नान् क्षत्ता कौषारवाग्रतः । जातैकभक्तिः गोविन्दे तेभ्यश्चोपरराम ह ॥ २ ॥ 
मैत्रेया जेवढे सारे प्रश्न त्यांनी विचारिले । सर्व त्या उत्तरापूर्वी झाले ते तृप्त भक्तिने ॥ २ ॥ 
क्षत्ता -  विदुर - कौषारवाग्रतः -  मैत्रेयाजवळ - यावतः -  जेवढया  - प्रश्नान् -  प्रश्नांना - कृतवान् -  करिता झाला - ह -  खरोखर - गोविंदे -  श्रीकृष्णावर - जातैकभक्तिः -  भक्ति उत्पन्न झालेला - च -  आणि - तेभ्यः -  त्यांपासून - उपरराम -  विराम पावला. ॥२॥ 
 
विदुराने मैत्रेय ऋषींना जे प्रश्न विचारले होते, त्यांची उत्तरे ऐकण्या अगोदरच विदुराची श्रीकृष्णांचे ठिकाणी अनन्य भक्ति असल्यामुळे त्याला त्या उत्तरांची अपेक्षाच उरली नाही. (२) 
 
तं बन्धुमागतं दृष्ट्वा धर्मपुत्रः सहानुजः । धृतराष्ट्रो युयुत्सुश्च सूतः शारद्वतः पृथा ॥ ३ ॥ गान्धारी द्रौपदी ब्रह्मन् सुभद्रा चोत्तरा कृपी । अन्याश्च जामयः पाण्डोः ज्ञातयः ससुताः स्त्रियः ॥ ४ ॥ प्रत्युज्जग्मुः प्रहर्षेण प्राणं तन्व इवागतम् । अभिसङ्गम्य विधिवत् परिष्वङ्गाभिवादनैः ॥ ५ ॥ मुमुचुः प्रेमबाष्पौघं विरहौत्कण्ठ्य कातराः । राजा तमर्हयां चक्रे कृतासन परिग्रहम् ॥ ६ ॥ 
आलेले पाहता काका धर्म नी चारि बंधुही । युयुत्सू धृतराष्ट्रो नी कृपाचार्य नि कुंति ती ॥ ३ ॥ द्रौपदी कृपि सूभद्रा गांधारी उत्तरा तसे । भावकी पुत्र पौत्रादी आनंदे मनिं हर्षले ॥ ४ ॥ प्रेतीं जीव जसा यावा तसे सर्वची हर्षले । स्वागता सर्वची गेले प्रणाम करुनी तया ॥ ५ ॥ वियोगे ढाळिले अश्रू आसनी बैसवोनिया । केला सत्कार काकांचा प्रसंगाने युधिष्ठिरे ॥ ६ ॥ 
आगतं -  आलेल्या - तं -  त्या - बंधुं -  बंधु अशा विदुराला - दृष्ट्वा -  पाहून - सहानुजः -  भावांसह - धर्मपुत्रः -  धर्मराज - धृतराष्ट्रः -  धृतराष्ट्र  - च -  आणि - युयुत्सुः -  युयुत्सु - सूतः -  सारथी संजय - शारद्वतः -  कृपाचार्य - पृथा -  कुंती. ॥३॥  ब्रह्मन् - शौनक हो ! - गान्धारी - गांधारी - द्रौपदी - द्रौपदी - सुभद्रा - सुभद्रा - च - आणि - उत्तरा - उत्तरा - कृपी - कृपी - च - आणि - अन्या - दुसर्या - जामयः - नातेवाईकाच्या स्त्रिया - पाण्डोः - पांडूच्या - ज्ञातयः - कुळातील - ससुताः - पुत्रांसह - स्त्रियः - स्त्रिया. ॥४॥ तन्वाः - शरीराचा - प्राणं - प्राण - आगतं - आलेल्या - इव - प्रमाणे - प्रहर्षेण - मोठया आनंदाने - प्रत्युज्जग्मुः - सामोर्या गेल्या - विधिवत् - अधिकारपरत्वे - परिष्वङ्गाभिवादनैः - आलिंगन व नमस्कार यायोगे - अभिसङ्गम्य - भेट घेऊन. ॥५॥ विरहौत्कण्ठयकातराः - वियोगाने उत्पन्न केलेल्या उत्कंठेमुळे विव्हळ असे - प्रेमबाष्पौघं - प्रेमाश्रूंच्या प्रवाहाला - मुमुचुः - सोडते झाले. - राजा - धर्मराज - कृतासनपरिग्रहं - आसनावर बसलेल्या - तं - त्याला - अर्हयाञ्चक्रे - पूजिता झाला. ॥६॥ 
शौनक महोदय, आपला चुलता विदुर आल्याचे पाहून धर्मराज युधिष्ठिर, त्याचे चारही भाऊ, धृतराष्ट्र, युयुत्सू, संजय, कृपाचार्य, कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा, कृपी तसेच पांडव-परिवारातील अन्य सर्व स्त्री-पुरुष आणि आपापल्या पुत्रांसहित अन्य स्त्रिया, असे सर्वजण मोठ्या आनंदाने जणू मृत शरीरात प्राण परत आले अशा भावनेने त्याच्या स्वागतासाठी सामोरे गेले. योग्य रीतीने आलिंगन, नमस्कार इत्यादि द्वारा सर्वजण त्याला भेटले आणि विरहदुःखामुळे व्याकूळ झालेल्या सर्वांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. युधिष्ठिराने त्याला आसनावर बसवून त्याचा यथोचित सत्कार केला. (३-६) 
 
तं भुक्तवन्तं विश्रान्तं आसीनं सुखमासने । प्रश्रयावनतो राजा प्राह तेषां च श्रृण्वताम् ॥ ७ ॥ 
जेवणे आणि विश्रांती होताचि सुखपूर्वक । धर्माने पुसले त्यांना आसनी बैसवोनिया ॥ ७ ॥ 
राजा -  धर्मराज - भुक्तवन्तं -  भोजन केलेल्या - विश्वान्तं -  विसावा घेतलेल्या - च -  आणि - आसने -  आसनावर - सुखं -  सुखाने - आसीनं -  बसलेल्या - तं -  त्याला - तेषां -  ते - शृण्वतां -  ऐकत असता - प्रश्रयावनः -  आदराने नम्र झालेला असा - प्राह -  बोलला. ॥७॥ 
 
भोजन व विश्रांती झाल्यानंतर विदुर समाधानाने आसनावर बसला, तेव्हा युधिष्ठिर विनयपूर्वक, सर्वांच्या देखत त्याला म्हणाला, (७) 
 
युधिष्ठिर उवाच । अपि स्मरथ नो युष्मत् पक्षच्छायासमेधितान् । विपद्गणाद् विषाग्न्यादेः मोचिता यत्समातृकाः ॥ ८ ॥ 
राजा युधिष्ठिर म्हणाला - काका अंड्यास पक्षी जै पंखात उबवीति ते । तसेचि पोषिती त्यांना त्यापरी लाडिले तुम्ही । लाक्षागृहीं विषामध्ये तुम्हीच वाचवीयले । आता तुम्हास येतोका आमुचा मनि आठव ॥ ८ ॥ 
यत् -  जे - समातृकाः -  आईसह - विषाग्न्यादेः -  विष, अग्नि वगैरे - विपद्गणात् -  अनेक विपत्तीतून - मोचिताः -  मुक्त केले - युष्मत्पक्षच्छायासमेधितान् -  तुमच्या पंखांच्या सावलीखाली वाढलेल्या - नः -  आम्हाला - स्मरथ -  स्मरता - अपि -  काय ? ॥८॥ 
 
युधिष्ठिर म्हणाला - काका, विषप्रयोग, लाक्षागृहात जळून मारणे यांच्यासारख्या आमच्यावर आलेल्या संकटप्रसंगी आपण मातेसह आम्हांला वाचविले आहे. आपल्या छत्रछायेत वाढलेल्या आमची आपणास कधी आठवण येत होती काय ? (८) 
 
कया वृत्त्या वर्तितं वः चरद्भिः क्षितिमण्डलम् । तीर्थानि क्षेत्रमुख्यानि सेवितानीह भूतले ॥ ९ ॥ 
फिरतां सर्व ही सृष्टी कैसा निर्वाह घेतला । सांगावी वृत्ति तेंव्हाची कोणते क्षेत्र पाहिले ॥ ९ ॥ 
क्षितिमण्डलं -  पृथ्वीतलावर  - चरद्भिः -  फिरणार्या आपणाकडून - कया -  कोणत्या - वृत्त्या -  उद्योगाने - वः -  स्वतःचे - वर्तितं -  उपजीवन केले - इह -  ह्या - भूतले -  पृथ्वीतलावर - क्षेत्रमुख्यानि -  मुख्य मुख्य क्षेत्रांनी युक्त अशी - तीर्थानि -  तीर्थे - सेवितानि -  सेवन केली. ॥९॥ 
 
पृथ्वीवर भ्रमण करीत असता कोणत्या पद्धतीने आपण जीवननिर्वाह चालविलात ? पृथ्वीवरील कोणकोणत्या मुख्य तीर्थक्षेत्रांचे आपण दर्शन घतले ? (९) 
 
भवद्विधा भागवताः तीर्थभूताः स्वयं विभो । तीर्थीकुर्वन्ति तीर्थानि स्वान्तःस्थेन गदाभृता ॥ १० ॥ 
तुम्ही तो भगवत्प्रीय तीर्थरूप अम्हा असा । ठेवुनी ह्रदयी कृष्ण महातीर्थचि जाहले ॥ १० ॥ 
विभो -  हे समर्थ विदुरा ! - स्वयं -  स्वतः - तीर्थीभूताः -  तीर्थस्वरूपी - भवद्विधाः -  तुमच्यासारखे - भागवताः -  भगवद्भक्त - स्वान्तःस्थेन -  स्वतःच्या अन्तःकरणात राहणार्या - गदाभृता -  गदा धारण करणार्या परमेश्वरामुळे - तीर्थानि -  तीर्थांना - तीर्थीकुर्वन्ति -  तीर्थपणा देतात. ॥१०॥ 
 
प्रभो, आपल्यासारखे भगवंतांचे भक्त स्वतःच तीर्थरूप असतात. आपल्या हृदयात विराजमान झालेल्या भगवंतांच्या द्वारा आपण तीर्थांनाच महातीर्थाची योग्यता मिळवून देता. (१०) 
 
अपि नः सुहृदस्तात बान्धवाः कृष्णदेवताः । दृष्टाः श्रुता वा यदवः स्वपुर्यां सुखमासते ॥ ११ ॥ 
काका! तीर्थे पहाताना द्वारका पाहिलीत का । सर्वांचा देव तो कृष्ण सांगावे क्षेम तेथले ॥ ११ ॥ 
तात -  बा विदुरा ! - नः -  आमचे - सुहृदः -  मित्र - बान्धवा -  बंधुवर्ग - कृष्णदेवताः -  कृष्णाला देव मानणारे - यदवः -  यादव - दृष्टाः -  पाहिले - वा -  किंवा - श्रुताः -  ऐकिले - स्वपुर्यां -  स्वतःच्या नगरीत - सुखं -  सुखरूप - आसते -  आहेत - अपि -  काय ? ॥११॥ 
 
आमचे सुहृद, बंधु-बांधव यादव, ज्यांचे एकमात्र आराध्य श्रीकृष्ण आहेत, ते आपल्या नगरात सुखरूप आहेत ना ? आपण त्यांना समक्ष भेटला नसाल तरी त्यांचेविषयी ऐकले तरी असेल. (११) 
 
इत्युक्तो धर्मराजेन सर्वं तत् समवर्णयत् । यथानुभूतं क्रमशो विना यदुकुलक्षयम् ॥ १२ ॥ 
ऐकोनी प्रश्न राजाचे पाहिले ऐकिले जसे । सांगितले तसे सर्व यदुनिःपात ना वदे ॥ १२ ॥ 
इति -  याप्रमाणे - धर्मराजेन -  धर्मराजाने - उक्तः -  बोललेला - यथा -  ज्याप्रमाणे - अनुभूतं -  अनुभव घेतलेले - तत् -  ते - सर्वं -  सगळे - यदुकुलक्षयं -  यादवांच्या वंशाच्या नाशाला - विना -  सोडून - क्रमशः -  अनुक्रमाने - समवर्णयत् -  वर्णिता झाला. ॥१२॥ 
 
युधिष्ठिराने असे विचारल्यानंतर विदुराने तीर्थक्षेत्रे आणि यदुवंशीयांच्या संदर्भात जे काही अनुभवले होते, ते सविस्तर सांगितले. फक्त यदुवंशाच्या विनाशाबद्दल तो काही बोलला नाही. (१२) 
 
नन्वप्रियं दुर्विषहं नृणां स्वयमुपस्थितम् । नावेदयत् सकरुणो दुःखितान् द्रष्टुमक्षमः ॥ १३ ॥ 
करुणाकर काकांनी वार्ता दुःखमयी अशी । असह्य पांडवांसाठी म्हणोनी कथिली नसे॥ १३ ॥ 
ननु -  खरोखर - दुःखितान् -  दुःखयुक्त अशांना - द्रष्टुं -  पाहण्याला - अक्षमः -  असमर्थ - सकरुणः -  दयाळू - नृणां -  मनुष्यांना - दुर्विषहं -  सहन न होणार्या - उपस्थितं -  प्राप्त झालेल्या - अप्रियं -  प्रिय नव्हे अशाला - स्वयं -  स्वतः - न आवेदयत् -  सांगता झाला नाही. ॥१३॥ 
 
करुण हृदय असलेला विदुर पांडवांना दुःखी अवस्थेत पाहू शकत नव्हता. म्हणून त्याने ही अप्रिय आणि असह्य घटना पांडवांना सांगितली नाही. नाहीतरी ती घटना आपोआप समजणार होतीच. (१३) 
 
कञ्चित् कालमथ अवात्सीत् सत्कृतो देववत्सुखम् । भ्रातुर्ज्येष्ठस्य श्रेयस्कृत् सर्वेषां सुखमावहन् ॥ १४ ॥ 
पांडवे पूजिले काका देवता पूजिणे जशा । इच्छेने धृतराष्ट्राच्या आणखी राहिले तिथे ॥ १४ ॥ 
अथ -  नंतर - देववत् -  देवाप्रमाणे - सत्कृतः -  सत्कार केलेला - ज्येष्ठस्य -  थोरल्या - भ्रातुः -  भावाच्या - श्रेयस्कृत् -  कल्याण करणारा - सर्वेषां -  सर्वांच्या - प्रीतिं -  प्रीतीला - आवहन् -  धारण करणारा - कञ्चित् -  काही एक - कालं -  काळपर्यंत - सुखं -  सुखाने - अवात्सीत् -  राहिला. ॥१४॥ 
 
पांडव विदुराची एखाद्या देवासारखी सेवा करीत असत. तो काही दिवस सुखाने हस्तिनापुरात राहिला आणि आपले थोरले बंधू धृतराष्ट्र यांचे कल्याण चिंतीत त्याने सर्वांना प्रसन्न केले. (१४) 
 
अबिभ्रदर्यमा दण्डं यथावत् अघकारिषु । यावद् दधार शूद्रत्वं शापात् वर्षशतं यमः ॥ १५ ॥ 
विदूर यमधर्मोची मांडव्य ऋषि शापिता । शतवर्ष म्हणोनिया शूद्र जन्मोनि राहिले । आर्यमे दंडिले पाप्यां त्याकाळी शतवर्ष की ॥ १५ ॥ 
यावत् -  जोपर्यंत - यमः -  यमधर्म - शापात् -  शापामुळे - वर्षशतं -  शंभर वर्षे - शूद्रत्वं -  शूद्रपणाला - दधार -  धरिता झाला - अर्यमा -  सूर्य - अघकारिषु -  पापी लोकांवर - यथावत् -  पूर्वीप्रमाणे - दंण्डं -  दंडाला - अबिभ्रत् -  धरिता झाला. ॥१५॥ 
 
विदुर तर साक्षात यमराज होता. मांडव्य ऋषींनी दिलेल्या शापामुळे तो शंभर वर्षांसाठी शूद्र जन्मात आला होता. या काळात यमराजाच्या स्थानावर अर्यमा होते व ते पाप्यांना योग्य दंड देत होते. (१५) 
 
युधिष्ठिरो लब्धराज्यो दृष्ट्वा पौत्रं कुलन्धरम् । भ्रातृभिर्लोकपालाभैः मुमुदे परया श्रिया ॥ १६ ॥ 
पाहोनी मुख नाताचे संपत्तीत अपार त्या । बंधूसवे युधिष्ठिर राहिला हर्षुनी सदा॥ १६ ॥ 
लब्धराज्यः -  राज्यप्राप्ति झालेला - युधिष्ठिरः -  धर्मराज - कुलंधरं -  कुरुवंशाला धरणार्या - पौत्रं -  नातवाला - दृष्ट्वा -  पाहून - लोकापालाभैः -  लोकापालांप्रमाणे तेजस्वी अशा - भ्रातृभिः -  भीमादि भावांशी - परया -  श्रेष्ठ अशा - श्रिया -  राज्यश्रीने - मुमुदे -  आनंदित झाला. ॥१६॥ 
 
राज्य प्राप्त झाल्यावर लोकपालांसारख्या असलेल्या बंधूंसह राजा युधिष्ठिर, आपला वंश चालविणार्या परीक्षिताला पाहून श्रेष्ठ राज्यलक्ष्मीमुळे आनंदात राहू लागला. (१६) 
 
एवं गृहेषु सक्तानां प्रमत्तानां तदीहया । अत्यक्रामत् अविज्ञातः कालः परमदुस्तरः ॥ १७ ॥ 
नित्याचे गुंफिता कर्म पांडवा हर्ष होतसे । पडला विसरो त्यांना मृत्यु सन्निध पातला ॥ १७ ॥ 
एवं -  याप्रमाणे - गृहेषु -  घरात - सक्तानां -  आसक्ति ठेवणार्यांचा - तदीहया -  त्यांच्या इच्छेने - प्रमत्त्तानां -  बेसावध असणार्यांचा - परमदुस्तरः -  तरून जाण्यास अत्यंत कठीण असा - कालः -  काल - अविज्ञातः -  न समजतांच - अत्यक्रामत् -  निघून गेला. ॥१७॥ 
 
याप्रकारे पांडव गृहस्थाश्रमाच्या व्यापात रमून गेले आणि त्याचबरोबर त्यांच्या लक्षातही आले नाही की आपले आयुष्य संपत आले आहे. पाहता पाहता जी वेळ कोणी टाळू शकत नाही, ती आलीच. (१७) 
 
विदुरस्तत् अभिप्रेत्य धृतराष्ट्रं अभाषत । राजन् निर्गम्यतां शीघ्रं पश्येदं भयमागतम् ॥ १८ ॥ 
काळाची गति पाहोनी विदूर बंधुला वदे । पहा तो पातला काळ निघावे इथुनी त्वरे ॥ १८ ॥ 
विदुरः -  विदुर - तत् -  ते - अभिप्रेत्य -  जाणून - धृतराष्ट्रं -  धृतराष्ट्राला - अभाषत -  बोलला. - राजन् -  हे राजा धृतराष्ट्रा ! - शीघ्रं -  लवकर - निर्गम्यतां -  बाहेर पडा - इदं -  ह्या - आगतं -  आलेल्या - भयं -  भयाला - पश्य -  पाहा. ॥१८॥ 
 
परंतु काळाची गती जाणून विदुर धृतराष्ट्राला म्हणाला - महाराज, आता काळ तर मोठा कठीण आला आहे. तेव्हा झटपट येथून निघावे. (१८) 
 
प्रतिक्रिया न यस्येह कुतश्चित् कर्हिचित् प्रभो । स एष भगवान् कालः सर्वेषां नः समागतः ॥ १९ ॥ 
सर्वांच्या शिरि तो घाली घिरट्या न कळे कुणा॥ १९ ॥ 
प्रभो -  हे राजा धृतराष्ट्रा ! - इह -  येथे - यस्य -  ज्याचा - कुतश्चित् -  कोठूनही - कर्हिचित् -  केव्हाही - प्रतिक्रिया -  प्रतिकार - न -  नाही. - सः -  तो - एव -  च - भगवान् -  सर्वगुणसंपन्न - कालः -  काल - नः -  आमच्या - सर्वेषां -  सर्वांकडे - समागतः -  प्राप्त झाला. ॥१९॥ 
 
हे राजा, सर्वसमर्थ असा काळ आता आपल्या सर्वांच्या डोक्यावर घिरट्या घालू लागला आहे, ज्याला टाळण्याचा कोठेच कोणताही उपाय नाही. (१९) 
 
येन चैवाभिपन्नोऽयं प्राणैः प्रियतमैरपि । जनः सद्यो वियुज्येत किमुतान्यैः धनादिभिः ॥ २० ॥ 
सर्वांना प्रीय तो प्राण दुजे ना श्रेष्ठ त्याहुनी । जाता तो सर्व ते खोटे धन ते काय त्या पुढे ॥ २० ॥ 
च -  आणि - येन -  ज्याने - अभिपन्नः -  पीडिलेला - अयं -  हा - जनः -  लोक - एव -  च - प्रियतमैः -  फारच आवडत्या - अपि -  सुद्धा - प्राणैः -  प्राणांसह - सद्यः -  तत्काळ - वियुज्येत -  वियोगयुक्त होतो - उत -  तर मग - अन्यैः -  दुसर्या - धनादिभिः -  द्रव्यादिकांनी - किं -  काय ? ॥२०॥ 
 
काळाच्या अधीन होऊन, जीवाला अत्यंत प्रिय असलेला प्राणही बोलता बोलता निघून जातो; तर मग धन इत्यादि वस्तूंची काय कथा ? (२०) 
 
पितृभ्रातृसुहृत्पुत्रा हतास्ते विगतं वयः । आत्मा च जरया ग्रस्तः परगेहमुपाससे ॥ २१ ॥ 
मेले की आप्त त्या युध्दी काका भाऊ नि पुत्र ही । तुम्हीही जाहले वृध्द पडले परक्या घरी ॥ २१ ॥ 
ते -  तुझे - पितृभ्रातृसुहृत्पुत्राः -  पितर, भाऊ, मित्र व मुलगे - हताः -  मेले - वयः -  वय - विगतं -  गेले - च -  आणि - आत्मा -  देह - जरया -  वृद्धावस्थेत - ग्रस्तः -  पीडिलेला - परगेहं -  दुसर्याच्या घराला - उपाससे -  सेवितोस. ॥२१॥ 
 
आपले चुलते, बंधू, नातेवाईल आणि पुत्र सर्व मारले गेले, आपले वयही झाले आहे, शरीर वृद्धत्वाची शिकार झाली आहे आणि आपण दुसर्याच्या आश्रयाला येऊन राहिलात ! (२१) 
 
अहो महीयसी जन्तोः जीविताशा यया भवान् । भीमापवर्जितं पिण्डं आदत्ते गृहपालवत् ॥ २२ ॥ 
अरे रे! प्राणिया इच्छा कितीही जगले तरी । भीमाने फेकिल्या घासा श्वानाच्या परि भक्षिता ॥ २२ ॥ 
अहो -  किती हो ! - जन्तोः -  प्राणिमात्रांची - महीयसी -  मोठी - जीविताशा -  जगण्याची इच्छा - यया -  जिने - भवान् -  आपण - गृहपालवत् -  कुत्र्याप्रमाणे - भीमेन -  भीमाने - आवर्जितं -  दिलेल्या - पिण्डं -  अन्नाच्या गोळ्याला - आदत्ते -  घेत आहा. ॥२२॥ 
 
पहा ना ! या प्राण्याची जिवंत राहण्याची इच्छा किती प्रबळ असते ती ! म्हणूनच आपण भीमाने देलेले अन्न खाऊन कुत्र्यासारखे जीवन जगत आहात ! (२२) 
 
अग्निर्निसृष्टो दत्तश्च गरो दाराश्च दूषिताः । हृतं क्षेत्रं धनं येषां तद्दत्तैरसुभिः कियत् ॥ २३ ॥ 
जाळुनी मारण्या ज्यांना अन्नात विष घालुनी । किती प्रयत्न ते केले पत्निला अवमानिले । भूमिही हरिली ज्यांची धनही सर्व घेतले । खातसा तुकडा त्यांचा ह्यात का गौरवो असे ॥ २३ ॥ 
येषां -  ज्यांना - अग्निः -  अग्नि - निसृष्टः -  दिला - गरः -  विष - दत्तः -  दिले - च -  आणि - दाराः -  स्त्री - दूषिताः -  अपमानिली - क्षेत्रं -  राज्य - च -  आणि - धनं -  द्रव्य - हृतं -  हरिले - तद्दत्तैः -  त्यांनी दिलेल्या - असुभिः -  प्राणांनी - कियत् -  काय उपयोग ? ॥२३॥ 
 
ज्यांना आपण अग्नीत जाळून मारण्याचा प्रयत्न केलात, विषप्रयोग करून मारण्याची इच्छा केलीत, भर सभेत ज्यांच्या विवाहित पत्नीला अपमानित केलेत, ज्यांची भूमी आणि धन हिसकावून घेतलेत, त्यांच्याच अन्नावर प्राणांचे पोषण करण्यात काय अर्थ आहे ? (२३) 
 
तस्यापि तव देहोऽयं कृपणस्य जिजीविषोः । परैत्यनिच्छतो जीर्णो जरया वाससी इव ॥ २४ ॥ 
कीव ती तव ज्ञानाची तरीही जगतोस तू । तुझ्या इच्छे न हो कांही वस्त्रजीर्ण झडल हे ॥ २४ ॥ 
तस्य -  त्या - अपि -  सुद्धा - कृपणस्य -  दीन अशा - जिजीविषोः -  जगण्यास इच्छिणार्या - अनिच्छतः -  इच्छा न करणार्या - तव -  तुझा - अयं -  हा - जीर्णः -  क्षीण झालेला - देहः -  देह - वाससी -  वस्त्रा - इव -  प्रमाणे - जरया -  वृद्धावस्थेने - परैति -  क्षय पावतो. ॥२४॥ 
 
अजूनही तुम्ही जिवंत राहू इच्छिता, ही तुमच्या मूर्खपणाची हद्दच म्हणायची. वृद्धापकाळाने गलितगात्र झालेले हे शरीर जुन्या वस्त्राप्रमाणे तुमची इच्छा नसली तरी क्षीण होतच आहे. (२४) 
 
गतस्वार्थमिमं देहं विरक्तो मुक्तबन्धनः । अविज्ञातगतिः जह्यात् स वै धीर उदाहृतः ॥ २५ ॥ 
अशा जीर्ण शरीराने काय तू हीत साधिसी । देहाची सोडणे माया स्वजनातूनि दूर हो । अज्ञात राहुनी मृत्यु धीराची धीरता असे ॥ २५ ॥ 
विरक्तः -  विषयांवर प्रेम न करणारा - मुक्तबंधनः -  सर्व सांसारिक बंधनांपासून मुक्त झालेला - अविज्ञातगतिः -  ज्याची गति माहीत नाही असा - गतस्वार्थं -  स्वार्थत्याग केलेल्या - इमं -  ह्या - देहं -  देहाला - जह्यात् -  सोडील - वै -  खरोखर - सः -  तो - धीरः -  शहाणा - उदाहृतः -  म्हटला आहे. ॥२५॥ 
 
या शरीराने आता तुमचा कोणताच स्वार्थ साधणार नाही. यात गुंतू नका. ममतेचे बंधन तोडून विरक्त व्हा. जो आपल्या सगे सोयर्यांना नकळत शरीराचा त्याग करतो, तोच खरा धीर पुरुष म्हटला जातो. (२५) 
 
यः स्वकात्परतो वेह जातनिर्वेद आत्मवान् । हृदि कृत्वा हरिं गेहात् प्रव्रजेत् स नरोत्तमः ॥ २६ ॥ 
ऐकोनी वा स्वये जावे धरोनी भगवान् मनी । संन्यास घेउनी जातो तो खरा पुरुषोत्तम ॥ २६ ॥ 
इह -  येथे - यः -  जो - स्वकात् -  स्वतःकडून - वा -  किंवा - परतः -  दुसर्याकडून - जातनिर्वेदः -  विरक्त झालेला - आत्मवान् -  आत्मज्ञानी - हृदि -  हृदयात - हरिं -  परमेश्वराला - कृत्वा -  करून - गेहात् -  घरातून - प्रव्रजेत् -  बाहेर जाईल - सः -  तो - नरोत्तमः -  श्रेष्ठ पुरुष. ॥२६॥ 
 
स्वतःच्या समजाने अगर दुसर्याने समजविल्याने, जो या संसाराला दुःखरूप समजून त्यापासून विरक्त होतो आणि आपले अंतःकरण वश करून घेऊन हृदयात भगवंताला धारण करून संन्यास घेण्यासाठी घराच्या बाहेर पडतो, तोच उत्तम पुरुष होय. (२६) 
 
अथोदीचीं दिशं यातु स्वैरज्ञात गतिर्भवान् । इतोऽर्वाक् प्रायशः कालः पुंसां गुणविकर्षणः ॥ २७ ॥ 
पुढे जो काळ येई तो हरील गुण सर्वही । तेंव्हा ना वदता कोणा जावे तू उत्तरेकडे ॥ २७ ॥ 
अथ -  नंतर - स्वैः -  स्वकीयांनी - अज्ञातगतिः -  न जाणला आहे मार्ग ज्याचा असे - भवान् -  आपण - उदीचीं -  उत्तर - दिशं -  दिशेला - यातु -  जावे - इतः -  येथून - अर्वाक् -  पुढे येणारा - कालः -  काल - प्रायशः -  बहुतेक - पुंसां -  पुरुषांच्या - गुणविकर्षणः -  गुणांचा नाश करणारा. ॥२७॥ 
 
यापुढील काळ, मनुष्यांचे गुण कमी करणारा असेल, म्हणून आपण आपल्या कुटुंबियांच्या नकळत उत्तराखंडाकडे निघून जा. (२७) 
 
एवं राजा विदुरेणानुजेन  प्रज्ञाचक्षुर्बोधित आजमीढः । छित्त्वा स्वेषु स्नेहपाशान्द्रढिम्नो निश्चक्राम भ्रातृसन्दर्शिताध्वा ॥ २८ ॥ 
(इंद्रवज्रा) जेंव्हा असा बंधु विदूर बोले तै ज्ञानडोळे उघडेचि झाले । बंधू तसे भावकिही त्यजोनी स्वमार्ग तेणे धरिला सुखाने ॥ २८ ॥ 
एवं -  ह्याप्रमाणे - हि -  खरोखर - अनुजेन -  कनिष्ठ भाऊ अशा - विदुरेण -  विदुराने - बोधितः -  उपदेशिलेला - भ्रातृसंदर्शिताध्वा -  भावाने ज्याला सन्मार्ग दाखवून दिला आहे असा - प्रज्ञाचक्षुः -  बुद्धीच ज्याचे डोळे, अर्थात आंधळा - आजमीढः -  अजमीढ वंशात उत्पन्न झालेला - राजा -  राजा धृतराष्ट्र - स्वेषु -  नातेवाईक जे धर्मराजादि त्यांचे वरील - द्रढिम्नः -  बळकट - स्नेहपाशान् -  प्रेमपाशाला - छित्वा -  तोडून - निश्चक्राम -  निघाला. ॥२८॥ 
 
जेव्हा लहान भाऊ विदुराने अंध राजा धृतराष्ट्राला याप्रमाणे समजाविले, तेव्हा बांधवांचे सुदृढ स्नेहपाश तोडून टाकून, भावाने दाखविलेल्या मार्गाने तो निघाला. (२८) 
 
पतिं प्रयान्तं सुबलस्य पुत्री  पतिव्रता चानुजगाम साध्वी । हिमालयं न्यस्तदण्डप्रहर्षं मनस्विनामिव सत्सम्प्रहारः ॥ २९ ॥ 
गांधारिने ते बघता निघाली  यात्रेस जाण्या हिमपर्वताच्या । ज्या पर्वती ते यति तृप्त होती घावास साही रणवीर जैसा ॥ २९ ॥ 
च -  आणि - साध्वी -  सद्धर्माने वागणारी - पतिव्रता -  पतिव्रता  - सुबलस्य -  सुबलराजाची - पुत्री -  मुलगी गांधारी - मनस्विनां -  थोर पुरुषांच्या - सत्संप्रहारः -  धार्मिक वादविवाद - इव -  प्रमाणे - न्यस्तदण्डप्रहर्षं -  संन्यासी लोकांना आनंद देणार्या - हिमालयं -  हिमालय पर्वताला - प्रयान्तं -  जाणार्या - पतिं -  पतीला - अनुजगाम -  अनुसरती झाली. ॥२९॥ 
 
ज्याप्रमाणे वीरपुरुषांना लढाईच्या मैदानात आपल्या शत्रूंनी केलेल्या न्यायोचित प्रहारांनी सुखप्राप्ती होते, त्याप्रमाणे हिमालयाची यात्रा करण्याने संन्यास घेतलेल्यांना होते, अशा हिमालयाच्या यात्रेला आपले पतिदेव निघाले आहेत असे पाहून परम पतिव्रता सुबलनंदिनी गांधारी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ चालू लागली. (२९) 
 
अजातशत्रुः कृतमैत्रो हुताग्निः  विप्रान् नत्वा तिलगोभूमिरुक्मैः । गृहं प्रविष्टो गुरुवन्दनाय न चापश्यत् पितरौ सौबलीं च ॥ ३० ॥ 
संध्या हुताग्नी करिताच धर्म  युधिष्ठिराने द्विज वंदिले नी । गाई भुमी स्वर्ण दिलेहि दान येता घरी तो धृतराष्ट्र नाही ॥ ३० ॥ 
कृतमैत्रः -  सूर्योपासना केलेला - हुताग्निः -  अग्निपूजा केलेला - अजातशत्रुः -  धर्मराज - तिलगोभूमिरुक्मैः -  तीळ गाई पृथ्वी व सोने ह्यायोगे - विप्रान् -  ब्राह्मणांना - नत्वा -  नमस्कार करून - गुरुवन्दनाय -  वडिलांच्या पाया पडण्याकरिता - गृहं -  घरात - प्रविष्टः -  गेला - च -  आणि - पितरौ -  दोन वडिलांस म्हणजे विदुर व धृतराष्ट्र यांस - च -  आणि - सौबलीं -  गांधारीला - न अपश्यत् -  न पाहता झाला. ॥३०॥ 
 
अजातशत्रू युधिष्ठिराने दुसरे दिवशी प्रातःकाळी संध्यावंदन आणि अग्निहोत्र करून ब्राह्मणांना नमस्कार केला, त्यांना तीळ, गायी, भूमी आणि सुवर्णाचे दान दिले. त्यानंतर जेव्हा तो गुरुजनांना वंदन करण्यासाठी म्हणून राजमहालात गेला, तेव्हा त्याला धृतराष्ट्र, विदुर आणि गांधारी दिसले नाहीत. (३०) 
 
तत्र सञ्जयमासीनं पप्रच्छोद्विग्नमानसः । गावल्गणे क्व नस्तातो वृद्धो हीनश्च नेत्रयोः ॥ ३१ ॥ 
(अनुष्टुप्) तेंव्हा चिंतीत होवोनी पुसले संजयास की । माझे वृध्दपिता अंध कोठे ते सांग पा मला ॥ ३१ ॥ 
उद्विग्नमानसः -  दुःखितान्तःकरण झालेला - तत्र -  तेथे - आसीनं -  बसलेल्या - सञ्जयं -  संजयाला - पप्रच्छ -  विचारिता झाला. - गावल्गणे -  हे संजया ! - वृद्धः -  म्हातारा - च -  आणि - नेत्रयोः -  दोन नेत्रांच्या - हीनः -  न्यून - नः -  आमचा - तातः -  बाबा - क्व -  कोठे ? ॥३१॥ 
 
युधिष्ठिने खिन्न होऊन तेथे बसलेल्या संजयाला विचारले, संजया, माझे ते वृद्ध अंध काका धृतराष्ट्र कुठे आहेत ? (३१) 
 
अम्बा च हतपुत्राऽऽर्ता पितृव्यः क्व गतः सुहृत् । अपि मय्यकृतप्रज्ञे हतबन्धुः स भार्यया । आशंसमानः शमलं गङ्गायां दुःखितोऽपतत् ॥ ३२ ॥ 
पुत्र दुःखित ती माता काका विदुर ते कुठे । बंधूंच्या हननी शंका माझी कां त्यां गमे तशी । गांधारी सह कां त्यांनी गंगेत देह अर्पिला? ॥ ३२ ॥ 
हतपुत्रार्ता -  मुलगे मेल्यामुळे पीडिलेली - अम्बा -  आई गांधारी - च -  आणि - सुहृत् -  चांगल्या विचाराने युक्त असा - पितृव्यः -  चुलता विदुर - क्व -  कोठे - गतः -  गेला - हतबन्धुः -  ज्याचे बांधव मेले आहेत असा - सः -  तो धृतराष्ट्र  - भार्यया -  बायकोसह - अकृतप्रज्ञे -  अपूर्ण ज्ञान असणार्या - मयि -  माझे ठिकाणी - शमलं -  अपराधाला किंवा पापाला - आशंसमानः -  शंकित होणारा - दुःखितः -  व दुःख करणारा - गङगायां -  गंगेत - अपतत् -  पडला - अपि -  काय ? ॥३२॥ 
 
पुत्रशोकाने पीडित झालेली दुःखी काकू गांधारी आणि माझे हितैषी चुलते विदुर कोठे गेले ? धृतराष्ट्र तर आपले पुत्र आणि बांधव मारले गेल्याने दुःखी झाले होते. मीच कसा मंदबुद्धी पहा ! माझ्याकडून काही अपराध घडलेला पाहून माता गांधारीसह त्यांनी गंगेत उडी घेतली नसेल ना ? (३२) 
 
पितर्युपरते पाण्डौ सर्वान्नः सुहृदः शिशून् । अरक्षतां व्यसनतः पितृव्यौ क्व गतावितः ॥ ३३ ॥ 
लहान असता आम्ही पित्याच्या निधनोत्तरे । रक्षिले संकटांमाजी हाय! गेले कुठे वदा ॥ ३३ ॥ 
पितरि -  बाप - पाण्डौ -  पांडु - उपरते -  परलोकवासी झाला असता  - सुहृदः -  सदाचारसंपन्न पांडूचे - शिशून् -  मुलगे अशा - सर्वान् -  सगळ्या - नः -  आम्हाला - व्यसनतः -  संकटापासून - अरक्षतां -  रक्षिले - पितृव्यौ -  चुलता व चुलती अर्थात धृतराष्ट्र व गांधारी - इतः -  येथून - क्व -  कोठे - गतौ -  गेली. ॥३३॥ 
 
आमचे वडील पांडू यांचा मृत्यू झाला, तेव्हा आम्ही लहान होतो. त्यावेळी या दोन्ही चुलत्यांनी कठीण प्रसंगी आम्हांला वाचविले. ते येथून कोठे निघून गेले बरे ? (३३) 
 
सूत उवाच ।  कृपया स्नेहवैक्लव्यात् सूतो विरहकर्शितः । आत्मेश्वरमचक्षाणो न प्रत्याहातिपीडितः ॥ ३४ ॥ 
सूतजी सांगतात- वियोगे स्वामिच्या तेव्हां वदला नच संजय । आली विकलता अंगी कृपास्नेह दुरावला ॥ ३४ ॥ 
विरहकर्शितः -  वियोगाने कृश झालेला - आत्मेश्वरं -  आपल्या धन्याला म्हणजे धृतराष्ट्राला - अचक्षाणः -  न पाहणारा - अतिपीडितः -  फारच पीडित झालेला - सूतः -  संजय - कृपया -  दयेने - स्नेहवैक्लव्यात् -  प्रेमामुळे विव्हळ होऊन - न प्रत्याह -  उत्तर देता झाला नाही. ॥३४॥ 
 
सूत म्हणाले - आपले स्वामी धृतराष्ट्र दिसत नाहीत हे पाहून त्यांची कृपा आणि स्नेह यांमुळे व्याकूळ झालेला संजय विरहाने अत्यंत कष्टी झाला होता. तो दुःखावेगामुळे युधिष्ठिराला काही उत्तर देऊ शकला नाही. (३४) 
 
विमृज्याश्रूणि पाणिभ्यां विष्टभ्यात्मानमात्मना । अजातशत्रुं प्रत्यूचे प्रभोः पादावनुस्मरन् ॥ ३५ ॥ 
बुध्दिने चित्त ते शांत धीराने करुनी पुन्हा । हाताने पुसुनी डोळे स्वामीला स्मरुनी वदे ॥ ३५ ॥ 
पाणिभ्यां -  दोन हातांनी - अश्रूणि -  डोळ्यांतील अश्रूंना - विमृज्य -  पुसून - आत्मना -  स्वतः - आत्मानं -  स्वतःला - विष्टभ्य -  धीर देऊन - प्रभोः -  धनी जो धृतराष्ट्र त्याच्या - पादौ -  दोन पायांना - अनुस्मरन् -  स्मरणारा - अजातशत्रुं -  धर्मराजाला - प्रत्यूचे -  बोलला. ॥३५॥ 
 
त्याने हातांनी अश्रू पुसले, स्वतःला सावरले आणि आपले स्वामी धृतराष्ट्र यांच्या चरणांचे स्मरण करीत तो युधिष्ठिराला म्हणाला, (३५) 
 
सञ्जय उवाच । नाहं वेद व्यवसितं पित्रोर्वः कुलनन्दन । गान्धार्या वा महाबाहो मुषितोऽस्मि महात्मभिः ॥ ३६ ॥ 
संजय म्हणाला- कुठे दोन्हीहि काका नी गेली गांधारि ती कुठे । न ठावे मजला कांही संकल्प काय तो पुढे ॥ पहा त्या थोर आत्म्यांनी मजला ठकवीयले । असे हे जाहले सारे श्रीबाहो कुलनंदना ॥ ३६ ॥ 
कुलनंदन -  कुरुकुलाला आनंद देणार्या हे धर्मराजा ! - अहं -  मी - वः -  तुमच्या - पित्रोः -  वडिलांच्या म्हणजे धृतराष्ट्र व विदुर यांच्या - वा -  अथवा - गान्धार्याः -  गांधारीच्या - व्यवसितं -  मनातील निश्चयात्मक अभिप्रायाला - न वेद -  जाणत नाही - महाबाहो -  हे आजानुबाहु धर्मराजा ! - महात्मभिः -  थोर मनाच्या पुरुषांनी - मुषितः -  फसविलेला - अस्मि -  आहे. ॥३६॥ 
 
संजय म्हणाला - हे कुरुकुलनंदना, आपले दोन्ही चुलते आणि गांधारी यांनी काय विचार केला, याची मला मुळीच कल्पना नाही. महाबाहो, त्या महात्म्यांनी तर मला पोरके केले. (३६) 
 
अथाजगाम भगवान् नारदः सहतुम्बुरुः । प्रत्युत्थायाभिवाद्याह सानुजोऽभ्यर्चयन्निव ॥ ३७ ॥ 
बोलणे बोलता ऐसे वीणा घेवोनि नारद । पातता उठुनी सर्वे नमस्कारहि आर्पिला ॥ ३७ ॥ 
अथ -  नंतर - सहतुम्बुरुः -  तुम्बुरुसह - भगवान् -  सर्वैश्वर्यसंपन्न  - नारदः -  नारद - आजगाम -  आला - सानुजः -  भावांसह धर्मराज - प्रत्युत्थाय -  उठून सामोरे जाऊन - अभिवाद्य -  नमस्कार करून - अभ्यर्चयन् -  पूजा करणारा - इव -  अशाप्रमाणे - आह -  बोलला. ॥३७॥ 
 
तेवढ्यात तुम्बुरू गंधर्वांसह देवर्षी नारद तेथे आले. युधिष्ठिराने आपल्या बंधूंसह उठून त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा आदर करीत म्हटले. (३७) 
 
युधिष्ठिर उवाच । नाहं वेद गतिं पित्रोः भगवन् क्व गतावितः । अम्बा वा हतपुत्रार्ता क्व गता च तपस्विनी ॥ ३८ ॥ 
राजा युधिष्ठिर म्हणाला -  नारदा द्वय काकाते ठाव त्यांचा नसेच की । वियोगे पुत्र मित्रांच्या गेले का मज ना कळे ॥ ३८ ॥ 
भगवन् -  सर्वैश्वर्यसंपन्न नारदा ! - अहं -  मी - पित्रोः -  वडील धृतराष्ट्र व विदुर यांच्या - गतिं -  गमनाला - न वेद -  जाणत नाही - इतः -  येथून - क्व -  कोठे - गतौ -  गेले - वा -  किंवा - तपस्विनी -  तप करणारी - हतपुत्रार्ता -  पुत्र मारल्यामुळे पीडिलेली - अम्बा -  आई गांधारी - क्व -  कोठे - गता -  गेली - च -  आणि - भगवान् -  सर्वैश्वर्यसंपन्न असे आपण - अपारे -  अफाट समुद्रात - कर्णधारः -  नावाडी - इव -  अशाप्रमाणे - पारदर्शकः -  परतीर दाखविणारे. ॥३८॥ 
 
युधिष्टिर म्हणाला - भगवन, माझ्या दोन्ही चुलत्यांचा मला ठावठिकाणा लागत नाही. ते दोघे आणि पुत्रशोकाने व्याकूळ झालेली बिचारी माता गांधारी येथून कोठे गेले असतील बरे ? (३८) 
 
कर्णधार इवापारे भगवान् पारदर्शकः । अथाबभाषे भगवान् नारदो मुनिसत्तमः ॥ ३९ ॥ 
बुडत्या या जहाजात कर्णधार तुम्ही असा । नारदे ऐकुनी सारे पुढती बोलले असे ॥ ३९ ॥ 
अथ -  नंतर - मुनिसत्तमः -  ऋषिश्रेष्ठ - भगवान् -  सर्वैश्वर्यसंपन्न  - नारदः -  नारद - आबभाषे -  बोलले - राजन् -  धर्मराजा - कञ्चन -  कोणाबद्दलही - मा शुचः -  शोक करू नकोस. - यत् -  कारण - जगत् -  जग - ईश्वरवशं -  परमेश्वराधीन. ॥३९॥ 
 
भगवन्, या अथांग दुःखसमुद्रातून नावाड्याप्रमाणे पार करणारे आपणच आहत. तेव्हा देवर्षी भगवान नारद म्हणाले. (३९) 
 
नारद उवाच । मा कञ्चन शुचो राजन् यदीश्वरवशं जगत् । लोकाः सपाला यस्येमे वहन्ति बलिमीशितुः । स संयुनक्ति भूतानि स एव वियुनक्ति च ॥ ४० ॥ 
धर्मा तू हा कुणासाठी शोक तो करणे नसे । घडते ईश इच्छेने आधीन लोक सर्व त्यां ॥ जोडितो सर्व प्राण्यांना तोडितोही तसाचि तो । आधीन लोकपालादी ती इच्छा मानिते जग ॥ ४० ॥ 
इमे -  हे - सपालाः -  लोकपालासह - लोकाः -  सर्व लोक - यस्य -  ज्या - इशितुः -  परमेश्वराच्या - बलिं -  बलीला - वहन्ति -  वाहून नेतात. - सः -  तो - भूतानि -  प्राणिमात्रांना - संयुनक्ति -  जोडतो - च -  आणि - सः -  तो - एव -  च - वियुनक्ति -  तोडतो. ॥४०॥ 
 
धर्मराज, तू कोणासाठीही शोक करू नकोस; कारण हे सर्व ईश्वराच्या अधीन आहे. हे सगळे लोक आणि लोकपाल ज्याच्या आज्ञेचे पालन करतात तोच ईश्वर एका प्राण्याची दुसर्याशी भेट करून देतो आणि तोच त्यांना विभक्त करतो. (४०) 
 
यथा गावो नसि प्रोताः तन्त्यां बद्धाः स्वदामभिः । वाक्तन्त्यां नामभिर्बद्धा वहन्ति बलिमीशितुः ॥ ४१ ॥ 
वेसणी घालिता बैला मानितो सगळे तसे । वर्णाश्रमादि वेदांच्या बंधाने तोचि आवरी ॥ ४१ ॥ 
यथा -  ज्याप्रमाणे - नसि -  नाकात - प्रोताः -  वेसण घातलेले - गावः -  बैल - तन्त्यां -  दावणीत - स्वदामभिः -  आपल्या दाव्यांनी - बद्धाः -  बांधलेले असतात - वाक्तन्त्यां -  वेदवाणीरूप दावणीत - नामभिः -  नावांनी - बद्धाः -  बांधलेले - ईशितुः -  परमेश्वराच्या - बलिं -  बलीला - वहन्ति -  नेतात. ॥४१॥ 
 
ज्याप्रमाणे मोठ्या दाव्याला बांधलेले आणि छोट्या दोरीने नाकात वेसण घातलेले बैल आपल्या मालकाचे ओझे ओढतात, त्याचप्रमाणे मनुष्यसुद्धा वर्णाश्रमादी अनेक प्रकारच्या नामांनी वेदरूपी दोरीत बांधलेले भगवंतांच्या आज्ञेचे पालन करतात. (४१) 
 
यथा क्रीडोपस्कराणां संयोगविगमाविह । इच्छया क्रीडितुः स्यातां तथैवेशेच्छया नृणाम् ॥ ४२ ॥ 
स्वइच्छे बाळ ते खेळे खेळते आणि मोडिते । तसेचि भगवत् इच्छे मनुष्य भेट नी तुटी ॥ ४२ ॥ 
यथा -  ज्याप्रमाणे - क्रीडितुः -  खेळणार्याच्या - इच्छया -  इच्छेने - क्रीडोपस्कराणां -  खेळण्याच्या साधनांचा - तथा -  त्याप्रमाणे - एव -  च - ईशेच्छया -  परमेश्वराच्या इच्छेने  - नृणां -  मनुष्याचे - इह -  येथे - संयोगविगमौ -  संयोग व वियोग - स्यातां -  होतात. ॥४२॥ 
 
ज्याप्रमाणे खेळाडूच्या इच्छेप्रमाणेच क्रीडा-साहित्याची जमवाजमव आणि विल्हेवाट लागते, त्याचप्रमाणे भगवंतांच्या इच्छेनेच मनुष्यांचे संयोग-वियोग होतात. (४२) 
 
यन्मन्यसे ध्रुवं लोकं अध्रुवं वा न चोभयम् । सर्वथा न हि शोच्यास्ते स्नेहात् अन्यत्र मोहजात् ॥ ४३ ॥ 
जीवास नित्य तो माना देह जड अनित्य तो । चैतन्यशुध्द ब्रह्माला नित्यानित्य म्हणो तरी । शोकाचा मूळ हा मोह म्हणोनी शोक ना करी ॥ ४३ ॥ 
यत् -  जर - लोकं -  लोकाला - ध्रुवं -  नेहमी टिकणारे - वा -  किंवा - अध्रुवं -  क्षणिक - च -  आणि - उभयं -  दोन्हीही - न -  नव्हे - मन्यसे -  मानतोस - सर्वथा -  सर्वप्रकारे म्हणजे काहीही मानिले तरी - मोहजात् -  अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या - स्नेहात् -  प्रेमाहून - अन्यत्र -  व्यतिरिक्त - ते -  ते - शोच्याः -  शोक करण्याजोगे - नहि -  नाहीत. ॥४३॥ 
 
तू लोकांना जीवरूपाने नित्य देहारूपाने अनित्य, अथवा शुद्धब्रह्मस्वरूपात नित्य अनित्य दोन्ही नाही, असे मानले, तरी कोणत्याही अवस्थेत मोहजन्य आसक्ति व्यतिरिक्त ते शोक करण्यास योग्य नाहीत. (४३) 
 
तस्माज्जह्यङ्ग वैक्लव्यं अज्ञानकृतमात्मनः । कथं त्वनाथाः कृपणा वर्तेरंस्ते च मां विना ॥ ४४ ॥ 
म्हणोनी धर्म राजा तू त्यागावे विकलो मन । आपुल्या विण ते कैसे राहतील नको स्मरू ॥ ४४ ॥ 
अङग -  हे धर्मराजा ! - तस्मात् -  म्हणून - अज्ञातकृतं -  अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या - आत्मनः -  स्वतःच्या - वैल्कव्यं -  व्याकुळतेला - जहि -  टाक - तु -  ते असे की - अनाथाः -  निराश्रित - च -  आणि - कृपणाः -  दीन - ते -  ते - मां -  मला - विना -  सोडून - कथं -  कसे - वर्तेरन् -  जगतील. ॥४४॥ 
 
म्हणून धर्मराजा, ते दीन-दुःखी चुलते-चुलती अशा असहाय अवस्थेत माझ्याशिवाय कसे राहू शकतील, हा अज्ञानजन्य मनाचा विमनस्कपणा सोडून दे. (४४) 
 
कालकर्म गुणाधीनो देहोऽयं पाञ्चभौतिकः । कथमन्यांस्तु गोपायेत् सर्पग्रस्तो यथा परम् ॥ ४५ ॥ 
पंचभौतिक हा देह काल-कर्म-गुणीवश । अज्गरा मुखिचा कोणी रक्षी का दुसर्यास तो ॥ ४५ ॥ 
अयं -  हा - पाञ्चभौतिकः -  पञ्चमहाभूतांपासून बनलेला - देहः -  देह - कालकर्मगुणाधीनः -  काल, कर्म व गुण ह्यांच्या स्वाधीन - यथा -  जसा - सर्पग्रस्तः -  सापाने गिळलेला - परं -  दुसर्याला - तु -  तसा तर - अन्यान् -  दुसर्यांना - कथं -  कसा - गोपायेत् -  रक्षील. ॥४५॥ 
 
हे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर काल, कर्म आणि गुण यांच्या अधीन आहे. अजगराच्या तोंडात सापडलेल्या मनुष्याप्रमाणे असलेले हे पराधीन शरीर, दुसर्यांचे संरक्षण कसे करू शकेल ? (४५) 
 
अहस्तानि सहस्तानां अपदानि चतुष्पदाम् । फल्गूनि तत्र महतां जीवो जीवस्य जीवनम् ॥ ४६ ॥ 
तुंडे ते हात वाल्यांचे विपाद श्वापदास नी । सान ते थोर जीवांचे सदा आहार होत की । जीव ते एकमेकांना जीवनी कारको सदा ॥ ४६ ॥ 
अहस्तानि -  हात नाहीत असे - सहस्तानां -  हात असणार्यांचे - अपदानि -  पाय नसणारे - चतुष्पदां -  चार पायांच्या पश्वादिकांचे - तत्र -  त्यात - फल्गूनि -  लहान - महतां -  मोठयांचे - जीवः -  जीव - जीवस्य -  जीवाचे - जीवनं -  उपजीविकासाधन. ॥४६॥ 
 
बिनहातवाले हे हातवाल्यांचे, बिनपायांचे गवत इत्यादि चार पायांच्या पशूंचे आणि छोटे जीव मोठ्या जीवांचे आहार आहेत. अशा प्रकारे एक जीव दुसर्या जीवाच्या जीवनाला कारणीभूत होत असतो. (४६) 
 
तदिदं भगवान् राजन् एक आत्मात्मनां स्वदृक् । अन्तरोऽनन्तरो भाति पश्य तं माययोरुधा ॥ ४७ ॥ 
स्वयंप्रकाश भगवान् जीवाच्या आत बाह्य ही । जीवाचा जीव तो मायें प्रगटे फक्त तू पहा ॥ ४७ ॥ 
राजन् -  हे धर्मराजा - तत् -  ते - इदं -  हे - आत्मनां -  प्राणिमात्रांचा - आत्मा -  सर्वव्यापी जीवस्वरूपी - स्वदृक् -  स्वतःला पाहणारा ज्ञानी - भगवान् -  षड्गुणैश्वर्यसंपन्न  - अन्तरः -  आत - अनन्तरः -  बाहेर - एकः -  एकरूप - मायया -  मायेने - उरुधा -  पुष्कळ प्रकाराने - भाति -  भासतो - तं -  त्याला - पश्य -  पाहा. ॥४७॥ 
 
हे राजा, जीवांची ही जी अनेक रूपे आहेत, त्यांच्या बाहेर आणि आत एकच स्वयंप्रकाश व सर्वांचा आत्मा भगवान मायेच्या द्वारे अनेक प्रकारांनी प्रगट होत आहे, त्या ईश्वराला पाहा. (४७) 
 
सोऽयमद्य महाराज भगवान् भूतभावनः । कालरूपोऽवतीर्णोऽस्यां अभावाय सुरद्विषाम् ॥ ४८ ॥ 
सर्व जीवासि तो दान देणारा भगवंतची । नष्टिण्या देवद्रोह्यांना कालरूपे उभा असे ॥ ४८ ॥ 
महाराज -  हे धर्मराजा ! - भूतभावनः -  प्राणिमात्राचे उत्पादन करून रक्षण करणारा - भगवान् -  सर्वैश्वर्यसंपन्न - कालरूपः -  काळस्वरूपी - सः -  तो - अयं -  हा - अद्य -  आज - सुरद्विषां -  दैत्यांच्या - अभावाय -  नाशाकरिता - अस्यां -  ह्या पृथ्वीतलावर - अवतीर्णः -  उत्पन्न झाला. ॥४८॥ 
 
महाराज, सर्व प्राण्यांना जीवनदान देणारे तेच भगवान यावेळी या पृथ्वीतलावर देवांचा द्रोह करणार्यांचा नाश करण्यासाठी कालरूपाने अवतीर्ण झाले आहेत. (४८) 
 
निष्पादितं देवकृत्यं अवशेषं प्रतीक्षते । तावद् यूयं अवेक्षध्वं भवेद् यावदिहेश्वरः ॥ ४९ ॥ 
देवतामनिची कार्ये जाहले आटपोनि ते । राहिले राहिल्या कार्या प्रतीक्षा तोवरी करा ॥ ४९ ॥ 
देवकृत्यं -  देवांचे कार्य - निष्पादितं -  संपविले  - अवशेषं -  उरलेले - प्रतीक्षते -  संपण्याची वाट पाहत आहे - इह -  येथे - ईश्वरः -  परमेश्वर श्रीकृष्ण - यावत् -  जोपर्यंत - भवेत् -  असेल - तावत् -  तोपर्यंत - यूयं -  तुम्ही - अवेक्षध्वं -  वाट पाहा. ॥४९॥ 
 
त्यांनी देवतांचे काम पुरे केले आहे. उरलेले काम पुरे करण्यासाठी ते थांबले आहेत. जोपर्यंत ते प्रभू येथे आहेत, तोपर्यंत आपण येथे थांबावे. (४९) 
 
धृतराष्ट्रः सह भ्रात्रा गान्धार्या च स्वभार्यया । दक्षिणेन हिमवत ऋषीणां आश्रमं गतः ॥ ५० ॥ स्रोतोभिः सप्तभिर्या वै स्वर्धुनी सप्तधा व्यधात् । सप्तानां प्रीतये नाना सप्तस्रोतः प्रचक्षते ॥ ५१ ॥ 
दक्षिणेस हिमाद्रीच्या गंगेला हर्षिण्या ऋषि । वाह्ते सात भागात स्थापुनी सात आश्रम ॥ ५० ॥ विदूर धूतराष्ट्रोनी गांधारी सोबती तया । गेले निघोनि तेथेची ऐक पा रे युधिष्ठिरा ॥ ५१ ॥ 
भ्रात्रा -  भावाशी - च -  आणि - स्वभार्यया -  स्वस्त्री - गांधार्या -  गांधारीशी - सह -  सहवर्तमान - धृतराष्ट्रः -  धृतराष्ट्र - हिमवतः -  हिमालय पर्वताच्या - दक्षिणेन -  दक्षिण बाजूने - ऋषीणां -  ऋषींच्या - आश्रमं -  आश्रमाला - गतः -  गेला. ॥५०॥  या - जी - स्वर्धुनी - आकाशगंगा - वै - खरोखर - नाना - अनेक - सप्तभिः - सात - स्त्रोतोभिः - प्रवाहांनी - सप्तानां - सप्तर्षींच्या - प्रीतये - प्रीतीकरिता - सप्तधा - सात प्रकारांनी - व्यधात् - विभागून वाहू लागली - सप्तस्रोतः - सप्तस्रोत - प्रचक्षते - म्हणतात. ॥५१॥ 
हिमालयाच्या दक्षिण भागात जेथे सप्तर्षींच्या प्रसन्नतेसाठी गंगामातेने स्वतःला वेगवेगळ्या सात धारात विभागले आहे, ज्याला सप्तस्रोत असे म्हणतात, तेथे ऋषींच्या आश्रमात धृतराष्ट्र, पत्नी गांधारी आणि विदुर, यांचेबरोबर गेले आहेत. (५०-५१) 
 
स्नात्वानुसवनं तस्मिन् हुत्वा चाग्नीन्यथाविधि । अब्भक्ष उपशान्तात्मा स आस्ते विगतैषणः ॥ ५२ ॥ 
त्रिकाल स्नान नी नित्य अग्निहोत्रादि कर्म ते । करिती शांत चित्ताने राहती जळ पीउनी ॥ ५२ ॥ 
अब्भक्षः -  पाणी पिऊन राहिलेला - उपशान्तात्मा -  मन शांत व स्थिर केलेला - विगतैषणः -  निरिच्छ - सः -  तो - तस्मिन् -  तेथे - अनुसवनं -  सकाळ-संध्याकाळ - स्नात्वा -  आंघोळ करून - च -  आणि - यथाविधि -  यथाशास्त्र - अग्नीन् -  अग्नीना - हुत्वा -  हविर्भाग देऊन - आस्ते -  राहिला आहे. ॥५२॥ 
 
तेथे ते त्रिकाल स्नान आणि विधिपूर्वक अग्निहोत्र करतात. आता त्यांच्या चित्तात कोणत्याही प्रकारची कामना शिल्लक नाही. ते फक्त पाणी पिऊन शांतचित्ताने तेथे राहात आहेत. (५२) 
 
जितासनो जितश्वासः प्रत्याहृतषडिन्द्रियः । हरिभावनया ध्वस्तः अजःसत्त्वतमोमलः ॥ ५३ ॥ 
आसना जिंकुनी काका प्राणायामातुनी सह । इंद्रिय विषयातून काढूनी राहिले तसे । धरिता भगवान् चित्ती त्रिगुण मळ संपला ॥ ५३ ॥ 
जितासनः -  आसनविधि ज्याने साध्य करून घेतला आहे असा - जितश्वासः -  प्राणायामादि विधी करणारा - प्रत्याहृतषडिन्द्रियः -  इंद्रियनिग्रह करणारा - हरिभावनया -  परमेश्वरावर भक्ति ठेवून - ध्वस्तरजःसत्त्वतमोमलः -  रजोगुण, तमोगुण व सत्त्वगुण हे जे तीन मळ ते ज्याचे पार नाहीसे झाले आहेत असा. ॥५३॥ 
 
आसन सिद्ध करून, प्राणांना वश करून घेऊन, त्यांनी आपल्या सहाही इंद्रियांना विषयांपासून मागे खेचले आहे. भगवंतांचीच धारणा केल्याने त्यांचे तम, रज आणि सत्त्वगुणाचे दोष नाहीसे झाले आहेत. (५३) 
 
विज्ञानात्मनि संयोज्य क्षेत्रज्ञे प्रविलाप्य तम् । ब्रह्मण्यात्मानमाधारे घटाम्बरमिवाम्बरे ॥ ५४ ॥ ध्वस्तमायागुणोदर्को निरुद्धकरणाशयः । निवर्तिताखिलाहार आस्ते स्थाणुरिवाचलः । तस्यान्तरायो मैवाभूः सन्न्यस्ताखिलकर्मणः ॥ ५५ ॥ 
अहंता बुध्दि बांधोनी आत्मा जो क्षेत्र जाणता । लीन त्यासी करोनिया तेथेचि घट्ट बाधिली ॥ ५४ ॥ महाकाशी घटाकाश ब्रह्मात अर्पिले असे । रोधिले इंद्रिया आणि माया गुणहि संपले । घेउनी कर्मसंन्यास राहिले ते निवांत तै । न करा तेथ जावोनी विघ्न त्या साधनेत की ॥ ५५ ॥ 
आत्मानं -  मनाला - विज्ञानात्मनि -  बुद्धीचे ठिकाणी - संयोज्य -  युक्त करून - तं -  त्याला - क्षेत्रज्ञे -  जीवात्म्यांत - आधारे -  जगाला आश्रयभूत अशा - ब्रह्मणि -  ब्रह्मात - अम्बरे -  आकाशातील - घटाम्बरं -  घटाकाश - इव -  प्रमाणे - प्रविलाप्य -  लीन करून. ॥५४॥  ध्वस्तमायागुणोदर्कः - मायेच्या तीन गुणांच्या फलांना नाहीसे केलेला - निरुद्धकरणाशयः - इंद्रियाच्या विषयांचा रोध केलेला - निवर्तिताखिलाहारः - सर्व आहारांना टाकलेला - स्थाणुः - खांब - इव - प्रमाणे - अचलः - न हालणारा - आस्ते - आहे. ॥५५॥ 
त्यांनी अहंकाराला बुद्धीशी जोडून त्याला क्षेत्रज्ञ आत्म्यामध्ये लीन केले आहे. शिवाय घटाकाश महाकाशात विलीन होते, त्याप्रमाणे क्षेत्रज्ञाला सर्वाधिष्ठान् असलेल्या ब्रह्माशी एकरूप केले आहे. त्यांनी आपली सर्व इंद्रिये आणि मन ताब्यात आणून सर्व विषयांना बाहेरच्या बाहेर परतविले आहे आणि मायेमुळे होणार्या गुणांच्या परिणामांना सर्वथैव मिटवून टाकले आहे. सर्व कर्मांचा संन्यास करून वठलेल्या वृक्षाप्रमाणे राहिलेल्या त्यांच्या मार्गात तू विघ्न आणू नयेस. (५४-५५) 
 
स वा अद्यतनाद् राजन् परतः पञ्चमेऽहनि । कलेवरं हास्यति स्वं तच्च भस्मीभविष्यति ॥ ५६ ॥ 
धर्मराजा पहा ऐका आजच्या पाचव्या दिनी । सोडितील शरीराला होतील भस्म अग्नित ॥ ५६ ॥ 
राजन् -  हे धर्मराजा ! - संन्यस्ताखिलकर्मणः -  सर्व कर्मे सोडून दिलेल्या - तस्य -  त्याच्यामध्ये - अन्तरायः -  विघ्नाला कारण - मा एव अभूः -  होऊ नकोस - वा -  किंवा - सः -  तो - अद्यतनात् -  आजपासून - परतः -  पुढील - पञ्चमे -  पाचव्या - अहनि -  दिवशी - स्वं -  स्वतःच्या - कलेवरं -  शरीराला - हास्यति -  टाकील - च -  आणि - तत् -  ते - भस्मीभविष्यति -  भस्म होईल. ॥५६॥ 
 
हे धर्मराजा, आजपासून पाचव्या दिवशी ते आपल्या शरीराचा त्याग करतील. आणि ते शरीर जळून भस्म होईल. (५६) 
 
दह्यमानेऽग्निभिर्देहे पत्युः पत्नी सहोटजे । बहिः स्थिता पतिं साध्वी तमग्निमनु वेक्ष्यति ॥ ५७ ॥ 
गार्हपत्त्यादि अग्नीने पेटेल झोपडी तदा । जळता पाहुनी नाथ गांधारी ही शिरेल की ॥ ५७ ॥ 
सहोटजे -  झोपडीसह - पत्युः -  पतीचा - देहे -  देह - अग्निभिः -  अग्नींनी - दह्यमाने -  जळून जात असता - बहिः -  बाहेर - स्थिता -  उभी असलेली - साध्वी -  पतिव्रता - पत्नी -  स्त्री - तं -  त्या - पतिं -  पतीला - अनु -  अनुसरून - अग्निं -  अग्नीत - वेक्ष्यति -  प्रवेश करील. ॥५७॥ 
 
गार्हपत्य इत्यादि अग्नीद्वारा, पर्णकुटीसहित आपल्या पतीचा देह जळत असलेला पाहून बाहेर उभी असलेली साध्वी गांधारी सहगमन करण्यासाठी त्या अग्नीत प्रवेश करील. (५७) 
 
विदुरस्तु तदाश्चर्यं निशाम्य कुरुनन्दन । हर्षशोकयुतस्तस्माद् गन्ता तीर्थनिषेवकः ॥ ५८ ॥ 
आपुल्या बंधुचा मोक्ष आश्चर्याने बघोनि तो । जाईल तीर्थयात्रेला विदूर दुःखि होउनी ॥ ५८ ॥ 
कुरुनन्दन -  हे धर्मराजा ! - विदुरः -  विदुर - तु -  तर - तत् -  त्या - आश्चर्यं -  आश्चर्याला - निशाम्य -  पाहून - हर्षशोकयुतः -  आनंद व शोक ह्यानी युक्त - तीर्थनिषेवकः -  तीर्थांचे सेवन करणारा - तस्मात् -  तेथून - गन्ता -  जाईल. ॥५८॥ 
 
धर्मराजा, ते आश्चर्य पाहून हर्षित पण वियोगामुळे दुःखित झालेला विदुर तेथून तीर्थयात्रेसाठी निघून जाईल. (५८) 
 
इत्युक्त्वाथारुहत् स्वर्गं नारदः सहतुम्बुरुः । युधिष्ठिरो वचस्तस्य हृदि कृत्वाजहाच्छुचः ॥ ५९ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे नैमिषीयोपाख्याने त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥ 
बोलुनी स्वर्गि ते गेले वीणा घेवोनि नारद । धर्माने त्याजिला शोक बोधाने शांत जाहला ॥ ५९ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता परमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्र्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ तेरावा अध्याय हा ॥ १ ॥ १३ ॥ हरि ॐ तस्तत् श्री कृष्णार्पणामस्तु ॥ 
सहतुम्बुरुः -  तुंबुरुसह - नारदः -  नारद - इति -  याप्रमाणे - उक्त्वा -  बोलून - अथ -  नंतर - स्वर्गं -  स्वर्गाला - आरुहत् -  जाता झाला. - युधिष्ठिरः -  धर्मराज - तस्य -  त्याचे - वचः -  भाषण - हृदि -  हृदयात - कृत्वा -  साठवून - शुचः -  शोक - अजहात् -  सोडिता झाला. ॥५९॥ 
 
एवढे बोलून देवर्षी नारद तुंबरू गंधर्वासह स्वर्गाकडे गेले. युधिष्ठिराने त्यांचा उपदेश ऐकून शोकाचा त्याग केला. (५९) 
 इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां  |