श्रीमद् भागवत पुराण
प्रथमः स्कन्धः
द्वादशोऽध्यायः

परीक्षितो जन्मोत्सवः -

परीक्षिताचा जन्म -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


शौनक उवाच -
अश्वत्थाम्नोपसृष्टेन ब्रह्मशीर्ष्णोरुतेजसा ।
उत्तराया हतो गर्भ ईशेनाजीवितः पुनः ॥ १ ॥
शौनकजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
अश्वत्थामेचि अस्त्राने उत्तरागर्भ मारिला ।
भगवंतकृपेने तो पुन्हा जीवित जाहला ॥ १ ॥

अश्वत्थाम्ना - अश्वत्थाम्याने - उपसृष्टेन - सोडिलेल्या - उरुतेजसा - अत्यंत तेजस्वी - ब्रह्मशीर्ष्णा - ब्रह्मास्त्राने - उत्तरायाः - उत्तरेचा - गर्भः - गर्भ - हतः - नष्ट झाला. - पुनः - फिरून - ईशेन - परमेश्वराने - आजीवितः - जिवंत केला. ॥१॥
शौनक म्हणाले - अश्वत्थाम्याने सोडलेल्या अत्यंत तेजस्वी ब्रह्मास्त्राने उत्तरेचा गर्भ नष्ट झाला होता, परंतु भगवंतांनी तो पुन्हा जिवंत केला. (१)


तस्य जन्म महाबुद्धेः कर्माणि च महात्मनः ।
निधनं च यथैवासीत् स प्रेत्य गतवान् यथा ॥ २ ॥
तदिदं श्रोतुमिच्छामो गदितुं यदि मन्यसे ।
ब्रूहि नः श्रद्दधानानां यस्य ज्ञानमदाच्छुकः ॥ ३ ॥
परीक्षित्‌ जन्मला त्यात महाज्ञानी महाधिप ।
शुकांनी बोधिले त्याला जन्म कर्म नि मृत्युही ॥ २ ॥
स्थिति त्या पुढची लाभे युक्त वाटेल ते तुम्ही ।
सर्वच्या सर्वही सांगा श्रध्देने ऐकु इच्छितो ॥ ३ ॥

महाबुद्धेः - अत्यंत बुद्धिमान - महात्मनः - व मोठया मनाच्या - तस्य - त्याचे - जन्म - जन्म - च - आणि - कर्माणि - कर्मे - च - आणि - यथा - ज्याप्रमाणे - एव - च - निधनं - मरण - आसीत् - झाला - सः - तो - प्रेत्य - मरून - यथा - जसा - गतवान् - गेला. ॥२॥
तत् - ते - इदं - हे - श्रोतुं - ऐकण्याला - इच्छामि - इच्छितो - यदि - जर - गदितुं - सांगण्याला - मन्यसे - मानतोस - श्रद्दधानानां - श्रद्धा ठेवणार्‍या - नः - आम्हाला - ब्रूहि - सांग - शुकः - शुकाचार्य - यस्य - ज्याचे - ज्ञानं - ज्ञान - अदात् - देता झाला. ॥३॥
ज्याला शुकदेवांनी ज्ञानोपदेश केला होता, त्या महाज्ञानी व महात्मा परीक्षिताचा जन्म, कर्म, मृत्यू आणि त्यानंतर त्याला जी गति प्राप्त झाली, ते सर्व आपणांस योग्य वाटत असेल तर, आम्हांस सांगावे. आम्ही मोठ्या श्रद्धेने ते ऐकू इच्छितो. (२-३)


सूत उवाच ।
अपीपलद्धर्मराजः पितृवद् रञ्जयन् प्रजाः ।
निःस्पृहः सर्वकामेभ्यः कृष्णपादानुसेवया ॥ ४ ॥
सूतजी सांगतात-
प्रसन्न ठेवुनी लोका सांभाळी लेकुरांसम ।
निस्पृहे सेवि श्रीकृष्णा राजा धर्मयुधिष्ठिर ॥ ४ ॥

कृष्णपादाब्जसेवया - भगवंताच्या चरणसेवेने - सर्वकामेभ्यः - सर्व विषयांपासून - निस्पृहः - निरिच्छ - पितृवत् - व बापाप्रमाणे - प्रजाः - प्रजेला - रञ्जयन् - रमविणारा - धर्मराजः - धर्मराज - अपीपलत् - पालन करिता झाला. ॥४॥
सूत म्हणाले - धर्मराज युधिष्ठिर आपल्या प्रजेला प्रसन्न ठेवीत पित्यासमान तिचे पालन करीत होते. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या सेवेमुळे ते सर्व भोगांबाबत निःस्पृह झाले होते. (४)


सम्पदः क्रतवो लोका महिषी भ्रातरो मही ।
जम्बूद्वीपाधिपत्यं च यशश्च त्रिदिवं गतम् ॥ ५ ॥
श्रेष्ठ संपत्ति त्यां होती यज्ञे श्रेष्ठत्व लाभले ।
बंधु राण्या हव्या तैशा पृथ्वी त्याचीच सर्वही ।
स्वामी तो सर्व द्वीपाचा कीर्ति स्वर्गात जाहली ॥ ५ ॥

संपदः - संपत्ति - क्रतवः - यज्ञ - लोकाः - सर्व प्राणिमात्र - महिषा - पत्‍नी - भ्रातरः - भाऊ - च - आणि - मही - पृथ्वी - जम्बुद्वीपाधिपत्यं - जम्बुद्वीपाचे राज्य - च - आणि - त्रिदिवं - स्वर्गाला - गतं - गेलेले - यशः - यश.॥५॥
त्यांच्याजवळ विपुल संपत्ती होती, मोठे मोठे यज्ञ केल्याकारणाने त्यांच्या फलस्वरूप श्रेष्ठ लोकांचा अधिकार त्यांनी प्राप्त करून घेतला होता. त्यांच्या पत्‍न्या आणि बंधू त्यांना अनुकूल होते. सर्व पृथ्वीवर त्यांची सत्ता होती. ते जंबूद्वीपाचे स्वामी होते आणि त्यांची कीर्ति स्वर्गापर्यंत पोहोचली होती. (५)


किं ते कामाः सुरस्पार्हा मुकुन्दमनसो द्विजाः ।
अधिजह्रुर्मुदं राज्ञः क्षुधितस्य यथेतरे ॥ ६ ॥
ऐश्वर्य साधने ऐसी देवांना लोभ ज्यां सुटे ।
भुकेला फक्त अन्ना जै तैसी भक्ति तया प्रिय ॥ ६ ॥

द्विजाः - ब्राह्मण हो ! - सुरस्पार्हाः - देवांनी सुद्धा इच्छिण्याजोगे - ते - ते - कामाः - विषय - मुकुन्दमनसः - श्रीकृष्णावर मन ठेवलेल्या - राज्ञः - धर्मराजाच्या - यथा - ज्याप्रमाणे - इतरे - दुसरे - क्षुधितस्य - भुकेलेल्याच्या - मुदं - आनंदाला - अधिजह्लुः किं - प्राप्त करून देतील काय ? ॥६॥
हे ऋषींनो, ज्याची देवताही इच्छा करतात अशी भोगसामग्री त्यांच्याजवळ होती. परंतु भुकेलेल्याला अन्नाखेरीज अन्य वस्तूंची अपेक्षा नसते, त्याप्रमाणे भगवंतांशिवाय अन्य कोणतीच गोष्ट त्यांना सुखी करू शकत नव्हती. (६)


मातुर्गर्भगतो वीरः स तदा भृगुनन्दन ।
ददर्श पुरुषं कञ्चिद् दह्यमानोऽस्त्रतेजसा ॥ ७ ॥
गर्भ जो त्रासला अस्त्रे जळता देह तो तसा ।
ज्योतिर्मय असा पाही डोळ्यांनी पुरुषोत्तम ॥ ७ ॥

भृगुनन्दन - हे शौनका ! - तदा - त्यावेळी - मातुः - आईच्या - गर्भगतः - गर्भात राहणारा - अस्रतेजसा - व अस्रसामर्थ्याने - दह्यमानः - पीडिलेला - वीरः - पराक्रमी - सः - तो - कंचित् - कोणा एका - पुरुषं - पुरुषाला - ददर्श - पाहू लागला. ॥७॥
शौनकमहोदय, उत्तरेच्या गर्भातील तो वीर ब्रह्मास्त्राच्या तेजाने जळू लागला, तेव्हा त्याला एक ज्योतिर्मय पुरुष दिसला. (७)


अङ्‌गुष्ठमात्रममलं स्फुरत् पुरट मौलिनम् ।
अपीव्यदर्शनं श्यामं तडिद् वाससमच्युतम् ॥ ८ ॥
श्रीमद् दीर्घचतुर्बाहुं तप्तकाञ्चन कुण्डलम् ।
क्षतजाक्षं गदापाणिं आत्मनः सर्वतो दिशम् ।
परिभ्रमन्तं उल्काभां भ्रामयन्तं गदां मुहुः ॥ ९ ॥
अंगुष्ठ मात्र तो विष्णु तरीही शुध्द रूपची ।
घनःश्याम विजे ऐसा नेसला जो पितांबर ।
शिरी झळकतो टोप सोन्याचा खूप देखणा ॥ ८ ॥
निर्विकार नरा ऐशा दीर्घबाहू हि चार त्यां
कुंडले शोभली कानी लालिमा नेत्रि त्या वसे ।
हातात विस्तवा ऐशी तळपे ती गदा पहा
होता फिरविता कृष्ण गर्भाच्या भोवती सदा॥ ९ ॥

अंगुष्ठमात्रं - आंगठयाएवढया - अमलं - निर्मळ - स्फुरत्पुरटमौलिनं - चकचकीत सुवर्णमुकुट धारण करणार्‍या - अपीच्यदर्शनं - सुंदर स्वरूपाच्या - श्यामं - नीळवर्ण असणार्‍या - तडिद्वाससं - विजेप्रमाणे चकचकीत वस्त्रे नेसणार्‍या - अच्युतं - श्रीकृष्णाला. ॥८॥
श्रीमद्दीर्घचतुर्बाहुं - शोभायमान चार हात लांब असणार्‍या - तप्तकाञ्चनकुण्डलं - तापविलेल्या सुवर्णाप्रमाणे चकचकीत सोन्याची कुंडले धारण करणार्‍या - क्षतजाक्षं - लाल डोळे असणार्‍या - गदापाणिं - हातात गदा घेतलेल्या - आत्मनः - स्वतःच्या - सर्वतोदिशं - सभोवार - परिभ्रमन्तं - फिरणार्‍या - उल्काभां - अग्निज्वाळेप्रमाणे तेजस्वी - गदां - गदेला - मुहुः - वारंवार - भ्रामयन्तं - फिरविणार्‍या. ॥९॥
तो अच्युत अंगठ्याएवढा, अत्यंत शुद्ध, सुंदर, श्यामवर्ण, विजेसारखा चमकणारा पीतांबर धारण केलेला, डोक्यावर झळकणारा मुकुट घातलेला, सुंदर व लांब चार भुजा असलेला, चमकणार्‍या सुवर्णाची सुंदर कुंडले कानांमध्ये घातलेला, लालसर डोळे असलेला होता. तो हातामध्ये कोलितासारखी जळत असलेली गदा घेऊन वारंवार ती फिरवीत स्वतः त्या शिशूभोवती फिरत होता. (८-९)


अस्त्रतेजः स्वगदया नीहारमिव गोपतिः ।
विधमन्तं सन्निकर्षे पर्यैक्षत क इत्यसौ ॥ १० ॥
जसे त्या सूर्यतेजाने धुके जाते पळोनिया ।
ब्रह्मास्त्रही तसेची त्या गदेने विरले असे ।
बघता पुरुषा गर्भ कोण हा मनिं बोलला ॥ १० ॥

गोपतिः - सूर्य - नीहारं - धुक्या - इव - प्रमाणे - स्वगदया - आपल्या गदेने - अस्रतेजः - ब्रह्मास्त्राच्या तेजाला - विधमन्तं - नष्ट करणार्‍याला - सन्निकर्षे - जवळ - असौ - हा - कः - कोण - इति - याप्रमाणे - पर्यैक्षत - विचारपूर्वक पाहू लागला. ॥१०॥
जसा सूर्य आपल्या किरणांनी धुक्याला पिटाळून लावतो, त्याप्रमाणे त्या गदेने तो अस्त्रतेजाला शांत करीत होता. आपल्याजवळ असलेल्या त्या पुरुषाला बघून "हा कोण आहे ?" असा तो शिशू विचार करू लागला. (१०)


विधूय तदमेयात्मा भगवान् धर्मगुब् विभुः ।
मिषतो दशमासस्य तत्रैवान्तर्दधे हरिः ॥ ११ ॥
गर्भस्थ शिशुसी रक्षी दहा मास पुरुष तो ।
करोनी शांत ब्रह्मास्त्र जाहला गुप्त तेथची ॥ ११ ॥

अमेयात्मा - अमर्याद स्वरूप असणारा - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - धर्मगुप् - धर्मरक्षक - विभुः - सर्वव्यापी - हरिः - श्रीकृष्ण - तत् - त्या ब्रह्मास्त्राला - विधूय - नष्ट करून - दशमासस्य - दहा महिन्याच्या - अस्य - ह्या गर्भस्थ बालकाच्या - मिषतः - समक्ष - तत्र - तेथे - एव - च - अन्तर्दधे - गुप्त झाला. ॥११॥
अशा प्रकारे त्या दहा महिन्यांच्या गर्भस्थ शिशूच्या समोरच धर्मरक्षक, अप्रमेय, भगवान श्रीकृष्ण अस्त्रतेजाला शांत करून तेथेच अंतर्धान पावले. (११)


ततः सर्वगुणोदर्के सानुकूल ग्रहोदये ।
जज्ञे वंशधरः पाण्डोः भूयः पाण्डुरिवौजसा ॥ १२ ॥
पुन्हा सर्व गुणवृध्दी ग्रहांची शुभ ती दशा ।
परीक्षित्‌ जन्मला तेंव्हा जै पंडूचि प्रकाशला ॥ १२ ॥

ततः - नंतर - पाण्डोः - पंडुराजाच्या - वंशधरः - वंशाला धारण करणारा - ओजसा - सामर्थ्याने - भूयः - पुनः - पांडुः - पंडुराजा - इव - सारखा - सर्वगुणोदर्के - सर्व गुणांनी परिपूर्ण - सानुकुलग्रहोदधे - अनुकूल ग्रहांचा उदय होण्याच्या वेळी - जज्ञे - उत्पन्न झाला. ॥१२॥
त्यानंतर अनुकूल ग्रहांचा उदय झाला असता, सर्व सद्‌गुणांना विकसित करणार्‍या शुभ मुहूर्तावर पांडुवंशीय परीक्षिताचा जन्म झाला. तो बालक इतका तेजस्वी होता की, जणू पांडु राजानेच पुन्हा जन्म घेतला होता. (१२)


तस्य प्रीतमना राजा विप्रैर्धौम्य कृपादिभिः ।
जातकं कारयामास वाचयित्वा च मङ्‌गलम् ॥ १३ ॥
नातूच्या जन्मवार्तेने राजा धर्म हि हर्षला ।
कृपाचार्य नि धौम्यादी पाचारुनि ऋषि तदा ।
वाचिले मंगलो पाठ केले जातक कर्म ते ॥ १३ ॥

च - आणि - प्रीतमनाः - प्रसन्नान्तःकरण असणारा - राजा - धर्मराज - धाम्यकृपादिभिः - धौ‌म्य, कृप वगैरे - विप्रैः - ब्राह्मणांकडून - तस्य - त्या बालकाचे - मङगलं - पुण्याहवाचनादि मंगल कृत्यांना - वाचयित्वा - वदवून - जातकं - जातक कर्माला - कारयामास - करविता झाला. ॥१३॥
महाराज युधिष्ठिरांनी प्रसन्न मनाने धौम्य, कृपाचार्य आदी ब्राह्मणांकडून पुण्याहवाचन करवून त्यचा जातकर्म संस्कार केला. (१३)


हिरण्यं गां महीं ग्रामान् हस्त्यश्वान् नृपतिर्वरान् ।
प्रादात्स्वन्नं च विप्रेभ्यः प्रजातीर्थे स तीर्थवित् ॥ १४ ॥
प्रजातीर्थी दिले दान सोने नी अन्न ही तसे ।
सुजात अश्व नी हत्ती गाई गावे भुमी तशी ॥ १४ ॥

तीर्थवित् - तीर्थादि उत्सवांना जाणणारा - सः - तो - नृपतिः - राजा - प्रजातीर्थे - पुत्रप्राप्तिरूपी उत्सवात - विप्रेभ्यः - ब्राह्मणांना - हिरण्यं - सोने - गां - गाई - महीं - पृथ्वी - ग्रामान् - गावे - वरान् - श्रेष्ठ - हस्त्यश्वान् - हत्तीघोडयांना - च - आणि - स्वन्नं - सुग्रास अन्नाला - प्रादात् - देता झाला. ॥१४॥
दान देण्यासाठी योग्य काळ जाणणार्‍या युधिष्ठिरांनी प्रजातीर्थकाळातच (नाळ तोडण्यापूर्वी) ब्राह्मणांना सुवर्ण, गायी, जमीन, गावे, उत्तम प्रतीचे हत्ती-घोडे आणि उत्तम अन्न हे दान दिले. (१४)


तमूचुर्ब्राह्मणास्तुष्टा राजानं प्रश्रयान्वितम् ।
एष ह्यस्मिन् प्रजातन्तौ पुरूणां पौरवर्षभ ॥ १५ ॥
दैवेनाप्रतिघातेन शुक्ले संस्थामुपेयुषि ।
रातो वोऽनुग्रहार्थाय विष्णुना प्रभविष्णुना ॥ १६ ॥
विप्र संतुष्ट होवोनी बोलले धर्मराजला ।
श्रेष्ठ हा वंश राजा रे काळाच्या गतिने पहा ॥ १५ ॥
पवित्र जो कुरूवंश संपावा हाचि हेतु तो ।
परी हरी कृपेने हे वाचले बाळ सानुले ॥ १६ ॥

तुष्टाः - आनंदित झालेले - ब्राह्मणाः - ब्राह्मण - प्रश्रयान्वितं - नम्र अशा - तं - त्या - राजानं - राजाला - ऊचुः - बोलले - हि - खरोखर - पौरवर्षभ - पुरुकुलांत श्रेष्ठपणाने वागणार्‍या हे धर्मराजा ! - एषः - हा - पुरूणां - पुरुवंशाच्या - अस्मिन् - ह्या - प्रजातन्तौ - वंशांकुरामध्ये. ॥१५॥
शुक्ले - शुभ्र अर्थात निष्पाप असा पुरुवंशांकुर - अप्रतिघातेन - अकुंठित अशा - दैवेन - दैवाने - संस्थां - नाशाला म्हणजे मृत्यूला - उपेयुषि - नेला असता - प्रभविष्णुना - मोठया पराक्रमी - विष्णुना - विष्णुने - वः - तुमच्यावर - अनुग्रहार्थाय - उपकार करण्याकरिता - रातः - रक्षिला. ॥१६॥
संतुष्ट होऊन ब्राह्मण त्या विनयशील युधिष्ठिरांना म्हणाले - "हे पुरुवंशशिरोमणी, प्रतिकूल कालगतीमुळे हा पवित्र पुरुवंश खंडित होऊ लागला होता. परंतु तुमच्यावर कृपा करण्यासाठी भगवान विष्णूंनी हा बालक देऊन त्याचे रक्षण केले आहे. (१५-१६)


तस्मान्नाम्ना विष्णुरात इति लोके बृहच्छ्रवाः ।
भविष्यति न सन्देहो महाभागवतो महान् ॥ १७ ॥
विष्णुरात असे नाम म्हणोनी याजला असे ।
होईल श्रेष्ठ हा भक्त जगात पुरुषोत्तम ॥ १७ ॥

तस्मात् - त्या कारणास्तव - विष्णुरातः - विष्णुरात - इति - अशा - नाम्ना - नावाने - लोके - जगात - बृहच्छ्रवाः - मोठा कीर्तिमान - महान् - मोठा - महाभागवतः - अत्यंत भगवद्‌भक्त म्हणजे वैष्णव - भविष्यति - होईल - सन्देहः - संशय - न - नाही. ॥१७॥
म्हणून याचे नाव ’विष्णूरात’ ठेवावे. हा बालक संसारात मोठा यशस्वी, भगवंतांचा परमभक्त आणि महापुरुष होईल, हे निःसंशय." (१७)


युधिष्ठिर उवाच ।
अप्येष वंश्यान् राजर्षीन् पुण्यश्लोकान् महात्मनः ।
अनुवर्तिता स्विद्यशसा साधुवादेन सत्तमाः ॥ १८ ॥
राजा युधिष्ठिर म्हणाला-
ऋषिंनो हा स्वयेशाने पवित्र वंश कीर्तिला ।
राजर्षी मार्ग जो थोर बाळ वागेल का तसा ॥ १८ ॥

सत्तमाः - साधुश्रेष्ठ हो ! - एषः - हा - साधुदेवान - साधूंनी वर्णिलेल्या - यशसा - कीर्तीने - वंश्यान् - स्ववंशात उत्पन्न झालेल्या म्हणजे पूर्वज अशा - पुण्यश्लोकान् - पुण्यकारक कीर्ती संपादन केलेल्या - महात्मनः - थोर अंतःकरण असलेल्या - राजर्षीन् - ऋषीपणाला पोचलेल्या राजांना - अनुवर्तिता - अनुसरेल - अपिस्वित् - काय ? ॥१८॥
युधिष्टिर म्हणाले - हे महात्म्यांनो ! हा बालक आपल्या उज्ज्वल यशाने आमच्या वंशाचे पवित्रकीर्ति महात्मे राजर्षी, यांचे अनुकरण करील ना ? (१८)


ब्राह्मणा ऊचुः ।
पार्थ प्रजाविता साक्षात् इक्ष्वाकुरिव मानवः ।
ब्रह्मण्यः सत्यसन्धश्च रामो दाशरथिर्यथा ॥ १९ ॥
ब्राम्हण म्हणाले -
इक्ष्वाकू जो मनूपुत्र त्या परी रक्षिल प्रजा ।
श्रीरामा परि हा सत्य नी विप्रभक्त होइल ॥ १९ ॥

पार्थ - हे धर्मराजा - साक्षात् - प्रत्यक्ष - मानवः - स्वायंभुव मनूपासुन उत्पन्न झालेल्या - इक्ष्वाकुः - इक्ष्वाकु राजा - इव - प्रमाणे - प्रजाः - प्रजांना - अविता - रक्षील - च - आणि - यथा - जसा - दाशरथिः - दशरथपुत्र - रामः - रामचंद्र - ब्रह्मण्यः - ब्राह्मणांचे कल्याण करणारा - सत्यसन्धः - खरे बोलणारा. ॥१९॥
ब्राह्मण म्हणाले - धर्मराज ! मनुपुत्र इक्ष्वाकूप्रमाणेच हा पुत्र आपल्या प्रजेचे पालन करील आणि दशरथपुत्र श्रीरामांच्यासारखा ब्राह्मणभक्त आणि सत्यप्रतिज्ञ होईल. (१९)


एष दाता शरण्यश्च यथा ह्यौशीनरः शिबिः ।
यशो वितनिता स्वानां दौष्यन्तिरिव यज्वनाम् ॥ २० ॥
औशीनर शिबी जैसा दाता शरण वत्सल ।
दुष्यंतपुत्र भरत तै यज्ञी कीर्ति वाढवी ॥ २० ॥

एषः - हा - यथा - जसा - औशीनरः - उशीनराचा मुलगा - शिबि - शिबि - दाताः - दानधर्म करणारा - च - आणि - शरण्यः - शरण आलेल्यांचे रक्षण करणारा - दौष्यन्तिः - दुष्यन्तपुत्र जो भरत - इव - त्याप्रमाणे - स्वानां - स्वकुलात जन्मलेल्या - यज्वनां - यज्ञयागादि कृत्ये करणार्‍या पूर्वजांच्या - यशः - कीर्तीला - हि - खरोखर - वितनिता - पसरवील. ॥२०॥
हा, उशीनर देशाच्या राजा शिबीप्रमाणे दानशूर आणि शरणागतवत्सल होईल. तसेच यज्ञकर्त्यांमध्ये दुष्यंतपुत्र भरताप्रमाणे आपल्या वंशाचे यश पसरवील. (२०)


धन्विनामग्रणीरेष तुल्यश्चार्जुनयोर्द्वयोः ।
हुताश इव दुर्धर्षः समुद्र इव दुस्तरः ॥ २१ ॥
आजोबापरि हा थोर धनुर्धारीहि होय की ।
क्रोधता अग्निची जैसा समुद्रापरि दुस्तर ॥ २१ ॥

धन्विनां - धनुर्धारी वीरांमध्ये - अग्रणीः - श्रेष्ठ - च - आणि - द्वयोः - दोन्ही - अर्जुनयोः - अर्जुनाच्या - तुल्यः - सारखा - हुताशः - अग्नि - इव - प्रमाणे - दुर्धुर्षः - जिंकण्यास कठीण - समुद्रः - समुद्र - इव - प्रमाणे - एषः - हा - दुस्तरः - तरून जाण्यास कठीण. ॥२१॥
धनुर्धार्‍यांमध्ये हा सहस्रार्जुन तसेच कौंतेय अर्जुन यांच्यासारखा अग्रगण्य होईल. हा अग्नीसारखा अजिंक्य आणि समुद्रासारखा दुस्तर होईल. (२१)


मृगेन्द्र इव विक्रान्तो निषेव्यो हिमवानिव ।
तितिक्षुर्वसुधेवासौ सहिष्णुः पितराविव ॥ २२ ॥
पराक्रमी मृगेंद्रोची आश्रितां तो हिमालय ।
हेतुसी पृथिवी ऐसा क्षमेला पितरे जशी ॥ २२ ॥

असौ - हा - मृगेन्द्रः - सिंह - इव - प्रमाणे - विक्रान्तः - पराक्रमी - हिमवान् - हिमालय पर्वत - इव - प्रमाणे - निषेव्य - सेवन करण्याजोगा - वसुधा - पृथ्वी - इव - प्रमाणे - तितिक्षुः - सहनशील - पितरौ - व आईबाप - इव - प्रमाणे - सहिष्णुः - सहनशील. ॥२२॥
हा सिंहासारखा पराक्रमी, हिमालयासारखा आश्रय घेण्यास योग्य, पृथ्वीसारखा क्षमाशील आणि माता-पित्यांसारखा सहनशील होईल. (२२)


पितामहसमः साम्ये प्रसादे गिरिशोपमः ।
आश्रयः सर्वभूतानां यथा देवो रमाश्रयः ॥ २३ ॥
समदृष्टें जसा ब्रह्मा कृपाळू भगवान्‌ शिव ।
लक्ष्मीकांत जसा विष्णु तसा प्राण्यांसि पोषिता ॥ २३ ॥

साम्ये - समबुद्धि ठेवण्यात - पितामहसमः - ब्रह्मदेवाप्रमाणे किंवा आजोबा धर्मराजाप्रमाणे - प्रसादे - प्रसाद करण्याच्या बाबतीत - गिरिशोपमः - शंकराप्रमाणे - यथा - जसा - रमाश्रयः - लक्ष्मीला आश्रय देणारा - देवः - विष्णु - सर्वभूतानां - सर्व प्राणिमात्रांचा - आश्रयः - आश्रयरूप. ॥२३॥
पितामह ब्रह्मदेवांप्रमाणे याच्या अंगी समता असेल. भगवान शंकरांसारखा हा कृपाळू होईल आणि सर्व प्राणिमात्रांना आश्रय देण्यामध्ये हा लक्ष्मीपती भगवान विष्णूंच्या समान होईल. (२३)


सर्वसद्‍गुणमाहात्म्ये एष कृष्णमनुव्रतः ।
रन्तिदेव इवोदारो ययातिरिव धार्मिकः ॥ २४ ॥
सद्‍गुणी राहुनी ऐसा कृष्णाचा भक्त होय हा ।
रन्तिदेवापरी दाता ययाती परि धार्मिक ॥ २४ ॥

एषः - हा - सर्वसद्‌गुणमाहात्म्ये - सर्व चांगल्या गुणांच्या मोठेपणाचे बाबतीत - कृष्णं - श्रीकृष्णाला - अनुव्रतः - अनुसरणारा - रन्तिदेवः - रन्तिदेव - इव - प्रमाणे - उदारः - थोर मनाचा - ययातिः - ययाति - इव - प्रमाणे - धार्मिकः - धर्मशील. ॥२४॥
समस्त सद्‌गुण धारण करणार्‍यांमध्ये हा श्रीकृष्णांचा अनुयायी होईल, रन्तिदेवासारखा उदार आणि ययातीसारखा धार्मिक होईल. (२४)


धृत्या बलिसमः कृष्णे प्रह्राद इव सद्‍ग्रहः ।
आहर्तैषोऽश्वमेधानां वृद्धानां पर्युपासकः ॥ २५ ॥
बळीच्यापरि हा धैर्यी प्रल्हादापरि भक्त ही ।
करील अश्वमेधादी वृध्द सेवापरायण ॥ २५ ॥

एषः - हा - धृत्या - धैर्याने - बलिसमः - बलिराजासारखा - प्रह्लादः - प्रह्लाद - इव - प्रमाणे - कृष्णे - परमेश्वराविषयी - सद्‌ग्रहः - चांगला ग्रह ठेवणारा - अश्वमेधानां - अश्वमेध यज्ञांचा - आहर्ता - करणारा - वृद्धानां - वृद्धांची - पर्युपासकः - सेवा करणारा. ॥२५॥
हा बलीसारखा धैर्यवान आणि भगवान श्रीकृष्णांवर प्रह्लादासारखा निष्ठावान होईल. हा पुष्कळ अश्वमेध यज्ञ करील आणि गुरुजनांची सेवा करील. (२५)


राजर्षीणां जनयिता शास्ता चोत्पथगामिनाम् ।
निग्रहीता कलेरेष भुवो धर्मस्य कारणात् ॥ २६ ॥
राजर्षि संतती होय दुष्टां दंडील हा जगी ।
भूमाता रक्षिण्या धर्मा ! कलीसी दडपील हा ॥ २६ ॥

एषः - हा - राजर्षीणां - ऋषिपणाला पोहोचलेल्या राजांचा - जनयिता - उत्पादक - च - आणि - उत्पथगामिनां - दुर्मार्गाचे सेवन करणार्‍यांचा - शास्ता - शासन करणारा - भुवः - पृथ्वीच्या - धर्मस्य - धर्मांच्या - कारणात् - करिता - कलेः - कलीचा - निग्रहीता - निग्रह करणारा. ॥२६॥
याचे पुत्र राजर्षी होतील. मर्यादांचे उल्लंघन करणार्‍यांना हा दण्ड देईल. पृथ्वीच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी हा कलीला शासन करील. (२६)


तक्षकादात्मनो मृत्युं द्विजपुत्रोपसर्जितात् ।
प्रपत्स्यत उपश्रुत्य मुक्तसङ्‌गः पदं हरेः ॥ २७ ॥
शापाने द्विजपुत्राच्या सर्पदंशेचि मृत्यु तो ।
ऐकुनी त्यजिता मोह भगवत्‌पद सेविल ॥ २७ ॥

द्विजपुत्रोपसर्जितात् - ब्राह्मणाच्या मुलाने पाठविलेल्या - तक्षकात् - तक्षक नावांच्या नागापासून - आत्मनः - स्वतःच्या - मृत्यूं - मरणाला - उपश्रुत्य - ऐकून - मुक्तसंगः - सर्व विषयांबद्दलची आवड सोडलेला - हरेः - विष्णूच्या - पदं - पदाला म्हणजे मोक्षाला - प्रपत्स्यते - प्राप्त होईल. ॥२७॥
ब्राह्मणकुमाराच्या शापाने तक्षकापासून आपला मृत्यू होणार, हे ऐकून हा सर्व आसक्ती सोडून देऊन भगवत्‌चरणांना शरण जाईल. (२७)


जिज्ञासितात्म याथार्थ्यो मुनेर्व्याससुतादसौ ।
हित्वेदं नृप गङ्‌गायां यास्यत्यद्धा अकुतोभयम् ॥ २८ ॥
शुकदेवकृपेने यां आत्मज्ञान मिळेल ते ।
त्यजुनी तिरि गंगेच्या तनू निर्भय हो असा ॥ २८ ॥

नृप - हे धर्मराजा ! - असौ - हा - व्याससुतात् - व्यासाचा पुत्र अशा - मुनेः - श्रीशुकाचार्यापासून - जिज्ञासितात्मयाथात्म्यः - आत्म्याबद्दलचे यथार्थ ज्ञान झालेला असा - गङ्गायां - गंगेत - इदं - ह्या शरीराला - हित्वा - टाकून - अद्धा - खात्रीने - अकुतोभयं - निर्भय अशा विष्णुपदाला - यास्यति - जाईल. ॥२८॥
हे राजा, व्यासपुत्र शुकदेव यांचेकडून हा आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेईल आणि शेवटी गंगातटाकी आपल्या शरीराचा त्याग करून निश्चितपणे अभयप्रद प्रप्त करून घेईल. (२८)


इति राज्ञ उपादिश्य विप्रा जातककोविदाः ।
लब्धापचितयः सर्वे प्रतिजग्मुः स्वकान् गृहान् ॥ २९ ॥
विशेषज्ञ द्विजे ऐसे ग्रहाचे फळ सांगता ।
अर्पुनी भेट पूजादी पातला धर्म स्वगृहा ॥ २९ ॥

जातककोविदाः - जातक वर्तविण्यात कुशल असे - सर्वे - सर्व - विप्राः - ब्राह्मण - इति - याप्रमाणे - राज्ञे - धर्मराजाला - उपादिश्य - सांगून - लब्धोपचितयः - ज्यांची उत्तम रीतीने पूजा केली आहे असे - स्वकान् - स्वतःच्या - गृहान् - घराला - प्रतिजग्मुः - परत गेले. ॥२९॥
ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञ ब्राह्मणांनी युधिष्ठिरांना याप्रमाणे सांगून आणि मान - सन्मान स्वीकारून ते आपापल्या घरी परतले. (२९)


स एष लोके विख्यातः परीक्षिदिति यत्प्रभुः ।
पूर्वं दृष्टमनुध्यायन् परीक्षेत नरेष्विह ॥ ३० ॥
बाळ ते जगती झाले परीक्षित्‌ नृपती पुढे ।
गर्भापासोनि जो ध्यायी भगवत्‌ रुपदर्शन ।
आणि लोकांत तो पाही यातला कोण तो असे? ॥ ३० ॥

यत् - ज्या कारणास्तव - प्रभुः - समर्थ - गर्भेदृष्टं - गर्भात पाहिलेल्याला - अनुध्यायन - चिंतणारा - इह - येथील - नरेषु - मनुष्यांमध्ये - परीक्षेत - पाहू लागेल - सः - तो - एषः - हा - परीक्षित - परीक्षित - इति - याप्रमाणे - लोकेविख्यातः - लोकांत प्रसिद्ध होईल. ॥३०॥
तो हा बालक पृथ्वीवर परीक्षित नावाने प्रसिद्धीला आला, कारण या श्रेष्ठ बालकाने गर्भामध्ये असताना ज्या पुरुषाचे दर्शन घेतले होते, त्याचे स्मरण करीत तो लोकांची अशा रीतीने परीक्षा घेत होता की, यातील कोण त्या पुरुषासारखा आहे ? (३०)


स राजपुत्रो ववृधे आशु शुक्ल इवोडुपः ।
आपूर्यमाणः पितृभिः काष्ठाभिरिव सोऽन्वहम् ॥ ३१ ॥
स्वकला करिता पूर्ण वाढते चंद्रकोर जै ।
तसा क्रमक्रमे पुत्र गुरुछत्रात वाढला ॥ ३१ ॥

सः - तो - राजपुत्रः - राजाचा मुलगा परीक्षित - अन्वंहं - दररोज - शुक्ले - शुक्लपक्षात - काष्ठाभिः - कलांनी - उडुपः - चंद्र - इव - प्रमाणे - पितृभिः - वडील मंडळींनी - आपूर्यमाणः - पालनपोषण केलेला - सः - तो - आशु - लवकर - ववृधे - वाढला. ॥३१॥
जसा शुक्लपक्षातील चंद्र दिवसेंदिवस आपल्या कलांनी पूर्ण होत होत वाढत जातो, तसाच तो राजकुमार वडील करीत असलेल्या पालन - पोषणाने दिवसेंदिवस वाढत गेला. (३१)


यक्ष्यमाणोऽश्वमेधेन ज्ञातिद्रोहजिहासया ।
राजा लब्धधनो दध्यौ अन्यत्र करदण्डयोः ॥ ३२ ॥
क्षम्यार्थ स्वजनोहत्त्या अश्वमेध करावया ।
युधिष्ठिर तदा योजी परी धन अपूर्ण ते ॥ ३२ ॥

ज्ञातिद्रोहजिहासया - भाऊबंदांशी वैर केल्यामुळे उत्पन्न झालेल्या दोषाला नाहीसे करण्याच्या इच्छेने - अश्वमेधेन - अश्वमेध यज्ञाने - यक्ष्यमाणः - यजन करणारा - अलब्धधनः - पुरेसे द्रव्य न मिळालेला - राजा - धर्मराज - करदण्डयोः - कर व दंड ह्यांच्या - अन्यत्र - शिवाय - दध्यौ - चिंतन करू लागला. ॥३२॥
याचवेळी स्वजनांच्या वधाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून राजा युधिष्ठिरांनी अश्वमेध यज्ञ करण्याचा विचार केला. परंतु प्रजेकडून वसूल केलेला कर आणि दंड, या व्यतिरिक्त अन्य धन नसल्याने ते काळजीत पडले. (३२)


तदभिप्रेतमालक्ष्य भ्रातरोऽच्युतचोदिताः ।
धनं प्रहीणमाजह्रुः उदीच्यां दिशि भूरिशः ॥ ३३ ॥
धर्माचा जाणुनी हेतू कृष्णाने प्रेरणा दिली ।
मरुत्तराज नी विप्रे त्यजीत धन आणिले ॥ ३३ ॥

तदभिप्रेतं - त्याच्या अभिप्रायाला - आलक्ष्य - जाणून - अच्युतचोदिताः - श्रीकृष्णाने आज्ञा दिलेले - भ्रातरः - भीमादि चार भाऊ - उदिच्यां - उत्तर - दिशि - दिशेत - प्रहीणं - टाकिलेल्या किंवा पुरलेल्या - भूरिशः - पुष्कळ - धनं - द्रव्याला - आहुः - आणते झाले. ॥३३॥
त्यांचे मनोगत जाणून भगवान श्रीकृष्णांच्या प्रेरणेने त्यांच्या भावांनी उत्तर दिशेला राजा मरुत्त आणि ब्राह्मणांनी सोडून दिलेले पुष्कळसे धन आणले. (३३)


तेन सम्भृतसम्भारो धर्मपुत्रो युधिष्ठिरः ।
वाजिमेधैः त्रिभिर्भीतो यज्ञैः समयजत् हरिम् ॥ ३४ ॥
सामग्री योजिली राये बोधिली विधिने जशी ।
अश्वयाग तिन्ही केले पावला पुरुषोत्तम ॥ ३४ ॥

भीतः - भ्यालेला - धर्मपुत्रः - यमधर्माचा मुलगा - युधिष्ठिरः - धर्मराज - तेन - त्याने - संभृतसंभारः - सर्व यज्ञसामग्री सिद्ध केली आहे असा - त्रिभिः - तीन - वाजिमेधैः - अश्वमेध - यज्ञेः - यज्ञांनी - हरिम् - श्रीविष्णूला - समयजत् - पूजता झाला. ॥३४॥
त्या धनातून यज्ञासाठी लागणारी सामग्री गोळा करून स्वजनवधामुळे भ्यालेल्या धर्मपुत्र महाराज युधिष्ठिरांनी तीन अश्वमेध यज्ञांच्या द्वारा भगवंतांची पूजा केली. (३४)


आहूतो भगवान् राज्ञा याजयित्वा द्विजैर्नृपम् ।
उवास कतिचित् मासान् सुहृदां प्रियकाम्यया ॥ ३५ ॥
आमंत्रिताचि येवोनी कृष्णाने त्या द्विजांसवे ।
करुनी यज्ञ संपन्न कांही मासहि राहिला ॥ ३५ ॥

राज्ञा - धर्मराजाने - आहूतः - बोलावलेला - भगवान् - श्रीकृष्ण - द्विजैः - ब्राह्मणांकडून - नृपं - धर्मराजाला - याजयित्वा - यज्ञ करण्यास लाववून - सुहृदां - मित्रांचे - प्रियकाम्यया - प्रिय करण्याच्या इच्छेने - कतिचित् - कित्येक - मासान् - महिने - उवास - राहिला. ॥३५॥
युधिष्ठिरांच्या आमंत्रणावरून आलेल्या भगवंतांनी ब्राह्मणांच्या द्वारा त्यांचा यज्ञ संपन्न करून आपले सुहृद पांडव यांच्या प्रसन्नतेसाठी ते काही महिने तेथेच राहिले. (३५)


ततो राज्ञाभ्यनुज्ञातः कृष्णया सहबन्धुभिः ।
ययौ द्वारवतीं ब्रह्मन् सार्जुनो यदुभिर्वृतः ॥ ३६ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे नैमिषीयोपाख्याने परीक्षिज्जन्माद्युत्कर्षो नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
बंधू युधिष्ठिरा आणि द्रौपदीस विचारुनी ।
घेतले सोबती पार्था निघाला द्वारकापुरा ॥ ३६ ॥
इति श्रीमद्‍भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्र्लोकी मराठी रूपांतर ॥
॥ बारावा अध्याय हा ॥ १ ॥ १२ ॥
हरि ॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

ब्रह्मन् - हे शौनका ! - ततः - नंतर - कृष्णया - द्रौपदीशी - बन्धुभिः - व भीमादि भावांशी - सह - सहवर्तमान - राज्ञा - धर्मराजाने - अभ्यनुज्ञातः - परवानगी दिलेला - यदुभिः - यादवांनी - वृतः - वेष्टिलेला - सार्जुनः - अर्जुनासह - द्वारवतीं - द्वारकेला - ययौ - गेला. ॥३६॥
अहो शौनक ! यानंतर बंधूंसहित राजा युधिष्ठिर आणि द्रौपदीचा निरोप घेऊन यादवांसह भगवान, अर्जुनाला बरोबर घेऊन द्वारकेला गेले. (३६)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां प्रथमः स्कन्धे द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
अध्याय बारावा समाप्त

GO TOP