श्रीमद् भागवत पुराण
प्रथमः स्कन्धः
एकादशोऽध्यायः

द्वारकावासिभिः कृतं भगवतोऽभिनंदनम्, पुरप्रवेशवर्णनं च -

श्रीकृष्णांचे द्वारकेमध्ये राजोचित स्वागत -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


सूत उवाच ।
आनर्तान् स उपव्रज्य स्वृद्धाञ्जनपदान् स्वकान् ।
दध्मौ दरवरं तेषां विषादं शमयन्निव ॥ १ ॥
सूतजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
समृध्द आपुली भूमि आनर्ती कृष्ण पातता ।
पांचजन्ये ध्वनी केला विषाद हरण्या जनी ॥ १ ॥

सः - तो - स्वृद्धान् - समृद्ध अशा - स्वकान् - स्वतःच्या - आनर्तान् - आनर्तनामक म्हणजे व्दारकानामक - जनपदान् - देशांना - उपव्रज्य - जाऊन - तेषां - त्यांच्या - विषादं - खेदाला - शमयन् - शांत करणारा - इव - अशाप्रमाणेच की काय - दरवरं - श्रेष्ठ शंख - दध्मौ - वाजविता झाला. ॥१॥
सूत म्हणाले - श्रीकृष्णांनी आपल्या समृद्ध अशा आनर्त देशात जाऊन पोहोचल्यानंतर तेथील लोकांच्या विरह-वेदना जणू शांत करण्यासाठी आपला श्रेष्ठ पांचजन्य नावाचा शंख वाजविला. (१)


स उच्चकाशे धवलोदरो दरोऽपि
     उरुक्रमस्य अधरशोण शोणिमा ।
दाध्मायमानः करकञ्जसम्पुटे
     यथाब्जखण्डे कलहंस उत्स्वनः ॥ २ ॥
(इंद्रवज्रा)
शंखास फुंकी जधि कृष्ण तेंव्हा
    ओठास लाली नि करास तैसी ।
पद्‌मापरी भासलि नी तसेच
    तो शंख श्वेतो जणु हंस गातो ॥ २ ॥

यथा - ज्याप्रमाणे - अब्जखण्डे - तांबूसरंगाच्या कमळसमूहांत - उत्स्वनः - मोठा शब्द करणारा - कलहंसः - राजहंस - धवलोदरः - तसाच आतील भाग पांढरा असणारा - उरुक्रमस्य - श्रीकृष्णाच्या - अघरशोणशोणिमा - अधरोष्ठाच्या आरक्त वर्णाने तांबूस रंग प्राप्त झालेला - करकञ्जसम्पुटे - हस्त कमळाच्या मध्यभागी - दाध्मायमानः - वाजविला जाणारा - सः - तो - दरः - शंख - अपि - सुद्धा - उच्चकाशे - शोभला. ॥२॥
भगवंतांच्या ओठांच्या लालीने लाल झालेला तो शुभ्र रंगाचा शंख वाजवितेवेळी त्यांच्या हातात इतका शोभायमान दिसत होता की, जसे काही लाल रंगाच्या कमळावर बसून कुणी राजहंस उच्चस्वरात मधुर गान गात आहे. (२)


तमुपश्रुत्य निनदं जगद्‍भयभयावहम् ।
प्रत्युद्ययुः प्रजाः सर्वा भर्तृदर्शनलालसाः ॥ ३ ॥
(अनुष्टुप्‌)
भगवत्‌ शंखनादाने संसारभय भीतसे ।
ऐकुनी त्या प्रजा सारी पातली कृष्णदर्शना ॥ ३ ॥

भर्तृदर्शनलालसाः - श्रीकृष्णाच्या दर्शनाकरिता उत्सुक झालेले - सर्वाः - संपूर्ण - प्रजाः - लोक - जगद्‌भयभयावहं - जगाच्या भीतीलासुद्धा भिवविणार्‍या - तं - त्या - निनदं - शब्दाला - उपश्रुत्य - ऐकून - प्रत्युदययु - सामोरे गेले. ॥३॥
संसारातील भयाला भयभीत करणारा भगवंतांच्या शंखाचा तो ध्वनी ऐकून सगळी प्रजा आपले स्वामी श्रीकृष्ण यांच्या दर्शनाच्या लालसेने त्यांना सामोरी आली. (३)


तत्रोपनीतबलयो रवेर्दीपमिवादृताः ।
आत्मारामं पूर्णकामं निजलाभेन नित्यदा ॥ ४ ॥
असे तो भगवान्‌ आत्मा आत्मलाभचि लाभतो ।
सूर्या जै अर्पिणे दीप पूजिती लोक त्या तसे ॥ ४ ॥

तत्र - तेथे - आदृताः - आदर बाळगणारे - रवेः - सूर्याच्या - दीपं - दिव्या - इव - प्रमाणे - उपनीतबलयः - नजराणे नेणारे - नित्यदा - नेहमी - निजलाभेन - आत्मप्राप्तीने - पूर्णकामं - ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत अशा - आत्मारामं - आत्म्यामध्येच रममाण होणार्‍याला ॥४॥
भगवान श्रीकृष्ण आत्माराम आहेत. असे असूनही जसे लोक मोठ्या आदराने भगवान सूर्यालाही नीरांजन ओवाळतात, त्याप्रमाणे प्रजेने अनेक प्रकारच्या भेटी देऊन श्रीकृष्णांचे स्वागत केले. (४)


प्रीत्युत्फुल्लमुखाः प्रोचुः हर्षगद्‍गदया गिरा ।
पितरं सर्वसुहृदं अवितारं इवार्भकाः ॥ ५ ॥
आनंदे खुलले सारे कंठ दाटूनि बोलले ।
सर्वांनी स्तविले जैसे बोलते शिशु बोबडे ॥ ५ ॥

प्रीत्युत्फुल्लमुखाः - प्रेमाने प्रफुल्लित झाली आहेत मुखे ज्यांची असे - अर्भकाः - मुले - पितरं - पित्या - इव - प्रमाणे - अवितारं - रक्षण करणार्‍या - सर्वसुहृदं - सर्वत्र मित्रभावाने वागणार्‍याला - हर्षद्‌गदया - आनंदाने सद्‌गदित झालेल्या - गिरा - वाणीने - प्रोचुः - बोलले. ॥५॥
सर्वांचे चेहरे प्रफुल्लित झाले. सर्वांचे सुहृद आणि संरक्षक अशा भगवान श्रीकृष्णांची ते हर्षगद्‌गद वाणीने अशा प्रकारे स्तुती करू लागले की, जशी मुले आपल्या वडिलांशी बोबड्या बोलाने बोलतात. (५)


नताः स्म ते नाथ सदाङ्‌घ्रिपङ्‌कजं
     विरिञ्चवैरिञ्च्य सुरेन्द्र वन्दितम् ।
परायणं क्षेममिहेच्छतां परं
     न यत्र कालः प्रभवेत्परः प्रभुः ॥ ६ ॥
(इंद्रवज्रा)
ब्रह्मे शिवे ही नमिले जयाला
    ते पाय आम्ही नमितो तुझे हे ।
कल्याणकारी जिव आश्रितो या
    ध्याता तया काळ केसाहि नाही ॥ ६ ॥

नाथ - हे स्वामिन् - इह - येथे - परं - आत्यन्तिक - क्षेमं - कल्याणाला - इच्छतां - इच्छिणार्‍यांच्या - परायणं - विशिष्ट आश्रयास योग्य - विरिञ्चिवैरिञ्च्‌यसुरेन्द्रावन्दितं - ब्रह्मदेव, सनत्कुमारादि ब्रह्मपुत्र व इन्द्र ह्यांनी वंदिलेल्या - ते - तुझ्या - अङ्घ्रिपङ्कजम् - चरणकमलाला - सदा - नेहमी - नताःस्म - नम्र झालो आहो - यत्र - जेथे - परप्रभुः - इतर ठिकाणी कार्य करण्यास समर्थ - कालः - काळ - न प्रभवेत् - समर्थ होत नाही. ॥६॥
हे नाथ, आम्ही आपल्या चरणकमलांना सदैव प्रणाम करतो. ज्या चरणांना ब्रह्मा, शंकर, इंद्रसुद्धा वंदन करतात, ते चरण या संसारात परम कल्याण इच्छिणार्‍यांचे सर्वोत्तम आश्रय आहेत, त्यांना शरण गेल्याने परम समर्थ काळही त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही. (६)


भवाय नस्त्वं भव विश्वभावन
     त्वमेव माताथ सुहृत्पतिः पिता ।
त्वं सद्‍गुरुर्नः परमं च दैवतं
     यस्यानुवृत्त्या कृतिनो बभूविम ॥ ७ ॥
माता पिता तूचि सखा नि स्वामी
    तू सद्‌गुरु देव नि विश्वभाव
कृतार्थ आम्ही तव पायि कृष्णा
    कल्याण देवा करणे तुम्हीच ॥ ७ ॥

विश्वभावन - हे जगाला उत्पन्न करणार्‍या श्रीकृष्ण ! - त्वं - तू - नः - आमच्या - भवाय - उत्कर्षाकरिता - भव - हो - त्वं - तू - एव - च - नः - आमची - माता - आई - अथ - सर्वप्रकारे - सुद्दत् - मित्र - पतिः - स्वामी - पिता - बाप - त्वं - तू - सद्‌गुरुः - चांगला उपदेशक - च - आणि - परमं - श्रेष्ठ - दैवतं - देवता - यस्य - ज्याच्या - अनुवृत्या - सेवेने - कृतिनः - धन्य - बभूविम - झालो आहे. ॥७॥
हे विश्वबंधो, आपणच आमचे माता-पिता, सुहृद आणि स्वामी आहात. आपणच सद्‌गुरू आणि परम आराध्यदैवत आहात. आपल्या चरणांची सेवा करून आम्ही कृतार्थ झालो आहोत. आपण आमचे कल्याण करा. (७)


अहो सनाथा भवता स्म यद्वयं
     त्रैविष्टपानामपि दूरदर्शनम् ।
प्रेमस्मित स्निग्ध निरीक्षणाननं
     पश्येम रूपं तव सर्वसौभगम् ॥ ८ ॥
ओहो! तुझ्यानेचि सनाथ अम्ही
    सौन्दर्यसारास पहातसो की ।
ही हासरी छान सस्नेह मुद्रा
    देवांसिही दुर्लभ दर्शने ही ॥ ८ ॥

अहो - काय हो आश्चर्य - वयं - आम्ही - भवता - तुझ्या समागमाने - सनाथाः - आश्रययुक्त - स्म - झालो आहो - यत् - ज्या कारणास्तव - त्रैविष्टपानां - स्वर्गात राहणार्‍या देवांना - अपि - सुद्धा - दूरदर्शनम् - दुर्लभ दर्शन असणार्‍या - प्रेमस्मितस्निग्धनिरीक्षणाननं - व प्रेमामुळे किंचित हास्ययुक्त व स्नेहभावयुक्त अशा अवलोकनाने शोभणार्‍या मुखाने सुंदर दिसणार्‍या - सर्वसौभगं - सर्वैश्वर्यसंपन्न अशा - तव - तुझ्या - रूपमं - स्वरूपाला - पश्येम - पाहतो. ॥८॥
अहाहा ! आपल्या प्राप्तीने आम्ही सनाथ झालो. कारण सर्व सौंदर्याचे सार असलेल्या आपल्या रूपाचे आम्ही दर्शन करीत आहोत. तसेच प्रेमळ स्मित हास्यपूर्वक स्निग्ध दृष्टीने पाहणारे मुखकमल आम्हांला पाहायला मिळत आहे. हे दर्शन तर देवांनाही दुर्लभ आहे. (८)


यर्ह्यम्बुजाक्षापससार भो भवान्
     कुरून् मधून् वाथ सुहृद् दिदृक्षया ।
तत्राब्दकोटिप्रतिमः क्षणो भवेद्
     रविं विनाक्ष्णोरिव नस्तवाच्युत ॥ ९ ॥
जातोसि कृष्णा स्वजनीं मथूरीं
    क्षणोक्षणी भास अनंत वर्ष ।
दृष्टी जशी ती रविलोपलीया
    आम्हा दशा तै तुजवीण कृष्णा ॥ ९ ॥

भो अम्बुजाक्ष - हे कमळनेत्रा ! - अच्युत - श्रीकृष्णा ! - यर्हि - जेव्हा - भवान् - आपण - सहृद्दिदृक्षया - मित्रदर्शनाच्या इच्छेने - कुरून् - कुरुदेशाला - वा - किंवा - मधून् - मधुदेशाला - अपससार - गेला - अथ - तर - तत्र - तेथे - रवि - सूर्याच्या - विना - अभावी - अक्ष्णोः - नेत्राच्या - इव - प्रमाणे - तव - तुझ्या - नः - आम्हाला - क्षणः - क्षण - अब्दकोटिप्रतिमः - कोटि वर्षाप्रमाणे - भवेत् - होईल. ॥९॥
कमलनयन श्रीकृष्णा, आपण आपल्या बांधवांना भेटण्यासाठी जेव्हा हस्तिनापुराला किंवा मथुरेला जाता, तेव्हा आपल्याशिवाय जाणारा एकेक क्षण आम्हांला कोट्यवधी वर्षांइतका मोठा वाटतो. सूर्याशिवाय डोळ्यांची जशी, तशी आमची आपल्याखेरीज अवस्था होते. (९)


इति चोदीरिता वाचः प्रजानां भक्तवत्सलः ।
शृण्वानोऽनुग्रहं दृष्ट्या वितन्वन् प्राविशत्पुरम् ॥ १० ॥
(अनुष्टुप्‌)
ऐकोनी वचने सारी भगवान्‌ भक्तवत्सले ।
कृपेच्या दृष्टीवृष्टीने पाहता पातला पुरा ॥ १० ॥

भक्तवत्सलः - भक्तांवर प्रेम करणारा श्रीकृष्ण - इति - याप्रमाणे - उदीरिताः - बोललेल्या - प्रजानां - लोकांच्या - वाचः - वाणी - शृण्वानः - ऐकणारा - च - आणि - दृष्टया - पाहण्याने - अनुग्रहं - उपकाराला - वितन्वन् - करणारा असा होत्साता - पुरीं - व्दारकानगरीत - प्राविशत् - शिरला. ॥१०॥
प्रजेच्या मुखांतून अशी स्तुतिवचने ऐकत आणि आपल्या कृपामय दृष्टीने त्यांच्यावर अनुग्रह करीत भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेत प्रवेश केला. (१०)


मधुभोजदशार्हार्ह कुकुरान्धक वृष्णिभिः ।
आत्मतुल्य बलैर्गुप्तां नागैर्भोगवतीमिव ॥ ११ ॥
नागांनी रक्षिली जैसी ती भोगानगरी स्वयें ।
द्वारका रक्षिली तैसी मधुभोजे दशार्हने ।
अंधके कुकुरे अर्हे यादवांनीहि रक्षिली ॥ ११ ॥

आत्मतुल्यबलैः - स्वतःसारख्या पराक्रमी - मधुभोजदशार्हार्हकुकुरान्धकवृष्णिभिः - मधु, भोज, दशार्ह, अर्ह, कुकुर, अन्धक, व वृष्णि या कुळातील शूर पुरुषांनी - नागैः - नागांनी - भोगवतीं - भोगवती नगरी - इव - प्रमाणे - गुप्तां - रक्षण केलेल्या. ॥११॥
ज्याप्रमाणे नाग आपल्या पाताळाचे रक्षण करतात, त्याप्रमाणे भगवंतांसारख्याच बलवान मधू, भोज, दाशार्ह, अर्ह, कुकुर, अंधक आणि वृष्णिवंशी यादव द्वारकेचे रक्षण करीत होते. (११)


सर्वर्तु सर्वविभव पुण्यवृक्षलताश्रमैः ।
उद्यानोपवनारामैः वृत पद्माकर श्रियम् ॥ १२ ॥
समस्त ऋतुसी शोभे संपन्न द्वारकापुरी ।
बागेत वृक्ष वेलींना फळे नी पुष्प ताटवे ।
क्रिडेच्या त्या वनामध्ये तळ्यात पद्म शोभले ॥ १२ ॥

सर्वर्तुसर्वविभवपुण्यवृक्षलताश्रमैः - संपूर्ण सहाही ऋतूंतील सर्व समृद्धीने शोभणार्‍या पुण्यवृक्ष व वेली ह्यांनी युक्त अशा आश्रमांच्या योगे - उदयानोपवनारामैः - फळबागा, फुलबागा व बगीचे, क्रीडाभुवने यांहीकरून - वृतपद्माकरश्रियम् - वेष्टिलेल्या सरोवरांनी शोभणार्‍या अशा व्दारकेला. ॥१२॥
द्वारकापुरी सर्व ऋतूंच्या संपूर्ण वैभवांनी संपन्न होती. तसेच पवित्र वृक्ष आणि वेलींच्या बागांनी युक्त होती. ठिकठिकाणी फळांचे वृक्ष, फुलांच्या बागा आणि क्रीडावने होती. अधूनमधून दिसणारी कमळांनी शोभणारी सरोवरे नगराची शोभा वाढवीत होती. (१२)


गोपुरद्वारमार्गेषु कृतकौतुक तोरणाम् ।
चित्रध्वजपताकाग्रैः अन्तः प्रतिहतातपाम् ॥ १३ ॥
तोरणे लाविली तेंव्हा वेसी दारांसि मार्गिही ।
ध्वजा नी डौलती झेंडे तेथोनी ऊन्ह ना दिसे ॥ १३ ॥

गोपुरव्दारमार्गेषु - नगरात शिरणार्‍या महाव्दारावर, घरांच्या दरवाज्यांवर तसेच रस्त्यांवर - कृतकौतुकतोरणां - उभारिली आहेत मंगलकारक तोरणे जेथे अशा - चित्रध्वजपताकाग्रैः - चित्रविचित्र अशा अबदागिरी व गुढया यांच्या टोकांनी - अन्तःप्रतिहतातपां - आतील ऊन्ह नाहीसे झालेल्या अशा. ॥१३॥
नगरातील दरवाजे, महालांची दारे आणि रस्त्यांवर भगवंतांच्या स्वागतासाठी तोरणे लावली होती. चारी बाजूंनी रंगीवेरंगी ध्वज आणि पताका फडकत होत्या. त्यामुळेच त्या ठिकाणी प्रखर सूर्यकिरण जाणवत नव्हते. (१३)


सम्मार्जित महामार्ग रथ्यापणक चत्वराम् ।
सिक्तां गन्धजलैरुप्तां फलपुष्पाक्षताङ्‌कुरैः ॥ १४ ॥
सर्वची सडका मार्गी सडे गंधीत घातले ।
अमाप वर्षिली पुष्पे अक्षता स्वागता तशा ॥ १४ ॥

संमार्जितमहामार्गरथ्यापणकचत्वराम् - जीतील मोठमोठे राजमार्ग, रस्ते, पेठा व आंगणी झाडून स्वच्छ केली आहेत अशा - गंधजलैः - व चंदनाच्या पाण्यांनी - सिक्तां - सडा घातलेल्या - फलपुष्पाक्षताङ्कुरैः - आणि फले, फुले, अक्षता व अंकुर ह्यांनी - उप्तां - आच्छादिलेल्या. ॥१४॥
तेथील राजमार्ग, अन्य सडका, बाजार आणि चौक येथे झाडझूड करून तेथे सुगंधित द्रव्यांचा सडा टाकला होता. भगवंतांच्या स्वागतासाठी उधळलेली फळे, फुले, अक्षता इत्यादी सगळीकडे पसरल्या होत्या. (१४)


द्वारि द्वारि गृहाणां च दध्यक्षत फलेक्षुभिः ।
अलङ्‌कृतां पूर्णकुम्भैः बलिभिः धूपदीपकैः ॥ १५ ॥
तांदूळ दहि नी पाणी फळे नी गूळ घालूनी ।
दारांसी भरिले कूंभ धूपदीपादि शोभले ॥ १५ ॥

च - आणि - गृहाणां - घरांच्या - व्दारिव्दारि - प्रत्येक दरवाजावर - दध्यक्षतफलेक्षुभिः - दही, अक्षता, फळे व ऊस ह्यांनी - पूर्णकुंभैः - पूर्णकुंभाच्या योगे - बलिभिः - किंवा पूजासाहित्याच्या योगे - धूपदीपकैः - धूप व दीप यांनी - अलंकृतां - सुशोभित केलेल्या.॥१५॥
घरोघरींच्या दारांवर दही, अक्षता, फळे, ऊस, पाण्यांनी भरलेले कलश, भेटवस्तू, धूप-दीप इत्यादींनी सजावट केली होती. (१५)


निशम्य प्रेष्ठमायान्तं वसुदेवो महामनाः ।
अक्रूरश्चोग्रसेनश्च रामश्चाद्‍भुतविक्रमः ॥ १६ ॥
प्रद्युम्नः चारुदेष्णश्च साम्बो जाम्बवतीसुतः ।
प्रहर्षवेग उच्छशित शयनासन भोजनाः ॥ १७ ॥
वारणेन्द्रं पुरस्कृत्य ब्राह्मणैः ससुमङ्‌गलैः ।
शङ्‌खतूर्य निनादेन ब्रह्मघोषेण चादृताः ।
प्रत्युज्जग्मू रथैर्हृष्टाः प्रणयागत साध्वसाः ॥ १८ ॥
उदार वसुदेवाने अक्रुरे उग्रसेनेने ।
बळी त्या बलरामने प्रद्युम्ने चारुदेष्णने ।
सांबाने ऐकिली वार्ता पुरासी कृष्ण पातले ॥ १६ ॥
जेवणे झोपणे त्यांनी आनंदे सर्व त्यागिले ।
स्वस्त्यय्‌न पाठ मांडोनी हत्ती सजविला पुढे ।
सर्वमंगल साहित्य सवे ब्राम्हण घेतले ॥ १७ ॥
ध्वनी शंख तुतार्‍यांचा वेदांचा घोष चालला ।
रथात बैसले सारे चालले कृष्णास्वागता ॥ १८ ॥

महामनाः - थोर अन्तःकरण असलेला - वसुदेवः - वसुदेव - च - आणि - अक्रूरः - अक्रूर - च - आणि - उग्रसेनः - उग्रसेन - च - आणि - अद्‌भुतविक्रमः - आश्चर्यजनक पराक्रम करणारा - रामः - बलराम - प्रेष्ठं - अत्यंत प्रिय अशा - आयान्तं - आलेल्या श्रीकृष्णाला - निशम्य - ऐकून. ॥१६॥
प्रदयुम्नः - प्रदयुम्न - चारुदेष्णः - चारुदेष्ण - च - आणि - जाम्बवतीसुतः - जाम्बवतीचा मुलगा - साम्बः - सांब - प्रहर्षवेगोच्छ्‌वसितशयनासनभोजनाः - अत्यंत आनंदाच्या भरात निजणे, बसणे व खाणे सोडून देते झाले. ॥१७॥
आदृताः - आदरयुक्त - ससुमङगलैः - मंगलकारक पदार्थांनी युक्त अशा - ब्राह्मणैः - ब्राह्मणांसह - शङ्खतूर्यनिनादेन - शंखांच्या व नगार्‍यांच्या आवाजाने - च - आणि - ब्रह्मघोषेण - वेदघोषाने युक्त - वारणेन्द्रं - श्रेष्ठ हत्तीला - पुरस्कृत्य - पुढे करून - प्रणयागतसाध्वसाः - प्रेमाने त्वरा करणारे - हृष्टाः - आनंदित होऊन - रथैः - रथांतून - प्रत्युज्जग्मुः - सामोरे गेले. ॥१८॥
जेव्हा उदार अंतःकरणाचे वसुदेव, अक्रूर, उग्रसेन, अद्‌भूत पराक्रमी बलराम, प्रद्युम्न, चारुदेष्ण आणि जांबवतीपुत्र सांबाने असे ऐकले की, आपले प्रियतम भगवान श्रीकृष्ण येत आहेत, तेव्हा आनंदाच्या भरात त्यांनी झोप, उठणे, बसणे, भोजन इत्यादी सोडून दिले. प्रेमोल्हासाने त्यांची हृदये उचंबळून आली. शुभशकून व्हावे, म्हणून त्यांनी गजराजाला अग्रभागी ठेवून मंगल-पाठांचे गायन करणार्‍या मंगलमय सामग्रींनी सुसज्ज अशा ब्राह्मणांना बरोबर घेऊन ते निघाले. शंख, तुतार्‍या आदी वाद्ये वाजू लागली आणि वेदघोष होऊ लागला. मोठ्या हर्षाने सर्वजण रथात बसून आदरपूर्वक भगवंतांच्या स्वागतासाठी निघाले. (१६-१८)


वारमुख्याश्च शतशो यानैः तत् दर्शनोत्सुकाः ।
लसत्कुण्डल निर्भात कपोल वदनश्रियः ॥ १९ ॥
शेकडो वनिता आल्या कुंडले मुखशोभिता ।
बसून पालख्यांमाजी स्वागता कृष्णदर्शना ॥ १९ ॥

च - आणि - तद्दर्शनोत्सुकाः - त्याला पाहण्याविषयी उत्कण्ठित झालेल्या - लसत्कुण्डलनिर्भातकपोलवदनश्रियः - व शोभायमान कुंडलांनी प्रकाशित अशा गालाने ज्यांच्या मुखावर एक प्रकारची शोभा प्राप्त झाली आहे अशा - शतशः - शेकडो - वारमुख्याः - वेश्या - यानैः - वाहनांसह ॥१९॥
गालांवर चमकणार्‍या कुंदलांचा प्रकाश पडल्याने ज्या अत्यंत सुंदर दिसत होत्या, अशा शेकडो वारांगना भगवंतांच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन पालख्यांत बसून भगवंतांच्या स्वागतासाठी निघाल्या. (१९)


नटनर्तकगन्धर्वाः सूत मागध वन्दिनः ।
गायन्ति चोत्तमश्लोक चरितानि अद्‍भुतानि च ॥ २० ॥
गायके नट भाटांनी त्या बंदीजन मागधे ।
अद्‍भूत गायिल्या लीला नार्‍यांचे नृत्य जाहले ॥ २० ॥

च - आणि - नटनर्तकगन्धर्वाः - नाटकी लोक, नाचणारे पुरुष व गंधर्व अर्थात गवई - च - आणि - सूतमागधबन्दिनः - सूत, मागध व स्तुतिपाठक - अद्‌भुतानि - आश्चर्य उत्पन्न करणारी - उत्तमश्लोकचरितानि - श्रीकृष्णाची चरित्रे - गायन्ति - गातात. ॥२०॥
पुष्कळसे नट, नर्तक, गायक, कीर्ति गाणारे सूत, मागध आणि बंदीजन भगवान श्रीकृष्णांचे अद्‌भुत चरित्र गायन करू लागले. (१६-२०)


भगवान् तत्र बन्धूनां पौराणां अनुवर्तिनाम् ।
यथाविधि उपसङ्‌गम्य सर्वेषां मानमादधे ॥ २१ ॥
भाऊनी भावकी यांना जनास सेवकास ही ।
गटाने भेटुनी कृष्णे युक्त सन्मान अर्पिले ॥ २१ ॥

तत्र - तेथे - भगवान् - श्रीकृष्ण - अनुवर्तिनां - सेवा करणार्‍या - पौराणां - नगरात राहणार्‍या - बन्धूनां - बंधूंच्या - यथाविधि - शास्त्रपद्धतीला अनुसरून - उपसंगम्य - भेटी घेऊन - सर्वेषां - सगळ्यांच्या - मानं - सत्काराला - आदधे - करता झाला. ॥२१॥
भगवान श्रीकृष्णांनी बांधव, नागरिक आणि सेवक यांना त्यांच्या योग्यतेनुसार स्वतंत्रपणे भेटून त्या सर्वांचा सन्मान केला. (२१)


प्रह्वाभिवादन आश्लेष करस्पर्श स्मितेक्षणैः ।
आश्वास्य चाश्वपाकेभ्यो वरैश्च अभिमतैर्विभुः ॥ २२ ॥
स्वयं च गुरुभिर्विप्रैः सदारैः स्थविरैरपि ।
आशीर्भिः युज्यमानोऽन्यैः वन्दिभिश्चाविशत् पुरम् ॥ २३ ॥
नमिले लवुनी कोणा कोणा शब्देचि वंदिले ।
कोणा आलिंगुनी आणि हस्तांदोलनही कुणा ।
कुणाला स्मित हास्याने कुणाला प्रेम दृष्टिने ।
वरदान कुणा त्याने इच्छिले त्यास ते दिले ॥ २२ ॥
गुरू सपत्‍निके विप्रां वृध्दांना थोर त्या जनां ।
वंदुनी घेतले त्याने आशिर्वाद नि तो पुढे ॥
बिरुदावलि ऐकोनि पुरामाजी प्रवेशला ॥ २३ ॥

विभुः - सर्वसामर्थ्यवान श्रीकृष्ण - प्रह्‌वाभिवादनाश्लेषकरस्पर्शस्मितेक्षणैः - साष्टांग नमस्कार, साधा नमस्कार, आलिंगन, हस्तस्पर्श, किंचित स्मितहास्यपूर्वक पाहणे ह्या सर्व क्रियांनी - च - आणि - अभिमतैः - आवडणारे असे - वरैः - वर देऊन - आश्वपाकेभ्यः - चांडाळापर्यंत - आश्वास्य - आश्वासन देऊन. ॥२२॥
च - आणि - स्वयं - स्वतः - सदारैः - स्त्रियांसहवर्तमान - गुरुभिः - गुरूंनी - च - आणि - विप्रैः - ब्राह्मणांनी - स्थविरैः - वृद्ध पुरुषांनी - च - आणखी - अपि - हि - अन्यैः - दुसर्‍या - बन्दिभिः - स्तुतिपाठक लोकांनी - आशीर्भिः - आशीर्वादांनी - युज्यमानः - युक्त केलेला - पुरं - व्दारकेत - आविशत् - शिरला. ॥२३॥
कोणाला मस्तक लववून नमस्कार केला, कोणाला शब्दांनी अभिवादन केले, कोणाला आलिंगन दिले, कोणाशी हस्तांदोलन केले, कोणाकडे हास्यमुद्रेने पाहिले, तर कोणाला केवळ नजरेने पाहिले. ज्याची जशी इच्छा होती, तशी पूर्ण केली. अशा रीतीने अंत्यजांपर्यंत सर्वांना संतुष्ट करून गुरुजन, सपत्‍नीक ब्राह्मण, वृद्ध, तसेच अन्य वडिलांचे आशीर्वाद ग्रहण करीत आणि बंदीजनांकडून स्तुती ऐकत सर्वांसह वर्तमान भगवान श्रीकृष्णांनी नगरात प्रवेश केला. (२२-२३)


राजमार्गं गते कृष्णे द्वारकायाः कुलस्त्रियः ।
हर्म्याण्यारुरुहुर्विप्र तदीक्षण महोत्सवाः ॥ २४ ॥
चालता राजमार्गाने द्वारका कुलस्वामिनी ।
दर्शना धन्य मानोनी चढल्या त्या स्वमंदिरा ॥ २४ ॥

विप्र - ब्राहमण हो ! - कृष्णे - श्रीकृष्ण - व्दारकायाः - व्दारकेच्या - राजमार्गं - राजमार्गाला - गते - प्राप्त झाला असता - तदीक्षणमहोत्सवाः - त्याला पाहण्याविषयी फारच उत्सुक अशा - कुलस्त्रियः - सत्कुलात उत्पन्न झालेल्या स्त्रिया - हर्म्याणि - वाडयांच्या गच्च्यांवर - आरुरुहुः - चढल्या.॥२४॥
शौनक महोदय ! भगवान ज्यावेळी राजमार्गावरून जात होते, तेव्हा द्वारकेतील कुलीन स्त्रिया भगवंतांच्या दर्शनातच परमानंद मानीत आपापल्या गच्चीवर चढून बसल्या. (२४)


नित्यं निरीक्षमाणानां यदपि द्वारकौकसाम् ।
न वितृप्यन्ति हि दृशः श्रियो धामाङ्‌गमच्युतम् ॥ २५ ॥
श्रियो निवासो यस्योरः पानपात्रं मुखं दृशाम् ।
बाहवो लोकपालानां सारङ्‌गाणां पदाम्बुजम् ॥ २६ ॥
राहते नित्य वक्षासी सुंदरी कमला जया ।
मुखीं ओसंडते नित्य प्राशिण्या रूप‍अमृत ।
बाहू ही लोकपालांना शक्ति देती अशाच की ।
परमोहंस जे भक्त पद्मपाद तयाश्रय ॥ २५ ॥
शोभा ही असली सारी लोकांनी नित्य पाहिली ।
तरीही तृप्ति ना त्यांना वेळ तो क्षण भासली ॥ २६ ॥

यत् - जरी - अपि - सुद्धा - नित्यं - नेहमी - श्रियः - लक्ष्मीचे - धाम - स्थान - अंगं - व सर्वांगसुंदर अशा - अच्युतं - श्रीकृष्णाला - निरीक्षमाणानां - पाहणार्‍या - व्दारकौकसां - व्दारकेत राहणार्‍यांच्या - दृशः - दृष्टी - न वितृप्यन्ति - तृप्त झाल्या नाहीत - हि - खरोखर. ॥२५॥
यस्य - ज्याचे - उरः - वक्षःस्थल - श्रियः - लक्ष्मीचे - निवासः - राहण्याचे घर - मुखं - तोंड - दृशां - डोळ्यांचे - पानपात्रं - पिण्याचे भांडे - वाहवः - दंड - लोकपालानां - लोकपालांचे - पदाम्बुजं - चरणकमळ - सारगाणां - चक्रवाकांचे किंवा भक्तांचे. ॥२६॥
भगवंतांचे वक्षःस्थळ मूर्तिमान सौंदर्यलक्ष्मीचे निवासस्थान आहे. त्यांचे मुख नेत्रांनी पिण्याचे सौंदर्य-सुधेने भरलेले पात्र आहे, त्यांचे बाहू लोकपालांचे निवासस्थान आहेत. त्यांचे चरणकमल भक्तांचे आश्रयस्थान आहेत. त्यांचे अंगप्रत्यंग शोभेचे धाम आहे. भगवंतांचे हे रूप द्वारकावासी नित्य-निरंतर पाहात असतात; तरीसुद्धा त्यांच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. (२५-२६)


सितातपत्रव्यजनैः उपस्कृतः
     नवर्षैः अभिवर्षितः पथि ।
पिशङ्‌गवासा वनमालया बभौ
     यथार्कोडुप चाप वैद्युतैः ॥ २७ ॥
(इंद्रवज्रा)
ते शोभले छत्र नि चामरे नी
मार्गी सडा पुष्प वर्षव झाला ।
त्या पुष्पमाला तयि पीतवस्त्र
ती कृष्ण शोभा नवलाव त्याचा ।
जै नीलमेघो अन त्याच भागी
एकोटुनी चंद्र रवीप्रकाश ।
जै वीज इंद्रो धनुमाजि शोभे
तसाचि शोभे घननीळ कृष्ण ॥ २७ ॥

सितातपत्रव्यजनैः - पांढरे छत्र चामरे ह्यांनी - उपस्कृतः - विभूषित - पथि - रस्त्यांत - प्रसून वर्षैः - फुलांच्या वृष्टींनी - अभिवर्षितः - वरून वर्षाव केलेला - पिशंगवासाः - पिंगट वर्णाचे वस्त्र नेसलेला - वनमालया - अरण्यातील विविध पुष्पांच्या माळेने - यथा - जसा - घनः - मेघ - अर्कोडुपचापवैदयुतैः - सूर्य, नक्षत्रे, इंद्रधनुष्य व वीज यांनी - वभौ - शोभला. ॥२७॥
द्वारकेच्या राजपथावरून जाताना भगवान श्रीकृष्णांच्या मस्तकावर शुभ्र वर्णाचे छत्र धरले होते, शुभ्र वर्णाच्या चवर्‍या ढाळल्या जात होत्या, चारी बाजूंनी पुष्पवृष्टी होत होती, पीतांबर आणि वनमाला त्यांनी धारण केली होती. त्यामुळे श्याम-वर्णाचा मेघ एकाच वेळी, सूर्य, चंद्र, इंद्रधनुष्य आणि विद्युत्-तेजाने शोभिवंत दिसावा, तसे श्रीकृष्ण शोभायमान दिसत होते. (२७)


प्रविष्टस्तु गृहं पित्रोः परिष्वक्तः स्वमातृभिः ।
ववन्दे शिरसा सप्त देवकीप्रमुखा मुदा ॥ २८ ॥
ताः पुत्रमङ्‌कं आरोप्य स्नेहस्नुत पयोधराः ।
हर्षविह्वलितात्मानः सिषिचुः नेत्रजैर्जलैः ॥ २९ ॥
(अनुष्टुप्‌)
माता-पित्याघरी गेला साती माताहि वंदिल्या ।
आनंद दाटला त्यांना कृष्णासी पोटि घेतले ॥ २८ ॥
अशा या प्रेमभावाने दूधहीर झरले स्तनीं ।
आनंदे हर्षुनी आसू कृष्ण मस्तकि ढाळिली ॥ २९ ॥

पित्रोः - आईबापांच्या - गृहं - घराला - प्रविष्टः - गेलेला - तु - तर - स्वमातृभिः - आपल्या मातांनी - परिष्वक्तः - आलिंगिलेला - देवकीप्रमुखाः - देवकीप्रमुख अशा - सप्त - सातांना - मुदा - आनंदाने - शिरसा - मस्तकाने - ववन्दे - नमस्कार करिता झाला. ॥२८॥
स्नेहस्नुतपयोधराः - प्रेमाने भिजून गेले आहेत स्तन ज्यांचे अशा - हर्षविव्हलितात्मानः - अत्यंत आनंदाने ज्यांचा आत्मा विव्हल झाला आहे अशा - ताः - त्या - पुत्रं - मुलाला - अङ्कं - मांडीवर - आरोप्य - घेऊन - नेत्रजैः - डोळ्यांतून निघालेल्या - जलैः - पाण्यांनी - सिषिचुः - स्नान घालत्या झाल्या. ॥२९॥
भगवान सर्वप्रथम आपल्या माता-पित्यांच्या महालात गेले. तेथे मोठ्या आनंदाने त्यांनी देवकी आदी आपल्या सात मातांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला आणि मातांनीही त्यांना आपल्या छातीशी कवटाळून मांडीवर बसवून घेतले. त्यांच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या, त्यांचे हृदय हर्षाने पुलकित झाले आणि आनंदाश्रुंनी त्या त्यांच्यावर अभिषेक करू लागल्या. (२८-२९)


अथाविशत् स्वभवनं सर्वकाममनुत्तमम् ।
प्रासादा यत्र पत्‍नीनां सहस्राणि च षोडश ॥ ३० ॥
तयांची घेउनी आज्ञा पातला भोगमंदिरा ।
संपन्न भवनामाजी नारी सोळा सहस्त्र त्या ॥ ३० ॥

अथ - नंतर - सर्वकामं - सर्व इच्छा पूर्ण करणार्‍या - च - आणि - अनुत्तमं - श्रेष्ठ अशा - स्वभवनं - स्वतःच्या मंदिरात - अविशत् - शिरला - यत्र - जेथे - पत्नीनां - स्त्रियांचे - षोडश - सोळा - सहस्त्राणि - हजार - प्रसादाः - महाल. ॥३०॥
नंतर मातांची आज्ञा घेऊन आपल्या सर्व प्रकारच्या भोग-सामग्रींनी संपन्न असलेल्या सर्वश्रेष्ठ भवनांत ते गेले. तेथे सोळा हजार पत्‍न्यांचे निरनिराळे महाल होते. (३०)


पत्‍न्यः पतिं प्रोष्य गृहानुपागतं
     क्य सञ्जात मनोमहोत्सवाः ।
उत्तस्थुरारात् सहसासनाशयात्
     व्रतैः व्रीडित लोचनाननाः ॥ ३१ ॥
(इंद्रवज्रा)
सोडोनि ध्याना बघता समोर
    संकेत सोडोनि उभ्याच ठेल्या ।
भांबावल्या प्राणप्रिया बघोनी
    गालीं मुखासी बहु लाजल्या त्या ॥ ३१ ॥

प्रोप्य - प्रवास करून - गृहान् - घराला - उपागतं - आलेल्या - पतिं - नवर्‍याला - आरात् - दुरूनच - विलोक्य - पाहून - संजातमनोमहोत्सवाः - ज्यांच्या मनाला फारच आनंद झाला आहे अशा - व्रीडेतलोचनाननाः - व ज्यांची नेत्रयुक्त मुखे लाजेने युक्त झाली आहेत अशा - पत्न्यः - स्त्रिया - सहसा - एकदम - व्रतैः - व्रतांशी - साकं - सहवर्तमान - आसनाशयात् - आसनावरून - उत्तस्थुः - उठल्या. ॥३१॥
आपले प्राणनाथ भगवान श्रीकृष्ण पुष्कळ दिवस दूर राहून घरी आल्याचे पाहून राण्यांची हृदये आनंदाने भरून गेली. त्यांना आपल्या शेजारी पाहून आपले ध्यान सोडून त्या एकाएकी उठून उभ्या राहिल्या, त्यांनी आपल्या केवळ आसनाचाच नव्हे तर पती परगावी गेल्यानंतर जे नियम पाळले होते, त्यांचाही त्याग केला. त्यावेळी त्यांच्या मुखांवर आणि नेत्रांवर लज्जा दाटून आली. (३१)


तं आत्मजैः दृष्टिभिरन्तरात्मना
     दुरन्तभावाः परिरेभिरे पतिम् ।
निरुद्धमप्यास्रवदम्बु नेत्रयोः
     विलज्जतीनां भृगुवर्य वैक्लवात् ॥ ३२ ॥
होते बहुप्रेम कृष्णावरी नी
    मनात नेत्रातचि व्यक्त केले ।
शिशू निमित्ते करितात स्पर्श
    प्रेमाश्रु त्याचे ढळले पुन्हाही ॥ ३१ ॥

भृगुवर्य - अहो शौनक हो ! - दुरन्तभावाः - गंभीर आहे अभिप्राय ज्यांचा अशा - आत्मजैः - शरीरांनी - दृष्टिभिः - नेत्रांनी - अन्तरात्मना - अंतःकरणाने - तं - त्या - पतिं - पतीला - परिरेभिरे - आलिंगन देत्या झाल्या ? - विलज्जतीनां - लाजणार्‍यांच्या - नेत्रयोः - दोन नेत्रांत - निरुद्धं - अटकवून ठेविलेले - अपि - सुद्धा - वैक्लवात् - अनावर झाल्यामुळे - अम्बु - अश्रुजल - आस्रवत् - खाली पडले. ॥३२॥
भगवंतांविषयी त्यांचे प्रेम कळण्याच्या पलीकडचे होते. त्यांनी प्रथम मनोमन, नंतर दृष्टीने आणि तदनंतर मुलाने मिठी मारावी तसे त्यांना आलिंगन दिले. शौनक महोदय ! त्यवेळी त्यांच्या नेत्रातून ज्या अश्रूधारा वाहू लागल्या, संकोचास्तव त्या रोखण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्‍न केला, पण प्रेमभावातिरेकाने अश्रू ओघळेच. (३२)


यद्यप्यसौ पार्श्वगतो रहोगतः
     तथापि तस्याङ्‌घ्रियुगं नवं नवम् ।
पदे पदे का विरमेत तत्पदात्
     चलापि यच्छ्रीर्न जहाति कर्हिचित् ॥ ३३ ॥
प्राणप्रियो कृष्ण सदाच त्यांचा
    परी तयांना पदप्रीय त्याचे ।
जी चंचला ती न कधीच सोडी
    तिच्या पुढे त्या मग काय अन्य ॥ ३३ ॥

यदि - जरी - अपि - सुद्धा - पार्श्वगतः - जवळ असलेला - रहोगतः - एकांतात राहिलेला - असौ - हा - तथा - तरी - अपि - सुद्धा - तस्य - त्याचे - अङ्घ्रियुगं - दोन चरणे - पदेपदे - पावलोपावली - नवंनवं - नवीन नवीनअग्नीला - का - कोणती - तत्पदात् - त्याच्या चरणापासून - विरमेत - दूर होईल. - यत् - ज्या कारणामुळे - चला - चंचल अशी - श्रीः - लक्ष्मी - अपि - सुद्धा - कर्हिचित् - कधीही - न जहाति - सोडीत नाही.॥३३॥
जरी भगवान श्रीकृष्ण एकांतात नेहमी त्यांच्याजवळ राहत असत, तरीसुद्धा त्यांचे चरणकमल त्यांना पदोपदी नवीन वाटत असत. स्वभावाने चंचल असणारीही लक्ष्मी ज्यांना क्षणभरसुद्धा जेथे सोडीत नाही, तेथे त्यांचे सान्निध्यात कोणती स्त्री तृप्त होईल ? (३३)


एवं नृपाणां क्षितिभारजन्मनां
     अक्षौहिणीभिः परिवृत्ततेजसाम् ।
विधाय वैरं श्वसनो यथानलं
     मिथो वधेनोपरतो निरायुधः ॥ ३४ ॥
परस्परा घासुनि बांबुबेटे
    जळोनि जाती नि कुणी न राही ।
कृष्णे तसे दो दळभार केले
    मारोनि त्यांना उपराच झाला ॥ ३४

निरायुधः - शस्त्ररहित असा श्रीकृष्ण - एवं - याप्रमाणे - क्षितिजभार जन्मनां - पृथ्वीला भार करण्याकरिताच जन्माला आलेल्या - अक्षौहिणीभिः - अक्षौहिणी सैन्याच्या योगे - परिवृत्ततेजसां - वाढलेल्या तेजाने युक्त - नृपाणां - राजांमध्ये - मिथः - एकमेकांत - वैरं - शत्रुत्वाला - यथा - ज्याप्रमाणे - श्वसनः - वायु - अनलं - अग्नीला - विधाय - उत्पन्न करून - वधेन - मारण्याने - उपरतः - शांत झाला. ॥३४॥
ज्याप्रमाणे वायू बांबूंचे घर्षण करून अग्नी उत्पन्न करून त्यांना जाळून टाकतो, त्याचप्रमाणे पृथ्वीला भारभूत झालेल्या आणि शक्तिशाली राजांमध्ये परस्पर फूट पाडून स्वतः शस्त्र हातात न धरता, भगवान श्रीकृष्णांनी त्यांना अनेक अक्षौहिणी सैन्यांसह एकमेकांकडून मारले आणि त्यानंतर स्वतः शांत राहिले. (३४)


स एष नरलोकेऽस्मिन् अवतीर्णः स्वमायया ।
रेमे स्त्रीरत्‍नकूटस्थो भगवान् प्राकृतो यथा ॥ ३५ ॥
(अनुष्टुप्‌)
परमात्मा स्वये कृष्ण लीलेने जन्म घेउनी ।
रमवी कैक त्या राण्या मनुष्या परि भासला ॥ ३५ ॥

सः - तो - एषः - हा - भगवान् - परमेश्वर - स्वमायया - आपल्या मायेने - अस्मिन् - ह्या - नरलोके - मृत्यूलोकांत - अवतीर्णः - उत्पन्न झाला - स्त्रीरत्नकूटस्थः - श्रेष्ठ स्त्रियांच्या समुदायात राहणारा असा - यथा - ज्याप्रमाणे - प्राकृतः - साधारण मनुष्य - रेमे - क्रीडा करू लागला. ॥३५॥
साक्षात परमेश्वरच आपल्या मायेने या मनुष्य लोकात अवतीर्ण झाले आणि हजारो रमणीरत्‍नांमध्ये राहून त्यांनी साधारण मनुष्यासारखे वर्तन केले. (३५)


उद्दामभाव पिशुनामल वल्गुहास ।
     व्रीडावलोकनिहतो मदनोऽपि यासाम् ॥
सम्मुह्य चापमजहात् प्रमदोत्तमास्ता ।
     यस्येन्द्रियं विमथितुं कुहकैर्न शेकुः ॥ ३६ ॥
तमयं मन्यते लोको ह्यसङ्‌गमपि सङ्‌गिनम् ।
आत्मौपम्येन मनुजं व्यापृण्वानं यतोऽबुधः ॥ ३७ ॥
(वसंत तिलका)
ज्याचे हसू बघूनि सुंदर भावयुक्त
तो लाजिरा बघुनि भाव मनात सुन्न ।
झाला असे अतिव विश्वजितोहि काम
घायाळ हो‌उनि तदा धनु बाण त्यागी ॥ ३६ ॥
(अनुष्टुप्‌)
कामाचा नचले चाळा विलास हरिच्या प्रती ।
मूर्ख ते मानिती कृष्णा असंगाऽऽसक्त की पहा ॥ ३७ ॥

यासां - ज्यांचे - उद्दामभावपिशुनामलवल्गुहासव्रीडावलोकनिहतः - गंभीर अभिप्रायसूचक शुभ्र व सुंदर जे हास्य आणि लज्जायुक्त नेत्रकटाक्ष त्यांनी ताडिलेला - अमदनः - कामाला जाळणारा शंकर - अपि - सुद्धा - संमुह्य - वेडा बनून - चापं - धनुष्याला - अजहात् - टाकता झाला - ताः - त्या - प्रमदोत्तमाः - उत्तम मदाने व्यापिलेल्या श्रेष्ठ स्त्रिया - कुहकैः - कपटांनी - यस्य - ज्याच्या - इन्द्रियं - इन्द्रियाला - विमथितुं - क्षुब्ध करण्यास - न शेकुः - समर्थ झाल्या नाहीत. ॥३६॥
हि - खरोखर - अयं - हा - लोकः - लोक - तं - त्या श्रीकृष्णाला - असङ्गं - सर्वसंगपरित्याग केलेला - अपि - असता सुद्धा - आत्मौपम्येन - स्वतःचे उदाहरण घेऊन - सङ्गिनं - विषयांवर आसक्ती ठेवणारा - व्यापृण्वानं - व्यवहार करणारा - मनुजं - मनुष्य असे - मन्यते - मानतो - यतः - ज्यामुळे - अबुधः - मूर्ख ॥३७॥
ज्यांचे निर्मळ आणि मधुर हास्य त्यांच्या हृदयातील तीव्र प्रेमभावनांचे सूचक होते, ज्यांच्या लज्जापूर्ण कटाक्षाने विव्हल होऊन शुद्ध हरपून, विश्वविजयी कामदेवानेसुद्धा आपल्या धनुष्याचा त्याग केला होता, अशा सौंदर्यवान स्त्रिया आपल्या काम-चेष्टांनी ज्यांच्या मनात यत्किंचितही क्षोभ उत्पन्न करू शकल्या नाहीत, त्या निःसंग भगवान श्रीकृष्णांना संसारी लोक आपल्यासारखेच कर्म करताना पाहून आसक्त मनुष्य समजतात, हा त्यांचा मूर्खपणाच आहे. (३६-३७)


एतत् ईशनमीशस्य प्रकृतिस्थोऽपि तद्‍गुणैः ।
न युज्यते सदाऽत्मस्थैः यथा बुद्धिस्तदाश्रया ॥ ३८ ॥
ह्यातची थोरवी त्याची शरीरी राहुनी सदा ।
न लिंपे गुण कर्मात भक्तांची बुध्दि जै तसा ॥ ३८ ॥

एतत् - हे - ईशस्य - ईश्वराचे - ईशनं - ऐश्वर्य - प्रकृतिस्थः - प्रकृतीमध्ये राहणारा - अपि - असूनही - असदात्मस्थैः - असत् अशा आत्म्यामध्ये राहणार्‍या - तद्‌गुणैः - त्याच्या गुणांनी - न युज्यते - युक्त होत नाही - यथा - ज्याप्रमाणे - तदाश्रया - त्याला आश्रय करून राहणारी - बुद्धिः - बुद्धि. ॥३८॥
हीच भगवंतांची महती आहे की, प्रकृतीत राहूनसुद्धा तिच्या गुणांनी ते कधी लिप्त होत नाहीत. जसे नेहमी भगवंतांना शरणागत बुद्धी स्वतःमधील गुणांनी लिप्त होत नाही. (३८)


तं मेनिरेऽबला मूढाः स्त्रैणं चानुव्रतं रहः ।
अप्रमाणविदो भर्तुः ईश्वरं मतयो यथा ॥ ३९ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे
नैमिषीयोपाख्याने श्रीकृष्णद्वारकाप्रवेशो नाम एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
तयाच्या मूढ त्या स्त्रीया एकांत कृष्ण सेविता ।
कामूक भासला त्यांना त्याचे श्रेष्ठत्व ना कळे ॥ ३९ ॥
॥ इति श्रीमद्‍भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्र्लोकी मराठी रूपांतर ॥
॥ अकरावा अध्याय हा ॥ १ ॥ ११ ॥
हरि ॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु॥

भर्तुः - नवर्‍याच्या - अप्रमणविदः - महात्म्याला यथार्थ रीतीने न जाणणार्‍या - यथा - जशी - मतयः - बुद्धि - मूढाः - मूर्ख - अबलाः - स्त्रिया - तं - त्या - ईश्वरं - श्रीकृष्णाला - स्त्रैणं - बाईलबुद्धीचा - च - आणि - रहः - एकांतात - अनुव्रतं - आपल्या मर्जीप्रमाणे वागणारा - मेनिरे - मानत्या झाल्या. ॥३९॥
जसे अहंकारी वृत्ती ईश्वराला आपल्याच धर्मांनी युक्त आहे असे मानते, त्याप्रमाणे त्या मूर्ख स्त्रियासुद्धा श्रीकृष्णांना आपला एकांतसेवी, स्त्रीलोलुप भक्तच समजत होत्या. कारण त्या आपल्या स्वामींचा महिमा जाणत नव्हत्या. (३९)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां प्रथमः स्कन्धे एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
अध्याय अकरावा समाप्त

GO TOP