श्रीमद् भागवत पुराण
प्रथमः स्कन्धः
नवमोऽध्यायः

युधिष्ठिरादीनां भीष्मसमीपे गमनम्, तत्र विविधान्
धर्मानुपदिश्य श्रीकृष्णस्तवनपूर्वकं भीष्मश्च महाप्रस्थानं च -

युधिष्ठिर आदींचे भीष्मांजवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत भीष्मांचा प्राणत्याग -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


सूत उवाच ।
(अनुष्टुप्)
इति भीतः प्रजाद्रोहात् सर्वधर्मविवित्सया ।
ततो विनशनं प्रागाद् यत्र देवव्रतोऽपतत् ॥। १ ॥
सूतजी सांगतात -
(अनुष्टुप)
प्रजाद्रोहामुळे राजा भरला भीतिने पहा ।
धर्मार्थ जाणण्या आला भीष्म शैय्या जिथे असे ॥ १ ॥

इति - याप्रमाणे - प्रजाद्रोहात् - प्रजेशी वैर केल्यामुळे - भीतः - भ्यालेला - ततः - त्यामुळे - सर्वधर्मविवत्सया - सर्व धर्म जाणण्याच्या इच्छेने - विनशनं - कुरुक्षेत्राला - प्रागात् - गेला - यत्र - जेथे - देवव्रतः - भीष्म - अपतत् - पडला. ॥१॥
सूत म्हणाले - अशा रीतीने युद्धामुळे प्रजेला पीडा झाल्यामुळे राजा युधिष्ठिर भयभीत झाला होता. नंतर सर्व धर्मांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने तो जेथे भीष्मपितामह शरशय्येवर पडले होते, त्या कुरुक्षेत्रावर गेला. (१)


तदा ते भ्रातरः सर्वे सदश्वैः स्वर्णभूषितैः ।
अन्वगच्छन् रथैर्विप्रा व्यासधौम्यादयस्तथा ॥। २ ॥
सोन्याच्या त्या रथा त्याने जुंपिले अश्व उत्तम ।
व्यासादी विप्र घेवोनी बैसलासे युधिष्ठिर ।
सोबती घेतले चारी बंधुंना आपल्या सवे ॥ २ ॥

तदा - त्यावेळी - ते - ते - सर्वे - सगळे - भ्रातरः - भाऊ - सदश्वैः - चांगले आहेत घोडे ज्यांना अशा - स्वर्णभूषितैः - व सोन्याने मढविलेल्या - रथैः - रथांसह - तथा - त्याचप्रमाणे - व्यासधौ‌म्यादयः - व्यास, धौ‌म्य इत्यादि - विप्राः - ब्राह्मण - अन्वगच्छन् - मागोमाग गेले ॥२॥
शौनकादी ऋषींनो, त्यावेळी ज्या रथाला चांगले घोडे जुंपले होते, अशा सुवर्णजडित रथात बसून ते सर्व पांडव बंधू युधिष्ठिरामागोमाग गेले. व्यास, धौम्य आदी मुनीही त्यांच्या बरोबर होते. (२)


भगवानपि विप्रर्षे रथेन सधनञ्जयः ।
स तैर्व्यरोचत नृपः कुवेर इव गुह्यकैः ॥। ३ ॥
अर्जुनासोबती कृष्ण रथात चढला असे ।
बंधूत शोभला राजा यक्षांमाजी कुबेर जै ॥ ३ ॥

विप्रर्षे - हे ब्राह्मणश्रेष्ठा ! - सधनञ्जयः - अर्जुनासह - भगवान् - श्रीकृष्ण - अपि - सुद्धा - रथेन - रथासह - गुह्यकैः - यक्षांसह - कुबेरः - कुबेर - इव - प्रमाणे - तैः - त्यांशी - सः - तो - नृपः - राजा - व्यरोचत - शोभला. ॥३॥
शौनका, भगवान श्रीकृष्णसुद्धा अर्जुनाबरोबर रथात बसले. तेव्हा त्या सर्व बंधूंच्यासह युधिष्ठिर, यक्षसमुदायात कुबेर शोभून दिसावा, तसा शोभून दिसत होता. (३)


दृष्ट्वा निपतितं भूमौ दिवश्च्युतं इवामरम् ।
प्रणेमुः पाण्डवा भीष्मं सानुगाः सह चक्रिणा ॥। ४ ॥
स्वर्गीय देवता जैशी पडावी तै पितामह ।
पाहता वंदिले सर्वे तीर शैय्यी तसेच त्या ॥ ४ ॥

सानुगा - अनुसरणार्‍या परिवारांसह - पाण्डवाः - पांडव - चक्रिणा - श्रीकृष्णांशी - सह - सहवर्तमान - दिवः - स्वर्गातून - च्युतं - पडलेल्या - अमरं - देवा - इव - प्रमाणे - भूमौ - जमिनीवर - निपतितं - पडलेल्या - भीष्मं - भीष्माला - दृष्ट्‌वा - पाहून - प्रणेमुः - नमस्कार करते झाले. ॥४॥
आपले अनुयायी आणि भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर तेथे गेल्यानंतर पांडवांना दिसले की, स्वर्गातून पडलेल्या एखाद्या देवासारखे भीष्मपितामह पृथ्वीवर पडले होते. सर्वांनी त्यांना प्रणाम केला. (४)


तत्र ब्रह्मर्षयः सर्वे देवर्षयश्च सत्तम ।
राजर्षयश्च तत्रासन् द्रष्टुं भरतपुङ्गवम् ॥। ५ ॥
तिथे ब्रह्मर्षि राजर्षी देवर्षि सर्व पातले ।
भरतवंशिच्या भीष्माचार्याला पाहण्या तिथे ॥ ५ ॥

सत्तम - साधुश्रेष्ठा - तत्र - तेथे - सर्वे - सगळे - ब्रह्मर्षयः - ब्रह्मर्षि - च - आणि - देवर्षयः - देवर्षि - च - आणि - तत्र - तेथे - राजर्षयः - राजर्षि - भरतपुङ्‌गवम् - भरतश्रेष्ठाला - द्रष्टुं - पाहण्यासाठी - आसन् - आले. ॥५॥
शौनका, भरतवंशाचे भूषण असलेल्या भीष्मपितामहांना भेटण्यासाठी त्यावेळी सर्व ब्रह्मर्षी, देवर्षी आणि राजर्षी तेथे आले होते. (५)


पर्वतो नारदो धौम्यो भगवान् बादरायणः ।
बृहदश्वो भरद्वाजः सशिष्यो रेणुकासुतः ॥। ६ ॥
वसिष्ठ इन्द्रप्रमदः त्रितो गृत्समदोऽसितः ।
कक्षीवान् गौतमोऽत्रिश्च कौशिकोऽथ सुदर्शनः ॥। ७ ॥
अन्ये च मुनयो ब्रह्मन् ब्रह्मरातादयोऽमलाः ।
शिष्यैरुपेता आजग्मुः कश्यपाङ्‌गिरसादयः ॥। ८ ॥
पर्वते नारदे धौम्ये भगवान्‌ बादरायणे ।
ब्रह्मदश्वे भरद्वाजे आणिले सर्व शिष्य ही ॥ ६ ॥
वसिष्ठ परशूरामे इंद्रप्रमद आसिते ।
कक्षिवान्‌ त्रित अत्रीने शुकदेवे सुदर्शने ॥ ७ ॥
गौतमे अंगिरापुत्रे सर्वांनी शिष्य आणिले ।
शुध्दात्मे मुनिही आले कुरुक्षेत्री तये क्षणी ॥ ८ ॥

पर्वतः - पर्वत - नारदः - नारद - धौ‌म्यः - धौ‌म्य - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - बादरायणः - व्यास - बृहदश्वः - बृहदश्व - भारव्दाजः - भारव्दाज - सशिष्यः - शिष्यांसह - रेणुकासुतः - रेणुकेचा मुलगा ॥६॥
वसिष्ठः - वसिष्ठ - इन्द्रप्रमदः - इन्द्रप्रमद - त्रितः - त्रित - गृत्समदः - गृत्समद - असितः - असित - कक्षीवान् - कक्षीवान - गौतमः - गौतम - अत्रिः - अत्रि - च - आणि - कौशिकः - विश्वामित्र - अथ - नंतर - सुदर्शनः - सुदर्शन॥७॥
ब्रह्मन् - शौनक हो ! - च - आणि - अन्ये - दुसरे - ब्रह्मरातादयः - शुकादि - अमलाः - पवित्र - मुनयः - ऋषि - शिष्यैः - शिष्यांनी - उपेता - युक्त असे - कश्यपाङ्‌गिरसादयः - कश्यप अङ्‌गिरा वगैरे - आजग्मुः - आले. ॥८॥
पर्वत, नारद, धौम्य, भगवान व्यास, बृहदश्व, भारद्वाज तसेच आपल्या शिष्यांसह परशुराम, वसिष्ठ, इंद्रप्रमद, त्रित, गृत्समद, असित, कक्षीवान, गौतम, अत्री, विश्वामित्र, सुदर्शन आणि शुकदेव इत्यादी शुद्धहृदय असणारे महात्मे, तसेच शिष्यांसहित कश्यप, अंगिरापुत्र बृहस्पती इत्यादी मुनिगणही तेथे आले. (६-८)


तान् समेतान् महाभागान् उपलभ्य वसूत्तमः ।
पूजयामास धर्मज्ञो देशकालविभागवित् ॥ ९ ॥
देश कालादि धर्माचे कर्म जाणी पितामह ।
सर्वांचा युक्त सत्कार केला तेव्हा पितामहे ॥ ९ ॥

धर्मज्ञः - धार्मिक - देशकालविभागवित् - देश व काल ह्यांच्या विभागाला जाणणारा - वसूत्तमः - भीष्म - समेतान् - एकत्र जन्मलेल्या - महाभागान् - भाग्यवन्त अशा - तान् - त्यांना - उपलभ्य - पाहून - पूजयामास - सत्कार करते झाले. ॥९॥
देश कालनिर्णय जाणणार्‍या धर्मज्ञ भीष्मपितामहांनी त्या थोर ऋषींना एकत्र आलेले पाहून त्यांचा मनाने व दृष्टीने यथायोग्य सन्मान केला. (९)


कृष्णं च तत्प्रभावज्ञ आसीनं जगदीश्वरम् ।
हृदिस्थं पूजयामास माययोपात्त विग्रहम् ॥ १० ॥
कृष्णासी जाणिले त्यांनी बाहेर हृदयी तदा ।
स्थापिले आसनी तेव्हा भगवान्‌ जगदीश्वरा ॥ १० ॥

च - आणि - तत्प्रभावज्ञः - त्याचा पराक्रम जाणणारा - आसीनं - बसलेल्या - जगदीश्वरन् - जगाचा अधिपति अशा - मायया - मायेने - उपात्तविग्रहं - शरीर धारण करणार्‍या - हृदिस्थं - हृदयात राहणार्‍या - कृष्णं - श्रीकृष्णाला - पूजयामास - पूजिता झाला. ॥१०॥
ते भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव जाणत होते. स्वलीलेने मनुष्यरूप धारण करून तेथे बसलेल्या जगदीश्वराची तसेच हृदयात विराजमान झालेल्या भगवान् श्रीकृष्णांची त्यांनी पूजा केली. (१०)


पाण्डुपुत्रान् उपासीनान् प्रश्रयप्रेमसङ्गतान् ।
अभ्याचष्टानुरागाश्रैः अन्धीभूतेन चक्षुषा ॥ ११ ॥
पांडव प्रेमभावाने बैसले नम्र होऊनी ।
भीष्माने पाहता त्यांना प्रेमाश्रू नेत्रि पातले ॥ ११ ॥

प्रश्रयप्रेमसंगतान् - नम्रता व स्नेह ह्यांनी युक्त अशा - उपासीनान् - आसनावर जवळ बसलेल्या - पाण्डुपुत्रान् - पांडवांना - अनुरागास्त्रैः - प्रेमाश्रूंनी - अन्धीभूतेन - अंध झालेल्या - चक्षुषा - नेत्राने - अभ्याचष्ट - बोलला. ॥११॥
पांडव मोठ्या नम्रतेने आणि प्रेमाने भीष्मपितामहांजवळ बसले. त्यांना पाहून भीष्मपितामहांचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले. ते त्यांना म्हणाले, (११)


अहो कष्टमहोऽन्याय्यं यद् यूयं धर्मनन्दनाः ।
जीवितुं नार्हथ क्लिष्टं विप्रधर्माच्युताश्रयाः ॥ १२ ॥
वदले धर्मपुत्रांनो ब्राम्हणां धर्म देवतां ।
आश्रीत असुनी तुम्ही घोर अन्याय जाहला ॥ १२ ॥

धर्मनन्दनाः - पांडव हो ! - यत् - ज्या कारणास्तव - विप्रधर्माच्युताश्रयाः - ब्राह्मण धर्म व श्रीकृष्ण यांचा आश्रय घेऊन राहणारे - यूयं - तुम्ही - क्लिष्टं - दुःखाने - जीवितुं - जगण्याला - न अर्हथ - योग्य नाही - अहो - काय हो ! - कष्टं - दुःख - अहो - किती हो ! - अन्याय्यं - अन्यायाचे कृत्य ॥१२॥
हे धर्मपुत्रांनो, तुम्ही सर्वजण ब्राह्मण, धर्म आणि भगवंतांचे आश्रित असूनही तुम्हांला एवढे कष्ट झाले आणि तुमच्यावर एवढा अन्याय झाला. अरेरे ! हे तुमच्या वाट्यास यायला नको होते. (१२)


संस्थितेऽतिरथे पाण्डौ पृथा बालप्रजा वधूः ।
युष्मत्कृते बहून् क्लेशान् प्राप्ता तोकवती मुहुः ॥ १३ ॥
निधने पांडुवीराच्या विधवा सतिने पुन्हा ।
तुम्हा घेवोनिया बाळा लाडिले कष्टुनी बहू ॥ १३ ॥

अतिरथे - अतिरथी - पाण्डौ - पाण्डु - संस्थिते - मृत झाला असता - बालप्रजा - जिचे मुलगे लहान आहेत अशी - वधूः - सून - पृथा - कुंती - तोकवती - लेकुरवाळी - युष्मत्कृते - तुमच्याकरिता - मुहुः - वारंवार - बहून् - पुष्कळ - क्लेशान् - दुःखांना - प्राप्ता - प्राप्त झाली. ॥१३॥
अतिरथी पांडूच्या मृत्युसमयी तुम्ही सर्वजण लहान होता. त्यावेळी मुले लहान असलेल्या कुंतीराणीला तुमच्यासाठी बरेच कष्ट सहन करावे लागले. (१३)


सर्वं कालकृतं मन्ये भवतां च यदप्रियम् ।
सपालो यद्वशे लोको वायोरिव घनावलिः ॥ १४ ॥
आधीन ढग वार्‍याच्या तसेचि जव ईश्वरां ।
संकटे तुमच्या वाट्या आली त्याचीच ही लीला ॥ १४ ॥

च - आणि - भवतां - आपले - यत् - जे - अप्रियं - वाईट - सर्वं - सर्व - कालकृतं - काळाने घडवून आणले - मन्ये - वाटते - यव्दशे - ज्याच्या स्वाधीन - वायोः - वायूच्या - घनावलिः - मेघपंक्ती - इव - प्रमाणे - सपालः - लोकपालासह - लोकः - लोक ॥१४॥
जसे ढग वार्‍याच्या अधीन असतात, त्याचप्रमाणे लोकपालांसहित हे सर्व जग काळरूप ईश्वराच्या अधीन आहे. मला तर असे वाटते की, तुम्हां सर्वांच्या जीवनात ज्या अप्रिय घटना घडल्या, त्या सर्व त्याचीच लीला होय. (१४)


यत्र धर्मसुतो राजा गदापाणिर्वृकोदरः ।
कृष्णोऽस्त्री गाण्डिवं चापं सुहृत् कृष्णः ततो विपत् ॥ १५ ॥
युधिष्ठिर जिथे राजा गदाधारी जिथे भिम ।
धनुर्धारी जिथे पार्थ कृष्ण तेथे विपत्ति कै ॥ १५ ॥

यत्र - जेथे - धर्मसुतः - युधिष्ठिर - राजा - राजा - गदापाणिः - हातात गदा घेतलेला - वृकोदरः - भीम - कृष्णः - अर्जुन - अस्त्री - अस्त्रे जाणणारा - गाण्डिवं - गाण्डिव - चापं - धनुष्य - कृष्णः - कृष्ण - सुहृत् - मित्र - ततः - तरीसुद्धा - विपत् - आपत्ती ? ॥१५॥
जेथे धर्मपुत्र राजा युधिष्ठिर, गदाधारी भीमसेन अस्त्रवेत्ता अर्जुन, गांडीव धनुष्य आणि स्वतः श्रीकृष्ण सन्मित्र, तिथेही विपात्ति याव्यात ना ! (१५)


न ह्यस्य कर्हिचित् राजन् पुमान् वेद विधित्सितम् ।
यत् विजिज्ञासया युक्ता मुह्यन्ति कवयोऽपि हि ॥ १६ ॥
कृष्ण हा कालरुपाने कधी काय करील तो ।
न जाणी कोणिही कांही योगिही कष्टती भले ॥ १६ ॥

राजन् - हे राजा - पुमान् - पुरुष - हि - खरोखर - कर्हिचित् - कधीही - अस्य - ह्याचे - विधित्सितम् - कर्तव्याला - न वेद - जाणत नाही - हि - खरोखर - कवयः - विव्दान - अपि - सुद्धा - यव्दिजिज्ञासया - ज्याला जाणण्याच्या इच्छेने - युक्ताः - युक्त होत्साते - मुह्यन्ते - वेडे बनतात. ॥१६॥
राजा, या कालरूप ईश्वराची इच्छा कोणीच माणूस जाणू शकत नाही. मोठमोठे ज्ञानी पुरुषसुद्धा याला जाणण्याच्या इच्छेने मोहित होतात. (१६)


तस्मात् इदं दैवतंत्रं व्यवस्य भरतर्षभ ।
तस्यानुविहितोऽनाथा नाथ पाहि प्रजाः प्रभो ॥ १७ ॥
युधिष्ठिरा जगी सारे इच्छेने घड ते जया ।
स्मरुनी त्यासची नित्य प्रजा सांभाळ थोर तू ॥ १७ ॥

भरतर्षभ - हे भरतश्रेष्ठा ! - तस्मात् - म्हणून - इदं - हे - दैवतन्त्रं - दैवाधीन - व्यवस्य - निश्र्चित करून - नाथ - हे राजा ! - प्रभो - हे समर्था ! - तस्य - त्याच्या - अनुविहितः - सांगण्याप्रमाणे चाललेला - अनाथाः - दुर्बल - प्रजाः - प्रजांचे - पाहि - रक्षण कर. ॥१७॥
हे युधिष्ठिरा, म्हणून संसारातील या घटना ईश्वरेच्छेच्या अधीन आहेत. त्याला अनुसरून तुम्ही या अनाथ प्रजेचे पालन करा. कारण आता तुम्हीच त्यांचे स्वामी आणि पालन करण्यास समर्थ आहात. (१७)


एष वै भगवान् साक्षात् आद्यो नारायणः पुमान् ।
मोहयन् मायया लोकं गूढश्चरति वृष्णिषु ॥ १८ ॥
साक्षात्‌ श्रीकृष्ण भगवान्‌ आदी नी पुरुषोत्तम ।
यदुकुळी लपोनीया मायेने घडवी लिला ॥ १८ ॥

एषः - हा - वै - तर - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - साक्षात् - प्रत्यक्ष - आदयः - श्रेष्ठ - नारायणः - जलशायी - पुमान् - परमेश्वर - मायया - मायेने - लोकं - लोकाला - मोहयन् - मोह उत्पन्न करणारा - वृष्णिषु - यादवात - गूढः - गुप्तरीतीने - चरति - वावरतो. ॥१८॥
हे भगवान श्रीकृष्ण साक्षात आदिपुरुष नारायण आहेत. आपल्या मायेने लोकांना मोहित करीत यदुवंशामध्ये गुप्तरूपाने हे लीला करीत आहेत. (१८)


अस्यानुभावं भगवान् वेद गुह्यतमं शिवः ।
देवर्षिर्नारदः साक्षात् भगवान् कपिलो नृप ॥ १९ ॥
प्रभाव थोर हा त्याचा जाणी पा रे युधिष्ठिरा ।
जाणिले त्यासि या सर्वे कपिले नारदे शिवे ॥ १९ ॥

नृप - हे राजा ! - भगवान् - षड्‍गुणैश्वर्यसंपन्न - शिवः - शंकर - देवर्षिः - देवर्षि - नारदः - नारद - साक्षात् - प्रत्यक्ष - भगवान् - षड्‍गुणैश्वर्यसंपन्न - कपिलः - कपिलमहामुनि - गुह्यतमं - अत्यंत गुप्त - अस्य - ह्याच्या - अनुभावं - पराक्रमाला - वेद - जाणतो. ॥१९॥
यांचा अत्यंत गूढ प्रभाव भगवान शंकर, देवर्षी नारद आणि स्वतः भगवान कपिल हेच जाणतात. (१९)


यं मन्यसे मातुलेयं प्रियं मित्रं सुहृत्तमम् ।
अकरोः सचिवं दूतं सौहृदादथ सारथिम् ॥ २० ॥
मामेभाऊ तुला मानी मित्र नी हित चिंतितो ।
सारथी दूत मंत्री तो जाहला देव भक्तिने ॥ २० ॥

यं - ज्याला - मातुलेयं - मामेभाऊ - प्रियं - आवडता - मित्रं - मित्र - सुहृत्तमम् - साधुश्रेष्ठ - मन्यसे - मानतोस - अथ - त्याचप्रमाणे - सौहृदात् - प्रेमाने - सचिवं - प्रधान - दूतं - चाकर - सारथिं - सारथि - अकरोः - केलेस. ॥२०॥
ज्याला तुम्ही आपला मामेभाऊ, प्रिय मित्र, सर्वांत श्रेष्ठ असा हितकर्ता मानता, तसेच प्रेमाने ज्याला तुझी आपला मंत्री, दूत एवढेच काय सारथी बनवितानाही संकोच केला नाही, ते श्रीकृष्ण स्वतः परमात्मा आहेत. (२०)


सर्वात्मनः समदृशो ह्यद्वयस्यानहङ्कृतेः ।
तत्कृतं मतिवैषम्यं निरवद्यस्य न क्वचित् ॥ २१ ॥
सर्वात्मा नी समदर्शी अद्वैती निरहंकर ।
निष्पाप परमात्म्याला भेद ना उच्च नीच हा ॥ २१ ॥

सर्वात्मनः - सर्वव्यापी - समदृशः - समदृष्टी - अव्दयस्य - व्दैतभावनारहित - अनहङ्‌कृतेः - अहंकाररहित - निरवदयस्य - दोषरहित अशाच्या - तत्कृतं - त्यामुळे केलेला - मतिवैषम्यं - बुद्धीचा विरुद्धपणा - हि - खरोखर - क्वचित् - कोठेच - न - नाही. ॥२१॥
हा सर्वात्मा, समदर्शी, अद्वितीय, अहंकाररहित आणि निष्पाप असून उच्च-नीच कारणांमुळे कधी कोणात भेद-भाव करीत नाही. (२१)


तथाप्येकान्तभक्तेषु पश्य भूपानुकम्पितम् ।
यत् मे असून् त्यजतः साक्षात् कृष्णो दर्शनमागतः ॥ २२ ॥
असुनी समदृष्टी तो पहा ना भक्त जो तया ।
वर्षितो किति तो प्रेम भेटला मज अंति तो ॥ २२ ॥

भूप - हे राजा - तथा - तरी - अपि - सुद्धा - एकान्तभक्तेषु - एकाच परमेश्वराची निश्र्चयपूर्वक अत्यंत भक्ती करणार्‍यावरील - अनुकम्पितं - दयाळूपणाला - पश्य - पहा - यत् - कारण - साक्षात् - प्रत्यक्ष - कृष्णः - श्रीकृष्ण - असून् - प्राणांना - त्यजतः - सोडणार्‍या - मे - माझ्या - दर्शनं - दृष्टीस - आगतः - पडला. ॥२२॥
हे युधिष्ठिरा, पहा ना ! अशाप्रकारे समदृष्टी असूनही, ते आपल्या अनन्यप्रेमी भक्तांवर किती कृपा करतात ! आणि केवळ याच कारणास्तव माझ्या प्राणत्यागाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी मला साक्षात दर्शन दिले. (२२)


भक्त्यावेश्य मनो यस्मिन् वाचा यन्नाम कीर्तयन् ।
त्यजन् कलेवरं योगी मुच्यते कामकर्मभिः ॥ २३ ॥
भक्तियोगी भक्तिभावे शेवटी जाणिती तया ।
त्यागिती कीर्ति गाताना त्यागी ते कर्मबंधने ॥ २३ ॥

यस्मिन् - ज्याचे ठिकाणी - मनः - अंतःकरण - भक्त्या - भक्तीने - आवेश्य - ठेवून - वाचा - वाणीने - यन्नाम - ज्याचे नाम - कीर्तयन् - वर्णन करणारा - योगी - योगी - कलेवरं - शरीराला - त्यजन् - सोडणारा असा होत्साता - कामकर्मभिः - काम्यकर्मापासून - मुच्यते - मुक्त होतो. ॥२३॥
योगी पुरुष भक्तिभावाने श्रीकृष्णात आपले मन गुंतवून आणि वाणीने यांच्या नामाचे कीर्तन करीत शरीराचा त्याग करतात. त्यामुळे ते कामना आणि कर्म बंधनातून मुक्त होतात. (२३)


(वंशस्थ)
स देवदेवो भगवान् प्रतीक्षतां
     कलेवरं यावदिदं हिनोम्यहम् ।
प्रसन्नहासारुणलोचनोल्लसन्
     मुखाम्बुजो ध्यानपथश्चतुर्भुजः ॥ २४ ॥
(इंद्रवज्रा)
प्रसन्न हास्या अरुणस्वनेत्रा
    राहो चतुर्भूज असेचि ध्यान ।
ध्यानीच लाभे तव रुप लोका
    राही असा मी तनु त्यागिताना ॥ २४ ॥

सः - तो - देवदेवः - देवांचा देव - प्रसन्नहासारुणलोचनोल्लसन्मुखाम्बुजः - शांत अशा हास्याने व आरक्तवर्ण अशा नेत्रांनी शोभणारे आहे मुखकमल ज्याचे असा - ध्यानपथः - ध्यानमार्गाने जाणला जाणारा - चतुर्भुजः - चार आहेत बाहु ज्यास असा - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण - यावत् - जोपर्यंत - अहं - मी - इदं - ह्या - कलेवरं - शरीराला - हिनोमि - टाकतो - प्रतीक्षतां - पाहो ! ॥२४॥
प्रसन्न हास्य आणि रक्तकमलाप्रमाणे अरुण नेत्र असणारे ज्यांचे मुखकमल आहे, ज्यांचे लोकांना केवळ ध्यानात दर्शन होते, ते चतुर्भुज देवेश्वर भगवान श्रीकृष्ण मी प्राणत्याग करीपर्यंत येथेच राहावेत. (२४)


सूत उवाच ।
(अनुष्टुप्)
युधिष्ठिरः तत् आकर्ण्य शयानं शरपञ्जरे ।
अपृच्छत् विविधान् धर्मान् ऋषीणां चानुश्रृण्वताम् ॥ २५ ॥
सूतजी म्हणतात -
(अनुष्टुप्‌)
ऐकोनी गोष्टि या सार्‍या धर्माचे ते रहस्य जे ।
पुसिल्या ऋषिच्या साक्षी प्रपित्यासी युधिष्ठिरे ॥ २५ ॥

युधिष्ठिरः - धर्मराज - तत् - ते - आकर्ण्य - ऐकून - च - आणि - अनुशृण्वतां - ऐकण्यास तयार असलेल्या - ऋषीणां - ऋषींच्या समक्ष - शरपञ्जरे - बाणांच्या पिंजर्‍यात - शयानं - निजलेला - विविधान् - अनेक प्रकारच्या - धर्मान् - धर्मांना - अपृच्छत् - विचारिता झाला. ॥२५॥
सूत म्हणाले - शरशय्येवर पडलेल्या भीष्मपितामहांचे हे बोलणे ऐकून अनेक ऋषींच्या समोरच युधिष्ठिराने त्यांना नानाप्रकारच्या धर्मांसंबंधी विचारले. (२५)


पुरुषस्वभावविहितान् यथावर्णं यथाश्रमम् ।
वैराग्यराग उपाधिभ्यां आम्नात उभयलक्षणान् ॥ २६ ॥
दानधर्मान् राजधर्मान् मोक्षधर्मान् विभागशः ।
स्त्रीधर्मान् भगवत् धर्मान् समास व्यास योगतः ॥ २७ ॥
धर्मार्थकाममोक्षांश्च सहोपायान् यथा मुने ।
नानाख्यान इतिहासेषु वर्णयामास तत्त्ववित् ॥ २८ ॥
वर्णाश्रमानु सारेची पुरुषीधर्म राग तो ।
वैराग्य कारणी भित्र रूप भीष्मे कथीयले ॥ २६ ॥
प्रवृत्ती निवृत्ती रूप द्विविधा दान धर्म नी ।
मोक्ष स्त्री राजधर्माचे, भगवद्‌धर्म मोक्ष हा ॥ २७ ॥
विस्तारे संक्षिपे त्यांनी वेगळे रूप बोधिले ।
धर्मार्थ काम मोक्षाच्या प्राप्तीची युक्त साधने ।
इतिहास तसा सारा त्यांनी भागूनि वर्णिला ॥ २८ ॥

पुरुषस्वभावविहितान् - मनुष्यस्वभावाला अनुसरून सांगितलेल्या - यथावर्णं - चारहि वर्णांना धरून - यथाश्रमं - व आश्रमांना अनुसरून अशा - वैराग्यरागोपाधिभ्यां - विषयांवर अप्रीती व विषयलालसा ह्या दोन्ही उपाधींनी - आम्नातोभयलक्षणान् - दोन्ही लक्षणांनी शास्त्रात सांगितलेल्या प्रकारच्या ॥२६॥
विभागशः - निरनिराळे भाग पाडून - समासव्यासयोगतः - संक्षेपाने व विस्तृत रीतीने - दानधर्मान् - दानधर्म - राजधर्मान् - राजधर्म - मोक्षधर्मान् - मोक्षधर्म - स्त्रीधर्मान् - स्त्रीधर्म - भगवद्धर्मान् - वैष्णवधर्म ॥२७॥
- मुने - शौनक हो ! - च - आणि - तत्त्ववित् - ज्ञानी - नानाख्यानेतिहासेषु - अनेक चरित्रे व कथा ह्यातून - सहोपायान् - उपायांसह - धर्मार्थकाममोक्षान् - धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्यांना - यथा - जसे सांगावयाचे तसे - वर्णयामास - सांगता झाला. ॥२८॥
तेव्हा तत्ववेत्त्या भीष्मपितामहांनी वर्ण आणि आश्रमानुसार असणारे पुरुषांचे स्वभावविहित धर्म वैराग्य व आसक्तिमुळे होणारी निवृत्ती आणि प्रवृत्तीरूप द्विविध धर्म, दानधर्म, राजधर्म, मोक्षधर्म, स्त्रीधर्म आणि भगवद्‍धर्म यांचे वेगवेगळे संक्षेपाने आणि विस्तारपूर्वक वर्णन केले. शौनका ! त्याचबरोबर धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ, त्यांच्या प्राप्तीची साधने, यांविषयी अनेक उपाख्याने आणि इतिहास सांगत विभागशः वर्णन केले. (२६-२८)


धर्मं प्रवदतस्तस्य स कालः प्रत्युपस्थितः ।
यो योगिनः छन्दमृत्योः वाञ्छितस्तु उत्तरायणः ॥ २९ ॥
धर्माची ही अशी भीष्मे वदता बोध वाक्य तै ।
लागले उत्तरायेण योगी ज्या मृत्यु इच्छिती ॥ २९ ॥

तस्य - तो - धर्मं - धर्म - प्रवदतः - सांगत असता - छन्दमृत्योः - इच्छामरणी अशा - योगिनः - योग्याच्या - वाञ्‌छितः - आवडीचा - यः - जो - उत्तरायणः - उत्तरायण - सः - तो - कालः - काल - तु - तर - प्रत्युपस्थितः - जवळ येऊन ठेपला. ॥२९॥
अशा प्रकारे भीष्मपितामह धर्म-प्रवचन करीत होते, तशात उत्तरायण सुरू झाले. इच्छामरणी योगी पुरुष याचीच इच्छा करतात. (२९)


(वंशस्थ)
तदोपसंहृत्य गिरः सहस्रणीः
     विमुक्तसङ्गं मन आदिपूरुषे ।
कृष्णे लसत्पीतपटे चतुर्भुजे
     पुरः स्थितेऽमीलित दृग् व्यधारयत् ॥ ३० ॥
(इंद्रवज्रा)
महारथ्याने स्थिर चित्त केले
    नी लाविले श्री हरिच्या रुपासी ।
पीतांबरें आणि चतुर्भुजांनी
    श्रीकृष्ण शोभे, टक पाहिला तो ॥ ३० ॥

तदा - त्यावेळी - सहस्रणीः - हजारोंचा पुढारी - गिरः - भाषण - उपसंहृत्य - बंद करून - अमीलितदृक् - डोळे उघडून पाहणारा होऊन - आदिपुरुषे - सर्वांच्या आदि असणारा पुरुष अशा - लसत्पीतपटे - शोभणारे आहे पिवळे वस्त्र ज्याचे - चतुर्भुजे - चार हात धारण केलेल्या - पुरः - पुढे - स्थिते - उभा राहिलेल्या - कृष्णे - श्रीकृष्णाचे ठिकाणी - विमुक्तसङ्गं - विषयांची आसक्ति सोडिलेल्या - मनः - मनाला - व्यधारयत् - ठेविता झाला. ॥३०॥
त्यावेळी अतिरथी भीष्मांनी मौन धारण करून अनासक्त मन सगळीकडून काढून घेऊन ते समोर असलेल्या आदिपुरुष पीतांबरधारी चतुर्भुज भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी एकाग्र केले. (३०)


विशुद्धया धारणया हताशुभः
     तदीक्षयैवाशु गतायुधश्रमः ।
निवृत्त सर्वेन्द्रिय वृत्ति विभ्रमः
     तुष्टाव जन्यं विसृजन् जनार्दनम् ॥ ३१ ॥
झाल्या व्यथा शांत तया कृपेने
    नी दूर गेले मग दोष सारे ।
इंद्रियवृत्ती अटवोनी सारी
    आरंभिली कृष्णस्तुती तयांनी ॥ ३१ ॥

विशुद्धया - अत्यंत शुद्ध अशा - धारणया - धारणा नावाच्या योगाने - हताशुभः - नष्ट झाले आहे पातक ज्याचे असा - आशु - तत्काळ - तदीक्षया - त्याच्याकडे अवलोकन केल्यामुळे - एव - च - गतायुधश्रमः - नाहीसे झाले आहेत शस्त्रास्त्रांच्या प्रहारापासून झालेले श्रम ज्यांचे असा - निवृत्तसर्वेन्द्रियवृत्तिविभ्रमः - व सर्व इन्द्रियांचे व्यापार व विषयसेवनादि विलास ज्यांचे पार नाहीसे झाले आहेत असा - जन्यं - उत्पन्न झालेल्या देहाला - विसृजन् - सोडणारा - जनार्दनं - श्रीकृष्णाला - तुष्टाव - स्तवू लागला. ॥३१॥
त्यांच्या शस्त्रप्रहारांच्या वेदना भगवंतांच्या दर्शनानेच तत्काळ नाहीशा झाल्या. तसेच भगवन्मूर्तीवर शुद्ध धारणा केल्याने सर्व अशुभही नष्ट झाले. आता शरीरत्याग करण्याच्या वेळी त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखून मोठ्या प्रेमाने भगवंतांच्या स्तुतीस सुरुवात केली. (३१)


श्रीभीष्म उवाच ।
(पुष्पिताग्रा)
इति मतिरुपकल्पिता वितृष्णा
     भगवति सात्वतपुङ्गवे विभूम्नि ।
स्वसुखमुपगते क्वचित् विहर्तुं
     प्रकृतिमुपेयुषि यद्‍भवप्रवाहः ॥ ३२ ॥
भीष्मजी म्हणाले -
(पुष्पिताग्रा)
मरण समयि बुध्दि अर्पि तुम्हा
    विमलचि जी तप साधुनी हो ।
स्वसुखी रमसि शांत नि स्थीर
    चलविशि सृष्टि हि घेवुनी रुपे ॥ ३२ ॥

इति - याप्रमाणे - वितृष्णा - निष्काम - मतिः - बुद्धि - विभूम्नि - सर्वात मोठया - स्वसुखं - स्वतःच्या सुखाला - उपगते - प्राप्त झालेल्या - यत् - ज्याकडून - भवप्रवाहः - संसारप्रवृत्ति - क्वचित् - कधीकधी - विहर्तुं - विहार करण्यासाठी - प्रकृतिं - मायेला - उपेयुषि - स्वीकारण्यार्‍या - सात्वतपुङ्‌गवे - यादवश्रेष्ठ अशा - भगवति - श्रीकृष्णाचे ठिकाणी - उपकल्पिता - योजिली आहे. ॥३२॥
भीष्म म्हणाले - माझी अत्यंत शुद्ध आणि कामनाविरहित झालेली बुद्धी मी मृत्युसमयी यदुवंशशिरोमणी अनंत भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करतो. ज्या प्रकृतीच्या द्वारे ही सृष्टीपरंपरा चालू आहे, त्या प्रकृतीचा ते सदा-सर्वदा आपल्या आनंदमय स्वरूपात राहूनही कधी लीला करण्याच्या हेतूने स्वीकार करतात. (३२)


त्रिभुवनकमनं तमालवर्णं
     रविकरगौरवराम्बरं दधाने ।
वपुरलककुलावृत आननाब्जं
     विजयसखे रतिरस्तु मेऽनवद्या ॥ ३३ ॥
त्रिभुवन मन मोहि श्यामवर्ण
    रविकर‌अंबर शोभतसे कटीसी ।
मुखकमलि कुरुळकेश शोभा
    विजयसख्या प्रित हो तुझ्याशी ॥ ३३ ॥

मे - माझी - अनवदया - स्तुत्य - रतिः - प्रीती - त्रिभुवनकमनं - त्रैलोक्यसुंदर - तमालवर्णं - व तमालपत्रासारखे कृष्णवर्णाचे - रविकरगौरवराम्बरं - आणि सूर्यकिरणाप्रमाणे तेजस्वी श्रेष्ठ वस्त्र धारण करणारे - अलककुलावृताननाब्जं - कुरळ केशकलापांनी वेढिले आहे मुखकमल ज्याचे असे - वपुः - शरीर - दधाने - धारण करणार्‍या - विजयसखे - अर्जुनाचा मित्र अशाचे ठिकाणी - अस्तु - असो.॥३३॥
ज्यांचे शरीर त्रिभुवनात सुंदर, तसेच तमालवृक्षाप्रमाणे सावळ्या वर्णाचे आहे, ज्यावर सूर्यकिरणांसमान श्रेष्ठ पीतांबर झळकत आहे, ज्यांच्या कमलमुखावर कुरळे केस भुरभुर उडत आहेत, त्या अर्जुनसखा श्रीकृष्णांवर माझे निष्काम प्रेम असो. (३३)


युधि तुरगरजो विधूम्र विष्वक्
     कचलुलितश्रमवारि अलङ्कृतास्ये ।
मम निशितशरैर्विभिद्यमान
     त्वचि विलसत्कवचेऽस्तु कृष्ण आत्मा ॥ ३४ ॥
समर मनि स्मरे तुझीच मूर्ती
    तुरगरजो कुरळ्याच केशी ।
मम शर तुजसी करीत वेध
    मन तनु हो हरि रे समर्पणी तुझ्या ॥ ३४ ॥

आत्मा - आत्मा - युधि - युद्धात - तुरगरजोविधूम्रविष्वक् - घोडयांचे खुरांनी उडालेल्या धुळीने मळलेल्या - कचलुलितश्रमवार्यलंकृतास्ये - व सर्वत्र उडणार्‍या केशांनी अडविलेल्या श्रमजन्य घामाच्या प्रवाहाने शोभणारे आहे मुख अशा - मम - माझ्या - निशिशतरैः - तीक्ष्ण बाणांनी - विभिदयमानत्वचि - विदीर्ण झाली आहे त्वचा ज्याची अशा - विलसत्कवचे - तेजस्वी चिलखत धारण करणार्‍या - कृष्णे - श्रीकृष्णावर - अस्तु - असो. ॥३४॥
युद्धाच्या वेळी ज्यांच्या चेहर्‍यावर भुरभुर उडणारे कुरळे केस घोड्यांच्या टापांच्या धुळीने माखले होते आणि घर्मबिंदु त्यावर शोभत होते. मी माझ्या तीक्ष्ण बाणांनी ज्यांच्या अंगावर प्रहार करीत होतो, त्या सुंदर कवचधारी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी माझे मन रममाण होवो. (३४)


सपदि सखिवचो निशम्य मध्ये
     निजपरयोर्बलयो रथं निवेश्य ।
स्थितवति परसैनिकायुरक्ष्णा
     हृतवति पार्थसखे रतिर्ममास्तु ॥ ३५ ॥
परिसुनि मत अर्जुनी स्वये तू
    द्वय कट भागि रथास नेशी ।
बघुनि सकल शत्रु आयु हरी
    ममप्रित पार्थसख्यात त्या हो ॥ ३५ ॥

मम - माझी - रतिः - प्रीति - सखिवचः - मित्राचे भाषण - निशम्य - ऐकून - सपदि - तत्काळ - निजपरयोः - स्वतःच्या व दुसर्‍याच्या - बलयोः - सैन्यांच्या - मध्ये - मध्ये - रथं - रथाला - निवेश्य - उभा करून - स्थितवति - उभा राहिलेल्या - अक्ष्णा - व डोळ्याने - परसैनिकायुः - शत्रूंच्या सैन्याचे आयुष्य - हृतवति - हरण करणार्‍या - पार्थसखे - अर्जुनाच्या मित्राचे ठिकाणी - अस्तु - असो. ॥३५॥
आपला मित्र अर्जुन याच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी ताबडतोब पांडव-सेना आणि कौरव-सेनेच्या मध्ये आपला रथ आणला आणि तेथे थांबून ज्यांनी आपल्या केवळ दृष्टीने शत्रुपक्षाच्या सैनिकांचे आयुष्य हिरावून घेतले, त्या पार्थसखा भगवान श्रीकृष्णांवर माझे परम प्रेम निर्माण होवो. (३५)


व्यवहित पृतनामुखं निरीक्ष्य
     स्वजनवधात् विमुखस्य दोषबुद्ध्या ।
कुमतिम अहरत् आत्मविद्यया यः
     चश्चरणरतिः परमस्य तस्य मेऽस्तु ॥ ३६ ॥
बघुनि सकल पार्थ शत्रु सेना
    विमुख वधा समजोनि पाप ।
निरसिशि कुमती वदोनि गीता
    ममप्रित पार्थसख्यात त्या हो ॥ ३६ ॥

यः - जो - व्यवहितपृतनामुखं - आच्छादिलेल्या सेनामुखाला - निरीक्ष्य - पाहून - दोषबुद्‌ध्या - दोषबुद्धीने - स्वजनवधात् - भाऊबंदाच्या मृत्यूपासून - विमुखस्य - पराङ्‌मुख अशाच्या - कुमतिं - अज्ञानी बुद्धीला - आत्मविदयया - आत्मज्ञानाने - अहरत् - दूर करिता झाला. - तस्य - त्या - परमस्य - परमेश्वराच्या - चरणरतिः - पायांवर प्रेम - मे - माझे - अस्तु - असो.॥३६॥
अर्जुनाने जेव्हा लांबूनच कौरवांच्या सैन्यांतील प्रमुख अशा आम्हांला पाहिले, तेव्हा स्वजनांचा वध हे पाप समजून तो युद्धापासून परावृत्त झाला. त्यावेळी ज्यांनी गीतेच्या रूपाने आत्मविद्येचा उपदेश करून त्याच्या अज्ञानाचा नाश केला, त्या परम पुरुष श्रीकृष्णांच्या चरणांवर माझी प्रीति जडो. (३६)


स्वनिगममपहाय मत्प्रतिज्ञां
     ऋतमधि कर्तुमवप्लुतो रथस्थः ।
धृतरथ चरणोऽभ्ययात् चलद्‍गुः
     हरिरिव हन्तुमिभं गतोत्तरीयः ॥ ३७ ॥
मम वचन सत्य ते कराया
    स्वकरि धरोनिहि चक्र धावे ।
वसन त‌इहि स्कंधिचे पडोनी
    धरणिस कंपचि तो जहाला ॥ ३७ ॥

स्वनिगमं - आपल्या प्रतिज्ञेला - अपहाय - सोडून - मत्प्रतिज्ञां - माझ्या प्रतिज्ञेला - ऋतं - खरी - अधिकर्तुं - करण्याकरिता - रथस्थः - रथांत बसलेला असूनही - अवप्लुतः - रथाखाली उतरलेला - धृतरथचरणः - रथाचे चाक धरलेला - चलद्‌गुः - ज्याच्या चालण्याने पृथ्वीसुद्धा हलू लागली - गतोत्तरीयः - अंगवस्त्र खाली पडलेला - हरिः - सिंह - इभं - हत्ती - इव - प्रमाणे - हन्तुं - मारावयाला - अभ्ययात् - चालून आला. ॥३७॥
’श्रीकृष्णांना हातात शस्त्र घ्यावयास लावीन’, अशी मी प्रतिज्ञा केली होती. ती सत्य आणि श्रेष्ठ ठरविण्यासाठी त्यांनी आपली शस्त्र ग्रहण न करण्याची प्रतिज्ञा मोडून रथातून खाली उडी मारली आणि सिंह जसा हत्तीला मारण्यासाठी त्याच्यावर तुटून पडतो, त्याप्रमाणे रथाचे चाक घेऊन माझ्याकडे झेप घेतली. त्यावेळी ते इतक्या वेगाने पळत आले की, त्यांच्या खांद्यावरील उपरणे खाली पडले आणि त्यामुळे पृथ्वी थरथर कापू लागली. (३७)


शितविशिखहतो विशीर्णदंशः
     क्षतजपरिप्लुत आततायिनो मे ।
प्रसभं अभिससार मद्वधार्थं
     स भवतु मे भगवान् गतिर्मुकुन्दः ॥ ३८ ॥
अतिव मनि धरोनि कोप बाणे
    क्षति करि तो हि तसाचि धावे ।
धरि करि जरि अर्जुनो न थांबे
    निजजनपावक तो मला लाभो ॥ ३८ ॥

आततायिनः - हातात शस्त्रास्त्रे धरून दुसर्‍याला मारण्यास तयार झालेल्या अशा - मे - माझ्या - शितविशिखहतः - तीक्ष्ण बाणाने ताडिलेला - विशीर्णदंशः - ज्याचे कवच छिन्नभिन्न झाले आहे असा - क्षतजपरिप्लुतः - रक्ताने माखलेला - मव्दधार्थं - मला मारण्याकरिता - प्रसभं - वेगाने - अभिससार - धावत आला - सः - तो - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - मुकुन्दः - श्रीकृष्ण - मे - माझी - गतिः - गति - भवतु - असो. ॥३८॥
आततायी अशा मी तीक्ष्ण बाण मारून त्यांच्या शरीरावरील कवच तोडून टाकल्यामुळे त्यांचे शरीर, रक्तबंबाळ होऊ लागले होते, अशा स्थितीत ते मोठ्या वेगाने मला मारण्यासाठी माझ्यकडे येत होते. असे भगवान श्रीकृष्णच माझे एकमात्र आश्रय असोत. (३८)


विजयरथकुटुम्ब आत्ततोत्रे
     धृतहयरश्मिनि तत् श्रियेक्षणीये ।
भगवति रतिरस्तु मे मुमूर्षोः
     यमिह निरीक्ष्य हता गताः स्वरूपम् ॥ ३९ ॥
विजय रथि बसोनि तो लगामा
    धरिहि प्रतोद करात तेंव्हा ।
द्वय बसता विलसेचि शोभा
    विजय पराक्रमि दोन्हिही पावे ॥ ३९ ॥

विजयरथकुटुम्बे - अर्जुनरथच ज्याचे कुटुंब अशा - आत्ततोत्रे - हातात चाबूक घेतलेल्या - धृतहयरश्मिनि - ज्याने हातात घोडयांचे लगाम धरले आहेत अशा - तच्छ्रिया - त्याच्या शोभेने - ईक्षणीये - शोभणार्‍या - भगवति - श्रीकृष्णाचे ठिकाणी - मुमूर्षोः - मरण्यास तयार झालेल्या - मे - माझी - रतिः - प्रीति - अस्तु - असो. - यं - ज्याला - निरीक्ष्य - पाहून - इह - येथे - हताः - मेलेले - सरूपं - सारखेपणाला - गताः - गेले. ॥३९॥
अर्जुनाच्या रथाचे रक्षण करण्यासाठी डाव्या हातात घोड्यांचा लगाम आणि उजव्या हातात चाबूक घेतल्यामुळे सुंदर दिसणार्‍या भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मरणासन्न असलेल्या माझी परम प्रीति निर्माण होवो. युद्धात मरणारे वीर याच रूपाचे दर्शन करीत राहिल्या कारणाने सारूप्य मोक्षाला प्राप्त झाले. (३९)


ललित गति विलास वल्गुहास
     प्रणय निरीक्षण कल्पितोरुमानाः ।
कृतमनुकृतवत्य उन्मदान्धाः
     प्रकृतिमगन् किल यस्य गोपवध्वः ॥ ४० ॥
ललित गति जयाचि गोपिका त्या
    नच दिसता अनुचर्य केल्या ।
मिसळुनि मदप्रेमि मत्त तैशा
    मज मरणी हरिप्रीत लाभो ॥ ४० ॥

ललितगतिविलासवल्गुहास - सुंदर चालणे, क्रीडा, मधुर व मंद हास्य - प्रणयनिरीक्षणकल्पितोरुमानाः - आणि प्रेमाने पाहणे ह्यायोगे ज्यांना तू मोठा मान देत होतास अशा - यस्य - ज्याच्या - कृतं - तुझ्या कृत्यांना - अनुकृतवत्यः - अनुकरण करणार्‍या - उन्मदान्धाः - आणि गर्वाने अंध झालेल्या - गोपवध्वः - गोपी - प्रकृतिं - स्वरूपाला - किल - खरोखर - अगन् - प्राप्त झाल्या. ॥४०॥
ज्यांची हावभावयुक्त सुंदर चाल आणि क्रीडा, मधुर हास्य, प्रेमपूर्ण दृष्टी यांमुळे अत्यंत सन्मानित झालेल्या गोपी, रासलीलेत जेव्हा ते श्रीकृष्ण अंतर्धान पावले, तेव्हा प्रेमोन्मादाने धुंद होऊन, ज्यांच्या लीलांचे अनुकरण करून तन्मय होऊन गेल्या, त्या भगवान श्रीकृष्णांवर माझे परम प्रेम राहो. (४०)


मुनिगण नृपवर्यसङ्कुलेऽन्तः
     सदसि युधिष्ठिर राजसूय एषाम् ।
अर्हणं उपपेद ईक्षणीयो
     मम दृशिगोचर एष आविरात्मा ॥ ४१ ॥
मुनि नृपहि सभेत राजसूया
    नि मम समक्षचि पूजिला जो ।
मरण समयी अजि तोचि आला
    सकल जनास जीवास आत्मा ॥ ४१ ॥

मुनिगणनृपवर्यसङ्‌कुले - ऋषिसमूह व श्रेष्ठ राजे लोक ह्यांनी व्यापिलेल्या - युधिष्ठिरराजसूये - धर्मराजाच्या राजसूययज्ञात - अन्तःसदसि - सभेमध्ये - ईक्षणीयः - दर्शनाला योग्य असा - एषः - हा - एषां - ह्यांच्या - अर्हणां - पूजेला - उपपदे - प्राप्त झाला. - आत्मा - सर्वव्यापी श्रीकृष्ण - मम - माझ्या - दृशिगोचरः - दृष्टीसमोर - आविः - प्रगट झाला. ॥४१॥
युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी मुनी आणि मोठमोठे राजे लोक उपस्थित असलेल्या सभेत, ज्या दर्शनीय भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा झाली होती, ते सर्वांचे आत्मा असलेले प्रभू माझ्यासमोर उभे आहेत. (४१)


तमिममहमजं शरीरभाजां
     हृदि हृदि धिष्ठितमात्म कल्पितानाम् ।
प्रतिदृशमिव नैकधार्कमेकं
     समधिगतोऽस्मि विधूत भेदमोहः ॥ ४२ ॥
जरि रवि नभि एक नेत्रि कैक
    दिसत बहूरुपि तैचि हा ही ।
सकल जनि विराजतोय तोची
    भ्रम निरसोनि मलाहि धाला ॥ ४२ ॥

विधूतभेदमोहः - भेदबुद्धी व मोह नाहीसा झालेला - अहं - मी - आत्मकल्पितानां - आत्म्याने निर्माण केलेल्या - शरीरभाजां - प्राणिमात्रांच्या - हृदिहृदि - प्रत्येक हृदयात - धिष्ठितं - राहिलेल्या - एकं - एकरूप अशा - प्रतिदृशं - व प्रत्येकाच्या दृष्टीला - अर्कं - सूर्य - इव - प्रमाणे - नैकधा - पुष्कळ प्रकारे भासणार्‍या - अजं - जन्मरहित अशा - तं - त्या - इमं - ह्याला - समधिगतः - प्राप्त झालेला - अस्मि - आहे. ॥४२॥
जसा एकच सूर्य, अनेकांच्या नेत्रांना अनेक रूपांमध्ये दिसतो, तसेच स्वतःच निर्माण केलेल्या अनेक प्राण्यांच्या हृदयांत ते अनेक रूपांनी भासतात. वास्तविक ते एकच आहेत. त्या भगवान श्रीकृष्णांना मी भेद-भ्रमाने रहित होऊन प्राप्त झालो आहे. (४२)


सूत उवाच ।
(अनुष्टुप्)
कृष्ण एवं भगवति मनोवाक् दृष्टिवृत्तिभिः ।
आत्मनि आत्मानमावेश्य सोऽन्तःश्वास उपारमत् ॥ ४३ ॥
सूतजी सांगतात -
(अनुष्टूप्‌)
असे भीष्मे मने वाचे दृष्टिने आत्मरुपि त्या ।
विलीन होऊनी कृष्णीं निवांत प्राण सोडिला ॥ ४३ ॥

सः - तो - एवं - याप्रमाणे - भगवति - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - आत्मनि - आत्मरूप - कृष्णे - श्रीकृष्णाचे ठिकाणी - मनोवाग्दृष्टिवृत्तिभिः - मनाच्या, वाणीच्या व अवलोकनाच्या क्रियांनी - आत्मानं - आत्म्याला - आवेश्य - ठेवून - अन्तःश्वासः - श्वासोच्छ्‌वासक्रिया आत रोधून घेतलेला असा - उपारमत् - विराम पावला. ॥४३॥
सूत म्हणाले - अशा प्रकारे भीष्मांनी आपले मन, वाणी आणि दृष्टी यांच्या वृत्तींनी आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्णांमध्ये स्वतःला लीन करून घेतले. त्यांचे प्राण तेथेच विलीन झाले व ते शांत झाले. (४३)


सम्पद्यमानमाज्ञाय भीष्मं ब्रह्मणि निष्कले ।
सर्वे बभूवुस्ते तूष्णीं वयांसीव दिनात्यये ॥ ४४ ॥
विलीन पाहता आत्मा अनंतात तदा पहा ।
सगळे जाहले शांत अस्तानंतर पक्षि जै ॥ ४४ ॥

निष्कले - उपाधिरहित अशा - ब्रह्मणि - ब्रह्मामध्ये - संपदयमानं - प्राप्त होणार्‍या - भीष्मं - भीष्माला - आज्ञाय - जाणून - ते - ते - सर्वे - सगळे - दिनात्यये - संध्याकाळी - वयांसि - पक्षी - इव - याप्रमाणे - तूष्णीं - शांत - बभूवुः - झाले. ॥४४॥
त्यांना अनंत ब्रह्मात लीन झाल्याचे पाहून दिवस मावळल्यावर पक्ष्यांचा कलकलाट थांबतो, त्याप्रमाणे सर्वजण स्तब्ध झाले. (४४)


तत्र दुन्दुभयो नेदुः देवमानव वादिताः ।
शशंसुः साधवो राज्ञां खात्पेतुः पुष्पवृष्टयः ॥ ४५ ॥
देवता मानवांनी तै केला दुंदुभिचा ध्वनी ।
नृपांनी वाहवा केली पुष्पवृष्टीहि जाहली ॥ ४५ ॥

तत्र - तेथे - देवमानववादिताः - देवांनी व मनुष्यांनी वाजवलेल्या - दुंदुभयः - दुंदुभि - नेदुः - वाजू लागल्या - राज्ञां - राजांमध्ये - साधवः - सज्जन - शशंसुः - स्तुति करू लागले - पुष्पवृष्टया - फुलांचे वर्षाव - खात् - आकाशांतून - पेतुः - पडले. ॥४५॥
त्यावेळी देवता आणि मनुष्ये नगारे वाजवू लागले. साधुस्वभावाचे राजे त्यांची प्रशंसा करू लागले आणि आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. (४५)


तस्य निर्हरणादीनि सम्परेतस्य भार्गव ।
युधिष्ठिरः कारयित्वा मुहूर्तं दुःखितोऽभवत् ॥ ४६ ॥
युधिष्ठिरे दशक्रिशा शवाची केलि शौनका ।
कांही क्षण तये केला शोक तेंव्हा मनातची ॥ ४६ ॥

भार्गव - अहो शौनक हो ! - युधिष्ठिरः - धर्मराज - संपरेतस्य - परलोकाला गेलेल्या - तस्य - त्याची - निर्हरणादीनि - और्ध्वदेहिक कृत्ये - कारयित्वा - करवून - मुहूर्तं - काही वेळ - दुःखितः - दुःखी - अभवत् - झाला. ॥४६॥
हे शौनका, युधिष्ठिरांनी त्यांची अंत्यक्रिया करविली. त्यावेळी काही वेळ ते शोकमग्न झाले. (४६)


तुष्टुवुर्मुनयो हृष्टाः कृष्णं तत् गुह्यनामभिः ।
ततस्ते कृष्णहृदयाः स्वाश्रमान्प्रययुः पुनः ॥ ४७ ॥
प्रेमाने मुनिवर्यांनी कृष्णाचे गुण गायिले ।
कृष्णमयचि होवोनी पातले आश्रमी पुन्हा ॥ ४७ ॥

हृष्टाः - आनंदित झालेले - मुनयः - ऋषि - गुह्यनामभिः - त्याच्या रहस्यमय अशा अनेक नावांनी - कृष्णं - श्रीकृष्णाला - तुष्टुवुः - स्तवू लागले. - ततः - नंतर - कृष्णहृदयाः - ज्यांचे अंतःकरण श्रीकृष्णाचे ठिकाणी लीन झाले आहे असे - ते - ते - पुनः - पुन्हा - स्वाश्रमान् - आपापल्या आश्रमांना - प्रययुः - प्राप्त झाले. ॥४७॥
त्यावेळी मुनिवर्यांनी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची रहस्यमय नावांनी स्तुती केली आणि कृष्णमय हृदय झालेले ते आपापल्या आश्रमात परत गेले. (४७)


ततो युधिष्ठिरो गत्वा सहकृष्णो गजाह्वयम् ।
पितरं सान्त्वयामास गान्धारीं च तपस्विनीम् ॥ ४८ ॥
तदा युधिष्ठिरे कृष्णा आणिले हस्तिनापुरा ।
धृतराष्ट्र नि गांधारी यांनाही धीर तो दिला ॥ ४८ ॥

ततः - नंतर - सहकृष्णः - कृष्णासह - युधिष्ठिरः - धर्मराज - गजाह्‌वयं - हस्तिनापुराला - गत्वा - जाऊन - पितरं - बापाला - च - आणि - तपस्विनीं - तपश्चर्या करणार्‍या - गांधारीं - गांधारीला - सान्त्वयामास - समजविता झाला. ॥४८॥
तत्पश्चात भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर युधिष्ठिर हस्तिनापुरात परत आले आणि तेथे त्यांनी आपले चुलते धृतराष्ट्र आणि तपस्विनी गांधारी यांचे सांत्वन केले. (४८)


पित्रा चानुमतो राजा वासुदेवानुमोदितः ।
चकार राज्यं धर्मेण पितृपैतामहं विभुः ॥ ४९ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
प्रथमस्कन्धे युधिष्ठिरराज्यप्रलम्भो नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
श्रीकृष्ण धृतराष्ट्राची घेवोनीया अनूमती ।
रितीने वंशधर्माच्या राजा झाला युधिष्ठिर ॥ ४९ ॥
॥ इती श्रीमद्‌भागवता महापुराणी परमहंसी संहिता ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्र्लोकी मराठी रुपांतर ॥
॥ नववा अध्याय हा ॥ १ ॥ ९ ॥

च - आणि - विभुः - समर्थ असा - राजा - धर्मराज - पित्रा - बापाने - अनुमतः - संमति झालेला - वासुदेवानुमोदितः - श्रीकृष्णाने अनुमोदन दिलेला - पितृपैतामहं - बाप व आजा ह्यांपासून प्राप्त झालेले - राज्यं - राज्याला - धर्मेण - धर्माने - चकार - स्वीकारिता झाला. ॥४९॥
धृतराष्ट्राची आज्ञा आणि भगवान श्रीकृष्णांची परवानगी घेऊन समर्थ राजा युधिष्ठिराने आपल्या वंशपरंपरागत साम्राज्याचे धर्माने पालन करण्यास सुरुवात केली. (४९)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां प्रथमः स्कन्धे नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
अध्याय नववा समाप्त

GO TOP