|  | 
| 
श्रीमद् भागवत पुराण  
उत्तरागर्भे द्रौण्यस्त्रतः परीक्षितो रक्षणम्  परीक्षिताचे गर्भात रक्षण, कुंतीने केलेली भगवंतांची स्तुती आणि युधिष्ठिराचा शोक - संहिता  -  अन्वय  -  अर्थ  समश्लोकी - मराठी 
सूत उवाच । (अनुष्टुप्) अथ ते सम्परेतानां स्वानामुदकमिच्छताम् । दातुं सकृष्णा गङ्गायां पुरस्कृत्य ययुः स्त्रियः ॥। १ ॥ 
सूतजी सांगतात-  सवे कृष्णास घेवोनी मृतस्वजन तर्पणा । वदा स्त्रियांसवे गंगातिरी पांडव पातले ॥ १ ॥ 
अथ -  नंतर - सकृष्णाः -  श्रीकृष्णासह - ते -  ते पांडव - स्त्रियः -  स्त्रियांना - पुरस्कृत्य -  पुढे करून - संपरेतानां -  मेलेल्या - इच्छतां -  व इच्छिणार्या - स्वानां -  आपल्या भाऊबंदांना - उदकं -  पाणी - दातुं -  देण्याकरिता - गङ्गायां -  गंगेच्या काठी - ययुः -  गेले. ॥१॥ 
 
सूत म्हणाले - यानंतर पांडव श्रीकृष्णांच्यासह स्त्रियांना पुढे करून, मेलेल्या स्वजनांना तिलांजली देण्यासाठी गंगा तीरावर गेले. (१) 
 
ते निनीयोदकं सर्वे विलप्य च भृशं पुनः । आप्लुता हरिपादाब्जः अजःपूतसरिज्जले ॥। २ ॥ 
सर्व त्या मृतबंधुंना जलदान दिला तिथे ।  जळात करुनी स्नान भगवत्पाद वंदिले ॥ २ ॥ 
ते -  ते - सर्वे -  सगळे - उदकं -  पाणी - निनीय -  नेऊन म्हणजे देऊन - च -  आणि - पुनः -  वारंवार - भृशं -  पुष्कळ - विलप्य -  शोक करून - हरिपादाब्जरजःपूतसरिज्जले -  भगवंताच्या चरणकमलाच्या धुळीने पवित्र झालेल्या गंगोदकात - आप्लुताः -  स्नान करते झाले. ॥२॥ 
 
तेथे त्या सर्वांनी मृत बंधूंना तिलांजली दिली आणि पुन्हा विलाप केला. त्यानंतर भगवंतांच्या चरणकमलांच्या धुळीने पवित्र झालेल्या गंगाजलात पुन्हा स्नान केले. (२) 
 
तत्रासीनं कुरुपतिं धृतराष्ट्रं सहानुजम् । गान्धारीं पुत्रशोकार्तां पृथां कृष्णां च माधवः ॥। ३ ॥ सांत्वयामास मुनिभिः हतबंधून् शुचार्पितान् । भूतेषु कालस्य गतिं दर्शयन् अप्रतिक्रियाम् ॥। ४ ॥ 
तिथे बंधुसवे राजा युधिष्ठिर कुरुपती  शोकव्याकूळ गांधारी कुंती नी द्रौपदी सती । या सर्वे बसुनी केला स्वजनांसाठि शोक तो धौम्यादि ऋषि नी कृष्णे घातली समजूत तै ॥ ३ ॥ संसारी जन्मला जो तो काळाच्या आधिनी असे । मृत्यूतून कुणी कोणा वाचवू शकतो नच ॥ ४ ॥ 
माधवः -  श्रीकृष्ण - तत्र -  तेथे - आसीनं -  बसलेल्या - सहानुजं -  भावांसह - कुरुपतिं -  युधिष्ठिराला - च -  आणि - धृतराष्ट्रं -  धृतराष्ट्राला - पुत्रशोकार्तां -  पुत्रांच्या मृत्यूने दुःखी झालेल्या - गांधारीं -  गांधारीला - पृथां -  कुंतीला - कृष्णा -  द्रौपदीला ॥३॥  मुनिमिः - ऋषींसह श्रीकृष्ण - हतबन्धून् - ज्यांचे भाऊबंद मेले आहेत अशा - शुचा - व शोकाने - अर्पितान् - व्याकुल झालेल्या युधिष्ठिरादिकांना - भूतेषु - प्राणिमात्रांच्या ठिकाणी - कालस्य - कालाच्या - अप्रतिक्रियां - अपरिहार्य - गतिं - गतीला - दर्शयन् - दाखविणारा असा होत्साता - सान्त्वयामास - सांत्वन करिता झाला. ॥४॥ 
कुरुराज महाराज युधिष्ठिर, त्यांचे बंधू, धृतराष्ट, पुत्रशोकाने व्याकूळ झालेली गांधारी, कुंती आणि द्रौपदी असे सर्वजण मृत स्वजनांच्यासाठी शोक करीत होते. भगवान श्रीकृष्णांनी धौम्य मुनींसह त्यांचे सांवन करून त्यांची समजूत घातली की, संसारातील सर्व प्राणी कालाच्या अधीन आहेत. मृत्यूपासून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. (३-४) 
 
साधयित्वाजातशत्रोः स्वं राज्यं कितवैर्हृतम् । घातयित्वासतो राज्ञः कचस्पर्शक्षतायुषः ॥। ५ ॥ 
अजात शत्रु तो धर्म कृष्णाने राज्य त्या दिले ।  द्रौपदी केशस्पर्शाने जे राजे आयुक्षीण ते । मृत्यू घडविला त्यांचा दुष्ट ना राहिला कुणी ॥ ५ ॥ 
कितवैः -  कपटयांनी - हृतं -  हरण केलेल्या - अजातशत्रोः -  युधिष्ठिराच्या - स्वं -  स्वतःच्या - राज्यं -  राज्याला - साधयित्वा -  मिळवून देऊन - कचस्पर्शक्षतायुषः -  व केस धरल्याने अल्पायु झालेल्या - असतः -  आणि मिथ्यामार्गाचा अवलंब केलेल्या - राज्ञः -  राजांना - घातयित्वा -  मारवून ॥५॥ 
 
अशा प्रकारे, धूर्त बंधुंनी कपटाने हिसकावून घेतलेले राज्य, भगवान श्रीकृष्णांनी अजातशत्रू युधिष्ठिर महाराजांना त्यांचे त्यांना देऊन टाकले. तसेच द्रौपदीच्या केशसंभाराला स्पर्श केल्याने आयुष्य क्षीण झालेल्या दुष्ट राजांचा वध करविला. (५) 
 
याजयित्वाश्वमेधैस्तं त्रिभिरुत्तमकल्पकैः । तद्यशः पावनं दिक्षु शतमन्योरिवातनोत् ॥। ६ ॥ 
धर्माच्या करवी केले विधिवत् यज्ञ तीन ते ।  पवित्र यश राजाचे जाहले सर्व या जगी ॥ ६ ॥ 
उत्तमकल्पकैः -  चांगल्या रीतीच्या साधनांनी संपादलेल्या - त्रिभिः -  तीन - अश्वमेधैः -  अश्वमेधांनी - तं -  त्याला म्हणजे युधिष्ठिराला - याजयित्वा -  यज्ञ करवून - शतमन्योः -  इंद्राच्या - इव -  प्रमाणे - पावनं -  पवित्र - तदयशः -  त्याचे यश - दिक्षु -  दाही दिशांमध्ये - आतनोत् -  पसरविता झाला. ॥६॥ 
 
त्याप्रमाणे उत्तम सामग्री आणि पुरोहितांद्वारे युधिष्ठिराकडून तीन अश्वमेध यज्ञ करविले. याप्रमाणे शंभर यज्ञ करणार्या इंद्राच्या यशाप्रमाणे, युधिष्ठिराचे पवित्र यश दशदिशांत पसरविले. (६) 
 
आमंत्र्य पाण्डुपुत्रांश्च शैनेयोद्धवसंयुतः । द्वैपायनादिभिर्विप्रैः पूजितैः प्रतिपूजितः ॥। ७ ॥ गन्तुं कृतमतिर्ब्रह्मन् द्वारकां रथमास्थितः । उपलेभेऽभिधावन्तीं उत्तरां भयविह्वलाम् ॥। ८ ॥ 
श्रीकृष्ण द्वारकीं जाण्या बोललासे मनोदय ।  निरोपा पांडवा बोले व्यासादी विप्र पूजिले ॥ ७ ॥ सर्वांनी पूजिला कृष्ण उद्धवासह सात्यकी । एव्हाना उत्तरा आली भयाने विव्हळे तशी ॥ ८ ॥ 
च -  आणि - शैनेयोद्भवसंयुतः -  सात्यकि व उद्धव यांच्या सहवर्तमान - पूजितैः -  लोकांनी पुजिलेल्या - व्दैपायनादिभिः -  व्यासादि - विप्रैः -  ब्राह्मणांनी - प्रतिपूजितः -  उलट पूजिलेला श्रीकृष्ण - पांडुपुत्रान् -  पांण्डवांना - आमन्त्र्य -  विचारून म्हणजे त्यांची परत जाण्याविषयी परवानगी घेऊन. ॥७॥  ब्रह्मन् - ब्राह्मण हो ! - व्दारकां - व्दारकेला - गन्तुं - जाण्याला - कृतमतिः - विचार केला आहे ज्याने असा व - रथं - रथांत - आस्थितः - बसलेला - भयविह्वलां - भयाने व्याकुळ झालेला - अभिधावन्तीं - व धावत येणार्या - उत्तरां - उत्तरेला - उपलेभे - पाहता झाला. ॥८॥ 
तदनंतर भगवान श्रीकृष्णांनी निथून जाण्याचा विचार केला. व्यास आदी ब्राह्मणांचा सत्कार करून पांडवांचा निरोप घेतला. त्या सर्वांचीही भगवान श्रीकृष्णांचा मोठाच सत्कार केला. त्यानंतर श्रीकृष्ण, सात्यकी आणि उद्धवासह द्वारकेला जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले. त्याचवेळी त्यांनी पाहिले की, भयाने विव्हळ झालेली उत्तरा समोरून पळत येत आहे. (७-८) 
 
उत्तरोवाच  पाहि पाहि महायोगिन् देवदेव जगत्पते । नान्यं त्वदभयं पश्ये यत्र मृत्युः परस्परम् ॥ ९ ॥ 
उत्तरा म्हणाली -  रक्षि रक्षि मला देवा महायोगी जगत्पते । रक्षिता एकाला तूची प्रत्येका शत्रु तो दुजा ॥ ९ ॥ 
महायोगिन् -  हे योगिश्रेष्ठा  - देव -  हे दैदीप्यमान - देव -  देवा ! - जगत्पते -  हे जगाच्या पालका ! - पाहि पाहि -  रक्षण कर, रक्षण कर - त्वत् -  तुझ्याहून - अन्यं -  दुसर्याला - अभयं -  भयनाशक असा - न पश्ये -  पाहत नाही - यत्र -  जेथे - परस्परं -  एकमेकांत - मृत्युः -  मृत्यु. ॥९॥ 
 
उत्तरा म्हणाली - देवाधिदेवा, जगदीश्वरा, आपण महान योगी आहात. आपण माझे रक्षण करा. या लोकात मला अभय देणारा आपल्याशिवाय अन्य् कोणीही नाही. कारण इथे तर प्रत्येकजण दुसर्याच्या मृत्यूलाच कारण होत आहे. (९) 
 
अभिद्रवति मामीश शरस्तप्तायसो विभो । कामं दहतु मां नाथ मा मे गर्भो निपात्यताम् ॥ १० ॥ 
प्रभो हा तप्त लोहाचा बाण मागे पळे पहा ।  मारिता मज मारावे गर्भ नष्ट न हो प्रभो ॥ १० ॥ 
विभो -  हे सर्वव्यापी - ईश -  परमेश्वरा ! - तप्तायसः -  तापलेले आहे अग्र ज्याचे असा - शरः -  बाण - मां -  माझ्याकडे - अभिद्रवति -  धावत येत आहे - नाथ -  हे स्वामी श्रीकृष्णा ! - मां -  मला - कामं -  पुष्कळ - दहतु -  जाळो - मे -  माझा - गर्भः -  गर्भ - मा निपात्यताम् -  पाडला न जावो. ॥१०॥ 
 
हे प्रभो, आपण सर्वशक्तिमान आहात. तप्त असलेला हा लोखंडी बाण माझ्याकडेच येत आहे. स्वामी, हा माझे खुशाल भस्म करो, परंतु याने माझ्या गर्भाला धक्का पोहोचवू नये (१०) 
 
सूत उवाच । उपधार्य वचस्तस्या भगवान् भक्तवत्सलः । अपाण्डवमिदं कर्तुं द्रौणेरस्त्रमबुध्यत ॥ ११ ॥ 
सूतजी सांगतात-  ऐकता कळले त्याला भक्तवत्सल तो प्रभू । नाशार्थ पांडुवंशाच्या द्रोणपुत्रचि योजि हे ॥ ११ ॥ 
भक्तवत्सलः -  भक्तांवर प्रेम करणारा - भगवान् -  षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण - तस्याः -  तिचे म्हणजे त्या उत्तरेचे - वचः -  भाषण - उपधार्य -  ऐकून - इदं -  हे - अपाण्डवं -  पाण्डवरहित - कर्तुं -  करण्याकरिता - द्रौणेः -  द्रोणाचार्यांचा पुत्र जो अश्वत्थामा त्याचे - अस्त्रं -  अस्त्र असे - अबुद्ध्यत -  जाणता झाला. ॥११॥ 
 
सूत म्हणाले - तिचे करुणावचन ऐकताच भक्तवत्सल भगवान समजून चुकले की, अश्वत्थाम्यानेच पांडवांचा वंश नाहीसा करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आहे. (११) 
 
तर्ह्येवाथ मुनिश्रेष्ठ पाण्डवाः पञ्च सायकान् । आत्मनोऽभिमुखान् दीप्तान् आलक्ष्यास्त्राण्युपाददुः ॥ १२ ॥ 
पाहिले पांडवांनीही पाच ते शर आपणा ।  विंधिण्या पातले तेव्हा तयांनी शस्त्र योजिले ॥ १२ ॥ 
मुनिश्रेष्ठ -  हे ऋषिश्रेष्ठा ! - अथ -  नंतर - तर्हि -  त्यावेळी - एव -  च - पाण्डवाः -  पांडव - आत्मनः -  स्वतःच्या - अभिमुखान् -  समोर येणार्या - दीप्तान् -  प्रज्वलित झालेल्या - पञ्च -  पाच - सायकान् -  बाणांना - आलक्ष्य -  पाहून - अस्त्राणि -  अस्त्रे - उपाददुः -  घेते झाले. ॥१२॥ 
 
हे मुनिश्रेष्ठ, जळत असलेले पाच बाण आपल्याकडेच येत असलेले पांडवांनी त्याच वेळेस पाहिले, म्हणून त्यांनीही आपापली अस्त्रे सज्ज केली. (१२) 
 
व्यसनं वीक्ष्य तत्तेषां अनन्यविषयात्मनाम् । सुदर्शनेन स्वास्त्रेण स्वानां रक्षां व्यधाद्विभुः ॥ १३ ॥ 
शरणागत भक्तांचे कृष्णे संकट पाहिले । सुदर्शन तदा त्याने सोडिले रक्षणार्थ ते ॥ १३ ॥ 
विभुः -  सर्वव्यापी श्रीकृष्ण - अनन्यविषयात्मनां -  दुसरी कोणाचीही भक्ती न करणार्या - तेषां -  ज्यांचे म्हणजे त्या पांडवांचे - तत् -  ते - व्यसनं -  दुःख - वीक्ष्य -  पाहून - सुदर्शनेन -  सुदर्शन नावाच्या - स्वास्त्रेण -  स्वतःच्या अस्त्राने - स्वानां -  स्वकीय अशा पांडवांचे - रक्षां -  रक्षण - व्यधात् -  करिता झाला.॥१३॥ 
 
सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अनन्य प्रेमी भक्तांवर संकट आलेले पाहून, आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचे रक्षण केले. (१३) 
 
अन्तःस्थः सर्वभूतानां आत्मा योगेश्वरो हरिः । स्वमाययाऽऽवृणोद्गर्भं वैराट्याः कुरुतन्तवे ॥ १४ ॥ 
अंतःस्थ सर्वभूतांचा आत्मा योगेश्वरो हरी ।  गर्भाला पांडुवंशाच्या माया गुंडाळिली तये ॥ १४ ॥ 
सर्वभूतानां -  सर्व प्राण्यांच्या - अन्तस्थः -  आत राहणारा - आत्मा -  व सर्वाला व्यापून राहिलेला - योगेश्वरः -  आणि योगश्रेष्ठ असा - हरिः -  श्रीकृष्ण - कुरुतन्तवे -  कौरववंशाची वाढ होण्याकरिता - स्वमायया -  स्वतःच्या मायेने - वैराटयाः -  विराट राजाची कन्या जी उत्तरा तिच्या - गर्भं -  गर्भाला - आवृणोत् -  आच्छादिता झाला. ॥१४॥ 
 
योगेश्वर श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या हृदयात आत्मरूपाने विराजमान आहेत. पांडवांची वंशपरंपरा चालू राहण्यासाठी, त्यांनी आपल्या मायेने उत्तरेचा गर्भ आच्छादित केला. (१४) 
 
यद्यप्यस्त्रं ब्रह्मशिरः त्वमोघं चाप्रतिक्रियम् । वैष्णवं तेज आसाद्य समशाम्यद् भृगूद्वह ॥ १५ ॥ 
ब्रह्मास्त्राहुनि त्या श्रेष्ठ जरी ना अस्त्र ते दुजे । तरी श्रीकृष्ण तेजाने शांत होवोनि राहिले ॥ १५ ॥ 
भृगुव्दह -  हे भृगुकुलोत्पन्न शौनका ! - यदि -  जरी - अपि -  हि - ब्रह्मशिरः -  ब्रह्मशिरोनामक - अस्त्रं -  अस्त्र - अमोघं -  फुकट न जाणारे - च -  आणि - अप्रतिक्रियम् -  ज्याचा नाश होणार नाही असे - तु -  तरीही - वैष्णवं -  विष्णूसंबंधी - तेजः -  तेजाला - आसादय -  प्राप्त होऊन - समशाम्यत् -  शांत झाले. ॥१५॥ 
 
शौनका, जरी ब्रह्मास्त्र हे अमोघ आहे आणि त्याला प्रतिकार करण्याचा कोणताच उपाय नाही, तरी भगवान श्रीकृष्णांच्या तेजासमोर आल्यावर ते शांत झाले. (१५) 
 
मा मंस्था ह्येतदाश्चर्यं सर्वाश्चर्यमयेऽच्युते । य इदं मायया देव्या सृजत्यवति हन्त्यजः ॥ १६ ॥ 
आश्चर्य नच हे त्याचे आश्चर्य तोचि की स्वता ।  अजन्मा निर्मि नी पोषि मायेने मारितो पुन्हा ॥ १६ ॥ 
हि -  खरोखर - सर्वाश्चर्यमये -  सर्व आश्चर्यांनी भरलेल्या - अच्युते -  श्रीकृष्णाचे ठिकाणी - एतत् -  ह्या - आश्चर्यं -  आश्चर्याला - मा मंस्थाः -  मानू नकोस - यः -  जो - अजः -  जन्मरहित श्रीकृष्ण - देव्या -  प्रकाशमान अशा - मायया -  मायेच्या योगे - इदं -  ह्या जगाला - सृजति -  उत्पन्न करितो - अवति -  रक्षितो - हन्ति -  व मारतो.॥१६॥ 
 
हे आश्चर्य समजण्याचे काही कारण नाही. कारण भगवान श्रीकृष्ण तर सर्व आश्चर्यांचे निधान आहेत. ते स्वतः अजन्मा असूनही आपल्या मायेच्या योगाने या विश्वाची उत्पत्ती, रक्षण आणि संहार करतात. (२६) 
 
ब्रह्मतेजोविनिर्मुक्तैः आत्मजैः सह कृष्णया । प्रयाणाभिमुखं कृष्णं इदमाह पृथा सती ॥ १७ ॥ 
कृष्ण जाण्या निघाला तै कुंती पुत्रांसवे सुना ।  घेवोनी पातली आणि कृष्णाला प्रार्थिले तिने ॥ १७ ॥ 
ब्रह्मतेजोविनिर्मुक्तैः -  ब्रह्मतेजापासून मुक्त झालेल्या - आत्मजैः -  पुत्रांशी - कृष्णया -  द्रौपदीशी - सह -  सहवर्तमान - सती -  पतिव्रता - पृथा -  कुंती - प्रयाणाभिमुखं -  व्दारकेला जाण्यास निघालेल्या - कृष्णं -  श्रीकृष्णाला - इदं -  ह्याप्रमाणे - आह -  बोलली. ॥१७॥ 
 
जेव्हा भगवान श्रीकृष्ण जाण्यासाठी निघाले, तेव्हा ब्रह्मास्त्राच्या ज्वालांतून मुक्त झालेल्या आपल्या पुत्र आणि द्रौपदीसह सती कुंतीने याप्रकारे स्तुती केली (१७) 
 
कुन्त्युवाच । नमस्ये पुरुषं त्वाऽऽद्यं ईश्वरं प्रकृतेः परम् । अलक्ष्यं सर्वभूतानां अन्तर्बहिरवस्थितम् ॥ १८ ॥ 
कुंती म्हणाली-  नमस्ते आदि पुरुषा पराप्रकृति ईश्वरा । जीवां बाहेर तू आत परी ना दिसशी तया ॥ १८ ॥ 
पुरुषं -  सर्वांच्या शरीरात आत्मरूपाने राहणार्या - आदयं -  सर्वांहून श्रेष्ठ व सर्वांच्या आदि असणार्या - ईश्वरं -  सर्व जगाचा स्वामी व ऐश्वर्यवान अशा - प्रकृतेः -  मायेहून - परं -  निराळ्या - अलक्ष्यं -  कोणाच्याही दृष्टीस न पडणार्या - सर्वभूतानां -  सर्व प्राण्यांच्या - अन्तः -  आत - बहिः -  बाहेर - अवस्थितम् -  राहिलेल्या - त्वा -  तुला - नमस्ये -  नमस्कार करिते. ॥१८॥ 
 
कुंती म्हणाली - आपण सर्व जीवांच्या बाहेर आणि आत राहात आहात; तरीसुद्धा आपण प्रकृतीच्या पलीकडील आदिपुरुष परमेश्वर असल्याने इंद्रिये आणि वृत्ती यांने पाहिले जाऊ शकत नाही. मी आपणांस नमस्कार करते. (१८) 
 
मायाजवनिकाच्छन्नं अज्ञाधोक्षजमव्ययम् । न लक्ष्यसे मूढदृशा नटो नाट्यधरो यथा ॥ १९ ॥ 
मायेच्या राहशी आड गमसी तूचि इंद्रिया  मूढ स्त्री मी कशी जाणू तू थोर पुरुषोत्तम । पाहिल्या त्या नटालागी नोळखी अज्ञ तो जसा तसा तू दिसुनी आम्हा न दिसे हेचि ते खरे ॥ १९ ॥ 
अज्ञा -  अज्ञानी मी - मायाजवनिकाच्छन्नं -  मायारूपी पडदयाने आच्छादिलेल्या - अधोक्षजं -  व इंद्रियांना अगोचर अशा - अव्ययम् -  अविनाशी - यथा -  ज्याप्रमाणे - नाटयधरः -  सोंग घेणारा - नटः -  नाटकी पुरुष - मूढदृशा -  अज्ञानी लोकांच्या दृष्टीने - न लक्ष्यसे -  तू ओळखिला जात नाहीस. ॥१९॥ 
 
इंद्रियांद्वारा जे काही जाणले जाते, त्याच्या तळाशी आपण विद्यमान असता, परंतु आपल्या मायेच्या पडद्याने झाकलेले असता, मी अज्ञानी स्त्री अविनाशी पुरुषोत्तम अशा आपणांस कशी जाणूं शकेन ? नटाचा वेष धारण करण्यार्यास प्रत्यक्ष पाहूनही मंद बुद्धीचे लोक ओळखू शकत नाहीत. (१९) 
 
तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनाम् । भक्तियोगविधानार्थं कथं पश्येम हि स्त्रियः ॥ २० ॥ 
हॄदयी परमोहंसा येशी तू कीर्तनी मिसे ।  अल्पबुद्धि अशा आम्ही तुझे रूप न जाणतो ॥ २० ॥ 
स्त्रियः -  आम्ही स्त्रिया  - तथा -  त्याप्रमाणे  - परमहंसानां -  वैष्णवधर्म स्वीकारलेल्या - अमलात्मनां -  निर्मल अंतःकरणाच्या - मुनीनां -  ऋषींच्या - भक्तियोगविधानार्थं -  भक्तियोगाचे आचरण करण्याकरिता  - कथं -  कशा - पश्येमहि -  पाहू शकू. ॥२०॥  
 
तसेच आपण आम्हांस ओळखू येत नाहीत. आपण शुद्ध हृद्याच्या, विवेकी, जीवोन्मुक्त परमहंसांच्या हृदयामध्ये आपली प्रेममय भक्ती अंकुरित करण्यासाठी अवतीर्ण झालेले आहात. मग माझ्यासारखी अल्पबुद्धी स्त्री आपल्याला कशी ओळखू शकेल ? (२०) 
 
कृष्णाय वासुदेवाय देवकीनंदनाय च । नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः ॥ २१ ॥ 
श्रीकृष्णा वासुदेवाला देवकीनंदना तुला ।  नंदगोपकुमाराला गोविंदाला नमो नमः ॥ २१ ॥ 
वासुदेवाय -  वसुदेवाचा मुलगा किंवा प्रकाशरूपाने सर्वत्र राहणार्या - च -  आणि - देवकीनन्दनाय -  देवकीला आनंद देणारा पुत्र अशा - नन्दगोपकुमाराय -  व नन्द नावाच्या गवळ्याच्या घरी पुत्राप्रमाणे वर्तणार्या अशा - गोविन्दाय -  व सर्वज्ञ अशा - कृष्णाय -  आणि सर्व भक्तांची अंतःकरणे आपल्याकडे ओढुन घेणार्या श्रीकृष्णाला - नमोनमः -  वारंवार नमस्कार असो. ॥२१॥ 
 
हे श्रीकृष्णा, वासुदेवा, देवकीनंदना, नंदगोपाचे लाडके बाळ, गोविंदा, आपणांस आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. (२१) 
 
नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने । नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये ॥ २२ ॥ 
नमो पंकजनाभाला नमो कमल माळिला ।  नमो पंकज नेत्राला नमस्ते पदपंकजा ॥ २२ ॥ 
पङ्कजनाभाय -  ज्याच्या नाभीपासून म्हणजे बेंबीपासून कमळ उत्पन्न झाले अशाला - नमः -  नमस्कार असो - पङ्कजमालिने -  ज्याच्या गळ्यात कमळांची माळ आहे अशाला - नमः -  नमस्कार असो - पङ्कजनेत्राय -  कमळाप्रमाणे नेत्र आहेत ज्याचे अशाला - नमः -  नमस्कार असो - पङ्कजाङ्घ्रये -  कमळासारखे आहेत पाय ज्याचे अशा - ते -  तुला - नमः -  नमस्कार असो. ॥२२॥ 
 
ब्रह्मदेवाचे जन्मस्थान असलेल्या ज्यांच्या नाभीतून कमल प्रगट झाले आहे, ज्यांनी सुंदर कमलांची माळ धारण केली आहे, ज्यांचे नेत्र कमलाप्रमाणे आहेत, ज्यांच्या चरणांवर कमलाचे चिन्ह आहे, अशा तुम्हांला माझा वारंवार नमस्कार असो. (२२) 
 
(वंशस्थ)  यथा हृषीकेश खलेन देवकी कंसेन रुद्धातिचिरं शुचार्पिता । विमोचिताहं च सहात्मजा विभो त्वयैव नाथेन मुहुर्विपद्गणात् ॥ २३ ॥ विषान्महाग्नेः पुरुषाददर्शनाद् असत्सभाया वनवासकृच्छ्रतः । मृधे मृधेऽनेकमहारथास्त्रतो द्रौण्यस्त्रतश्चास्म हरेऽभिरक्षिताः ॥ २४ ॥ 
(इंद्रवज्रा) केले जसे रक्षण देवकीचे त्या दुष्टकंसासहि नष्ट केले । तैसाचि रक्षी मम पुत्र देवा पुनःपुन्हा ही तुजला विनंती ॥ २३ ॥ लाक्षागृही वीष द्युती वनात सभेत क्षेत्रीं अन श्रेष्ठ अस्त्रीं । हिडिंब युद्धी तुचि स्वामि कृष्णा केले अम्हा रक्षित नित्य देवा ॥ २४ ॥ 
हृषीकेश -  हे जितेन्द्रिय  - विभो -  सर्वव्यापी श्रीकृष्णा ! - यथा -  ज्याप्रमाणे - खलेन -  दुष्ट अशा - कंसेन -  कंसाने - अतिचिरं -  फार दिवस - रुद्धा -  बंदिखान्यात ठेवलेली अशी - शुचा -  व शोकाने - अर्पिता -  पीडीलेली अशी - देवकी -  देवकी - च -  आणि - सहात्मजा -  पुत्रांसह - अहं -  मी - नाथेन -  स्वामी अशा - त्वया -  तुझ्याकडून - एव -  च - विपद्गणात् -  संकटसमूहातून - मुहुः -  वारंवार - विमोचिता -  मुक्त केली. ॥२३॥  हरे - हे श्रीकृष्णा ! - विषात् - विषापासून - महाग्नेः - मोठया अग्नीपासून - पुरुषाददर्शनात् - माणसे खाणार्या राक्षसांच्या दर्शनापासून - असत्सभायाः - दुष्टांच्या सभेपासून - वनवासकृच्छ्रतः - वनवासातील दुःखातून - मृधेमृधे - प्रत्येक युद्धात - अनेकमहारथास्त्रताः - पुष्कळ महारथी वीर पुरुषांनी सोडलेल्या अस्त्रांपासून - च - आणि - द्रौण्यस्त्रतः - अश्वत्थाम्याच्या अस्त्रांपासून - अभिरक्षिताः - रक्षिलेले - आस्म - आहो. ॥२४॥ 
हे हृषीकेशा, दुष्ट कंसाने कैद केलेल्या आणि पुष्कळ दिवस शोकग्रस्त असलेल्या देवकीचे जसे आपण रक्षण केलेत, त्याचप्रमाणे माझे आणि माझ्या पुत्रांचेही आपणच वेळोवेळी संकटांपासून रक्षण केलेत. आपण आमचे स्वामी आहात. सर्वशक्तिमान आहात. संकटनिवारणाचे किती म्हणून प्रसंग सांगावेत ? विषप्रयोगापासून, लाक्षागृहाला लागलेल्या भयानक आगीपासून, हिडिंब इत्यादी राक्षसांच्या तावडीतून, दुष्टांच्या द्यूतसभेच्या वेळी, वनवासातील आपत्तीपासून, अनेक वेळा झालेल्या युद्धाच्या वेळी महारथांच्या अस्त्रांपासून आणि आता आता अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून आपण आमचे रक्षण केलेत. (२३-२४) 
 
(अनुष्टुप्)  विपदः सन्तु ताः शश्वत् तत्र तत्र जगद्गुरो । भवतो दर्शनं यत्स्याद् अपुनर्भवदर्शनम् ॥ २५ ॥ 
( अनुष्टुप) आमुच्या जीवनी नित्य संकटे ही पुनःपुन्हा । प्रत्येक वेळि तू आला भवाचे नष्टिले भय ॥ २५ ॥ 
जगद्गुरो -  हे जगच्चालका श्रीकृष्णा ! - तत्रतत्र -  त्या त्या ठिकाणी - नः -  आम्हाला - शश्वत् -  नेहमी - विपदः -  आपत्ति - सन्तु -  असोत. - यत् -  ज्यामुळे - अपुनर्भवदर्शनं -  पुनर्जन्मादि उत्पन्न न करणारे - भवतः -  आपले - दर्शनं -  दर्शन - स्यात् -  होते. ॥२५॥ 
 
हे जगद्गुरू, आमच्या जीवनात पावलापावलांगणिक आमच्यावर संकटे येत राहोत, कारण संकटांच्या वेळीच आपले निश्चित दर्शन होते आणि दर्शनानंतर तर जन्म-मृत्यूच्या फेर्यातूनच सुटका होते. (२५) 
 
जन्मैश्वर्यश्रुतश्रीभिः एधमानमदः पुमान् । नैवार्हत्यभिधातुं वै त्वां अकिञ्चनगोचरम् ॥ २६ ॥ 
विद्या ऐश्वर्य नी जन्मे सवर्णी माज माजतो ।  त्यांना तू कसला लाभे भणंगा भेटसी परी ॥ २६ ॥ 
जन्मैश्वर्यश्रुतश्रीभिः -  जन्म, ऐश्वर्य, ज्ञान, व संपत्ती ह्यांनी - एधमान मदः -  ज्याचा मद म्हणजे गर्व वाढलेला आहे असा - पुमान् -  पुरुष - वै -  खरोखर - अकिंचनगोचरं -  दरिद्री लोकांनाच दिसणार्या - त्वां -  तुला - अभिधातुं -  नामादिकाने वर्णन करण्यास - न एव अर्हती -  योग्य होतच नाही. ॥२६॥ 
 
उच्च कुळात जन्म, विद्या आणि संपत्ती यामुळे गर्विष्ठ झालेली माणसे तर आपले नाव घेऊ शकत नाहीत. कारण आपण स्वतःजवळ प्रापंचिक वस्तू आणि वासना न ठेवणार्यांनाच दर्शन देता. (२६) 
 
नमोऽकिञ्चनवित्ताय निवृत्तगुणवृत्तये । आत्मारामाय शान्ताय कैवल्यपतये नमः ॥ २७ ॥ 
गरीबा धन तू ठेवा स्पर्शित लोभ त्या कधी ।  सुस्वांतरुप तू मोक्ष कैवल्या रे नमो नमो ॥ २७ ॥ 
अकिञ्चनवित्ताय -  दारिद्रय हेच आहे ऐश्वर्य ज्याचे अशा - निवृत्तगुणवृत्तये -  व सर्व गुणांचे धर्म जेथून परत फिरले आहेत म्हणजे जो निर्गुण अशाला - नमः -  नमस्कार असो. - आत्मारामाय -  आत्म्यामध्येच रममाण होणार्या - शान्ताय -  शांत चित्ताच्या अशा - कैवल्यपतये -  व मोक्ष देण्यास समर्थ अशाला - नमः -  नमस्कार असो. ॥२७॥ 
 
आपण निर्धनांचे धन आहात, मायेचा प्रपंच आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आपण आत्मानंदातच रममाण असता. आपण परम शांतस्वरूप आहात. मोक्षाचे आपणच अधिपती आहात. आपल्याला मी वारंवार नमस्कार करते. (२७) 
 
मन्ये त्वां कालमीशानं अनादिनिधनं विभुम् । समं चरन्तं सर्वत्र भूतानां यन्मिथः कलिः ॥ २८ ॥ 
मी अनादी अनंताला सर्वव्यापक स्वामिला  मानिते कालरूपाला एकची परमेश्वर । संसारी जीव ते सर्व द्रोहिती की परस्परा तरी तू सर्व प्राण्यात समान राहसी तसा ॥ २८ ॥ 
त्वां -  तुला - कालं -  काल - ईशानं -  शंकर - अनादिनिधनं -  जन्म, मृत्यू-रहित - विभुं -  सर्वव्यापी - सर्वत्र -  सर्व ठिकाणी - समं -  तुल्य भावनेने - चरन्तं -  फिरणारा असे - मन्ये -  मानिते - यत् -  ज्यामुळे - भूतानां -  प्राणिमात्रांच्या - मिथः -  एकमेकांत - कलिः -  कलह. ॥२८॥ 
 
मी आपल्याला अनादी, अनंत सर्वव्यापक, सर्वांचे नियंते, काळस्वरूप असलेले असे परमेश्वर समजते. भेदभावामुळे, आपापसात कलह करणार्या सर्वांमध्ये आपण मात्र समान रूपाने संचार करीत असता. (२८) 
 
(वंशस्थ)  न वेद कश्चिद् भगवंश्चिकीर्षितं तवेहमानस्य नृणां विडम्बनम् । न यस्य कश्चिद् दयितोऽस्ति कर्हिचिद् द्वेष्यश्च यस्मिन्विषमा मतिर्नृणाम् ॥ २९ ॥ 
(इंद्रवज्रा) मनुष्य रूपे करिशी लिला तू हेतू तुझा ना कळतो कुणाला । कोणी तुला ना प्रिय आणि शत्रू प्रियाप्रियो लोक तुला पहाती ॥ २९ ॥ 
भगवन् -  हे श्रीकृष्णा ! - कश्चित् -  कोणीही - नृणां -  मनुष्यांच्या - विडम्बनम् -  अनुकरणाला - ईहमानस्य -  करण्याची इच्छा करणार्या - तव -  तुझ्या - चिकीर्षितं -  मनांतील हेतूंना - न वेद -  जाणत नाही - कश्चित् -  कोणीही - यस्य -  ज्याच्या - दयितः -  प्रीतीतला - च -  आणि - कर्हिचित् -  कधीही - व्देष्यः -  शत्रू - न अस्ति -  नाही - नृणां -  मनुष्यांची - मतिः -  बुद्धि - यस्मिन् -  ज्याविषयी - विषमा -  विरुद्ध. ॥२९॥ 
 
भगवन्, आपण जेव्हा मनुष्यासारखी लीला करता, तेव्हा काय करू इच्छिता, हे कोणाला समजत नाही. आपणास कोणी प्रिय नाही, कोणी अप्रिय नाही. आपल्यासंबंधी मात्र लोकांची बुद्धी विषम आहे. (२९) 
 
(अनुष्टुप्)  जन्म कर्म च विश्वात्मन् अजस्याकर्तुरात्मनः । तिर्यङ् नृषिषु यादःसु तद् अत्यन्तविडम्बनम् ॥ ३० ॥ 
(अनुष्टुप)    विश्वरूपा नि विश्वात्मा न जन्म कर्म ते तुला । पशु पक्षी ऋषीरूपा धरुनी करिशी लिला ॥ ३० ॥ 
विश्वात्मन् -  जगात आत्मरूपाने राहणार्या हे श्रीकृष्णा ! - अजस्य -  जन्मरहित अशा - अकर्तुः -  व कर्तव्यशून्य अशा - आत्मनः -  सर्वव्यापी अशा आत्म्याचे - तिर्यङ्नृषिषु -  पशु, मनुष्य व ऋषि यांत - यादस्सु -  जलचरांत - जन्म -  जन्म - च -  आणि - कर्म -  कर्म - तत् -  ते - अत्यन्तविडम्बनम् -  फार अनुकरणरूप होय. ॥३०॥ 
 
आपण विश्वाचे आत्मा आहात, विश्वरूप आहात. आपण जन्म घेत नाही की कर्म करीत नाही. तरीसुद्धा पशु-पक्षी, मनुष्य, ऋषी, जलचर आदी योनीत आपण जन्म घेता आणि त्या त्या योनींनुसार दिव्य कर्मेसुद्धा करता. ही आपली लीलाच होय. (३०) 
 
(वसंततिलका)  गोप्याददे त्वयि कृतागसि दाम तावद् या ते दशाश्रुकलिल अञ्जन संभ्रमाक्षम् । वक्त्रं निनीय भयभावनया स्थितस्य सा मां विमोहयति भीरपि यद्बिभेति ॥ ३१ ॥ 
(वसंत तिलका) तू फोडिता मडकि माय तुझी यशोदा बांधोनी दूर निघता रडलास तू तै । होते कपोल भरले जव अंजनाने नी घाबरूनि बघसी तयि त्या भुमीसी । ती पाहुनी तव दशा मनि आठवोनी होते मनातचि हरी तुज लुब्ध मी रे । वाऽरे तुलाहि भय की भयग्रस्त होसी झाली अशी तव दशा तुज काय बोलू ॥ ३१ ॥ 
गोपी -  गोपी अर्थात यशोदा - त्वयि -  तू - कृतागसि -  अपराध केला असता - दाम -  दावे - आददे -  घेती झाली - तावत् -  तितक्यात - अश्रुकलिलाञ्जनसम्भ्रमाक्षं -  अश्रूंनी युक्त अशा काजळाने बरबटून गेले आहेत डोळे ज्याचे अशा - वक्रं -  मुखाला - भयभावनया -  भीतीचा आविर्भाव दाखवून - निनीय -  खाली घालून - स्थितस्य -  राहणार्या - ते -  तुझी - या -  जी - दशा -  अवस्था - सा -  ती - मां -  मला - विमोहयति -  मोह उत्पन्न करिते - यत् -  ज्याला - भीः -  भीति - अपि -  सुद्धा - बिभेति -  भिते. ॥३१॥ 
 
जेव्हा आपण  दह्याचा डेरा फोडला तेव्हा यशोदा माता रागावली आणि तिने आपल्याला बांधण्यासाठी हातात दोरी घेतली. ते पाहून आपल्या डोळ्यांत अश्रू आले. त्यामुळे गालांवरून काजल ओघळू लागले, डोळे बावरले आणि आपण मान खाली घालून उभे राहिला, तेव्हाच्या आपल्या त्या लीला छबीची आठवण होऊन मी मोहित होऊन जाते. भयही ज्याला भिते, त्याची काय ही अवस्था ! (३१) 
 
(अनुष्टुप्)  केचिद् आहुः अजं जातं पुण्यश्लोकस्य कीर्तये । यदोः प्रियस्य अन्ववाये मलयस्येव चन्दनम् ॥ ३२ ॥ 
(अनुष्टुप) अजन्मा असुनी तू तो जन्म का घेतलास हा सांगावी कारणे त्याची कोणी ते वदती असे । असणे मलयाचे जै चंदनो गुण दर्शितो । तसेचि यदुराजाचे माहात्म्य वाढवीशी तू ॥ ३२ ॥ 
केचित् -  कित्येक - प्रियस्य -  प्रिय अशा - पुण्यश्लोकस्य -  धर्मराजाच्या - कीर्तये -  कीर्तीकरिता - यदोः -  यदूच्या - अन्ववाये -  वंशात - मलयस्य -  मलयपर्वताच्या - चन्दनं -  चन्दनवृक्षा - इव -  प्रमाणे - अजं -  जन्मरहित - जातं -  उत्पन्न झाला असे - आहुः -  बोलतात. ॥३२॥ 
 
आपण अजन्मा असूनही जन्म घेतल्याचे कारण सांगताना काही महापुरुष असे म्हणतात की, ज्याप्रमाणे मलयपर्वताची कीर्ति पसरविण्यासाठी तेथे चंदनाची झाडे प्रगट होतात, त्याप्रमाणे आपला प्रिय भक्त पुण्यश्लोक राजा यदूची कीर्ति पसरविण्यासाठी आपण त्याच्या वंशामध्ये अवतार घेतला आहे. (३२) 
 
अपरे वसुदेवस्य देवक्यां याचितोऽभ्यगात् । अजस्त्वमस्य क्षेमाय वधाय च सुरद्विषाम् ॥ ३३ ॥ 
देवकी वसुदेवाच्या पूर्वजन्मवरा मुळे ।  भक्तांना रक्षिण्या तैसे दानवा मारण्यास तू । जन्मलास तया पोटी कोणी ते वदती असे ॥ ३३ ॥ 
अपरे -  दुसरे - अजः -  जन्मरहित - याचितः -  प्रार्थना केलेला - त्वं -  तू - सुरव्दिषां -  दैत्यांच्या - वधाय -  नाशाकरिता - च -  आणि - अस्य -  ह्या जगाच्या - क्षेमाय -  कल्याणाकरिता - वसुदेवस्य -  वसुदेवाच्या - देवक्यां -  देवकीचे ठिकाणी - अभ्यगात् -  उत्पन्न झाला. ॥३३॥ 
 
अन्य काही असेम्हणतात की, वसुदेव-देवकीने पूर्व जन्मामध्ये (सुतपा आणि पृश्नीच्या रूपाने) आपल्याकडून हाच वर मागितला होता, म्हणूनच आपण अजन्मा असूनही जगाचे कल्याण आणि दैत्यांचा नाश करण्यासाठी त्यांचे पुत्र झालात. (३३) 
 
भारावतारणायान्ये भुवो नाव इवोदधौ । सीदन्त्या भूरिभारेण जातो ह्यात्मभुवार्थितः ॥ ३४ ॥ 
दैत्यभारे डुले पृथ्वी बुडता तारण्यास तू ।  ब्रह्म्याने प्रार्थिता आला वदती कुणि ते तसे ॥ ३४ ॥ 
अन्ये -  दुसरे - हि -  खरोखर - आत्मभुवा -  ब्रह्मदेवाने - अर्थितः -  प्रार्थना केलेला - उदधौ -  समुद्रातील - नावः -  नौके - इव -  प्रमाणे - भूरिभारेण -  पुष्कळ ओझ्यामुळे - सीदन्त्याः -  दुःखी झालेल्या - भुवः -  पृथ्वीच्या - भारावतरणाय -  ओझ्याला दूर करण्याकरिता - जातः -  उत्पन्न झाला. ॥३४॥ 
 
दुसरे काही असे म्हणतात की, समुद्रात बुडणार्या जहाजाप्रमाणे, दैत्यांच्या भारामुळे ही पृथ्वी अस्थिर, पीडित झाली, तेव्हा ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेने पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी आपण प्रगट झालात. (३४) 
 
भवेऽस्मिम् क्लिश्यमानानां अविद्याकामकर्मभिः । श्रवण स्मरणार्हाणि करिष्यम् इति केचन ॥ ३५ ॥ 
अज्ञान कामना कर्मे संसारी बांधले जन ।  लाभावी मुक्ति गाण्याने म्हणोनी करिशी लिला ॥ ३५ ॥ 
केचन -  काही लोक - अस्मिन् -  ह्या - भवे -  संसारात - अविदयाकामकर्मभिः -  अज्ञानाने काम्यकर्मे केल्यामुळे - क्लिश्यमानानां -  दुःखित झालेल्यांच्या - श्रवणस्मरणार्हाणि -  श्रवणास व स्मरण करण्यास योग्य अशी - करिष्यन् -  करणारा - इति -  असे समजतात. ॥३५॥ 
 
काही महापुरुष असे म्हणतात की, जे लोक या संसारात अज्ञान, वासना आणि कर्मबंधनात जखडल्यामुळे पीडित झाले आहेत, त्यांनी श्रवण आणि स्मरण करण्यायोग्य लीला करण्याच्या विचारानेच आपण अवतार धारण केलात. (३५) 
 
(वंशस्थ)  श्रृण्वन्ति गायन्ति गृणन्त्यभीक्ष्णशः स्मरन्ति नन्दन्ति तवेहितं जनाः । त एव पश्यन्त्यचिरेण तावकं भवप्रवाहोपरमं पदाम्बुजम् ॥ ३६ ॥ 
(इंद्रवज्रा) ऐकोनि गावोनि चरित्र लीला आनंद लाभे स्मरता तुलाची । देसी त्वरे दर्शन भक्तराजा भवप्रवाहातुनि वाचवीसी ॥ ३६ ॥ 
जनाः -  लोक - तव -  तुझे - ईहितं -  इष्ट चरित्र - अभीक्ष्णशः -  वारंवार - शृण्वन्ति -  ऐकतात - गायन्ति -  गातात - गृणन्ति -  वर्णन करितात - स्मरन्ति -  स्मरण करितात - नन्दन्ति -  आनन्दित होतात - ते -  ते - एव -  च - अचिरेण -  लवकर - तावकं -  तुझ्या - भवप्रवाहोपरमं -  संसार प्रवाहाला बंद करणार्या - पदाम्बुजं -  चरणकमलाला - पश्यन्ति -  पाहतात. ॥३६॥ 
 
भक्तजन वारंवार आपल्या चरित्राचे श्रवण, गायन, कीर्तन, आणि स्मरण करून आनंदित होतात, त्यांना आपल्या चरणकमलांचे तत्काळ दर्शन होते. त्यामुळे त्यांचा जन्म-मृत्यूचा प्रवाह कायमचा थांबतो. (३६) 
 
अप्यद्य नस्त्वं स्वकृतेहित प्रभो  जिहाससि स्वित् सुहृदोऽनुजीविनः । येषां न चान्यत् भवतः पदाम्बुजात् परायणं राजसु योजितांहसाम् ॥ ३७ ॥ 
भक्तासि कल्पद्रुम तुचि देवा  पाल्यासि टाकोनि कसाचि जासी । हे पाय सारा मजला सहारा राजे जगीचे करितात द्रोह ॥ ३७ ॥ 
च -  आणि - स्वकृतेहित -  आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणार्या - प्रभो -  हे श्रीकृष्णा ! - राजसु -  राजांचे ठिकाणी - योजितांहसां -  पाप करणार्या - येषां -  ज्याच्या - भवतः -  आपल्या - पदाम्बुजात् -  चरणकमलाहून - अन्यत् -  दुसरे - परायणं -  श्रेष्ठ - न -  नाही - अदय -  आज - त्वं -  तू - अनुजीविनः -  अवलंबून राहणार्या - सुहृदः -  मित्र अशा - नः -  आम्हाला - अपि -  सुद्धा - जिहाससि -  टाकतोस - स्वित् -  काय ? ॥३७॥ 
 
भक्तांच्या इच्छा पुरविणार्या हे प्रभो, आजच आपण आपल्या आश्रयाला आलेल्या आणि सोयरे असलेल्या आम्हांला सोडून जाणार काय ? राजांच्या वधाचे पाप केलेल्या आम्हांला आपल्या चरणकमलांखेरीज अन्य कोणताही आश्रय नाही. (३७) 
 
(अनुष्टुप्)  के वयं नामरूपाभ्यां यदुभिः सह पाण्डवाः । भवतोऽदर्शनं यर्हि हृषीकाणां इव ईशितुः ॥ ३८ ॥ 
(अनुष्टुप) निष्प्राण इंद्रिये व्यर्थ तसाचि तुज वाचुनी । यदुचा पांडुराजाचा वंश हा व्यर्थची असे ॥ ३८ ॥ 
यर्हि -  जरी - ल्हषीकाणां -  इन्द्रियांचा - ईशितुः -  चालक - इव -  प्रमाणे - भवतः -  आपले - अदर्शनं -  दर्शन घडणार नाही - यदुभिः -  यादवांशी - सह -  सहवर्तमान - पाण्डवाः -  पाण्डुपुत्र - वयं -  आम्ही - नामरूपाभ्यां -  नावरूपांनी - के -  कोण ? ॥३८॥ 
 
जसे जीव नसेल तर इंद्रिये शक्तिहीन होतात, त्याचप्रमाणे आपण पाहिले नाही, तर यदुवंशी किंवा पांडव यांच्या नावा-रूपाला काय किंमत आहे ? (३८) 
 
नेयं शोभिष्यते तत्र यथेदानीं गदाधर । त्वत्पदैः अङ्किता भाति स्वलक्षणविलक्षितैः ॥ ३९ ॥ 
पवित्र पदस्पर्शाने कुरुजांगल ही भुमी ।  आज जी शोभली ऐसी जाता तू नच राहि रे ॥ ३९ ॥ 
गदाधर -  हे गदा धारण करणार्या श्रीकृष्णा ! - यथा -  जशी - इदानी -  हल्ली - स्वलक्षणविलक्षितैः -  स्वतःच्या चिन्हांनी शोभणार्या - त्वत्पदैः -  तुझ्या पायांनी - अड्किता -  शोभणारी - इयं -  ही - भाति -  शोभते - तत्र -  तेथे - न शोभिष्यते -  शोभणार नाही. ॥३९॥ 
 
हे गदाधारी, आपल्या असामान्य पदचिह्नांनी युक्त अशी ही कुरुदेशाची भूमी आज जशी शोभायमान झाली आहे, तशी आपल्या निघून जाण्याने राहणार नाही. (३९) 
 
इमे जनपदाः स्वृद्धाः सुपक्वौषधिवीरुधः । वनाद्रि नदी उदन्वन्तो ह्येधन्ते तव वीक्षितैः ॥ ४० ॥ 
तुझ्या दृष्टिप्रभावाने धान्य वेली तरु फळे ।  नद्या वने बहरती समुद्र गिरि वाढले ॥ ४० 
तव -  तुझ्या - वीक्षितैः -  अवलोकनामुळे - इमे -  हे - सुपक्वौषधिवीरुधः -  चांगल्या पिकलेल्या औषधी व वेली ज्यात आहेत असे - जनपदाः -  देश - हि -  खरोखर - स्वृद्धाः -  समृद्ध झालेले आहेत - वनाद्रिनदयुदन्वन्तः -  अरण्ये, पर्वत, नदया व समुद्र - एधन्ते -  वाढतात. ॥४०॥ 
 
आपल्या दृष्टीच्या प्रभावानेच हा देश धन-धान्य आणि लता-वृक्षांनी समृद्ध झाला आहे. ही वने, हे पर्वत, नद्या आणि समुद्रसुद्धा आपल्या दृष्टिक्षेपानेच वृद्धिंगत होत आहेत. (४०) 
 
अथ विश्वेश विश्वात्मन् विश्वमूर्ते स्वकेषु मे । स्नेहपाशं इमं छिन्धि दृढं पाण्डुषु वृष्णिषु ॥ ४१ ॥ 
विश्वाचा स्वामि तू नाथा विश्वात्मा विश्वरुप तू । जडे दोन्ही कुळा माझी माया तू तोड ती तशी ॥ ४१ ॥ 
अथ -  म्हणून - विश्वेश -  हे जगत्पते ! - विश्वात्मन् -  हे जगाच्या आत्मरूपा ! - विश्वमूर्ते -  हे जगात अनेक मूर्तींनी वास्तव्य करणार्या श्रीकृष्णा ! - स्वकेषु -  स्वकीय अशा - पाण्डुषु -  पाण्डवांचे ठिकाणी - वृष्णिषु -  व यादवांचे ठिकाणी - इमं -  ह्या - मे -  माझ्या - दृढं -  बळकट अशा - स्नेहपाशं -  प्रेमपाशाला - छिन्धि -  तोडुन टाक. ॥४१॥ 
 
आपण विश्वाचे स्वामी, आत्मा आणि विश्वरूप आहात. यदुवंशी आणि पांडव यांचेविषयी माझे मनात फारच ममता निर्माण झाली आहे. आपण माझे हे स्नेहपाश तोडून टाकावेत. (४१) 
 
त्वयि मेऽनन्यविषया मतिर्मधुपतेऽसकृत् । रतिं उद्वहतात् अद्धा गङ्गेवौघं उदन्वति ॥ ४२ ॥ 
अखंड पडते धारा जान्हवीची समुद्रि जै ।  नित्य बुद्धी तशी माझी तुझ्या प्रेमात वाहते ॥ ४२ ॥ 
मधुपते -  मधु दैत्याच्या अधिपते हे श्रीकृष्णा ! - मे -  माझी - अनन्यविषया -  दुसरीकडे न जाणारी - मतिः -  बुद्धि - गंगा -  गंगा - उदन्वति -  समुद्रात - ओघं -  प्रवाह - इव -  प्रमाणे - असकृत् -  वारंवार - त्वयि -  तुझ्या ठिकाणी - अद्धा -  चांगल्या रीतीने - रतिं -  प्रीतीला - उव्दहतात् -  धारण करो.॥४२॥ 
 
श्रीकृष्णा, ज्याप्रमाणे गंगेच्या धारा अखंडपणे समुद्राला मिळत राहतात, त्याप्रमाणे माझी बुद्धी इकडे तिकडे सैर-भैर न होता केवळ आपल्यावरच निरंतर प्रेम करीत राहो. (४२) 
 
(वसंततिलका)  श्रीकृष्ण कृष्णसख वृष्णि ऋषभावनिध्रुग् राजन्यवंशदहन अनपवर्ग वीर्य । गोविन्द गोद्विजसुरार्तिहरावतार योगेश्वराखिलगुरो भगवन् नमस्ते ॥ ४३ ॥ 
(वसंततिलका) पार्थासि तू हरि सखा यदुवंशश्रेष्ठा जे भारभूत नृपरूपचि दैत्य त्यांना । जाळावया अनल तू स्वयमेव अग्नि गो विप्र रक्षिसि हरी तुजला नमस्ते ॥ ४३ ॥ 
कृष्णसख -  हे अर्जुनाच्या मित्रा ! - वृष्ण्यृष -  हे यादवश्रेष्ठा ? - अवनिघ्रुग्राजन्यवीर्यदहन -  पृथ्वीला उपद्रव देणार्या राजांच्या पराक्रमाला जाळणार्या - अनपवर्गवीर्य -  क्षीण होणारे नाही वीर्य ज्याचे असा - गोविन्द -  पृथ्वीचे रक्षण करणार्या - गोव्दिजसुरार्तिहरावतार -  गाई, व्दिज व देव यांच्या पीडा दूर करण्याकरिता अवतार घेणार्या - योगेश्वर -  हे योगांच्या अधिपते ! - अखिलगुरो -  हे त्रैलोक्याच्या गुरो ! - भगवन् -  हे षड्गुणैश्वर्यसंपन्न  - श्रीकृष्ण -  हे श्रीकृष्णा ! - ते -  तुला - नमः -  नमस्कार असो. ॥४३॥ 
 
हे श्रीकृष्णा, अर्जुनाच्या प्रिय सख्या, यदुवंशशिरोमणे, आपण पृथ्वीला भारभूत झालेल्या राजवेषधारी दैत्यांना जाळण्यासाठीच अग्निस्वरूप आहात. आपली शक्ती अनंत आहे. हे गोविंदा, आपला हा अवतार गायी, ब्राह्मण आणि  देवता यांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आहे. योगेश्वरा, चराचराचे गुरु भगवंता, मी आपणांस नमस्कार करते. (४३) 
 
सूत उवाच । (अनुष्टुप्) पृथयेत्थं कलपदैः परिणूताखिलोदयः । मन्दं जहास वैकुण्ठो मोहयन्निव मायया ॥ ४४ ॥ 
सूतजी सांगतात-  (अनुष्टुप्) ऐशा या मधु शब्दांनी कुंतीने गुण गायिले । ऐकुनी मोहिले कृष्ण केलेसे मंद हास्य ही ॥ ४४ ॥ 
इत्थं -  याप्रमाणे - पृथया -  कुंतीने - कलपदैः -  मधुर भाषणांनी - परिणूताखिलोदयः -  स्तविला आहे संपूर्ण पराक्रम ज्याचा असा - वैकुण्ठः -  श्रीकृष्ण - मायया -  मायेने - मोहयन् -  मोहित करणारा - इव -  अशाप्रमाणे - मन्दं -  हळूहळू - जहास -  हसला. ॥४४॥ 
 
सूत म्हणाले - अशा प्रकारे कुंतीने मोठ्या मधुर शब्दांनी भगवंतांच्या अधिकाधिक लीलांचे वर्णन केले. हे सर्व ऐकून भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेने कुंतीला मोहित करीत मंद हास्य करू लागले. (४४) 
 
तां बाढं इति उपामंत्र्य प्रविश्य गजसाह्वयम् । स्त्रियश्च स्वपुरं यास्यन् प्रेम्णा राज्ञा निवारितः ॥ ४५ ॥ 
बोलले ठीक नी आले माघारी हस्तिनापुरा ।  निरोप घेउनी जाता रोधिले श्री युधिष्ठिरे ॥४५ ॥ 
गजसाह्ययं -  हस्तिनापुरात - प्रविश्य -  शिरून - बाढं -  बरे - इति -  असे - तां -  त्या कुंतीला - च -  आणि - स्त्रियः -  द्रौपदीप्रमुख स्त्रियांना - उपामन्त्त्र्य -  विचारून - स्वपुरं -  आपल्या नगरीला - यास्यन् -  जाण्यास तयार असताही - राज्ञा -  धर्मराजाने - प्रेम्णा -  प्रेमाने - निवारितः -  निवारण केले.॥४५॥ 
 
ते कुंतीला म्हणाले - "ठीक आहे" आणि तेथून हस्तिनापुराला परत आले. तेथे कुंती, सुभद्रा आदींचा निरोप घेऊन ते जेव्हा द्वारकेला जाऊ लागले, तेव्हा राजा युधिष्ठिराने त्यांना मोठ्या प्रेमाने थांबवून घेतले. (४५) 
 
व्यासाद्यैरीश्वरेहा ज्ञैः कृष्णेनाद्भुत कर्मणा । प्रबोधितोऽपि इतिहासैः नाबुध्यत शुचार्पितः ॥ ४६ ॥ 
भावकी मरता युद्धी धर्माला शोक जाहला ।  श्रीकृष्णे नी तसे व्यासे बोधिले परि ना मिटे ॥ ४६ ॥ 
ईश्वरेहाज्ञैः -  परमेश्वराची इच्छा न ओळखणार्या - व्यासादयैः -  व्यासादिकांनी - अद्भुतकर्मणा -  आश्चर्यकारक कर्म करणार्या - कृष्णेन -  श्रीकृष्णाने - इतिहासैः -  अनेक कथांनी - प्रबोधितः -  उपदेशिलेला - अपि -  सुद्धा - शुचा -  शोकाने - अर्पितः -  युक्त झालेला - न अबुध्यत -  न समजता झाला. ॥४६॥ 
 
आपले बांधव मारले गेल्याने राजा युधिष्ठिर मोठा शोकाकुल झाला होता. भगवंतांच्या लीलांचे मर्म जाणणारे व्यासांसारखे महर्षी आणि अद्भुत चरित्र दाखविणारे स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनीही अनेक ऐतिहासिक घटना सांगून त्याला समजाविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. परंतु त्याचे समाधान झाले नाही, तो शोक करीतच राहिला. (४६) 
 
आह राजा धर्मसुतः चिन्तयन् सुहृदां वधम् । प्राकृतेनात्मना विप्राः स्नेहमोहवशं गतः ॥ ४७ ॥ अहो मे पश्यताज्ञानं हृदि रूढं दुरात्मनः । पारक्यस्यैव देहस्य बह्व्यो मेऽक्षौहिणीर्हताः ॥ ४८ ॥ 
धर्मपुत्र जरी राजा अज्ञाने परि मोहिला ।  चिंतीत चित्ति होवोनी आक्रोशे बोलु लागला ॥ ४७ ॥ दुरात्मा मी असे बद्ध अज्ञान हृदयी पहा । खावया कोल्हि कुत्र्यांना असंख्य वीर मारिले ॥ ४८ ॥ 
विप्राः -  ब्राह्मण हो ! - धर्मसुतः -  युधिष्ठिर - राजा -  राजा - सुहृदां -  मित्रांच्या - वधं -  नाशाला - चिंतयन् -  चिंतणारा - प्राकृतेन -  स्वभावतः सात्त्विक अशा - आत्मना -  मनामुळे - स्नेहमोहवशं -  प्रेमाने मोहाच्या स्वाधीन - गतः -  झालेला - आह -  बोलला. ॥४७॥  अहो - काय हो ! - दुरात्मनः - दुष्ट अशा - मे - माझ्या - हृदि - हृदयात - रूढं - उत्पन्न झालेले - अज्ञानं - अज्ञान - पश्यत - पाहा. - पारक्यस्य - दुसर्याच्या हवाली होणार्या - एव - च - मे - माझ्या - देहस्य - देहाकरिता - बह्व्यः - पुष्कळ - अक्षौहिणीः - अक्षौहिणी - हताः - मारल्या गेल्या. ॥४८॥ 
शौनकादी ऋषींनो, धर्मपुत्र राजा युधिष्ठिर आपल्या स्वजनांच्या वधाचा विचार करकरून अविवेकयुक्त चित्तामुळे स्नेह आणि मोहवश होऊन म्हणू लागला - माझ्या दुरात्म्याच्या हृदयात दृढ झालेले अज्ञान तर पहा ! कोल्ह्या-कुत्रांचा आहार असलेल्या या शरीरासाठी अनेक अक्षौहिणी सैन्याचा नाश केला. (४७-४८) 
 
बालद्विजसुहृन् मित्र पितृभ्रातृगुरु द्रुहः । न मे स्यात् निरयात् मोक्षो ह्यपि वर्ष अयुत आयुतैः ॥ ४९ ॥ 
मी मुले द्विज स्नेहांचा मित्र काका गुरूस नी ।  द्रोह तो बंधुसी केला भोगणे कोटि रौरवा ॥ ४९ ॥ 
हि -  खरोखर - बालव्दिजसुहृन्मित्रपितृभ्रातृगुरुद्रुहः -  लहान मुले, ब्राह्मण, साधु, मित्र, वडील, भाऊबंद व गुरु ह्या सर्वांशी वैर करणार्या - मे -  माझी - वर्षायुतायुतैः -  कोटयवधि वर्षांनी - अपि -  सुद्धा - निरयात् -  नरकातून - मोक्षः -  मोकळीक - न स्यात् -  होणार नाही. ॥४९॥ 
 
मी बालक, ब्राह्मण, सोयरे. मित्र, काका, बंधू आणि गुरुजनांशी द्रोह केला आहे. कोट्यवधी वर्षानंतरही माझी नरकातून सुटका होणार नाही. (४९) 
 
नैनो राज्ञः प्रजाभर्तुः धर्मयुद्धे वधो द्विषाम् । इति मे न तु बोधाय कल्पते शासनं वचः ॥ ५० ॥ 
रक्षणार्थ प्रजेच्याची युद्ध ते राजधर्म हो ।  न पाप धर्म तो सांगे परी तोष मला नसे ॥ ५० ॥ 
प्रजाभर्तुः -  प्रजापालक - राज्ञः -  राजाचे - धर्मयुद्धे -  धर्मयुद्धात - व्दिषां -  शत्रूंचे - वधः -  मारणे - एनः -  पाप - न -  नाही - इति -  असे - शासनं -  आज्ञारूप - वचः -  शास्त्रवचन - तु -  तर - मे -  माझ्या - बोधाय -  उपदेशाला - न कल्पते -  समर्थ होत नाही.॥५०॥ 
 
राजाने प्रजेचे पालन करण्यासाठी धर्मयुद्धांमध्ये शत्रूंचा वध केला तर त्यास पाप लागत नाही, या शास्त्रवचनाने माझे समाधान होत नाही. (५०) 
 
स्त्रीणां मत् हतबंधूनां द्रोहो योऽसौ इहोत्थितः । कर्मभिः गृहमेधीयैः नाहं कल्पो व्यपोहितुम् ॥ ५१ ॥ 
भावकी मारिली सारी विधवा जाहल्या स्त्रिया ।  गृहस्थोचित तो भाग करण्या मी समर्थ ना ॥ ५१ ॥ 
इह -  येथे - अहं -  मी - मद्धतबन्धूनां -  माझ्यामुळे मारले गेलेल्या बांधवांच्या - स्त्रीणां -  स्त्रियांचा - उत्थितः -  उत्पन्न झालेला - यः -  जो - असौ -  हा - द्रोहः -  वैरभाव - गृहमेधीयैः -  गृहस्थाश्रमी पुरुषांनी करण्यास योग्य अशा - कर्ममिः -  कृत्यांनी - व्यपोहितुं -  दूर करण्यास - कल्पः -  समर्थ - न -  नाही. ॥५१॥ 
 
स्त्रियांचे पती आणि बांधवांना मारल्यामुळे माझ्याकडून त्यांचा जो अपराध झाला आहे, त्याचे परिमार्जन यज्ञयागादी कर्मांनीही मी करू शकणार नाही. (५१) 
 
यथा पङ्केन पङ्काम्भः सुरया वा सुराकृतम् । भूतहत्यां तथैवैकां न यज्ञैः मार्ष्टुमर्हति ॥ ५२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे कुन्तीस्तुतिर्युधिष्ठिरानुतापो नाम अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥ 
न निघे चिखली तीर्थ दारूची अपवित्रता ।  तसे एकाहि हत्येचे पाप यागे न नष्टते ॥ ५२ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ आठवा अध्याय हा ॥ १ ॥ ८ ॥ हरिः ॐ तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु ॥ 
यथा -  ज्याप्रमाणे  - पङ्केन -  चिखलाने - पङ्काम्भः -  गढूळ पाणी - वा -  किंवा - सुरया -  मदयाने - सुराकृतं -  मदय प्यायल्यामुळे लागणारे पाप - तथा -  त्याप्रमाणे - एव -  च - एकां -  एक - भूतहत्यां -  प्राण्यांना मारल्याचे पाप - यज्ञैः -  यज्ञांनी - मार्ष्टुं -  दूर करण्यास - न अर्हती -  समर्थ होत नाही. ॥५२॥ 
 
जसे चिखलाने गढूळ पाणी स्वच्छ करता येत नाही, मदिरेने मदिरेची अपवित्रता नाहीशी करता येत नाही, त्याप्रमाणे अनेक हिंसायुक्त यज्ञांनी एका प्राण्याच्या हत्येचेही परिमार्जन होत नाही. (५२) 
 इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां  |