|  | 
| 
श्रीमद् भागवत पुराण  
नारदोपदेशेन व्यासद्वारा श्रीमद्भागवतारंभः  अश्वत्थाम्याचे द्रौपदीच्या पुत्रांना मारणे आणि अर्जुनाकडून अश्वत्थाम्याची मानहानी - संहिता  -  अन्वय  -  अर्थ  समश्लोकी - मराठी 
शौनक उवाच ।  (अनुष्टुप्) निर्गते नारदे सूत भगवान् बादरायणः । श्रुतवांस्तदभिप्रेतं ततः किमकरोद् विभुः ॥ १ ॥ 
शौनकांनी विचारले -  (अनुष्टुप) सर्वज्ञ शक्तिमान व्यासे ऐकता बोल नारदी । पुढती सूतजी काय केले त्या बादरायणे ॥ १ ॥ 
सूत -  हे सूता ! - नारदे -  नारद - निर्गते -  निघून गेला असता - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न  - विभुः -  व सर्वव्यापी असे - बादरायणः -  बदरिकाश्रमात राहणारे व्यास - तदभिप्रेतं -  त्याच्या अभिप्रायाला - श्रुतवान् -  ऐकणारे असे होत्साते - ततः -  नंतर - किम् -  काय - अकरोत् -  करिते झाले. ॥१॥ 
 
शौनकांनी विचारले - सूतमहोदय, नारद निघून गेल्यानंतर सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान अशा व्यासांनी नारदांचा अभिप्राय ऐकून काय केले ? (१) 
 
सूत उवाच । ब्रह्मनद्यां सरस्वत्यां आश्रमः पश्चिमे तटे । शम्याप्रास इति प्रोक्त ऋषीणां सत्रवर्धनः ॥ २ ॥ 
सूतजी सांगतात -  सरस्वती तिरी एक तो शम्याप्राश आश्रम । तीर्थीं त्या नित्यची होती ऋषिंचे यज्ञ याग की ॥ २ ॥ 
ब्रह्मनदयां -  जिची देवता ब्रह्मदेव आहे किंवा ज्या नदीवर नेहमी पुष्कळ ब्राह्मण येऊन स्नानसंध्यादि करितात अशा - सरस्वत्यां -  सरस्वती नदीच्या ठिकाणी - पश्चिमे -  पश्चिम - तटे -  तीरावर - ऋषीणां -  ऋषींच्या - सत्रवर्धनः -  यज्ञाना वाढविणारा - शम्याप्रासः -  शम्याप्रास - इति -  अशा रीतीने - प्रोक्तः -  प्रसिद्ध असलेला असा - आश्रमः -  आश्रम आहे. ॥२॥ 
 
सूत म्हणाले - ब्रह्मनदी सरस्वती नदीच्या पश्चिम तटावर शम्याप्रास नावाचा एक आश्रम आहे. तेथे ऋषी नेहमी यज्ञ करतात. (२) 
 
तस्मिन् स्व आश्रमे व्यासो बदरीषण्डमण्डिते । आसीनोऽप उपस्पृश्य प्रणिदध्यौ मनः स्वयम् ॥। ३ ॥ 
तिथे आश्रम व्यासांचा बोरांचे वन शोभते ।  संकल्प सोडिला तेथे आचम्य करुनी तये ॥ ३ ॥ 
तस्मिन् -  त्या - बदरीखण्डमण्डिते -  बोरीच्या झाडांच्या समूहाने शोभणार्या - स्वे -  स्वतःच्या - आश्रमे -  आश्रमात - आसीनः -  बसलेले - व्यासः -  व्यास - अपः -  पाण्याला - उपस्पृश्य -  स्पर्श करून म्हणजे आचमन करून - स्वयं -  स्वतः - मनः -  मनाला - प्रणिदध्यौ -  स्थिर करिते झाले. ॥३॥ 
 
तेथेच व्यासांचा स्वतःचा आश्रम आहे. त्याच्या चारी बाजूंनी बोरीच्या झाडांचे सुंदर बन आहे. त्या आश्रमात बसून त्यांनी आचमन केले आणि आपले मन एकाग्र केले. (३) 
 
भक्तियोगेन मनसि सम्यक् प्रणिहितेऽमले । अपश्यत् पुरुषं पूर्णं मायां च तदपाश्रयम् ॥। ४ ॥ 
भक्ति योगे तदा त्यांनी शुद्ध चित्तासि बांधिले ।  पाहिली परमात्म्याची सर्व माया तशीच ती ॥ ४ ॥ 
भक्तियोगेन -  भक्तियोगाने - अमले -  निर्मळ अशा - सम्यक् -  व उत्तम रीतीने - प्रणिहिते -  स्थिर केलेल्या - मनसि -  मनात - पूर्वं -  प्रथम - पुरुषं -  परमेश्वराला - च -  आणि - तदुपाश्रयां -  त्याला धरून राहिलेल्या - मायां -  मायेला - अपश्यत् -  पाहिले. ॥४॥ 
 
त्यांनी भक्तियोगाच्या द्वारे आपले मन पूर्णतया एकाग्र आणि पवित्र केले आणि आदिपुरुष परमात्मा व त्याच्या आश्रयाने राहणार्या मायेला पाहिले. (४) 
 
यया संमोहितो जीव आत्मानं त्रिगुणात्मकम् । परोऽपि मनुतेऽनर्थं तत्कृतं चाभिपद्यते ॥। ५ ॥ 
मुक्त तो जीवही बद्ध मायेच्या त्रिगुणामुळे ।  मानी होवोनिया तैसा भोगितो बहुदःख तो ॥ ५ ॥ 
जीवः -  जीव - परः -  परमेश्वररूपी  - अपि -  असूनहि - यया -  जिने - संमोहित -  मोहित झालेला असा - आत्मानं -  स्वतःला - त्रिगुणात्मकं -  तीन गुणाने युक्त असे - मनुते -  मानतो - च -  आणि - तत्कृतं -  तिने केलेल्या - अनर्थं -  अनर्थाला - अभिपदयते -  प्राप्त होतो. ॥५॥ 
 
याच मायेने मोहित होऊन हा जीव मूलतः तिन्ही गुणांच्या पलीकडील असूनही आपल्याला त्रिगुणात्मक मानतो आणि त्यामुळे होणार्या अनर्थांना भोगतो. (५) 
 
अनर्थोपशमं साक्षाद् भक्तियोगमधोक्षजे । लोकस्याजानतो विद्वांन् चक्रे सात्वतसंहिताम् ॥। ६ ॥ 
अनर्थी या अशा जीवा तारितो भक्ति योगची ।  प्रपंची गुंतला त्याला अनर्थ नच हा कळे ॥ हंसज्ञाने अशी व्यासे श्रीमद्भागवती कथा । उद्धारार्थ जगाच्या या संहिता रचिली असे ॥ ६ ॥ 
विद्वान -  ज्ञानी व्यास - अनर्थोपशमं -  अनर्थ नाहीसा करणार्या - अधोक्षजे -  परमेश्वराविषयीच्या - साक्षात् -  प्रत्यक्ष - भक्तियोगं -  भक्तियोगाला - अजानतः -  न जाणणार्या - लोकस्य -  जगासाठी - सात्वतसंहितां -  श्रीमद्भागवतसंहितेला - चक्रे -  करिता झाला. ॥६॥ 
 
भगवंताची भक्ती ही एकच या अनर्थांच्या निराकरणाचे प्रत्यक्ष साधन आहे. परंतु संसारी लोक हे जाणत नाहीत. हे लक्षात घेऊन व्यासांनी श्रीमद्भागवताची रचना केली. (६) 
 
यस्यां वै श्रूयमाणायां कृष्णे परमपूरुषे । भक्तिरुत्पद्यते पुंसः शोकमोहभयापहा ॥। ७ ॥ 
हिच्या श्रवणमात्रेने मिळते कृष्ण भक्ति ती ।  शोक मोह भया वारी अशी अद्भूत ही कथा ॥ ७ ॥ 
वै -  खरोखर - यस्यां -  जी - श्रूयमाणायां -  ऐकिली असता - परमपुरुषे -  श्रेष्ठ पुरुष अशा - कृष्णे -  कृष्णाचे ठिकाणी - पुंसः -  पुरुषाची म्हणजे प्राणिमात्रांची - शोकमोहभयापहा -  शोक, मोह, व भीती नाहीशी करणारी - भक्तिः -  भक्ति - उत्पदयते -  उत्पन्न होते. ॥७॥ 
 
याच्या केवळ श्रवणाने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी परमप्रेममय भक्ती निर्माण होते. त्यामुळे जीवाचा शोक, मोह आणि भय नष्ट होते. (७) 
 
स संहितां भागवतीं कृत्वानुक्रम्य चात्मजम् । शुकं अध्यापयामास निवृत्तिनिरतं मुनिः ॥। ८ ॥ 
रचिता संहिता ऐसी वाचिली ती पुनःपुन्हा ।  निवृत्त शुक या पुत्रा तयांनी कथिली असे ॥ ८ ॥ 
सः -  तो - मुनिः -  व्यास महर्षि - भागवतीं -  श्रीमद्भागवत नावाच्या - संहितां -  संहितेला - कृत्वा -  तयार करून - च -  आणि - अनुक्रम्य -  क्रमवार त्याची व्यवस्था लावून - निवृत्तिनिरतं -  मोक्षमार्गात आसक्त असणार्या - आत्मजं -  पुत्र अशा - शुकं -  शुकाला - अध्यापयामास -  शिकविता झाला. ॥८॥ 
 
त्यांनी या भागवतसंहितेची निर्मिती करून नंतर ती आपला वैराग्यशील पुत्र शुक याला शिकविली. (८) 
 
शौनक उवाच । स वै निवृत्तिनिरतः सर्वत्रोपेक्षको मुनिः । कस्य वा बृहतीं एतां आत्मारामः समभ्यसत् ॥ ९ ॥ 
शौनकांनी विचारले -  असता शुक निवृत्त आसक्ति नसता तया । रमती आत्मज्ञानात तये कां शिकली कथा ॥ ९ ॥ 
वै -  खरोखर - निवृत्तिनिरतः -  मोक्षमार्गात आसक्ति ठेवणारा - सर्वत्र -  सर्व गोष्टींविषयी - उपेक्षकः -  उदासीन - मुनिः -  मननशील असा - आत्मारामः -  व आत्म्यांतच रममाण होणारा - सः -  तो शुक - कस्य -  कोणत्या - वा -  कारणास्तव - बृहतीं -  मोठया - एतां -  ह्या संहितेला - समभ्यसत् -  शिकता झाला. ॥९॥ 
 
शौनकांनी विचारले - श्रीशुकदेव तर अत्यंत निवृत्त आहेत. त्यांना कोणत्याही वस्तूची अपेक्षा नाही. ते नेहमी आत्मचिंतनात रममाण असतात. असे असता त्यांनी या विशाल ग्रंथाचे अध्ययन कशासाठी केले ? (९) 
 
सूत उवाच । आत्मारामाश्च मुनयो निर्ग्रन्था अप्युरुक्रमे । कुर्वन्ति अहैतुकीं भक्तिं इत्थंभूतगुणो हरिः ॥ १० ॥ 
सूतजी सांगतात -  ज्ञानी जे असती लोक अविद्या तुटली जया । निर्हेते ध्याति ते ईशा हरिची आगळी लिला ॥ १० ॥ 
आत्मारामाः -  आत्म्यामध्ये रममाण होणारे - च -  आणि - निर्ग्रन्थाः -  संसाराच्या गाठी ज्यांच्या तुटून गेल्या आहेत असे - अपि -  सुद्धा - मुनयः -  ऋषि - उरुक्रमे -  मोठा आहे पराक्रम ज्याच्या अशा परमेश्वराचे ठिकाणी - अहैतुकीं -  निष्काम अशा - भक्तिं -  भक्तीला - कुर्वन्ति -  करितात. - इत्थंभूतगुणः -  अशा गुणाने युक्त - हरिः -  परमेश्वर आहे. ॥१०॥ 
 
सूत म्हणाले, जे लोक ज्ञानी आहेत, ज्यांची अविद्येची गाठ सुटली आहे आणि जे नेहमी आत्म्यातच रममाण झालेले असतात, असे लोकही भगवंतांची निष्काम भक्ती करतात. कारण भगवंतांचे गुण इतके मधूर आहेत की, ते सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेतात. (१०) 
 
हरेर्गुणाक्षिप्तमतिः भगवान् बादरायणिः । अध्यगान् महदाख्यानं नित्यं विष्णुजनप्रियः ॥ ११ ॥ 
शुक तो भगवत्प्रेमी भगवान व्यासपुत्र ते ।  हरीने वेधिता चित्त त्यांनी अभ्यासिली कथा ॥ ११ ॥ 
हरेः -  परमेश्वराच्या - गुणाक्षिप्तमतिः -  गुणांनी आकर्षिली आहे बुद्धि ज्याची असा - नित्यं -  व नेहमी - विष्णुजनप्रियः -  वैष्णवांवर प्रेम करणारा असा - भगवान् -  षड्गुणैश्वर्यसंपन्न  - बादरायणिः -  बोरीच्या जंगलात राहणार्या व्यासांचा मुलगा शुकाचार्य - महत् -  मोठे - आख्यानं -  कथानक - अध्यगात् -  शिकता झाला. ॥११॥ 
 
भगवान शुकदेव तर भगवद्भक्तांना अत्यंत प्रिय आहेत आणि स्वतः भगवान असलेल्या व्यासांचे पुत्र आहेत. त्यांच्या हृदयाला भगवंतांच्या गुणांनी आकर्षून घेतले आहे आणि त्याचमुळे त्यांनी या विशाल ग्रंथाचे अध्ययन केले. (११) 
 
परीक्षितोऽथ राजर्षेः जन्मकर्मविलापनम् । संस्थां च पाण्डुपुत्राणां वक्ष्ये कृष्णकथोदयम् ॥ १२ ॥ 
आता परीक्षिताची मी जन्म कर्म नि मोक्षिची ।  वर्णितो सगळी वार्ता पांडवांचाही स्वर्ग तो । जयात कॄष्ण लीला ती उदयो पावते पहा ॥ १२ ॥ 
अथ -  नंतर - राजर्षेः -  राजर्षि अशा - परीक्षितः -  परीक्षित राजाचे - जन्म -  जन्म - कर्म -  कर्म - विलापनं -  आणि अंत - च -  आणि - पाण्डुपुत्राणां -  पाण्डवांचे - संस्थां -  स्वर्गारोहण - कृष्णकथोदयं -  ज्यांत कृष्णचरित्राचे वर्णन येईल अशा रीतीने - वक्ष्ये -  सांगणार आहे. ॥१२॥ 
 
आता मी राजर्षी परीक्षिताचा जन्म, कर्म आणि मोक्ष, तसेच पांडवांच्या स्वर्गारोहणाची कथा सांगतो. कारण त्यातूनच भगवान श्रीकृष्णांच्या अनेक कथांचा उगम होतो. (१२) 
 
(इंद्रवज्रा)  यदा मृधे कौरवसृञ्जयानां वीरेष्वथो वीरगतिं गतेषु । वृकोदराविद्धगदाभिमर्श भग्नोरुदण्डे धृतराष्ट्रपुत्रे ॥ १३ ॥ भर्तुः प्रियं द्रौणिरिति स्म पश्यन् कृष्णासुतानां स्वपतां शिरांसि । उपाहरद् विप्रियमेव तस्य जुगुप्सितं कर्म विगर्हयन्ति ॥ १४ ॥ 
(इंद्रवज्रा) जै पांडवांचे अन कौरवांचे अनेक मेले लढण्यात वीर । अशा महाभारत युद्ध क्षेत्री गदे भिमाने जनु भग्न केली ॥ १३ ॥ दुर्योधनाचे ऋण आठवोनी कृष्णासुतांना वधि द्रोणपुत्र । दुर्योधनाही बहु दुःख झाले कृत्यां अशा निंदिती सर्व लोक ॥ १४ ॥ 
अथो -  नंतर - यदा -  जेव्हा - कौरवसृञ्जयानां -  कौरवपांडवांच्या - मृधे -  युद्धात - वीरेषु -  वीर - वीरगतिं -  युद्धात मेलेल्या वीरांच्या गतीला म्हणजे स्वर्गाला - गतेषु -  गेले असता - धृतराष्ट्रपुत्रे -  व धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन - वृकोदराविद्धगदाभिमर्शभग्नोरुदण्डे -  भीमाने ताडिलेल्या गदेच्या प्रहाराने मांडी मोडलेला असा झाला असता ॥१३॥  द्रोणिः - द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा - भर्तुः - स्वामीचे - प्रियं - प्रिय - इति - असे - पश्यन् - पाहणारा - स्वपतां - निजलेल्या - कृष्णासुतानां - द्रौपदीच्या पाच मुलांची - शिरांसि - मस्तके - उपाहरत् स्म - हरण करिता झाला म्हणजे तोडिता झाला - तस्य - त्याचे - विप्रियम् - न आवडणारे - एव - च - तत् - ते - जुगुप्सितं - निंदय - कर्म - कृत्य - विगर्हयन्ति - निंदितात. ॥१४॥ 
ज्यावेळी कौरवपांडवांच्या युद्धात दोन्ही पक्षांतील पुष्कळसे वीर मारले गेले आणी भीमाच्या गदाप्रहाराने आपला राजा दुर्योधनाची मांडी भंगली, तेव्हा अश्वत्थाम्याने आपला राजा दुर्योधन याचे प्रिय करण्यासाठी द्रौपदीच्या झोपलेल्या मुलांची मस्तके छाटून दुर्योधनाला भेट म्हणून आणून दिली. हे दुर्योधनाला आवडले नाही. कारण अशा नीच कर्माची सर्वचजण निंदा करतात. (१३-१४) 
 
माता शिशूनां निधनं सुतानां  निशम्य घोरं परितप्यमाना । तदारुदद् बाष्पकलाकुलाक्षी तां सांत्वयन्नाह किरीटमाली ॥ १५ ॥ 
माता शिशुंची बहु दुःखि झाली  ढाळोनि अश्रू रडु लागली ती । पाहोनि त्या दुःखित माऊलीला त्या सांत्वना अर्जुन बोलला तो ॥ १५ ॥ 
तदा -  त्यावेळी - शिशूनां -  बालकांची - माता -  आई - घोरं -  भयंकर - सुतानां -  पुत्रांच्या - निधनं -  मृत्यूला - निशम्य -  ऐकून - परितप्यमाना -  दुःखित झालेली अशी - बाष्पकलाकुलाक्षी -  व अश्रुधारांनी भरून गेले आहेत डोळे जिचे अशी - अरुदत् -  रडली - किरीटमाली -  मुगुटाने शोभणारा अर्जुन - तां -  तिला - सांत्वयन् -  सांत्वन करणारा असा - आह -  बोलला. ॥१५॥ 
 
त्या मुलांची माता द्रौपदी आपल्या पुत्रांच्या निधनाची वार्ता ऐकून अत्यंत दुःखी झाली. तिच्या नेत्रांतून आसवे वाहू लागली. ती रडू लागली. अर्जुन तिचे सांत्वन करीत म्हणाला. (१५) 
 
तदा शुचस्ते प्रमृजामि भद्रे  यद्ब्रह्मबंधोः शिर आततायिनः । गाण्डीवमुक्तैः विशिखैरुपाहरे त्वाक्रम्य यत्स्नास्यसि दग्धपुत्रा ॥ १६ ॥ 
पुसील तेंव्हा तव मीच अश्रू  छेदीन डोके जव त्या अरीचे । ते शीर टाकीन तुझ्या पदासी लावीन आंघोळ करावयाला ॥ १६ ॥ 
भद्रे -  हे कल्याणि ! - यत् -  जेव्हा - ब्रह्मबन्धोः -  ब्राह्मणाधम - आततायिनः -  व घातकी क्रूर अशाचे - शिरः -  मस्तक - गाण्डीवमुक्तैः -  गाण्डीवापासून सुटलेल्या - विशिखैः -  बाणांनी - उपाहरे -  आणीन - दग्धपुत्रा -  आणि मेले आहेत मुलगे जिचे अशी तू - तु -  तर - यत् -  ज्याला - आक्रम्य -  उल्लंघून - स्नास्यसि -  अंग धुशील - तदा -  तेव्हा - ते -  तुझ्या - शुचः -  शोकाला - प्रमृजामि -  दूर करीन. ॥१६॥ 
 
हे कल्याणी, जेव्हा मी त्या आततायी अधम ब्राह्मणाचे मस्तक माझ्या गांडीव धनुष्याच्या बाणांनी छाटूनतुला ते भेट म्हणून आणून देईन, आणि जळलेल्या आपल्या मुलांचा अंत्यविधी झाल्यावर तू त्या मस्तकावर पाय ठेवून स्नान करशील, त्याचवेळी मी तुझे अश्रू पुसले असे होईल. (१६) 
 
(उपेंद्रवज्रा)  इति प्रियां वल्गुविचित्रजल्पैः स सान्त्वयित्वाच्युतमित्रसूतः । अन्वाद्रवद् दंशित उग्रधन्वा कपिध्वजो गुरुपुत्रं रथेन ॥ १७ ॥ 
अर्जून ऐसा मधु बोलला तै  विचारुनी त्या प्रिय मित्र कृष्णा । सारथ्य देवोनिहि तो निघाला गेला करी घेउनि गांडिवाते ॥ १७ ॥ 
अच्युतमित्रसूतः -  श्रीकृष्ण आहे मित्र व सारथी ज्याचा असा - सः -  तो अर्जुन - इति -  याप्रमाणे - प्रियां -  प्रिय पत्नीला - वल्गुविचित्रजल्पैः -  मधुर व चित्रविचित्र भाषणांनी - सान्त्वयित्वा -  सांत्वन करून - दंशितः -  सज्ज - उग्रधन्वा -  भयंकर धनुष्य धरणारा - कपिध्वजः -  आणि मारुती ज्याच्या ध्वजावर आहे असा - रथेन -  रथात बसून - गुरुपुत्रं -  गुरूचा मुलगा जो अश्वत्थामा त्याचा - अन्वाद्रवत् -  पाठलाग करिता झाला. ॥१७॥ 
 
अर्जुनाने अशा मधुर पण विलक्षण शब्दांनी द्रौपदीचे सांत्वन केले आणि आपले सुहृद भगवान श्रीकृष्णांना सारथी बनवून अंगावर कवच धारण करून, आपले भयंकर गांडीव धनुष्य घेऊन तो रथावर बसला आणि गुरुपुत्र अश्वत्थाम्याचा त्याने पाठलाग सुरू केला. (१७) 
 
तमापतन्तं स विलक्ष्य दूरात्  कुमारहोद्विग्नमना रथेन । पराद्रवत् प्राणपरीप्सुरुर्व्यां यावद्गमं रुद्रभयाद् यथार्कः ॥ १८ ॥ 
उद्विग्न पापी जरि तो हत्यारी  पाहोनी ना तो पळला मुळी की । रुद्राभये या तिन्हिलोकताळी लोकार्क काशीस जसा निमाला ॥ १८ ॥ 
कुमारहा -  ज्याने लहान मुले मारिली आहेत असा - सः -  तो अश्वत्थामा - आपतन्तं -  पाठोपाठ धावत येणार्या - तं -  त्या अर्जुनाला - दुरात् -  लांबून - विलक्ष्य -  पाहून - उद्विग्नमनाः -  दुःखित अंतःकरणाचा - प्राणपरीप्सुः -  व प्राण वाचविण्यास इच्छिणारा - यथा -  जसे - रुद्रभयात् -  शंकराच्या भीतीने - अर्कः -  सूर्य - रथेन -  रथात बसून - उर्व्यां -  जमिनीवर - यावद्गमं -  जितके लांब जाववेल तितके ! - पराद्रवत् -  पळत सुटला. ॥१८॥ 
 
मुलांची हत्या केल्याने घाबरलेला अश्वत्थामा अर्जुन आपल्यावरच चालून येत असल्याचे पाहून आपले प्राण रक्षण करण्यासाठी जेथपर्यंत पळून जाता येईल तेथेपर्यंत पळत सुटला, जसा रुद्राला भिऊन सूर्य पळाला होता त्याप्रमाणे. (१८) 
 
(अनुष्टुप्)  यदाशरणमात्मानं ऐक्षत श्रान्तवाजिनम् । अस्त्रं ब्रह्मशिरो मेने आत्मत्राणं द्विजात्मजः ॥ १९ ॥ 
(अनुष्टुप) स्वरथा पाहिले विप्रे थकले अश्व तेधवा । कोणी ना रक्षिता आता ब्रह्मास्त्र हेचि साधन ॥ १९ ॥ 
यदा -  जेव्हा - द्विजात्मजः -  ब्रह्मपुत्र अश्वत्थामा - श्रान्तवाजिनं -  ज्याचे घोडे थकून गेले आहेत असे - आत्मानं -  व स्वतःला - अशरणं -  दुसरा कोणीही संरक्षक नाही असे - ऐक्षत -  पाहता झाला - ब्रह्मशिरः -  तेव्हा ब्रह्मशिर - अस्त्रं -  अस्त्राला - आत्मत्राणं -  स्वसंरक्षक - मेने -  मानिता झाला. ॥१९॥ 
 
जेव्हा ब्राह्मणपुत्राने पाहिले की, आपल्या रथाचे घोडे थकले आहेत आणि आपण असहाय आहोत, तेव्हा आपल्या रक्षणाचे एकमात्र साधन केवळ ब्रह्मास्त्रच आहे, हे त्याने ओळखले.(१९) 
 
अथोपस्पृश्य सलिलं सन्दधे तत्समाहितः । अजानन् उपसंहारं प्राणकृच्छ्र उपस्थिते ॥ २० ॥ 
आचम्य घेउनी त्याने ध्याने ब्रह्मास्त्र योजिले ।  न जाणी मागुता घेणे स्वरक्षार्थचि सोडिले ॥ २० ॥ 
अथ -  नंतर - प्राणकृच्छ्रे -  प्राणसंकट - उपस्थिते -  प्राप्त झाले असता - उपसंहारं -  परत घेण्याच्या विधीला - अजानन् -  न जाणणाराही - सलिलं -  पाण्याला - उपस्पृश्य -  स्पर्श करून म्हणजे आचमन करून - समाहितः -  ध्यान करणारा असा होत्साता - तत् -  त्या ब्रह्मास्त्राला - सन्दधे -  सोडता झाला. ॥२०॥ 
 
जरी त्याला ब्रह्मास्त्र परत घेण्याची विद्या अवगत नव्हती, तरी प्राणावर बेतलेले संकट पाहून त्याने आचमन केले, ध्यानस्थ झाला आणि ब्रह्मास्त्र सोडले. (२०) 
 
ततः प्रादुष्कृतं तेजः प्रचण्डं सर्वतो दिशम् । प्राणापदमभिप्रेक्ष्य विष्णुं जिष्णुरुवाच ह ॥ २१ ॥ 
दिशा त्या व्यापिल्या सर्व तेजे अस्त्र प्रचंडची ।  अर्जुने पाहिला धोका कृष्णासी प्रार्थिले तदा ॥ २१ ॥ 
ततः -  नंतर - सर्वतोदिशं -  सर्व दिशांकडून - प्रादुष्कृतं -  प्रकट झालेले - प्रचण्डं -  भयंकर - तेजः -  तेजाला - प्राणापदं -  व प्राणावर आलेल्या आपत्तीला - अभिप्रेक्ष्य -  पाहून - जिष्णुः -  अर्जुन - विष्णुं -  श्रीकृष्णाला - ह -  याप्रमाणे - उवाच -  बोलला. ॥२१॥ 
 
त्या अस्त्राचे सर्व दिशांना एक प्रचंड तेज पसरले. अर्जुनाने जाणले की, आता आपल्या प्राणावरच बेतले आहे. तेव्हा त्याने श्रीकृष्णांना प्रार्थना केली. (२१) 
 
अर्जुन उवाच । कृष्ण कृष्ण महाबाहो भक्तानामभयङ्कर । त्वमेको दह्यमानानां अपवर्गोऽसि संसृतेः ॥ २२ ॥ 
अर्जुन म्हणाला -  कृष्णा कृष्णा महाभागा भक्तासी तूचि रक्षिसी । सच्चिदानंदरूपी तू भवज्वालीहि रक्षिसी ॥ २२ ॥ 
कृष्ण ! -  हे श्रीकृष्णा ! - महाभाग -  हे महाभाग्यवान - भक्तानां -  भक्तांची - अभयंकर -  भीती दूर करणार्या - कृष्ण -  हे कृष्णा ! ! - त्वं -  तू - एकः -  एकटाच - संसृतेः -  संसारापासून - सह्यमानानां -  संतप्त झालेल्यास - अपवर्गः -  मोक्षरूप असा - असि -  आहेस. ॥२२॥ 
 
अर्जुन म्हणाला - हे श्रीकृष्णा, महाबाहो, आपण भक्तांना अभय देणारे आहात. संसाराच्या धगधगत्या आगीत होरपळून निघणार्या जीवांना त्यापासून मुक्ति देणारे आपणच आहात. (२२) 
 
त्वमाद्यः पुरुषः साक्षाद् ईश्वरः प्रकृतेः परः । मायां व्युदस्य चिच्छक्त्या कैवल्ये स्थित आत्मनि ॥ २३ ॥ 
सृष्टिच्या वेगळा तूची तू आदी देवताहि तू ।  मायाजाळातुनी मुक्त कैवल्य आत्म चिंतनी ॥ २३ ॥ 
त्वं -  तू - आदयः -  सर्वांच्या आदि असणारा - पुरुषः -  शरीरात आत्मस्वरूपाने राहणारा - साक्षात् -  प्रत्यक्ष - ईश्वरः -  ईश्वर - प्रकृतेः -  मायेहून - परः -  निराळा - चिच्छक्त्या -  ज्ञानशक्तीने - मायां -  मायेला - व्युदस्य -  दूर करून - कैवल्ये -  निर्विकार - आत्मनि -  आत्म्यामध्ये - स्थितः -  राहिला आहेस. ॥२३॥ 
 
आपण आदिपुरुष, प्रकृतीपलीकडील, साक्षात् परमेश्वर आहात. मायेला आपल्या चित्शक्तीने निरस्त करून आपण आपल्या अद्वितीय स्वरूपात स्थित असता. (२३) 
 
स एव जीवलोकस्य मायामोहितचेतसः । विधत्से स्वेन वीर्येण श्रेयो धर्मादिलक्षणम् ॥ २४ ॥ 
तोचि तू स्वप्रभावाने मायेने मोहिसी जिवा ।  त्यांना तू सांगशी धर्म कल्याणार्थ विधान जे ॥ २४ ॥ 
सः -  तो - एव -  च - मायामोहितचेतसः -  मायेने मोहित झाली आहेत अंतःकरणे ज्यांची अशा - जीवलोकस्य -  प्राणिमात्रांच्या - धर्मादिलक्षणं -  धर्मादिक आहेत लक्षणे ज्याची अशा - श्रेयः -  कल्याणाला - स्वेन -  स्वतःच्या - वीर्येण -  वीर्याने - विधत्से -  करतोस. ॥२४॥ 
 
मायेने मोहित झालेल्या जीवांना आपण आपल्या प्रभावाने धर्मादिस्वरूप कल्याणाचा मार्ग दाखविता. (२४) 
 
तथायं चावतारस्ते भुवो भारजिहीर्षया । स्वानां चानन्यभावानां अनुध्यानाय चासकृत् ॥ २५ ॥ 
पृथ्विचा भार हाराया जन्मसी तू पुनः पुन्हा ।  अनन्य प्रेम भावाने ध्यावे नित्य उपासके ॥ २५ ॥ 
तथा -  त्याप्रमाणे - च -  हि - भुवः -  पृथ्वीचा - भारजिहीर्षया -  भार दूर करण्याच्या इच्छेने - च -  आणि - अनन्यभावानां -  एकाग्र मनाने भक्ति करणार्या - स्वानां -  स्वकीयांच्या - असकृत् -  वारंवार - अनुध्यानाय -  चिन्तनाकरिता - अयं -  हा - ते -  तुझा - अवतारः -  अवतार. ॥२५॥ 
 
पृथ्वीवरील दैत्यांचा भार नाहीसा करण्यासाठी आणि तुमच्या अनन्यप्रेमी भक्तांनी तुमचे निरंतर स्मरण, ध्यान करावे, यासाठीच तुमचा हा अवतार आहे. (२५) 
 
किमिदं स्वित्कुतो वेति देवदेव न वेद्म्यहम् । सर्वतो मुखमायाति तेजः परमदारुणम् ॥ २६ ॥ 
स्वयंप्रकाश तू देवा तेज ते मज ग्रासिते ।  कशाने कोठुनी आले स्वये मी हे न जाणितो ॥ २६ ॥ 
देव -  हे प्रकाशमान  - देव -  परमेश्वरा ! - सर्वतोमुखं -  सर्वबाजूने - परमदारुणं -  भयंकर असे - तेजः -  तेज - आयाति -  येत आहे - इदं -  हे - किं -  काय - स्वित् -  बरे - वा -  किंवा - कुतः -  कोठून - इति -  याप्रमाणे - अहं -  मी - न वेद्मि -  जाणत नाही. ॥२६॥ 
 
स्वयंप्रकाश श्रीकृष्णा, हे भयंकर तेज सर्व दिशांनी माझ्याकडे येत आहे. हे काय आहे आणि ते कोठून येत आहे, याचे मला ज्ञान नाही. (२६) 
 
श्रीभगवानुवाच । वेत्थेदं द्रोणपुत्रस्य ब्राह्ममस्त्रं प्रदर्शितम् । नैवासौ वेद संहारं प्राणबाध उपस्थिते ॥ २७ ॥ 
श्रीभगवान म्हणाले-  हे असे द्रोण पुत्राचे ब्रह्मास्त्र जे भयानक । सोडिले प्राणरक्षार्थ परी ना परतू शके ॥ २७ ॥ 
प्राणबाधे -  प्राणांवर संकट - उपस्थिते -  प्राप्त झाले असता - प्रदर्शितं -  दाखविलेले - इदं -  हे - द्रोणपुत्रस्य -  द्रोणाचा मुलगा जो अश्वत्थामा त्याचे - ब्राह्मं -  ब्रह्मसंबंधी - अस्त्रं -  अस्त्र - वेत्थ -  जाण - असौ -  हा - संहारं -  परत घेण्याच्या विधीला - न एव वेद -  जाणतच नाही. ॥२७॥ 
 
भगवान म्हणाले - अश्वत्थाम्याने आपल्यावर प्राणसंकट आल्याने हे ब्रह्मास्त्र सोडले आहे, असे समज. परंतु हे पुन्हा मागे कसे घ्यावे, याचे त्याला ज्ञान नाही. (२७) 
 
न ह्यस्यान्यतमं किञ्चिद् अस्त्रं प्रत्यवकर्शनम् । जह्यस्त्रतेज उन्नद्धं अस्त्रज्ञो ह्यस्त्रतेजसा ॥ २८ ॥ 
नसे याहूनि ती शक्ती या लागी दडपावया ।  ब्रह्मास्त्री तूही निष्णात त्यानेच मिटवी यया ॥ २८ ॥ 
अस्य -  ह्याच्या - प्रत्यवकर्शनं -  शक्ति नाहीशी करणारे - अन्यतमं -  याहून दुसरे - किञ्चित् -  कोणतेही - अस्त्रं -  अस्त्र - नहि -  नाही. - हि -  ह्या कारणास्तव - अस्त्रज्ञः -  अस्त्र जाणणारा तू - अस्त्रतेजसा -  अस्त्राच्या तेजाने - उन्नद्धं -  अमर्याद पसरलेल्या - अस्त्रतेजः -  अस्त्राच्या तेजाला - जहि -  जिंक म्हणजे नाहीसे कर. ॥२८॥ 
 
या अस्त्राचा पाडाव करण्याची अन्य कोणत्याही अस्त्रात शक्ती नाही. तू शस्त्रास्त्रविद्या चांगली जाणतोस. तुम्ह्या ब्रह्मास्त्राच्या तेजानेच या ब्रह्मास्त्राचे प्रचंड तेज शमव. (२८) 
 
सूत उवाच । श्रुत्वा भगवता प्रोक्तं फाल्गुनः परवीरहा । स्पृष्ट्वापस्तं परिक्रम्य ब्राह्मं ब्राह्माय संदधे ॥ २९ ॥ 
सूतजी सांगतात-  विपक्षवीर संहारी ख्याता अर्जून वीर तो । कृष्णाचे ऐकुनी त्याने केले आचम्य एकदा । केली प्रदक्षिणा कृष्णा तेचि ब्रह्मास्त्र योजिले ॥ २९ ॥ 
परवीरहा -  शत्रुरूपी वीराला ठार मारणारा - फाल्गुनः -  अर्जुन - भगवता -  श्रीकृष्णाने - प्रोक्तं -  सांगितलेले - श्रुत्वा -  ऐकून - अपः -  पाण्याला - स्पृष्टा -  स्पर्श करून - तं -  त्याला म्हणजे श्रीकृष्णाला - परिक्रम्य -  प्रदक्षिणा करून - ब्राह्माय -  ब्रह्मास्त्राकरिता - ब्राह्मं -  ब्रह्मास्त्राला - संदधे -  सोडिता झाला. ॥२९॥ 
 
सूत म्हणाले - शत्रुपक्षातील वीरांना मारण्यात अर्जुन निपुण होता. भगवम्तांचा सल्ला ऐकून त्याने आचमन केले, भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्मास्त्राचे निवारण करण्यासाठी दुसर्या ब्रह्मास्त्राची योजना केली. (२९) 
 
संहत्य अन्योन्यं उभयोः तेजसी शरसंवृते । आवृत्य रोदसी खं च ववृधातेऽर्कवह्निवत् ॥ ३० ॥ 
बाणवेष्ठित ते दोन्ही आकाशी टकरावुनी ।  सूर्याग्नी प्रलयंकारी वाढला भडकोनि तो ॥ ३० ॥ 
उभयोः -  दोघांच्या - शरसंवृते -  बाणांनी वेष्टून राहिलेली - तेजसी -  दोन तेजे - अन्योन्यं -  एकमेकांत - संहत्य -  मिसळून - रोदसी -  पृथ्वी व स्वर्ग ह्याला - च -  आणि - खं -  आकाशाला - आवृत्य -  वेढून - अर्कवन्हिवत् -  सूर्याग्नीप्रमाणे - ववृधाते -  वाढती झाली. ॥३०॥ 
 
बाणांनी वेढलेल्या त्या दोन्ही ब्रह्मास्त्रांचे तेज सूर्य आणि अग्नीप्रमाणे, एकमेकांना टक्कर दिल्याने, आकाश आणि सर्व दिशांना व्यापून टाकत वाढू लागले. (३०) 
 
दृष्ट्वास्त्रतेजस्तु तयोः त्रिँल्लोकान् प्रदहन्महत् । दह्यमानाः प्रजाः सर्वाः सांवर्तकममंसत ॥ ३१ ॥ 
त्रिलोक शकतो जाळू जन ते भाजु लागले ।  लोकांना कळले सा-या प्रलयंकारि अग्नि हा ॥ ३१ ॥ 
दह्यमानाः -  संतप्त होणार्या - सर्वाः -  सर्व - प्रजाः -  प्रजा - तु -  तर - त्रीन् -  तीन - लोकान् -  लोकांना - प्रदहत् -  जाळणारे - महत् -  मोठे - तयोः -  त्या दोघांच्या - अस्रतेजः -  ब्रह्मास्त्राच्या तेजाला - दृष्ट्वा -  पाहून - सांवर्तकं -  प्रलयकाळ जवळ आला असे - अमंसत -  मानत्या झाला. ॥३१॥ 
 
तिन्ही लोकांना जाळणार्या, वाढत जाणार्या, त्या दोन्ही ब्रह्मास्त्रांच्या ज्वाळांनी पोळणार्या प्रजेला प्रलयकाळ ओढवला असे वाटले. (३१) 
 
प्रजोपप्लवमालक्ष्य लोकव्यतिकरं च तम् । मतं च वासुदेवस्य संजहारार्जुनो द्वयम् ॥ ३२ ॥ 
पाहता जन संहार पार्थे कृष्णां विचारुनी ।  ब्रह्मास्त्र प्रलयंकारी दोन्हीही परताविली ॥ ३२ ॥ 
अर्जुनः -  अर्जुन - प्रजोपप्लवं -  प्रजेच्या नाशाला - च -  आणि - तं -  त्या - लोकव्यतिकरं -  लोकांच्या नाशाला - च -  आणि - वासुदेवस्य -  श्रीकृष्णाच्या - मतं -  मताला - आलक्ष्य -  पाहून - द्वयं -  दोन्हीही अस्त्रांना - संजहार -  परत घेता झाला. ॥३२॥ 
 
त्या आगीने तिन्ही लोक आणि प्रजेचा नाश होत असलेला पाहून, भगवंतांची आज्ञा घेऊन अर्जुनाने ती दोन्ही ब्रह्मास्त्रे आवरून घेतली. (३२) 
 
तत आसाद्य तरसा दारुणं गौतमीसुतम् । बबंधामर्षताम्राक्षः पशुं रशनया यथा ॥ ३३ ॥ 
क्रोधाने नेत्र पार्थाचे लाल होता पुढे तये ।  अश्वत्थामा पशू जैसा दोराने बांधिला असे ॥ ३३ ॥ 
ततः -  नंतर - आमर्षताम्राक्षः -  क्रोधाने डोळे लाल झालेला अर्जुन - तरसा -  वेगाने - दारुणं -  कठोर वर्तनाच्या - गौतमीसुतं -  अश्वत्थाम्याला - आसादय -  गाठून - यथा -  ज्याप्रमाणे - रशनया -  दोरीने - पशुं -  पशूला - बबन्ध -  बांधिता झाला. ॥३३॥ 
 
अर्जुनाचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. झडप घालून त्याने क्रूर अश्वत्थाम्याला पकडून एखादा पशू दोरखंडाने बांधावा, तसे त्याला बांधले. (३३) 
 
शिबिराय निनीषन्तं रज्ज्वा बद्ध्वा रिपुं बलात् । प्राहार्जुनं प्रकुपितो भगवान् अंबुजेक्षणः ॥ ३४ ॥ 
बळाने बांधिले त्याला शिबिरी न्यावयास तै ।  क्रोधाने लाल होवोनी वदे श्रीकृष्ण अर्जुना ॥ ३४ ॥ 
अंबुजेक्षणः -  कमलाप्रमाणे डोळे असणारा - भगवान् -  श्रीकृष्ण - दाम्ना -  दोरीने - रिपुं -  शत्रूला - बध्वा -  बांधून - बलात् -  जबरदस्तीने - शिबिराय -  शिबिराला - निनीषन्तं -  नेण्यास इच्छिणार्या - अर्जुन -  अर्जुनाला - प्रकुपितः -  रागावून - प्राह -  बोलला. ॥३४॥ 
 
अर्जुन मोठ्या ताकदीने अश्वत्थाम्याला दोरीने बांधून शिबिराकडे नेणार होता, तेव्हा कमलनयन भगवान श्रीकृष्ण कोपाविष्ट होऊन त्याला म्हणाले, (३४) 
 
मैनं पार्थार्हसि त्रातुं ब्रह्मबंधुमिमं जहि । यो असौ अनागसः सुप्तान् अवधीन्निशि बालकान् ॥ ३५ ॥ 
अधमो पापि या विप्रा न सोडी ठारची करी ।  निष्पाप बालका येणे झापीत मारिले कि रे ॥ ३५ ॥ 
पार्थ -  हे अर्जुना ! - एनं -  ह्याला - त्रातुं -  रक्षण करण्याला - मा अर्हसि -  योग्य नाहीस - इमं -  ह्या - ब्रह्मबन्धुं -  दुष्ट ब्राह्मणाला - जहि -  मार - यः -  जो - असौ -  हा - अनागसः -  निरपराधी अशा - निशि -  रात्री - सुप्तान् -  निजलेल्या - बालकान् -  मुलांना - अवधीत् -  मारिता झाला. ॥३५॥ 
 
पार्था, या अधम ब्राह्मणाला जिवंत सोडून देणे उचित नाही. त्याचा वध कर. रात्री झोपलेल्या निरपराध मुलांची याने हत्या केली आहे. (३५) 
 
मत्तं प्रमत्तमुन्मत्तं सुप्तं बालं स्त्रियं जडम् । प्रपन्नं विरथं भीतं न रिपुं हन्ति धर्मवित् ॥ ३६ ॥ 
असावधां तसे स्त्रीसी वेड्यां मत्ता नि बालका  निद्रिस्त ज्ञानहीनांना शरणार्थी विनारथी । भयग्रस्त असा शत्रू ययांशी वीर धर्म जो जाणता तो कधी त्यांना मारीना नच मारि ना ॥ ३६ ॥ 
धर्मवित् -  धार्मिक पुरुष - मत्तं -  दारू पिऊन गुंग झालेल्या - प्रमत्तं -  बेसावध - उन्मत्तं -  भूतबाधेने पिडीलेल्या - सुप्तं -  निजलेल्या - बालं -  बाल्यावस्थेतल्या - स्त्रियं -  स्त्री - जडं -  आळशी - प्रपन्नं -  शरण आलेल्या - विरथं -  ज्याचा रथ मोडून गेलेला आहे अशा - भीतं -  भ्यालेल्या - रिपुं -  शत्रूला - न हन्ति -  मारीत नाही. ॥३६॥ 
 
धर्माचरण करणारा पुरुष मद्याने धुंद, बेसावध, वेडसर, झोपलेला, बालक, स्त्री, अविवेकी, शरणागत, रथहीन आणि भयभीत, अशा शत्रूला कदापिही मारीत नाही. (३६) 
 
स्वप्राणान्यः परप्राणैः प्रपुष्णात्यघृणः खलः । तद् वधस्तस्य हि श्रेयो यद् दोषाद्यात्यधः पुमान् ॥ ३७ ॥ 
परंतु दुष्ट जो मारी क्रौर्याने प्राण रक्षणा ।  त्याचा वध हिताचाची पुन्हा तो पाप नाचरे ॥ ३७ ॥ 
अघृणः -  निर्दय व - खलः -  दुष्ट असा - यः -  जो - परप्राणेः -  दुसर्यांच्या प्राणांनी - स्वप्राणान् -  स्वतःच्या प्राणांना - प्रपुष्णाति -  पुष्ट करितो - तद्वघः -  त्याचा नाश - तस्य -  त्याच्या - श्रेयः -  कल्याणास कारणीभूत आहे - हि -  खरोखर - यद्दोषात् -  ज्या दोषामुळे - पुमान् -  पुरुष - अधः -  अधोगतीला - याति -  प्राप्त होतो. ॥३७॥ 
 
जे दुष्ट आणि क्रूर पुरुष दुसर्यांना मारून आपल्या प्राणांचे पोषण करतो, त्याचा वध करणेच श्रेयस्कर आहे. कारण अशा प्रवृत्तीचा माणूस जिवंत राहिला, तर तो आणखी पाप करील आणि नरकात जाईल. (३७) 
 
प्रतिश्रुतं च भवता पाञ्चाल्यै श्रृण्वतो मम । आहरिष्ये शिरस्तस्य यस्ते मानिनि पुत्रहा ॥ ३८ ॥ 
माझ्या समक्ष तूं केली प्रतिज्ञा द्रौपदी पुढे ।  ज्याने मारीयले पुत्र त्याचे छेदीन शीर ते ॥ ३८ ॥ 
च -  आणि - मानिनि -  हे मानवती द्रौपदी ! - यः -  जो - ते -  तुझ्या - पुत्रहा -  पुत्रांना मारणारा - तस्य -  त्याचे - शिरः -  मस्तक - आहरिष्ये -  आणीन असे - मम -  मी - शृण्वतः -  ऐकत असताना - भवता -  आपणाकडून - पाञ्चाल्यै -  द्रौपदीला - प्रतिश्रुतं -  वचन दिले गेले आहे. ॥३८॥ 
 
शिवाय माझ्यादेखत तू द्रौपदीपुढे प्रतिज्ञा केली होतीस की, ’हे मानिनी, ज्याने तुझ्या पुत्रांचा वध केला, त्याचे मी मस्तक तोडून आणीन.’ (३८) 
 
तदसौ वध्यतां पाप आतताय्यात्मबंधुहा । भर्तुश्च विप्रियं वीर कृतवान् कुलपांसनः ॥ ३९ ॥ 
पाप्याने कुलअंगारे वधिले पुत्र ते तुझे ।  दिले स्वामीसही दुःख अर्जुना ठार मारि यां ॥ ३९ ॥ 
वीर -  हे पराक्रमी अर्जुना ! - तत् -  ह्याकरिता - पापः -  पापी - आततायी -  क्रूर व निंदय कर्म करणारा - आत्मबंधुहा -  स्वतःच्या भाऊबंदांचा नाश करणारा - असौ -  हा अश्वत्थामा - वध्यतां -  मारला जावा - च -  आणि - कुलपांसनः -  कुलाला काळिमा लावणारा - भर्तुः -  स्वामींचे - वित्रियां -  अप्रिय - कृतवान् -  करता झाला. ॥३९॥ 
 
या पापी, कुळाला कलंक असलेल्या आततायीने तुझ्या पुत्रांचा वध केला, एवढेच नव्हे तर आपला स्वामी दुर्योधन यालाही दुःखित केले आहे. म्हणून हे वीर अर्जुना, तू याचा वध कर." (३९) 
 
सूत उवाच । एवं परीक्षता धर्मं पार्थः कृष्णेन चोदितः । नैच्छद् हन्तुं गुरुसुतं यद्यप्यात्महनं महान् ॥ ४० ॥ 
पाहिली नीति श्रीकृष्णे पार्थाची बोलुनी असे ।  मनाने श्रेष्ठ तो पार्थ गुरुपुत्रा न मारिले ॥ ४० ॥ 
एवं -  याप्रमाणे - धर्म -  धर्माला - परीक्षिता -  सूक्ष्म रीतीने अवलोकन करणार्या - कृष्णेन -  श्रीकृष्णाने - चोदितः -  प्रेरणा केलेला - महान् -  मोठा - पार्थः -  अर्जुन - यदि -  जरा - अपि -  सुद्धा - आत्महनं -  स्वतःचा नाश करून घेणार्या - गुरुसुतं -  अश्वत्थाम्याला - हन्तुं -  मारण्यास - न ऐच्छत् -  न इच्छिता झाला. ॥४०॥ 
 
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या धर्माचरणाची परीक्षा घेण्यासाठी म्हणून अर्जुनाला अशी प्रेरणा दिली खरी; परंतु अर्जुनाचे हृदय विशाल होते. जरी अश्वत्थाम्याने त्याच्या पुत्रांची हत्या केली होती, तरी गुरुपुत्राला मारण्याची अर्जुनाची इच्छा नव्हती. (४०) 
 
अथोपेत्य स्वशिबिरं गोविंदप्रियसारथिः । न्यवेदयत् तं प्रियायै शोचन्त्या आत्मजान् हतान् ॥ ४१ ॥ 
सारथ्या कृष्ण घेवोनी शिबिरी पातला पुन्हा ।  पापी हा सोपवीलासे माता शोकाकुला हिला ॥ ४१ ॥ 
अथ -  नंतर - गोविन्दप्रियसारथि -  श्रीकृष्ण आहे प्रिय व सारथी ज्याचा असा अर्जुन - स्वशिबिरं -  आपल्या शिबिराला - उपेत्य -  येऊन - हतान् -  मेलेल्या - आत्मजान् -  पुत्रांबद्दल - शोचन्त्यै -  शोक करणार्या - प्रियायै -  प्रियपत्नी द्रौपदीपुढे - तं -  त्या अश्वत्थाम्याला - न्यवेदयत् -  अर्पिता झाला म्हणजे आणता झाला. ॥४१॥ 
 
यानंतर आपला मित्र आणि सारथी श्रीकृष्णांबरोबर तो युद्धाच्या छावणीत परतला आणि त्याने आपल्या मृत पुत्रांचा शोक करीत असलेल्या द्रौपदीकडे अश्वत्थाम्याला सोपविले. (४१) 
 
(वंशस्थ)  तथाहृतं पशुवत्पाशबद्धं अवाङ्मुखं कर्मजुगुप्सितेन । निरीक्ष्य कृष्णापकृतं गुरोः सुतं वामस्वभावा कृपया ननाम च ॥ ४२ ॥ 
(इंद्रवज्रा) पशूपरी बद्धित द्रोणपुत्रा पांचालि पाही नतद्रष्ट पाप्या । गुरूसुताचा अवमान ऐसा न साहुनी त्या नमिले सतीने ॥ ४२ ॥ 
तथा -  त्याप्रमाणे - वामस्वभावा -  सरळ स्वभावाची - कृष्णा-  द्रौपदी - पशुवत् -  पशुप्रमाणे - पाशबद्धम् -  पाशाने म्हणजे दोरीने बांधलेल्या - च -  आणि - आहृतं -  आणलेल्या - कर्मजुगुप्सितेन -  निंदय कर्मामुळे - अवाङ्मुखं -  खाली मान घातलेल्या - अपकृतं -  अपकार केलेल्या - गुरोः -  गुरूच्या - सुतं -  पुत्राला - निरीक्ष्य -  पाहून - कृपया -  दयेने - ननाम -  नमस्कार करिती झाली. ॥४२॥ 
 
द्रौपदीला दिसले की, अश्वत्थाम्याला पशूसारखे बांधून आणले आहे. निंद्य कर्म केल्याने तो खाली पाहात होता. आपले अनिष्ट केल्याचे पाहून द्रौपदीच्या कोमल हृदयात करुणा उत्पन्न झाली आणि तिने अश्वत्थाम्याला नमस्कार केला. (४२) 
 
(अनुष्टुप्)  उवाच चासहन्त्यस्य बंधनानयनं सती । मुच्यतां मुच्यतां एष ब्राह्मणो नितरां गुरुः ॥ ४३ ॥ 
(अनुष्टुप) गुरुपुत्रा असा बद्ध न साही द्रौपदी सती । सोडा सोडा वदे त्याला पूज्यब्राह्मण तो असे ॥ ४३ ॥ 
च -  आणि - अस्य -  ह्याच्या - बंधनानयनं -  बांधून आणण्याला - असहन्ती -  सहन न करणारी - सती -  अशी ती पतिव्रता द्रौपदी - एषः -  हा - ब्राह्मणः -  ब्राह्मण - नितरां -  थोर - गुरुः -  गुरु - मुच्यतां -  सोडा - उवाच -  असे बोलली. ॥४३॥ 
 
पुरुपुत्राला अशा प्रकारे बांधून आणल्याचे सती द्रौपदीला सहन झाले नाही. ती म्हणाली - "सोडा, सोडा याला. हा ब्राह्मण आहे, म्हणून आपल्याला पूज्य आहे. (४३) 
 
सरहस्यो धनुर्वेदः सविसर्गोपसंयमः । अस्त्रग्रामश्च भवता शिक्षितो यदनुग्रहात् ॥ ४४ ॥ स एष भगवान् द्रोणः प्रजारूपेण वर्तते । तस्यात्मनोऽर्धं पत्न्याः ते नान्वगाद् वीरसूः कृपी ॥ ४५ ॥ 
ज्यांनी सा-या धनुर्विद्या गुप्तसंहारके दिली ।  कृपेने ज्ञानही सारे तयांचे रूप पुत्र हे ॥ ४४ ॥ पुत्राच्या प्रेमपाशाने वीरमाता कृपी सती । न गेली पतिच्या अग्नी जिवंत अजून अशी ॥ ४५ ॥ 
भवता -  आपणांकडून - यदनुग्रहात् -  ज्याच्या कृपेने - सविसर्गोप संयमः -  सोडणे व परत घेणे ह्या दोन्ही क्रियांसहवर्तमान - अस्त्रग्रामः -  अस्त्र समूह - च -  आणि - सरहस्यः -  रहस्यांसह - धनुर्वेदः शिक्षितः -  शिकला गेला. ॥४४॥  सः - तो - एषः - हा - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - द्रोणः - द्रोणाचार्य - प्रजारूपेण - पुत्राच्या स्वरूपाने - वर्तते - आहे. - तस्य - त्याच्या - आत्मनः - देहाचा - अर्धं - अर्धा भाग अशी - पत्नी - बायको - कृपी - कृपी - आस्ते - आहे - वीरसूः - पराक्रमी पुत्राला प्रसवणारी असल्यामुळे - न अन्वगात् - सहगमन न करती झाली. ॥४५॥ 
ज्यांच्या कृपेने संपूर्ण रहस्यासह धनुर्वेद, त्याचे प्रयोग आणि उपसंहारासह सर्व शस्त्रास्त्रांचे ज्ञान आपण प्राप्त केले, ते आपले आचार्य द्रोण, पुत्राच्या रूपाने आपल्या समोर उभे आहेत. त्यांची अर्धांगिनी वीरमाता कृपी सती गेली नाही. ती अद्याप जिवंत आहे. (४४-४५) 
 
तद् धर्मज्ञ महाभाग भवद्भिः र्गौरवं कुलम् । वृजिनं नार्हति प्राप्तुं पूज्यं वन्द्यमभीक्ष्णशः ॥ ४६ ॥ 
धर्मज्ञ आर्यपुत्रा हो महाभाग्य तुम्हा असे ।  नित्या पूज्य गुरुवंशा त्रास देणे न योग्यची ॥ ४६ ॥ 
तत् -  म्हणून - धर्मज्ञ -  हे धर्म जाणणार्या - महाभाग -  महाभाग्यवंता - भवद्भिः -  आपल्याकडून - अभीक्ष्णशः -  वारंवार - वंदयं -  नमस्कार करण्यास योग्य असे - पूज्यं -  व पूजा करण्यास योग्य असे - गौरवं -  गुरुच्यासंबंधी - कुलं -  कुल - वृजिनं -  दुःखाला - प्राप्तुं -  प्राप्त होण्यास - न अर्हति -  योग्य नाही. ॥४६॥ 
 
हे धर्मज्ञा, ज्या गुरुवंशाची नित्य पूजा करून ज्याला वंदन केले पाहिजे, त्याला व्यथित करणे योग्य नाही. (४६) 
 
मा रोदीदस्य जननी गौतमी पतिदेवता । यथाहं मृतवत्साऽर्ता रोदिम्यश्रुमुखी मुहुः ॥ ४७ ॥ 
जशी मी दुःखिता माता ढाळी अश्रु पुनः पुन्हा ।  तशी ती गौतमीमाता होईल दुःखिता पुन्हा ॥ ४७ ॥ 
यथा -  ज्याप्रमाणे - मृतवत्सार्ता -  लहान बालके मेल्यामुळे दुःखित झालेली - अश्रुमुखी -  व जिच्या मुखावर नेत्रांतील अश्रुंचे ओघळ आले आहेत अशी - अहं -  मी - मुहुः -  वारंवार - रोदिमि -  रडते - अस्य -  ह्याची - जननी -  आई - पतिदेवता -  पतिव्रता - गौतमी -  कृपी - मा रोदित् -  न रडो. ॥४७॥ 
 
ज्याप्रमाणे आपली मुले मारली गेल्यामुळे मी दुःखी होऊन रडत आहे आणि सारखी अश्रू ढाळीत आहे, तसे याच्या पतिव्रता माता गौतमीने रडू नये. (४७) 
 
यैः कोपितं ब्रह्मकुलं राजन्यैरजितात्मभिः । तत् कुलं प्रदहत्याशु सानुबंधं शुचार्पितम् ॥ ४८ ॥ 
उताविळा असा राजा द्वेषी द्विजकुळास जो ।  तयाचे कुळ ते भस्म द्विजशापचि होतसे ॥ ४८ ॥ 
अकृतात्मभिः -  इंद्रिय निग्रह न केलेल्या - यैः -  ज्या - राजन्यैः -  क्षत्रियांनी - ब्रह्मकुलं -  ब्राह्मणवंशाला - कोपितं -  क्रोधयुक्त केले - तत् -  तो ब्राह्मणवंश - सानुबन्धं -  सपरिवार - शुचार्पितम् -  शोकाने व्यापिलेल्या - कुलं -  कुलाला - आशु -  लवकर - प्रदहति -  जाळून टाकितो. ॥४८॥ 
 
ज्या उच्छृंखल राजांनी आपल्या दुष्कृत्याने ज्या ब्राह्मणकुळाला राग आणला असेल, ते कोपिष्ट ब्राह्मणकुळ त्या राजांना त्यांच्या परिवारासह शोकाग्नीमध्ये ढकलून लगेच त्या कुळाचे भस्म करते." (४८) 
 
सूत उवाच । धर्म्यं न्याय्यं सकरुणं निर्व्यलीकं समं महत् । राजा धर्मसुतो राज्ञ्याः प्रत्यनंदद् वचो द्विजाः ॥ ४९ ॥ 
सूतजी सांगतात - ऐका हो नीति नी धर्म द्रौपदी बोलली तदा । समता शुद्ध कारुण्या वाखाणी धर्म राणिला ॥ ४९ ॥ 
द्विजाः -  द्विज हो  - धर्मसुतः -  धर्मपुत्र - राजा -  धर्मराज - धर्म्यं - धार्मिक - न्याय्यं -  नीतियुक्त - सकरुणं -  दयायुक्त - निर्व्यलीकं -  निष्कपट - समं -  भेदभावरहित - महत् -  व मोठे - राज्ञाः -  राणी जी द्रौपदी तिच्या - वचः -  बोलण्याला - प्रत्यनन्दत् -  अनुमोदन देता झाला. ॥४९॥ 
 
ब्राह्मण हो ! द्रौपदीचे म्हणणे धर्म आणि न्यायाला अनुसरून होते. त्यामध्ये कपट नव्हते, तर करुणा आणि समदृष्टी होती. म्हणून राजा युधिष्ठिराने राणीच्या या हितकारक श्रेष्ठ वचनांचे कौतुक केले. (४९) 
 
नकुलः सहदेवश्च युयुधानो धनंजयः । भगवान् देवकीपुत्रो ये चान्ये याश्च योषितः ॥ ५० ॥ तत्राहामर्षितो भीमः तस्य श्रेयान् वधः स्मृतः । न भर्तुर्नात्मनश्चार्थे योऽहन् सुप्तान् शिशून् वृथा ॥ ५१ ॥ 
नकुले सहदेवाने कृष्णे पार्थे हि मानिले ।  तसेचि अन्य लोकांनी द्रौपदी अनुमानिली ॥ ५० ॥ कोपोनी वदला तेंव्हा भीमवीर तदा पहा । हत्यारी व्यर्थ हा याला मारणे हेचि उत्तम ॥ ५१ ॥ 
नकुलः -  नकुल, - च -  आणि - सहदेवः -  सहदेव, - युयुधानः -  सात्यकि, - धनञ्जयः -  अर्जुन, - भगवान् -  व षड्गुणैश्वर्यसंपन्न असा - देवकीपुत्रः -  देवकीचा मुलगा श्रीकृष्ण, - च -  आणि - ये -  जे - अन्ये -  दुसरे - च -  आणि - याः -  ज्या - योषितः -  स्त्रिया - अमर्षितः -  रागावलेला - भीमः -  भीम - तत्र -  तेथे - यः -  जो - भर्तुः -  स्वामीच्या - अर्थे -  करिता - न -  नव्हे; - च -  आणि - आत्मनः -  स्वतःकरिताही - न -  नव्हे - वृथा -  व्यर्थ - सुप्तान् -  निजलेल्या - शिशून् -  बालकांना - अहन् -  मारिता झाला - तस्य -  त्याचा - वधः -  नाश - श्रेयान् -  कल्याणकारक - स्मृतः -  सांगितला आहे - आह -  असे बोलला. ॥५०-५१॥ 
 
त्याचबरोबर नकुल, सहदेव, सात्यकी, अर्जुन, स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्री-पुरुषांनी द्रौपदीच्या म्हणण्याला पुष्टी दिली. (५०)  त्यावेळी भीम क्रुद्ध होऊन म्हणाला, "ज्याने झोपी गेलेल्या मुलांना स्वतःसाठी किंवा आपल्या स्वामीसाठी नव्हे, तर निष्कारण मारले आहे, त्याचा वध करणेच उत्तम होय." (५१) 
निशम्य भीमगदितं द्रौपद्याश्च चतुर्भुजः । आलोक्य वदनं सख्युः इदमाह हसन्निव ॥ ५२ ॥ 
श्रीकृष्णे द्रौपदीनेही भीमाचे शब्द ऐकुनी ।  हासुनी पाहिले पार्था पुढे श्रीकृष्ण बोलला ॥ ५२ ॥ 
चतुर्भुजः -  चार हात असणारा श्रीकृष्ण - भीमगदितं -  भीमाच्या भाषणाला - च -  आणि - द्रौपदयाः -  द्रौपदीच्या - निशम्य -  ऐकून - सख्युः -  मित्र जो अर्जुन त्याच्या - वदनं -  मुखाकडे - आलोक्य -  पाहून - हसन् -  हसणारा अशा - हव -  प्रमाणे - इदं -  हे - आह -  बोलला. ॥५२॥ 
 
द्रौपदी आणि भीमाचे म्हणणे ऐकून, अर्जुनाकडे पाहून भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले. (५२) 
 
श्रीभगवानुवाच । ब्रह्मबंधुर्न हन्तव्य आततायी वधार्हणः । मयैवोभयमाम्नातं परिपाह्यनुशासनम् ॥ ५३ ॥ 
श्रीकृष्ण भगवान म्हणाले -  पापी द्विजा न मारावे पाप्याला मारणे बरे । शास्त्रार्थ सांगतो दोन्ही माझ्या आज्ञाचि दोन्हि या ॥ ५३ ॥ 
ब्रह्मबंधुः -  अधम असाहि ब्राह्मण - न हन्तव्यः -  ठार मारू नये; - आततायी -  क्रूर घातकी - वधार्हणः -  ठार मारण्यास योग्य - मया -  माझ्याकडून - एव -  च - उभयं -  दोन्ही - आम्नातं -  शास्त्रनियम ठरविले आहेत - अनुशासनं -  ह्या आज्ञेला - परिपाहि -  पालन कर. ॥५३॥ 
 
श्रीकृष्ण म्हणाले - "पापकृत्य केलेल्याही ब्राह्मणाचा वध करू नये आणि आततायीला तर मारले पाहिजे. या दोन्ही गोष्टी मी शास्त्रात सांगितल्या आहेत. म्हणून माझ्या दोन्ही आज्ञांचे पालन कर. (५३) 
 
कुरु प्रतिश्रुतं सत्यं यत्तत् सांत्वयता प्रियाम् । प्रियं च भीमसेनस्य पाञ्चाल्या मह्यमेव च ॥ ५४ ॥ 
केला पण तुझा पाळी तसाचि भीम द्रौपदी ।  मलाही प्रीय होशील असे कृत्य करी पहा ॥ ५४ ॥ 
प्रियां -  प्रियपत्नी द्रौपदीला - सान्त्वयता -  सांत्वन करणार्या तुझ्याकडून - यत् -  जे - प्रतिश्रुतं -  प्रतिज्ञा केलेले - तत् -  ते - सत्यं -  खरे - कुरु -  कर - च -  आणि - भीमसेनस्य -  भीमाचे - प्रियं -  प्रिय - च -  आणि - पाञ्चाल्याः -  द्रौपदीचे - मह्यं -  मला - एव -  सुद्धा. ॥५४॥ 
 
द्रौपदीचे सांत्वन करताना तू जी प्रतिज्ञा केली होतीस, तिचे पालन कर. त्याचबरोबर भीम, द्रौपदी आणि मला जे प्रिय असेल, तेसुद्धा कर." (५४) 
 
सूत उवाच । अर्जुनः सहसाऽऽज्ञाय हरेर्हार्दमथासिना । मणिं जहार मूर्धन्यं द्विजस्य सहमूर्धजम् ॥ ५५ ॥ 
सूतजी सांगतात-  जाणिली अर्जुने गोष्ट कृष्णाच्या जी मनीं असे । कापिली खड्ग काढोनी शिखा केसांसवे तये ॥ ५५ ॥ 
अथ -  नंतर - अर्जुनः -  अर्जुन - सहसा -  एकदम - हरेः -  श्रीकृष्णाच्या - हार्दं -  मनातील अभिप्रायाला - आज्ञाय -  जाणून - असिना -  तरवारीने - द्विजस्य -  द्विज जो अश्वत्थामा त्याच्या - मूर्धन्यं -  मस्तकात असणार्या - सहमूर्धजं -  केसांसह वर्तमान अशा - मणिं -  मण्याला - जहार -  हरण करता झाला. ॥५५॥ 
 
सूत म्हणाले - अर्जुनाने भगवंतांच्या म्हणण्याचा मथितार्थ लगेच जाणला आणि त्याने आपल्या तलवारीने अश्वत्थाम्याच्या डोक्यावरील मणी केसांसह उपटून काढला. (५५) 
 
विमुच्य रशनाबद्धं बालहत्याहतप्रभम् । तेजसा मणिना हीनं शिबिरान् निरयापयत् ॥ ५६ ॥ 
श्रीहीन बालहत्येने ब्रह्मतेज शिखेविना ।  जाता त्या सोडिला आणि हाकलोनी दिला तसा ॥ ५६ ॥ 
रशनाबद्धं -  दोरीने बांधलेल्या त्याला - विमुच्य -  सोडून - बालहत्याहतप्रभं -  बालकांना मारल्यामुळे काळा ठिक्कर पडलेल्या - तेजसा -  व तेजाने - मणिना -  आणि मण्याने - हीनं -  रहित अशा त्याला - शिबिरात् -  शिबिरातून - निरयापयत् -  हाकलून देता झाला. ॥५६॥ 
 
मुलांची हत्या केल्यामुळे तो अश्वत्थामा अगोदरच सत्त्वहीन झाला होता, त्यात त्याचा मणी आणि ब्रह्मतेजही नाहीसे झाले. अशा त्याचे दोरखंडाचे बंधन सोडून अर्जुनाने त्याला शिबिराच्या बाहेर घालवले. (५६) 
 
वपनं द्रविणादानं स्थानान् निर्यापणं तथा । एष हि ब्रह्मबंधूनां वधो नान्योऽस्ति दैहिकः ॥ ५७ ॥ 
द्विजाचे धन ते घेता स्थान भ्रष्ट नि मुंडन ।  मानावा वध तो त्याचा द्विजां वध दुजा नसे ॥ ५७ ॥ 
हि -  कारण - वपनं -  क्षौर - द्रविणादानं -  द्रव्य हरण करणे  - तथा -  त्याप्रमाणे - स्थानात् -  जागेतून - निर्यापणं -  घालवून देणे - एषः -  हा - ब्रह्मबन्धूनां -  अधम ब्राह्मणांचा  - वधः -  मृत्यू - अन्यः -  दुसरा - दैहिकः -  देहासंबंधी - नास्ति -  नाही. ॥५७॥ 
 
मुंडन करणे, धन काढून घेणे आणि निर्वासित करणे, हाच अधम ब्राह्मणांचा वधहोय. याखेरीज त्यांच्यासाठी शारीरिक वध शास्त्राने सांगितलेला नाही. (५७) 
 
पुत्रशोकातुराः सर्वे पाण्डवाः सह कृष्णया । स्वानां मृतानां यत्कृत्यं चक्रुर्निर्हरणादिकम् ॥ ५८ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे द्रौणिनिग्रहो नाम सप्तमोऽध्यायः ॥। ७ ॥ 
पुत्रांच्या दुःखयोगाने द्रौपदी आणि पांडवे ।  मृतांची सर्व ती केली सर्वांनी की दशक्रिया ॥ ५८ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ सातवा अध्याय हा ॥ १ ॥ ७ ॥ हरिः ॐ तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु ॥ 
कृष्णया -  द्रौपदीशी - सह -  सहवर्तमान - पुत्रशोकातुराः -  बालकांच्या नाशामुळे शोकाकुल असे - सर्वे -  सर्व - पांडवाः -  पांडव - मृतानां -  मेलेल्या - स्वानां -  भाऊबंदांच्या - निर्हरणादिकं -  अन्त्य दहनादिक - यत् -  ज्या - कृत्यं -  कृत्याला - चक्रुः -  करिते झाले. ॥५८॥ 
 
पुत्रांच्या मृत्यूमुळे द्रौपदी आणि सर्व पांडव शोकाकुल झाले होते. नंतर त्यांनी आपल्या मृत बांधवांचे अंत्यविधी पार पडले. (५८) 
 इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां  |