श्रीमद् भागवत पुराण
प्रथमः स्कन्धः
पञ्चमोऽध्यायः

नारदव्याससंवादः, भगवद्‌गुणकर्मवर्णनस्य महत्त्वं,
देवर्षि नारदकर्तृकं स्वकीय पूर्वजन्मवृत्तांत कथनं च -

भगवंतांच्या यश-कीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


सूत उवाच ।
(अनुष्टुप्)
अथ तं सुखमासीन उपासीनं बृहच्छ्रवाः ।
देवर्षिः प्राह विप्रर्षिं वीणापाणिः स्मयन्निव ॥ १ ॥
सूतजी सांगतात -
(अनुष्टुप)
देवर्षि नारदे तेव्हा हाती घेवोनिया विणा ।
आसनी बैसुनी व्यासा हासोनी पुसले असे ॥ १ ॥

अथ - नंतर - बृहच्छ्रवाः - ज्याची कीर्ती मोठी आहे असा - वीणापाणि - हातात वीणा घेतलेला - सुखं - स्वस्थ - आसीनः - बसलेला - देवर्षिः - देवांचा ऋषी नारद - उपासिनं - जवळ बसलेल्या - तं - त्या - विप्रर्षि - ब्रह्मर्षि अशा व्यासाला - स्मयन - किंचित हास्य करणारा अशा - इव - सारखा - प्राह - बोलला. ॥१॥
सूत म्हणाले - त्यानंतर आरामात बसलेल्या, हातात वीणा घेतलेल्या, परम यशस्वी देवर्षी नारदांनी हास्ययुक्त मुद्रेने आपल्या जवळच बसलेल्या ब्रह्मर्षी व्यासांना विचारले. (१)


नारद उवाच ।
पाराशर्य महाभाग भवतः कच्चिदात्मना ।
परितुष्यति शारीर आत्मा मानस एव वा ॥ २ ॥
नारदजींनी विचारले -
भाग्यवंत तुम्ही व्यासा तुमचे मन नी तनू ।
कर्म नी चिंतने चांग आहे संतुष्ट का कसे ॥ २ ॥

महाभाग - हे भाग्यवान - पाराशर्य - पराशरपुत्रा व्यासा - भवतः - आपला - शारीर - शरीरात राहणारा म्हणजे शरीराभिमानी - वा - अथवा - मानसः - मनात वास्तव्य करणारा म्हणजे मनाबद्दल अभिमान बाळगणारा - आत्मा - आत्मा - आत्मना - स्वतःच्या योगाने म्हणजे शरीराने किंवा मनाने - एव - च - परितुष्यति - संतुष्ट होतो - कच्चित - का ? ॥२॥
नारदांनी विचारले - हे व्यासमहर्षे, आपले शरीर मन दोन्हीही आपण केलेल्या कर्माने आणि चिंतनाने संतुष्ट आहेत ना ? (२)


जिज्ञासितं सुसंपन्नं अपि ते महदद्‍भुतम् ।
कृतवान् भारतं यस्त्वं सर्वार्थपरिबृंहितम् ॥ ३ ॥
प्रचंड अशि जिज्ञासा जाहली पूर्ण भारते ।
धर्म नी पुरुषार्थांनी अद्‍भूतपूर्ण ते असे ॥ ३ ॥

ते - तुला - जिज्ञासितं - जाणण्यास योग्य असे - अपि - सुद्धा - सुसंपन्न - चांगले जाणलेले - यः - जो - त्वं - तू - सर्वार्थ परिबृंहितं - सर्व पुरुषार्थांनी पूर्ण भरलेले - अद्‌भुतं - आश्चर्यजनक - महत् - मोठे - भारतं - भारत - कृतवान् - करता झालास. ॥३॥
आपली मनीषा निश्चितच पूर्ण झाली असेल, कारण आपण ही जी महाभारताची रचना केली आहे, ती अत्यंत अद्‌भूत आहे. ती रचना धर्म आदी सर्व पुरुषार्थांनी परिपूर्ण आहे. (३)


जिज्ञासितमधीतं च यत्तद् ब्रह्म सनातनम् ।
तथापि शोचस्यात्मानं अकृतार्थ इव प्रभो ॥ ४ ॥
सनातनी असे ब्रह्मतत्वाच्या चिंतनी तुम्ही ।
जाणण्या राहिले नित्य तरी शोक कशास हा ॥ ४ ॥

यत् - जे - सनातनं - चिरस्थायी - ब्रह्म - ब्रह्म - तत् - ते - जिज्ञासितं - जाणले गेले - च - आणि - अधीतं - शिकले गेले - अथापि - तरीसुद्धा - प्रभो - हे भगवान् - आत्मान - स्वतःबद्दल - अकृतार्थ - कृतकृत्य न झालेला - इव - प्रमाणे - शोचसि - शोक करतोस. ॥४॥
सनातन ब्रह्मव्रताचे आपण पुष्कळ चिंतन केले आहे आणि ते जाणलेही आहे. असे असतानाही हे प्रभो, आपण कृतार्थ न झालेल्या पुरुषाप्रमाणे शोक का बरे करीत आहात ? (४)


व्यास उवाच ।
(उपेंद्रवज्रा)
अस्त्येव मे सर्वमिदं त्वयोक्तं
     तथापि नात्मा परितुष्यते मे ।
तन्मूलमव्यक्तमगाधबोधं
     पृच्छामहे त्वात्मभवात्मभूतम् ॥ ५ ॥
व्यासजी म्हणाले-
संबंधि माझ्या वदले तुम्ही हे
    खरे परंतू हॄदया न तोष ।
न जाणितो कारण काय झाले
    तुम्हीच सांगा मज काय झाले ॥ ५ ॥

त्वया - तुझ्याकडून - उक्तं - बोलले गेलेले - इदं - हे - सर्वं - सगळे - मे - माझ्या - अस्ति - आहे - एव - च - तथा - तरी - अपि - सुद्धा - मे - माझा - आत्मा - आत्मा - न परितुष्यते - संतुष्ट होत नाही - तन्मूलं - त्याचे कारण - अव्यक्तं - स्पष्ट दृग्गोचर न होणार्‍या म्हणजे दुर्लभदर्शन असणार्‍या अशा व - अगाधबोधं - अपरिमित ज्ञानाने युक्त अशा - आत्मभवात्मभूतं - ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेल्या - त्वा - तुला - पृच्छामहे - विचारतो. ॥५॥
व्यास म्हणाले - आपण माझ्याबद्दल म्हणालात, ते सर्व खरे आहे. असे असूनही माझ्या मनाला समाधान नाही, याचे कारण समजत नाही. आपले ज्ञान अगाध आहे. आपण साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात. म्हणून मी आपणालाच याचे कारण विचारीत आहे.(५)


स वै भवान् वेद समस्तगुह्यं
     उपासितो यत्पुरुषः पुराणः ।
परावरेशो मनसैव विश्वं
     सृजत्यवत्यत्ति गुणैरसङ्गः ॥ ६ ॥
ब्रह्माजिचे मानसपुत्र तुम्ही
    रहस्य सारे मनि जाणतात ।
अलिप्त स्वामी असता जगाचा
    इच्छे जयां मृत्युनि जन्म होय ॥ ६ ॥

सः - तो - वै - च - भवान् - आपण - समस्तगुह्यं - सर्वांत गूढ - वेद - जाणता - यत् - कारण - परावरेशः - परावरांचा स्वामी व - असङ्गः - अलिप्त असा - गुणैः - गुणांच्या योगाने - मनसा - मनाने - एव - च - विश्वं - जगत् - सृजति - उत्पन्न करितो - अवति - रक्षण करितो - अत्ति - संहार करितो असा - पुराणः - पुरातन - पुरुषः - पुरुष - उपासितः - उपासना केला गेला. ॥६॥
आपण सर्व गुप्त रहस्ये जाणता. कारण आपण त्या पुराणपुरुषाची उपासना केली आहे की, जो प्रकृती आणि पुरुष अशा दोन्हींचा स्वामी आहे, स्वतः निःसंग राहूनही केवळ आपल्या संकल्पाने, गुणांच्या द्वारे, या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करीत राहतो. (६)


त्वं पर्यटन्नर्क इव त्रिलोकीं
     अन्तश्चरो वायुरिवात्मसाक्षी ।
परावरे ब्रह्मणि धर्मतो व्रतैः
     स्नातस्य मे न्यूनमलं विचक्ष्व ॥ ७ ॥
सूर्या प्रमाणे फिरतात विश्वी
    वायू जसा देह देहात जातो ।
साक्षी तसे योगबले करोनी
    नी जाणिता शब्द ब्रह्मादिकासी ॥ ७ ॥

अर्कः - सूर्य - इव - प्रमाणे - त्रिलोकीं - त्रैलोक्यात - पर्यटन - फिरणारा - वायुः - वायु - इव - सारखा - अंतश्चरः - अंतःकरणात हिंडणारा - आत्मसाक्षी - व बुद्धीच्या वृत्ती ओळखणारा - त्वं - तू - परावरे - पर व अपर अशा - ब्रह्मणि - ब्रह्मामध्ये - धर्मतः - धर्मपूर्वक - व्रतैः - व्रतांनी - स्नातस्य - निष्णात अशा - मे - माझे - अलं - अत्यंत - न्यूनं - व्यंग - विचक्ष्व - शोधून काढ. ॥७॥
आपण सूर्याप्रमाणे तिन्ही लोकांत भ्रमण करता आणि प्राणवायूसारखे सर्वांच्य अंतःकरणाचे साक्षी आहात. मी नियमपालनांच्या द्वारा परब्रह्म आणि शब्दब्रह्म या दोन्हींचीही पूर्णपणे प्राप्ती करून घेतली असताही माझ्यामध्ये जी उणीव आहे ती आपण सांगावी. (७)


श्रीनारद उवाच ।
(अनुष्टुप्)
भवतानुदितप्रायं यशो भगवतोऽमलम् ।
येनैवासौ न तुष्येत मन्ये तद्दर्शनं खिलम् ॥ ८ ॥
श्री नारदजी म्हणाले -
कृष्णाचे यश ते शुद्ध तुम्ही ना गायिले कधी ।
व्यर्थची असते सारे जिथे ना देव तुष्टतो ॥ ८ ॥

भवता - आपल्याकडून - अमलं - निर्मळ म्हणजे शुद्ध निष्पाप असे - भगवतः - भगवंताचे - यशः - यश - अनुदितप्राय - वर्णन न केल्यासारखे - येन - ज्यामुळे - एव - च - असौ - हा - न तुष्येत - संतुष्ट होत नाही - तत् - ते - दर्शनं - ज्ञान - खिलं - व्यंग असे - मन्ये - मानतो. ॥८॥
श्रीनारद म्हणाले - आपण बहुधा भगवंतांच्या निर्मल यशाचे गुणगान केले नाही. मला असे वाटते की, ज्यामुळे भगवम्त संतुष्ट होत नाहीत, असे शास्त्र किंवा ज्ञान अपूर्ण आहे. (८)


यथा धर्मादयश्चार्था मुनिवर्यानुकीर्तिताः ।
न तथा वासुदेवस्य महिमा ह्यनुवर्णितः ॥ ९ ॥
पुरुषार्थ तसे धर्म तुम्ही निरुपिले जसे ।
कॄष्णाचा महिमा तैसा कधी ना गायिला पहा ॥ ९ ॥

मुनिवर्य - ऋषिश्रेष्ठ हो - च - आणि - यथा - ज्याप्रमाणे - धर्मादयः - धर्मादि - अर्थाः - पुरुषार्थ - अनुकीर्तिताः - वर्णिले - तथा - त्याप्रमाणे - हि - खरोखर - वासुदेवस्य - भगवंताचे - महिमा - माहात्म्य - न अनुवर्णितः - वर्णिले नाही. ॥९॥
मुनिवर्य, आपण धर्म आदी पुरुषार्थांचे जसे निरूपण केले आहे, तसे भगवान श्रीकृष्णांच्या महिम्याचे निरूपण केले नाही. (९)


(वंशस्थ)
न यद् वचश्चित्रपदं हरेर्यशो
     जगत्पवित्रं प्रगृणीत कर्हिचित् ।
तद्वायसं तीर्थमुशन्ति मानसा
     न यत्र हंसा निरमन्त्युशिक्क्षयाः ॥ १० ॥
(इंद्रवज्रा)
वाणी अलंकारित का असे ना
    ना गायि ती श्री हरि कीर्ति तेंव्हा ।
तो काक‍उष्टा अपवित्रखंड
    न भक्तहंसो रमती तिथे की ॥ १० ॥

यत् - जे - चित्रपदं - विचित्रपदांनी युक्त - वचः - भाषण - जगत्पवित्रं - जगाला पवित्र करणार्‍या - हरेः - भगवंताच्या - यशः - यशाला - कर्हिचित् - कधीही - न प्रगृणीत - वर्णित नाही - तत् - ते - वायसं - कावळ्याचे - तीर्थं - तीर्थ असे - उशन्ति - मानितात - यत्र - जेथे - मानसाः - सात्त्विक मनाचे ठिकाणी असणारे किंवा मानससरोवरात रममाण होणारे - उशिक्‍क्षयाः - ब्रह्माच्या ठिकाणी वास्तव्य असणारे किंवा सुंदर वस्तूंवर प्रेम करणारे - हंसाः - साधु किंवा हंस पक्षी - न निरमन्ति - रममाण होत नाहीत. ॥१०॥
ज्या रसभावालंकारांनी युक्त अशाही वाणीने जगताला पवित्र करणार्‍या भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे वर्णन केले नाही, तर अशी वाणी म्हणजे कावळ्यांसाठी ज्या ठिकाणी उष्टे पदार्थ फेकून दिले जातात, तशी अपवित्र मानली जाते. मानससरोवरात रममाण होणारे भगवत्‌चरणांचे आश्रित परमहंस अशा रचनेच्या ठिकाणी रममाण होत नाहीत. (१०)


तद्वाग्विसर्गो जनताघविप्लवो
     यस्मिन् प्रतिश्लोकमबद्धवत्यपि ।
नामान्यनन्तस्य यशोऽङ्‌कितानि यत्
     श्रृण्वन्ति गायन्ति गृणन्ति साधवः ॥ ११ ॥
प्राकृतवाणी भलती असो का
    ज्या श्लोकि आहे हरिकीर्ति स्पर्श ।
ती वाणि नष्टी जनपाप सारे
    ती ऐकती गातिहि संत थोर ॥ ११ ॥

जनताघविप्लवः - लोकसमूहांच्या पातकांचा नाश करणारा - तव्दाग्विसर्गः - तोच वाणीचा उच्चार - यत् - ज्या कारणास्तव - यस्मिन् - जो - अबद्धवति - अपशब्दयुक्त - अपि - असूनहि - प्रतिश्लोकं - प्रत्येक श्लोकाला - साधवः - साधु - अनन्तस्य - परमेश्वराची - यशोऽङ्कितानि - कीर्तीने भूषित - नामानि - नावे - शृण्वन्ति - ऐकतात - गायन्ति - गातात - गृणन्ति - वर्णितात. ॥११॥
याउलट, जी रचना दूषित शब्दांनी भरलेली आहे, परंतु जिचा प्रत्येक श्लोक भगवंतांच्या सुयशसूचक नामांनी भरलेला आहे, तीच वाणी लोकांच्या सर्व पापांचा नाश करते. कारण सत्पुरुष अशाच वाणीचे श्रवण, गायन आणि कीर्तन करतात. (११)


नैष्कर्म्यमप्यच्युतभाववर्जितं
     न शोभते ज्ञानमलं निरञ्जनम् ।
कुतः पुनः शश्वदभद्रमीश्वरे
     न चार्पितं कर्म यदप्यकारणम् ॥ १२ ॥
मोक्षार्थ जे ज्ञान पवित्र तेही
    श्रीकृष्णभक्ती विण ना सजे हो ।
सिद्धी घृणा साधन काम्य कर्म
    कृष्णा न ध्याता नच त्यात शोभा ॥ १२ ॥

नैष्कर्म्यं - फलेच्छारहित कर्म ज्यात आहे असे - निरञ्जनं - निर्मळ - अपि - सुद्धा - ज्ञानं - ज्ञान - अच्युतभाववर्जितं - भगवद्‌भक्तिरहित असेल तर - अलं - विशेष करून - न शोभते - शोभत नाही - च - आणि - शश्वत् - नेहमी - अभद्रं - दुःखरूप - यदपि - जरीही - अकारणं - काम्यकर्मरहित - कर्म - कर्म - ईश्वरे - ईश्वराचे ठिकाणी - न अर्पितं - अर्पण केले नसेल तर - पुनः - पुन्हा - कुतः - कोठून ? ॥१२॥
मोक्षप्राप्तीचे साक्षात साधन असलेले निर्मल ज्ञान, भगवद्‌भक्तिविरहित असेल तर ते तितकेसे शोभत नाही. तर मग जे साधन आणि सिद्धी, अशा दोन्ही अवस्थेत नेहमी अमंगल असते, ते काम्य कर्म (साधन) आणि जे भगवंताला अर्पण केले नाही असे अहेतुकदेखील कर्म तरी कसे बरे शोभेल ? (१२)


अथो महाभाग भवानमोघदृक्
     शुचिश्रवाः सत्यरतो धृतव्रतः ।
उरुक्रमस्याखिलबंधमुक्तये
     समाधिनानुस्मर तद्‌विचेष्टितम् ॥ १३ ॥
व्यासा तुम्हा लाभलि दिव्य दृष्टी
    कीर्ती तशी सत्यव्रते कठोर ।
तारावयाला जन सर्व नित्य
    श्रीकृष्ण लीला स्मरणे मनासी ॥ १३ ॥

महाभाग - हे भाग्यवान् ! - अथो - सर्व प्रकाराने - अमोघदृक् - ज्याचे अवलोकन निरर्थक नाही असा - शुचिश्रवाः - शुद्ध कीर्ती असणारा - सत्यरतः - सत्यावर प्रीती करणारा - धृतव्रतः - व्रताचरण करणारा - भवान् - आपण - अखिलबन्धमुक्तये - सर्व सांसारिक बन्धनापासून मुक्ति मिळावी एवढयाकरिता - उरुक्रमस्य - परमेश्वराचे - तत् - ते - विचेष्टितं - कृत्य - समाधिना - एकाग्र अंतःकरणाने - अनुस्मर - स्मरण कर. ॥१३॥
व्यासमहर्षे, आपली दृष्टी अचूक असून कीर्ति पवित्र आहे. आपण सत्यवती आणि दृढव्रती आहात. असे असल्याने आपण समाधीच्या योगाने संपूर्ण जीवमात्रांना बंधमुक्त करण्यासाठी, अचिंत्यशक्ती भगवंतांच्या लीलांचे स्मरण करा. (१३)


ततोऽन्यथा किञ्चन यद्‌विवक्षतः
     पृथग् दृशस्तत् कृतरूपनामभिः ।
न कर्हिचित् क्वापि च दुःस्थिता मतिः
     लभेत वाताहतनौरिवास्पदम् ॥ १४ ॥
कामूक भावे भजता तयाला
    बुद्धी भ्रमे नी नसरेचि कर्म ।
वा-यात नावेस न ठाव लाभे
    तै चंचलावृत्ति कधी स्थिरेना ॥ १४ ॥

यत् - ज्या कारणास्तव - ततः - त्याहून - पृथग्दृशः - भिन्न दृष्टीच्या - अन्यथा - दुसरे - किंचन - काही एक - विवक्षतः - बोलण्याची इच्छा करणार्‍याच्या - तत्कृतरूपनामभिः - आणि त्यामुळे स्फुरण पावणार्‍या नावांनी व रूपांनी - दुःस्थिता - अस्थिर - मतिः - बुद्धि - कुत्रचित् - कोठेही - च - आणि - क्वापि - कोणत्याही बाबतीत - वाताहतनौः - वार्‍याने हालणारी होडी - इव - प्रमाणे - आस्पदं - स्थान - न लभेत - मिळवीत नाही. ॥१४॥
जो मनुष्य भगवंतांच्या लीलांव्यतिरिक्त दुसरी काही सांगण्याची इच्छा करतो, तो भेदबुद्धी मनुष्य त्या इच्छेने निर्माण केलेल्या अनेक नाम-रूपांच्या फेर्‍यात सापडतो. जसे झंझावाताने डगमगणारी नाव अखंड हेलकावे खाते, त्याप्रमाणे अशा माणसांची चंचल बुद्धी कोठेच स्थिर होत नाही. (१४)


जुगुप्सितं धर्मकृतेऽनुशासतः
     स्वभावरक्तस्य महान् व्यतिक्रमः ।
यद्‌वाक्यतो धर्म इतीतरः स्थितो
     न मन्यते तस्य निवारणं जनः ॥ १५ ॥
वृत्तिस्वभावे जग गुंतले हे
    धर्मार्थ आज्ञाहि सकाम केली ।
मूढांसि हिंसा गमलाचि धर्म
    नाही तयां बोध मुळीच झाला ॥ १५ ॥

जुगुप्सितं - निंद्य असे - स्वभावरक्तया - स्वाभाविक रीतीने विषयलोलुप अशांच्या - धर्मकृते - धर्माकरिता - अनुशासतः - उपदेश करणार्‍याचा - महान् - मोठा - व्यतिक्रमः - अन्याय - यव्दाक्यतः - ज्याच्या वाक्यानेच - धर्मः - धर्म - इति - असे समजून - इतरः - सामान्य - जनः - जन - स्थितः - राहिला आहे. - तस्य - त्याचे - निवारणं - दूरीकरण - न मन्यते - मानीत नाही. ॥१५॥
संसारी लोक स्वभावतःच विषयांत गुंतलेले आहेत. धर्माच्या नावावर निंदनीय अशी सकाम कर्मे करण्याची आज्ञा आपणच त्यांना केली आहे, हे सर्व उलटेच झाले. कारण सामान्य लोक निंदनीय कर्मालाच मुख्य धर्म समजून अशा धर्माचा निषेध करणार्‍यांचे म्हणणे ऐकत नाहीत. (१५)


विचक्षणोऽस्यार्हति वेदितुं विभोः
     अनन्तपारस्य निवृत्तितः सुखम् ।
प्रवर्तमानस्य गुणैरनात्मनः
     ततो भवान् दर्शय चेष्टितं विभोः ॥ १६ ॥
ज्ञानी विचारी पुरुषास होतो
    विरक्त त्यांना निज बोध सारा ।
बुद्धी नसे जी हरिच्या ठिकाणी
    त्याच्या हिता कृष्णलिला वदाव्या ॥ १६ ॥

विचक्षणः - कुशल म्हणजे निपुण जन - निवृत्तितः - निवृत्ति मार्गाने अर्थात मोक्षमार्गाने - अनंतपारस्य - ज्याचा अंत म्हणजे नाश नाही व ज्याला मर्यादा नाही अशा - अस्य - ह्या - विभोः - परमेश्वराचे - सुखं - सुखात्मक रूप - वेदितुं - जाणण्याला - अर्हति - योग्य आहे - ततः - त्या कारणास्तव - भवान् - आपण - अनात्मनः - आत्मज्ञानरहित अशा - गुणैः - व सत्त्वादिगुणांनी - प्रवर्तमानस्य - चालणार्‍या - विभोः - ईश्वराचे - चेष्टितं - पराक्रम - दर्शय - दाखवा. ॥१६॥
भगवंतांचे गुण अनंत आहेत. कोणी विचारवंत ज्ञानी पुरुषच संसारातून निवृत्त होऊन भगवंतांच्या स्वरूपभूत परमानंदाचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून ज्यांचा परमार्थाकडे ओढा नाही आणि जे गुणांमुळे डळमळित झाले आहेत, त्यांच्या कल्याणासाठीच आपण भगवंतांच्या लीलांचे वर्णन करावे. (१६)


त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरेः
     भजन् अपक्वोऽथ पतेत् ततो यदि ।
यत्र क्व वाभद्रमभूदमुष्य किं
     को वार्थ आप्तोऽभजतां स्वधर्मतः ॥ १७ ॥
त्यागोनि धर्म भजि जो पदाला
    होता असा पक्व भिती न त्याला ।
भक्तीविना जो घडतो स्वधर्म
    त्यासी मिळेना निजलाभ कांही ॥ १७ ॥

स्वधर्मं - स्वधर्माला - त्यक्त्वा - टाकून - हरेः - भगवंताच्या - चरणाम्बुजं - पादकमळाला - भजन् - सेवणारा - अपक्वः - पूर्णावस्थेस न पोचलेला असुनही - अथ - नंतर - ततः - तेथून - यदि - जर - पतेत् - पडेल तर - यत्र - जेथे - क्व वा - कोठेही - अमुष्य - ह्याचे - अभद्रं - अकल्याण - अभूत् - होईल - किं - काय ? - वा - किंवा - अभजता - भजन न करणार्‍यांना - स्वधर्मतः - स्वधर्मापासून - कः - कोणता - अर्थः - लाभ - आप्तः - मिळाला. ॥१७॥
जो मनुष्य आपल्या धर्माचा त्याग करून भगवच्चरणांची सेवा करतो, परंतु सिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच जर त्याचे भजन-पूजन सुटले तर त्याचे काही अमंगल होते का ? परंतु दुसरा कोणी भगवंतांचे भजन न करता केवळ स्वधर्माचे पालन करतो, त्याला कोणता बरे लाभ होतो ? (१७)


(इंद्रवंशा)
तस्यैव हेतोः प्रयतेत कोविदो
     न लभ्यते यद्‍भ्रमतामुपर्यधः ।
तल्लभ्यते दुःखवदन्यतः सुखं
     कालेन सर्वत्र गभीररंहसा ॥ १८ ॥
योनीत सा-या भ्रमला जरी तो
    ना लाभ काही श्रम ते सरेना ।
विद्वान त्यांनी करणे विचार
    कर्मेचि लाभे सुख दुःख सारे ॥ १८ ॥

यत् - जे - उपरि - वरती - अधः - खालती - भ्रमतां - फिरणार्‍यांना - न लभ्यते - मिळत नाही - तस्य - त्याच्या - एव - च - हेतोः - कारणास्तव - कोविदः - विव्दान - प्रयतेत - प्रयत्न करावा; - अन्यतः - अन्यप्रकारे वागल्यास - तत् - ते - सुखं - सुख - सर्वत्र - सर्वठिकाणी - गंभीररंहसा - गंभीर वेग असणार्‍या - कालेन - कालाकडून - दुःखवत् - दुःखासारखे - लभ्यते - मिळते. ॥१८॥
अशाच वस्तूच्या प्राप्तीसाठी बुद्धिमान मनुष्याने प्रयत्‍न केले पाहिजेत की जी वस्तू मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व उच्च-नीच योनीत केलेल्या कर्मांचे फलस्वरूप म्हणून प्राप्त होत नाही. अचिंत्यगति काळाच्या नियमानुसार दुःखाप्रमाणे विषयसुख सर्वांना स्वभावतःच प्राप्त होते. (१८)


(वंशस्थ)
न वै जनो जातु कथञ्चनाव्रजेत्
     मुकुंदसेव्यन्यवदङ्ग संसृतिम् ।
स्मरन् मुकुंदाङ्घ्र्युपगूहनं पुनः
     विहातुमिच्छेन्न रसग्रहो जनः ॥ १९ ॥
जो कृष्णापायी कमळी निमाला
    संसार त्याला इतरां प्रमाणे ।
ना भेडवी तो नशिबी जरी ते
    जाता पदाला न फिरे कधीही ॥ १९ ॥

अंग - अहो ! - मुकुन्दसेवी - भगवंताची सेवा करणारा - जनः - जन - अन्यवत् - इतराप्रमाणे - संसृतिं - संसाराला - जातु - केव्हाही - कथंचन - कोणत्याही प्रसंगी - वै - खरोखर - न आव्रजेत् - प्राप्त होणार नाही - मुकुन्दाङ्घ्न्युपगूहनं - ईश्वरचरणाच्या आलिंगनाला - स्मरन् - स्मरण करणारा - पुनः - पुन्हा - विहातुं - टाकण्याला - न इच्छेत् - इच्छा करणार नाही - यतः - ज्या कारणास्तव - रसग्रहः - तेथे रसालाभ आहे. ॥१९॥
हे मुने, जो भगवान श्रीकृष्णांचा चरणसेवक आहे, तो भगवद्‌भजन न करणार्‍या पण धर्म-कर्म करणार्‍या मनुष्याप्रमाणे, दैववशात काही पापकर्म झाले तरी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात अडकत नाही. तो सेवक भगवच्चरणाच्या आलिंगनाचे स्मरण झाल्यावर त्यापासून परावृत्त होऊ इच्छित नाही, कारण त्याला भगवद्‌रसाची गोडी लागलेली असते. (१९)


इदं हि विश्वं भगवानिवेतरो
     यतो जगत्स्थाननिरोधसंभवाः ।
तद्धि स्वयं वेद भवांस्तथापि वै
     प्रादेशमात्रं भवतः प्रदर्शितम् ॥ २० ॥
हेतू जयाचे जग सर्व आहे
    त्या श्रीहरीचे जगरूप सारे ।
दिसोनि राही हरि तो निराळा
    संकेत माझा तुम्हि जाणता तो ॥ २० ॥

हि - खरोखर - इदं - हे - विश्वं - जग - भगवान् - परमेश्वर - इव - प्रमाणे - इतरः - भिन्न - यतः - ज्यापासून - जगत्स्थाननिरोधसंभवाः - जगाची स्थिती, विनाश व उत्पत्ति - तत् - ते - हि - सुद्धा - भवान् - आपण - स्वयं - स्वतः - वेद - जाणता - तथापि - तरीही - वै - सुद्धा - भवतः - आपणाला - प्रादेशमात्रं - टीचभर म्हणजे थोडेसे - प्रदर्शितं - दाखविले आहे. ॥२०॥
ज्यांच्यापासून या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो, ते भगवम्तच या विश्वाच्या रूपाने आहेत. ही गोष्ठ आपण जाणत आहातच, तरीसुद्धा मी आपल्याला या गोष्टीची आठवण करून दिली आहे. (२०)


त्वमात्मनात्मानमवेह्यमोघदृक्
     परस्य पुंसः परमात्मनः कलाम् ।
अजं प्रजातं जगतः शिवाय तन्
     महानुभावाभ्युदयोऽधिगण्यताम् ॥ २१ ॥
जी लाभली दिव्य तुम्हास दृष्टी
    लावोनि पाहा अवतार तुम्ही ।
तो मुक्त आत्मा असला तरीही
    लोकार्थ सांगा हरिकीर्तने ती ॥ २१ ॥

अमोघदृक् - हे यतार्थज्ञानसंपन्ना ! - त्वं - तू - आत्मना - स्वतः - आत्मानं - स्वतःला - अजं - जन्मरहित - जगतः - जगाच्या - शिवाय - कल्याणाकरिता - परस्य - श्रेष्ठ - पुंसः - पुरुषाच्या - परमात्मनः - अर्थात परमेश्वराच्या - कलां - अंशभूत असा - प्रजातं - उत्पन्न झालेला असे - अवेहि - समज - तत् - त्याकारणास्तव - महानुभावाभ्युदयः - मोठी आहे कीर्ति ज्याची अशा परमेश्वराचा पराक्रम - अधिगण्यतां - वर्णिला जावो. ॥२१॥
आपली दृष्टी अचूक आहे. आपण हे समजून घ्या की, आपण पुरुषोत्तम भगवंतांचे कलावतार आहात. आपण अजन्मा असूनही जगताच्या कल्याणासाठी जन्म घेतला आहे. म्हणून आपणच विशेष करून भगवंतांच्या लीलांचे वर्णन करावे. (२१)


इदं हि पुंसस्तपसः श्रुतस्य वा
     स्विष्टस्य सूक्तस्य च बुद्धिदत्तयोः ।
अविच्युतोऽर्थः कविभिर्निरूपितो
     यदुत्तमश्लोक गुणानुवर्णनम् ॥ २२ ॥
ज्ञानी असे सांगति सार सारे
    वेदे तपे यज्ञ नि दान ज्ञाने ।
स्वाध्याय यांनी भजनी मिळावे
    त्या कृष्ण लीला भजनात गाव्या ॥ २२ ॥

यत् - जे - उत्तमश्लोकगुणानुवर्णनं - श्रेष्ठ आहे कीर्ति ज्याची अशा परमेश्वराचे गुणवर्णन - इदं - हे - हि - च - पुंसः - पुरुषाच्या - तपसः - तपश्चर्येचे - वा - किंवा - श्रुतस्य - श्रवणाचे - स्विष्टस्य - यज्ञादिकांचे - सूक्तस्य - अध्ययनाचे - च - आणि - बुद्धिदत्तयोः - ज्ञान व दान ह्या दोहोंचे - अविच्युतः - सतत चालणारे - अर्थः - फल असे - कविभिः - विव्दानांनी - निरूपितः - सांगितले आहे. ॥२२॥
विद्वानांचे म्हणणे असे आहे की मनुष्याने केलेले तप, वेदाध्ययन, यज्ञाचे अनुष्ठान, स्वाध्याय, ज्ञान आणि दान यांचा एकमेव उद्देश हाच आहे की, पुण्यकीर्ति श्रीकृष्णांचे गुण आणि लीला यांचे वर्णन केले जावे. (२२)


(इंद्रवंशा)
अहं पुरातीतभवेऽभवं मुने
     दास्यास्तु कस्याश्चन वेदवादिनाम् ।
निरूपितो बालक एव योगिनां
     शुश्रूषणे प्रावृषि निर्विविक्षताम् ॥ २३ ॥
मागील जन्मी सुत मी जियेचा
    ती विप्र दासी, भजलो पित्याला ।
चातूरमासीहि तशीच सेवा
    संतास केली जरि मी शिशू हो ॥ २३ ॥

मुने - हे ऋषे - अहं - मी - तु - तर - पुरा - पूर्वी - अतीतभवे - गेल्या जन्मात - वेदवादिनां - वेदवेत्त्यांच्या - कस्याश्चन - कोण्या एक - दास्याः - दासीपासून - अभवं - जन्मलो - बालकः - लहान असता - एव - च - प्रावृषि - पावसाळ्यात - निर्विविक्षतां - एकत्र राहण्याची इच्छा करणार्‍या - योगिनां - योग्यांच्या - शुश्रूषणे - सेवेत - निरूपितः - योजिला गेलो. ॥२३॥
हे मुने, मागील कल्पातील माझ्या पूर्वजन्मी मी एका वेदसम्पन्न ब्राह्मणांच्या दासीचा मुलगा होतो. एका पावसाळ्यात काही योगीजन तेथे चातुर्मास व्यतीत करीत होते. लहानपणीच मला त्यांची सेवा करण्यास सांगितले. (२३)


ते मय्यपेताखिलचापलेऽर्भके
     दान्तेऽधृतक्रीडनकेऽनुवर्तिनि ।
चक्रुः कृपां यद्यपि तुल्यदर्शनाः
     शुश्रूषमाणे मुनयोऽल्पभाषिणि ॥ २४ ॥
न अंगि चांचल्य कधी न खेळे
    जिंतेंद्रियो नी नित लोकसेवा ।
बोले कमी फार तसेचि शील
    पाहोनि संते मज बोध केला ॥ २४ ॥

यद्यपि - जरीही - तुल्यदर्शनाः - समदृष्टि ठेवणारे - ते - ते - मुनयः - ऋषि - अपेताखिलचापले - नाहीसे झाले आहे सर्व चांचल्य ज्यांचे अशा - दान्ते - व इंद्रियनिग्रह केलेल्या अशा - अघृतक्रीडनके - खेळण्याचा नाद नसणार्‍या - अनुवर्तिनि - अनुकूल वागणार्‍या - शुश्रूषमाणे - सेवा करणार्‍या - अल्पभाषिणि - थोडे बोलणार्‍या - अर्भके - लहान अशा - मयि - माझ्यावर - कृपां - दया - चक्रुः - करू लागले. ॥२४॥
मी जरी लहान होतो, तरीपण कोणत्याही प्रकारच्या खोड्या करीत नसे, इंद्रिये माझ्या अधीन होती. खेळण्याबागडण्यापासून मी दूर होतो आणि त्यांच्या आज्ञेनुसार त्यांची सेवा करीत असे. मी फार कमी बोलत होतो. माझे हे चांगले वर्तन पाहून समदर्शी असूनही त्या योग्यांनी माझ्यावर अनुग्रह केला. (२४)


उच्छिष्टलेपाननुमोदितो द्विजैः
     सकृत्स्म भुञ्जे तदपास्तकिल्बिषः ।
एवं प्रवृत्तस्य विशुद्धचेतसः
     तद्धर्म एवात्मरुचिः प्रजायते ॥ २५ ॥
घेई तयांच्या अनुमोदनाने
    थाळीत अन्नो अन सेवि उष्टे ।
त्या सेवने पाप धुवोनि गेले
    नी कीर्तनाने रमलो सवे त्यां ॥ २५ ॥

व्दिजैः - व्दिजांनी म्हणजे ब्राह्मणादि त्रिवर्गांनी - उच्छिष्टलेपान् - उष्टया पानांना चिकटलेल्या पदार्थांना - अनुमोदितः - खाण्याबद्दल संमती दिलेला - तदपास्तकिल्बिषः - व त्यामुळे नष्ट झाले आहे पाप ज्याचे असा - सकृत् - एकदाच - भुञ्जे स्म - भोजन करीत असे - एवं - याप्रमाणे - प्रवृत्तस्य - वागणार्‍या - विशुद्धचेतसः - व शुद्धान्तःकरणाच्या - तद्धर्मे - त्यांच्या धर्मात - एव - च - आत्मरुचिः - स्वतःची प्रीती - प्रजायते - उत्पन्न झाली. ॥२५॥
त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या पात्रातील उरलेले अन्न मी दिवसातून एक वेळ खात असे. त्यामुळे माझी सर्व पापे नाहीशी झाली. अशा प्रकारे त्यांची सेवा करता करता माझे हृदय शुद्ध झाले आणि ते लोक जे भजन-पूजन करीत असत, त्यात मला गोडी वाटू लागली. (२५)


(वंशस्थ)
तत्रान्वहं कृष्णकथाः प्रगायतां
     अनुग्रहेणाश्रृणवं मनोहराः ।
ताः श्रद्धया मेऽनुपदं विश्रृण्वतः
     प्रियश्रवस्यङ्ग ममाभवद् रुचिः ॥ २६ ॥
त्या संगतीने नित रोज वार्ता
    श्रीकृष्णलीला स्मरलो मनासी ।
श्रद्धा असे रोज बसोनि राही
    तेणे मनीं प्रीत कृष्णीं निमाली ॥ २६ ॥

तत्र - तेथे - अन्वहं - दररोज - मनोहराः - मनोहर अशा - कृष्णकथाः - भगवंताच्या कथा - प्रगायतां - गाणार्‍यांच्या - अनुग्रहेण - कृपेने - अशृणवं - ऐकता झालो - मे - माझ्या - श्रद्धया - श्रद्धेने - अंग - अहो ! - ताः - त्या - अनुपदं - प्रत्येक पदागणिक - विशृण्वतः - विचारपूर्वक श्रवण करणार्‍या - मम - माझी - प्रियश्रवसि - प्रिय आहे कीर्ति ज्याची अशा भगवंताच्या ठिकाणी - रुचिः - आवड म्हणजे प्रेम - अभवत् - झाले. ॥२६॥
त्या सत्संगात लीलागानपरायण महात्म्यांचा अनुग्रह झाल्याने मी दररोज श्रीकृष्णांच्या मनोहर कथा ऐकू लागलो. श्रद्धापूर्वक एक एक कथा ऐकत गेल्याने प्रियकीर्ति भगवंताविषयी मला प्रेम वाटू लागले. (२६)


(इंद्रवंशा)
तस्मिंस्तदा लब्धरुचेर्महामते
     प्रियश्रवस्यस्खलिता मतिर्मम ।
ययाहमेतत् सदसत्स्वमायया
     पश्ये मयि ब्रह्मणि कल्पितं परे ॥ २७ ॥
ऐका मुनी प्रेम कृष्णीं निमाले
    तेव्हा प्रभूने स्थिरबुद्धि केली ।
चराचरी जे लपले असे ते
    मी ब्रह्मरूपासहि ओळखीले ॥ २७ ॥

महामुने - हे महर्षे - तदा - त्यावेळी - तस्मिन् - त्या - प्रियश्रवसि - प्रिय आहे ज्याची कीर्ति अशा परमेश्वराचे ठिकाणी - लब्धरुचेः - गोडी लागलेल्या - मम - माझी - मतिः - बुद्धि - अस्खलिता - न अडखळणारी अशी झाली - अहं - मी - यया - जिने - एतत् - हे - सदसत् - सत् म्हणजे सूक्ष्म व असत् म्हणजे स्थूल असे - स्वमायया - आत्ममायेच्या योगे - परे - श्रेष्ठ - ब्रह्मणि - ब्रह्मरूप अशा - मयि - माझे ठिकाणी - कल्पितं - कल्पित केले आहे असे - पश्ये - पाहतो. ॥२७॥
हे महामुनि, जसजशी मला भगवंतांच्या विषयी ओढ वाटू लागली, तसतशी त्यांचे ठिकाणी माझी बुद्धी स्थिर झाली. या स्थिरबुद्धीमुळे या संपूर्ण कार्यकारणरूप जगातला असूनही मी माझ्या परब्रह्मास्वरूप आत्म्यामध्ये, "ही माया आहे," अशी कल्पना करू लागलो. (२७)


इत्थं शरत् प्रावृषिकावृतू हरेः
     विश्रृण्वतो मेऽनुसवं यशोऽमलम् ।
सङ्कीर्त्यमानं मुनिभिर्महात्मभिः
     भक्तिः प्रवृत्ताऽऽत्मरजस्तमोपहा ॥ २८ ॥
पाऊस थंडीत तिन्ही हि वेळी
    कथा हरीची नित ऐकिली मी ।
रजो तमाचा मुळि नाश झाला
    भक्तीवसा या हृदयात आला ॥ २८ ॥

इत्थं - याप्रमाणे - शरत्प्रावृषिकौ - शरत् व वर्षा असे - ऋतू - दोन ऋतूपर्यंत - महात्मभिः - थोर मनाच्या - मुनिभिः - ऋषींनी - अनुसवं - वेळोवेळी - सङ्कीर्त्यमानं - वर्णिलेले - अमलं - निर्मळ - हरेः - परमेश्वराचे - यशः - यश - विशृण्वतः - विशेष रीतीने श्रवण करणार्‍या - मे - माझी - आत्मरजस्तमोपहा - आत्म्यावरील रजोगुण व तमोगुण ह्यांस नाहीशी करणारी - भक्तिः - भक्ति - प्रवृत्ता - वाढली म्हणजे उत्पन्न झाली. ॥२८॥
अशा प्रकारे वर्षा आणि शरद या दोन ऋतुकालांत ते महात्मे दिवसातून तिन्ही वेळी श्रीहरींच्या मंगलमय यशाचे संकीर्तन करीत असत आणि मी ते प्रेमभराने ऐकत असे. त्यामुळे चित्तातील रजोगुण आणि तमोगुण नाहीशी करणारी भक्ती माझ्या हृदयात उदय पावू लागली. (२८)


(अनुष्टुप्)
तस्यैवं मेऽनुरक्तस्य प्रश्रितस्य हतैनसः ।
श्रद्दधानस्य बालस्य दान्तस्यानुचरस्य च ॥ २९ ॥
(अनुष्टुप)
लाडका विनयी होतो श्रद्धाळू संयमी असा ।
शरीरे मन वाणीने आज्ञाधारीच जाहलो ॥ २९ ॥

एवं - ह्याप्रमाणे - अनुरक्तस्य - प्रेम करणार्‍या - प्रश्रितस्य - नम्र - हतैनसः - निष्पाप - श्रद्दधानस्य - श्रद्धा ठेवणार्‍या - दान्तस्य - जितेंद्रिय - च - आणि - अनुचरस्य - सेवा करणार्‍या अशा - बालस्य - लहान - मे - माझ्यावर ॥२९॥
मी प्रेमळ आणि विनम्र होतो. त्यांच्या सेवेने माझे पाप नाहीसे झाले. माझ्या हृदयात श्रद्धा होती. मी इंद्रियांचा संयम केला होता. तसेच मी त्यांचा आज्ञाधारक होतो. (३९)


ज्ञानं गुह्यतमं यत्तत् साक्षाद्‍भगवतोदितम् ।
अन्ववोचन् गमिष्यन्तः कृपया दीनवत्सलाः ॥ ३० ॥
दीनवत्सल संतांनी कृपेने गुह्यज्ञान जे ।
दिले ते स्वमुखे देवे पुन्हाही उपदेशिले ॥ ३० ॥

गमिष्यन्तः - जाणारे - दीनवत्सलः - व दीनावर प्रेम करणारे - यत् - जे - साक्षात् - प्रत्यक्ष - भगवता - ईश्वराने - उदितं - सांगितले - तत् - ते - गुह्यतमं - अत्यंत गूढ असे - ज्ञान - ज्ञान - कृपया - कृपेने - अन्ववोचन् - सांगते झाले. ॥३०॥
ज्या गुह्यतम ज्ञानाचा उपदेश स्वतः भगवंतांनी आपल्या मुखाने केला होता, ते ज्ञान, त्या दीनवत्सल महात्म्यांनी कृपाळू होऊन, तेथून जातेवेळी मला दिले. (३०)


येनैवाहं भगवतो वासुदेवस्य वेधसः ।
मायानुभावमविदं येन गच्छन्ति तत्पदम् ॥ ३१ ॥
अशा या उपदेशाने जगाचा आदि कृष्ण जो ।
तयाची कळली माया जेणे मुक्तीच लाभते ॥ ३१ ॥

येन - ज्यायोगे - एव - च - अहं - मी - भगवतः - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न अशा - वेधसः - व एकाचे अनेक करू शकणार्‍या अशा - वासुदेवस्य - सर्वत्र प्रकाशमान अशा परमेश्वराच्या - मायानुभावं - मायेच्या सामर्थ्याला - अविदं - जाणता झालो - येन - ज्यामुळे - तत्पदं - त्या स्थानाला म्हणजे ब्रह्मपदाला - गच्छन्ति - जातात. ॥३१॥
त्या उपदेशामुळेच या जगताचे निर्माते भगवान श्रीकृष्ण यांच्या मायेच्या त्या प्रभावाला मी जाणू शकलो. जे जाणल्याने भगवंतांच्या परमपदाची प्राप्ती होते. (३१)


एतत् संसूचितं ब्रह्मन् तापत्रयचिकित्सितम् ।
यदीश्वरे भगवति कर्म ब्रह्मणि भावितम् ॥ ३२ ॥
व्यासजी सत्यसंकल्पा ! कर्म कृष्णसि अर्पिणे ।
औषधे हरिती ताप गुह्य हे वदलो तुम्हा ॥ ३२ ॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मरूपा म्हणजे ब्रह्मज्ञा - यत् - जे - भगवति - भगवान - ब्रह्मणि - ब्रह्मस्वरूप अशा - ईश्वरे - परमेश्वराचे ठिकाणी - भावितं - अर्पण केलेले - कर्म - कर्म - एतत् - हे - तापत्रयचिकित्सितम् - तीनही तापांना नाहीसे करणारे असे - संसूचितं - सुचविले आहे. ॥३२॥
हे ब्रह्मन्, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनाच सर्व कर्मे समर्पित करणे, हेच संसारातील त्रिविध तापांवर एकमात्र औषध आहे, हे मी आपणास सांगितले. (३२)


आमयो यश्च भूतानां जायते येन सुव्रत ।
तदेव ह्यामयं द्रव्यं न पुनाति चिकित्सितम् ॥ ३३ ॥
प्राण्यांनी सेविता अन्न होतो जो रोग तो पुन्हा ।
हरतो त्याच अन्नाने चिकित्सा होतसे तशी ॥ ३३ ॥

सुव्रत - अहो चांगल्या रीतीने व्रताचरण करणारे हो ! - च - आणि - भूतानां - प्राण्यांना - यः - जो - आमयः - रोग - येन - ज्याने - जायते - उत्पन्न होतो - तत् - ते - एव - च - द्रव्यं - द्रव्य - आमयं - रोगाला - न - नाहीसे करीत नाही - हि - तरीही - चिकित्सितं - तेच चिकित्सापूर्वक योजिलेले म्हणजे औषधांच्या भावनेने शुद्ध केलेले - पुनाति - पवित्र करते. ॥३३॥
प्राण्यांना ज्या पदार्थाच्या सेवनामुळे एखादा रोग होतो, त्याच पदार्थाची चिकीत्सा करून त्याचा प्रयोग केल्यावर तो रोग नाहीसा होणार नाही काय ? (३३)


एवं नृणां क्रियायोगाः सर्वे संसृतिहेतवः ।
त एवात्मविनाशाय कल्पन्ते कल्पिताः परे ॥ ३४ ॥
भवचक्रात कर्माने गुंततो जरि जीव हा ।
अर्पिता भगवंताला कर्माचे कार्य योजिणे ॥ ३४ ॥

एवं - याप्रमाणे - नृणां - मनुष्यांची - सर्वे - सगळी - क्रियायोगाः - कर्माचरणे - संसृतिहेतवः - संसाराला कारणीभूत - ते - ती - एव - च - परे - परमेश्वराचे ठिकाणी - कल्पिताः - योजिलेली - आत्मविनाशाय - आत्म्याच्या संसाराचा नाश करण्यास - कल्पन्ते - समर्थ होतात. ॥३४॥
याप्रमाणे जरी मनुष्याची सर्व कर्मे त्याला जन्म-मृत्यूरूप संसारचक्रात अडकवितात, तरीसुद्धा जर ती कर्मे भगवंतांना समर्पण केली, तर त्याचे कर्मपणच (कर्मबंधन) नष्ट होते. (३४)


यदत्र क्रियते कर्म भगवत् परितोषणम् ।
ज्ञानं यत् तद् अधीनं हि भक्तियोगसमन्वितम् ॥ ३५ ॥
या लोकी शुद्ध शास्त्राने कृष्णार्थ कर्म योजिणे ।
पराभक्ति असे ज्ञान लाभते नच संशय ॥ ३५ ॥

अत्र - येथे - यत् - जे - भगवत्परितोषणं - ईश्वराला संतुष्ट करणारे - कर्म - कर्म - क्रियते - केले जाते - यत् - जे - भक्तियोगसमन्वितं - भक्तियोगाने युक्त - ज्ञानं - ज्ञान - हि - खरोखर - तदधीनं - त्याच्याच स्वाधीन ॥३५॥
या लोकी जे शास्त्रविहित कर्म भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केले जाते, त्यापासूनच पराभक्तियुक्त ज्ञानाची प्राप्ती होते. (३५)


कुर्वाणा यत्र कर्माणि भगवच्छिक्षयासकृत् ।
गृणन्ति गुणनामानि कृष्णस्यानुस्मरन्ति च ॥ ३६ ॥
भगवत् कर्म मार्गात त्यांचे आज्ञेत राहुनी ।
नामसंकीर्तनी ध्यानी कृष्ण गौरव तो हवा ॥ ३६ ॥

यत्र - जेथे - भगवच्छिक्षया - भगवंताच्या उपदेशाप्रमाणे - असकृत् - वारंवार - कर्माणि - कर्मे - कुर्वाणाः - करणारे - कृष्णस्य - भगवंताचे - गुणनामानि - गुण व नावे - गृणन्ति - वर्णितात - च - आणि - अनुस्मरन्ति - स्मरतात. ॥३६॥
त्या भगवत्प्रीत्यर्थ केल्या जाणार्‍या कर्ममार्गावर, भगवंतांच्या आज्ञेनुसार आचरण करीत लोक वारंवार भगवंतांचे गुण व नामांचे कीर्तन करीत त्यांचे स्मरण करतात. (३६)


नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि ।
प्रद्युम्नायानिरुद्धाय नमः सङ्कर्षणाय च ॥ ३७ ॥
नमस्ते वासुदेवाला ध्यातो मी भगवान् मनीं ।
संकर्षणा अनिरुद्धा प्रद्युम्ना ही नमो नमः ॥ ३७ ॥

भगवते - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न व - वासुदेवाय - सर्वत्र दैदीप्यमान अशा किंवा वसुदेवपुत्र अशा नावाने प्रसिद्ध असणार्‍या - तुभ्यं - तुला - नमः - नमस्कार असो - प्रद्युम्नाय - ऐश्वर्यसंपन्न अशा प्रद्युम्नाला - अनिरुद्धाय - अकुंठगतीच्या अनिरुद्धाला - च - आणि - संकर्षणाय - सर्वांचे आकर्षण करणार्‍या संकर्षणाला - नमः - नमस्कारपूर्वक - धीमही - आम्ही ध्यातो. ॥३७॥
प्रभो ! भगवान श्रीवासुदेवांना माझा नमस्कार असो. आम्ही आपले ध्यान करतो. प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण यांनाही नमस्कार असो. (३७)


इति मूर्त्यभिधानेन मंत्रमूर्तिममूर्तिकम् ।
यजते यज्ञपुरुषं स सम्यग् दर्शनः पुमान् ॥ ३८ ॥
चतुर्युह अशी मूर्ती अरूप मंत्ररूपिणी ।
यज्ञात पूजिता नित्य पूर्ण ज्ञानचि होतसे ॥ ३८ ॥

इति - याप्रमाणे - मूर्त्यभिधानेन - मूर्तींच्या नावांनी - अमूर्तिकं - मूर्तिरहित - मंत्रमूर्तिं - व मंत्र हीच ज्याची मूर्ति अशा - यज्ञपुरुषं - यज्ञस्वरूपी परमेश्वराला - यजते - पूजितो - सः - तो - पुमान् - पुरुष - सम्यग्दर्शनः - उत्तम ज्ञानी ॥३८॥
या प्रकारे जो पुरुष भगवंतांच्या मूर्तींच्या नामद्वारा, मंत्राखेरीज वेगळी मूर्ती नसलेल्या, मंत्रमूर्ती भगवान यज्ञपुरुषाचे पूजन करतो, त्याचेच ज्ञान पूर्ण आणि यथार्थ आहे. (३२-३८)


इमं स्वनिगमं ब्रह्मन् अवेत्य मदनुष्ठितम् ।
अदान्मे ज्ञानमैश्वर्यं स्वस्मिन् भावं च केशवः ॥ ३९ ॥
ब्रह्मन् ! मी भगवंताची आज्ञा पाळोनि जाणिले ।
ऐश्वर्य भक्ति नी ज्ञान त्याने दान दिले मला ॥ ३९ ॥

ब्रह्मन् - ब्राह्मण हो ! - केशवः - श्रीकृष्ण - इमं - ह्या - मदनुष्ठितं - माझ्याकडून आचरण केलेल्या - स्वनिगमं - आत्मोपदेशाला - अवेत्य - जाणून - मे - मला - ऐश्वर्यं - ईश्वरासंबंधी - ज्ञानं - ज्ञान - च - आणि - स्वस्मिन् - परमेश्वराचे ठिकाणी - भावं - भक्ति - अदात् - देता झाला. ॥३९॥
ब्रह्मर्षी, मी जेव्हा भगवंतांच्या आज्ञेचे याप्रकारे पालन केले, तेव्हा हे जाणून भगवान श्रीकृष्णांनी मला आत्मज्ञान, ऐश्वर्य आणि आपली भक्ती प्रदान केली. (३९)


(इंद्रवंशा)
त्वमप्यदभ्रश्रुत विश्रुतं विभोः
     समाप्यते येन विदां बुभुत्सितम् ।
प्राख्याहि दुःखैर्मुहुरर्दितात्मनां
     संक्लेशनिर्वाणमुशन्ति नान्यथा ॥ ४० ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
प्रथमस्कन्धे व्यासनारदसंवादे पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥
(इंद्रवज्रा)
ज्ञानी तुम्ही व्यास जगास सांगा
    श्रीकृष्णलीला अन कीर्ति त्याची ।
जिज्ञासु ऐकोनिच तृप्त होती
    त्या अन्य मार्गे बहु दुःख घोर ॥ ४० ॥
॥ इति श्रीमद्‍भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥
॥ पाचवा अध्याय हा ॥ १ ॥ ५ ॥

अदभ्रश्रुत - हे बहुश्रुत - त्वं - तू - अपि - हि - येन - ज्याने - विदां - ज्ञान्यांची - बुभुत्सितं - भोग्यविषयक इच्छा - समाप्यते - समाप्त होते असे - विभोः - ईश्वराचे - विश्रुतं - सर्वश्रुत यश - आख्याहि - वर्णन कर - यत् - ज्यामुळे - दुःखैः - दुःखांनी - मुहुः - वारंवार - अर्दितात्मनां - पीडिलेल्यांच्या - संक्लेशनिर्वाणं - दुःखशांतीला - उशन्ति - सेवितात - अन्यथा - अन्यप्रकारे - न - नाही. ॥४०॥
आपण पूर्ण ज्ञानी आहात. आपण भगवंतांच्या कीर्तीचे वर्णन करा. त्यामुळे मोठमोठ्या ज्ञानी लोकांची जिज्ञासाही पूर्ण होईल. जे लोक संसारदुःखामुळे वारंवार व्यथित होत आहेत, त्यांच्या दुःखाची निवृत्तीही यामुळे होऊ शकते. दुसरा कोणताही उपाय नाही. (४०)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां प्रथमः स्कन्धे पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥
अध्याय पाचवा समाप्त

GO TOP