श्रीमद् भागवत पुराण
प्रथमः स्कन्धः
तृतीयोऽध्यायः

भगवतश्चतुर्विंशति अवताराणां संक्षेपतो वर्णनम् -

भगवंतांच्या अवतारांचे वर्णन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


सूत उवाच ।
(अनुष्टुप्)
जगृहे पौरुषं रूपं भगवान् महदादिभिः ।
संभूतं षोडशकलं आदौ लोकसिसृक्षया ॥। १ ॥
सूतजी सांगतात -
( अनुष्टुप् )
भगवंते स्व‍इच्छेने महत्तत्वातुनी असे ।
घेतले पुरुषीरूप कळा सोळा अशा पहा ॥ १ ॥

सूत उवाच - सूत म्हणतात - आदौ - प्रथमारंभी - भगवान् - परमेश्वराने - लोकसिसृक्षया - ब्रह्मांडगोल निर्माण करावेत अशा इच्छेने - महदादिभिः - पंचमहाभूतादि - संभूतं - उत्पन्न करून - षोडशकलं - षोडशकलांनी युक्त असे - पौरुषं रूपं - पुरुषाचे स्वरूप - जगृहे - धारण केले. ॥१॥
सूत म्हणतात - सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांना लोकनिर्मितीची इच्छा उत्पन्न झाली. तेव्हा त्यांनी महत्तत्त्व आदींपासून दहा इंद्रिये, पंचमहाभूते आणि एक मन अशा सोळा कलांनी युक्त पुरुषरूप ग्रहण केले. (१)


यस्याम्भसि शयानस्य योगनिद्रां वितन्वतः ।
नाभिह्रदाम्बुजादासीद् ब्रह्मा विश्वसृजां पतिः ॥ २ ॥
लाविली योगनिद्रे ती विशाल सागरात त्या ।
नाभीत उगवे पद्म ब्रह्मा त्यातून जन्मला ॥ २ ॥

विश्वसृजां - जगत् निर्माण करणाऱ्यांचा - पतिः - स्वामी असा - ब्रह्मा - ब्रह्मदेव - अम्भसि - उदकामध्ये - शयानस्य - निद्रा घेणाऱ्या - योगनिद्रां - समाधिनिद्रेला - वितन्वतः - प्रगट करणाऱ्या - यस्य - ज्याच्या - नाभिहृदाम्बुजात् - नाभिरुपी डोहातील कमलापासून - आसीत - झाला. ॥२॥
पाण्यात पहुडून योगनिद्रा घेत असताना त्यांच्या नाभिसरोवरातून प्रगट झालेल्या कमळापासून प्रजापतींचे अधिपती ब्रह्मदेव उत्पन्न झाले. (२)


यस्यावयवसंस्थानैः कल्पितो लोकविस्तरः ।
तद् वै भगवतो रूपं विशुद्धं सत्त्वमूर्जितम् ॥। ३ ॥
विराट भगवत् रूप अंगी लोक हि कल्पिले ।
विशुद्ध श्रेष्ठ हे ऐसे सत्वदर्शन होतसे ॥ ३ ॥

यस्य - ज्याच्या - अवयवसंस्थानैः - अवयवांच्या रचनेवरुन - लोकविस्तरः - लोकांचा विस्तार - कल्पितः - मानलेला आहे - तत् - ते - वै - च - विशुध्दं - अत्यंत शुध्द - ऊर्जितं - प्रत्यक्ष प्रगट झालेले - सत्वं - सत्वगुणात्मक - भगवतः - भगवंताचे - रूपम् - स्वरूप. ॥३॥
भगवंतांच्या त्या विराट रूपाच्या अंग-प्रत्यंगांतच सर्व लोकांची कल्पना केली गेली आहे. ते विराट रूप भगवंतांचे विशुद्ध असे सत्त्वमय श्रेष्ठ रूप आहे. (३)


(इंद्रवंशा)
पश्यन्त्यदो रूपमदभ्रचक्षुषा
     सहस्रपादोरुभुजाननाद्‍भुतम् ।
सहस्रमूर्धश्रवणाक्षिनासिकं
     सहस्रमौल्यम्बरकुण्डलोल्लसत् ॥ ४ ॥
(इंद्रवजा)
तपी पहाती नित रूप त्याचे
    हजार पायास हजार मांड्या ।
ती डोकि डोळे अन कान नाक
    प्रकाशत टोप नि कुंडले ती ॥ ४ ॥

अदः - हे - सहस्त्रपादोरुभुजाननाभ्दुतं - हजारो पाय, हजारो मांड्या, हजारो दंड व हजारो मुखे ह्यांनी आश्चर्यजनक - सहस्त्रमूर्धश्रवणाक्षिनासिकम् - हजारो मस्तके, हजारो कान, हजारो डोळे व हजारो नाके, ज्याला आहेत असे - सहस्त्रमौल्यम्बरकुण्डलोल्लसत् - हजारो किरीटे, हजारो वस्त्रे व हजारो कुंडले यांनी शोभणारे - रूपं - स्वरूप - अदभ्रचक्षुषा - विशाल दॄष्टीने - पश्यन्ति - पाहतात. ॥४॥
योगी दिव्य दृष्टीने भगवंतांच्या त्या रूपाचे दर्शन करतात. भगवंतांच्या त्या रूपाला हजारो पाय, जांघा, हात आणि मुखे असल्याने ते अत्यंत विलक्षण आहे. त्यालाच हजारो डोकी, कान, डोळे नाके, तसेच हजारो मुकुट असून ते वस्त्रे आणि कुंडले इत्यादि अलंकारांनी शोभून दिसते. (४)


(अनुष्टुप्)
एतन्नानावताराणां निधानं बीजमव्ययम् ।
यस्यांशांशेन सृज्यन्ते देवतिर्यङ्नरादयः ॥ ५ ॥
( अनुष्टुप )
विराटरूप हे त्याचे त्यातून प्रगटे जग ।
मनुष्य पशु नी पक्षी सा-या योनी तयातुनी ॥ ५ ॥

एतत् - हे - नानावताराणां - नानाप्रकारच्या अवतारांचे - निधानं - लयस्थान व - अव्ययं - कधीही विकृति न पावणारे - बीजं - मूलस्थान. - यस्य - ज्याच्या - अंशांशेन - भागप्रतिभागाने - देवतिर्यड्.नरादयः - देव, पशु, पक्षी, मनुष्य इत्यादी - सृज्यन्ते - उत्पन्न होतात. ॥५॥
भगवंतांचे हे पुरुषरूप ज्याला नारायण म्हणतात, अनेक अवतारांचे उगमस्थान आहे. यातूनच सर्व अवतार प्रगट होतात. या रूपाच्या लहानातील लहान अंशापासून देवता, पशु-पक्षी आणि मनुष्यादी योनींची उत्पत्ती होते. (५)


स एव प्रथमं देवः कौमारं सर्गमाश्रितः ।
चचार दुश्चरं ब्रह्मा ब्रह्मचर्यमखण्डितम् ॥ ६ ॥
सर्गारंभासि ब्रह्म्याला मानसीपुत्र चार ते ।
जाहले घेतले ज्यांनी ब्रह्मचर्य असे व्रत ॥ ६ ॥

प्रथमं - आरंभी - सः - तो - एव - च - देवः - परमेश्वर - कौमारं - कुमार नामक - सर्ग - सृष्टीला - आस्थितः - प्राप्त झालेला - ब्रह्मा - ब्राह्मण - अखण्डितं - सतत - दुश्चरं - आचरण करण्यास कठीण अशा - ब्रह्मचर्य - ब्रह्मचर्याला - चचार - अनुष्ठिता झाला. ॥६॥
त्याच प्रभूनी पहिल्या कौमार-सर्गात सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार या चार ब्राह्मणांच्या रूपाने अवतार ग्रहण करून अत्यंत कठीण अशा ब्रह्मचर्याचे पालन केले. (६)


द्वितीयं तु भवायास्य रसातलगतां महीम् ।
उद्धरिष्यन् उपादत्त यज्ञेशः सौकरं वपुः ॥ ७ ॥
रसातळास ही पृथ्वी गेली श्रीहरि पाहि तो ।
वराह रुप घेवोनी सुखे ती काढिली वरी ॥ ७ ॥

व्दितीयं - दुसरा - तु - तर - यज्ञेशः - यज्ञाधिपती - अस्य - ह्याच्या - भवाय - उत्पत्तीकरिता - रसातलगतां - रसातळास गेलेल्या - महीं - पृथ्वीला - उध्दरिष्यन् - वर काढणारा - सौकरं - वराहसंबंधी - वपुः - स्वरूप - उपादत्त - घेता झाला. ॥७॥
समस्त यज्ञांचे स्वामी असलेल्या या भगवंतांनीच दुसर्‍यावेळी या सृष्टीच्या कल्याणकरता रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी वराहरूप धारण केले. (७)


तृतीयं ऋषिसर्गं वै देवर्षित्वमुपेत्य सः ।
तन्त्रं सात्वतमाचष्ट नैष्कर्म्यं कर्मणां यतः ॥ ८ ॥
नारदा जाहला जन्म पंचरात्र वदे जगा ।
कर्माने कर्म तोडोनी मुक्तिची युक्ति तो वदे ॥ ८ ॥

च - आणखी - तृतीयं - तिसरा - सः - तो - ऋषिसर्गं - ऋषिसृष्टीतील - देवर्षित्वं - देवर्षिपणाला - उपेत्य - प्राप्त होऊन - सात्वतं - पंचरात्रागम - तंत्रं - तंत्र - आचष्ट - सांगता झाला - यतः - ज्यामुळे - कर्मणां - कर्मांची - नैष्कर्म्यम् - नैष्कर्म्यसिध्दि. ॥८॥
ऋषिसर्गात देवर्षी नारदांच्या रूपाने तिसरा अवतार घेतला आणि सात्वत-तंत्राचा (नारद-पंचरात्राचा) उपदेश केला. या तंत्रात कर्मे करूनच कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते, याचे वर्णन आहे. (८)


तुर्ये धर्मकलासर्गे नरनारायणौ ऋषी ।
भूत्वात्मोपशमोपेतं अकरोद् दुश्चरं तपः ॥ ९ ॥
नर नरायणो रुपी चौथा अव्‌‍तार जाहला ।
इंद्रीयदमने त्यांनी तपस्या घोर साधिली ॥ ९ ॥

तुर्ये - चवथ्यात - धर्मकलासर्गे - धर्मपत्नीच्या संततीत - नरनारायणौ - नर व नारायण असे - ऋषी - दोन ॠषी - भूत्वा - होऊन - आत्मोपशमोपेतं - अंतःकरणाच्या शांतीने युक्त - दुश्चरं - व दुर्घट असे - तपः - तप - अकरोत् - केले. ॥९॥
धर्मपत्‍नी मूर्तीपासून त्यांनी नर-नारायणाच्या रूपाने चौथा अवतार धारण केला. या अवतारात त्यांनी ऋषी होऊन मन आणि इंद्रियांचा संयम करून उग्र तपश्चर्या केली. (९)


पञ्चमः कपिलो नाम सिद्धेशः कालविप्लुतम् ।
प्रोवाचासुरये सांख्यं तत्त्वग्रामविनिर्णयम् ॥ १० ॥
पाचवा कपिलो रुपे सांख्यशास्त्र प्रबोधिले ।
आसुरी नाम विप्रासी लुप्त हे ज्ञान बोधिले ॥ १० ॥

पंचमः - पाचवा - कपिलः - कपिल महामुनी - नाम - नामक - सिध्देशः - सिध्द पुरुषात श्रेष्ठ असा - आसुरये - आसुरी ब्राह्मणाला - कालविप्लुतं - कालगतीने नष्ट झालेले - सांख्यं - सांख्य - तत्वग्रामविनिर्णयं - तत्वसमूहांचा ज्यांत निर्णय केला आहे असे - प्रोवाच - सांगता झाला. ॥१०॥
पाचव्या अवतारात हे सिद्धांचे स्वामी ’कपिल’ रूपाने प्रगट झाले आणि त्यांनी काळाच्या ओघात लुप्त झालेले तत्त्वनिर्णय करणारे सांख्यशास्त्र आसुरी नामक ब्राह्मणाला सांगितले. (१०)


षष्ठे अत्रेरपत्यत्वं वृतः प्राप्तोऽनसूयया ।
आन्वीक्षिकीमलर्काय प्रह्लादादिभ्य ऊचिवान् ॥ ११ ॥
अनसूयावरपूर्ते जाहला अत्रिनंदन ।
अवतारी सहाव्या त्या दत्ते अलर्क बोधिले ॥ ११ ॥

षष्ठे - सहाव्यात - अनसूयया - अनसूयेने - वृतः - प्रार्थना केलेला - अत्रेः - अत्रीच्या - अपत्यवं - पुत्रत्वाला - प्राप्तः - प्राप्त झालेला - अलर्काय - अलर्काला - प्रल्हादादिभ्यः - आणि प्रल्हादादिकांना - आन्वीक्षिकीं - आत्मविद्या - ऊचिवान् - सांगता झाला. ॥११॥
अनसूयेने वर मागितल्यावरून सहाव्या अवतारात ते अत्रिपुत्र दत्तात्रेय झाले. या अवतारात त्यांनी अलर्क, प्रह्लाद आदींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. (११)


ततः सप्तम आकूत्यां रुचेर्यज्ञोऽभ्यजायत ।
स यामाद्यैः सुरगणैः अपात् स्वायंभुवान्तरम् ॥ १२ ॥
जन्मले यज्ञरुपाने रुची आकुचिता सुतो ।
सवे घेवोनिया याम देवांना रक्षिले तदा ।
मन्वंतरास जो या त्या स्वायंभूवास रक्षिले ॥ १२ ॥

ततः - त्यानंतर - सप्तमे - सातव्यात - रुचेः - रुचीच्या - आकूत्यां - आकूतीच्या ठिकाणी - यज्ञः - यज्ञ - अभ्यजायत - जन्मला - सः - तो - यामाद्यैः - यामादिक - सुरगणैः - देवगणांसह - स्वायंभुवांतरं - स्वायंभुवमन्वंतराला - अपात् - रक्षिता झाला. ॥१२॥
सातव्या वेळेला रुची प्रजापतीच्या आकूतिनामक पत्‍नीपासून यज्ञरूपाने अवतार धारण केला आणि आपले पुत्र याम इत्यादी देवांच्या सह स्वायंभुव मन्वंतराचे संरक्षण केले.(१२)


अष्टमे मेरुदेव्यां तु नाभेर्जात उरुक्रमः ।
दर्शयन्वर्त्म धीराणां सर्वाश्रम नमस्कृतम् ॥ १३ ॥
राजा त्या नाभिची पत्‍नी मेरुदेवी कुशीत तो ।
विरागी ऋषभो देव आठवा अवतार तो ।
धीरांना दाविला मार्ग श्रेष्ठ पारमहंस जो ॥ १३ ॥

अष्टमे - आठव्यात - तु - तर - धीराणां - विवेकी पुरुषांच्या - सर्वाश्रमनमस्कृतं - सर्व आश्रमात वंद्य अशा - वर्त्म - मार्गाला - दर्शयन् - दाखविणारा - उरुक्रमः - पराक्रमी - नाभेः - नाभिराजापासून - मेरुदेव्यां - मरुदेवीच्या ठिकाणी - जातः - उत्पन्न झाला. ॥१३॥
भगवंतांनी ऋषभदेवाच्या रूपाने नाभिराजाची पत्‍नी मेरुदेवीपासून आठवा अवतार धारण केला. या रूपाने, सर्व आश्रमांच्या लोकांना वंदनीय असणारा पर्महंस मार्ग दाखविला. (१३)


ऋषिभिर्याचितो भेजे नवमं पार्थिवं वपुः ।
दुग्धेमामोषधीर्विप्राः तेनायं स उशत्तमः ॥ १४ ॥
ऋषिंनी प्रार्थिता देवा पृथुरूपात पातला ।
समस्त औषधी त्याने शोधून आपणा दिल्या ॥ १४ ॥

विप्राः - अहो ब्रह्मवृंद हो ! - ऋषिभिः - ऋषींनी - याचितः - प्रार्थना केलेला असा - नवमं - नवव्या - पार्थिवं - पृथूसंबंधी - वपुः - शरीराला - भेजे - धारण करिता झाला. - इमां - हिच्यापासून - औषधीः - औषधी - दुग्ध - दोहन करिता झाला. - तेन - त्यामुळे - सः - तो - अयं - हा - उशत्तमः - अत्यंत सुंदर आहे. ॥१४॥
हे ऋषींनो ! ऋषींनी प्रार्थना केल्यावरून नवव्या वेळी ते पृथू (राजा) च्या रूपाने अवतीर्ण झाले. या अवतारात त्यांनी पृथ्वीतून सर्व औषधी उत्पन्न केल्या. त्यामुळेच हा अवतार सर्वांनाच अतिशय कल्याणकारी ठरला. (१४)


रूपं स जगृहे मात्स्यं चाक्षुषोदधिसंप्लवे ।
नाव्यारोप्य महीमय्यां अपाद् वैवस्वतं मनुम् ॥ १५ ॥
मन्वंतरात चाक्षूषी बुडता पृथ्वि काढिली ।
दहाव्या मत्स्य रूपाने वैवस्वतहि रक्षिला ॥ १५ ॥

चाक्षुषोदधिसंप्लवे - चाक्षुषमन्वंतरात समुद्रात पृथ्वी निमग्न झाल्यावेळी - सः - तो - मात्स्यं - मत्स्यसंबंधी - रूपं - स्वरूप - जगृहे - घेता झाला. - महीमय्यां - पृथ्वीरूप - नावि - नौकेत - आरोप्य - बसवून - वैवस्वतं - वैवस्वत - मनुं - मनूला - अपात् - रक्षिता झाला. ॥१५॥
चक्षुष मन्वंताराच्या शेवटी जेव्हा त्रैलोक्य समुद्रात बुडू लागले होते, तेव्हा त्यांनी मत्स्यरूपाने दहावा अवतार घेतला आणि पृथ्वीरूपी नौकेत बसवून वैवस्वत मनूचे रक्षण केले. (१५)


सुरासुराणां उदधिं मथ्नतां मन्दराचलम् ।
दध्रे कमठरूपेण पृष्ठ एकादशे विभुः ॥ १६ ॥
अवतारो अकरावा कूर्मरूपहि घेतले ।
मंदरापर्वता पाठीं मंथनीं पेलिले असे ॥ १६ ॥

एकादशे - अकराव्यात - सुरासुराणां - देव आणि दैत्य - उदधिं - समुद्राला - मथ्नतां - मंथित असता - विभुः - परमेश्वर - कमठरूपेण - कासवाच्या रूपाने - मन्दराचलम् - मंदर पर्वताला - पृष्ठे - पाठीवर - दध्रे - धरिता झाला. ॥१६॥
देवता आणि दैत्य समुद्र-मंथन करीत असताना अकराव्या अवतारात भगवंतांनी कासवरूपाने मंदराचल पर्वताला आपल्या पाठीचा आधार दिला. (१६)


धान्वन्तरं द्वादशमं त्रयोदशममेव च ।
अपाययत् सुरान् अन्यान् मोहिन्या मोहयन् स्त्रिया ॥ १७ ॥
समुद्रातूनि बारावे रूप धन्वंतरी निघे ।
अमृतो आणिले कुंभी तोचि, तेरावि मोहिनी ।
दैत्यांना मोहिले सर्व सुधें देवांसि तृप्तिले ॥ १७ ॥

व्दादशमं - बारावा - धान्वंतरं - धन्वंतरीसंबंधी - च - आणि - त्रयोदशमं - तेरावा - एव - सुद्धा - मोहिन्या - मोहिनी अशा - स्त्रिया - स्त्रीरूपाने - अन्यान् - दुसर्‍यांना - मोहयन् - भुरळ घालणारा - सुरान् - देवांना - अपाययत् - पाजिता झाला. ॥१७॥
धन्वंतरीच्या रूपात बारावा अवतार धारण करून, अमृत घेऊन समुद्रातून ते प्रगट झाले आणि तेरावा अवतार मोहिनीरूपाने धारण करून, दैत्यांना मोहित करून, देवांना अमृत पाजले. (१७)


चतुर्दशं नारसिंहं बिभ्रद् दैत्येन्द्रमूर्जितम् ।
ददार करजैरुरौ एरकां कटकृत् यथा ॥ १८ ॥
नृसिंह धारिले रूप चौदावा अवतार तो ।
हिरण्य कशपू त्याने फाडिला स्वनख बळे ॥ १८ ॥

चतुर्दशं - चवदावा - नारसिंहं - नरसिंहासंबंधी - बिभ्रत् - धारण करणारा - यथा - ज्याप्रमाणे - कटकृत् - बुरूड - एरकां - लव्हाळ्याला - तथा - त्याप्रमाणे - ऊर्जितं - उन्मत्त झालेल्या - दैत्येन्द्रं - दैत्यांच्या राजाला - करजैः - नखांनी - वक्षसि - वक्षःस्थळाचे ठिकाणी - ददार - फाडता झाला. ॥१८॥
चौदाव्या अवतारात त्यांनी नरसिंह-रूप धारण केले आणि अत्यंत बलाढ्य अशा दैत्यराज हिरण्यकशिपूची छाती आपल्या नखांनी अशी फाडली, जसा, चटई विणणारा गवताची काडी मधूनच चिरतो. (१८)


पञ्चदशं वामनकं कृत्वागादध्वरं बलेः ।
पदत्रयं याचमानः प्रत्यादित्सुस्त्रिविष्टपम् ॥ १९ ॥
वामनो रूप पंध्रावे बळीच्या यज्ञिं पातले ।
इच्छि त्रिलोकिराज्या तो बळी पाताळि घातला ॥ १९ ॥

पञ्चदशं - पंधरावा - पदत्रयं - तीन पावले - याचमानः - मागणारा व - त्रिविष्टपं - स्वर्गाला - प्रत्यादित्सुः - हिरावून घेऊ इच्छिणारा - वामनकं - वामन - कृत्वा - होऊन - बलेः - बलीच्या - अध्वरं - यज्ञाला - अगात् - प्राप्त झाला. ॥१९॥
पंधराव्या वेळी वामनरूप धारण करून भगवंत बळीच्या यज्ञात आले. त्रैलोक्य मिळविण्यासाठी केवळ तीन पावले ठेवण्याइतकी जमीन मागितली. (१९)


अवतारे षोडशमे पश्यन् ब्रह्मद्रुहो नृपान् ।
त्रिःसप्तकृत्वः कुपितो निःक्षत्रां अकरोन् महीम् ॥ २० ॥
नृपांनी मांडिला द्रोह ब्राह्मणांचा न पाहवे ।
सोळाव्या परशूरामे सारे क्षत्रीय मारिले ॥ २० ॥

षोडशमे - सोळाव्या - अवतारे - अवतारात - ब्रह्मद्रुहः - ब्राह्मणांचा व्देष करणारा - नृपान् - राजांस - पश्यन् - पाहणारा व - कुपितः - रागावलेला - त्रिःसप्तकृत्वः - एकवीसवेळा - महीं - पृथ्वीला - निःक्षत्रां - निःक्षत्रिय - अकरोत् - करिता झाला. ॥२०॥
सोळाव्या परशुराम अवतारात राजेलोक ब्राह्मणांचा द्रोह करणारे झाले आहेत असे पाहून क्रोधाने त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. (२०)


ततः सप्तदशे जातः सत्यवत्यां पराशरात् ।
चक्रे वेदतरोः शाखा दृष्ट्वा पुंसोऽल्पमेधसः ॥ २१ ॥
अज्ञान पाहता सर्व व्यासरुपेहि जन्मला ।
माता सत्यवती आणि पाराशर मुनी पिता ॥ २१ ॥

ततः - नंतर - सप्तदशे - सतराव्यांत - सत्यवत्यां - सत्यवतीच्या ठिकाणी - पराशरात् - पराशरापासून - जातः - झाला - अल्पमेधसः - मंदबुद्धि झालेल्या - पुंसः - पुरुषांना - दृष्ट्वा - पाहून - वेदतरोः - वेदवृक्षाचे - शाखाः - भाग - चक्रे - केले. ॥२१॥
यानंतर सतराव्या अवतारात पराश ऋषींपासून सत्यवतीच्या ठिकाणी व्यासरूपाने भगवम्त अवतीर्ण झाले. लोकांची जाण आणि ग्रहणशक्ती कमी झाल्याचे पाहून त्यांनी वेदरूपी वृक्षाच्या अनेक शाखा (विभाग) तयार केल्या. (२१)


नरदेवत्वमापन्नः सुरकार्यचिकीर्षया ।
समुद्रनिग्रहादीनि चक्रे वीर्याण्यतः परम् ॥ २२ ॥
राम तो आठरावा त्या देवांच्या कार्य हेतुने ।
उदंड कार्य ते केले वधिले रावणादिका ॥ २२ ॥

अतः - येथून - परं - पुढे - सुरकार्यचिकीर्षया - देवांचे कार्य करण्याच्या इच्छेने - नरदेवत्वं - नृपपणाला - आपन्नः - प्राप्त झाला व - समुद्रनिग्रहादीनि - समुद्रबंधनादि - वीर्याणि - पराक्रम - चक्रे - केले. ॥२२॥
देवतांचे कार्य करण्याच्या इच्छेने अठराव्या वेळी राजाच्या रूपाने रामावतार धारण करून सेतु-बंधन, रावणवध अशा शौर्याच्या अनेक लीला केल्या. (२२)


एकोनविंशे विंशतिमे वृष्णिषु प्राप्य जन्मनी ।
रामकृष्णाविति भुवो भगवान् अहरद् भरम् ॥ २३ ॥
बळीराम नि श्रीकृष्ण एकोणिस नि वीसावा ।
प्रगटोनी यदुवंशी भुमीचा भार हारिला ॥ २३ ॥

भगवान् - भगवंत - एकोनविंशे - एकोणिसाव्यात - विंशतिमे - आणि विसाव्यात - वृष्णिषु - यादवांच्या कुळामध्ये - रामकृष्णौ - बळराम व कृष्ण - इति - ह्याप्रमाणे - जन्मनी - दोन जन्म - प्राप्य - घेऊन - भुवः - भूमीचा - भरं - भार - अहरत् - हरण करिता झाला. ॥२३॥
एकोणिसाव्या आणि विसाव्या अवतारात त्यांनी यदुवंशात बलराम आणि श्रीकृष्ण या नावांनी प्रगट होऊन पृथ्वीवरील दुष्टांचा भार कमी केला. (२३)


ततः कलौ संप्रवृत्ते सम्मोहाय सुरद्विषाम् ।
बुद्धो नाम्नांजनसुतः कीकटेषु भविष्यति ॥ २४ ॥
कलीत मगधो प्रांती अजानो बुद्ध होइल ।
दैत्यांना मोहपाडाया घडेल अवतार तो ॥ २४ ॥

ततः - त्यानंतर - कलौ - कलियुग - संप्रवृत्ते - सुरू झाले असता - सुरव्दिषां - देवांचा व्देष करणार्‍यांच्या म्हणजे दैत्यांच्या - संमोहाय - मोहाकरिता - अजनसुतः - अजनाचा पुत्र असा - नाम्ना - नावाने - बुद्धः - बुद्ध - कीकटेषु - कीकट देशात म्हणजे गया प्रांतात - भविष्यति - होईल. ॥२४॥
यानंतर कलियुग आल्यावर देवतांचा द्वेष करणार्‍या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगधदेशात (बिहार) जनाच्या पुत्राच्या रूपाने त्यांचा बुद्धावतार होईल. (२४)


अथासौ युगसंध्यायां दस्युप्रायेषु राजसु ।
जनिता विष्णुयशसो नाम्ना कल्किर्जगत्पतिः ॥ २५ ॥
बावीसावा पुढे ऐसा श्रीविष्णु यशपुत्र जो ।
कल्कि होवोनि तो राजे मारील दुष्ट जे प्रजी ॥ २५ ॥

अथ - नंतर - असौ - हा - जगत्पतिः - जगांचा पालनकर्ता - युगसंध्यायां - युगाच्या संधिकाळी - राजसु - राजे - दस्युप्रायेषु - बहुतेक चोरासारखे झाले असता - विष्णुयशसः - विष्णुयशापासून - कल्किः - कल्कि - नाम्ना - नावाने - जनिता - उत्पन्न होईल. ॥२५॥
यापुढे जेव्हा कलियुग समाप्त होण्याचा काळ येईल आणि राजेलोक लुटारूसारखे बनतील, तेव्हा जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्किरूपाने अवतार घेतील. (वरील बावीस अवतारांखेरीज हंस आणि हयग्रीव हे दोन अवतार धरून चोवीस अवतार होतात.) (२५)


अवतारा ह्यसङ्ख्येया हरेः सत्त्वनिधेर्द्विजाः ।
यथाविदासिनः कुल्याः सरसः स्युः सहस्रशः ॥ २६ ॥
महासरोवरातून ओढे निघती कैक जै।
तसेचि कैक जन्माते घेतो इच्छे स्वये प्रभू ॥ २६ ॥

व्दिजाः - व्दिज हो ! - यथा - ज्याप्रमाणे - अविदासिनः - कधी न आटणार्‍या - सरसः - सरोवरापासून - सहस्रशः - हजारो - कुल्याः - कालवे - स्युः - होतात - हि - त्याप्रमाणे - सत्त्वनिधेः - सत्त्वगुणाचा सागर अशा - हरेः - विष्णूपासून - असंख्येयाः - अगणित - अवताराः - अवतार. ॥२६॥
हे ऋषींनो ! एखाद्या न आटणार्‍या सरोवरातून जसे असंख्यछोटे छोटे प्रवाह निघतात, त्याचप्रमाणे सत्त्वनिधी भगवान श्रीहरींचे असंख्य अवतार होतात. (२६)


ऋषयो मनवो देवा मनुपुत्रा महौजसः ।
कलाः सर्वे हरेरेव सप्रजापतयः तथा ॥ २७ ॥
ऋषि मनू मनूपुत्र प्रजापती नि देवता ।
महाशक्ति तिथे देव अंश रूपे वसे सदा ॥ २७ ॥

ऋषयः - ऋषि - मनवः - मनू - देवाः - देव - महौजसः - मोठमोठे प्रतापशाली - मनुपुत्राः - मनूचे पुत्र - तथा - त्याचप्रमाणे - सप्रजापतयः - प्रजापतींसहवर्तमान - सर्वे - सगळे - हरे - विष्णूंचे - एव - च - कलाः - अंश. ॥२७॥
ऋषी, मनू, देव, प्रजापती, मनुपुत्र आणि असेच जितके महान शक्तिशाली आहेत, ते सर्व भगवंतांचेच अंश आहेत. (२७)


एते चांशकलाः पुंसः कृष्णस्तु भगवान् स्वयम् ।
इन्द्रारिव्याकुलं लोकं मृडयन्ति युगे युगे ॥ २८ ॥
पूर्णावतार तो कृष्ण स्वये प्रगटला प्रभू ।
अत्याचारे भरे विश्व तेंव्हा प्रगटतो पुन्हा ॥ २८ ॥

च - आणि - एते - ह्या - पुंसः - परमेश्वराच्या - अंशकलाः - अंशभूत विभूति - कृष्णः - कृष्ण - तु - तर - स्वयं - स्वतः - भगवान् - परमेश्वर - इंद्रारिव्याकुलं - इंद्राच्या शत्रूंनी गांजलेल्या - लोकं - लोकास - युगे युगे - युगायुगामध्ये - मृडयन्ति - सुखी करितात. ॥२८॥
हे सर्व भगवंतांचे अंशावतार किंवा कलावतार आहेत. परंतु श्रीकृष्ण स्वतः ’भगवंत’ आहेत. जेव्हा प्रजा दैत्यांच्या अत्याचारांनी व्याकूळ होते, तेव्हा युगायुगात अनेक रूपे धारण करून भगवंत प्रजेचे रक्षण करतात. (२८)


जन्म गुह्यं भगवतो य एतत्प्रयतो नरः ।
सायं प्रातर्गृणन् भक्त्या दुःखग्रामाद् विमुच्यते ॥ २९ ॥
गुह्यही अवताराची कथा नारायणी असे ।
सायं प्रभात वाचावी दुःखे सर्वचि नष्टती ॥ २९ ॥

यः - जो - नरः - पुरुष - प्रयतः - शुद्ध होऊन - सायं - संध्याकाळी - प्रातः - व सकाळी - एतत् - ह्या - भगवतः - भगवंताच्या - गुह्यं - गूढ - जन्म - जन्माला - भक्त्या - भक्तीने - गृणन् - पठण करणारा - दुःखग्रामात् - दुःखसमूहापासून - विमुच्यते - मुक्त होतो. ॥२९॥
भगवंतांच्या दिव्य जन्मांची ही रहस्यमय कथा जो मनुष्य एकाग्र चित्ताने सायंकाळी आणि प्रातःकाळी भक्तीने पठन करतो, तो सर्व दुःखांपासून मुक्त होतो. (२९)


एतद् रूपं भगवतो ह्यरूपस्य चिदात्मनः ।
मायागुणैर्विरचितं महदादिभिरात्मनि ॥ ३० ॥
जगदाकार हे रूप चिन्मयी भगवंत तो ।
माया‍आदी गुणतत्वा भगवत् रूप मानिले ॥ ३० ॥

हि - कारण - एतत् - हे - अरूपस्य - निराकार व - चिदात्मनः - चित्स्वरूप अशा - भगवतः - परमेश्वराचे - रूपं - रूप - मायागुणैः - मायेचे गुण अशा - महदादिभिः - महतत्त्वादिकांनी - आत्मनि - आत्म्यामध्येच - विरचितं - धारण केले. ॥३०॥
निराकार चिन्मय भगवंतांचे जे हे स्थूल जगदाकार रूप आहे, ते त्यांच्याच मायेच्या महत्तत्त्वादी गुणांनी भगवंतावर कल्पिले आहे. (३०)


यथा नभसि मेघौघो रेणुर्वा पार्थिवोऽनिले ।
एवं द्रष्टरि दृश्यत्वं आरोपितं अबुद्धिभिः ॥ ३१ ॥
आकाशी असती मेघ धूळ वायू मधे जशी ।
दोघा आरोप दोघांचा तसे ईशासि रुप ते ॥ ३१ ॥

यथा - ज्याप्रमाणे - नभसि - आकाशामध्ये - मेघौघः - मेघपंक्ती - वा - अथवा - अनिले - वायूमध्ये - पार्थिवः - पृथ्वीसंबंधी - रेणुः - धूळ - एवं - ह्याप्रमाणेच - द्रष्टरि - साक्षीवर - अबुद्धिभिः - मंदबुद्धीनी - दृश्यत्वं - प्रत्यक्ष धर्म - आरोपितं - आरोपित केला आहे. ॥३१॥
जसा अल्पबुद्धी माणूस ढगांचा आकाशावर आणि धूळीचा वायूवर आरोप करतो, त्याचप्रमाणे अविवेकी पुरुष साक्षी असलेल्या आत्म्यावर दृश्य जगताचा आरोप करतो. (३१)


अतः परं यदव्यक्तं अव्यूढगुणबृंहितम् ।
अदृष्टाश्रुतवस्तुत्वात् स जीवो यत् पुनर्भवः ॥ ३२ ॥
स्थूल रुपाहुनी भिन्न सूक्ष्म अव्यक्त तो असे ।
शिरे आत्मा जधी देही तो जीव जन्मतो पुन्हा ॥ ३२ ॥

अतः - ह्याहून - परं - निराळे - यत् - जे - अदृष्टाश्रुतवस्तुत्त्वात् - अदृष्टपूर्व व अश्रुतपूर्व तत्त्व असल्यामुळे - अव्यूढगुणव्यूहितं - परिणाम न पावलेल्या गुणांनी रचलेले - अव्यक्तं - अस्पष्ट - सः - तो - जीवः - प्राणी - यत् - ज्यापासून - पुनर्भवः - पुनर्जन्म. ॥३२॥
या स्थूलरूपाच्या पलीकडे भगवंतांचे एक सूक्ष्म अव्यक्त रूप आहे, ज्याला स्थूलासारखा आकार नाही, जे पाहता किंवा ऐकता येत नाही, तेच त्यांचे सूक्ष्म शरीर आहे. यात आत्म्याचा प्रवेश झाला की त्याला जीव असे म्हणतात व त्याचाच वारंवार जन्म होतो. (३२)


यत्रेमे सदसद् रूपे प्रतिषिद्धे स्वसंविदा ।
अविद्ययाऽऽत्मनि कृते इति तद्ब्रह्मदर्शनम् ॥ ३३ ॥
अज्ञाने भासतो स्थूल ज्ञानाने सूक्ष्मरूप ते ।
ज्ञानाने पाहता त्याला साक्षात्कारचि होतसे ॥ ३३ ॥

यत्र - ज्यात - इमे - ही - अविद्यया - अज्ञानाने - आत्मनि - आत्म्यामध्ये - कृते - केलेली - सदसद्रूपे - सत् व असत् अशी दोन स्वरूपे - स्वसंविदा - आत्मज्ञानाने - प्रतिषिद्धे - नष्ट झालेली - इति - याप्रमाणेच - तत् - ते - ब्रह्मदर्शनं - ब्रह्मज्ञान. ॥३३॥
अविद्येमुळेच आत्म्यावर या सूक्ष्म आणि स्थूल शरीराचा आरोप केला जातो. ज्यावेळी आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे हा आरोप नाहीसा होतो, त्याचवेळी ब्रह्माचा साक्षात्कार होतो. (३३)


यद्येषोपरता देवी माया वैशारदी मतिः ।
संपन्न एवेति विदुः महिम्नि स्वे महीयते ॥ ३४ ॥
प्रभूची संपते माया असे ज्ञानीच जाणती ।
स्वरूपी मिळतो जीव परमानंद पावता ॥ ३४ ॥

यदि - जर - एषा - ही - देवी - दैदीप्यमान - वैशारदी - सर्वज्ञ - माया - माया - मतिः - बुद्धिपूर्वक - उपरता - विराम पावलेली - संपन्नः - परिपूर्ण - एव - च - इति - असे - विदुः - जाणतात व - स्वे - आत्मीय - महिम्नि - माहात्म्यात - महीयते - पूजित होतो. ॥३४॥
तत्त्वज्ञानी लोक हे जाणतात की, ज्यावेळी परमेश्वराची बुद्धिरूपी माया नाहीशी होते, त्याचवेळी जीव परमानंदमय होतो आणि आपल्या स्वरूपात स्थिर होतो. (३४)


एवं जन्मानि कर्माणि ह्यकर्तुरजनस्य च ।
वर्णयन्ति स्म कवयो वेदगुह्यानि हृत्पतेः ॥ ३५ ॥
जन्मणे मरणे नाही निराकार हॄदेश्वर ।
कर्म जे गुह्य वेदाचे ज्ञानीच जाणती खरे ॥ ३५ ॥

कवयः - ज्ञानी लोक - एवं - याप्रमाणे - हृत्पतेः - अंतःकरणाचा स्वामी अशा व - अकर्तुः - कर्तृत्वशून्य - च - आणि - अजनस्य - जन्मरहित अशाची - वेदगुह्यानि - वेदात गुप्तरीतीने वर्णिलेली - जन्मानि - जन्मे व - कर्माणि - कर्मे - हि - खरोखर - वर्णयन्ति स्म - वर्णन करतात. ॥३५॥
वास्तविक ज्यांना जन्म-कर्म नाही, त्या हृदयेश्वर भगवंतांच्या मायाश्रित जन्म-कर्मांचे तत्त्वज्ञानी लोक याच प्रकारे वर्णन करतात. कारण भगवंतांचे जन्म-कर्म वेदांचे गोपनीय असे रहस्य आहे. (३५)


(उपेंद्रवज्रा)
स वा इदं विश्वममोघलीलः
     सृजत्यवत्यत्ति न सज्जतेऽस्मिन् ।
भूतेषु चान्तर्हित आत्मतंत्रः
     षाड्वर्गिकं जिघ्रति षड्गुणेशः ॥ ३६ ॥
( इंद्रवजा )
अमोघ त्याच्या असती लिला त्या
    निर्मोनि पोषी अन तोचि मारी ।
न लिंपतो राहुनि देहि त्यांच्या
    चवीस घेतो बसुनी स्वतंत्र ॥ ३६ ॥

वा - किंवा - अमोघलीलः - ज्याच्या क्रीडा निरर्थक नाहीत असा - सः - तो - इदं - ह्या - विश्वं - जगाला - सृजति - उत्पन्न करतो - अवति - पाळतो व - अत्ति - खातो म्हणजे नष्ट करतो. - अस्मिन् - ह्यात - न सज्जते - आसक्ति धरीत नाही. - च - आणि - षड्‌गुणेशः - सहा गुणांचा स्वामी - भूतेषु - प्राण्यांचे ठिकाणी - अन्तर्हितः - अंतर्धान पावलेला असा - षाड्‌वर्गिकं - षड्‌वर्गाच्या म्हणजे सहा इंद्रियांच्या विषयांस - आत्मतन्त्रः - स्वतंत्र होऊन - जिघ्रति - उपभोगतो. ॥३६॥
भगवंतांची लीला निश्चित कार्य करणारी आहे. ते लीलेनेच या सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात, परंतु त्यात आसक्त होत नाहीत. प्राण्यांच्या अंतःकरणात गुप्तपणे राहून ज्ञानेंद्रिये आणि मनाचे नियंत्रण करून त्या विषयांना ग्रहणही करतात. परंतु ते स्वतंत्र असल्याने त्यांपासून अलिप्त राहतात. (३६)


न चास्य कश्चिन्निपुणेन धातुः
     अवैति जन्तुः कुमनीष ऊतीः ।
नामानि रूपाणि मनोवचोभिः
     सन्तन्वतो नटचर्यामिवाज्ञः ॥ ३७ ॥
नटासि मानी कुणि सत्य रूप
    अज्ञानी पाही हरि माणुषी तो ।
न जाणिती त्या निजरूप सत्या
    कुबुद्धिवादी करितात तर्क ॥ ३७ ॥

अज्ञः - अज्ञानी - नटचर्यां - नटाच्या सोंगाला - इव - प्रमाणे - कुमनीषः - कुबुद्धि असा - कश्चित् - कोणताही - जन्तुः - प्राणी - मनोवचोभिः - मनाने व वाणीने - नामानि - नावे - च - आणि - रूपाणि - स्वरूपे - सन्तन्वतः - विस्तृत करणार्‍या - धातुः - आणि धारण व पोषण करणार्‍या - अस्य - ह्याच्या - ऊतीः - लीला - निपुणेन - तर्काने - न अवैति - जाणत नाही. ॥३७॥
ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य नटांनी केलेल्या करामती समजू शकत नाही, त्याप्रमाणे आपले संकल्प आणि वेदवाणीद्वारा भगवंतांनी प्रगट केलेल्या या अनंत नाम आणि रूपांना तसेच त्यांच्या लीलांना अल्पबुद्धी जीव अनेक तर्क आणि युक्तींनी ओळखू शकत नाहीत. (३७)


स वेद धातुः पदवीं परस्य
     दुरन्तवीर्यस्य रथाङ्गपाणेः ।
योऽमायया सन्ततयानुवृत्त्या
     भजेत तत्पादसरोजगन्धम् ॥ ३८ ॥
जो चक्रपाणी नकळे कुणाला
    निर्मोनि विश्वा असतो निराळा ।
जाणोनि त्याला भजि जो मनाने
    नि सेवितो पद्मपदी सुगंध ॥ ३८ ॥

यः - जो - अमायया - निष्कपट - सन्ततया - व निरंतर चालणार्‍या - अनुवृत्या - अनुकूल वर्तनाने - तत्पादसरोजगन्धं - त्याच्या चरणकमलाच्या सुगंधाला - भजेत - भजतो - सः - तो - धातुः - धारण व पोषण करणार्‍या - दुरन्तवीर्यस्य - अनन्त आहे पराक्रम ज्याचा अशा - रथाङ्ग्पाणेः - आणि हातात चक्र धारण करणार्‍या - परस्य - परमेश्वराच्या - पदवीं - स्थानाला - वेद - जाणतो. ॥३८॥
चक्रपाणी भगवंतांची शक्ती आणि पराक्रम अनंत आहेत, ते सर्व जगताच्या पलीकडचे आहेत. जो नेहमी निष्कपट भावनेने त्यांच्या दिव्य चरणकमलांच्या सुगंधाचे सेवन करतो, तोच त्यांचे स्वरूप किंवा लीलांच्या रहस्यांना जाणू शकतो. (३८)


अथेह धन्या भगवन्त इत्थं
     यद्‌वासुदेवेऽखिललोकनाथे ।
कुर्वन्ति सर्वात्मकमात्मभावं
     न यत्र भूयः परिवर्त उग्रः ॥ ३९ ॥
अहो तुम्हा भाग्य असेल कांही
    त्रिलोक स्वामी वसुदेवपुत्र ।
अनन्य प्रेमे बघतो तुम्हासी
    नाही भवाची पुढती भिती ती ॥ ३९ ॥

अथ - नंतर - इह - येथे - भगवंतः - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न असे आपण - धन्याः - धन्य आहा - यत् - ज्या कारणास्तव - अखिललोकनाथे - संपूर्ण लोकांचा स्वामी अशा - वासुदेवे - परमेश्वराचे ठिकाणी - इत्थं - याप्रमाणे - सर्वात्मकं - सर्वरूप अशा - आत्मभावं - आपलेपणाला - कुर्वंति - करतात. - यत्र - जेथे - भूयः - पुनः - उग्रः - भयंकर - परिवर्तः - भोवर्‍याप्रमाणे भ्रमण - न - नाही. ॥३९॥
हे ऋषींनो ! आपण मोठे भाग्यशाली आहात. कारण सर्वांचे स्वामी असणार्‍या भगवान श्रीकृष्णांविषयी आत्मभाव ठेवून त्यांचेवर अनन्य प्रेम करीत आहात. त्यामुळे या जन्म-मरण रूप संसारात परत यावे लागत नाही. (३९)


इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसम्मितम् ।
     उत्तमश्लोकचरितं चकार भगवान् ऋषिः ॥ ४० ॥
(अनुष्टुप)
भगवान् वेदव्यासाने रचिली भगवत्कथा ।
वेदासम हिची ख्याती पुराण भगवत महान् ॥ ४० ॥

भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - ऋषिः - मुनी - उत्तमश्लोकचरितं - भगवंताचे यश ज्यात वर्णिले आहे असे - इदं - हे - ब्रह्मसंमितं - ब्रह्मज्ञानाने युक्त - भागवतं - भागवत - नाम - नामक - पुराणं - पुराण - चकार - करिता झाला. ॥४०॥
भगवान वेदव्यासांनी हे वेदतुल्य, भगवच्चरित्राने परिपूर्ण, असे भागवत नावाचे पुराण लिहिले आहे.(४०)


(अनुष्टुप्)
निःश्रेयसाय लोकस्य धन्यं स्वस्त्ययनं महत् ।
तदिदं ग्राहयामास सुतं आत्मवतां वरम् ॥ ४१ ॥
सोपी कल्याणकारी ही श्रीमद्‌भागवती कथा ।
ज्ञानेंद्र शुक जो पुत्र त्यासी हीच प्रबोधिली ॥ ४१ ॥

लोकस्य - लोकांच्या - निःश्रेयसाय - कल्याणाकरिता - धन्यं - कृतार्थ करणारे - महत् - मोठे - स्वस्त्ययनं - कल्याणकारक - तत् - ते - इदं - हे - आत्मवतां - आत्मज्ञानी लोकांमध्ये - वरं - श्रेष्ठ अशा - सुतं - मुलाला - ग्राहयामास - घेवविले. ॥४१॥
त्यांनी हे प्रशंसनीय, कल्याणकारी महापुराण लोकांच्या परम कल्याणासाठी आपल्या आत्मज्ञानशिरोमणी पुत्राला सांगितले. (४१)


सर्ववेदेतिहासानां सारं सारं समुद्धृतम् ।
स तु संश्रावयामास महाराजं परीक्षितम् ॥ ४२ ॥
वेदांचे सार हे सर्व तसेचि इतिहास हा ।
परीक्षितां शुकदेवे मुक्त्यर्थ कथिली असे ॥ ४२ ॥

सर्ववेदेतिहासानां - सर्व वेद व इतिहास ह्यांचे - सारंसारं - अत्यंत श्रेष्ठ सार - समुद्धृतं - काढले - सः - तो - तु - तर - महाराजं - सार्वभौ‌म अशा - परीक्षितम् - परीक्षित राजाला - संश्रावेयामास - ऐकविता झाला. ॥४२॥
यात सर्व वेद आणि इतिहासांचे सार संग्रहित केले आहे. शुकदेवांनी हे महाराज परीक्षिताला ऐकविले. (४२)


प्रायोपविष्टं गङ्गायां परीतं परमर्षिभिः ।
कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानादिभिः सह ॥ ४३ ॥
कलौ नष्टदृशामेष पुराणार्कोऽधुनोदितः ।
तत्र कीर्तयतो विप्रा विप्रर्षेर्भूरितेजसः ॥ ४४ ॥
अहं चाध्यगमं तत्र निविष्टस्तद् अनुग्रहात् ।
सोऽहं वः श्रावयिष्यामि यथाधीतं यथामति ॥ ४५ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
प्रथमस्कन्धे नैमिषीयोपाखाने तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
प्रायोपवेषणा जेंव्हा तो गंगातिरि बैसला ।
अज्ञान अंधकारी तो कली तेंव्हाचि पातला ॥ ४३ ॥
तेंव्हा या ग्रंथसूर्याचे पुन्हा तेज विखूरले ।
शौनका त्याच वेळेला कथा मी ऐकिली असे ॥ ४४ ॥
कृपेने शिकलो सारे जेवढी बुद्धि लाभली ।
सांगेन त्यानुसारेची संतांनी ऐकणे पुढे ॥ ४५ ॥
॥ इति श्रीमद्‍भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥
॥ तिसरा अध्याय हा ॥ १ ॥ ३ ॥
हरिः ॐ तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु ॥

विप्राः ! - ब्राह्मण हो ! - तत्र - तेथे - गंगायां - गंगेच्या काठी - प्रायोपविष्टं - मरणाच्या उद्देशाने बसलेल्या - परमर्षिभिः - व मोठमोठया ऋषींनी - परीतं - वेढलेल्या अशा त्यास - विप्रर्षेः - ब्रह्मर्षी - भूरितेजसः - व अत्यंत तेजस्वी - कीर्तयतः - कीर्तन करीत असता ॥४३॥
तत्र - तेथे - तदनुग्रहात् - त्याच्या कृपेने - निविष्टः - बसलेला - अहं - मी - अध्यगमं - शिकलो - च - आणि - सः - तो - अहं - मी - यथाधीतं - जसे शिकलो तसे - यथामति - यथाशक्ति - वः - तुम्हाला - श्रावयिष्यामि - ऐकवीन. ॥४४॥
कृष्णे - श्रीकृष्ण - धर्मज्ञानादिभिः - धर्मज्ञानादिकांशी - सह - सहवर्तमान - स्वधामोपगते - निजधामास गेला असता - नष्टदृशां - अज्ञान्यांस - अधुना - हल्ली - कलौ - कलियुगात - एषः - हा - पुराणार्कः - पुराणरूपी सूर्य - उदितः - उदयास आला. ॥४५॥
त्यावेळी परीक्षित सभोवताली श्रेष्ठ ऋषींसह आमरण उपोषणाचे व्रत घेऊन गंगातटाकी बसला होता. भगवान श्रीकृष्ण जेव्हा धर्म, ज्ञान इत्यादींसह आपल्या परमधामाला गेले, तेव्हा या कलियुगातील जे लोक अज्ञानरूपी अंधकाराने अंध झाले, त्यांच्यासाठी हा पुराणऋपी सूर्य उगवला. हे ऋषींने ! जेव्हा महातेजस्वी श्रीशुक तेथे या पुराणाची कथा सांगत होते, तेव्हा मी तेथे बसलो होतो. तेथे मी त्यांच्या कृपापूर्ण संमतीने अध्ययन केले. माझे जसे अध्ययन झाले आणि माझ्या बुद्धीने ते जितके ग्रहण केले, त्यानुसार मी आपणांस सांगेल (४३-४५)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां प्रथमः स्कन्धे तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
अध्याय तिसरा समाप्त

GO TOP