|  | 
| 
श्रीमद् भागवत पुराण  
सूतप्रतिवचनम्, भगवत्कथायाः श्रवणकीर्तनयोः  भगवत्कथा आणि भगवद्भक्तीचे माहात्म्य - संहिता  -  अन्वय  -  अर्थ  समश्लोकी - मराठी 
व्यास उवाच । इति संप्रश्नसंहृष्टो विप्राणां रौमहर्षणिः । प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुं उपचक्रमे ॥ १ ॥ 
व्यासजी सांगतात -  (अनुष्टुप) प्रश्न ऐकोनि सर्वांचा रोमहर्षणसूत जे । उग्रश्रवासि आनंद होताचि बोलले पुढे ॥ १ ॥ 
इति -  याप्रमाणे - संप्रश्नसंहृष्टः -  उत्तम प्रश्नांनी संतुष्ट झालेला - रौमहर्षणिः -  रोमहर्षणाचा पुत्र - म्ह. सूत - तेषां -  त्या - विप्राणां -  ऋषींच्या - वचः -  भाषणाचे - प्रतिपूज्य -  अभिनंदन करून - प्रवक्तुं -  उत्तर देण्यास - उपचक्रमे -  आरंभ करिता झाला. ॥१॥ 
 
श्रीव्यास म्हणतात - शौनकादी ब्रह्मवादी ऋषींचा हा प्रश्न ऐकून रोमहर्षणाचे सुपुत्र उग्रश्रवा यांना फार आनंद झाला. त्यांनी ऋषींच्या या मंगलमय प्रश्नाचे अभिनंदन करून सांगण्यास सुरुवात केली. (१) 
 
सूत उवाच ।  (वसंततिलका) यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव । पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि ॥ २ ॥ 
सूतजी म्हणाले -  ( वसंततिलका ) संन्यास इच्छुनि शिशू निघता वनाते पुत्रासि व्यास म्हणता विरहे सुताऽरेऽऽ! वेली नि वृक्ष वदले प्रति उत्तरा मी सर्वात्मरूप ! शुकदेव नमी असे मी ॥ २ ॥ 
  अनुपेतं -  व्रतबंध न झालेल्या - अपेतकृत्यं -  कर्माचा त्याग केलेल्या - प्रव्रजन्तं -  अरण्यात जावयाला निघाल्यामुळे - यं -  ज्याच्या - विरहकातरः -  वियोगाला भ्यालेला - द्वैपायनः -  व्यास ऋषी - पुत्रा -  हे बाळा ! - इति -  अशी - आजुहाव -  हाक मारिता झाला. - तन्मयतया -  त्याचेच स्वरूप असल्यामुळे - तरवः -  वृक्षांनी - अभिनेदुः -  उत्तर दिले - सर्वभूतहृदयं -  सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात योगबलाने प्रवेश करणार्या - तं -  त्या - मुनिं -  मुनीला - आनतः -  नम्र - अस्मि -  आहे. ॥२॥ 
 
कोणतेही लौकिक - वैदिक कर्म कर्तव्य नसल्यामुळे संन्यास घेण्यासाठी एकटेच निघालेल्या ज्यांना वडील व्यास विरहाने व्याकूळ होऊन पुत्रा, पुत्रा, म्हणून हाका मारून लागले. तेव्हा ब्रह्मरूप झालेल्या शुकदेवांशी एकरूप झालेले वृक्षच त्यांच्या वतीने ’ओ’ देऊ लागले. अशा सर्व चराचराच्या हृदयांत विराजमान झालेल्या श्रीशुकमुनींना मी नमस्कार करतो. (२) 
 
यः स्वानुभावमखिल श्रुतिसारमेकं  अध्यात्मदीपं अतितितीर्षतां तमोऽन्धम् । संसारिणां करुणयाऽऽह पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनाम् ॥ ३ ॥ 
हे वेदसार नि तसेचि पुराणसार  कृष्णस्वरूप मिळते अशि गूढ वार्ता । अध्यात्मदीप उजळे भगवत्कथेने वक्ते असे शुक तया नमितो पुन्हा मी ॥ ३ ॥ 
  यः -  जो - अंधं -  घोर - तमः -  अंधःकाराला - संसाराला - अतितितीर्षतां -  तरून जाण्यास इच्छिणार्या - संसारिणां -  संसारी लोकांच्या - करुणया -  दयेने - एकं -  केवळ - अध्यात्मदीपं -  आत्मविद्येचे प्रकाशक - स्वानुभावं -  ज्याचा प्रभाव विलक्षण आहे असे - अखिलश्रुतिसारं -  सर्व वेदांचे सार - पुराणगुह्यं -  पुराणात गुप्त असलेले - आह -  सांगता झाला - तं -  त्या - मुनीनां -  ऋषींच्या - गुरुं -  गुरूला - व्याससूनुं -  व्यासपुत्राला - उपयामि -  शरण जातो. ॥३॥ 
 
अत्यंत प्रभावी, सर्व वेदांचे सार असलेले, संसाररूप अंधारातून बाहेर पडू इच्छिणार्यांना आध्यात्मिक प्रकाश देणारे, अद्वितीय रहस्यमय श्रीमद्भागवत पुराण, संसारी लोकांची दया येऊन त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी सांगितले, त्या मुनींचे गुरू असण्यार्या व्यासपुत्र श्रीशुकाचार्यांना मी शरण जातो. (३) 
 
(अनुष्टुप्)  नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् । देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ॥ ४ ॥ 
(अनुष्टुप) नरनारायणो ऐशा थोरांना नमितो पुढे । देवी सरस्वती व्यासा जयार्थचि नमो नमो ॥ ४ ॥ 
  नारायणं -  नारायणाला - चैव -  आणि - नरोत्तमं -  सर्व पुरुषांत श्रेष्ठ अशा - नरं -  नराला - चैव -  आणखीही - सरस्वतीं देवीं -  देवी सरस्वतीला - नमस्कृत्य -  नमस्कार करून - ततः -  नंतर - जयं -  ग्रंथाला - उदीरयेत् -  आरंभ करावा. ॥४॥ 
 
पुरुष श्रेष्ठ नर-नारायण ऋषींना, सरस्वती देवीला आणि श्रीव्यासदेवांना नमस्कार करून या श्रीमद्भागवताचे पठण करावे. (४) 
 
मुनयः साधु पृष्टोऽहं भवद्भिः लोकमङ्गलम् । यत्कृतः कृष्णसंप्रश्नो येनात्मा सुप्रसीदति ॥ ५ ॥ 
ऋषिंनो तुम्हि हा प्रश्न उत्तमचि विचारिला ।  कृष्णाच्या या कथे होते आत्मशुद्धि निरंतर ॥ ५ ॥ 
  हे मुनयः -  हे ऋषी हो ! - भवभ्दिः -  आपण - अहं -  मी - साधु -  चांगल्या प्रकारे - लोकमंगलं -  लोकांचे कल्याण ज्यायोगे होईल असा - पृष्टः -  विचारलेला - यत् -  ज्याअर्थी - कृष्णसंप्रश्नः -  कृष्णचरिताविषयींचा प्रश्न - कृतः -  केलात - येन -  तेणेकरून - आत्मा -  अंतःकरण - सुप्रसीदति -  समाधान पावले. ॥५॥ 
 
ऋषिवर्य हो ! संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारला आहे. कारण हा प्रश्न श्रीकृष्णांच्या संबंधात आहे. त्यामुळे अंतःकरण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते. (५) 
 
स वै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे । अहैतुक्यप्रतिहता ययात्मा संप्रसीदति ॥ ६ ॥ 
सर्वश्रेष्ठ असा धर्म नित्य निष्काम भक्ति ती ।  अशाच भक्तिने लाभे आनंदरूप कृष्ण तो ॥ ६ ॥ 
  यतः -  ज्याच्या योगाने - अधोक्षजे -  परमेश्वराच्या ठिकाणी - अहैतुकी -  निष्काम - अप्रतिहता -  निर्विघ्न - यया -  जिच्या योगाने - आत्मा -  अंतःकरण - संप्रसीदति -  सुप्रसन्न होते - एतादृशी -  अशा प्रकारची - भक्तिः -  भावना - भवति -  उत्पन्न होते - सः -  तो - वै -  च - पुंसां -  पुरुषांचा - परः -  श्रेष्ठ - धर्मः -  धर्म होय. ॥६॥ 
 
ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी, निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते, तोच मनुष्यांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. ६() 
 
वासुदेवे भगवति भक्तियोगः प्रयोजितः । जनयत्याशु वैराग्यं ज्ञानं च यद् अहैतुकम् ॥ ७ ॥ 
अनन्य भक्तियोगाने ज्ञान वैराग्य लाभते ।  परी चित्त असो शुद्ध श्रीकृष्णी नित्य गुंतले ॥ ७ ॥ 
  भगवति -  षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा - वासुदेवे -  श्रीकृष्णाविषयी - प्रयोजितः -  दाखवून दिलेला - भक्तियोगः -  भक्तियोग - आशु -  लौकर - वैराग्यं -  वैराग्य - जनयति -  उत्पन्न करतो - यत् -  ज्यामुळे - अहैतुकं -  शुष्क तर्कांनी अगोचर - तत् -  ते - ज्ञानं -  ज्ञान - जनयति -  उत्पन्न होते. ॥७॥ 
 
भगवान श्रीकृष्णांच्या ठायी भक्ती निर्माण होताच तत्काळ निष्काम ज्ञान व वैराग्याचा आविर्भाव होतो. (७) 
 
धर्मः स्वनुष्ठितः पुंसां विष्वक्सेनकथासु यः । नोत्पादयेद् यदि रतिं श्रम एव हि केवलम् ॥ ८ ॥ 
धर्माने वागणे छान अनुष्ठानचि ते घडो ।  कथेत प्रेम ना ज्याचे त्याच सर्वचि व्यर्थ ते ॥ ८ ॥ 
  पुंसां -  पुरुषांनी - यः -  जो - धर्मः -  धर्म - स्वनुष्ठितः -  चांगल्या रीतीने आचरण केलेला तो - विष्वक्सेनकथासु -  परमात्म्याच्या कथेविषयी - यदि -  जर - रतिं -  प्रेमा - न उत्पादयेत् -  उत्पन्न करणार नाही - हि -  तर - केवलं -  निखालस - श्रमः -  कष्ट - एव -  मात्र होत. ॥८॥ 
 
धर्माचे योग्य तर्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्यांच्या हृदयांत भगवंतांच्या कथांविषयी प्रेम निर्माण होत नसेल, तर ते धर्मपालन म्हणजे केवळ श्रमच होत. (८) 
 
धर्मस्य ह्यापवर्ग्यस्य नार्थोऽर्थायोपकल्पते । नार्थस्य धर्मैकान्तस्य कामो लाभाय हि स्मृतः ॥ ९ ॥ 
धर्माचे फळ ते मोक्ष गौण संपत्ति ती सदा ।  संपत्तीने घडो धर्म नको मोह धनीं पहा ॥ ९ ॥ 
  आपवर्ग्यस्य -  ज्याचे पर्यवसान मोक्ष आहे अशा - धर्मस्य -  धर्मांचे - अर्थाय -  फलाकरिता - अर्थः -  द्रव्य - न उपकल्पते -  योग्य होत नाही - धर्मैकांतस्य -  धर्म हेच ज्याचे मुख्य फल अशा - अर्थस्य -  द्रव्याच्या - लाभाय -  लाभाकरिता - कामः -  इच्छा - नहि स्मृतः -  सांगितलेली नाही. ॥९॥ 
 
धर्माचे फळ मोक्ष आहे. धनप्राप्तीत धर्माची सार्थकता नाही. धन धर्मासाठीच आहे. भोग-विलास हे धनाचे फळ मानलेले नाही. (९) 
 
कामस्य नेन्द्रियप्रीतिः लाभो जीवेत यावता । जीवस्य तत्त्वजिज्ञासा नार्थो यश्चेह कर्मभिः ॥ १० ॥ 
नसावा भोग तृप्त्यर्थ जीवनार्थचि तो हवा ।  तत्वेच्छा फळ ते जीवा स्वर्ग ही हेतु ना असे ॥ १० ॥ 
  यावता -  जेवढयाने - जीवेत -  शरीर धारण होईल - तावान् -  तेवढेच - कामस्य -  उपभोग्य वस्तूचे - लाभः -  फळ - इंद्रियप्रीतिः -  इंद्रियांनाच संतुष्ट करणे - न युज्यते -  योग्य नव्हे - जीवस्य -  मनुष्याला - तत्त्वजिज्ञासा -  रहस्य जाणण्याची इच्छा - अर्थः -  हाच काय तो उपयोग - इह -  ह्या लोकामध्ये - यः -  जो - च कर्मभिः -  यज्ञादि कर्मे करून स्वर्गादि इच्छा करणे - सः न -  तो काही खरा उपयोग नव्हे. ॥१०॥ 
 
भोग विलासांचे फळ इंद्रियतृप्ती नव्हे; तर त्याचा हेतू केवळ जीवननिर्वाह आहे. जीवनाचे फळ म्हणजे तत्त्वजिज्ञासा, कर्मे करून स्वर्गप्राप्ती हे नव्हे. (१०) 
 
वदन्ति तत् तत्त्वविदः तत्त्वं यत् ज्ञानमद्वयम् । ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्द्यते ॥ ११ ॥ 
तत्ववेत्ते असे लोक ज्ञाता ज्ञेय रहीत त्या ।  सच्चिदानंद रुपाला देव ब्रह्म म्हणे कुणी ॥ ११ ॥ 
 यत् -  जे - अद्वयं -  अद्वितीय - ज्ञानं -  ज्ञान त्यालाच - तत्त्वविदः -  ज्ञाते लोक - तत् -  तेच खरे - तत्त्वं -  तत्त्व - वदन्ति -  असे म्हणतात - ब्रह्मा -  ब्रह्मदेव - परमात्मा -  परमेश्वर - भगवान् -  भगवंत - इति -  इत्यादि - शब्द्यते -  निरनिराळे शब्द लावतात. ॥११॥ 
 
तत्त्ववेत्ते लोक ज्ञाता (जाणाणारा) आणि ज्ञेय (जे जाणावयाचे ते) या भेदांनी रहित, अद्वितीय, अशा ज्ञानालाच तत्त्व म्हणतात. त्यालाच कोणी ब्रह्म, कोणी परमात्मा तर कोणी भगवान असे म्हणतात. (११) 
 
तत् श्रद्दधाना मुनयो ज्ञानवैराग्ययुक्तया । पश्यन्त्यात्मनि चात्मानं भक्त्या श्रुतगृहीतया ॥ १२ ॥ 
श्रीमद्भागवता भक्त ऐकोनी ज्ञान भक्तिने ।  विरागी वृत्तिने जीवी जाणिती रूप दिव्य ते ॥ १२ ॥ 
  तत् -  ते - श्रद्दधानाः -  भक्तिमान - मुनयः -  ऋषी - ज्ञानवैराग्ययुक्तया -  ज्ञानवैराग्यसंपन्न असल्यामुळे - श्रुतगृहीतया -  वेदांतादि श्रवणाने प्राप्त झालेल्या - भक्त्या -  भक्तीने - आत्मनि -  अंतःकरणातच - आत्मानं -  आत्मस्वरूप - पश्यन्ति -  पाहतात. ॥१२॥ 
 
श्रद्धाळू मुनी भागवतश्रवणाने प्राप्त झालेल्या ज्ञानवैराग्यमुक्त भक्तीने आपल्या हृदयात त्या परमात्म्याचा अनुभव घेतात. (१२) 
 
अतः पुम्भिः द्विजश्रेष्ठा वर्णाश्रमविभागशः । स्वनुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धिः हरितोषणम् ॥ १३ ॥ 
वर्णाश्रमासि जाणोनी धर्माने जगतील जे ।  तयांना लाभतो मोक्ष तीच सिद्धि असे पहा ॥ १३ ॥ 
  अतः -  ह्याकरिता - व्दिजश्रेष्ठाः -  ऋषिश्रेष्ठ हो ! - पुम्भिः -  पुरुषांनी - वर्णाश्रमविभागशः -  वर्णाश्रमविभागाप्रमाणे - स्वनुष्ठितस्य -  चांगल्या रीतीने आचरण केलेल्या - धर्मस्य संसिद्धिः -  धर्माचे उक्त फल - हरितोषणं -  ईश्वराचे हेच आराधन ॥१३॥ 
 
हे ऋषींनो ! म्हणूनच मनुष्यांनी आपापल्या वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे धर्माचरण केले असेल, त्याची पूर्ण सिद्धी म्हणजे भगवंतांची प्रसन्नता होय. (१३) 
 
तस्मादेकेन मनसा भगवान् सात्वतां पतिः । श्रोतव्यः कीर्तितव्यश्च ध्येयः पूज्यश्च नित्यदा ॥ १४ ॥ 
म्हणोनी एकचित्ताने भक्तवत्सल कृष्ण जो ।  त्याची आराधना होवो कथा कीर्तन ऐकणे ॥ १४ ॥ 
  तस्मात् -  ह्याकरिता - एकेन -  एकाग्र - मनसा -  चित्ताने - सात्वतां पतिः -  भक्तांचा संरक्षक - भगवान् -  असा जो भगवान - नित्यदा -  निरंतर - श्रोतव्यः -  श्रवण करण्यास योग्य आहे - च -  त्याचप्रमाणे - कीर्तितव्यः -  कीर्तन करण्यासही योग्य आहे - ध्येयः -  ध्यान करण्यासही योग्य तोच व - पूज्यः -  पूजन करण्यासही योग्य तोच. ॥१४॥ 
 
म्हणून एकाग्र चित्ताने भक्तवत्सल भगवंतांचेच निरंतर श्रवण, कीर्तन, ध्यान आणि पूजन केले पाहिजे. (१४) 
 
यद् अदनुध्यासिना युक्ताः कर्मग्रन्थिनिबन्धनम् । छिन्दन्ति कोविदास्तस्य को न कुर्यात् कथारतिम् ॥ १५ ॥ 
कर्माची गाठ ती मोठी चिंतने योगि कापिती ।  सांगा मग असा कोण कथाप्रेम नसे मनी ॥ १५ ॥ 
  कोविदाः -  विद्वान लोक - यदनुध्यासिना -  ज्याच्या ध्यानरूप खड्गाने - युक्तः -  परिपूर्णतेस पोचलेले - ग्रंथिनिबंधनं कर्म -  अहंकारग्रंथी उत्पन्न करणारे कर्म - छिन्दन्ति -  तोडून टाकतात - तस्य -  त्यांच्या - कथारतिं -  कथांची आवड - कः -  कोण - न कुर्यात् -  करणार नाही ? ॥१५॥ 
 
विवेकी पुरुष ज्या भगवंतांच्या चिंतनरूपी तलवारीने कर्मबंधनाची गाठ तोडून टाकतात, त्या भगवंतांच्या लीला-कथांवर कोणता मनुष्य प्रेम करणार नाही ? (१५) 
 
शुश्रूषोः श्रद्दधानस्य वासुदेवकथारुचिः । स्यान्महत्सेवया विप्राः पुण्यतीर्थनिषेवणात् ॥ १६ ॥ 
पवित्र फिरता तीर्थे सेवा आवडते मनीं । अनुतापे सश्रद्धांना आवडे ग्रंथ ऐकणे ॥ १६ ॥ 
  हे विप्राः -  हे व्दिजश्रेष्ठ हो ! - शुश्रूषोः -  सेवेत तत्पर अशा पुरुषांची - श्रद्दधानस्य -  जे भक्तिमान आहेत त्यांची - वासुदेवकथारुचिः -  परमेश्वराच्या कथांविषयी अभिरुची - पुण्यतीर्थनिषेवणात् -  पुण्यकारक तीर्थांच्या सेवेने - महत्सेवया -  साधुसंताच्या सेवेनेच - स्यात् -  उत्पन्न होते. ॥१६॥ 
 
हे ऋषींनो ! पवित्र तीर्थांची यात्रा केल्याने आणि महापुरुषांची सेवा केल्याने श्रद्धापूर्वक श्रवण करणार्याला भगवत्कथेत रुची उत्पन्न होते. (१६) 
 
श्रृण्वतां स्वकथां कृष्णः पुण्यश्रवणकीर्तनः । हृद्यन्तःस्थो ह्यभद्राणि विधुनोति सुहृत्सताम् ॥ १७ ॥ 
ऐकता स्वकथा कृष्ण कथेत कीर्तनात ही ।  हृदयी स्थिर होवोनी वारितो सर्व वासना ॥ १७ ॥ 
  हि -  कारण - पुण्यश्रवणकीर्तनः -  ज्याच्या कथाचे श्रवण व कीर्तन पुण्यदायक आहे असा - सतां -  साधूंचा - सुहृत् -  हितकर्ता - कृष्णः -  जो श्रीकृष्ण - स्वकथां -  स्वतःच्या कथा - श्रृण्वतां -  ऐकणार्याच्या - हृदि -  अंतःकरणामध्ये - अन्तस्थः -  हृदयात वास्तव्य करणारा - सत् -  असून - अभद्राणि -  पातकांचा - विधुनोति -  नाश करतो. ॥१७॥ 
 
भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे श्रवण आणि कीर्तन दोनीही पवित्र करणारी आहेत. संतांचे सुहृद भगवान, आपली कथा ऐकणार्यांच्या हृदयात येऊन स्थिर होतात आणि त्यांच्या अशुभ वासना नष्ट करतात. (१७) 
 
नष्टप्रायेष्वभद्रेषु नित्यं भागवतसेवया । भगवति उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी ॥ १८ ॥ 
ही कथा श्रवणाने त्या होती नष्ट कुवासना ।  तेव्हा पवित्र श्रीकृष्णावरी ते प्रेम राहते ॥ १८ ॥ 
  नित्यं -  निरंतर - भागवतसेवया -  भगवद्भक्तांची सेवा केली म्हणजे - अभद्रेषु -  दुर्वासनारूप पातके - नष्टप्रायेषु -  बहुधा नष्टप्राय होतात - सत्सु -  ती नष्ट झाली असता - उत्तमश्लोके -  पुण्यकारक कीर्ती आहे ज्याची अशा - भगवति -  भगवंताची - नैष्ठिकी -  एकनिष्ठ - भक्ती -  भक्ति - भवति -  उत्पन्न होते. ॥१८॥ 
 
श्रीमद्भागवत किंवा भगवद्भक्तांच्या निरंतर सहवासाने जेव्हा पुष्कळशा अशुभ वासना नष्ट होतात, तेव्हा पवित्रकीर्ति भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी चिरस्थायी प्रेम निर्माण होते. (१८) 
 
तदा रजस्तमोभावाः कामलोभादयश्च ये । चेत एतैरनाविद्धं स्थितं सत्त्वे प्रसीदति ॥ १९ ॥ 
आणि रज तमो भाव प्रपंची लोभ लोपतो ।  चित्ती स्थिरावते सत्व होते निर्मळ निर्मळ ॥ १९ ॥ 
  तदा -  तेव्हा - भक्ति उत्पन्न झाली म्हणजे - रजः -  रजोगुण - तमः  तमोगुण - कामलोभादयः -  कामलोभादि - ये -  जे - भावाः -  विकार होतात - च -  आणि - एतैः -  ह्या विकारांनी - अनाविद्धं -  विकृति न पावलेले - चेतः -  अंतःकरण - सत्वे -  सात्त्विक भावामध्ये - स्थितं -  स्थिर होऊन - प्रसीदति -  समाधान पावते. ॥१९॥ 
 
तेव्हा काम आणि लोभासारखे रजोगुण आणि तमोगुणाचे भाव नाहीसे होतात आणि चित्त यांनी रहित होऊन सत्त्वगुणामध्ये स्थिर, तसेच निर्मल होते. (१९) 
 
एवं प्रसन्नमनसो भगवद्भक्तियोगतः । भगवत् तत्त्वविज्ञानं मुक्तसङ्गस्य जायते ॥ २० ॥ 
अशा प्रसन्न चित्ताने भगवद्भक्ति योजिता ।  आसक्ती मिटुनी जाती साक्षात्कारचि होतसे ॥ २० ॥ 
  एवं -  अशा रीतीने - प्रसन्नमनसः -  प्रसन्न झालेल्या पुरुषास - मुक्तसंगस्य -  ज्याची आसक्ती सुटली आहे त्याला - भगवद्भक्तियोगतः -  ईश्वरभक्तीच्या योगाने - भगवतत्त्वविज्ञानं -  भगवत्स्वरुपाचे ज्ञान - जायते -  प्राप्त होते. ॥२०॥ 
 
याप्रकारे भगवंतांची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशा होऊन, हृदय आनंदाने भरून जाते, तेव्हा भगवत्-तत्त्वाचा अनुभव येऊ लागतो. (२०) 
 
भिद्यते हृदयग्रन्थिः छिद्यन्ते सर्वसंशयाः । क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे ॥ २१ ॥ 
दर्शने आत्मरुपाने मनीच्या ग्रंथि भंगती ।  संदेह मिटती सारे कर्मबंध उरेचि ना ॥ २१ ॥ 
  आत्मनि -  अंतःकरणामध्ये - ईश्वरे -  ईश्वराचे - दृष्टे -  साक्षाद्दर्शन झाले असता - एव -  अशा प्रकारची - अस्य -  त्याची - हृदयग्रंथीः -  अहंकाररूपी गाठ - भिद्यते -  उकलते - सर्वसंशयाः -  सारे संशय - छिद्यन्ते -  नष्ट होतात. - च -  आणि - कर्माणि -  सारी कर्मे - क्षीयन्ते -  लयास जातात. ॥२१॥ 
 
हृदयात आत्मस्वरूप भगवंतांचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात, सर्व संशय नाहीसे होतात आणि कर्मबंधन क्षीण होते. (२१) 
 
अतो वै कवयो नित्यं भक्तिं परमया मुदा । वासुदेवे भगवति कुर्वन्त्यात्मप्रसादनीम् ॥ २२ ॥ 
म्हणोनि ज्ञानि ते नित्य आनंदे कृष्णभक्ति ती ।  प्रेमाने करिती सारे आत्मज्ञान मिळे तया ॥ २२ ॥ 
  अतः -  म्हणून - कवयः -  बुद्धिमान मनुष्य - नित्यं -  निरंतर - परमया -  अत्यंत - मुदा -  आनंदाने - भगवति -  भगवान - वासुदेवे -  वासुदेव ह्यांची - आत्मप्रसादनीं -  अंतःकरण शुद्ध करणारी - भक्तिं -  भक्ती - कुर्वंति -  करतात. - वै -  निश्चयेकरून ॥२२॥ 
 
म्हणून बुद्धिमान लोक नेहमी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतात आणि त्यांना आत्मानंदाची प्राप्ती होते. (२२) 
 
(वसंततिलका)  सत्त्वं रजस्तम इति प्रकृतेर्गुणास्तैः युक्तः परः पुरुष एक इहास्य धत्ते । स्थित्यादये हरिविरिञ्चिहरेति संज्ञाः श्रेयांसि तत्र खलु सत्त्वतनोः नृणां स्युः ॥ २३ ॥ 
( वसंततिलका ) सत्वो रजो अन तसे तम या गुणांचा निर्माण पोषण तसे विलयादि खेळा । विष्णू नि ब्रह्म तिसरे शिवरुप घेतो सत्वात श्रीहरिमध्ये रमताचि मोक्ष ॥ २३ ॥ 
 सत्त्वं -  सत्त्वगुण - रजः -  रजोगुण - तमः -  तमोगुण - इति -  असे हे - प्रकृतेः -  प्रकृतीचे - मायेचे - गुणाः -  गुण - स्युः -  आहेत. - तैः -  त्यांनी - युक्तः -  युक्त - एकः -  असा काय तो एकच - परः -  श्रेष्ठ - पुरुषः -  पुरुष - परमात्मा - इह -  या लोकी - अस्य -  ह्या जगाचे - स्थित्यादये -  उत्पत्ति, पालन इत्यादी करण्याकरिता - हरिविरिञ्चिहरेति -  विष्णु, ब्रह्मदेव, महेश्वर इत्यादी - संज्ञाः -  नावे - धत्ते -  धारण करतो. - तत्र -  त्यातही - नृणां -  मनुष्यांचे - श्रेयांसि -  कल्याण - खलु -  निश्चयेकरून - सत्त्वतनोः -  ज्याची मूर्ति सात्त्विक आहे त्यापासूनच म्ह विष्णूपासूनच - स्युः -  होते. ॥२३॥ 
 
प्रकृतीच्या सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांचा स्वीकार करूनच विश्वाची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय करण्यासाठी एका अद्वितीय परमात्म्यानेच विष्णू, ब्रह्मा आणि रुद्र ही तीन नावे धारण केली आहेत. परंतु मनुष्यांचे परमकल्याण, सत्त्वगुणाचा स्वीकार करण्यार्या श्रीहरींपासूनच होते. (२३) 
 
(अनुष्टुप्)  पार्थिवाद् दारुणो धूमः तस्मादग्निस्त्रयीमयः । तमसस्तु रजस्तस्मात् सत्त्वं यद् ब्रह्मदर्शनम् ॥ २४ ॥ 
(अनुष्टुप) मातीत जन्मते काष्ठ त्या काष्ठातुनि अग्नि तो । श्रेष्ठ जे तै असे सत्व भगवंत तये मिळे ॥ २४ ॥ 
  पार्थिवात् -  जड अशा - दारुणः -  लाकडापेक्षा - धूमः -  धूर हा श्रेष्ठ - तस्मात् -  त्यापेक्षा - त्रयीमयः -  तिन्ही वेदांत सांगितलेल्या कर्मांचा प्रवर्तक - अग्निः -  अग्नि श्रेष्ठ - तमसः -  तमोगुणापेक्षा - रजः -  रजोगुण श्रेष्ठ - तस्मात् -  त्यापेक्षा - यत् -  जो - सत्त्वं -  सत्त्वगुण हा श्रेष्ठ होय. - तत् -  त्यामध्येच - ब्रह्मदर्शनम् -  परब्रह्माचा साक्षात्कार घडतो. ॥२४॥ 
 
जसे पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या लाकडापेक्षा धूर आणि त्याहीपेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे, कारण वेदोक्त यज्ञयागांद्वारा अग्नी सद्गती देणारा आहे, त्याचप्रमाणे तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे आणि त्यापेक्षाही सत्त्वगुण श्रेष्ठ आहे. कारण तोच ब्रह्मदर्शन करून देणारा आहे. (२४) 
 
भेजिरे मुनयोऽथाग्रे भगवन्तं अधोक्षजम् । सत्त्वं विशुद्धं क्षेमाय कल्पन्ते येऽनु तानिह ॥ २५ ॥ 
शुद्ध सत्वीं वसे विष्णु जाणते भजती तया ।  या पथी चालती त्यांना थोर कल्याण लाभते ॥ २५ ॥ 
  अथ -  ह्याकरिता - अग्रे -  पूर्वी - मुनयः -  ऋषी - भगवन्तं -  भगवान - विशुद्धं -  अत्यंत शुद्ध - सत्त्वं -  सत्त्वाची मूर्ती जो - अधोक्षजं -  श्रीकृष्ण त्याची - भेजिरे -  भक्ती करू लागले. - इह -  ह्या मृत्यूलोकावर - ये -  जे - तान् -  त्यांचे - अनु -  अनुकरण करतात ते - क्षेमाय -  कल्याणाला - कल्पन्ते -  पात्र होतात. ॥२५॥ 
 
प्राचीन काळी महात्मे आपल्या कल्याणासाठी विशुद्ध सत्त्वमय भगवान विष्णूंचीच आराधना करीत असत. आताही जे लोक त्या महात्म्यांचे अनुकरण करतात, त्यांचे तसेच कल्याण होते. (२५) 
 
मुमुक्षवो घोररूपान् हित्वा भूतपतीनथ । नारायणकलाः शान्ता भजन्ति ह्यनसूयवः ॥ २६ ॥ 
मुमुक्षू न करी निंदा दोष ना पाहती कुणा ।  भैरवादी त्यजोनिया भजती सत्व विष्णु तो ॥ २६ ॥ 
 अथ -  तसेच - मुमुक्षवः -  मोक्षाची इच्छा करणारे - घोररूपान् -  अक्राळविक्राळ पिशाच्चे किंवा - भूतपतीन् -  वेताळ इत्यादिकांना - हित्वा -  सोडून - अनसूयवः -  कोणाची कधीच निंदा न करणारे असे - संतः -  असणारे - शान्ताः -  शांतस्वरूपी - नारायणकलाः -  नारायणस्वरूपालाच - हि -  खरोखर - भजन्ति -  भजतात. ॥२६॥ 
 
जे लोक हा संसारसागर पार करू इच्छितात, ते कोणाचे दोष पाहात नसले, तरी अघोरी अशा तमोगुणी आणि रजोगुणी भैरवादी भूतपतींची उपासना न करता सत्त्वगुणी भगवान विष्णू आणि त्यांचे अंशावतार यांचेच भजन करतात. (२६) 
 
रजस्तमःप्रकृतयः समशीला भजन्ति वै । पितृभूतप्रजेशादीन् श्रियैश्वर्यप्रजेप्सवः ॥ २७ ॥ 
रज तमादि भावाने संतान धन लाभते ।  म्हणोनी भजती पित्रा भूत आणि प्रजापती ॥ २७ ॥ 
  श्रीयैश्वर्यप्रजेप्सवः -  द्रव्ये, ऐश्वर्य, व संतती यांची इच्छा करणारे - समशीलाः -  समानशील असे - रजस्तमःप्रकृतयः -  रजोगुण व तमोगुण ह्यांच्या अंकित असलेले - पितृभूतप्रजेशादीन् -  पितर, भूत, प्रजापति इत्यादिकांची - वै -  खरोखर - भजन्ति -  आराधना करतात. ॥२७॥ 
 
परंतु ज्यांचा स्वभाव रजोगुणी अगर तमोगुणी आहे, ते धन, ऐश्वर्य, पुत्र-पौत्र इत्यादींच्या अभिलाषेने पितर, भूत आणि प्रजापती यांची उपासना करतात. कारण अशा लोकांचा स्वभाव त्यांच्याशी मिळताजुळता असतो. (२७) 
 
वासुदेवपरा वेदा वासुदेवपरा मखाः । वासुदेवपरा योगा वासुदेवपराः क्रियाः ॥ २८ ॥ 
वेदांचे सार तो कृष्ण हवनोद्देश कृष्णची ।  कृष्णार्थ योग ते सारे कर्मोद्देशहि कृष्ण तो ॥ २८ ॥ 
  वेदाः -  वेद झाले तरी ते - वासुदेवपराः -  परमेश्वराप्रीत्यर्थच असतात - मखाः -  यज्ञ झाले तरी ते - वासुदेवपराः -  परमेश्वराप्रीत्यर्थच असतात - योगाः -  योग केले तरी ते - वासुदेवपराः -  ईश्वराप्रीत्यर्थच - क्रियाः -  किंवा कोणतेही कर्म घेतले तरी ते - वासुदेवपराः -  ईश्वराप्रीत्यर्थच - सन्ति -  असते. ॥२८॥ 
 
वेदांचे तात्पर्य श्रीकृष्ण हेच आहे. यज्ञांचा उद्देशही श्रीकृष्ण प्राप्ती हाच आहे. योग श्रीकृष्णांसाठीच केला जातो आणि सर्व कर्मांची समाप्ती श्रीकृष्णांमध्येच आहे. (२८) 
 
वासुदेवपरं ज्ञानं वासुदेवपरं तपः । वासुदेवपरो धर्मो वासुदेवपरा गतिः ॥ २९ ॥ 
ज्ञानाने लाभतो कृष्ण जपानेही तसाचि तो ।  अनुष्ठाने तयासाठी सर्व व्याप तयार्थची ॥ २९ ॥ 
  ज्ञानं -  ज्ञान झाले तरी ते - वासुदेवपरं -  परमेश्वराप्रीत्यर्थच - तपः -  तप झाले तरी ते - वासुदेवपरं -  परमेश्वराप्रीत्यर्थच - धर्मः -  धर्म झाला तरी तो वासुदेवपरः -  परमेश्वराप्रीत्यर्थच - गतीः -  स्वर्गादि उत्तम गती झाल्या तरी त्या - वासुदेवपरा -  ईश्वराप्रीत्यर्थच होत. ॥२९॥ 
 
ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच प्राप्ती होते, तप श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठीच केले जाते, धर्माचे अनुष्ठान श्रीकृष्णांकरिताच केले जाते आणि अंतिम गती श्रीकृष्णच आहेत. (२९) 
 
स एवेदं ससर्जाग्रे भगवान् आत्ममायया । सद् असद् रूपया चासौ गुणमय्यागुणो विभुः ॥ ३० ॥ 
गुणातीत जरी कृष्ण प्रकृतीहूनि भिन्न जो ।  मायेने दिसतो जातो जेणे हे निर्मिले जग ॥ ३० ॥ 
  अगुणः -  निर्गुण असा - विभुः -  परमेश्वर जो - सः -  तो - एव -  अशा प्रकारचा - असौ -  असलेला - भगवान् -  परमेश्वर - गुणमय्या -  त्रिगुणरूपी - सदसद्रूपया -  कार्यकारणात्मक - आत्ममायया -  आपल्या मायेच्या योगाने - अग्रे -  पूर्वीच - इदं -  हे जग - ससर्ज -  निर्माण करिता झाला. ॥३०॥ 
 
जरी भगवान श्रीकृष्ण, प्रकृती आणि तिचे गुण यांच्याही पलीकडचे आहेत, तरीसुद्धा त्यांनी ’जी प्रपंचदृष्टीने आहे; परंतु तत्त्वदृष्टीने नाही अशा’ आपल्या त्रिगुणात्मक मायेने प्रथम विश्वाची रचना केली. (३०) 
 
तया विलसितेष्वेषु गुणेषु गुणवानिव । अन्तःप्रविष्ट आभाति विज्ञानेन विजृम्भितः ॥ ३१ ॥ 
त्रिगुणात्मक मायेने खेळतो तोचि खेळ हे  विज्ञानानंद तो पूर्ण भासतो गुंतल्यापरी ॥ ३१ ॥ 
  विज्ञानेन -  मायेच्या योगाने - विजृम्भितः -  गुरफटलेला  तया -  त्याच मायेच्या योगाने - विलसितेषु -  उत्पन्न झालेल्या - एषु गुणेषु -  ह्या गुणांमध्ये - अंतः -  आत - प्रविष्टः -  प्रवेश केलेला - गुणवान् -  जणो काय त्रिगुणात्मक - अभिमानी - इव -  असा - आभाति -  भास होतो. ॥३१॥ 
 
हे तीन गुण त्यांच्या मायेचा विलास आहे. परंतु मायेच्या अंतर्गत राहिल्यामुळे भगवान गुणवान असल्यासारखेच भासतात. वास्तविक ते परिपूर्ण विज्ञानानंदघन आहेत. (३१) 
 
यथा ह्यवहितो वह्निः दारुष्वेकः स्वयोनिषु । नानेव भाति विश्वात्मा भूतेषु च तथा पुमान् ॥ ३२ ॥ 
अग्नि तो एकची होय भासतो भिन्न इंधनी ।  सर्वात्मकू असा कृष्ण भासतो भिन्न तो तसा ॥ ३२ ॥ 
  यथा -  ज्याप्रमाणे - एकः -  एकच - वन्हिः -  अग्नि - स्वयोनिषु -  आपणास प्रगट करणार्या - दारुषु -  काष्ठांमध्ये - अवहितः -  प्रविष्ट झालेला - नाना इव -  अनेक प्रकारचा - भाति -  भासतो - तथा -  त्याप्रमाणे - विश्वात्मा पुमान् -  जगाला व्यापून राहिलेला परमेश्वर - भूतेषु -  प्राणिमात्रांच्या ठिकाणी - भाति -  भासतो. ॥३२॥ 
 
अग्नी वस्तुतः एकच असला तरी स्वतःचे उत्पत्तिस्थान असणार्या लाकडांच्या विविध आकारांनी तसतसा प्रगट होतो, त्याचप्रमाणे सगळ्यांच्या ठायी आत्मरूपाने असलेले एकच भगवंत प्राण्यांच्या विविधतेमुळे अनेक आहेत, असे वाटते. (३२) 
 
असौ गुणमयैर्भावैः भूत सूक्ष्मेन्द्रियात्मभिः । स्वनिर्मितेषु निर्विष्टो भुङ्क्ते भूतेषु तद्गुणान् ॥ ३३ ॥ 
निर्मितो प्राणीमात्रांना जीवरूपे प्रवेशतो ।  स्वेच्छेने भोग तो भोगी भोगाया लावितो तसा ॥ ३३ ॥ 
  असौ -  हा - भूतसूक्ष्मेन्द्रियात्मभिः -  सूक्ष्म भूते, इंद्रिये आणि मन यांहीकरून - गुणमयैः -  त्रिगुणांच्या - भावैः -  कार्यांनी - स्वनिर्मितेषु -  स्वतःच निर्माण केलेल्या - भूतेषु -  प्राणिमात्रांमध्ये - निर्विष्टः -  प्रवेश केलेला - तद्गुणान् -  त्या भूतांच्या गुणांस - भुङ्क्ते -  भोगतो. ॥३३॥ 
 
भगवंतच सूक्ष्म-भूत-तन्मात्रा, इंद्रिये आणि अंतःकरण आदी गुणांपासून उत्पन्न झालेल्या भावांच्या द्वारा अनेक प्रकारच्या जीव (योनी) निर्माण करतात आणि त्या भिन्न जीवांत प्रवेश करून त्या त्या जीवांना अनुरूप विषयभोग घेतात. (३३) 
 
भावयत्येष सत्त्वेन लोकान्वै लोकभावनः । लीलावतारानुरतो देवतिर्यङ् नरादिषु ॥ ३४ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे नैमिषीयोपाखाने द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥ 
रचिता सर्व लोकांना पशू पक्षात जन्मतो ।  पोषितो सर्व लोकांना कोणाला नकळे लिला ॥ ३४ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ दुसरा अध्याय हा ॥ १ ॥ २ ॥ हरिः ॐ तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु ॥ 
  देवतिर्यङ्नरादिषु -  देव, पशुपक्षी व मनुष्य इत्यादिकांमध्ये - लीलावतारानुरतः -  लीलेने घेतलेल्या अवतारांचे ठिकाणी अनुरक्त असा - लोकभावनः -  जगत्कर्ता - एषः वै -  हा निश्चयेकरून - सत्त्वेन -  सत्त्वगुणाने - लोकान् -  लोकांना - भावयति -  पालन करतो. ॥३४॥ 
 
तेच संपूर्ण लोकांची रचना करतात आणि देवता, पशु-पक्षी, मनुष्य इत्यादी योनींत लीलावतार धारण करून सत्त्वगुणाच्या द्वारा जीवांचे पालन-पोषण करतात. (३४)  ॥ अध्याय दुसरा समाप्त ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां  |