श्रीमद् भागवत पुराण
प्रथमः स्कन्धः
प्रथमोऽध्यायः

नैमिषक्षेत्रे श्रीमद्‌भागवतविषये सूतं प्रति शौनकादि मुनीनां प्रश्न -

शौनक आदी ऋषींचा सूतांना प्रश्न -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


(शार्दूलविक्रीडित)
जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतः चार्थेष्वभिज्ञः स्वराट् ।
तेने ब्रह्म हृदा य आदिकवये मुह्यन्ति यत् सूरयः ।
तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गोऽमृषा ।
धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि । १ ॥
( शार्दूलविक्रीडित )
जन्मादी स्थितीसी प्रतीत हरीची सत्ता असे या जगी
    ज्याने वेद दिले जगास, पडतो तो मोह ज्ञानीजना ।
तेजी वारि तयात भूमि गमते तैसा जगी तो गमे
    मायामुक्त स्वतेज सत्यरुप ते आम्ही मनी ध्यातसो ॥ १ ॥

वयं - आम्ही - परं - परमेश्वराचे - धीमहि - ध्यान करतो. - कथंभूतं परं - तो परमेश्वर कसा आहे ? - सत्यं - सत्यस्वरूप असा - कुतः ? - त्याचे सत्यस्वरूप कोठे दृष्टीस पडते ? - यत्र - ज्याच्या - त्रिसर्गः - तीन अवस्था - अमृषा - खोटया म्हणता येत नाहीत - अत्र दृष्टांतः - ह्याला उदाहरण - यथा - जसे - तेजोवारिमृदां - प्रकाश, उदक आणि मृत्तिका ह्यांची - विनिमयः - रूपांतरे - पुनः कीदृशम् - आणखी कसा ? - स्वेन - स्वतःच्या - धाम्ना - प्रकाशानेच - सदा - नेहमी - निरस्तकुहकम् - त्यांच्या भ्रमाचा निरास करतो - ती सत्यस्वरूपाने दिसू लागतात - पुनः कीदृशम् - आणखी परमेश्वर कसा ? - यतः - ज्याच्यापासून - अस्य - ह्या जगाच्या - जन्मादि - उत्पत्ति, स्थिती, लय आदिकरून - अर्थेषु - कार्यामध्ये - अन्वयात् - सत्ता दृष्टिगोचर होते. - इतरतः च - आणि याशिवाय इतरही भिन्न भिन्न कार्यात त्याची सत्ता दिसून येते - पुनः कीदृशम् - आणखी तो परमेश्वर कसा आहे ? तर - अभिज्ञः - ज्ञानसंपन्नसर्वज्ञ - स्वराट् - स्वयंप्रकाश - यः - ज्याने - यत् - ज्यांना - सूरयः - मोठे मोठे विद्वान व ज्ञातेही - मुह्यंति - भुलून पडतात. - तत् - ते - ब्रम्ह - वेद - आदिकवये - आद्य वेदोनारायण जो ब्रम्हदेव त्याला - हृदा - मनानेच - तेने - शिकवले. त्याच्या अंतःकरणात प्रेरणा केली; स्फूर्ति दिली. ॥१॥
या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो. हे विश्व त्याच्याच आधारावर चालते आणि त्याच्यातच नाहीसे होते. सर्व पदार्थांतील त्याच्या अस्तित्वावरून (अन्वय) तो विश्वाचे उपादान कारण आहे हे सिद्ध होते, तर या सर्वांहून तो वेगळा (व्यतिरेक) असल्यामुळे तोच निमित्तकारण आहे, याचा निश्चय होतो. (कारण) तो सर्व काही जाणणारा व स्वयंप्रकाश आहे. त्यानेच ज्ञानी ऋषींनाही अनाकलनीय वेद, सृष्टिनिर्मात्या विधात्याला केवळ संकल्पाने दिले. त्याने सत्त्वगुणरूप तेज, रजोगुणमय जल आणि तमोगुणात्मक पृथ्वी स्वतःपासूनच निर्माण केली, असे तैत्तिरीय श्रुती सांगते. तोच त्यांचे उपादान कारण असल्याने ती भूते सत्य वाटतात. (तरीही तो अद्वैतदृष्ट्या मायाजनित भ्रम होय.) जसे सूर्यप्रकाशावर मृगजळ, पाण्यावर काच (रूप मोती) किंवा काचरूप मातीवर पाणी वास्तविक नसूनही अधिष्ठानसत्तेमुळे सत्य वाटते, तसेच परमात्मसत्तेमुळे विश्व सत्य वाटते. (या ठिकाणी त्रिसर्ग म्हणजे सत्त्व-रज-तम हे तीन गुण किंवा पंचभूते, इंद्रिये व त्यांच्या अधिष्ठात्री देवता यांची निर्मितीही घेता येईल.) असे असूनही स्वतःच्या तेजाने जो अनन्य भक्तांच्या मनांतील मायेचा अंधार पूर्णपणे नाहीसा करतो, त्या एकमेवाद्वितीय परम सत्य परमात्म्याचे (माया निरासासाठी) आम्ही ध्यान करतो. (१)


धर्मः प्रोज्झितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां ।
वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् ।
श्रीमद्‍भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः ।
सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिः तत् क्षणात् ॥ २ ॥
जो निष्कामचि संतधर्म कथिला निर्मत्सरी मोकळा
ज्यामध्ये कथिले शिवस्वरूप नी तापत्रयो नाशक ।
श्रीमद्‍भागवतो महामुनिकृती सायास अन्यो नको
पुण्यात्माधरिता मनात श्रवणा बंदी हृदीं ईश्वर ॥ २ ॥

अत्र - ह्यामध्ये - महामुनिकृते - महामुनींनी - व्यासोनारायणांनी केलेल्या - श्रीमद्‌भागवते - श्रीमद्‌भागवतामध्ये - निर्मत्सराणां - मत्सररहित अशा - सतां - साधूंचा - परमः - उत्तम - धर्मः - धर्म कोणता ते - निरूप्यते - सांगितले आहे. - कथंभूतः धर्मः ? - तो धर्म कसा ? - प्रोज्झितकैतवः - ज्यांत यत्किंचितही कपट नाही असा निष्काम - अत्र - ह्यापासून - वास्तवं - सत्य अशा - वस्तु - वस्तूचे - वेद्यं - ज्ञान होते - कथंभूतं वस्तु - ती वस्तु कसली ? तर - शिवदं - कल्याणप्रद - तापत्रयोन्मूलनम् - तापत्रयांना नष्ट करणारी अशी - परैः - इतर शास्त्रांनी - साधनांनी - ईश्वरः - परमेश्वर हा - हृदि - अंतःकरणामध्ये - सद्यः - तत्काल - अवरुध्यते - आकलन - किं वा - होईल काय ? नाही. कधीच होत नाही. पण - अत्र - ह्या भागवतधर्मामध्ये - शुश्रूषुभिः - तो श्रवण करू इच्छिणार्‍या - कृतिभिः - पुण्यवान पुरुषांनी - तत्क्षणात् - तो तात्काल स्थिर - आपलासा केला आहे. ॥२॥
महामुनिव्यास-निर्मित या श्रीमद्‌भागवतमहापुराणात मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परमधर्माचे निरूपण केले आहे. यात शुद्ध अंतःकरण असणार्‍या सत्पुरुषांनी जाणण्यायोग्य मूळ परमात्म्याचे निरूपण केले आहे, ते आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापांना मुळापासून नाहीसे करणारे असून परम कल्याण करणारे आहे. ज्यावेळी पुण्यवान पुरुष या शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात, त्यावेळी भगवंत विनाविलंब त्यांच्या हृदयात स्थिर होतात, तर मग याखेरीज दुसरे साधन किंवा शास्त्र यांची काय गरज आहे ? (२)


(द्रुतविलम्बित)
निगमकल्पतरोर्गलितं फलं ।
     शुकमुखाद् अमृतद्रवसंयुतम् ।
पिबत भागवतं रसमालयं ।
     मुहुरहो रसिका भुवि भावुकाः । ३ ॥
( द्रुतविलंबित )
निगमकल्पतरुफळ पक्व हे
    शुक मुखातुनिच जे द्रवले असे ।
सततही जन भाविक हो तुम्ही
    रससमुद्रचि भागवता पिणे ॥ ३ ॥

अहो भावुकाः - अहो ! भाविक लोक हो ! - रसिकाः - अहो रसिक जन हो ! - निगमकल्पतरोः फलं - वेदरूप कल्पवृक्षाचेच फळ असे जे - भागवतं - श्रीमद्भागवत - आलयं - ते अंतकालपर्यंत - मुहुः - वारंवार - पिबत - प्राशन करा. - कथंभूतं फलं ? - ते फल कसे ? तर - शुकमुखात् - शुकाच्या - पोपटाच्या पक्षी शुकाचार्याच्या मुखातून - भुवि - भूमीवर, म्रुत्युलोकावर - गलितं - गळून पडले आहे असे. - पुनः कथंभूतम् ? - आणखी कसे ? तर - अमृतद्रवसंयुतं - अमृतरसाने युक्त; - पुनः कीदृशम् - आणखी कसे ? तर - रस - रसाळ - रसाने डबडबलेले. ॥३॥
भक्तिरस जाणणारे भक्तजनहो, हे श्रीमद्‌भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले फळ आहे. श्रीशुकदेवरूप पोपटाच्या मुखाचा संबंध आल्याने अमृतरसाने परिपूर्ण आहे. हा मूर्तिमान रस आहे. जोपर्यंत शरीरात प्राण आहे, तो पर्यंत किंवा मनाचा लय होईपर्यंत या दिव्य भागवतरसाचे पृथ्वीवर वारंवार पान करीत रहा. (३)


(अनुष्टुप्)
नैमिषेऽनिमिषक्षेत्रे ऋषयः शौनकादयः ।
सत्रं स्वर्गायलोकाय सहस्रसममासत ॥ ४ ॥
कथारंभः -
(अनुष्टुप)
नैमिष्यारण्य क्षेत्रात शौनकादी ऋषींनि त्या ।
स्वर्ग हेतू धरोनिया अनुष्ठानास मांडिले ।
हजार वर्ष जो चाले असा यज्ञचि मांडिला ॥ ४ ॥

अनिमिषक्षेत्रे - श्रीविष्णूचेच प्रत्यक्ष स्थान जे श्रीक्षेत्र - नैमिषे - नैमिषारण्य, त्यात - शौनकादयः - शौनक आदिकरून - ऋषयः - सारे ऋषी - स्वर्गायलोकाय (स्वः गीयेत स्वर्गायः विष्णुः तस्य लोकाय) - स्वर्गात राहणारा जो विष्णु त्याचा लोक प्राप्त व्हावा म्हणून - सहस्रसमं - हजार वर्षेपर्यंत - सत्रं - यज्ञ - आसत - चालू केला होता, त्याची सांगता करण्यासाठीच ते सर्व तेथे राहिले होते. ॥४॥
कथेचा प्रारंभ
भगवान विष्णू आणि देवता यांचे परम पुण्यमय ठिकाण असलेल्या नैमिषारण्यात एकदा शौनकादी ऋषींनी भगवत्‌ प्राप्तीच्या इच्छेने एक हजार वर्षापर्यंत चालणार्‍या एका मोठ्या यज्ञाचे अनुष्ठान केले. (४)


त एकदा तु मुनयः प्रातर्हुतहुताग्नयः ।
सत्कृतं सूतमासीनं पप्रच्छुः इदमादरात् ॥ ५ ॥
एकदा त्या उषःकाली संपता नित्यकर्म ते ।
आसनीं पूजिता सूता पुसला प्रश्न आदरे ॥ ५ ॥

ते - ते ऋषी - प्रातर्हुतहुताग्नयः - सकाळीच होमद्रव्याने अग्नीत हवन करून - मनुयः तु - सारे ऋषी - एकदा - एके वेळी - आसीनं - बसलेल्या - सूतं - सूताचा - सत्कृतं - सत्कार करून - आदरात् - मोठया उत्सुकतेने - इदं - ह्याप्रमाणे - पप्रछुः - विचारते झाले. ॥५॥
एक दिवस या ऋषींनी प्रातःकाली अग्निहोमादिक नित्यकर्मे आटोपून सूतांचे पूजन केले आणि त्यांना एका उच्चासनावर बसवून मोठ्या आदराने प्रश्न केला. (५)


ऋषय ऊचुः ।
त्वया खलु पुराणानि सेतिहासानि चानघ ।
आख्यातान्यप्यधीतानि धर्मशास्त्राणि यान्युत । ६ ॥
ऋषि म्हणाले -
इतिहास पुराणे नी सर्व शास्त्रे तुम्ही तसे ।
चांगली वाचिली तैसी व्याख्याही कथिली असे ॥ ६ ॥

हे अनघ ! - हे पुण्यपुरुषा ! - त्वया - तू - खलु - निश्चयेकरून - सेतिहासानि - इतिहासासहवर्तमान - पुराणानि - पुराणे - उत - आणि - यानि - जी - धर्मशास्त्राणि - धर्म आणि शास्त्रे - तानि - ती - अधीतानि - अध्ययन केलेली - आख्यातानि च - व दुसर्‍यांस पढविलेली - अपि - सुद्धा. ॥६॥
ऋषी म्हणाले - सूत महोदय, आपण निष्पाप आहात. आपण सर्व इतिहास, पुराणे आणि धर्मशास्त्रांचे यथाशास्त्र अध्ययन केले आहे. तसेच त्यांचे चांगल्या तर्‍हेने निरूपणही केले आहे. (६)


यानि वेदविदां श्रेष्ठो भगवान् बादरायणः ।
अन्ये च मुनयः सूत परावरविदो विदुः ॥ ७ ॥
वेत्थ त्वं सौम्य तत्सर्वं तत्त्वतः तदनुग्रहात् ।
ब्रूयुः स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत ॥ ८ ॥
वेदवेत्त्यांमधे श्रेष्ठ भगवान् बादरायण ।
सगूण निर्गुणो तेची सर्व श्रेष्ठीत जाणते ॥ ७ ॥
त्यांच्या अनुग्रहा तुम्ही पात्र एकचि जाहला ।
गुरु ते गुप्तही सर्व शिष्यासी नित्य सांगती ॥ ८ ॥

हे सूत ! - हे सूता ! - विदां - विद्वानांमध्ये - श्रेष्ठः - अग्रगण्य - भगवान् - भाग्यसंपन्न असे - बादरायणः - व्यास महर्षी - यानि - जी जी - वेद - जाणतात - परावरविदः - भगवंताची सगुण व निर्गुण स्वरूपे जाणणारे - अन्ये - दुसरे - मुनयः च - ऋषीही - यानि - जी - विदुः - जाणतात ती. ॥७॥ हे सौ‌म्य - हे शांतस्वरूप मुने ! - उत - आणखी - त्वं - आपण - तत् - ते - सर्वं - सारे - तत्त्वतः - रहस्यासहवर्तमान - तदनुग्रहात् - त्यांच्या - व्यासमुनींच्याच कृपेने - वेत्थ - जाणत आहा. - स्निग्धस्य - प्रेमळ - शिष्यस्य - शिष्याला - गुरवो - सद्‌गुरू असतात ते - गुह्यं - आपले अत्यंत गूढ असलेले रहस्य - अपि - सुद्धा - ब्रूयुः - सांगतात. ॥८॥
वेद जाणणार्‍यामध्ये सर्वश्रेष्ठ असे भगवान बादरायण (व्यास) आणि भगवंतांच्या सगुण-निर्गुण स्वरूपाला जाणणार्‍या अन्य मुनिवरांनीही ज्या विषयांचे ज्ञान ग्रहण केले आहे, ते सर्व ज्ञान त्यांच्या कृपेने आपल्याला मिळाले आहे. कारण गुरुजन आपल्या प्रिय शिष्याला गुप्त ज्ञानही देतात. (७-८)


तत्र तत्राञ्जसाऽऽयुष्मन् भवता यद् विनिश्चितम् ।
पुंसां एकान्ततः श्रेयः तन्नः शंसितुमर्हसि । ०९ ॥
कृपाकरून ते सांगा जेणे कलियुगात या ।
जीवाते सहजी लाभे कल्याण काय तंत्र ते ॥ ९ ॥

हे आयुष्मन् ! - हे आयुष्यमंता ! - भवता - आपण - तत्रतत्र - त्या त्या ग्रंथामध्ये - अंजसा - साक्षात् - पुंसां - पुरुषांना - एकांततः - वास्तविक - श्रेयः - कल्याणकारक - यत् - जे काय - विनिश्चितं - निश्चयाने ठरविलेले असेल - तत् - ते - नः - आम्हाला - शंसितुं - सांगावयाला - अर्हसि - योग्य आहात. ॥९॥
महोदय, आपण कृपा करून हे सांगा की, त्यांतून कलियुगात जन्मलेल्या लोकांचे परम कल्याण होईल असे कोणते सोपे साधन आपण निश्चित केले आहे (९)


प्रायेणाल्पायुषः सभ्य कलौ अस्मिन् युगे जनाः ।
मन्दाः सुमन्दमतयो मन्दभाग्या ह्युपद्रुताः ॥ १० ॥
भूषणे संत जीवांचे, कलीत अल्प आयु ती ।
मंदबुद्धी तसे भाग्य विघ्नांनी बाधिले असे ॥ १० ॥

हे सभ्य ! - हे साधो ! - हि - खरोखर - अस्मिन् - ह्या - कलौ - कलीच्या - युगे - युगामध्ये - जनाः - लोक - प्रायेण - बहुतेक - अल्पायुषः - अल्पायुषी - मंदाः - आळशी - सुमंदमतयः - फार मंदबुद्धीचे - मंदभाग्याः - फार हतभागी - दरिद्री - उपद्रुताः - आणि रोगग्रस्त असे झालेले आहेत. ॥१०॥
या कलियुगात आयुष्य बहुतेक कमी झाले आहे. ते आळशी झाले आहेत. त्यांची समजूत यथातथाच आहे. ते अभागी आहेत. शिवाय इतर अनेक प्रकारच्या विघ्नांनी घेरलेले आहेत. (१०)


भूरीणि भूरिकर्माणि श्रोतव्यानि विभागशः ।
अतः साधोऽत्र यत्सारं समुद्धृत्य मनीषया ।
ब्रूहि नः श्रद्दधानानां येनात्मा संप्रसीदति ॥ ११ ॥
अनेक शास्त्र ते कर्म विवीध बोलती तसे ।
त्यांचा विस्तार ही मोठा ऐकण्या वेळ ना मिळे ।
सर्वांचे सार सांगावे जेणे शुद्धीच होतसे ॥ ११ ॥

श्रोतव्यानि - श्रवण करण्यासारखे - विभागशः - लहान लहान भाग करून - भूरीणि - पुष्कळ - भूरिकर्माणि - पुष्कळ कर्मानुष्ठान ज्यामध्ये आहे अशी - अतः - ह्याकरिता - हे साधो ! - हे साधो ! - अत्र - यात - यत् - जे - सारं - सार असेल - तत् - ते - मनीषया - आपल्या बुद्धीने - समुध्दृत्य - काढून - श्रद्दधानानां - भक्ति ठेवणार्‍या - नः - आम्हाला - ब्रूहि - सांगावे. असे की - येन - ज्याच्या योगाने - आत्मा - आमचा आत्मा - संप्रसीदति - फार सुप्रसन्न होईल. ॥११॥
अनेक कर्मांचे वर्णन असलेली, जाणण्यासारखी विभागवार शास्त्रे पुष्कळ आहेत. म्हणून हे साधो, आपण आपल्या बुद्धीने त्यांचे सार काढून आम्हां श्रद्धाळू लोकांना ते सांगा. त्यामुळे आमचे अंतःकरण निश्चिंत होईल. (११)


सूत जानासि भद्रं ते भगवान् सात्वतां पतिः ।
देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया ॥ १२ ॥
भद्र हो तुमचे सूता यदुवंशात श्रीहरी ।
देवकी वसुदेवाच्या पोटी कां कॄष्ण जन्मला ॥ १२ ॥

हे सूत ! - हे सूता ! - जानासि - जाणतोस - ते - तुझे - भद्रं - कल्याण असो. - सात्वतां - भक्तांचा - पतिः - पालक - वसुदेवस्य - वसुदेवाच्या - देवक्यां - देवकीच्या उदरी - भगवान् - भगवान - यस्य - जे - चिकीर्षया - करण्याच्या इच्छेने - जातः - जन्मास आला - अवतार घेता झाला. ॥१२॥
सूतमहोदय, आपले कल्याण असो. यदुवंशीयांचे रक्षक भगवान श्रीकृष्ण यांनी वसुदेव-देवकीपासून कशासाठी जन्म घेतला, ते आपण जाणताच. (१२)


तन्नः शुष्रूषमाणानां अर्हस्यङ्गानुवर्णितुम् ।
यस्यावतारो भूतानां क्षेमाय च भवाय च ॥ १३ ॥
उत्सुक ऐकण्या आम्ही सांगा ती भगवत् कथा ।
तारण्या जडजीवांना जन्मतो भगवंत तो ॥ १३ ॥

हे अंग ! - हे सूता ! - शुश्रूषमाणानां - श्रवण करण्यास उत्सुक अशा - नः - आम्हाला - तत् - ते - अनुवर्णितुं - सांगण्यास - अर्हसि - आपणच योग्य आहात - यस्य - ज्याचा - अवतारः - जन्म - भूतानां - प्राणिमात्रांच्या - क्षेमाय - कल्याणाकरिता - च - आणि - भवाय - समृद्धीकरिताच - अस्ति - असतो. ॥१३॥
आम्ही ते ऐकू इच्छितो. आपण कृपाकरून त्याचे वर्णन करा. कारण भगवंतांचा अवतार जीवांच्या पालनासाठी आणि समृद्धीसाठी होत असतो. (१३)


आपन्नः संसृतिं घोरां यन्नाम विवशो गृणन् ।
ततः सद्यो विमुच्येत यद् बिभेति स्वयं भयम् ॥ १४ ॥
सारे संसारचक्रात गुंतले जीव ते असे ।
भगवन्नाम ते घेता लाभते मुक्ति निश्चित ॥ १४ ॥

घोरां - भयंकर अशा - संसृतिं - संसारात - आपन्नः - गुरफटलेला - विवशः - केवळ पराधीन - यन्नाम - ज्याचे नाव - गृणन् - उच्चार करतो तो - सद्यः - तत्काल - ततः - त्या संसारापासून - विमुच्येत - मुक्त होतो - स्वयं - स्वतः - भयं यत् - भय असते तेच ज्याला - विभेति - भिते. ॥१४॥
हा जीव जन्म-मृत्यूच्या घोर सापळ्यात अडकला आहे. या स्थितीतही जर त्याने कधी भगवंतांच्या नामाचा उच्चार केला, तर तो त्याच क्षणी मुक्त होतो. कारण स्वतः भय भगवंतांना भिते. (१४)


यत्पादसंश्रयाः सूत मुनयः प्रशमायनाः ।
सद्यः पुनन्त्युपस्पृष्टाः स्वर्धुन्यापोऽनुसेवया ॥ १५ ॥
विरक्त शांत जे साधू राहती हरिचिंतनी ।
त्यांचिया स्पर्शने मुक्ति गंगातीर्थ जया परी ॥ १५ ॥

हे सूत ! - हे सूता ! - यत्पादसंश्रयाः - ज्याच्या चरणांचा आश्रय करणारे - प्रशमायनाः - शांति हेच ज्यांचे निवासस्थान आहे असे म्ह. शांत - मुनयः - ऋषी - उपस्पृष्टाः - स्पर्श करताच - सद्यः - तत्काल - पुनंति - पावन होतात - स्वर्धुन्यापः - गंगोदक - तु - तर - अनुसेवया - पुनःपुनः सेवन करावे लागते. ॥१५॥
भगवंतांना शरण गेल्यामुळे परम शांत झालेले मुनिजन केवळ स्पर्शानेही जीवांना ताबडतोब पवित्र करतात. त्याऐवजी गंगाजल पुष्कळ दिवस सेवन केल्यानंतरच मग कोठे पवित्र करते. (१५)


को वा भगवतस्तस्य पुण्यश्लोकेड्यकर्मणः ।
शुद्धिकामो न श्रृणुयाद् यशः कलिमलापहम् ॥ १६ ॥
ज्याची भक्त लिला गाता कलीचे दोष नष्टती ।
इच्छितो आत्मशुद्धी जो न ऐके कोण ही कथा ॥ १६ ॥

शुद्धिकामः - पापापासून मुक्त होऊ इच्छिणारा - कः - कोण ? - वा - अथवा - पुरुषः - इतर पुरुष तरी - तस्य - त्याचे - परमेश्वराचे - पुण्यश्लोकेडयकर्मणः - सत्कीर्तिमान पुरुषांनी ज्याच्या पराक्रमाची प्रशंसा केली आहे अशा - भगवतः - भगवंताच्या - कलिमलापहं - कलियुगातील पातक नाश करणार्‍या - यशः - कीर्तीला - न श्रृणुयात् - श्रवण करणार नाही ? ॥१६॥
असे पुण्यात्मे भक्त ज्यांच्या लीलांचे गुणगान करतात, त्या भगवंतांचे कलियुगाचे दोष हरण करणारे पवित्र यश, ज्याला आत्मशुद्धीची इच्छा आहे, असा कोणता मनुष्य श्रवण करणार नाही ? (१६)


तस्य कर्माण्युदाराणि परिगीतानि सूरिभिः ।
ब्रूहि नः श्रद्दधानानां लीलया दधतः कलाः ॥ १७ ॥
लीलाधर हरीला त्या नारदे गायिले असे ।
आम्हा श्रद्धाळुना आता त्यांचे वर्णन सांगणे ॥ १७ ॥

लीलया - लीलेने - कलाः - रूपांना - दधतः - धारण करणार्‍या - तस्य - त्याची - सूरिभिः - साधूंनी - परिगीतानि - गायन केलेली - उदाराणि - उत्तमोत्तम - कर्माणि - चरित्रे - श्रद्दधानानां - भक्ति धरून असणार्‍या - नः - आम्हाला - ब्रूहि - सांग. ॥१७॥
ते आपल्या लीलांनीच अवतार धारण करतात. नारदादी महात्मा पुरुषांनी त्यांच्या औदार्यपूर्ण कर्मांचे वर्णन केले आहे. आम्हां श्रद्धाळूंसाठी आपण त्यांचे वर्णन करावे. (१७)


अथाख्याहि हरेर्धीमन् अवतारकथाः शुभाः ।
लीला विदधतः स्वैरं ईश्वरस्यात्ममायया ॥ १८ ॥
योगमाये स्वयें देव लीला स्वच्छंद खेळले ।
मंगला हरिची कीर्ती करा वर्णन ती पुढे ॥ १८ ॥

हे धीमन् ! - हे बुद्धिमान पुरुषा ! - अथ - आणखी - आत्ममायया - आपल्या मायेने - स्वैरं - यथेच्छ - लीला - क्रीडा - विदधतः - करणार्‍या - ईश्वरस्य - ईश्वररुपी - हरेः - श्रीकृष्णाच्या - शुभाः - मंगलदायक - अवतारकथाः - जीवनचरित्रे - आख्याहि - सांग. ॥१८॥
अहो बुद्धिमान सूत, सर्वसमर्थ प्रभू आपल्या योगमायेने स्वच्छंद रीतीने लीला करतात. आपण त्या श्रीहरींच्या मंगलमय अवतारकथांचे आता वर्णन करा. (१८)


वयं तु न वितृप्याम उत्तमश्लोकविक्रमे ।
यत् श्रृण्वतां रसज्ञानां स्वादु स्वादु पदे पदे ॥ १९ ॥
भगवत् पुण्य त्या लीला न हो तृप्ति कधीहि ती ।
रसिकां नूतनो नित्य रसास्वाद पदोपदी ॥ १९ ॥

उत्तमश्लोकविक्रमे - सत्कीर्तिमान परमेश्वराच्या गुणांनी - वयं - आमची - तु - तर - न वितृप्यामः - कधीच तृप्ती होत नाही - यच्छृण्वतां - ते परमेश्वराचे चरित्र श्रवण करताना - रसज्ञानां - रसिकांची - पदेपदे - क्षणोक्षणी - स्वादुस्वादु - अधिक अधिक गोडी वाढतच जाते. ॥१९॥
रसज्ञ श्रोत्यांना पावलापावलागणिक भगवंतांच्या लीलांमधून नवनवीन रसांचा अनुभव येत असल्याने त्या ऐकून आमची कधीच तृप्ती होत नाही. (१९)


कृतवान् किल वीर्याणि सह रामेण केशवः ।
अतिमर्त्यानि भगवान् गूढः कपटमानुषः ॥ २० ॥
त्यांनी निश्चित केले की श्रेष्ठ भागवतो युगीं ।
श्रवणे पठणे मुक्ती आणि वैकुंठ दायक ॥ २० ॥

गूढः - गुप्त - कपटमानुषः - मायावी मनुष्यरूप धारण करणारा - भगवान् - परमात्मा - केशवः - श्रीकृष्ण - रामेण सह - बलरामासहवर्तमान - अतिमर्त्यानि - अमानुष - वीर्याणि - पराक्रम - कृतवान् - करता झाला - किल - हे निःसंशय आहे. ॥२०॥
भगवान श्रीकृष्णांनी गुप्त राहून मनुष्यरूपाने बलरामासहित असे काही पराक्रमही केले की, जे सामान्य मनुष्य करू शकणार नाही. (२०)


कलिमागतमाज्ञाय क्षेत्रेऽस्मिन् वैष्णवे वयम् ।
आसीना दीर्घसत्रेण कथायां सक्षणा हरेः ॥ २१ ॥
कलीचे ज्ञान होताची आम्ही हा यज्ञ मांडिला ।
हरीच्या ऐकण्या लीला वेळ ही योग्य लाभली ॥ २१ ॥

वयं - आम्ही - कलिं - कलियुग - आगतं - प्राप्त झाले आहे हे - आज्ञाय - जाणून - अस्मिन् - ह्या - वैष्णवे - विष्णूच्या - क्षेत्रे - क्षेत्रात - दीर्घसत्रेण - पुष्कळ दिवस यज्ञ् चालू ठेवण्याच्या उद्देशाने - आसीनाः - बसलेले आहोत - अतः - म्हणून - हरेः - श्रीकृष्णाच्या - कथायां - कथा ऐकावयाला - सक्षणाः - वेळ आहे असे - स्म - आहोत. ॥२१॥
कलियुग आले आहे, असे जाणून या वैष्णव क्षेत्रात आम्ही दीर्घकाल चालणार्‍या सत्राचा संकल्प करून बसलो आहोत. त्यामुळे श्रीहरींची कथा ऐकण्यासाठी आम्हांला पुष्कळ वेळ आहे. (२१)


त्वं नः संदर्शितो धात्रा दुस्तरं निस्तितीर्षताम् ।
कलिं सत्त्वहरं पुंसां कर्णधार इवार्णवम् ॥ २२ ॥
कली हा नष्टितो शुद्धी करीतो शक्तिहीनही ।
यातून पार होण्याला उतारी लाभले तुम्ही ॥ २२ ॥

धात्रा - परमेश्वराने - पुंसां - पुरुषांचे - सत्त्वहरं - सर्वस्व हरण करणार्‍या - अर्णवं - सागरा - इव - प्रमाणे - दुस्तरं - तरून जाण्यास कठीण अशा - कलिं - कलीला - निस्तितीर्षताम् - तरून जाण्यास इच्छिणार्‍या - नः - आम्हाला - कर्णधारः - नावाड्या - इव - सारखा - त्वं - तू - संदर्शितः - दिसतोस. ॥२२॥
हे कलियुग अंतःकरणातील पवित्रता आणि शक्तीचा नाश करणारे आहे. यातून पार होणे कठीण आहे. ज्याप्रमाणे समुद्र पार करणार्‍याला नावाडी मिळावा, त्याप्रमाणे कलियुगातून पार पडण्याची इच्छा करण्यार्‍या आम्हांला ब्रह्मदेवाने आपली भेट घडवून दिली आहे. (२२)


ब्रूहि योगेश्वरे कृष्णे ब्रह्मण्ये धर्मवर्मणि ।
स्वां काष्ठामधुनोपेते धर्मः कं शरणं गतः ॥ २३ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
प्रथमस्कन्धे नैमिषीयोपाखाने प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
ज्याचे छत्रचि विप्रांना असा योगेश्वरो हरी ।
स्वधाम पातला तेंव्हा धर्मे कोणास प्राथिले ॥ २३ ॥
॥ इति श्रीमद्‍भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ १ ॥ १ ॥
हरिः ॐ तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु ॥

योगेश्वरे - योगीश्रेष्ठ - धर्मवर्मणि - धर्मसंरक्षक - ब्रह्मण्ये - परम सत्य - कृष्णे - श्रीकृष्ण - अधुना - सांप्रत - स्वां - निज - काष्ठां - धामाला - उपेते सति - गेला असता - धर्मः - धर्म हा - कं - कोणाला ? - शरणं - शरण- गतः - गेला- ब्रूहि - तेही सांगा. ॥२३॥
धर्मरक्षक, ब्राह्मणभक्त, असे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आता स्वधामाला गेल्यानंतर धर्म कोणास शरण गेला, हे आपण सांगावे. (२३)
अध्याय पहिला समाप्त.


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां प्रथमः स्कन्धे प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
अध्याय पहिला समाप्त

GO TOP