|
श्रीमद् भागवत पुराण श्रीमद्भागवत सप्ताहपारायणविधिः -
सप्ताह यज्ञाचा विधि - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
कुमारा ऊचुः -
(अनुष्टुप्) अथ ते संप्रवक्ष्यामः सप्ताहश्रवणे विधिम् । सहायैर्वसुभिश्चैव प्रायः साध्यो विधिः स्मृतः ॥ १ ॥ दैवज्ञं तु समाहूय मुहूर्तं पृच्छ्य यत्नतः । विवाहे यादृशं वित्तं तादृशं परिकल्पयेत् ॥ २ ॥ नभस्य आश्विनोर्जौ च मार्गशीर्षः शुचिर्नभाः । एते मासाः कथारम्भे श्रोतॄणां मोक्षसूचकाः ॥ ३ ॥ मासानां विप्र हेयानि तानि त्याज्यानि सर्वथा । सहायाश्चेतरे तत्र कर्तव्याः सोद्यमाश्च ये ॥ ४ ॥ देशे देशे तथा सेयं वार्ता प्रेष्या प्रयत्नतः । भविष्यति कथा चात्र आगन्तव्यं कुटुम्बिभिः ॥ ५ ॥ दूरे हरिकथाः केचित् दूरे चाच्युतकीर्तनाः । स्त्रियः शूद्रादयो ये च तेषां बोधो यतो भवेत् ॥ ६ ॥ देशे देशे विरक्ता ये वैष्णवाः कीर्तनोत्सुकाः । तेष्वेव पत्रं प्रेष्यं च तल्लेखनं इतीरितम् ॥ ७ ॥ सतां समाजो भविता सप्तरात्रं सुदुर्लभः । अपूर्वरसरूपैव कथा चात्र भविष्यति ॥ ८ ॥ श्रीमद्भागवत पीयुष पानाय रसलम्पटाः । भवन्तश्च तथा शीघ्रं आयात प्रेमतत्पराः ॥ ९ ॥ नावकाशः कदाचित् चेत् दिनमात्रं तथापि तु । सर्वथाऽऽगमनं कार्यं क्षणोऽत्रैव सुदुर्लभः ॥ १० ॥ एवमाकारणं तेषां कर्तव्यं विनयेन च । आगन्तुकानां सर्वेषां वासस्थानानि कल्पयेत् ॥११ ॥
कुमार म्हणाले - (अनुष्टुप्) साधूंनो ! सांगतो आम्ही सप्ताहविधि तो कसा । लोक नी धन साह्याने जशी साध्य कथीयली ॥ १ ॥ ज्योतिषा सुमुहूर्ताते घ्यावे छान विचारुनी । विवाहासम ते द्रव्य योजावे खर्च वेचण्या ॥ २ ॥ भादवा कार्तिकाश्वीन आषाढ मार्गशीर्ष ही । श्रावणासह साहीही मासी श्रावण मोक्षद ॥ ३ ॥ भद्रा नी व्यतिपातादी कुयोग त्याज्य सर्वथा । इच्छार्थी असता कोणी द्यावा त्या सहभाग तो ॥ ४ ॥ देशदेशात वार्ता ही धाडावी यत्नपूर्वक । त्या सर्वा सपरिवारे प्रार्थावे ऐकण्या कथा ॥ ५ ॥ स्त्रिया शुद्रादिकांना ही बोलवावे कथेस या । जे दूर हरिच्या भक्ती होते आजवरी तसे ॥ ६ ॥ विरक्त देशदेशीचे प्रेमी हरिकथेस या । निमंत्रणे तया द्यावी कथेचा विधि हा असा ॥ ७ ॥ इथे भागवतीदेवी कथा सत्संगही तसा । अपूर्व रसवार्ता ही सातची दिनि होतसे ॥ ८ ॥ सारे रसिक हो तुम्ही कथापानास पातणे । प्रेमाने शीघ्रची यावे कृपा ही एवढी करा ॥ ९ ॥ जरी तो एवढा वेळ नसला मग हे करा । एके तरी दिनी यावे एकेक क्षण दुर्लभ ॥ १० ॥ या अशा विनयानेच करावे ते निमंत्रण । येणार्या सर्व लोकांचा निवास युक्त ठेवणे ॥ ११ ॥
सनकादिक म्हणाले - आम्ही आता आपल्याला सप्ताहश्रवणाचे विधान सांगतो. साधारणतः लोकांची मदत आणि धन यांच्या साहाय्याने हा विधी पार पाडावा असे सांगितले जाते. सुरुवातीला ज्योतिष्याला बोलावून मुहूर्त विचारावा. तसेच विवाहासाठी जेव्हढ्या धनाची आवश्यकता असते, तितक्या धनाची प्रयत्नपूर्वक व्यवस्था करावी. सप्ताह करण्यासाठी आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक व मार्गशीर्ष हे सहा महिने श्रोत्यांसाठी मोक्षदायी आहेत. देवर्षे ! या महिन्यांतही भद्रा, व्यतिपात इत्यादी कुयोग टाळावेत. दुसरे जे उत्साही लोक असतील, त्यांना आपले मदतनीस म्हणून घ्यावे. नंतर प्रयत्नपूर्वक देशोदेशी निमंत्रण द्यावे की, येथे भागवतकथा होणार आहे, तरी सर्व लोकांनी सहकुटुंब सहपरिवार यावे. जे भागतवतकथा आणि हरिनाम-संकीर्तनापासून दूर राहिलेले असतात त्यांना तसेच स्त्रिया, शूद्रादी यांनाही निमंत्रण मिळेल अशी व्यवस्था करावी. देशोदेशी जे विरक्त वैष्णव आणि हरीकीर्तनात गोडी असणारे असतील, त्यांनाच अवश्य निमंत्रण पाठवावे. त्यांना निमंत्रण पाठविण्याची पद्धत अशी आहे. "महोदय, येथे सात दिवस सत्पुरुषांची दुर्लभ अशी मांदियाळी जमणार आहे आणि अपूर्व रसमय अशी श्रीमद्भागवताची कथा होणार आहे. आपण भगवत्कथारसाचे रसिक आहात, म्हणून श्रीभागवतामृताचे सेवन करण्यासाठी प्रेमपूर्वक ताबडतोव येणाची कृपा करावी. जर आपणांस इतके दिवस सवड नसेल, तर निदान एक दिवस तरी अवश्य येण्याची कृपा करावी. कारण येथील प्रत्येक क्षण अत्यंत दुर्मिळ आहे." अशा प्रकारे नम्रतेने त्यांना आमंत्रण द्यावे आणि जे लोक येतील, त्यांच्यासाठी निवासाची योग्य ती व्यवस्था करावी. (१-११)
तीर्थे वापि वने वापि गृहे वा श्रवणं मतम् ।
विशाला वसुधा यत्र कर्तव्यं तत्कथास्थलम् ॥ १२ ॥
तीर्थी तैसे वनी गेही मानिली श्रवणा कथा । विशाल स्थान राखावे कथेच्या श्रवणास्तव ॥ १२ ॥
कथाश्रवण तीर्थक्षेत्रात, वनामध्ये किंवा आपल्या घरी सुद्धा योग्य मानले गेले आहे. जेथे प्रशस्त मैदान असेल, तेथेच कथेचे आयोजन करावे. (१२)
शोधनं मार्जनं भूमेः लेपनं धातुमण्डनम् ।
गृहोपस्करमुद्ध्रुत्य गृहकोणे निवेशयेत् ॥ १३ ॥ अर्वाक् पंचाहतो यत्नात् आस्तीर्णानि प्रमेलयेत् । कर्तव्यो मण्डपः प्रोच्चैः कदलीखण्डमण्डितः ॥ १४ ॥ फलपुष्पदलैर्विष्वक् वितानेन विराजितः । चतुर्दिक्षु ध्वजारोपो बहुसम्पद्विराजितः ॥ १५ ॥ ऊर्ध्वं सप्तैव लोकाश्च कल्पनीयाः सविस्तरम् । तेषु विप्रा विरक्ताश्च स्थापनीयाः प्रबोध्य च ॥ १६ ॥ पूर्वं तेषां आसनानि कर्तव्यानि यथोत्तरम् । वक्तुश्चापि तदा दिव्यं आसनं परिकल्पयेत् ॥ १७ ॥ उदङ्मुखो भवेद्वक्ता श्रोता वै प्राङ्मुखस्तदा । प्राङ्मुखश्चेत् भवेद्वक्ता श्रोता च उदङ्मुखस्तदा ॥ १८ ॥ अथवा पूर्वदिग्ज्ञेया पूज्यपूजकमध्यतः । श्रोतॄणां आगमे प्रोक्ता देशकालादिकोविदैः ॥ १९ ॥ विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्रविशुद्धिकृत् । दृष्टान्तकुशलो धीरो वक्ता कार्योऽति निःस्पृह ॥ २० ॥ अनेकधर्मनिभ्रान्ताः स्त्रैणाः पाखण्डवादिनः । शुकशास्त्रकथोच्चारे त्याज्यास्ते यदि पण्डिताः ॥ २१ ॥ वक्तुः पार्श्वे सहायार्थं अन्यः स्थाप्यस्तथाविधः । पण्डितः संशयच्छेत्ता लोकबोधनतत्परः ॥ २२ ॥
सडे झाडोनि टाकावे भिंतीना रंग लेपिणे । घरप्रपंचिची भांडी कथेच्या स्थळि ती नको ॥ १३ ॥ आधी पाच दिनाने तो भव्य मंडप टाकणे । खांब ते केळिच्या खांबे करावे की सुशोभित ॥ १४ ॥ फळ पुष्प दळाने त्या मंडपा सजवा बहू । पताका ध्वजही लावा शोभेच्या वस्तु मांडणे ॥ १५ ॥ मंडपी सात थोरांना उंच आसन ठेवणे । सप्त लोक स्मरोनिया विरक्त बैसवा द्विज ॥ १६ ॥ पुढे जे बसती त्यांना आसने योग्य ती असो । उंच सिंहासनी वक्ता व्य्वस्था करणे अशी ॥ १७ ॥ उत्तरी मुख जै वक्ता श्रोता पूर्वमुखी बसो । बसे पूर्वमुखी वक्ता श्रोत्याचे उत्तरेस हो ॥ १८ ॥ अथवा बसणे युक्त द्वयांचे मुखपूर्वला । जाणते देश कालाचे सांगती बसणे असे ॥ १९ ॥ विरक्त वैष्णवी विप्र वेदशास्त्रनिपूण जो । दृष्टांती निस्पृही ज्ञानी वक्ताचि अधिकारी तो ॥ २० ॥ अनेक धर्मविभ्रांत स्त्रैण पाखंडवादि जो । शुकशास्त्र कथेला तो त्याज्य पंडितही असो ॥ २१ ॥ वक्त्यांच्या जवळी अन्य तसाच द्विज बैसवा । कुशंका नी तशा शंका लोकांच्या मिटवील जो ॥ २२ ॥
जागेची स्वच्छता, सडा-संमार्जन, रंग-रंगोटी इत्यादी करावी. घरातील सर्व सामान एका कोपर्यात ठेवावे. चार-पाच दिवस अगोदर प्रयत्नपूर्वक सतरंज्या वगैरे आसनासाठी तयार ठेवाव्या आणि केळीच्या खांबांनी उंच मंडप करून सजवावा. तो चारी बाजूंनी पाने, फुले, फळे वगैरे लावून सुशोभित करावा आणि चारी बाजूंना झेंडे लावून निरनिराळ्या वस्तूंनी तो सजवावा. त्या मंडपात एका उंच स्थानावर सात विशाल लोकांची कल्पना करून त्यावर विरक्त ब्राह्मणांना बोलावून बसवावे. पुढच्या बाजूला त्यांच्यासाठी यथोचित आसने तयार ठेवावी. त्यांच्यामागे वक्त्यासाठी सुद्धा एक दिव्य सिंहासन तयार करावे. जर वक्ता उत्तराभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि जर वक्ता पूर्वाभिमुख बसला असेल, तर श्रोत्यांनी उत्तरेकडे तोंड करून बसावे. किंवा वक्ता आणि श्रोता दोघांनीही पूर्वेकडे तोंड करून बसावे. देशकाल इत्यादि जाणणार्या विद्वानांनी श्रोत्यांच्यासाठी असाच नियम सांगितला आहे. जो वेद आणि शास्त्रांची स्पष्ट व्याख्या करण्याचा अधिकारी आहे, वेगवेगळे दृष्टांन्त देऊ शकतो आणि अत्यंत निःस्पृह आहे असा विरक्त आणि विष्णुभक्त बाह्मण वक्ता असावा. जे अनेक धर्ममतांमुळे गोंधळात पडले आहेत, स्त्रीलंपट आहेत, नास्तिक आहेत, असे लोक जरी विद्वान असले, तरी त्यांना भागवतकथा सांगण्यासाठी नेमू नये. वक्त्याच्या जवळच त्याला मदत करण्यासाठी एक तसाच विद्वान बसविला पाहिजे. तोसुद्धा सर्व प्रकारच्या संशयांची निवृत्ती करण्यात अधिकारी आणि लोकांना समजावून देण्यात कुशल असला पाहिजे. (१३-२२)
वक्त्रा क्षौरं प्रकर्तव्यं दिनाद् अर्वाक् व्रताप्तये ।
अरुणोदयेऽसौ निर्वर्त्य शौचं स्नानं समाचरेत् ॥ २३ ॥ नित्यं संक्षेपतः कृत्वा संध्याद्यं स्वं प्रयत्नतः । कथाविघ्नविघाताय गणनाथं प्रपूजयेत् ॥ २४ ॥ पितॄन् संतर्प्य शुद्ध्यर्थं प्रायश्चित्तं समाचरेत् । मण्डलं च प्रकर्तव्यं तत्र स्थाप्यो हरिस्तथा ॥ २५ ॥ कृष्णमुद्दिश्य मंत्रेण चरेत् पूजाविधिं क्रमात् । प्रदक्षिण नमस्कारान् पूजान्ते स्तुतिमाचरेत् ॥ २६ ॥ संसारसागरे मग्नं दीनं मां करुणानिधे । कर्ममोहगृहीताङ्गं मामुद्धर भवार्णवात् ॥ २७ ॥ श्रीमद्भागवतस्यापि ततः पूजा प्रयत्नतः । कर्तव्या विधिना प्रीत्या धूपदीपसमन्विता ॥ २८ ॥ ततस्तु श्रीफलं धृत्वा नमस्कारं समाचरेत् । स्तुतिः प्रसन्नचित्तेन कर्तव्या केवलं तदा ॥ २९ ॥ श्रीमद्भागवताख्योऽयं प्रत्यक्षः कृष्ण एव हि । स्वीकृतोऽसि मया नाथ मुक्त्यर्थं भवसागरे ॥ ३० ॥ मनोरथो मदीयोऽयं सफलः सर्वथा त्वया । निर्विघ्नेनैव कर्तव्य दासोऽहं तव केशव ॥ ३१ ॥
वक्त्याने करणे क्षौर व्रतारंभ म्हणोनिया । स्नान शौचादि कर्मेही प्रभाती करणे असे ॥ २३ ॥ संध्यादी नित्यकर्मांना आटोपा थोडक्यात नी । कथेत टाळण्या विघ्न पूजावा श्री गणेशजी ॥ २४ ॥ पितृगणास तार्पण्य पापशुद्ध्यर्थ ते करा । करावा मंडली एका तो प्रस्थापित श्रीहरी ॥ २५ ॥ कृष्णात चित्त लावोनी मंत्राने पूजिणे तया । प्रदक्षिणा नमस्कार पुजेने स्तुति ती करा ॥ २६ ॥ संसारसागरी मग्न दीन मी करुणानिधे । गुंतलो कर्म मोहात उद्धारी रे भवार्णवी ॥ २७ ॥ श्रीमद्भागवतालाही पूजावे प्रार्थुनी असे । प्रीतीने करणे सर्व धूप दीप समर्पित ॥ २८ ॥ श्रीफलो ठेवुनी ग्रंथा नमस्कार करा पुन्हा । स्तुती प्रसन्न चित्ताने करावी ती पुन्हा तशी ॥ २९ ॥ श्रीमद्भागवताख्यान प्रत्यक्ष कृष्णरुप तू । स्वीकारी मजला नाथा मुक्त्यर्थ भवसागरी ॥ ३० ॥ मनोरथ करी माझा सफल सर्वथाचि तू । होवो निर्विघ्न हे कार्य दास मी तव केशवा ॥ ३१ ॥
कथा प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी व्रत धारण करण्यासाठी वक्त्याने क्षौर केले पाहिजे. तसेच सूर्योदयाच्या वेळी शौच-मुखमार्जन करून स्नान करावे. संध्या वगैरे आपली नित्यकर्मे थोडक्यात आटोपून कथा निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून श्रीगणेशाचे पूजन करावे. त्यानंतर पितरांसाठी तर्पण करून पापांच्या शुद्धीसाठी प्रायश्चित करावे आणि एक मंडल तयार करून त्यावर श्रीहरींची स्थापना करावी. नंतर भगवान श्रीकृष्णांना उद्देशून मंत्रोच्चारपूर्वक षोडशोपचारांनी पूजन करावे. त्यानंतर प्रदक्षिणा, नमस्कार, करून पूजेच्या शेवटी स्तुती करावी. हे करुणानिधे, मी संसारसागरात बुडालेला एक दीन आहे. कर्मामुळे उत्पन्न झालेल्या मोहाने ग्रासलेल्या मला या संसारसागरातून वर काढावे. नंतर धूप, दीप वगैरे उपचारांनी मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने श्रीमद्भागवताचीही योग्य प्रकारे पूजा करावी. त्यानंतर ग्रंथाच्या समोर नारळ ठेवून नमस्कार करावा आणि प्रसन्न चित्ताने केवळ स्तुती करावी. श्रीमद्भागवताच्या रूपाने आपण साक्षात भगवान श्रीकृष्णच आहात. नाथ, या भवसागरातून सुटका होण्यासाठी मी आपणांस शरण आलो आहे. कोणत्याही विघ्नाशिवाय आपण माझा हा मनोरथ यथास्थित पूर्ण करावा. हे केशवा ! मी आपला दास आहे. (२३-३१)
एवं दीनवचः प्रोच्य वक्तारं चाथ पूजयेत् ।
सम्भूष्य वस्त्रभूषाभिः पूजान्ते तं च संस्तवेत् ॥ ३२ ॥ शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद । एतत्कथाप्रकाशेन मदज्ञानं विनाशय ॥ ३३ ॥ तदग्रे नियमः पश्चात् कर्तव्यः श्रेयसे मुदा । सप्तरात्रं यथाशक्त्या धारणीयः स एव हि ॥ ३४ ॥ वरणं पंचविप्राणां कथाभङ्गनिवृत्तये । कर्तव्यं तैः हरेर्जाप्यं द्वादशाक्षरविद्यया ॥ ३५ ॥ ब्राह्मणान् वैष्णवान् चान्यान् तथा कीर्तनकारिणः । नत्वा संपूज्य दत्ताज्ञः स्वयं आसनमाविशेत् ॥ ३६ ॥ लोकवित्तधनागार पुत्रचिन्तां व्युदस्य च । कथाचित्तः शुद्धमतिः स लभेत्फलमुत्तमम् ॥ ३७ ॥
प्रार्थावे लीन होवोनी वक्त्याला पूजिणे पुन्हा । वस्त्र आभूषणे द्यावी करावी स्तुती ती अशी ॥ ३२ ॥ शुकरुप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद । आता कथा प्रकाशावी माझे अज्ञान नष्टिणे ॥ ३३ ॥ कल्याण धरणे चित्ती प्रसन्न होउनी असे । सात रात्री यथाशक्ति नियमा पाळणे पहा ॥ ३४ ॥ वरणी पाच विप्रांना कथारक्षार्थ ती करा । द्वादशाक्षर मंत्राने जापिती भगवंत जे ॥ ३५ ॥ विप्रांना विष्णुभक्तांना नमस्कारुनि पूजिणे । तयांची घेवूनी आज्ञा बसावे आसनी स्वये ॥ ३६ ॥ लोक वित्त धनागार पुत्रचिंताहि सोडुनी । शुद्ध चित्ते कथेसी या ऐकता फळ लाभते ॥ ३७ ॥
याप्रकारे करुणापूर्ण प्रार्थना करून नंतर वक्त्याचे पूजन करावे. वक्त्याला सुंदर वस्त्रालंकारांनी सुशोभित करून त्याच्या पूजनानंतर त्याचीही अशी स्तुती करावी. "हे शुकस्वरूप भगवन, समजावून देण्याच्या कलेत आपण कुशल आहात आणि शास्त्रात पारंगत आहात. कृपया ही कथा समजावून सांगून माझे अज्ञान दूर करावे." त्यानंतर प्रसन्नेतेने आलया कल्याणासाठी वक्त्यासमोर नियम करून सात दिवसपर्यंत त्यांचे यथाशक्ती पालन करावे. कथेमध्ये विघ्न येऊ नये, म्हणून आणखी पाच ब्राह्मणांना निमंत्रित करून त्यांच्याद्वारा भगवंतांच्या द्वादशाक्षर मंत्राचा (’ॐ नमो भगवते वासुदेवाय’) जप करावा. यानंतर ब्राह्मण, अन्य विष्णुभक्त आणि संकीर्तन करणार्यांना नमस्कार करून त्यांची पूजा करावी व त्यांची आज्ञा घेऊन स्वतः स्थानापन्न व्हावे. जो पुरुष लोकव्यवहार, संपत्ती, धन, घर, पुत्र इत्यादींची चिंता सोडून शुद्धचित्ताने केवळ कथेतच लक्ष ठेवतो, त्याला श्रवणाचे उत्तम फळ मिळते. (३२-३७)
आसूर्योदयमारभ्य सार्धत्रिप्रहरान्तकम् ।
वाचनीया कथा सम्यक् धीरकण्ठं सुधीमता ॥ ३८ ॥ कथाविरामः कर्तव्यो मध्याह्ने घटिकाद्वयं । तत्कथामनु कार्यं वै कीर्तनं वैष्णवैस्तदा ॥ ३९ ॥ मलमूत्रजयार्थं हि लघ्वाहारः सुखावहः । हविष्यान्नेन कर्तव्यो हि, एकवारं कथार्थिना ॥ ४० ॥ उपोष्य सप्तरात्रं वै शक्तिश्चेत् श्रुणुयात् तदा । घृतपानं पयःपानं कृत्वा वै श्रृणुयात् सुखम् ॥ ४१ ॥ फलाहारेण वा भाव्यं एकभुक्तेन वा पुनः । सुखसाध्यं भवेद् यत्तु कर्तव्यं श्रवणाय तत् ॥ ४२ ॥ भोजनं तु वरं मन्ये कथाश्रवणकारकम् । नोपवासो वरः प्रोक्तः कथाविघ्नकरो यदि ॥ ४३ ॥
सूर्योदये कथारंभ औटप्रहर सांगणे । वाचके मध्यमावाणी कथा सुंदर वाचिणे ॥ ३८ ॥ अवकाश कथेला तो द्यावा माध्यान्हि दो घडी । कथानुसार योजावे रिक्त वेळात कीर्तन ॥ ३९ ॥ मलमूत्र निरोधाते अल्पाहारचि सेविणे । श्रोत्याने एक वेळेला हविष्यान्नचि भक्षिणे ॥ ४० ॥ जर शक्य दिनी सात करावे ते उपोषण । दूध तूप पिवोनिया ऐकावे सुखपूर्वक ॥ ४१ ॥ एकभुक्त फलाहार चालते कोणतेहि ते । करावे शक्य ते जैसे सुसाध्य श्रवणास ते ॥ ४२ ॥ जेवणे चांगले का की श्रवणी लक्ष लागणे । उपास जर तो बाधी कथाविघ्न असाचि तो ॥ ४३ ॥
बुद्धिमान वक्त्याने सूर्योदयाला कथेची सुरुवात करून साडेतीन प्रहरांपर्यंत मध्य स्वरात, चांगल्या तर्हेने स्पष्ट उच्चारांसहित कथेचे वाचन करावे. दुपारच्या वेळी दोन घटका कथा बंद ठेवावी. यावेळी कथेतील प्रसंगानुसार उपस्थित वैष्णवांनी भगवद्गुणांचे संकीर्तन करावे. कथेच्या वेळी मल-मूत्र-वेग ताब्यात राहावा, यासाठी अल्पाहार हितकारी असतो. म्हणून श्रोत्याने दिवसातून केवळ एक वेळ हविष्यान्नच घ्यावे. सुदृढ असेल त्याने सात दिवस निराहार राहून कथा ऐकावी किंवा केवळ दूध वा तूप घेऊन आनंदाने श्रवण करावे किंवा फलाहार घ्यावा अगर दिवसातून एक वेळ एकाच प्रकारचे अन्न खावे. ज्याला जो नियम सहज पाळणे शक्य असेल, त्याने तो नियम कथाश्रवणाचे वेळी पाळावा. कथा श्रवणास सहाय्यक असेल तर मी उपवास करण्यापेक्षा भोजन करण्याला प्राधान्य देतो. उपवास करण्याने श्रवणात अडथळा येत असेल, तर असा उपवास न केलेला बरा. (३८-४३)
सप्ताहव्रतिनां पुंसां नियमान् श्रुणु नारद ।
विष्णुदीक्षाविहीनानां नाधिकारः कथाश्रवे ॥ ४४ ॥ ब्रह्मचर्यमधः सुप्तिः पत्रावल्यां च भोजनम् । कथासमाप्तौ भुक्तिं च कुर्यात् नित्यं कथाव्रती ॥ ४५ ॥ द्विदलं मधु तैलं च गरिष्ठान्नं तथैव च । भावदुष्टं पर्युषितं जह्यात् नित्यं कथाव्रती ॥ ४६ ॥ कामं क्रोधं मदं मानं मत्सरं लोभमेव च । दम्भ मोहं तथा द्वेषं दूरयेच्च कथाव्रती ॥ ४७ ॥ वेदवैष्णवविप्राणां गुरुगोव्रतिनां तथा । स्त्रीराजमहतां निन्दां वर्जयेत् यः कथाव्रती ॥ ४८ ॥ रजस्वला अन्त्यज म्लेच्छ पतित व्रात्यकैस्तथा । द्विजद्विड् वेदबाह्यैश्च न वदेत् यः कथाव्रती ॥ ४९ ॥ सत्यं शौचं दयां मौनं आर्जवं विनयं तथा । उदारमानसं तद्वत् एवं कुर्यात् कथाव्रती ॥ ५० ॥ दरिद्रश्च क्षयी रोगी निर्भाग्यः पापकर्मवान् । अनपत्यो मोक्षकामः श्रुणुयाच्च कथामिमाम् ॥ ५१ ॥ अपुष्पा काकवन्ध्या च वन्ध्या या च मृतार्भका । स्रवत् गर्भा च या नारी तया श्राव्या प्रयत्नतः ॥ ५२ ॥ एतेषु विधिना श्रावे तदक्षयतरं भवेत् । अत्युत्तमा कथा दिव्या कोटियज्ञफलप्रदा ॥ ५३ ॥
ऐकणार्या इतरांचे नियमा ऐकणे मुनी । विष्णुदीक्षा विहीनांना कथेचा अधिकार ना ॥ ४४ ॥ पाळावे ब्रह्मचर्याते झोपावे जमिनीवरी । श्रीकथा संपते तेव्हा पत्रावळीत जेवणे ॥ ४५ ॥ डाळी नी तेल गोडाचे गरिष्ठान्न न सेविणे । शिळे नी दृष्टि दोषाचे अन्न वर्ज्य असे पहा ॥ ४६ ॥ काम क्रोध मद माना मत्सरा स्थान ते नको । लोभ दंभ तसा मोह नको द्वेष कथाव्रती ॥ ४७ ॥ कथाव्रती असे त्याने न निंदो वेद वैष्णवा । गुरु गायव्रती तैसे स्त्रिया राजा नि संत ते ॥ ४८ ॥ त्यजा रजस्वला म्लेंच्छा पापी व्रात्यासही तसे । वेदहीन द्विजाशीही कथा ही नच सांगणे ॥ ४९ ॥ सत्य शौच दया मौन आर्जवी विनयी तसा । उदार मानसी त्याला कथा ही सांगणे पहा ॥ ५० ॥ धनहीन क्षयरोगी निर्भाग्यी पापकर्मि ही । पुत्रहीन मुमुक्षुंना ऐकवावी कथा पहा ॥ ५१ ॥ अपुष्पा काकवंध्येने वंध्या नी मृतअर्भका । गर्भश्रवा अशा स्त्रीने ऐकावे यत्नपूर्वक ॥ ५२ ॥ विधिवत् ऐकता त्यांनी निश्चीत फळ लाभते । अत्युत्तमा कथा दिव्या कोटियज्ञ फलप्रदा ॥ ५३ ॥
नारदमुने ! नियमपूर्वक सप्ताह ऐकणार्या पुरुषांसाठी नियम ऐका. ज्याने विष्णुभक्तांची दीक्षा घेतली नाही, तो कथाश्रवण करण्यास अधिकारी नाही. जो पुरुष नित्य नियमाने कथा ऐकतो, त्याने ब्रह्मचर्य पाळावे, जमिनीवर झोपावे आणि दररोज कथा संपल्यावर पत्रावळीवर भोजन करावे. डाळ, मध, तेल, पचण्यास जड, वाईट भावनेने दूषित आणि शिळे अशा अन्नाचा व्रतस्थ माणसाने अवश्य त्याग केला पाहिजे. कथाश्रवणाचे व्रत घेतलेल्याने काम, क्रोध, मद, मान-सन्मान, मत्सर, लोभ, दंभ, मोह आणि द्वेष यांना आपल्या मनात अजिबात थारा देऊन नये. त्याने वेद, वैष्णव, ब्राह्मण, गुरू, गोसेवा करणारे तसेच स्त्रिया, राजा आणि महापुरुषांची निंदा वर्ज्य करावी. व्रतस्थ पुरुषाने रजस्वला स्त्री, चांडाल, म्लेंच्छ, पापी, गायत्रीजप न करणारे ब्राह्मण, ब्राह्मणांचा द्वेष करणारे तसेच वेद न मानणारे यांच्याशी संभाषण करू नये. कथा श्रवण करणार्याने सत्य, शौच, दया, मौन, आर्जव, विनय आणि औदार्ययुक्त आचरण केले पाहिजे. दरिद्री, क्षयरोगी, कोणत्याही रोगाने पीडित, अभागी, पापी, पुत्रहीन आणि मोक्षाची इच्छा करणारे यांनीही ही कथा ऐकावी. ज्या स्त्रीचे रजोदर्शन थांबले आहे, जिला फक्त एकच संतान झाले आहे, जी वांझ आहे, जिचे संतान जिवंत राहात नाही किंवा जिचा गर्भपात होतो अशा स्त्रियांनी प्रयत्नपूर्वक ही कथा ऐकावी. वरील सर्वजण जर नियमांचे पालन करून कथा ऐकतील, तर त्यांना अविनाशी फल प्राप्त होऊ शकते. ही सर्वांत उत्तम दिव्य कथा कोट्यवधी यज्ञांचे फळ देणारी आहे. (४४-५३)
एवं कृत्वा व्रतविधिं उद्यापनं अथाचरेत् ।
जन्माष्टमी व्रतमिव कर्तव्यं फलकांक्षिभिः ॥ ५४ ॥ अकिंचनेषु भक्तेषु प्रायो नोद्यापनाग्रहः । श्रवणेनैव पूतास्ते निष्कामा वैष्णवा यतः ॥ ५५ ॥
विधिवत् ऐकुनी वार्ता उद्यापन करा पुन्हा । जन्माष्टमी व्रता ऐसे करावे फळ लाभते ॥ ५४ ॥ अकिंचना नि भक्ताला असा आग्रह तो नसे । पवित्र श्रवणाने तो निष्काम कृष्णभक्त जो ॥ ५५ ॥
अशा प्रकारे नियमांचे पालन करून नंतर या व्रताचे उद्यापन करावे. ज्याला विशिष्ठ फलप्राप्तीची इच्छा असेल, त्याने गोकुळाष्टमी व्रताप्रमाणे याचे उद्यापन करावे. परंतु जे भगवंतांचे निष्कांचन भक्त आहेत, त्यांना उद्यापन करण्याचे बंधन नाही. ते निष्काम भगवद्भक्त असल्याने केवळ श्रवणानेच पवित्र होतात. (५४-५५)
एवं नगाहयज्ञेऽस्मिन् समाप्ते श्रोतृभिस्तदा ।
पुस्तकस्य च वक्तुश्च पूजा कार्यातिभक्तितः ॥ ५६ ॥ प्रसादतुलसीमाला श्रोतृभ्यश्चाथ दीयताम् । मृदंगतालललितं कर्तव्यं कीर्तनं ततः ॥ ५७ ॥ जयशब्दं नमःशब्दं शंखशब्दं च कारयेत् । विप्रेभ्यो याचकेभ्यश्च वित्तं अन्नं च दीयताम् ॥ ५८ ॥ विरक्तश्चेत् भवेत् श्रोता गीता वाद्या परेऽहनि । गृहस्थश्चेत् तदा होमः कर्तव्यः कर्मशान्तये ॥ ५९ ॥ प्रतिश्लोकं तु जुहुयात् विधिना दशमस्य च । पायसं मधु सर्पिश्च तिलान् आदिकसंयुतम् ॥ ६० ॥
सप्ताह यज्ञ हा होता श्रोत्यांनी भक्तिपूर्वक । करावी ग्रंथपूजा नी वक्ताही पूजिणे तसा ॥ ५६ ॥ प्रसाद तुलसीमाला वक्त्याने वाटणे पहा । मृदंग टाळ नादाने करावे हरिकीर्तन ॥ ५७ ॥ जय शब्दे नमो शब्दे तसेचि शंखनाद हो । विप्रांना याचकांनाही वित्तान्न दान ते करा ॥ ५८ ॥ विरक्त असता श्रोता कर्मशांती दुजे दिनी । गीतापाठ करावा तो गृहस्थे होम योजिणे ॥ ५९ ॥ हवनी दशमस्कंधी एकेक श्लोक वाचता । खीर मध तिळे तूप आहुत्या त्या समर्पिणे ॥ ६० ॥
याप्रकारे जेव्हा सप्ताहयज्ञाची समाप्ती होईल, तेव्हा श्रोत्यांनी अत्यंत भक्तिपूर्वक ग्रंथ आणि वक्ता यांची पूजा करावी. नंतर वक्त्याने, श्रोत्यांना प्रसाद व तुळशीच्या माळा द्यावात आणि सर्वांनी मृदंग, झांज यांच्या सुंदर गजरात भगवत्कीर्तन करावे. जयजयकार, नमस्कार आणि शंखनाद करावा. तसेच ब्राह्मण आणि याचक यांना धन आणि अन्न द्यावे. श्रोता विरक्त असेल तर त्याने या कर्माच्या समाप्तीसाठी दुसर्या दिवशी गीतापठण करावे. गृहस्थाने हवन करावे. हवन करताना दशमस्कंधाचा एक एक श्लोक वाचून विधिपूर्वक पायस, मध, तूप, तीळ आणि अन्न या वस्तूंच्या आहुती द्याव्यात. (५६-६०)
अथवा हवनं कुर्याद् गायत्र्या सुसमाहितः ।
तन्मयत्वात् पुराणस्य परमस्य च तत्त्वतः ॥ ६१ ॥ होमाशक्तौ बुधो हौम्यं दद्यात् तत्फल सिद्धये । नानाच्छिद्रनिरोधार्थं न्यूनताधिकतानयोः ॥ ६२ ॥ दोषयोः प्रशमार्थं च पठेत् नामसहस्रकम् । तेन स्यात् सफलं सर्वं नास्त्यस्मादधिकं यतः ॥ ६३ ॥
अथवा एकचित्ताने गायत्री हवनो करा । गायत्रीरुप हे आहे पुराण भगवत्कथा ॥ ६१ ॥ होमाची नसता शक्ती अशांतिदान ते करा । विप्रास होमसामग्री दिल्याने फळ लाभते ॥ ६२ ॥ सर्वदोष शमनार्थ सहस्त्र विष्णुनाम हा । श्रद्धेने करणे पाठ कर्म हे सर्व श्रेष्ठची ॥ ६३ ॥
किंवा एकाग्रचित्ताने गायत्रीमंत्राने हवन करावे. कारण, खरे पाहू जाता हे महापुराण गायत्रीस्वरूपच आहे. होम-हवन करण्याचे सामर्थ्य नसेल तर कथाश्रवणाचे फल प्राप्त करण्यासाठी ब्राह्मणांना हवनसामग्री दान करावी. तसेच अनेक प्रकारच्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि विधिनियम पालनात जे कमी-अधिक दोष राहिले असतील, ते नाहीसे करण्यासाठी विष्णुसहस्रनामाचा पाठ करावा. त्यामुळे सर्व कर्मांचे पूर्तता होते. कारण कोणतेही कर्म यापेक्षा श्रेष्ठ नाही. (६१-६३)
द्वादश ब्राह्मणान् पश्चात् भोजयेत् मधुपायसैः ।
दद्यात् सुवर्णं धेनुं च व्रतपूर्णत्वहेतवे ॥ ६४ ॥ शक्तौ पलत्रयमितं स्वर्णसिंहं विधाय च । तत्रास्य पुस्तकं स्थाप्यं लिखितं ललिताक्षरम् ॥ ६५ ॥ संपूज्य आवाहनाद्यैः तद् उपचारैः सदक्षिणम् । वस्त्रभूषण गन्धाद्यैः पूजिताय यतात्मने ॥ ६६ ॥ आचार्याय सुधीर्दत्त्वा मुक्तः स्याद् भवबंधनैः । एवं कृते विधाने च सर्वपापनिवारणे ॥ ६७ ॥ फलदं स्यात् पुराणं तु श्रीमद्भागवतं शुभम् । धर्मकामार्थमोक्षाणां साधनं स्यात् न संशयः ॥ ६८ ॥
पुन्हा बारा द्विजा द्यावे षड्रसान्नादि भोजने । गो स्वर्ण दान ते द्यावे व्रतपूर्ती म्हणोनिया ॥ ६४ ॥ घडवा तीन तोळ्याचे सिंहासन सुवर्णी जे । मांडावी पोथि त्या ठायी भगवद्रूप ही कथा ॥ ६५ ॥ आवाहनादि रीतीने पूजावे विधिपूर्वक । आचार्या पूजिणे तैसे वस्त्रालंकार देउनी । गंधादि लावूनी त्याना दक्षिणा ती समर्पिणे ॥ ६६ ॥ बुद्धिवंत असा दाता मुक्त होवोनि जातसे । सप्ताह वाचनाने ती पापे जळति सर्वची ॥ ६७ ॥ मिळे फळ पुराणाने श्रीमद्भागवते शुभ । धर्मार्थ काम मोक्षाच्या प्राप्तीचे तंत्र हे असे ॥ ६८ ॥
नंतर बारा ब्राह्मणांना पायस, मध असे उत्तम पदार्थयुक्त भोजन द्यावे, तसेच व्रताच्या पूर्ततेसाठी गाय आणि सुवर्णाचे दान करावे. आर्थिक क्षमता असेल तर, तीन ’पल’ सुवर्णाचा एक सिंह करून, त्यावर सुंदर अक्षरात लिहिलेला श्रीमद्भागवत ग्रंथ ठेवावा. आवाहनादी विविध उपचारांनी त्याची पूजा करावी आणि जितेंद्रिय आचार्याला वस्त्र, अलंकार, गंध वगैरेंनी पूजा करून दक्षिणा देऊन तो ग्रंथ समर्पण करावा. बुद्धिमान दाता असा विधी करण्याने जन्म-मरणाच्या बंधनातून मुक्त होतो. हा सप्ताह पारायणाचा विधी सर्व प्रकारची पापे नाहीसे करणारा आहे. हे मंगलमय भागवतपुराण इष्ट फल प्राप्त करून देते. तसेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती करून देणारे हे साधन आहे, याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. (६४-६८)
कुमारा ऊचुः -
इति ते कथितं सर्वं किं भूयः श्रोतुमिच्छसि । श्रीमद्भागवतेनैव भुक्तिमुक्ति करे स्थिते ॥ ६९ ॥
पुढे सनकादिक संत म्हणतात- सप्ताह श्रवणाचा हा विधी ऐकविला अम्ही । भोग मोक्ष द्वयो लाभ श्रीमद्भागवते मिळे ॥ ६९ ॥
सनकादिक म्हणाले - मुनिवर्य, अशा प्रकारे हा सप्ताहश्रवणविधी आम्ही आपणास सविस्तर सांगितला. आणखी काय ऐकू इच्छिता ? या श्रीमद्भागवतानेच भोग आणि मोक्ष दोन्हीही हाती लागतात. (६९)
सूत उवाच -
इत्युक्त्वा ते महात्मानः प्रोचुर्भागवतीं कथाम् । सर्वपापहरां पुण्यां भुक्तिमुक्तिप्रदायिनीम् ॥ ७० ॥ श्रृण्वतां सर्वभूतानां सप्ताहं नियतात्मनाम् । यथाविधि ततो देवं तुष्टुवुः पुरुषोत्तमम् ॥ ७१ ॥ तदन्ते ज्ञानवैराग्य-भक्तीनां पुष्टता परा । तारुण्यं परमं चाभूत् सर्वभूतमनोहरम् ॥ ७२ ॥ नारदश्च कृतार्थोऽभूत् सिद्धे स्वीये मनोरथे । पुलकीकृतसर्वाङ्ग परमानन्दसम्भृतः ॥ ७३ ॥ एवं कथां समाकर्ण्य नारदो भगवत्प्रियः । प्रेमगद्गदया वाचा तानुवाच कृताञलिः ॥ ७४ ॥
सूतजी सांगतात- सनकांनी अशी युक्त कथा सांगितली पुन्हा । हरि ते पाप दे पुण्य भुक्ति मुक्ति प्रदायिनी ॥ ७० ॥ ऐकिली सर्व लोकांनी सप्ताही विधिपूर्वक । देवाधिदेव तो कृष्ण त्याचे कीर्तन मांडिले ॥ ७१ ॥ भक्ति वैराग्य ज्ञानाला तारुण्य पुष्टि लाभली । त्यांनी आकर्षिली चित्ते लोकांना हर्ष जाहला ॥ ७२ ॥ कथेने साधला हेतू नारदा मोद जाहला । रोमांच उठले अंगी पूर्ण आनंद लाभला ॥ ७३ ॥ श्रवणे धन्य झालेल्या नारदे हात जोडिले । सनकादिक संताना प्रेमे ते बोलले असे ॥ ७४ ॥
सूत म्हणतात - हे शौनका, असे म्हणून महात्म्या सनकादिकांनी विधिपूर्वक एक सप्ताहपर्यंत सर्व पापांचा नाश करणार्या, परम पवित्र आणि भोग-मोक्ष देणार्या या भागवतकथेचे प्रवचन केले. सर्वांनी नियमपूर्वक याचे श्रवण केले. त्यानंतर त्यांनी विधिपूर्वक भगवान पुरुषोत्तमांची स्तुती केली. कथेच्या शेवटी ज्ञान, वैराग्य आणि भक्तीला मोठी पुष्टी प्राप्त झाली आणि ती तिघे एकदम तरुण होऊन सर्व जीवांचे चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेऊ लागली. आपले मनोरथ पूर्ण झाल्याचे पाहून नारद कृतकृत्य झाले. त्यांच्या सर्व शरीरावर रोमांच दाटून आले आणि त्यांना परमानंद झाला. भगवंतांचे प्रिय नारदमुनि याप्रकारे कथा ऐकून, हात जोडून, प्रेमाने सद्गदित होऊन सनकादिकांना म्हणाले - (७०-७४)
नारद उवाच -
धन्योस्मि अनुगृहितोऽस्मि भवद्भिः करुणापरैः । अद्य मे भगवान् लब्धः सर्वपापहरो हरिः ॥ ७५ ॥ श्रवणं सर्वधर्मेभ्यो वरं मन्ये तपोधनाः । वैकुण्ठस्थो यतः कृष्णः श्रवणाद् यस्य लभ्यते ॥ ७६ ॥
नारदजी म्हणाले- धन्य मी मजला तुम्ही कृपेने अनुबोधिले । सर्वपाप विनाशी जो कृष्ण तो लाभला मला ॥ ७५ ॥ श्रीमद्भागवती वार्ता सर्व धर्मात श्रेष्ठ की । लाभे गोलोक वैकुंठ श्रीकृष्ण प्राप्त होतसे ॥ ७६ ॥
नारद म्हणाले - मी धन्य झालो. दयाळू अशा आपण माझ्यावर अनुग्रह केला. सर्वपापहारी भगवान श्रीहरींची आज मला प्राप्ती झाली. हे तपोनिधी ! मी श्रीमद्भागवत श्रवणाला सर्व धर्मांत श्रेष्ठ मनतो. कारण याच्या श्रवणाने वैकुंठात राहणार्या श्रीकृष्णांची प्राप्ती होते. (७५-७६)
सूत उवाच -
एवं ब्रुवति वै तत्र नारदे वैष्णवोत्तमे । परिभ्रमन् समायातः शुको योगेश्वरास्तदा ॥ ७७ ॥ (वंशस्थ) तत्राययौ षोडशवार्षिकस्तदा व्यासात्मजो ज्ञानमहाब्धिचन्द्रमाः । कथावसाने निजलाभपूर्णः प्रेम्णा पठन् भागवतं शनैः शनैः ॥ ७८ ॥ (इंद्रवंशा) दृष्ट्वा सदस्याः परमोरुतेजसं सद्यः समुत्थाय ददुर्महासनम् । प्रीत्या सुरर्षिस्तमपूजयत् सुखं स्थितोऽवदत् संश्रृणुतामलां गिरम् ॥ ७९ ॥
सूतजी म्हणाले - बोलता शब्द हे तेव्हा नारदे वैष्णवोत्तमे । फिरता वेळि त्या आले योगेश्वर मुनी शुक ॥ ७७ ॥ (इंद्रवज्रा) समाप्तिसी व्याससुतोहि आले सोळा वयाने तरि ज्ञानपूर्ण । जै ज्ञानधीच्या भरतीस चंद्र प्रेमेचि घेता हरिनाम संथ ॥ ७८ ॥ तेजस्वि ऐसे शुक पाहताच सभासदांनी पुजिले उठोनी । ते बैसता पूजिति नारदोही शब्दामृताते वदणे म्हणाले ॥ ७९ ॥
सूत म्हणाले - वैष्णवश्रेष्ठ नारद असे बोलत आहेत, तोच भ्रमण करीत करीत योगेश्वर शुकदेव तेथे आले. कथा समाप्त होतेवेळीच व्यासपुत्र श्रीशुकदेव तेथे आले. सोळा वर्षांचे वय, आत्मलाभाने तृप्त, ज्ञानरूपी महासागराला भरती आणणारे चंद्र असे शुकदेव प्रेमाने सावकाश श्रीमद्भागवताचा पाठ करीत होते. तेजःपुंज शुकदेवांना पाहून उपस्थित सर्वजण लगेच उठून उभे रहिले आणि त्यांनी त्यांना एका उच्च आसनावर बसविले. देवर्षी नारदांनी त्यांचे प्रेमपूर्वक पूजन केले. तेथे शांतपणे बसून शुकदेव म्हणाले, आपण माझी पवित्र वाणी ऐका. (७७-७९)
श्रीशुक उवाच -
(द्रुतविलंबित) निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखात् अमृतद्रवसंयुतम् । पिबत भागवतं रसमालयं मुहुरको रसिका भुवि भावुकाः ॥ ८० ॥ (शार्दूलविक्रीडित) धर्मप्रोज्झितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् । श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात् ॥ ८१ ॥ श्रीमद्भागवतं पुराणतिलकं यद्वैष्णवानां धनं यस्मिन् पारमहंस्यमेवममलं ज्ञानं परं गीयते । यत्र ज्ञानविरागभक्तिसहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तत् श्रुण्वन् प्रपठन् विचारणपरो भक्त्या विमुच्येन्नरः ॥ ८२ ॥ (अनुष्टुप्) स्वर्गे सत्ये च कैलासे वैकुण्ठे नास्त्ययं रसः । अतः पिबन्तु सद्भाग्या मा मा मुञ्चत कर्हिचित् ॥ ८३ ॥
श्री शुकदेवजी म्हणाले - (द्रुतविलंबित) निगमकल्पतरु फळ पक्व हे शुकमुखांमृत स्पर्शित पूर्णची । नचहि साल बिया रसपूर्ण हे सुलभ प्राशुनि घे रसिका त्वरे ॥ ८० ॥ (शार्दूलविक्रीडित) श्री व्यासे रचिले पुराणमहतो, निष्कामधर्मी असे । कल्याणा वदले ययेचि मिळते, शांती नि पापो हरे । श्रीमद्भागवती कथेस धरिता, कर्मो न काही उरे पुण्यत्मा श्रवणा मनात स्मरता, राही हृदी ईश्वर ॥ ८१ ॥ श्रीमद्भागवती पुराणतिलको, हे वैष्णवांचे धन मध्ये पारमहंसज्ञान विमलो, गायीयले श्रेष्ठ ते । येथे ज्ञान विराग भक्ति सहितो, नैष्कर्म्य सांगीतले भावे जो कथितो करी श्रवण हे, लाभे तया मोक्षची ॥ ८२ ॥ (अनुष्टुप्) स्वर्गी ना सत्यलोकात वैकुंठीही असा रस । कैलासीही नसे हा तो श्रोत्यांनो ! खूप हा पिणे ॥ ८३ ॥
सूत म्हणाले - रसिक आणि भाविक जनहो, हे श्रीमद्भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे परिपक्व झालेले फळ आहे. श्रीशुकदेवांच्या मुखातून निघालेले असल्याने अमृतरसाने हे परिपूर्ण आहे. यात केवळ रसच रस आहे. या फळाला साल किंवा बी नाही. जोपर्यंत शरीरात जीव आहे, तोपर्यंत आपण याचे वारंवार श्रवणरूप पान करावे. महामुनी व्यासदेवांनी श्रीमद्भागवत-महापुराणाची रचना केली आहे. यामध्ये निष्कपट, निष्काम, अशा परमधर्माचे निरूपण केलेले आहे. शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषांनी जाणण्याजोगे कल्याणकारी सत्य आत्मवस्तूचे यात वर्णन आहे. यामुळे तिन्ही तापांची निवृत्ती होते. जेव्हा एखादा पुण्यात्मा पुरुष हे शास्त्र ऐकण्याची इच्छा करतो, तेव्हा भगवंत लगेच त्याच्या हृदयात प्रवेश करतात. मग इतर साधनांची आवश्यकताच काय ? हे भागवत पुराणांच्या अग्रभागी असून हे वैष्णवांचे धन आहे. परमहंसमुनींना अपेक्षित अशा विशुद्ध ज्ञानाचे यात वर्णन केले आहे. तसेच यात ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त निवृत्तिमार्ग प्रकाशित केलेला आहे. जो पुरुष मोठ्या भक्तिभावाने याचे श्रवण, पारायण आणि मनन करण्यात तत्पर असतो, तो मुक्त होतो. हे भाग्यवान श्रोत्यांनो ! हा रस स्वर्गलोक, सत्यलोक, कैलास व वैकुंठातही नाही. म्हणून तुम्ही याचे यथेच्छ पान करा. यापासून मुळीच परावृत्त होऊ नका. (८०-८३)
सूत उवाच -
(इंद्रवंशा) एवं ब्रुवाणे सति बादरायणौ मध्ये सभायां हरिराविरासीत् । प्रह्रादबल्युद्धवफाल्गुनादिभिः वृत्तं सुरर्षिस्तमपूजयच्च तान् ॥ ८४ ॥ दृष्ट्वा प्रसन्नं महदासने हरिं ते चक्रिरे कीर्तनमग्रतस्तदा । भवो भवान्या कमलासनस्तु तत्रागमत् कीर्तनदर्शनाय ॥ ८५ ॥ (स्रग्धरा) प्रह्रादस्तालधारी तरलगतितया चोद्धवः कांस्यधारी वीणाधारी सुरर्षि स्वरकुशलतया रागकर्तार्जुनोऽभूत् । इन्द्रोऽवादीन्मृदङ्गं जय जय सुकराः कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव ॥ ८६ ॥ (उपेंद्रवज्रा) ननर्त मध्ये त्रिकमेव तत्र भक्त्यादिकानां नटवत्सुतेजसाम् । अलौलिकं कीर्तनमेतदीक्ष्य हरिः प्रसन्नोऽपि वचोऽब्रवीत् तत् ॥ ८७ ॥ (इंद्रवज्रा) मत्तो वरं भाववृताद्वृणुध्वं प्रीतः कथाकीर्तनतोऽस्मि साम्प्रतम् । श्रुत्वेति तद्वाक्यमतिप्रसन्नाः प्रेमार्द्रचित्ता हरिमूचिरे ते ॥ ८८ ॥ (उपेंद्रवज्रा) नगाहगाथासु च सर्वभक्तैः एभिस्त्वया भाव्यमिति प्रयत्नात् । मनोरथोऽयं परिपूरनीयः तथेति चोक्त्वान्तरधीयताच्युतः ॥ ८९ ॥
सूतजी सांगतात - (इंद्रवज्रा) बोलोनि घेता शुक हे तदा तै प्रल्हाद पार्थो बळि उद्धवादी । सहीत आला हरि पार्षदांच्या सर्वास तेव्हा पुजिले ऋषिंनी ॥ ८४ ॥ देवर्षि त्यांना बघता प्रसन्न त्या श्रेष्ठ सिंहासनि बैसवीले । नी त्या पुढे कीर्तन गान होता ब्रह्मा शिवो दर्शनि पातले तै ॥ ८५ ॥ (स्रग्धरा) प्रल्हादो टाळ घेई तरल गति तया उद्धवो झांज घेई वीणा घेती सुरर्षी स्वरकुशल असा अर्जुनो राग गायी इंद्राहाती मृदंगो जयजय वदती कीर्तनी ते कुमार सामोरी भाववक्ता सरसकवन ते व्यासपुत्रो करीती ॥ ८६ ॥ (इंद्रवज्रा) त्याच्याच सर्वात विरक्त भक्त नटांप्रमाणे बहु नाचले की । अलौकिकी कीर्तन पाहुनीया प्रसन्न चित्ते हरि बोलले तै ॥ ८७ ॥ मी कीर्तनाने बहु तोषलो हो भावे तुम्ही तो मज वश्य केले । मागा तुम्हा काय हवे असे ते नी भक्त प्रेमे मग बोलले की ॥ ८८ ॥ सप्ताह गाथा पुढती जधी हो तै पार्षदांच्या सह या तुम्ही ही । हे पूर्ण व्हावेचि मनोरथो की ‘तथास्तु’ शब्दे हरि गुप्त झाले ॥ ८९ ॥
सूत म्हणाले - श्रीशुकदेव याप्रमाणे सांगत होते, तोच तेथे प्रह्लाद, बली, उद्धव, अर्जुन आदी भक्तांसहित साक्षात श्रीहरी प्रगट झाले. तेव्हा देवर्षी नारदांनी भगवंत आणि त्यांचे भक्त यांचे यथोचित पूजन केले. भगवंतांना प्रसन्नचित्त पाहून देवर्षी नारदांनी त्यांना एका विशाल सिंहासनावर बसविले आणि सर्व लोक त्यांचे समोर त्यावेळी संकीर्तन करू लागले. ते संकीर्तन पाहण्यासाठी पार्वतीसह भगवान शंकर तसेच ब्रह्मदेवही आले. त्या संकीर्तनात प्रह्लाद उत्साहाने टाळ वाजवू लागला. उद्धवाने झांजा घेतल्या. देवर्षी नारद वीणा वाजवू लागला. सनकादिक मधून-मधून जयजयकार करू लागले आणि या सर्वांच्या पुढे व्यासपुत्र शुकदेव वेगवेगळे हावभाव करून भाव सांगू लागले. या सर्वांच्या मध्ये परम तेजस्वी अशी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य नटांप्रमाणे नाचू लगले. असे हे अलौकिक संकीर्तन पाहून भगवान प्रसन्न होऊन म्हणाले, "मी तुमच्या या कथा-कीर्तनाने अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुमच्या या भक्तिभावाने तुम्ही मला स्वाधीन करून घेतले आहे. तुझी माझ्याकडे वर मागा." भगवंताचे हे बोल ऐकून सर्वजण अत्यंत प्रसन्न झाले आणि प्रेमाने अंतःकरण भरून येऊन भगवंतांना म्हणाले. भगवन ! आमची अशी इच्छा आहे की, येथून पुढे जेव्हा जेव्हा असा सप्ताह होईल, तेथे आपण आपल्या या भक्तांसह अवश्य यावे, आमचा हा मनोरथ पूर्ण करा. "तथास्तु" म्हणून भगवान अंतर्धान पावले. (८४-८९)
(वंशस्थ)
ततोऽनमत्तत् चरणेषु नारदः तथा शुकादीनपि तापसांश्च । अथ प्रहृष्टाः परिनष्टमोहाः सर्व ययुः पीतकथामृतास्ते ॥ ९० ॥ (इंद्रवज्रा) भक्तिः सुताभ्यां सह रक्षिता सा शास्त्रे स्वकीयेऽपि तदा शुकेन । अतो हरिर्भागवतस्य सेवनात् चित्तं समायाति हि वैष्णवानाम् ॥ ९१ ॥ दारिद्र्यदुःखज्वरदाहितानां मायापिशाचीपरिमर्दितानाम् संसारसिन्धौ परिपातितानां क्षेमाय वै भागवतं प्रगर्जति ॥ ९२ ॥
देवर्षि तेव्हा नमिती दिशेला शुकादिकेही नमिले तसेची । कथामृते सर्वचि तृप्त झाले स्वस्थानि गेले मग सर्व लोक ॥ ९० ॥ भक्तीत सूतां मग स्थापिले या शास्त्री स्वयेची शुक या मुनींनी । जे ऐकती भागवती कथा ही विष्णू तयाच्या हृदयात नांदे ॥ ९१ ॥ दारिद्र्य दुःखी जळती तयांना माया पिशाच्चे जरि चेंदिलेही । भवात खाती जरि गोचि त्यांना क्षेमार्थ हे भागवतोचि गर्जे ॥ ९२ ॥
यानंतर नारदांनी भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या चरणकमलांना उद्देशून नमस्कार केला. तसेच शुकदेव आणि अन्य तपस्व्यांनाही नमस्कार केला. कथामृतपानाने सर्वांना मोठा आनंद झाला, त्यांचा सर्व मोह नाहीसा झाला. नंतर ते सर्वजण आपापल्या स्थानी परतले. त्याचवेळी शुकदेवांनी भक्तीला तिच्या पुत्रांसहित आपल्या भागवत शास्त्रात समाविष्ट केले. म्हणून भागवतकथापान केल्याने श्रीहरी वैष्णवांच्या हृदयात विराजमान होतात. जे लोक दारिद्र्याने गांजले आहेत, ज्यांना मायारूपी पिशाच्चाने जखडून टाकले आहे आणि जे संसार सागरात बुडत आहेत, त्यांचे कल्याण होईल, अशी श्रीमद्भागवत सिंहगर्जना करीत आहे. (९०-९२)
शौनक उवाच -
(अनुष्टुप्) शुकेनोक्तं कदा राज्ञे गोकर्णेन कदा पुनः । सुरर्षये कदा ब्राह्मैः छिन्धि मे संशयं त्विमम् ॥ ९३ ॥
शौनकांनी विचारले - (अनुष्टुप्) शुके परीक्षिता लागी गोकर्णे धुंधुकारीला । नारदा सनकादींनी कधी सांगितली कथा ॥ ९३ ॥
शौनकांनी विचारले - सूत महोदय, शुकदेवांनी राजा परीक्षिताला, गोकर्णाने धुंधुकारीला आणि सनकादिकांनी नारदमुनींना कोणकोणत्या वेळी ही कथा सांगितली, ही माझी शंका दूर करा. (९३)
सूत उवाच -
आकृष्णनिर्गमात् त्रिंशत् वर्षाधिकगते कलौ । नवमीतो नभस्ये च कथारंभं शुकोऽकरोत् ॥ ९४ ॥ परीक्षित् श्रवणान्ते च कलौ वर्षशतद्वये । शुद्धे शुचौ नवम्यां च धेनुजोऽकथयत्कथाम् ॥ ९५ ॥ तस्मादपि कलौ प्राप्ते त्रिंशत् वर्षगते सति । ऊचुरूर्जे सिते पक्षे नवम्यां ब्रह्मणः सुताः ॥ ९६ ॥ इत्येत्तते समाख्यातं यत्पृष्टोऽहं त्वयानघ । कलौ भागवती वार्ता भवरोगविनाशिनी ॥ ९७ ॥
सूतजी सांगतात- वैकुंठी श्रीहरी जाता तीस वर्षांनि त्या पुन्हा । भादवी शुद्ध नौमीला शुके आरंभिली कथा ॥ ९४ ॥ परीक्षिती कथे अंती कलीची वर्ष दोनशे । शुद्ध आषाढ नौमीस गोकर्णाची सुरु पहा ॥ ९५ ॥ पुढती तीस वर्षांनी नवमी शुक्ल कार्तिकी । आरंभिली कथा तेंव्हा कुमार सनकादिके ॥ ९६ ॥ निष्पाप शौनका तुम्हा दिधली पूर्ण उत्तरे । कलीत कृष्ण वार्ता ही भवरोगविनाशिनी ॥ ९७ ॥
सूत म्हणाले - भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर कलियुगाची साधारण तीस वर्षे उलटून गेल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल नवमीला शुकदेवांनी कथा सांगण्यास प्रारंभ केला. राजा परीक्षिताने कथा ऐकल्यानंतर कलियुगाची दोनशे वर्षे लोटल्यानंतर आषाढ शुद्ध नवमीपासून गोकर्णांनी ही कथा सांगितली होती. यानंतर कलियुगाची आणखी तीस वर्षे निघून गेली. कार्तिक शुद्ध नवमीपासून सनकादिकांनी हा कथा सांगण्यास प्रारंभ केला. हे निष्पाप शौनका ! आपण जो प्रश्न विचारला होता, त्याचे मी आपणांस उत्तर दिले आहे. या कलियुगात भागवत-कथा हे भवरोगावरील रामबाण औषध आहे. (९४-९७)
(वसंततिलका)
कृष्णप्रियं सकलकल्मषनाशनं च मुक्त्येकहेतुमिह भक्तिविलासकारि सन्तः कथानकमिदं पिबतादरेण लोके हि तीर्थपरिशीलनसेवया किम् ॥ ९८ ॥ (अपरवक्त्र) स्वपुरुषमपि वीक्ष्य पाशहस्तं वदति यमः किल तस्य कर्णमूले । परिहर भगवत्कथासु मत्तान् प्रभुरहमन्युनृणां न वैष्णवानाम् ॥ ९९ ॥ (शिखरिणी) असारे संसारे विषयविषसङ्गाकुलधियः क्षणार्धं क्षेमार्थं पिबत शुकगाथातुलसुधाम् । किमर्थं व्यर्थं भो व्रजथ कुपथे कुत्सितकथे परीक्षित्साक्षी यत् श्रवणगतमुक्त्युक्तिकथने ॥ १०० ॥ (अनुष्टुप्) रसप्रवाहसंस्थेन श्रीशुकेनेरिता कथा । कण्ठे संबध्यते येन स वैकुण्ठप्रभुर्भवेत् ॥ १०१ ॥ (मालिनी) इति च परमगुह्यं सर्वसिद्धान्तसिद्धं सपदि निगदितं ते शास्त्रपुञ्जं विलोक्य । जगति शुककथातो निर्मलं नास्ति किञ्चित् पिब परसुखहेतोर्द्वादशस्कन्धसारम् ॥ १०२ ॥ (प्रहर्षिणी) एतां यो नियततया श्रृणोति भक्त्या यश्चैनां कथयति शुद्धवैष्णवाग्रे । तौ सम्यक् विधिकरणात्फलं लभेते याथार्थ्यान्न हि भुवने किमप्यसाध्यम् ॥ १०३ ॥ इति श्रीपद्मपुराणे उत्तरखण्डे श्रीमद्भागवतमाहात्म्ये श्रवणविधिकथनं नाम षष्टोऽध्यायः ॥ ६ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
(वसंततिलका) कृष्णप्रियो सकल कल्मष नष्टितात मुक्ती तयास मिळते मग भक्तिराजा । जे संत पीति कथना बहु आदराने धुंडावयास नलगे मग तीर्थ त्यांना ॥ ९८ ॥ (पुष्पिताग्रा) स्वकियजनकरी बघोनि पाशा यम हळु तो वदतसे तयांसि कानीं । भजनि जन असे तया न स्पर्शा नच मज शक्ति तयास दंडिण्याची ॥ ९९ ॥ (शिखरिणी) असारी संसारी विषय विषसंगी पुरुष हो क्षणार्धी तो प्यावी स्वसुखकर ही भागवत सुधा । कशा लागी व्यर्थो भटकत असा वाम कथनी परीक्षित् साक्षी की श्रवणि मिळतो मोक्ष सुलभो ॥ १०० ॥ (अनुष्टुप्) रसप्रवाहि डुंबोनी श्रीशुके कथिली कथा । ज्या कंठी स्पर्श वार्तेचा वैकुंठस्वामि होय तो ॥ १०१ ॥ (मालिनी) बघुनि सकल शास्त्रा आपणा बोललो मी रम सकलसारो सर्वसिद्धांत सिद्ध । जगति शुक कथा ही निर्मलो अन्य नाही परम सुख मिळाया प्यावि बाराहि स्कंधी ॥ १०२ ॥ (प्रहर्षिणी) जो वार्ता नियमित ऐकतो मनाने जो शुद्धो भजक तयाचि कथी कथा ही । पाळावे विधिहि द्वये फळास घ्यावे नाही काहीच त्रिभुवनि तया असाध्य ॥ १०३ ॥ ॥ इति श्री पद्मपुराणी उत्तरखंडी श्रीमद्भागवत कथा माहात्म्य ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ सहावा अध्याय हा ॥ मा ॥ ६ ॥ ॥ माहात्म्य परिपूर्ण हे ॥
संतसज्जनहो ! आपण मोठ्या आदराने ही कथा श्रवण करावी. ही कथा श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय, सर्व पापांचा नाश करणारी, मुक्तीचे एकमेव साधन आणि भक्ति वृद्धिंगत करणारी आहे. असे असताना तीर्थयात्रा इत्यादि तरी कशाला पाहिजेत ? हातात पाश घेतलेल्या आपल्या दूतांना पाहून यमराजांनी त्यांच्या कानात सांगितले की, "हे पहा जे भगवंतांच्या कथाकीर्तनात एकाग्रचित्त झाले आहेत त्यांच्यापासून दूर रहा. माझ्यात इतरांना दंड देण्याची शक्ती आहे. वैष्णवांना नाही." या असार संसारात विषयरूप विषाच्या आसक्तीमुळेच व्याकूळ बुद्धी झालेल्या पुरुषांनो, आपल्या कल्याणासाठी, अर्धा क्षण का होईना त्या शुककथारूप अवीट गोडीच्या अमृताचे प्राशन करा. निंद्य कथांनी युक्त अशा कुमार्गावर कशासाठी भटकता ? या कथेचा कानात प्रवेश होताच मुक्ति मिळते, या म्हणण्याला परीक्षित राजा प्रमाण आहे. श्रीशुकदेवांनी प्रेमरसाच्या प्रवाहात स्थित राहून ही कथा सांगितली आहे, या कथेचा कंठाशी संबंध येताच तो पुरुष वैकुंठाचा अधिकारी होतो. शौनका ! अनेक शास्त्रांचा अभ्यास करून मी हे परम गुह्य आताच तुला सांगितले. सर्व शास्त्रांच्या सिद्धांतांचे हे सार आहे. या संसारात शुकशास्त्राइतकी पवित्र दुसरी कोणतीही गोष्ट नाही. म्हणून आपण परमानंदप्राप्तीसाठी या बारा स्कन्ध असलेल्या भगवतरसाचे पान करा. जो पुरुष नियमांचे पालन करून या कथेचे भक्तिभावाने श्रवण करतो, तसेच जो अंतःकरण शुद्ध असणार्या भगवद्भक्तांना याचे कथन करतो, असे दोघेही सर्व नियमांचे पूर्णतः पालन केल्याकारणाने याचे यथार्थ फळ मिळवितात. अशांसाठी त्रैलोक्यात असाध्य असे काहीच राहात नाही.
येथे श्रीभागवतमाहात्म्य समाप्त झाले. अध्याय सहावा समाप्त |