श्रीमद् भागवत पुराण
श्रीमद्‌भागवतमाहात्म्यम्
पञ्चमोऽध्यायः

धुन्धुकारिणो दुर्मृत्युनिमित्तक प्रेतत्वप्राप्तिवर्णनं ततो गोकर्णानुग्रहेणोद्धारश्च -

धुंधुकारीचा प्रेतयोनीत जन्म आणि तीतून उद्धार -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


सूत उवाच -
(अनुष्टुप्)
पितरि उपरते तेन जननी ताडिता भृशम् ।
क्व वित्तं तिष्ठति ब्रूहि हनिष्ये लत्तया न चेत् ॥ १ ॥
इति तद्वाक्य संत्रासात् जनन्या पुत्रदुःखतः ।
कूपे पातः कृतो रात्रौ तेन सा निधनं गता ॥ २ ॥
गोकर्णः तीर्थयात्रार्थं निर्गतो योगसंस्थितः ।
न दुःखं न सुखं तस्य न वैरी नापि बान्धवः ॥ ३ ॥
सूतजी म्हणाले -
(अनुष्टुप्)
पिता वनात तो जाता मातेला धुंधुकारी तै ।
पुसे धन कुठे सांग अन्यथा जाळितो तुला ॥ १ ॥
त्याच्या या धमकीने ती त्वरे बाहेर धावली ।
घाबरी पडली कूपीं जाहली गतप्राण की ॥ २ ॥
तो योगनिष्ठ गोकर्ण गेला तीर्थाटना तसा ।
न दुःख सुख त्या भासे शत्रू मित्र न मानि तो ॥ ३ ॥

सूत म्हणाले - शौनका, वडिलांच्या मृत्यूनंतर एक दिवस धुंधुकारीने आपल्या आईस पुष्कळ मारले व विचारले, "बोल. धन कुठे ठेवले आहेस ते ! नाहीतर तुला लाथांनी तुडवीन." मुलाच्या या धमकीला भिऊन आणि त्याच्या उपद्रवाने दुःखी होऊन एक दिवस रात्री तिने विहिरीत उडी टाकली व ती मरण पावली. योगनिष्ठ गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. या घटनांचे त्याला सुख किंवा दुःख झाले नाही. कारण त्याला ना कोणी मित्र होता ना कोणी शत्रू. (१-३)


धुन्धुकारी गृहेऽतिष्ठत् पंचपण्यवधूवृतः ।
अत्युग्रकर्मकर्ता च तत् पोषणविमूढधीः ॥ ४ ॥
एकदा कुलटास्तास्तु भूषणान्यभिलिप्सवः ।
तदर्थं निर्गतो गेहात् कामान्धो मृत्युमस्मरन् ॥ ५ ॥
यतस्ततश्च संहृत्य वित्तं वेश्म पुनर्गतः ।
ताभ्योऽयच्छत् सुवस्त्राणि भूषणानि कियन्ति च ॥ ६ ॥
बहुवित्तचयं दृष्ट्वा रात्रौ नार्यो व्यचारयन् ।
चौर्यं करोत्यसौ नित्यं अतो राजा ग्रहीष्यति ॥ ७ ॥
वित्तं हृत्वा पुनश्चैनं मारयिष्यति निश्चितम् ।
अतोऽर्थगुप्तये गूढं अस्माभिः किं न हन्यते ॥ ८ ॥
निहत्यैनं गृहीत्वार्थं यास्यामो यत्र कुत्रचित् ।
इति ता निश्चयं कृत्वा सुप्तं सम्बद्ध्य रश्मिभिः ॥ ९ ॥
पाशं कण्ठे निधायास्य तन्मृत्युं उपचक्रमुः ।
त्वरितं न ममारासौ चिन्तायुक्ताः तदाभवन् ॥ १० ॥
तप्तांगारसमूहांश्च तन्मुखे हि विचिक्षिपुः ।
अग्निज्वालातिदुःखेन व्याकुलो निधनं गतः ॥ ११ ॥
तं देहं मुमुचुर्गर्ते प्रायः साहसिकाः स्त्रियः ।
न ज्ञातं तद्‌रहस्यं तु केनापीदं तथैव च ॥ १२ ॥
लोकैः पृष्ट्वा वदन्ति स्म दूरं यातः प्रियो हि नः ।
आगमिष्यति वर्षेऽस्मिन् वित्तलोभविकर्षितः ॥ १३ ॥
स्त्रीणां नैव तु विश्वासं दुष्टानां कारयेत् बुधः ।
विश्वासे यः स्थितो मूढः स दुःखैः परिभूयते ॥ १४ ॥
सुधामयं वचो यासां कामिनां रसवर्धनम् ।
हृदयं क्षुरधाराभं प्रियः को नाम योषिताम् ॥ १५ ॥
धुंधुकारी घरी आता पाच वेश्या सवे रमे ।
लालनार्थ तयांच्याच कुकर्म करु लागला ॥ ४ ॥
मागता दागिने खूप कामांध धुंधुकारी तो ।
न भिता मृत्युला गेला मोठी चोरी करावया ॥ ५ ॥
अनेक घातले डाके लुटिले द्रव्य खूप ते ।
खर्चुनी आणिले कांही वस्त्रालंकार भूषणे ॥ ६ ॥
अफाट धन पाहोनी वेश्यांनी मनि चिंतिले ।
त्याच्या नित्य अशा कृत्ये राजा दंडिल त्याजला ॥ ७ ॥
नेईल धन हे राजा मारील आपणा तसा ।
म्हणोनी मारुया याला कट गुप्त करोनिया ॥ ८ ॥
मारिता यास हे द्रव्य घेवोनी पळ काढुया ।
योजुनी युक्ति ही सारी बांधिले धुंधुकारीला ॥ ९ ॥
गळ्याशी लाविला फास परी मृत्यु घडेचिना ।
मरेना म्हणुनी त्यांना चिंताच वाटली मनी ॥ १० ॥
तेव्हा त्या क्रूर वेश्यांनी जळता विस्तु टाकिला ।
जळाले तोंड ते त्याचे मेला तडफडोनि की ॥ ११ ॥
बांधिले गाठडे त्याचे पुरले जमिनीत ते ।
अशा रांडा पहा होती मोठया दुःसाहसी किती ॥ १२ ॥
म्हणती पुसती लोका गेले प्रीय धनार्थ ते ।
येतील एक वर्षाने गेले दूर कुठे तरी ॥ १३ ॥
चतुरे दुष्ट स्त्रीयांशी विश्वासे आचरु नये ।
विश्वासे मूर्ख जो त्यांसी दुःख कष्टचि लाभते ॥ १४ ॥
मधुरा अमृतावाणी कामींच्या हृदयी घुसे ।
नच जार स्त्रियांना तो कोणी प्रीय असे मनी ॥ १५ ॥

धुंधुकारी पाच वेश्यांसह घरात राहू लागला. त्यांच्यासाठी भोगसामग्री मिळविण्याच्या चिंतेने त्याची सद्‌बुद्धी नष्ट झाली आणि तो अत्यंत क्रूर कर्मे करू लागला. एक दिवस त्या वेश्यांनी त्याच्याकडे पुष्कळसे दागिने मागितले. कामांध झालेल्या त्याला मृत्यूचे विस्मरण झाले होते. दागिने मिळविण्यासाठी तो घराच्या बाहेर पडला. इकडून तिकडून चोरी करून धन घेऊन तो घरी आला आणि त्याने त्यांना किंमती वस्त्रे आणि पुष्कळ दागिने आणून दिले. चोरीचा पुष्कळ माल बघितल्यावर रात्रीच्या वेळी वेश्यांनी विचार केला की, हा नेहमीच चोरी करतो. तेव्हा एखादे दिवशी त्याला राजा निश्चितपणे पकडेल. राजा निश्चितच याचे धन जप्त करून याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल. तर मग आपणच धनाचे रक्षण करण्यासाठी गुप्तरूपाने याला का मारू नये ? याला मारून, याची मालमत्ता घेऊन आपण कुठेतरी निघून जाऊ. असा निश्चय करून त्यांनी झोपी गेलेल्या धुंधुकारीला दोरीने बांधले, गळ्याला दोरीचा फास लावून त्याला मारण्याचा प्रयत्‍न केला, तरी तो लवकर मरेना, हे पाहून त्यांना काळजी वाटू लागली. तेव्हा त्यांनी त्याच्या तोंडावर पुष्कळ जळते निखारे टाकले. त्यामुळे अग्निज्वाळांनी भाजून तो तडफडून मृत्युमुखी पडला. त्यांनी ते शरीर एका खड्ड्यात पुरून टाकले. बहुधा स्त्रिया धाडसी असतात ! त्यांच्या या गुप्त कृत्याचा कोणालाही पत्ता लागला नाही. लोकांनी विचारल्यावर त्या सांगत की, "आमचा प्रियकर पैशाच्या लोभाने यावेळी परदेशी गेला आहे. वर्षभरात तो परत येईल." शहाण्या पुरुषांनी दुष्ट स्वभावाच्या स्त्रियांवर कधीही विश्वास ठेवू नये. जो मूर्ख त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याला शेवटी दुःखी व्हावे लागते. ज्या स्त्रियांची अमृताप्रमाणे वाणी कामी पुरुषांच्या हृदयांत प्रेम निर्माण करते, त्यांचे हृदय धारदार सुरीप्रमाणे तीक्ष्ण असते. अहो ! या स्त्रियांना कोण प्रिय आहे ? (४-१५)


संहृत्य वित्तं ता याताः कुलटा बहुभर्तृकाः ।
धुम्धुकारी बभूवाथ महान् प्रेतः कुकर्मतः ॥ १६ ॥
वात्यारूपधरो नित्यं धावन् दशदिशो‍न्तरम् ।
शीतातप परिक्लिष्टो निराहारः पिपासितः ॥ १७ ॥
न लेभे शरणं क्वापि हा दैवेति मुहुर्वदन् ।
कियत्कालेन गोकर्णो मृतं लोकादबुध्यत ॥ १८ ॥
अनाथं तं विदित्वैव गयाश्राद्धं अचीकरत् ।
यस्मिन् तीर्थे तु संयाति तत्र श्राद्धं अवर्तयत् ॥ १९ ॥
मिळून कुटला सार्‍या तिथोनी पळल्या पुढे ।
कोण जाणे असे त्यांना कितीक पति लाभले ॥ १६ ॥
धुंधुकारी स्वकर्माने पापयोनीत पातला ।
वायुरूपे फिरे नित्य शीत घामेहि तापला ।
भुकें व्याकुळ होवोनी, रे दैवा ! ओरडे फिरे ॥ १७ ॥
परंतु त्याजला कोठे मिळाला नच आश्रय ।
गोकर्णास जने सारी वार्ता ही कथिली असे ॥ १८ ॥
अनाथ धुंधुकारी हा गोकर्णे समजोनिया ।
गयेसी तीर्थ तीर्थांसी श्राद्ध त्याचे स्वये करी ॥ १९ ॥

धुंधुकारीची सर्व संपत्ती घेऊन अनेक पुरुषांकडे जाणार्‍या त्या वेश्या दुसरीकडे निघून गेल्या. आपल्या कुकर्मांमुळे धुंधुकारी भूतयोनीत गेला. तो वावटळीच्या रूपाने दाही दिशांना भटकू लागला. थंडी, उष्णता, तहान भूक यांनी व्याकूळ होऊन तो "हाय दैवा ! हाय दैवा " असे ओरडत असे. परंतु त्याला कोठेही आश्रय मिळाला नाही. काही कालानंतर धुंधुकारीच्या मृत्यूचा समाचार लोकांमार्फत गोकर्णाच्या कानी गेला. तेव्हा धुंधुकारीला अनाथ समजून गोकर्णाने त्याचे गयाक्षेत्री श्राद्ध केले आणि ज्या ज्या तीर्थक्षेत्रात तो जात असे, तेथे त्याचे शाद्ध अवश्य करीत असे. (१६-१९)


एवं भ्रमन् स गोकर्णः स्वपुरं समुपेयिवान् ।
रात्रौ गृहांगणे स्वप्तुं आगतोऽलक्षितः परैः ॥ २० ॥
तत्र सुप्तं स विज्ञाय धुन्धुकारी स्वबान्धवम् ।
निशीथे दर्शयामास महारौद्रतरं वपुः ॥ २१ ॥
सकृन्मेषः सकृद्धस्ती सकृच्च महिषोऽभवत् ।
सकृदिन्द्र सकृच्चाग्निः पुनश्च पुरुषोऽभवत् ॥ २२ ॥
वैपरीत्यं इदं दृष्ट्वा गोकर्णो धैर्यसंयुतः ।
अयं दुर्गतिकं कोऽपि निश्चित्याथ तमब्रवीत् ॥ २३ ॥
गोकर्ण फिरता ऐसा स्वग्रामी पातला पुन्हा ।
लोकांची दृष्टि टाळोनी स्वगृही रात्रि झोपला ॥ २० ॥
घरात झोपला बंधू बघून धुंधुकारी ने ।
घेतले विकटो रुप बंधूशी भेडवीतसे ॥ २१ ॥
हत्ती मेंढा कधी रेडा इंद्र अग्निरुपात ही ।
शेवटी माणुसी रुप धारिले धुंधुकारीने ॥ २२ ॥
विपरीत रुपे कोणी गोकर्णे मनि जाणिले ।
दुर्गती लाभली कोणा धैर्याने पुसले तया ॥ २३ ॥

याप्रकारे फिरत फिरत गोकर्ण आपल्या नगरात परतला आणि रात्रीच्या वेळी कोणाच्याही दृष्टीस न पडता सरळ आपल्या घरच्या अंगणात झोपण्यासाठी गेला. आपल्या भावाला झोपलेला पाहून मध्यरात्रीच्या वेळी धुंधुकारीने आपले भयंकर रूप त्याला दाखविले. तो कधी बोकड, कधी हत्ती, कधी रेडा, कधी इंद्र तर कधी अग्नीचे रूप धारण करू लागला. शेवटी तो मनुष्याच्या रूपात प्रकट झाला. त्याच्या या वेगवेगळ्या अवस्था पाहून गोकर्णाने निश्चय केला की, हा कोणी तरी दुर्गती प्राप्त झालेला जीव आहे. तेव्हा त्याने धैर्यपूर्वक त्याला विचारले. (२०-२३)


गोकर्ण उवाच -
कस्त्वं उग्रतरो रात्रौ कुतो यातो दशां इमाम् ।
किंवा प्रेतः पिशाचो वा राक्षसोऽसीति शंस नः ॥ २४ ॥
गोकर्णजी म्हणाले -
कोण तू रात्रिच्या वेळी भयाण रुप दाविशी ।
कोण तू भूत का प्रेत कशाने दुर्दशा अशी ॥ २४ ॥

गोकर्ण म्हणाला - तू कोण आहेस ? रात्रीच्या वेळी अशी भयानक रूपे का दाखवीत आहेस ? तुझी अशी दशा कशी झाली ? तू प्रेत आहेस, पिशाच्च आहेस का कोणी राक्षस आहेस ? हे मला सांग तर खरे ! (२४)


सूत उवाच -
एवं पृष्टस्तदा तेन रुरोदोच्चैः पुनः पुनः ।
अशक्तो वचनोच्चारे संज्ञामात्रं चकार ह ॥ २५ ॥
ततोऽञ्जलौ जलं कृत्वा गोकर्णस्तमुदैरयत् ।
तत्सेकहतपापोऽसौ प्रवक्तुं उपचक्रमे ॥ २६ ॥
सूतजी सांगतात -
गोकर्णे पुसता त्याला रडला स्फुंदस्फुंदुनी ।
नव्हती अंगि ती शक्ती खुणेने बोलु लागला ॥ २५ ॥
गोकर्णे प्रोक्षिता पाणी करोनी अभिमंत्रित ।
शमता पाप ते थोडे पुढे तो बोलला असे ॥ २६ ॥

सूत म्हणाले - गोकर्णाने असे विचारल्यावर तो एकसारखा जोरजोराने रडू लागला. त्याला बोलता येत नव्हते, म्हणून त्याने केवळ खुणा केल्या. तेव्हा गोकर्णाने ओंजळीत पाणी घेऊन ते अभिमंत्रित करून त्याच्यावर शिंपडले. त्यामुळे त्याच्या पापांचे काहीसे परिमार्जन झाले आणि तो बोलू लागला. (२५-२६)


प्रेत उवाच -
अहं भ्राता त्वदीयोऽस्मि धुन्धुकारीरि नामतः ।
स्वकीयेनैव दोषेण ब्रह्मत्वं नाशितं मया ॥ २७ ॥
कर्मणो नास्ति संख्या मे महाज्ञाने विवर्तिनः ।
लोकानां हिंसकः सोऽहं स्त्रीभिर्दुःखेन मारितः ॥ २८ ॥
अतः प्रेतत्वं आपन्नो दुर्दशां च वहाम्यहम् ।
वाताहारेण जीवामि दैवाधीनफलोदयात् ॥ २९ ॥
अहो बन्धो कृपासिन्धो भ्रातर्मामाशु मोचय ।
गोकर्णो वचनं श्रुत्वा तस्मै वाक्यं अथाब्रवीत् ॥ ३० ॥
प्रेत म्हणाले -
धुंधुकारी तुझा बंधू असे मी ओळखी मला ।
माझ्याचि पाप दोषाने नासिले ब्राह्मणत्व मी ॥ २७ ॥
अपार पाप ते माझे मोजणे शक्य ही नसे ।
घडली लोकहत्या नी वेश्यांनी मज मारिले ॥ २८ ॥
प्रेतयोनी मिळाली ही भोगतो बहु कष्ट की ।
दैव कर्म फळाने मी वायू पीवोनि राहतो ॥ २९ ॥
अहो बंधु कृपासिंधु सोडवी मज यातुनी ।
गोकर्णे धुंधुकारीचे ऐकोनी मग बोलला ॥ ३० ॥

प्रेत म्हणाले - मी तुझा भाऊ आहे. माझे नाव धुंधुकारी. मी आपल्याच दोषाने माझे ब्राह्मणत्व नष्ट केले. माझ्या कुकर्मांची गणतीच नाही. मी मोठ्या अज्ञानातच वावरत होतो. म्हणूनच मी लोकांना पीडा दिली. शेवटी वेश्यांनी मला हालहाल करून मारले. म्हणूनच मी प्रेतयोनीत येऊन ही दुर्दशा भोगीत आहे. आता दैववशात माझ्य कर्मांचे फळ म्हणून केवळ वायुभक्षण करून जगत आहे. बंधो, तू दयेचा सागर आहेस. म्हणून काहीही करून लवकरात लवकर मला या योनीतून सोडव. गोकर्णाने धुंधुकारीचे सर्व बोलणे ऐकले आणि तो त्यास म्हणाला. (२७-३०)


गोकर्ण उवाच -
त्वदर्थं तु गयापिण्डो मया दत्तो विधानतः ।
तत्कथं नैव मुक्तोऽसि ममाश्चर्यं इदं महत् ॥ ३१ ॥
गयाश्राद्धान्न मुक्तिश्चेत् उपायो नापरस्त्विह ।
किं विधेयं मया प्रेत तत्त्वं वद सविस्तरम् ॥ ३२ ॥
गोकर्णजी म्हणाले -
तुझे पींड गया तिर्थी दान केले विधी जसा ।
आश्चर्य वाटते चित्ती परी तू मुक्त का न हो ॥ ३१ ॥
न लाभे पिंडदानाने मुक्ति ती मग काय ते ।
करु मी कोणते कर्म जेणे मुक्ति तुला मिळे ॥ ३२ ॥

गोकर्ण म्हणाला - बंधो ! मी तुझ्यासाठी विधिपूर्वक गयाक्षेत्रात पिंडदान केले. तरीसुद्धा तुझी प्रेतयोनीतून मुक्तता कशी झाली नाही, याचेच मला मोठे आश्चर्य वाटते. गयाश्राद्धामुळेही तुझी मुक्ती झाली नसेल, तर आता दुसरा कोणताही उपाय नाही. तू आता मला सविस्तरपणे सांग की, मी आता काय करावे ? (३१-३२)


प्रेत उवाच -
गयाश्राद्धशतेनापि मुक्तिर्मे न भविष्यति ।
उपायं अपरं कंचित् त्वं विचारय साम्प्रतम् ॥ ३३ ॥
प्रेत म्हणाले-
गया श्राद्ध जरी केले शेकडो मजसाठि ते ।
तरी मुक्ति मला नाही दुजे कांही करी पहा ॥ ३३ ॥

प्रेत म्हणाले - शेकडो गयाश्राद्धे करूनही माझी मुक्ती होऊ शकणार नाही. तू आता यासाठी दुसरा कोणतातरी उपाय शोधून काढ. (३३)


इति तद्‌वाक्यमाकर्ण्य गोकर्णो विस्मयं गतः ।
शतश्राद्धैर्न मुक्तिश्चेत् असाध्यं मोचनं तव ॥ ३४ ॥
इदानीं तु निजं स्थानं आतिष्ठ प्रेत निर्भयः ।
त्वन्मुक्तिसाधकं किंचित् आचरिष्ये विचार्य च ॥ ३५ ॥
प्रेत म्हणाले -
ऐकोनी प्रेतवाणी ती गोकर्ण विस्मये मनी ।
म्हणाला याहुनी कोठे मुक्त्यर्थ तंत्र ते नसे ॥ ३४ ॥
तरी मी पाहतो श्रेष्ठ मुक्त्यर्थ साधनास त्या ।
राही स्थीर स्थळी आता नको हिंडू पुढे कुठे ॥ ३५ ॥

प्रेताचे हे म्हणणे ऐकून गोकर्णाला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, जर शेकडो गयाश्राद्धे करूनही तुझी मुक्ती होणार नसेल, तर मग तुझी मुक्ती केवळ अशक्य आहे. हे प्रेता ! आता तू निर्भर होऊन आपल्या स्थानावर जा. मी विचार करून तुझ्या मुक्तीचा दुसरा काहीतरी उपाय करीन. (३४-३५)


धुन्धुकारी निजस्थानं तेनादिष्टस्ततो गतः ।
गोकर्णश्चिन्तयामास तां रात्रिं न तदध्यगात् ॥ ३६ ॥
प्रातस्तं आगतं दृष्ट्वा लोकाः प्रीत्याः समागताः ।
तत्सर्वं कथितं तेन यत् जातं च यथा निशि ॥ ३७ ॥
विद्वांसो योगनिष्ठाश्च ज्ञानिनो ब्रह्मवादिनः ।
तन्मुक्तिं नैव तेऽपश्यन् पश्यन्तः शास्त्रसंचयान् ॥ ३८ ॥
ततः सर्वैः सूर्यवाक्यं तन्मुक्तौ स्थापितं परम् ।
गोकर्णः स्तम्भनं चक्रे सूर्यवेगस्य वै तदा ॥ ३९ ॥
तुभ्यं नमो जगत् साक्षिन् ब्रूहि मे मुक्तिहेतुकम् ।
तत् श्रुत्वा दूरतः सूर्यः स्फुटमित्यभ्यभाषत ॥ ४० ॥
श्रीमद्‌भागवतान् मुक्तिः सप्ताहं वाचनं कुरु ।
इति सूर्यवचः सर्वैः धर्मरूपं तु विश्रुतम् ॥ ४१ ॥
सर्वेऽब्रुवन् प्रयत्‍नेन कर्तव्यं सुकरं त्विदम् ।
गोकर्णो निश्चयं कृत्वा वाचनार्थं प्रवर्तितः ॥ ४२ ॥
गोकर्णशब्द ऐकोनी बसला एकस्थानि तो ।
गोकर्ण जागुनी रात्री केला व्यर्थ विचार की ॥ ३६ ॥
सकाळी कळता लोका प्रेम भेटीस पातले ।
प्रसंग रात्रिचा त्याने सर्व लोकां कथीयला ॥ ३७ ॥
विद्वान ज्ञानयोग्यांनी पाहिले शास्त्र चाळुनी ।
परी ना मिळली कांही साधना मुक्ति लाभण्या ॥ ३८ ॥
निश्चये वदले सर्व सूर्याचे ऐकुया पहा ।
गोकर्णे तपयोगाने सूर्यदेवासि रोधिले ॥ ३९ ॥
सर्वानी सूर्यदेवाला प्रार्थुनी नमिले असे ।
वदले धुंधुकारीच्या मुक्तिचा मार्ग कोणता ॥ ४० ॥
गोकर्णशब्द ऐकोनी वदला सूर्य भास्कर ।
श्रीमद्‌भागवते मुक्ति सप्ताह मांडुनी पहा ॥ ४१ ॥
गोकर्णे ऐकले सारे सर्वांनी तेच मानिले ।
गोकर्णे ऐकण्या वार्ता सप्ताहास नियोजिले ॥ ४२ ॥

गोकर्णाची आज्ञा घेऊन धुंधुकारी तेथून आपल्या स्थानाकडे निघून गेला. इकडे गोकर्णाने रात्रभर विचार केला, परंतु त्याला काहीही उपाय सुचला नाही. सकाळ झाल्यावर तो आल्याचे पाहून लोक त्याला प्रेमाने भेटण्यासाठी म्हणून आले. तेव्हा गोकर्णाने रात्री जो प्रकार जसा झाला, तसा तो सर्व त्यांना सांगितला. त्यांपैकी जे लोक विद्वान, योगनिष्ठ, ज्ञानी आणि वेदपारंगत होते, त्यांनी अनेक शस्त्रे धुंडाळून पाहिली, तरीसुद्धा त्यांना प्रेताच्या मुक्तीचा उपाय सापडला नाही. तेव्हा सर्वांनी असा निश्चय केला की, याविषयी सूर्यनारायण जी आज्ञा करतील, तिचेच पालन केले पाहिजे. म्हणून गोकर्णाने आपल्या तपोबलाने सूर्याची गती थांबविली. त्याने सूर्याची स्तुति केली. भगवन, आपण सर्व जगाचे साक्षी आहात. आपणांस नमस्कार अशो. कृपा करून धुंधुकारीच्या मुक्तीचा उपाय आपण मला सांगावा. गोकर्णाची प्रार्थना ऐकून सूर्यदेव लांबूनच स्पष्ट शब्दात म्हणाले की, श्रीमद्‌भागवताने मुक्ती होऊ शकते. म्हणून त्याचे तू सप्ताहपारायण कर. सूर्याचे हे धर्ममय वचन तेथे सर्वांनी ऐकले. तेव्हा सर्वजण म्हणाले की, प्रयत्‍न करून हेच साधन करा. शिवाय हे साधन अतिशय सोपे आहे. म्हणून गोकर्णानेही त्याप्रमाणे निश्चय करून कथा सप्ताहवाचनासाठी तो तयार झाला. (३६-४२)


तत्र संश्रवणार्थाय देशग्रामाज्जना ययुः ।
पङ्‌ग्वन्ध वृद्धमन्दाश्च तेऽपि पापक्षयाय वै ॥ ४३ ॥
समाजस्तु महाञ्जातो देवविस्मयकारकः ।
यदैवासनमास्थाय गोकर्णोऽकथयत्कथाम् ॥ ४४ ॥
स प्रेतोऽपि तदाऽऽयातः स्थानं पश्यन् इतस्ततः ।
सप्तग्रन्थियुतं तत्र अपश्यत् कीचकमुछ्रितम् ॥ ४५ ॥
तन्मूलच्छिद्रमाविश्य श्रवणार्थं स्थितौ ह्यसौ ।
वातरूपी स्थितिं कर्तुं अशक्तो वंशमाविशत् ॥ ४६ ॥
अनेक गावचे तेव्हा कितेक लोक पातले ।
आंधळे पांगळे वृद्ध पापी मुक्त्यर्थ पातले ॥ ४३ ॥
गर्दी ही पाहुनी देवा नभी आश्चर्य वाटले ।
व्यासपीठास गोकर्ण बसोनी सांगु लागले ॥ ४४ ॥
प्रेतही पातले तेथे जागा कोठे दिसे न त्या ।
दिसता सात गाठीचा वेळू सहज जो तिथे ॥ ४५ ॥
त्यात छिद्रातूनी गेला घुसून ऐकण्या कथा ।
कर्तुमाशक्तिने वायुरूपे वेळूत बैसला ॥ ४६ ॥

शेजारच्या प्रांतातून आणि खेड्यापाड्यांतून अनेक लोक कथा ऐकण्यासाठी तेथे आले. पुष्कळसे लुळे-पांगळे, अंध, म्हातारे, आणि मंदबुद्धी लोकही आपल्या पापांची निवृत्ती व्हावी, या उद्देशाने तेथे येऊन पोहोचले. अशा प्रकारे तेथे गर्दी झालेली पाहून देवांनाही आश्चर्य वाटले. जेव्हा गोकर्ण व्यासपीठावर बसून कथा सांगू लागला, तेव्हा ते प्रेतही तेथे आले आणि बसण्यासाठी इकडे तिकडे जागा शोधू लागले. इतक्यात सात गाठी असलेल्या एका उंच वेळूवर त्याची दृष्टी गेली. त्या वेळूच्या सर्वांत खालच्या गाठीच्या छिद्रात घुसून ते प्रेत तेथे बसून राहिले. वायुरूप असल्याकारणाने ते कुठे बाहेर बसू शकत नव्हते. म्हणून वेळूत घुसले. (४३-४६)


वैष्णवं ब्राह्मणं मुख्यं श्रोतारं परिकल्प्य सः ।
प्रथमस्कन्धतः स्पष्टं आख्यानं धेनुजोऽकरत् ॥ ४७ ॥
दिनान्ते रक्षिता गाथा तदा चित्रं बभूव ह ।
ंशैकग्रन्थिभेदोऽभूत् सशब्दं पश्यतां सताम् ॥ ४८ ॥
द्वितीयेऽह्नि तथा सायं द्वितीयग्रन्थिभेदनम् ।
तृतीयेऽह्नि तथा सायं तृतीयग्रन्थिभेदनम् ॥ ४९ ॥
एवं सप्तदिनैश्चैव सप्तग्रन्थिविभेदनम् ।
कृत्वा स द्वादशस्कन्ध श्रवणात् प्रेततां जहौ ॥ ५० ॥
दिव्यरूपधरो जातः तुलसीदाममंडितः ।
पीतवासा घनश्यमो मुकुटी कुण्डलान्वितः ॥ ५१ ॥
ननाम भ्रातरं सद्यो गोकर्णं इति चाब्रवीत् ।
त्वयाहं मोचितो बन्धो कृपया प्रेतकश्मलात् ॥ ५२ ॥
धन्या भागवती वार्ता प्रेतपीडाविनाशिनी ।
सप्ताहोऽपि तथा धन्यः कृष्णलोकफलप्रदः ॥ ५३ ॥
कम्पन्ते सर्वपापानि सप्ताहश्रवणे स्थिते ।
अस्माकं प्रलयं सद्यः कथा चेयं करिष्यति ॥ ५४ ॥
आर्द्रं शुष्कं लघु स्थूलं वाङ्‌मनः कर्मभिः कृतम् ।
श्रवणं विदहेत्पापं पावकं समिधो यथा ॥ ५५ ॥
मुख्य श्रोता द्विज एक म्हणोनी कल्पिला असे ।
पहिल्या पासुनी वार्ता स्पष्ट आरंभिली असे ॥ ४७ ॥
सायंकाळी कथा होता घडली घटना अशी ।
तड्तडा वाजुनी एका गाठीशी वेळु भंगला ॥ ४८ ॥
दुसर्‍या दिनिही तैसी दुसरी गाठ भंगली ।
तिसर्‍या दिनिही तैसी तिसरी भंगली असे ॥ ४९ ॥
असेचि घडले साती दिनी गाठी फुटोनिया ।
ऐकता स्कंध बाराही जाहले मुक्त प्रेत ते ॥ ५० ॥
धुंधुकारी शरीराने घनश्यामची शोभला ।
कुंडले पिवळे वस्त्र मुकुट तुळसीदळे ॥ ५१ ॥
गोकर्णा वंदिले घाई आणीक मग बोलला ।
बंधो ! तुझ्या कृपेने मी प्रेत मुक्तचि जाहलो ॥ ५२ ॥
धन्य भागवती वार्ता प्रेतपीडा निवारिते ।
हिच्या सप्ताह कार्याने कृष्णाचे धाम लाभते ॥ ५३ ॥
थर्‌थरा कापती पापे सप्ताह श्रवणी हिच्या ।
कथा भासे तयांनाही मोठीच प्रलयंकर ॥ ५४ ॥
अर्ध ओली हि ती काष्ठे आगीत भस्म होति जै ।
तशीच जळती पापे अग्नीत समिधा जशा ॥ ५५ ॥

गोकर्णाने एका वैष्णव ब्राह्मणाला मुख्य श्रोता बनविले आणि पहिल्या स्कंधापासून स्पष्ट शब्दांत कथा सांगण्यास प्रारंभ केला. सायंकाळी जेव्हा कथा संपली तेव्हा एक विचित्र घटना घडली. सर्वांच्या देखत त्या वेळूची एक गाठ तडतड करीत फुटली. त्याचप्रमाणे दुसर्‍या दिवशी सायंकाळी दुसरी गाठ फुटली आणि तिसरे दिवशी त्याच वेळी तिसरी गाठ फुटली. अशा प्रकारे सात दिवसात सात गाठी फुटून बारा स्कंध ऐकल्यानंतर धुंधुकारी पवित्र होऊन प्रेतयोनीतून मुक्त झाला आणि दिव्य शरीर धारण करून सर्वांसमोर प्रगट झाला. त्याचे शरीर मेघाप्रमाणे श्याम वर्णाचे, पीतांबर नेसलेले, गळ्यात तुळसीमाळांनी सुशोभित असे होते. मस्तकावर सुंदर मुकुट आणि कानांमध्ये कुंडले झळकत होती. त्याने ताबडतोब आपला भाऊ गोकर्णाला नमस्कार केला आणि तो म्हणाला, बंधो, तू दयाळूपणाने माझी प्रेतयोनीच्या यातनांपासून सुटका केलीस. प्रेतपीडेचा नाश करणारी ही श्रीमद्‌भागवताची कथा धन्य होय. श्रीकृष्णधामाची प्राप्ती करून देणारे हे सप्ताह पारायणही धन्य होय ! जेव्हा एखाद्याला सप्ताह श्रवाणाचा योग येतो तेव्हा त्याच्या पापांचा थरकाप उडतो. कारण भागवताची कथा आपला लगेच नाश करील, असे त्यांना वाटते. ज्याप्रमाणे अग्नी ओले-सुके, लहान-मोठे असे सर्व प्रकारचे लाकूड भस्मसात करतो. त्याप्रमाणे हे सप्ताहश्रवण मन, वाणी आणि क्रियांद्वारा केलेली नवी-जुनी, लहान-मोठी, सर्व पापे भस्मसात करते. (४७-५५)


अस्मिन् वै भारते वर्षे सूरिभिः देवसंसदि ।
अकथाश्राविणां पुंसां निष्फलं जन्म कीर्तितम् ॥ ५६ ॥
राहोनी भारता मध्ये श्रीमद्‌भागवती कथा ।
जेणे ही ऐकिली नाही व्यर्थ तो सूर बोलती ॥ ५६ ॥

विद्वानांनी देवतांच्या सभेत म्हटले आहे की, या भारतवर्षात जो श्रीमद्‌भागवताची कथा ऐकत नाही, त्याचा जन्म व्यर्थ होय. (५६)


किं मोहतो रक्षितेन सुपुष्टेन बलीयसा ।
अध्रुवेण शरीरेण शुकशास्त्रकथां विना ॥ ५७ ॥
अस्थिस्तम्भं स्नायुबद्धं मांसशोणितलेपितम् ।
चर्मावनद्धं दुर्गन्धं पात्रं मूत्रपुरीषयोः ॥ ५८ ॥
जराशोकविपाकार्तं रोगमन्दिरमातुरम् ।
दूष्पूरं दुर्धरं दुष्टं सदोषं क्षणभंगुरम् ॥ ५९ ॥
कृमिविड् भस्म संज्ञान्तं शरीरं इति वर्णितम् ।
अस्थिरेण स्थिरं कर्म कुतोऽयं साधयेत् न हि ॥ ६० ॥
यत्प्रातः संस्कृतं चान्नं सायं तच्च विनश्यति ।
तदीयरससम्पुष्टे काये का नाम नित्यता ॥ ६१ ॥
लाडिला पाळिला देह धष्ट पुष्ट हि जाहला ।
शुकशास्त्र कथा त्याने नैकता लाभ काय तो ॥ ५७ ॥
अस्थिस्तंभ शरीराच्या नाडी दोरेची बांधिला ।
लेपिले वरि ते मास कातडे मढिले असे ॥ ५८ ॥
जरा शोक परीणामे रोगांचे घर दुःख जे ।
तनू सांभाळिता त्रास क्षणात नासकी अशी ॥ ५९ ॥
पुरता सडते काया जाळता राख होतसे ।
असा नश्वर हा देह सुकर्म कां न साधिती ॥ ६० ॥
सकाळी शिजता अन्न संध्याकाळीच नासते ।
पोसतो असल्या अन्ने देह नश्वरची असे ॥ ६१ ॥

बरे ! या नाश पावणार्‍या शरीराचे मोहपूर्वक लालनपालन करून त्याला धष्टपुष्ट आणि बलवान बनविले आणि जर श्रीमद्‌भागवताची कथा ऐकली नाही, तर त्याचा काय उपयोग ? हाडे या शरीराचे आधारस्तंभ आहेत, नाडीरूपी दोर्‍यांनी याला बांधले आहे, त्यावर मांस आणि रक्त यांचा लेप देऊन कातड्याने याला मढविले आहे. हे मलमूत्राचे भांडेच असल्याने यातील प्रत्येक अंगाला दुर्गंधी येत आहे. वृद्धावस्था आणि शोक यांमुळे परिणामतः हे दुःखमय असून रोगांचे घरच आहे. कोणत्या ना कोणत्या इच्छेने हे व्याकूळ असते, याची कधी तृप्तीच होत नाही. याला धारण करणे हेही एक ओझेच आहे. याच्या रोमरोमात दोष भरलेले आहेत आणि नष्ट होण्याला याला एक क्षणही लागत नाही. शेवटी याला पुरले तर त्यांतून किडे उत्पन्न होतात. पशूंनी खाल्ले तर विष्टेत रूपांतर होते आणि अग्नीत जाळले तर राखेचा ढीग तयार होतो. असा तीनच प्रकारांनी याचा शेवट होतो. अशा विनाशी शरीराकडून मनुष्य अविनाशी फळ देणारे काम का करून घेत नाही ? जे अन्न सकाळी शिजविले जाते, ते संध्याकाळपर्यंत खराब होऊन जाते. तर मग त्यांतील रसामुळे पुष्ट झालेले शरीर नित्य कसे राहील. (५७-६१)


सप्ताहश्रवणात् लोके प्राप्यते निकटे हरिः ।
अतो दोषनिवृत्त्यर्थं एतद् एव हि साधनम् ॥ ६२ ॥
बुद्‌बुदा इव तोयेषु मशका इव जन्तुषु ।
जायन्ते मरणायैव कथाश्रवणवर्जिताः ॥ ६३ ॥
जडस्य शुष्कवंशस्य यत्र ग्रन्थिविभेदनम् ।
चित्रं किमु तदा चित्त ग्रन्थिभेदः कथाश्रवात् ॥ ६४ ॥
भिद्यते हृदयग्रन्थिः छिद्यन्ते सर्वसंशयाः ।
क्षीयन्ते चास्य कर्माणि सप्ताहश्रवणे कृते ॥ ६५ ॥
संसारकर्दमालेप प्रक्षालनपटीयसि ।
कथातीर्थे स्थिते चित्ते मुक्तिरेव बुधैः स्मृता ॥ ६६ ॥
श्रवणे पाठ सप्ताही लाभतो भगवान् त्वरे ।
म्हणोनी सर्व दोषांची कथा निवृत्ति ही असे ॥ ६२ ॥
बुडबुडे आणि डासांचे क्षणात मरणे जसे ।
तसेचि मरती लोक कथाश्रवणवर्जित ॥ ६३ ॥
जड शुष्कहि वेळूच्या जियेने ग्रंथि भंगल्या ।
चित्ताच्या फुटती गाठी आश्चर्य यात काय ते ॥ ६४ ॥
सप्ताह ऐकता सार्‍या शंका जाती सुटोनिया ।
कृतकर्म विनाशोनी संपती ऐकता कथा ॥ ६५ ॥
भागवत्‌सार हे तीर्थ धुते संसारकर्दम ।
विद्वान वदती नित्य हृदयी स्थिरता गती ॥ ६६ ॥

या जगात सप्ताहश्रवण केल्याने भगवंतांची तत्काळ प्राप्ती होऊ शकते. म्हणून सर्व प्रकारचे दोष नाहीसे होण्यासाठी हेच एकमेव साधन आहे. जे लोक भागवतकथा श्रवण करीत नाहीत, ते पाण्यावरील बुडबुडे आणि डास यांच्याप्रमाणे केवळ नाहीसे होण्यासाठीच जन्माला येतात. ज्याच्या प्रभावामुळे निर्जीव आणि वाळलेल्या बांबूच्या गाठी तुटतात, त्या भागवतकथेच्या श्रवणाने चित्ताची अज्ञानरूप गाठ सुटते, त्याचे सर्व संशय नाहीसे होतात आणि सर्व कर्में क्षीण होतात. हे भागवतरूपी तीर्थ संसारातील पापरूप चिखल धु‍ऊन काधण्यात पटाईत आहे. विद्वानांचे म्हणणे आहे की, जेव्हा हे कथातीर्थ हृदयात स्थिर होते, तेव्हा मनुष्याची मुक्ति होते, हे निश्चित समजावे. (६२-६६)


एवं ब्रुवति वै तस्मिन् विमानं आगमत् तदा ।
वैकुण्ठवासिभिर्युक्तं प्रस्फुरत् दीप्तिमण्डलम् ॥ ६७ ॥
सर्वेषां पश्यतां भेजे विमानं धुन्धुलीसुतः ।
विमाने वैष्णवान् वीक्श्य गोकर्णो वाक्यमब्रवीत् ॥ ६८ ॥
धुंधुकारीस तेव्हा ते वैकुंठयान पातले ।
मंडलाकार तेजाने देवदूत प्रकाशले ॥ ६७ ॥
विमानी धुंधुलीसूत सर्वानी पाहिला तदा ।
विष्णूदूतास पाहोनी गोकर्ण वाक्य बोलला ॥ ६८ ॥

ज्यावेळी धुंधुकारी हे सर्व सांगत होता, त्याचवेळी वैकुंठातील पार्षदांसह एक तेजस्वी विमान तेथे उतरले. सर्व लोकांच्या समक्ष धुंधुकारी त्या विमानात चढून बसला. तेव्हा विमानातून आलेल्या पार्षदांना गोकर्ण म्हणाला - (६७-६८)


गोकर्ण उवाच -
अत्रैव बहवः सन्ति श्रोतारो मम निर्मलाः ।
आनीतानि विमानानि न तेषां युगपत्कुतः ॥ ६९ ॥
श्रवणं समभागेन सर्वेषामिह दृश्यते ।
फलभेदः कुतो जातः प्रब्रुवन्तु हरिप्रियाः ॥ ७० ॥
गोकर्णजी म्हणाले -
इथे सर्वचि श्रोत्यांनी श्रद्धेने ऐकिली कथा ।
विमाने सर्व लोकांना देवानी का न आणिली ॥ ६९ ॥
सर्वांनी समश्रद्धेने ऐकिली ही कथा बरी ।
समान फळ ना त्यांना ऐसे का मज सांगणे ॥ ७० ॥

गोकर्णाने विचारले - भगवंतांच्या प्रिय पार्षदांनो ! येथे तर शुद्ध अंतःकरणाचे अनेक श्रोते आहेत. त्या सर्वांसाठी आपण आपल्याबरोबर आणखी विमाने का आणली नाहीत ? आम्हांला तर असे दिसते की, इथे सर्वांनी सारख्याच भावनेने कथा ऐकली आहे. तर मग फलप्राप्तीत असा भेद का, हे आपण सांगावे. (६९-७०)


हरिदासा ऊचुः -
श्रवणस्य विभेदेन फलभेदोऽत्र संस्थितः ।
्रवणं तु कृतं सर्वैः न तथा मननं कृतम् ।
फलभेदोस्ततो जातो भजनादपि मानद ॥ ७१ ॥
सप्तरात्रं उपोषैव प्रेतेन श्रवणं कृतम् ।
मननादि तथा तेन स्थिरचित्ते कृतं भृशम् ॥ ७२ ॥
अदृढं च हतं ज्ञानं प्रमादेन हतं श्रुतम् ।
संदिग्धो हि हतो मंत्रो व्यग्रचित्तो हतो जपः ॥ ७३ ॥
अवैष्णवो हतो देशो हतं श्राद्धं अपात्रकम् ।
तं अश्रोत्रिये दानं अनाचारं हतं कुलम् ॥ ७४ ॥
विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्वभावना ।
मनोदोषजयश्चैव कथायां निश्चला मतिः ॥ ७५ ॥
एवं आदि कृतं चेत् स्यात् तदा वै श्रवणे फलम् ।
पुनः श्रवान्ते सर्वेषां वैकुण्ठे वसतिर्ध्रुवम् ॥ ७६ ॥
गोकर्ण तव गोविन्दो गोलोकं दास्यति स्वयम् ।
एवमुक्त्वा ययुः सर्वे वैकुण्ठ हरिकीर्तनाः ॥ ७७ ॥
हरिदास म्हणाले -
बाह्यरुपी कथा यांनी ऐकिली मनि ना तशी ।
भजनी भेद तो होता त्यांना मुक्ति कशी मिळे ॥ ७१ ॥
उपासी राहुनी नित्य प्रेताने ऐकिली कथा ।
मननादि जसे चित्त असावे ठेविले तसे ॥ ७२ ॥
न दृढ ज्ञान ते व्यर्थ संशये मंत्रही तसे ।
अस्थीर ठेविता चित्त जपाचे फळ काय ते ॥ ७३ ॥
अवैष्णव हरे देश अपात्री श्राद्ध नासते ।
अश्रोती दान नी कूळ आचाराविण नासते ॥ ७४ ॥
विश्वास गुरुवाक्याते मनात दीन भावना ।
मनासी ठेविणे ताबा अशाने फळ लाभते ॥ ७५ ॥
जर हे निश्चये ऐशा घेतील ऐकुनी पुन्हा ।
लाभेल याहि सर्वांना वैकुंठधाम राहण्या ॥ ७६ ॥
ऐका गोकर्णजी तुम्हा स्वये श्री विष्णु येतसे
गोलोकी न्यावया ऐसे भाग्य थोर तुम्हा असे ।
बोलोनी वाक्य हे सारे विष्णुचे दूत ते तदा ।
गात गेले हरीगीत वैकुंठधाम गाठण्या ॥ ७७ ॥

हरिदास म्हणाले - फलप्राप्तीच्या भेदाचे कारण श्रवणातील भेद हे आहे. श्रवण सर्वांनी सारखेच केले हे म्हणणे बरोबर आहे. परंतु याच्यासारखे सर्वांनी मनन केलेले नाही. म्हणूनच सर्वांनी एकाच वेळी श्रवण केल्यानंतरही फळात फरक पडला. या प्रेताने सात दिवस उपवास करून श्रवण केले होते. तसेच ऐकलेल्या विषयाचे स्थिरचित्ताने खूप मनन आणि निदिध्यासनही ते करीत होते. जे ज्ञान चित्तात दृढ होत नाही, ते व्यर्थ होय. त्याचप्रमाणे लक्ष न देता केलेले श्रवण, संशयी मनाने केलेले मंत्रपठण आणि मन इकडे तिकडे भटकत असताना केलेला जप काहीही फल देत नाही. वैष्णव नसलेला देश, अपात्र व्यक्तीला दिलेले श्राद्धाचे भोजन, अवैदिकाला दिलेले दान आणि सदाचारहीन कूळ, हे सर्व व्यर्थ होय. गुरुवचनावर विश्वास, अंतःकरणात नम्रता, मनातील विकारांवर विजय आणि कथा ऐकताना चित्ताची एकाग्रता आदी नियमांचे पालन केले गेले, तर श्रवणाचे फळ मिळते आणि अशा रीतीने श्रोत्यांनी पुन्हा श्रीमद्‌भागवताची कथा ऐकली तर त्यांना निश्चितच वैकुंठप्राप्ती होईल. हे गोकर्णा, आपल्याला तर भगवंत स्वतः येऊन गोलोकधामाला घेऊन जातील, असे म्हणून ते सर्व पार्षद हरिकीर्तन करीत वैकुंठलोकी निघून गेले. (७१-७७)


श्रवणो मासि गोकर्णः कथां ऊचे तथा पुनः ।
सप्तरात्रवतीं भूयः श्रवणं तैः कृतं पुनः ॥ ७८ ॥
कथासमाप्तौ यज्जातं श्रूयतां तच्च नारद ॥ ७९ ॥
विमानैः सह भक्तैश्च हरिराविर्बभूव ह ।
जयशब्दा नमःशब्दाः तत्रासन् बहवस्तदा ॥ ८० ॥
पाञ्चजन्य ध्वनिं चक्रे हर्षात् तत्र स्वयं हरिः ।
गोकर्णं तु समालिंग्य अकरोत् स्वसदृषं हरिः ॥ ८१ ॥
श्रोतॄन् अन्यान् घनश्यामान् पीतकौशेयवाससः ।
कीरीटिनः कुण्डलिनः तथा चक्रे हरिः क्षणात् ॥ ८२ ॥
तद्‌ग्रामे ये स्थिता जीवा आश्वचाण्डालजातयः ।
विमाने स्थापितास्तेऽपि गोकर्णकृपया तदा ॥ ८३ ॥
प्रेषिता हरिलोके ते यत्र गच्छन्ति योगिनः ।
गोकर्णेन स गोपालो गोलोकं गोपवल्लभम् ।
कथाश्रवणतः प्रीतो निर्ययौ भक्तवत्सलः ॥ ८४ ॥
अयोध्यावासिनं पूर्वं यथा रामेण संगताः ।
तथा कृष्णेन ते नीता गोलोकं योगिदुर्लभम् ॥ ८५ ॥
यत्र सूर्यस्य सोमस्य सिद्धानां न गतिः कदा ।
तं लोकं हि गतास्ते तु श्रीमद्‌भागवतश्रवात् ॥ ८६ ॥
पुन्हा श्रावण मासात गोकर्णे योजिली कथा ।
श्रोते तेचि पुन्हा आले श्रीमद्‌भागवतास जे ॥ ७८ ॥
कथा ती संपली तेव्हा ऐका हो नारदा पुढे ॥ ७९ ॥
विमानी भक्त घेवोनी श्रीहरी तेथ पातले ।
जय्‌जय्‌कार दिशी झाला अपार ध्वनी नादला ॥ ८० ॥
आनंदे भगवंताने फुंकिला पांचजन्यही ।
कवटाळुनि गोकर्णा स्वरूप दिधले तया ॥ ८१ ॥
क्षणात सर्व श्रोत्यांना श्यामवर्ण हि लाभला ।
पीत अंबर धारी ते किरीट कुंडले तशी ॥ ८२ ॥
तेथील श्वान नी पापी सर्वच्या सर्व जीव ते ।
गोकर्णाची कृपा होता विमानी बैसले पहा ॥ ८३ ॥
जिथे योगी सदामुक्त तिथे सर्वास धाडिले ।
प्रसन्न हो‌ऊनी कृष्णे गोकर्णा घेतले सवे ।
प्रीय गोलोक तो त्याचा मुक्त तेथेचि ठेविले ॥ ८४ ॥
अयोध्यावासिया रामे साकेतधाम ते दिले ।
योगी दुर्लभ गोधाम कृष्णे सर्वास ते दिले ॥ ८५ ॥
ज्या लोका चंद्र सूर्याला सिद्धांना नच दर्शन ।
श्रोते भागवताचे जे त्यांना ते सहजी मिळे ॥ ८६ ॥

गोकर्णाने श्रावण महिन्यात पुन्हा त्याच प्रकारे सप्ताह करून कथा सांगितली आणि त्याच श्रोत्यांनी ती पुन्हा ऐकली. हे नारदमुनी ! या कथेच्या समाप्तीनंतर काय झाले ते ऐका. भगवंत आपल्या भक्तांनी भरलेल्या विमानांसह तेथे प्रगट झाले. त्यावेळी सगळीकडे नमस्कार आणि जयजयकाराचा घोष होऊ लागला. भगवंतांनी अत्यंत आनंदाने आपल्या पांचजन्य शंखाचा नाद केला आणि गोकर्णाला आपल्या हृदयाशी कवटाळून त्याला आपल्यासारखे रूप दिले. भगवंतांनी क्षणातच अन्य सर्व श्रोत्यांनाही मेघासारखे श्यामवर्ण, रेशमी पीतांबरधारी, किरीट आणि कुंडले यांनी विभूषित केले. गोकर्णाच्या कृपेने त्या गावातील कुत्र्यापासून चांडाळापर्यंत जेवढे जीव होते, त्या सर्वांना विमानात बसविण्यात आले. जेथे योगीजन जातात त्या भगवद्‌धामात त्या सर्वांना पाठविण्यात आले. अशा रीतीने कथाश्रवणाने प्रसन्न होऊन भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण गोकर्णाला बरोबर घेऊन गोपगोपींच्या प्रिय गोलोकधामाला गेले. पूर्वी ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अयोध्या-वासीयांना घेऊन आपल्या धामाला गेले होते, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांना घेऊन योग्यांना सुद्धा दुर्लभ असणार्‍या गोलोकाला गेले. ज्या लोकात सूर्य, चंद्र आणि सिद्ध हे सुद्धा जाऊ शकत नाहीत, तेथे ते श्रीमद्‌भागवत श्रवण केल्यामुळे गेले. (७८-८६)


(इंद्रवंशा)
ब्रूमोऽत्र ते किं फलवृन्दमुज्ज्वलं
     सप्ताहयज्ञेन कथासु संचितम् ।
कर्णेन गोकर्णकथाक्षरो यैः
     पीतश्च ते गर्भगता न भूयः ॥ ८७ ॥
वाताम्बुपर्णाशन देहशोषणैः
     तपोभिः उग्रैः चिरकालसंचितैः ।
योगैश्च संयान्ति न तां गतिं वै
     सप्ताहगाथाश्रवणेन यान्ति याम् ॥ ८८ ॥
(अनुष्टुप्)
इतिहासं इमं पुण्यं शाण्डिल्योऽपि मुनीश्वरः ।
पठते चित्रकूटस्थो ब्रह्मानन्दपरिप्लुतः ॥ ८९ ॥
(इंद्रवज्रा)
आख्यानमेतत् परमं पवित्रं
     श्रुतं सकृद्वै विदहेदघौघम् ।
श्राद्धे प्रयुक्तं पितृतृप्तिमावहेत्
     नित्यं सुपाठाद अपुनर्भवं च ॥ ९० ॥
इति श्रीपद्मपुराणे उत्तरखण्डे श्रीमद्‌भागवतमाहात्म्ये
गोकर्णमोक्षवर्णनं नाम पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
(इंद्रवज्रा)
सप्ताहयज्ञी कथनामृताचे
    ते काय वाणू फळ केवढे ते ।
कथारस प्राशिति कर्णि शब्द
    त्यांना पुन्हा ना कधि गर्भवास ॥ ८७ ॥
वायू जलो शुष्कहि पर्ण खाता
    त्रासोनि देहा कुणि योग घेती ।
जो लाभ त्यांना न मिळे कदापि
    तो लाभ होतो कथनामृताने ॥ ८८ ॥
(अनुष्टुप्)
इतिहास पवित्रो हा चित्रकूटी विराजमान् ।
शांडिल्य ब्रह्ममोदात डुंबोनी वाचिती पहा ॥ ८९ ॥
(इंद्रवज्रा)
आख्यान हे तो अति पावनो नी
    हे ऐकता भस्मचि होति पापे ।
श्राद्धात होता पठणो ययाचे
    पित्रांसि तृप्ती अन मोक्ष लाभे ॥ ९० ॥
॥ इति श्री पद्मपुराणी उत्तरखंडी श्रीमद्‌भागवत कथा माहात्म्य ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ पाचवा अध्याय हा ॥ मा ॥ ५ ॥ हरिःॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

सप्ताह-यज्ञ कथा श्रवण केल्याने जे उज्ज्वल फल साठते, त्याविषयी आम्ही आपल्याला काय सांगावे ? अहो ! ज्यांनी आपल्या कर्णपुटांद्वारे गोकर्णाने सांगितलेल्या कथेचे एक अक्षरसुद्धा ऐकले, ते पुन्हा गर्भवासी झाले नाहीत. ज्या गतीला सप्ताहश्रवणाने भक्त सहजगत्या प्राप्त करून घेतात, त्या गतीला मनुष्य वारा, पाणी किंवा पाने खाऊन शरीर सुकवून पुष्कळ काळपर्यंत घोर तपस्या करून आणि योगाभ्यास करूनही प्राप्त करू शकत नाही. या परम पवित्र इतिहासाचे पारायण चिय्रकूट पर्वतावर विराजमान असलेले मुनीश्वर शांडिल्यसुद्धा ब्रह्मानंदात मग्न होऊन करीत असतात. ही कथा मोठी पवित्र आहे. एक वेळ श्रवण केल्यानेही सर्व पापांचे भस्म होते. श्राद्धाचे वेळी याचा पाठ केला, तर त्यामुळे पितृगणांची तृप्ती होते आणि नित्य पाठ केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. (८७-९०)


अध्याय पाचवा समाप्त

GO TOP