|
श्रीमद् भागवत पुराण सप्ताहकथायां भगवतः प्रादुर्भावः, गोकर्णोपाख्यानारम्भश्च - गोकर्ण-उपाख्यान प्रारंभ - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
सूत उवाच -
(अनुष्टुप्) अथ वैष्णवचित्तेषु दृष्ट्वा भक्तिं अलौकिकीम् । निजलोकं परित्यज्य भगवान् भक्तवत्सलः ॥ १ ॥ वनमाली घनश्यामः पीतवासा मनोहरः । काञ्चीकलापरुचिरो लसन् मुकुटकुण्डलः ॥ २ ॥ त्रिभङ्गललितश्चारु कौस्तुभेन विराजितः । कोटिमन्मथलावण्यो हरिचन्दनचर्चितः ॥ ३ ॥ परमानन्द चिन्मूर्तिः मधुरो मुरलीधरः । आविवेश स्वभक्तानां हृदयानि अमलानि च ॥ ४ ॥ वैकुण्ठवासिनो ये च वैष्णवा उद्धवादयः । तत्कथाश्रवणार्थं ते गूढरूपेण संस्थिताः ॥ ५ ॥ तदा जयजयारावो रसपुष्टिरलौकिकी । चूर्णप्रसून वृष्टिश्च मुहुः शंखरवोऽप्यभूत् ॥ ६ ॥ तत् सभासंस्थितानां च देहगेहात्मविस्मृतिः । दृष्ट्वा च तन्मयावस्थां नारदो वाक्यमब्रवीत् ॥ ७ ॥
सूतजी सांगतात - (अनुष्टुप्) अशी वैष्णवचित्तात भक्ति थोर बघोनिया । सोडोनी निजधामाला भगवान् पातला तिथे ॥ १ ॥ वनमाळी घनश्याम पीतांबर मनोहर । मुकुट कर्धनी तैसे कुंडली तेज फाकले ॥ २ ॥ भावे त्रिभंग ललितो उभा चित्तास चोरटा । कौस्तूभ शोभला कंठी अंगी चंदन चर्चित । करोडो कामदेवांचे जणू रुप हिराविले ॥ ३ ॥ परमानंद चिन्मूर्ती मधुरो मुरलीधर । नटला खूप सौंदर्ये भक्तचित्तात ठाकला ॥ ४ ॥ वैकुंठवासिचे भक्त उद्धवादी अनेक ते । कथेसी पातले तेथे गुप्त रूपात तेधवा ॥ ५ ॥ जय् जयो वदले आणि गुलाल फेकिली फुले । अद्भूत भक्तिगंगा ती शंखाचा नाद जाहला ॥ ६ ॥ मंडपी बैसले त्यांचे देहादि भान संपले । तल्लीनता बघोनिया देवर्षि बोलले असे ॥ ७ ॥
सूत म्हणाले - त्यावेळी आपल्या भक्तांच्या चित्तातील अलौकिक भक्ति पाहून भक्तवत्सल श्रीभगवान आपले स्थान सोडून तेथे आले. त्यांच्या गळ्यात वनमाला शोभून दिसत होती, पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे त्यांचे अंग श्यामवर्णाचे होते, त्यांनी पीतांबर धारण केला होता, कमरेभोवती मेखला शोभत होती. ते त्रिभंगी मुद्रेमुळे सुंदर दिसत होते. वक्षःस्थळावर कौस्तुभमणी चमकत होता, संपूर्ण शरीरावर हरिचंदनाचा लेप लावला होता. त्यांनी जणू कोट्यवधी कामदेवांचे सौंदर्य धारण केले होते. ते म्हणजे परमानंदाची चैतन्यमय मूस होते. असे मनोहर मुरलीधर, आपल्या भक्तांच्या निर्मळ हृदयात प्रविष्ट झाले होते. वैकुंठात वास्तव्य करणारे उद्धवादी भक्त गुप्तरूपाने कथा ऐकण्यासाठी तेथे आले होते. तेव्हा जयघोष होऊ लागला. भक्तिरसाचा अद्भुत प्रवाह वाहू लागला. गुलाल, बुक्का, फुलांचा वर्षाव आणि शंखनादही होऊ लागला. त्या सभेत बसलेल्या लोकांची आपला देह, घरदार आणि अंतःकरणाचीही जाणीव नाहीशी झाली ते असे तन्मय झालेले पाहून नारदमुनी म्हणाले - (१-७)
(वंशस्थ)
अलौकिकोऽयं महिमा मुनीश्वराः सप्ताहजन्योऽद्य विलोकितो मया । मूढाः शठा ये पशुपक्षिणोऽत्र सर्वेऽपि निष्पापतमा भवन्ति ॥ ८ ॥ (उपेंद्रवज्रा) अतो नृलोके ननु नास्ति किंचित् चित्तस्य शोधाय कलौ पवित्रम् । अघौघविध्वंसकरं तथैव nbsp; कथासमानं भुवि नास्ति चान्यत् ॥ ९ ॥ (इंद्रवज्रा) के के विशुद्ध्यन्ति वदन्तु मह्यं सप्ताहयज्ञेन कथामयेन । कृपालुभिर्लोकहितं विचार्य प्रकाशितः कोऽपि नवीनमार्गः ॥ १० ॥
(इंद्रवज्रा) मुनीश्वरांनो बहु थोर गोष्ट पाहीयली मी अजि या कथेत । हे मूर्ख पापी पशु पक्षि सारे निष्पाप झाले सगळेचि येथे ॥ ८ ॥ कलीत चित्ता करण्या पवित्र कथाचि आहे नच संशयो तो । नाही दुजे साधन या कलीत त्या पापराशी करण्यास नष्ट ॥ ९ ॥ मुनीश्वरांनो तुम्ही तो कृपाळू हा मार्ग केला बहुस्वल्प तुम्ही । सप्ताहयज्ञी जगि कोण थोर गेले तरोनी कृपया वदावे ॥ १० ॥
मुनिगण हो ! सप्ताह श्रवणाचा, एक अलौकिक महिमा मी पाहात आहे. येथे आलेल्यांत मूर्ख, धूर्त आणि पशु-पक्षीही असून ते सर्वच अत्यंत निष्पाप झाले आहेत. म्हणून या कलियुगात चित्तशुद्धीसाठी, मृत्युलोकातील पापसंचय नाहीसा करणारे भागवतकथेच्या बरोबरीचे दुसरे कोणतेही पवित्र साधन नाही. मुनिवर, आपण मोठे कृपाळू आहात. लोकांच्या कल्याणासाठी आपण विचारपूर्वक एक वेगळा असा मार्ग शोधून काढला आहे. या कथारूप सप्ताहयज्ञाने कोणकोण पवित्र होतात हे आपण मला सांगावे. (८-१०)
कुमारा ऊचुः -
(वंशस्थ) ये मानवाः पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचाररता विमार्गगाः । क्रोधाग्निदग्धाः कुटिलाश्च कामिनः सप्ताहयज्ञेन कलौ पुनन्ति ते ॥ ११ ॥ सत्यन हीना पितृमातृदूषकाः तृष्णाकुलाचाश्रमधर्मवर्जिताः । ये दाम्भिका मत्सरिणोऽपि हिंसकाः सप्ताहयज्ञेन कलौ पुनन्ति ते ॥ १२ ॥ पञ्चोग्रपापात् छलछद्मकारिणः क्रूराः पिशाचा इव निर्दयाश्च ये । ब्रह्मस्वपुष्टा व्यभिचारकारिणः सप्ताहयज्ञेन कलौ पुनन्ति ते ॥ १३ ॥ कायेन वाचा मनसापि पातकं नित्यं प्रकुर्वन्ति शठा हठेन ये । परस्वपुष्टा मलिना दुराशयाः सप्ताहयज्ञेन कलौ पुनन्ति ते ॥ १४ ॥
कुमार म्हणाले - जी माणसे पापचि वर्ततात पापात होती रममाण नित्य । नी क्रोध कामी जळती असेही सप्ताह यज्ञी तरि मुक्त होती ॥ ११ ॥ माता पित्याची करितात निंदा अधर्मि सत्यच्युत दंभि तृष्णी । नी साधिती मत्सर अन्य लोका सप्ताहयज्ञी तरि मुक्त होती ॥ १२ ॥ जो मद्यपी ब्रह्म हत्यारी ऐसा सुवर्ण चोरो गुरुपत्नि भोगी । विश्वासघाती छळ क्रोधकर्मी सप्ताहयज्ञी तरी मुक्त होती ॥ १३ ॥ वाणी मनाने अन या शरीरे हट्टेचि पापी बहु भोग घेती । मलीन झाले हृदयी नि अंगी सप्ताहयज्ञी तरि मुक्त होती ॥ १४ ॥
सनकादिक म्हणाले - जे लोक नेहमी पापकर्मे करतात आणि नेहमी दुराचरणात तत्पर असतात, वाममार्गाने जातात, क्रोधाग्नीने तप्त झालेले असतात, कपटी आणि कामातुर असतात, असे सर्वजण या कलियुगात सप्ताहयज्ञाने पवित्र होतात. सत्यापासून परावृत्त झालेले, माता-पित्यांची निंदा करणारे, कामनांनी ग्रस्त झालेले, आश्रमधर्मांचे पालन न करणारे, दांभिक, दुसर्यांचा मत्सर करणारे आणि दुसर्यांना पीडा देणारे, हे सर्व कलियुगात सप्ताहयज्ञाने पवित्र होतात. मद्यपान, ब्राह्मणहत्या, सुवर्ण-चोरी, गुरुस्त्रीगमन आणि विश्वासघात ही पाच महापापे करणारे, कपट व ढोंग करण्यात तत्पर, क्रूर, पिशाच्चांप्रमाणे निर्दय, बाह्मणाच्या धनाने श्रीमंत होणारे आणि व्यभिचारी, हे सर्व कलियुगात सप्ताहयज्ञाने पवित्र होतात. जे धूर्त हट्टाने नेहमी मन, वाणी आणि शरीराने पापकर्म करीत असतात, दुसर्याच्या धनाने पुष्ट होतात, तसेच मलिन मन आणि दुष्टवासनांनी युक्त आहेत, ते सुद्धा कलियुगात सप्ताहयज्ञाने पवित्र होतात. (११-१४)
(अनुष्टुप्)
अत्र ते कीर्तयिष्याम इतिहासं पुरातनम् । यस्य श्रवणमात्रेण पापहानिः प्रजायते ॥ १५ ॥ तुंगभद्रातटे पूर्वं अभूत् पत्तनमुत्तमम् । यत्र वर्णाः स्वधर्मेण सत्यसत्कर्मतत्पराः ॥ १६ ॥ आत्मदेवः पुरे तस्मिन् सर्ववेद विशारदः । श्रौतस्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्करः ॥ १७ ॥ भिक्षुको वित्तवान् लोके तत्प्रिया धुन्धुली स्मृता । स्ववाक्यस्थापिका नित्यं सुन्दरी सुकुलोद्भवा ॥ १८ ॥ लोकवार्तारता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका । शूरा च गृहकृत्येषु कृपणा कलहप्रिया ॥ १९ ॥ एवं निवसतोः प्रेम्णा दंपत्यो रममाणयोः । अर्थाः कामास्तयोरासन् न सुखाय गृहादिकम् ॥ २० ॥ पश्चात् धर्माः समारब्धाः ताभ्यां संतानहेतवे । गोभूहिरण्यवासांसि दीनेभ्यो यच्छतः सदा ॥ २१ ॥ धनार्धं धर्ममार्गेण ताभ्यां नीतं तथापि च । न पुत्रो नापि वा पुत्री ततश्चिन्तातुरो भृशम् ॥ २२ ॥
(अनुष्टुप्) संदर्भा इतिहासाची गोष्ट तुम्हास सांगतो । तिच्या श्रवणमात्रेने पाप ते सर्व नष्टते ॥ १५ ॥ पूर्वी श्री तुंगभद्रेच्या तटी अनुपमापुरी । होते तै सर्ववर्णाचे लोक सत्कर्मतत्पर ॥ १६ ॥ आत्मदेव तिथे विप्र सर्ववेद विशारद । श्रौत-स्मार्तात निष्णात जो दुजा सूर्यची गमे ॥ १७ ॥ श्रीमंत असुनी भिक्षु अशीच उपजीविका । त्याची ती धुंधुली पत्नी कुलीन सुंदरी तशी ॥ १८ ॥ लोकात जल्पणे भारी स्वभावी क्रूरताचि ती । घरी सुगरणी तैशी कृपणा कलहप्रिया ॥ १९ ॥ असे नांदतसे प्रेमे दांपत्य रमुनी पहा । घरी विपुलता सारी परी सौख्य नसे मुळी ॥ २० ॥ वाढता वय त्या दोघे पुण्यकार्याहि योजिले । अन्न गो स्वर्ण वस्त्रादी पुत्रार्थ दान ते दिले ॥ २१ ॥ अर्धे धन असे त्यांनी दानात वाटिले तरी । पुत्र वा पुत्रिचे तोंड पहाया नच की मिळे ॥ २२ ॥
आता आम्ही तुम्हांला या संबंधी एक प्राचीन इतिहास सांगतो. तो केवळ ऐकल्यानेही सर्व पापे नष्ट होतात. पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तटावर एक उत्तम शहर वसलेले होते. तेथे सर्व वर्णांचे लोक, आपापल्या धर्माचे आचरण, सत्यवर्तन आणि सत्कर्मे यांत तत्पर असत. त्या नगरात सर्व वेदांचा जाणकार आणि श्रौत-स्मार्त कर्मांत निपुण असा आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहात होता. तो जणू दुसरा सूर्यच होता. तो धनवान असून पौरोहित्य करीत असे. त्याची पत्नी धुंधुली कुलीन घराण्यातील आणि सुंदर असून नेहमी आपलेच म्हणणे खरे करणारी होती. लोकांची निंदा करण्यात तिला आनंद मिळत असे. ती स्वभावाने क्रूर होती. नेहमी काहीबाही बडबड करीत असे. गृहकृत्यात निपुण, कंजूष तसेच भांडखोरही होती. याप्रकारे ते ब्राह्मण जोडपे प्रेमाने आपल्या संसारात रमले होते. त्यांच्याजवळ धन आणि भोगविलासाची सामग्री भरपूर होती. परंतु त्या वैभवात त्यांना सुख नव्हते. अखेर त्यांनी संतानप्राप्तीसाठी गरिबांना गायी, जमीन-जुमला, धन, सुवर्ण, वस्त्रे इत्यादि दान करण्यास आरंभ केला. अशा रीतीने दान-धर्मात त्याने आपली अर्धी संपत्ती खर्च केली, तरीसुद्धा त्यांना पुत्र किंवा कन्या झाली नाही. त्यामुळे तो ब्राह्मण अतिशय चिंतातुर झाला. (१५-२२)
एकदा स तु द्विजो दुःखाद् गृहं त्यक्त्वा वनं गतः ।
मध्याह्ने तृषितो जातः तडागं समुपेयिवान् ॥ २३ ॥ पीत्वा जलं निषण्णस्तु प्रजादुःखेन कर्शितः । मुहूर्तादपि तत्रैव संन्यासी कश्चित् आगतः ॥ २४ ॥ दृष्ट्वा पीतजलं तं तु विप्रो यातस्तदन्तिकम् । नत्वा च पादयोस्तस्य निःश्वसन् संस्थितः पुरः ॥ २५ ॥
एकदा विप्र दुःखाने वनात पातला असे । दुपारी त्रासला तृष्णे तळ्याशी रिघला तदा ॥ २३ ॥ दुःखाने पीडिल्या देहा पाण्याने सुख लाभले । सुमुहूर्त पहा कैसे संन्यासी दिसला तिथे ॥ २४ ॥ ब्राह्मणे पाहिले तेव्हा संन्यासी तो पिता जळ । द्विजाने धरिले पाय दुःखे निश्वास टाकिला ॥ २५ ॥
तो दुःखी ब्राह्मण एक दिवस घरातून बाहेर पडला आणि वनात निघून गेला. माध्याह्नकाळी त्याला तहान लागल्याने तो एका तळ्याच्या काठी आला. संतान नसल्याने दुःखी असलेला तो पाणी पिऊन तेथेच बसला. थोड्याच वेळात तेथे एक संन्यासी आला. संन्यासी पाणी प्याल्याचे पाहून तो ब्राह्मण त्याच्याजवळ जाऊन त्याच्या चरणांना नमस्कार करून दीर्घ सुस्कारे टाकीत उभा राहिला. (२३-२५)
यतिरुवाच -
कथं रोदिषि विप्र त्वं का ते चिन्ता बलीयसी । वद त्वं सत्वरम् मह्यं स्वस्य दुःखस्य कारणम् ॥ २६ ॥
संन्याशाने विचारिले - सांगा ब्राह्मण देवाजी अश्रु हे लोचनी कसे । काय चिंता तुम्हा ऐसी त्वरीत मज सांगणे ॥ २६ ॥
संन्याशाने विचारले - हे ब्राह्मणा, तू का रडतोस ? कशामुळे तू अतिशय चिंताग्रस्त आहेस ? तू ताबडतोब तुझ्या दुःखाचे कारण मला सांग. (२६)
ब्राह्मण उवाच -
किं ब्रवीमि ऋषे दुःखं पूर्वपापेन संचितम् । मदीयाः पूर्वजास्तोयं कवोष्णं उपभुञ्जते ॥ २७ ॥ मद्दत्तं नैव गृह्णन्ति प्रीत्या देवा द्विजातयः । प्रजादुःखेन शून्योऽहं प्राणान् त्यक्तुं इहागतः ॥ २८ ॥ धिक् जीवितं प्रजाहीनं धिक् गृहं च प्रजां विना । धिक् धनं चानपत्यस्य धिक्कुलं संततिं विना ॥ २९ ॥ पाल्यते या मया धेनुः सा वन्ध्या सर्वथा भवेत् । यो मया रोपितो वृक्षः सोऽपि वन्ध्यत्वमाश्रयेत् ॥ ३० ॥ यत्फलं मद्गृहायातं तच्च शीघ्रं विनश्यति । निर्भाग्यस्यानपत्यस्य किमतो जीवितेन मे ॥ ३१ ॥ इत्युक्त्वा स रुरोदोच्चैः तत्पार्श्वं दुःखपीडितः । तदा तस्य यतेश्चित्ते करुणाभूत् गरीयसी ॥ ३२ ॥ तद्भालाक्षरमालां च वाचमायास योगवान् । सर्वं ज्ञात्वा यतिः पश्चात् विप्रं ऊचे सविस्तरम् ॥ ३३ ॥
ब्राह्मण(आत्मदेव) म्हणाला - पाप ते पूर्वजन्माचे दिलेले अर्घ्यपानही । पिती ती पितरे सारे उष्ण श्वासे करोनिया ॥ २७ ॥ पुत्रहीन म्हणोनीया द्विजदेव तसेचि ते । अप्रसन्न अशा चित्ते घेतात दान की पहा । म्हणोनी प्राण त्यागार्थ पातलो मी असा इथे ॥ २८ ॥ धिक् जिणे नी तसे गेह धिक् सर्व धन कूळ ते । संतान नच ज्या त्याचे सर्वच्या सर्व व्याप की ॥ २९ ॥ धेनु मी पाळिल्या ज्या ज्या निघाल्या वांझ त्या पहा । लाविली रोपटे दारी निघाले सर्व वांझ ते ॥ ३० ॥ फळे मी आणिता गेही पहा त्वरित नासती । हीन भाग्य असे माझे जगावे काय कारणी ॥ ३१ ॥ द्विज तो वदुनी ऐसे रडला स्फुंद स्फुंदुनी । तेव्हा यतिवरा चित्ती करुणा प्राप्त जाहली ॥ ३२ ॥ योगनिष्ठ यतिंद्राने भाग्यरेखाहि जाणिल्या । सारा वृत्तांत ऐकोनी विस्तारे बोलले तया ॥ ३३ ॥
ब्राह्मण म्हणाला - यतिमहाराज, मी माझ्या पूर्वजन्मीच्या साठलेल्या पापांमुळे प्राप्त झालेल्या दुःखाचे कसे वर्णन करू ? माझे पितर मी जे तर्पणासाठी पाणी देतो ते स्वतःच्या चिंतायुक्त सुस्कार्यांनी गरम होते. तेच ते पितात. देवता आणि ब्राह्मण मी दिलेल्या दानाचा प्रसन्न चित्ताने स्वीकार करीत नाहीत. संतान नसल्यामुळे मी इतका दुःखी झालो आहे की, मला सर्व सुनेसुने वाटत आहे. मी प्राणत्याग करण्यासाठी येथे आलो आहे. संतानहीन जीवनाचा धिक्कार असो. संतानहीन धनाचा, संतानहीन कुळाचा धिक्कार असो. मी ज्या गाईचे पालन करतो, तीही वांझ होते. जे झाड लावतो, त्यालाही कधी फुले-फळे येत नाहीत. मी माझ्या घरात जे फळ आणतो, ते लवकरच सडून जाते. मी असा अभागी आणि संतानहीन असल्याने माझ्या ह्या जीवनात काय अर्थ आहे ? असे म्हणून तो ब्राह्मण संन्याशाजवळ ओक्साबोक्शी रडू लागला. तेव्हा त्या संन्याशाच्या हृदयात ब्राह्मणाविषयी मोठीच करुणा उत्पन्न झाली. ते संन्यासी योगनिष्ठ होते. ब्राह्मणाची ललाटरेषा पाहून त्यांनी सर्व जाणले आणि विस्तारपूर्वक त्याला म्हणाले. (२७-३३)
यतिरुवाच -
मुञ्च अज्ञानं प्रजारूपं बलिष्ठा कर्मणो गतिः । विवेकं तु समासाद्य त्यज संसारवासनाम् ॥ ३४ ॥ श्रुणु विप्र मया तेऽद्य प्रारब्धं तु विलोकितम् । सप्तजन्मावधि तव पुत्रो नैव च नैव च ॥ ३५ ॥ संततेः सगरो दुःखं अवाप अङ्गः पुरा तथा । रे मुञ्चाद्य कुटुम्बाशां संन्यासे सर्वथा सुखम् ॥ ३६ ॥
संन्यासी म्हणाला - हे द्विजा ऐक माझे की प्रजेची आस सोड तू । विवेक ठेवुनी चित्ती सोडी संसारवासना ॥ ३४ ॥ ऐक विप्रा तुझ्या भाग्यी सात जन्मात हेच की । कोणत्याही प्रयासाने संतान नच होय ते ॥ ३५ ॥ सगरो अंग राजाला पुत्रांनी दुःखची दिले । म्हणोनी सोडणे आशा घ्यावा संन्यास युक्त हे ॥ ३६ ॥
संनासी म्हणाले - हे ब्राह्मणा, संतानप्राप्तीचा मोह सोडून दे. कर्मगती मोठी प्रबळ आहे. विवेकाचा आश्रय कर आणि संसाराची वासना सोडून दे. हे विप्रवरा, ऐक. मी तुझे प्रारब्ध जाणले आहे. यापुढील सात जन्मात तुला संतानप्राप्तीचा मुळीच योग नाही. पूर्वी राजा सगर आणि अङ्ग यांना मुलांमुळे दुःख भोगावे लागले आहे. हे ब्राह्मणा, तू आता संसाराची आशा सोड. संन्यासातच सर्व प्रकारचे सुख आहे. (३४-३६)
ब्राह्मण उवाच -
विवेकेन भवेत्किं मे पुत्रं देहि बलादपि । नो चेत् त्यजाम्यहं प्राणान् त्वदग्रे शोकमूर्छितः ॥ ३७ ॥ पुत्रादिसुखहीनोऽयं संन्यासः शुष्क एव हि । गृहस्थः सरसो लोके पुत्रपौत्रसमन्वितः ॥ ३८ ॥
ब्राह्मण म्हणाला - बोधाचा मज ना लाभ बलाने पुत्र द्या मज । अन्यथा आपुल्या साक्षी शोक मूर्च्छे मरेन मी ॥ ३७ ॥ जया ना पुत्र स्त्री यांचे मिळाले सुख ते कधी । त्याचा संन्यासही व्यर्थ गृहस्थाश्रम धन्य तो ॥ ३८ ॥
ब्राह्मण म्हणाला - विवेकाने माझे काय समाधान होणार ? आपल्या सामर्थ्याने का होईना, आपण मला पुत्र द्या. नाहीतर शोकाकुल मी आपल्यासमोरच प्राणत्याग करतो. ज्यामध्ये पुत्र, पत्नी इत्यादी सुख नाही, असा संन्यास सर्वथैव नीरस आहे. लोकाचारात पुत्र-पौत्रांनी भरलेला गृहस्थाश्रमच श्रेष्ठ आहे. (३७-३८)
इति विप्राग्रहं दृष्ट्वा प्राब्रवीत् स तपोधनः ।
चित्रकेतुर्गतः कष्टं विधिलेखविमार्जनात् ॥ ३९ ॥ न यास्यसि सुखं पुत्रात् यथा दैवहतोद्यमः । अतो हठेन युक्तोऽसि ह्यर्थिनं किं वदाम्यहम् ॥ ४० ॥
विप्रहट्ट बघोनिया तपी तो बोलला पुढे । मोडता विधिलेखाला चित्रकेतूहि कष्टला ॥ ३९ ॥ मोडिता ईशइच्छा ती तूही तै फसशील की । इच्छोनी धरिशी हट्ट तुजला काय सांगणे ॥ ४० ॥
ब्राह्मणाचा असा हट्ट पाहून तो तपोनिष्ठ संन्यासी म्हणाला, विधात्याचा लेख पुसून टाकण्याच्या हट्टानेच राजा चित्रकेतूला मोठे कष्ट झेलावे लागले. एखाद्याचे प्रयत्न दैव जसे उलथून पाडते, त्याप्रमाणे तुलासुद्धा पुत्रापासून सुख मिळणार नाही. तू मोठ्या हट्टाने माझ्याकडे याचकाप्रमाणे उभा आहेस. या परिस्थितीत मी तुला काय सांगू ? (३९-४०)
तस्याग्रहं समालोक्य फलमेकं स दत्तवान् ।
इदं भक्षय पत्न्या त्वं ततः पुत्रो भविष्यति ॥ ४१ ॥ सत्यं शौचं दया दानं एकभक्तं तु भोजनम् । वर्षावधि स्त्रिया कार्यं तेन पुत्रोऽतिनिर्मलः ॥ ४२ ॥
आग्रहो पाहता त्याला दिधले फळ एक नी । वदे पत्नीस दे खाया तेणे पुत्रचि होतसे ॥ ४१ ॥ सत्य शौच दया दान आणीक एक भुक्तची । राहता वर्ष ती पत्नी पुत्र जन्मेल शुद्ध तो ॥ ४२ ॥
ब्राह्मणाचा हट्ट पाहून त्याला एक फळ देऊन संन्यासी म्हणाले, हे फळ तू आपल्या पत्नीस खावयास दे. त्यायोगे तिला एक पुत्र होईल. तुझ्या पत्नीने एक वर्षभर सत्य, पावित्र्य, दया, दान यांचे पालन करून दिवसातून एकवेळ एक प्रकारचे अन्न खाण्याचा नियम पाळला पाहिजे. त्यायोगे पुत्र सुस्वभावी निपजेल. (४१-४२)
एवमुक्त्वा ययौ योगी विप्रस्तु गृहमागतः ।
पत्न्याः पाणौ फलं दत्त्वा स्वयं यातस्तु कुत्रचित् ॥ ४३ ॥ तरुणी कुटिला तस्य सख्यग्रे च रुरोद ह । अहो चिन्ता ममोत्पन्ना फलं चाहं न भक्ष्यये ॥ ४४ ॥ फलभक्षेण गर्भः स्याद् गर्भेण उदरवृद्धिता । स्वल्पभक्षं ततोऽशक्तिः गृहकार्यं कथं भवेत् ॥ ४५ ॥ दैवाद् धाटी व्रजेद्ग्रामे पलायेद्गर्भिणी कथम् । शुकवत् निवसेत् गर्भः तं कुक्षेः कथमुत्सृजेत् ॥ ४६ ॥ तिर्यक् चेदागतो गर्भः तदा मे मरणं भवेत् । प्रसूतौ दारुणं दुःखं सुकुमारी कथं सहे ॥ ४७ ॥ मन्दायां मयि सर्वस्वं ननान्दा संहरेत् तदा । सत्यशौचादिनियमो दुराराध्यः स दृश्यते ॥ ४८ ॥ लालने पालने दुःखं प्रसूतायाश्च वर्तते । वन्ध्या वा विधवा नारी सुखिनी चेति मे मतिः ॥ ४९ ॥
बोलोनी योगि तो गेला गेला ब्राह्मण ही घरा । फळ ते पत्निशी देता निघाला हर्षुनी पुढे ॥ ४३ ॥ पत्नि ती कुटिला ऐसी रडोनी सखिशी म्हणे । सखये बघ हे कष्ट फळ मी नच भक्षिते ॥ ४४ ॥ फळे वाढेल तो गर्भ पिणे खाणेहि वर्ज्यते । वाढेल पोट ते मोठे क्षीण देह तसाचि हो । मग ही घरची कामे कसे होतील सांग पा ॥ ४५ ॥ दैवाने जर त्या वेळी डाकू गावात पातले । पळू मी कशि त्या वेळी मजला भय वाटते । बाहेर काढणे कैसे भयाने मज ग्रासिले ॥ ४६ ॥ आडला जर तो गर्भ प्रसूत समयी तसा । प्राणाशी गाठ ती बाई कुमारी त्याहुनी बरी ॥ ४७ ॥ अशक्त पाहता नंदा नेतील धन धान्यही । सत्य शौचादि पाळावे हेही कष्टप्रदो मला ॥ ४८ ॥ जिला मूल तिला कष्ट लालनी पालनी असे । त्याहुनी विधवा वंध्या होणे हे चांगलेच की ॥ ४९ ॥
असे म्हणून ते योगिराज निघून गेले आणि ब्राह्मण आपल्या घरी आला. त्याने ते फळ आपल्या पत्नीस दिले आणि तो दुसरीकडे निघून गेला. त्याची पत्नी कपटी स्वभावाची होती. रडतरडत ती आपल्या सखीस म्हणाली, सखी, मला तर मोठी काळजी लागून राहिली आहे. मी हे फळ खाणार नाही. फळ खाल्ल्याने गर्भ राहील, त्यामुळे पोट मोठे होईल. मग मला खाता-पिता येणार नाही आणि मी अशक्त होईन. अशा स्थितीत मला घरचे कामकाज कसे करता येईल ? आणि दैववशात जर गावात चोरांची धाड पडली, तर गरोदर मी कशी पळून जाऊ शकेन ? तसेच जर शुकदेवाप्रमाणे गर्भ पोटातच अधिक काळ राहिला, तर त्याला बाहेर कसे काढता येईल ? प्रसूतीच्या वेळेस गर्भ आडवा आला तर कदाचित प्राणही गमवावे लागतील. शिवाय, प्रसूतीच्या वेदनाही भयंकर असतात. मी अशी नाजूक, हे सर्व कसे सहन करू शकेन ? मी जर अशक्त झाले, तर माझी नणंद येऊन घरातील सर्व सामान घेऊन जाईल. शिवाय, सत्य, पावित्र्य इत्यादि नियमांचे पालन करणेही अवघड आहे. जी स्त्री मुलाला जन्म देते, तिला त्याचे लालन-पालन करण्याचे अतिशय कष्ट पडतात. मला तर वाटते की वांझ किंवा विधवा स्त्रीच सुखी आहे. (४३-४९)
एवं कुतर्कयोगेन तत्फलं नैव भक्षितम् ।
पत्या पृष्टं फलं भुक्तं भुक्तं चेति तयेरितम् ॥ ५० ॥ एकदा भगिनी तस्याः तद्गृहः स्वेच्छयाऽऽगता । तदग्रे कथितं सर्वं चिन्तेयं महती हि मे ॥ ५१ ॥ दुर्बला तेन दुःखेन ह्यनुजे करवाणि किम् । साब्रवीत् मम गर्भोस्ति तं दास्यामि प्रसूतितः ॥ ५२ ॥ तावत्कालं सगर्भेव गुप्ता तिष्ठ गृहे सुखम् । वित्तं त्वं मत्पतेर्यच्छ स ते दास्यति बालकम् ॥ ५३ ॥ षण्मासिको मृतो बाल इति लोको वदिष्यति । तं बालं पोषयिष्यामि नित्यमागत्य ते गृहे ॥ ५४ ॥ फलमर्पय धेन्वै त्वं परीक्षार्थं तु साम्प्रतम् । तत् तद् आचरितं सर्वं तथैव स्त्रीस्वभावतः ॥ ५५ ॥
मनी कुतर्क मांडोनी तिने फळ न भक्षिले । पुसता पतिदेवाने भक्षिले वदिली पहा ॥ ५० ॥ बहीण एकदा आली धुंधुलीची तिच्या कडे । धुंधुली वदली वृत्त चिंता सर्वही बोलली ॥ ५१ ॥ चिंतेने रोड मी झाले प्रिये सांग कशी करु । बहीण वदली तेव्हा माझ्या गर्भात पुत्र तो ॥ ५२ ॥ गर्भारपणाचे सोंग करोनी बैस तू घरी । मजला धन दे कांही देईन पुत्र तो तुला ॥ ५३ ॥ मेले षण्मासि ते बाळ लोकांना मी म्हणेल नी । इथे येईन मी नित्य पाजीन दूध त्याजला ॥ ५४ ॥ गाईला फळ हे द्यावे खरे खोटे हि देख तू । स्वभावे ब्राह्मणीने ते केले सर्व तसेचि की ॥ ५५ ॥
मनात असे अनेक कुतर्क आल्याने तिने ते फळ खाल्ले नाही. पतीने जेव्हा विचारले, ’फळ खाल्ले का ?’ तेव्हा तिने उत्तर दिले ,’होय, खाल्ले.’ एक दिवस तिची बहीण सहज तिच्याकडे आली असता तिने बहिणीला सर्व वृत्तांत सांगून म्हटले, "माझ्या मनात याविषयी मोठीच काळजी लागून राहिली आहे. याच चिंतेने मी दिवसेंदिवस अशक्त होत चालले आहे. हे भगिनी, मी काय करू ?" बहीण म्हणाली, "मी गर्भवती आहे. प्रसूत झाल्यानंतर ते मूल तुला देईन. तोपर्यंत तू गर्भवतीचे सोंग करून गुप्तपणे घरात सुखाने राहा. तू माझ्या पतीला काही धन दिलेस, तर तो तुला माझे मूल देईल. आपण अशी युक्ती करू की, सर्व लोक म्हणतील की, हिचे बालक सहा महिन्यांचे होऊन मरून गेले. मी दररोज तुझ्या घरी येऊन त्या बालकाचे लालन-पालन करीन. तू आता या फळाची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून ते गाईला खाऊ घाल." ब्राह्मणाने स्त्रीस्वभावानुसार बहिणीने सांगितले तसे तसे केले. (५०-५५)
अथ कालेन सा नारी प्रसूता बालकं तदा ।
आनीय जनको बालं रहस्ये धुन्धुलीं ददौ ॥ ५६ ॥ तया च कथितं भर्त्रे प्रसूतः सुखमर्भकः । लोकस्य सुखमुत्पन्नं आत्मदेव प्रजोदयात् ॥ ५७ ॥ ददौ दानं द्विजातिभ्यो जातकर्म विधाय च । गीतवादित्रघोषोऽभूत् तद्द्वारं मंगलं बहु ॥ ५८ ॥ भर्तुरग्रेऽब्रवीत् वाक्यं स्तन्यं नास्ति कुचे मम । अन्यस्तन्येन निर्दुग्धा कथं पुष्णामि बालकम् ॥ ५९ ॥ मत्स्वसुश्च प्रसूताया मृतो बालस्तु वर्तते । तामाकार्य गृहे रक्ष सा तेऽर्भं पोषयिष्यति ॥ ६० ॥ पतिना तत्कृतं सर्वं पुत्ररक्षणहेतवे । पुत्रस्य धुन्धुकारीति नाम मात्रा प्रतिष्ठितन् ॥ ६१ ॥
पुन्हा कालांतरे झाला पुत्र त्या भगिनीस जो । तिने गुप्तरितीने तो दिधला धुंधुलीसही ॥ ५६ ॥ धुंधुली आत्मदेवाला म्हणाली सुखरुप मी । झाले प्रसूत हे बाळ आनंदे पुत्र हा पहा ॥ ५७ ॥ संस्कारी जातकादींच्या ब्राह्मणे वाटिले धन । आनंदोत्सव मानोनी वाद्य मंगल लाविले ॥ ५८ ॥ पतीसी धुंधुली बोले दूध माझ्या स्तनी नसे । दुधाने वरच्या कैसे वाढेल बाळ आपुले ॥ ५९ ॥ प्रसुती भगिनी माझी परी बालक वारले । तिला बोलाविता येथे करील प्रतिपोषण ॥ ६० ॥ पतीने सर्व ते केले पुत्राच्या रक्षणार्थ जे । माता धुंधुलीने नाम धुंधुकारीच ठेविले ॥ ६१ ॥
यानंतर योग्य वेळी त्या स्त्रीला पुत्र झाल्यावर त्याच्या वडिलांनी गुपचूप तो मुलगा धुंधुलीला आणून दिला. आणि तिने पतीला सांगितले की, मला सुखरूपपणे पुत्र झाला. अशा प्रकारे आत्मदेवाला पुत्र झाल्याचे ऐकून सर्वांना आनंद झाला. ब्राह्मणाने त्या मुलाला जातकर्म संस्कार करून ब्राह्मणांना दाने दिली आणि त्याच्या घरासमोर मंगल वाद्ये वाजू लागली. तसेच मंगल कृत्ये होऊ लागली. धुंधुली आपल्या पतीला म्हणाली, "माझ्या स्तनातून दूध येत नाही. तर गाय वगैरे प्राण्यांच्या दुधाने या बालकाचे पालन-पोषण मी कसे करू ? माझ्या बहिणीला नुकतेच बाळ झाले होते, ते गेले. तिला बोलावून आपल्या घरी ठेवून घ्या. म्हणजे ती तुमच्या बाळाचे पालन-पोषण करील." तेव्हा पुत्राचे रक्षण होण्यासाठी आत्मदेवाने तसेच केले. माता धुंधुलीने त्या बालकाचे नाव धुंधुकारी असे ठेवले. (५६-६१)
त्रिमासे निर्गते चाथ सा धेनुः सुषुवेऽर्भकम् ।
सर्वांगसुन्दरं दिव्यं निर्मलं कनकप्रभम् ॥ ६२ ॥ दृष्ट्वा प्रसन्नो विप्रस्तु संस्कारान् स्वयमादधे । मत्वाऽऽश्चर्यं जनाः सर्वे दिदृक्षार्थं समागताः ॥ ६३ ॥ भाग्योदयोऽधुना जात आत्मदेवस्य पश्यत । धेन्वा बालः प्रसूतस्तु देवरूपीति कौतुकम् ॥ ६४ ॥ न ज्ञातं तद्रहस्यं तु केनापि विधियोगतः । गोकर्णं तं सुतं दृष्ट्वा गोकर्णं नाम चाकरोत् ॥ ६५ ॥
त्रिमास लोटले तेव्हा गाईस मूल जाहले । सर्वांगी दिसण्या दिव्य निर्मळो कनकप्रभ ॥ ६२ ॥ आत्मदेवे तयाचेही केले जातक हर्षुनी । आश्चर्य वाटले लोका पाहण्या कैक पातले ॥ ६३ ॥ म्हणाले आत्मदेवाचे पहा हे भाग्य केवढे । गाईच्या उदरातून अहो बालक जन्मले ॥ ६४ ॥ रहस्य दैवयोगाने गुप्तची राहिले असे । गाईसम तया कर्ण गोकर्ण नाम जाहले ॥ ६५ ॥
त्यानंतर तीन महिने झाल्यावर त्या गायीलाही (मनुष्याकृती) मुलगा झाला. तो सर्वांगसुंदर, दिव्य, निर्मळ तसेच त्याची कांती सोन्यासारखी होती. त्याला पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला आणि त्याने स्वतः त्याचे सर्व संस्कार केले. हे वृत्त ऐकून इतर लोकांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते त्या बालकाला पाहण्यासाठी आले. ते म्हणू लागले, "पहा, पहा ! आत्मदेवाचे भाग्य कसे उदयाला आले ! हे केवढे आश्चर्य आहे की गाईलासुद्धा देवासारखा मुलगा झाला." दैवयोगाने हे रहस्य कोणालाही समजले नाही. त्या बलकाने त्याचे नाव ’गोकर्ण’ ठेवले. (६२-६५)
कियत्कालेन तौ जातौ तरुणौ तनयावुभौ ।
गोकर्णः पण्डितो ज्ञानी धुन्धुकारी महाखलः ॥ ६६ ॥ स्नानशौचक्रियाहीनो दुर्भक्षी क्रोधवर्जितः । दुष्परिग्रहकर्ता च शवहस्तेन भोजनम् ॥ ६७ ॥ चौरः सर्वजनद्वेषी परवेश्मप्रदीपकः । लालनायार्भकान् धृत्वा सद्यः कूपे न्यपातयत् ॥ ६८ ॥ हिंसकः शस्त्रधारी च दीनान्धानां प्रपीडकः । चाण्डालाभिरतो नित्यं पाशहस्तः श्वसंगतः ॥ ६९ ॥ तेन वेश्याकुसंगेन पित्र्यं वित्तं तु नाशितम् । एकदा पितरौ ताड्य पात्राणि स्वयमाहरत् ॥ ७० ॥
लोटला काळ तो कांही तारुण्यी पुत्र पातले । ज्ञानी पंडित गोकर्ण दुसरा दुष्ट जाहला ॥ ६६ ॥ क्रोधिष्ठ धुंधुकारी तो स्नान शौचादि नाचरे । लुटी अन्यांचिये द्रव्य सूतकी भोजनप्रिय ॥ ६७ ॥ करणे द्वेष चौर्यादी दुजांची जाळि ती घरे । कोणाची उचली बाळे आडात फेकिही कधी ॥ ६८ ॥ हिंसको शस्त्रधारी तो दीन अंधासिही पिडी । रमे चांडाळ लोकात श्वानपाश सदा करी ॥ ६९ ॥ फसला फंदि वेश्याच्या वडिलार्जित संपले । माता पित्यासि ठोकोनी भांडीही विकिली तये ॥ ७० ॥
काही काळानंतर त्या दोन्ही बालकांनी तारुण्यात पदार्पण केले. त्यातील गोकर्ण मोठा पंडित आणि ज्ञानी झाला, परंतु धुंधुकारी मोठा दुष्ट झाला. स्नान, वगैरे तो करीतच नव्हता, अभक्ष्यही भक्षण करीत होता. क्रोधाच्या आहारी गेला होता. वाईट वस्तूंचा तो संग्रह करीत असे. प्रेताच्या हाताने स्पर्श केलेले अन्नही तो खात असे. चोरी करणे, सर्वांचा द्वेष करणे, दुसर्यांच्या घरांना आगी लावणे हा त्याचा स्वभाव होता. लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून कडेवर घेई आणि त्यांना विहिरीत टाकून देत असे. हत्या करणे, हातात शस्त्र घेऊन आंधळे, दीन-दुःखी यांना त्रास देणे हे त्याचे काम असे. चांडाळांविषयी त्याला विशेष प्रेम होते. हातात फास घेऊन, कुत्र्यांना बरोबर घेऊन तो शिकार करण्यासाठी भटकत असे. वेश्यांच्या जाळ्यात अडकून त्याने आपल्या वडिलांची सर्व संपत्ती उधळून टाकली. एक दिवस माता-पित्यांना बडवून घरातील सर्व भांडीकुंडी तो घेऊन गेला. (६६-७०)
तत्पिता कृपणः प्रोच्चैः धनहीनो रुरोद ह ।
वध्यतवं तु समीचीनं कुपुत्रो दुःखदायकः ॥ ७१ ॥ क्व तिष्ठामि क्व गच्छामि को मे दुःखं व्यपोहयेत् । प्राणान् त्यजामि दुःखेन हा कष्टं मम संस्थितम् ॥ ७२ ॥ तदानीं तु समागत्य गोकर्णो ज्ञानसंयुतः । बोधयामास जनकं वैराग्यं परिदर्शयन् ॥ ७३ ॥ असारः खलु संसारो दुःखरूपी विमोहकः । सुतः कस्य धनं कस्य स्नेहवान् ज्वलतेऽनिशम् ॥ ७४ ॥ ते च इंद्रस्य सुखं किंचित् न सुखं चक्रवर्तिनः । सुखमस्ति विरक्तस्य मुनेः एकान्तजीविनः ॥ ७५ ॥ मुञ्च अज्ञानं प्रजारूपं मोहतो नरके गतिः । निपतिष्यति देहोऽयं सर्वं त्यक्त्वा वनं व्रज ॥ ७६ ॥
संपता सर्व संपत्ती चिक्कू बापहि स्फुंदला । वांझ माता सुखी होय कुपुत्र दुःखदायक ॥ ७१ ॥ करु काय कुठे जाऊ दुःख कोण निवारिल । मरेन दुःख होवोनी वदला द्विज तेधवा ॥ ७२ ॥ ज्ञानी गोकर्ण तेव्हा त्या पित्याशी नम्र बोलला । वैराग्य कथिले सर्व खूप तो समजाविला ॥ ७३ ॥ असार सर्व संसार दुःखी मोहेचि ओढितो । कोणाचे धन हे पुत्र लोभी दीपापरी जळे ॥ ७४ ॥ न सुखी नृप नी इंद्र वैराग्यी सुख लाभते । एकांती जीव जो राही त्यालाच सुख ते मिळे ॥ ७५ ॥ पुत्रांचा लोभ तो सोडा सोडा नरकमोह हा । होईल देह हा नष्ट सुखाने वन सेविणे ॥ ७६ ॥
अशा प्रकारे सर्व संपत्ती नष्ट झालेली पाहून तो बिचारा बाप ओक्शाबोक्शी रडत म्हणाला - "वांझपणा परवडला, पण कुपुत्र हा अत्यंत दुःख देणारा ठरतो. आता मी कोठे राहू ? कोठे जाऊ ? माझे हे दुःख कोण नाहीसे करील ? माझ्यावर तर मोठे संकट आले आहे. या दुःखामुळेच मी आता जीव देतो." त्याचवेळी ज्ञानी गोकर्ण तिथे आला आणि त्याने पित्याला वैराग्याचा उपदेश करीत समजावण्याचा प्रयत्न केला. गोकर्ण म्हणाला, हा संसार असार आहे. हा अत्यंत दुःखरूप आणि मोहात पाडणारा आहे. कोणाचा पुत्र ? कोणाचे धन ? आसक्ती असलेला मनुष्य रात्रंदिवस दुःखाने जळत राहतो. इंद्र आणि चक्रवर्ती राजा यांनाही काही सुख मिळत नाही. केवळ विरक्त, एकांतात जीवन कंठणारे मुनीच सुखी असतात. ’हा माझा पुत्र आहे’ या अज्ञानाचा त्याग करा. मोहामुळे नरकप्राप्ती होते. हे शरीर तर नाहीसे होणारच आहे. म्हणून सर्वसंगत्याग करून वनामध्ये निघून जा. (७१-७६)
तद्वाक्यं तु समाकर्ण्य गन्तुकामः पिताब्रवीत् ।
किंकर्तव्यं वने तात तत्त्वं वद सविस्तरम् ॥ ७७ ॥ अन्धकूपे स्नेहपाशे बद्धः पंगुरहं शठः । कर्मणा पतितो नूनं मामुद्धर दयानिधे ॥ ७८ ॥
ऐकोनी पुत्रवाणी ती आत्मदेवे विचारिले । निघतो परि मी काय करावे तेथे सांग ते ॥ ७७ ॥ मोठा मी मूर्ख लोभी नी कर्म स्नेहेचि बांधिलो । घरकूपात मी बद्ध कृपेने तारि तू मला ॥ ७८ ॥
गोकर्णाचे म्हणणे ऐकून आत्मदेव वनात जाण्यासाठी तयार झाला; आणि त्याला म्हणू लागला - पुत्रा, वनात राहून मी काय करावे, ते मला तू सविस्तर सांग मी खरोखर मूर्ख आहे, पूर्वकर्माने मोहपाशात बांधला जाऊन मी पांगळ्याप्रमाणे या घररूपी अंधार्या विहिरीत पडून राहिलो आहे. हे दयाळू, यातून माझा उद्धार कर. (७७-७८)
(वसंततिलका)
देहेऽस्थिमांसरुधिरेऽभिमतिं त्यज त्वं जायासुतादिषु सदा ममतां विमुञ्च । पश्यानिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठं वैराग्यरागरसिको भव भक्तिनिष्ठः ॥ ७९ ॥ धर्म भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधुपुरुषान् जहि कामतृष्णाम् । अन्यस्य दोषगुणचिन्तनमाशु मुक्त्वा सेवाकथारसमहो नितरां पिब त्वम् ॥ ८० ॥
गोकर्णजी म्हणाले - (वसंततिलका) देहात मास भरले अन रक्त हाडे दारा तनू नि तनयो ययिं मोह टाळा । क्रोधास त्याग करणे जग नाशिवंत वैराग्य ध्यास धरणे स्मरणे हरीला ॥ ७९ ॥ घ्यावा तुम्ही भजनधर्मचि थोर ऐसा साधूसि नित्य पुजिणे त्यजिणे भवाला । पापास स्पर्श नच हो गुण-दोष टाळा प्यावा कथारस सदा करणे त्वरा ती ॥ ८० ॥
गोकर्ण म्हणाला - हे शरीर, हाडे, मांस आणि रक्ताचे कोठार आहे. शरीर म्हणजे ’मी’ असे म्हणणे सोडून द्या आणि स्त्री-पुत्रांना सुद्धा ’आपले’ मानू नका. हा संसार क्षणभंगुर आहे असे नेहमी मानून केवळ वैराग्यरसात आनंद मानून भगवंतांची भक्ती करा. नेहमी धर्माचा आश्रय करून राहा. सर्व लौकिक व्यवहाराचा त्याग करा, साधु-संतांची सेवा करा, भोगलालसेला जवळही येऊ देऊ नका, दुसर्यांच्या गुण-दोषांचा विचार करणे तत्काळ सोडून द्या आणि भगवत्सेवा व भगवंतांच्या कथांचा नित्य आनंद लुटा. (७९-८०)
एवं सुतोक्तिवशतोऽपि गृहं विहाय
यातो वनं स्थिरमतिर्गतषष्टिवर्षः । युक्तो हरेरनुदिनं परिचर्ययासौ श्रीकृष्णमाप नियतं दशमस्य पाठात् ॥ ८१ ॥ इति श्रीपद्मपुराणे उत्तरखण्डे श्रीमद्भागवतमाहात्म्ये विप्रमोक्षो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ऐकोनि पुत्रवचना मग आत्मदेव गेले वनात करुनी दृढनिश्चयाते । नी लागले निशि दिनी हरिच्या पुजेत वाचोनि स्कंध दशमो हरि प्राप्त केला ॥ ८१ ॥ ॥ इति श्री पद्मपुराणी उत्तरखंडी श्रीमद्भागवत कथा माहात्म्य ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ चौथा अध्याय हा ॥ मा ॥ ४ ॥ हरिःॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
याप्रमाणे पुत्राच्या उपदेशाने आत्मदेवाने घर सोडले आणि तो वनात निघून गेला. त्याचे साठ वर्षांचे वय झाले होते, तरी बुद्धी स्थिर होती. रात्रंदिवस भगवंतांची पूजा-अर्चा आणि नियमितपणे भागवताच्या दशम स्कंधांचे वाचन करून त्याने भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून घेतली. (८१)
अध्याय चवथा समाप्त |