श्रीमद् भागवत पुराण
श्रीमद्‌भागवतमाहात्म्यम्
तृतीयोऽध्यायः

सनकादिमुखात् श्रीमद्‌भागवतश्रवणेन भक्त्तेस्तुष्टीर्ज्ञानवैराग्ययोः पुष्टिश्च -

भक्तीच्या कष्टांची निवृत्ती -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


नारद उवाच -
(अनुष्टुप्)
ज्ञानयज्ञं करिष्यामि शुकशास्त्रकथोज्ज्वलम् ।
भक्तिर्ज्ञानविरागाणां स्थापनार्थं प्रयत्‍नतः ॥ १ ॥
कुत्र कार्यो मया यज्ञः स्थलं तद्‌वाच्यतामिह ।
महिमा शुकशास्त्रस्य वक्तव्यो वेदपारगैः ॥ २ ॥
कियद्‌भिः दिवसैः श्राव्या श्रीमद्‌भागवती कथा ।
को विधिः तत्र कर्तव्यो ममेदं ब्रुवतामितः ॥ ३ ॥
नारदजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
शुके जे कथिले शास्त्र तयाचा यज्ञ मांडितो ।
वैराग्य भक्ति ज्ञानाला स्थापीन यत्‍नपूर्वक ॥ १ ॥
सांगा मला कुठे मांडू कथेचा ज्ञानयज्ञ तो ।
तुम्ही वेदज्ञ हो संत कथा माहात्म्य सांगणे ॥ २ ॥
किती दिन करावी श्रीमद्‌भागवत्‌ कथा।
मजला सगळे सांगा श्रीमद्‌भागवतो विधी ॥ ३ ॥

नारद म्हणाले - भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी श्रीशुकदेवांनी सांगितलेल्या भागवतशास्त्राच्या कथांद्वारा मी उज्ज्वल ज्ञानयज्ञ करीन. हा यज्ञ कोठे केला पाहिजे, ते ठिकाण आपण मला सांगा. आपण वेद जाणणारे आहात, तेव्हा शुकांनी सांगितलेल्या शास्त्राचा महिमा आपण मला सांगा. श्रीमद्‌भागवताची कथा किती दिवसात सांगितली पाहिजे व ती कथन करण्याचा विधीही आपण मला सांगा ॥ १-३ ॥


कुमारा ऊचुः -
श्रृणु नारद वक्ष्यामो विनम्राय विवेकिने ।
गंगाद्वारसमीपे तु तटं आनन्दनामकम् ॥ ४ ॥
नानाऋषिगणैर्जुष्टं देवसिद्धनिषेवनम् ।
नानातरुलताकीर्णं नवकोमलवालुकम् ॥ ५ ॥
रम्यं एकान्तदेशस्थं हेमपद्मसुसौरभम् ।
यत्समीपस्थजीवानां वैरं चेतसि न स्थितम् ॥ ६ ॥
सनकादिक संत म्हणाले -
नम्र हो नारदा तुम्ही विवेकीही तसेच की ।
ऐका आनंद नावाचा हरिद्वारासि घाट तो ॥ ४ ॥
त्या तिथे ऋषि ते कैक देवता सिद्ध राहती ।
वृक्षवेली सदानंदी मऊ वाळू तिथे पहा ॥ ५ ॥
रम्य एकांत ते स्थान गंधे कमल शोभले ।
जिथे हिंस्त्र पशूही ते वैर सांडोनि राहती ॥ ६ ॥

सनकादिक म्हणाले - नारदमुनी, आपण मोठे विनम्र आणि विवेकी आहात. आम्ही आपणांस सविस्तर सांगतो, ऐका. हरिद्वाराजवळ आनंद नावाचा एक घाट आहे. तेथे अनेक ऋषी वास्तव्य करून आहेत. तसेच देवता आणि सिद्धपुरुषही त्या स्थानाचा लाभ घेतात. नाना प्रकारचे वृक्ष आणि वेली यांनी व्याप्त असे हे ठिकाण असून तिथे कोमल रसरशीत वाळू पसरलेली आहे. हा घाट एकांतात असून रमणीय आहे. तेथे नेहमी सोनेरी कमळांचा सुगंध दरवळत असतो. त्याच्याजवळ राहणारे परस्पर वैरभाव असणारे प्राणीही एकमेकांशी वैर करीत नाहीत. (४-६)


ज्ञानयज्ञस्त्वया तत्र कर्तव्यो हि अप्रयत्‍नतः ।
अपूर्वरसरूपा च कथा तत्र भविष्यति ॥ ७ ॥
पुरःस्थं निर्बलं चैव जराजीर्णकलेवरम् ।
तद्‌द्वयं च पुरस्कृत्य भक्तिस्तत्रागमिष्यति ॥ ८ ॥
यत्र भागवती वार्ता तत्र भक्त्यादिकं व्रजेत् ।
कथाशब्दं समाकर्ण्य तत्त्रिकं तरुणायते ॥ ९ ॥
निर्धास्त राहुनी तेथे आरंभा ज्ञानयज्ञ तो ।
कथेला त्याच जागेत भरेल रस गोडवा ॥ ७ ॥
जराजर्जर पुत्रांच्या सह ती भक्ति त्या स्थळी ।
आपोआपचि येईल पहा नेत्रे समोरची ॥ ८ ॥
जिथे भागवती वार्ता तिथे येईल भक्ति नी ।
तारुण्य प्राप्त होईल त्या तिघा ऐकता कथा ॥ ९ ॥

आपण त्या ठिकाणी ज्ञानयज्ञ करावा. तेथे विशेष काही प्रयत्‍न न करताही कथेमध्ये अपूर्व रस उदित होईल. आपल्या दृष्टीसमोरच दुर्बल आणि वृद्धावस्थेत पडलेल्या ज्ञान आणि वैराग्याला आपल्या बरोबर घेऊन भक्ति कथास्थानी येईल. जेथे श्रीमद्‌भागवतकथा चालू असते तेथे भक्ति इत्यादी स्वतः जातील. तेथे कथेचे शब्द कानी पडताच ह्या तिघांना तारुण्य प्राप्त होईल. (७-९)


सूत उवाच -
एवमुक्त्वा कुमारास्ते नारदेन समं ततः ।
गंगातटं समाजग्मुः कथापानाय सत्वराः ॥ १० ॥
यदा यातास्तटं ते तु तदा कोलाहलोऽप्यभूत् ।
भूर्लोके देवलोके च ब्रह्मलोके तथैव च ॥ ११ ॥
श्रीभागवतपीयूष पानाय रसलम्पटाः ।
धावन्तोऽप्याययुः सर्वे प्रथमं ये च वैष्णवाः ॥ १२ ॥
सूतजी म्हणाले -
नारदे मानिले तैसे कुमारांसह तेधवा ।
कथामृत पिण्या आले गंगेच्या तटि सत्वर ॥ १० ॥
तिथे येताचि हे सर्व भूदेव ब्रह्म संत ते ।
सगळे धावले तेथे मिळवाया कथारस ॥ ११ ॥
आले प्रथम जे कोणी विष्णुचे नित्य सेवक ।
सर्वांच्या पुढती त्यांनी राखिले स्थान आपुले ॥ १२ ॥

सूत म्हणाले - असे म्हणून सनकादिकही नारदांबरोबर श्रीमद्‌भागवतकथामृत ऐकण्यासाठी तेथून ताबडतोब गंगातटाकी आले. ज्यावेळी हे सर्वजण गंगातटाकी पोहोचले, त्याचवेळी भूलोक, देवलोक आणि ब्रह्मलोक अशा सगळीकडे तेथे जाण्यासाठी धांदल उडाली. भागवतकथामृतपानासाठी जे रसिक विष्णुभक्त होते, ते सर्व धावत धावत आधी आले. (१०-१२)


(वंशस्थ)
भृगुर्वसिष्ठश्च्यवनश्च गौतमो
     मेधातिथिर्देवलदेवरातौ ।
रामस्तथा गाधिसुतश्च शाकलो
     मृकण्डुपुत्रात्रिजपिप्पलादाः ॥ १३ ॥
(इंद्रवज्रा)
योगेश्वरौ व्यासपराशरौ च
     छायाशुको जाजलिजह्नुमुख्याः ।
सर्वेऽप्यमी मुनिगणाः सहपुत्रशिष्याः
     स्वस्त्रीभिराययुरतिप्रणयेन युक्ताः ॥ १४ ॥
(इंद्रवज्रा)
भृगू वसिष्ठो च्यवनो नि व्यास
    मेधातिथी देवल देवरात ।
ते गौतमो राम नि विश्वमित्र
    मृकुंडपुत्रो अन शाकलो ते ॥ १३ ॥
दत्तात्रयो जाजलि पिप्पलादी
    जन्हू शुको हे मुनि पातले तै ।
स्त्रिया तसे शिष्यहि घेउनीया
    सप्रेम आले कथि बैसण्याला ॥ १४ ॥

भृगु, वसिष्ठ, च्यवन, गौतम, मेधातिथी, देवल, देवरात, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडेय, दत्तात्रेय, पिप्पलाद, योगेश्वर व्यास आणि पराशर, छायाशुक, जाजलि आणि जह्नू असे अनेक प्रमुख मुनिगण आपापले पुत्र, शिष्य आणि पत्‍नींसमवेत, प्रेमभराने तेथे आले. (१३-१४)


(अनुष्टुप्)
वेदान्तानि च वेदाश्च मन्त्रास्तन्त्राः समूर्तयः ।
दशसप्तपुराणानि षट्शास्त्राणि तथाऽऽययुः ॥ १५ ॥
(अनुष्टुप्‌)
तसेचि पातले तंत्र वेद वेदांत मंत्र ते ।
पुराणे सतरा शास्त्रे आले प्रत्यक्ष ते सहा ॥ १५ ॥

यांच्याखेरीज वेद, उपनिषदे, मंत्र, तंत्र, सतरा पुराणे आणि सहा शास्त्रे तेथे मूर्तरूप धारण करून आली. (१५)


गंगाद्या सरितस्तत्र पुष्करादिसरांसि च ।
क्षेत्राणि च दिशः सर्वा दण्डकादि वनानि च ॥ १६ ॥
नगादयो ययुस्तत्र देवगन्धर्वदानवाः ।
गुरुत्वात्तत्र नायातान् भृगुः सम्बोध्य चानयत् ॥ १७ ॥
गंगादी सरिता सार्‍या पुष्करादी सरोवरे ।
दंडकादी वने सारी तशाच दश त्या दिशा ॥ १६ ॥
हिमालयादि गिरि ते देव गंधर्व दानव ।
पातले ऐकण्या वार्ता भृगुने अन्य आणिले ॥ १७ ॥

गंगा आदी नद्या, पुष्कर आदी सरोवरे, सर्व तीर्थक्षेत्रे, सर्व दिशा, दंडकारण्य आदी अरण्ये, हिमालय आदी पर्वत, तसेच देव, गंधर्व, दानव असे सर्वजण कथा ऐकण्यासाठी आले. स्वतःस श्रेष्ठ समजणारे जे आपणहून आले नाहीत, त्यांची महर्षी भृगूंनी समजून घालून त्यांना आणले. (१६-१७)


दीक्षिता नारदेनाथ दत्तं आसनमुत्तमम् ।
कुमारा वन्दिताः सर्वैः निषेदुः कृष्णतत्पराः ॥ १८ ॥
नारदे त्या प्रवक्त्यांना दिधले उच्च आसन ।
कुमारा स्थापिले तेथे श्रोत्यांनी वदिले तया ॥ १८ ॥

त्यावेळी श्रीकृष्णभक्त सनकादी, नारदांनी दिलेल्या उच्च आसनावर कथाकार म्हणून कथा ऐकविण्यासाठी बसले. त्यावेळी सर्व श्रोत्यांनी त्यांना नमस्कार केला. (१८)


वैष्णवाश्च विरक्ताश्च न्यासिनो ब्रह्मचारिणः ।
मुखभागे स्थितास्ते च तदग्रे नारदः स्थितः ॥ १९ ॥
एकभागे ऋषिगणाः तद् अन्यत्र दिवौकसः ।
वेदोपनिषदो अन्यत्र तीर्थान् यत्र स्त्रियोऽन्यतः ॥ २० ॥
श्रोतीं विरक्त संन्यासी बैसले वैष्णवी गण ।
सुमुखे त्यात सर्वांच्या पुढे नारद बैसले ॥ १९ ॥
एकभागी ऋषी आणि एक भागात देवता ।
वेदोपनिषदे तीर्थे स्त्रिया अन्यत्र बैसल्या ॥ २० ॥

श्रोत्यांमध्ये वैष्णव, विरक्त, संन्यासी आणि ब्रह्मचारी पुढे येऊन बसले तर नारदमुनी त्या सर्वांच्या पुढे बसले. एका बाजूला ऋषिगण, एकीकडे देवता, एकीकडे वेद-उपनिषदे, एकीकडे तीर्थक्षेत्रे बसली; तर दुसर्‍या बाजूला स्त्रिया बसल्या. (१९-२०)


जयशब्दो नमःशब्दोः शंखशब्दस्तथैव च ।
चूर्णलाजा प्रसूनानां निक्षेपः सुमहान् अभूत् ॥ २१ ॥
विमानानि समारुह्य कियन्तो देवनायकाः ।
कल्पवृक्ष प्रसूनैस्तान् सर्वान् तत्र समाकिरन् ॥ २२ ॥
नमस्कार करोनिया जयघोष निनादला ।
शंखांचे शब्द ते झाले गुलाल पुष्प वर्षले ॥ २१ ॥
विमानी चढल्या तेंव्हा त्या श्रेष्ठ कांहि देवता ।
कल्पतरूफुलांचा तो केला वर्षाव अद्‌भुत ॥ २२ ॥

त्यावेळी सगळीकडे जयजयकार, नमस्कार आणि शंखांचे आवाज होऊ लागले. तसेच बुक्का, गुलाल, फुले इत्यादींची उधळण होऊ लागली. काही काही प्रमुख देव तर विमानांत बसून, सभेत बसलेल्या सर्व लोकांवर कल्पवृक्षांच्या फुलांची उधळण करू लागले. (२१-२२)


सूत उवाच -
एवं तेष्वकचित्तेषु श्रीमद्‌भागवस्य च ।
माहात्म्यं ऊचिरे स्पष्टं नारदाय महात्मने ॥ २३ ॥
सूतजी म्हणाले -
अशी होताच पूजा ती सनकादिक संत तै ।
श्रीमद्‌भागवताचे हे माहात्म्य कथु लागले ॥ २३ ॥

सूत म्हणाले - अशा प्रकारे जेव्हा सर्वजण एकाग्रचित्त झाले, तेव्हा सनकादिक ऋषी, मुनिवर नारदांना श्रीमद्‌भागवताचे माहात्म्य स्पष्ट करून सांगू लागले. (२३)


कुमारा ऊचुः -
अथ ते वर्ण्यतेऽस्माभिः महिमा शुकशास्त्रजः ।
यस्य श्रवणमात्रेण मुक्तिः करतले स्थिता ॥ २४ ॥
सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद्‌भागवती कथा ।
यस्याः श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत् ॥ २५ ॥
कुमार म्हणाले -
महिमा सांगतो आता आम्ही भागवताचि ती ।
जिच्या श्रवणमात्रेने मुक्ति हातास लाभते ॥ २४ ॥
नित्य नित्यचि सेवावी अशी भागवती कथा ।
हिच्या श्रवण योगाने हृदयी श्रीहरी वसे ॥ २५ ॥

सनकादिक म्हणाले - आता आम्ही आपल्याला या शुकशास्त्राचा (भागवतशास्त्राचा) महिमा सांगतो. याच्या केवळ श्रवणाने मुक्ती हाती लागते. श्रीमद्‌भागवताच्या कथेचे नित्य सेवन करावे. या कथेच्या श्रवणाने श्रीहरी हृदयात विराजमान होतात. (२४-२५)


ग्रन्थोऽष्टादशसाहस्त्रो द्वादशस्कन्धसम्मितः ।
परीक्षित् शुकसंवादः श्रृणु भागवतं च तत् ॥ २६ ॥
आठ्‌रा हजार श्लोकात बारा स्कंधी विराजली ।
राजा परीक्षितालाही बोधिली शुकदेवि जी ॥ २६ ॥

या ग्रंथाचे अठरा हजार श्लोक आणि बारा स्कंध आहेत. यात श्रीशुकदेव आणि राजा परीक्षित यांचा संवाद आहे. आपण हे भागवतशास्त्र लक्षपूर्वक ऐका. (२६)


तात संसारचक्रेऽस्मिन् भ्रमतेऽज्ञानतः पुमान् ।
यावत् कर्णगता नास्ति शुकशास्त्रकथा क्षणम् ॥ २७ ॥
ऐका सावध चित्ताने जीव अज्ञान हा वश ।
नित्य हिंडे परी थांबे ऐकता श्रेष्ठ ही कथा ॥ २७ ॥

जोपर्यंत एक क्षणभर का होईना, या शुकशास्त्राची कथा कानी पडत नाही, तोपर्यंत हा अज्ञानी जीव संसारचक्रात भटकत राहतो. (२७)


किं श्रुतैबहुभिः शास्त्रैः पुराणैश्च भ्रमावहैः ।
एकं भागवतं शास्त्रं मुक्तिदानेन गर्जति ॥ २८ ॥
पुराणे शास्त्र ऐकोनी होतसे काय लाभ तो ।
व्यर्थची भ्रम तो वाढे मुक्ती भागवतातची ॥ २८ ॥

इतर अनेक शास्त्रे आणि पुराणे ऐकून काय लाभ होणार ? त्यामुळे तर भ्रम उत्पन्न होतो. मुक्ती देण्यासाठी केवळ भागवत-शास्त्रच पुरेसे आहे. (२८)


कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्‌गृहे ।
तद्‌गृहं तीर्थरूपं हि वसतां पापनाशनम् ॥ २९ ॥
कथा भागवताची ही ज्या घरी नित्य होतसे ।
घर ना तीर्थ ते जाणा त्या घरी पाप नष्टते ॥ २९ ॥

ज्या घरात नित्य श्रीमद्‌भागवताची कथा होते, ते घर तीर्थक्षेत्र होऊन जाते आणि जे लोक अशा घरात राहतात, त्यांचे सारे पाप नष्ट होऊन जाते. (२९)


अश्वमेधसहस्राणि वाजपेयशतानि च ।
शुकशास्त्रकथायाश्च कलां नार्हन्ति षोडशीम् ॥ ३० ॥
हजारो अश्वमेधाचे शेकडो वाजपेयचे ।
सोळांश ना तये पुण्य एका भागवतात जे ॥ ३० ॥

हजारो अश्वमेध यज्ञ आणि शेकडो वाजपेय यज्ञ या शुकशास्त्राच्या सोळाव्या भागाचीही बरोबरी करू शकत नाहीत. (३०)


तावत् पापानि देहेस्मिन् निवसन्ति तपोधनाः ।
यावत् न श्रूयते सम्यक् श्रीमद्‌भागवतं नरैः ॥ ३१ ॥
तपोधान ! पहा ऐका देहाचे पाप ते किती ।
नच सोडी कधी देहा नैकती जोवरी कथा ॥ ३१ ॥

हे तपोधन हो, जो पर्यंत मनुष्यमात्र श्रीमद्‌भागवताचे अवधानपूर्वक श्रवण करीत नाहीत, तोपर्यंतच त्यांच्या शरीरामध्ये पापांनी ठाण मांडलेले असते. (३१)


न गंगा न गया काशी पुष्करं न प्रयागकम् ।
शुकशास्त्रकथायाश्च फलेन समतां नयेत् ॥ ३२ ॥
न गंगा न गया काशी पुष्कर न प्रयाग ही ।
कोणते तीर्थ ते नाही या कथेहूनि श्रेष्ठ ते ॥ ३२ ॥

फलाच्या दृष्टीने पाहिले, तर, गंगा, गया, काशी, पुष्कर किंवा प्रयाग ही तीर्थेही शुकशास्त्रकथेची बरोबरी करू शकत नाहीत. (३२)


श्लोकार्धं श्लोकपादं वा नित्यं भागवतोद्‌भवम् ।
पठस्व स्वमुखेनैव यदीच्छसि परां गतिम् ॥ ३३ ॥
श्लोकार्थ अथवा चौथा भाग तो जरि वाचिला ।
तरी जीव गती पावे अशी भागवती कथा ॥ ३३ ॥

जर आपल्याला मोक्षप्राप्तीची इच्छा असेल तर श्रीमद्‌भागवताच्या अर्ध्या अगर चतुर्थांश श्लोकाचा स्वमुखाने नित्य-नियमाने पाठ करीत जा. (३३)


वेदादिः वेदमाता च पौरुषं सूक्तमेव च ।
त्रयी भागवतं चैव द्वादशाक्षर एव च ॥ ३४ ॥
द्वादशात्मा प्रयागश्च कालं संवत्सरात्मकः ।
ब्राह्मणाश्चाग्निहोत्रं च सुरभिर्द्वादशी तथा ॥ ३५ ॥
तुलसी च वसन्तश्च पुरुषोत्तम एव च ।
एतेषां तत्त्वतः प्राज्ञैः न पृथ्ग्भाव इष्यते ॥ ३६ ॥
गायत्री वेद ओंकार पुरूष सूक्त नी तसे ।
श्रीमद्‌भागवतो आणि द्वादशाक्षरि मंत्र तो ॥ ३४ ॥
सूर्यदेव प्रयागो नी काल संवत्सरो तसे ।
विप्र नी अग्निहोत्रो नी गायनी द्वादशीतिथी ॥ ३५ ॥
तुलसी नी वसंतो नी भगवान्‌ पुरुषोत्तम ।
या सर्वांच्या मधे प्राज्ञ भेद ना मुळि मानितो ॥ ३६ ॥

ॐ कार, गायत्री मंत्र, पुरुषसूक्त, तिन्ही वेद, श्रीमद्‌भागवत, ॐ नमो भगवते वासुदेवाय हा द्वादशाक्षरी मंत्र, सूर्यभगवान, प्रयाग, संवत्सररूप काल, ब्राह्मण, अग्निहोत्र, गाय, द्वादशी तिथी, तुळस, वसंत-ऋतू आणि भगवान पुरुषोत्तम या सर्वांना बुद्धीमान लोक तत्त्वतः समान मानतात. (३४-३६)


यश्च भागवतं शास्त्रं वाचयेत् अर्थतोऽनिशम् ।
जन्मकोटिकृतं पापं नश्यते नात्र संशयः ॥ ३७ ॥
श्लोकार्धं श्लोकपादं वा पठेत् भागवतं च यः ।
नित्यं पुण्यं अवाप्नोति राजसूयाश्वमेधयोः ॥ ३८ ॥
जो हे भागवतो शास्त्र स‌अर्थ नित्य वाचितो ।
कोटि जन्माचिये पापे नष्टती नच संशय ॥ ३७ ॥
श्लोकार्थ भाग चौथाई वाचिला जर नित्य तो ।
राजसूयाश्वमेधाचे फळ त्या लाभते पहा ॥ ३८ ॥

जो पुरुष नित्य अर्थासहित श्रीमद्‌भगवतशास्त्र पठण करतो, त्याच्या कोट्यवधी जन्मांचे पाप नाहीसे होते, यात मुळीच शंका नाही. जो मनुष्य नियमीतपणे भागवताच्या अर्ध्या किंवा चतुर्थांश का होईना श्लोकाचा पाठ करतो, त्याला राजसूय आणि अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. (३७-३८)


उक्तं भागवतं नित्यं कृतं च हरिचिन्तनम् ।
तुलसीपोषणं चैव धेनूनां सेवनं समम् ॥ ३९ ॥
अन्तकाले तु येनैव श्रूयते शुकशास्त्रवाक् ।
प्रीत्या तस्यैव वैकुण्ठं गोविन्दोऽपि प्रयच्छति ॥ ४० ॥
श्रीमद्‌भागवता नित्य वाचणे हरिचिंतिणे ।
तुलसी धेनुची सेवा चारी पुण्य समान ते ॥ ३९ ॥
ऐके जो अंतकाळाला श्रद्धेने शुकशास्त्र हे ।
श्री विष्णु पावतो त्याला वैकुंठ धाम लाभते ॥ ४० ॥

नित्य भागवताच्या पाठ करणे, भगवंतांचे चिंतन करणे, तुळशीला पाणी घालणे आणि गायीची सेवा करणे, हे सर्व एकसारखे आहे. जो पुरुष अंतकाळी श्रीमद्‌भागवत ऐकतो, भगवान त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वैकुंठधामाला नेतात. (३९-४०)


हेमसिंहयुतं चैतत् वैष्णवाय ददाति च ।
कृष्णेन सह सायुज्यं स पुमान् लभते ध्रुवम् ॥ ४१ ॥
सुवर्णासनि ठेवोनी देता ग्रंथचि वैष्णवा ।
सायुज्य मुक्ति ती लाभे देणार्‍यास न संशय ॥ ४१ ॥

जो पुरुष सुवर्णसिंहासनासह भागवताचे दान विष्णुभक्ताला देतो, त्यला भगवंतांचे सायुज्यपद अवश्य प्राप्त होते. (४१)


(वसंततिलका)
आजन्ममात्रमपि येन शठेन किंचित्
     चित्तं विधाय शुकशास्त्रकथा न पीता ।
चाण्डालवत् च खरवत् बत तेन नीतं
     मिथ्या स्वजन्म जननी जनिदुःखभाजा ॥ ४२ ॥
जीवच्छवो निगदितः स तु पापकर्मा
     येन श्रुतं शुककथावचनं न किंचित् ।
धिक् तं नरं पशुसमं भुवि भाररूपम्
     एवं वदन्ति दिवि देवसमाजमुख्याः ॥ ४३ ॥
(वसंततिलका)
एकाग्रचित्त करुनी शुकशास्त्र जेणे
    ना सेविले जगुनिया ठक पापि तोचि ।
चांडाळ गर्दभ असे समजा जिणे ते
    मिथ्या स्वजन्मि जननी पिडिली तयाने ॥ ४२ ॥
जो ना पिलाचि शुकशास्त्र जगोनि खूप
    जीता असोनि समजा मुडदा सचेत ।
भारस्वरुप समजा पशुतुल्य धिक्क
    इंद्रादि देव म्हणती मनि स्वर्ग ऐसे ॥ ४३ ॥

ज्या अज्ञानी माणसाने आपल्या संपूर्ण आयुष्यात चित्त एकाग्र करून भागवतामृताचा थोडासुद्धा आस्वाद घेतला नाही, त्याने आपला सर्व जन्म चांडाळ आणि गाढवासारखा व्यर्थ घालविला. एवढेच नव्हे तर आपल्या मातेला केवळ प्रसववेदना देण्यासाठीच तो जन्माला आला. ज्याने हे शुकशास्त्र थोडेसुद्धा ऐकले नाही, तो पापात्मा जिवंत असून मेल्यासारखाच आहे. स्वर्गलोकातील इंद्रादी प्रधान देवताही असेच म्हणतात की, "पृथ्वीला भारभूत असणार्‍या अशा पशुतुल्य माणसाचा धिक्कार असो." (४२-४३)


(अनुष्टुप्)
दुर्लभैव कथा लोके श्रीमद्‌भागवतोद्‌भवा ।
कोटिजन्मसमुत्थेन पुण्येनैव तु लभ्यते ॥ ४४ ॥
(अनुष्टुप्‌)
दुर्लभा ही कथा लोकी श्रीमद्‌भागवती पहा ।
करोडो जन्मपुण्याने लाभते मानवा अशी ॥ ४४ ॥

कोट्यवधी जन्मातील पुण्यसंचयानंतरच प्राप्त होणारी ही श्रीमद्‌भागवतकथा जगात दुर्लभच आहे. (४४)


तेन योगनिधे धीमन् श्रोतव्या सा प्रयत्‍नतः ।
दिनानां नियमो नास्ति सर्वदा श्रवणं मतम् ॥ ४५ ॥
बुद्धिवंत ! अहो योगी ! ऐका सावध ही कथा ।
वारांचे न हिला बंध केव्हाही फळ येतसे ॥ ४५ ॥

नारदमुने, आपण बुद्धीमान आणि योगी आहात. आपण प्रयत्‍नपूर्वक ही कथा ऐका. ही कथा ऐकण्यासाठी ठराविक दिवसांचेच असे काही बंधन नाही. नेहमी ऐकणेच चांगले. (४५)


सत्येन ब्रह्मचर्येण सर्वदा श्रवणं मतम् ।
अशक्यत्वात् कलौ बोध्यो विशेषोऽत्र शुकाज्ञया ॥ ४६ ॥
पाळावे ब्रह्मचर्यो नी सत्य ते वागणे हवे ।
शुकांनी कथिले तैसे वागणे चांगले असो ॥ ४६ ॥

ही कथा सत्याचरण आणि ब्रह्मचर्यपालन पूर्वकच ऐकणे उत्तम समजले गेले आहे. परंतु कलियुगात असे होणे कठीण असल्याने ही कथा ऐकण्याचा शुकमुनींनी सांगितलेला विशेष विधी समजावून घेतला पाहिजे. (४६)


मनोवृत्तिजयश्चैव नियमाचरणं तथा ।
दीक्षां कर्तुं अशक्यत्वात् सप्ताहश्रवणं मतम् ॥ ४७ ॥
ब्रह्मचर्य नि ते सत्य कलीत दीर्घकाळ ते ।
कठीण वाटते ज्यांना त्यांनी सप्ताह योजिणे ॥ ४७ ॥

कलियुगात पुष्कळ दिवसांपर्यंत चित्तवृत्ती ताब्यात ठेवणे, नियमांना बांधील राहणे आणि केवळ एखाद्याच पुण्यकर्माला वाहून घेणे अवघड असल्याने सात दिवसांच्या श्रवणाचा विधी सांगितला आहे. (४७)


श्रद्धातः श्रवणे नित्यं माघे तावद्धि यत्फलम् ।
तत्फलं शुकदेवेन सप्ताहश्रवणे कृतम् ॥ ४८ ॥
श्रद्धेने कधिही ऐका किंवा त्या माघ श्रावणी ।
सप्ताही ऐकता तेची लाभते फळ श्रोतिया ॥ ४८ ॥

श्रद्धापूर्वक केव्हाही श्रवण केल्याने किंवा माघ महिन्यात श्रवण केल्याने जे फळ प्राप्त होते, तेच फळ सात दिवसांच्या श्रवणविधीमध्ये श्रीशुकदेवांनी सांगितले आहे. (४८)


मनसश्च अजयात् रोगात् पुंसां चैवायुषः क्षयात् ।
कलेर्दोषबहुत्वाच्च सप्ताहश्रवणं मतम् ॥ ४९ ॥
कलीत चंचला वृत्ती रोग अल्पायु कारणे ।
सप्ताह श्रवणाचा तो स्वल्प हा विधि बोलिला ॥ ४९ ॥

मनाचा निग्रह नसणे, रोगग्रस्तता आणि कमी आयुष्य, तसेच कलियुगातील अनेक दोष यांमुळे सप्ताहश्रवणाचेच विधान सांगितले आहे. (४९)


यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना ।
अनायासेन तत्सर्वं सप्ताहश्रवणे लभेत् ॥ ५० ॥
जे तपे योग ध्यानाने न मिळे सहजी कुणा ।
ते सर्व मिळते आता कथेच्या श्रवणातुनी ॥ ५० ॥

जे फळ तप, योग आणि समाधीमुळे मिळत नाही, ते संपूर्ण फळ सप्ताहश्रवणाने सहजगत्या प्राप्त होते. . (५०)


यज्ञात् गर्जति सप्ताहः सप्ताहो गर्जति व्रतात् ।
तपसो गर्जति प्रोच्चैः तीर्थान्नित्यं हि गर्जति ॥ ५१ ॥
योगात् गर्जति सप्ताहो ध्यानात् ज्ञानाच्च गर्जति ।
किं ब्रूमो गर्जनं तस्य रे रे गर्जति गर्जति ॥ ५२ ॥
श्रेष्ठ यज्ञाहुनी आणि तपव्रत फिके पुढे ।
तीर्थ योगादि सायासाहुनी श्रेष्ठ कथा असे ॥ ५१ ॥
अधीक काय ते सांगू ज्ञान ध्यानहि धाकुटे ।
सर्वची त्या प्रयासात कथा ही श्रेष्ठची पहा ॥ ५२ ॥

सप्ताहश्रवण यज्ञ, व्रत, तप, तीर्थयात्रा, योग, ध्यान आणि ज्ञान या सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. अहो ! याचे वैशिष्ट्य काय वर्णब करावे ? हे सप्ताहश्रवण तर सर्वांत श्रेष्ठ आहे. (५१-५२)


शौनक उवाच -
(इंद्रवंशा)
साश्चर्यमेतत्कथितं कथानकं
     ज्ञानादिधर्मान् विगणय्य साम्प्रतम् ।
निःश्रेयसे भागवतं पुराणं
     जातं कुतो योगविदादिसूचकम् ॥ ५३ ॥
शौनकजी म्हणाले -
(इंद्रवज्रा)
आश्चर्यवार्ता कथिली तुम्ही तो
    ब्रह्मा नि नारायण योगवेत्ते ।
अवश्य श्री भागवता कथीती
    मोक्षार्थ ना साधन ते दुजे की ॥ ५३ ॥

शौनकांनी विचारले - ही तर आपण मोठी आश्चर्याची गोष्ट सांगितली. हे भागवतपुराण निश्चितच योगवेत्ते, ब्रह्मदेव यांचे आदिकारण असणार्‍या श्रीनारायणांचेच निरूपण करीत आहे; पण मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान, इत्यादी सर्व साधनांचा तिरस्कार करूनही या युगात या पुराणाची ख्याती कशी झाली ? (५३)


सूत उवाच -
(अनुष्टुप्)
यदा कृष्णो धरां त्यक्त्वा स्वपदं गन्तुमुद्यतः ।
एकादशं परिश्रुत्यापि उद्धवो वाक्यमब्रवीत् ॥ ५४ ॥
श्री सूतजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
सोडण्या जग हे कृष्णे योजिले निजधाम तै ।
आकरा स्कंध ऐकोनी उद्धवे प्रश्न टाकिला ॥ ५४ ॥

सूत म्हणाले - हे पृथ्वीतल सोडून स्वधामाला (गोलोकाला) जाण्यासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण निघाले, तेव्हा त्यांच्या तोंडून अकराव्या स्कंधातील ज्ञानोपदेश ऐकून उद्धवांनीही असेच विचारले होते. (५४)


उद्धव उवाच -
त्वं तु यास्यसि गोविन्द भक्तकार्यं विधाय च ।
मच्चित्ते महती चिन्ता तां श्रुत्वा सुखमावह ॥ ५५ ॥
उद्धवजी म्हणाले -
गोविंदा ! कार्य भक्तांचे करोनी चालले तुम्ही ।
परी माझ्या मनी चिंता आहे ती हरणे प्रभो ॥ ५५ ॥

उद्धव म्हणाले - हे गोविंद, आपण आपल्या भक्तांचे कल्याण करून स्वधामास जाऊ इच्छिता, परंतु माझे मन चिंताग्रस्त आहे. माझी चिंता ऐकून तिचे निरसन करून आपण माझे समाधान करा. (५५)


आगतोऽयं कलिर्घोरो भविष्यन्ति पुनः खलाः ।
तत्संगेनैव सन्तोऽपि गमिष्यन्ति उग्रतां यदा ॥ ५६ ॥
तदा भारवती भूमिः गोरूपेयं कमाश्रयेत् ।
अन्यो न दृश्यते त्राता त्वत्तः कमललोचन ॥ ५७ ॥
आलाचि समजा घोर कली या पृथवीवरी ।
माजेल दुष्टता भारी होतील संत उग्र ते ॥ ५६ ॥
तेव्हा भारवती भूमी गो रुपी आश्रया कुठे ।
जाईल सांगणे देवा तुम्हीच प्रतिपालक ॥ ५७ ॥

आता घोर कलियुग आलेच आहे. आता पुन्हा अनेक दुष्ट प्रगट होतील. त्यांच्या संसर्गाने जेव्हा अनेक सत्पुरुषही क्रूर स्वभावाचे होतील, तेव्हा त्याच्या भाराने दबून गेलेली ही गायरूपी पृथ्वी कोणाला शरण जाईल ? हे कमलनयना, मला तर हिचे रक्षण करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणी दिसत नाही. (५६-५७)


अतः सस्तु दयां कृत्वा भक्तवत्सल मा व्रज ।
भक्तार्थं सगुणो जातो निराकारोऽपि चिन्मयः ॥ ५८ ॥
न जावे म्हणुनी कोठे देवा हो भक्तवत्सला ।
निराकार परब्रह्म आलात स्वजनास्तव ॥ ५८ ॥

म्हणून हे भक्तवत्सला, साधुपुरुषांवर कृपा करा आणि येथून जाऊ नका. भगवन, आपण निराकार आणि चिन्मय असूनही भक्तांसाठीच हे सगुण रूप धारण केले आहे. (५८)


त्वद् वियोगेन ते भक्ताः कथं स्थास्यन्ति भूतले ।
निर्गुणोपासने कष्टं अतः किंचिद् विचारय ॥ ५९ ॥
मोठा वियोग तो तैसा भक्तांना नच साहवे ।
निर्गुणोपासनी कष्ट म्हणोनी मार्ग काढणे ॥ ५९ ॥

तर मग आपला वियोग झाल्यावर ते भक्तजन पृथ्वीवर कसे राहू शकतील ? निर्गुणाची उपासना करण्यात तर फार कष्ट आहेत. यासाठी आपण दुसरा काहीतरी विचार करा. (५९)


इति उद्धववचः श्रुत्वा प्रभासेऽचिन्तयत् हरिः ।
भक्तावलम्बनार्थाय किं विधेयं मयेति च ॥ ६० ॥
स्वकीयं यद् भवेत् तेजः तच्च भागवतेऽदधात् ।
तिरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद् भागवतार्णवम् ॥ ६१ ॥
बोलणे उद्धवाचे हे कृष्णाने ऐकिले असे ।
मनात चिंतिले त्यांनी भक्तोद्धारार्थ कार्य ते ॥ ६० ॥
कृपाळू भगवंताने दिव्यशक्ति कथेत या ।
आपुली ओतुनी सारी स्वधाम गाठीले पुन्हा ॥ ६१ ॥

प्रभासक्षेत्रामध्ये उद्धवाचे हे वचन ऐकून भगवंत विचार करू लागले की, भक्तांच्या आधारासाठी आपल्याला काय करता येईल ? तेव्हा भगवंतांनी आपले तेज भागवतामध्ये स्थापित केले आणि अंतर्धान पावून त्यांनी या भागवतरूपी समुद्रात प्रवेश केला. (६०-६१)


तेनेयं वाङ्‌मयी मूर्तिः प्रत्यक्षा वर्तते हरेः ।
सेवनात् श्रवणात् पाठात् दर्शनात् पापनाशिनी ॥ ६२ ॥
सप्ताहश्रवणं तेन सर्वेभ्योऽप्यधिकं कृतम् ।
साधनानि तिरस्कृत्य कलौ धर्मोऽयमीरितः ॥ ६३ ॥
त्यामुळे वाङम्‌योमूर्ती प्रत्यक्ष भगवंत ही ।
म्हणोनी श्रवणे पाठे नष्टती पाप सर्व ते ॥ ६२ ॥
सप्ताही ऐकणे श्रेष्ठ पंडित मानिले असे ।
कलीत अन्य ते नाही तंत्र याहून श्रेष्ठ की ॥ ६३ ॥

म्हणून ही भगवंतांची प्रत्यक्ष वाङ्‌मयमूर्ती आहे. भागवताची आराधना, श्रवण, पठण, किंवा दर्शनसुद्धा मनुष्याची पापे नष्ट करते. असे असल्याने याचे सप्ताहश्रवण सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे आणि कलियुगात तर अन्य सर्व साधने दुय्यम समजून यालाच सर्वश्रेष्ठ धर्म मानले आहे. (६२-६३)


दुःखदारिद्र्य दौर्भाग्य पापप्रक्षालनाय च ।
कामक्रोध जयार्थं हि कलौ धर्मोऽयमीरितः ॥ ६४ ॥
अन्यथा वैष्णवी माया देवैरपि सुदुस्त्यजा ।
कथं त्याज्या भवेत् पुम्भिः सप्ताहोऽतः प्रकीर्तितः ॥ ६५ ॥
कलीत एकची धर्म दुःख दारिद्रय हारिण्या ।
पाप कामादिकालाही हरिते नित्य ही कथा ॥ ६४ ॥
अन्यथा विष्णुची माया देवतांनाहि पीडिते ।
मायापाश तुटे सारा सप्ताही ऐकता कथा ॥ ६५ ॥

कलियुगात हाच एक असा धर्म आहे की, ज्यामुळे दुःख, दारिद्र्य, दुर्भाग्य आणि पाप यांचा सर्वनाश होतो आणि काम-क्रोधादि शत्रूंवर विजय प्राप्त करता येतो. भगवंतांच्या मायेपासून सुटका होणे जिथे देवांनाही अवघड आहे, तिथे मनुष्याची सुटका कशी होणार ? म्हणून मायापाश सुटण्यासाठीसुद्धा सप्ताहश्रवणाचा विधी सांगितला आहे. (६४-६५)


सूत उवाच -
(इंद्रवज्रा)
एवं नगाहश्रवणोरुधर्मे
     प्रकाश्यमाने ऋषिभिः सभायाम् ।
आश्चर्यमेकं समभूत् तदानीं
     तदुच्यते संश्रृणु शौनको त्वम् ॥ ६६ ॥
सूतजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
माहात्म्य ऐसे जधि संत गाती
    सप्ताह पारायण ऐकण्याचे ।
आश्चर्य झाले तयि वेळि एक
    ऐका तयाते वदतो तुम्हाला ॥ ६६ ॥

सूत म्हणाले - शौनका, ज्यावेळी सनकादिक मुनिवर्य सप्ताहश्रवणविधीची याप्रमाणे प्रशंसा करीत होते, त्यावेळेला सभेत एक आश्चर्य घडले. ते मी तुला सांगतो, ऐक. (६६)


भक्तिः सुतौ तौ तरुणौ गृहीत्वा
     प्रेमैकरूपा सहसाऽविरासीत् ।
श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे
     नाथेति नामानि मुहुर्वदन्ती ॥ ६७ ॥
दो वृद्धपुत्रा सह ती तरुणी
    भक्ति तिथे पातलि नित्य बोले ।
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे
    हे नाथ नारायण वासुदेव ॥ ६७ ॥

तारुण्यावस्था प्राप्त झालेल्या आपल्या दोन पुत्रांना घेऊन पवित्र प्रेमरूप भक्ति तेथे अकस्मात प्रगट झाली. ती मुखाने "श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव ॥" या नामांचा वारंवार जयघोष करीत होती. (६७)


तां चागतां भागवतार्थभूषां
     सुचारुवेषां ददृशुः सदस्याः ।
कथं प्रविष्टा कथमागतेयं
     मध्ये मुनीनामिति तर्कयन्तः ॥ ६८ ॥
ऐकावया भक्ति सजोनि आली
    सदस्य सारे बघती तिला की ।
बोलोनि गेले तयि आपसात
    कैसी इथे पातलि ही कळेना ॥ ६८ ॥

तेव्हा सभासदांनी सुंदर वेष धारण केलेली भक्ती भगवताच्या अर्थाचे दागिने अंगावर घालून तेथे आल्याचे पाहिले. मुनींच्यामध्ये हिचे आगमन कसे झाले, याविषयी सभेतील सर्वजण तर्क-वितर्क करू लागले. (६८)


ऊचुः कुमारा वचनं तदानीं
     कथार्थतो निश्पतिताधुनेयम् ।
एवं गिरः सा ससुता निशम्य
     सनत्कुमारं निजगाद नम्रा ॥ ६९ ॥
कुमार तेव्हा वदती मुखाने
    कथारसातूनचि पातली ही ।
ऐके जधी भक्तिहि त्याच वेळी
    पुत्रांसवे ती मग बोलली की ॥ ६९ ॥

तेव्हा सनकादिक म्हणाले की, "भागवतकथेच्या अर्थातून आत्ताच ही येथे प्रगट झाली आहे." हे ऐकून भक्ति आपल्या पुत्रांसह अत्यंत विनम्र भावाने सनत्कुमारांना असे म्हणाली - (६९)


भक्तिरुवाच -
(उपेंद्रवज्रा)
भवद्‌भिः अद्यैव कृतास्मि पुष्टा
     कलिप्रणष्टापि कथारसेन ।
क्वाहं तु तिष्ठाम्यधुना ब्रुवन्तु
     ब्राह्मा इदं तां गिरमूचिरे ते ॥ ७० ॥
(इंद्रवज्रा)
भक्तेषु गोविन्दसरूपकर्त्री
     प्रेमैकधर्त्री भवरोगहन्त्री ।
सा त्वं च तिष्ठस्व सुधैर्यसंश्रया
     निरंतरं वैष्णवमानसानि ॥ ७१ ॥
(उपेंद्रवज्रा)
ततोऽपि दोषाः कलिजा इमे त्वां
     द्रष्टुं न शक्ताः प्रभवोऽपि लोके ।
एवं तदाज्ञावसरेऽपि भक्तिः
     तदा निषण्णा हरिदासचित्ते ॥ ७२ ॥
भक्ति म्हणाली -
कलीत झाले बहु मी कृशा नी
    तुम्ही कथेने मज पुष्ट केले ।
सांगा बरे मी मग कोण आहे ?
    ऐकोनिया संतहि बोलले तै ॥ ७० ॥
तू भक्ति गे दाविशि कृष्णरुप
    तू प्रेम देसी हरिशी भवाला ।
करोनि धैर्या तरि तू रमावे
    श्रीविष्णुदासा हृदयात नित्य ॥ ७१ ॥
विश्वात होई कलिचा प्रभाव
    आता तुला ना मुळि ताप होई ।
घेवोनि आज्ञा मग ती त्वरेने
    श्रीविष्णुदासा हृदयात गेली ॥ ७२ ॥

भक्ती म्हणाली - कलियुगात माझा लोप झाला होता. कथामृताचे सिंचन करून आपण मला आजच पुष्ट केलेत. आपण मला आता असे सांगा की, "मी कोठे राहू ?" हे ऐकून सनकादिक तिला म्हणाले, तू भक्तांना भगवत्स्वरूप देणारी, त्यांचे अनन्य प्रेम संपादन करणारी आहेस, म्हणून तू धैर्य धारण करून विष्णूभक्तांच्या हृदयांत निरंतर वास करून रहा. या कलियुगातील दोघांचा लोकांवर प्रभाव पडणारा असला तरी तुझ्यावर त्या दोघांची दृष्टीसुद्धा पडू शकणार नाही. अशा प्रकारे आज्ञा होताच भक्ति ताबडतोब भक्तांच्या हृदयांत विराजमान झाली. (७०-७२)


(मालिनी)
सकलभुवनमध्ये निर्धनास्तेऽपि धन्या
     निवसति हृदि येषां श्रीहरेर्भक्तिरेका ।
हरिरपि निजलोकं सर्वथातो विहाय
     प्रविशति हृदि तेषां भक्तिसूत्रोपनद्धः ॥ ७३ ॥
(वसंततिलका)
ब्रूमोऽद्य ते किमधिकं महमानमेवं
     ब्रह्मात्मकस्य भुवि भागवताभिधस्य ।
यत्संश्रयात् निगदिते लभते सुवक्ता
     श्रोतापि कृष्णसमतामलमन्यधर्मैः ॥ ७४ ॥
इति श्रीपद्मपुराणे उत्तरखण्डे श्रीमद्‌भागवतमाहात्म्ये
भक्तिकष्टनिवर्तनं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
(द्रुतविलंबित)
सकल भुवनमध्ये निर्धनी तोहि धन्य
    निवसत हृदि ज्याच्या श्रीहरीभक्ति एक ।
हरिजरि असला तो भक्तिने बद्ध होतो
    अन हृदि बसतो तो सोडुनी श्रेष्ठधाम ॥ ७३ ॥
(वसंततिलका)
वानू किती महति भागवताचिया मी
    हे लोकि या प्रगटले परब्रह्म साक्षात्‌ ।
जे ऐकती नि कथिती कथनामृताला
    ते कृष्णरूप घडती मग काय व्हावे ॥ ७४ ॥
॥ इति श्री पद्मपुराणी उत्तरखंडी श्रीमद्‌भागवत कथा माहात्म्य ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ तिसरा अध्याय हा ॥ माहात्म्य ३ ॥ हरिःॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचाच निवास आहे, ते भले निर्धन का असेनात, परम धन्य आहेत; कारण या भक्तीच्या दोरीने बांधलेले साक्षात भगवानही आपले परमधाम (गोलोक) सोडून भक्तांच्या हृदयांत येऊन निवास करतात. या पृथ्वीतलावर, हे भागवत साक्षात परब्रह्माचे स्वरूप आहे. याची महती याहून अधिक आम्ही किती म्हणून वर्णन करावी ? भागवताच्याच आश्रयाने त्याचे कथन करणारा आणि ऐकणारा, दोघांनाही भगवान श्रीकृष्णांची सारूप्यमुक्ती प्राप्त होते, म्हणून याखेरीज अन्य धर्माचरणाची काय गरज आहे ? (७३-७४)


अध्याय तिसरा समाप्त

GO TOP