श्रीमद् भागवत पुराण
श्रीमद्‌भागवतमाहात्म्यम्
द्वितीयोऽध्यायः

भक्तेः क्लेशनिवृत्तये नारदस्य उद्योगः -

भक्तीचे दुःख दूर करण्याचा नारदांचा प्रयत्‍न -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


नारद उवाच -
(अनुष्टुप्)
वृथा खेदयसे बाले अहो चिन्तातुरा कथम् ।
श्रीकृष्णचरणाम्भोजं स्मर दुःखं गमिष्यति ॥ १ ॥
द्रौपदी च परित्राता येन कौरवकश्मलात् ।
पालिता गोपसुन्दर्यः स कृष्णः क्वापि नो गतः ॥ २ ॥ br>त्वंतु भक्तिः प्रिया तस्य सततं प्राणतोऽधिका ।
त्वयाऽऽहूतस्तु भगवान् याति नीचगृहेष्वपि ॥ ३ ॥
नारदजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
वृथा खेद नको बाले मनीं चिंता कशास ही ।
भगवान कृष्णपायाच्या चिंतने दुःख संपते ॥ १ ॥
रक्षिली द्रौपदी त्याने कौरवांच्या सभेत की ।
सनाथ गोपिका केल्या कृष्ण दूर न त्या कधी ॥ २ ॥
तू तो प्रिया सखी त्याची भक्ति-कृष्ण न ते दुजे ।
प्रेमे बोलाविता त्याला नीचाघरिही धावतो ॥ ३ ॥

नारद म्हणाले - बालिके, तू व्यर्थ खेद का करीत आहेस ? तू इतकी चिंतातुर का झाली आहेस ? भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे चिंतन कर. तुझे दुःख नाहीसे होईल. कौरवांच्या अत्याचारापासून ज्यांनी द्रौपदीचे रक्षण केले होते आणि गोपसुंदरींचे ज्यांनी पालन केले, ते श्रीकृष्ण कोठेही गेलेले नाहीत. त्यांना नेहमी प्राणांहूनही अधिक प्रिय अशी तू भक्ति आहेस. तुझ्या आमंत्रणावरून भगवान कनिष्ठांच्याही घरात जातात. (१-३)


सत्यादित्रियुगे बोध वैराग्यौ मुक्तिसाधकौ ।
कलौ तु केवला भक्तिः ब्रह्मसायुज्यकारिणी ॥ ४ ॥
इति निश्चित्य चिद्‌रूपः सद्‌रूपां त्वां ससर्ज ह ।
परमानन्दचिन्मूर्ति सुंदरीं कृष्णवल्लभाम् ॥ ५ ॥
बद्ध्वांजलिं त्वया पृष्टं किं करोमीति चैकदा ।
त्वां तदाऽऽज्ञापयत् कृष्णो मद्‌भक्तान् पोषयेति च ॥ ६ ॥
मुक्त्यर्थ ज्ञान वैराग्य सत्य आदी युगी तिन्ही ।
कलीत केवलो भक्ती ब्रह्म सायुज्य लाभण्या ॥ ४ ॥
ज्ञानस्वरुप ईशाने बुद्ध्याचि निर्मिले तुला ।
प्रत्यक्ष कृष्णचंद्राची प्रिया तू रूपसुंदरी ॥ ५ ॥
तयासी एकदा तूची प्रार्थिले कार्य सांगण्या ।
आज्ञापिले तदा त्याने माझ्या भक्तासि रक्षिणे ॥ ६ ॥

सत्य, त्रेता आणि द्वापर या तीन युगांत ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधने होती; परंतु कलियुगात केवळ भक्ति मोक्षप्राप्ती करून देणारी आहे, असे निश्चित जाणून परमानंद चिन्मूर्ती ज्ञानस्वरूप श्रीहरींनी सत्स्वरूप अशा तुझी निर्मिती केलेली आहे. तू श्रीकृष्णांना प्रिय अशी सुंदरी आहेस. एकदा तू हात जोडून त्यांना विचारले होते की, "मी काय करू ?" तेव्हा श्रीकृष्णांनी "माझ्या भक्तांचे पोषण कर," अशी तुला आज्ञा केली होती. (४-६)


अंगीकृतं त्वया तद्वै प्रसन्नोऽभूत् हरिस्तदा ।
मुक्तिं दासीं ददौ तुभ्यं ज्ञानवैराग्यकौ इमौ ॥ ७ ॥
पोषणं स्वेन रूपेण वैकुण्ठे त्वं करोषि च च ।
भूमौ भक्तविपोषाय छायारूपं त्वया कृतम् ॥ ८ ॥
आज्ञा तू मानिली त्याची भगवान पावला तदा ।
दिधली मुक्ति ती दासी ज्ञान वैराग्य पुत्र हे ॥ ७ ॥
भक्तां सांभाळण्यासाठी साक्षात वैकुंठि नांदली ।
सावली हो‌उनी तेथे त्यांच्या पुष्ट्यर्थ राहिली ॥ ८ ॥

तू ते स्वीकारल्यानंतर श्रीहरी प्रसन्न झाले आणि त्यांनी तुझी सेवा करण्यासाठी मुक्तीला दासीच्या रूपात आणि ज्ञान-वैराग्यांना पुत्ररूपात तुझ्य्या स्वाधीन केले. तू तुझ्या मूळ रूपाने वैकुंठामध्ये भक्तांचे पोषण करतेस; तर पृथ्वीवर भक्तांचे पोषण करण्यासाठी तू केवळ सावलीच्या रूपात राहिली आहेस. (७-८)


मुक्तिं ज्ञानं विरक्तिं च सह कृत्वा गता भुवि ।
कृतादि द्वापरस्यान्तं महानन्देन संस्थिता ॥ ९ ॥
कलौ मुक्तिः क्षयं प्राप्ता पाखण्डामयपीडिता ।
त्वद् आज्ञया गता शीघ्रं वैकुण्ठं पुनरेव सा ॥ १० ॥
वैराग्य मुक्ति नी ज्ञान सवे तू येथ पातली ।
द्वापार युग पर्यंत आनंदे राहिलीस तू ॥ ९ ॥
कलीत मुक्ति ही झाली पाखंडरोग ग्रस्त ती ।
तू तिला शीघ्र वैकुंठी आज्ञा देवोनि धाडिले ॥ १० ॥

तू मुक्ति, ज्ञान आणि वैराग्यासह पृथ्वीतलावर आलीस आणि सत्ययुग ते द्वापरयुगापर्यंत मोठ्या आनंदाने राहिलीस. मुक्ती कलियुगात नास्तिकतेच्या रोगाने ग्रस्त होऊन क्षीण होऊ लागली होती, म्हणून ती लगेच तुझ्या आज्ञेने वैकुंठलोकात गेली. (९-१०)


स्मृता त्वयापि चात्रैव मुक्तिरायाति याति च ।
पुत्रीकृत्य त्वयेमौ च पार्श्वे स्वस्यैव रक्षितौ ॥ ११ ॥
उपेक्षातः कलौ मन्दौ वृद्धौ जातौ सुतौ तव ।
तथापि चिन्तां मुञ्च त्वं उपायं चिन्तयाम्यहम् ॥ १२ ॥
तू तिला स्मरता ध्यानी येते जाते पुनःपुन्हा ।
वैराग्य ज्ञान ही बाळे तुझे म्हणुनि ठेविली ॥ ११ ॥
पुढती या कली मध्ये उपेक्षेने तुझी मुले ।
मंदवृद्ध अशी झाली त्यांची चिंता करू नको ॥ १२ ॥

तू स्मरण करताच मुक्ती येथे येते आणि परत जाते. परंतु या ज्ञान आणि वैराग्याला तू पुत्र मानून आपल्याजवळच ठेवले आहेस. कलियुगात उपेक्षा झाल्याने हे तुझे पुत्र निरुत्साही आणि वृद्ध झाले आहेत. परंतु तू चिंता करू नकोस. यांना नवजीवन प्राप्त करून देण्याचा उपाय मी शोधून काढतो. (११-१२)


कलिना सदृशः कोऽपि युगो नास्ति वरानने ।
तस्मिन् त्वां स्थापयिष्यामि गेहे गेहे जने जने ॥ १३ ॥
अन्यधर्मान् तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान् ।
तदा नाहं हरेर्दासो लोके त्वां न प्रवर्तये ॥ १४ ॥
त्वद् अन्विताश्च ये जीवा भविष्यन्ति कलौ इह ।
पापिनोऽपि गमिष्यन्ति निर्भयं कृष्णमन्दिरम् ॥ १५ ॥
कलीच्या परि ना चांग युग ते दुसरे पहा ।
गेही गेही तसेची मी पोचवील जनीं जनीं ॥ १३ ॥
अन्य धर्मासि दाबोनी तुला मी वाढवीन की ।
न करू शकता तैसे हरीचा दास मी नसे ॥ १४ ॥
महापापी जरी कोणी संयोगे या युगी तुझ्या ।
तरी तो धाम कृष्णाचे लीलया मिळवीतसे ॥ १५ ॥

हे सुंदरी, कलीसारखे दुसरे कोणतेही युग नाही. या युगात मी घराघरात, प्रत्येक माणसाच्या हृदयात तुझी स्थापना करीन. अन्य सर्व साधनांना तुच्छ ठरवून आणि भक्तिविषयक मोठ्या उत्सवांना प्राधान्य देऊन लोकांत मी तुझा प्रचार केला नाही, तर मी श्रीहरींचा दास म्हणवून घेणार नाही. या कलियुगात जे जीव भक्तिमार्गाला लागतील, ते पापी असल्यासही निर्भयपणे श्रीकृष्ण धामाला जातील. (१३-१५)


येषां चित्ते वसेद्‌भक्तिः सर्वदा प्रेमरूपिणी ।
नते पश्यन्ति कीनाशं स्वप्नेऽप्यमलमूर्तयः ॥ १६ ॥
न प्रेतो न पिशाचो वा राक्षसो वासुरोऽपि वा ।
भक्तियुक्तमनस्कानां स्पर्शने न प्रभुर्भवेत् ॥ १७ ॥
न तपोभिर्न वेदैश्च न ज्ञानेनापि कर्मणा ।
हरिर्हि साध्यते भक्त्या प्रमाणं तत्र गोपिकाः ॥ १८ ॥
ज्याच्या हृदीं सदाभक्ती मोक्षदा प्रेमरुपिणी ।
न दिसे त्यास स्वप्नीही यमधर्म कसाहि तो ॥ १६ ॥
न तया भूत-प्रेताचे भय स्पर्शू शके कधी ।
दैत्य दानव यांचीही मात्रा तेथे न चालते ॥ १७ ॥
तपाने वेदपाठाने ज्ञान कर्मे न बांधतो ।
भक्तिने हरि लाभे तो यासी गोपी प्रमाण की ॥ १८ ॥

ज्यांच्या हृदयात प्रेमस्वरूप भक्ति निरंतर निवास करते, ते शुद्धान्तःकरणाचे लोक स्वप्नातदेखील यमाला पाहात नाहीत. ज्यांच्या हृदयात भक्ति आहे, त्यांना प्रेत, पिशाच्च, राक्षस किंवा दैत्य स्पर्श करण्यास असमर्थ आहेत. तप, वेदाध्ययन, ज्ञान, कर्म अशा कोणत्याही साधनाने भगवंत वश होऊ शकत नाहीत, ते केवळ भक्तीनेच वश होतात. गोपी याचे उत्तम उदाहरण आहे. (१६-१८)


नृणां जन्मसहस्रेण भक्तौ प्रीतिर्हि जायते ।
कलौ भक्तिः कलौ भक्तिः भक्त्या कृष्णः पुरः स्थितः ॥ १९ ॥
भक्तिद्रोअकरा ये च ते सीदन्ति जगत्त्रये ।
दुर्वासा दुःखमापन्नः पुरा भक्तविनिन्दकः ॥ २० ॥
अलं व्रतैः अलं तीर्थैः अलं योगैरलं मखैः ।
अलं ज्ञानकथालापैः भक्तिरेकैव मुक्तिदा ॥ २१ ॥
हजारो जन्मपुण्याने भक्तीचे प्रेम ये मनी ।
या युगी भक्तिची एक जेणे श्रीकृष्ण लाभतो ॥ १९ ॥
करी जो भक्तिचा द्वेष तिन्ही लोकात दुःखि तो ।
दुर्वासे भोगिले सारे दुःख तैसे भयावह ॥ २० ॥
नको ज्ञान नको याग व्रत तीर्थ नकोच ते ।
ज्ञानचर्चा नको कांही भक्तिने मुक्ति लाभते ॥ २१ ॥

हजारो जन्मांच्या पुण्याईने मनुष्याला भक्तीविषयी प्रेम निर्माण होते. कलियुगात भक्ति, केवळ भक्तीच सार आहे. भक्तीनेच प्रत्यक्ष श्रीकृष्ण समोर उपस्थित होतात. भक्तीशी द्रोह करणारे तिन्ही लोकांत दुःखाचेच धनी होतात. एकेकाळी भक्ताचा तिरस्कार केल्यामुळे दुर्वासऋषींना दुःख प्राप्त झाले होते. व्रते, तीर्थयात्रा, योग, यज्ञ, ज्ञानचर्चा इत्यादि साधनांची काहीही आवश्यकता नाही. एकमात्र भक्तीच मुक्ती देणारी आहे. (१९-२१)


सूत उवाच -
इति नारदनिर्णीतं स्वमायात्म्यं निशम्य सा ।
सर्वाङ्‍६गपुष्टिसंयुक्ता नारदं वाक्यमव्रवीत् ॥ २२ ॥
सूतजी सांगतात -
ऐकता आपुली ख्याती नारदे जी कथीयली ।
सर्वांगपुष्ट होवोनी नारदा भक्ति बोलली ॥ २२ ॥

सूत म्हणाले - आपले माहात्म्य निर्णायकरीत्या नारदांच्या तोंडून ऐकल्यानंतर भक्ती सर्व अंगांनी पुष्ट झाली आणि त्यांना म्हणाली. (२२)


भक्तिरुवाच -
अहो नारद धन्योऽसि प्रीतिस्ते मयि निश्चला ।
न कदाचिद् विमुञ्चामि चित्ते स्थास्यामि सर्वदा ॥ २३ ॥
कृपालुना त्वया साधो मद्‌बाधा ध्वंसिता क्षणात् ।
पुत्रयोश्चेतना नास्ति ततो बोधय बोधय ॥ २४ ॥
भक्ति म्हणाली -
नारदा धन्य हो तुम्ही माझ्याशी प्रीत ही खरी ।
राहीन नित्य मी चित्ती कधी जाणे नसे कुठे ॥ २३ ॥
कृपाळू साधू हो तुम्ही क्षणात दुःख हारिले ।
परी पुत्रात चैतन्य यावे सत्वर ते करा ॥ २४ ॥

भक्ति म्हणाली - नारदमुनी, आपण धन्य आहात. आपले माझ्या ठिकाणी निश्चल प्रेम आहे. मी नेहमी आपल्या हृदयात निवास करीन. आपल्याला मी कधीही सोडून जाणार नाही. हे साधू, आपण मोठे कृपाळू आहात. एका क्षणात आपण माझे सारे दुःख दूर केलेत. परंतु अजूनही माझ्या पुत्रांना चेतना आलेली नाही. म्हणून आपण यांना जागे करा. यांच्यात चैतन्य आणा. (२३-२४)


सूत उवाच -
तस्या वचः समाकर्ण्य कारुण्यं नारदो गतः ।
तयोर्बोधनमारेभे कराग्रेण विमर्दयन् ॥ २५ ॥
मुखं संयोज्य कर्णान्ते शब्दमुच्चैः समुच्चरन् ।
ज्ञान प्रबुध्यतां शीघ्रं रे वैराग्य प्रबुध्यताम् ॥ २६ ॥
सूतजी सांगतात -
भक्तिचे वाक्य ऐकोनी आले कारुण्य नारदा ।
मुलांना हात लावोनी उठवू लागले तदा ॥ २५ ॥
कानात जोर जोराने तोंडाने शब्द बोलले ।
वैराग्या रे अरे ज्ञाना व्हावे जागृत सत्वर ॥ २६ ॥

सूत म्हणाले - भक्तीचे हे वचन ऐकून नारदांना पुत्रांची करुणा आली आणि ते त्यांना हाताने हलवून जागे करू लागले. त्यांच्या कानाजवळ तोंड नेऊन जोराने ओरडून म्हणू लागले की, हे ज्ञाना, ऊठ. लवकर जागा हो ! हे वैराग्या, ऊठ. लवकर जागा हो ! (२५-२६)


वेदवेदान्तघोषैश्च गीतापाठैर्मुहुर्मुहुः ।
बोध्यमानौ तदा तेन कथंचित् चोत्थितौ बलात् ॥ २७ ॥
नेत्रैः अनवलोकन्तौ जृम्भन्तौ सालसावुभौ ।
बकवत्पलितौ प्रायः शुष्ककाष्ठसमाङ्‍गकौ ॥ २८ ॥
क्षुत्क्षामौ तौ निरीक्ष्यैव पुनः स्वापपरायणौ ।
ऋषिश्चिन्तापरो जातः किं विधेयं मयेति च ॥ २९ ॥
वेदघोष तसा पाठ गीतेचा नित्य बोलले ।
ऐकोनी मंत्र हे सारे प्रयासे उठले द्वय ॥ २७ ॥
नाही उघडिले डोळे आळसे देति जांभया ।
केस ते पांढरे होते अंग काष्ठापरी कृश ॥ २८ ॥
क्षुधा तृष्णे असे झाले दुबळे बंधु तेधवा ।
पुन्हा झोप बघोनीया नारदा भय वाटले ॥
नारदे चिंतिले तेंव्हा काय मी करणे असे ॥ २९ ॥

नंतर नारदांनी वेदघोष, वेदान्तघोष आणि वारंवार गीतापाठ करून त्यांना जागे केले. त्यामुळे ते मोठ्या कष्टाने जागे झाले. परंतु आळसाने ते दोघेही जांभई देत राहिले. डोळे उघडून पाहू शकले नाहीत. त्यांचे बहुतेक केस बगळ्याच्या रंगासारखे पांढरे झाले होते. सर्व अंग वाळलेल्या लाकडाप्रमाणे निस्तेज झाले होते. अशा रीतीने तहान-भूकेने व्याकूळ झालेले ते पुन्हा झोपी जाऊ लागले आहेत, असे पाहून नारदांना मोठी चिंता लागून राहिली आणि ते विचार करू लागले की, आता आपण काय करावे ? (२७-२९)


अहो निद्रा कथं याति वृद्धत्वं च महत्तरम् ।
चिन्तयन् इति गोविन्दं स्मारयामास भार्गव ॥ ३० ॥
त्यांची ती पाहुनी निद्रा वृद्धावस्था तशीच ती ।
गोविंदा ! नारदे तेव्हा भगवंतासि गायिले ॥ ३० ॥

यांची झोप आणि त्याहीपेक्षा अधिक वृद्धावस्था कशी दूर होईल ? शौनका ! अशी काळजी करीत नारद भगवच्चिंतन करू लागले. (३०)


व्योमवाणी तदैवाभूत् मा ऋषे खिद्यतामिति ।
उद्यमः सफलस्तेऽयं भविष्यति न संशयः ॥ ३१ ॥
एतदर्थं तु सत्कर्म सुरर्षे त्वं समाचर ।
तत्ते कर्माभिधास्यन्ति साधवः साधुभूषणाः ॥ ३२ ॥
सत्कर्मणि कृते तस्मिन् सनिद्रा वृद्धतानयोः ।
गमिष्यति क्षणाद्‌भक्तिः सर्वतः प्रसरिष्यति ॥ ३३ ॥
तेव्हा त्या समयी झाली आकाशवाणि ती अशी ।
मुनी खेद नको ऐसा लाभेल यश ते खरे ॥ ३१ ॥
देवर्षि याज साठी ते सत्कर्म करणे असे ।
संतश्रेष्ठ तुम्हा अन्य ते कर्म वदतील की ॥ ३२ ॥
कर्माचे त्या अनुष्ठान करिता झोप जाय ही ।
वृद्धावस्थाहि संपोनी लोकात भक्ति ही वसे ॥ ३३ ॥

त्याचवेळी आकाशवाणी झाली, "मुनिवर्य खेद करू नका. तुमचे हे प्रयत्‍न निश्चितच सफल होतील. देवर्षी, यासाठी तुम्ही एक सत्कर्म करा. ते कोणते, ते तुम्हाला संतशिरोमणी महात्मे सांगतील. त्या सत्कर्माचे अनुष्ठान करताक्षणीच यांची झोप आणि वृद्धावस्था नाहीशी होईल आणि सगळीकडे भक्तीचा प्रसार होईल. (३१-३३)


इत्याकाशवचः स्पष्टं तत्सर्वैरपि विश्रुतम् ।
नारदो विस्मयं लेभे नेदं ज्ञातमिति ब्रुवन् ॥ ३४ ॥
आकाशवाणि ही ऐसी नारदे स्पष्ट ऐकिली ।
आश्चर्य वाटले त्यांना अर्थ कांही कळेचिना ॥ ३४ ॥

ही आकाशवाणी तेथील सर्वांनीच स्पष्ट ऐकली. त्यामुळे नारदांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते मनात म्हणू लागले, "मला तर याचा आशयच कळला नाही." (३४)


नारद उवाच -
अनयाऽऽकाशवाण्यापि गोप्यत्वेन निरूपितम् ।
किं वा तत्साधनं कार्यं येन कार्यं भवेत् तयोः ॥ ३५ ॥
क्व भविष्यन्ति सन्तस्ते कथं दास्यन्ति साधनम् ।
मयात्र किं प्रकर्तव्यं यदुक्तं व्योमभाषया ॥ ३६ ॥
नारदजी म्हणाले -
गुप्तही ऐकिली वाणी नाही साधन बोलिले ।
ज्याने सिद्धीस हे कार्य निश्चये होय साजिरे ॥ ३५ ॥
संत ते कोणत्या ठायी भेटतील कधी मला ।
सांगतील मला अर्थ वाणीचा परिपूर्ण जे ॥ ३६ ॥

नारद म्हणाले - या आकाशवाणीनेसुद्धा गुप्तरूपानेच ही गोष्ट सांगितली. ज्यामुळे यांचे कार्य तडीस जाईल, असे साधन सांगितलेच नाही. ते संत कोठे भेटतील व कोणते साधन सांगतील बरे ! आता आकाशवाणीने जे काही सांगितले, त्यानुसार आता मला काय केले पाहिजे ? (३५-३६)


सूत उवाच -
तत्र द्वौ अपि संस्थाप्य निर्गतो नारदो मुनिः ।
तीर्थं तीर्थं विनिष्क्रम्य पृच्छन् मार्गे मुनीश्वरान् ॥ ३७ ॥
वृत्तान्तः श्रूयते सर्वैः किंचित् निश्चित्य नोच्यते ।
असाध्यं केचन प्रोचुः दुर्ज्ञेयमिति चापरे ।
मूकीभूतास्तथान्ये तु कियन्तस्तु पलायिताः ॥ ३८ ॥
सूतजी सांगतात -
त्या तिघा सोडुनी तेथे निघाले मुनि ते पुढे ।
जेथे तेथेहि साधुंना भेटता प्रश्न बोलिले ॥ ३७ ॥
सर्वांनी प्रश्न ऐकोनी नाही निश्चित बोधिले ।
असाध्य वदले कोणी कोणी गप्पचि राहिले ॥ ३८ ॥

सूत म्हणाले - शौनका ! ज्ञान व वैराग्य यांना तेथेच सोडून नारदमुनी तेथून निघाले आणि प्रत्येक तीर्थक्षेत्रात जाऊन वाटेत भेटणार्‍या ऋषिवर्यांना ते साधन विचारू लागले. त्यांचे म्हणणे सर्वजण ऐकून घेत होते; परंतु निश्चित उत्तर कोणीच देत नव्हते. कोणी सांगितले, "हे अशक्य आहे", दुसरे कोणी म्हणाले, "याचे योग्य उत्तर मिळणे दुरापास्त आहे." तर काहीजण गप्प राहिले आणि अन्य काहीजण आपले हसे होईल या भितीने उत्तर देणे टाळण्यासाठी तेथून निघून गेले. (३७-३८)


हाहाकारो महानासीत् त्रैलोक्ये विस्मयावहः ।
वेदवेदान्तघोषैश्च गीतापाठैर्विबोधितम् ॥ ३९ ॥
भक्तिज्ञानविरागाणां नोदतिष्ठत् त्रिकं यदा
उपायो नापरोऽस्तीति कर्णे कर्णेऽजपञ्जनाः ॥ ४० ॥
कोणास वाटले न्यून टोलावा टोलवी दिली ।
हाहाःकार जगी झाला आश्चर्यी बुडले जन ॥ ३९ ॥
वेदांत घोष गीतेचा याहुनी साधना नसे ।
गीतापाठहि ऐकोनी ज्ञान वैराग्य ना मिळे ॥ ४० ॥

त्रैलोक्यात आश्चर्यकारक असा हाहाकार माजला. लोक एकमेकांशी कानाजवळ जाऊन कुजबुजु लागले. जर वेदपठण, वेदांतघोष आणि वारंवार गीतापठण ऐकवूनही भक्ति, ज्ञान आणि वैराग्य यांना जाग आणता आली नाही तर अन्य कोणताही उपाय दिसत नाही. (३९-४०)


योगिना नारदेनापि स्वयं न ज्ञायते तु यत् ।
तत्कथं शक्यते वक्तुं इतरैरिह मानुषैः ॥ ४१ ॥
एवं ऋषिगणैः पृष्टैः निर्णीयोक्तं दुरासदम् ॥ ४२ ॥
भक्त ज्ञानी नि वैरागी स्वयं नारदजीच ते ।
पुसती सर्व लोकांना लोकांनी काय सांगणे ॥ ४१ ॥
बोलले ऋषि ते सर्व यासी तंत्र ना काहिही ॥ ४२ ॥

परम योगी नारदमुनींनाही ज्याचे ज्ञान नाही, अशा बाबतीत अन्य सामान्य लोक काय सांगू शकतील ? अशाप्रकारे ज्या ज्या ऋषिवर्यांना विचारले गेले, त्यांनी असाच निर्णय दिला की, ही गोष्ट असाध्य आहे. (४१-४२)


ततश्चिन्तातुरः सोऽथ बदरीवनमागतः ।
तपश्चरामि चात्रेति तदर्थं कृतनिश्चयः ॥ ४३ ॥
तावद् ददर्श पुरतः सनकादीन् मुनीश्वरान् ।
कोटिसूर्यसमाभासान् उवाच मुनिसत्तमः ॥ ४४ ॥
चिंतेत नारदे तेव्हा फिरोनी जग सर्व हे ।
बदरीवनात जावोनी तप ते योजिले असे॥ ४३ ॥
तेव्हाचि दिसले त्यांना सनकादिक ते मुनी ।
आनंदे पाहुनी चौघां नारदाने विचारिले ॥ ४४ ॥

तेव्हा नारद चिंतातुर अवस्थेत बद्रीवनात आले. ज्ञान आणि वैराग्य यांना जाग आणण्यासाठी "मी येथे तप करीन" असा त्यांनी निश्चय केला. त्यचवेळी नारदांना समोर कोट्यावधी सूर्यांच्या सारखे अत्यंत तेजस्वी असे सनकादिक मुनी दिसले. त्यांना मुनिश्रेष्ठ नारद म्हणाले - (४३-४४)


नारद उवाच -
इदानीं भूरिभाग्येन भवद्‌भिः संगमोऽभवत् ।
कुमारा ब्रुवतां शीघ्रं कृपां कृत्वा ममोपरि ॥ ४५ ॥
भवन्तो योगिनः सर्वे बुद्धिमन्तो बहुश्रुताः ।
पञ्चहायनसंयुक्ताः पूर्वेषामपि पूर्वजाः ॥ ४६ ॥
नारदजी म्हणाले -
भाग्याने माझिया झाली आपुली भेट ही अशी ।
त्वरीत मजला सांगा काय साधन ते असे ॥ ४५ ॥
दिसता पाच वर्षाचे परी योगी तुम्ही असा ।
पूर्वजांचे तुम्ही आहा आदिपूर्वजची पहा ॥ ४६ ॥

नारद म्हणाले - माझ्या महद्‌भाग्यानेच आपली व माझी यावेळी भेट झाली. कुमारांनो, कृपा करून आपण ते साधन मला तातडीने सांगावे. आपण सर्वजण महान योगी, बुद्धीमान आणि बहुश्रुत आहात. आपण ५-५ वर्षांचे बालक दिसत असलात, तरी आपण पूर्वजांचेही पूर्वज आहात. (४५-४६)


सदा वैकुण्ठनिलया हरिकीर्तनतत्पराः ।
लीलामृतरसोन्मत्ताः कथामात्रैकजीविनः ॥ ४७ ॥
हरिः शरणमेव हि नित्यं येषां मुखे वचः ।
अथ कालसमादिष्टा जरा युष्मान्न बाधते ॥ ४८ ॥
सदा वैकुंठधामात निवास असतो तुम्हा ।
हरिकथारसवल्ली आधार तुमचा असे ॥ ४७ ॥
हरिः शरणम्‌ मंत्राते तुम्ही तो नित्य गातसा ।
तेणे वृद्धापकाळाची मात्रा तुम्हा न ती चले ॥ ४८ ॥

आपण नेहमी वैकुंठधामात राहता, सदैव हरिकीर्तनामध्ये तत्पर असता. भगवंतांच्या लीलामृताचे पान करीत त्यातच तल्लीन होता आणि भगवत्कथा हाच आपल्या जीवनाचा एकमेव आधार आहे. "श्रीहरिः शरणम्" हाच मंत्र आपल्या मुखात नेहमी असतो. आणि म्हणूनच कालगतीनुसार येणारी वृद्धावस्था आपल्याला बाधू शकत नाही. (४७-४८)


येषां भ्रूभङ्‍गमात्रेण द्वारपालौ हरेः पुरा ।
भ्रूमौ निपतितौ सद्यो यत्कृपातः पुरं गतौ ॥ ४९ ॥
एकदा विष्णुद्वारीच्या जय नी विजयासही ।
भ्रूभंगे तुमच्या तेव्हा शिक्षा ती लाभली असे ॥ ४९ ॥

पूर्वी एकदा ज्या भुवया आपण वक्र करताच भगवान विष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय तात्काळ पृथ्वीवर गेले आणि पुन्हा आपल्याच कृपेने वैकुंठ लोकात आले. (४९)


अहो भाग्यस्य योगेन दर्शनं भवतामिह ।
अनुग्रहस्तु कर्तव्यो मयि दीने दयापरैः ॥ ५० ॥
अशरीरगिरोक्तं यत् तत्किं साधनमुच्यताम् ।
अनुष्ठेयं कथं तावत् प्रब्रुवन्तु सविस्तरम् ॥ ५१ ॥
भक्तिज्ञानविरागाणां सुखं उत्पद्यते कथम् ।
स्थापनं सर्ववर्णेषु प्रेमपूर्वं प्रयत्‍नतः ॥ ५२ ॥
भाग्याने मजला झाले श्रेष्ठ दर्शन आपुले ।
मज दीनावरी तुम्ही कृपा केलीच पाहिजे ॥ ५० ॥
सांगा आकाशवाणीचा अर्थ तो समजावूनी ।
कोणत्या साधना ध्यावे विस्तारे सांगणे मला ॥ ५१ ॥
वैराग्य भक्ति ज्ञानाला कैसे सुख मिळेल ते ।
वाढेल सर्व वर्णात प्रतिष्ठा प्रेमपूर्वक ॥ ५२ ॥

माझ्या सौभाग्यानेच मला आता आपले येथे दर्शन होत आहे. मी दीन आहे तर आपण दयाळू आहात. म्हणून आपण माझ्यावर कृपा करावी. आकाशवाणीने ज्याबद्दल मला सांगितले, ते साधन कोणते ? त्याचे अनुष्ठान कसे केले पाहिजे ? हे आपण मला विस्तारपूर्वक सांगा. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना कोणत्या मार्गाने सुख मिळू शकेल ? सर्व वर्णांमध्ये यांचीच कोणत्या प्रयत्‍नांनी प्रेमपूर्वक प्रतिष्ठापना होऊ शकेल. (५०-५२)


कुमारा ऊचुः -
मा चिन्तां कुरु देवर्षे हर्षं चित्ते समावह ।
उपायः सुखसाध्योऽत्र वर्तते पूर्व एव हि ॥ ५३ ॥
कुमार म्हणाले -
न चिंता करणे योगी प्रसन्न चित्त ते करा ।
उपाय सहजी सोपा पूर्वीच सिद्ध जाहला ॥ ५३ ॥

सनकादिक म्हणाले - देवर्षी, आपण चिंता करू नका. मन प्रसन्न ठेवा. त्याबाबतचा साधा सोपा उपाय पहिल्यापासूनच विद्यमान आहे. (५३)


अहो नारद धन्योऽसि विरक्तानां शिरोमणिः ।
सदा श्रीकृष्णदासानां अग्रणीः योगभास्करः ॥ ५४ ॥
त्वयि चित्रं न मन्तव्यं भक्त्यर्थं अनुवर्तिनि ।
घटते कृष्णदासस्य भक्तेः संस्थापना सदा ॥ ५५ ॥
धन्य हो नारदा तुम्ही विरक्तांचे शिरोमणी ।
सदा श्रीकृष्णदासाचे कोटिभास्कर दर्शक ॥ ५४ ॥
ऋषिंनी दाविले मार्ग परी ते कष्ट दायक ।
श्रमसाध्यचि सर्वांना अंती स्वर्गची लाभतो ॥ ५५ ॥

नारदमुने, आपण धन्य आहात. आपण विरक्तांचे शिरोमणी, श्रीकृष्ण भक्तांत अग्रगण्य तसेच भक्तियोगाचे सूर्य आहात. आपण भक्तीसाठी जे प्रयत्‍न करीत आहात ती काही आश्चर्याची गोष्ट नाही. भक्तीची पुनःस्थापना करणे हे कार्य भगवद्‌भक्तांसाठी सर्वथैव योग्य आहे. (५४-५५)


ऋषिर्बहवो लोके पन्थानः प्रकटीकृताः ।
श्रमसाध्याश्च ते सर्वे प्रायः स्वर्गफलप्रदाः ॥ ५६ ॥
वैकुण्ठसाधकं पन्थाः स तु गोप्यो हि वर्तते ।
तस्योपदेष्टा पुरुषः प्रायो भाग्येन लभ्यते ॥ ५७ ॥
तुम्ही त्या भक्तिच्या साठी मांडिला हा प्रपंच की ।
तिजला कृष्णदासाने ठेवावि नित्यची मनी ॥ ५६ ॥
वैकुंठ लाभते ज्याने गुप्त तो मार्ग हा असा ।
मार्गाचे या उपदेशी भाग्याने संत लाभती ॥ ५७ ॥

या संसारात ऋषिमुनींनी उद्धाराचे अनेक मार्ग प्रकट केले आहेत. परंतु ते सर्व कष्टसाध्य आणि बहुधा स्वर्गप्राप्ती करून देणारे आहेत. परंतु भगवत्‌प्राप्तीचे साधन मात्र गुप्तच ठेवल आहे. त्याचा उपदेश करणारा सत्पुरुष मोठ्या भाग्यानेच मिळतो. (५६-५७)


सत्कर्म तव निर्दिष्टं व्योमवाचा तु यत्पुरा ।
तदुच्यते श्रृणुष्वाद्य स्थिरचित्तः प्रसन्नधीः ॥ ५८ ॥
तुम्हा आकाशवाणीने मार्ग हा गुप्त बोधिला ।
चित्ती प्रसन्न होवोनी ऐकावे हित सांगतो ॥ ५८ ॥

आपल्याला आकाशवाणीने ज्या सत्कर्माचा संकेत केला आहे तो आम्ही तुम्हांला सांगतो. आपण प्रसन्न आणि स्थिरचित्त होऊन ऐका. (५८)


द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च ते तु कर्मविसूचकाः ॥ ५९ ॥
सत्कर्मसूचको नूनं ज्ञानयज्ञः स्मृतो बुधैः ।
श्रीमद्‌भागवतालापः स तु गीतः शुकादिभिः ॥ ६० ॥
द्रव्ययज्ञ तपोयज्ञ हव्ययज्ञे तसेचि त्या ।
ज्ञान यज्ञादि कर्माने स्वर्ग केवळ लाभतो ॥ ५९ ॥
ज्ञानयज्ञात सत्कर्म सदाचि मोक्ष दायक ।
श्रीमद्‌भागवती वार्ता गायिली जी शुकादिने ॥ ६० ॥

द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ हे कर्मांचे सूचक आहेत. विद्वानांनी ज्ञानयज्ञालाच सत्कर्मांचे सूचक मानले आहे. शुकादी महामुनींनी ज्याचे गायन केले आहे. ते श्रीमद्‌भागवताचे पारायण हेच ते सत्कर्म होय. (५९-६०)


भक्तिज्ञानविरागाणां तद्‌घोषेण बलं महत् ।
व्रजिष्यति द्वयोः कष्टं सुखं भक्तेर्भविष्यति ॥ ६१ ॥
प्रलयं हि गमिष्यन्ति श्रीमद्‌भागवतध्वनेः ।
कलेर्दोषा इमे सर्व सिंहशब्दाद् वृका इव ॥ ६२ ॥
ज्ञानवैराग्यसंयुक्ता भक्तिः प्रेमरसावहा ।
प्रतिगेहं प्रतिजनं ततः क्रीडां करिष्यति ॥ ६३ ॥
जियेच्या श्रवणोमात्रे ज्ञान वैराग्य वाढते ।
भक्तिची मिटते चिंता तिला आनंद लाभतो ॥ ६१ ॥
सिंहाची गर्जना होता कोल्हे भीवूनि धावती ।
कथा ऐकोनिया तैसे कलीचे दोष धावती ॥ ६२ ॥
घेउनी ज्ञान वैराग्य भक्ती ती प्रेमदायक ।
प्रत्येक व्यक्तिच्या ठायी आनंदाने क्रिडेल की ॥ ६३॥

त्याचे शब्द ऐकूनच भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना मोठी शक्ती प्राप्त होईल. यामुळे ज्ञान-वैराग्यांचे कष्ट नाहीसे होतील आणि भक्तीला आनंद होईल. सिंहगर्जना ऐकून ज्याप्रमाणे लांडगे पळून जातात, त्याप्रमाणे श्रीमद्‌भागवताच्या शब्दांनीच कलियुगाचे हे सर्व दोष नाहीसे होतील. त्यावेळी प्रेमरस वाहात नेणारी भक्ति, ज्ञान आणि वैराग्याला बरोबर घेऊन घरोघरी प्रकट होईल. (६१-६३)


नारद उवाच -
वेदवेदान्तघोषैश्च गीतापाठैः प्रबोधितम् ।
भक्तिज्ञानविरागाणां नोदतिष्ठत् त्रिकं यदा ॥ ६४ ॥
श्रीमद्‌भागवत आलापात् तत्कथं बोधमेष्यति ।
तत्कथासु तु वेदार्थः श्लोके श्लोके पदे पदे ॥ ६५ ॥
छिन्दन्तु संशयं ह्येनं भवन्तोऽमोघदर्शनाः ।
विलम्बो नात्र कर्तव्यः शरणागतवत्सलाः ॥ ६६ ॥
नारदजी म्हणाले -
गीता वेदांत घोषाने यांना मी उपचारिले ।
परी ना शुद्धिसी आले ज्ञान वैराग्य हे द्वय ॥ ६४ ॥
श्रीमद्‌‍भागवती सार वेदांचेच असे पहा ।
तरी ती तारिते कैसी ज्ञान वैराग्य भक्तिला ॥ ६५ ॥
संशयो हा निवारावा उशीर याजला नको ।
भाविका पावता तुम्ही न जाय व्यर्थ दर्शन ॥ ६६ ॥

नारद म्हणाले - वेद-वेदांताचे पठण आणि गीतापाठ करून भक्ति-ज्ञान-वैराग्यरूप हे तिघे जर जागे झाले नाहीत, तर श्रीमद्‌भागवतकथा ऐकून ते कसे जागे होतील ? कारण त्या कथेच्या प्रत्येक पदात आणि प्रत्येक श्लोकात वेदांचाच सारांश कथन केलेला आहे. आपण शरणागतवत्सल आहात. आपले दर्शन कधीही व्यर्थ होत नाही. म्हणून माझी ही शंका दूर करा. विलंब करू नका. (६४-६६)


कुमारा ऊचुः -
वेदोपनिषदां सारात् जाता भागवती कथा ।
अत्युत्तमा ततो भाति पृथग्भूता फलाकृतिः ॥ ६७ ॥
कुमार म्हणाले -
वेदातुनी निघाली ही सार रूप कथा अशी ।
म्हणोनी उत्तमा ठेली फलरुप गुणोत्तमा ॥ ६७ ॥

सनकादिक म्हणाले - श्रीमद्‌भागवताची कथा, वेद आणि उपनिषदे यांच्या सारसर्वस्वातूनच प्रकट झाली आहे. पण ही स्वतंत्र फलरूप असल्याने वेद-उपनिषदांपेक्षा उत्तम ठरली आहे. (६७)


आमूलाग्रं रसस्तिष्ठन् नास्ते न स्वाद्यते यथा ।
सभूयः संपृथग्भूतः फले विश्वमनोहरः ॥ ६८ ॥
यथा दुग्धे स्थितं सर्पिः न स्वादायोपकल्पते ।
पृथग्भूतं हि तद्‌गव्यं देवानां रसवर्धनम् ॥ ६९ ॥
इक्षूणामपि मध्यान्तं शर्करा व्याप्य तिष्ठति ।
पृथग्भूता च सा मिष्टा तथा भागवती कथा ॥ ७० ॥
वृक्षाचे अंग पाचीही चवीने भिन्न भिन्न की ।
फळ हे सार वृक्षाचे जगी सर्वासि आवडे ॥ ६८ ॥
तूप राही दुधामध्ये दोघांचा स्वाद भिन्न की ।
वेगळे निघता तूप देवांनाही अतिप्रिय ॥ ६९ ॥
शर्करा ती उसामध्ये जशी बाहेर काढिता ।
वेगळी चव ती श्रेष्ठ तशी भागवती कथा ॥ ७० ॥

ज्याप्रमाणे झाडातील रस बुंध्यापासून फांदीच्या शेंड्यापर्यंत असला तरी त्याचा आस्वाद घेता येत नाही, पण ज्यावेळी तो रस फळाच्या रूपाने वेगळा प्रकट होतो, तेव्हा सर्वांना हवाहवासा वाटतो. दुधामध्ये तूप असतेच, परंतु त्याचा स्वाद घेता येत नाही. तेच तूप दुधापासून वेगळे काढले जाते, तेव्हा ते देवतांसाठीही स्वादिष्ट बनते. उसाच्या सर्वांगात साखर व्यापून असते, परंतु ती वेगळी झाल्यानंतरच तिची गोडी समजते. भागवतकथा ही अशीच आहे. (६८-७०)


इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसम्मितम् ।
भक्तिज्ञानविरागाणां स्थापनाय प्रकाशितम् ॥ ७१ ॥
श्रीमद्‌भागवती वार्ता व्यासांनी रचिली असे ।
वेदांच्या सम ही ख्याता वाढवी ज्ञान भक्ति ती ॥ ७१ ॥

हे भागवतपुराण वेदांच्या बरोबरीचे आहे. श्रीव्यासांनी भक्ति, ज्ञान, वैराग्य यांची स्थापना करण्यासाठी हे प्रकाशित केले आहे. (७१)


वेदान्तवेदसुस्नाते गीताया अपि कर्तरि ।
परितापवति व्यासे मुह्यत्यज्ञानसागरे ॥ ७२ ॥
तदा त्वया पुरा प्रोक्तं चतुःश्लोकसमन्वितम् ।
तदीयश्रवणात् सद्यो निर्बाधो बादरायणः ॥ ७३ ॥
तत्र ते विस्मयः केन यतः प्रश्नकरो भवान् ।
श्रीमद्‌भागवतं श्राव्य शोकदुःखविनाशनम् ॥ ७४ ॥
वेदांत सारिणी गीता रचिली श्रेष्ठ ती तरी ।
खिन्नले व्यासजी चित्ती बुडालेऽज्ञानसागरी ॥ ७२ ॥
तेव्हाचि तुम्हि त्या चार श्लोकाने उपदेशिले ।
ऐकता सर्वची चिंता संपली व्यासजींचि तै ॥ ७३ ॥
तरी आश्चर्य कां तुम्हा आम्हास प्रश्न छेडिता ।
श्रीमद्‌भागवतो त्यांना ऐकवा दुःख नाशि जे ॥ ७४ ॥

वेद-वेदांतात पारंगत आणि गीतेची रचना करणारे भगवान व्यासदेव हे पूर्वी एकदा खिन्न होऊन अज्ञानांधकारात चाचपडत होते, तेव्हा आपणच त्यांना चार श्लोकांत याच भागवताचा उपदेश केला होता. तो ऐकूनच त्यांची खिन्नता तत्काळ नाहीशी झाली होती. असे असता आपण आश्चर्यचकित होऊन उलट आम्हांलाच का प्रश्न करीत आहात ? आपण त्यांना शोक दुःखाचा नाश करणारे श्रीमद्‌भागवतपुराण ऐकविले पाहिजे. (७२-७४)


नारद उवाच -
(वसंतितिलका)
यद्दर्शनं च विनिहन्त्यशुभानि सद्यः
     श्रेयस्तनोति भवदुःखदवार्दितानाम् ।
निःशेषशेषमुखगीतकथैकपानाः
     प्रेमप्रकाशकृतये शरणं गतोऽस्मि ॥ ७५ ॥
भाग्योदयेन बहुजन्मसमर्जितेन
     सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै ।
अज्ञानहेतुकृतमोहमदान्धकार
     नाशं विधाय हि तदोदयते विवेकः ॥ ७६ ॥
इति श्रीपद्मपुराणे उत्तरखण्डे श्रीमद्‌भागवतमाहात्म्ये
कुमारनारदसंवादो नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
नारदजी म्हणाले -
(वसंततिलका)
होताचि दर्शन जिवा तुमचे तयाने
    नष्टोनि पाप शमतो भव दुःख अग्नि ।
निःशेष शेषमुखगीत कथाचि प्याले
    प्रेम प्रकाश कळण्या नमितो तुम्हा मी ॥ ७५ ॥
भाग्योदयेचि बहु संचित पुण्य योगे
    तो संतसंग घडतो मग मानवाला ।
अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार
    नष्टे तयेनि मग तो उगवे विवेक ॥ ७६ ॥
॥ इति श्री पद्मपुराणी उत्तरखंडी श्रीमद्‌भागवत कथा माहात्म्य ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ दुसरा अध्याय हा ॥ माहात्म्य २ ॥ हरिःॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

नारद म्हणाले - ज्यांचे दर्शन सर्व पापांना तत्काळ नाहीसे करते आणि जे संसारदुःखाच्या वणव्याने तप्त झालेले आहेत, त्यांचेवर कल्याणाचा वर्षाव करणारे आहे. सहस्रमुख शेष गात असलेल्या भगवत्कथामृताचे आपण नेहमी पान करीत असता. प्रेमलक्षणा भक्ति उजेडात आणण्याच्या हेतूने मी आपणास शरण आलो आहे. जेव्हा मनुष्याच्या अनेक जन्मांतील संचित पुण्याचा उदय होऊन त्याला सत्संग प्राप्त होतो, तेव्हा त्याचा अज्ञानजनित मोह आणि मदरूपी अंधकाराचा नाश होऊन त्याचे ठिकाणी विवेकाच उदय होतो. (७५-७६)


अध्याय दुसरा समाप्त

GO TOP