श्रीमद् भागवत पुराण
श्रीमद्भागवतमाहात्म्यम्
प्रथमोऽध्यायः

नारदसनकादिसमागमः, नारदकर्तृकं भक्तिज्ञानवैराग्य वृत्तान्तनिवेदनं च -

देवर्षी नारदांची भक्तीशी भेट -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


(अनुष्टुप्)
सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे ।
तापत्रविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः ॥ १ ॥
(अनुष्टुप्‌)
सच्चिदानंदरुपी जो विश्वोत्पत्त्यादि हेतुही ।
तापत्रयविनाशी त्या श्रीकृष्णाला नमो नमो ॥ १ ॥

जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश ज्यांच्यामुळे होतो, तसेच आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे तीनही ताप जे नाहीसे करतात, त्या सच्चिदानंदस्वरूप भगवान श्रीकृष्णांची आम्ही स्तुती करतो. (१)


(वसंततिलका)
यं प्रव्रजन्तमनुपेत्यमपेतकृत्यं
     द्वैपायनो विरहकातर आजुहाव ।
पुत्रेति तन्मयतया तववोऽभिनेदुः
     तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि ॥ २ ॥
(वसंततिलका)
संन्यास इच्छुनि शिशू निघता वनासी
    द्वैपायना विरह ना सहवोनि पुत्राऽऽ
जासी कुठे वदत तै पुसताचि वृक्ष
    मी सर्वभूत वदले शुक ते नमी मी ॥ २ ॥

कोणतेही लौकिक - वैदिक कर्म कर्तव्य नसल्यामुळे संन्यास घेण्यासाठी एकटेच निघालेल्या ज्यांना वडील व्यास विरहाने व्याकूळ होऊन पुत्रा ! पुत्रा ! म्हणून हाका मारू लागले. तेव्हा ब्रह्मरूप झालेल्या शुकदेवांशी एकरूप झालेले वृक्षच त्यांच्या वतीने ’ओ’ देऊ लागले. अशा सर्व चराचराच्या हृदयांत विराजमान झालेल्या श्रीशुकमुनींना मी नमस्कार करतो. (२)


(अनुष्टुप्)
नैमिषे सूतं आसीनं अभिवाद्य महामतिम् ।
कथामृत रसास्वाद कुशलः शौनकोऽब्रवीत् ॥ ३ ॥
(अनुष्टुप्‌)
नैमिष्यारण्यि जे ज्ञानी कथा वक्ते चतूर त्या ।
सूतांना नमुनी ऐसे शौनके पुसले असे ॥ ३ ॥

भगवत्‌कथामृताचे पान करण्यामध्ये कुशल असणार्‍या मुनिवर शौनकांनी नैमिषरण्यात आसनावर बसलेल्या महाबुद्धिमान सूतांना नमस्कार करून म्हटले. (३)


शौनक उवाच -
अज्ञानध्वान्तविध्वंस कोटिसूर्यसमप्रभ ।
सूताख्याहि कथासारं मम कर्णरसायनम् ॥ ४ ॥
भक्तिज्ञानविरागाप्तो विवेको वर्धते महान् ।
मायामोहनिरासश्च वैष्णवैः क्रियते कथम् ॥ ५ ॥
इह घोरे कलौ प्रायो जीवश्चासुरतां गतः ।
क्लेशाक्रान्तस्य तस्यैव शोधने किं परायणम् ॥ ६ ॥
शौनकजी म्हणाले-
करोडो ज्ञानसूर्यांचे तेज अंगी तुम्हा असे ।
ज्ञानामृत कथा तुम्ही कानीं ओता रसायन ॥ ४ ॥
भक्ति ज्ञान नि वैराग्य विवेक वाढतो कसा ।
मोह माया त्यजोनीया कैसे वैष्णव राहती ॥ ५ ॥
युगी घोर कलीमध्ये असूर जाहले बहू ।
क्लेशाने त्रासले लोक कैसे उद्धार पावणे ॥ ६ ॥

शौनक म्हणाले - सूत महोदय, अज्ञानांधकार नष्ट करण्यासाठी लागणारे ज्ञान आपल्या ठायी कोट्यवधी सूर्यांच्या तेजाच्या बरोबरीचे आहे. कानाला अमृतासमान असणारी सारभूत कथा आपण आम्हांला सांगा. भक्ती, ज्ञान आणि वैराग्यद्वारा प्राप्त होणारा महान विवेक कशामुळे वृद्धिंगत होतो ? तसेच वैष्णव मायामोहापासून कसे मुक्त होतात ? या घोर कलियुगामध्ये मनुष्यप्राणी बहुधा आसुरी स्वभावाचे आहेत. विविध तापांनी पोळलेल्या या जीवांना शुद्ध (दैवी शक्तिसंपन्न) होण्याचा शर्वश्रेष्ठ उपाय कोणता ? (४-६)


श्रेयसां यद् भवेत् श्रेयः पावनानां च पावनम् ।
कृष्णप्राप्तिकरं शश्वत् साधनं तद्‌वदाधुना ॥ ७ ॥
चिन्तामणिर्लोकसुखं सुरद्रुः स्वर्गसंपदम् ।
प्रयच्छति गुरुः प्रीतो वैकुण्ठं योगिदुर्लभम् ॥ ८ ॥
सांगा तंत्र असे काही सोपे कल्याणकारक ।
पवित्र आणि जे ऐसे जेणे श्रीकृष्ण पावतो ॥ ७ ॥
कल्पतरूत सामर्थ्य स्वर्ग संपत्ति लाभते ।
परी गुरुकृपेने ते वैकुंठधाम लाभते ॥ ८ ॥

आपण आम्हांस असे शाश्वत साधन सांगा की, ज्यायोगे अधिक कल्याण होईल, जे पवित्रांनाही पवित्र करू शकेल, आणि भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून देईल. चिंतामणी लौकिक सुख देऊ शकतो, कल्पवृक्ष स्वर्गप्राप्ती करून देऊ शकेल; परंतु सद्‌गुरू प्रसन्न झाल्यावर योग्यांनाही दुर्लभ असे वैकुंठधाम प्राप्त करून देतात. (७-८)


सूत उवाच -
प्रीतिः शौनक चित्ते ते ह्यतो वच्मि विचार्य च ।
सर्वसिद्धान्त निष्पन्नं संसरभयनाशनम् ॥ ९ ॥
भक्त्योघवर्धनं यच्च कृष्णसंतोषहेतुकम् ।
तदहं तेऽभिधास्यामि सावधानतया श्रृणु ॥ १० ॥
सूतजी म्हणाले-
शौनका जाणिले मी तो कृष्णप्रेमी तुम्ही असा ।
विचारे सांगतो सूत्र संसारभयनाशक ॥ ९ ॥
वाढतो भक्तिचा स्त्रोत भगवान्‌ कृष्ण पावतो ।
ऐका श्रेष्ठ असे तंत्र व्हावे सावध सावध ॥ १० ॥

सूत म्हणाले - शौनक महोदय, तुमच्या हृदयात भगवत्प्रेम आहे; म्हणून मी विचारपूर्वक तुम्हांला जन्ममृत्यूचे भय नाहीसे करणारा सर्व सिद्धांतांचा निष्कर्ष सांगतो. ज्यामुळे भक्तिप्रवाहाला वेग येतो आणि जे भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेला प्रमुख कारण होऊ शकते, ते साधन मी तुम्हांला सांगतो. लक्षपूर्वक ऐका. (९-१०)


कालव्यालमुखाग्रास त्रासनिर्णाशहेतवे ।
श्रीमद्‌भागवतं शास्त्रं कलौ कीरेण भाषितम् ॥ ११ ॥
एतस्माद् अपरं किंचिद् मनःशुद्ध्यै न विद्यते ।
जन्मान्तरे भवेत् पुण्यं तदा भागवतं लभेत् ॥ १२ ॥
या कलीकाळ सर्पाने ग्रासिले त्रासिले जग ।
मुक्तीसाठी शुकांनी ते श्री भागवत बोधिले ॥ ११ ॥
साधनात असे कांही नाही याहूनि श्रेष्ठ की ।
पुण्याने जन्म-जन्मीच्या मानवा लाभते असे ॥ १२ ॥

कलियुगात मनुष्यप्राणी कालरूपी सर्पाचे भक्ष्य झालेले आहेत. या त्रासाचा संपूर्ण नाश करण्यासाठी श्रीशुकदेवांनी श्रीमद्‌भागवत शास्त्रावर प्रवचन केले आहे. मनःशुद्धीसाठी यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही अन्य साधन नाही. मनुष्याच्या अनेक जन्मांच्या पुण्याचा उदय होतो, त्याचवेळी त्यास भागवतशास्त्र ऐकण्यास मिळते. (११-१२)


परीक्षिते कथां वक्तुं सभायां संस्थिते शुके ।
सुधाकुंभं गृहीत्वैव देवास्तत्र समागमन् ॥ १३ ॥
शुकं नत्वावदन् सर्वे स्वकार्यकुशलाः सुराः ।
कथासुधां प्रयच्छस्व गृहीत्वैव सुधां इमाम् ॥ १४ ॥
एवं विनिमये जाते सुधा राज्ञा प्रपीयताम् ।
प्रपास्यामो वयं सर्वे श्रीमद्‌भागवतामृतम् ॥ १५ ॥
राजा परीक्षिता लागी कथाया बैसता शुक ।
सुधाकुंभा सवे तेव्हा पातल्या देवदेवता ॥ १३ ॥
स्वकार्यकुशली देव शुका वंदोनि बोलले ।
सुधा घेवोनि आम्हाला द्यावी सुंदर ही कथा ॥ १४॥
ह्या अशा देव-घेवीने सुधा प्राशील तो नृप ।
आम्ही ऐकोत आनंदे श्रीमद्‌भागवतामृता ॥ १५ ॥

परीक्षिताला ही कथा सांगण्यासाठी जेव्हा श्रीशुकदेव सभेमध्ये आले, तेव्हा देव अमृतकलश घेऊनच तेथे आले. आपले काम साधून घेण्यात चतुर असणार्‍या देवांनी शुकमुनींना प्रणाम केला व म्हणाले की, हे अमृत घेऊन त्याच्या मोबदल्यात आपण आम्हांस भागवत कथामृताचे दान द्यावे. अशी देवाण-घेवाण केल्याने राजा परीक्षित अमृत प्राशन करील (त्यामुळे तो अमर होईल) आणि आम्ही श्रीमद्‌भागवतरूप अमृत प्राशन करू. (१३-१५)


क्व सुधा क्व कथा लोके क्व काचः क्व मणिर्महान् ।
ब्रह्मरातो विचार्यैवं तदा देवाञ्जहास ह ॥ १६ ॥
अभक्तान् तांश्च विज्ञाय न ददौ स कथामृतम् ।
श्रीमद्‌भागवती वार्ता सुराणां अपि दुर्लभा ॥ १७ ॥
हसून शुकजी तेव्हा उत्तरा बोलले असे ।
कुठे रत्‍न कुठे काच तैसी वार्ता नि ती सुधा ॥ १६ ॥
भक्तिहीन अशा देवां शुकांनी नच बोधिले ।
श्रीमद्‌भागवतीवार्ता देवां दुर्लभ ही अशी ॥ १७ ॥

या असार संसारात जशी काच आणि मौल्यवान रत्‍न यांची तुलना होत नाही, त्याप्रमाणे कुठे अमृत व कुठे भागवतकथा ! असा श्रीशुकांनी विचार करून देवांचा उपहास केला. देवांना अभक्त समजून शुकांनी कथामृताचे दान त्यांना केले नाही. अशी ही श्रीमद्‌भागवतकथा देवांनाही दुर्लभ आहे. (१६-१७)


राज्ञो मोक्षं तथा वीक्ष्य पुरा धातापि विस्मितः ।
सत्यलोक तुलां बद्ध्वा तोलयत् साधनान्यजः ॥ १८ ॥
लघून्यन्यानि जातानि गौरवेण इदं महत् ।
तदा ऋषिगणाः सर्वे विस्मयं परमं ययुः ॥ १९ ॥
मेनिरे भगवद्‌रूपं शास्त्रं भागवतं कलौ ।
पठनात् श्रवणात् सद्यो वैकुण्ठफलदायकम् ॥ २० ॥
राजाचा मोक्ष पाहोनी झाले विस्मित ब्रह्मजी ।
बांधिली सत्यलोकात पुण्याची तौलनी तुळा ॥ १८ ॥
झाले चकित ते सारे ऋषी आचार्य पाहुनी ।
कथा भारी तुळी झाली सर्व योगात ती पहा ॥ १९ ॥
त्यांनी निश्चित केले की श्रेष्ठ भागवतो युगीं ।
पठणे श्रवणे मुक्ती आणि वैकुंठ दायक ॥ २० ॥

पूर्वी श्रीमद्‌भागवतकथा श्रवणानेच राजा परीक्षिताला मोक्ष प्राप्त झाला होता, हे पाहून ब्रह्मदेवांनाही आश्चर्य वाटले होते. त्यांनी सत्यलोकात अन्य सर्व साधने तराजूवर तोलून बघितली. भागवताच्या तुलनेत अन्य सर्व साधने कमी वजनाची भरली आणि भागवताचे पारडे जड झाले. हे पाहून सर्व ऋषीही अतिशय आश्चर्यचकित झाले. त्यांनी निर्णय केला की कलियुगात भगवद्‌रूप असे भागवतशास्त्रच पठण-श्रवणाने तत्काळ वैकुण्ठलोक प्राप्त करून देते. (१८-२०)


सप्ताहेन श्रुतं चैतत् सर्वथा मुक्तिदायकम् ।
सनकाद्यैः पुरा प्रोक्तं नारदाय दयापरैः ॥ २१ ॥
यद्यपि ब्रह्मसंबंधात् श्रुतमेतत् सुरर्षिणा ।
सप्ताहश्रवणविधिः कुमारैस्तस्य भाषितः ॥ २२ ॥
सप्ताही ऐकता आहे संसारी मुक्तिदायक ।
दयावंत अशा संते नारदांना प्रबोधिले ॥ २१ ॥
ब्रह्माजींच्या मुखे ब्रह्मर्षिनी ऐकिलिही कथा ।
सप्ताह श्रवणाचा तो संतांनी विधि बोधिला ॥ २२ ॥

सप्ताहविधीने श्रवण केल्यावर भागवत खात्रीने मुक्ति प्राप्ती करून देते. हे शास्त्र पूर्वी दयार्द्र अंतःकरणाच्या सनकादिकांनी देवर्षी नारदांना कथन केले होते. जरी हे शास्त्र देवर्षींनी प्रथम ब्रह्मदेवांकडून श्रवण केले होते, तरी त्याचा सप्ताहश्रवणविधी मात्र त्यांना सनकादिकांनीच सांगितला होता. (२१-२२)


शौनक उवाच -
लोकविग्रहमुक्तस्य नारदस्यास्थिरस्य च ।
विधिश्रवे कुतः प्रीतिः संयोगः कुत्र तैः सह ॥ २३ ॥
शौनकजींनी विचारले -
हिंडतो नित्य हा योगी मुक्त संसारि नारद ।
कथा विधि विधानाची गोडी त्या लाभली कशी ॥ २३ ॥

शौनकांनी विचारले - संसारपाशातून मुक्त तसेच नित्य संचार करण्यार्‍या नारदांची सनकादिकांशी केव्हा भेट झाली आणि विधान ऐकण्याची गोडी त्यांना कशी लागली ? (२३)


सूत उवाच -
अत्र ते कीर्तयिष्यामि भक्तियुक्तं कथानकम् ।
शुकेन मम यत्प्रोक्तं रहः शिष्यं विचार्य च ॥ २४ ॥
एकदा हि विशालायां चत्वार ऋषयोऽमलाः ।
सत्सङ्‌गार्थं समायाता ददृशुस्तत्र नारदम् ॥ २५ ॥
सूतजी म्हणाले-
आता मी सांगतो तुम्हा भक्तिपूर्ण अशी कथा ।
श्रीशुके शिष्य जाणोनी एकांती कथिली मला ॥ २४ ॥
विशाला नगरी मध्ये सत्संगी ऋषि पातले ।
नारदा पाहता संते तयांनी पुसले असे ॥ २५ ॥

सूत म्हणाले - श्रीशुकदेवांनी मला त्यांचा एकनिष्ठ शिष्य समजून जे भक्तिपूर्ण कथानक एकांतात मला सांगितले, ते मी तुम्हांला सांगतो. एकदा बद्रीनारायणक्षेत्री ते चारही निर्मल अंतःकरणाचे सनकादिक ऋषी सत्संगासाठी आले असता नारदांना त्यांनी पाहिले. (२४-२५)


कुमाराः ऊचुः -
कथं ब्रह्मन् दीनमुखं कुतश्चिन्तातुरो भवान् ।
त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव ॥ २६ ॥
इदानीं शून्यचित्तोऽसि गतवित्तो यथा जनः ।
तवेदं मुक्तसङ्‌गस्य नोचितं वद कारणम् ॥ २७ ॥
कुमारांनी विचारिले -
सांगा ब्रह्मन्‌ असे तुम्ही म्लानमुख कशामुळे ।
चिंतातुर असे तुम्ही लगेच निघता कुठे ॥ २६ ॥
दिसता दीन जै तुम्ही चोरांनी लुटिल्या परी ।
विरक्त संत तो तुम्ही सांगावे काय जाहले ॥ २७ ॥

सनकादिकांनी विचारले - ब्रह्मन्, आपण उदास व चिंताक्रांत का दिसत आहात ? इतक्या घाईने आपण कुठे जात आहात ? आपण कोठून आलात ? एखाद्याने धन चोरीला गेल्यानंतर तो जसा व्याकूळ झालेला दिसतो, तसे आपण दिसत आहात. याचे कारण काय ? आपल्यासारख्या आसक्तिरहित पुरुषाला हे शोभणारे नाही. तरी कारण सांगा. (२६-२७)


नारद उवाच -
अहं तु पृथिवीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तममिति ।
पुष्करं च प्रयागं च काशीं गोदावरीं तथा ॥ २८ ॥
हरिक्षेत्रं कुरुक्षेत्रं श्रीरङ्‌गं सेतुबन्धनम् ।
एवमादिषु तीर्थेषु भ्रममाण इतस्ततः ॥ २९ ॥
नापश्यं कुत्रचित् शर्म मनस्संतोषकारकम् ।
कलिनाधर्ममित्रेण धरेयं बाधिताधुना ॥ ३० ॥
नारदजी म्हणाले-
जाणोनी उत्तमा पृथ्वी आलो सुंदर लोकि या ।
प्रयाग पुष्करो येथे काशी गोदावरी तटी ॥ २८ ॥
हरिद्वार कुरुक्षेत्री श्रीरंगी सेतु बंधनी ।
न शांति मुळिही कोठे कलीने धर्म त्रासिला ॥ २९ ॥
न संतोष कुठेही तो अधर्म माजला तसा ।
अधर्मे पीडिले लोका अनर्थ सर्व जाहला ॥ ३० ॥

नारद म्हणाले - पृथ्वी सर्वोत्तम आहे, असे समजून मी येथे आलो. पृथ्वीवरील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वरम (सेतुबंध) इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री मी संचार केला. परंतु मला कोठेही मनःशांती प्राप्ती झाली नाही. सध्या अधर्माला साहाय्य करणार्‍या कलियुगाने सर्व पृथ्वी दुःखित झाली आहे. (२८-३०)


सत्यं नास्ति तपः शौचं दया दानं न विद्यते ।
उदरंभरिणो जीवा वराकाः कूटभाषिणः ॥ ३१ ॥
मन्दाः सुमन्दमतयो मन्दभाग्या हि उपद्रुताः ।
पाखण्डनिरताः संतो विरक्ताः सपरिग्रहाः ॥ ३२ ॥
तरुणीप्रभुता गेहे श्यालको बुद्धिदायकः ।
कन्याविक्रयिणो लोभाद् दंपतीनां च कल्कनम् ॥ ३३ ॥
तप शौच तसे सत्य दया दान विलोपले ।
बिचारे जीव ते सर्व खोटे पोटार्थ बोलती ॥ ३१ ॥
आळशी मंद बुद्धी नी भाग्यहीन उपद्रवी ।
साधू दांभिक ते झाले विरक्त दिसती वरी ॥ ३२ ॥
घरात पगडा स्त्रीचा मेहुणे हित सांगती ।
लोभाने विकिती कन्या स्त्रिया-पुरुष भांडती ॥ ३३ ॥

येथे आता सत्य, तप, पावित्र्य, दया, दान राहिलेले नाही. मनुष्यप्राणी केवळ उपजीविकेत व्यग्र आहेत. ते असत्य भाषण करणारे, आळशी, मंदबुद्धी, भाग्यहीन आणि उपद्रवग्रस्त झालेले आहेत. संत म्हणविणारे दांभिक आहेत, वरकरणी विरक्त दिसणारे संचय करीत आहेत. घराघरात स्त्रियांची सत्ता चालते. पत्‍नीचा भाऊ सल्लागार झाला आहे. लोक धनलोभाने कन्याविक्रय करू लागले आहेत आणि नवरा-बायकोमध्ये कलह होत आहे. (३१-३३)


आश्रमा यवनै रुद्धाः तीर्थानि सरितस्तथा ।
देवतायतनान्यत्र दुष्टैः नष्टानि भूरिशः ॥ ३४ ॥
न योगी नैव सिद्धो वा न ज्ञानी सत्क्रियो नरः ।
कलिदावानलेनाद्य साधनं भस्मतां गतम् ॥ ३५ ॥
अट्टशूला जनपदाः शिवशूला द्विजातयः ।
कामिन्यः केशशूलिन्यः संभवन्ति कलौ इह ॥ ३६ ॥
आश्रमी तीर्थ क्षेत्रात यवने धाक ठेविला ।
कितेक मंदिरे त्यांनी फोडिली तोडिली पहा ॥ ३४ ॥
सिद्धज्ञानी नसे कोणी सत्कर्मी योगि ना कुणी ।
कली दावानलीं सर्व साधने भस्म जाहली ॥ ३५ ॥
अन्नही विकिती हाटीं धनार्थ वेद सांगती ।
नटती थटती जाया वेश्यावृत्ति बळावली ॥ ३६ ॥

महात्मा पुरुषांचे आश्रम, तीर्थक्षेत्रे, नद्या इत्यादींवर परधर्मीयांचा अधिकार आहे. येथे दुष्टांनी बरीचशी देवालये नष्ट केली आहेत. यावेळी इथे कोणी योगी नाही, सिद्धपुरुष नाही, ज्ञानी नाही की सत्कर्म करणारा नाही. सर्व पुण्य साधने यावेळी कलिरूपी वणव्याने भस्मसात करून टाकली आहेत. या कलियुगात बहुतेक देशवासी बाजारात अन्न विकू लागले आहेत. ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवीत आहेत आणि स्त्रिया सदाचारहीन झाल्या आहेत. (३४-३६)


एवं पश्यन् कलेर्दोषान् पर्यटन् अवनीं अहम् ।
यामुनं तटमापन्नो यत्र लीला हरेरभूत् ॥ ३७ ॥
तत्राश्चर्यं मया दृष्टं श्रूयतां तन्मुनीश्वराः ।
एका तु तरुणी तत्र निषण्णा खिन्नमानसा ॥ ३८ ॥
कलीचा पाहता दोष यमुनातटि पातलो ।
इथे प्रत्यक्ष कृष्णाने लीला केल्या बहूत की ॥ ३७ ॥
मुनींनो ऐकणे तुम्ही आश्चर्य दिसले तिथे ।
युवती स्त्री कुणी एक बैसली खिन्न मानसी ॥ ३८ ॥

अशा तर्‍हेने कलियुगाचे दोष पहात पहात पृथ्वीवर संचार करीत असता मी, जेथे भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लीला संपन्न झाल्या, त्या यमुनेच्या तटावर जाऊन पोहोचलो. मुनिवर, ऐका. तेथे मी एक मोठे आश्चर्य पाहिले. एक तरुण स्त्री तेथे खिन्न मनाने बसली होती. (३७-३८)


वृद्धौ द्वौ पतितौ पार्श्वे निःश्वसन्तौ अचेतनौ ।
शुश्रूषन्ती प्रबोधन्ती रुदती च तयोः पुरः ॥ ३९ ॥
दशदिक्षु निरीक्षन्ती रक्षितारं निजं वपुः ।
वीज्यमाना शतस्त्रीभिः बोध्यमाना मुहुर्मुहुः ॥ ४० ॥
दोन वृद्ध तिचेपाशी श्वासे विकल जाहले ।
सचेत करण्या त्यांना लागली ती रडावया ॥ ३९ ॥
रक्षणार्थचि ती ईशा सर्वत्र धुंडु लागली ।
शेकडो तिजसी स्त्रीया पंखे ढाळोनि बोधिती ॥ ४० ॥

त्या स्त्रीजवळ दोन वृद्ध पुरुष निपचितपणे पडले होते व ते जोरात सुस्कारे टाकीत होते. ती तरुण स्त्री त्यांची सेवा करता करता त्यांना जागविण्याचा प्रयत्‍न करीत होती आणि त्यांच्यापुढे रडत होती. आपल्या रक्षणकर्त्याला ती दशदिशांना शोधत होती. तिच्या चारी बाजूंना शेकडो स्त्रिया तिला पंख्याने वारा घालीत होत्या व तिचे सांत्वन करीत होत्या. (३९-४०)


दृष्ट्वा दुराद् गतः सोऽहं कौतुकेन तदन्तिकम् ।
मां दृष्ट्वा चोत्थिता बाला विह्वला चाब्रवीद् वचः ॥ ४१ ॥
दुरोनी पाहिले सारे आश्चर्य वाटले मला ।
मला पाहोनिया आली शोक व्याकूळ बोलली ॥ ४१ ॥

दुरूनच हे दृश्य पाहून कुतूहल म्हणून मी तिच्याजवळ गेलो. मला पाहून ती तरुणी उभी राहिली व व्याकुळतेने म्हणाली - (४१)


बालोवाच -
भो भोः साधो क्षणं तिष्ठ मच्चिन्तामपि नाशय ।
दर्शनं तव लोकस्य सर्वथाघहरं परम् ॥ ४२ ॥
बहुधा तव वाक्येन दुःखशान्तिर्भविष्यति ।
यदा भाग्यं भवेद् भूरि भवतो दर्शनं तदा ॥ ४३ ॥
युवती म्हणाली -
क्षण थांबा इथे साधो माझी चिंता हरा तुम्ही ।
तुमच्या दर्शने सारी पातके नष्ट होत की ॥ ४२ ॥
बोधाने तुमच्या मी तो दुःखात शांत होतसे ।
भाग्याच्या उदये होती संतांची दर्शने अशी ॥ ४३ ॥

तरुणी म्हणाली - हे साधुपुरुषा, कृपया क्षणभर थांबून माझी चिंताही निवारण करा. आपल्या केवळ दर्शनाने या संसारातील सर्व पापे समूळ नाहीशी होतात. आपल्या वाणीने बहुतेक माझे दुःख दूर होऊ शकेल. मनुष्याचे ज्यावेळी मोठे भाग्य उदयाला येथे, त्याचवेळी आपले दर्शन होते. (४२-४३)


नारद उवाच -
कासि त्वं कौ इमौ चेमा नार्यः काः पद्मलोचनाः ।
वद देवि सविस्तारं स्वस्य दुःखस्य कारणम् ॥ ४४ ॥
नारदजी म्हणाले -
तिला मी पुसले कोण, तू नी दोघे पुरुष हे ।
कोण या देवता ऐशा तू अशी दुःखिता कशी ॥ ४४ ॥

नारद म्हणाले - हे देवी, तू कोण आहेस ? हे दोन पुरुष कोण आहेत ? तुझ्या भोवतालच्या या कमलनयना स्त्रिया कोण आहेत ? तुझ्या दुःखाचे कारण तू मला सविस्तर सांग (४४)


बालोवाच -
अहं भक्तिरिति ख्याता इमौ मे तनयौ मतौ ।
ज्ञानवैराग्य नामानौ कालयोगेन जर्जरौ ॥ ४५ ॥
गङ्‌गाद्या स्मरितश्चेमा मत्सेवार्थं समागताः ।
तथापि न च मे श्रेयः सेवितायाः सुरैरपि ॥ ४६ ॥
इदानीं श्रुणु मद्वार्तां सचित्तस्त्वं तपोधन ।
वार्ता मे वितताप्यस्ति तां श्रुत्वा सुखमावह ॥ ४७ ॥
युवती म्हणाली -
भक्ति नाम असे माझे ज्ञान वैराग्य ही मुले ।
कलीच्या गतिने त्यांची जाहली स्थिति ही अशी ॥ ४५ ॥
ह्या नद्या देवता गंगा माझ्या सेवेत पातल्या ।
प्रत्यक्ष देवता आल्या तरीही शांति ना मिळे ॥ ४६ ॥
हे तपी ध्यान देवोनी ऐकावी मम ही कथा ।
सर्वांना ज्ञात ती आहे ऐकोनी शांति द्या मला ॥ ४७ ॥

युवती म्हणाली - माझे नाव भक्ति. ज्ञान आणि वैराग्य या नावाचे हे माझे दोन पुत्र आहेत. कालगतीमुळे हे असे वृद्ध झाले आहेत. या देवता म्हणजे गंगा इत्यादी नद्या आहेत. अशा प्रकारे साक्षात देवतांच्या द्वारा माझी सेवा होत असूनही माझ्या मनाला समाधान नाही. हे तपस्वी, आता लक्षपूर्वक माझी कथा ऐका. खरेतर माझी कथा सर्वश्रुत आहे; तरीपण ती ऐकून आपण मला शांती प्रदान करा. (४५-४७)


उत्पन्ना द्रविडे साहं वृद्धिं कर्नाटके गता ।
क्वचित् क्वचित् महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गता ॥ ४८ ॥
तत्र घोर कलेर्योगात् पाखण्डैः खण्डिताङ्गका ।
दुर्बलाहं चिरं याता पुत्राभ्यां सह मन्दताम् ॥ ४९ ॥
वृन्दावनं पुनः प्राप्य नवीनेव सुरूपिणी ।
जाताहं उवती सम्यक् श्रेष्ठरूपा तु सांप्रतम् ॥ ५० ॥
जन्मले द्रविडी मी नी वाढले कन्नडात की ।
कौतुकिले महाराष्ट्रे गुर्जरी वृद्ध जाहले ॥ ४८ ॥
पाखंडे कलिच्या काले येथेचि मज ताडिले ।
मुले नी मीहि त्या देशी अशक्त वृद्ध जाहलो ॥ ४९ ॥
वृंदावनात आल्याने लाभले रुप यौवन ।
जाहले सुंदरा देही पुन्हा सोज्वळ ही अशी ॥ ५० ॥

द्रविड देशात माझा जन्म झाला. कर्नाटकात मी वाढले, महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला, परंतु गुजराथमध्ये मला वृद्धापकाळाने घेरले. तेथे घोर कलियुगाच्या प्रभावाने दुर्जनांनी मला छिन्नविच्छिन्न केले. दीर्घ कालपर्यंत माझी अशी अवस्था झाल्याने मी माझ्या पुत्रांसह अशी दुर्बल आणि निस्तेज झाले. परंतु आता मी या वृंदावनात पुन्हा आले व नवजीवन मिळाल्याप्रमाणे मला उत्तम सौंदर्य प्राप्त होऊन मी तरुण झाले. (४८-५०)


इमौ तु शयितौ अत्र सुतौ मे क्लिश्यतः श्रमात् ।
इदं स्थानं परित्यज्य विदेशं गम्यते मया ॥ ५१ ॥
जरठत्वं समायातौ तेन दुःखेन दुःखिता ।
साहं तु तरुणी कस्मात् सुतौ वृद्धौ इमौ कुतः ॥ ५२ ॥
समोर पडले माझे पुत्र दुःखी अशक्त की ।
येथून वाटते जावे दूर कोठे निघोनिया ॥ ५१ ॥
हे दोघे वृद्ध पाहोनी वाटते दुःख दारुण ।
का बरे तरुणी मी अन्‌ पुत्र का वृद्ध जाहले ॥ ५२ ॥

परंतु हे झोपलेले दोघे पुत्र थकले-भागलेले आहेत. हे स्थान सोडून मी दुसरीकडे जाऊ इच्छिते. हे माझे पुत्र वृद्ध झालेले पाहून मी त्या दुःखाने दुःखी झाले आहे. मी तर तरुण आहे, पण माझे हे दोन पुत्र वृद्ध कसे ? (५१-५२)


प्रयाणां सहचारित्वात् वैपरीत्यं कुतः स्थितम् ।
घटते जरठा माता तरुणौ तनयौ इति ॥ ५३ ॥
अतः शोचामि चात्मानं विस्मयाविष्टमानसा ।
वद योगनिधे धीमन् कारणं चात्र किं भवेत् ॥ ५४ ॥
सवेचि राहतो आम्ही तरी हे विपरीत कां ।
असावी वृद्ध ती माता तारुण्यी पुत्र हे हवे ॥ ५३ ॥
आश्चर्य वाटते आणि दुःख आणिक वाढते ।
सांगा योगी असे कां हो याचे कारण काय ते ॥ ५४ ॥

आम्ही तिघे एकत्र राहाणारे आहोत. तरी असे विपरीत का ? वास्तविक आई वृद्ध व पुत्र तरुण असावयास पाहिजे. या स्थितीचे मला आश्चर्य वाटत असल्याने मी शोकमग्न आहे. आपण बुद्धिमान आणि योगी आहात. म्हणून हे असे का, याचे कारण मला सांगा. (५३-५४)


नारद उवाच -
ज्ञानेनात्मनि पश्यामि सर्वं एतत् तवानघे ।
न विषादः त्वया कार्यो हरिः शं ते करिष्यति ॥ ५५ ॥
नारदजी म्हणाले -
न करी खेद तू बाले पाहतो ज्ञान दृष्टिने ।
रक्षील तुज तो देव क्षेम होवो तुझे तसे ॥ ५५ ॥

नारद म्हणाले - साध्वी, मी माझ्या हृदयातील ज्ञानदृष्टीने तुझ्या संपूर्ण दुःखाचे कारण जाणण्याचा प्रयत्‍न करतो. तुला दुःख करण्याचे कारण नाही. श्रीहरी तुझे कल्याण करील. (५५)


सूत उवाच -
क्षणमात्रेण तज्ज्ञात्वा वाक्यं ऊचे मुनीश्वरः ॥ ५६ ॥
सूतजी म्हणाले -
क्षणात जाणूनी सारे मुनी हे वाक्य बोलले ॥ ५६ ॥

सूत म्हणाले - मुनिवर नारदांनी एका क्षणात कारण जाणले व ते म्हणाले. (५६)


नारद उवाच -
श्रुणुषु अवहिता बाले योगोऽयं दारुणा कलिः ।
तेन लुप्तः सदाचारो योगमार्गः तपांसि च ॥ ५७ ॥
जना अघासुरायन्ते शाठ्यदुष्कर्मकारिणः ।
इह सन्तो विषीदन्ति प्रहृष्यन्ति हि असाधवः ।
धत्ते धैर्यं तु यो धीमान् स धीरः पण्डितोऽथवा ॥ ५८ ॥
नारदजी म्हणाले -
देवी सावध हो ऐक आहे हे कलियूग की ।
येणे सर्व सदाचार तपोबल हरीयले ॥ ५७ ॥
अधाशी हो‌उनी लोक खोटे दुष्कर्म वर्तती ।
संतांना दुःख देवोनी सुखात दुष्ट नांदती ॥
अशा या समया मध्ये बुद्धिवंत पुरुष जे ।
धैर्याने राहती सत्य तेचि पंडित ज्ञानि की ॥ ५८ ॥

नारद म्हणाले - देवी, लक्षपूर्वक ऐक. हे दारुण कलियुग असल्याने आता सदाचार, योगसाधन व तप ही सर्व लुप्त झाली आहेत. लोक लुटारूवृत्ती आणि दुष्कर्मे यांत प्रवृत्त होऊन राक्षसी वृत्तीचे बनले आहेत. या संसारात सत्पुरुष दुःखी आहेत; तर दुष्ट सुखी आहेत. या स्थितीत ज्या बुद्धिमान पुरुषाचे धैर्य टिकून राहील, तोच ज्ञानी किंवा पंडित समजावा. (५७-५८)


अस्पृश्यान् अवलोक्येयं शेषभारकरी धरा ।
वर्षे वर्षे क्रमात् जाता मंगलं नापि दृश्यते ॥ ५९ ॥
शेषभार धरा झाली आणि ती जड भासते ।
अस्पृश्य कुरुपा झाली अमंगळ अशीच ती ॥ ५९ ॥

ही पृथ्वी प्रतिवर्षी शेषाला भाररूप होऊ लागली आहे. तिला स्पर्श करणे राहोच, ती दृष्टी टाकण्यायोग्य देखील राहिलेली नाही आणि येथे काहीही कल्याणकारक असे दिसत नाही. (५९)


न त्वामपि सुतैः साकं कोऽपि पश्यति सांप्रतम् ।
उपेक्षितानुरागान्धैः जर्जरत्वेन संस्थिता ॥ ६० ॥
वृन्दावनस्य संयोगात् पुनस्त्वं तरुणी नवा ।
धन्यं वृन्दावनं तेन भक्तिः नृत्यति यत्र च ॥ ६१ ॥
अत्रेमौ ग्राहकाभावात् न जरामपि मुञ्चतः ।
किञ्चित् आत्मसुखेनेह प्रसुप्तिः मन्यतेऽनयोः ॥ ६२ ॥
मुलांसवे तुला कोणी नाही पाहत या जगी ।
विषयी रमले सारे तेणे वृद्ध तुम्ही असा ॥ ६० ॥
वृंदावनात आल्याने झालीस अशि सुंदरा ।
येथे तुझ्यात डुंबोनी गाती नाचति भक्त हे ॥ ६१ ॥
परी या तव पुत्रांना कोणी ग्राहक ना असे ।
म्हणोनी राहिले वृद्ध आत्मसुखि विसावले ॥ ६२ ॥

आता तुझ्या पुत्रांसह तुझे दर्शनही कोणास होत नाही. विषयांध झालेल्या जीवांकडून उपेक्षित झाल्याकारणाने तू जर्जर झाली होतीस वृंदावनातील वास्तव्याने तू पुन्हा नवतरुणी झाली आहेस. येथे भक्ती आनंदाने नृत्य करीत आहे, म्हणूनच वृंदावनधाम धन्य होय. परंतु तुझ्या या दोन पुत्रांचे येथे कोणीही चाहते नाहीत म्हणून यांचे वृद्धत्व नाहीसे होत नाही. इथे यांना किंचितसे आत्मसुख प्राप्त झाल्याकारणाने ते निद्रिस्त झाल्यासारखे वाटतात. (६०-६२)


भक्तिरुवाच -
कथं परीक्षिता राज्ञा स्थापितो ह्यशुचिः कलिः ।
प्रवृत्ते तु कलौ सर्वसारः कुत्र गतो महान् ॥ ६३ ॥
करुणापरेण हरिणापि अधर्म कथमीक्ष्यते ।
इमं मे संशयं छिन्धि त्वद्वाचा सुखितास्म्यहम् ॥ ६४ ॥
भक्ति म्हणाली -
सांगा परीक्षिते राये थारा कलिस का दिला ।
याच्या आगमने सारे सार निस्सत्व जाहले ॥ ६३ ॥
दयार्द्र हरि तो ऐसा अधर्म पाहतो कसा ।
मुनी शंका निवारावी वचने शांति लाभली ॥ ६४ ॥

भक्ती म्हणाली - राजा परीक्षिताने या पापी कलियुगाला येथे आश्रय का दिला ? याच्या आगमनानेच सर्व वस्तूंतील मोठे सारच कोठे नाहीसे झाले ? करुणामय श्रीहरींना हा अधर्म कसा पाहवतो ? मुनिवर, माझ्या या संशयाचे निराकरण करा. आपल्या वचनांनी मला खूपच शांती प्राप्त झाली आहे. (६३-६४)


नारद उवाच -
यदि पृष्टस्त्वया बाले प्रेमतः श्रवणं कुरु ।
सर्वं वक्ष्यामि ते भद्रे कश्मलं ते गमिष्यति ॥ ६५ ॥
यदा मुकुन्दो भगवान् क्ष्मां त्यक्त्वा स्वपदं गतः ।
तद्‌दिनात् कलिरायातः सर्वसाधनबाधकः ॥ ६६ ॥
नारदजी म्हणाले -
बाले तू ऐक प्रेमाने तुला उत्तर सांगतो ।
सर्व सांगेन जेणे तू जाशील सुखि हो‌उनी ॥ ६५ ॥
भूलोक सोडुनी जेव्हा स्वधामी कृष्ण पातले ।
त्या दिनी दोषकर्ता हा कली दारुण पातला ॥ ६६ ॥

नारद म्हणाले - बालिके, तू विचारलेच आहेस, तर मी तुला सर्व सांगतो. प्रेमाने ऐक. जेणेकरून हे कल्याणी, तुझे दुःख नाहीसे होईल. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण हा पृथ्वीलोक सोडून आपल्या परमधामाला गेला, त्या दिवसापासून सर्व साधनांमध्ये विघ्न आणणार्‍या कलियुगाची सुरुवात झाली. (६५-६६)


दृष्टो दिग्विजये राज्ञा दीनवत् शरणं गतः ।
न मया मारणीयोऽयं सारंग इव सरभुक् ॥ ६७ ॥
यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना ।
तत्फलं लभते सम्यक् कलौ केशवकीर्तनात् ॥ ६८ ॥
एकाकारं कलिं दृष्ट्वा सारवत्सारनीरसम् ।
विष्णुरातः स्थापितवान् कलिजानां सुखाय च ॥ ६९ ॥
दिग्विजय करोनीया राजा येताच त्या क्षणी ।
दीन रुपे कली आला शरणागत हो‌उनी ॥ ६७ ॥
न लाभे जे तपे योगे समाधीत न जे मिळे ।
कीर्तनी सर्व ते लाभे ऐसे तंत्र कलीत या ॥ ६८ ॥
सारहीन कली ऐसा सारयुक्तहि तो असे ।
सार पाहुनिया त्याला थारा राये दिला असे ॥ ६९ ॥

दिग्विजयाच्या वेळी अत्यंत दीन व शरण आलेल्या कलियुगाकडे परीक्षिताची दृष्टी गेली, तेव्हा भ्रमरासारख्या सारग्राही बुद्धीच्या राजाने असा निश्चय केला की, मी याचा वध करता कामा नये. कारण जे फळ तपस्या, योगसाधना आणि समाधीपासूनही मिळत नाही, तेच फळ कलियुगात श्रीहरिकीर्तनाने चांगल्या प्रकारे प्राप्त होते. अशाप्रकारे साररहित असूनही एकप्रकारे उपयुक्त आहे, असे जाणून परीक्षिताने कलियुगात जन्म घेणार्‍या मनुष्यमात्रांच्या सुखासाठी त्याला राहू दिले. (६७-६९)


कुकर्माचरनात्सारः सर्वतो निर्गतोऽधुना ।
पदार्थाः संस्थिता भूमौ बीजहीनास्तुषा यथा ॥ ७० ॥
विप्रैर्भागवती वार्ता गेहे गेहे जने जने ।
कारिता कणलोभेन कथासारस्ततो गतः ॥ ७१ ॥
कुकर्मे वागती लोक गेले सत्त्व निघोनिया ।
निरर्थक भुसा जैसा झाल्या वस्तु निरर्थक ॥ ७० ॥
लोभाने धन धान्याच्या विप्र भागवती कथा ।
सांगती गेहि गेही तै निस्सार जाहली कथा ॥ ७१ ॥

यावेळी लोक निंद्य कर्मांत प्रवृत्त झालेले असल्यामुळे सर्व वस्तूंमधील रस नाहीसा झाला असून सर्व पदार्थ बी नसलेल्या भुश्याप्रमाणे झाले आहेत. ब्राह्मण केवळ धनधान्याच्या लोभाने घरोघरी, प्रत्येकाकडे जाऊन भागवतकथा कथन करू लागले आहेत. त्यामुळे कथेचे सार निघून गेले आहे. (७०-७१)


अत्युग्रभूरिकर्माणो नास्तिका रौरवा जनाः ।
तेऽपि तिष्ठन्ति तीर्थेषु तीर्थसारस्ततो गतः ॥ ७२ ॥
कामक्रोध महालोभ तृष्णाव्याकुलचेतसः ।
तेऽपि तिष्ठन्ति तपसि तपःसारस्ततो गतः ॥ ७३ ॥
मनसश्चाजयात् लोभाद् दंभात् पाखण्डसंश्रयात् ।
शास्त्रान् अभ्यसनाच्चैव ध्यानयोगफलं गतम् ॥ ७४ ॥
अनंत घोर पापीही नरकी नास्तिकी नर ।
राहिले तीर्थि जावोनी प्रभाव संपला तिथे ॥ ७२ ॥
मनात काम-क्रोधादी लोभ माया खळाळली ।
ऐसे लोक तपी ढोंगी तेणे ते तप निष्फळ ॥ ७३ ॥
इंद्रियीं नसुनी ताबा दंभी पाखंडि होऊनी ।
अनभ्यासी मिटी डोळे तेणे ध्यान निरर्थक ॥ ७४ ॥

तीर्थक्षेत्रातही अनेक प्रकारची घोर कर्मे करणारे, नास्तिक तसेच नरकात जाण्याजोगे पुरुष राहू लागल्या कारणाने तीर्थक्षेत्रांचाही प्रभाव नाहीसा झाला आहे. ज्यांचे चित्त नेहमी काम, क्रोध, अतिलोभ आणि अभिलाषा यांसाठी व्याकूळ आहे, ते सुद्धा तप करू लागल्यामुळे तपाचेही सार निघून गेले आहे. मनावर नियंत्रण न राहिल्या कारणाने, तसेच लोभ, दंभ आणि नास्तिकतेचा आश्रय घेतल्याने, शास्त्राभ्यास न करण्याने ध्यानयोगाचे फलही नाहीसे झाले आहे. (७२-७४)


पण्डितास्तु कलत्रेण रमन्ते महिषा इव ।
पुत्रस्योत्पादने दक्षा अदक्षा मुक्तिसाधने ॥ ७५ ॥
म्हशीच्या परि तो संग विद्वान्‌ पत्‍नीशि भोगती ।
प्रजोत्पादनि ते ज्ञानी मुक्तिचे ज्ञान ना तया ॥ ७५ ॥

विद्वानांची अशी स्थिती आहे की, ते पशूंप्रमाणे स्व-स्त्रीशी संततिनिर्मितीच्या हेतूने रममाण होतात आणि मुक्ति मिळविण्याच्या साधनांकडे दुर्लक्ष करतात. (७५)


न हि वैष्णवता कुत्र संप्रदायपुरःसरा ।
एवं प्रलयतां प्राप्तो वस्तुसारः स्थले स्थले ॥ ७६ ॥
अयं तु युगधर्मो हि वर्तते कस्य दूषणम् ।
अतस्तु पुण्डरीकाक्षः सहते निकटे स्थितः ॥ ७७ ॥
वैष्णवता न ती कोठे संप्रदाय हि संपला ।
तेणेचि सर्व वस्तूंचे सार ते संपले जगी ॥ ७६ ॥
हा तो स्वभाव काळाचा नच दोषी कुणी तसा ।
पुंडरीकाक्ष तो नित्य साहितो हृदयी पहा ॥ ७७ ॥

संप्रदायानुसार प्राप्त झालेली विष्णुभक्ति कोठे दिसत नाही. अशा प्रकारे सगळीकडे, सर्व वस्तूंचे सारसर्वस्वच नाहीसे झाले आहे. हा तर कलियुगाचा स्वभाव आहे. तेव्हा याचा दोष अन्य कोणाला देणार ? याच कारणाने पुंडरीकाक्ष भगवान अगदी जवळ असूनही सर्व सहन करीत आहेत. (७०-७७)


सूत उवाच -
इति तद्वचनं श्रुत्वा विस्मयं परमं गता ।
भक्तिरूचे वचो भूयः श्रूयतां तच्च शौनक ॥ ७८ ॥
सूतजी सांगतात -
ऐसे हे बोल ऐकोनी भक्ति विस्मित जाहली ।
मग काय पुढे बोले भक्ति शौनक ऐकणे ॥ ७८ ॥

सूत म्हणाले - शौनका, देवर्षी नारदांचे असे वचन ऐकून भक्तीला मोठे आश्चर्य वाटले. त्यावर ती पुन्हा काय म्हणली, ते ऐक. (७८)


भक्तिरुवाच -
सुरर्षे त्वं हि धन्योऽसि मद्‌भाग्येन समागतः ।
साधूनां दर्शनं लोके सर्वसिद्धिकरं परम् ॥ ७९ ॥
(मालिनी)
जयति जयति मायां यस्य कायाधवस्ते
     वचनरचनमेकं केवलं चाकलय्य ।
ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं
     सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि ॥ ८० ॥
इति श्रीपद्मपुराणे उत्तरखण्डे श्रीमद्‌भागवतमाहात्म्ये
भक्तिनारदसमागमो नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
भक्ति म्हणाली -
महर्षि धन्य हो तुम्ही माझ्या भाग्यात भेट ही ।
साधूची भेट या लोकी श्रेष्ठ कल्याणकारक ॥ ७९ ॥
(मालिनी)
क्षणभर तव भेटीं भक्त प्रल्हाद बाळ
    कयधुकुमर तेणे मोह माया गिळीली ।
ध्रुवपद ध्रुवबाळा लाभले एक भेटी
    सकल कुशलपात्री ब्रह्मपुत्रा नमी मी ॥ ८० ॥
॥ इति श्री पद्मपुराणी उत्तरखंडी श्रीमद्‌भागवत् कथा माहात्म्य ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ पहिला अध्याय हा ॥ माहात्म्य १ ॥ हरिः ॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

भक्ती म्हणाली - देवर्षी, आपण धन्य आहात. माझ्या सद्‌भाग्यानेच माझी आपल्याशी भेट झाली. या संसारात साधूंच्या दर्शनानेच सर्व सिद्धी प्राप्त होतात. आपण केवळ एक वेळ उपदेश केल्याने कयाधूचा पुत्र प्रह्लाद याने मायेवर विजय मिळविला होता. आपल्या कृपेनेच ध्रुवाने ध्रुवपदही प्राप्त केले होते. आपण सर्व मंगलांचे मंगल तसेच साक्षात ब्रह्मदेवांचे पुत्र आहात. मी आपणांस नमस्कार करते. (७९-८०)
॥ अध्याय पहिला समाप्त ॥


अध्याय पहिला समाप्त

GO TOP