श्रीमद् भागवत महापुराण

माहात्म्य (श्रीस्कान्दे) - अध्याय १ ला

परीक्षित आणि वज्रनाभ यांची भेट, शांडिल्यमुनींच्या मुखातून
भगवंतांच्या लीलांचे रहस्य आणि वज्रभूमीच्या महत्त्वाचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

महर्षी व्यास म्हणतात - ज्यांचे स्वरूप सच्चिदानंदघन आहे, जे अनंत सुखाचा वर्षाव करतात, ज्यांच्या शक्‍तीनेच या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतात, त्या भगवान श्रीकृष्णांची आम्ही भक्‍तिरसाच्या प्राप्तीसाठी नित्य स्तुती करतो. (१)

नैमिषारण्यामध्ये आसनावर बसलेल्या बुद्धिमान सूतांना भगवंतांच्या कथांचे रसिक असलेल्या शौनकादी ऋषींनी प्रणाम करून विचारले. (२)

ऋषींनी विचारले- श्रीमथुरामंडलात अनिरुद्धपुत्र वज्रनाम आणि हस्तिनापुरामध्ये आपला नातू परीक्षित यांना राज्याभिषेक करून जेव्हा युधिष्ठीर हिमालयात निघून गेला, तेव्हा त्या दोघांनी कोणकोणती कार्ये कसकशी केली ? (३)

सूत म्हणाले -भगवान नारायण, नरोत्तम नर, देवी सरस्वती आणि महर्षि व्यासांना नमस्कार करून ’जय’ ग्रंथाचे पठन करावे. ब्रह्मर्षींनो ! धर्मराज महाप्रस्थानाला गेला, तेव्हा सम्राट परीक्षित एके दिवशी वज्रनाभाला भेटण्यासाठी मथुरेला गेला. पित्यासमान असणारा परीक्षित भेटण्यासाठी आल्याचे पाहून वज्रनाभाचे हृदय प्रेमाने भरून आले. त्याने त्याचे स्वागत करून व त्याला नमस्कार करून मोठ्या प्रेमाने आपल्या महालात आणले. ज्याचे मन नेहमी श्रीकृष्णांच्या ठायी रममाण झाले होते, त्या वीर परीक्षिताने वज्रनाभाला आलिंगन देऊन, अंतःपुरात जाऊन श्रीकृष्णांच्या रोहिणी इत्यादी पत्‍न्यांना नमस्कार केला. सम्राट परीक्षिताचा त्यांनी खूप सन्मान केला. विश्रांती घेतल्यानंतर आरामात बसून तो वज्रनाभाला म्हणाला. (४-८)

परीक्षित म्हणाला- " हे वज्रनाभा ! तुझे वडील आणि आजोबा यांनी माझे वडील आणि आजोबांना मोठमोठ्या संकटातून वाचविले. माझे रक्षणही त्यांनीच केले. प्रिय वज्रनाभा ! मी कितीही चांगल्या गोष्टी केल्या, तरी त्यांच्या उपकारांची परतफेड होऊ शकणार नाही. म्हणून मी तुला विनंती करतो की, तू खुशाल राज्यकारभारात माझी मदत घे. तुला खजिन्याची, सौन्याची किंवा शत्रुंना धाकात ठेवणे इत्यादींची जरासुद्धा काळजी करण्याचे कारण नाही. (याबाबतीत मी तुला साह्य करीन.) तू फक्‍त तुझ्या या मातांची चांगल्या तर्‍हेने सेवा कर. तुला काही अडचण आली, तर मला सांग . मी ती दूर करीन. हे ऐकून वज्रनाभ अतिशय प्रसन्न होऊन त्याला म्हणाला. (९-१२)

वज्रनाभ म्हणाला - महाराज ! आपण मला जे काही सांगितले, ते आपणास साजेसेच आहे. मला धनुर्विद्या शिकवून आपल्या वडिलांनीसुद्धा माझ्यावर मोठेच उपकार केले आहेत. मी क्षत्रियाला योग्य अशा शौर्याने चांगल्या रीतीने संपन्न असल्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची किंचितशीसुद्धा काळजी वाटत नाही. मला फक्‍त एकाच गोष्टीची मोठी चिंता आहे. त्यासंबंधी आपण काहीसा विचार करावा. माझा मथुरेच्या राज्यावर अभिषेक झाला असला तरी मी निर्जन वनातच आहे. येथील प्रजा कोठे निघून गेली, याविषयी मला काहीच माहीती नाही. प्रजा असेल, तरच राज्याचे सुख असते ना ! वज्रनाभाने परीक्षिताला असे म्हटल्यावर वज्रनाभाच्या शंकेचे निरसन करण्यासाठी त्याने नंदादिकांचे पुरोहित महर्षी शांडिल्य यांना बोलाविले. (१३-१६)

तेव्हा शांडिल्य पर्णकुटीतून बाहेर पडून ताबडतोब तेथे येऊन पोहोचले. वज्रनाभाने त्यांचा विधिपूर्वक सत्कार केला. नंतर ते उच्चासनावर विराजमान झाले. वज्रनाभाचे म्हणणे परीक्षिताने त्यांना सांगितले. तेव्हा अत्यंत प्रसन्नतेने महर्षी शांडिल्य त्यांचे सांत्वन करीत म्हणू लागले. (१७-१८)

शांडिल्य म्हणाले - व्रजभूमीचे रहस्य मी तुम्हांला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. ’व्रज’ शब्दाचा अर्थ व्याप्ती असा आहे. या व्युत्पत्तीनुसार , व्यापक असल्याकारणानेच या भूमीचे ’व्रज’ असे नाव पडले आहे. सत्त्व, रज, तम या तीन गुणांच्या पलीकदे जे परब्रह्म आहे, तेच व्यापक आहे. म्हणून त्याला ’व्रज’ असे म्हणतात. ते सदानंदस्वरूप, परम ज्योतिर्मय आणि अविनाशी आहे. मुक्‍तांचे तेच स्थान आहे. या व्रजधामामध्ये नंदनंदन भगवान श्रीकृष्णांचा निवास आहे. त्यांचा श्रीविग्रह सच्चिदानंदस्वरूप आहे. ते आत्माराम आणि आप्तकाम आहेत. प्रेमरसात बुडालेले रसिकजनच त्यांचा अनुभव घेतात. भगवान श्रीकृष्णांची आत्मा आहे राधिका. तिच्याशी रममाण होत असल्याकारणानेच हे रहस्य जाणणारे ज्ञानी त्यांना ’ आत्माराम’ म्हणतात. ’काम’ म्हणजे हवे असलेले पदार्थ. भगवान श्रीकृष्णांना हवे असलेले व्रजातील पदार्थ म्हणजे गाई, गोप,गोपी आणि त्यांच्याबरोबर लीला करणे, विहार करणे इत्यादी. हे सर्व त्यांना नेहमीच मिळालेले असते, म्हणूनच श्रीकृष्णांना ’आप्तकाम’ असे म्हटले गेले आहे. त्यांचे हे रहस्य प्रकृतीच्याही पलीकडील आहे. ते जेव्हा प्रकृतीबरोबर हे खेळ खेळू लागतात, तेव्हा दुसरे लोकसुद्धा त्यांच्या लीलेचा अनुभव घेतात. प्रकृतीच्याबरोबर होणार्‍या लीलेमध्येच रजोगुण, सत्त्वगुण आणि तमोगुण यांच्याद्वारे होणारी सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांची प्रचीती येते. अशा प्रकारे भगवंतांची लीला ही एक पारमार्थिक आणि दुसरी व्यवहारतील, अशी दोन प्रकारची असते. पारमार्थिक लीला ही स्वसंवेद्य असते. जीवांच्या देखत जी लीला होते ती व्यावहारिक लीला होय. पारमार्थिक लीलेखेरीज व्यावहारीक लीला होऊ शकत नाही; परंतु व्यावहारिक लीलेचा पारमार्थिक लीलेत प्रवेश होऊ शकत नाही. तुम्ही दोघेजण भगवंतांची जी लीला पाहात आहात, ती व्यावहारिक लीला आहे. पृथ्वी इत्यादी लोक या लीलेच्या अंतर्गत आहेत. याच पृथ्वीवर हे मथुरामंडळ आहे. जेथे भगवंतांची ती पारमार्थिक लीला गुप्तरूपाने सदैव होत असते, तीच ही व्रजभूमी आहे. कधी कधी प्रेमपूर्ण भक्‍तांना ती येथे सगळीकडे दिसू लागते. अठ्ठाविसाव्या द्वापर युगाच्या शेवटी जेव्हा केव्हा भगवंतांच्या रहस्य-लीलेचे अधिकारी येथे एकत्र येतील, त्यावेळी सुद्धा आताप्रमाणेच भगवान आपल्या भक्‍तांसह अवतार घेतील. हेतू हाच की, आपल्या अधिकारी भक्‍तांत मिसळता यावे. त्यावेळी भगवंतांचे प्रिय देव इत्यादीसुद्धा सगळीकडे अवतार घेतील. (१९-३०)

आता एवढ्यात, अगदी अलीकडे , जो अवतार झाला होता, त्यावेळी भगवंत आपल्या सर्व आवडत्या भक्‍तांच्या अभिलाषा पूर्ण करून अंतर्धान पावले आहेत. यावरून हे निश्चित झाले की, येथे भगवंत येण्याआधी तीन प्रकारचे भक्‍तजन उपस्थित होते, यात कोणतीही शंका नाही. त्यांपैकी पहीले नित्य ’अंतरंग’ पार्षद . दुसरे त्यांच्या अंतरंग-लीलेत प्रवेश करून घेऊ इच्छिणारे. तिसरे देवता इत्यादी. यांपैकी देवादिकांना भगवंतांनी अगोदरच व्रजभूमीतून द्वारकेत नेऊन पोहोचविले होते. नंतर त्यांनाच मुसळाचे निमित्त करून पुन्हा आपापल्या अधिकारावर पाठविले. तसेच जे भगवंतांनाच प्राप्त करून घेण्याची इच्छा करणारे होते, त्यांना प्रेमानंदस्वरूप बनवून नेहमीसाठी आपल्या नित्य अंतरंग-पार्षदांमध्ये सामील करून घेतले. जे सर्व नित्य पार्षद आहेत, ते अजूनही येथे असले, तरी जे त्यांच्या दर्शनचे अधिकारी नाहीत, त्यांना ते दिसत नाहीत. जे लोक व्यावहारीक लीला पाहात होते, ते नित्यलीलेच्या दर्शनाचे अधिकारी नाहीत. म्हणून येथे येणार्‍यांना सगळीकडे निर्जन वनच दिसते. (३१-३५)

म्हणून, हे वज्रनाभा ! तुला काळजी करण्याचे कारण नाही. माझ्या आज्ञेने तू येथे पुष्कळशी गावे वसव. त्यामुळे तुझे मनोरथ पूर्ण होतील. भगवान श्रीकृष्णांनी जेथे जशी लीला केली, त्यानुसार त्या ठिकाणाचे नाव ठेवून तू अनेक गावे वसव आणि अशा प्रकारे दिशा अशा या व्रजभूमीचे चांगल्या रीतीने सेवन करीत राहा. गोवर्धन, दिर्घपूर (डीग), मथुरा, महावन (गोकुळ), नंदिग्राम (नंदगाव) आणि ब्रहत्सानू (बरसाना) या ठिकाणी तू गावे निर्माण कर. भगवंतांच्या लीलांची ठिकाणे असलेल्या नदी, पर्वत, दर्‍या, सरोवर, कुंड, लताकुंज, वने इत्यादींचे सेवन करीत राहिले असता तुझ्या राज्यातील प्रजा अतिशय सुखसंपन्न होईल आणि तुलासुद्धा आनंद मिळेल. ही व्रजभूमी सच्चिदानंदमय आहे. म्हणून प्रयत्‍नपूर्वक तू या भूमीचे सेवन केले पाहिजेस. भगवंतांच्या लीलांची ठिकाणे माझ्या कृपेने तुझ्या लक्षात येवोत. हे वज्रनाभा ! ह्या व्रजभूमीचे सेवन करीत राहिल्याने तुला उद्धव भेटतील. त्यांच्याकडून मातांसह तुला हे रहस्य कळेल. (३६-४१)

एवढे बोलून शांडिल्य श्रीकृष्णांचे स्मरण करीत, आपल्या आश्रमाकडे निघून गेले. ते ऐकून परीक्षित आणि वज्रनाभ अतिशय प्रसन्न झाले. (४२)

अध्याय पहिला समाप्त

GO TOP