श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १२ वा - अध्याय १३ वा

विभिन्न पुराणांची श्लोकसंख्या आणि श्रीमद्‌भागवताचा महिमा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूत म्हणतात - ब्रह्मदेव, वरुण, इंद्र, रुद्र, आणि मरुद्‍गण दिव्य स्‍तोत्रांनी ज्यांची स्तुती करतात, सामगायन करणारे ऋषी अंग, पद, क्रम तसेच उपनिषदांसह वेदांच्याद्वारे ज्यांचे गायन करतात, योगी ध्यानाच्या वेळी निश्वल झालेल्या मनाने ज्यांचे दर्शन घेतात आणि देव-दैत्यसुद्धा ज्यांचे खरे स्वरूप जाणत नाहीत, त्या स्वयंप्रकाश परमात्म्याला नमस्कार असो. ज्यावेळी भगवंतांनी कच्छपरूप धारण केले होते आणि त्यांच्या पाठीवर मोठा मंदराचल रवीसारखा फिरत होता, त्यावेळी मंदराचलाच्या पहाडांच्या टोकांनी खाजविल्यामुळे ज्यांना झोप आली, त्यावेळचे त्यांचे श्वासरूप वायू तुमचे रक्षण करतो. त्यावेळी त्या श्वासाच्या वायूमुळे जी समुद्राच्या पाण्यात खळबळ माजली, त्या संस्कारांच्या खुणा आजही शिल्लक आहेत. त्यामुळेच समुद्राच्या पाण्याची जी सतत किनार्‍यावर लाटांच्या रूपाने ये-जा चालू झाली, ती अजूनही थांबत नाही. (१-२)

आता पुराणांची वेगवेगळी श्लोकसंख्या, त्यांची बेरीज, श्रीमद्‌भागवताचा प्रतिपाद्य विषय आणि त्याचा हेतू, हा ग्रंथ दान देण्याची पद्धत, दान आणि पठण इत्यादींचा महिमासुद्धा ऐक. ब्रह्मपुराणात दहा हजार, पद्मपुराणात पंचावन्न हजार, श्रीविष्णुपुराणात तेवीस हजार आणि शिवपुराणात चोवीस हजार श्र्लोक आहेत. श्रीमद्‌भागवतामध्ये अठरा हजार, नारदपुराणात पंचवीस हजार, मार्कंडेय पुराणात नऊ हजार तसेच अग्निपुराणात पंधरा हजार चारशे हजार पाचशे, ब्रह्मवैवर्ताची अठरा हजार तसेच लिंग पुराणाची अकरा हजार आहे. वराहपुराणाची श्लोकसंख्या चोवीस हजार, स्कंदपुराणाची एक्याऐंशी हजार एकशे आहे आणि वामनपुराणाची दहा हजार आहे. कूर्मपुराण हे सतरा हजार श्लोकांचे आणि मत्स्यपुराण चौदा हजार श्लोकांचे आहे. गरुडपुराणामध्ये एकोणीस हजार श्लोक आणि ब्रह्मांड-पुराणात बारा हजार श्र्लोक आहेत. अशा प्रकारे सर्व पुराणांची श्लोकसंख्या एकूण चार लक्ष आहे. त्यांपैकी श्रीमद्‌भागवत अठरा हजार श्लोकांचे आहे. (३-९)

भगवान विष्णूंनी पूर्वी आपल्या नाभिकमळात असलेल्या व संसारामुळे भयभीत झालेल्या ब्रह्मदेवाला कृपा करून हे सांगितले. याच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी वैराग्य अत्पन्न करणार्‍या पुष्कळ कथा आहेत. भगवान श्रीहरींच्या ज्या लीला-कथा या महापूराणात आहेत, त्या अमृतस्वरूप असून सत्पुरुष आणि देवांनाही आनंद देणार्‍या आहेत. सर्व वेदान्तांचे सार म्हणजे ब्रह्म आणि आत्म्याची एकतारूप अद्वितीय सद्वस्तू प्रतिपादन करणे व त्याचे फल म्हणजे मोक्ष. श्रीमद्‌भागवताचाही विषय तोच आहे. (१०-१२)

जो पुरुष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी श्रीमद्‌भागवताचे सुवर्ण-सिंहासह दान करतो, त्याला परमगती प्राप्त होते. जोपर्यंत सर्वश्रेष्ठ श्रीमद्‌भागवत महापुराणाचे दर्शन होत नाही, तोपर्यंतच संतांच्या सभेमध्ये दुसरी पुराणे शोभून दिसतात. (१३-१४)

हे श्रीमद्‌भागवत सर्व वेदान्तांचे सार आहे. या रसामृताचे पान करून जो तृप्त झाला, तो दुसर्‍या कोणत्याही पुराणात रमत नाही. जशी नद्यांमध्ये गंगा, देवतांमध्ये विष्णू आणि वैष्णवांमध्ये श्रीशंकर सर्वश्रेष्ठ आहेत, त्याचप्रमाणे पुराणांमध्ये श्रीमद्‌भागवत आहे. हे ऋषींनो ! सर्व क्षेत्रांमध्ये जशी काशी सर्वश्रेठ आहे, त्याचप्रमाणे सर्व पुराणांमध्ये श्रीमद्‌भागवत आहे. श्रीमद्‌भागवत हे सर्व दृष्टींनी नर्दोष पुराण आहे. वैष्णवांना हे अत्यंत प्रिय आहे. या पुराणामध्ये जीवन्मुक्‍त परमहंसांच्या अद्वितीय तसेच मायेपासून पूर्णतः अलिप्त अशा ज्ञानाचे वर्णन केले गेले आहे. या ग्रंथात सर्व कर्मांपासून आत्यंतिक निवृत्ती ही ज्ञान, वैराग्य आणि भक्‍ती यांनी युक्‍त अशी आहे. जो याचे भक्‍तीने श्रवण, पठण आणि मनन करतो, तो मुक्‍त होतो. (१५-१८)

हा अजोड ज्ञानरूप दिवा सर्वप्रथम ज्यांनी ब्रह्मदेवासाठी प्रकाशित केला, नंतर ज्यांनी ब्रह्मदेवाच्या रूपाने नारदांना, पुढे नारदांच्या रुपाने व्यासांना, त्यानंतर ज्यांनी व्यासरूपाने योगींद्र शुकदेवांना आणि श्रीशुकदेवांच्या रुपाने दयाळू होऊन परीक्षिताला उपदेश केला, त्या परम शुद्ध मायामलापासून रहित, शोकरहित अविनाशी परम सत्यस्वरूप परमेश्वराचे आम्ही ध्यान करतो. आम्ही त्या सर्वसाक्षी भगवान वासुदेवांना नमस्कार करतो. ज्यांनी कृपा करून मोक्षाभिलाषी ब्रह्मदेवांना याचा उपदेश केला, त्या योगिराज ब्रह्मस्वरूप श्रीशुकदेवांना नमस्कार असो. ज्यांनी हे महापुराण ऐकवुन संसारसर्पाने दंश केलेल्या परीक्षिताला मुक्‍त केले. हे देवाधिदेवा ! प्रभो! ज्या अर्थी आपणच आमचे पालनकर्ते आहात, म्हणून आपणच, आता आमच्यावर अशी कृपा करा की, प्रत्येक जन्मात आपल्या चरणकमलांवरच आमची भक्‍ती राहो. (१९-२२)

ज्या भगवंतांच्या नामांचे संकीर्तन सर्व पापे सर्वथैव नष्ट करते आणि ज्या भगवंतांच्या चरणांना केलेले वंदन सर्व प्रकारची दुःखे नाहीशी करते, त्याच परमतत्त्वस्वरूप श्रीहरींना मी नमस्कार करतो. (२३)

अध्याय तेरावा समाप्त

GO TOP