|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय १० वा
मार्कंडेयला शंकरांचे वरदान - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] सूत म्हणतात - अशा तर्हेने मार्कंडेय मुनीने नारायणनिर्मित योगमाया-वैभवाचा अनुभव घेतला. आणि तो त्यांनाच शरण गेला. (१) मार्कंडेय म्हणाला - प्रभो ! आता मला कळले की, ज्या आपल्या मायेने ती खरीच आहे असे वाटून मोठमोठे विद्वानसुद्धा का मोहित होतात ते. शरणगतांना अभय देणार्या आपल्या चरणकमलांनाच मी शरण आलो आहे.(२) सूत म्हणतात - अशा प्रकारे शरणागत झालेल्या त्याला पार्वतीसह नंदीवर स्वार होऊन आकाशमार्गाने फिरणार्या भगवान शंकरांनी पाहिले. त्यांच्याबरोबर त्यांचे गणसुद्धा होते. पार्वती देवींनी मार्कंडेय मुनीला ध्यानावस्थेत पाहून शंकरांना म्हटले, “भगवन ! या ब्राम्हणाकडे पहा ना ! वादळ शांत झाल्यावर, लाटा आणि मासे शांत झालेला समुद्र जसा असतो, तसा शरीर, इंद्रिये आणि अंतःकरण शांत झालेला हा मुनी आहे. सर्व सिद्धी देणारे साक्षात आपणच असल्यामुळे आपण याला तपश्चर्येचे फळ द्यावे.” (३-५) भगवान शंकर म्हणाले - देवी ! हा ब्रह्मर्षी कोणत्याही वस्तूची, किंबहुना मोक्षाचीही इच्छा करीत नाही. कारण याला अविनाशी भगवंतांच्या ठिकाणी पराभक्ती प्राप्त झालेली आहे. देवी ! तरीसुद्धा आपण या महात्म्याशी बोलू. कारण संतांचा सहवास मिळणे, हाच माणसांच्या दृष्टीने फार मोठा लाभ आहे. (६-७) सूत म्हणतात - एवढे बोलून सर्व विद्यांचे प्रवर्तक, सर्व प्राण्यांच्या ह्रदयात असलेले व संतांचे आश्रय भगवान शंकर मार्कंडेयाजवळ आले. मार्कंडेयाच्या मनोवृत्ती त्यावेळी निरूद्ध असल्यामुळे त्याला आपल्या शरीराचे किंवा जगाचे अजिबात भान नव्हते. त्यामुळे त्याला विश्वाचे आत्मा साक्षात भगवान गौरी-शंकर आलेले कळले नाही. भगवान कैलासपतींनी ते जाणून वारा ज्याप्रमाणे छिद्रात शिरतो, त्याप्रमाणे योगमायेने मुनीच्या ह्रदयाकाशात प्रवेश केला. मार्कंडेयाला दिसले की, त्याच्या ह्रदयामध्ये शंकर आले आहेत. त्यांच्या मस्तकावर विजेप्रमाणे चमकणार्या पिवळ्याधमक जटा शोभत आहेत. तीन डोळे आणि दहा हात आहेत. त्यांचे शरीर, उगवणार्या सूर्यासारखे तेजस्वी आहे. त्यांनी शरीरावर व्याघ्रजिन पांघरले आहे आणि हातामध्ये त्रिशूळ, खट्वांग, ढाल, रुद्राक्ष-माळ, डमरू, भिक्षापात्र, तलवार आणि धनुष्य घेतलेले आहे. आपल्या ह्रदयात अचानकपणे प्रगट झालेल्या भगवान शंकरांना पाहून मुनी आश्चर्यचकित झाला. “हे काय आहे? हे कोठून आले?” या वृत्तींचा चित्तात उदय झाल्याने त्याची समाधी उतरली. डोळे उघडून पाहिले तर तिन्ही लोकांचे एकमेव गुरू भगवान शंकर, पार्वतीदेवी व गणांसह आले आहेत. तेव्हा त्याने त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून प्रणाम केला. त्यानंतर मुनीने स्वागत, आसन, पाद्य, अर्घ्य, गंध, पुष्पमाला, धूप, दीप इत्यादी उपचारांनी भगवान शंकरांची पार्वती आणि गणांसह पूजा केली. आणि म्हटले, “हे सर्वव्यापक आणि सर्वशक्तिमान प्रभो ! आपण आत्मानुभूतीने पूर्णकाम आहात. ज्या आपल्यामुळेच जग आनंदपूर्ण आहे, त्या आपली मी काय सेवा करू? मी आपल्या त्रिगुणातीत सदाशिव स्वरूपाला आणि सत्वगुणाने युक्त अशा शांत स्वरूपाला नमस्कार करीत आहे. मी आपल्या रजोगुणयुक्त सर्वप्रवर्तक स्वरूपाला तसेच तमोगुणयुक्त अघोर स्वरुपालाही नमस्कार करीत आहे.”(८-१७) सूत म्हणतात - मार्कंडेयाने संतांचे परम आश्रय असलेल्या देवाधिदेव भगवान शंकरांची अशी स्तुती केली, तेव्हा ते त्याच्यावर अत्यंत संतुष्ट झाले आणि अतिशय प्रसन्न चित्ताने हसत हसत त्याला म्हणाले. (१८) भगवान शंकर म्हणाले - ब्रह्मदेव, विष्णू व मी असे आम्ही तिघेही वर देणार्यांचे स्वामी आहोत. आमचे दर्शन कधीही व्यर्थ जात नाही. आमच्याकडूनच मरणशील मनुष्यसुद्धा अमृतत्वाची प्राप्ती करून घेतो. म्हणून तुझी जी इच्छा असेल, तो वर माझ्याकडून मागून घे. ब्राम्हण सच्छील, शांतचित्त, अनासक्त, प्राण्यांवर प्रेम करणारे, कोणाशी वैर न करणारे, समदर्शी आणि आमचे निःसीम भक्त असतात. सगळे लोक आणि लोकपाल अशा ब्राम्हणांना वंदन करून त्याची पूजा-उपासना करतात. मी, भगवान ब्रह्मदेव व भगवान विष्णूसुद्धा त्यांचा आदर करतात. असे महापुरूष, मी, विष्णू, ब्रह्मदेव, आपण स्वतः आणि सर्व जीव यांच्यामध्ये जराही भेद पाहात नाहीत. म्हणून आम्ही तुम्हासारख्या महात्म्यांची स्तुती करतो. केवळ पाणी म्हणजे तीर्थ नव्हे. फक्त जड मूर्तीच देवता नव्हेत. कारण तीर्थ आणि देवता पुष्कळ दिवसांनंतर पवित्र करतात, परंतु तुम्ही मात्र दर्शनानेच पवित्र करता. आम्ही ब्राम्हणांनाच नमस्कार करतो. कारण ते चित्ताची एकाग्रता, तपश्चर्या, स्वाध्याय, धारणा, ज्ञान आणि समाधीच्याद्वारे आमचे वेदमय रूप धारण करतात. महापापी आणि अंत्यजसुद्धा तुम्हासारख्या महापुरूषांचे चरित्रश्रवण आणि दर्शनानेच शुद्ध होतात, तर मग तुमच्याशी संभाषण, सहवास इत्यादींनी ते शुद्ध होतील, यात काय संशय ? (१९-२५) सूत म्हणतात - चंद्रभूषण भगवान शंकरांचे धर्माच्या रहस्याने परिपूर्ण असे अमृतमय बोलणे कानांनी अत्यंत तन्मयतेने ऐकून मुनीची तृप्ती होत नव्हती. भगवंतांच्या मायेने पुष्कळ काळापर्यंत भटकल्याने तो अतिशय थकला होता. आता शंकरांच्या वाणीरूप अमृताचे प्राशन केल्याने त्याचे सर्व क्लेश नाहीसे झाले. तो त्यांना म्हणाला. (२६-२७) मुनी म्हणाला- भगवंतांची ही लीला माणसांच्या आकलनशक्तीच्या पलीकडची आहे. कारण आपल्यासारखे सगळ्या जगाचे स्वामी असूनही ते त्यांच्या अधीन असणार्या आमच्यासारख्या पामरांना वंदन करून त्यांची स्तुती करतात. धर्माविषयी सांगणारे, साधारणतः प्राण्यांना धर्माचे रहस्य आणि स्वरुप समजावून सांगण्यासाठी धर्मानुसार आचरण करतात आणि त्यालाच दुजोरा देतात. तसेच जो कोणी धर्माचे आचरण करीत असेल, त्याची प्रशंसा करतात. जादुगार ज्याप्रमाणे पुष्कळ खेळ दाखवितो, पण त्या खेळांमुळे त्याच्या प्रभावात काही उणेपणा येत नाही, त्याचप्रमाणे आपण आपल्या मायामय वर्तनाने कुणाची वंदन-स्तुती केली, तरी त्यामुळे आपला महिमा कमी होत नाही. एखाद्या स्वप्न पाहाणार्याप्रमाणे आपण आपल्या मनाचेच संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आणि स्वतः हिच्यामध्ये प्रवेश करून स्वतः कर्ता न होताही, कर्म करणार्या गुणांच्या द्वारा कर्त्याप्रमाणे आपण स्वतःला भासवत आहात. (२८-३१) भगवन ! आपण त्रिगुणस्वरूप असूनही त्यांचा आत्मा आहात. केवल, अद्वितीय, ब्रह्मस्वरूप गुरू आहात. मी आपणास नमस्कार करीत आहे. हे अनंता ! आपल्या श्रेष्ठ दर्शनाखेरीज मी आपणाकडून दुसरा कोणता वर मागून घेऊ ? आपल्या दर्शनानेच माणसाच्या सर्व कामना पूर्ण होऊन तो सत्यसंकल्प होतो. स्वतः परिपूर्ण असून भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करणार्या आपल्याकडे मी एक वरदान मागतो. ते हे की, आपल्या ठिकाणी व आपल्या शरणागत भक्तांच्या ठिकाणी माझी अचल भक्ती असावी. (३२-३४) सूत म्हणतात - मार्कंडेय मुनीने आपल्या सुमधुर वाणीने जेव्हा भगवान शंकरांची अशी स्तुती आणि पूजा केली. तेव्हा त्यांनी पार्वतीच्या प्रेरणेने त्याला म्हटले. महर्षे ! तुझ्या सर्व कामना पूर्ण होवोत ! परमात्म्याच्या ठिकाणी तुझी अनन्य भक्ती राहो. कल्पांतापर्यंत तुझे पवित्र यश राहो आणि तू अजर आणि अमर हो. ब्रह्मन ! ब्रह्मतेज धारण करणार्या तुला तिन्ही काळातील ज्ञान असो. वैराग्ययुक्त विज्ञानही प्राप्त होवो. तसेच तू पुराणांचाही आचार्य हो. (३५-३७) सूत म्हणतात - त्रिलोचन भगवान शंकर, अशा प्रकारे मार्कंडेयाला वर देऊन मार्कंडेय मुनीची तपश्चर्या व त्याचे प्रलयासंबंधीचे अनुभव भगवती पार्वतीला सांगत, तेथून निघून गेले. भृगुवंश-शिरोमणी मार्कंडेय मुनीला त्याच्या महायोगाचे परम फल प्राप्त झाले. तो भगवंतांचा अनन्य भक्त अजूनही पृथ्वीवर विहार करीत आहे. ज्ञान संपन्न मार्कंडेय मुनीने, भगवंतांच्या योगमायेची जी अद्भुत लीला अनुभवली. ती मी वर्णन करून सांगितली. मार्कंडेय मुनीने हा जो अनेक कल्पांचा अनुभव घेतला, तो म्हणजे मार्कंडेयाला दाखविण्यासाठी भगवंतांनी मायेने केलेली तात्पुरती लीला होती. तो खरा प्रलय नव्हता. हे जाणून न घेताच काही अज्ञानी लोक अनादिकाळापासून वारंवार होत असणरा हा प्रलय होय, असे म्हणतात. (३८-४१) हे भृगुश्रेष्ठा ! मी आपल्याला हे जे मार्कंडेयचरित्र ऐकविले, ते भगवान चक्रपाणींचा प्रभाव आणि महिमा यांनी भरलेले आहे. जे याचे श्रवण आणि कीर्तन करतात, ते दोघेही कर्म-वासनांमुळे प्राप्त होणार्या जन्म-मरणाच्या फेर्यांतून मुक्त होतात. (४२) अध्याय दहावा समाप्त |