श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १२ वा - अध्याय ११ वा

भगवंतांची अंगे, उपांगे आणि आयुधांचे रहस्य तसेच वेगवेगळ्या सूर्यगणांचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

शौनक म्हणाला - सूत महोदय ! आपण भागवताचे तत्त्व जाणणारे आणि अनेक विषय जाणणारे आहात. सर्व शास्त्रांच्या सिद्धांतांसंबंधी आम्ही आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो. भगवान आपले कल्याण करोत. आम्ही क्रियायोगाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेऊ इच्छितो; कारण कौशल्याने आणि योग्य तर्‍हेने त्याचे आचरण केल्याने मनुष्य अमरत्व प्राप्त करून घेतो. म्हणून आपण आम्हांला हे सांगा की, पांचरात्र इत्यादी तंत्रांचा विधी जाणणारे लोक फक्त श्रीलक्ष्मीपती भगवंतांची आराधना करतेवेळी कोणकोणत्या तत्त्वांनी त्यांचे चरण इत्यादी अंगे, गरुडादी उपांगे, सुदर्शन इत्यादी आयुधे आणि कौस्तुभ इत्यादी अलंकारांची कल्पना करतात ? (१-३)

सूत म्हणाले - मी श्रीगुरूदेवांच्या चरणांना नमस्कार करून, ब्रह्मदेव इत्यादी आचार्यांनी , वेदांनी तसेच पांचरात्र इत्यादी तंत्रग्रंथांनी श्रीविष्णूंच्या ज्या विभूतींचे वर्णन केले आहे, ते सांगतो. भगवंतांच्या ज्या चेतन विराट रूपामध्ये हे त्रैलोक्य दिसते, ते प्रकृती, सूत्रात्मा, महतत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या नऊ तत्त्वांनी निर्माण झालेले आहे. हे भगवंतांचेच पुरूषरूप आहे. पृथ्वी याचे चरण, स्वर्ग मस्तक, अंतरिक्ष नाभी, सूर्य नेत्र, वायू नासिका आणि दिशा कान आहेत. (४-६)

प्रजापती लिंग, मृत्यू गुदस्थान, लोकपाल बाहू, चंद्र मन आणि यम भुवया आहेत. लज्जा वरचा ओठ, लोभ खालचा ओठ, चांदणे दात, भ्रम हास्य, झाडे रोम आणि ढग हेच विराट पुरूषाच्या डोक्यावर उगवलेले केस आहेत. ज्याप्रमाणे हा व्यष्टिपुरुष सात वितीएवढा आहे, त्याप्रमाणे तो समष्टिपुरुषसुद्धा या लोकांसह त्याच्या सात वितीएवढाच आहे. (७-९)

भगवान कौस्तुभमण्याच्या रूपाने आत्मज्योतीलाच धारण करतात आणि त्याच्या परिसर व्यापून टाकणार्‍या प्रभेलासुद्धा वक्षःस्थळावर श्रीवत्सरूपाने धारण करतात. सत्त्व, रज इत्यादी गुणांच्या मायेला ते वनमालेच्या रूपाने, छंदाला पीतांबराच्या रूपाने, तसेच अ + उ + म या तीन मात्रांच्या प्रणवाला यज्ञोपवीताच्या रूपाने धारण करतात. भगवान, सांख्य आणि योगरूप मकराकृती कुंडले, तसेच सर्व लोकांना अभय देणार्‍या ब्रह्मलोकालाच मुगुटाच्या रूपाने धारण करतात. मूळ प्रकृती हीच त्यांची शेषशय्या आहे. तिच्यावर ते नेहमी विराजमान असतात आणि धर्म-ज्ञानादिकांनी युक्त असा सत्त्वगुण हे त्यांचे पद्मासन आहे. त्यांनी मन, इंद्रिये आणि शरीरसंबंधी शक्तींनी युक्त अशी प्राणतत्त्वरूप कौमोदकी गदा, जलतत्त्वरुप पांचजन्य शंख आणि तेजस्ततत्त्वरूप सुदर्शन चक्र धारण केले आहे. आकाशासारखे निर्मल आकाशस्वरूप खड्‍ग, तमोमय अज्ञानरूपी ढाल, काळरूप शार्ड्रःधनुष्य आणि कर्म हाच बाणांचा भाता धारण केला आहे. इंद्रियांनाच भगवंतांच्या धनुष्याचे बाण म्हटले आहे. क्रियाशक्तियुक्त मन म्हणजेच रथ होय. तन्मात्रा या रथाचे बाहेरचे भाग आहेत आणि अभय इत्यादी मुद्रांद्वारा त्यांचे वरदान, अभय इत्यादी रूपाने त्यांची क्रियाशीलता प्रगट होते. सूर्यमंडळ किंवा अग्निमंडळ हेच भगवंतांच्या पूजेचे स्थान होय. अंतःकरणाची शुद्धी म्हणजेच मंत्रदीक्षा आहे आणि आपली सर्व पापे नाहीशी करणे हीच भगवंतांची पूजा होय. (१०-१७)

समग्र ऐश्वर्य, धर्म, यश, लक्ष्मी, ज्ञान आणि वैराग्य हे सहा गुणरूप लीला-कमल भगवंत आपल्या हातात धारण करतात. धर्म आणि यशाला अनुक्रमे चवर्‍या आणि पंख्याच्या रूपाने तसेच निर्भय धाम वैकुंठाला छत्र रूपाने धारण केले आहे. तीन वेदांचेच नाव गरूड आहे. तेच अंतर्यामी परमात्म्याचे वहन करतात. आत्मस्वरूप भगवंतांपासून कधीही विभक्त न होणार्‍या त्यांच्या आत्मशक्तीचेच नाव लक्ष्मी आहे. भगवंतांच्या पार्षदांचे नायक विष्वक्‌सेन, पांचरात्र इत्यादी आगमरूप आहेत. भगवंतांचे स्वाभाविक गुण असणार्‍या अणिमा, महिमा इत्यादी अष्टमहासिद्धिंनाच नंद, सुनंद इत्यादी आठ द्वारपाल म्हणतात. शौनका ! स्वतः भगवानच वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चार मूर्तींच्या रूपात आहेत. त्यांनाच चतुर्व्यूह म्हटले जाते. तेच जागृती अवस्थेचे अभिमानी ‘विश्व’ होऊन बाह्य विषयांना ग्रहण करतात, स्वप्नावस्थेचे अभिमानी ‘तैजस’ होऊन मनाने अनेक विषय ग्रहण करतात, तेच सुषुप्ती अवस्थेचे अभिमानी असे ‘प्राज्ञ’ होऊन विषय आणि मनाच्या संस्कारांनी युक्त अशा अज्ञानाने झाकले जातात आणि तेच सर्वांच्या साक्षी अशा ‘तुरीय’ अवस्थेत राहून सर्व ज्ञानांचे अधिष्ठान या स्वरूपात राहातात. अशा प्रकारे अंगे, उपांगे, आयुधे आणि अलंकारांनी युक्त तसेच वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध या चार मूर्तींच्या रूपांमध्ये प्रगट होऊन सर्वशक्तिमान भगवान श्रीहरीच अनुक्रमे विश्व, तैजस, प्राज्ञ आणि तुरीय रुपाने प्रकाशित होतात. (१८-२३)

तेच सर्वस्वरूप भगवान, वेदांचे मूळ कारण आहेत. ते स्वयंप्रकाश आणि आपल्या महिम्याने परिपूर्ण असे आहेत. ते आपल्या मायेने ब्रह्मदेव इत्यादी नावांनी आणि रूपांनी या विश्वाची सृष्टी, स्थिती आणि संहार करतात. परंतु त्यामुळे त्यांचे ज्ञान कधी झाकले जात नाही. शास्त्रांमध्ये, ते वेगवेगळे असल्याचे वर्णन केले आहे हे खरे; परंतु ते आपल्या भक्तांना आत्मस्वरूप श्रीकृष्णा ! आपण अर्जुनाचे मित्र आहात. हे यदुवंशशिरोमणी ! आपण अवतार घेऊन पृथ्वीचा द्रोह करणार्‍या राजेलोकांचे भस्म करून टाकलेत. आपले सामर्थ्य कधीही नाहीसे होत नाही. गोप-गोपींचा समूह आणि नारद इत्यादी भक्त नेहमी आपल्या पवित्र यशाचे गायन करीत असतात. हे गोविंदा ! आपले नाम, गुण आणि लीला इत्यादींचे श्रवण करण्यानेच जीवाचे कल्याण होते. आम्ही सर्वजण आपले सेवक आहोत. आपण आमचे रक्षण करावे. जो मनुष्य या वर्णनाचा भगवंतांचे ठिकाणी चित्त एकरूप करून, त्याला सर्वांच्या ह्रदयात राहाणार्‍या ब्रह्मस्वरूप परमात्म्याचे ज्ञान होईल. (२४-२६)

शौनक म्हणाला - ब्रह्मर्षी श्रीशुकांनी कथा ऐकणार्‍या परीक्षिताला सांगितले होते की, ऋषी, गंधर्व, नाग, अप्सरा, यक्ष, राक्षस आणि देवता यांचा मिळून एक सौरगण तयार होतो आणि हे सातहीजण दर महिन्याला बदलत राहतात. हे बारा गण आपले स्वामी असणार्‍या बारा आदित्यांबरोबर राहून काय काम करतात आणि त्याच्या अंतर्गत असणार्‍या व्यक्तींची नावे काय आहेत ? सूर्याच्या रूपामध्येसुद्धा स्वतः भगवंतच आहेत. म्हणून त्यांचे विभागही आम्ही मोठ्या श्रद्धेने ऐकू इच्छितो. तरी ते आपण आम्हांला सांगावे. (२७-२८)

सूत म्हणतात - सर्व प्राण्यांचे आत्मा असणार्‍या विष्णूंच्या अनादी अविद्येमुळे लोकांना व्यवहार करण्यास प्रवृत्त करावे, म्हणून सूर्यमंडळाची निर्मिती झालेली आहे. तेच लोकांमध्ये भ्रमण करीत असते. सर्व लोकांचा आत्मा आदिकर्ता एकमेव श्रीहरीच सूर्य आहे. सर्व वैदिक क्रियांचे मूळ असणार्‍या त्याचे ऋषींनी अनेक रूपात वर्णन केले आहे. शौनका ! एक भगवानच मायेमुळे काल, देश, क्रिया, कर्ता, साधन, कर्म, वेदमंत्र, द्रव्य आणि फळ या नऊ प्रकारांनी सांगितले जातात. काळरूप धारण केलेले भगवान सूर्य, लोकांचे व्यवहार नीट चालण्यासाठी चैत्र इत्यादी बारा महिन्यांमध्ये आपल्या निरनिराळ्या बारा गणांसह फिरत असतात. (२९-३१)

शौनका ! धाता नावाचा सूर्य, कृतस्थली अप्सरा, हेती राक्षस, वासुकी सर्प, रथकृत यक्ष, पुलस्त्य ऋषी आणि तुंबुरू गंधर्व हे चैत्र महिन्यामध्ये आपापली कार्ये पार पाडतात. अर्यमा नावाचा राक्षस, पुंजिकास्थली अप्सरा, नारद गंधर्व आणि कच्छनीर साप, हे वैशाख महिन्यातील कार्यवाहक होत. मित्र सूर्य, अत्री ऋषी, पौरुषेय राक्षस, तक्षक साप, मेनका अप्सरा, हाहा गंधर्व आणि रथस्वन यक्ष, हे ज्येष्ठ महिन्यातील कार्ये चालविणारे होत. आषाढामध्ये वरुण नावाच्या सूर्यासह वसिष्ठ ऋषी, रंभा अप्सरा, सहजन्य यक्ष, हूहू गंधर्व, शुक्र नाग आणि चित्रस्वन राक्षस आपापली कामे करतात. श्रावणात इंद्र नावाचा सूर्य, विश्वावसू गंधर्व, श्रोता यक्ष, एलापत्र नाग, अंगिरा ऋषी, प्रम्लोचा अप्सरा तसेच वर्य नावाचा राक्षस आपापली कार्ये करतात. भाद्रपदात विवस्वान नावाचा सूर्य, उग्रसेन गंधर्व, व्याघ्र राक्षस, आसारण यक्ष, भृगु ऋषी, अनुम्लोचा अप्सरा आणि शंखपाल नाग, हे कार्ये करतात. माघ महिन्यामध्ये पूषा नावाचा सूर्य, धनंजय नाग, वात राक्षस, सुषेण गंधर्व, सुरूची यक्ष, घृताचि अप्सरा आणि गौतम ऋषी, हे असतात. फाल्गुन महिन्यात पर्जन्य नावाचा सूर्य, क्रतू यक्ष, वर्चा राक्षस, भरद्वाज ऋषी, सेनजित अप्सरा, विश्व गंधर्व आणि ऐरावत साप हे असतात. मार्गशीर्ष महिन्यात सूर्य अंशू, कश्यप ऋषी, तार्क्ष्य यक्ष, ऋत्सेन गंधर्व, उर्वशी अप्सरा, विद्युच्छ्त्रू राक्षस आणि महाशंख नाग, हे असतात. पौश महिन्यामध्ये भग नावाच्या सूर्यासह शूर्ज राक्षस , अरिष्टनेमी गंधर्व, ऊर्ण यक्ष, आयू रुषी, पूर्वचित्ती अप्सरा आणि कर्कोटक नाग, हे असतात. आश्विनात त्वष्टा सूर्य, जमदग्नी ऋषी, कंबल नाग, तिलोत्तमा अप्सरा, ब्रह्मपित राक्षस, शतजित यक्ष आणि धृतराष्ट्र गंधर्व हे, कार्य करतात. कार्तिक महिन्यामध्ये विष्णू नावाच्या सूर्याबरोबर अश्वत नाग, रंभा अप्सरा, सूर्यावर्चा गंधर्व, सत्यजित यक्ष, विश्वामित्र ऋषी आणि मखापेत राक्षस आपापली कार्ये पार पाडतात. (३३-४४)

ही सगळी रूपे म्हणजे सूर्यरूप भगवान विष्णूंच्या विभूती आहेत. जे लोक यांचे दररोज सकाळी आणि सायंकाळी स्मरण करतात, त्यांची सर्व पापे नष्ट होतात. हे सूर्यदेव आपल्या सहा गणांसह बाराही महिने सगळीकडे विहार करतात आणि इह-परलोकामध्ये विवेक-बुद्धिचा विस्तार आणि सामवेदातील सूर्यासंबंधी मंत्रांनी त्यांची स्तुती करतात, गंधर्व त्यांच्या सुयशाचे गायन करतात आणि अप्सरा नृत्य करीत करीत पुढे चालतात. (४५-४७)

नाग दोरखंडाप्रमाणे त्यांच्या रथाला बांधलेले असतात. यक्ष रथ तयार करतात आणि बलदंड राक्षस तो (रथ) पाठीमागून ढकलतात. याशिवाय वालखिल्य नावाचे साठ हजार निर्मळ स्वभावाचे ब्रह्मर्षी, सूर्याकडे तोंड करून त्यांच्या पुढे पुढे स्तुतिपाठ गात चालतात. अशा प्रकारे अनादी, अनंत, अजन्मा भगवान श्रीहरी हेच प्रत्येक कल्पामध्ये आपल्या स्वरूपाचा विभाग करून लोकांचे पालन-पोषण करीत असतात. (४८-५०)

अध्याय अकरावा समाप्त

GO TOP