|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय ९ वा
मार्कण्डेयाला मायेचे दर्शन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] सूत म्हणतात - बुद्धिमान मार्कंडेयाने जेव्हा अशी स्तुती केली, तेव्हा प्रसन्न होऊन नरासह असलेले भगवान नारायण मार्कंडेयाला म्हणाले. (१) भगवान नारायण म्हणाले - “हे श्रेष्ठ ब्रह्मर्षे ! चित्ताची एकाग्रता, तपश्चर्या, स्वाध्याय, संयम आणि माझी अनन्य भक्ती यांद्वारे तू सिद्ध झाला आहेस. तुझ्या ह्या नैष्ठिक ब्रह्मचर्यामुळे आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. तुझे कल्याण असो ! वर देणार्या सर्वांचा मी स्वामी आहे; म्हणून तुला इच्छित असणारा वर तू माझ्याकडून मागून घे." (२-३) मार्कंडेय म्हणाला - हे देवदेवेशा ! शरणागतांचे भय नाहिसे करणार्या हे अच्युता ! आपला जयजयकार असो ! आपण स्वतः दर्शन दिलेत, एवढा एकच वर आम्हांला पुरेसा आहे. ब्रह्मदेव इत्यादी देवगण योगाने परिपक्व झालेल्या मनानेच ज्यांच्या परम-सुंदर श्रीचरणकमलांचे दर्शन घेतात, तेच आपण आज माझ्या डोळ्यांसमोर प्रगट झालात. हे पवित्रकीर्ति-शिरोमणी ! कमलनयना ! असे असूनही, मी आपल्याकडे वर मागतो. जिला मोहित होऊन सर्व लोक आणि लोकपाल अद्वितीय वस्तू असलेल्या ब्रह्मामध्ये अनेक प्रकारचे भेद पाहू लागतात, ती आपली माया मी पाहू इच्छितो. (४-६) सूत म्हणतात - शौनका ! मार्कंडेय मुनीने जेव्हा अशा प्रकारे भगवान नर-नारायणांच्या इच्छेनुसार त्यांची स्तुती व पूजा केली आणि वर मागितला, तेव्हा हसून ते म्हणाले,‘ठीक आहे.’ यानंतर ते बदरीवनात आपल्या आश्रमाकडे गेले. मार्कंडेय मुनी आपल्या आश्रमात राहून आपल्याला मायेचे दर्शन केव्हा होईल, या एकाच गोष्टीचे चिंतन करीत असे. तो अग्नी, सूर्य, चंद्र, जल, पृथ्वी, वायू, आकाश तसेच अंतःकरणामध्ये एवढेच नव्हे तर सगळीकडे भगवंतांचेच चिंतन करीत मानसिक वस्तूंनी त्यांची पूजा करीत असे. कधी-कधी तर प्रेमाच्या पुरात बुडून जाऊन भगवंतांची पूजा विसरे. (७-९) हे शौनका ! एके दिवशी संध्याकाळच्या वेळी, पुष्पभद्रा नदीच्या तीरावर मार्कंडेय मुनी भगवंतांची उपासना करीत असता अचानक जोरदार तुफान आले. त्यावेळी तो वारा भयंकर आवाज करू लागला, त्या मागोमाग अक्राळ विक्राळ ढग आकाशात दिसू लागले. चमकणार्या विजा कडाडू लागल्या आणि रथाच्या धुर्याएवढ्या पावसाच्या मोठमोठ्या धारा पृथ्वीवर कोसळू लागल्या. त्यावेळी मार्कंडेयाला असे दिसू लागले की, चारही बाजूंनी चारही समुद्र सगळी पृथ्वीच गिळू लागले आहेत. वार्याच्या वेगाने समुद्रात प्रचंड लाटा उसळू लागल्या आहेत, मोठमोठे भोवरे उत्पन्न झाले आहेत आणि भयंकर आवाजामुळे कानठळ्या बसत आहेत. भयानक मगर ठिकठिकाणी उसळ्या मारीत आहेत. त्यावेळी आत-बाहेर सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागले. त्या अपार पाण्यामध्ये स्वर्गसुद्धा बुडून जाऊ लागला आहे. वरून प्रचंड वारा वाहात आहे आणि विजा चमकत आहेत की, ज्यामुळे सगळे जगच संत्रस्त झाले आहे. मार्कंडेय मुनीने जेव्हा असे पाहिले की, या जलप्रलयात सगळी पृथ्वी बुडून गेली आहे, चारही प्रकारचे प्राणी आणि आपण स्वतःसुद्धा अतिशय व्याकूळ झालो आहोत, तेव्हा मात्र तो भयभीत झाला. त्याच्या समोरच प्रलयसमुद्रामध्ये प्रचंड लाटा उसळत होत्या. तुफानाच्या वेगाने पाणी उसळत होते आणि प्रलयकालीन ढग पाऊस पाडून पाडून समुद्राला पाण्याने आणखीनच भरून टाकीत होते. समुद्राने द्विप, वर्ष आणि पर्वतांसह सगळी पृथ्वीच बुडवून टाकली होती. पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग, ज्योतिर्मंडल आणि दिशांसह तिन्ही लोक पाण्यात बुडून गेले. त्यावेळी तो वेड्याप्रमाणे किंवा आंधळ्याप्रमाणे जटा पसरून इकडून तिकडे भटकत होता. तो तहान-भुकेने व्याकूळ झाला होता. एका बाजूने मगरी तर दुसरीकडून मोठमोठे मासे त्याच्यावर तुटून पडत होते. एकीकडून वार्याचे झोत तर दुसरीकडून लाटांचे तडाखे त्याला घायाळ करीत. अशा प्रकारे भटकत असता तो अंधकारात पडला. तो इतका थकून गेला की, त्याला पृथ्वी आणि आकाश यांचीसुद्धा जाणीव राहिली नाही. कधी तो मोठ्या भोवर्यात सापडे, तर कधी त्याला लाटांचे तडाखे बसत. पाण्यातील प्राणी जेव्हा कधी एकमेकांवर आक्रमण करीत, तेव्हा हा अचानकपणे त्यांची शिकार होई. तो कधी शोकग्रस्त होई तर कधी मोहग्रस्त होई ! त्याला कधी दुःख तर कधी भय उत्पन्न होई. कधी मृत्यू येई, तर कधी निरनिराळ्या प्रकारचे रोग त्रासून सोडीत. अशा प्रकारे भगवंतांच्या मायेत गुरफटून त्या प्रलयकाळच्या समुद्रात भटकता भटकता त्याची शेकडो, हजारो, नव्हे तर लक्षावधी, कोट्यावधी वर्षे निघून गेली. (असे त्याला वाटले.) (१०-१९) मार्कंडेय अशा प्रकारे भटकत असता एकदा त्याला पृथ्वीच्या एका उंबरठ्यावर एक लहानसे वडाचे झाड दिसले. त्यावर पाने आणि फळे शोभून दिसत होती. वडाच्या झाडाच्या ईशान्येला एक डहाळी होती. तिच्यावर द्रोणाच्या आकाराचे एक पान होते. त्यावर एक बालक पहुडला होता. त्याच्या शरीरातून बाहेर पडणार्या तेजाने आसपासचा अंधार नाहीसा झाला होता. तो बालक पाचूच्या खड्यासारखा सावळ्या वर्णाचा होता. मुखकमल सौंदर्यसंपन्न होते. मान शंखासारखी होती. छाती रूंद होती. सुंदर नाक होते आणि भुवया अतिशय मनोहर होत्या. श्वासाने त्याचे कुरळे केस हलत होते. शंखाप्रमाणे असलेल्या कानांवर डाळिंबाची फुले शोभून दिसत होती. पोवळ्याप्रमाणे असणार्या लाल ओठांच्या कांतीने अमृतासारखे शुभ्र हास्य थोडेसे लालसरसे दिसत होते. डोळ्यांच्या कडा कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर होत्या. हास्ययुक्त नजर मनोहारी होती. खोल नाभी असलेले इवलेसे पोट पिंपळाच्या पानाप्रमाणे दिसत होते आणि श्वास घेताना त्यावरील वळ्या हलत होत्या. तो बालक सुंदर बोटे असलेल्या दोन्ही करकमलांनी चरणकमल तोंडात धरून चोखीत होता. हे पाहून मार्कंडेय आश्चर्यचकित झाला. (२०-२५) त्याला पाहाताच मुनीचा सर्व थकवा नाहीसा झाला. आनंदाने त्याचे ह्रदयकमल आणि नेत्रकमल प्रफुल्लित झाले. शरीर पुलकित झाले. त्या बालकाचे भाव पाहून “हा कोण आहे?” इत्यादी निरनिराळ्या शंका त्याच्या मनात उत्पन्न झाल्या आणि त्यालाच हे विचारावे, म्हणून तो त्याच्याकडे पुढे सरकला. इतक्यात त्या बालकाच्या श्वासाबरोबर तो, एखादा डास आत जावा, तसा त्याच्या शरीरात गेला. तेथेही त्याने प्रलयाच्या अगोदर बाहेर जशी सृष्टी पाहिली होती, तशीच ती संपूर्णपणे आत पाहिली. ते पाहून तो अधिकच चकित झाला. त्याला काहीच कळेना ! त्याने त्याच्या शरीरात आकाश, अंतरिक्ष, ज्योतिर्मंडल, पर्वत, समुद्र, द्विप, वर्षे, दिशा, देवता, दैत्य, वन, देश, नद्या, नगरे, खाणी, गावे, गौळवाडे, आश्रम, वर्ण, त्यांचे आचार, पंचमहाभूते, त्यांनी बनलेली शरीरे व वस्तू, अनेक युगे आणि कल्प याच्या भेदांनी युक्त असे काल इत्यादी पाहिले. एवढेच नव्हे, तर ज्यामुळे जगाचा व्यवहार चालतो, ते सर्व तेथे खरे असल्यासारखेच होते. हिमालय पर्वत, तीच पुष्पवहा नदी, आपला आश्रम आणि तेथे राहाणारे ऋषीसुद्धा पाहिले. अशा प्रकारे संपूर्ण विश्व पाहात असतानाच तो त्या बाळाच्या उच्छ्वासातून बाहेर आला आणि पुन्हा त्या प्रलय-समुद्रात येऊन पडला. पुन्हा त्याला असे दिसले की, समुद्रामध्ये पृथ्वीच्या एका टेकडावर तेच वडाचे झाड असून त्याच्या पानाच्या द्रोणात तोच बालक पहुडला आहे आणि तो प्रेमामृताने परिपूर्ण असे मंद हास्य करीत आपल्याकडे कटाक्ष टाकीत आहे. बालकाच्या रूपातील इंद्रियातील भगवंतांना मुनीने आपल्या डोळ्यांच्याद्वारे आत नेऊन ह्रदयात स्थिर केले होते. आता त्याला आलिंगन देण्यासाठी मुनी अतिशय कष्टाने पुढे सरकला. (२६-३२) इतक्यात ते योगांचे अधिपती आणि सर्वांच्या ह्रदयात राहाणारे भगवान लगेच अंतर्धान पावले. जसे असमर्थ पुरूषांचे परिश्रम फळ न देताच वाया जातात, तसे. हे शौनका ! तो बालक अंतर्धान पावताच ते वडाचे झाड, ते पाणी, तो प्रलयाचा देखावा तर काय, तो पहिल्यासारखाच आपल्या आश्रमात बसलेला आहे. (३३-३४) अध्याय नववा समाप्त |